मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “९ ऑगस्ट :: आंतरराष्ट्रीय मूलनिवासी (?) दिवस” ☆ सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “९ ऑगस्ट :: आंतरराष्ट्रीय मूलनिवासी (?) दिवस” ☆ सुश्री शोभा जोशी ☆

एखादी गोष्ट आपल्याला वरकरणी खूप छान वाटते. मात्र त्यामागचं सत्य फार भयानक असतं. अगदी हीच गोष्ट या मूलनिवासी (आदिवासी) दिनाच्या बाबतीत आहे. खरं तर ९ आॅगस्ट हा जनजातींसाठी /मूलनिवासींसाठी उत्सवाचा दिवस नसून तो रक्तरंजित इतिहासाचा दिवस आहे, हे त्यामागचं सत्य कळल्यावर पटतं.

९ आॅगस्टचा इतिहास…. १९४२ साली भारतातील व्यापारासाठी, भारताचा मार्ग शोधण्यासाठी निघालेला कोलंबस चुकून अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर जाऊन पोहोचला. त्यावेळी अमेरिकेत ५ मूलनिवासींचे आदिवासींचे आधिपत्य होते. चॅराॅकी, चिकासो, चोक्ताव, मास्कोगी व सेमिनाॅल या त्या प्रमुख जमाती – – – कोलंबसला वाटले, हाच भारत देश आणि हे भारतीय लोक. म्हणून ते रेड इंडियन. विस्तृत क्षेत्रात सुखासमाधानाने नांदणार्‍या या जमातींच्या सुखाला कोलंबसच्या येण्याने ग्रहण लागले.

व्यापारासाठी निरनिराळी क्षेत्रे शोधणे ही तर गोर्‍यांची खासियत. या व्यापारवृध्दीच्या मोहापायी ब्रिटिशांनी अमेरिकेत शिरकाव केला आणि तेथील जमातींच्या जमिनी हडप केल्या आणि तिथल्या मूलनिवासींना बेघर केले. गोर्‍यांनी आपल्या वसाहाती वाढवल्या. हळू हळू चर्चच्या प्रभावाखाली येऊन अमेरिका, न्यूझिलंड, आस्ट्रेलिया या देशांनी अमानुषपणे तेथील मूलनिवासिंना त्याच्या जन्मभूमीतून नष्ट केले.

९आॅगस्ट १६१० या दिवशी अमेरिकेतील पवनहाट युध्द सुरू झाले, गोरे युरोपियन आणि मूलनिवासी यांच्यातील हे युध्द. अर्थातच संख्येने कमी असलेल्या मूलनिवासींचा पराभव झाला. १६१०ते १७७५ या काळात इंग्रजांनी अमेरिकेच्या मूलनिवासींना अनन्वीत अत्याचाराने, अतिशय अमानुष पध्दतीने त्यांना ठार केले. त्यांच्याविरूध्द विश्र्वातील पहिले रासायनिक युध्द केले गेले. त्यात ८०% मूलनिवासिंना तडफडून मारले गेले.

कोलंबसच्या अमेरिकेतील पदार्पणाला ९ आॅगस्ट १९९२ ला ५०० वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्ताने ‘ कोलंबस डे…. थॅंक्स गिव्हिंग डे ‘ साजरा करण्याची जोरात तयारी सुरू होती. पण तिथे शिल्लक असलेल्या मूलनिवासींनी त्याविरूध्द जोरदार आवाज उठवला. कारण त्यांच्यासाठी तो विनाशकारी दिवस होता. कोलंबसच्या पदार्पणामुळे त्यांच्या सगळ्या जमाती नष्ट झाल्या होत्या. संस्कृती नष्ट झाली होती. ८०% मूलनिवासींचे हत्त्याकांड झाले होते. मूलनिवासींच्या या रोषाला शांत करण्यासाठी अमेरिकेने ‘ इंडिजिनियस पिपल्स डे ‘ साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून ९ आॅगस्ट हा दिवस ‘ मूलनिवासी /आदिवासी दिवस ‘ म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. पण संख्येने कमी असले तरी अजूनही हे मूलनिवासी त्याला विरोध करतात. कारण त्यांच्यासाठी हा रक्तरंजित नरसंहार दिवस आहे.

काही शतकानंतर मूलनिवासींनी पुन्हा अन्यायाला वाचा फोडली. त्यांना अधिकार मिळवून देण्यासाठी, २००७ साली संयुक्त राष्ट्रसंघाने साळसूदपणे जाहिरनामा काढला. भारताने त्यावर सही केली पण मूलनिवासी ही संकल्पनाच मान्य नसल्याचे भारताने स्पष्ट केले. कारण भारतातील सर्व जाती-धर्मांचे, पंथाचे लोक मूलनिवासीच आहेत. आदिवासी नाहीत. (आदिवासी म्हणजे इथले मूळचे रहाणारे व बाकीचे बाहेरून आलेले असा अर्थ होतो. भारतातील सर्व लोक मुळचे इथलेच आहेत. बाहेरून आलेले कोणीच नाहीत. म्हणून ते सर्व मूलनिवासीच आहेत. त्यातील कोणी आदिवासी नाही.) भारतीय राज्यघटनेनुसार जंगलात/वनात वास्तव्य करणार्‍यांना अनुसूचित जमाती (जनजाती) संबोधले जाते.

भारतातील परिस्थिती- भारतात सुध्दा विविधप्रकारांनी या जमातींवर जनजातींवर ब्रिटिशांनी अन्याय अत्याचार केले आहेत.

– – स्वातंत्र्यानंतर आपल्या राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. भारतामध्ये सर्व जनजातींना सन्मानाने वागविले जाते.

भारतातील सर्व मूलनिवासीच आहेत, तरीसुध्दा भारतातील काही देशविघातक शक्ती व गोरे लोक जनजाती व इतर समाजामध्ये फूट पाडण्यासाठी, ‘तुम्ही आदिवासी आहात ‘ हे त्यांना ठासून सांगण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना ९ आॅगस्ट हा दिवस ‘ आदिवासी दिवस ‘ म्हणून साजरा करायला लावतात. तरूणांना भडकावतात. तरूणांना वाटते, हा दिवस आपल्या पूर्वजांचा गौरव करण्याचा दिवस आहे. या भावनेने ते तो साजरा करतात. या तरूणांना किंवा हा दिवस साजरा करणार्‍या इतर लोकांना या षड्यंत्राची कल्पना नाही. पण आता सत्य कळल्यानंतर सर्व जनजातींनी जागृत होणं आवश्यक आहे.

सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘कन्येला वडिलांचे गोत्र का मिळत नाही?…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘कन्येला वडिलांचे गोत्र का मिळत नाही?’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

 – – – एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्पष्टीकरण…

आपल्याला माहीत आहे की स्त्रियांमध्ये XX गुणसूत्रं आणि पुरुषांमध्ये XY गुणसूत्रं असतात.

जेव्हा संतती होते….

जर पुत्र झाला तर त्याचे गुणसूत्र XY असतात. यातलं Y गुणसूत्र केवळ वडिलांकडूनच येते, कारण आईकडे Y गुणसूत्र नसते.

जर कन्या झाली तर तिचं गुणसूत्र XX असतं.

एक X वडिलांकडून आणि दुसरं X आईकडून येतं.

०१ XX गुणसूत्र (कन्या)

कन्येमध्ये असलेले दोन X गुणसूत्र आई-वडिलांकडून मिळतात. हे दोन्ही गुणसूत्र “cross over” नावाची एक प्रक्रिया करतात, ज्यात दोन्ही गुणसूत्रांची अदलाबदल होते. त्यामुळे एकमेकात मिश्रण होते.

०२ XY गुणसूत्र (पुत्र)

पुत्रामध्ये Y गुणसूत्र वडिलांकडूनच येते. XY मध्ये असमानता असल्यामुळे फक्त 5% cross over होतो आणि Y गुणसूत्र जवळपास 95% जसंच्या तसं (intact) राहते त्यामुळे हे गुणसूत्र वडिलांकडून तंतोतंत आलेलं असतं.

गोत्र प्रणाली आणि Y गुणसूत्र 

गोत्र ही वैदिक प्रणाली Y गुणसूत्र वर आधारित आहे. म्हणजेच, जेव्हा एखाद्याचं गोत्र कश्यप असतं, तेव्हा त्याचं Y गुणसूत्र “कश्यप ऋषी” पर्यंत मागे जातं.

कारण स्त्रियांमध्ये Y गुणसूत्र नसते, म्हणूनच विवाहानंतर तिला नवऱ्याच्या गोत्रात समाविष्ट केलं जातं.

सगोत्र विवाह वर्ज्य का?

जर दोघांचं गोत्र एकच असेल, तर त्यांच्या पूर्वजांमध्ये एकच ऋषी असतो म्हणजेच ते एकाच कुटुंबातून आलेले असतात त्यामुळे त्यांना बंधुभगिनी मानलं जातं.

आजच्या जनुकशास्त्र (Genetics) नुसार सुद्धा, एकसारखी जनुके असलेल्या व्यक्तींमध्ये विवाह झाल्यास, त्यांच्या संततीमध्ये मानसिक/शारीरिक अपंगत्व, गंभीर आजार यांसारख्या अनुवांशिक दोषांचं प्रमाण वाढतं. त्यामुळे सगोत्र विवाह वर्ज्य केला आहे.

मुलगा व मुलगी DNA चे प्रमाण

पुत्रामध्ये वडिलांकडून 95% आणि आईकडून 5% DNA येतो.

कन्येमध्ये आई-वडिलांकडून 50-50% DNA येतो.

जर कन्येलाही कन्या झाली, आणि पुन्हा तिलाही मुलगी झाली, तर सातव्या पिढीपर्यंत वडिलांचा डीएनए केवळ 1% राहतो. म्हणजेच, वडिलांचा Y गुणसूत्र वारसा फक्त पुत्रा मार्फत टिकतो.

सात जन्मांचा संबंध :

वडिलांचं Y गुणसूत्र सतत पुत्रापासून पुढे जात राहतं. त्यामुळे DNA वारसा अमर राहतो आणि हेच सात जन्मांचं नातं दर्शवतं. म्हणूनच पूर्वज आपल्याला आशीर्वाद देतात कारण आपण त्यांच्या गुणसूत्रांचे वाहक असतो.

कन्यादानाचा अर्थ :

कन्यादान म्हणजे कन्येला वस्तू मानणं नाही, तर हे एक वैज्ञानिक संस्कार आहे. विवाहासाठी कन्या गोत्रमुक्त केली जाते म्हणजे ती वडिलांच्या गोत्रातून बाहेर पडते आणि नवऱ्याच्या गोत्रात समाविष्ट होते.

विवाहित स्त्री नवऱ्याच्या वंशाला रजदान (Monthly Menstrual Cycle द्वारे) करते म्हणजे ती त्या वंशाच्या संततीची माता होते. त्यामुळे माता म्हणून तिचा सन्मान केला जातो.

निष्कर्ष :

हिंदू गोत्र परंपरा ही विज्ञानाशी सुसंगत आहे. गोत्र ही केवळ एक धार्मिक संकल्पना नसून, त्यामागे दीर्घकालीन अनुवांशिक शुद्धता राखण्याचं अत्यंत परिपूर्ण तत्त्वज्ञान आहे ज्याचं ज्ञान आपल्या ऋषींनी विज्ञानाच्या आधुनिकतेपूर्वीच दिलं होतं.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कैकयी – लेख क्र. ८ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ कैकयी – लेख क्र. ८ ☆ सौ. मंजिरी येडूरकर

(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)

तुम्ही… तुम्ही साऱ्यांनी मला खलनायक ठरवलंत. नाही नाही ते आरोप केलेत. कुणीही असा विचार केला नाही की मी हा निर्णय का घेतला असेल! अहो, भरता पेक्षा माझं रामावर जास्त प्रेम होतं आणि खरं म्हणजे हे साऱ्यांना माहिती होतं. तरी सुद्धा कुणाला काही शंका आली नाही. मला स्वार्थी ठरवणं सोपं होतं, तुम्ही ठरवून टाकलं. ती बिचारी मंथरा, कां मला असं काही सांगेल की ज्याचा परिणाम तिच्या राजवाड्यातल्या अस्तित्वावर होणारा होता. पण नाही तिलाही सहज दुष्टांच्या रांगेत बसवलंत.

या कैकयीला वारसा हक्काने फक्त रूपच मिळालं होतं असं नाही तर युद्ध कौशल्य, राज्य कारभार निपुणता, बुद्धिमत्ता, मुत्सद्दीपणा याही गोष्टी मिळाल्या होत्या. मला एक सांगा, महाराजांना पुत्रशोकांने मृत्यू येईल असा शाप मिळाला होता. याचा अर्थ काय होतो हो, महाराजांचा मृत्यू होण्यापूर्वी माझ्या एका पुत्राचा मृत्यू होणार, हे नक्की नां! जसजसं महाराजांचं वार्धक्य जवळ यायला लागलं तसतसं हे सत्य काळीज पोखरत होतं. आधीच पुत्रप्राप्ती महाराजांना फार उशिरा झाली. त्या भरल्या गोकुळात महाराज शापाचा विषय विसरून गेले. पण मी मात्र एकही दिवस सुखाने जागी झाले नाही की सुखाने झोपू शकले नाही. मुलांचे हसरे चेहरे पाहिले की पोटात कालवायचं. वाटायचं, या शापाशी या निरागस मुलांचा काय संबंध? त्यांना कां शिक्षा? कुणाही एकाला गमावलं असतं तर महाराजच काय, आम्ही सारे पुत्रशोकांने मेलो असतो. सगळे इतके आनंदी होते की या गोष्टीची कुणाला आठवण करून देण्याचं माझं धाडस झालं नाही. काही सुचत नव्हतं. काहीतरी जादू व्हावी असं वाटायचं आणि कोणत्याही पुत्राचा मृत्यू न होता महाराजांना पुत्र शोक व्हावा. कारण महाराजांचा मृत्यू तर अटळ होता. या रोजच्या भीतीने काळजाला घरं पडत होती. अखेरीस मी सरस्वतीला साकडं घातलं. मला मार्ग दाखव म्हणाले. तेव्हा ती मंथरेच्या तोंडून वदली की, ” एका मुलाला वनवासाला पाठव. ” कुणाला वनवासाला पाठवू? वयाने त्यातल्या त्यात मोठा, परिपक्व, वनवासात तग धरू शकेल, असा रामच होता ना!

देव व असूर यांच्या युद्धाच्या वेळी इंद्रदेवांनी महाराजांकडे मदतीची याचना केली. रावणाने देवांची केलेली अवस्था बघून मी महाराजांचं सारथ्य करायचं ठरवलं. कारण हे युद्ध शस्त्रांपेक्षा मुत्सद्देगिरीनं लढायला हवं होतं. शत्रू बलाढ्य होता. युद्धात रथाचं चाक तुटलं. तेव्हा मी ते बोटांनी उचलून धरलं, युद्ध संपेपर्यंत! त्यामुळे विजय प्राप्त होऊ शकला. तेंव्हा महाराजांनी मला दोन वर दिले. मी तर महाराजांची पट्ट राणी होते. काय मागणार, कसलीच कमतरता नव्हती.

वाली हा सुग्रीवाचा भाऊ. त्याच्यासमोर जो कोणी युद्धाला उभा राहील त्याची अर्धी शक्ती वालीला मिळणार असा त्याला वर मिळाला होता. त्यामुळे तो स्वतःला अजेय समजू लगला होता. वाली सगळ्यांनाच त्रासदायक झाला होता. महाराज व मी वनविहार करताना वाली समोर आला, युद्धासाठी ललकारू लागला. महाराजांनी हार पत्करली पण आपला मुकुट गमावला. नंतर तो मुकुट वाली कडून रावणाकडे आला होता. एवढा मोठा अपमान मी विसरू शकत नव्हते. वालीला धडा शिकवणं व तो मुकुट रावणाकडून हिसकावून घेणं किंवा त्याला लाचार करून माफी सह मुकुट परत करण्यास भाग पाडणे हेच माझं ध्येय होतं.

रावण पराक्रमी होता त्याच्याकडे मायावी शक्ती होती. त्यालाही अमर, अजेय करणारे वर मिळाले होते. तो गर्वांध झाला होता. त्याचा पुत्र मेघनाद याने इंद्राचाही पराभव केला होता. वालीसारखा योद्धा त्याच्याकडे होता. त्याला टक्कर देणं एवढं सोपं नव्हतं. मुलांचं युद्ध कलेचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरु विश्वामित्रांनी राम व लक्ष्मण यांना असुरांच्या निर्दालनासाठी नेलं. त्यांनीही ताडका, सुबहू अशा राक्षसांचा वध केला. रामाने मारीच राक्षसाला एका बाणात थेट लंकेत फेकून दिलं. परत येताना अहिल्या उद्धार केला. शिवधनुष्य तोडून सीतेला जिंकलं. हे सारं पाहून रामा मध्ये असणाऱ्या फक्त शूरत्वाचीच नव्हे तर देवत्वाचीही जाणीव मला झाली. त्यामुळं वाली, रावण यांचं निर्दालन फक्त रामच करू शकतो, याबद्दल माझी खात्री झाली. अर्थात मुकुटाचा प्रसंग, शिकारीच्या वेळी मिळालेल्या शापाचा प्रसंग कुणालाच माहिती नव्हता. तो मी प्रथम रामाला सांगितला. त्याला सांगितलं की हा मुकुट परत मिळवणं सोपं नाही, हे मला माहित आहे. ते सोपं करण्यासाठी रावणाचा बलाढ्य साथी, वाली, तुला आधी नष्ट करावा लागेल. म्हणजे वानर सेना तुझी होईल. तिथल्या जनमानसात रावणविरोधी मत बनवावं लागेल. तिथल्या वनवासी लोकांना एकत्र करावं लागेल. आदिवासी लोक बहाद्दूर असतात. त्यांना मदतीला घे. जर तुला राज्याभिषेक झाला व मग वनवासाला गेलास तर राजा म्हणून ते वनवासात तुझ्याशी मैत्री करणार नाहीत. अयोध्येचं सैन्य रावणाच्या सैन्यापुढे टिकाव धरू शकणार नाही. त्यामुळे तू वनवासाला जा. भरताचा राज्याभिषेक करूया. पण ही गोष्ट कुणालाही सांगू नकोस. याला प्रचंड विरोध होईल. अगदी अयोध्येचा जनसागर ही मागे राहणार नाही. त्यामुळे मी महाराजांनी मला दिलेल्या वचनांचा उपयोग करून घेते. कारण ‘प्राण गेले तरी वचन मोडणार नाही ‘ हे आपले तत्व सर्वांना परिचित आहे.

सगळं ठरवल्याप्रमाणे झालं. त्यातच शूर्पणखेचा अपमान झाला. त्यामुळे तिच्या भावाने युद्ध पुकारलं. त्यात तिचा भाऊ व बरेच राक्षस मारले गेले. याचा बदला घेण्यासाठी रावणाने सीतेला पळवून नेलं. त्यामुळे रामाला सर्वांची सहानुभूती मिळाली. रावणाचा विनाश करणं ही सगळ्या आदिवासींना आपली जबाबदारी वाटली. व रावणाचा शेवट झाला. आता या सगळ्यात सांगा बरं, मी काय चूक केली. महाराजांचा मृत्यू फार पूर्वीच लिहिला गेला होता, तरीही त्यांच्या मृत्यूला मला जबाबदार धरलं. मी एकाही पुत्राचा मृत्यू होऊ दिला नाही हे मात्र कोणालाच जाणवलं नाही. रामाचं वनवासाला जाणं, महाराजांचा मृत्यू या गोष्टींचा मानसिक त्रास सर्वांसारखाच मलाही होणार होताच ना? कां या दुःखापेक्षा भरताला राज्याभिषेक करणं मला जास्त आनंददायी होतं? माझ्या पोटच्या मुलानंही मला वैरीण ठरवलं. पुन्हा माझं तोंड बघायलाही तो आला नाही. याची मला आधी कल्पना नव्हती असं वाटतंय कां तुम्हाला? या घटनेनंतर आपलं काय होणार हे पुरेपूर माहीत असून मी काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेतला. तो केवळ पुत्राचा मृत्यू न होता पुत्र शोक व्हावा यासाठी, आणि वाली व रावणाकडून झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी. कारण हा अपमान फक्त माझा किंवा महाराजांचा नव्हता तर साऱ्या राज्याचा होता. वाईट एवढंच वाटतंय की माझं हे बलिदान व्यर्थ गेलं नसलं तरी ते कुणालाच कळलंही नाही!!!

(मुकुटाची कथा ‘ रामायणातील काही माहिती नसलेल्या गोष्टी ‘ या सदरात मिळाली. काहींच्या मते ही खोटी आहे असंही वाचनात आलं. पण रामाने वालीचा वध करून सुग्रीव याला राजा करण्याच्या कृतीला पुष्टी मिळण्यासाठी उपयोगी असल्याने लेखात घेतली आहे.) 

– लेख क्र. ८ 

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज” – लेखक : अज्ञात☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

अमरावती जिल्ह्याच्या चांदूरबाजार तालुक्यातील यावली हे तुकडोजींचे जन्मगाव. त्यांचे आजोबा गणेशपंत हे विठ्ठलाचे निस्सीम उपासक होते. आषाढी एकादशीची पंढरीची वारी त्यांनी कधीही चुकविली नाही. संपूर्ण ज्ञानेश्वरी त्यांना मुखोद्गत होती. त्यांना सात मुली आणि एक मुलगा झाला. त्या मुलाचे नाव होते, बंडोपंत. हेच तुकडोजींचे पिता होत. त्यांच्या वागण्यातील बंडखोरीमुळे त्यांना बंडोपंत हे नाव मिळाले होते. त्यांचा पंढरीच्या वारीवर मुळीच विश्वास नव्हता. कारण की, ही वारी करणाऱ्या त्यांच्या वडिलांच्या आर्थिक परिस्थितीत कोणतीही प्रगती झाली नव्हती. त्यांची पत्नी म्हणजे अमरावती जिल्ह्यातील वरखेड येथील तुकारामबुवा वानखेडे यांची मुलगी मंजुळा. तिच्या पोटी ३० एप्रिल १९०९ रोजी तुकडोजीचा जन्म झाला. वरखेड येथील संत आडकोजी महाराज यांनी बाळाला भाकरीचा तुकडा भरविला व त्याचे नाव ठेवले तुकड्या. बंडोजींचा स्वभाव धरसोडपणाचा होता. त्यामुळे माता मंजुळा आणि तुकड्या यांची नेहमीच फरफट होत असे. अशा ताण-तणावात तुकड्याचे बालपण गेले. वडिलांच्या व्यसनी वृत्तीमुळे तुकड्या संसारापासून विरक्त झाला.

नागपूर जिल्ह्यातील रामटेक आणि चंद्रपूर जिल्ह्यातील रामदिघी तसेच चिमूर येथील अरण्यात त्याने साधना केली. या दरम्यान अनेक साधू-संतांचा सहवास त्याला लाभला. त्यातून तुकड्याचे व्यक्तिमत्त्व आकाराला आले व तुकडोजी महाराज या नावाने त्यांना ओळखले जाऊ लागले. आदिवासींच्या व्यथा-वेदना जाणून त्यांनी त्यांची मनोभावे सेवा केली. समाजातील कुरीतीविरुद्ध जन-जागरण करण्याकरिता त्यांनी कवने रचलीत. खंजिरी वाजवून ते भजने करीत असत. त्यांच्या भजनांची पुस्तकेही प्रकाशित झालीत. त्यांच्या समाजहितकारक कार्यामुळे त्यांचा महात्मा गांधीजींशी परिचय झाला व ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सामील झालेत. भारत छोडो आंदोलनात त्यांना अटक झाली आणि तुरुंगवासही भोगावा लागला होता. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत त्यांनी दहा दिवसात ११४१० एकर जमीन मिळवून देवून अतिशय मोलाचे योगदान दिले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी देशाच्या उभारणीत सहभाग घेतला. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत या उपाधीने संबोधले. त्यामुळे सारेच त्यांना राष्ट्रसंत म्हणून संबोधू लागले.

पंढरीची वारी आणि अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेश आंदोलन

आपल्या आजोबा आणि आजीप्रमाणेच तुकडोजी महाराजही नियमितपणे आषाढी एकादशीला पंढरीच्या वारीला न चुकता जात असत. २१ जुलै १९४५ रोजी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला तुकडोजी गेले असता त्यांनी अस्पृश्यांना मंदिराबाहेर दर्शनासाठी ताटकळत असताना पाहिले. आपल्या दुःखाला वाट करून देण्याकरिता ते विठ्ठल मंदिरासमोर असलेल्या संत चोखामेळा यांच्या पायरीवर बसले. नेहमी मंदिरात सहज प्रवेश करणारे महाराज असे बाहेर का बसले आहेत असा प्रश्न बडव्यांना पडला. तेथे उपस्थित वारकऱ्यांमध्येही पंढरपूरला येऊनही विठ्ठलाचे दर्शन न करणाऱ्या महाराजांबद्दल प्रश्न पडला. खरे कारण कळल्यावर त्यांच्यामध्येही गोंधळ उडाला. त्यामुळे धर्ममार्तंड अस्वस्थ झाले. त्यांच्यापैकी काहींनी त्याविषयी विचारल्यावर महाराज म्हणाले:

“समाजात काही विशिष्ट जातीत जन्मास आलेल्या लोकांना इतर अनेक बाबतीत मागे पडावे लागते, अनेक न्याय्य लाभांपासून दूर राहावे लागते, ही वस्तुस्थिती अत्यंत खेदजनक आहे, यात शंका नाही. परंतु या सर्वांवर कळस चढविणारी गोष्ट म्हणजे कित्येकांना ‘ पतितपावन’ भगवंताच्या मंदिरात जाऊन त्याचे दर्शन घेण्यासही बंदी केली जाते. देवाच्या दर्शनाने ते पावन होण्याऐवजी त्यांच्या सावलीने देवच बाटतो, असे अत्यंत विसंगत व विकृत विचार मांडून लोक त्यांना कुत्र्या-मांजरापेक्षाही नीच लेखतात. मानवतेला व भक्तिभावाला कलंक लावणारी गोष्ट याहून दुसरी कोणती? ”

महाराजांनी आपले याविषयीचे मत काही कार्यकर्त्यांकडे लेखी स्वरुपात दिले. ते कळताच काही सनातन्यांनी महाराजांना शास्त्रार्थ करण्याचे आव्हान दिले. त्याला योग्य शब्दात महाराजांनी पत्र दिले. परंतु त्या पत्राचे उत्तर मात्र मिळाले नाही. एका कीर्तनकाराने मिश्किलपणे प्रश्न केला की, वरखेडच्या आपल्या गुरुमहाराजांच्या समाधी मंदिराचं काय? ” त्यावर महाराज म्हणाले की, ” याच कारणाने मी स्वतः उभारलेल्या समाधी मंदिरात जाण्याचे सोडले आहे. पंढरपूरहून महाराज वरखेडला आल्यावर तेथील लोकांनी आपण पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश का केला नाही, हा प्रश्न केला. त्यावर महाराजांनी तेथील वृत्तांत त्यांना सागितला आणि जोपर्यंत याही ठिकाणी अस्पृश्यांना प्रवेश नसेल तर मीही या मंदिरात जाणार नाही असे ठामपणे सांगितले. महाराजांचा हा दृढ निश्चय पाहून गावकरी मंडळींनी ७ ऑगष्ट १९४६ रोजी सर्वांसाठी आडकोजी महाराजांचे समाधी मंदिर खुले केले. तेथील कार्यकर्त्यांनी महाराजांच्या विनंतीनुसार गावातील अस्पृश्यांना आपल्या हातात हात धरून मंदिरात नेले. सार्वजनिक विहिरी आणि मंदिरे सर्वांसाठी खुल्या कराव्यात असे मत आपल्या भजनामध्ये महाराजांनी मांडले होते, त्यानुसार ते आग्रही होते. त्यानुसार गावोगावच्या गुरुदेव सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील मंदिरे आणि विहिरी अस्पृश्यांसाठी खुल्या केल्यात. त्यामुळेच अस्पृश्यांसाठी पंढरपूरचे मंदिर खुले व्हावे यासाठी आमरण उपोषण आंदोलन करणाऱ्या पू. साने गुरुजी यांच्यासोबत तुकडोजी होते. साने गुरुजींनी ४ नोव्हेंबर १९४६ रोजी आमरण उपोषण सुरू केले, तेव्हा तुकडोजींनी त्यांना पाठिंबा दिला. १० मे १९४७ रोजी साने गुरुजींचे उपोषण संपले, तेव्हाही तुकडोजी त्यांच्यासोबत होते. विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले.

ग्रामगीतेची प्रेरणा पंढरपुरात

२३ जुलै १९५३ या दिवशी आषाढी एकादशी होती. या दिवशी पंढरपूरला महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून आलेले पांडुरंगाचे भक्त पाहून त्यांच्याकरिता आपण काय करू शकतो हा विचार त्यांच्या मनात आला. त्यांच्या संवेदना तीव्र झाल्यात आणि त्यांनी सर्व सामान्य माणसाकरिता ‘ ग्रामगीता ‘ हा ग्रंथ लिहिण्याचा संकल्प केला. महात्मा गांधी यांच्या ग्रामस्वराज्याची संकल्पना या ग्रंथामधून त्यांनी विस्ताराने सांगितली आणि आपल्या चिंतनाचे सारही त्याद्वारे व्यक्त केले. आपल्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून राष्ट्रसंतांनी चार-पाच महिन्यांमध्ये ग्रामगीतेची रचना केली. त्यांनी ४१ अध्यायांमधून ४६७५ ओव्या रचल्यात. प्रवासातही ते ग्रामगीतेचे लेखन करीत असत. गावाचा पोशिंदा शेतकरी हा या ग्रंथाचा केंद्रबिंदू आहे. त्यालाच ग्रामनाथ असे संबोधून त्याला त्यांनी हा ग्रंथ अर्पण केला आहे. १९५४ मध्ये ग्रामगीतेचे हस्तलिखित प्रवासात चोरी गेले होते. परंतु काही दिवसांनी ते परत मिळाल्यामुळे तिचे प्रकाशन करण्यात आले.

एक हजार ठिकाणी ग्रामगीतेचे प्रकाशन

विदर्भ साहित्य संघाचे १८ वे अधिवेशन भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे भरले होते. या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रसंतांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात २५ डिसेंबर १९५५ रोजी ग्रामगीतेच्या रचनेबद्दल राष्ट्रसंतांचे अभिनंदन करण्याचा ठराव सर्वानुमते संमत झाला. यावेळी राष्ट्रसंतांचा सत्कारही केला गेला. याच अधिवेशनात ग्रामगीतेचे प्रकाशन करण्यात आले.

२५ डिसेंबर रोजी गीता जयंती होती. त्यानिमित्त राष्ट्रसंतांच्या आदेशावरून एक हजार गावांमध्ये थोरा-मोठ्यांच्या हस्ते ग्रामगीतेचे प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्त अनेक विधायक कार्यक्रम त्या त्या गावांमध्ये झाल्यामुळे सारी गावे चैतन्याने भारून गेली होती. नागपूरच्या टाऊन हॉलमध्ये झालेल्या ग्रामगीता प्रकाशन समारंभात समाज कल्याण विभागाच्या अध्यक्ष सौ. रमाबाई तांबे, डॉ. वि. भि. कोलते, माजी न्यायमूर्ती भवानीशंकर नियोगी इत्यादींनी भाषणे दिलीत. अशारितीने इतर गावांमध्येही मान्यवरांनी ग्रामगीतेचे प्रकाशन केले.

धर्मकार्य व राष्ट्रकार्य 

राष्ट्राच्या उभारणीकरिता धर्माचा वापर करणारे तुकडोजी महाराज हे एकमेव संत होत. त्यांनी जपानमध्ये २३ जुलै १९५५ रोजी भरलेल्या विश्वधर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. बुद्धाच्या पंचशील तत्वाच्या आधारे विश्वधर्माची संकल्पना त्यांनी तेथे मांडली. या परिषदेचे उद्घाटनही त्यांच्याच हस्ते झाले. त्यांच्या खंजिरीवादनाने विदेशातील प्रतिनिधींना मंत्रमुग्ध केले होते. जगाला शांततेच्या मार्गाकडे वळविण्याकरिता धर्मसुधार, धर्मसंघटन आणि धर्मप्रसार कसा उपकारक आहे, हे त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले. या दृष्टीने त्यांनी उचललेले पहिले पाऊल म्हणजे ९ एप्रिल १९५६ रोजी हृषीकेश येथे भरविलेला संत-महात्म्यांचा मेळावा होय. या ठिकाणी त्यांनी भारत साधू समाजाची स्थापना केली. संत गाडगेबाबा, सितारामदासबाबा, लहानुजी महाराज, सत्यदेवबाबा, दामोदर महाराज इ. संत त्यांच्या सोबत असत.

भारतावर १९६२ मध्ये चीनच्या आणि १९६५मध्ये झालेल्या पाकिस्तानच्या आक्रमणाच्या वेळी त्यांनी सैनिकांचे मनोबळ वाढविण्याकरिता जन-प्रबोधन करून आर्थिक मदत केली. त्याचप्रमाणे स्वतः सीमेवर जावून सैन्याला दिलासा दिला.

पंढरपूरला शेवटले भाषण व भजन

देश-विदेशात समाजप्रबोधनासाठी प्रवास करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे शेवटले भाषण व भजन आषाढी एकादशीच्या दिवशी १९६७मध्ये पंढरपूर येथे झाले. १९६५च्या डिसेंबर रोजी त्यांना कर्करोगाची बाधा झाल्याचे निदान झाले होते. तरीही त्यांनी आपल्या दैनंदिन कार्यात खंड पडू दिला नाही. त्यांनी स्थापन केलेले गुरुदेव सेवा मंडळ त्यांनी संचालक मंडळाच्या स्वाधीन केले. पंढरपुरात विशाल जनसमुदायासमोर त्यांनी दिलेले भाषण व भजन अखेरचे ठरले. यावेळी ते म्हणाले की विठ्ठलाच्या दरबारची माझी ही अखेरची भेट आहे. कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे शेवटचे कीर्तनही पंढरपुरातच झाले होते. या दोन्ही संतांची पंढरपुराविषयीची ओढ अनन्यसाधारण होती. ११ ऑक्टोबर १९६८ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची खंजिरी कायमची मूक झाली. परंतु त्यांची भजने आणि ग्रामगीता त्यांच्या विचाराचे आणि गुरुदेव सेवा मंडळ हे कार्याचे स्मारक म्हणून आपणाला सतत प्रेरणा देत राहील.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुनील देशपांडे

ईमेल : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १३ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १३ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

तल्लक्षणानि वाच्यन्ते नानामतभेदात् ॥ १५ ॥

अर्थ – भक्तीचे वर्णन अनेक प्रकारे करता येते. अनेक विद्वान भक्तीचे वर्णन त्यांच्या त्यांच्या मताप्रमाणे, अनुभवाप्रमाणे करतात, अनेक लक्षणे सांगतात.

नाना मतानुसार त्या भक्तीची लक्षणे सांगितली जातात.

विवेचन: कोणतीही गोष्ट लक्षणांनी सिद्ध झाली पाहिजे असा शास्त्रकारांचा दंडक आहे. लक्षणाविना लक्ष्य स्वरूपाचा बोध यथार्थ रूपाने होऊ शकत नाही. येथे भक्ती हे लक्ष्य आहे. कोणी म्हणेल भक्तीचे लक्षण तर पूर्वी सूत्र दोनमध्ये ‘परमप्रेमरूपा’ असे सांगितलेच आहे. पुन्हा लक्षण सांगण्याचे प्रयोजन काय? लक्षण हे सामान्य; विशेष अशा दोन रूपाने कोठे कोठे सांगितले जाते. ‘परमप्रेमरूपा’ हे भक्तीचे सर्वसामान्य लक्षण आहे. पण तेच प्रेम अभिव्यक्त होण्यास कोणती तरी क्रिया कारण होत असते. त्या क्रियेच्या मागे काही विशिष्ट भावना असते. म्हणूनच भक्तिशास्त्रामध्ये भक्तीचे विविध प्रकार सांगितले गेले आहेत. श्रीमद्भा‍गवतामध्ये प्रल्हादचरित्रात नवविविधा भक्तीचा निर्देश आहे.

श्रीविष्णो श्रवणे परीक्षिदभवद् वैयासकिः कीर्तने।

प्रह्लादः स्मरणे तदङ्घ्रिभजने लक्ष्मीःपृथुः पूजने।

अक्रूरस्त्वभिवन्दने कपिपतिर्दास्ये च सख्येऽर्जुनः।

सर्वस्वाऽऽत्मनिवेदने बलिरभूत् कैवल्यमेषां समम्॥

भक्तीचे नऊ प्रकार वरील सुभाषितामध्ये सांगितले आहेत. (श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन) ह्या नऊ पायऱ्या म्हणजे मनुष्याच्या जीवनविकास आहे असे म्हटले तर अधिक योग्य होईल. मनुष्य सर्वात आधी ऐकायला शिकतो, मग हळूहळू एखादा शब्द बोलायला शिकतो, त्यांनतर बाकीच्या भक्ती मनुष्य क्रमाने आचरण्याचा प्रयत्न करतो. माऊली पहिल्या ओळीत भावेंवीण भक्ति करता येत नाही असे म्हणतात. वरील सर्व प्रकारच्या ‘भक्ती’ आपण परमार्थाच्या पाठशाळेत शिकू शकतो किंवा त्या शिकायलाच हव्यात. मनुष्य दासबोधात सांगितल्याप्रमाणे नवविधा भक्तिंचे सर्व समास तोंडपाठ करू शकतो, खरतरं पाठ करतोही. पण त्यामुळे मनुष्याच्या अंतरंगात बदल होत नसेल, ते पाठांतर काय उपयोगाचे? आपण फारतर त्याला घोकमपट्टी म्हणू शकतो. म्हणजे फक्त दमछाक! एखाद्या सुगरणीने उत्तम स्वैंपाक केला, अन्नाचा सुगंधही घरभर पसरला, पण त्या अन्नात जर मीठ नसेल तर त्याचा उपयोग शून्य. भाव हा आपल्या साधनेतील मीठ समजावे. इथे भाव हा शब्द ‘प्रेम’ या अर्थाने आला आहे. हे ‘सैराट’प्रेम नाही. हे ‘खरे’ प्रेम आहे, अर्थात वस्तू निरपेक्ष, व्यक्ति निरपेक्ष आणि परिस्थिती निरपेक्ष प्रेम!!!

“प्रेमेवीण श्रुतिस्मृतिज्ञान। प्रेमेवीण ध्यानपूजन। प्रेमेवीण श्रवणकीर्तन। वृथा जाण नृपनाथा।।”

 एकनाथी भागवत २. ३२

संतांनी जे प्रेम भगवंतावर केले, मिरेने कृष्णावर केले, प्रल्हादाने देवावर केले, हनुमानाने रामावर केले ते हे प्रेम!! या प्रेमाची सर जगातील कोणत्याही प्रेमास येऊ शकत नाही. आई आपल्या बाळाला धोंड्या, दगड्या, पेंद्या किंवा मऱ्या कोणत्याही नावाने हाक मारते आणि ते बाळ सुद्धा लगेच हाक देते, कारण त्या दगड्या, धोंड्या सबोधनातील ‘वात्सल्य’ त्यास कळते. संतांनी विठूरायाला कोणत्या नावाने हाक मारली नाही? कोणी त्यास काळतोंडया म्हटले आहे, तर कोणी त्यास पंढरीचा चोर म्हटले आहे, तर कोणी आणिक काही म्हटलं आहे. पण ह्यामागे निष्काम प्रेम आहे. जन्मभरीच्या श्वासाइतके हरिनाम घेऊन कोणी विठ्ठलास विकत घेतले आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी देव श्रीखंड्या बनून पाणक्याचे काम केल्याचे वर्णन आहे. खरंतर प्रेमाचे वर्णन करणे शक्य नाही. “प्रेम नये सांगता बोलता दावितां। अनुभव चित्ता चित्त जाणे।।” कणभरही विरह सहन न होणे ही प्रेमाची खरी कसोटी. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कृष्णाच्या गोपी. त्यांच्या ध्यानीमनी फक्त कृष्णच असायचा.

वरीलप्रमाणे अनेक अंगाने भक्ती होत असते, त्यात कित्येक भक्त म्हणविणार्‍याच्या काही विवक्षित स्वतंत्र भावना असतात, त्या भावनेप्रमाणेच तो तो त्या त्या क्रियांना भक्ती म्हणत असतो. श्रीनारदऋषींनीही ही भक्ती मूळ एकरूपा असूनही अकरा प्रकारची होते असे सूत्र त्र्याऐंशी मध्ये सांगितले आहे. भक्तीची अनेक लक्षणे सांगता येतील.

प्रत्येक आई आपल्या लेखकावर विविध प्रकारे वात्सल्य भाव प्रकट करते. कोणी लेकराला कुरवाळेल, कोणी पाठीवरुन हात फिरवेल, कोणी खाऊ देईल, कोणी पुरणपोळी करेल, तर कोणी आणिक काही करेल….? यात एक गोष्ट मात्र खरी असेल की ती माउली आपल्या लेकरांवर प्रेम करीत असेल…..!

इथून पुढील काही सूत्रात आपण प्रेमाची अर्थात भक्तीची लक्षणे पाहणार आहोत.

श्रोता वक्ता श्रीराम समर्थ 

जय जय रघुवीर समर्थ 

– लेख क्र. १४ 

नारद महाराज की जय!!!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कारगिल युद्धाने घडवलेला वायू योध्दा… अंतराळवीर! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

कारगिल युद्धाने घडवलेला वायू योध्दा… अंतराळवीर! ☆ श्री संभाजी बबन गायके 

वाहत्या पाण्याला धार असते.. तशी समशेरीला सुद्धा असतेच. पाण्याच्या धारेत आणि ते ही पवित्र क्षेत्रातल्या पाण्याच्या धारेत स्नान घडले तर पुण्यप्राप्ती होते, असे मानतात. युद्धाच्या तीर्थक्षेत्रात या समशेरीच्या धारेमध्ये रुधीरस्नान घडले तर तीर्थक्षेत्री घडलेल्या स्नानापेक्षाही अधिकचे पुण्य लाभते.. नव्हे या धारेत पडलेला चिरंजीव होऊन जातो! आणि हे योद्धे पुन:पुन्हा अवतार घेत राहतात अशीही धारणा आहे! अर्थात हा अवतार प्रत्येकवेळी देहाच्या स्थितीतच असेल, असे नसते. वीर त्यांच्या विचारांच्या रूपाने पुन्हा जन्म घेतात.

२७ मे, १९९९. स्क्वाड्रनलीडर अजय आहुजा मिग-२१ लढाऊ विमान घेऊन त्यांच्या एका सहका-याचा शोध घेत उड्डाण करीत होते. फ्लाईट लेफ्टनंट के. नचिकेता मिग-२७ घेऊन कामगिरीवर गेले होते.. ते परतलेच नव्हते.. त्यांचा काही ठावठिकाणासुद्धा लागत नव्हता. नियतीच्या मनात भलतेच चालले होते त्याक्षणी. के. नचिकेता यांच्या विमानावर स्टिंगर मिसाईलने हल्ला यशस्वीरीत्या चढवून विमान धराशाई केले होते… मात्र विमानातून अगदी ऐनवेळी उडी घेउन के. नचिकेता साहेब जमिनीवर उतरले.. पण पाकिस्तानी हद्दीत असल्याने तेथील जनतेच्या आणि पुढे लष्कराच्या तावडीत सापडले होते. भविष्यात त्यांची सुखरूप सुटका होणार होती… पण दरम्यानच्या काळात त्यांना शोधण्यास निघालेल्या आहुजा साहेबांच्या नशिबी मात्र मृत्यू लिहिलेला होता. आहुजा साहेबांच्याही विमानाचा वेध त्याच मिसाईलने घेतला… साहेबांनी यशस्वीरीत्या बाहेर उडी घेतली… तेही पाकिस्तानी हद्दीत उतरले… तेथील लष्कराच्या तावडीत सापडले… आणि भयावह छळ झाल्याच्या खुणा असलेले त्यांचे पार्थिव काही दिवसांनी पाकिस्तानाने भारताच्या ताब्यात दिले!

या सा-या बातम्या चौदा वर्षांचा एक शाळकरी पोरगा मोठ्या उत्सुकतेने पहात, ऐकत होता. हुतात्मा सैनिकांची पार्थिवे देशाच्या विविध भागांत पोहोचत होती… त्यांच्या जयजयकारात सारा देश एकमुखाने सहभागी होत होता… सुरुवातीचे अपयश पचवत भारतीय वायुसेनेने घुसखोरांना सळो की पळो करून सोडले. सरते शेवटी सत्यच पुन्हा जिंकले. आणि याच घटनांचा परिणाम या मुलाच्या हृदयावर होत गेला… त्याने ठरवले… अशीच आभाळ भरारी घ्यायची! आणि त्याने ते स्वप्न सत्यात उतरवून दाखवलेच.

बारावीची परीक्षा झाली होती आणि अभ्यासात कुशाग्र बुद्धी असल्याने निकालाची चिंता नव्हतीच. आता मोकळ्या वेळेत नेमके काय करावे, हे सुचत नव्हते. त्यात घरामध्ये लगीनघाई सुरु झाली होती… थोरल्या बहिणीचे लग्न ठरले होते. बहिणीचा एकुलता एक भाऊ तर अशावेळी धावपळ करायला पाहिजेच… भावोजीचा कान पिरगळून त्यांना बहिणीला सुखी ठेव अशी प्रेमळ धमकी देताना त्यांच्याकडून बक्षिसी उकळायची संधीही मिळणार होती.

एकेदिवशी तोही प्रसंग अगदी समोर येऊन उभा राहिला… पण याच नेमक्या प्रसंगी भाऊराया जणू कुठे अंतर्धान पावलेला होता. काल दीदीचे लग्न लागले… रात्री उशीरापर्यंत धामधूम सुरु होती. आज दुपारी दीदी सासरी निघणार होती.. अगदी ती सजवलेल्या मोटारीत बसण्याची वेळ आली तरी भाउसाहेब नजरेस पडत नव्हते… बरं काही सांगूनही गेलेले नव्हते! वडिलांच्या रागाचा पार आभाळाला टेकला होता. समोरासमोर भेट झाली असती तर श्रीमुखात भडकावली जाणे निश्चित होते. एवढ्यात स्वारी धापा टाकीत लग्नघरात पोहोचली… घामाघूम! सायकल दामटत कुठून आला होता कोण जाणे… सायकल मंडपाच्या दारातच फेकून देऊन तो दीदीकडे धावला… तोवर सारेच रडू लागले होते. तो वडिलांच्या नजरेला नजर न भिडवता थेट दीदीजवळ गेला… ”जरुरी काम से गया था! ” दीदी त्याच्याकडे पहातच राहिली!

त्याच्या एका मित्राने U. P. S. C. (एन. डी. ए. प्रवेश) परीक्षेचा अर्ज विकत आणला होता खरा… पण हे शिवधनुष्य आपल्याला पेलणार नाही याची त्याला लवकरच खात्री पटली होती. अभ्यासातली हुशारी, शारीरिक क्षमता आणि लाखो परीक्षार्थी बसणार असलेल्या परीक्षेत देशभरातून निवडल्या जाणा-या मोजक्या तरुणांमधला एक तरूण होण्याची क्षमता आपल्यापेक्षा आपल्या दोस्तात अधिक आहे, हे त्याने ताडले… आणि तो अर्ज याच्या हाती सोपवला!

बहिणीच्या लग्नाची गडबड, घरी कुणालाही काहीही सांगितलेलं नाही… मामला चोरीचा! चोरून लपून अभ्यास सुरु होता. परीक्षेचे तारीख हाती पडली आणि चेहरा पडला… दीदीच्या लग्नाच्या दुस-याच दिवशी घरापासून काही किलोमीटर्स वर परीक्षा केंद्र होते. शुभेच्छा द्यायला कुणाला सांगितले तर असायला हवे होते की… त्यामुळे अक्षरश: लगीनघरातल्या गोंधळाचा अचूक फायदा घेत साहेब परीक्षेला पोहोचले… स्व-चालीत दुचाकीवर… अर्थात सायकलवर. परतीचा प्रवासही त्याच दोन चाकांवर झाला! वधू पाठवणीच्या प्रसंगात याचा अपराध तसा दुर्लक्षिला गेला… आणि एन. डी. ए. परीक्षेत उत्तीर्ण झाल्याच्या बातमीने सारा काळोख संपला! वडिलांना आपल्या लेकाचा अभिमान वाटला.. आता याला थांबवण्यात अर्थ नव्हता… असा त्यांनी विचार केला. आणि २००२ या वर्षातल्या एका भल्या पहाटे साहेब राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या कोंढवा गेटवर हजर होते… त्यांनी २००५ मध्ये लष्करी अधिकारी म्हणून मोठ्या दिमागात त्यावेळी अंतिम पग म्हणून संबोधले जाणारे आणि हल्लीचे प्रथम पग देशाच्या सेवेत टाकले. हवाईदलाचे आकर्षण तर होतेच सुरुवातीपासून… तीच शाखा मिळाली. इंडियन एअर फोर्स अकादमी मध्ये पुढील प्रशिक्षण पार पडले… आणि शुभांशु शंभू दयाल शुक्ल नावाचा देखणा, उमदा लढाऊ वैमानिक भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून सेवारत झाला… एक स्वप्न असे प्रत्यक्षात उतरले! एस. यु. ३० एम. के. आय. , मिग २१, मिग २९, जग्वार, हॉक, डोर्निअर, ए. एन. ३२ अशी आधुनिक विमाने लीलया उडवणे, त्यांचे परीक्षण करणे यात शुक्ल साहेबांनी महारत प्राप्त केली. दोन हजार तासांचा उड्डाण अनुभव गाठीशी आला!

शालेय जीवनापासून परिचित असलेल्या आणि पुढे दंतवैद्य अर्थात dentist बनलेल्या doctor कामना मिश्र यांच्याशी विवाह करण्याची मनोकामनाही अर्थात पूर्ण झाली. एका पुत्राच्या जन्माने या विवाहाला एक चैतन्य प्राप्त झाले! फावल्या वेळेत… जो अगदी दुर्लभ असतो सैनिकी सेवेत… साहेबांनी चक्क कुंडली-ज्योतिषशास्त्राचाही अभ्यास केला. शास्त्र आणि ज्योतिषशास्त्र अशी मजल मारणा-या शुक्ल साहेबांच्या कुंडलीत एक अभूतपूर्व नसला तरी द्वितीय स्थान पक्के करणारा योग होता.. हे त्यांना कदाचित त्यावेळी ठाऊक नसावे.

तसे मित्र परिवारात मस्करी करणारे पण एरव्ही अत्यंत अबोल असणारे आणि तरीही चेह-यावर मंद हसू वागवणारे शुक्ल साहेब सातत्याने अभ्यासात, सरावात दंग असत.

तुम्ही सर्जिकल स्ट्राईक मध्ये असालच की… असं कुणी आडमार्गाने विचारल्यावर ते म्हणत… दुसरे विषय आहेत की बोलायला…. कामाबद्दल काय सांगत बसू! आणि पुढे एक अक्षरही बोलायचे नाहीत. २०१९ वर्ष उजाडले. Institute of Aerospace Medicine या भारतीय हवाई दलाच्या अधिपत्याखाली असलेल्या संस्थेने Indian Human Spaceflight Programme हाती घेतला. त्यात अंतराळवीर निवडीच्या प्रक्रियेत शुक्ल साहेबांचे नाव अग्रभागी होते. अत्यंत कठोर चाचण्या झाल्यावर शेकडो उमेदवारांमधून शुक्ल साहेब पहिल्या चार मध्ये आले.. आणि २७ फेब्रुवारी, २०२४ रोजी भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी भारताच्या पहिल्या मानव सहित अंतराळ मोहिमेसाठी निवडल्या गेलेल्या अंतराळवीरांच्या यादीत शुभांशु शुक्ल यांचे नाव जाहीर केले. १९९९ मध्ये सुरु झालेला एक विचार २०२४ मध्ये एका प्रचंड उंचीवर येऊन ठेपला!

International Space Station अर्थात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाऊन विविध प्रयोग करण्याची संधी देणा-या अतिशय खर्चिक आणि महत्त्वाकांक्षी Axiom 4 मोहिमेत शुक्ल यांची पायलट म्हणून निवड होणे यात काही आश्चर्य नाही… त्यामागे कठोर परिश्रम आहेत. राकेश शर्मा साहेबांनी अंतराळात पहिल्या भारतीय पावलाचा ठसा उमटवला… दुसरे पाऊल शुभांशु शुक्ल साहेब यांचे असणार आहे. NASA-Space X- ISRO या तीन प्रबळ संस्थांच्या संयुक्त आयोजनात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय हे बिरूद त्यांना लाभणार आहेच. या अंतराळ यानातील या एका आसनाची भारतीय रुपयांतील किंमत सुमारे पाचशे कोटी इतकी असणार आहे… पण १४५-५० कोटी लोकसंख्येच्या या देशांत ही रक्कम दरडोई अगदी काही रुपयांत होईल. पुढे यशस्वी होणारच असलेल्या मानव सहित गगनयान चांद्र मोहिमेची ही एक मुहूर्तमेढच जणू उभारली जात आहे, असे म्हटले पाहिजे.

खराब हवामानामुळे दोन वेळा पुढे ढकलले गेलेले हे उड्डाण येत्या काही दिवसांत यशस्वी होईल, अशी खात्री आहेच. शुभांशु शुक्ल साहेब हे आपले खरे हिरो आणि भारताने पैलू पाडलेला एक हिरा आहेत… त्यांच्या या यशातून प्रेरणा घेतीलच आपली मुले. त्यासाठी मुलांना, तरूणांसमोर या बातम्या, ह्या घडामोडी सातत्याने आल्या पाहिजेत. शुक्ल साहेबांचे उड्डाण पाहण्यासाठी देश एकवटला पाहिजे… ही दृश्ये पाहून आपल्याला भावी शूर सैनिक गवसणार आहेत. जय हिंद! ‘शुक्स’ अर्थात शुक्ल साहेबांना १९ जून रोजी होणार असलेल्या उड्डाणासाठी आधीच शुभेच्छा आणि अभिनंदन!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “इथे खरोखरंच ओशाळला मृत्यू!” – लेखक : श्री विद्याधर आठवले ☆ सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “इथे खरोखरंच ओशाळला मृत्यू!” – लेखक : श्री विद्याधर आठवले ☆ सुश्री शोभा जोशी ☆

— ग्रुप कॅप्टन डी किलर  –

दोन वर्ष पूर्ण व्हायच्या आतच आमच्या स्क्वाड्रनला पुन्हा हलवण्याचा निर्णय झाला. आम्ही सगळा मांडलेला पसारा आवरून जामनगरला आलो. अजूनही आमच्याकडे तीच जुनीपुराणी हंटर विमानं होती आणि नवीन विमानं मिळण्याची शक्यता दुरापास्त असल्यामुळे आम्ही याचा पार्ट त्याला, त्याचा पार्ट याला करत करत शिळ्या कढीला ऊत आणण्यासाठी झटत होतो!

जामनगरला पठाणकोट सारखंच प्रचंड मोठं एअर फोर्स स्टेशन होतं. खूप मोठा टेक्निकल एरिया, खूप मोठा डोमेस्टिक एरिया, सिनेमा थिएटर, स्विमिंग पूल, रिक्रिएशन सेंटर, डार्क रूमसह सर्व सुविधा युक्त हौशी फोटो क्लब, अशा नागरी सुविधा होत्या. सुकाॅय ७, मिग २१ आणि मि ८ हेलिकॉप्टर तसंच बेल हेलिकॉप्टरच्या स्क्वाॅड्रन होत्या. त्यात आता आमच्या हंटरची भर पडली!

– – सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे पासष्ट आणि एकाहत्तरच्या युद्धातील वाॅर हिरो, किलर ब्रदर्स पैकी, ग्रुप कॅप्टन डी किलर जामनगरला आमचे स्टेशन कमांडर होते! साक्षात किलर सरांना प्रत्यक्ष भेटण्याच्या कल्पनेनेच मी हरखून गेलो होतो! किलर सर, जठार सर हे म्हणजे साक्षात ‘काळ ‘ असं बरंच काही ऐकलेलं असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती! किलर सरांनी आणि जठार सरांनी युद्धांमधे पाकिस्तानी एअर फोर्सच्या धावपट्या उखडून, चहूबाजूंनी गोळ्या लागून चाळण झालेली, पेटती विमानं आणून आपल्या रनवेवर उतरवली होती! या असामान्य कामगिरीबद्दल त्याना शौर्य पदकं मिळाली होती! कोणत्या मटेरियलचं काळीज बनवलं असेल परमेश्वराने या माणसांचं!!

– – – विमानाला गोळ्या लागून आग लागलेली असताना, आपला जीव वाचविण्यासाठी, विमान सोडून ‘बेल आऊट’ न करता, त्या विमानाचे काही ना काही पार्टस् वापरता येतील आणि आपल्या देशाचं काही फाॅरेन एक्सचेंज वाचेल या उदात्त हेतूने, स्वतःच्या जीवावर उदार होऊन ते विमान आणून आपल्या विमानतळावर उतरवण्यासाठी आपलं सर्व कौशल्य पणाला लावणारे योद्धे ज्या देशाकडे असतील त्यांना जगातलं कोणतंही आणि कितीही शक्तिमान राष्ट्र पराभूत करू शकणार नाही!

प्रत्यक्षात किलर सरांना पाहिल्यावर माझा भलताच भ्रमनिरास झाला! नावच किलर असलेला माणूस भयंकर उग्र व्यक्तिमत्वाचा असणार अशी माझी कल्पना होती! हा लाल गोरा अँग्लो इंडियन माणूस अतिशय प्रसन्न आणि गोड चेहर्‍याचा होता! अत्यंत प्रेमळ स्वभाव! सगळ्यांना सांभाळून घेण्याची कामाची आश्वासक पद्धत! सगळ्या सोशल ऍक्टिव्हिटीजमधे उत्साहाने सहभागी व्हायची हौस! उतरंडीतल्या शेवटच्या पायरीवरच्या माणसाच्या सुद्धा खांद्यावर हात टाकून, त्याची समस्या स्वतः समजून घेऊन त्यावर उपाय करण्याची धडपड! देवाने हे एक वेगळंच रसायन घडवलं होतं!

आकाशात जीवघेण्या भराऱ्या मारणाऱ्या, या उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या माणसाकडून मी जमिनीवर रहाणं किती महत्वाचं असतं ते शिकून घेतलं! ‘तुमच्या सहकार्यांच्या कोंदणात तुम्ही किती घट्ट बसला आहात त्यावर तुमचं पद, तुमची प्रतिष्ठा किती अधिकाधिक उजळून निघणार हे अवलंबून असतं ‘ हा एक खूप महत्वाचा धडा, किलर सरांचं प्रशासकीय कौशल्य जवळून निरखताना आपोआप मिळाला, ज्याचा मी पुढे उच्च पदावर काम करताना मला खूप फायदा झाला! यशाची गुरुकिल्लीच किलर सरांनी नकळत माझ्या हाती सोपविली!

एका रोमहर्षक प्रसंगात ‘किलर’ म्हणजे काय ते प्रत्यक्षच पहायला मिळालं! एका मिग- २१ चं टेस्ट फ्लाईंग करण्यासाठी किलर सरांनी टेक ऑफ घेतला. आकाशात झेपावल्या क्षणीच, विमानाची कॅनाॅपी (फायटर विमानात पायलटला बाहेरचं पहाता यावं म्हणून ठेवलेलं फायबरचं पारदर्शक कवच उडून गेली! हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा अपघात होता! आता कल्पना करा की, डोळ्यावर शील्ड नसली तर ऐंशी किलोमीटर वेगाने मोटरसायकल सुद्धा चालवता येत नाही! हा माणूस बाराशे नॉटिकल माईल्स वेगाने टेक ऑफ घेत असताना याच्या डोळ्यासमोरची विंड शिल्ड नाहीशी झाली! काय करावं या माणसाने?

– – विमान सोडून तात्काळ इजेक्ट करायला हवं होतं! नियंत्रण कक्षातून तशा सूचनाही दिल्या होत्या, पण नवं कोरं विमान सोडून देणाऱ्या माणसाचं नांव किलर असूच शकत नाही! त्यांनी नियंत्रण कक्षाला उलट सांगितलं, ” क्रॅश लँडिंगची तयारी करा! मी विमान उतरवतोय! “

क्षणात अनेक सिग्नल्सची देवाण घेवाण झाली. किलर सरांच्या वरिष्ठांनी कळकळीची विनंती केली,

” किलर या देशासाठी विमानापेक्षा किंमती आहे! विमान सोड! “

किलर सरांनी बहुदा सांगितलं असावं, “Don’t worry Sir, you will have both! “

रनवेवर क्रॅश लँडिंगची तयारी झाली. प्रत्येकजण आपापलं कर्तव्य करण्यासाठी सज्ज झालेला होता आणि मनात, “देवा, किलर सरांना वाचव. ” अशी तळमळीने प्रार्थना करत होता.

— — डोळ्यांना काहीही दिसत नसताना, केवळ इच्छाशक्ती आणि अनुभवाच्या जोरावर सर्किटमधे फिरून त्यांनी फ्युएल संपवलं आणि आपण लँडिंग करत असल्याची सूचना दिली! नियंत्रण कक्षाकडून आपण परफेक्ट लँडिंग लाईनवर आहोत याची खात्री करून घेतली आणि त्या ऐतिहासिक क्षणाकडे सरकायला सुरुवात झाली….

…. प्रत्येक जण श्वास रोखून, काळजावर दगड ठेवून, आता पुढे काय वाढून ठेवलंय त्याची प्रतिक्षा करत होता! विमानाचं अंडर कॅरेज सुरक्षितपणे उघडलं! तीनही चाकं व्यवस्थित बाहेर पडली! विमान उंची कमी करत करत योग्य दिशेने रनवेकडे येऊ लागलं! विमान इतक्या परफेक्ट लाईनवर होतं की पायलटला काही दिसत नाहीये हे खरंच वाटत नव्हतं! प्रत्यक्षात नियंत्रण कक्षातून मिळणाऱ्या फक्त सूचनांच्या बळावर विमान उतरत होतं! – – सर्व काही सुरळीत होत आहे असं वाटत असतानाच विमान एका बाजूने कलंडल्यासारखं झालं आणि विमानाच्या मागच्या दोन चाकांपैकी एक चाक बॅरियरच्या सिमेंट पोलला टच झाल्यामुळे तुटून गेलं…. आता मागचं एकच चाक उरलं होतं, ते टेकून नीट बॅलन्स झाला तर पुढचं टेकणार.. गती आणखी कमी करण्यासाठी, चाक तुटताच किलरसरांनी टेलशूट (मागे उघडणारं पॅराशूट) ओपन केलं होतं!

– शेवटी विमान एका बाजूला घसरून बाॅडी घासल्यामुळे आग लागणार, हे आता सगळ्यांना कळून चुकलं होतं! क्रॅश व्यवस्थापन पुढच्या भयंकर प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी अति सज्ज झालं होतं!

अति समिप…. सावधान…. विमानाची गती संपता संपता ते तिरकं तिरकं जात असताना काँक्रिटच्या रनवेवर बाॅडी टेकणार नाही असं दोन चाकांवर बॅलन्स करत ते रनवे सोडून बाजूच्या मातीवर आल्याची खात्री पटल्यावरच किलर सरांनी इंजिन स्विच आॅफ केलं आणि विमानाला आग लागण्यापासूनही वाचवलं 

डाॅक्टरनी किलर सर कसे आहेत ते पहाण्यासाठी काॅकपिटकडे धाव घेतली… त्यांच्या चेहऱ्यापासून संपूर्ण शरीर इतकं सुजलं होतं की सेफ्टी बेल्ट कापून काढल्यानंतर सुद्धा त्याना काॅकपिटमधून बाहेर काढणं अवघड झालं होतं! चेहर्‍यावर ना नाक दिसत होतं ना डोळे! बेल्ट कापता कापताच ते बेशुद्ध झाले! कसंबसं काॅकपिटमधून बाहेर काढून त्याना आय एन एस वलसुरा ला नेव्हीच्या हाॅस्पिटलमधे दाखल केलं, तेव्हा ते कोमात गेले होते!

सतरा दिवस मृत्यूशी झुंज देऊन ह्या महारथीने अचाट पराक्रम करून देशाचं एक विमान आणि एक जिगरबाज पायलट वाचवला आणि पुन्हा आकाशात झेप घ्यायला सज्ज झाला!

इथे खरोखरंच ओशाळला मृत्यू!

त्यांना आणि त्यांच्या धाकट्या भावाला १९६५ च्या युध्दात वीर चक्र मिळाले होते. ते १९९१ मध्ये निवृत्त झाले व ऑगस्ट २०२४ मधे त्यांचे निधन झाले.

लेखक : श्री विद्याधर गणेश आठवले

प्रस्तुती : सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नव्या पिढीचे लोकमान्यांना अभिवादन! ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ?

☆ नव्या पिढीचे लोकमान्यांना अभिवादन! ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

नव्या पिढीचे लोकमान्यांना अभिवादन!

हॅलो टिळक!

 फर्स्ट ऑगस्ट इज अ हिस्टोरिकल डे फाॅर अस ‘ असं आमच्या स्कूलमध्ये टिच्चर म्हणतात. आज तुमची डेथ एनिवर्सरी! इन आवर नेशन हा म्हणजे साॅरी तो तुमचा भारत कित्ती बदललाय!! फ्यू मिनिट्स हं तुम्हाला अपडेट देते…

व्हाय??? अं… म्हणजे कसं आहे ना ते तुम्ही लोकांनी इतकं बलिदान का, काय म्हणतात ते केलंत.

आयुष्य देशासाठी खुर्ची घातलंत… सॉरी सॉरी ते खर्ची का खुर्ची?? आय एम कन्फ्युज! .. वेट अ मिनिट! आय विल जस्ट सर्च इन गुगल!

ओ सॉरी ‘खर्ची’ घातलंत. यु नो टिळक! अलीकडे खर्ची हा शब्द नाही वापरत कुणी.. इट्स आऊट डेटेड.

खुर्चीच वापरला जातो. मग काय करणार तेच आलं पटकन तोंडात. आमच्या लहानपणापासून आम्ही तेच ऐकतोय ना. दॅट्स व्हाय असं घडलं. यु अंडरस्टॅंड ना! प्लीज फरगिव्ह हां!

तर मी काय म्हणत होते.. इथले अपडेट्स तुम्हाला द्यायला हवेत!

यू नो टिळक! आणखीन एका दिवशी आम्हाला तुमची खूप आठवण येते. वुइ मिस यु!! – 

– गणेश फेस्टिवल!! दॅट्स व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग यु नो! सगळीकडे गणपती असतात. डिजे असतात मिरवणुका असतात… ढोल पथक असतात… आणि दहा दिवस ते वाजत असतात. दॅट्स अमेझिंग! वाॅव! साऊंड! डान्स! लाइट्स! इट्स फेमस ऑल ओव्हर द वर्ल्ड.. फॉरेनर्ससुद्धा येतात ते बघायला.

– – तेव्हा मला तुमची खूप आठवण येते. थँक्यू सो मच फॉर दॅट…! तुम्ही नसता तर कुणी अशी सोय केली असती??? आम्ही कसा फेस्टिवल सेलिब्रेट केला असता???

इतकी गर्दी, इतके सेलिब्रेटी पर्सन्स येतात…हीरो हीरोइन येतात… मग कल्चरल ॲक्टिव्हिटीज होतात.

आम्ही खूप एन्जॉय करतो रमून जातो त्यात… मधून मधून गणपतीची आठवण येते आम्हाला.. अगदीच नाही असं नाही. मग तेव्हा आम्ही स्तोत्र, आरत्या म्हणतो. पण किती डिफिकल्ट लँग्वेजमध्ये त्या.. संस्कृत यू नो टोटली आऊटडेटेड लॅंग्वेज. — 

– – तुम्ही म्हणे त्यात खूप मास्टर होतात. युनो, टिळक आता कुणी वापरत नाही त्या लँग्वेज. आता की नाही आम्ही जर्मन शिकतो, फ्रेंच शिकतो, जॅपनीज शिकतो, त्यात कुठे हे ओल्ड मराठी संस्कृत नो वे…

इट्स सो आउटडेटेड. बट इट्स ओके! कारण की आता तर युट्युबवरती त्या फाईंड होतात. आणि प्ले करता येतात. त्यामुळे रिमेंबर करायचं टेन्शनच नाही.

मग मोदक खातो… व्हरायटी ऑफ मोदक… तुम्हाला तर माहितही नसतील.. यु नो आता चॉकलेट मोदकसुद्धा मिळतो… एनी वे! थँक्यू फॉर दॅट! आजच्या दिवशी तुम्हाला हे सांगावसं वाटलं.

बाकी ओल्ड पीपल्स म्हणतात तुम्ही खूप काही केलंय. तुम्ही मॅथ्समध्ये खूप ग्रेट होतात. यु नो टिळक! कॉम्प आलाय ना, तर त्याच्यावर सगळी कॅल्क्युलेशन्स फास्ट होतात. आता ना सगळं ए. आय. करतो…

ओ! सॉरी सॉरी.. यु डोन्ट नो ए आय नं? ए आय मीन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स.. म्हणजे कसं आहे ना… आता आपल्याला डोकं वापरायचं नाही. आता सगळं एआय करणार! इट रिमेंबर्स एवरीथिंग…

इट फाईंड्स एनिथिंग… इट टिचेस एनिथिंग… लाईफ इज सोऽऽऽऽऽ कूल! कुठली गोष्ट हवी असेल तर फक्त क्लिक करायचं की तुमच्या समोर हजर. खूप अभ्यास करा, खूप विचार करा, कष्ट करा याची गरजच नाही. इट्स रियली रियली ग्रेट! इझंट इट??

ओके वन मिनिट.. एक रिमाइंडर आलाय.. मला आता कोचिंगला जायचंय 

.. आपण परत नंतर बोलूयात.

ओके. बाय…

अँड थँक्स फॉर द फेस्टिवल!

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे…” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? इंद्रधनुष्य ?

☆ “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे…☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे…

आणि तो मी मिळवणारच !!

स्वातंत्र्य पूर्वीचा काळ… ब्रिटिश महासत्ता यांचे साम्राज्य… अशावेळी चाललेला स्वातंत्र लढा… त्याचवेळी कायद्याचा अभ्यास करून त्याच्या जोरावर अनेक सभा गाजवणारे बाळ गंगाधर टिळक… जन समान्यांचे मन जिंकणारे त्यांचे प्रभूत्व आणि त्याच जोरावर मिळालेली लोकमान्य ही पदवी किंवा मिळालेला किताब…

१९१६ चा झालेला स्वातंत्र्याचा महासंग्राम आणि त्याचवेळी लखनौ येथील परिषदेत काढलेले हे धीरोदगार 

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.. आणि तो मी मिळवणारच.” 

हेच वाक्य घेऊन नंतर स्वातंत्र्य लढ्याची पुढील वाटचाल सुरु झाली. जणू स्वातंत्र्याच्या काटेरी वाटेवर या वाक्याच्या मखमली पायघड्या त्यांनी अंथरल्या होत्या.

काय नाहीये या वाक्यात? या वाक्यात खच्चून भरलेली खंबीरता आहे. एक ठोस मागणी आहे. एक दृढ निश्चय आहे. एक धमकावणी आहे. एक आत्मविश्वास आहे. एक ध्येयासक्ती आहे. एक नेतृत्व आहे. एक परखडपणा आहे. एक स्वप्न आहे. एक दिलेली मोठी समज आहे….

अशा कितीतरी भावनांची ज्योत करून लावलेली एक धगधगती मशाल म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळणारच हे उद्गार.

एवढ्या सगळ्या भावनांनी भरलेले हे उद्गार काढण्यासाठी टिळकांना आधी स्वराज्य या शब्दासाठी पण मोठा झगडा करावा लागला होता. स्वराज्य ही संकल्पना शिवाजी महाराजांना स्मरून त्यांनी रुजवली असल्याचे सांगितले जाते. पण स्वराज्य म्हणजे काय हे स्पष्ट करताना बेळगावहून सातारा व वाई येथे कार्यक्रम करीत टिळक अहमदनगर शहरात दाखल झाले. तेथे ३१ मे आणि १ जून या दिवशी भरवलेल्या सभांमधून त्यांनी ‘स्वराज्या’ची भूमिका स्पष्ट केली. आपला इंग्लंडमधील राजसत्तेला मुळीच विरोध नसून या राजसत्तेच्या भारतातील नोकरांना विरोध असल्याचे ते सांगू लागले. ब्रिटिशांची मूळ सत्ता म्हणजे मूळ धनी चांगला असून त्याला आपला पाठिंबाच आहे, पण त्याच्या इथल्या कोठावळ्यांना विरोध केला पाहिजे. त्यांच्याऐवजी आमचा कारभार आम्ही करणे म्हणजे स्वराज्य. यात ब्रिटिश सत्तेला विरोधाचा प्रश्न येतोच कोठे? आपल्या सर्व समस्यांचे उत्तर स्वराज्य हे आहे. स्वराज्य ही गुरुकिल्लीच आहे. असा युक्तिवाद करून त्यांनी स्वराज्य ही संकल्पना ब्रिटिशांच्याही गळी उतरवली होती आणि स्वराज्यासाठी मान्यता मिळवली होती.

जन्मसिद्ध अधिकार म्हणजे काय? ते कोणते? ते कसे असायला हवेत याचा कायदेशीर अभ्यास करून अत्यंत परखड भूमिका घेत ठणकावून हे उद्गार काढले होते.

जन्मसिद्ध अधिकार म्हणजे जन्मत: मिळालेले अधिकार असे नसून वारसा हक्काने मिळालेले अधिकार आहे हा सूक्ष्म भेद पण त्यांनी जाणला होता. जसे कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनानंतर काही अधिकार फक्त मोठ्या मुलालाच मिळतात, काही गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य फक्त मुलांनाच दिलेले असते तसे काहीसे आहे असे सांगून ब्रिटिश लोकांना मोठ्या चतुराईने फसवले होते. परंतु त्यात निव्वळ देशभक्ती होती. त्यात त्यांचा वैयक्तिक फायदा नव्हता. म्हणूनच या वाक्याने दाखवलेली दिशा ही स्वातंत्र्य मंदिराकडे जाणाऱ्या पहिल्या पायरीवरील शिळा ठरली.

म्हणूनच आजच्या काळातही जेथे जेथे अन्याय दिसत आहे, जेथे जेथे आपल्या देशाची अभिमानता दाखवून द्यायची गरज आहे तेव्हा तेव्हा हेच उद्गार नाही काढले तरी तशी आग्रही भूमिका घेऊन.. तशीच परखडता ठेऊन.. तेवढाच खंबीरपणा दाखवून आपले म्हणणे सांगता आले पाहिजे. तो करारीपणा.. तो निग्रहीबाणा प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ओळख एका विलक्षण माणसाची – लेखक : डॉ. प्रसाद दाढे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ ओळख एका विलक्षण माणसाची… – लेखक : डॉ. प्रसाद दाढे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

कॅप्टन सर रिचर्ड फ्रान्सिस बर्टन

… ज्याच्या घरी साक्षात भाषा पाणी भरीत होती !! 

सध्या आपल्याकडे ‘भाषा’ विषयावरून बरेच वादविवाद सुरू आहेत. कधी थरूरांच्या इंग्रजीची चेष्टा होते तर कधी दुसऱ्या भाषेतील फलकांना काळे फासले जाते. अर्थातच ही गोष्ट नवीन नाही. पण एकूणच प्रांतभेद, भाषाभेद अश्या वादांना सध्या प्रसारमाध्यमे वाजवीपेक्षा महत्त्व देतात असं वाटतं.

आपल्या मातृभाषेव्यतिरिक्त निदान दोन भाषा किमान बोलता येणं ही अपेक्षा फारशी अतिरेकी नसावी. पण काही जणांना हा व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला वाटतो म्हणून कदाचित वाद चिघळत असतील. आणखीन काही आयाम असू शकतात.

एका व्यक्तीला एका आयुष्यात किती भाषा अवगत असू शकतील असा विचार केला तर कल्पनेची धाव चार किंवा पाचपेक्षा पुढं जायला धजावत नाही. अतिशयोक्ती जरी करावी वाटली तरी तो आकडा ‘तीस’ असू शकत नाही….. पण ही अतिशयोक्ती नाही.. तर सत्य आहे.

– – – तो जन्माने इंग्रज होता त्यामुळे इंग्रजी त्याची मातृभाषा होती. फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन, लॅटिन आदी युरोपियन भाषांवर त्याचं प्रभुत्व होतंच पण त्यासोबत अरेबिक, हिंदी, मराठी, संस्कृत, गुजराती, सिंधी, स्वाहिली अश्या जवळजवळ ‘तीस’ वेगवेगळ्या भाषांत तो पारंगत होता. कित्येक बोलीभाषाही त्याला येत होत्या. ह्याच्या पुढची अतर्क्य गोष्ट म्हणजे त्याने माकडांच्या भाषेतील साठ शब्द शोधून काढले होते ! 

कॅप्टन सर रिचर्ड फ्रान्सिस बर्टन ! काहींना नावावरून हॉलिवूडचा जुना नट आठवेल. पण भाषापंडित रिचर्ड बर्टन एकोणिसाव्या शतकात होऊन गेला.

आज भाषांवरून वाद घालणारे जग बर्टनला विसरले आहे. बाळ सामंतांनी लिहिलेलं त्याचं चरित्र ‘शापित यक्ष’ (परचुरे प्रकाशन) वाचलं नसतं तर मला हा माणूस कळला नसता.

केवळ भाषापंडित नाही तर इतके गुण (आणि काही अवगुणसुद्धा) बर्टनच्या अंगी होते की हा एकच माणूस होता की ह्याच नावाच्या वेगवेगळ्या व्यक्ती होत्या असं कुणाला वाटून जाईल.

लिओनार्दो दा विंची हा अष्टपैलू होता म्हणतात. बर्टनला अर्वाचीन काळातील विंची म्हणावे लागेल.

केवळ भाषाच नाही तर तो भिन्न भाषिकांच्या संस्कृतीचा, जीवनमानाचा, प्रथांचा, धार्मिक विधींचा सखोल अभ्यास करीत असे. त्या काळातील कठीण गोष्ट म्हणजे निरनिराळ्या समाजातील लैंगिक प्रथांचासुद्धा त्याने शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला होता. समलैंगिकतेवर धाडसाने लिहिणारा हा विद्वान आपल्या हयातीत वादग्रस्त बनला, सनातन्यांच्या टीकेचे लक्ष्य बनला ह्याचं आश्चर्य काय? 

बर्टनने काही काळ ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतलं असलं तरी शिस्तभंगाच्या आरोपावरून त्याची हकालपट्टी झाली होती. त्यानंतर तो ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात दाखल झाला आणि भारतात आला. मुंबई, कराची आदी नगरात त्याचे वास्तव्य होते. भारतीय भाषांची, संस्कृतीची गोडी त्याला इथेच लागली. काही तासांत तो एखादी भाषा शिकत असे. त्याच्या पध्दती अफलातून होत्या. म्हणायचा, नवीन भाषेतील अगोदर शिव्या शिका ! तर कधी तो चक्क वेश्यांकडून नवीन भाषा शिकत असे.

तो एक धाडसी शोध-प्रवासीही होता. आफ्रिकेतील महाकाय सरोवर लेक ‘टांगानिका’चा शोध त्याने लावला. त्या काळात तो प्रवास भयंकर अवघड असे. प्रतिकूल हवामान, घनदाट जंगल, रोगराई, विषारी कीटक-सर्प, नरभक्षक प्राणी व आदिवासी आणि प्राथमिक अवस्थेतील दळणवळण ह्या सगळ्यावर मात करून बर्टनने आफ्रिकेत भ्रमंती केली आणि तिथली भौगोलिक तसेच सामाजिक परिस्थिती प्रगत जगासमोर पहिल्यांदा मांडली.

त्याने केलेला दुसरा मोठा पराक्रम म्हणजे गैरमुस्लिम असूनही मक्केला जाण्याचे धाडस. मक्केस आजही केवळ मुस्लिम धर्मीयच जाऊ शकतात. त्या काळात तर अन्यधर्मियाचा जागेवर शिरच्छेद होत असे. बर्टनने वेषांतर करून मक्का-मदिना यात्रा केली. अगोदर त्याने अरबी भाषेवर प्राविण्य मिळवले, कुराण मुखोद्गत केले व इस्लामचा धार्मिक व सामाजिक प्रथांचा बारकाईने अभ्यास केला. त्यामुळे मक्का-मदीनेतील मुल्लामौलवींना संशय आला नाही.

बर्टनने अनेक प्रांतात मुशाफिरी केली. तो युरोपातील एक नावाजलेला तलवारबाज होता. शिल्पकला, चित्रकलेत त्याला गती होती. शिवाय तो उत्तम बुद्धिबळपटूसुद्धा होता.

उत्तर आयुष्यात त्याने वात्सायनाचे कामसूत्र, कल्याणमल्लाचे अनंगरंगरतीशास्त्र तसेच अरेबियन नाईट्सचे त्या काळी ‘बोल्ड’ वाटणारे इंग्रजी अनुवाद केले व ते प्रचंड गाजले. त्याच्या ग्रंथांमध्ये मजकुराइतक्याच, किंबहुना त्यापेक्षा अधिक प्रमाणात माहितीपूर्ण तळटिपा असत. कारण त्याला केवळ भाषा अवगत नव्हती तर वेगवेगळ्या समाजातील दंतकथा, लोककथा, रूढी, समजुती तो उत्तमरीत्या जाणत होता.

वैयक्तिक पातळीवर तो नास्तिक असला तरी अनेक धर्मांचा अभ्यास केल्यामुळे तो काही रूढी पाळत असे. एकदा मुंबईतील वाळकेश्वर मंदिरात पत्नीसह गेला असतांना पुजाऱ्याने ‘किरीस्तावास मज्जाव’ केल्यावर बर्टनने आपले जानवे दाखवले व गायत्री मंत्र म्हणून दाखवला. पुजारी अवाक झाला असणार.

तरुणपणी आडदांड, धसमुसळा, संधी मिळेल तिथे मारामारी करणारा, पीळदार मिश्या राखणारा बर्टन लेडी’ज मॅन म्हणूनही प्रसिद्ध होता.

त्याच्या वात्रट स्वभावाचे एक उदाहरण देतो… 

रोज दुपारी त्याच्या बायकोच्या (इझबेल) अनेक मैत्रिणी तिच्याशी गप्पा मारायला घरी येत असत. त्यांच्या फालतू बडबडीमुळे बर्टन वैतागून जात असे. एक दिवस तो त्या खोलीत गेला आणि बायकांसमोर एक हस्तलिखित आदळून निघून गेला. बायकांना बर्टन मोठा लेखक आहे हे ठाऊक होतं म्हणून त्यांनी लगबगीने हस्तलिखित पाहिलं तर त्याचा मथळा होता, ‘पादण्याचा इतिहास’ !

लंडनचे उपनगर ‘मॉर्टलेक’मध्ये बर्टनची वैशिष्ट्यपूर्ण कबर आहे. बेदाऊन तंबूसारखी रचना असलेल्या कबरीचा दरवाजा उघडला की उंटाच्या गळ्यातील घंटेचा नाद ऐकू येतो आणि आपल्याला बर्टनसोबत अरबस्तानातील वाळवंटात नेतो..

आपल्यासारख्या सामान्यांना बर्टनसारख्या पंचवीस-तीस भाषा येणं अशक्य असलं तरी इतर भाषांबद्दल, संस्कृतीबद्दल किमान आदर बाळगायला काही हरकत नसावी.

लेखक : डॉ. प्रसाद दाढे.

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares