मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ झुळूक आणखी एक! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ झुळूक आणखी एक! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

काळ हेच औषध असतं, असं म्हणतात. पण हा काळ ज्याला कंठावा लागतो त्या जीवालाच ठाऊक त्या वेदनांचा दाह!

विस्मरण, स्मरण आणि मरण या एकमेकांच्या हातात हात गुंफून चालणाऱ्या गोष्टी. एखाद्याला आपण विसरून गेलो तर आपल्या लेखी त्याचा मृत्यूच झालेला असतो. आणि हे जग सोडून गेलेल्यास आपण स्मरणात ठेवले तर तो जिवंत असतो. पण कित्येक वेळा, कित्येकांना स्मरण जणू मरणाचा अनुभव देत असावे. कालौघात विरहाची धार जराशी बोथट होत असेलही, पण स्मरणाच्या तारेला झंकारुन उठायला एखादी हलकीशी झुळूकही पुरेशी ठरत असावी… किंबहुना त्या तारा वाऱ्याची यासाठीच तर आळवणी करीत असाव्यात!

खरं तर कोणत्याही प्राण्याच्या बाबतीत, वस्तूच्या, पदार्थाच्या बाबतीत उत्पत्ती, स्थिती आणि लय हा क्रम ठरलेला असतो. पण आधी जन्माला आलेला जीव नंतर जन्माला आलेल्या जीवाच्या आधी जावा… नंतर जन्मलेल्याने नंतर जावे… खरं तर हाच क्रम योग्य आहे. पण निसर्ग याबाबतीत खूप अन्यायी आहे. प्रत्येकाची मरणरेषा स्पष्ट आखलेली असते या श्वासांच्या शर्यतीत. आणि श्वास थांबवता येत नाहीत… अंतिम रेषा पार करे पर्यंत. कुणी बळजबरी केली आणि स्वतःचे श्वास स्वतःच थांबवले की ती शर्यत पुन्हा पहिल्यापासून आरंभ करावी लागते… पुढील जन्मात! ज्यांचे श्वास इतरांनी थांबवले, त्यांची शर्यत अपूर्ण राहते बराच काळ… पण सुटका नाही!

निष्प्राण देह जड होऊन जातो.. आणि हा देह वाहून नेणारे खांदे जर या देहापेक्षा ज्येष्ठ असतील तर हा जडपणा अधिकचा असतो… जगातला सर्वांत मोठा भार… हा भार जन्मभर खांद्यावरून उतरत नाही.

या स्मरण वेदनेवर काळ हा उतारा वरवर गुणकारी भासतो.. पण मनाला चकवा देऊन कळ उसळी मारतेच अधून मधून. त्यापेक्षा सतत स्मरण राखत राहिलं तर सवय तरी होऊन जाते.

काळीज जितकं जुनं तितकं ते हळवं. माणसांच्या गराड्यातून स्वतःच्या काळोखात एकदा का हे काळीज गेलं ना की त्याला फक्त त्याचीच धडधड ऐकू येते. हा एक हृदयविकारच जणू.

आणि म्हणून अशा काळजांना एकाकी नसतं राहू द्यायचं. त्यांचं अंधारात जाण्याचं शक्य तितकं लांबवत राहायचं! काही अंधारात एकाच्या जोडीला दुसरंही हृदय असतं.. आणि ते एकाअर्थी बरं असतं. ये हृदयीचे ते हृदयी समजू शकतं.

लोकांचं काय हो… लोक विसरून जातात. सोयरे सुतक फिटलं की मोकळे होतात. मित्र परिवार स्मृतिदिनापुरता उरतो. सांत्वने, आश्वासने घडीची सोबती असतात… शेवटी ज्याचे भोग ज्याचे त्यानेच भोगावेत.. अशीच जगरहाटी असते!

मरणाला कुठला आलाय विधिनिषेध? कुणी कुठल्या कारणानं, कधी, आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर कुणाच्या आयुष्यातून कायमचं निघून जावं.. हे कोण ठरवत असेल तो असो… मृत्यू सर्वत्र एकाच चेहऱ्याने वावरतो… वेदनेच्या!

म्हणूनच ज्याला शक्य आहे, त्याने असे मरणस्पर्श झालेल्या मनांशी संवाद साधत राहायला पाहिजे… एक नित्योपचार म्हणून. मृत्यूच्या उतरंडीवर सर्वांत वर आहेत.. ते तरुण, देखण्या, सशक्त, नीडर सैनिकांचे मृत्यू.. अर्थात अकालमृत्यू!

या तरुणांचे प्राणहरण करण्यासाठी आलेल्या दुतांचेही हात थरथरत असतील त्यांना पाशात अडकवताना… पण त्यांना स्वर्गात नेण्याचे भाग्य लाभते यासाठी ते दूत दैवाचे आभारही मानत असावेत! गेल्या काही दिवसांत अशाच काही माता, पिता, बंधू, भगिनी यांच्याशी संवाद घडला… आणि लक्षात आलं… समाज आणि हे वेदनापिडित यांच्यात खूप मोठी दरी आहे! केवळ वेळ-प्रसंगीच आठवणी जागवत न राहता… त्यांच्या आठवणी जागत्या ठेवायला हव्यात… त्यांच्या अखेरीपर्यंत. आपल्या घरात दिवा लावताना त्यांच्याही अंधा-या घरांत एक पणती पोहोचवावी जाणत्यांनी! सुदैवाने असे जाणते आपल्याकडे फार अधिक नसले तरी मूठभर तरी आहेत. हे सुहृद सैनिकांच्या मुलांशी, पत्नीशी, आई-वडिलांशी सतत संपर्कात राहतात… त्यांच्या सुख-दु:खाच्या गोष्टी सांगत असतात, ऐकत असतात. त्यांच्या मुलांच्या पराक्रमाच्या कहाण्या इतरांना सांगत असतात… पुन:पुन्हा! देव घ्या फुका.. देव घ्या फुका… न लगे रुका मोल काही! अर्थात देव मिळवायला काही खर्च लागत नाही… तुम्हीही असे देव शोधा…. त्यांनी घडवलेल्या सैनिकांच्या हौतात्म्याच्या कथा सर्वत्र पोहोचू द्यात… आणि या कथा सर्वत्र पोहोचत आहेत हेही त्यांच्यापर्यंत पोहोचावा! तुमच्या शब्दांची एक झुळूक.. त्यांच्या अंतरीच्या जखमा सुखावून जातील! हुतात्मा सैनिकांच्या परिवारांसाठी काम करणा-या सर्व बंधू-भगिनी-मातांना सप्रेम नमस्कार.

जय हिंद!!!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ महर्षि व्यास, वाल्मिकींचे गुरु.. ‘गुरुंचेही गुरु’ – देवर्षी नारद – भाग – २ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘महर्षि व्यास, वाल्मिकींचे गुरु.. ‘गुरुंचेही गुरु’ – देवर्षी नारद – भाग – २ ’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

☆

देवर्षि नारदांच्या सर्व उपदेशांचे सार असे की ‘सर्वदा सर्वभावेन निश्चिन्तितै: भगवानेव भजनीय:’ म्हणजे सर्वदा सर्वभावाने निश्चिंत होऊन केवळ भगवंताचेच ध्यान करावे. नामस्मरण करुन आनंदात असावे.

श्री विष्णूचे अनन्य भक्त

देवर्षि नारद भगवंताचे सर्वश्रेष्ठ भक्त आहेत. ते भगवंताची भक्ति आणि माहात्म्य याच्या प्रचारासाठी आपल्या वीणेचा मधुर झंकार करीत, भगवंताचे गुणगान करीत निरंतर भ्रमण करीत असतात. त्यांना भगवंताचे मन म्हणतात. ते अप्रत्यक्षरूपात भक्तांना सहाय्य करतात. त्यांचे मंगलमय जीवन विश्वाचे मंगल करण्यासाठी समर्पित आहे. ते ज्ञानाचे स्वरूप, विद्येचे भांडार, आनंदसागर आणि सर्व भूतमात्रांवर प्रेम करणारे, विश्वकल्याण चिंतणारे आहेत. म्हणूनच सर्व युगात, सर्व लोकात, सर्व विद्यांमधे, समाजातील सर्व वर्गांमधे नारदांचे एक महत्त्वपूर्ण स्थान राहिले आहे. केवळ देवतांनीच नव्हे तर दानवांनीही त्यांचा सदैव आदर केला आहे. वेळोवेळी सर्वांनी त्यांचा परामर्श घेतला आहे. श्रीमद्भागवत म्हणते की सृष्टिमधे भगवंतांनी देवर्षि नारदांच्या रूपात तीसरा अवतार घेतला आणि ‘सात्वततंत्र’, ज्याला ‘नारद पंचरात्र’ पण म्हणतात, त्याचा उपदेश दिला. यात सत्कर्मांद्वारे भव-बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग दाखविला आहे. नारद हे ऋषिमुनींचे देवता आहेत व त्यांना ‘ऋषिराज’ म्हणूनही ओळखले जाते.

महाभारताच्या सभापर्वातील पांचव्या अध्यायात नारदांच्या व्यक्तिमत्वाचा करून दिलेला परिचय असा आहे… देवर्षि नारद वेद आणि उपनिषदांचे मर्मज्ञ, देवतांचे पूज्य, इतिहास – पुराणांचे विशेषज्ञ, पूर्वी होऊन गेलेल्या कल्पातील घटना जाणणारे, न्याय व धर्माचे तत्त्‍‌वज्ञ, शिक्षा, व्याकरण, आयुर्वेद, ज्योतिष आदिचे प्रकांड विद्वान, संगीत विशारद, प्रभावशाली वक्ता, मेधावी, नीतिज्ञ, कवि, महापंडित, बृहस्पतिसारख्या महाविद्वानांच्याही शंकांचे समाधान करणारे, धर्म -अर्थ- काम – मोक्ष या पुरुषार्थांचे यथार्थ ज्ञाता, योगबाळावर समस्त लोकांचे सर्व समाचार जाणण्याचे समर्थ, सांख्य आणि योग शास्त्रांचे सम्पूर्ण रहस्य जाणाणारे, देवता व दैत्यांना वैराग्य विषयाचे उपदेशक, क‌र्तव्य -अक‌र्तव्य यातील भेद करण्यात दक्ष, समस्त शास्त्रात प्रवीण, सद्गुणांचे भांडार, सदाचाराचे आधार, आनंदाचे सागर, परम तेजस्वी, सर्व विद्यानिपुण, सर्वांचे हित करणारे आहेत. अठरा महापुराणांमधे एक नारदोक्त पुराण; ‘बृहन्नारदीय पुराण’ या नावाने प्रख्यात आहे.

वायुपुराणात देवर्षि पदाचे लक्षण वर्णन असे केले आहे… देवलोकात प्रतिष्ठा प्राप्त करणा-या ऋषिगणांना देवर्षि म्हणून ओळखले जाते. भूत, वर्तमान व भविष्य या तिन्ही काळांचे ज्ञाता, सत्यभाषी, कठोर तपस्येमुळे लोकविख्यात, गर्भावस्थेतच अज्ञान रूपी अंधकाराला नष्ट केल्यामुळे ज्यांना ज्ञानाचा प्रकाश लाभला आहे असा मंत्रवेत्ता आपल्या सिद्धिंच्या बळावर सर्व लोकात सर्वत्र संचार करण्यास सक्षम, समादेश घेणा-या लोकांनी वेढलेले, देवता, द्विज आणि नृप देवर्षि म्हणून ओळखले जातात.

असे असले तरी जनसाधारण देवर्षिंच्या रूपात केवळ नारदच परिचित आहेत. त्यांच्याइतकी प्रसिद्धि व लोकप्रियता अन्य कोणालाच लाभली नाही. वायुपुराणात सांगितलेली देवर्षि पदाची सारी लक्षणे नारदांच्या ठाई दिसतात.

मत्स्यपुराणात वर्णन आहे की श्री नारदजींनी ‘बृहत्कल्पप्रसंग’ मधे ज्या अनेक धर्म-आख्यायिका सांगितल्या आहेत, २५, ००० श्लोकांचा हा महाग्रंथच नारद महापुराण आहे. सध्या उपलब्ध असलेले नारदपुराण २२, ००० श्लोकांचे आहे. ३, ००० श्लोक कमी आहेत. प्राचीन पांडुलिपिचा काही भाग नष्ट झाल्यामुळे असे झाले असावे.

नारदपुराणात सुमारे ७५० श्लोक ज्योतिषशास्त्रवर आहेत. यात ज्योतिषाचे तीन स्कंधात सिद्धांत, होरा आणि संहिताची सर्वांगीण चर्चा केली आहे.

नारदसंहिता नावाने उपलब्ध अशा अजून एका ग्रंथात पण ज्योतिष शास्त्राच्या सर्व विषयांचे विस्तृत वर्णन मिळते. यावरून हे सिद्ध होते की देवर्षि नारद भक्तिप्रमाणे ज्योतिष विषयाचेही प्रधान आचार्य होते.

कीर्तन परंपरा

भारत देश विविधतेने नटलेला आहे हे सर्वज्ञात आहे. विविध भाषा, विविध, वेषभूषा, विविध संगीत परंपरा, विविध लोककला, विविध कथाकीर्तन परंपरा, किती किती म्हणून सांगावे! पण येवढी विविधता असली तरी संस्कृती एक आहे.

महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडेही भक्तिमार्गात कीर्तन परंपरा आहेत. त्यात वारकरी कीर्तन, रामदासी कीर्तन व नारदीय कीर्तन, या तीन मुख्य कीर्तन परंपरा विशेष लोकप्रिय आहेत.

वारकरी कीर्तन परंपरा संत नामदेवांनी विशेष लोकप्रिय केली. त्यापूर्वी ती अस्तितौवात असेलही, तरी भागवत किंवा वारकरी कीर्तन परंपरेत नामदेवांचे नाव अग्रस्थानी आहे.

नामदेव महाराज उत्तम कीर्तन करीत असंत. असे म्हणतात की, नामदेव कीर्तन करू लागले की स्वतः विठ्ठल त्यांचे कीर्तन ऐकायला येऊन बसत. कीर्तनातील नामघोष करताना नामदेवांबरोबर स्वतः श्रीहरी सुद्धा तल्लीन होऊन नाचायला लागंत. नाचताना ते येवढे तल्लीन होत की स्वतः नेसूचा पीतांबर कधी फिटला याचेही हरीला भान रहात नसे!

रामदासी कीर्तन परंपरेचे प्रणेते श्री समर्थ रामदासस्वामी आहेत. या कीर्तनाचा वर्णविषय असतो प्रभु रामचंद्रांचे लीलाचरित्र वर्णन.

नारदीय कीर्तन परंपरा सर्वात प्राचीन आहे. तिचे प्रवर्तक स्वतः देवर्षी नारद आहेत. यात श्रीविष्णु राम, श्रीकृष्ण, विठ्ठल, यासारखे त्यांचे अवतार व देवतांच्या लीलांचे गुणगान तसेच थोर वैष्णव संतचरित्रांचे कथन, वर्णन केले जाते. काव्य, नाट्य, अभिनय, गायन, वादन, नर्तन या सर्व कलांचे प्रदर्शन करून हरिकथा अधिकाधिक रंगवून सांगितल्या जातात.

जगातील एकमेव नारद मंदीर महाराष्ट्रात व तेही पुण्यात आहे. तिथे नारदीय कीर्तनाचे विद्यापीठही आहे. हजारो विद्यार्थी- विद्यार्थिनी हौसेने तिथे कीर्तनकला शिकून जगभर आपली कीर्तने सादर करीत आहेत.

सध्या धार्मिक चित्रपट, टी व्ही मालिका, नाटके इ मधे नारदांचे जे चित्र दाखवले जाते ते देवर्षिच्या महानतेपुढे अगदीच ठेंगणे ठुसके आहे, सवंग आहे. नारदांचे पात्र ज्या प्रकारे रंगविले जाते त्यावरून नारद केवळ भांडणे लाऊन गंमत बघणारा, अंगविक्षेप, शब्दच्छल व कोट्या करणारा विदूषक वाटावा.

प्रकांड पांडित्य असलेल्या विराट व्यक्तिमत्वावर केलेला हा सरळ सरळ अन्याय आहे. ते लोक नारदजींचा उपहास करणारे, श्रीहरिच्या या अंशावताराचा अवमान करण्याचा अपराध करणारे आहेत.

भगवंताच्या अधिकांश लीलांत नारदजी अनन्य सहयोगी असतात. ते भगवंताचे पार्षद आहेतच खेरीज देवता गणांचे प्रवक्ता पण आहेत. नारदजी ख-या अर्थाने ‘गुरुंचे गुरु’ आहेत, देवांचे ऋषी- ‘देवर्षि’ आहेत!

ऋषीपंचमीनिमित्त सर्व ऋषी, महर्षींना साष्टांग नमस्कार.

— समाप्त —

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ काही ‘अलिखित’ नियम… लेखक : श्री प्रसन्न पेठे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ काही ‘अलिखित’ नियम… लेखक : श्री प्रसन्न पेठे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

☆

हे माहित असेलच पण तरीही….

काही काही नियम हे ‘अलिखित’ असतात. म्हणजे ते कुठे लिखित स्वरूपात, छापील स्वरुपात नसले तरी जगभर शिष्टाचार-स्वरुपात पाळले जातात.

पूर्वीच्या काळच्या झुंजार राजांची, पराक्रमी योद्धयांची जी अश्वारूढ शिल्पं घडवतात, त्यात एक शिष्टाचार पाळला जातो तो असा –

(१) जर का तो योद्धा लढाई लढत असताना, रणांगणावर झुंजताना मरण आलं असेल, तर तो स्वार असणाऱ्या घोड्याचे पुढचे दोन पाय हवेत दाखवतात.

(२) जर का त्या योद्ध्याला युद्धात जखमा होऊन प्रत्यक्ष युद्धभूमीपासून दूर मरण आलं असेल, तर तो स्वार असणाऱ्या घोड्याचा एकच पाय हवेत असतो असं दाखवतात.

(३) जर तो योद्धा घोड्याच्या बाजूला घोड्याजवळ लगाम धरुन उभा दाखवला असेल, तर त्याचा अर्थ तो योद्धा आणि त्याचा घोडा दोघांना लढाईत मरण आलेलं असतं.

(४) जर तो स्वार असलेल्या घोड्याचे चारही पाय जमिनीवर टेकलेले असतील, तर त्याचा अर्थ त्या योद्ध्याला लढाईखेरीज वेगळ्या कारणाने मरण आलेलं असतं.

☆

लेखक : श्री प्रसन्न पेठे

प्रस्तुती :  सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाची अफाट शक्ती… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाची अफाट शक्ती… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

लुईस या एक अमेरिकन महिला होत्या. त्यांच्या पूर्वायुष्यात वयाच्या ५-१५ वर्षांपर्यंत त्यांच्यावर भरपूर शारीरिक अत्याचार झाले. यामुळे त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच इतका नकारात्मक होता की, हे संपूर्ण जगच वाईट आहे. सर्व पुरुष हे घाणेरडेच असतात व मी जगायला लायक नाही.

ख्रिश्चॅनिटीनुसार त्या ‘नन’ होतात व त्यांच्या धर्मातील आध्यात्मिक पुस्तके वाचत. पुढे वयाच्या ४० व्या वर्षी त्यांना कॅन्सर होतो. जेव्हा त्यांच्या हे लक्षात येते की, ज्यांनी हे कृत्य करायचं ते करून निघूनही गेले; त्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला नाही. त्रास (कॅन्सर) कोणाला झालाय तर मला. कारण इतकी वर्षं त्या सर्वांबद्दलच्या सर्व नकारात्मक भावना (राग, द्वेष, घृणा) मी धरून ठेवल्या आहेत. जर मला यातून बाहेर पडायचे असेल तर त्या सर्वांना माफ करणे खूप गरजेचे आहे. बरं ज्यांनी ते कृत्य केलं, ते माफ करण्यासारखं होतं का? तर आपल्या दृष्टीने नक्कीच नाही.

 – पण ‘लुईस हे’ यांनी मनाची स्वच्छता केली.

त्या सर्व व्यक्तींविषयी मनात असलेला सर्व राग बाहेर काढून त्या सर्वांना मनापासून माफ केले व कोणतेही ऑपरेशन (शस्त्रक्रिया) न करता त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. पुढे ९० व्या वर्षापर्यंत जगभर लेक्चर देत फिरत होत्या.

त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिले आहे ‘यू कॅन हील युवर लाईफ’. त्या पुस्तकाच्या शेवटच्या काही पृष्ठांमध्ये तर त्यांनी एक तक्ता दिला आहे, ज्यामध्ये पहिल्या स्तंभामध्ये आजार, दुसऱ्या स्तंभामध्ये त्यामागील नकारात्मक भावना व तिसऱ्या स्तंभामध्ये कशाप्रकारे सकारात्मक विचार करा म्हणजे तो आजार बरा होईल असे दिले आहे. अगदी सर्दी खोकल्यापासून कॅन्सर पर्यंत सर्व आजारांच्या मागच्या नकारात्मक भावनांचा त्यामध्ये समावेश आहे. हा तक्ता आपल्या मनाची स्वच्छता करायला नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

दुसरे उदाहरण ‘ब्रँडन बेज’ यांचे. त्यांना स्वत:ला फुटबॉलच्या आकाराचा ट्युमर पोटामध्ये होता. बऱ्याच दिवसांपासून पोट सुटल्यासारखं वाटतंय म्हणून रूटिन चेकअपसाठी सोनोग्राफी केली, तेव्हा एवढा मोठा ट्युमर डॉक्टरांना दिसला. त्यांच्या गायनॅकॉलाजिस्ट (स्त्री रोग तज्ज्ञ) तर उडाल्याच. त्या म्हणाल्या, लगेच अ‍ॅडमिट होऊन उद्याच्या उद्या ऑपरेशन करून काढून टाकू. पण ब्रँडन बेज यांना मन, भावना व शरीराच्या संबंधांविषयी चांगली माहिती असल्याने त्या म्हणाल्या, “मला एक महिन्याची मुदत द्या. समजा काही उपयोग नाही झाला तर ऑपरेशन करा. “

एक महिनाभर त्यांनी स्वत:च्या मनाची स्वच्छता केली व जुन्या अनावश्यक आठवणी खणून बाहेर काढल्या व टाकून दिल्या. त्याच्याशी निगडित लोकांना माफ केलं. महिनाभराने सोनोग्राफीत ट्युमरचा आकार निम्म्याने कमी झाला व पुढील तीन महिन्यांत सोनोग्राफी नॉर्मल आली. इतरांनाही याचा उपयोग व्हावा यासाठी त्यांनी ‘The Journey’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे. तसेच ही पद्धत शिकवणारा तीन दिवसांचा कोर्सही सुरू केला आहे. त्या कोर्सचा अनेकांना खूपच उपयोग झाला.

तसेच आपल्या देशातील डॉ. दीपक चोप्रा हे एक प्रख्यात एन्डोक्रायनॉलॉजिस्ट आहेत व अमेरिकेतील एका प्रसिद्ध हॉस्पिटल मध्ये प्रमुख पदावर होते. ते म्हणायचे की, मी अगदी मनापासून कॅन्सरच्या गाठी मुळापासून कापतो, So ideally it should not recur. खरं म्हणजे ते पुन्हा होता कामा नये. पण तरीही recurrence का बरं होतो?

जेव्हा त्यांनी याचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या हे लक्षात आले की, जेव्हा आपल्याला एखादी जखम होते, तेव्हा मलम लावलं तर ती जखम लवकर बरी होते. पण समजा नाही लावलं तरीही ती जखम बरी होतेच. कोण बरं ही जखम बरी करतं? आपलंच शरीर.

जखमेच्या शेजारील mother cells पासून daughter cells तयार होतात व जखम भरून येते. सर्वसाधारणपणे आईचे जसे संस्कार, मानसिकता असेल तशीच मुलीची होते. आपल्या नकारात्मक भावना वेगवेगळ्या पेशींमध्ये साठवल्या जातात. त्यामुळे ट्युमर कापला तरी तिथे जी जखम होते, ती बरी करण्याचं काम तिथल्या mother cells करतात.

पण त्यामध्ये जर नकारात्मक भावना साठवल्या असतील तर नवीन पेशी परत तशाच तयार होणार. त्यामुळे वर-वर फांद्या छाटून उपयोग नाही तर झाड मुळापासून काढायला हवं. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी medical practice बंद केली व आता ते पूर्णपणे cellular healing वर काम करतात. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला मनाची स्वच्छता करायला शिकवतात.

त्यामुळे जर आपण सर्वांनी स्वत:साठी रोजची १५ मिनिटे काढली व मनाची स्वच्छता केली तर आपण कमीत कमी आजारी पडू. बरं मनाची स्वच्छता करताना एखाद्या दिवशी खूपच छान व हलके वाटते पण दुसऱ्या दिवशी परत काहीतर घटना घडतात आणि ‘ये रे माझ्या मागल्या’ प्रमाणे मनात नकारात्मक विचार यायला लागतात.

दारुड्या माणसाला तुम्ही कितीही समजवा की दारू पिणे वाईट आहे व त्याला ते पटते सुद्धा. पण दारूचे दुकान दिसल्यावर पाय बरोबर तिकडे वळतात. त्याचप्रमाणे आपण अगदी ठरवतो सुद्धा की, फक्त सकारात्मकच विचार करायचे. पण एक ठिणगी पुरेशी होते की, लगेच नकारात्मक विचारांची शृंखला सुरू होते. पण हे अगदी नैसर्गिक आहे. ज्याप्रमाणे घरातील धूळ रोज साफ करावी लागते, त्याचप्रमाणे मनाची स्वच्छताही रोज करणे आवश्यक आहे.

प्रयोग म्हणून करून तर पहा. मी जोपर्यंत स्वत: कोणती गोष्ट करून अनुभवून पहात नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवत नाही. तुम्हीही ठेवू नका. पण एकदा तुम्हाला अनुभव आला की, मला खात्री आहे की, रोज ज्याप्रमाणे आपण सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना दात घासायला, अंघोळ करायला, हातपाय धुवायला विसरत नाही, त्याप्रमाणे एकदा तुम्हाला मनाची स्वच्छता करण्याची सवय लागली की, तुम्ही कधीच ही सवय सोडणार नाही.

सर्वांना निरामय आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

आपण सर्व आरोग्यदायी जीवन जगत इतरांना प्रेरित कराल ही अभिलाषा!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री स्नेहलता गाडगीळ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तीन तिघाडा…!” – भाग – 1 ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

??

☆ “तीन तिघाडा…!” – भाग – 1 ☆ श्री संदीप काळे ☆

रायगडमधली सगळी कामं आटवून मी सिद्धार्थ जाधव नावाच्या माझ्या कॉलेज मित्राच्या घरी जेवण केलं. मुंबईमधल्या माणसाला कोणाच्या घरी जाऊन जेवायचं म्हटलं की जरा अडखळल्यासारखं वाटतंच. आणि ते जेवण जर एखाद्या गावच्या ठेवणीत आईच्या स्पर्शाने बनवलं असेल, तर त्याची मजा काही औरच. सिद्धार्थ आणि मी तसे नांदेड जिल्ह्यातले. त्याच्या आईची जुनी ओळख, मग काय — आईने पक्का मराठवाडी जेवणाचा बेत आखला आणि जोरदार जेवण झाले.

जेवण झाल्यावर मी पुढच्या रस्त्याला निघालो. गाडी सुरू होती. मी माझ्या लॅपटॉपवर माझीच प्रेमसेतू नावाची कादंबरी वाचत होतो. बराच वेळ प्रवास झाल्यावर “फणसाड अभयारण्य” असा बोर्ड वाचायला मिळाला. पुढे मुरुड-जंजिरा आणि रोहे अशी शहरे आसपास असल्याचं फलकावरून जाणवलं. त्या रस्त्यावर मध्ये येणारी माणसं — जंगलातून रस्त्यावर प्रवास करणारी माणसं; कोणी फळं विकत होतं, कोणी लाकडं वाहत होतं, कुणी गुरेढोरे चारण्यासाठी जंगलामध्ये ये-जा करत होतं.

जंगलाच्या आतमध्ये थोडं पुढे गेल्यावर माणसांची वर्दळ जरा कमी झाली. एका वाहणाऱ्या शांत आणि निरागस झऱ्यावर माझी नजर गेली. तिथे प्रचंड शांतता होती. आसपास असणारं वातावरण मनाला मोहिनी घालत होतं. मी सगळीकडे पाहिलं — आसपास कोणीही नव्हतं. कदाचित म्हणूनच इथल्या वातावरणामध्ये एक वेगळी शांतता होती.

माझ्यासोबत असलेला शंकर नावाचा माझा चालक मला म्हणाला, “साहेब, तुम्ही त्या झऱ्याकडे पाहत आहात; पण त्याच्या थोडं पलीकडे पहा. ” मी पाहिलं तर एका बाजूला दोन-चार मोर एका झाडाखाली बागडत होते. त्या मोरांच्या पलीकडे, दोन छोटे-छोटे हरणाची पिल्लं पाणी पिण्यासाठी पाऊलवाटेने पाण्याच्या दिशेने जात होती. आम्ही गाडीचा आवाज न करता शांतपणे तिथेच थांबलो होतो.

असं वाटत होतं की माणसाने त्या सगळ्या प्राण्यांच्या विश्वावर प्रचंड अतिक्रमण केलं आहे. बिचाऱ्या प्राण्यांना माणसाने कुठेच सोडलेलं नाही.

माझ्या चालकाने मानेखालची शीट लांब केली आणि त्या लिंबाच्या झाडाखाली रस्त्यावर शांतपणे त्या शीटवर पडला. सिद्धार्थच्या आईचं जेवण त्याच्या अंगाला लागलं होतं, हे माझ्या लक्षात आलं. मी लॅपटॉप आवरला आणि चालकाला आवाज देत म्हणालो, “अरे, मी जरा आलोच. ” ड्रायव्हरने लावलेले डोळे थोडेसे उघडले आणि माझ्याकडे पाहिलं. मी गेल्याची खात्री करून तो अजून शांततेत पडून राहिला.

मला दुरून दिसणाऱ्या त्या झऱ्यापर्यंत मी चालत गेलो. मी जाईपर्यंत त्या हरणांचं पाणी पिणं झालं होतं. माझ्या पावलांच्या चाहुलीने ते मोर केव्हाच पळाले होते. आता मी तिथली शांतता आणि ते पाण्याचे वाहणारे झरे — अशा आमच्यातच न बोलताही गप्पा सुरू होत्या. मी बूट काढले आणि शांतपणे त्या पाण्यात पाय सोडून बसलो.

त्या जागेवर खऱ्या अर्थाने सांगायचं तर शांत जगाची चाहूल लागली होती — म्हणजे माणसं नाहीत, वाहनांची जवळजवळ ये-जा नाही, मोबाईलला रेंज नाही, कोणाचं बंधन नाही, कुठल्या फॅक्टरीचा किंवा विमानाचा आवाज नाही.

मला असं वाटलं होतं की थोडा वेळ झाल्यावर माझा चालक मला शोधत-शोधत तिकडे येईल आणि म्हणेल, “चला, उशीर झाला”; पण तो कशाचा येतोय! शांत ठिकाणी आणि लिंबाच्या झाडाखाली त्याला लागलेली झोप अधिकच गाढ स्वरूपाची होती, हे त्याच्या न येण्यामुळे मी समजून गेलो.

पुढच्या प्रवासाला लागावं, या हेतूने मी उठणार तितक्यात दोन महिला आणि एक मुलगी डोक्यावर लाकडांच्या मोठ्या मुळ्या घेऊन येताना मी पाहिल्या. त्या तिन्ही माझ्या अगदी जवळ आल्या. त्यांनी अलगदपणे त्या लाकडाच्या मुळ्या खाली ठेवल्या आणि मी ज्या ठिकाणी पाय सोडून बसलो होतो त्या झऱ्याचं पाणी गटागट पिऊ लागल्या. पाणी प्यायल्यावर त्यांचा थकलेला चेहरा एकदम प्रसन्न झाला.

त्या सुनसान जागी, जिथे सगळीकडे “सावधान” असे बोर्ड लावलेले होते, जिथे माणसांचा-पक्ष्यांचा फारसा थारा नव्हता, तिथे या दोन महिला आणि एक मुलगी एवढ्या जड लाकडं घेऊन कुठे जात असतील? हे रोजचं त्यांचं काम असेल का? यांना इथल्या हिंस्र प्राण्यांची भीती वाटत नसेल का? असे प्रश्न माझ्या मनात आले.

मी त्यांना बोलावं का, आणि बोलल्यावर त्यांना आवडेल का, हा प्रश्नही मनात आला. पण मी संकोच न ठेवता मोठ्याने आवाज दिला —

“ताई, हे पाणी काय पाईपलाईनचं आहे का?”

मी ज्यांना प्रश्न विचारला, त्या बाईने दुसऱ्या बाईच्या चेहऱ्याकडे पाहिलं, पदरानं चेहरा पुसला आणि हसत म्हणाली,

“दादा, हे जंगलातून येणारं पाणी आहे. इथे कुठली पाईपलाईन आली आहे?”

मी विचारलं, “बारा महिने पाणी असतं का?”

ती म्हणाली, “हो, इथे नेहमी पाणी असतं. ”

मी विचारलं, “तुम्ही कुठे राहता?”

हे ऐकल्यावर तिचा सूर थोडा आवरलेला झाला, “बाजूलाच राहतो, ” एवढंच उत्तर दिलं.

मी म्हणालो, “बरं ताई, ठीक आहे, मी निघतो. ”

त्यावर ती म्हणाली, “दादा, जरासा हात लावाल का, ही लाकडं उचलायला?”

मी हसलो, “हो का नाही, नक्की. ”

पण तिनं लगेच म्हटलं, “असू द्या, दादा. आम्ही थोडं खातो, थोडा वेळ बसतो, मग निघतो. ”

मी हो म्हणून मान हलवली.

तिने पिशवीतून भाकरी काढली. त्या खात होत्या. त्या दोन मोठ्या महिलांना मला बोलायला संकोच वाटत होता, पण धाकटी मुलगी मोकळेपणाने बोलत होती.

ती म्हणाली, “दादा, तुम्ही आमच्या सरांसारखे दिसता. तुम्ही पण शिक्षक आहात का?”

मी हसत उत्तर दिलं, “नाही, मी पुस्तकं लिहितो, लेखक आहे. ”

ती म्हणाली, “थोडं खाल का भाकरी?”

मी म्हणालो, “नको, मी आत्ताच जेवलो. ”

ते ऐकून दुसरी महिला म्हणाली, “अगं, एवढे मोठे माणसं आहेत, तुझा चटणी-भाकरीचा तुकडा खातील का?”

हे ऐकून मुलीचा चेहरा पडला.

मी म्हणालो, “अहो, अन्नापुढे लहान-मोठं असतं का? दे, अर्धी भाकरी मलाही द्या, मी खातो. ”

माझं ऐकताच ती मुलगी पटकन उठली. तिनं भाकरीचा एक तुकडा मोडला, त्यावर चटणी लावली, एक मिरची ठेवली आणि मला दिली.

तो घास तोंडात जाताच माझ्या मनानं सिग्नल दिला — हा मेनू झकास आहे! हॉटेलमधून सोन्याचा चमचा घेऊन खाण्यापेक्षा हा मानपानानं दिलेला घास कितीतरी मौल्यवान होता.

जेवताना गप्पा सुरू झाल्या. त्यातून त्यांच्या जगण्याच्या गोष्टी उलगडल्या.

सर्वसामान्य माणसाला रोज पोटाची आग भागवण्यासाठी काय काय उपाय करावे लागतात, हे लाल दिव्याच्या गाडीत बसून योजना करणाऱ्यांना कळणारच नाही.

ती एक मुलगी आणि त्या दोन महिला माझ्यासाठी जिवंत केस स्टडी होत्या — गरिबी आणि लाचारीत जगणारा महाराष्ट्र माझ्यासमोर उभा राहिला. पण या गरिबीतही त्यांनी आपला स्वाभिमान कधीच विकला नव्हता — हाच महाराष्ट्राचा चेहरा आहे.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

व्हाइस ऑफ मिडिया, मुंबई 

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ Just do it, then fix it… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ Just do it, then fix it… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

बर्था बेंझ

Just Do it, then fix it !

ही गोष्ट आहे १८८८ सालची. जर्मनीतील एक तरुण गृहिणी, बर्था, आपल्या पतीबद्दल काळजीत होती. तिने कार्ल नावाच्या एका हुशार संशोधकाशी लग्न केलं होतं, कारण तिला त्याच्या प्रतिभेवर प्रचंड विश्वास होता. लग्नामध्ये तिने माहेरून मोठी रक्कम आणली होती, ज्यातून कार्लने त्याच्या सर्वात मोठ्या शोधासाठी, ‘मोटरवॅगन’साठी पैसा गुंतवला होता. ही मोटरवॅगन म्हणजे जगातील पहिल्या इंजिन (internal-combustion engine) असलेल्या तीन चाकी गाडीचा एक नमुना होता.

बर्थाचा पतीवरील विश्वास बरोबर होता, कार्ल खरंच एक हुशार संशोधक होता. पण त्याची एक मोठी अडचण होती – त्याला आपल्या कामाचं मार्केटिंग अजिबात जमत नव्हतं. त्याने एकही गाडी विकली नव्हती. लोक त्याच्या ‘मोटरवॅगन’कडे फक्त एक खेळणं किंवा कुतूहलाची वस्तू म्हणून पाहत होते. या गाडीचं मार्केटिंग कसं करावं, हे कार्लला कळतच नव्हतं. तो फक्त आपल्या गाडीचं डिझाईन अधिकाधिक सुधारण्यात वेळ घालवत असे.

पण बर्था अधिक व्यवहारी होती. तिला माहित होतं की लोकांना फक्त बोलून पटणार नाही, तर त्यांना पुरावा हवा होता. ‘मोटरवॅगन’ हे फक्त एक खेळणं नसून, ते घोडागाडीसारखं सर्व काम करू शकते, हे सिद्ध करण्याची गरज होती.

एके दिवशी सकाळी, तिने कार्लसाठी एक चिठ्ठी लिहिली. त्यात लिहिलं होतं की, “मी आपल्या १३ आणि १५ वर्षांच्या दोन्ही मुलांना घेऊन माझ्या आईकडे जात आहे. ” तिची आई १०० किलोमीटर दूर राहत होती. त्यामुळे कार्लला वाटलं की ती ट्रेननेच जाईल. पण जेव्हा त्याने गॅरेजचा दरवाजा उघडला, तेव्हा त्याच्या काळजात धस्स झालं.

त्याची ‘मोटरवॅगन’ गायब होती! त्याला विश्वासच बसेना. ‘ती गाडी घेऊन तर नाही ना गेली?’ तो स्वतःशीच पुटपुटला. त्या गाडीत फक्त दहा मैल (अंदाजे १६ किमी) चालेल एवढंच इंधन होतं आणि वाटेत इंधन भरण्यासाठी कोणतीही जागा नव्हती. शिवाय, पक्के रस्ते नव्हतेच, फक्त खडबडीत आणि खाचखळग्यांच्या पायवाटा होत्या. त्या रस्त्यांवर त्याच्या ‘मोटरवॅगन’चे तुकडे तुकडे झाले असते. हे निव्वळ वेडेपणाचं धाडस होतं.

पण बर्थाने ते धाडस केलं होतं. तिने प्रवासात येणाऱ्या अडचणींचा कोणताही विचार केला नव्हता. तिने ठरवलं होतं की समस्या जशा येतील, तशा त्या सोडवायच्या.

पहिली समस्या लगेचच समोर आली – गाडीतलं पेट्रोल संपलं. बर्थाला माहित होतं की ‘लिग्रोइन’ (Ligroin) नावाचं पेट्रोल-आधारित द्रावक (solvent) अनेक औषधांच्या दुकानात मिळतं. तिने एका छोट्या गावात औषधांचं दुकान शोधलं आणि तिथे एक-एक लीटरच्या दहा बाटल्या विकत घेतल्या. (आणि अशाप्रकारे, तिने नकळतपणे जगातल्या पहिल्या ‘पेट्रोल पंप’ची कल्पना प्रत्यक्षात आणली होती.)

थोड्या वेळाने, दोन तारा एकमेकांना चिकटल्या आणि गाडीची इलेक्ट्रिकल सिस्टीम बंद पडली. बर्थाने त्या तारांना वेगळं करण्यासाठी ‘गार्टर’ (garter – एक कपडा) वापरला आणि तारांना एकमेकांपासून दूर ठेवलं. (आणि अशाप्रकारे, तिने ‘इन्सुलेशन’च्या प्राथमिक स्वरूपाचा शोध लावला होता.)

पुढे गेल्यावर, कार्बोरेटरमध्ये कचरा अडकला आणि गाडी बंद पडली. फुंकर मारूनही तो कचरा निघेना. तेव्हा बर्थाने आपल्या हॅटला लावलेली लांब ‘पिन’ (hatpin) काढली आणि तिने कार्बोरेटर साफ केला. (आणि अशाप्रकारे, तिने एका अर्थाने ‘रोडसाईड असिस्टन्स’ची सुरुवात केली होती.)

प्रवासात गाडीचे लाकडी ब्रेक-ब्लॉक घासून घासून गुळगुळीत झाले होते. ब्रेक लागेनासे झाले. तिने एका गावातल्या चांभाराला शोधून काढलं आणि त्याला त्या लाकडी ब्लॉक्सच्या आकाराचे दोन चामड्याचे तळवे बनवायला सांगितले. (आणि अशाप्रकारे, तिने आजच्या ‘ब्रेक-पॅड’ची कल्पना जन्माला घातली होती.)

अखेरीस, एक उंच डोंगर आला, जो गाडीचं लहान इंजिन चढू शकत नव्हतं. गाडीत फक्त दोनच गिअर होते, कारण ती फक्त सपाट जमिनीवर चालवण्यासाठी बनवली होती. बर्थाने आणि तिच्या दोन्ही मुलांनी गाडीला धक्का मारत डोंगर चढवला. तेव्हा तिला कळलं की डोंगर चढण्यासाठी गाडीला कमी ताकदीचा ‘लोअर गिअर’ असणं गरजेचं आहे.

अखेरीस, अनेक अडचणींवर मात करत ती तिच्या आईच्या घरी पोहोचली. तिने लगेच आपल्या पतीला तार (telegram) करून आपण सुरक्षित पोहोचल्याचं कळवलं. दुसऱ्या दिवशी, ती त्याच गाडीने १०० किलोमीटरचा परतीचा प्रवास करून घरी परत आली.

तिने दोन दिवसांत २०० किलोमीटरचा प्रवास करून हे सिद्ध केलं होतं की, तिच्या पतीची ‘मोटरवॅगन’ घोडागाडीपेक्षा कमी नाही. तिच्या या धाडसी प्रवासाची बातमी संपूर्ण जर्मनीत वाऱ्यासारखी पसरली. लोकांचा ‘मोटरवॅगन’कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि कार्लच्या कंपनीला प्रचंड यश मिळालं.

बर्थाचं माहेरचं आडनाव ‘रिंगर’ होतं, पण तिचं सासरचं आडनाव होतं ‘बेंझ’ आणि तिच्या पतीचं नाव होतं ‘कार्ल बेंझ’. बेंझ कंपनी यशस्वी झाली. कालांतराने १९२६ मध्ये तिचं ‘डेमलर’ (Daimler) कंपनीत विलीनीकरण झालं आणि जगातली सर्वात प्रसिद्ध कंपनी ‘मर्सिडीज-बेंझ’ (Mercedes-Benz) उदयास आली.

बर्था बेंझच्या या गोष्टीतून आपण काय शिकू शकतो? आपण हे शिकू शकतो की, “सर्व काही योग्य होण्याची” वाट पाहत बसल्याने समस्या कधीच सुटत नाहीत. आपल्याकडे उत्तरं नसली तरीही सुरुवात करणं महत्त्वाचं आहे, कारण समस्या कधीच आपल्या अपेक्षेप्रमाणे येत नाहीत. आपण विचार करत बसलो, तर संधी हातातून निघून जाऊ शकते.

प्रसिद्ध लेखक जेम्स क्लिअर यांनी एकदा एक किस्सा सांगितला होता. ते काही वरिष्ठ मॅनेजमेंट अधिकारी आणि सल्लागारांसोबत एका चर्चेत सहभागी होते. एका नाविन्यपूर्ण कल्पनेबाबत चर्चा सुरु होती. अनेक तांत्रिक आणि व्यवस्थापकीय मुद्दे अनेकजण मांडत होते. त्या चर्चेत सहभागी असलेल्यांपैकी सगळ्यात यशस्वी, प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यक्ती मात्र एकच गोष्ट बोलली… की हे आधी करून बघूया… नंतर सुधारणा करत करत पुढे जाऊया !(Do it, then fix it) ती व्यक्ती होती “वर्जिन ग्रुप”चे सर रिचर्ड ब्रॅन्सन !

बर्था बेंझने १८८८ मध्ये हेच केलं होतं. Just Do it, then fix it!

लेखक : श्री सलिल सुधाकर चौधरी 

 नेटभेट + ई-लर्निंग सोल्युशन्स, 

 (मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !) 

प्रस्तुति : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆”लेफ्टनंट जनरल सुरेंद्र नाथ शर्मा” – इंग्लिश माहिती संग्राहक : अज्ञात अनुवादक ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ ”लेफ्टनंट जनरल सुरेंद्र नाथ शर्मा” – इंग्लिश माहिती संग्राहक : अज्ञात अनुवादक ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

 लेफ्टनंट जनरल सुरेंद्र नाथ शर्मा 

आज एका अत्यंत कणखर व्यक्तिमत्त्वाबद्दल आपण जाणून घेऊयात.

हे आहेत लेफ्टनंट जनरल सुरेंद्र नाथ शर्मा (S N Sharma). ते १०२ वर्षांचे आहेत. त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९२३ रोजी झाला. त्यांच्या पत्नी ९७ वर्षांच्या आहेत त्यांचे सर्व कुटुंबीय ही भारतीय सेनेशी पराक्रमाने जोडले गेलेले आहे.

चला, थोडी झलक पाहूया….

त्यांचे वडील मेजर जनरल अमरनाथ शर्मा हे भारतीय सेनेमध्ये डॉक्टर होते व त्यांनी डायरेक्टर जनरल ऑफ आर्मी मेडिकल कॉर्पस् हे पद भूषविले होते.

त्यांचे मोठे बंधू मेजर सोमनाथ शर्मा यांना अतुलनीय शौर्याबद्दल पहिले परमवीर चक्र मिळाले आहे..

त्यांचे धाकटे बंधू लेफ्टनंट जनरल विश्वनाथ शर्मा हे ही भारतीय सेनेत १९८८ ते १९९०या काळात चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते।

लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ शर्मा यांच्या पत्नीच्या मातोश्री यांनी आपल्या सेनेच्या परमवीर चक्राचे डिझाईन तयार केले आहे.

स्वतः लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ शर्मा भारतीय सेनेत पॅराट्रूपर होते. पॅरॅशूट मधून उडी घेणे ही गोष्ट ते अत्यंत बिनचूकपणे, आवडीने व सर्वस्व पणाला लावून करत असत. आपल्या आयुष्यातील अशी शेवटची उडी त्यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी मारली आहे.

लेफ्टनंटसाहेब अजूनही स्वतः मोटर ड्रायव्हिंग करतात. हिमाचल प्रदेश येथे असलेल्या त्यांच्या फार्म हाऊसवर पोचण्यासाठी ते स्वतः च १० तास ड्रायव्हिंग करतात.

तुम्ही काय खाता या पत्रकाराच्या प्रश्नाला त्यांनी मोठे मार्मिक उत्तर दिले आहे – – 

“ काळजी आणि ताण हे सोडून मी सर्व काही खातो ! अगदी पोटभर ! “ 

– – आपण सर्वांनी, विशेषत: ज्येष्ठ आणि अति ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्यापासून स्फूर्ती घेतली पाहिजे आणि आपण सर्वांनी ह्या थोर गृहस्थांचा आदर्श ठेवला पाहिजे.

इंग्लिश माहिती संग्राहक : अज्ञात 

मराठी अनुवाद : प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कलीयुगातील राम-सीता!! – लेखक : श्री प्रमोद आसने ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

 

☆ कलीयुगातील राम-सीता!! – लेखक : श्री प्रमोद आसने ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

रोडच्या कडेनं जाणारं प्रत्येक गरीब जोडपं भिकारी असतंच, असं काही नाही…

आज कोपरगाव येथून येत असताना रोड च्या कडेने एक म्हातारं जोडपं जाताना दिसलं माझी नेहमीची सवय असल्यामुळं मी त्या भिकारी दिसणाऱ्या जोडप्याला दुपार असल्यामुळं सहजच जेवणाचं विचारलं, तर ते ‘नको’ म्हणाले. मग मी त्यांना 100 रुपये देऊ केले, तर ते सुद्धा नको म्हणाले, मग पुढचा प्रश्न विचारला की :तुम्ही असे का हिंडताय? ‘

 – – मग सुरू झाला त्यांचा जीवनपट – 

ते 2200 km चा प्रवास करून आता द्वारकेला स्वतःच्या घरी परत चालले होते. त्यांनी सांगितले की माझे दोन्ही डोळे 1 वर्षांपूर्वी गेले होते आणि डॉक्टरनी सांगितले की ऑपरेशन करून उपयोग नाही मग माझ्या आईने डॉक्टर ला भेटून ऑपरेशन करायला भाग पाडले व तिने श्री कृष्ण मंदिरात जाऊन देवाजवळ नवस केला की, ‘डोळे परत आले तर माझा मुलगा पदयात्रा करत बालाजी व पंढरपूर ला जाऊन परत द्वारकेला पायी येईल’,

म्हणून मी आईच्या शब्दासाठी पदयात्रा करतोय, मग मी त्यांच्या बायकोविषयी विचारलं तर ‘ती पण मला एकटं सोडायला तयार नव्हती व रस्त्याने मी तुम्हाला जेवण तयार करायला येते’, म्हणून निघाली.

मग मी ते 25% हिन्दी 75% इंग्रजी बोलत असल्यामुळे शिक्षण विचारलं तर माझी बुद्धी ऐकून सुन्न झाली. त्यांनी लंडन येथे ऑक्सपोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये 7 वर्षे खगोलशास्त्र यावर पी एच डी केलीय तर त्यांच्या बायकोने ‘मनोविकार शास्त्र’ या विषयावर लंडन येथेच पी एच डी केलीय (एवढं शिकून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर गर्व नाही, नाहीतर आपल्या कडे 10 नापास सुद्धा छाती ताणून हिंडतो) एवढंच नाहीतर व सी. रंगराजन (गव्हर्नर) यांचे बरोबर, तसेच कल्पना चावला ह्यांच्या बरोबर काम व मैत्रेचे संबंध होते, तसेच त्यांना मिळणारी मासिक पेन्शन ते एक अंध ट्रस्ट ला ते देऊन टाकतात. सध्या ते सोशल मिडियापासून लांब राहतात, रोडच्या कडेन जाणार प्रत्येक जोडपं भिकारी असतंच असं काही नाही, एखादा पुरुष हा आपल्या आईच्या शब्दासाठी प्रभू राम व्हायला तयार होतो आणि आपल्या पतीसोबत कोणी स्त्री सीता सुद्धा होते, म्हणूनच आज भेटलेली माणसे कलीयुगातील मी तर राम-सीता च समजतो 

आम्ही जवळ जवळ 1 तास त्यांच्याशी गप्पा मारल्या रोडवर उभा राहूनच. इतके प्रगल्भ विचार एकूण मन सुन्न झाले. अहंकार गळून गेला. आणि वाटलं की आपण उगाचच खोट्या फुशारकीवर जगतो. त्या व्यक्तीच्या बोलण्यातील सहजपणा बघून असं वाटलं की आपण या जगात शून्य आहोत. हा पायी प्रवास बघून थक्क झालो. प्रवासाला निघून तीन महिने झाले आणि अजून घरी पोहचायला एक महिना लागेल.

त्यांचे नाव –

डॉ. देव उपाध्याय व डॉ. सरोज उपाध्याय.. कलीयुगातील राम सीता…!!!

┉❀꧁꧂❀┉

लेखक : श्री प्रमोद आसने 

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आज एक यशोदा भेटली… लेखक : श्री सागर कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ आज एक यशोदा भेटली… लेखक : श्री सागर कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

 (F O S T E R C A R E) 

सौ. गीतांजली रोहोकले व श्री. सुनील रोहोकले. पार्ल्यामध्ये राहणारे एक उच्च वर्गीय सुखी कुटुंब..

गीतांजली रोहोकले हे नाव ‘स्वयं टॉक’ फॉलो करणार्यांना नक्कीच परिचित असणार. श्री. रोहोकले ICICI मध्ये दहा वर्ष जनरल मॅनेजर आणि आता एका इन्व्हेस्टमेंट कंपनी मध्ये CEO म्हणून कार्यरत… मुलगी दहावीत तर मुलगा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत.. स्वतः मॅडम अनेक सामाजिक संस्थाबरोबर कार्यरत.. एकंदरीत आपल्या सारख्या कुटुंबाची जी काही स्वप्न असतात ती पूर्ण झालेले सुखी कुटुंब….

काल ह्या दाम्पत्याला भेटण्याचा योग आला, निम्मित होतं ‘स्वयं’ टॉकवर ऐकलेली ‘फॉस्टर मदर गीतांजली रोहोकले’ यांची मुलाखत. एकदा तरी प्रत्यक्ष जाऊन ह्यांना भेटायचे हे मी व सौ. ने तेव्हाच मनाशी पक्कं केलं होतं.

जवळजवळ दहा महिन्यांनी हा योग जुळून आला. अनेक प्रश्न मनात होते, एखादी छोटी गोष्ट सुद्धा विसरायला होऊ नये म्हणून सौ. नी तर चक्क एका कागदावर प्रश्नावलीच लिहून काढली…..

बदलापूर ते पार्ला 3 तासाचा प्रवास एकदाचा संपला आणि आम्ही त्यांच्या घरी पोचलो… आमच्या स्वागतासाठी मॅडम दारातच उभ्या होत्या. अतिशय प्रसन्न व हसतमुखाने आमचे स्वागत झाले.. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नक्की मिळणार ह्याची खात्री त्याच क्षणाला पटली…

“FOSTER CARE” म्हणजे नक्की काय?? हे बहुतेकांना माहीत नसावे.. त्यांच्यासाठी थोडक्यात माहिती..

अनाथ आश्रमात आलेली लहान बाळे.. ते दत्तक जाईपर्यंत काही कुटुंबांकडे सांभाळायला दिली जातात. लहान असताना त्या बाळांना आईच्या मायेची व कुटुंबाची नितांत गरज असते. कोवळ्या मनाला आधार व आकार देण्याचे काम अशी काही कुटुंबं करत असतात. त्यांना “Foster Care Family” म्हणतात…

थोडक्यात सांगायचे तर देवकीच्या पोटी जन्माला आलेला कृष्ण यशोदेकडे सांभाळायला दिला गेला. त्यामुळे यशोदा माता आणि नंद राजा हे कृष्णाची Foster Care Family झाली…

मॅडमशी बोलताना, त्यांचे अनुभव ऐकतांना पदोपदी त्यांच्या डोळ्यांत, त्यांच्या देहबोलीत नितांत मातृत्वाचा झराच वाहतोय ह्याचा अनुभव येत होता.

फॉस्टर मदर असलेल्या गीतांजली मॅडम बऱ्याच सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. TB झालेल्या मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थामध्ये त्या प्रत्यक्ष काम करतात.. फक्त देणगी स्वरूपात आपली सामाजिक जबाबदारी पूर्ण न करता प्रत्यक्ष काम करण्याकडे त्यांचा कल आहे.

घरी आलेल्या बाळाची काळजी घ्यायला, त्यांची देखभाल करायला पगारी तत्वावर बाई ठेवणे सहज शक्य असताना, मॅडम सगळे स्वतः जातीने करतात.. अगदी आलेल्या बाळाला आंघोळ घालण्यापासून, त्यांचे खाणेपिणे, औषधे सर्व काही त्या स्वतः करतात. ‘आपल्याला अशा मुलांची आईच व्हावे लागते’ असा त्यांचा आग्रह आहे..

अनाथ आश्रमातील एक बाळ जास्तीत जास्त पाच ते सहा महिने फॉस्टर फॅमिलीकडे असते. बाळ त्याच्या हक्काच्या पालकांच्या घरी जाईपर्यंत त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, ह्याची संपुर्ण काळजी मॅडम घेत असतात..

बाळ आल्या दिवसापासून, त्याच्या प्रत्येक छोट्या छोट्या हरकतींचे व्हिडिओ, त्याच्या प्रत्येक महिन्याच्या वाढदिवसाचे फोटो काढून त्याचा एक अल्बम मॅडम दत्तक घेणाऱ्या पालकांना देतात. नवीन पालकांनी बाळाच्या लहानपणीचे कुठलेही क्षण मिस करू नयेत, त्यांचे बाळ अगदी लहान असतांना कसे दिसायचे हे त्यांनाही माहीत असावे, बाळ मोठे झाल्यावर आपण लहानपणी कसे दिसायचो हे त्यालाही कळावे म्हणून हा सगळा प्रेमळ खटाटोप.

आज संस्थेला अश्या कुटुंबांची खूप गरज आहे. लहान बाळं जेव्हा अनाथ आश्रमात येतात तेव्हा फार नाजूक स्थितीत असतात. जन्मतःच आईशी तुटलेली नाळ, हरवलेले कुटुंबाचे छत्र.. भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या खूप मोठे वादळ त्यांनी अनुभवलेलं असते. त्या काळात त्यांना मायेची, कुटुंबाच्या भक्कम आधाराची नितांत गरज असते.

एवढ्या लहान, म्हणजे अगदी चार ते पाच दिवसांच्या बाळाला काही कळते का हो? कुतूहलापोटी माझा निरर्थक प्रश्न.. पण त्यावर मॅडमनी दिलेलं उत्तर ऐकताना सगळ्यांच्याच डोळ्यांच्या कडा पाणावल्या….

त्या म्हणाल्या, “अश्या सगळ्या बाळांमध्ये एक सवय खूप प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे दूध पितांना किंवा झोपताना ते बाळ कायम आईचे एक बोट मुठीत गच्च धरून ठेवते. एकदा हरवलेले मायेचे छत्र परत हरवेल ही भीती इतक्या लहान वयातही त्यांच्या मनात घर करून असते”.

दत्तक जाईपर्यंत आणि एक शाश्वत आधार मिळेपर्यंत.. म्हणजेच अनाथ आश्रम ते हक्काचे घर ह्या प्रवासाचा सेतू फॉस्टर फॅमिलीला बांधायचा असतो.

हे सगळे अनुभव सांगताना मुंबईमध्ये केवळ सहा फॉस्टर फॅमिली आहेत ह्याची खंत ह्या माऊलीच्या बोलण्यातून जाणवत होती. ही संख्या वाढण्याची खूप नितांत गरज आहे असे त्यांना मनोमन वाटते.

रोहोकले दाम्पत्यांना भेटण्याचा योग मिळाला हे आमचे भाग्यच. “तुमचे कार्य असेच अखंड सुरू राहो” ह्या सदिच्छा देऊन, अतिशय सुंदर भेटीचा मौल्यवान खजिना घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो,

ते लवकरच परत भेटण्याचा योग येईल ह्या सकारात्मक विचारांनीच…

लेखक : श्री सागर कुलकर्णी,

बदलापूर. मो  8806816983

संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ संपूर्ण देशातील मुलींसाठी एक प्रेरणा मणिपूरच्या अदासो कपेसा – लेखक : ॲड विलास पाटणे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता जोशी ☆

सुश्री सुनिता जोशी

 

 

? इंद्रधनुष्य ?

☆ संपूर्ण देशातील मुलींसाठी एक प्रेरणा मणिपूरच्या अदासो कपेसा – – लेखक : ॲड विलास पाटणे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता जोशी ☆

मणिपूरच्या अदासो कपेसा पंतप्रधान मोदींच्या पहिल्या महिला अंगरक्षक.

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच, पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी एका महिला अंगरक्षकाची नियुक्ती झाली आली आहे. या महिला अधिकाऱ्याचे नाव अदासो कपेसा आहे.

अदासो कपेसा ह्या मणिपूरच्या सेनापती जिल्ह्यातील कैबी गावच्या रहिवासी आहेत. सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या असूनही त्यांनी आपले ध्येय कधीही नजरेआड होऊ दिले नाही. एसपीजी मध्ये रुजू होण्यापूर्वी, अदासो कपेसा सशस्त्र सीमाबलाच्या ५५ व्या बटालियनमध्ये पिथौरागढ येथे इन्स्पेक्ट म्हणून कार्यरत होत्या. तिथेही त्यांनी आपल्या कामात उच्च दर्जाची प्रतिबद्धता आणि शिस्त दाखवली.

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये निवड होणे ही भारतातील सर्वात कठीण निवड प्रक्रियांपैकी एक आहे. अदासो यांना प्रतिनियुक्तीवर एसपीजी मध्ये पाठवण्यात आले, जिथे त्यांनी अत्यंत कठोर कमांडो प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणादरम्यान त्यांची कामगिरी इतकी उत्कृष्ट होती की, त्यांना पंतप्रधानांच्या सुरक्षा टीममध्ये नियुक्त करण्यात आले.

मणिपूरच्या एका छोट्याशा गावातून येऊन एसपीजी सारख्या प्रतिष्ठित युनिटमध्ये स्थान मिळवणे कौतुकास्पद आहे. त्या केवळ आपल्या गावासाठी किंवा मणिपूरसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशातील मुलींसाठी एक प्रेरणास्थान आहेत.

– – त्यांचा संघर्ष, शिस्त, आणि अतूट विश्वास यांना अभिवादन !! 

लेखक : ॲड विलास पाटणे

प्रस्तुती : सुश्री सुनीता जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares