मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘एक कठोर सत्य…’  – लेखक : अज्ञात ☆ स्वैर अनुवाद : सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

‘एक कठोर सत्य…’  – लेखक : अज्ञात ☆ स्वैर अनुवाद : सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

एक कठोर सत्य – – – 

आयुष्य.. आपल्याला कल्पनाही करता येणार नाही इतकं अनिश्चित असतं आयुष्य.. आणि आपल्यासाठी अनपेक्षित असं काहीतरी आपल्यासमोर उभं करू शकणारी स्वैरता त्याच्याकडे असते.

तुम्ही तुमच्या प्रिय माणसांबरोबर सुट्टी उपभोगण्यासाठी जाता आणि.. अतिरेकी गोळीबार करतात.

तुम्ही जिंकलेला करंडक हातात उंच धरून सर्वांना दाखवत तुम्ही विजयाचा आनंद साजरा करता आणि..

अनपेक्षितपणे झालेल्या प्राणघातक चेंगराचेंगरीत तो आनंदच संपून जातो.. जणू निष्प्राण होतो.

काही कामासाठी किंवा निव्वळ सुट्टीचा आनंद घेण्यासाठी जायचं म्हणून तुम्ही एका विमानाने जायला निघता.. आणि ते विमान पुन्हा कधीच जमिनीवर उतरतच नाही.

नेहेमीसारखंच दुपारचं जेवण करण्यासाठी तुम्ही काम थांबवून होस्टेलच्या मेसमध्ये येता आणि.. त्या इमारतीवर विमान कोसळतं.. काही कळायच्या आतच.

…. अशांपैकी कुणीच कधीच असा विचार नक्कीच केलेला नसेल की आपलं आयुष्य अशा तऱ्हेने संपेल.

…. अशांपैकी कुणीच त्यादिवशी सकाळी असा विचार करत उठलेला नसेल की त्याच्या आयुष्यातली ती शेवटची सकाळ असणार आहे.

…. ते सगळे जण फक्त जगत होते.. इतर माणसांसारखंच.. त्या त्या क्षणात.. आपल्या आयुष्यात उद्याचा दिवसही नेहेमीसारखाच येईल हा विश्वास बाळगून.

– – आणि आयुष्याचं हेच कठोर सत्य आहे.

मृत्यू फारच क्वचित दार ठोठावतो.. तो फक्त ‘येतो’… अगदी थेट.. शांतपणे.. तत्क्षणी.. कुणाचीही कसलीही परवानगी न घेता…. आणि बहुतेकदा अशा मार्गाने की ज्यासाठी आपण कधीच सज्ज असत नाही.

.. त्यामुळे तुम्ही जर आत्ता श्वास घेत असलात तर क्षणभर थांबा.. भीतीमुळे नाही.. तर कृतज्ञता म्हणून.

आजूबाजूला बघा.. हवेचा जाणीवपूर्वक अनुभव घ्या.. ‘ ती आहे ‘ हे तुम्हाला जाणवू दे. आजूबाजूचे वेगवेगळे ध्वनी लक्ष देऊन ऐका….. हा क्षण जरी नेहेमीसारखा.. सामान्य वाटत असला तरी तो तुमच्या विशेष हक्काचा आहे.. हे आवर्जून लक्षात ठेवा.

तुमचं ज्या कुणा व्यक्तींवर प्रेम असेल त्यांना साद घाला.. त्यांच्यासमोर तुमचं प्रेम व्यक्त करा.. त्यासाठी उगीच कसली वाट बघत बसू नका.

जरा घराबाहेर.. स्वतःच्या विश्वाबाहेर पाऊल टाका.. आभाळ ढगाळलेलं असलं तरीही त्याच्याकडे डोळे भरून बघा. कुणाकडे तरी बघून छान स्मित करा. तुम्हाला गरजेचं वाटत नसलं तरीही इतर माणसांशी सभ्यपणाने.. प्रेमळपणाने वागा.

ज्या गोष्टी मनात साठवून ठेवण्याची खरंच अजिबात गरज नसते त्या गोष्टी लगेच मनातून काढून टाका.. क्षमा करायला जमणार असेल तर लगेच क्षमा करून टाका… ‘जाणते’पणाने जगा.. प्रामाणिकपणे बोला…. आणि अगदी मनापासून प्रेम करा.

कारण – – कारण आपण सकाळी जागे होतो तो प्रत्येक दिवस आपल्याला नक्की दिल्याचं आश्वासन आपल्याला कधीच कुणाकडूनही मिळालेलं नसतं.. आणि म्हणूनच प्रत्येकच दिवस आपल्यासाठी फार मौल्यवान असतो…

*******

एक इंग्लिश पोस्ट : लेखक : अज्ञात 

स्वैर अनुवाद : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारताच्या संरक्षण सिध्दतेमध्ये रतन टाटांची असामान्य दूरदृष्टी… लेखक – श्री प्रमोद कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆भारताच्या संरक्षण सिध्दतेमध्ये रतन टाटांची असामान्य दूरदृष्टी… लेखक – श्री प्रमोद कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

या आठवड्यात टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेडने जागतिक कीर्तीच्या लढाऊ विमान रॅफेलच्या संपूर्ण मध्यवर्ती सांगाड्याच्या (Fuselage) निर्मितीसाठी फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशन बरोबर करार केला ही एक महत्वाची बातमी आहे. भारतासाठी आणि टाटा समूहासाठी ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. परंतु रतन टाटांच्या २००७ साली घेतलेल्या असामान्य दूरदृष्टीच्या निर्णयाने हे यश साध्य होऊ शकले आहे हे आपल्यापैकी अनेकांना कदाचित माहित नसेल.

अतिशय प्रतिकूल सरकारी धोरणे असलेल्या परिस्थितीत रतन टाटांनी २००७ मध्ये यासंदर्भात काही धाडसी पावले उचलली होती.

१९६२ मध्ये रतन टाटा, टाटा समूहात सामील झाले होते. तेव्हापासून, त्यांना भारतातील सर्व क्षेत्रातील उद्योगांची परिस्थिती, मर्यादा आणि क्षमता यांची सखोल कल्पना होती. रतन टाटांनी नेहमीच राष्ट्रीय आणि सामाजिक गरजांमध्ये व्यवसायाच्या संधी शोधल्या.

२००५ ते २००८ पर्यंत ते हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड (HAL) च्या संचालक मंडळावर होते. या पदामुळे आणि त्यांच्या जागृत जाणीवेमुळे त्यांच्या लक्षात आले की भारत त्याच्या संरक्षण गरजांसाठी आयातीवर खूप अवलंबून आहे. त्यावेळी भारत त्याच्या संरक्षण गरजांपैकी सुमारे ७०% गोष्टी आयात करत होता. स्वदेशी उत्पादन फक्त सरकारी मालकीच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये होते.

१९५१ मध्ये लागू झालेल्या एका कायद्याद्वारे, खाजगी क्षेत्राला भारताच्या संरक्षण गरजासाठी लागणारे साहित्य तयार करण्याची परवानगी नव्हती. या कायद्याने एकूणच उद्योगांवर अनेक निर्बंध आणि परवान्याच्या पूर्व-अटी देखील लादल्या होत्या. या कायद्यामुळेच खऱ्या अर्थाने भारतात ‘लायसेन्स राज’ निर्माण झाले होते.

संरक्षण क्षेत्रातील आयातीसाठी प्रचंड परकीय चलन लागत होते, लाखो रोजगार क्षमता वाया जात होत्या, भारतीय प्रतिभेचा वापर होत नव्हता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परदेशी पुरवठादारांकडून कधी लहरी नकार दिल्याने भारतीय सार्वभौमत्वाला धक्का बसत होता. या एकूण परिस्थितीमुळे संवेदनशील देशप्रेमी रतन टाटा अस्वस्थ झाले होते. त्यांना भारताच्या संरक्षण उद्योगाची वाईट स्थिती माहित होती. त्यांना भारताचे सार्वभौमत्व जपायचे होते आणि भारताच्या लष्करी क्षमता मजबूत करायच्या होत्या.

रतन टाटा हे चौकटीबाहेर विचार करणारे आणि काळाच्या खूप पुढे पाहणारे व्यक्ती होते. त्यांनी विचार केला की जरी देशांतर्गत बाजारपेठ कायद्याने प्रतिबंधित असली तरी परदेशी बाजारपेठा ते शोधू शकतात. या बाबतीत सरकारी धोरणांमध्ये बदल होण्याची त्यांना आशा होती. धोरणात बदल झाल्यास टाटा समूह आधीपासूनच पूर्णपणे तयार असला पाहिजे असा त्यांचा विचार होता.

या विचाराने आणि नियोजनाने २००७ मध्ये त्यांनी टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) ही कंपनी स्थापन केली. कंपनीने हैदराबादजवळील आदिबाटला येथे उत्पादन सुविधा स्थापन केल्या. ही कंपनी टाटा सन्सच्या पूर्ण मालकीची उपकंपनी होती आणि आहे. कायद्यामुळे देशांतर्गत पातळीवर असलेल्या अडचणी लक्षात घेऊन रतन टाटांनी आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीत प्रवेश करण्याचा आणि निर्यात करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे जगभरात वैयक्तिक संपर्क होते. जगभरात टाटा समूह आणि रतन टाटांचे नाव ‘विश्वास आणि गुणवत्ता’ असे समानार्थी होते. संरक्षण उत्पादने अत्यंत तांत्रिक असतात आणि त्यांना लष्करी अचूकतेची आवश्यकता असते. टाटांना या क्षेत्रात पूर्वी कोणताही अनुभव नसला तरीही टाटांच्या क्षमतेवर जगभरात विश्वास होता. त्यामुळे TASL पुढे नमूद करार करू शकले,

१. २००८ मध्ये इस्रायलची सर्वात मोठी एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी, इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजसोबत विस्तृत श्रेणीतील संरक्षण उत्पादनांचे उत्पादन करणे.

२. २००९ मध्ये अमेरिकन हेलिकॉप्टर कंपनी सिकोर्स्कीसोबत, जी आता लॉकहीड मार्टिन कॉर्पोरेशनच्या मालकीची आहे, S-92 हेलिकॉप्टर केबिन तयार करणे.

३. २०१० मध्ये, लष्करी वाहतूक विमान C-130 सुपर हरक्यूलिसच्या काही महत्त्वाच्या घटकांची निर्मिती करण्यासाठी, प्रसिद्ध F-16 लढाऊ विमानांचे निर्माते लॉकहीड मार्टिन या कंपनी बरोबरचा करार. सध्या C-130 ही विमाने भारतीय सैन्यात मोठ्या प्रमाणात समाविष्ट केली आहेत.

४. २०१२ मध्ये ‘GN-3’ नाईट व्हिजन उपकरणांच्या निर्मितीसाठी अमेरिकन कंपनी आयआयटी एक्सेलिससोबत करार.

दरम्यान, टीएएसएलने मार्च २०१० मध्ये प्रत्यक्ष उत्पादने सुरू केली होती.

२०१२ पासून कंपनीने मानवरहित हवाई वाहनांसाठी (UAV), ड्रोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रणालींवरही लक्ष केंद्रित केले.

पुढे गरजेनुसार टीएएसएलने विविध उपकंपन्या आणि परदेशी संस्थांसोबत संयुक्त उपक्रम स्थापन केले.

टीएएसएलने २०१८ मध्ये अपाचे हेलिकॉप्टरसाठी केबिन तयार करण्यासाठी बोईंगसोबत एक संयुक्त उपक्रम कंपनी देखील स्थापन केली. अपाचे हेलिकॉप्टर हे अमेरिका आणि भारतासह इतर १५ देश वापरत असलेले मजबूत लष्करी लढाऊ हेलिकॉप्टर आहे. २०२० मध्ये यासाठी प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले.

आता टीएएसएल ही अत्यंत जटिल आणि लष्करी अचूकता असलेल्या भागांची निर्मिती करणारी एक मोठी जागतिक मान्यताप्राप्त कंपनी आहे. ती अनेक प्रगत देशांमध्ये आपले उत्पादन निर्यात करते. टाटा समूहाच्या इतर अनेक कंपन्यांनीही त्यांच्या स्वतःच्या स्पेशलायझेशनच्या क्षेत्रात संरक्षण उत्पादने सुरू केली आहेत.

संरक्षण क्षेत्रातील उत्पादने करण्यासाठी भारतीय उद्योगांना १९५१ च्या कायद्यामुळे बंद झालेले दरवाजे २००० मध्ये अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना थोडेसे उघडले गेले. परंतु त्याचा फारसा व्यावहारिक उपयोग झाला नाही. २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन धोरणांमुळे प्रत्यक्षात दरवाजे आणखी खुले झाले. २०१६, २०१७ आणि २०१८ मध्ये त्यांच्या ‘आत्मनिर्भर’ आणि ‘मेक इन इंडिया’ धोरणांअंतर्गत सरकारी धोरणे पुन्हा उदार करण्यात आली. २०१८ पासून संरक्षण क्षेत्र भारतीय कंपन्यांसाठी जवळपास पूर्णपणे खुले झाले आहे. आता टाटा, रिलायन्स, महिंद्रा, भारत फोर्ज, एल अँड टी इत्यादी मोठ्या कंपन्यांसह अक्षरशः शेकडो कंपन्या या क्षेत्रात आहेत. आता भारतात उत्पादनांची विस्तृत श्रेणी आहे.

अलिकडेच, ‘ऑपरेशन सिंदूर’ ने स्वदेशी उत्पादनांची ताकद देखील दाखवून दिली आहे.

एकेकाळी संरक्षण उपकरणांच्या आयातीवर अवलंबून असलेला देश आता जगात एक प्रमुख निर्यातदार आहे. २०३० पर्यंत भारत संरक्षण उपकरणांसाठी जगातील एक प्रमुख केंद्र होईल अशी अपेक्षा आहे.

या सर्वांचा खाजगी क्षेत्रासाठीचा पाया रतन टाटांनी २००७ मध्ये घातला असे म्हणता येईल.

या सर्व गोष्टी दर्शवितात की रतन टाटांचा भारतासाठी, त्याच्या संरक्षण क्षेत्रासाठी आणि टाटा समूहासाठी कसा व्यापक आणि काळाच्या पुढे पाहणारा दृष्टिकोन होता. त्यांना या क्षेत्रातील अग्रणी म्हणता येईल. सरकारी धोरण परिस्थिती पूर्णपणे प्रतिकूल असताना त्यांनी पाया घातला.

पुरेसे आणि वेळेवर धोरणात्मक बदल करण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही द्यायला हवे.

या दोन्ही व्यक्तिमत्त्वांना सलाम !!! 

लेखक : प्रमोद कुलकर्णी, पुणे.

 ९ जून, २०२५

प्रस्तुती : सुश्री स्नेहलता गाडगीळ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इन्द्रधनुष्य ☆ विम्बल्डनची भैरवी ! … लेखक – श्री नवीन काळे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

विम्बल्डनची भैरवी ! … लेखक – श्री नवीन काळे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

अख्खं जग ‘विम्बल्डन’ हे तिथे होणाऱ्या मॅचेससाठी पाहातं. मला देखील अर्थातच मॅचेस आवडतात, पण मला सर्वात आवडतो तो फायनल झाल्यानंतर तिथे होणारा तो छोटेखानी बक्षीस समारंभ ! लहानपणापासून मी या ‘समारोपाच्या’ प्रेमात आहे. मोजून दहा मिनिटं असतो तो कार्यक्रम. पण त्याच्याइतका आटोपशीर, देखणा आणि ग्रेसफुल कार्यक्रम मी आजतागायत पाहिलेला नाही. 

सुमारे एकशे सेहेचाळीस वर्षात या स्पर्धेने जगात किती बदल पाहिले असतील? काळाप्रमाणे  काही लेयर्स सोडले तर ही स्पर्धा त्याच ग्रेसने भरावली जाते. सध्या अमुक एक पॉप स्टार लोकप्रिय आहे, म्हणून त्याला परफॉर्म करायला बोलवा वगैरे गोष्टींची त्यांना गरज वाटत नाही. ‘सर्वोत्तम दर्जाचे टेनिस’ हाच इथला हिरो राहिलाय आणि राहील. संपूर्ण आयोजनामधली शिस्त वगैरे याबद्दल आपण इथे बोलूयाच नको ! (संपूर्ण मॅच सुरु असताना मी कुठल्याही लाईन अंपायरला दुसऱ्या लाईन अंपायरबरोबर गप्पा मारताना, टाळ्या देत हास्यविनोद करताना, वेगवेगळ्या तऱ्हेने खुणा करताना वगैरे पाहिलेलं नाही !)         

दरवर्षी तिथे होणारा तो कार्यक्रम मला एक प्रेक्षक, रसिक, आयोजक आणि माणूस म्हणून श्रीमंत करत असतो. सलग पाच सहा तास दुसऱ्याला पॉईंट मिळू नये म्हणून जीवाची बाजी लावणारे मॅच संपल्यावर एकमेकांविषयी किती आदराने बोलतात ! शेवटच्या त्या दहा मिनिटांच्या कार्यक्रमात भावभावनांचा किती सुंदर पट उभा राहतो ! किती मोजकं पण छान अर्थपूर्ण बोलतात हे खेळाडू ! यावरून त्यांच्या सरावामधून टेनिस इतकेच मानसिक दृष्ट्या सुद्धा किती प्रगल्भ झालेत याचं पदोपदी दर्शन घडत असतं. जय-पराजयाकडे हे लोकं कसे पाहतात याचा एक सुंदर वस्तुपाठ म्हणजे ही शेवटची दहा मिनिटं असतात. काल जोकोव्हिच मोजकंच पण खूप सुंदर बोलला. ‘मी माझ्यापेक्षा सरस खेळाडूकडून हरलोय… मी स्वतःला लवकरच भावनिक दृष्ट्या सावरून घेईन – पण ते उद्या सकाळी ! हा पराभव मी निदान आजतरी पचवू शकणार नाही !… २३ ग्रँड स्लॅम्स जिंकून सुद्धा पुन्हा पुन्हा जिंकण्याची उर्मी कशी टिकवून ठेवत असतील ही माणसं ! आज आपण हरलो असलो तरी निदान आपला मुलगा आपल्याकडे पाहून आश्वासक हसतोय, असं म्हणून स्वतःचे अश्रू थोपवू न शकलेला कालचा जोकोव्हिच मला खूप आवडला. 

मग प्रश्न पडतो, फायनल संपल्यावर त्या काही क्षणांपुरता खरंच कोणाचा पराभव झालेला असतो का? की ते दोघेही त्याक्षणी जय आणि पराजयाच्या पलीकडे गेलेले असतात? गेले काही दिवस जय-पराजयाचे युद्ध सुरु असलेल्या विम्बल्डनचा हा समारोप मला एखाद्या जमून आलेल्या भैरवीसारखा वाटतो. 

…. बहुदा हीच भैरवी अनुभवण्यासाठी माझ्यासकट संपूर्ण जग त्या विम्बल्डन मैफिलीची दरवर्षी वाट पाहातं !

लेखक : श्री नवीन काळे

प्रस्तुती :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com, a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डोळ्यांमधले आसू पुसती… ओठांवरले गाणे! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

डोळ्यांमधले आसू पुसती… ओठांवरले गाणे! ☆ श्री संभाजी बबन गायके 

त्याला आठवत होता तो क्षण…. ज्याक्षणी त्याने त्याच्या नाजूक हातांमध्ये ते नाजूक वाद्य सोपवलं होतं…. डाव्या हाताच्या खांद्याला व्हायोलीन अलगद कसं टेकवायचं.. त्याला डावा गाल कसा टेकवला न टेकवल्यासारखा करायचा…. हे सुद्धा त्याने त्याला करून दाखवलं…. एखादं गोड मूल खांद्यावर घ्यावं तसंच होतं ते. आणि तारांवर उजव्या हाताल्या स्टीकवरचे बो हेअर कसे अलगद टेकवायचे… बालकाच्या गालाचे चुंबन घेतल्यासारखं…!

तो त्याच्याशी तसाच वागायचा… सात-आठ वर्षांचं कोवळं पोर ते! सागरतळाएवढी गरीबी, अत्यंत ओंगळवाणी वस्ती, आसमंतात भरून राहिलेली मादक पदार्थांची दुर्गंधी आणि रक्तपात पहात पहात तो मोठा होत होता… आणि आजारांनी ग्रस्त असल्याने जीवनावर कातावलाही होताच…. दियेगो त्याचं नाव… आणि त्याच्या नावाचा एक अर्थ होतो… वारस!

अशाच एका क्षणी दियेगोची आणि एवान्द्रो द सिल्वा यांची गाठ पडली. एवान्द्रोचं जगही सुरुवातील असंच काहीसं होतं… तो लहानपणीच मादक पदार्थ पुरवण्याच्या धंद्यात शिरला होता… पण त्याने पुढे संगीताचा मार्ग अनुसरला. आफ्रोरेगे नावाची स्वयंसेवी संस्था स्थापन केली आणि ब्राझीलमधील गरीब मुलांना संगीताचे धडे देऊ लागला… अगदी विनामूल्य. ही मुले मग गुन्हेगारीचा मार्ग सोडून सन्मानाने जगण्याच्या प्रयत्नाला लागली… त्यांच्या आयुष्यात दैवी सुरावटी अवतरल्या आणि त्यांचं वैराण वाळवंट हिरवंगार होऊ लागलं! रिओ द जनेरिओ मध्ये ही मुलं संगीत शिकत शिकत उदरनिर्वाह सुद्धा करू लागली… मादक पदार्थांपेक्षा वाद्यसंगीतातले सूर त्यांना जवळचे वाटू लागले होते!

एका दिवसाच्या पहिल्याच प्रहरी दियेगोचे विश्व त्याच्यावरच कोसळले जणू… एवान्द्रो.. त्याचा गुरु जगाचा अवेळी आणि अगदी दुर्दैवी पद्धतीने हे जग सोडून निघून गेला होता. पहाटे दीड वाजता एवान्द्रो घरी परतत असताना दोघा चोरट्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला… चीज वस्तू लुटल्या… पण झटापटीत त्याच्या पोटात पिस्टलची गोळी लागली आणि तो कोसळला… वस्तू तिथेच टाकून चोरटे पसार झाले… त्याचवेळी तिथून लष्करी पोलिसांची गस्ती पथकातली गाडी जात होती… पोलिसांनी का कुणास ठाऊक एवान्द्रोला मदत करण्याऐवजी त्या चोरांचा पाठलाग केला… ते तर पसार झालेच होते! पोलिसांनी एवान्द्रोला भिकारी समजून रस्त्यात तसेच पडू दिले. त्याच्या पोटात गोळी शिरलेली होती… तो पालथा पडला होता.. त्यामुळे त्यांना बहुदा त्याचे रक्त दिसले नसावे… दोन तासांत खूप रक्तस्राव झाल्याने एवान्द्रो मरण पावला! Violin शिकवणारा Violence चा बळी ठरला…!

एवान्द्रोच्या अंत्यविधीला शेकडो माणसं जमली… त्यात त्याने शिकवून तयार केलेले वादक तर अर्थातच होते… आपल्या गुरूला शेवटची मानवंदना म्हणून त्या सर्वांनी दफनभूमीमध्ये वाद्यं जुळवली… आणि आत्यंतिक शोकाच्या लहरी त्या दफनभूमीत आधीच निद्रा घेत असलेल्या आत्म्यांना जागे केले!

दियेगोच्या वायोलिन मधून त्यादिवशी अवघे नादब्रम्ह प्रकटले होते…. आणि त्याच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत होते… त्याचं वायोलिन गात होतं… आणि दियेगोच्या आसवांत नहात होतं…. असा निरोप खूप कमी लोकांच्या नशिबी असतो!

गुरु पासून दुरावण्याच्या यातनांचा भार त्या लहानग्या शिष्याला जास्तच होता.. त्यात त्याचे रक्तक्षयाचे दुखणे बळावले… आणि दियेगो आपल्या गुरुमागे अनंताच्या प्रवासाला निघून गेला… मात्र त्याच्या अंत्यसंस्कारांवेळी वायोलिन वाजली नाहीत… दियेगो नव्हता ना वायोलिन छेडायला…. वाद्ये यांत्रिकपणे सूर निर्माण करतात.. त्यांना छेदणारी मने संगीत निर्माण करतात! दियेगो… तुला जग स्मरणात ठेवेल! दियेगो वायोलिन वाजवता वाजवता अश्रू ढाळतो आहे… हे चित्र मोठं क्लेशदायी होतं..!

मार्कोस तिरीस्तावो या फोटोग्राफरने दियेगोची ही छबी कैद केली होती… हा फोटो एक दस्तऐवज बनला आहे…. संगीत, गुरु आणि शिष्य यांच्यातल्या भावबंधाचा!

(वाचनात आलं.. मनाला भावलं… तुमच्यासाठी शब्दांत आणलं… शीर्षकासाठी कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या गाण्याची ओळ वापरली आहे.)..

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “लढा — विस्मरणाशी (Dementia)” – लेखिका : सुश्री संध्या घोलप  ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “लढा — विस्मरणाशी (Dementia)– लेखिका : सुश्री संध्या घोलप  ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

मी “अथश्रीत” राहायला येऊन आता तीन महिने होतील. बऱ्याच ओळखी झाल्या, हौशी रहिवाश्यांनी सुरू केलेल्या “स्मरणवेध” क्लासला जायला लागले, रोजचं रूटीन ठरलं.

अशातच भेट झाली श्री जयंत व सौ अनुराधा दीक्षित यांची. अनुराधा ताईंशी बोलणं झालं आणि मी भारावूनच गेले. किती प्रेरणादायी कहाणी आहे त्यांची!

श्री जयंत दीक्षित, वय वर्ष ८५, गेली तेरा वर्ष विस्मरणाशी लढा देत आहेत. आणि त्यांच्या सह उभ्या आहेत त्यांच्या अर्धांगिनी वय वर्ष ७६! त्यांना सांभाळत, आधार देत, या लढ्यातल्या खंद्या शिपाई बनून.

याला लढा म्हणायचं कारण हे आहे की एकदा हा आजार स्वीकारल्यावर, दोघांनीही त्याचा “डोळसपणे” सामना केला. अभ्यास केला आणि त्याप्रमाणे शक्य असतील ते सगळे उपाय केले. सुदैवाने आर्थिक स्थिती चांगली असल्याने त्यांना हे शक्य झालं.

पेशाने Coastal and oceanographic Engineer असलेले श्री जयंत दादा निवृत्त झाल्यानंतरही दहा वर्ष, “विज्ञान वाहिनी” संस्थेतर्फे स्वयंसेवी शिक्षक म्हणून काम करत होते. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. पण चिकाटीने, फिजिओथेरपी केल्यामुळे ते पुन्हा उजव्या हाताने लिहू सुद्धा लागले. पण पुन्हा पाच वर्षांनी, मेंदूत रक्तस्त्राव होऊन रक्ताची गुठळी तयार झाल्याचं निमित्त झालं. मेंदूतल्या ठराविक पेशींना प्राणवायूचा पुरवठा न झाल्याने त्याचं कार्य मंदावलं आणि हळूहळू विस्मरणाची लक्षणं दिसू लागली.

साधारण २०१२ मध्ये, दीनानाथ हॉस्पिटल मध्ये, डॉ मंगलाताई जोगळेकर यांनी “विस्मरणाच्या जनजागृतीसाठी” जो कार्यक्रम ठेवला होता, त्याला दीक्षित दांपत्य मित्राच्या आग्रहास्तव गेले आणि तिथे झालेल्या स्क्रिनिंग टेस्ट वरून, मंगलाताईनी, जयंत दादांना dementia ची सुरुवात असू शकते हे सुतोवाच केलं.

(उपस्थित प्रेक्षकांना ठराविक प्रश्न विचारून ही टेस्ट घेतली जाते.) 

हा आजार, तोपर्यंत ‘कृतिशील असलेल्या या व्यक्तीला’ पचवणं हे कठीणच काम होतं. या आजाराची सखोल माहिती करून घेऊन तो स्वीकारणं, यासाठी ही डॉ नी खूप मदत केली.

आणि मग सुरू झाला विस्मरणाशी लढा!

वेळेवर टेस्टस् करणं, दादांना डॉ कडे घेऊन जाणं, औषधं पाणी हे काम अनुराधा ताईंचं. पण प्रश्न एवढ्यावरच थांबले नव्हते. दादांना आता आर्थिक व्यवहार जमत नाहीत हे लक्षात आल्यावर ताईंना ते ही नव्याने शिकून घेऊन, ताब्यात घ्यावे लागले. दादांना दिशा, वेळ, अंतर आणि गती याचा अदमास न राहिल्याने, गडबड व्हायला लागली. झोपेचं वेळापत्रक लहान मुलासारखं झाल्याने, रात्री जाग आल्यावर, सकाळ झाली असं समजून फिरायला जायला निघणे किंवा रस्ता चुकण्याचे प्रसंग येऊ लागले. त्यामुळे त्यांना एकट्याला बाहेर जाऊ न देणं, ही जबाबदारीही वाढली. आणि कंटाळा न करता, ताई रोज त्यांच्याबरोबर फिरायला जाऊ लागल्या. आधी दोघेही आपापल्या वेगाने, आपापल्या इच्छेने फिरायला जात होते. आता दोघांच्याही स्वातंत्र्यावर गदा आली! पण त्यावरही ताईंनी मार्ग शोधून काढला. मंगलाताईनी मेमरी लॅब मध्ये शिकवलेले खेळ – अक्षरांशी खेळणं, वेगवेगळी गाणी, भेंड्या वगैरे, या वॉकच्या वेळेला सुरू ठेवले.

“मेंदूच्या असलेल्या क्षमता टिकवायच्या आणि अधोगतीचा वेग रोखायचा” हेच केवळ आपल्या हातात आहे हे दोघांनीही स्वीकारलं होतं आणि त्याप्रमाणे पुढे जात होते.

विस्मरणाची अधोगती रोखण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते – हे दोघंही करत असतात याचं मला जास्त कौतुक वाटलं.

उतारवयात, मेमरी स्थिर राहावी यासाठी मेंदूला व्यायाम देणं आवश्यक आहे आणि ते काम आपण लवकरात लवकर सुरू केलं पाहिजे, हे आता सर्वांना माहीत झालं आहे. त्यासाठी शब्दकोडी, सुडोकू सोडवणे, नवीन भाषा किंवा कला शिकणे हे उपायही आपल्याला माहीत आहेत.

इथे दादा सुडोकू, शब्दकोडी सोडवतातच. नवीन कला शिकण्यासाठी त्यांनी नातवाकडून Casio शिकायला सुरुवात केली. आजही ते नियमितपणे की- बोर्ड वाजवतात. यात बोटांचा व्यायाम, सुरांशी संगत आणि बिझी राहणं हे उद्दिष्ट. ते काही सराईतपणे की – बोर्ड वाजवत नाहीत पण ती अपेक्षाही नाही.

यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे, इंग्लिश पुस्तकांचं मराठीत भाषांतर करण्याची त्यांना आवड आहे. आणि आज त्यांचा तेराव्या पुस्तकाचा अनुवाद चालू आहे.

हा आजार होण्यापूर्वी त्यांचं एक पुस्तक प्रकाशित ही झालं आहे. मी त्यांची वही बघितली. त्यावर लिखाण सुरू केल्याची वेळ, थांबवल्याची वेळ लिहिलेली असते. लक्षात राहण्यासाठी पुस्तकावर पण खूण केलेली असते. “आता अक्षर नीट येत नाही, पण मी हे माझ्या समाधानासाठी करतो. ” असं दादा म्हणाले. अक्षर न समजल्याने पुढची पुस्तकं छापता आली नाहीत पण त्याचं त्यांना वाईट वाटत नाही. ते मनोभावे लिखाणाचं काम करतात.

त्यांचं रूटीन पण ठरलेलं आहे. सकाळी उठून चहा पाणी झालं की योगासनं करायची, ब्रेकफास्ट तयार होईपर्यंत की- बोर्ड वाजवायचा किंवा सुडोकू सोडवायचं. नंतर आंघोळ, पूजा! संध्याकाळी वेळेवर फिरायला जाणं, परत आल्यावर रामरक्षा!

यात म्युझिक थेरपी चा फायदा होऊ शकतो आणि त्यासाठी त्यांना हंसध्वनी, शिवरंजनी, जयजयवंती आणि दरबारी असे राग ऐकवावेत असं तज्ञांनी सांगितल्यावर अनुराधा ताईंनी त्याचीही सुरुवात केली.

“त्याचा खरच फायदा होतो का, हे मला माहित नाही. पण गाणं ऐकण्यात तोटा तर नाही ना? ” असा विचार करून त्या दादांना कधी instrumental, कधी रागावर आधारित गाणी असं नियमित ऐकवत असतात. दादांना जुनी गाणी तोंडपाठ आहेत. आमच्या मेमरीच्या क्लासमध्ये, “मोरावर” गाणी म्हणायची होती. तर दादांना “केतकीच्या बनी तिथे” हे पटकन आठवलं. तालासुरात ते गाणी म्हणतात.

एकदा चिठ्ठ्यांवर विषय लिहून दिले होते. चिठ्ठी उघडून लगेच त्या विषयावर बोलायला सुरुवात करायची होती. मी ताईंना म्हटलं की दादांची चिठ्ठी उघडा की आधी. त्यांना विचार करायला वेळ मिळेल. तर ताई म्हणाल्या, “नाही नाही, ते व्यवस्थित बोलतील. Extempore बोलायला आवडतं त्यांना. ” मला दोघांचंही कौतुक वाटलं.

गेली तेरा वर्ष अनुराधा ताई, केवळ दादांच्या रूटीन साठी झटत आहेत. आता लांबचा प्रवास करू शकत नसल्याने त्यांचं मुलांकडे परदेशात जाणंही बंद झालं आहे. पण मुलं आणि नातेवाईक यांचा भक्कम मानसिक आधार त्यांच्या पाठीशी आहे हे त्यांनी आवर्जून सांगितलं. ताईंचं कौतुक केलं तर, त्या लगेच म्हणाल्या, “माझं काहीच नाही हो त्यात. यांनी ते स्वीकारलं आणि माझ्या प्रयत्नांना साथ दिली हे महत्त्वाचं. त्यांनी प्रयत्नच केले नसते तर मी काय करणार होते? मुळात त्यांचं strong spirit आणि positive attitude, जगण्यातला इंटरेस्ट यामुळे आम्ही सामना करू शकलो” (हे सगळे ताईंचेच शब्द आहेत!) 

ते सहकारनगरहून आता पाषाणला राहायला आल्याने त्यांना मंगलाताईंच्या मेमरी लॅबला जाता येत नाही. पण इथे त्यांना “स्मरणवेध” हा पर्याय मिळाला आहे त्याचा त्यांना आनंद आहे.

Dementia चे पेशंट्स आपण सर्वांनी पाहिले आहेत. आठवत नाही म्हणून संवाद कमी/ बंद होतो, कशात रस वाटत नाही म्हणून दिवस दिवस पडून राहतात, व्यायाम नाही, स्वतःची स्वच्छता नाही, चिडचिड होते! असे वागण्यातले बदल दादांच्या बाबतीत कधी दिसले नाहीत. या सगळ्यापासून दादांना लांब ठेवण्यात ताईंचा हात आहे, हे निश्चित.

“कधीतरी माझाही पेशन्स जातो हो! पण नंतर मलाच जाणवतं की मी नॉर्मल माणसासारखी यांच्याकडून अपेक्षा केली. मग मी यांना सॉरी म्हणायला जाते, पण हे तोपर्यंत ती घटना विसरून गेलेले असतात. अर्थात त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून मला कळतं की माझा पेशन्स गेला आहे हे त्यांना समजलंय. पण ते कधी रुसून बसत नाहीत! ” 

अशा समजूतदार साथीदाराच्या प्रयत्नांना यश लाभो हीच सदिच्छा!

ही पोस्ट लिहिण्याचं महत्वाचं कारण हेच की विस्मरणाचा आजार होण्याची वाट न बघता, शारीरिक व्यायामासह, बुद्धीला/ मेंदूला चालना देणारे व्यायाम करणं अत्यावश्यक आहे, हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे हीच इच्छा!

लेखिका : सुश्री संध्या घोलप

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘आंबोळीचं शेत…’ – शब्दांकन : प्रा. पांडुरंग रावजी नाडकर्णी☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘आंबोळीचं शेत…‘ – शब्दांकन : प्रा. पांडुरंग रावजी नाडकर्णी ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

वैशाख महिन्याचे दिवस. भर दुपारची वेळ. रणरणतं उन्ह. कोल्हापूर शहराच्या बाजूलाच एका शिवारांतून एक बाई लगबगीने चालली होती. डोक्यावर टोपली. टोपलीत नव-यासाठीं जेवण आणि पाण्याने भरलेला तांब्या होता. चालता, चालता, मध्येंच गच्च झाडी असलेली पायवाट लागली. वाट नेहमीचीच. पण कां कोणास ठाऊक. पण या ठिकाणी येताच तिला नेहमीच भिती वाटायची. अचानक कोणी समोर आला तर? कांहीं अतिप्रसंग केला तर? ओरडलो तरी मदतीला कोणी पोचणार नाही अशी ती जागा.

आजही तोच विचार तिच्या मनात आला. पण नेहमीप्रमाणे तिने तो झटकून टाकला. पावलं लगबगीने पडायला लागली. एवढ्यात तिला घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. बाई मनातून बरीच घाबरली. टापांचा आवाज जवळ ऐकायला यायला लागला. बाई आणखीनच घाबरली. एवढ्यात तो रुबाबदार घोडेस्वार तिच्या समोर उभा ठाकला.

बाईंची भितीने गाळणच उडाली. दरदरून घाम फुटला. तशी बाई धीटच होती. घोडेस्वाराने विचारले, “काय ग, कूठें चाललीस? ” “धन्याला जेवण घेऊन चाललीया, ” बाईने उत्तर दिले. “कोठे आहे धनी तुझा? ” घोडेस्वाराने परत प्रश्र्न विचारला. “पलीकडच्या शेतामध्ये काम करतुया. “बाई उत्तरली. “असं का. कोणाचं शेत? तुमचं की दुस-याच्या शेतात? ” बाई आतापर्यंत बरीच सावरली होती. म्हणाली, “आर माझ्या भावा, आमी गरीब मानसं. आमचं कूठून आलंय शेत. ” बाई मोठी हिकमती होती. भावा असं म्हणून तिने स्वत:च्या रक्षणाचे एक हत्यार बाहेर काढले होते. “बरं, आज जेवणांला काय आहे? ” घोडेस्वाराने विचारले. बाईंची भीड आता बरीच चेपली होती. ती म्हणाली, “अहो, आमी गरीब मानसं. आमचं ते जेवन काय असणार. आंबोळ्या आनी चटनीचा गोळा. ” ” मला खायला देशील का? ” घोडेस्वाराने विचारले. “आर, माझ्या भावा, खावा की. ” बाई म्हणाली.

बाईने जेवणाची टोपली खाली ठेवली. घोडेस्वार घोड्यावरून खाली उतरला आणि खाली जमिनीवर मांड ठोकून बसला. बाईने टोपलीतल्या आंबोळ्या, त्यावर लसणीचा लाल लाल गोळा आणि पाण्यानं भरलेला तांब्या घोडेस्वाराच्या समोर ठेवला. घोडेस्वाराने खायला सुरुवात केली. खातां, खातां घोडेस्वाराने तिला विचारले, “अग, तूं या आंबोळ्याना कशी काय भोकं पाडतीस? सुईने की काय? ” त्याबरोबर बाई मोठमोठ्याने हसली व म्हणाली, “आर माज्या भावा, यडा की खुळा र तू? ” आतापर्यंत तीची भिती पळून गेली होती.

बाईने घोडेस्वाराला आंबोळ्या कश्या करतात ते सविस्तरपणे सांगितले. आदल्या दिवशी तांदूळ कसे फुगत घालावे लागतात, मग दुसऱ्या दिवशी ते पाट्यावर कसे वाटतात, मग तापलेल्या तव्यावर कसे भाजतात, तापलेल्या तव्यावर पाणी वाळल्यानंतर तिथं भोकं तयार होतात. “आसं होय. ” असं म्हणून तो घोडेस्वार खळाळून हसला. बाईपण खळाळून हसली. घोडेस्वाराने चटणी बरोबर आंबोळ्या खाल्ल्या. त्यावर पाणी प्याला व त्या बाईला विचारले, “अग, आता तुझ्या नव-याला जेवण? ” ” त्याची काळजी तुम्हाला नग. आता मी घरला जाईन. परत आंबोळ्या आनी चटनी करून नव-याला नेईन. ” बाई म्हणाली. घोडेस्वार घोड्यावर स्वार झाला आणि निघून गेला.

बाई परत घरी आली. परत आंबोळ्या केल्या. लाल तिखट चटणी केली. पाण्याचा तांब्या भरला. सगळं पाटलींत ठेवले आणि परत नव-याकडे यायला निघाली. इकडे नवरा ठरल्या वेळेत बायको आली नाही याची काळजी करत होता. एवढ्यात त्याला दूरवरून येणारी बायको दिसली आणि जीवाला बरं वाटलं.

बाई आली आणि तिने टोपली खाली ठेवली. नव-याने विचारले, ” अग, एव्हढा उशीर कां झाला? “

मग बायकोने सगळं सविस्तर सांगितले. त्या आडवळणाच्या जागीं तो रुबाबदार घोडेस्वार कसा आला, त्याला भावा कसं म्हटलं, आंबोळ्या खाताना छिद्रांची हकिकत सांगितली आणि आपण त्याला यडा की खुळा म्हणून छिद्रे कशी होतात ते सांगितले. यावर दोघेही नवरा- बायको भरभरून हसली. नव-याने जेवण केले आणि तांब्यातले पाणी घटा-घटा प्यायला. दोघांनी संध्याकाळपर्यंत शेतात काम केले व सूर्य अस्ताला जाण्याच्यावेळीं घरी परतली.

दोघं नवरा-बायको घराकडे पोंचली. पहातो तो काय? दोन सैनिक घराकडे उभे होते. नवरा-बायको दोघेही घाबरली, एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहीली. दोघांपैकी एक सैनिक म्हणाला, ” उद्यां सकाळी दहा वाजता तुम्हां दोघानाबी कोल्हापूरच्या दरबारात हजर व्हायला हवं. ” निरोप देऊन दोघेही सैनिक परतले.

इकडे दोघं नवरा-बायको भयभीत होऊन एकमेकांवर काही तरी वंगाळ काम केल्याचा संशय घ्यायला लागली. मन था-यावर नव्हतं. रात्रीच्या जेवणाकडे दोघांचं लक्ष नव्हतं. कसेतरी दोन घास घशाखाली घातले आणि दोघंजण अंथरुणावर पडलीं पण झोप लागत नव्हती. या कुशीवरून त्या कुशीवर वळत रात्र काढली.

दुसऱ्या दिवशी नेहमीपेक्षा लवकरच पहाटे दोघं जणं उठलीं. नव-याने गाईचं दूध काढणे, गुरांना रानांत सोडणे, दुधाचा रतीब टाकणं, ही कामं केली. बायकोने शेण भरून गोठा साफ करणे, घरांतील इतर सगळीं काम आटोपली. दोघं नवरा-बायको कोल्हापूरच्या दरबारात जायला निघाली. मनात धाकधूक होतीच. काय चूक झाली असेल आपणाकडून. कशाला बोलावले असेल दरबारात. हेच प्रश्र्न दोघांच्याही मनात येत होते.

अर्धा- पाऊण तास पायपीट केल्यावर दोघेही कोल्हापूरला राजवाड्यात पोंचली. त्यांना दरबारात नेण्यांत आले. दरबारात प्रचंड गर्दी होती. लोक अनेक तक्रारी घेऊन शाहू महाराजांकडे आले होते. जसजशी गर्दी कमी होत होती, तसतशी नवरा-बायको घाबरलेल्या अवस्थेत पूढे पूढे जात होती. गर्दी बरीचकमी झाली. संपूर्ण दरबार आता दिसत होता. एवढ्यात शेतकऱ्याच्या बायकोचे लक्ष सिंहासनाकडे गेले आणि आश्चर्याने ती नव-याला म्हणाली, ” अहो, ह्योच तो कालचा रुबाबदार घोडेस्वार. ” नवरा म्हणाला, ” अग, ह्यो तर आमचे शाहू महाराज. ” बायको आता आणखीनच घाबरली व म्हणाली, ” आरं म्हाज्या देवा, म्हणजे कालचा तो घोडेस्वार म्हणजे साक्षात शाहू महाराज व्हते. महाराजांना मी काय काय म्हटलं? भावा म्हटलं, यडा की खुळा म्हटलं. ” बाई आता भितीने थरथर कापायला लागली. नवरा म्हणाला, “म्हाराज काय शिक्षा देतात ती मुकाट्याने भोगायची आता. “

थोड्या वेळात ही नवरा-बायको थरथर कापत शाहू महाराजांच्या पायांवर घालून घेणार एवढ्यात शाहू महाराजांनी आपला हात पुढे केला आणि म्हणाले, “दिवाणजी, या माझ्या बहिणीची साडी-चोळीने ओटी भरण्याची व्यवस्था करा, आणि या माझ्या बहिणीच्या नव-याला त्या शिवारात सहा एकर जमीन वतन द्या. “

दोघांही नवरा-बायकोच्या डोळ्यातून अश्रुंच्या धारा वहात होत्या. दोघंही आदरयुक्त भावनेने शाहू महाराजांच्या समोर नतमस्तक झालीं. भितीची जागा आता आदराने घेतली होती. शेतकऱ्याच्या बायकोची साडी-चोळीने ओटी भरण्यात आली आणि तिच्या नवऱ्याला सहा एकर वतनाचा कागद देण्यात आला.

भरलेल्या अंत: करणाने आणि सद्गतीत मनाने दोघेही नवरा-बायको घरी परतली. वतन दिलेल्या त्या शेताला आजही “आंबोळीचं शेत” ह्याच नावाने ओळखतात.

शब्दांकन : प्रा. पांडुरंग रावजी नाडकर्णी

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ श्री गणपति तालम् स्तोत्रम् ॥ ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ श्री गणपति तालम् स्तोत्रम् ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

विकटोत्कटसुंदरदंतिमुखं

भुजगेंद्रसुसर्पगदाभरणम् ।

गजनीलगजेंद्र गणाधिपतिं

प्रणतोऽस्मि विनायक हस्तिमुखम् ॥ १॥

सुर सुर गणपति सुंदरकेशं

ऋषि ऋषि गणपति यज्ञसमानम् ।

भव भव गणपति पद्मशरीरं

जय जय गणपति दिव्यनमस्ते ॥ २॥

 *

गजमुखवक्त्रं गिरिजापुत्रं

गणगुणमित्रं गणपतिमीशप्रियम् ॥ ३ ॥

 *

करधृतपरशुं कंकणपाणिं

कबलितपद्मरुचिम् ।

सुरपतिवंद्यं सुंदरनृत्तं

सुरचितमणिमकुटम् ॥ ४ ॥

 *

प्रणमत देवं प्रकटित तालं

षड्गिरि तालमिदम् ।

तत्तत तो षड्गिरि तालमिदं

तत्तत षड्गिरि तालमिदम् ॥ ५ ॥

 *

लंबोदरवर कुंजासुरकृत कुंकुमवर्णधरम् ।

श्वेतसशृंगं मोदकहस्तं प्रीतिसपनसफलम् ॥ ६ ॥

 *

नयनत्रयवर नागविभूषित नानागणपतिदं तत्तत्

नयनत्रयवर नागविभूषित नानागणपतिदं तत्तत्

नानागणपति तं तत्तत् नानागणपतिदम् ॥ ७॥

 *

धवलित जलधरधवलित चंद्रं

फणिमणिकिरणविभूषित खड्गम् ।

तनुतनुविषहर शूलकपालं

हर हर शिव शिव गणपतिमभयम् ॥ ८ ॥

 *

कटतट विगलितमदजल जलधित-

गणपतिवाद्यमिदं

कटतट विगलितमदजल जलधित-

गणपतिवाद्यमिदं

तत्तत् गणपतिवाद्यमिदं

तत्तत् गणपतिवाद्यमिदम् ॥ ९ ॥

 *

तत्तदिं नं तरिकु तरिजणकु कुकु तद्दि

कुकु तकिट डिंडिंगु डिगुण कुकु तद्दि

तत्त झं झं तरित

त झं झं तरित

तकत झं झं तरित

त झं झं तरित

तरिदणत दणजणुत जणुदिमित

किटतक तरिकिटतों

तकिट किटतक तरिकिटतों

तकिट किटतक तरिकिटतों ताम् ॥ १० ॥

 *

तकतकिट तकतकिट तकतकिट तत्तों

शशिकलित शशिकलित मौलिनं शूलिनम् ।

तकतकिट तकतकिट तकतकिट तत्तों

विमलशुभकमलजलपादुकं पाणिनम् ।

धित्तकिट धित्तकिट धित्तकिट तत्तों

प्रमथगणगुणकथितशोभनं शोभितम् ।

धित्तकिट धित्तकिट धित्तकिट तत्तों

पृथुलभुजसरसिज विषाणकं पोषणम् ।

तकतकिट तकतकिट तकतकिट तत्तों

पनसफलकदलिफलमोदनं मोदकम् ।

धित्तकिट धित्तकिट धित्तकिट तत्तों

प्रणतगुरु शिवतनय गणपति तालनम् ।

गणपति तालनं गणपति तालनम् ॥ ११ ॥

 *

☆ मराठी भावानुवाद ☆

 *

विशाल बलवंत चारुदंतआनन

गदा सर्पराज भूषण धारण

गजनील गजराज गणाधिपती

गजमुख विनायक करितो नमन ॥१॥

 *

सुकुंतला सुर सुर देव गणपती

यज्ञसमान ऋषी ऋषी गणपती

कमलदेही भव भव गणपती

दिव्यप्रणाम जय जय गणपती ॥२॥

 *

गजवक्रतुंड गिरिजापुत्र

शिवप्रिय गणपती गणगुणमित्र ॥३॥

 *

प्रभा कमलासम हाती परशु करावरी कंकण

सुरपती वंद्य किरिट रत्नजडित मोहक नर्तन ॥४॥

 *

प्रणाम इशा प्रकटे ताल 

षट्गिरींचा वाजे ताल 

तोचि तो षट्गिरी ताल 

तोचि तो ऐसा षट्गिरी ताल ॥५॥

 *

सिंदूर वर्णी लंबोदरा कुंजासुरद्वारा पूजित 

हाती मोदक श्वेत मूषक प्रीति-स्नेहाने भजित ॥६॥

 *

नानागणपती त्रिनेत्री नागविभूषित तोचि तो 

नानागणपती त्रिनेत्री नागविभूषित तोचि तो 

नानागणपती तोचि तो नानागणपती तोचि तो ॥७॥

 *

श्वेतवर्ण मेघासम श्वेतवर्ण सोमासम

तेज खड्गधारी फणिमणिकिरणासम

विषहारी देह शूलकपालधारी

हर हर शिव शिव अभयद गणपती ॥८॥

 *

सागरतटी लाटांचा गाज गणपती वादन बाज 

सागरतटी लाटांचा गाज गणपती वादन बाज 

तोचि जणू गणपती वादन बाज 

तोचि जणू गणपती वादन बाज ॥९॥

 *

तत्तदिं नं तरिकु तरिजणकु कुकु तद्दि

कुकु तकिट डिंडिंगु डिगुण कुकु तद्दि

तत्त झं झं तरित

त झं झं तरित

तकत झं झं तरित

त झं झं तरित

तरिदणत दणजणुत जणुदिमित

किटतक तरिकिटतों

तकिट किटतक तरिकिटतों

तकिट किटतक तरिकिटतों ताम् ॥ १०॥

 *

तकतकिट तकतकिट तकतकिट तत्तों

शिरावरी शोभतो शशी हाती शूल धारण

तकतकिट तकतकिट तकतकिट तत्तों

चरण कमलासम, हस्त जयाचे पावन

धित्तकिट धित्तकिट धित्तकिट तत्तों

सुशोभित वर्णित प्रशंसित जैसे प्रमथ गण

धित्तकिट धित्तकिट धित्तकिट तत्तों

शंखधारी विशाल बाहु पालक पद्मसमान 

तकतकिट तकतकिट तकतकिट तत्तों

रंभापर्णावरी मोदक मोदभरे ते भोजन

धित्तकिट धित्तकिट धित्तकिट तत्तों

तालदेवता शिवपुत्र गणपती गुरूसिया पूजन

गणपति ताल गणपति तालन॥ 11 ॥

 *

☆ ॥ इति निशिकान्त भावानुवादित श्री गणपति ताल स्तोत्र संपूर्ण ॥ ☆

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक अजोड आठवण ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ एक अजोड आठवण ☆ श्री जगदीश काबरे ☆

जागतिक कीर्तीचे प्रख्यात शास्त्रज्ञ, विज्ञान लेखक आणि फलज्योतिष्याच्या विरोधात ठाम भूमिका घेणारे डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाची बातमी सकाळी कळली आणि त्यांच्याबरोबर घालवलेल्या क्षणांच्या आठवणीने मन उचंबळून आले. त्यांनी त्यांचे गुरु फ्रेड हॉयल यांच्यासोबत ‘स्थिर-स्थिती विश्वाचे’ समर्थन करणारा ‘हॉयल-नारळीकर सिद्धांत’ मांडला होता. तसेच त्यांनी मराठी भाषेत विज्ञान साहित्याचे दालन खुले केले. हे त्यांचे खूपच मोठे काम होते.

मी जेव्हा मराठीतून विज्ञान प्रसार करण्यासाठी लेखक म्हणून लिहिता झालो होतो, त्या सुरुवातीच्या काळात त्यांनी माझ्या ‘कथा ही रक्ताची’ — रक्ताबद्दल वैज्ञानिक माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन केले होते. तेव्हा त्यांनी मी नवखा असूनही माझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्याचे आठवते. एवढे मोठे शास्त्रज्ञ असूनही ते एवढ्या मित्रत्वाच्या नात्याने बोलत होते की, मी अचंबित होऊन गेलो. त्यानंतर ‘ज्योतिष शास्त्रावर प्रकाशझोत’ हे माझे पुस्तक मी त्यांना अभिप्रयार्थ पाठवले होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या प्रचंड कामाच्या व्यापातूनही तत्परतेने ते पुस्तक वाचून त्यावर त्यांच्या हस्ताक्षरात मला अभिप्राय पाठवला होता. (छायाचित्रात तेच पत्र आहे.) माझ्यासाठी हा अनमोल ठेवा आहे. तो मी मरेपर्यंत जपून ठेवणार आहे. त्यांच्या या प्रोत्साहनपर अभिप्रायामुळेच पुढे मी लिहिता राहिलो.

त्यांच्याबरोबर माझ्या अशा अधून-मधून भेटी होत राहिल्या आणि मी समृद्ध होत गेलो. अशी व्यक्ती आयुष्यातून निघून जाणे म्हणजे आपल्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण होणे असते. पण अर्थातच त्यांच्या साहित्यामुळे ती पोकळी भरून निघेल याची मला खात्री आहे आणि ते कायम आपल्या सोबत असतील.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ धीरे से आजा रे अखियन में… –  लेखिका : माधुरी ताम्हाणे देव ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ धीरे से आजा रे अखियन में… –  लेखिका : माधुरी ताम्हाणे देव ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर

संगीतकार सी. रामचंद्र 

” धीरे से आजा रे अखियन में “….

अनेक वर्षांपूर्वीची पण विसरता न येणारी ही हकीकत आहे — 

“बाळ रडतंय? ग्राईप वॉटर दे त्याला” अशी माझी परिस्थिती झाली होती. संध्याकाळी मी ऑफीस मधून घरी आले तेव्हा मस्त खेळत असलेला माझा तान्हा मुलगा अचानक खूप रडू लागला. आम्ही रहात असलेल्या बिल्डिंगमध्ये लहान बाळ म्हणून त्याचे लाड होत असत. कौतुक होत असे. संध्याकाळी त्याच्याशी खेळायला आजूबाजूची लहान मुलं येत असत. तसेच बिल्डींग मधल्या शेजार्‍यांची जा – ये त्याच्यासाठी आमच्या घरी असे. त्याचं रडणं थांबवण्यासाठी सगळ्यांनी वेगवेगळे प्रयत्न करून बघितले, उपाय सुचवले. पण ते व्यर्थच. असा इतका, तो कधीच रडत नसे. मी मनातून धास्तावले होते.

या काळात, शिवाजी पार्कला आमच्या शेजारच्या गल्लीत राहणारे सी. रामचंद्र उर्फ अण्णा चितळकर यांच्याशी नुकताच परिचय झाला होता. आमच्या शेजार्‍यांचे ते मित्र होते. नेमके त्याच वेळी ते रात्री गप्पा मारायला म्हणून तिथे आले. आमच्या मजल्यावरच्या चारही ब्लॉक्समधील सगळी मंडळी आमच्या घरात, आणि “बाळ रडतंय” चा गोंधळ बघत ते थोडा वेळ शांतपणे आमच्या दाराच्या चौकाटीत उभे राहिले.

काही मिनिटांनंतर ते पुढे आले आणि मला म्हणाले,

“दे त्याला माझ्याकडे! ” 

साशंक मनाने मी बाळाला त्यांच्या हातात दिलं. त्यांनी त्याला जवळ घेतलं आणि किंचित हसून मला म्हणाले, “अगं मुली, त्याचं काही दुखत नाही. त्याला कंटाळा आलाय. तुमची औषधं, तुमच्या नजरेतील भिती, तेच तेच चुटक्या वाजवणं हे सगळं त्याला नको आहे. शांत रहा आता जरा मी बघतो”.

ते सोफावर छान मांडी घालून बसले. बाळाशी हंसले, त्याला मांडीवर घेऊन थोपटू लागले. बाळाचं रडण कमी झालं. आम्ही सगळे चकित होऊन बघत होतो. तोंडावर बोट ठेवून त्यांनी आम्हा सगळ्यांना शांत रहाण्याची खूण केली.

-एखाद मिनीट गेलं असेल…. आणि आमच्या घराच्या भिंती जणू झंकारल्या. खुद्द सी. रामचंद्र उर्फ अण्णा चितळकर माझ्या मुलासाठी लोरी म्हणत होते”.

“धीरेसे आजा रे अंखियन मे, निंदिया आजा रे आजा.. “

आणि बाळ मजेत त्यांचं बोट मुठीत धरुन हसत होतं.

आम्ही सगळे स्तब्ध. एक इतकं मोठं नामवंत, प्रज्ञावंत, कीर्तिवंत असं संगीतातलं व्यक्तिमत्त्व, आमच्या घरात केवळ एक लहान बाळ रडतय् म्हणून ही लोरी, जी लता मंगेशकरांच्या आवाजात देशातल्या घराघरात पोचली आहे. ती म्हणतांना ऐकणं, बघणं हा एक शब्दातीत अनुभव होता. मुख्य म्हणजे ते स्वत: त्या लोरीत इतके रमले होते की गाणं पूर्ण होतांना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि माझा मुलगा त्यांच्या मांडीवर गाढ झोपला होता.

मला योगायोगाने भेटलेल्या प्रतिभावंतांच्या भेटी संबंधीच्या आठवणीतील ही एक मनावर कोरली, नव्हे, गोंदली गेलेली आठवण आहे.

नंतरही ते अधून मधून येत राहिले. गप्पांच्या ओघात कधी ते विविध चाली ऐकवत असत, कधी एखाद्या गाण्यामागची आठवण सांगत असत. ते गप्पात रमून जायचे आणि इतरांनाही मजा आणायचे.

एखादा गायक, कलाकार, लेखक, कवी यांना सर्वसामान्य माणसं त्यांच्यातील प्रतिभेमुळे ओळखत असतात, त्यांच्या कलेवर प्रेम करत असतात. हेच प्रतिभावंत जेव्हा एखाद्या क्षणी स्वत:चं समाजातलं मोठेपण विसरुन, नकळत, सहजगत्या आपला स्वभाव, माणूसपण दाखवतात तेव्हा ती एक स्मृती बनून मनात घर करुन रहाते.

सी. रामचंद्र या नावापुढे एक संगीत रसिक म्हणून तर पूर्वी माझे हात जुळायचेच पण वर दिलेल्या घटनेनंतर त्यांच्या नावाच्या उल्लेखाने एक “आई ” म्हणूनही माझे हात आपोआप जुळतात. कोणत्याही वाद्याशिवाय, कोणतीही साथ नसतांनाचा त्यांचा निखळ आवाज, ती तल्लीनता आणि चेहर्‍यावरचे लहान बाळा प्रतीचे वत्सल भाव आठवतांना मला आजही गहिवरुन येतं.

मंदिरातल्या घंटा नादासारखा त्यांचा आवाज या गाण्याच्या संदर्भात मला आश्वासक वाटला. कोणत्याही अस्वस्थ क्षणी तद्रूप होऊन त्यांनी गायलेले लोरीचे शब्द आठवत रहातात आणि डोळे झोपेच्या आधीन होतात.

“धीरे से आजा रे अँखियन में

निंदिया आजा रे आजा, धीरे से आजा

छोटे से नैनन की 

बगियन में

निन्दिया आजा रे आजा,

धीरे से आजा

लेकर सुहाने सपनों की कलियाँ

आके बसा दे पलकों 

की गलियाँ,

पलकों की छोटी सी 

गलियन में

निन्दिया आजा रे आजा,

धीरे से आजा. “

लेखिका : सुश्री माधुरी ताम्हाणे देव

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “व्यर्थ न हो बलिदान…” ☆ सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “व्यर्थ न हो बलिदान…☆ सुश्री शोभा जोशी ☆

९ जून हा भगवान बिरसा मुण्डा यांचा बलिदान दिवस. माणूस जन्माला येतो त्याच वेळी त्याच्या मृत्युची तारीख ठरलेली असते असं म्हणतात. जन्म आणि मृत्यु या दोन्ही गोष्टी माणसाच्या हातात नाहीत. त्यावर माणसांची सत्ता नाही. पण जन्म आणि मृत्यु या मधल्या काळावर मात्र माणसाची सत्ता असते. तो काळ तुम्ही कसा व्यतीत करता यावर तुमच्या जन्माचे सार्थक अवलंबून असते.

इंग्रज सत्तेविरुद्ध लढताना ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या हुतात्म्यांचे जीवन सार्थकी लागले. जनजातीतील अशा हुतात्म्यांमध्ये बिरसा मुण्डा यांचे नाव अग्रणी आहे. आपला धर्म, आदिवासी परंपरा टिकवण्यासाठी केलेले प्रयत्न, लोकांनी ख्रिश्र्चन पाद्र्यांच्या जाळ्यात अडकून आपला धर्म बदलू नये म्हणून केलेले प्रयत्न आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरूध्द दिलेला लढा या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत.

बिरसांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ ह्या दिवशी, वडिल सुगाना मुण्डा आणि आई कर्मी यांच्या पोटी झारखंड मधील उलिहातू गावी झाला. हे मुण्डा कुटुंब अत्यंत गरीब होते. गावोगावी जाऊन मोलमजूरी करून पोट भरत असे.

परिस्थिती वशात मुण्डा कुटुंबाने ख्रिश्र्चन धर्म स्वीकारला आणि बिरसाला ख्रिश्र्चन मिशनर्‍यांच्या शाळेत घातले. तिथे जेवणात दिले जाणारे गायीचे मांस आणि त्याला शेंडी कापण्यासाठी केलेली सक्ती, याविध्द बिरसांनी बंड पुकारले. त्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले.

इथूनच बिरसांच्या इंग्रजांविरूध्दच्या संघर्षाला सुरूवात झाली. ते दोन पातळ्यांवर इंग्रजांशी संघर्ष करीत होते. एक म्हणजे आपल्या हिंदू धर्मावर ख्रिश्र्चन धर्माचे आक्रमण होऊ नये म्हणून आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरे म्हणजे भेटलेली माणसे. बिरसांची आनंद पांडे यांच्याशी भेट झाली आणि त्यांच्याकडून ते खूप गोष्टी शिकले.

हिंदू धर्माचे रक्षण. . . आनंद पांडे यांच्याकडे त्यांनी धार्मिक शिक्षण घेतले. आपल्या रामायण, महाभारत, गीता इ. धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला. ख्रिश्र्चन पाद्री, जनजाती समाजाला निरनिराळी प्रलोभने दाखवून ख्रिश्र्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडत होते. पण बिरसाने लोकांना पटवून दिले की. . .

धर्मादपेतं यत्कर्म यद्यपि स्यान्महाफलम।न तत्सेवेत मेधावी न हि तध्दितमुच्यते।।

धर्मास सोडून असलेले कर्म जरी महाफलदायी असलेतरी बुध्दिमानाने ते करू नये कारण ते हितकारक आहे असे कोठेही सांगितलेले नाही. असा उपदेश करून अनेक लोकांना त्यांनी ख्रिश्र्चन होण्यापासून परावृत्त केले.

त्यांनी बिरसाईयत पंथाची स्थापना करून काही मार्गदर्शक तत्वे सांगितली. भगवान बिरसा मुण्डा हे आदिवासींची धार्मिक व्यवस्था, संस्कृती, परंपरा, अस्तित्व वअस्मितेचे प्रतिक आहेत. त्यांच्या या कार्यामुळे लोक त्यांना भगवान म्हणू लागले.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांशी संघर्ष. . . . बिरसांचा लोकांवरील वाढता प्रभाव बघून ख्रिश्र्चन पाद्र्यांनी इंग्रज अधिकार्‍याकडे तक्रार केली की, बिरसा हा हिंदू सन्यासी, आदिवासींचा राजा होऊ पाहातो आहे तो ब्रिटिशांविरूध्द जनतेला भडकावतो आहे. या तक्रारीवरून बिरसांना तात्काळ अटक करण्याचे आदेश ब्रिटिश सरकारने दिले. पण ग्रामस्थांनी सक्त विरोध करून बिरसांना पकडायला आलेल्या सशस्र पोलिसांशी तीव्र लढा दिला व त्यांना परत पाठवले. पण शेवटी छल कपटाने २५ आॅगस्ट १८९५ रोजी पोलिसांनी

अटक करून बिरसांना हजारीबाग तुरूंगात ठेवले.

३० नोव्हेंबर१८९७ रोजी बिरसा तुरूंगातून मुक्त झाले. त्यावेळी त्यांना भेटायला आलेल्या हजारो लोकांची त्यांनी शिस्तबध्द संघटना बांधली आणि त्यांना इंग्रजांविरूध्द उठाव करण्यास प्रेरित केले. त्याला उलगुलान (क्रांती) नाव देण्यात आले. २४ डिसेंबर १८९९ यादिवशी उठाव करण्याचे निश्र्चित केले. ठरल्याप्रमाणे त्या दिवशी पोलिस चौक्या, शासकीय कार्यालये, गोदामे यांच्यावर हल्ले करण्यात आले. इंग्रज शासक, ख्रिश्र्चन पाद्री, आणि आमचे शोषण करणारे आमचेच लोक (उदा. जमीनदार, सावकार इ. )यांना त्यांनी प्रमुख शत्रू म्हणून घोषित केले.

९ जानेवारी १९०० रोजी बिरसांनी जोजोहातूच्या जवळील डोमबारी टेकड्यांवर एक सभा आयोजित केली या सभेत हजारोंच्या संख्येने लोक सामिल झाले होते. तेथील आयुक्त स्ट्रीटफिल्ड यांना ही बातमी समजताच त्यांनी संपूर्ण डोंगराला आपल्या सैन्याचा वेढा दिला. आणि लोकांवर बेछूट गोळीबार केला.

इंग्रजांच्या बंदुकांपुढे बिरसांच्या सेनेच्या, धन्युष्यबाण, भाले यांचा निभाव लागला नाही. हजारो बायका, मुले, पुरूष मृत्युमुखी पडले.

बिरसा तिथून कसेतरी निसटलेआणि जंगलात लपून राहिले व तिथून त्यांनी आपलं कार्य चालू ठेवलं. ब्रिटिशांनी त्यांना पकडून देणार्‍यास ५००/-रू. चं बक्षीस जाहिर केलं. पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली. पण बिरसा हाती लागले नाहीत.

“कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ “अशी आपल्याकडे म्हण आहे. शेवटी फंदफितुरी झाली आणि ३ फेब्रु. १९०० रोजी पोलिसांनी बिरसांना अटक केली. त्यांना रांचीच्या तुरूंगात डांबण्यात आलं. तिथं त्यांचा अनन्वीत छळ करण्यात आला. शेवटी ९ जून १९०० या दिवशी रक्ताची उलटी होऊन त्यांची प्राण ज्योत मालवली, त्यांना विष देऊन मारण्यात आले असाही संशय व्यक्त करण्यात येतो.

त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. . . . बिरसांच्या मृत्युनंतर त्यांच्या कार्याचा परिणाम म्हणून छोटा नागपूर क्षेत्रात सरकारने जमीन सुधारणा विषयक कायदे लागू केले. त्यांच्या उपदेशामुळे मुण्डांच्या समाज जीवनात अमुलाग्र बदल झाला. अनेक क्षेत्रात मुण्डा आजही चमकदार कामगिरी करताना दिसतात. बिरसांचे चित्र भारतीय संसदेच्या मध्य कक्षासमोर लावले आहे. जनजातीतील ते एकटेच क्रांतीकारक आहेत ज्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ रांची विमानतळाला त्यांचे नाव दिले आहे. १५ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस ‘ जनजाती गौरव दिन ‘ म्हणून साजरा करण्यात येत आहे.

बिरसांनी भारतीय संस्कृती, परंपरा, स्वधर्माचे रक्षण करत स्वातंत्र्य लढ्यात कर्तव्याच्या रणभूमीवर मृत्युला आलिंगन दिले.

९ जून या त्यांच्या बलिदान दिनी आमचे त्यांना शतशः प्रणाम.

©  सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares