☆ ‘बॉम्बे ब्लड ग्रुप…‘ – माहिती प्रस्तुतकर्ता : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले☆
☆
मागच्याच महिन्यात आठ तारखेला रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात अंजली हेळकर प्रसूतीसाठी दाखल झाली. चिरेखाणीवर काम करणाऱ्या अंजलीची हिमोग्लोबिन पातळी होती केवळ सहा. त्यामुळे प्रसूतीसाठी रक्त पुरवणे गरजेचे होतेच. लगेचच रक्तगटाची तपासणी केली गेली. आणि रिपोर्टमध्ये ‘ओ’ पॉझिटिव्ह रक्तगटाची नोंद झाली. सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पण खरी मेख पुढेच होती. ‘ओ’ गटाचे रक्त चढवण्यासाठी ‘मॅच’ करण्यात आले पण ते मॅच झालेच नाही. नेमका काय प्रकार झाला हे कळेना. मग पुन्हा एकदा लॅब टेक्निशियन आणि वैद्यकीय टीमच्या सल्ल्याने एक टेस्ट केली गेली. या टेस्टनंतर कळलं की हा ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ आहे. आता मात्र सगळे हादरले. कारण हा अत्यंत दुर्मिळ रक्तगट.
जगभरात केवळ 400 लोक या रक्तगटाचे आहेत. त्यातले भारतात केवळ 179. या रक्तगटाचा शोध मुंबईत लागल्यामुळे त्याला ‘बॉम्बे ब्लड’ ग्रुप हे नाव मिळाले.
आता रत्नागिरीत हा रक्तगट कुठे आणि कधी मिळणार हा प्रश्न होता. मग सोशल मीडियावर या रक्तगटाची गरज असल्याचा मेसेज फिरवण्यात आला.
योगायोगाने सांगलीच्या विक्रम यादव या तरुणाच्या हाती हा मेसेज पडला. विक्रमचा स्वतःचाच रक्तगट होता बॉम्बे ब्लड. मेसेज वाचताच विक्रमने चक्क दुचाकीवर रत्नागिरी गाठले. त्वरित रक्त मिळाल्याने आज अंजली आणि तिचे बाळ सुखरूप हाती लागले आहे. नंतर विक्रमचा जिल्हा शासकीय रूग्णालया मार्फत सत्कार देखील करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. आर. आरसुळकर सांगतात, हिमोग्लोबीन कमी असल्याने अंजलीची परिस्थिती नाजूक होती. तिला रक्त दिलं गेल्याने तिच्यात लवकरच सुधारणा होईल. बॉम्बे ब्लड ग्रुप असल्याचे लवकर कळत नाही. सुरूवातीला तो ओ पॉझिटीव्ह म्हणून दाखवतो, मात्र ओ पॉझिटीव्ह जेव्हा मॅच होत नाही तेव्हा तो बॉम्बे ब्लड ग्रुप आहे का, याची खात्री करावी लागते.
बहुतेकांना ओ, बी, ए पॉझिटीव्ह – निगेटीव्ह ब्लड ग्रुप माहिती असतात. पण यापलीकडे आणखी एक ब्लड ग्रुप असेल याची माहिती फारशी नसते. देशातील नाही तर संपूर्ण जगातील दुर्मिळ असा हा ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’. या गटाचे रक्तदाते अत्यंत कमी असल्यामुळे हे रक्त उपलब्ध करणे ही मोठी समस्या आरोग्य यंत्रणेला भेडसावते.
आपला रक्तगट दुर्मिळ आहे हे विक्रमही जाणून आहे. स्वत:च्या दुचाकीमागे त्याने ठळक अक्षरात ‘बॉम्बे ब्लड ग्रुप मोफत सेवा’ असे लिहूनच ठेवले आहे. सामाजिक बांधिलकीतून विक्रम करत असलेले कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. विक्रम सांगतो, ‘माझा ब्लड ग्रुप जगातील दुर्मिळ गट असल्याची कल्पना असल्यानेच मी मदतीसाठी आलो. रक्तदान केल्याने माझे रक्त कमी झाले नाही तर वाढले आहे. तसेच आता मला एका मातेचे, बाळाचे आशिर्वाद लाभले आहेत’.
विक्रम यादव यांचा संपर्क क्र. – 9970018001
(जास्तीत जास्त शेअर करा.)
माहिती प्रस्तुतकर्ता : अज्ञात
प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “प्रतिक्रिया आणि प्रतिसाद…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यात नेमका फरक काय ? खरं तर दोन्हीही प्रत्युत्तरे… एखाद्या घटनेवर व्यक्त होण्यासाठी केलेली एक क्षणैक कृती आणि दूसरी कालांतराने केलेली कृती.. प्रतिक्रियेत विचाराला संधी नाही. आधी करून मोकळे व्हायचे, मग मागचा पुढचा विचार. अनेकदा ती स्वसंरक्षणार्थ घडते… कधी बचावात्मक पवित्रा, तर कधी आक्रमणात्मक हल्ला. पण क्षणाचीही उसंत न दवडता घडते, ती प्रतिक्रिया… ‘आरे ला का रे म्हणणे’ म्हणजे प्रतिक्रिया.
प्रतिसादाचे तसे नाही. तेथे वेळ आणि विचार महत्वाचा. समोरच्याच्या विधान आणि कृतीचा पूर्ण परामर्श घेऊन, त्यातील गर्भितार्थ जाणून घेऊन, ठरवून केलेली क्रिया म्हणजे प्रतिसाद. प्रतिसाद म्हणजे एक बुध्दीबळाचा डाव. माणसाला अर्थपूर्ण जगायचे तर प्रतिसाद सक्षम आणि विचारी हवा. अंगाशी येणारा विषय टाळायचा असेल तर प्रतिक्रिया तीक्ष्ण हव्यात. गरज असते ती दोहोंमध्ये समन्वय साधण्याची आणि कुठे काय वापरायचे याचे तारतम्य ठेवण्याची. प्रतिक्रियेत बरेचदा तारतम्य आणि ताळतंत्र सुटते. भान हरपून शब्द चुकीचे वापरले जातात, प्रसंगी भाषा शिवराळ होते आणि मस्करीची कुस्करी होते.
प्रतिसाद ही अभ्यासाने साध्य करावयाची गोष्ट आहे, तर प्रतिक्रिया ही ‘स्व’ला जपण्यासाठी होणारी नैसर्गिक उर्मी आहे. माणसाच्या बुध्दीमत्तेचा जसजसा विकास होत गेला आणि तो जसजसा वानाराचा नर होत गेला तसतशी त्याच्या प्रतिसादात उत्क्रांती होत गेली. प्रतिक्रिया मात्र त्याच्या उगमाच्या वेळी जशा होत्या तशाच राहिल्या आणि पुढची अनेक शतके त्या तशाच रहातील. म्हणूनच नराचा नरोत्तम होण्यासाठी त्याच्या प्रतिसादामध्ये सकारात्मक गुणवत्ता वाढीस लागली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने अंतर्भूत होऊन कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करतांना थोडासा विचार करण्याची गरज आहे. महत्वाचे म्हणजे विचाराने केलेली कोणतीही कृती म्हणजे प्रतिसाद हा क्षणिक प्रतिक्रियेच्या प्रत्युत्तरापेक्षा अधिक लाभदायी ठरतो, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
☆ इतिहासातील चिरंजीवाची पूर्णाहुती… लेखक : श्री संतोष भोसेकर ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे☆
☆
१८५७ च्या क्रांति युद्धातील शूर सेनानी तात्या टोपे यांचे देशासाठी बलिदान करून अमर झाले ते आजच्याच दिवशी.
रामचंद्र पांडुरंग भट हे तात्या टोपे यांचे मूळ नाव. ते नाशिक जिल्ह्यातील येवले या गावचे. तात्यांचे वडील पेशव्यांच्या पदरी चाकरीला होते. नानासाहेब आणि तात्या बालपणी एकत्र खेळले, एकत्र मोठे झाले. लहानपणापासूनच तात्या टोपे अत्यंत स्वाभिमान साहसी वृत्तीचे होते. त्यांचे शौर्य पाहून बाजीराव पेशवे त्यांच्यावर खुश असताना एकदा तात्यांचे कौतुक करताना नवरत्नांनी मढवलेली एक मोठी टोपी तात्यांच्या मस्तकावर ठेवली आणि तेव्हापासून तात्या टोपे म्हणू लागले.
१८५७ च्या काळात तात्या टोपे नानासाहेबांच्या दरबारात लेखनिक म्हणून कामाला होते. उठावाच्या वेळी इंग्रजांनी कानपूरवर हल्ला करून ते ताब्यात घेतले. नानासाहेबांचा पराभव झाला. तेव्हा मात्र तात्या टोपे यांनी आपल्या हातातील लेखणी खाली ठेवली आणि हाती तलवार घेतली.
नानासाहेब पेशव्यांना बिठुरहून फत्तेपूरला पाठवून स्वतः इंग्रजांशी लढत तात्या टोपे बिठुरलाच राहिले. इंग्रजांबरोबर त्यांची प्रचंड लढाई झाली त्यात तात्या टोपेंचा पराभव झाला. निवडक सैन्यासह दुथडी भरलेल्या गंगेत तात्यांनी उडी टाकून पैलतीरावरील फत्तेपुरला पोहोचले. तेथे नानासाहेब व तात्या टोपे यांनी मिळून कानपूर जिंकून घेतले. या सुमारास झाशीवर सर ह्यू रोज याने हल्ला चढवला. राणी लक्ष्मीबाईंनी तात्या ंची मदत मागितली. राणीच्या साहाय्यासाठी आपल्या सैन्यासह तात्या टोपे झाशीला गेले.
तात्या टोपे जवळ उत्तम संघटन चातुर्य होते. त्यांना हिंदी, उर्दू, मराठी, संस्कृत आणि सही पुरते इंग्रजी इत्यादी भाषा अवगत होत्या. इंग्रजांशी समोरासमोर न लढता गनिमी पद्धतीने लढण्याचे युद्ध पद्धती त्यांनी ठरवली. प्रचंड मोठा झंजावात केला. तात्या टोपे यांना पकडण्यासाठी इंग्रजी सैन्य धडपडत होते. त्यांना तिन्ही बाजूंनी घेरले. नर्मदा ओलांडून तात्या टोपे यांनी इंग्रजांना हुलकावणी दिली. ते इंग्रजांच्या दृष्टीने धोकेबाज ठरले होते. त्यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी जिवाचे रान केले. रिचर्ड मीड ने तात्या टोपे यांना पकडण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. तात्या टोपे यांचे मित्र मानसिंग हा फितूर झाला. मानसिंगने तात्यांचा विश्वासघात केला. त्यांने मीडच्या ताब्यात तात्या टोपे यांना स्वाधीन केले.
१८ एप्रिल १८५९ ग्वाल्हेर जवळील शिवपुरी येथे दुपारी चार वाजता फाशी देण्यासाठी तात्या टोपे यांना आणले. फाशीचा दोर स्वतःच्या हाताने गळ्यात भोवती अडकवला. मानेचा दोर आवळला गेला आणि क्षणार्धात…. सहस्रावधी देश बांधवांच्या डोळ्यात दुःखाश्रू उभे राहिले. सारा देश दुःख सागरात बुडाला. इंग्रजी सत्तेला आव्हान देणारा हा भारताचा स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्याचा झेंडा हाती घेऊन फाशी गेला. त्याचा मृतदेह सायंकाळपर्यंत तसाच लटकत होता.
१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाततील होमकुंडात तात्यांची शेवटची आहुती पडली. स्वातंत्र्यवीर सावरकर “१८५७ च्या स्वातंत्र्यसमर” ग्रंथात म्हणतात…
तो फास रक्ताने भिजला आणि देश अश्रूंनी ओलाचिंब झाला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अत्यंत कष्ट सोसले हाच त्याचा अपराध होता. देशद्रोही विश्वासघाताच्या दुतोंडी चालीचे हे बक्षीस त्यांना मिळाले आणि त्यांचा शेवट एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे फासावर लटकविला. तात्या, तात्या ह्या असल्या दुर्दैवी देशात तुम्ही कशाला जन्म घेतला? ह्या दुर्बळांच्या अश्रूंसाठी आपण रक्त सांडावे खरोखर कसला हा महागडा सौदा!!
गनिमी काव्याच्या रणपंडिताला शतशः प्रणाम.
☆
लेखक : श्री संतोष भोसेकर
प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे
पुणे
मो 9420861468
medhasahasrabuddhe@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
दागिन्यांची किंवा पैशांची भिशी आपल्याला ठाऊक आहे. पण ‘झाडांची भिशी’ ही कल्पना अनेकांना नवीन वाटेल. — – –
झालं असं, यशवंत पेठकर नावाचे डॉक्टर शाळेपुढील जागेत शाळेच्या परवानगीनं वृक्षारोपण करीत होते. त्यांचे मित्र डॉ. सचिन पुराणिक यांनी ते पाहिलं. शाळेपुढं झाडं लावण्याची त्यांची कृती सचिन यांना अभिनव वाटली. पण एकट्या-दुकट्यानं हे काम केलं, तर त्याला व्यापक स्वरूप येणार नाही, काहीतरी वेगळी कल्पना लढवली पाहिजे, असं त्यांच्या मनानं घेतलं.
एका-दोघांनी झाडं लावण्यापेक्षा ही सामूहिक कृती व्हायला हवी, पण त्यासाठी पैसे हवेत. ते कसे उभे करायचे?
डॉ. सचिन यांचा आपल्या मित्रांवर भरवसा होता. त्यांनी काही मित्रांना झाडांच्या भिशीची कल्पना सांगितली. सगळ्यांनी ती उचलून धरली आणि पाहता पाहता ती आकाराला आली. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वांनाच स्वतः झाडं लावण्यासाठी वेळ देणं शक्य नव्हतं. शिवाय त्या झाडांचं संगोपनही करण्याचा महत्त्वाचा मुद्दा होता. सगळ्यांनी मिळून त्यावर तोडगा काढला.
🌲🌳
दोन वर्षांत सोलापुरात ७०० झाडं लावण्यात आली आणि ती सगळी जिवंत आहेत.
🎄🌳🌴
अशी आहे भिशी….
सुरवातीला बारा डॉक्टरांनी मिळून सुरू केलेल्या या भिशीमध्ये आता ८८ सदस्य आहेत. त्यातील अनेक जण उद्योजक, इंजिनिअर, आर्किटेक्ट किंवा अन्य व्यवसायांतील आहेत.
🌳🌲
प्रत्येकाकडून दरमहा दोनशे रुपये घेऊन महिन्याला दोन लकी ड्रॉ काढले जातात. ज्यांच्या नावाचा ड्रॉ निघाला, त्यांच्या पसंतीची योग्य वाढ झालेली रोपं खरेदी केली जातात.
🌱 🎋 🪴
त्यांच्याच सूचनेनुसार वृक्षारोपणाची जागा निश्चित केली जाते. त्याची निगा आणि संगोपनाची जबाबदारी ठरवली जाते. त्यानुसार कधी समारंभपूर्वक, तर कधी साधेपणानं लागवड केली जाते.
🌱🌿🌳🌴
भिशीच्या पैशातून रोपखरेदी, जाळीचे किमान पाच फुटांचे ट्री गार्ड खरेदी केले जाते. ड्रॉ निघालेल्या सदस्याच्या घराच्या, बंगल्याच्या आवारात रोप लावले जाते. तेथे जागा नसल्यास शाळा किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी ते लावले जाते.
🌲🌳🎄🌴
सोलापुरातील विविध शाळा या मंडळींना आपल्या शाळेत वृक्षारोपणाची विनंती करतात. रेंज फॉरेस्ट ऑफिसर संजय माळी यांना ही संकल्पना समजली. दिवंगत ‘वृक्षमित्र’ बाबूराव पेठकर आणि पर्यावरणतज्ज्ञ सिद्राम पुराणिक या सगळ्यांनी या उपक्रमाला मार्गदर्शन केले.
🎄🌲🌳🌴🌴
दोन वर्षांत सातशे झाडं स्वखर्चाने लावणाऱ्या या निसर्गप्रेमींची दखल राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही घेतली. त्यांनी या ग्रुपमधील काही सदस्यांना मुंबईला निमंत्रण देऊन ही कल्पना समजून घेतली. त्यांच्यापुढे झालेल्या सादरीकरणामुळे हा उपक्रम आणखी जोमाने सुरू झाला.
🌵🌲🌳
हिमाचल प्रदेशात एक लाख औषधी वृक्षांची लागवड केलेल्या योगी अरविंद यांना या उपक्रमाची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी सोलापूरला आवर्जून भेट देऊन या मंडळींना मार्गदर्शन केले.
🎄🌾🎋
झाडांचा वाढदिवस लावलेल्या झाडांची महिन्यातून दोनदा तपासणी केली जाते. रोप व्यवस्थित रुजले आहे की नाही ते पाहिले जाते. बऱ्याचदा रोप रुजत नाही, तेव्हा दुसरे रोप लावले जाते. लागवडीला वर्ष पूर्ण झालेल्या झाडाचा वाढदिवस साजरा केला जातो. झाडाचं संगोपन करणाऱ्यांचे कौतुक केले जाते. हा उपक्रम सोलापूरकरांना आवडला आहे. आता कित्येक जण आपल्या वाढदिवशी किंवा लग्नाच्या वाढदिवशी झाडं लावण्याचा संकल्प करतात व या उपक्रमात सहभागी होतात.
🌳🌲🌴🎄
डॉ. सचिन यांच्या कल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाची व्याप्ती वाढत आहे. एकाच ग्रुपमध्ये अधिकाधिक सदस्य वाढवण्यापेक्षा शहराच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळे भिशी ग्रुप व्हावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केल्यामुळे आणखी ग्रुप तयार झाले आहेत. झाडं लावणाऱ्यांची सावली झाडंच सांभाळतात.
🌲🌴
असा हा उपक्रम पाहता म्हणावे लागेल…….
🌳🌴
कवी नारायण सुमंत यांच्या शब्दांत सांगायचे, तर ‘फुलता आले नाही त्यांनी फुलवून जावे थोडे, रुजण्याजोगे झाड पाहून लावीत जावे झाडे.
🎄🌳 🌴
जीवनाच्या शोधात आपण मृत्यूच्या किती जवळ आलो आहोत, याचा या मंडळींनी इतका सुंदर विचार करून अमलात आणला आहे.
🌳🪴🌲🌳
कारण आज लोकांना खूप उकाडा जाणवत आहे पण एसी कधी घेणार याची चिंता आणि विचार माणूस आज करत आहे. भारतात ५०० कोटी झाडांची गरज आहे आणि ही फक्त सुरुवात आहे. ४५ सेंटीग्रेड ते ४९ सेंटीग्रेड हे तापमान ५५ सेंटीग्रेड ते ६० सेंटीग्रेड व्हायला वेळ लागणार नाही.
🎄🌳🌲🌴
५६ सेंटीग्रेड वर मानव जगणार नाही हे आपल्याला समजून घ्यावे लागेल आणि रोपे लावावी लागतील.
🌾🌿🌴🌳आत्तापासूनच झाडे लावा कारण एक झाड मोठे होण्यासाठी पाच ते सात वर्षे लागतील. आता पाऊस येणार आहे. दोन झाडे नक्की लावा सर्व काही सरकारवर सोडू नका.
🎄🌲🌳🌴
ज्यांना जमेल त्यांनी वरील प्रमाणे भिशी सुरू करा झाडे लावा, झाडे जगवा, झाडे वाढवा.. 🙏
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुश्री स्नेहलता गाडगीळ
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “थांबणे…” – लेखक – डॉ अनिल अवचट ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
कुठे..?
केव्हा..?
कसे थांबावे..?
ही एक कला आहे.
ती सर्व कलांमध्ये लागू होते..!
कविता, कथा, कादंबरी, चित्र, शिल्पात कुठे थांबायचे याला संयम आणि विवेक लागतो. अन्यथा आशय भरकटत जातो. तसे जीवनातही घडते.
माझ्याभोवती तरुणपणी अलौकिक माणसे होती. त्यांच्यामुळेच ही जाणीव मला होत गेली. विंदा करंदीकर माझे शेजारी आणि प्रतिभावंत कवी. एकदा त्यांनी ठणकावले की, आता मी लिखाण बंद करतो आहे. आणि त्यांनी शब्द पाळला.
स्वत:शी प्रामाणिक राहून या निर्णयापर्यंत यावयास धारिष्ट्य तर लागतेच; पण विसर्जनाची बूजही लागते. तसेच तात्या माडगूळकरही होते. तेही माझे मित्र होते. आयुष्याच्या उताराला लागले तेव्हा या उमद्या लेखक, चित्रकार, शिकारी आणि प्रवासी माणसाने हाच मार्ग अवलंबला. ते म्हणायचे, ‘गड्या, जगण्याची आतून उमेद राहिली नाही…! ‘
विंदा शेवटपर्यंत प्रसन्न राहिले. भाजी, मासे आणायला आम्ही सोबतीने जात असू. मासेवाल्या बाईशी घासाघीस करायला त्यांना मजा येत असे. तेव्हा त्यांच्यातला कवी बहुदा त्यांच्या पिशवीत त्यांनी लपवून ठेवलेला असे. तितक्याच आत्मीयतेने ते संगीतात रमत. तसेच तात्या होते. संध्याकाळी आम्ही गप्पा मारीत फेरफटका मारीत असू. तेव्हा त्यांच्यातल्या अद्भुत लेखकाची सावली कुठेही त्यांच्याबरोबर चालत नसे. उरलेले जीवन एखाद्या कवितेसारखे गुणगुणत ही माणसे कुठलेही आविर्भाव न घेता जगले.
पु. ल. देशपांडे यांनीही वेळेनुसार आवराआवर केली. देणग्या देऊन, पुस्तके/ पुस्तकांचे हक्क त्यांनी वाटून टाकून ते मुक्त झाले आणि उरलेले आयुष्य एक गिफ्ट ळाल्यासारखे हसत जगले.
‘जोपर्यंत लोकांना वाटते आपण अजून खेळावे, तीच थांबण्याची योग्य वेळ असते…! , ‘ हे सुनील गावस्करचे वाक्य तंतोतंत यात बसते. कोठे थांबावे हाच संयम त्यात आहे.
विद्वान तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणजे आमचे आबा. त्यांचा व्यासंग, प्रभुत्व, त्यांची जाण, अभ्यास, समाज सुधारण्यासाठीचे त्यांचे दीर्घ कार्य सर्वानाच ठाऊक आहे. त्यांच्या सहवासात मला हेच जाणवते. या प्रचंड ज्ञानाच्या ग्रंथसंग्रहालयातून ते अचानक जुन्या महाबळेश्वरच्या घरी गेले. ड्रायव्हरला सांगितले, ‘सकाळी काही घाई नाही. ‘ ड्रायव्हर जेव्हा आत आला तेव्हा छातीवर हात ठेवून आबांचे विसर्जन झाले होते.
ज्ञानी आणि भक्कम जीवनाचा अर्थ कळलेले हे ऋषीच म्हणावे लागतील. साहित्य सहवासात संध्याकाळी फिरताना गंगाधर गाडगीळ एकदा भेटले. गाडगीळ हे ब्रिटिश शिस्तीतले होते. सगळं नीटनेटके, वेळेवर असायचे, जसे त्यांचे वाड:मय आणि आयुष्य होते. त्या संध्याकाळी त्यांचा ड्रेसदेखील इस्त्री केलेला, तंतोतंत होता. त्यांच्या मदतीला बरोबर नोकरही होता. मला त्यांनी थांबवले आणि म्हणाले, ‘मिस्टर अवचट, बरे झाले आत्ताच भेट झाली…! आता पुढे भेट शक्य नाही. ‘
‘परदेशी चाललाय का…? , ‘ मी विचारले. ‘नाही. आत्ता सारे थांबवले आहे. लिखाण आणि इतर गोष्टी व्यवस्थित आवरल्या आहेत. औषधे बंद केली आहेत. आता एकेक मित्रांना भेटतो आहे. थँक्यू, तुमचा सहवास लाभला…! ‘
ते शांतपणे नोकराबरोबर फाटकापाशी चालत गेले. त्याच आठवड्यात ते गेल्याचा निरोप आला. या लोकांनी हे विसर्जन किती समजूतदार आणि अलिप्तपणे स्वीकारले होते.
ओशोंनीही अत्यंत वेगळ्या संदर्भाने विसर्जनावर लिहिले आहे. Abandoning करणे, सोडून देणे अशी सारी अंगे या विसर्जनात येतात. ओशोंनी शेवटी सांगितले, माझ्या गळ्यात घातलेल्या माळा फेकून द्या. संन्याशी भगवे कपडे काढून टाका. स्वत:चा संन्यास स्वत: शोधा. जे मौनात विसर्जित होते तेच चांगले संगीत…! त्यांच्या या वाक्यातच जीवनाच्या संगीताचे अर्थ सामावले आहेत.
जगण्याच्या या शर्यतीत प्रत्येक जण निराळे मार्ग शोधतो. बहुतेकांना ते आयते हवे असतात. कोणाच्या तरी खांद्याची, दैवताची डोके ठेवण्याची त्यांची गरज असते. पण विसर्जन हा तुमच्या बौद्धिक पातळीचा, मनाचा एक भाग आतल्या आत असतो; जो भाग एखादा गुरू प्रसाद म्हणून तुमच्या हातात देत नाही.
वयाप्रमाणे जीवनाशी सामील होणे यातच खरी ग्रेस आहे. अंगणात उन्हात तांदूळ निवडत बसलेल्या, साईसारखी त्वचा झालेल्या प्रेमळ आजीमध्ये ती ग्रेस असते.
कोऱ्या हॅण्डमेड पेपरवर रंगाचा पहिला ठिपका टाकल्यावर तो हळुवार पसरत जातो. पुन्हा अनेक रंगांत तो मिसळत जातो. त्याच्या कंट्रोल्ड ओघळांनी किंवा छटांनी एक चित्र बनते. कधी ते देखणे दिसते, कधी जमत नाही. हे महत्त्वाचे नाही. ती प्रोसेसच दैवी असते. त्या कागदावरच्या रंगाच्या प्रत्येक ठिपक्यात पारदर्शक विसर्जनाचे क्षण तरंगत असतात.. बदलत राहतात. विघटन हे अलौकिक अॅबस्ट्रॅक्ट नॅचरल चराचरातील मौनच असते.
समतया वसुवृष्टि विसर्जनै
जंगलात, ऋतुचक्रात हे सामावलेले असते. हत्तीला कळते आपले दिवस संपायला आलेत. कळपातून तो अपरात्री गुपचूप पाय न वाजवता निघतो आणि पूर्वीच शोधलेल्या गुप्त ठिकाणाकडे तो चालत राहतो. तो तेथे पोहोचतो आणि स्थिर उभा राहतो. त्याचा एवढा प्रचंड बलवान देह हळूहळू काही दिवसांत संपतो आणि मातीशी एकरूप होतो…
हे विसर्जन…!!!
झाडाचे पिकले पिवळे पान फांदीवरून निसटते. हवेत तरंगत मौनाच्या प्रार्थनेसारखे जमिनीवर अलगद टेकते आणि विसर्जित होते. अगदी हळुवारपणे. विसर्जन ही मौलिक गिफ्ट आहे.
आजकाल लोकाना कुठे थांबावे हेच समजत नाही. जीव संपला तरी हावरटपणा जात नाही. छाती फुटेपर्यंत लोक धावत असतात मागे वळून बघत नाही. स्वत:ची पर्वा नसते का..? तर जेवढे कमवता येईल तवढे पदरात पाडून घ्यायचे पण एक दिवस सर्व असुनही सर्व संपल्यासारखे दिवस येतात तेव्हा हातात फक्त निराशा आणि अंधारच दिसतो. ऐश्वर्य येते पण ते भोगायची मनस्थिती नसते. मग जीवनभर एवढे पळून काय उपयोग झाला. शेवटी हे सगळे मायाजाल न संपणारे आहेत. त्यातून आपणच ठरवून विरक्त होणे केव्हाही चांगलेच…!!!
विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण तेवढा पण वेळ आपल्याला नाही…!!!!
लेखक : डॉ अनिल अवचट
(डॉ. अनिल अवचट यांची मृत्यूपूर्वीची शेवटची पोस्ट)
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “व्रताशिवाय उद्यापन निष्फळच” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆
“प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म किती वाजता झाला? ”
“श्रीकृष्णाचा जन्म किती वाजता झाला? “
“नृसिंह जन्म कुठल्या वेळी झाला? “
“हनुमंतांचा जन्म कुठल्या वेळी झाला? ”
अशा प्रकारचे काही प्रश्न मी डिसेंबर महिन्यातल्या एका सेशनमध्ये मुलामुलींना विचारले होते. समोर बसलेली सगळी मुलंमुली १३ ते २५ वयोगटातली, उच्चशिक्षित कुटुंबातली, आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असलेली, नामांकित खाजगी शाळांमध्ये जाणारी होती. पण मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांना देता आली नाहीत. मी त्यांना वेगवेगळ्या फळभाज्या, पालेभाज्या आणि फळं यांची नावं सांगून त्यांच्या सेवनातून आपल्याला कुठले घटक मिळतात, असं विचारलं. त्याचीही उत्तरं मिळाली नाहीत.
“घरात तुम्ही एकटेच आहात आणि भूक लागली तर तुम्ही काय करुन खाल? “असं विचारल्यावर जवळपास सगळ्यांनी मॅगी नूडल्स, पास्ता, जॅम टोस्ट अशी नावं सांगितली.
“श्रावण महिन्यात आपल्या घरी कोणकोणते कार्यक्रम असतात? “
“गणपती विसर्जनाच्या दिवशी गणपती घरातून बाहेर पडताना आपण उंबऱ्यापाशी काय म्हणतो? ”
“गुढीपाडवा, दसरा आणि दिवाळी पाडव्यादिवशी आपण सरस्वती पूजन किंवा पाटीपूजन करतो का? “
“पाटीवरची सरस्वती काढता येते का? “
“पंचामृत कसं करतात? “
“नैवेद्याचं पान कसं वाढतात? “
“चैत्रांगण कसं काढतात? ”
“चैत्रगौर म्हणजे काय? “
“खंडेनवमीच्या दिवशी काय करतात? “
“आषाढी एकादशीचं महत्त्व काय? “
यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर एकालाही देता आलं नाही. मग मात्र मला जरा अस्वस्थता आली.
एका जुडीमध्ये किती दुर्वा असतात? , माळावस्त्र कसं करतात? , औक्षण कसं करतात – तेलाच्या दिव्यानं की तुपाच्या दिव्यानं? , पुरणाची आरती माहिती आहे का? , धोतर कसं नेसतात? तुमचं कुलदैवत आणि कुलदेवता माहिती आहे का? … हे प्रश्न विचारले तेव्हाही हाच अनुभव आला. अनेकांनी तर “आमच्या घरी असे काही सणवार आम्ही करतच नाही. सगळे सण मोठ्या घरी असतात किंवा गावी असतात” अशी उत्तरं दिली. मुंज झालेल्यांना बहुतेक सगळ्यांना मुंज का करतात? हेही ठाऊक नव्हतं.
मुलांना श्लोक, वेचे येत नाहीत. संतांचे अभंग येत नाहीत, एक तेवढी गणपतीची सोडली तर बाकी आरत्या येत नाहीत. उत्तमोत्तम कवींच्या कविता येत नाहीत. त्यांनी प्रवासवर्णनं वाचलेली नाहीत. वाचनालयात जाण्याची सवय नाही. एखादं चार ओळींचं पत्र लिहिता येत नाही. पाकिटावर पत्ता कुठल्या क्रमानं लिहितात, ते माहिती नाही. फार तर गणपती स्तोत्र, रामरक्षा, मारुती स्तोत्र येतं. पण, महिषासुरमर्दिनी स्तोत्र, पांडुरंगाष्टक, भगवद्गीतेचे अध्याय, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, आदित्यहृदय स्तोत्र येत नाही. मनाचे श्लोक येत नाहीत, करुणाष्टके ठाऊक नाहीत. संपूर्ण वन्दे मातरम् सुद्धा ठाऊक नाही.
आपत्कालीन परिस्थितीत काय कराल? असं विचारलं, तर तेही सांगता येईना. ॲम्ब्युलन्स कशी बोलवाल? गॅस सिलेंडर लिकेज असेल तर काय कराल? कुणी लिफ्ट मध्ये अडकलं तर काय कराल? सीसीटीव्ही फुटेज पाहता येतं का? ऑफलाईन रेल्वे रिझर्व्हेशन करता येतं का? बँकेत चेक भरता येतो का? वीजबिल वाचता येतं का? पुण्यात बस ने फिरता येईल का? धान्य निवडता येतं का? हॉट प्रेस ऑईल आणि कोल्ड प्रेस ऑईल यात फरक काय असतो? पाम ऑईल म्हणजे नेमकं काय? वनस्पती तूप म्हणजे काय? कोलेस्टेरॉल म्हणजे काय? हेही कुणाला सांगता येईना…!
घरातल्या सगळ्यांच्या कपड्यांना इस्त्री करता येते का? उभी इस्त्री आणि आडवी इस्त्री म्हणजे काय? वॉशिंग मशीन न वापरता कपडे धुता येतात का? शाळेतला डबा स्वतःचा स्वतःला घासून ठेवता येतो का? शर्टाचं बटण तुटलं तर लावता येतं का किंवा उसवला तर टाके घालता येतात का? गिफ्ट पॅक करता येतं का? कोऱ्या कागदांची वही शिवता येते का? भाज्या निवडता, चिरता येतात का? कंपोस्ट खत करता येतं का? फोडणी करता येते का? दह्याचं विरजण लावता येतं का? ताक करता येतं का? लोणी कढवता येतं का? मुगाची खिचडी करता येते का? असं विचारलं तर तेही येत नव्हतं.
हे सगळं इतक्या स्पष्ट समोर आलं आणि त्याचीच अस्वस्थता मनातून जाता जाईना. मुलांच्या जडण-घडणीला जो सांस्कृतिक आधार असायला हवा, तो तयारच झाला नसल्याचं लक्षात आलं. वय वर्षे पंधरा-सोळा ते वय वर्षे बावीस-तेवीस या वयोगटात यातलं काहीही येत नसेल तर मामला गंभीर आहे, हे पालकांना जाणवून देणं गरजेचं वाटलं.
फक्त भरभक्कम गुणांच्या मार्कलिस्ट मिळवल्या आणि भरपूर पॅकेज मिळवलं म्हणजे आपलं आयुष्य परिपूर्ण झालं, असं होऊ शकत नाही, हे मुलं आणि पालक या दोघांनाही लक्षात यायला हवं. बरं, शालेय अभ्यासात तरी उत्कृष्ट गुणवत्ता आहे का? तर पुष्कळदा तसंही नसतं. वर्षानुवर्षं मराठी ऐकून, वाचून, बोलून सुद्धा “भेटलं, मिळालं, सापडलं” यातला फरक कळत नाही. “जर आणि अगर” यातला फरक कळत नाही. मराठी बोलताना हिंदी इंग्रजी शब्द बेसुमार घुसवलेले असतात. देवनागरी लिखाणाबद्दल तर विचारायलाच नको. विज्ञानात पुस्तकी सर्किट डायग्राम येते, पण प्रत्यक्षात सर्किट तयार करता येत नाही. साधा सिलिंग मधला एलईडी बल्ब पण बदलता येत नाही.
रात्री झोपण्यापूर्वी गॅस सिलेंडरचा नॉब बंद करता येत नाही. आखूड आणि तंग कपड्यांपेक्षा अंगभर शुद्ध सुती कपडे वापरण्याचं महत्त्व समजत नाही. जंक फूड मधला धोका लक्षात येत नाही. रोजच्या आयुष्यात प्लॅस्टिकचा वापर कसा टाळावा, हे कळत नाही. सिग्नलला थांबल्यावर दुचाकी बंद करावी, यातलं पर्यावरण महत्व कळत नाही. कापडी पिशवीचा वापर का वाढवायला हवा, हे समजत नाही. बाहेरून अन्न पार्सल आणायला जाताना सोबत स्टीलचा डबा घेऊन जावा, गरम पदार्थ प्लॅस्टिक कंटेनर किंवा फॉइल मधून पार्सल आणू नये, हे विज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कळू नये? कृत्रिम शीतपेये कशी हानिकारक आहेत, हे कळत नाही. मग विज्ञानाचा नेमका अभ्यास ही मुलंमुली करतात तरी कशी?
मग आयुष्य उत्तम जगण्यासाठीची सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक, भावनिक, शैक्षणिक, पर्यावरणविषयक, वैज्ञानिक, आर्थिक आणि राष्ट्रीय चारित्र्य विषयक जीवनदृष्टी आहे का? ते सर्वांगीण जीवनपोषण आपल्या मुलामुलींना कसं मिळणार, कुठून मिळणार, कोण देणार ह्याचा विचार आपण केला आहे का?
हे प्रश्न इतके लख्ख समोर दिसल्यावर दोन महिन्यांपूर्वी आम्ही पालकांसाठी एक सत्र आयोजित केलं होतं. त्यामध्ये “आपल्या मुलांनी कोणत्या गोष्टी शिकाव्यात, असं तुम्हाला वाटतं? ” असा प्रश्न मी उपस्थित पालकांना विचारला. बहुतेक सगळ्या पालकांची गाडी ‘शाळेच्या परीक्षेत भरपूर मार्क’ याच गोष्टीपाशी अडली होती. नॅशनल एन्ट्रन्सेस मध्ये स्कोअर झाला की बस्स.. डोक्यात एवढा एकच विचार.. आपल्या जगण्याची गुणवत्ता फक्त पैसा कशी ठरवणार?
आपल्या मुलामुलींचा सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक बुद्धिभेद का होतो आहे? “मी, माझं, मला, फक्त माझ्यापुरतं” हा फॉर्म्युला आपल्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीनं कितपत उपयोगी पडणार आहे? “आयुष्यात पैसा हेच एकमेव सत्य आहे” ही धारणा आपल्या मुलांना सुरक्षित आणि स्वस्थ जगवेल का? असे प्रश्नच पालकांना पडत नाहीत, ह्याचं मला फार आश्चर्य वाटलं आणि तेवढंच वाईटही वाटलं. आपल्या मुलामुलींना चांगले मित्र मैत्रिणी नाहीत, चांगलं वाचनीय साहित्य त्यांना ठाऊक नाही, विद्वानांचा सहवास नाही, आपल्याला मिळालेल्या चांगल्या आयुष्याविषयी कृतज्ञता नाही. निदान आपल्या चांगल्या आरोग्याविषयी तरी दैनंदिन जीवनात बदल घडवायला हवा, तर तेही नाही.
जर असं असेल तर हा केवळ शिक्षणव्यवस्थेचा दोष नाही. नव्या पिढीला घडवण्याचं धोरण समाजानंच ठरवण्याची गरज आहे. कारण, कुठलाच पुस्तकी अभ्यासक्रम आणि मार्कलिस्ट आपल्या मुलांच्या सुदृढ, समंजस आणि शहाण्या जगण्याचा पाया घालण्यासाठी पुरा पडणार नाही. शाळा, कुटुंब आणि समाज या तिघांनीही एकत्र येऊन काही नीति ठरवली तर हे चित्र बदलता येईल. समाजातल्या प्रत्येकानं ‘ही माझी जबाबदारी आहे’ असं मान्य करुन सक्रिय सहभाग घेतला नाही, तर आपल्या पुढच्या पिढ्यांची आयुष्याची वस्त्रं अशी फाटत राहतील, ज्यांना लावायला ठिगळं अपुरी पडतील.
पुस्तकी अभ्यास, विद्याभ्यास आणि कौशल्याभ्यास या तीनही वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या आयुष्यात या तीनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, हे मान्यच आहे. पण शाळेची सुट्टी ही पुस्तकी अभ्यासाची सुट्टी आहे, असं लक्षात घेऊन जीवनविद्या आणि कौशल्य विकास या दोन्हीं विकासांवर भर द्यायला हवा. जाणिवेच्या समृद्धीपासून ते प्रत्यक्ष कृतिशीलतेपर्यंतचा प्रवास व्हायला हवा. आपल्या संस्कृतीमधलं विज्ञान मुलांना समजायला हवं आणि विज्ञानातली नैतिक संस्कृती सुद्धा उमगायला हवी. खिशाला पटणं आणि मनाला पटणं यातला फरक नव्या पिढीला शिकवायला हवा.
पर्यावरणाच्या स्वास्थ्याला आणि राष्ट्रीय हिताला ज्या गोष्टी हिताच्या नाहीत, त्या कितीही आर्थिक मोबदला देणाऱ्या असल्या तरीही त्या नाकारण्याचं धैर्य मुलांमध्ये यायला हवं. महिन्याभराचा अनलिमिटेड डेटा पॅक मारुन घरात निवांत बसून सोशल मीडियावर वाट्टेल तसं व्यक्त होण्यात काहीही कर्तृत्व नाही, उलट ते लाज आणणारं लक्षण आहे, हेही घडवणं आता संस्कारांचा भाग झालंय. महापुरुषांचे विचार कृतीमध्ये आणण्यासाठी आणि अनुकरण करण्यासाठी असतात. डॉल्बी सिस्टिमपुढं नाचण्यानं ते विचार आपल्या व्यक्तिमत्वात येत नाहीत, हाही संस्कार आता नितांत गरजेचा झाला आहे. तरच ‘आयुष्य म्हणजे इव्हेंट नसतो’ हे पुढच्या पिढ्यांमध्ये रुजायला मदत होईल.
म्हणूनच म्हणतो पालकमित्रांनो, उन्हाळी सुट्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदला. मूल घडवण्याचा खरा अभ्यासक्रम फार व्हास्ट आहे आणि त्यात उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला स्वतःलाच पाण्यात उतरावं लागेल. मुलांच्या पाठीशी नाही तर त्यांच्या सोबत राहावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्याला मानेवरचं जोखड न समजता स्वतः डेव्हलपमेंटल मेंटॉर होण्यातला आनंदसुद्धा मनसोक्त लुटला पाहिजे.
लक्षात घ्या, आपल्या मुलांना आपल्याच सक्रियतेची सगळ्यात जास्त गरज आहे. ती जबाबदारी आऊटसोर्स करता येणार नाही. केवळ जन्म दिल्यानं पालक होता येत नाही आणि शाळा, कोर्सेस, ग्राउंड, शिबिरं यांच्या फिया भरल्यानं संगोपन केलं असं म्हणता येत नाही. आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्वाचं शिल्प अधिक देखणं घडवायचं असेल तर, शिक्षकांसोबत आपणही ती शिल्पकला शिकून घेणं गरजेचं आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय मुलांना उत्तमपण येणार नाही अन् ते घाव आपणच घातल्याशिवाय आपलं पालकत्व सुफळ संपूर्ण होणार नाही. तेव्हां, पालकत्वाचं व्रत स्वतःच केलं तरच त्याचा लाभ आपल्या पदरी पडेल, अन्यथा….!
हा लेख प्रत्येकाने गांभीर्याने वाचून आत्मचिंतन करावे, ही विनंती.
☆ हाड नसलेल्या जिभांचे करायचे काय?☆ श्री संभाजी बबन गायके☆
श्री. विक्रम मिसरी
माळरानावर बोंब मारायची असेल तर गावाच्या पाटलाची परवानगी घ्यावी लागत नाही… हे जरी खरं असलं तरी ही बोंब कुणाच्या जिव्हारी लागत असेल तर मात्र त्या बोंब मारणा-याला चावडीवर आणून चाबकाचे चार फटके द्यायला लागतात… हे ही खरं!
आताच्या सोशल मिडीयाच्या काळात फेसबुक आणि त्यातल्या त्यात X(पूर्वाश्रमीचे Twitter) ही माळराने झालीत. या माध्यमांमधून कुणीही, कितीही, काहीही, कसेही आणि कुणाविरुद्धही अक्षरश: मनगटावर चुना लावून मनोसोक्त बोंबलू शकते.. हे झालेत ट्रोलर्स!
सभ्य समाजात प्रत्येकाला आपले मत मांडायचा अधिकार आहे, परंतु या अधिकारासोबत मत मांडताना वापरल्या जाणा-या भाषेबाबत, मांडणीबाबत आणि विशेषत: वेळेबाबत काही अलिखित संकेत, जबाबदा-याही आहेतच. पण याचे भान राखले जात नाही, याबद्दल वैषम्य वाटते!
अधिकार गाजवणारे पण जबाबदारी टाळणारे लोक एका अर्थी समाजद्रोही असतात. भारत-पाकिस्तान संघर्षामध्ये नुकताच विराम जाहीर केला गेला. दोन्ही देशांच्या जबाबदार, अधिकारी व्यक्तींनी हा निर्णय घेतला आणि हा निर्णय जाहीर करण्याची जबाबदारी एका अनुभवी, जबाबदार आणि अधिकारी व्यक्तीने सरकारच्या वतीने पार पाडली! या व्यक्तीचे नाव श्री. विक्रम मिसरी. सर्वसामान्य लोकांना श्री. मिसरी यांची कारकीर्द माहित असण्याचे काही कारण नाही. पण आताच्या स्थितीत त्यांची कारकीर्द, त्यांची योग्यता आणि गेल्या काही दिवसांत त्यांनी बजावलेली असाधारण कामगिरी नजरेसमोर ठेवता त्यांच्याविषयी अधिकच्या काही बाबी समजून घेणे अगत्याचे वाटले, म्हणून हा लेखन प्रयास!
भारतीय परराष्ट्र सेवा (INDIAN FOREIGN SERVICE) हा जग आणि आपला देश यांच्या परस्पर संबधामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा विभाग राष्ट्रीय आहे. देश सामरिकदृष्ट्या जितका सरस तितकाच मुत्सद्देगिरीच्या बाबतीतही सक्षम असेल तरच त्याचा निभाव लागू शकतो, हे आपण जाणताच.
श्री. विक्रमजी हे सध्याचे आपल्या देशाचे ३५वे परराष्ट्र सचिव (विदेश सचिव) म्हणून कार्यरत आहेत. अत्यंत शांत, संयमी, निगर्वी आणि सक्षम अधिकारी म्हणून त्यांनी स्वत:ला सिद्ध करून दाखवले आहे.
श्री. मिसरी यांचा जन्म श्रीनगर-जम्मू-काश्मीर राज्यातला असून ते दिल्लीच्या हिंदू महाविद्यालयाचे इतिहास विषयाचे पदवीधर आहेत. १९८९ मध्ये भारतीय परदेश सेवेत दाखल झालेल्या श्री. मिसरी यांनी १९९१ ते १९९६ या पाच वर्षांच्या काळात ब्रुसेल्स, ट्यूनिस या देशांमध्ये भारतीय मोहिमांमध्ये विविध जबाबदा-या सांभाळल्या. श्रीमती इंदिरा गांधी, मोरारजी देसाई आणि चरण सिंग या तीन पंतप्रधानांच्या काळात सोविएत युनियन मध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केलेल्या पंतप्रधान श्री. इंदर कुमार गुजराल यांनी श्री. मिसरी यांची त्यांचे स्वीय साहाय्यक म्हणून नेमणूक केली होती, यातच श्री. मिसरी यांच्या कार्यक्षमतेची कल्पना यावी. पुढे श्री. मनमोहन सिंग यांचेही ते स्वीय साहाय्यक होते आणि श्री. नरेंद्र मोदी यांनीही त्यांना त्याच पदावर कायम ठेवले होते.
२०१९ मध्ये चीन मधील भारताचे राजदूत म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी केली. गलवान मध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये २०२०-२१ झालेल्या हिंसक संघर्षाच्या वेळी श्री. मिसरी यांनी मुत्सद्दीपणाची चुणूक दाखवली आहे. २०२४ मध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार या पदावर नेमले गेले आणि १५ जुलै, २०२४ पासून ते परराष्ट्र सचिव या महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत.
आणि विशेष म्हणजे एवढा मोठा अधिकारी प्रसिद्धीच्या झोतात आजवर कधीच दिसला नाही. श्री. मिसरी भारताने पाकिस्तानी दहशतवादी केंद्रांवर चढवलेल्या हल्ल्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत होते. या परिषदेत मेजर सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या महिला अधिकारी मिडीयाच्या नजरेत काहीशा अधिक भरल्या. श्री. मिसरी साहेबांनी सुद्धा नेहमीप्रमाणे लो प्रोफाईल राहून त्यांचे विहित कर्म काटेकोरपणे सुरूच ठेवले. परंतु १० मे, २०२५ रोजी श्री. विक्रम मिसरी यांनी भारताचे शीर्ष नेतृत्व, भारतीय सैन्यदल यांच्या वतीने पाकिस्तानशी युद्धविराम केला गेल्याचे अत्यंत संयमी आणि मोजक्या शद्बांत जाहीर केले! युद्धविराम करण्याचा निर्णय त्यांनी त्यांच्या तोंडून ऐकवला… त्यांनी स्वत: युद्धविरामाचा निर्णय घेतला नव्हता.. हे अधोरेखितच होते. परंतु, सोशल मिडीयावर श्री. मिसरी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर बिभित्स भाषेत टीका सुरु झाली. एखाद्याला ट्रोल करणे म्हणजे to deliberately try to upset or provoke them, often through online interactions, by posting offensive, unkind, or inflammatory messages. It’s a form of online harassment or bullying, with the aim of causing distress or stirring up arguments. (ऑनलाईन संवादामध्ये एखाद्याबद्दल मानहानीकारक, बीभत्स मजकूर लिहिणे जेणेकरून त्या व्यक्तीला मानसिक त्रास होईल, आणि त्यातून वादविवाद निर्माण होईल.)
ही शिवीगाळ इतकी टोकाला गेली की त्यांच्या दोन्ही मुलींना यामध्ये ओढले गेले. वास्तविक त्यांच्या मुली, त्या परदेशात करीत असलेल्या नोक-या हा एक अत्यंत व्यक्तिगत भाग आहे. पण त्याचे भान राखले गेले नाही. अर्थात स्वत:ची काहीही पात्रता नसताना बरळणा-या लोकांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचे, हे सुद्धा ठरवावे लागते. परंतु सातत्याने असेच लिहिले, बोलले गेल्यास किमान मानसिक त्रास तर होतोच. यामुळे श्री. मिसरी यांनी त्यांचे एक्स खाते बंद करून टाकले.
भारतातील जबाबदार राजकीय नेते, प्रशासकीय सेवेतील अधिका-यांच्या संघटना इत्यादी लोकांनी देशासाठी अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावत असलेल्या श्री. विक्रम मिसरी साहेबांना पाठिंबा जाहीर केला आहे, ही उत्तम बाब आहे. परंतु, मिसरी साहेब आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल जाहीर अनुदार वक्तव्ये केलेल्या लोकांवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, हेही खरे आहे.
भारतीय प्रशासकीय व्यवस्थेमध्ये प्रशासकीय अधिकारी नव्हेत तर देशाचे सर्वोच्च राजकीय नेतृत्व हे सर्वोपरी असते, हे श्री. मिसरी साहेबांविरुद्ध अनाधिकाराने बोलणा-यांच्या लक्षात येत नाही, यातच या ट्रोलक-यांच्या बुद्धिमत्तेची एकूणातली खोली, लांबी आणि रुंदीही लक्षात येते.
सर्वसामान्य भारतीय जनता मात्र श्री. विक्रम मिसरी साहेबांसारख्या देशभक्त आणि खंबीर, प्रामाणिक माणसाच्या मागे किमान मनाने तरी उभी असेल, यात शंका नाही. युद्ध सुरु ठेवावे की थांबवावे याचा निर्णय घ्यायला आपली भारतीय सेना, राजकीय नेतृत्व सक्षम आहे, हेही सांगणे न लगे! देशभरातून विविध राजकीय पक्ष, विचारवंत यांच्याकडून सरकारच्या भूमिकेवर विश्वास व्यक्त केला जात असताना श्री. मिसरी साहेबांवर चिखलफेक केली जाणे, हे शत्रूच्या पथ्यावरच पडेल, याची जाणीव संबंधित मूर्ख लोकांना लवकरात लवकर व्हावी, ही अपेक्षा!
श्री. मिसरी साहेबांविषयी प्रसिद्ध माजी आय. पी. एस. अधिकारी श्रीमती किरण बेदी यांनी काढलेले उद्गार अतिशय नेमके आहेत. श्री. मिसरी हे काश्मीर मधून निर्वासित केल्या गेलेल्या कश्मीरी पंडित समाजातून आले आहेत. अन्यायाच्या राखेतून उठून उभे राहून त्यांनी अधिकार पदास गवसणी घातली आहे… ती अभ्यास, विचार आणि ताठ कण्याच्या बळावर.. विरोध किंवा सूडाच्या भावनेतून नव्हे! ”
बोलणा-यांची तोंडे धरता येत नाहीत, असे निदान मिसरी साहेबांच्या विरोधात केल्या गेलेल्या TROLLING बाबत म्हणून चालणार नाही. एकंदरीतच बेताल लिहिण्या, बोलण्यावर सामाजिक निर्बंध आले पाहिजेत.
श्री. विक्रम मिसरी साहेब यांना शुभेच्छा. असो. याबाबतीत आपण सामान्य लोक प्रत्यक्षात काही करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु किमान काही गोष्टी आपल्याही माहितीत असाव्यात, म्हणून हे एवढे लिहिले आहे. जय हिंद! माहिती आणि छायाचित्र इंटरनेट, वृत्तपत्रे इत्यादी स्रोतांमधून साभार घेतली आहे. जन-मन-हितार्थ जारी.
☆ जेसिका कॉक्स! .. एक असामान्य व्यक्तिमत्त्व! – माहिती संकलक : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
अॅरिझोना प्रांतातील सिएरा व्हीस्टा येथील जेसिका कॉक्स. ही विल्यम आणि इनेज कॉक्स यांची दुसरी मुलगी. वडील निवृत्त बॅन्ड मास्टर आहेत. २ फेब्रुवारी १९८३ रोजी जेव्हा जेसिकाचा जन्म झाला, तेव्हा तिला खांद्यापासुन दोन्ही हात नव्हते. पण जेसिकाचे नशीब बलवत्तर, आई वडील जिद्दीचे निघाले. तेच तिचे दोन्ही हात झाले. विशेष म्हणजे जेसिकाने या नसलेल्या हातामुळेच ‘अशक्य ’हा शब्द तिच्या डिक्शनरीतुन काढून टाकला.
खरे तर आम्ही भारतीय लोकांनी देखिल नशीब, दैव, भविष्य, यांना आयुष्यातुन वजा करायला हवे. जन्मताना भलेही जेसिकात शारीरीक दोष होते, पण मानसिक बळ मात्र जबरदस्त होते. मग तिने ठरवले, हात नाही म्हणून काय झाले, पाय तर आहेत ना. मग पायच तिचे हात झाले.
आई वडिलांना काळजी होती की, आपली मुलगी सर्वसाधारण आयुष्य तरी नीट जगू शकेल की नाही. पण तिने सर्व खोटे ठरवले. सर्व साधारण नाही, तर असाधारण आयुष्य घडवले. अर्थात तिच्या आई बाबानीही तिला कधी ती अपंग आहे याची जाणीव होऊ दिली नाही.
लहानपणी आई तिच्या पायात खेळणी ठेवत असे व लहानगी जेसिका पायाने खेळणी खेळत असे. घरी संगीताचे वातावरण असल्यामुळे, जेसिकाने लहानपणीच नृत्य शिकायला सुरूवात केली. जेव्हा नृत्य सादर करण्याचा पहिला दिवस उगवला, तेव्हा तिने नृत्य शिक्षकेला विनंती केली की, तिला मागच्या रांगेत उभे करा, पण शिक्षकेने सांगितले की, इथे मागची रांग नाही, तुला समोर जाऊनच नृत्य करावे लागेल आणि तिने ते करून दाखविले. समोरच्या रांगेत तिला तिच्या शिक्षिकेने आणून ठेवले, आणि ती रांग मग तिने कधीच सोडली नाही. एवढेच नाही तर पूढे १४ वर्षे तिने आपली नृत्यकला सादर केली.
वडील संगीतकार असल्यामुळे संगीताची आवड तीला उपजतच होती. तिने पायाने पियानो शिकण्यास सुरूवात केली आणि तरबेजही झाली. पियानो वादनाचे अनेक सोलो कार्यक्रम जेसिकाने सादर करून लाखो रसिकांचे लक्ष स्वत:कडे वळवले.
एकदा तिच्या आई वडीलांची जीम कनिंगहॅम नावाच्या तायक्वांदो शिक्षकाशी सहज भेट झाली. व त्याने सांगितले की, जेसिका तायक्वांदो आत्मसात करू शकेल, कारण तिला पायाचा कसा उपयोग करायचा हे चांगले माहित आहे. जीम तिला तायक्वांदो शिकविण्यास तयार झाला आणि त्याचे म्हणणे खरे ठरले. जेसिका कॉक्स ला वयाच्या १४ व्या वर्षी पहिला जगातिक ब्लॅक बेल्ट मिळाला. जेसिका ही हात नसलेली जगातील पहिली ब्लॅक बेल्ट व्यक्ती आहे.
शाळेतील सर्वच कार्यक्रमात ती आग्रहाने भाग घेत असे. पूढे तीने अॅरिझोना विद्यापिठात प्रवेश मिळवला आणि मानसशास्त्र विषयात पदवी मिळवली. हा विषयही तिने मुद्दाम निवडला होता. ती नेहमी म्हणते की, मानसाशास्त्रामुळेच मी शारीरीक अपंगात्वावर मात करू शकले. कॉलेजच्या काळात तिला ‘अमेरिकन तायक्वांदो’ क्लबची माहिती मिळाली आणि ती त्याची सभासद झाली व पुन्हा तायक्वांदोचा अभ्यास सुरू केला. यातुन आणखी एक चांगली गोष्ट घडली, ती म्हणजे तिच्या प्रशिक्षिकाने हात नसलेल्या व्यक्तीसाठी नवीन अभ्यासक्रम तयार केला.
जेसिका कॉक्स आपली कार स्वत:च उत्तम रितीने ड्राईव्ह करू शकते. तिच्यासाठी कार मध्ये कुठलेही फेरबदल केले जात नाहीत. स्वत: कार मध्ये इंधन तीच भरते. पण जेसिकाचे एवढ्यावरच समाधान झाले नाही. कार चालवताना नेहमी समोर बघावे लागते आणि अनेकदा समोर क्षितीज रेषा दिसत असते, या रेषेला आकाश टेकलेले असते.
एक दिवस जेसिकाला या टेकलेल्या आभाळाने खुणविले व मग तिने वर बघायला सुरूवात केली. आता तिचे लक्ष आकाशात भिरभिरणाऱ्या विमानांकडे लागले. उंचावरून जाणाऱ्या विमानांकडे बघताना तिच्या स्वप्नांनाही आपसूक उंची मिळू लागली. असे उंच आकाशात आपल्याला का जाता येणार नाही? या प्रश्नाने मग ती अस्वस्थ होऊ लागली. मला विमान चालवता आले पाहिजे व मी ते शक्य करून दाखवेनच. जिद्दीला कसल्याच सिमारेषा असत नाहीत व कष्टाला शॉर्टकट असत नाही, याची जाणीव तिला पूरेपूर होतीच. कारण तिला आता तिच्या पायावर पूर्ण विश्वास होता, सोबत आत्मविश्वासही ठासून भरलेला होता.
जेसिका कॉक्स तयारीला लागली आणि तिला १० ऑक्टोबर २०१० रोजी पायलटचा परवाना मिळाला. ही ट्रेनींग मुळात सहा महिन्याची असते, मात्र जेसिकाला तीन वर्षे कसून सराव करावा लागला आणि त्यानंर ‘लाईट स्पोर्ट एअरक्राफ्ट’ उडविण्यासाठी ती पात्र ठरली. हे विमान ती १० हजार फूट उंचीवरून उडवण्याची परवानगी होती. पहिल्यांदा तिने जेव्हा विमान चालविले, ते एक एकल एजिंन विमान होते. तिचे आकाशात उडण्याचे स्वप्न जेव्हा पूर्ण झाले, तेव्हा ‘गिनीज बुक’ नेही मग तिची नोंद घेतली. हात नसलेली जगातील पहिली पायलट व्यक्ती म्हणून तिचा गौरव करण्यात आला.
जेसिका कॉक्स ची ही गोष्ट जशी तिच्या स्वत:च्या जिद्दीची आहे, तशीच ती जिद्दी पालकांची देखिल आहे. आई तिला सतत प्रोत्साहन देत असे. सुरूवातीला जेसिकाला कृत्रिम हातही बसविणात आले होते, पण नंतर तिने ते काढून टाकले. आज जशी ती वैमानिक म्हणून ओळखली जाते, तशी एक उत्तम तायक्वांदो, उत्तम स्कुबा डायव्हर म्हणूनही ओळखली जाते. तिच्या कर्तृत्वाने प्रभावित होऊन तिच्यावर Born Without Arms नावाच्या लघुपटाची निर्मिती केली गेली. जेसिका आज जगभर एक मोटीव्हेटीव ऑयकॉन म्हणून प्रवास करते. जगभरातील अपंगासाठी मदत गोळा करत फिरते. या प्रवास दरम्यान जगातील अनेक नामवंत व्यक्क्ती स्वत:हुन तिच्या भेटी घेतात.
सन २०१० मध्ये AOPA Live Pilots Choice Award, तर २०१२ मध्ये जगातिक स्तरावरील Inspiration Award for Women हा पुरस्कार प्राप्त झाला. अमेरिकेतील १०० प्रभावी व्यक्ती मध्ये तिच्या नावाची नोंद करण्यात आली. सर्वसामान्यपणे तरूणी जे काम हाताने करतात, ते सर्व ती आज सहजपणे करते.
जेसिका एकदा फिलिपाईन्स येथे गेली असता, तिची भेट तायक्वांदो फेस्टिव्हल दरम्यान पॅट्रीक चॅम्बर्लिन यांच्याशी झाली. तेथेच दोघांनी आपण लग्न करणार असल्याचे जाहीर केले, आणि सन २०१२ मध्ये लग्न केले. आज जेसिका एक सुखी संपन्न आयुष्य जगत आहे. शरीराने व सर्वार्थाने धडधाकट असलेले अनेक जण जेव्हा रडत असतात, त्यांच्यासाठी जेसिकाची ही विलक्षण कहाणी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. हाताने आकाशाला गवसणी घालणारे तुम्ही बघितले असतील, पण पायाने आकाशाला गवसणी घालणारी जेसिका अपवादात्मक असते.
माहिती संकलक : मिलिंद पंडित, कल्याण.
संग्रहिका : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ कुरूपता.. तिची? की जगाची??? ☆ श्री संभाजी बबन गायके☆
Mary Ann Bevan
नवरा होता तोवर तिला कशाची फिकीर नव्हती. इतकी वर्षे सांभाळलेली परिचारिकेची नोकरी तिला गमवावी लागली होती पण नव-याचा व्यवसाय चार मुलांचे पोट भरण्याइतपत ठीकठाक होता. पण एकदिवशी दैवाने तिचा आणि तिच्या लेकरांचा आधार हिरावून घेतला आणि ती रस्त्यावर आली!
या जगात दिसणं हे जगात असण्यासाठी किती महत्त्वाचं आहे, हे तिला कळून चुकलं होतं… किंवा निसर्गाचं काही तरी चुकलं हे तिला कळालं होतं असं म्हणा हवं तर!
कुणाही चारचौघींसारखा तिचा संसार सुरु होता. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या तिला त्यावेळी लगेचच रोजगार मिळवून देणारी, तिच्या सारख्या नाजूक मुलीला सहज पेलू शकणारी आणि मुख्य म्हणजे तिच्यातल्या मार्दवाला साजेल अशी नोकरी मिळाली… नर्सची नोकरी. दिसायला ती गोड होतीच शिवाय तिचा स्वभाव अतिशय लाघवी. त्यामुळेच एक शेतकरी भला मनुष्य तिच्या प्रेमात पडला आणि त्या दोघांनी मिळून संसार थाटला. तिला आईपणाबद्दल खूप आकर्षण होतं. तिला मुलं हवीहवीशी वाटायची. चार मुलं झाली तिला. आणि नोकरी सांभाळून ती या चारही मुलांकडे अतिशय निगुतीने लक्ष द्यायची. प्रत्येक मुलावर तिचं जीवापाड प्रेम होतं. आणि मुलांसाठी आई नावाचा जीव काहीही म्हणजे काहीही करू शकतो! आणि अगदी तसंच करण्याची वेळ तिच्यावर ओढवली…!
तिचे हात, पाय सुजू लागले, तिच्या अन्य अववयांच्या मानाने मोठे दिसू लागले… आणि चेहरा अनैसर्गिकरीत्या वाढू लागलं… एका सुंदर फूलपाखराचं जणू पुन्हा सुरवंटामध्ये रुपांतर होऊ लागलं होतं. तिच्या दोन्ही डोळ्यांखाली सूज वाढू लागली.. तिथली त्वचा खाली लोंबू लागली…. हनुवटी मोठी होऊ लागली… स्त्रीचं शरीर पुरुषी दिसू लागलं होतं… भयावह स्थिती होती ही. वैद्यकीय परिभाषेत या विकाराला acromegaly असं नाव होतं आणि त्याकाळी या विकारावर उपचार नव्हते फारसे.
मेरी आता असाहाय्य होती. नर्सची नोकरी तिला सोडावी लागली. आणि अन्य कोणत्या नोकरीवर तिला कुणी ठेवून घेईना… जवळची पुंजी तर संपली होती. मुलांची आयुष्ये आता तर कुठे सुरु झाली होती… कसं होणार?
इतरांच्या दु:खावर, व्यंगावर जगणारा समाजाचा एक वर्ग सर्वत्र असतोच. तिच्याही आसपास असे लोक होतेच. कुणीतरी ‘सर्वाधिक कुरूप महिला’ निवडण्यासाठी एक स्पर्धाच आयोजित केली… तिच्यासारख्या सुमारे अडीचशे महिलांनी यात त्यांचे नशीब आजमावले होते…. आणि मेरीने ती स्पर्धा जिंकली! हा विजय नव्हता.. परिस्थितीपुढे तिने स्वीकारलेली शरणागती होती… आपल्या मुलांचं पोट भरण्यासाठी एका मातेला पत्करावा लागलेला हा अत्यंत घृणास्पद पर्याय होता!
यामुळे मेरी काहींच्या नजरेत भरली… त्यांची सर्कस होती… जंगली प्राण्यांची आणि माणसांची सुद्धा. त्यांनी निसर्गाने केलेल्या चुकांचा बाजार मांडला होता.
पाच फूट सात इंच उंचीचं शरीर, १५४ पौंडस वजन आणि ११ साईजचा पाय आणि २५ साईज हात! एक महाकाय कुरूपता… लोकांना बघायला मांडलेली… लोकही ही विचित्र मूर्ती बघायला गर्दी करायचे… सर्कसवाले मग मेरीला आणखीनच विचित्र पोशाख घालायला लावायचे. लोक तिची मनोसोक्त थट्टा करीत… पिंज-यातल्या हिंस्र श्वापदांना लोक सोडत नाहीत… ही तर असहाय्य… अबला… आणि एक आई! कित्येक वर्षे ती शारीरिक आणि मानसिक वेदना सहन करीत राहिली… या विकारामुळे तिच्या दृष्टीवर सुद्धा दुष्परिणाम झाला होता…. त्यामुळे तिला तिच्याकडे बघून हसणारे लोक काहीसे धूसर दिसत होते.. इतकेच!
या विकारावर तिने काही उपचारही घेण्याचा प्रयत्न केला… पण पदरी निराशाच पडली! तिचा कुरूपतेकडून अधिक कुरूपतेकडे जीवघेणा प्रवास सुरूच राहिला.. तो तिच्या वयाच्या एकोणसाठाव्या वर्षापर्यंत म्हणजे १८८० पर्यंत. मृत्यूने तिची सुटका केली!
एका जगप्रसिद्ध संस्थेने २००६ मध्ये एक Birth Day कार्डही बनवून विक्रीस ठेवले होते यात जगातील सर्वाधिक कुरूप महिला म्हणून मेरीचा संदर्भ दिला होता! Netherland मधील एक वैद्यकीय व्यावसायिक लंडनमध्ये सुट्टीसाठी आलेला असताना त्याच्या नजरेस ही भेट (?) कार्ड्स पडली. त्याने या विरोधात तक्रार केली असता, या संस्थेने या कार्ड्सची पुढील छपाई स्थगित केली… मात्र आधीच बाजारात पाठवली गेलेली कार्ड्स परत घेतली नाहीत… व्यवसाय महत्त्वाचा… मग तो एखाद्याच्या मर्मावर घाव घालणार का असेना… मेरीपेक्षा हे जग जास्त कुरूप निघाले!
मेरी निसर्गाने तिच्या शरीराशी केलेल्या विश्वासघाताची बळी ठरली… पण यामुळे मिळालेल्या पैशांतून तिने तिच्या चारही मुलांना दूरच्या ठिकाणी वसतिगृहात ठेवून शिकवले आणि त्यांच्या पायांवर उभे केले… आई मुलांसाठी काहीही करू शकते.. हे Mary Ann Bevan ने सिद्ध केले!
नुकत्याच झालेल्या मातृदिवसानिमित्त आणि आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त मेरीची ही कथा सांगितली. लेकरांसाठी खस्ता खाऊन कष्टाचे डोंगर उपसणा-या सर्व मातांना या निमित्ताने साष्टांग दंडवत… जगातली कोणतीही आई सुंदरच असते…
(लेखासाठी मेरी यांचे त्यांच्या आजारापूर्वीच्या आयुष्यातील एक छायाचित्र वापरले आहे… नंतरचे छायाचित्र हेतुपुरस्सर टाळले आहे.)
श्यामची आई या चित्रपटात काम करणाऱ्या माधव वझे यांचे काल दुःखद निधन झाले आणि श्याम गेल्याचे जाणवले….
श्यामची आई हा चित्रपट आमच्या पिढीसाठी आदर्श वागणुकीचा वस्तूपाठ होता. आयांसाठी श्यामची आई आदर्श होती आणि वागावे कसे यासाठी श्याम. साने गुरुजींनी आपल्या आईच्या सांगितलेल्या आठवणी.. त्याचे ते संकलन म्हणजे संस्कार पुस्तकच आहे. त्या पुस्तकांनी अनेक पिढ्यांवर संस्कार केले किती छोट्या छोट्या प्रसंगातून आई आपल्या मुलावर सहजपणे संस्कार करते याचे उदाहरण प्रत्येक पानावर होते. खंबीर आणि हळवी आई.. काळजी करणारी आई. मुलाचा आधार होणारी आई.. तीच्या कित्येक भूमिकांनी आणि त्यातील संवादाने मूल कसे घडते याचे ते प्रात्यक्षिकच होते. खरं पालकत्वाची जाणीव करून देणार ते पुस्तक त्याच्या इतकं सुंदर पुस्तक नाही…
मुक्या कळ्या तोडणाऱ्या शामला आई किती सुंदर सांगते किती सुंदर समजावते आई “शाम अरे ऊमलाईच्या आधी कुणाला खुडू नये त्याला पूर्ण फुलायचा अधिकार आहे त्याला सुगंध द्यायचा आहे मग आपण का बरं त्याच्या वाटेत यावे” आणखी एका प्रसंगात श्याम आंघोळ करून येतो आणि आई आपला पदर त्याच्यापुढे पसरते आणि या पदरावर पाय ठेवून ये म्हणते कारण श्यामला वाटत असते की आपल्या पायाला धूळ लागू नये आणि आईचे त्यानंतरचे वाक्य आहे, “श्याम पायाला धुळ लागू नये म्हणून जितका जपतोच ना तितक्याच मनाला धुळ लागू नये म्हणून जप बर”. आपले मन मलीन होता कामा नये ते स्वच्छ ठेवले पाहिजे हा एक उत्तम संदेश किती साध्या प्रसंगातून दिला होता….
पोहायला येत नसलेल्या शाम मुलांबरोबर जायला घाबरतोय मुलं धडाधड विहिरीत उड्या मारताहेत पण श्यामच्या अंगात ते बळ नाही तो घाबरून ओरडतोय तेव्हा खुद्द त्याची आई येऊन त्याला पाण्यात ढकलते आणि शिकायला प्रवृत्त करते कारण जीवनामध्ये पोहायला येणं हे खूप गरजेचे आहे हे शामला कळायला हवे यासाठी ती किती कठोर झाली आहे …
श्याम संस्कारक्षम सुंदर शिक्षण घेतलेला शिक्षित मुलगा व्हावा यासाठी आईचे अपार कष्ट… शेजाऱ्याच्या घरी जावून निवडण टिपण दळण कांडण.. प्रचंड कष्ट करणारी ती माऊली… कोकणात शाळेची सोय नसल्यामुळे दूर शहरात शिकायला गेलेल्या श्याम आईची आणि त्याची शेवटी झालेले ताटातूट सगळच कासावीस करणार आहे नात्यांचे सगळे बंध त्याच्यामध्ये अतिशय सुंदर आहेत घरी परतून आलेली विधवा आत्या तिलाही घरामध्ये किती सन्मान आहे आई आत्याच्या मांडीवर डोकं ठेवून उत्तम भजन गाणी ऐकणारे ती भावंड ते सगळच दृश्य मनाला चटका लावून जाते.
…. त्यातील चिंधीचे गाणे तर घराघरात गायले जात होते
“ भरजरी ग पितांबर दिला फाडून.. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण ।।“
पाठच्या बहिणीने, सुभद्रेने सगळे शेले शालू आहेत तर चिंधी कुठून आणू? असा विचार केला. प्रत्यक्ष नारायण जेंव्हा द्रौपदीच्या घरी गेले. तिने झटकन पितांबराची चिंधी फाडली आणि त्याच्या बोटाच्या जखमेला बांधली आणि ती म्हणते कशी… की काळजाचीही चिंधी करून बांधावे इतके ऋण माझेवर या भावाचे आहे आणि याच चिंधीच्या ऋणात राहिलेल्या परमेश्वराने नंतर तिला वस्त्रहरणात वस्त्र पुरवली. कृष्णाची गोष्ट एका गाण्यात किती सुंदर गुंफली आहे. चित्रपटातील ते गाणेही मुलांवर आपल्या धर्माचे, रामायण, महाभारत यांचे संस्कार गोष्टी रुपात करते हे नकळत सांगितले आहे.
– – मध्यंतरी पुण्याला एक गृहस्थ होते. ते श्यामच्या आईच्या प्रती रोज थोड्या तरी विकल्याशिवाय जेवण करत नसत कारण घरोघरी तो संस्कार रुजला जावा एवढीच त्यांची इच्छा होती.
श्यामच्या आईने इतिहास घडवला. चित्रपटाला सुवर्णकमळ प्राप्त झाले. शाळा शाळातून हा चित्रपट दाखवला गेला आणि अनेक पुढच्या पिढ्याना तो चित्रपट सिनेमा घरात दाखवला गेला
दूरदर्शन वर एकदा दुपारी हा चित्रपट दाखवला गेला तेव्हा माझ्या घरात मी माझ्या भाच्याना बळजबरीने बसवले चित्रपट पाहताना माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होते आणि ते सगळे जण मला चक्क काहीतरी वेडपट सारखे रडते आत्या असे म्हणून उठून गेले….
…. त्या दिवशी मला जाणवलं आता श्याम संपला आहे… काल माधव वझे त्यांच्या जाण्याने प्रकर्षाने शामच्या आईची आठवण झाली. त्यातली श्यामची भूमिका अजरामर करून गेले वझे साहेब…
… शाम आता सगळ्याच अर्थाने संपला आहे इतके जाणवले…. माधव वझे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏