मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. २. ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. २. ☆ प्रा.भारती जोगी ☆

दुर्गाबाई दामोदर चाफेकर 

२२ जून… हा दिवस म्हणजे स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील धगधगते पान! त्या पानावरील होमकुंड म्हणजे आपल्या सशस्त्र क्रांतीने पेटविणा-या चाफेकर बंधूंच्या अभिमानास्पद योगदानाचं तेजाळलेलं दर्शन!!

१८९७ मध्ये पसरलेल्या प्लेगच्या साथीमध्ये तपासणीच्या नावाखाली महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्लेग कमिशनर कॅप्टन रॅंड आणि त्याचा सहकारी आयर्स्ट यांच्यावर गोळ्या झाडून केलेला वध! ही घटना इतिहासातील पानावर कोरली गेली. नंतर १८ एप्रिल १८९८ रोजी मोठे बंधू दामोदर चाफेकर यांना फाशीची शिक्षा झाली. स्वातंत्र्य यज्ञात बलिदान दिलेला हा हुतात्मा!!

पण… त्याच होमकुंडात, समिधा म्हणून सतत स्वतः ला समर्पित करत राहिलेल्या… पण साधा नामोल्लेख च काय पण… साधं नाव देखील माहीत नसलेल्या अशा… उपेक्षित आणि अलक्षित स्त्रियांपैकी एक… स्वातंत्र्यवीराची पत्नी… दामोदर चाफेकरांची अर्धांगिनी *दुर्गाबाई*!!

दुर्गाबाई पिंपरी जवळील *मेंढ-याचे तळे* येथील होळकर घराण्यातील! एक हसरी, मिश्किल स्वभावाची मुलगी! गाणेही उत्तम गात असे. सणासमारंभात जमलेल्या नातेवाईकांना एकत्र करून नाच-गाणी करत असे. थोडक्यात काय तर एक हसता-खळाळता, उत्फुल्ल, निर्मळ निर्झर! अतिशय नाजूक अशी बाला! गंमत म्हणजे तिला शीळ देखील वाजवता येत असे.

ही अशी भरभरून जगणारी दुर्गा, १७ व्या वर्षी दामोदर चाफेकर यांच्याशी विवाह संपन्न होऊन चाफेकरांच्या घरात मोठी सून बनून प्रवेशली आणि दुर्गा… दुर्गा *बाई* बनली… आणि बघता-बघता तिच्यातली अल्लड, खेळकर, खुशमिजाज दुर्गा तिच्या बाईपणाच्या कोशात गुरफटून जणू अस्तित्व हीन झाली. दामोदर रावांच्या अगदी विरुद्ध स्वभावाच्या प्रवाहाविरुद्ध न वाहता, त्याच प्रवाहात स्वतः ला पूर्णपणे सामावून घेत, जीवन प्रवाह वाहता ठेवला तिनं!

दामोदर चाफेकरांना फाशी झाली. दुर्गाबाई आणि धोंडीराम नामे त्यांचा पुत्र मागे राहिले. दामोदर चाफेकरांचे, चाफेकर बंधूंचे नाव स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अमर झाले. पण इतिहासात अशा प्राणांची आहुती देऊन अमर झालेल्यांच्या कुटुंबियांचे… पत्नी, मुलांचे काय झाले असेल, हा विचार ही आम्हां आयते स्वातंत्र्य उपभोगणा-यांच्या मनात ही येत नाही, ही खरी शोकांतिका आहे.

रॅंड आणि आयर्स्ट चा खून झाल्यावर ३ महिन्यांच्या आत… दोघांच्याही श्रीमतींना आणि मुलांना स्पेशल, वार्षिक पेन्शन सुरू झाले. ऑन ड्युटी मारले गेले म्हणून खास वाढीव दराने पेन्शन सुरू झाले. पण…

दामोदर चाफेकर… जे… खरं म्हणजे देशासाठी ड्युटी करून फासावर चढले, त्यांच्या पाठीशी घरी राहून ऑन ड्युटी राहूनही, दुर्गाबाई आणि त्यांच्या मुलाला कोणतेही पेन्शन मिळाले नाही. १८९७ मध्ये त्या फक्त १७ वर्षांच्या होत्या. त्यानंतर त्या १९५६ पर्यंत… म्हणजे ६० वर्षे जगल्या. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही त्या ९ वर्षे जगूनही ना त्यांना कोणते पेन्शन मिळाले, ना, पती स्वातंत्र्य सैनिक असल्याचे ताम्रपट मिळाले!

हीच ती खरी खंत! विचार करावा अशी बाब!! शेवटी होमकुंडात किती आणि कोणत्या समिधा जळल्या… कुणी पाहिल्या ना????

*ज्या प्रबला निज भाव बलाने*

*करिती सदने हरिहर भुवने*

*देव -पतिना वाहिनी सुमने*

*पाजुनी केशव वाढविती*

*परी जयांच्या दहनभूमीवर,

नाही चिरा नाही पणती…

* तेथे कर माझे जुळती!!

– लेख क्र. २.

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २५ आणि २६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २५ आणि २६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. २५ – – 

मना वीट मानू नको बोलण्याचा ।

पुढे मागुता राम जोडेल कैचा?

सुखाची घडी लोटता दुःख आहे ।

पुढे सर्व जाईल काही न राहे ।।२५।।

अर्थहे मना, माझ्या या बोलण्याचा—एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगण्याचा—तू कंटाळा मानू नकोस. कारण तसे झाले तर ज्या भगवंतप्राप्तीसाठी तू प्रयत्न करीत आहेस, तो राम तुला कसा प्राप्त होईल? या संसारात सुख-दुःखाचे चक्र अखंड सुरू असते. सुखाचा क्षण संपला की दुःख येतेच. आणि शेवटी ज्याला तू सुख मानतोस तेही नाश पावणारेच आहे—काहीही शाश्वत राहात नाही.

विवेचनया श्लोकात समर्थांची लोककल्याणाची विलक्षण तळमळ पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवते. आपण वारंवार सांगत असलेला उपदेश ऐकून लोकांना कंटाळा येऊ शकतो, याची त्यांना जाणीव आहे. म्हणूनच ते प्रेमाने सांगतात—

माझ्या बोलण्याचा वीट मानू नकोस.

आपल्या व्यवहारातही असेच घडते. कोणी आपल्या हितासाठी एखादी गोष्ट सांगितली, उपदेश केला तर तो आपल्याला लगेच पटत नाही. उलट, आपले भले व्हावे या उद्देशाने स्पष्ट बोलणाऱ्या व्यक्तीपासून आपण दूर राहण्याचा प्रयत्न करतो. अशा व्यक्तीबद्दल अनेकदा नकारात्मक मत तयार केले जाते—

“तो खूप स्पष्टवक्ता आहे”, “तो नेहमी नकारात्मकच बोलतो”, “त्याचे ऐकले तर व्यवहार कसा करायचा? ”

परंतु सत्य हे असे आहे की अप्रिय पण हितकारक बोलणारा माणूस दुर्मिळ असतो, आणि त्याचे ऐकणारा त्याहूनही दुर्मिळ!

संसारात सुख आणि दुःख यांचे चक्र अखंड चालू असते. सुखाचा काळ संपला की दुःख येणारच—ही अटळ गोष्ट आहे. एखादा माणूस मोठ्या पदावर पोहोचतो—आमदार, खासदार किंवा मंत्री होतो. पण त्या सत्तेचा उपयोग लोककल्याणासाठी करण्याऐवजी तो स्वतःच्या स्वार्थासाठी करतो. सत्तेची नशा चढते. परंतु एक दिवस सत्ता जाते, आणि त्याला वास्तवाला सामोरे जावे लागते.

एखाद्या उद्योगपतीचा भरभराटीला आलेला व्यवसाय अचानक तोट्यात जातो. जोपर्यंत सुख आपल्या वाट्याला असते, तोपर्यंत आपण त्यातच रमून जातो. त्या सुखात इतके गुंततो की परमेश्वराची आठवणही होत नाही. आपल्याला वाटते—हे सुख कायम राहील.

परंतु हे सर्व प्रारब्धावर अवलंबून असते. जसे सुख आपल्या कर्मानुसार मिळते, तसेच दुःखही भोगावे लागते. सुख-दुःखाचे हे चक्र, जन्म-मरणाचा हा फेरा—कोणालाही टाळता येत नाही.

म्हणूनच, जर आपल्याला या चक्रातून मुक्त व्हायचे असेल, तर परमेश्वराशी नाते जोडणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी जो कोणी आपल्याला सत्य, श्रेयस्कर आणि हितकारक मार्ग दाखवेल, त्याचे बोलणे कंटाळा न करता ऐकणे गरजेचे आहे.

अर्थात, अशी शिकवण संतच देऊ शकतात. समर्थांसारख्या संतांच्या वचनांमध्ये गूढार्थ, अनुभव आणि करुणा दडलेली असते. त्यांचे प्रत्येक शब्द आपल्याला योग्य दिशेने नेणारे असतात.

खरा साधक कधीच त्यांच्या बोलण्याचा कंटाळा करत नाही; उलट तो त्या मार्गावर निष्ठेने चालत राहतो.

स्वसंवाद :: 

  • माझ्या हितासाठी कोणी सत्य सांगितले तर मी ते खुलेपणाने स्वीकारतो का?
  • सुखाच्या काळात मी परमेश्वराला विसरतो का, की त्याचे स्मरण ठेवतो?
  • सुख-दुःख हे क्षणभंगुर आहे याची जाणीव ठेवून मी जीवनाकडे पाहतो का?
  • संतांचे किंवा हितचिंतकांचे मार्गदर्शन मी मनापासून ऐकतो आणि आचरणात आणतो का?

 – – – – 

श्लोक क्र. २६ – – 

देहे रक्षणाकारणे येत्न केला ।

परी सेवटी काळ घेऊनि गेला ।

करी रे मना भक्ती या राघवाची ।

पुढे अंतरी सोडी चिंता भवाची ।।२६।।

अर्थ : मनुष्य आपल्या देहाचे रक्षण व्हावे म्हणून खूप प्रयत्न करतो, त्याची काळजी घेतो. परंतु शेवटी काळ (मृत्यू) त्याला घेऊन जातोच. म्हणून हे मना, तू राघवाची भक्ती कर आणि मनातील संसाराची (भवाची)चिंता सोडून दे.

विवेचनमागील श्लोकात समर्थांनी सुख-दुःखाच्या चक्राचे वास्तव आपल्यासमोर ठेवले. या श्लोकात त्याच विचाराला पुढे नेत ते देहाभिमानाचे वास्तव आपल्यासमोर मांडतात.

आपण आयुष्यभर देहाच्या रक्षणासाठी झटत असतो. देहबुद्धी इतकी प्रबळ असते की देहसुखालाच आपण खरे सुख मानतो. शरीराला आनंद मिळावा म्हणून माणूस विविध भोग-विलासात रमतो. काही जण तर केवळ खाणे-पिणे आणि मौजमजा हाच जीवनाचा उद्देश समजतात.

पूर्वी चार्वाकांनीही “यावत् जीवेत् सुखं जीवेत्” असा भोगवाद मांडला होता. आज अनेकजण नकळत त्याच विचारसरणीचा स्वीकार करताना दिसतात.

पण येथे समर्थांचा हेतू देहरक्षणाला नाकारण्याचा नाही. देहाची काळजी घेऊ नये असे ते म्हणत नाहीत. उलट, देह ही एक मौल्यवान देणगी आहे.

शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्”. शरीर हेच धर्मसाधनेचे पहिले साधन आहे.

म्हणून देहाची योग्य काळजी घेणे आवश्यकच आहे. निरोगी आयुष्य जगणे, जीवनाचा आनंद घेणे हेही चुकीचे नाही. परंतु याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की हा देह नश्वर आहे आणि एक दिवस तो सोडून जावेच लागणार आहे.

वेदकाळातील ऋषींनीही आपल्या निरोगी दीर्घायुष्याची कामना केली, पण मिळालेल्या त्या आयुष्याचा उपयोग त्यांनी ईश्वरप्राप्तीसाठी आम्ही करणार आहोत असे स्पष्ट सांगितले.

आपल्या जीवनात आपले काहीतरी ध्येय असते. आस्तिक व्यक्ती परमेश्वर प्राप्तीसाठी झटते तर नास्तिक किंवा बुद्धिवादी मंडळी मानवसेवा, समाजसेवा, वैज्ञानिक प्रगती यासारख्या गोष्टींना आपल्या आयुष्याचे ध्येय मानतात. परंतु बरेचदा आपण मात्र ध्येय बाजूला ठेवून देहासाठीच अधिक वेळ खर्च करतो.

माणूस स्वतःच्या देहाबरोबरच संसाराची, घरदाराची, मुलाबाळांची चिंता करीत राहतो. पण प्रारब्धानुसार जे घडायचे ते घडणारच असते. म्हणून समर्थ सांगतात

– – – “करी रे मना भक्ती या राघवाची”

श्रीरामाबद्दल बोलताना समर्थ नेहमी “या राघवाची” भक्ती करावी असे म्हणतात. त्यांचे आराध्य दैवत असलेला श्रीराम जणू त्यांच्यासमोर उभा आहे. त्या राघवाची असे ते कधीही म्हणत नाहीत. समर्थांसाठी श्रीराम हे केवळ तत्त्व नाही, तर सजीव अनुभव आहे. जणू समोर उभा असलेला ईश्वर!

म्हणूनच ते आपल्याला सांगतात की बाबारे, संसाराची चिंता करण्याऐवजी मनाला राघवाच्या स्मरणात गुंतव. एकदा का मन त्याच्याकडे लागले, की मग संसाराची चिंता आपोआप कमी होत जाते. आणि हळूहळू अशी भावना दृढ होते की राम कर्ता आहे, सर्व काही त्याच्याच कृपेने घडते आहे.

अशी श्रद्धा निर्माण झाली की मन हलके होते, चिंता निवळते आणि जीवन अधिक शांत, समाधानी बनते.

स्वसंवाद :: 

  • मी माझ्या देहाची काळजी घेताना त्यालाच अंतिम सत्य मानून चालतो का?
  • जीवनाचे खरे ध्येय लक्षात ठेवून मी देहाचा उपयोग करतो आहे का?
  • संसाराच्या चिंतेत मी इतका गुंततो का की परमेश्वराचे स्मरण विसरतो?
  • माझ्या मनाला राघवाच्या नामस्मरणाची सवय लागली आहे का?

– क्रमशः श्लोक २५ आणि २६

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ”ARE YOU DEAD?” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “ARE YOU DEAD?” ☆ संध्या बेडेकर ☆

काही लोक असे आहेत, जे सकाळी मोबाईल हातात घेतल्यावर आपल्या गृप्समध्ये पहिला मेसेज Good morning चा टाकतात. बरोबर एखाद गुलाबाचे फूल पण पोस्ट करतात. खरतर हा एक अभिवादन करायचा प्रकार आहे.

मी कधी कोणाला Good morning चा मेसेज पाठवत नाही. गुलदस्ता पाठवत नाही. आणि कोणी मेसेज पाठवला तर मी उत्तरही देत नाही. मला हे उगीचच, waste of time, काय गरज आहे या सगळ्याची? अस वाटत. बहुतेक यात माझा उद्धटपणा दिसतो.

काहीच रिसपोन्स मिळत नसल्यामुळेच, पूढे असे मेसेज मला येत नाहीत. कदाचित फारच शिष्ठ आहेत या असा शिक्का पण माझ्या नावावर मारला जात असावा.

वर्तमानपत्रात एक लेख वाचल्यावर या Good Morning msg कडे बघायचा माझा दृष्टिकोन बदलला. आता हा असा मेसेज किती महत्वाचा असू शकतो. हे लक्षात आल. दृष्टिकोन बदलला की विचार बदलतात. हे खरय.

आता एका वेगळ्या अर्थाने Good morning msg पटला.

Are you dead? हा लेख वाचला.

चीनमध्ये हा app वापरणारे बरेच लोक आहेत. आजकाल फॅमिलीच्या नावाखाली जास्तीत जास्त 3 जणांची संख्या असते. त्यातील मुलगा/ मुलगी शिक्षणासाठी, लग्न झाल्यावर दूर गेले की फॅमिलीत फक्त 2 जण उरतात. जसजस वय वाढत तस ज्येष्ठांच्या समस्यांना तोंड देत, एक वेळ अशीही येते की दोघांपैकी फॅमिलीत एकच उरतो.

आधीच्या काळात एका मुलाला वाढवायला आजूबाजूचे अनेक लोक असायचे. घरातच कमित कमि आठ दहा जण असायचे. आता तर हम दो हमारे दो हा हिशोब पण गेलाय, आता एकच.. किंवा मुल नकोच. आता DINK चा जमाना आहे (double income no kids), मग एकटे राहणार्यांचा नंबर वाढणारच. त्यात 996 कल्चर.

9 to9 job, मग इतक काम केल्यावर दोन दिवस आराम, भटकंतीत. 6 days busy. त्यामुळे आजूबाजूला राहणार्या लोकांशी संबंध नाही, भेटीगाठी नाही, बोलण नाही. शेजारी कोण. राहतय? हे सुद्धा खूपदा माहित नसत. social life as such नाहीच.

अशा वेळेस त्यांच्या घरात काय घडलय/ काय घडतय? हे कळायला मार्ग नाही. त्यात privacy च्या नावाने वागण्या बोलण्यात मोकळीक नाही. विदेशी राहणार्या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय, तेही एक मोठ कारण आहेच.

आज single/ एकटे राहणार्यांची संख्या वाढतेय. त्याला कारण अनेक आहेत.

नोकरीमुळे दुसर्या शहरात जाणे, डायव्होर्स झाल्यावर, लग्न करायचे नाही, अशा विचारांचे पण बरेच आहेत. ऑफिस मधून घरी आल्यावर ही conference calls. Work culture अस झालय की आई-वडीलां बरोबरही बोलायला वेळ मिळत नाही. त्यामुळे

एकटेपणा ही समस्या फक्त जेष्ठांचीच आहे अस राहिलेल नाहिये.

 एका समृद्ध घरात एकटी राहणार्या वृद्ध स्री चे प्राण गेले, हे कळल केंव्हा? तर आठवड्याभरानंतर. या दरम्यान कधी कोणी फोन केला, रिंग गेली, फोन उचलला नाही… अस कदाचित झाल असेल. तर बाहेर गेल्या असतील अशी आपली समजूत करून, या बाबतीत कदाचित लक्ष दिल गेल नसेल.. काय नक्की झाल असाव? माहित नाही. पण कळल मात्र आठ दिवसांनी. हे बरोबर आहे का?

Are you dead?

 या app ला CHINA मध्ये छान response मिळाला/ मिळतोय.

एकटे राहणार्यांनी फक्त रोज तेथे एक बटन दाबायचे असते. आणि 

मी आहे

 I am there , I am in

 ही सूचना द्यायची. जर लगातार दोन दिवस हे बटन operate झाल नाही, तर काही problem असावा.

अस लक्षात येईल. त्या app वर registration करताना, काही महत्वाचे, तुमच्या नातेवाईकांचे फोन. नंबर नक्की घेतले असतीलच. त्यानुसार पूढचे काम करण सोप होईल.

मधून मधून वर्तमान पत्रात, TV वर या संदर्भात काही भयानक बातम्या ऐकायला वाचायला मिळतात.

भारतात या app ची गरज आहे का?

आज भारतात 5% लोक एकटे राहतात.

ही संख्या वाढतच चाललीय.

आज तरी या प्रकारचा App भारतात नाही.

या प्रश्नावर काही उपाय आहे का?

मला वाटत

 जर आपला एक गृप असला, मग तो मित्र/मैत्रीणींचा, आपल्या आजूबाजूला राहणार्या लोकांचा, ऑफिस मधला, समवयस्क मैत्रीणींचा, कोणताही असू शकतो.

त्या गृपवर फक्त

Good Morning msg रोज टाकायचाच असा नियम ठरवला तरी हा प्रश्न सुटू शकतो. नाही का?

आज खासकरून जेष्ठांसाठी अनेक संस्था काम करतायेत.

UP मध्ये 112 वर फोन केला तर लगेच मदद मिळते. तर केरळमध्ये एकटेपणा घालवायला Listener parlours.. Manglore मध्ये sathi Shifts आहेत.

एकटे राहणाऱ्यांच्या मनात… मला काही झाल तर लोकांना कळेल का? केंव्हा कळेल? हा प्रश्न भेडसावतोच.

काळजी कमी करण्याच एक रहस्य समजून घ्याव. उगीच कल्पनेत काळजी करत बसण्यापेक्षा काही तरी निर्णय घ्यावा. व्यक्त व्हाव.

जस शरीरात वेदना झाल्या की आपण डोॅक्टरकडे जातो, तसेच मनात काळजी / शंका / भीती असेल तर ती वेळेवर समजून व्यक्त होण आवश्यक आहे.

वेळेवर घेतलेल्या correct decision मुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो.

No need to worries.

म्हणून रोज good morning चा मेसेज गृपमध्ये पाठवणे हा सरळ साधा सोपा उपाय चांगला आहे. सहज करण्यासारखाही आहे.

आयुष्यातील चुका जरी खोडता येत नसल्या तरी दुरुस्त नक्कीच करता येतात.

मी माझी चूक सुधारणार…

आजपासून मी good morning लिहिणार आणि अशा मेसेजला उत्तरही नक्की देणार.

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २३ आणि २४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २३ आणि २४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. २३ – – – 

न बोले मना राघवेवीण काही ।

जनी वाऊगे बोलता सुख नाही ।

घडीने घडी काळ आयुष्य नेतो ।

देहांती तुला कोण सोडू पाहतो ।।२३।।

अर्थ : हे मना, एका राघवाशिवाय म्हणजेच भगवंताच्या नामाशिवाय दुसरे काही बोलू नकोस. तू इतर व्यर्थ बडबड केलीस तर तुला जे पारमार्थिक सुख अपेक्षित आहे ते मिळणार नाही. काळ क्षणाक्षणाला आपले आयुष्य कमी करीत असतो. जर या काळात परमेश्वराचे नामस्मरण करणे राहून गेले, तर अंतकाळी तुला कोणीही वाचवू शकणार नाही.

विवेचनमागील श्लोकात समर्थांनी आपल्या हितासाठी श्रीरामाचे नाव चित्तामध्ये दृढ धारण करावे असा उपदेश केला. या श्लोकात त्याच विचाराचा विस्तार करत ते आपल्या मनाला बजावतात की हे मना, एका रामाशिवाय तू दुसरे काही बोलू नकोस. कारण इतर गोष्टी बोलण्यात खरे सुख नाही. काळ कोणासाठीही थांबत नाही. तो कोणाचाही अपवाद करत नाही. क्षणाक्षणाला तो आपले आयुष्य कमी करीत असतो आणि एक दिवस असा येतो की अंतिम क्षणी तो आपल्यालाही सोडत नाही.

समर्थांना आपल्या कल्याणाची किती तळमळ आहे हे या श्लोकातून जाणवते. आपले जीवन म्हणजे परमेश्वराकडून मिळालेली एक अमूल्य भेट आहे. पण या जीवनामध्ये ज्याने आपल्याला ही सुंदर देणगी दिली त्या परमेश्वरालाच आपण विसरतो आणि निरर्थक बोलण्यात आपले आयुष्य वाया घालवतो.

बोलण्यात आपली मोठी शक्ती खर्च होत असते. अनेकदा बोलण्यामुळे जेवढा शीण येतो, तेवढा एखादे श्रमाचे काम केल्यामुळेही येत नाही. एखादा वक्ता जर दोन-तीन तास सतत बोलत राहिला तर त्याला किती थकवा येतो हे त्यालाच ठाऊक असते. शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना आणि प्राध्यापकांनाही हा अनुभव वारंवार येत असतो.

परंतु समाजात आपण पाहतो की बरीच मंडळी व्यर्थ बोलण्यात वेळ घालवतात. चौकात उभे राहून गप्पा मारणारी तरुणांची टोळकी, कट्ट्यावर बसणारे लोक, कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र जमलेली मंडळी या सगळ्यांच्या चर्चांना कोणताही विषय चालतो. एकदा बोलायला सुरुवात झाली की कोणत्याही विषयावर अखंड बोलत राहणे ही सवय बनते. यात वेळेचा आणि शक्तीचाही अपव्यय होतो.

अति बोलण्याची सवय वृद्धापकाळात त्रासदायक ठरू शकते. अशा वेळी घरातील लोकांनाही ती माणसे नकोशी वाटू लागतात. बोलायला कोणी नसते आणि त्यामुळे मनात निरर्थक दुःख साचत जाते. म्हणून वेळीच सावध होणे आवश्यक आहे. आजच्या काळात टीव्हीवरील चर्चा, भडक बातम्या किंवा निरर्थक वादविवाद यांकडे लक्ष देण्यातही आपला बराच वेळ खर्च होतो. परंतु साधकाच्या दृष्टीने त्यातून फारसे काही निष्पन्न होत नाही.

आपले खरे हीत साधायचे असेल तर भगवंताच्या नामाशिवाय दुसरा मार्ग नाही. त्या नामाला विसरून आपण कितीही इतर गोष्टी बोलत राहिलो, तरी ती व्यर्थ बडबडच ठरते. त्यामुळे खरे सुख मिळत नाही. येथे सुख म्हणजे परमेश्वर प्राप्तीच्या किंवा आत्मसाक्षात्काराच्या दृष्टीने होणारी आपली वाटचाल असे म्हणता येईल.

नाम घेण्याची सवय जर आयुष्यभर अंगवळणी पडली नाही, तर अंतकाळी ते सहजपणे आपल्या मुखात येणार नाही. संतांना माणसाचे कल्याण व्हावे याची प्रचंड तळमळ असते. म्हणूनच संत गोंदवलेकर महाराज देखील आपल्या प्रवचनांमध्ये वारंवार सांगतात की तुम्ही रामनाम घ्या.

समर्थ रामदासांचाही कळकळीचा हाच संदेश आहे. जीवनाचा एकही क्षण व्यर्थ घालवू नका; भगवंताचे नामस्मरण करा.

स्वसंवाद :: 

  • वेळ, शक्ती आणि आयुष्य वाया घालवणाऱ्या व्यर्थ चर्चांपासून मी स्वतःला दूर ठेवू शकतो का?
  • माझ्या दैनंदिन जीवनात भगवंताचे नामस्मरण कितपत आहे?
  • आयुष्याचा प्रत्येक क्षण अमूल्य आहे याची जाणीव ठेवून मी तो अधिक अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करतो का?

– – – – 

श्लोक क्र. २४ – – 

रघूनायकावीण वाया शिणावे ।

जनासारिखे व्यर्थ का वोसणावे ॥

सदा सर्वदा नाम वाचे वसो दे ।

अहंता मनी पापिणी ते नसो दे |२४|

अर्थ: हे मना, एका रामाला सोडून केलेली सगळी कामे व्यर्थ आहेत. भगवंताला विन्मुख झालेल्या सामान्य माणसांप्रमाणे व्यर्थ बडबड (वोसणावे) करू नये. त्या बाष्कळ बडबडी ऐवजी भगवंताचे नाव मुखात असू दे. अहंकार हा अध्यात्मामध्ये फार मोठा शत्रू आहे. त्याला मनात थारा देऊ नकोस.

विवेचन: समर्थांना मानव जातीच्या कल्याणासाठी वाटणारी तळमळ ही एखाद्या मातेसारखी आहे. आपल्या मुलाचे कल्याण व्हावे म्हणून ती त्याला जरी आवडत नसले तरी एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत असते. त्याचप्रमाणे समर्थ मागील श्लोकातीलच गोष्ट या ठिकाणी पुढे विस्तारून सांगतात. आधीच्या श्लोकात मनाला राघवाशिवाय काही बोलू नकोस कारण व्यर्थ बोलण्यामध्ये सुख नाही असे त्यांनी सांगितले आहे. या श्लोकात हीच गोष्ट ते वेगळ्या शब्दात आपल्याला सांगतात.

भगवंताच्या नामामध्ये अपार सामर्थ्य आहे. शिणलेल्या मनाला शक्ती देण्याचे, उभारी देण्याचे सामर्थ्य त्यात आहे. आपण जर खऱ्या सुखाचा शोध घेत असू तर भगवंताच्या नामाइतके सुख कशातच नाही. अन्य सुखे तात्पुरती आहेत आणि अंतिमतः दुःख देणारीच आहेत हेच समर्थ या श्लोकातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आपल्या जिभेवर नेहमी भगवंताचे नाम असावे असे त्यांचे सांगणे आहे.

शब्द किंवा भाषा बोलणे हे माणसाचे वैशिष्ट्य आहे. भाषेच्या माध्यमातून आपण आपले विचार व्यक्त करतो. शब्दांमध्ये किंवा भाषेमध्ये केवढी शक्ती असते हे जेव्हा आपण अधिकारी व्यक्तींच्या साहित्याचे वाचन करतो किंवा त्यांचे बोल ऐकतो तेव्हा लक्षात येते. बोलण्याला वाचाशक्ती असेही आपण म्हणतो. हे सरस्वतीचे वरदान आहे. पण सर्वसामान्य लोक बऱ्याच वेळा वायफळ बोलण्यात ही शक्ती व्यर्थ घालवत असतात.

पण ज्यांना साधना मार्गावर वाटचाल करायची आहे, भगवंत जोडायचा आहे, त्यांना अशी बाष्कळ बडबड करून चालणार नाही. आपल्या वाचेने त्यांनी भगवंताचे नाम घ्यायला हवे तशी सवय करायला हवी. उठत बसता, कार्य करता, सदा घेता देता… भगवंताचे नाम मुखात यायला हवे. मी जर साधक आहे आणि भगवंत प्राप्ती हे माझे ध्येय आहे असे जर आपण मनाशी ठरविले असेल तर जनांमध्ये मिसळताना सामान्य माणसांसारखी बडबड करून मला भागणार नाही. तसे केले तर मी माझ्या वाचेची शक्ती व्यर्थ घालवली असा त्याचा अर्थ होईल.

सुरुवातीला लोक मला नावे ठेवतील. माझी चेष्टा किंवा टिंगलटवाळी करतील पण मला भगवंत प्राप्तीसाठी ती सुद्धा सोसता आली पाहिजे. काही दिवसांनी लोकांना हे लक्षात येईल की ही व्यक्ती आपल्यासारखी नाही. ती साधक आहे. मग ते तुमच्याशी आदराने व्यवहार करतील. समर्थ या सगळ्या परिस्थितीतून गेले आहेत. ही परिस्थिती त्यांनी अनुभवली आहे आणि त्यातूनच त्यांचे हे अनुभवाचे बोल आले आहेत.

समाजात मिसळताना आपल्याला लोकांनी नावे ठेवू नये किंवा आपण कुठे कमी पडू नये म्हणून आपण त्यांच्यासारखे वागण्याचा प्रयत्न करतो. बरेचदा आपण जसे नसतो तसे दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी विद्वान आहे, ज्ञानी आहे मला फार कळते अशा प्रकारचे मुखवटे धारण करतो. हा मुखवटा लोकांना दाखवण्यासाठी जरी असला तरी त्यातूनच अहंकार जन्म पावतो. अहंकार हे पापाचे मूळ आहे. रावणाला स्वतःच्या शक्तीचा, सामर्थ्याचा केवढा अहंकार झाला होता! जगामध्ये माझ्यासारखा कोणी नाही, मला कोणी हरवू शकत नाही हा त्याचा अहंकार त्याचे विनाशाला कारणीभूत ठरला. अहंकारातून अनेक नको असलेल्या गोष्टी घडतात. म्हणून समर्थ अहंतेला पापिणी असे म्हणतात.

म्हणून, हे मना, वाणीमध्ये भगवंताचे नाम ठेव आणि मनातून अहंकार दूर ठेव. यातच तुझे खरे कल्याण आहे.

स्वसंवाद :: 

  • माझ्या बोलण्यात भगवंताचे नाम कितपत आहे आणि व्यर्थ बडबड किती आहे?
  • भगवंताचे नाम घेण्याची सवय मी स्वतःला लावतो आहे का?
  • माझ्या मनात अहंकाराची छटा आहे का? ती ओळखून मी कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे का?

क्रमशः श्लोक २३ आणि २४

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ☆ “वाटेत ‘रॉबिन चॅटर्जी’ आहेत? .. घाला वळसा!”  ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

वाटेत रॉबिन चॅटर्जीआहेत? .. घाला वळसा!” ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

*ये दोनो बेसुरे है*… *कोई दुसरे सिंगर बुलाओ*

 – – – किशोरदा आणि आशाताई बद्दलची सत्यकथा.

केवळ हिंदीच नव्हे तर भारतातील विविध भाषेत गाणी गाऊन अवघ्या भारतीयाच्या मनावर राज्य करणारे दोन गायक म्हणजे किशोर कुमार आणि आशा भोसले! स्वतःच्या हिमतीवर त्यांनी स्वतःचे साम्राज्य उभे केले.

मात्र सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अगदी वाईट अपमान सहन करावे लागले.

त्यातला एक जीवघेणा प्रसंग आज सांगतो.

*

झालं असं की, एका सिनेमाच्या गाण्याचे रेकॉर्डिंग होते त्यासाठी किशोरदा आणि आशा ताईंना बोलावलेलं होतं. गाण्याच्या साउंड रेकॉर्डिगसाठी त्याकाळातले अत्यंत फेमस आणि टॉपचे समजले जाणारे रॉबिन चॅटर्जी होते. आणि हा तो काळ होता जेव्हा किशोरदा आणि आशाताई स्ट्रगल करत होत्या.

त्यात समोर रॉबिन याना पाहून हे दोघेही थोड्या दडपणाखाली आले.

मात्र हिंमत करून दोघांनी माईकसमोर येऊन गायला सुरु केलं.

मुखड्याच्या दोन ओळी गाऊन होत आहेत नाहीत तोवर रॉबिनजी यांनी “स्टॉप” स्टॉप म्हणत रेकॉर्डिंग थांबवलं.

आणि सिनेमाच्या दिग्दर्शक / निर्मात्यांना म्हणाले,

ये कौन लोग लेके आये गाने के लिये? इन्हे तो कुछ भी नही आता… आवाज अच्छी नही है… गाने की आवाज है कहा इनकी? जाओ जाकर गीता को बुलाओ”

*

वरच्या पट्टीतले त्यांचे हे बोलणे ऐकून सगळेच सुन्न झाले. आशाताई अन किशोरदावर काय आभाळ कोसळले असेल… कल्पना करवत नाही.

*

शांतपणे ते दोघे तिथून बाहेर पडले. डोळ्यात गच्च गहिवर आणि हृदयात मात्र अपमानच आगडोंब उसळलेला!

तिथून जवळच महालक्ष्मी स्टेशन होते. तिथं जाऊन रिकाम्या बाकड्यावर ते दोघे बसले.

दोघेही सुन्न… थोड्या वेळाने किशोरदा म्हणाले, “भूक लगी है, कुछ देखता हू”

आणि असं म्हणून ते भल्या मध्यरात्री त्या स्टेशनवर असलेल्या एका स्टॉल वर गेले तिथं बटाटेवडे होते तेही शिळे… तेच घेऊन किशोरदा आले. आणि या दोघांनी शांतपणे ते वडे खाताना किशोरदा म्हणाले, “आशा… हमको निकाल दिया”

त्यावर नेहमीच पॉजिटीव्ह विचार करणाऱ्या आशाताई म्हणाल्या, “नही… दादा… आप की जो आवाज है उसे कोई रोक नही सकता, “

आणि मग शिळा वडा खाऊन… पाणी पिऊन दोघांनी घरची वाट धरली.

*

यानंतर चार वर्षानंतर या दोघांचे अनेक सिनेमे (गाणी) हिट झाली. दोघांचेही नाव झाले. किशोरदा तर गायक प्लस हिरो असे डबल फेमस झाले.

आणि एका सिनेमाच्या गाण्यासाठी पुन्हा हीच जोडी “त्याच” स्टुडिओत एकत्र आली आणि योगायोग पहा… त्याचेही साउंड रेकॉर्डिस्ट तेच रॉबिनदा होते ज्यांनी याना रिजेक्ट केलं होत.

त्यांना तिथे पाहताच किशोरदा आशाताईंना म्हणाले “आशा… वो देखो व्हिलन बैठा है… वो अगर इधर रेकॉर्डिस्ट है तो मै गाना नही गाऊंगा… “

त्यावर आशाताई दादाला म्हणाल्या, “दादा, ऐसे नही करते… आज हमारा नाम है तो क्या हुआ? किसी के पेट पे पैर नही देते.

किशोरदा म्हणाले, तुम्हे याद है… उसने हमारे साथ क्या किया था?

*आशाताई म्हणाल्या, “याद है… लेकिन अपना वख्त खराब था… आज अपना है तो गुरुर किस बात का? “*

*

आणि अशा रीतीने ते गाणे रेकॉर्ड झाले.

गोष्ट इथं संपलीय!

डॉ. डीडी क्लास : एखादा माणूस मोठा का होतो? तर जमलं तर त्याच्या तळपायाकडे पहा… किती भेगाळले असतात अशा लोकांचे पाय… अपमान, उपासमार, अवहेलना… हे सगळे काटे पायात रुतलेले असतात आणि तरी हि मंडळी शांतपणे ते काटे बाजूला ठेवून पुढे चालत असतात. त्या काट्याला भांडत बसत नाहीत की त्याची जिरवण्यासाठी काही करत नाहीत. ते काम नियतीवर सोडावे आपण असं मला वाटत. कारण कर्मा काय अन नियती काय… ज्याचे त्याचे हिशोब चुकते करत असते त्यासाठी आपण आपला वेळ का घालवावा? आपण आपल्या कामात राहून आपल्या कामातूनच जगाला उत्तर द्यावे… हेच जास्त बेस्ट! तसे तुम्हालाही जमावे… (कारण आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे “रॉबिन चॅटर्जी” आलेले असतात.) त्यांना वळसा मारून पुढं जावं! येणारा काळ त्यांना बरोबर उत्तर देतो… रिलॅक्स मंडळी!

©️ डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD : Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor : transcendental-technologies, Asso. with Pune University (SPPU)

5) Mentor : Canadian Asso. for Security and Intelligence Studies – CANADA

6) Mentor : Direct Action International – UK

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ६४ आणि ६५ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ६४ आणि ६५ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

भक्ति सूत्र – ६४

अभिमानदम्भादिकं त्याज्यम् ||६४||

अर्थ : अभिमान म्हणजे गर्व, ढोंग, कपट, यांसारख्या दुर्गुणांचा त्याग करावा.

विवेचन: अभिमान हा भल्याभल्या साधकांना पथभ्रष्ट करतो असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. याची अनेक उदाहरणे आपल्या सर्वांना ठाऊक आहेत. अभिमान आणि स्वाभिमान हे जोडशब्द आहेत. त्यातील सीमारेषा अत्यंत सूक्ष्म आहे. ती नीट समजून घेतली तर मनुष्यात आमूलाग्र बदल घडेल. अभिमान कोणाला नसतो ? , जसा तो श्रीमंताला असतो तसा तो भिकाऱ्याला देखील असतो. समजा एखाद्या भिकाऱ्याला एका घरात भीक मिळाली नाही तर तो लगेच सांगतो, तुमचं शेवटचं घर नाहीए, मी इतरत्रही भीक मागेन. असा अभिमान काय कामाचा ? हिरण्यकश्यपूला मारायला भगवंत नरसिंह अवतारात प्रगट झाले. साक्षात भगवंत समोर असतानाही हिरण्यकश्यपूचे हात नमस्कारासाठी जोडले न जाता ते देवाला मारण्यासाठी शस्त्राकडे गेले. यावरून आपल्याला अभिमान काय ‘चीज’ आहे हे लक्षात येऊ शकते. आपल्या घरात दुधाचे पातेले असते, त्याला आतील बाजूने दुधातील तुपाचा तवंग चिकटलेला असतो. घरातील माताभगिनी त्यात गरम पाणी ओतून ठेवतात म्हणजे तूप पाण्यात विरघळून जाते आणि नंतर ते पातेले घासून स्वच्छ करण्यात येते. इतके करूनही जर ते पातेले नीट घासले गेले नाही आणि त्यात पुन्हा दूध घेतले गेले तर तेही नासतें. मानवी मनाचे असेच आहे. अभिमान मनुष्याच्या मनाला असाच चिकटून असतो. सर्व सद्गुरू मातृहृदयी असतात. ते आपल्या मनाचे पातेले लख्ख व्हावे, आपली देहबुद्धी, आपला अभिमान नष्ट व्हावा म्हणून प्रयत्न करीत असतात. मनुष्याने ह्या नश्वर जगात अलिप्त व्हावे असे त्यांना वाटत असते म्हणून ते अभिमानाचा समूळ नाश करण्याचा प्रेमळ सल्ला साधकाला देतात.

मनुष्याची वाटचाल तीन प्रकारे होत असते. देहाकडून देहाकडे, देहाकडून मनुष्यत्त्वाकडे आणि देहाकडून देवत्वाकडे. यापैकी पहिली वाटचाल आपसूक होत असते. दुसरीसाठी काही प्रयत्न करावे लागतात तर तिसरी स्थिती प्राप्त होण्यासाठी मात्र अनेक आणि अथक प्रयत्नांची गरज असते. श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज यांचे एक वचन आहे, *”मनुष्य म्हणून जन्माला आलेला माणूस, माणूस म्हणून मेला तरी बरा! “* साधक, मुमुक्षु, सिद्ध या तर खूप पुढच्या गोष्टी राहिल्या. श्री महाराज असे का म्हणाले असतील ? यावर चिंतन करताना असे लक्षात आले की दैनंदिन व्यवहार करताना मी दिवसभरात मनुष्य असल्याचे दाखवून देतो, थोडक्यात मी दिवसभर माणसा सारखा वागतो का ? थोडा सूक्ष्म विचार केला तर असे लक्षात येईल, मनुष्य अनेक प्राण्यांसारखा वागत असतो. उदा. स्वार्थासाठी तो मांजरीसारखा लोचट होतो, कुत्र्यासारखा तो लोकांवर भुंकत असतो (डाफरतो! ), कधी तो गरीब गाय, वासरू असतो तर कधी गोगलगाय, तर कधीकधी तो गाढवासारखा सुखदुःखांची ओझी वाहत असतो. थोडक्यात दिवसभरात मनुष्य आपल्या कृतीतून स्वतःमधील ‘अनेक’ प्राण्यांची ओळख स्वतःच स्वत:ला आणि जगाला करून देत असतो. दिवसभरात तो फार कमी वेळ ‘मनुष्य’ म्हणून वागत असतो. श्रीदासबोधातील ‘पढतमूर्ख समास’ सुद्धा अशा लोकांसाठीच लिहिला गेला असावा, असे म्हणायला हा उत्तम आधार आहे. श्रीसमर्थ आपल्याला सांगत आहेत की ‘मनुष्य ते मनुष्य’ प्रवास होण्यासाठी मनुष्याच्या अंगी अतिलीनता असणे अनिवार्य आहे. अतिलीन होणे म्हणजे ‘मी’ चा पूर्णपणे ऱ्हास होणे. आंब्याचे झाड फळांनी डवरले की नकळत झुकते तशी महान मंडळी कायम अतिलीन असतात. स्वतः ‘सद्गुरू’ असूनही श्री गोंदवलेकर महाराज स्वतःला रामाचा ‘दीनदास’ म्हणायचे. समर्थ तर स्वतःला रामदास म्हणायचे. विश्वमाऊली झालेले श्री ज्ञानेश्वर महाराज स्वतःला *”येऱ्हवी तरी मी मुर्खु”* (ज्ञाने. १. ७६) असे संबोधतात.

संत ज्ञानेश्वर म्हणतात, “म्हणौनि थोरपण पर्‍हां सांडिजे । एथ व्युत्पत्ति आघवी विसरिजे । जैं जगा धाकुटें होईजे । तैं जवळीक माझी ॥”

शरणागती खूप महत्वाची आणि अत्यावश्यक आहे. कार्यालयात अधिकाऱ्यांपुढे स्वार्थासाठी लीन (खरेतर हाजीहाजी करणे) आणि भगवंता पुढे लीन होणे यात मूलभूत फरक आहे, तो वाचकांनी नीट समजून घ्यावा. संत जरी असे अतीलीन होऊन वागत असले, सामान्य मनुष्य मात्र तसा नसतो. त्याला जात्याच अहंकार असतो आणि वाढत्या वयागणिक आणि इतर गोष्टींमुळे तो कमी न होता, त्यात सतत वाढ होत असते. म्हणून अहंकार ते लीनता हा प्रवास कठीणच असतो. हा प्रवास करणे म्हणजे मनाला बांध घालणे, मनावर नियंत्रण मिळविणे. मनुष्याकडे व्युत्पत्ती, विद्वता जरूर असावी, पण ती विसरता आली पाहिजे, नव्हे विसरता आलीच पाहिजे. मी म्हणजे कोणी विशेष आहे असे न वाटता आपण जगातील सर्व वस्तुमात्रांसारखेच एक आहोत असे वाटून खऱ्या अर्थाने नम्र होता आले पाहिजे. सद्गुरुंना शरण गेल्याने अंगी लीनता येऊ शकते. साधना करताना आपली सर्व कर्मे जर भगवंतांस किंवा आपल्या सद्गुरूंना अर्पण करता आली तर अंगी लीनता बाणायला अधिक गती येते. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे लिनतेकडील प्रवास साधकाला जमू लागला याचा अर्थ साधकाची प्रगती योग्य गतीने चालू आहे. समर्थांना अपेक्षित असलेली लीनता ही दिखाऊ, नाटकी नक्कीच नसावी. ती सर्वभावें आणि स्वभावतः असावी. सर्वभावें (कोणत्याही भावात) म्हणजे मनापासून स्वीकारलेली लीनता आणि स्वभावे म्हणणे सहजभावाने कोणताही अभिनिवेश न बाळगता. समर्थ काही दुर्गुणांच्या अति नको असे म्हणतात पण लीनतेच्या बाबतीत मात्र अति हवे असे आग्रहाने सांगतात. लीनतेचे वागणे सर्वांना आवडते.

आज ‘चार’ पुस्तके शिकलेला मनुष्य स्वतःला ‘शहाणा’ समजू लागतो आणि स्वतःच्या (काही कारणांमुळे) कमी शिकलेल्या आईबाबांना अडाणी’ समजतो. इतकेच नव्हे तर हाच मनुष्य स्वार्थासाठी अनेक ठिकाणी लाचारी करताना दिसत असतो. म्हणून समर्थ सांगतात की अतिलीनता ही दिखाऊ असू नये तर ती पोटातून असावी, फक्त ओठातून असू नये. कारण दिखाऊपण फार काळ टिकत नाही. एक वचन आहे, *’आपण सर्वांना सर्वकाळी मूर्ख बनवू शकत नाही’*, काही जणांना काही वेळा मूर्ख बनवू शकतो. एकदा का दिखाऊपणाचा मुखवटा उतरला की मग त्या मनुष्याचे आयुष्य विराण बनते. साधन करता करता मनुष्य आपले सर्व कर्म परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो, तेव्हा लीनता त्याच्या अंगी मुरू लागते. मनुष्याच्या अंगी खरी लीनता असेल तर ती संत-सज्जनांना आनंद देते.

या सूत्राचे सार एक ओळीत सांगायचे झाल्यास पुढील प्रमाणे सांगता येईल.

जनीं निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे।

(मनाचे श्लोक 2)

जय जय रघुवीर समर्थ

=============

भक्ति सूत्र – ६५

तदर्पिताखिलाचार: सन् कामक्रोधाभिमानादिकं तस्मिन्नेव करणियम् ||६५||”

अर्थ आपले सर्व आचार, व्यवहार भगवंताला अर्पण करूनही काम, क्रोध, अभिमान इत्यादि विकार उद्भवले तर तेही भगवतांच्या ठिकाणी समर्पित करावे.

विवेचनआपण सध्या नारद भक्ति सूत्रे अभ्यासत आहोत. पारमार्थिक मार्गाने जाताना चूक झाली तर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. तिथे काठावर उत्तीर्ण, गुणाची जोड देऊन उत्तीर्ण, अमक्याचा मुलगा, तमक्याचा मुलगा असे तिथे चालत नाही. हजारो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषी छोट्याश्या कामनेचे बळी ठरून साधनाभ्रष्ट झाल्याची उदाहरणे इतिहासात आढळतात. हे सर्व सांगण्याचे कारण असे की जप करायला सुरुवात केली, नाम घ्यायला सुरुवात केली, एखाद्या सत्संगात अमुक एक साधना ऐकली आणि ती करण्यास सुरुवात केली की मनुष्याला आज आता ताबडतोप अनुभूती हवी असते. अहो, जिथे पदवीधर होण्यासाठी आयुष्याची पंधरा वर्षे खर्च करावी लागतात, तिथे भगवतांची प्राप्ती साधना करून होईल असे म्हणणे किती सयुक्तिक आहे याचा प्रत्येक साधकाने विचार करायला हवा.

मनुष्याची वाटचाल सामान्यपणे तीन प्रकारे होत असते. देहाकडून देहाकडे, देहाकडून मनुष्यत्त्वाकडे आणि देहाकडून देवत्वाकडे. यापैकी पहिली वाटचाल आपसूक होत असते. दुसरीसाठी काही प्रयत्न करावे लागतात तर तिसरी स्थिती प्राप्त होण्यासाठी मात्र अनेक आणि अथक प्रयत्नांची गरज असते. श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज यांचे एक वचन आहे, “मनुष्य म्हणून जन्माला आलेला मनुष्य मनुष्य म्हणून मेला तरी बरा! “

मनुष्याला मनुष्य म्हणून घडण्याच्या मागे अनेक विकार विघ्न आणीत असतात. विकारांचा विचार आपण विस्तृतपणे मागील लेखांत पाहिला आहे. या विकारांवर विजय मिळवणे निव्वळ अवघड आहे. एकतर सध्या विकारांची संख्या हनुमानाच्या शेपटीसारखी वाढत आहे आणि मनुष्याची निश्चयशक्ती मात्र कमकुवत होत आहे, त्यामुळे मनुष्याला खूप कष्ट करण्याची गरज आहे.

यावर एक उपाय नारद महाशय सांगतात, की हे सर्व विकार भगवंताच्या चरणी अर्पण करावेत. त्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे प्रत्येक गोष्ट भगवंताला सांगून करावी. प्रत्येक इच्छा देवाला सांगावी, प्राप्ती झाली तर त्याचा प्रसाद म्हणून स्वीकारावी आणि प्राप्ती झाली नाही तर त्याची इच्छा नाही असे म्हणून ती इच्छा आपल्या मनातून काढून टाकावी. थोडक्यात आपले विकार देवाला अर्पण करावेत. अशी स्थिती अनेक साधकांना अनुभवावी लागते. यातून संतांची देखील सुटका नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात,

“काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठलीं । आवडी धरिली पायांसवें ॥१॥ आतां कोण पाहे मागें परतोनि । गेले हारपोनि देहभाव ॥ध्रु. ॥”

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

 भक्तीसूत्रे – ६४ व ६५ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “याति कुळ माझे गेले हारपोनी!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “याति कुळ माझे गेले हारपोनी!!” ☆ श्री संभाजी बबन गायके

सौरभ सिंह शेखावत – दीपेंद्र सिंग सेंगर

 १७, मराठा लाईट इन्फंट्री मध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झालेले झालेला हा तरणाबांड अधिकारी जीवनात आणखी काहीतरी मोठं करू इच्छित होता. सैनिक झालोच आहोत तर प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंग अनुभवणे गरजेचे आहे! म्हणून जिथं हे सर्व अनुभवयला मिळेल ते दल म्हणजे स्पेशल फोर्स! … आणि सुदैवाने तशी संधी लाभली. कर्नल क्लिमेंट सम्यूएल साहेबांनी परवानगी दिली.

नहान, हिमाचल प्रदेश येथे असलेल्या स्पेशल फोर्सेस ट्रेनिंग स्कूल या प्रशिक्षण केंद्रात सेकंड लेफ्टनंट साहेबांचा आजचा पहिलाच दिवस. प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी आलेले अधिकारी कितीही मोठे असोत… त्यांचे खरे बॉस म्हणजे मैदानावर प्रशिक्षण देणारे एन. सी. ओ. अर्थात नॉन कमिशन्ड ऑफिसर्स… जे शिपाई पदावरून प्रगती करीत करीत, अनुभव गाठीला बांधत बांधत इथवर पोहोचलेले असतात आणि अर्थातच वयाने ज्येष्ठ असतात!

सेकंड लेफ्टनंट साहेब राजस्थानी आणि प्रशिक्षण देणारे एन. सी. ओ. साहेब उस्ताद हवालदार हनुमान राम राजस्थानीच. त्यांनी लेफ्टनंट साहेबांना विचारलं… तुमचं नाव? त्यावर साहेबांनी नाव सांगितलं. लगेच दुसरा प्रश्न आला… ”धर्म, जात? ” खरं तर नावावरून त्या एन. सी. ओ. साहेबांनी लेफ्टनंट साहेबांची जात ओळखली असावी, असं वाटणं साहजिकच होतं… पण तरीही ते विचारत आहेत.. म्हणून साहेबांनी सांगितलं… हिंदू राजपूत!

त्यावर एन. सी. ओ. साहेबांनी म्हटलं… ” ते पाण्याचं डबकं दिसतंय ना.. ते पवित्र पाणी आहे… त्यात एक बुडी मारून पवित्र होऊन या! ” आणि जाताना पळत नाही जायचं… रोलिंग करत म्हणजे जमिनीवर कोलांट्या उड्या मारत जायचं… जा! ”

“कमाल आहे! आल्या आल्या ही शिक्षा? ” साहेबांनी मनातल्या मनात म्हटलं आणि ते त्या डबक्याकडे गेले. काळं, घाण पाणी… त्यात ग्रीस सारखं काहीतरी तरंगते आहे. वास तर भयानक! पण आज्ञा पाळायला तर पाहिजेच… सेकंड. लेफ्टनंट साहेबांनी डुबकी मारली आणि पुन्हा रोलिंग करीत येऊन एन. सी. ओ. साहेबांसमोर सावधान स्थितीत उभे राहिले! एन. सी. ओ. साहेबांनी पुन्हा जात, धर्म विचारला! … या साहेबांना वाटले की आधीच्या वेळी त्यांना नाव, जात नीटसे ऐकू गेले नसावे… त्यांनी पुन्हा सांगितले… सर, मी राजपूत जातीचा आहे!

यावर एन. सी. ओ. साहेबांनी पुन्हा एक डुबकी मारून यायला सांगितले… साहेबांनी पुन्हा तसं केलं.. असं दोन, तीन वेळा झाल्यावर मात्र साहेबांनी मानत विचार केला… आणि सभोवार पाहिलं! प्रशिक्षण केंद्राच्या भिंतीवर लिहिलं होतं… ’कमांडो कंट्री सर्व विथ प्राईड’

आता मात्र त्यांनी बरोबर उत्तर दिलं, ”उस्ताद, माझा धर्म स्पेशल फोर्सेस, माझी जात स्पेशल फोर्सेस! ”

यावर उस्ताद गोड हसले आणि म्हणाले, ”मी म्हटलं होतं ना… ते पाणी पवित्र आहे… डुबक्या मारल्या की आपोआप ज्ञान प्राप्त होतं! ”

उस्ताद पुढं म्हणाले, ”तुमचे सैनिक ज्या जातीचे तीच तुमची जात आणि धर्म. तुम्ही भारतीय सैन्यातील विविध रेजिमेंटस, बटालियन्स मध्ये नेतृत्व करायला जाणार आहात. तुमच्या अखत्यारीत असलेल्या सैनिकांची जी जात असेल, त्यांच्या ज्या पूजा पद्धती असतील, आहार पद्धती असतील, धार्मिक पध्दती असतील… त्याच तुमच्याही असतील. त्यांच्याशी एकरूप झाल्याशिवाय तुम्हांला त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी करून घेता येणारच नाही! ”

एका अनुभवी प्रशिक्षकांनी दिलेली ही शिकवण त्यावेळी सेकंड लेफ्टनंट असलेले सौरभ सिंग शेखावत कधीच विसरले नाहीत! इथे त्यांना आणखी एक शिकवण मिळाली… सोबत्याला कधीही मागे एकटे सोडायचे नाही… भले त्यासाठी प्राणांची आहुती द्यावी लागली तरी बेहत्तर! सैनिक नेहमी जोडीजोडीने कामगिरी करतात. सहकारी जखमी झाला तर त्याला सुरक्षित स्थळी पोहोचवण्याची जबाबदारी साथीदाराचीच असते.

शेखावत साहेब हे सर्व नेतृत्वगुण शिकत शिकत पुढे जात होते. स्पेशल फोर्सेसमधील प्रशिक्षणादरम्यान त्यांची शस्त्रे कायम सज्ज स्थितीमध्ये असतात… म्हणजे फायर करण्यासाठी तयार असतात!

बरेच दिवस उलटून गेले होते… पण शेखावत साहेबांना प्रत्यक्ष शत्रूवर फायर करण्याची संधी काही मिळत नव्हती… आणि ते तर त्याचसाठी स्पेशल फोर्सेसमध्ये आले होते. त्यांचे प्रोबेशन संपले तरी तसं काही घडेना. एकेदिवशी ते आसाम भागातल्या एका रेल्वे स्टेशनजवळ तैनात असतानाच त्यांना त्यांचे सिनिअर ऑफिसर दीपेंद्रसिंग सेंगर साहेबांचा मेसेज आला… आपली टीम घेऊन ताबडतोब मी सांगतो त्या ठिकाणी पोहोचा… मी पुढे निघतो आहे! ”

सेंगर साहेबांना एक पक्की खबर मिळाली होती… ULFA (United Liberation Front of Asom) या सशस्त्र अतिरेकी संघटनेचे आठ-दहा अतिरेकी एका घरात थांबल्याचे आणि लवकरच ते तिथून निसटून जाण्याच्या तयारीत आहेत. सेंगर साहेबांनी ज्या व्यक्तीने ती खबर आणली होती, त्याला ताबडतोब त्यांच्या वाहनात बसवले आणि ते निघाले… जसे होते तसे. म्हणजे त्यावेळी सेंगर साहेब अर्धी विजार, टी-शर्ट आणि पायांत साध्या रबरी स्लीपर्स अशा वेशात होते… पण अतिरेकी पळून जातील म्हणून घाई होती! आणि अतिरेक्यांना संशय येऊ नये म्हणून त्यांनी लष्करी वाहन न घेता एक खाजगी वाहन वापरण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी खबरी माणसाला बजावलं होतं… त्या घराच्या आधी चार पाचशे मीटर्सवर गाडी थांबवायला सांग… आम्ही तिथून पुढे पायी जाऊन कारवाई करू! परंतू तो माणूस इतका गडबडून गेलेला होता की… त्याने सेंगर साहेबांना थेट त्या अतिरेक्यांच्या घरासमोरच नेले! घराच्या अंगणात, खुर्च्यांवर दहा-बारा जण छान चहा-नास्ता करीत बसलेले दिसले. आता एक क्षणही गमावून चालणार नव्हते. सेंगर साहेब वाहनातून तसेच खाली उतरले आणि थेट त्या अतिरेक्यांच्या दिशेने निघाले… त्यांचा वेश पाहून त्या अतिरेक्यांना सुरुवातीला अजिबात संशय आला नाही. सेंगर साहेबांनी खांद्यावर लटकवलेली रायफल झटक्यात काढली आणि गोळीबार सुरु केला. पहा-यावर उभ्या असलेल्या अतिरेक्याला उडवले! आता अतिरेकी सावध झाले… त्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले! अगदी दोन, तीन मीटर्सवरून गोळीबार झाला. अतिरेकी तिथून पळाले…!

शेखावत साहेब सेंगर साहेबांच्या वाहनापासून पाचशे मीटर्सचे अंतर मुद्दाम ठेवून लष्करी वाहनातून चाललेले होते. त्यांनी गोळीबाराचा आवाज ऐकला आणि वाहनाचा वेग वाढवला… तो त्यांच्याच दिशेने सात-आठ अतिरेकी पळत येताना दिसले. आधी समजेना हे लोक स्थानिक गावकरी आहेत की कोण ते! शेखावत साहेबांच्या समवेत असलेल्या जवानांची सुद्धा प्रत्यक्ष शत्रूवर गोळीबार करण्याची ही पहिलीच वेळ होती… शेखावत साहेबांनी ओरडून या जवानांना सावध केले आणि त्या सर्वांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा शत्रूवर गोळ्या झाडल्या!

शेखावत साहेब तिथून घटनास्थळी पोहोचले… सेंगर साहेब रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांच्या पोटातून एके-४७ रायफलच्या सात-आठ गोळ्या आरपार निघून गेलेल्या होत्या… जवळून गोळीबार झाल्याने तसं झालं होतं. स्पेशल फोर्सेसच्या सैनिकांना, अधिका-यांना उच्च दर्जाचे वैद्यकीय प्रशिक्षणही दिले जाते. शेखावत साहेबांनी सेंगर साहेबांवर आवश्यक ते उपचार केले… पुढे त्यांना उपचारांसाठी हलवण्याची सर्व व्यवस्था अगदी त्वरेने केली. आधी चार चाकी वाहन, पुढे लष्कराचे हेलीकॉप्टर असा प्रवास सेंगर साहेबांनी प्रचंड वेदना सहन करीत पूर्ण केला. पंधरा तास शस्त्रक्रिया चालली. इंग्लीश भाषेत To “have guts” means to possess courage, bravery, and determination when facing danger, difficulty, or uncertainty. It signifies having the audacity, grit, or willpower to take risks. अर्थात धोका पत्कारण्यासाठी अंगी धमक असणे. यातील guts या शब्दाचा दुसरा अर्थ आहे… आतडे! सेंगर साहेबांना सेनेचे डॉक्टर gut शब्दाचा श्लेष साधत म्हणाले… ”You have lots of guts… so we cut some it! ” कठीण परिस्थितीत सुद्धा विनोद बुद्धी शाबूत ठेवणारे सैनिक आणि डॉक्टर्स भारतीय सैन्यातच आढळतात! सेंगर साहेबांच्या आतड्याचा मोठा भाग कापून काढण्यात आला. आणि हे आतडे नैसर्गिक शरीरधर्म साधण्यासाठी बाहेर काढून पिशव्यांना जोडण्यात आले!

धर्मनिरपेक्ष भारतीय सैन्याला वंदन. आणि ह्या परंपरा जीवाचे मोल देऊन पाळणा-या सैनिक, अधिका-यांना दंडवत. ज्ञानेश्वर माऊली एका अभंगात म्हणतात… याति कूळ माझे गेले हारपोनि… माजी जात, माझे कूळ मी विसरून गेलो आहे… श्रीरंगावाचून आनु नेणे! अर्थात श्रीरंग श्रीकृष्ण यांच्याशिवाय मला दुसरे काहीही ठाऊक नाही! भारतीय सैनिकांची हीच मनोवृत्ती आहे. त्यामुळेच जातीय, धार्मिक कट्टरतावाद जोपासत भारतावर चालून येणा-या शत्रूला आपले सैनिक भारी पडतात! जय हिंद. जय हिंद की सेना.

© श्री संभाजी बबन गायके.

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘एकलव्य!’ – लेखक : श्री पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – सुलू साबणे जोशी ☆

सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘एकलव्य!’ – लेखक : श्री पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – सुलू साबणे जोशी ☆

तेलगू रंगभूमीवरील श्रेष्ठ गायक-नट रघुरामय्या

*  * 

मला एक प्रसंग आठवतो : पंधरा-वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हैद्राबादला माझ्या एका नाट्यप्रेमी तेलगू मित्राच्या बंगल्याच्या गच्चीवर चांदण्या रात्री गप्पागोष्टींची एक मैफल जमली होती. बहुतेक मंडळी नाटक, गाणे, वाजवणे ह्यांतली होती. तेवढ्यात कुणीतरी मला पेटीवर मराठी नाटकातले एखादे पद वाजवण्याची फर्माइश केली. मी काय वाजवावे ह्या विचारात पट्ट्यांवर बोटांची चाळवाचाळव सुरू केली. मिश्रपिलूच्या अंगाने एकदोन जागा पेटीवर निघाल्या आणि त्या गच्चीच्या कोपऱ्यातून आवाज आला, “अय्योय्यो बालगंधर्वाऽऽ! ” एवढ्यावरच प्रकरण थांबले नाही. एक गोरापान, काळेभोर कुरळे केस असलेला, अंगावर रेशमी झब्बा, पांढरेशुभ्र धोतर नेसलेला देखणा गृहस्थ तिथून उठून सरळ माझ्यापर्यंत चालत आला आणि समोर बसून त्याने चक्क आपले दोन्ही हात माझ्यापुढे केले आणि माझे हात हातात घेऊन स्वतःच्या कपाळाला लावून म्हणाला, “बाबूजीऽऽ यह बालगंधर्वका गाना आपके उंगलीमें आके बैठा है… सत्य वदे बजाना-” ‘सत्य वदे’ हे माझेही आवडते गाणे. मी वाजवायला सुरुवात केली. ‘अश्रुनीर वाहे डोळां’ अशा अवस्थेत तो गृहस्थ समोर बसून कुठे तरी पार हरवल्यासारखा ते ऐकत होता. हे अद्भुत घडताना पाहून आमचे इतर तेलगू मित्रही चकित झाले होते. हा तेलगू रंगभूमीवरचा आणि त्यानंतर शेकडो तेलगू बोलपटांतला *श्रेष्ठ गायक-नट रघुरामय्या. *

– – त्या नंतरची ती मैफिल म्हणजे मी बालगंधर्वांची आठवतील ती गाणी पेटीवर वाजवत होतो, जमतील तशी गात होतो आणि त्यातल्या प्रत्येक गाण्याचे तेलगू भाषेतले रूपांतर बालगंधर्वांच्या गायनाच्या ढंगाने, त्यातल्या गानसौंदर्यातली जागा न् जागा दाखवत रघुरामय्या गात होते. कर्नाटक संगीताचा वापर असलेल्या तेलगू रंगभूमीवर ह्या बालगंधर्वांच्या एकलव्यासारखी विद्या मिळवलेल्या शिष्याने सारी बालगंधर्व गायकी नेऊन असंख्य लोकांची मने जिंकली होती.

पस्तिशी-चाळिशीतला वाटावा असा हा रसरशीत माणूस मला भेटला त्या वेळी सत्तरीत शिरला होता. एक केस पिकला नव्हता. चेहऱ्यावर एक सुरकुती नव्हती. त्यानंतर पुढचे आठ दिवस मला एखाद्या लहान मुलासारखा धरून होता. विषय फक्त बालगंधर्व! बालगंधर्वांसारखाच लहानपणी रंगभूमीवर आला. नवव्या दहाव्या वर्षांपासून गायला लागला. एका नाटक कंपनीवाल्याने ह्याच्या शेतकरी बापाला जमिनीचा लहानसा तुकडा देऊन हा मुलगा विकत घेतला. कंपनीच्या भ्रमंतीत कुठल्याशा गावी नाटकात चांगले काम केल्याबद्दल तिथल्या सावकाराने “हे गाणे गात जा” म्हणून ह्या बालनटाला बालगंधर्वांची रेकॉर्ड दिली‌, ती ‘सत्य वदे’ची. रघुरामय्यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे, “वह यकच प्यालामें सुधाकर जैसा पहिले पियालेमे शराबी बन गया, वैसा येक सत्य वदे’की रेकॉर्डने हमको बालगंधर्वका चरणरज बना दिया. ” रघुरामय्यांचा तो ‘चरणरज’ आजही माझ्या कानात आहे. ह्या रघुरामय्यांना आम्ही बालगंधर्व स्पर्धेची पारितोषिके द्यायला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याला बोलावले होते. त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली तीच मुळी, “हमने बालगंधर्वका उच्छिष्ट खाते खाते जिंदगी बितायी” ह्या वाक्याने. समोर श्रोत्यांत भीमसेन होते, हिराबाई होत्या, वसंतराव देशपांडे होते. गंधर्वप्रेमी रसिकांनी हॉल खचाखच भरला होता. आमच्या आग्रहावरून ह्या तेलगू भाषिक नटाने ‘मूर्तिमंत भीति उभी’ म्हटले. शंभर टक्के बालगंधर्वांचे स्मरण करून देणाऱ्या त्यांच्या गाण्याला सार्‍या सभेने डोळ्यांतून वाहणार्‍या अश्रूंनी दाद दिली. ते एक अद्भुत दृश्य होते. गंधर्व-गायकी त्याच्या रंध्रारंध्रांत भिनली होती. ती त्यांनी आत्मसात केली होती, केवळ भक्तिभावाने.

लेखक : श्री. पु. ल. देशपांडे

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “फक्त एकच खोली कशाला ?” – माहिती संग्राहक : श्री सुधीर गाडगीळ ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “फक्त एकच खोली कशाला ?” – माहिती संग्राहक : श्री सुधीर गाडगीळ ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

डॉ. अशोक जैन आणि त्यांनी उभारलेली शाळा.

“ फक्त एकच खोली कशाला ? “

“ फक्त एकच खोली कशाला ? “ पूर्ण शाळाच बांध!” – आईच्या एका शब्दाखातर लेकाने उभारली तब्बल सात कोटीची शाळा…

राजस्थानातील जालोर जिल्ह्यातील ‘दादाल’ गावातील एका शाळेची सध्या देशभर चर्चा होत आहे. ही शाळा चक्क ‘संसद भवना’ सारखी दिसते! पण या इमारतीपेक्षाही मोठी आहे ती यामागील भावना..

नेमकी गोष्ट काय? या गावातीलच सुपुत्र असलेले डॉ. अशोक जैन हे गेल्या ३१ वर्षांपासून अमेरिकेत डॉक्टर आहेत. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण याच सरकारी शाळेत पूर्ण केले होते. जेव्हा ते गावी आले, तेव्हा शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना विनंती केली की, “शक्य असल्यास मुलांसाठी एक खोली बांधून द्या. “

आईचा तो शब्द आणि पालटलेले चित्र: अशोक जैन यांनी ही गोष्ट आपल्या आईला सांगितली. तेव्हा आईने दिलेला सल्ला ऐतिहासिक ठरला. आई म्हणाली, “एका खोलीने काय होणार? मुलं खूप आहेत, तू पूर्ण शाळाच बांधून दे! “

आईचा शब्द मानून डॉ. अशोक जैन यांनी सुमारे ७ कोटी रुपये खर्च केले. संसदेसारखी दिसणारी भव्य आणि आधुनिक इमारत उभारली. शाळेत सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या.

आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्याची ही पद्धत खरोखरच कौतुकास्पद आहे. ज्या शाळेत शिकून मोठे झाले, त्याच शाळेला आज त्यांनी एक नवं रूप दिलं आहे.

अशा दानशूर सुपुत्राला आणि संस्कार देणाऱ्या मातेला सलाम!

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १८ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १८ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

रविंद्रनाथ टागोरांनी गीतांजलीतील १५ ते १६ कवितांची रचना परमेश्वराला पती, प्रियकर किंवा सखा मानून केलेली दिसते. कांही कवितांत हे नातं उघडपणे मांडलेलं आहे तर कांही कवितांत या भावनेला निसटता स्पर्श केल्याचे जाणवते.

परमेश्वर व भक्त जेव्हा परस्परात एकरूप होऊन जातात तेव्हा ती मधुरा भक्ती असते. त्यांच्यातल्या नात्याला पती-पत्नी, प्रियकर- प्रेयसी असे संबोधले जाऊ लागले. वैदिक काळापासून हिंदू धर्मात तसेच मुस्लिम व ख्रिस्ती धर्मातही अशा प्रकारचे उल्लेख आढळतात.

महर्षी नारदांनी भक्तीचे नऊ प्रकार – नवविधा भक्ती, सांगितली आहे.

१- श्रवण भक्ती: म्हणजे देवाच्या कथा, गुण, महात्म्य श्रद्धेने ऐकणे.

२- कीर्तन भक्ती: म्हणजे देवाची स्तुती भजन व गुणगान गाणे.

३- स्मरणभक्ती: परमेश्वराचे चिंतन करणे व त्याची निरंतर आठवण ठेवून नाम जप करणे.

४- पादसेवन भक्ती: यात देवाची किंवा संतांची चरण सेवा करणे.

५- अर्चना भक्ती: पूजेच्या साहित्याने देवाची बाह्य पूजा, आरती करणे.

६- वंदन भक्ती: देवाला नमस्कार करून प्रार्थना करणे.

७- दास्यभक्ती: देवाचा सेवक म्हणून त्याची तन-मनाने सेवा करणे.

८- सख्य भक्ती: देवाशी मैत्री करणे आणि आपले प्रत्येक कर्म त्याच्यासाठीच आहे याची जाणीव ठेवणे.

९- आत्मनिवेदन भक्ती: स्वतःला देवाच्या चरणी अर्पण करणे. पूर्ण शरणागती पत्करणे. देहाभिमान नष्ट होऊन आत्मा परमात्म्यात विलीन होईल असा प्रयत्न करणे.

आत्मनिवेदनात भगवंतावरील प्रेम, आसक्ती ही सर्वात तीव्र स्वरूपाची आहे. पण ही आसक्ती हे प्रेम मिळवायचे कसे? याचे उत्तर देण्यासाठी ऋषींनी काही अध्यात्मिक वृत्तींची माहिती दिली आहे. अत्युच्च पदापर्यंत जाण्याच्या पायऱ्याच म्हणानात! त्यांनाही भक्ती म्हणतात.

१- शांता भक्ती: यात आनंद- दुःख, यश- अपयश देवाचीच देणगी आहे म्हणून स्वीकारणे. त्यासाठी कोणतीही तक्रार न करणे.

२- सख्य भक्ती: म्हणजे साथीदार व सल्लागार प्रभूच असतो. नेहमी त्याच्या सांगण्यावरूनच भक्ताची कृती होत असते.

३- दास्यभक्ती: स्वतःला देवाचा सेवक मानणे म्हणजेच देवाला आपला स्वामी मानणे.

४- वात्सल्य भक्ती: म्हणजे देवाला आई-वडील मानून, प्रभु चरणाशी स्वतःला जोडणे.

५- मधुरा भक्ती: भक्त व देव यांच्यात अद्वैत निर्माण होणे. ज्याला नाव नाही, रूप नाही, कोणताही गुणधर्म नाही अशा परमतत्वात विलीन होण्याची तळमळ असणे.

वेद, उपनिषदे इत्यादींमधील वाङ्‍मयात ईश्वर व भक्त यांच्यामधील प्रेमसंबंधाच्या वर्णनात दांपत्यप्रेमाचे दाखले दिल्याची उदाहरणे आढळत असली, तरी तेथे ही भक्ती स्पष्टपणे मधुरा भक्तीच्या स्वरूपात आढळत नाही. मात्र गोपींनी कृष्णाची प्रेमस्वरूप भक्ती केली आणि त्यामुळे त्यांचा उध्दार झाला, या भागवतातील विवेचनामुळे मधुरा भक्तीची ही संकल्पना उदयाला आली, असे मानले जाते. या संकल्पनेनुसार भक्तांना ईश्वर प्रेमाच्या प्रचीतीसाठी गोपींप्रमाणे स्त्रीरूप स्वीकारण्याची आवश्यकता वाटू लागली. यामुळे, या प्रकारात भक्त लिंगविपर्यास मानतात. याउलट, ईश्वराला प्रेयसी व स्वत:ला प्रियकर मानून केल्या जाणाऱ्या सूफी साधू वगैरेंच्या भक्तीत असा लिंगविपर्यास मानण्याची आवश्यकता नसते.

कृष्ण हा जगातील एकमेव पुरूष असून, बाकी सर्व जीवात्मे कृष्णाची निसर्गतःच ओढ असलेल्या स्त्रिया आहेत, असा सिध्दांतही त्यासाठी निर्माण करण्यात आला. याचा परिणाम म्हणून पुरूषभक्तांनीदेखील स्त्रीवेष धारण करून भक्ती करावयास सुरवात केली. विरह, मीलन इत्यादींमध्ये स्त्रियांना ज्या विविध अवस्थांचा अनुभव येतो, त्या अवस्थांचा अनुभव पुरूषभक्तही घेऊ लागले. बंगालमधील चैतन्य गौरांग प्रभूंच्या वैष्णव संप्रदायात काही वेळा या गोष्टीचा इतका अतिरेक झाला, की पुरूषभक्ताला तो स्त्री बनल्यामुळे स्त्री प्रमाणे मासिक ऋतुप्राप्ती झाल्याचे मानून त्यानुसार वर्तन करण्याचे प्रकारही आढळू लागले.

मधुरा भक्तीमध्ये असे आगळेपण आढळत असल्यामुळे तिचे मानसशास्त्रीय विश्लेषण करण्याचेही प्रयत्‍न झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मधुरा भक्तीला काही जणांनी विकृती मानले, तर यात आश्चर्य नाही. मधुरा भक्तीमध्ये कामभावनेचे उदात्तीकरण होते, की कामभावनेचे रूपांतर होऊन मधुरा भक्ती ही एक वेगळीच अवस्था बनते, यांसारख्या प्रश्नांची मानसशास्त्रीय चर्चा करण्यात आली आहे. पुरूषभक्ताला स्त्रीवेष धारण करावा असे वाटणे ही विकृती आहे, की आणखी काही वेगळी अवस्था आहे, याचेही विवेचन करण्यात आले आहे.

परंतु एक सत्य मान्य केलेच पाहिजे की, पती-पत्नी, प्रियकर- प्रेयसी या नात्यातील अत्यंतिक उत्कटता, माधुर्य, समर्पण याकडे केवळ भक्तच नाही तर कवीही आकर्षित झाले. तद्वतच टागोरांना देखिल या भावनेचा, मधुरा भक्तीचा आधार काही रचनांसाठी घ्यावासा वाटणे स्वाभाविकच आहे.

—–

☆ गीत: ५२ ☆

THOUGHT I should ask of thee ⎯ but I dared not ⎯ the rose wreath thou hadst on thy neck. Thus I waited for the morning, when thou didst depart, to find a few fragments on the bed. And like a beggar I searched in the dawn only for a stray petal or two.

Ah me, what is it I find? What token left of thy love? It is no flower, no spices, no vase of perfumed water. It is thy mighty sword, flashing as a flame, heavy as a bolt of thunder. The young light of morning comes through the window and spreads itself upon thy bed. The morning bird twitters and asks, “Woman, what hast thou got? ” No, it is no flower, nor spices, nor vase of perfumed water ⎯ it is thy dreadful sword.

I sit and muse in wonder, what gift is this of thine. I can find no place where to hide it. I am ashamed to wear it, frail as I am, and it hurts me when I press it to my bosom. Yet shall I bear in my heart this honour of the burden of pain, this gift of thine.

From now there shall be no fear left for me in this world, and thou shalt be victorious in all my strife. Thou hast left death for my companion and I shall crown him with my life. Thy sword is with me to cut asunder my bonds, and there shall be no fear left for me in the world.

From now I leave off all petty decorations. Lord of my heart, no more shall there be for me waiting and weeping in corners, no more coyness and sweetness of demeanour.

Thou hast given me thy sword for adornment. No more doll’s decorations for me!

—– 

☆ मराठी भावानुवाद : गीत: ५२ ☆


देशील हार गळ्यात रुळणारा?

आठवण म्हणून, तो मोहविणारा

*

वाटलं विचारावं, पण धाडस नाही

कधी येते उषा याचीच वाट पाही

*

अधाशासरखी धावले शेजेकडे

दोन तरी पाकळ्या मिळोत तिकडे 

*

भितीदायक आठवण दिलीस

तुझी पराक्रमी तलवार ठेवलीस

*

सौदामिनी सारखी तळपत होती

नाजूक हातांना या पेलत नव्हती

*

राघू, मैना काय मिळालं म्हणाले

काय सांगू? कुठं लपवू? गोंधळले

*

जड इतकी, कशी हृदयाशी घेईन

वेदनेचं ओझं सन्मानाने मिरवीन

*

आता भिती वाटत नाही कशाची

जगाच्या संघर्षात पाश तोडण्याची

*

भित्री, नाजूक, लाजरी नाही मी आता

माझा साज शृंगार ही तलवारच आता

*

तू घालून दिलेल्या मार्गानेच जाईन

वेदनेचे गीत गात तुलाच आळवीन

*

तूच माझा सखा जिवा-भावाचा

साज चढवेन तुला मम आयुष्याचा

भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—– 

☆ गीत:५३ ☆

BEAUTIFUL is thy wristlet, decked with stars and cunningly wrought in myriad-coloured jewels. But more beautiful to me thy sword with its curve of lightning like the outspread wings of the divine bird of Vishnu, perfectly poised in the angry red light of the sunset.

It quivers like the one last response of life in ecstasy of pain at the final stroke of death;it shines like the pure flame of being burning up earthly sense with one fierce flash.

Beautiful is thy wristlet, decked with starry gems; but thy sword, O lord of thunder, is wrought with uttermost beauty, terrible to behold or to think of.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ५३ ☆

कलात्मक घडवलेलं, अनंत रंगीत रत्नांनी

कंकण तुझे सुंदर, सजवलेले लक्ष ताऱ्यांनी

*

पण त्याहून सुंदर, खड्ग बाकदार, चमकणारे

विष्णुवाहन वैनतेयाच्या पंखापरी पसरणारे

भव्य रूप ते पश्चिमेच्या लालीत तळपणारे

*

शेवटच्या प्रतिसादाला तडफडणाऱ्या देहासारखे

ऐहिक भावना जळताना उडणाऱ्या प्रकाशासारखे 

*

मेघाधिपती, कंकणरूपी जीवना साज रत्नांचा

खड्ग रुपी मृत्यू त्याहून सुंदर, अनामिक भितीचा

*

होशील जर सखा माझा, वाहीन जीवन सजलेलं

खड्ग पेलण्याचं धैर्य दे, मन आहे आसुसलेलं

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ५४ ☆

ASKED nothing from thee; I uttered not my name to thine ear. When thou took’st thy leave I stood silent. I was alone by the well where the shadow of the tree fell aslant, and the women had gone home with their brown earthen pitchers full to the brim. They called me and shouted, “Come with us, the morning is wearing on to noon. ” But I languidly lingered awhile lost in the midst of vague musings.

I heard not thy steps as thou camest. Thine eyes were sad when they fell on me; thy voice was tired as thou spokest low ⎯ “Ah, I am a thirsty traveller. ” I started up from my day-dreams and poured water from my jar on thy joined palms. The leaves rustled overhead; the cuckoo sang from the unseen dark, and perfume of babla flowers came  from the bend of the road.

I stood speechless with shame when my name thou didst ask. Indeed, what had I done for thee to keep me in remembrance? But the memory that I could give water to thee to allay thy thirst will cling to my heart and enfold it in sweetness. The morning hour is late, the bird sings in weary notes, neem leaves rustle overhead and I sit and think and think.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ५४ ☆


तू बोलला नाहीस, मी ही नाही बोलले

स्तब्ध उभी पहात, सारेच अधुरे राहिले

*

घागर घेऊन उभी, जिथे होती तिरपी साऊली

मैत्रिणी म्हणाल्या, ‘चल, दुपार होऊ लागली’

*

तिथेच रेंगाळले, आज कुणी तार हृदयाची छेडली

तू आलास, तुझी चाहूल कां नाही आली?

*

तू उदास होतास, थकला होतास

तहान लागली, पाणी मिळेल कां म्हणालास

*

एकदम जागी झाले मी, दिवा स्वप्नातून

घागरीतलं पाणी प्यालास, तुझ्या ओंजळीतून

*

अन् पानं सळसळली, कोकीळ गाऊ लागला,

काय ही जादू! फुलांनीही गंध पसरला

*

नाव विचारता तू, मी लाजून चूर 

शब्दही नाही फुटला, हीच हुरहूर

*

तुझी तहान भागवली हा दिलासा जिवाला

ही गोड आठवण सदैव आनंद देईल मनाला

*

सूर्य माथ्यावर, कोकिळेचा आवाज थकला

तुझी माझी भेट हा संकेत कसला?

*

मी एकटीच विणते साखळी विचारांची

तूच माझा कान्हा, ओळख शतजन्मांची

– क्रमशः भाग १८..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares