मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कीव… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ कीव… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(“साहेब आम्ही गरिब माणसं. कुठून आणणार एवढे पैशे. मावशींना तर माहितेय आमचा घरचा माणूस धड कामधंदा करत नाही. वाटलं तर घेऊन जातो रिक्षा नाहीतर पत्ते खेळत बसतो. नाहितर दारु पिऊन तमाशे करतो. मीच चारपाच घरची धुणीभांडी करुन संसार चालवते” 

तिनं बोलताबोलता पदर डोळ्यांना लावला.) – इथून पुढे — — 

“असंय पुष्पा की ती सायकल नवीनच आहे. तरीसुध्दा तुला आम्ही निम्म्या किमतीत देतोय. तू गरीब आहे म्हणून किराणा दुकानदार तुला फुकटात किराणा देतो का?गॅसवाला फुकटात सिलिंडर देतो का?नाही ना? मग नवी सायकल फुकटात कशी मिळेल?चल ठिक आहे चार हजारात घेऊन जा. एक हजार अजून कमी केले तुझ्यासाठी ” तिची किंव‌ येऊन मी म्हणालो

“नाही ना साहेब. चार हजार सायकलला दिले तर मी महिना कसा काढू?”

“साॅरी चार हजारापेक्षा कमी नाही होणार. फुकटात तर अजिबातच नाही मिळणार सायकल ” मी निक्षून सांगितलं तशी ती न बोलता निघून गेली. मला थोडं वाईट वाटलं. आपण एवढं कठोर‌ व्हायला नको होतं असं वाटून गेलं. पण पै पैचा हिशोब ठेवून कुटुंबाला वर आणणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला फुकट मागू नये आणि फुकट देऊ नये या स्वभावातून बाहेर येणं शक्य नव्हतं.

असाच महिना निघून गेला. त्या दरम्यान सुरेखानं मला सायकलबद्दल काय विचार केला असं दोनदा विचारलं पण मी तिला बाहेरचं कुणी गिऱ्हाईक आलं तर चार हजारात विकून टाकू पण फुकटात सायकल द्यायची नाही असं निक्षून सांगितलं.

त्यानंतर मी माझ्या काही व्हाॅट्सअप ग्रुपवर ” नवीकोरी गियरची सायकल योग्य किंमत आल्यास विकणे आहे. कृपया संपर्क साधावा ” असा मेसेज टाकला. आसपासच्या सायकल रिपेयरच्या दुकानदारांनाही सायकलबद्दल सांगून आलो. कुणीतरी येऊन सायकल घेऊन जाईल असा मला विश्वास वाटत होता. एकदा काॅलनीत काम करणाऱ्या माळ्याला सांगितल्यावर तो सायकल पहायला आला. पण ती आधुनिक सायकल त्याला नको होती. मागे कॅरियर असलेली साधी पण दणकट सायकल त्याला हवी होती. रात्री काॅलनीत गस्य घालणाऱ्या गुरख्यालाही ती दाखवली पण त्यालाही सामान ने-आण करण्यासाठी उपयुक्त असलेली सायकल हवी होती. मग एका रविवारी ही सायकल रिपेअर करणाऱ्या पंक्चरवाल्याकडे गेलो. त्याला गिऱ्हाईकाबद्ल विचारल्यावर तो म्हणाला ” साहेब मी तुम्हांला त्याच दिवशी सांगितलं होतं की आजकाल ज्यांना डाॅक्टरांनी वजन कमी करायला सांगितलंय ते किंवा सायकलिंगचे शौकीन लोकच सायकल विकत घेतात. आणि असे लोक जुन्या सायकली सहसा घेत नाहीत. तुम्ही तुमच्या ओळखीच्या गरीब माणसाला ती ज्या किंमतीला जाईल त्या किमतीला विकून टाका. नाहितर भंगारमध्ये द्या ” 

मी निराश झालो. मग मी कौस्तुभच्या मित्रांना फोन लावले. सायकलिंग असोसिएशनच्या कुणा सदस्याला सायकल हवी आहे का विचारलं. पण सध्यातरी कुणालाच सायकल नको होती. उलट त्यांनी मला ती सायकल लंडनला कौस्तुभकडे पाठवून द्यायचा सल्ला दिला. पण कौस्तुभलाही तिथं सायकल नको होती. भंगारवाल्याला विचारलं तर तो सातशे रुपये देत होता. अर्थातच मी नकार दिला.

एक दिवस संध्याकाळी सुरेखानं मला विचारलं 

“मग मिळतंय का सायकलला कुणी गिऱ्हाईक?”

“अजूनतरी नाही. पण मिळेल कधी ना कधी ” मी आशेने म्हणालो

“तुम्हीही ना काही पण जिद्दीपणा करता. आणि तोही फक्त चार हजारासाठी. चार हजारात कोणती बिल्डिंग बांधणार आहे आपण?तीन महिने झाले तुमच्या या जिद्दीपणामुळे ती सायकलही धुळ खात पडलीये आणि ती पुष्पाही ताटकळत बसलीये. दर आठवड्याला ती मला सायकलबद्दल विचारते. साहेबांना समजावून सांगा म्हणते. तिला काय उत्तर द्यावं तेच मला समजेनासं झालंय ” सुरेखा चिडून म्हणाली 

” तू मला जिद्दी म्हणतेय पण तुझी पुष्पा किती जिद्दीपणा करतेय हे तुला दिसत नाही. खरी गरजू असती तर थोडी घासाघीस करुन अडिच तीन हजारात सायकल घेऊन गेली असती. पण तिला तर फुकटच पाहिजे आहे ” मी रागावून म्हणालो.

” अहो पण मी म्हणते आपल्याला काय कमी आहे? मुलीचं लग्न होऊन गेलंय. मुलगा लंडनला चांगला कमवतोय. पुण्यातल्या दोन फ्लॅटचं चांगलं भाडं येतंय. तुमचा स्वतःचा तीन लाख पगार आहे. दागदागिने, एफ. डी. भरपूर आहेत. तीन प्लाॅट आहेत. रिटायर झाल्यावर तुम्हाला पेंशनही भरपूर मिळेल. अहो जे इन्कम येतंय त्यातला पाव हिस्सा सुध्दा खर्च होत नाहीये. आपल्या दोघांना मेलं लागतं तरी किती! मग त्या चार हजारासाठी तुम्ही एवढा का जीव काढताय? लोक लाखो रुपयांचं दान करतात. आपण एक साधी जुनी सायकल दान करु शकत नाही? बरं ते दानही काही वाया जाणारं नाही. ते सत्कारणीच लागणार आहे. देऊन टाका ना मेली ती सायकल “

तिचं बोलणं ऐकून मी थंडगार झालो. काय चुकीचं बोलत होती ती? मी उगीचच हटवादीपणा करतोय याची जाणीव मला झाली. तरीपण मला शरणागती पत्करावीशी वाटेना. मी शेवटचं अस्त्र वापरलं

” ठिक आहे तिला म्हणा एक टोकन म्हणून एक हजार दे आणि घेऊन जा सायकल ” 

” अरे रामा! अजूनही हजार रुपयात जीव अटकलाच आहे का? अहो पुष्पाच्या जागी दुसरी बाई असती तर मी काहीच बोलले नसते. पण पुष्पा इमानदार आहे. मुख्य म्हणजे ती खाडे करत नाही, उर्मट बोलत नाही, नखरे करत नाही. कामंही किती छान आहे तिचं. नाहीतर इतर बायका किती त्रास देतात ” 

” बरं बरं. सांग तिला उद्या घेऊन जा ” मी शेवटी पराभव पत्करला. तिच्या चेहऱ्यावर विजयी भाव उमटले 

” हे ऐकून बिचारीला खुप आनंद होईल ” ती हसत म्हणाली.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी ऑफिसातून घरी आलो तेव्हा पोर्चमध्ये सायकल दिसली नाही.

” काय झालं? नेली का सायकल?” मी सुरेखाला विचारलं 

” हो. तिचा मुलगा येऊन घेऊन गेला ” 

” काय म्हंटली पुष्पा? खुश झाली असेल “

” कशाची खुश! खालीपिली साहेबांनी तीन महिने बर्बाद केले म्हणे. अगोदरच दिली असती तर पोराचा पायी जायचा त्रास तरी वाचला असता असं म्हणत होती “

म्हणजे सायकल फुकटात देऊनही मीच अपराधी झालो होतो. बाईने आभार तर मानलेच नव्हते उलट मलाच दोषी ठरवलं होतं.

एक महिन्याने मला दिल्लीला ऑफिस कामानिमित्त एक आठवड्यासाठी जावं लागलं. परत आलो तर सुरेखा सिंकमध्ये भांडी घासत होती.

” काय गं पुष्पा येणार नाहीये का आज?”

” नाही. तिनं आपलं काम सोडलं ” 

” सोडलं? का?”

” का म्हणजे? तिला दुसरीकडे दहा हजार पगाराचं काम मिळालं म्हणून ती तिकडे गेली ” 

” दहा हजार पगार? अशी कोणती नोकरी मिळाली बुवा तिला?” मी आश्चर्याने विचारलं.

” नोकरी नाही. हेच धुणीभांडी, झाडूपोछा आणि दोन्ही वेळेच्या स्वयंपाकाचं काम आहे. मोठा बंगलाआहे म्हणे आणि तीन भावांच्या फॅमिली एकत्र रहातात. कामंही तेवढंच जास्त असणार ” 

मला आठवलं माझा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये एम. ई. केलेला भाचा एका कंपनीत नुकताच लागला होता. त्याला दहा हजारच पगार होता. म्हणजे तिसरी शिकलेली पुष्पा आणि लाखो रुपये खर्च करुन एम. ई. केलेला भाचा समान पातळीत आले होते. मला आजकालच्या शिक्षणातील झालेल्या घसरणीची आणि माझ्या भाचाची चांगलीच किंव आली.

” मग काय तूच धुणीभांडी करणार आहेस का?”

” तुम्हांला तर काय आनंदच होईल मी केलं तर. पैसे वाचतात ना तुमचे! मी लावून घेतलीये दुसरी बाई. उद्यापासून येणार आहे ” 

मला आठवलं आमच्या लग्नाच्या वेळी मी साधा क्लार्क होतो. पगारही कमीच होता. तेव्हा माझी आई आणि सुरेखा दोघी मिळून धुणीभांडी, घराची साफसफाई, स्वयंपाक करायच्या. एवढंच नाही तर पापड, वेफर्स, कुरडया, लोणची, दिवाळीचा फराळ सगळं घरीच व्हायचं. आई गेली तरी अगदी मुलं काॅलेजला जाईपर्यंत हे सुरु होतं. सुरेखा तोपर्यंत अगदी चवळीची शेंग होती. पण घरकामाला आणि अगदी पोळ्या करायलाही बाई यायला लागली तेव्हापासून सुरेखाला चांगलाच आराम मिळू लागला. सोबत तिचं वजनही वाढू लागलं. मग हळूहळू डायबेटिस, बी. पी. , गुडघेदुखी, कंबरदुखी हे आजार तिच्या मागे लागले. मुलीचं लग्न झाल्यानंतर तर ती एकदमच परावलंबी झाली. तिच्या हातच्या भाज्या मला आवडायच्या म्हणून तेवढं सोडून प्रत्येक कामाला तिनं बाई लावून घेतली होती. आणि त्यातली एक जरी बाई कामाला आली नाही तर ती चिडचिड करायची.

— क्रमशः भाग दुसरा 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कीव… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ कीव… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

एका रविवारी मी निवांतपणे पेपर वाचत असतांना सुरेखा बाहेर येऊन मला म्हणाली 

” अहो ती आपली कौस्तुभची सायकल ठेवायची आहे की विकून टाकायची? “

” का? अचानक असं का विचारतेय? ” 

” अहो काही नाही पुष्पा विचारतेय की तुम्ही वापरत नसाल तर मला देता का म्हणून? “

मी विचारात पडलो. कौस्तुभ नोकरीसाठी लंडनला गेल्यापासून ती सायकल खरंतर धुळ खातच पडली होती. पण तिला घेऊन अजून एक वर्षही झालं नव्हतं. कौस्तुभ इथं असतांना त्यानं फार तर तीन महिने ती वापरली असेल. अर्थातच अजून ती नवीकोरीच वाटत होती. त्यामुळे मला ती विकाविशी वाटेना.

” राहू दे अजून. मी वापरेन तिला ” 

” तुम्ही? घरात दोन बाईक आणि एक कार असतांना तुम्ही सायकल वापरणार? ” 

” अगं नेहमीकरिता नाही. अधूनमधून जेव्हा वाटेल, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वापरत जाईन. असंही डाॅक्टरने मला सायकल वापरायला सांगितलंय ” 

” मग तिला काय नाही सांगू? “

” सध्या तरी नाही सांग. कधी वाटलंच विकाविशी तर तसं सांगू तिला ” 

” बरं. सांगते ” 

ही पुष्पा आमच्याकडे सात वर्षांपासून धुण्याभांड्यांचं काम करत होती. सांगितल्याशिवाय ती कधी खाडे करायची नाही. त्यातून कधी जास्तीचे पाहूणे आले तरी जास्त काम पुरतं म्हणून कटकटही करायची नाही त्यामुळे सुरेखा तिच्यावर खुश होती. दिवाळी आली की बोनस म्हणून एक महिन्याचा पगार, साडी, फराळाचे पदार्थ वरुन चहा अशी तिची सरबराई केली जायची. केवळ दिवाळीच नाही तर इतरही वेळेस सुरेखा तिला प्रेमाने जेवू घालायची. मैत्रिणी किंवा शेजारच्या बायका जमल्या की हमखास घरात काम करणाऱ्या बाईचा विषय निघायचा. अशावेळी सुरेखा तोंड भरभरून पुष्पाची स्तुती करायची.

काही कामानिमित्त मी घराबाहेर पडलो तेव्हा पोर्चमध्ये भिंतीला टेकून उभी असलेली सायकल मला दिसली. नऊ हजाराची ती गिअरची सायकल चांगली देखणी होती. कौस्तुभला फिटनेसची आवड असल्यामुळे तो कायम सायकल चालवायचा. जुनी सायकल त्रास देऊ लागली तशी त्यानं जुनी सायकल भंगारमध्ये विकून ही घेतली होती. कौस्तुभसोबत त्याच्या दोन मित्रांनीही अगदी अशीच ह्याच रंगाची सायकल घेतल्यामुळे तिघांनीही आपली सायकल ओळखू यावी यासाठी त्यावर स्वतःच्या नावाचे स्टिकर लावले होते. कौस्तुभनंही K. P. अर्थात कौस्तुभ पालवे असं स्टिकर सायकलच्या मागेपुढे लावलं होतं. या के. पी. वरुन त्याचे मित्र त्याला गमतीनं खुद पसंद म्हणायचे. मात्र कौस्तुभ एकदम मनमिळावू स्वभावाचा सदैव हसतमुख रहाणारा मुलगा होता. ही सायकल पाहिली की मला कौस्तुभची तिव्रतेने आठवण यायची. त्यानं लंडन सोडून ताबडतोब इथं निघून यावं असं वाटू लागायचं. अर्थात तो जेव्हा लंडनला जायला निघाला तेव्हा मलाच आनंदासोबत त्याचा खुप अभिमान वाटला होता.

१५-२० दिवस उलटल्यानंतर परत एकदा सुरेखानं सायकलचा विषय काढला. या दिवसात मी एकदाही सायकल वापरली नव्हती. खरंतर सकाळी ऑफिसला जातांना घाई असायची म्हणून आणि परतल्यावर थकून गेल्यामुळे माझी सायकल वापरायची इच्छाच व्हायची नाही. अशीही गेल्या २०-२५वर्षांपासून मी सायकलच चालवली नव्हती. अर्थातच सायकल चालवण्याचा मुहूर्त काही निघत नव्हता. सुरेखानं विचारल्यावर मी अजून एखादा महिना गेल्यावर सायकलचा विचार करु असं तिला सांगितलं. सकाळचा माॅर्निंग वाॅक सोडून सायकल चालवावी या विचाराने एक दिवस मी निघालो. सायकल छानपैकी पुसून घेतली. पण खाली पाहतो तर सायकलचं पुढचं चाक बसलेलं. त्यातली हवा कमी झाली की ते पंक्चर झालंय हे कळायला मार्ग नव्हता. एवढ्या सकाळी पंक्चरची दुकानं उघडत नसल्याने मी सायकल पोर्चमध्येच ठेवून वाॅकला गेलो. त्या रविवारी बाहेरगावी जावं लागल्याने सायकल रिपेअर होऊ शकली नाही. एके दिवशी संध्याकाळी जेवायला बसलो असतांना सुरेखानं परत विषय काढला.

” का हो दिड महिना उलटून गेला तुम्ही सायकलला हात लावलेला नाही. मला नाही वाटत तुम्ही कधी सायकल चालवाल. मग उगीच कशाला त्या बिचाऱ्या पुष्पाला ताटकळत ठेवताय. देऊन टाका ना तिला. तिच्या मुलाला काॅलेजला जायला हवीये. बिचाऱ्याला इतक्या दूर पायी जावं लागतंय असं सांगत होती ” 

मी विचारात पडलो. सुरेखाचं म्हणणं योग्यच होतं. एकतर गेल्या अनेक वर्षांपासून मी सायकल चालवलेली नव्हती. दुसरं ती चालवण्यात मला इंटरेस्टच नव्हता. पडूनपडून खराब होण्यापेक्षा ती विकून टाकलेली बरी असा मी निर्णय घेतला.

” ठिक आहे. सांगून दे तिला सात हजार देऊन घेऊन जा म्हणून “

” सात हजार? ती गरीब बाई काय देईल सात हजार “

” अगं सायकल एकदम नवीन आहे. कौस्तुभनं ती जास्तीत जास्त तीन महिने वापरली असेल. आताशी ८-९ महिने झालेत तिला घेऊन. नऊ हजाराची घेतली होती आपण. सात हजार तर मिळायलाच पाहिजे तिचे. तू तिला सांगून तर बघ. नाही म्हंटली तर सहा हजारात देऊन टाकू “

” बरं सांगून पहाते “

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी आल्यावर मी तिला पुष्पा काय म्हणाली ते विचारलं

” ती नाही म्हणतेय “

” मग किती देणार म्हणतेय ती? “

” ती म्हणते अशीच पैसे न घेता देऊन टाका. गरीबाला दान केलं तर काय बिघडतं? असंही म्हणे तुम्हांला काय कमी आहे? बंगला आहे, दोन फटफट्या आहे, एक चारचाकी आहे. साहेबांना दोन लाख रुपये पगार आहे. सहासात हजारांनी तुम्हांला काय फरक पडणार आहे? असं म्हणत होती “

” वा गं! भलतीच शहाणी दिसतेय तुझी पुष्पा. आणि मला दोन लाख रुपये पगार आहे असं तिला कुणी सांगितलं? “

” मी एकदा तिला म्हणाले होते. तरी तिला कमीच सांगितला. तीन लाख नाही सांगितला “

” तरीच ती इतकी वटवट करतेय. अजिबात फुकट नाही द्यायची सायकल. आपली काय दोन नंबरची कमाई आहे? आम्हीही खुप गरीबी पाहिलीये. उपाशी

पोटी दिवस काढलेत. दहा वर्षाचा होतो तेव्हापासून कष्टाची कामं करतोय. पण कधी कुणाकडे हात पसरले नाहीत की कुणाला असं तिच्यासारखं काही फुकट मागितलं नाही. स्वाभिमानाने जगलो आणि कष्ट करुन इतक्या वर पोहचलोय. पैशांची किंमत आहे म्हंटलं अजून आम्हांला. आपण विकत घ्यायचं आणि ह्यांना फुकट द्यायचं ही कोणती पद्धत? ” 

मी चिडून म्हणालो तशी सुरेखा वरमली. मुकाट्यानं आपली काम करत राहिली. मीच शांत होऊन म्हणालो.

” तिला म्हणा. तुझ्यासाठी दोन हजार अजून कमी करतो. पाच हजारात घेऊन जा सायकल ” 

सुरेखा काहीच बोलली नाही. माझा निर्णय तिला आवडलेला दिसला नाही पण मी त्यावर ठाम होतो.

त्या रविवारी मी पंक्चरच्या दुकानात जाऊन सायकलमध्ये हवा भरली. तिला ऑईलिंग, ग्रिसिंग करुन चकाचक केली. थोडी चालवूनही पाहिली. मस्त चालत होती. पण तेवढ्या चालवण्यानेही माझा श्वास चांगलाच फुलला. पोटऱ्यात पेटके आले. आपल्याकडून आता सायकल चालवणं होणार नाही या निष्कर्षाप्रत मी आलो. पंक्चरवाल्याला सायकल विक्रीबद्दल विचारलं तर तो म्हणाला 

” साहेब सध्या फक्त ज्यांना ढेऱ्या कमी करायच्या असतात ते किंवा जे शौकीन आहे तेच सायकल विकत घेतात. तरी पण मी विचारुन बघतो. कितीपर्यंत द्याल? “

” नऊ हजाराची सायकल आहे. पाच हजारात देऊन टाकू “

तो हसला

” पाच हजारात कुणी घेणार नाही साहेब. दोन हजारांपर्यंत जाईल “

” अरे फक्त आठनऊ महिने झालेत घेऊन. कमीत कमी चार हजार तरी आले पाहिजे ना. तू तर बघतोच आहेस की सायकल अगदी नवीन आहे ” 

” बरं बघतो ” म्हणून तो बाईकचं पंक्चर जोडू लागला.

मी घरी आलो तर सुरेखा म्हणाली

” ती पुष्पा तुमच्याशी बोलायचं म्हणतेय ” 

” बरं पाठव “

” पण तिच्याशी चिडून बोलू नका. नाहितर काम सोडून जायची ती. तुम्हांला काय माहित नवीन बाई मिळवायला आम्हांला किती त्रास होतो ते ” 

आजकाल या बायकांनी या कामवाल्यांना फारच शेफारुन ठेवलंय. कामवाली काम सोडून जाईल या भितीने त्या सदोदित त्यांची वरवर करत असतात.

” ठिक आहे. पाठव तर खरं तिला ” 

पुष्पा समोरच्या दारातून आली

” नमस्कार साहेब. साहेब ती सायकल देऊन टाका ना. पोराले कालीजात जायला लई तरास होतोय बगा ” 

” मी कुठे नाही म्हणतोय. पाच हजार दे आणि घेऊन जा सायकल ” 

ती ओशाळवाणं हसून म्हणाली 

” साहेब आम्ही गरिब माणसं. कुठून आणणार एवढे पैशे. मावशींना तर माहितेय आमचा घरचा माणूस धड कामधंदा करत नाही. वाटलं तर घेऊन जातो रिक्षा नाहीतर पत्ते खेळत बसतो. नाहितर दारु पिऊन तमाशे करतो. मीच चारपाच घरची धुणीभांडी करुन संसार चालवते ” 

तिनं बोलताबोलता पदर डोळ्यांना लावला.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जिंदगी जीने के लिए… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ जिंदगी जीने के लिए… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“आयुष्यात दोन शक्ती महत्त्वाच्या •••• एक सहन शक्ती व दुसरी समज शक्ती ” •••

 काल बऱ्याच दिवसांनी अनघा घरी म्हणजे माहेरी आली. लग्न झाल्यावर पहिले वर्ष सणवार म्हणून तिचे येणे होत असे. पण आता घरी सासू सासरे, एक छोटं बाळ, म्हणजे घरात तीन लहान मुले. यांना सांभाळण्यात तिचा वेळ कसा जातो?? ते तिलाही कळत नाही. त्यातच आता सासरे आजारी आहेत, म्हंटल तर अजून काम वाढलेले आहे. अजय तिला खूप मदत करतो. आई बाबांची जबाबदारी जणू त्यानेच घेतली आहे. त्यांचे औषधपाणी बघणे, डॉक्टर ची visit त्यानंतर ब्लड टेस्ट, इतर टेस्टसाठी त्यांना नेणे -आणणे. तो खूप शांतपणे करत असतो. अनघाही त्याला साथ देते. •••

येवढ्यातच बाबा आजारी पडल्यापासून, तो आई बाबांना आपल्या घरी रहायला घेऊन आला. आतापर्यंत आई बाबा स्वतंत्रपणे अगदी आरामात रहात असत. बाबा सर्व काम स्वतः करत असत. कोणावर अवलंबून नव्हते. पण आता आजारपणामुळे नाईलाजाने त्यांना येथे येणे भाग पडले. मनातून त्यांना हे आवडत नव्हतेच. पण काय करणार?? म्हातारपण म्हणजे अनेक न आवडणाऱ्या गोष्टी करायला भाग पाडणारा आयुष्याचा काळ. •••• 

येथे आल्यावर सर्व व्यवस्थित सुरू झालं. पण बाबा सारखी चिडचिड करत असत. अनघाला कळतच नव्हत की आम्ही कुठे कमी पडतोय? कधी कधी अजयचे पण बाबांबरोबर खटके उडू लागले. आई शांत असायच्या. पण बाबा मात्र लहान सहान गोष्टींवरून चिडत असतं. ••••

एकदा त्यांचे औषध दोन तीन दुकानात शोधून ही मिळाले नाही. अजयच्या मिटिंगची वेळ झाल्यामुळे, संध्याकाळी जाऊन पुन्हा बघतो, असा विचार करून अजय औषध न घेता घरी परत आला. ••••

” माझं औषध मुद्दामच आणल नाही. असं कसं औषधं मिळालं नाही?? सर्व औषध मिळतात फक्त हेच मिळाल नाही. ” असं म्हणून बाबा खूप रागावले व जेवले नाही. तसेच झोपले. त्यांच्या अशा वागण्याने घरातील वातावरण खराब झाले. ••••

दुपारी चहा घेताना आई अनघाला म्हणाल्या, ••• “अगं! ! आजाराने ते त्रस्त झाले आहेत. त्यांना परावलंबन आवडत नाही. म्हणून असे वागतायेत. तुम्ही दोघे खरंच खूप लक्ष देत आहात. अनघा तू समजून घे बाबांना. “•••••

थोड्या वेळाने अनघाच्या कानावर सहजच आई बाबांचे बोलणे पडले. बाबा आईंना म्हणत होते, ••• “ही मुलं आपल्याकडे लक्ष देत नाही. आपण त्यांना जड झालो आहोत. बघ आज औषध आणल नाही. तेंव्हा आपण आपल्या घरी जाऊ. ” आईंनी त्यांच्या म्हणण्याला ••• ” हो का?? तुम्हाला असं वाटतं का?? बरं, आपण जाऊया घरी म्हणून दुजोरा दिला. “••••

अनघाला वाईट वाटले आत्ता तर आई काही वेगळंच बोलत होत्या आणि आत्ता काही वेगळंच. •••••

आज अनघाने आपल्या आई बाबांना बोलताना हे सर्व सांगितले. व रडू लागली. अजून काय करावं?? अशी अपेक्षा आहे त्यांची?? मला कळतच नाही. ••••

अनघाची आई म्हणाली, •••

अग! ! तुझा थोडा गैरसमज झालाय.

थोडा विचार कर. पूर्ण आयुष्य स्वतंत्र पणे जगणाऱ्या माणसाला या परावलंबी परिस्थिती शी जुळवून घेता येत नाहीये. त्यात म्हातारपण, आजारपणामुळे त्यांच्या मनात असंख्य विचार येत असावेत. नेहमी एक्टीव्ह राहणाऱ्या माणसाला पलंगावर पडून राहणे जड जातंय. आपल्यामुळे इतरांना होणारा त्रास त्यांच्या स्वाभिमानी स्वभावाला ते पटत नाही. त्यातच मुलांच्या होणारा खर्चाची काळजीही वाटत असावी. आणि आजींचे म्हणशील तर त्यांचेही वय झालंय. व या उतार ‌वयात बाबांना सांभाळण्याचे काम करायचे आहे. त्यांची होणारी सतत चिडचिड आईंनाच झेलायची आहे. उगीच वाद नको म्हणून परिस्थितीला सांभाळायला त्या तसं म्हणतात. तू समजते तसा अर्थ नाही. म्हणजे तू त्याचा तसा अर्थ काढू नको. अग! म्हातारपण म्हणजे बालपणच लहान मुलांसारख. कधी कधी त्यांच्या हो मधे हो मिसळावे लागते. थोड्यावेळाने ते ती गोष्ट विसरून जातात. तसंच काहीसं आहे हे. •••••

आयुष्यभर समजदारीने वागणारा माणूसही म्हातारपणी कसा वागेल??? सांगता येत नाही. तुला आठवतंय ना आपले आजोबा कसे करायचे?? आयुष्यभर प्रत्येक पाहुण्याची सरबराई करणारे, भरपूर खाऊपिऊ घालणारे आजोबा, शेवटी फार विचित्र वागत होते. जेवताना त्यांच्या जवळ कोणी गेले की माझे जेवण हा घेईल या भीतीने ते रागवत असत. ••••

अनघा हे सर्व विचार मनातून काढून टाक. तू आणि अजय छान काम करत आहात. जास्त काम पडतंय तुला हे मान्य आहे. पण आपल्या माणसांची काळजी घेणे हे आपलेच काम असते ना. सध्या दुसरी इतर कामे करू नको. स्वतः कडेही लक्ष दे. गरज असल्यास स्वयंपाक करायला एखाद्या मावशी मिळतात का बघ. वेळ पडली तर एजेंन्सी मधून बाबांसाठी एखादा सहायक मदतीला ठेव. •••

आईच्या बोलण्याने अनघाच्या मनातले अनावश्यक, तिला मानसिक त्रास देणारे विचारांची दिशा बदलली. तिला आई चे म्हणणे पटले. ••••

बाबा शांतपणे ऐकत होते. म्हणाले, •••• अगं! ! आई बरोबर सांगतेय. हे बघ हे सर्व आम्ही दूर बसून तुला सांगतोय. पण त्या situation मधे जो असतो, तेंव्हा तुमची मानसिक परिस्थिती वेगळी असते. पण शांत रहायचे. हे लक्षात ठेव. ••••

विचारांची दिशा बदलली, व अनघा शांत झाली. तुम्ही संभ्रमात असताना योग्य मार्गदर्शन मिळाले की प्रश्न सूटतात. •••

अनघाच्या आई बाबांनी आपली जबाबदारी छान पार पाडली. मुलांचे केवळ कौतुक न करता, चूका सुद्धा लक्षात आणून देणे, त्यांचे कर्तव्य व जबाबदारी त्यांना समजावून सांगणे, योग्य मार्गदर्शन करणे, ही जबाबदारी आई वडिलांचीच असते. •••

म्हणताना ना, ••••

” रिश्तों की कद्र करनी हो, तो 

वक्त रहते कर लिजिए जनाब 

बाद में सूखे पेड़ों को पानी देकर

हरियाली की उम्मीद करना बेकार हैं।”•••

म्हणतात ना, •••

“जिंदगी जीने के लिए दो शक्तियों की जरूरत होती है एक सहन शक्ती और दूसरी समझ शक्ती”।••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “भागीआजी…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “भागीआजी…” ☆ श्री मंगेश मधुकर

फॅमिली ग्रुपवर रात्री साडे-अकराला चंदूचा मेसेज “भागीआजी सीरियस, हॉस्पिटलमध्ये एडमिट केलंय”लगेच ग्रुपवर विचारपूस सुरू झाली.

भागीरथी उर्फ भागीआजी, वयाची सत्तरी पार केलेली, काही वर्षांपूर्वी नवरा गेला. मूलबाळ नाही. सगळी मावस-चुलत भाचे मंडळी हाच भागीआजीचा गोतावळा. गावाकडे भल्या मोठ्या घरात लाडक्या मोत्यासोबत एकटी रहायची. चंदू सोडला तर दिवसेंदिवस कोणी भेटीला यायचं नाही. भाचे, इतर नातेवाईक लग्न कार्यात भेटायचे. कधीतरी फक्त फोनवर बोलणं व्हायचं. वयामुळं आजीला त्रास सुरू झालेले. एकदोनदा हॉस्पिटलवारी झाली तेव्हा भाचे-पुतणे आवर्जून भेटून गेले. तेव्हापासून फोनवर विचारपूस वाढली. भागीआजीला खूप आनंद झाला पण मनात शंकेची पाल चुकचुकली. ही काळजी आपली की इस्टेटीची असा विचार मनात आला. आतापर्यंत दुर्लक्ष केलं आणि आता अचानक इतकी काळजी? आपण लाडके कसे झालो याचचं आजीला आश्चर्य वाटत होतं. वास्तविक भागीआजीचा एकमेव आधार म्हणजे चंदू. जो दररोज फोन करायचा आणि जमेल तसं तर भेटायला यायचा. चंदू ना नात्याच्या ना गोत्याचा. त्याच्या घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण सोडावं लागणार होतं तेव्हा भागीआजीनं मदत केली. शिक्षण पूर्ण करून चंदूनं तालुक्याच्या बॅंकेत नोकरी मिळवली. तिथंच सेटल झाला पण भागीआजीला विसरला नाही.

दुसऱ्या दिवशी भागीआजीला भेटायला सगळा गोतावळा आला.

“नक्की काय झालयं. ”

“तब्येत फार खराब झालीयं”

“वय झालयं. आता असे प्रॉब्लेम्स येणारच. ”

“सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेत मग नक्की प्रॉब्लेम काय?? ”

“डॉक्टर काय म्हणाले. ”

“आजीची शुद्ध का हरपलीय. काहीच बोलत का नाही”

…   अशी पाठोपाठच्या प्रश्नांना चंदू उत्तरं देत होता. भेटीची औपचारिकता पार पाडून प्रत्येकानं काढता पाय घेतला.

“काळजी करू नकोस. म्हातारपण आहे थोडा वेळ लागेल पण आजी ठणठणीत होईल. नक्कीच बरी होईल. चल येतो. शुद्धीवर आल्यावर आजीला मी भेटायला आलो होतो हे तिला नक्की सांग आणि काही लागलं तर बिनधास्त फोन कर. पैसे आहेत ना. ” 

…. हेच चंदूला प्रत्येकानं सांगितलं. रूममधून बाहेर आल्यावर सर्वांचं बोलणं एकदम बदललं…..  

“यावेळेस कन्फर्म दिसतंय”

“फार फार तर अजून दोन तीन दिवस काढेल. ”

“म्हणजे परत सुट्टी काढून यायला लागेल”

“आयला, वैतागच आहे”

“काही सांगता येत नाही. ”

“हो ना. म्हातारी फार काटक ये. ”

“हा ते पण खरंय. इतकी वर्षे एकटी राहतिये. डेरिंग लागतं ”

“तिच्यानंतर गावांकडचं घर आणि दोन एकर जमीन कोणाच्या नशिबी???? ”

“म्हातारीची इच्छा”

“कोणाला म्हणून काय विचारता. त्या चंद्यालाच मिळेल”

“मग आपण काय xx मारायला आलोय का”

“बरे गप्प बसू. लांबचे असलो तरी रक्ताचे नातलग आहोत. तो चंद्याच परका आहे. गरज पडली तर कोर्टात जाऊ. ”

“या सगळ्या नंतरच्या गोष्टी झाल्या. आधी आजीच्या मनात काय आहे ते कळू द्या”

“पण एक गोष्ट मान्य करा. चंदूनं आजीची खूप काळजी घेतली आणि अजूनही घेतोय. ”

“बरंच आहे की. आपल्या डोक्याला ताप नाही. ”

“आणि तसंही फार कळवळा आला असेल तर तूही चंदूला जॉइन कर. ”

“नको. जे चाललयं ते ठीकयं”

पुरुषांची चर्चा सुरू असताना महिलामंडळी आजीला भेटायला गेल्यावर चंदू बाहेर आला… 

“ए बघ गं. आहेत की..  ” एकजण म्हणाली तेव्हा खी खी करत सगळ्या हसल्या.

“हळू हळू. कुणी ऐकलं तर वाट लागेल. ”

“आजीची परिस्थिती पाहून जे वाटलं ते तर बोलले. ”

“हो गं. काहीच हालचाल नाही..  ही म्हणते तसंच वाटतं”

पुन्हा एकदा खी खी झालं…

“दोन दिवस झाले हीच कंडिशन आहे. ”

“म्हातारीच्या मागे इस्टेट कोणाला?? ”

“मृत्यूपत्र केलं असेल ना”

“असल्या गोष्टींविषयी तिला काय माहीत असणार”

“एक सांगते. म्हातारीच्या नावावर जे काही आहे ते विकून समान वाटणी करायची”

“मान्य. सगळं आपल्यालाच मिळणारयं. उगीच त्यावरून भाडंणं नकोत. थोडे दिवस थांबा. ”

… तितक्यात चंदू आल्यानं लगेच सगळ्यांनी टोन बदलला. काहीजणींचे डोळे भरले तर दोघी रडायलाच लागल्या.

“काही लागलं तर हक्कानं सांग. फोन कर. ”

…. तोंडदेखलं बोलून सगळ्या रूमबाहेर आल्यावर चटकन नॉर्मल मोडवर आल्या. भागीआजीला भेटायला आलेल्यांनी कोरडी सहानुभूती दाखवण्यापलीकडं काहीही केलं नाही. फक्त चंदू आणि त्याची बायको दोघांनी हॉस्पिटल सोडलेलं नव्हतं.

— 

रात्री चंदूचा पुन्हा मेसेज “भागीआजी…….   ”

“कधी, किती वाजता, आता पुढचं कसं करायचं, इथंच की गावाकडे”

…. लगेचच ग्रुपवर विचारणा सुरू झाली. पाचेक मिनिटांनी ग्रुपवर चंदूनं व्हिडिओ पोस्ट केला. त्यात हॉस्पिटलच्या बेडवर मांडी घालून बसलेल्या भागीआजीला पाहून सर्वांना धक्का बसला. कोपरापासून हात जोडत आजीनं बोलायला सुरवात केली….

“ए सरडयांनो, मी चांगली धडधाकट आहे. इतक्या लवकर जात नाही. तुमची नाटकी काळजी दिसली. बोललेलं समद ऐकलं, वा रे वा काय एकेकाची भाषा. इस्टेटी साठी खोटं वागता. समदे लबाड लांडगे. मागं आजारी पडले. एकदम तुमी लोक भेटायला आला. तवाच डाउट आला. म्हणून तुमचे खरे रंग बगण्यासाठीच हे नाटक केलं. यात बिचाऱ्या चंद्याचे हाल झाले..  पण तुमचं पुतनामावशीसारखं प्रेम, नकली काळजी समजली. साळत गेली नाई पण दुनियेनं लई शिकवलं. आता समदं इसरा. दान करीन पण तुमाला देणार नाही..  बजावून ठेवते. आणि आता परत तोंडं दाखवू नगा. नाहीतर….   ” 

…. हातातल्या चाकूने भागीआजीनं सफरचंदाचा तुकडा मोडला आणि व्हिडीओ बंद झाला.

काही वेळातच चंदू फॅमिली ग्रुपमधून बाहेर पडला…

…. त्यानंतर ग्रुपवर फक्त एकच विषय होता – – ‘ भागीआजी ‘.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कस्तुरी… – भाग – २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?  जीवनरंग ?

☆ कस्तुरी… – भाग – २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(आई क्षणभर भयकंपित झाली अन् तिने हवेतच देवाला हात जोडले. ” स्वामी माझ्या कस्तुरीचं रक्षण कर.”) इथून पुढे – – 

पण कस्तुरी उमलत होती. फुलत होती. शाळेतही ती शिक्षकांची खूप आवडती झाली होती. तिची शैक्षणिक प्रगती विलक्षण होती. पण परीक्षेत तिला वेळेत पेपर पुरा करता यायचा नाही हा मात्र समजून घेण्याचा भाग होता. मात्र तिला आता मित्र -मैत्रिणी ही मिळू लागल्या होत्या.

 एका स्नेहसंमेलनात तिने तिची एक कविता सादर केली.

*

चांदणझूल पांघरते 

राउळाच्या कळसावरती

 गाभारीचा तम सारतो 

पेटलेल्या सांजवाती 

*

तिच्या आवाजात थरथर, काहीसा घोगरेपणा होता पण अंतरीच्या गाभ्यातून सुंदर शब्दांची झालेली उधळण लोकांना स्तब्ध करून गेली. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि त्या दिवसापासून कस्तुरीला एक सूर गवसला जगण्यासाठीचा. तिच्या अंतरीच्या गाभ्यातला सुगंध नकळत तिलाच गंधित करून गेला.

तिला जन्मतःच प्राप्त झालेल्या शारीरिक असंतुलनामुळे तिला पूर्णपणे सर्वसाधारण जीवन जगता येत नव्हते. कधीकधी ती संवादातही कमी पडायची. कधी तिला भोवताली घडणाऱ्या अनेक घटनांचा अर्थ लावता यायचा नाही पण घटनेतली कुरूपता, विकृती कुठेतरी आतल्या मनात तिला जाणवायची आणि तिच्या चिडण्यातून, रागवण्यातून, कधीकधी तर अनावर झालेल्या क्रोधातून ते प्रत्यक्षपणे व्यक्त व्हायचं. अशा प्रत्येक क्षणी तिची आई मात्र तिच्याजवळ कायम असायची पण कधीकधी हेच क्षण तिच्या मनात कविता फुलवायचे आणि त्यात ती झपाटल्यासारखी मग्न व्हायची.

दुर्दैवाने, ईश्वराने तिच्यावर आघात करणं सोडलं नाही. आत्ता कुठे तिला जीवन जगणं जाणवू लागलं होतं. काहीतरी गवसलं होतं. खूप काही नसण्यामधलं असणं सापडत होतं. तोच एका दुर्दैवी अपघातात तिच्या आई-वडिलांचं – दोघांचही प्राणोत्क्रमण झालं. अवाढव्य जगात ती केवळ एकटी. अनेक अभावांचं आयुष्य घेऊन अंधार डोहात उभी. जंगलात हरवलेल्या हरिणी सारखीच तिची अवस्था झाली.

तिच्या आई-वडिलांशी संबंधित असलेल्या एका स्वयंसेवी संस्थेने तिला नंतर मिशनरी सेवा केंद्रात दाखल केले. आई-वडिलांच्या मागे त्यांच्या मालमत्तेची ती एकमेव वारस होती. त्या संपत्तीचा तिच्या विकासासाठी ट्रस्ट केला गेला. बाकी तिचे सारे भवितव्य एका अज्ञात शक्तीवरच सोपवले गेले.

कितीतरी दिवस ती इथल्या इमारतींच्या भींतीकडे, छताकडे निस्तेज नजरेने पहात राहायची. मी कोण? मी इथे का? असे प्रश्न तिला पडायचे. बालपणी कार्टून फिल्ममध्ये पाहिलेली “पळणारी हरिणी” तिला स्वप्नात दिसायची. ती भयभीत व्हायची, किंचाळून जागी व्हायची, रडायची.

सिस्टर मोना तिची काळजीवाहू..  एक केअरटेकर होती. तिने मात्र तिला आईसारखे प्रेम दिले. ती शांत झाल्यावर सिस्टर मोना तिला म्हणायची, “तुझं नाव कस्तुरी आहे ना? तुला माहीत आहे कस्तुरी म्हणजे काय? एक विशिष्ट जातीचे, वेगळेच आणि विरळा हरीण असते. कुठेतरी हिमालयात क्वचित कुणाला बघायला मिळत असेल. त्याच्या पोटाखाली असलेल्या नाभीत चिकट द्रव्यरूप स्वरूपात सुगंधी काहीतरी पाझरत असते. त्या सुगंधी द्रव्यास कस्तुरी म्हणतात. त्या हरणाला सुद्धा ते माहीत नसतं. तोही त्या वासामुळे बेचैन होऊन हा गंध कुठून येतो हे शोधण्यासाठी इकडे तिकडे पळत असतो पण त्याला कळतच नाही की सुगंध त्याच्यापाशीच आहे. तशीच तू आहेस कस्तुरी! तुझे आहे तुझ्यापाशीच. ”

हळूहळू कस्तुरीची ऊर्जा प्रेरित होत होती. केंद्रात अनेक लहान थोर माणसं होती. अपंग, अनाथ, मनोरुग्ण! मतिमंद अॅबनॉर्मल. जीवनातल्या एका भयाण कुरूपतेला ती न्याहळत होती. पाहता पाहता तिच्यातल्या अबोल अदृश्य जाणिवा उजळत होत्या. ती त्यांच्यातलीच एक होती पण तिच्यात एक गंधकोष होता. सुगंधित. तो गंधस्पर्श तिला जाणवत होता. एक शक्ती होती तिची.

केंद्रातल्या अनेक माणसांच्यातले स्थित अंश तिच्यात वाहणाऱ्या प्रवाहाशी जुळायचे त्यामुळे ती त्या सर्वांशीच एक सुंदर नाते प्रस्थापित करू शकली. जणू काही ते तिचं राज्य होतं आणि त्या राज्याची ती राणी होती. कोणी रडलं, कोणी हसलं..  सगळ्यांच्या भावभावनात ती सहजपणे सामील व्हायची. पटकन डोळ्यातून ओघळणारे कोणाचे अश्रू पुसून त्याला अशाच मजेशीर कवितांतून हसवायची.

वारा वारा गरा गरा सो सो सुम

ढोल्या ढोल्या ढगात ढूम ढूम ढूम 

सगळेच हसायचे. टाळ्या वाजवायचे आणि समोर असलेल्या फाटक्या जीवनाला झोळीत घालून जगण्याचा सोहळा करायचे. लहान थोरांसाठी कस्तुरी म्हणजे खरोखरच त्या केंद्रातला एक आनंदाचा झराच बनला. खरं म्हणजे इथूनच तिच्या प्रतिभेला अनंत धुमारे फुटले. तिच्या लेखणीतून तिचं हास्य, कारुण्य, अश्रू, एकाकीपणा, मनातली स्पंदनं, घुसमट शब्दांमधून वाहू लागली. तिच्या कवितांचं जगच निराळं होतं. अंतर्मनाचा ठाव घेणारं होतं. तिच्या कवितांना सहजच प्रसिद्धी मिळू लागली. “कवयित्री कस्तुरी” म्हणून तिची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. तिने तिच्या असाध्य नैसर्गिक अभावांवर जणू काही मात केली. जगण्यातला क्षण नि क्षण आनंदात बुडवून टाकला.

एक दिवस तिच्या “लावण्यागंधा” या कवितासंग्रहाला राष्ट्रीय वाङमय परिषदेचा मोठा पुरस्कार जाहीर झाला. रोख दहा लाख, शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र. या तिच्या यशोदीप सोहळ्यात मिशनरी सेवा केंद्रातील सर्वच उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या हातून पुरस्कार स्वीकारण्यासाठी जेव्हा ती व्यासपीठावर आली तेव्हा टाळ्यांचा गजर झाला. कवितेतून दिसणारी कस्तुरी आज तिच्या शारीरिक अपंगत्वात पाहताना इतर जनसागर थक्क झाला. तिच्या स्वरयंत्रातून अनियमितपणे ओघळणारे ते शब्दांचे लावण्य ऐकताना अनेकांचे डोळे पाणावले.

ती म्हणाली, ” मी लहान असताना आई मला कस्तुरीमृगाची गोष्ट सांगायची आणि नंतर म्हणायची प्रत्येक माणूस व्यक्ती या कस्तुरीमृगासारखीच असते. प्रत्येकापाशी एक निसर्गदत्त सुगंध असतो फक्त तो जाणून घ्यावा लागतो. समाजाने मला समजून घेतले. मी समाजाची ऋणी आहे. मला मिळालेली पुरस्काराची रक्कम मी आमच्या केंद्राला देते जेणेकरून माझ्यासारख्या अनेकांना घडवण्यासाठी त्यांना बळ मिळावं. सगळ्यांना प्रणाम! धन्यवाद! ”

प्रेक्षागृहात कमालीची शांतता होती. नंतर निवेदिकेनेच तिला संबोधित करत म्हटलं, “कस्तुरी आज तू तुझ्या नावाला सार्थ केलंस. तू स्वतःच लावण्यगंधा आहेस आणि तुझ्या अंतरातल्या या सुवासाने आम्हा सर्वांनाच सुवासिक केलेस! देव तुला उदंड आयुष्य देवो! तुझा गंध स्त्रोत सदैव असाच दरवळत राहो! ” 

– समाप्त –

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कस्तुरी… – भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?  जीवनरंग ?

☆ कस्तुरी… – भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

जेव्हा ती जन्माला आली तेव्हा खरं म्हणजे तिचं जन्माक्षर हे काहीतरी वेगळंच होतं. क हे नव्हतंच पण तरीही तिच्या आईने तिचे नाव “कस्तुरी”च ठेवले. देवानं मला हिच्या रूपात एक  कस्तुरीमृगच भेट दिलाय. स्वतःशीच एक सुगंध बाळगणारा! माझंही  बाळ असंच आहे. ही माझी “कस्तुरीच” आहे.” तिच्या या बोलण्याने आजूबाजूच्या लोकांना म्हणजेच तिच्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना नेमके काय वाटले असेल कोण जाणे पण पाळण्यात झोपलेले एक गोंडस, गुलाबी, गोरंपान बाळ पाहून कुठेतरी सारेच हळहळले असावेत हे नक्कीच. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकाच अर्थाची भावाक्षरे होती. “कसं होणार हिचं? भविष्यात हिच्यासाठी कुणास ठाऊक  काय काय वाढून ठेवलं असेल ?”

कस्तुरी ही जन्मापासूनच “सेरेब्रल पाल्सी”(CP) नावाच्या न्यूरोलॉजिकल असंतुलनाची शिकार होती.  वेळेच्या आधी तिचा जन्म होताना किंवा गर्भातच मेंदूला पुरेसा प्राणवायू न मिळाल्यामुळे ती अशा अवस्थेत जन्माला आली. तिच्या जन्मानंतर दहा-बारा दिवसांनीच डॉक्टरांनी “सेरीब्रल पाल्सी” हे तिच्या बाबतीतलं निदान तिच्या आई-बाबांना सांगितलं. त्यानंतर ते असंही म्हणाले,” याचे परिणाम कितपत गंभीर असतील हे आत्ताच सांगता येणार नाही. जसजशी ती मोठी होईल तसतसे ते आपल्याला कळत जाईल पण घाबरू नका, धीर कायम ठेवा. तुमचीच कसोटी आहे ही पण तरीही सकारात्मक रहा. ही व्याधी बरी होणारी नसली तरी, मूळात ही व्याधी नाही हा सीन्ड्रोम, एक प्रकारची मेंदूशी संबधित अनियमितता आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे तिचं जीवन तुम्ही नक्कीच वेगळ्या प्रकारे उमलवू शकता. कधी कधी अशाही मुलांमध्ये अदृश्य रुपात काही दैविक क्षमताही असू शकतात. तुम्हाला फक्त त्या केंद्रित कराव्या लागतील.”

खरं म्हणजे ही परीक्षा  कस्तुरीच्या मात्या-पित्यांचीच होती. असाध्यतेतून साध्याकडचा किंवा विकृतीतून  शाश्वताकडे जाण्याचा हा एक खोल अंधारातला प्रवासच होता त्यांच्यासाठी.

कस्तुरी वाढत होती. बाल्यावस्थेतले अनेक विकासाचे टप्पे ती गाठू शकत नव्हती. अजून ती उभी राहू शकत नव्हती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, “स्नायूंवरचं मेंदूचं नियंत्रण कमी पडत असल्यामुळे असं होऊ शकतं. आपण वाट पाहूया.”

एक दिवस खिडकीत गजाला धरून कस्तुरीच्या आईने तिला आधार देऊन उभे केले. खिडकीतून दिसणारं सुंदर काळसर निळं आभाळ आणि शुभ्र पूर्ण चंद्र पाहताच कस्तुरीच्या तोंडून एक भावपूर्ण आनंदमिश्रित नवलाचा उद्गार उमटला. अचानक ती खिडकीतच नाचण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या आईला हा एक सकारात्मक संकेतच वाटला जणू! एक आशावाद प्रबळ झाला.

तेव्हापासून आई कस्तुरीला कडेवर घेऊन कधी बागेत, कधी एखाद्या तलावाच्या काठी तर कधी छोट्याशा टेकडीवर घेऊन जाऊ लागली. झाडावरची उमललेली फुलं, पाण्यात पोहणारी बदकं, उंच टेकडीवरून दिसणारी हिरवळ पाहून कस्तुरी मनापासून आनंदायची. आईच्या  कडेवरून मग ती हळूच उतरायचा प्रयत्न करायची आणि जागच्या जागीच हातापायांची चमत्कारिक पण आशावादी हालचाल करायची. त्यावेळीच ती बोलण्याचाही प्रयत्न करायची. तिला फुलं, पाणी, हिरवळीवर.. खूप काहीतरी छान बोलायचं आहे हे तिच्या डोळ्यातून, नजरेतून जाणवायचं. अशा बोलक्या क्षणी प्रत्येक वेळी आईला हेच वाटायचं “हा माझा कस्तुरीमृग आहे एक सुगंध घेऊनच ती जन्माला आली आहे. हा सुगंधच मला जपायचाय.”

एक दिवस डॉक्टर म्हणाले,” सुदैवाने कस्तुरीला बौद्धिक अपंगत्व आलेलं नाही. ती शाळेत जाऊ शकते,अभ्यास करू शकते, वाचन लेखन ती नक्कीच करू शकेल.”

काही थेरेपीज्..उपचारपद्धती आई-बाबांनी डॉक्टरांच्या सांगण्यावरून तिच्यासाठी आयोजिल्या. एक दोन शस्त्रक्रियाद्वारेही  तिच्या स्नायूंवरचं नियंत्रणही बऱ्याच प्रमाणात साधलं गेलं. शिवाय एका शस्त्रक्रियेत तिच्या मेंदूत “ब्रेन स्टिम्युलेटिंग डिव्हाईस” बसवलं त्यामुळे तिच्या अविकसित शारीरिक हालचाली सुधारू लागल्या. आता ती कुणाचाही हात न धरता उभी राहू शकत होती, चालू शकत होती. तिच्या तोंडातून उमटणाऱ्या अस्पष्ट उद्गारांनाही आता थोडा थोडा शाब्दिक आकार येऊ लागला होता. सुरुवातीला काही साधारण विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शाळेतल्या व्यवस्थापनाने तिच्यासाठी प्रवेश नाकारला. “तिला दिव्यांगासाठी असलेल्या शाळेत जाऊ द्यावे” असा अनाहूत सल्लाही दिला गेला पण आई-बाबा ठाम होते. अखेर कस्तुरीला एका मिशनरी शाळेत प्रवेश मिळाला.

तसं पाहिलं तर तिचं शारीरिक वय वर्गातल्या इतर मुलांपेक्षा जास्त होतं.तिचं दिसणं,हालचाली साधारण नव्हत्या.  वर्गातली मुलं तिच्याशी मैत्री करतील का? तिला स्वीकारतील का की तिच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊन तिची अवस्था अधिकच कठीण होईल?  हे भय मनात होतं पण तरीही मनात एक अदृश्य स्वरूपातला कस्तुरीमृग आई-बाबांनी जपून ठेवला होता कस्तुरीचं व्यक्तिमत्व खुलेल आणि तिच्यापाशी असलेला  सुवर्ण चाफ्याचा दरवळ इतरांनाही आनंदवेल, प्रसन्न करेल याची कुठेतरी खात्री त्यांना वाटत होती.

सुरुवातीला शाळेत जरी कुणी तिच्याशी वाईट वागत नसलं तरी फारसं कोणी तिच्याजवळ जाऊन मैत्री ही करत नव्हते त्यामुळे कस्तुरीला एकटेपणा जाणवायचा आणि तिच्यात होणाऱ्या शारीरिक संप्रेरक बदलांमुळे तिलाच आता हळूहळू जाणवायला लागलं होतं की,”ती वेगळी आहे, तिच्यात त्रुटी आहेत, अभाव आहेत, ती इतरांसारखी नॉर्मल नाही.”

पण मग ती बागेत बागडणाऱ्या फुलपाखरांना बघायची आणि मनातच गुणगुणायची.

छान किती दिसते फुलपाखरू 

या वेलीवर फुलांबरोबर 

गोड किती हसते.. फुलपाखरू.

तिलाही खुदकन हसू यायचं. डोक्यावरचं निळं अथांग आभाळ बघताना तिला वाटायचं,

“देवा तुझे किती सुंदर आकाश 

सुंदर चांदणं चंद्र हा सुंदर.”

सूर्य,चंद्र तारे तिचे सवंगडी झाले होते. निसर्गात ती रमायची.  त्या सुंदरतेमुळे तिच्यातल्या काही अदृश्य ऊर्जा जणू काही हलकेच जागृत व्हायच्या.

एकदा मात्र टीव्हीवर कार्टून फिल्म ती बघत होती. एक भेदरलेलं हरिण सर्व शक्ती एकवटून पळत होतं आणि एक पट्टेरी वाघ  तिला पकडण्यासाठी तिच्या मागे धावत होता. ते दृश्य खूप भयानक होतं. ती किंचाळू लागली.ओरडू लागली. आईने खोलीत येऊन पटकन टीव्हीच बंद केला. कस्तुरीला छातीशी लपेटून घेतलं. शांत केलं. त्या क्षणी काही निर्णय घेण्यापूर्वी आईला हे कळत नव्हतं की,” कस्तुरीला सौंदर्यासोबत कुरूपतेचंही दर्शन घडवायला हवं की नको? याशिवाय तिच्या व्यक्तिमत्त्वात परिपूर्णता कशी येईल?शिवाय खरंच कधी भविष्यात तिच्यावरच असा प्रसंग गुदरला तर?”आई क्षणभर भयकंपित झाली अन् तिने हवेतच देवाला हात जोडले.” स्वामी माझ्या कस्तुरीचं रक्षण कर.” 

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुधारस… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

?  जीवनरंग ?

☆ सुधारस… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

“आई, कोण आलंय बघ गं” समीरचं बोलणं ऐकून शैलानं बाहेरच्या खोलीत येऊन दरवाज्याकडं पाहिलं.तिचा मोठा भाऊ दारात महेश उभा होता.जवळपास दहा बारा वर्षांनी ती त्याला पहात होती.

“आत या  म्हण पाहुण्यांना” असं समीरला  म्हणून ती आत गेली.

“हे पाणी दे  पाहुण्यांना.

आणि पाया पड त्यांच्या.तुझे ते मोठे मामा आहेत”.

समीरनं पाण्याचा ग्लास आणून महेशच्या  हातात दिला आणि त्याच्या  पायावर डोकं ठेवण्यासाठी तो वाकला.त्याला  आपल्या हातांनी उठवून  महेश म्हणाला,

“बाळा,आईला म्हणावं लवकर ओवाळून घे.आणि लगेच जेवायला वाढ.मामाला भूक लागलीय”.

समीर आत येताच शैलानं त्याला  दुकानातून  नारळ आणि करगोटा आणायला पाठवलं आणि ती ओवाळण्याचं  ताट भरभर करू लागली.ते करताना तिच्या डोळ्यापुढून सारा इतिहास सरकून गेला. 

शैला आईवडिलांची धाकटा  लेक.महेश  थोरला मुलगा. काॅलेजात जाणारी 

शैला  अभ्यासाबरोबरच अनेक  अ‍ॅक्टिव्हीजमध्ये सतत सक्रीय होती. एन्.एस्. एस्., वादविवाद  स्पर्धा,खेळ, महिलांवर होणारे अन्याय, कुठे होणारे भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन असो, ती सतत आघाडीवर असे.

काॅलेजातल्या  अन्वर नावाच्या  मुलाशी  तिची ओळख झाली.तोही तिच्याबरोबर अनेक सामाजिक कार्यात भाग घेत होता.ओळखीचं पर्यावसान प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला.पण शैलाचा हा निर्णय तिच्या आईवडलांना आवडला नाही.’लग्न हे केवळ दोन व्यक्तिंचे मिलन नसते तर दोन कुटुंबांचेही  संबंध  त्यातून जोडले जातात आणि लग्न करताना, दोघांनी केवळ भावनिक  न होता, आपला कुटुंबाचा आर्थिक पाया भक्कम आहे ना? हे पाहूनच निर्णय घ्यावा’ असं त्यांना वाटत  होतं.

 ‘वो  लडकी आपनी बिरादारीकी  नही ‘ या मुद्द्यावर अन्वरच्या  घरच्यांनीही या लग्नाला विरोध केला होता.अखेर घरच्यांचा विरोध डावलून दोघांनी लग्न करायचं ठरवलं.रजिस्टर पध्दतीनं त्यांनी लग्न केलं.मात्र यामुळे दोघांनाही आपापल्या घरांतून बाहेर पडावं लागलं होतं. उदरनिर्वाहासाठी अन्वरनं, ओळखीनं 

जिल्ह्य़ाच्या ठिकाणी जाऊन  एका सहकारी पतपेढीत नोकरी मिळवली. अनेक अडचणींतून त्यांचा संसार सुरू झाला.त्यांना एक मुलगा झाला – समीर .

समीर चार वर्षाचा झाला आणि एक दिवस  घरी येताना,अन्वर रेल्वेचा रूळ ओलांडताना रेल्वेखाली चिरडला गेला.

शैलाचं आभाळच फाटलं.मात्र लवकरच ती त्या धक्क्यातून सावरली. एका एन्. जी.ओ.त तिनं नोकरी पत्करली आणि समीरला मोठं करणं हेच  आयुष्याचं ध्येय ठेवून ती जगत राहिली;

परिस्थितीतीशी झगडत राहिली.जवळच्याच शाळेत तिनं समीरला टाकलं.मात्र कितीही अडचणी आल्या तरी माहेर किंवा अन्वरच्या  घरच्यांकडून तिनं काहीच अपेक्षा ठेवली नाही.असेच दिवस लोटले गेले आणि एका दिवाळीत तिचा भाऊ महेश तिच्या घरी आला होता.

दरवाजा उघडला. दुकानातून  समीर आला .

“हे घे बाळा खाऊ” असं  म्हणून महेशनं समीरच्या समोर एक बाॅक्स धरला.”मम्मी…” आईकडं  समीरनं  प्रश्नार्थक दृष्टीनं पाहिलं.

“आईसारखाच मानी दिसतोय”. महेश. 

” घे समीर ,मामानं तुझ्यासाठी काय आणलंय बघ”

“मला खाऊ नको”.

“मग काय पाहिजे?”

“पुस्तक”.

“ठीक आहे बाबा…

आधी हे तर घे. मी ऑनलाईन काॅमिक आत्ताच मागवतो…” असं म्हणून महेशनं नेटवरून  एक   काॅमिक  शोधून, त्याची एका 

वर्षाची वर्गणी मोबाईलवरून पाठवली. 

तोवर शैलानं ओवाळणीची तयारी केली.

लग्नानंतर ती पहिल्यांदाच महेशला ओवाळत होती.तिला आठवलं,लग्नाआधी भाऊबीजेला महेशला ओवाळून झाल्यावर ती हक्कानं तिला हवं ते गिफ्ट मागवून घेत असे.यावेळी मात्र तिनं तसं केलं नाही.महेशनं तिच्या ओवाळणीच्या  ताटात एक बंद पाकीट टाकलं. हळूच ते घेऊन शैलानं ते किचनवर ठेवून दिलं.

” गिफ्ट काय आहे हे उघडून  पण पहाणार नाही का शैला?”

हसत शैलानं ते उघडलं.पाकीटात 

एक  जुनी किल्ली होती.

“हे काय?”

“आपल्या कापडाच्या दुकानाची किल्ली आहे”

“म्हणजे ?”

“अगं,म्हणजे  सगळं सोडून तू आपल्या घरी यायचं.कापडाचं दुकान आता तू चालवायचं?”

“आणि तू काय करणार?”

“गावातच दुसरं दुकान मी विकत घेतलंय.ते मी पाहीन”.

“कशासाठी हे दादा? आणि इतक्या दुरून मी हे कसं पहाणार? आणि आता समीरची शाळाही सुरू आहे.”

“तुम्ही दोघांनीही तिकडंच रहायला यायचं.आपल्या बंगल्यातल्या तीन खोल्यात  तुम्ही रहायचं.

तो बंगला तुझ्याच आईवडलांचा आहे ना.”

“अरे, तुझं आणि आईपप्पांचं ठीक आहे.पण वहिनीचं  म्हणणं जाणून  घेतलं का?”

” अगं बाई, तिनंच मला इकडं पाठवलं.सकाळी काही नाष्टापण करून दिला नाही  तिनं. बहिणीकडं जा जेवायला म्हणाली ती.थांब. तिच्याशीच बोल”.असं म्हणून त्यानं मोबाईल काढला.शैलानं तो परत त्याच्याकडं देत म्हणाली, “आधी मामा भाचे जेवून घ्या. मग बोलू”.

जेवण झाल्यावर  महेशच्या बायकोबरोबर ती व्हिडिओवरून बोलली,

“काय वन्सं,आज काय जेवण केलं तुमच्या भावासाठी?”

” फराळाचं होतंच.आणि 

 दादाच्या आवडीचा सुधारस  केला होता वहिनी.”.

”  वन्सं, येता कधी मग इकडं दुकान  संभाळायला?”

” समीरच्या शाळेचा दाखला मिळाला की येऊ “.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

ईमेल- sks.satish@gmail.com

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “नाईलाज!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “नाईलाज!!” ☆ श्री संभाजी बबन गायके

ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस निनादात होता की नाही ठाऊक नाही, पण त्यावेळी तिच्या मनात आठवांची बरसात मात्र अखंडित होत असावी… संततधार!

शरीरात चैतन्य पेरीत वाहणारं रक्तच जेव्हा मृत्यूच्या मागे खळाळत धावू लागतं ना… महापुरात एखाद्या दुथडीभरून वाहणाऱ्या नदीसारखं.. तेंव्हा जगणं खूप मागं पडत जातं आणि क्षणार्धात दृष्टीआड होऊन जातं.

तिचं असंच झालं असावं. वैद्यकशास्त्र त्याचा निवाडा देऊन नामानिराळं झालं होतं. बापानं तिला आवडतात त्या गोष्टी तिला घेऊन देण्याचा सपाटा लावला… तेंव्हाच तिलाही कळून चुकलं… आयुष्याच्या शाळा सुटण्याची घंटा कोणत्याही क्षणी घणघणू लागेल!

पण तिला ही शाळा सुटू नये असंच वाटत राहिलं.

मूल शाळेत पहिलं पाऊल ठेवतं ना तेंव्हा त्याचा पुन्हा एकदा जन्म झालेला असतो. नऊ महिने नऊ दिवस आईच्या गर्भगृहात नांदलेला जीव जगाच्या झगमगत्या प्रकाशात बुजून जातो.. आणि म्हणूनच रडू लागतो. शाळेत असंच रडू येतं पोरांना!

तिलाही शाळेतले तिचे पहिले पाऊल आठवत असेल बहुदा. हळुवार पडलेली पावलं पुढे कधी धावायला लागली हे तिला समजलेही नसेल.

शाळा हे दुसरे जग. या जगातले सर्वजण आयुष्याचा एक अवयव बनून राहतात. घरातल्या छोट्याशा कुटुंबातून मूल मोठ्या आणि विविधरंगी कुटुंबात येतं. सुरुवातीला तर घरात आई आणि शाळेत बाई असा भावनिक पदर लागत राहतो मनाच्या देहाला.

 घरातलं शाळेत सांगितलं जाईलच असं नसतं… पण शाळेतलं मात्र घरात हमखास सांगितलं जातं.

वर्गातील मैत्र मनीचे गुज सांगण्याइतकं घट्ट होत जातं आणि मग आधी हवीशी वाटणारी सुट्टी थोड्याच दिवसांत नकोशी वाटू लागते.

एखाद्या स्पर्धेत मिळालेला एखादा क्रमांक आणि त्यावर वर्गात झालेला टाळ्यांचा गजर कित्येक दिवस कानांत गुंजत राहतो.

मुले शिक्षकांच्या व्यक्तिमत्वात खूप काही शोधत असतात. काहींनी आई गवसते तर काहींना वडील. आणि काहींना मित्रही दिसतात शिक्षकांत. सहली आणि त्यातून राहत्या सहली दीर्घकाळाची शिदोरी बनून जातात… पुढे आपल्याही मुलांना सहलीला सोडवायला गेल्यावर सहलीच्या बस बघून आपणही काळाच्या मागे जातो!

मुलांनी शिक्षकांचे द्वितीय नामकरण केलेले असते तर शिक्षकांनीही मुलांचे दुसरे बारसे घातलेले असते कित्येकदा.

मध्येच शाळा सोडून इतर गावांत शाळेत जावे लागणाऱ्या मुलांची अवस्था केविलवाणी होत असते. नव्या मातीत रुजायला वेळ लागतोच.

दहावीच्या वर्गाचा, निवृत्त होणाऱ्या शिक्षकांचा, शिपाई काकांचा निरोप समारंभ इतर मुलांना आपणही असेच इथून बाहेर पडणार याची हलकीशी जाणीव करून देणारे ठरतात.

तिला मात्र शाळेचाच नव्हे तर या जगाचा असा मधूनच निरोप घ्यावा लागला. असाध्य व्याधी तिला तिच्या ध्यानीमनी जडली आणि तिचा जीवनप्रवास खंडित करून गेली.

ही मानसक्का.. म्हणजे मानसी अक्का… अक्का हे तिच्या शिक्षकांनी दिलेलं लाडाचं नाव. नाशिक मधल्या एका शाळेतील विद्यार्थिनी.

तिने तिच्या शिक्षकांना लिहिलेल्या पत्रात तिने जमेल त्या आठवणी जागवण्याचा प्रयत्न केला जाता जाता… ती शाळेत आणि या जगात असतोवर एखादी सहल झाली असती तर बरे झाले असते, असेही ती म्हणते.

तिच्या अक्षरातील नाविलाज अर्थात नाईलाज शब्द काळजाचा ठाव घेणारा ठरला आहे.

पालक, शिक्षक आणि एकूणच सर्वांनी एकमेकांना जितेपणी किती जीव लावणे गरजेचे आहे, हेच यातून अधोरेखित होते, नाही का? कारण आयुष्याच्या शांत भासणाऱ्या समुद्रात एखादी मोठी लाट अनपेक्षितपणे उसळू शकते.. आणि गलबत तळाशी जाऊ शकते!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # ८२२ ⇒ चेहरे पर चेहरा ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए दैनिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “चेहरे पर चेहरा।)

?अभी अभी # ८२२ ⇒ आलेख – चेहरे पर चेहरा ? श्री प्रदीप शर्मा  ?

(THE BEARD)

क्या दाढ़ी चेहरे पर एक और चेहरा नहीं। केश को महिलाओं का श्रृंगार माना गया है और दाढ़ी को मर्दों की खेती, जब चाहे उगा ली, और जब चाहे काट ली। एक समय था, वानप्रस्थ और सन्यास के वेश में दाढ़ी का भी योगदान होता था। आज भी साधु, बाबा और संन्यासियों का श्रृंगार है यह दाढ़ी।

चलती का नाम गाड़ी की तर्ज पर किशोर कुमार ने एक फिल्म बनाई थी, बढ़ती का नाम दाढ़ी ! आप अगर काटो नहीं, तो दाढ़ी और नाखून दोनों बढ़ने लगते हैं। क्या विचित्र सत्य है, हमारे शरीर के नाखून और बाल, शरीर का हिस्सा होते हुए भी, इनमें खून नहीं है। इन्हें काटो, तो दर्द नहीं होता।

कैसी अहिंसक पहेली है यह ;

बीसों का सर काट लिया।

ना मारा ना खून किया।।

हमारे दिव्य अवतार राम, कृष्ण, बुद्ध और महावीर के मुखमंडल की आभा देखते ही बनती है। स्वामी विवेकानंद के चेहरे का ओज देखिए। कलयुग के फिल्मी सितारों को ही देख लीजिए, देव, राज और दिलीप। धरम, राजेश खन्ना, जीतू और गोविंदा ही नहीं एंग्री यंग मैन अमिताभ भी ! बेचारे अमिताभ को तो स्क्रीन टेस्ट में भी बड़ी परेशानी आई थी। भला हो सात हिंदुस्तानी आनंद, नमकहराम, मिली और शोले और दीवार जैसी फिल्मों का, जिसने अमिताभ को सदी का महानायक बना दिया और हमारे बिग बी ने एक चेहरे पर एक और चेहरा चढ़ा लिया।

कितनी पते की बात कह गए हैं हसरत जयपुरी साहब फिल्म असली नकली में ;

लाख छुपाओ छुप ना सकेगा

राज दिल का गहरा।

दिल की बात बता देगा

असली नकली चेहरा।।

साहिर ने अपने चेचक के दाग वाले चेहरे को कभी दाढ़ी में नहीं छुपाया लेकिन एक चेहरे पे कई चेहरे लगा लेने वालों की अच्छी खबर ली। गुलजार तो कह गए हैं, मेरी आवाज ही पहचान है, और आज इधर जहां देखो वहां, दाढ़ी ही मेरी पहचान है।।

एक समय था, जब मर्द की पहचान मूंछों से होती थी।

लिपटन टाइगर वाला मुछंदर याद है न? लिपटन माने अच्छी चाय। मूंछ पर ताव देना और शर्त हारने पर मूंछ मुंडवा देने की कसम खाना आम था। मूंछ तो हमने भी बढ़ाई थी, लेकिन जब दाढ़ी भी बढ़ने लगी तो पिताजी ने डांट पिला दी, यह क्या देवदास बने फिर रहे हो, जाओ दाढ़ी बनाकर आओ। पिताजी के सामने कभी हमारा मुंह नहीं खुला, मन मसोसकर रह गए। लेकिन मन ही मन बड़बड़ाते रहे, पिताजी क्या जानें, बिना दाढ़ी के कोई येसुदास नहीं बनता।

कभी दाढ़ी फैशन थी, आज तो दाढ़ी का ही प्रचलन है।

कबीर बेदी की दाढ़ी बड़ी स्टाइलिश थी। क्या जोड़ी थी कच्चे धागे में विनोद खन्ना और कबीर बेदी की। बेचारे संत महात्मा तो दाढ़ी बढ़ाकर भूल जाते हैं, लेकिन जो लोग शौकिया दाढ़ी रखते हैं, उन्हें तो दाढ़ी का बच्चों जैसा खयाल रखना पड़ता है। ब्यूटी पार्लर से महंगे होते जा रहे हैं आजकल मैन्स पॉर्लर।

वैसे हमें क्या, बंदर क्या जाने अदरक का स्वाद।।

बिग भी, हमारे नरेंद्र मोदी और विराट कोहली तीन टॉप के दाढ़ी वाले हैं आज के इस युग के। विराट की स्टाइल की कॉपी ने तो पुराने फैशन के सभी रेकॉर्ड तोड़ दिए हैं। सोलह बरस की बाली उमर से ही आज के युवा में विराट की छवि नजर आने लगती है।

आज के युवा अभिनेता हों या क्रिकेट प्लेयर, कॉलेज का छात्र हो या प्रोफेसर, टॉप एक्जीक्यूटिव और मोटिवेशनल स्पीकर, सभी जगह दाढ़ी वाले ही नज़र आएंगे आजकल।

आज अगर बिग बी और मोदी जी आपके सामने बिना दाढ़ी के प्रकट हो जाएं, तो वे कैसे लगेंगे ? हो सकता हैं, वे अपने आपको ही नहीं पहचान पाएं। अगर गांधी और नेहरू भी दाढ़ी भी रखते, तो कैसे नज़र आते। कई दार्शनिक और वैज्ञानिक तो इतने व्यस्त रहते थे, कि उन्हें दाढ़ी बनाने की फुर्सत ही नहीं होती थी।।

वैसे मनोविज्ञान तो यही कहता है कि पुरुष भी किसी महिला के लिए ही सजता, संवरता है। जरूर आज की युवतियों की भी पहली पसंद दाढ़ी वाले युवा ही होंगे। बुढ़ापे में तो दाढ़ी इंसान के कई ऐब छुपा लेती है। किस दाढ़ी में साधु है और किस दाढ़ी में शैतान, यह तो सिर्फ भगवान ही जानता है।

कभी अभिनय के लिए नकली दाढ़ी लगाते थे, आज तो असली दाढ़ी ही अभिनय के काम आती है। जो दाढ़ी में भी सहज और सरल है, बस वही सच्चा साधु है।

होंगे हमारे अधिकांश अवतार क्लीन शेव्ड, हमारी कृत्रिम बुद्धि, यानी आर्टिफिशियल इंटेलिजेंस, तो यही कहती है कि अगला कल्कि अवतार भी हमारे आसपास कहीं किसी दाढ़ी में छुपा हुआ बैठा है, बूझो तो जानें।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मैत्रीण…  — भाग – २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

? जीवनरंग ?

☆ मैत्रीण…  — भाग – २ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(एक वाजला.. आता वासंतीताईंना सहन होईना.. अचानक त्यांना काल सुधाने त्यांच्या मोबाईलमध्ये भरलेला नंबर आठवला.. त्यानी कॉल लावला.. पलीकडे सुधा..) – इथून पुढे – – 

‘काय झाले वासंती?

‘सुधा.. तूझ्या मुलीला इथे ताबडतोब पाठव.. मला बाथरूमला जायचे आहे..

काय झाले असेल हे सुधाताईंनी ओळखले. त्यानी फोन खाली ठेवला आणि मुलगी प्रज्ञासह स्वतः हजर झाल्या. बेल दाबली.. मोबाईलवर गाणी ऐकणाऱ्या आशाने दार उघडले.. दोघी आत गेल्या.. सुधाताईंनी काल बेडरूम पाहिली होतीच.. त्यांनी वासंतीताईंचा हात पकडला आणि बाथरूमला घेऊन गेली. बाहेर आल्यावर त्या सुधाताई ना म्हणाल्या” सुधा.. मला इथे राहायचे नाही.. मला नेशील तुझ्याकडे?

‘हो चल ना.. म्हणूनच प्रज्ञाला सोबत आणलय.. तुझे डॉक्टर रिपोर्ट्स, औषधे, थोडे कपडे बरोबर घेऊ.. कुठे ठेवले आहेत ते दाखव. वासंतीबाईंनी जे जे दाखवले ते प्रज्ञाने एका बॅगेत भरले आणि त्यान्च्या हाताला धरून बाहेर आणले आणि गाडीत बसवून घरी घेऊन गेली.. तोंड उघडे टाकून आशा सारे बघत राहिली आणि तिने सुजाताला फोन लावला.

सुजाता आशाला म्हणाली.. ‘जाऊ दे.. जाऊन जाऊन कुठे जाईल? तिचे आहे कोण.. एक भाची वसु.. ती सांगलीला.. कोणी नेली ती संध्याकाळी आणून पोचवणार.

सुधाताईंनी हाताला धरून वासंतीताईना घरात आणलं.. खुर्चीवर बसवलं.. तोपर्यंत पटकन प्रज्ञा घरात गेली आणि गरमभात.. त्यावर तूप ओतून घेऊन आली. वासंतीताई त्या गरम भातावर तुटून पडल्या.. सकाळपासून त्या उपाशी होत्या. त्यांचे जेवण होईपर्यंत प्रज्ञाने त्यांना सुधाताईच्या खोलीत बेड घातला होता.

दोन घास खाऊन वासंतीताई शांत झाल्या.. मग प्रज्ञा त्याना तिच्या आईच्या खोलीत घेऊन गेली.

‘तू आराम कर वासंती.. संध्याकाळी बोलू.. ’ असे म्हणत सुधाताईंनी एक पुस्तक उघडले. चांगला दोन अडीच तास आराम करून वासंतीताई जाग्या झाल्या. सुधाताईंनी दोघीसाठी कॉफी करून आणली…

‘मग मघा बाहेरच्या खोलीत गाणी ऐकत बसलेली आशा की नवीन बाई? ’

‘आशाच ती.. मी सुजाताला सांगितले तिला बोलावू नकोस.. तरी सुजाता म्हणाली.. आशाच येणार, तिच्याकडूनच तुमचे काय ते करून घ्या.. ’

‘मग?

‘सकाळी नेहेमीसारखी आशा आली.. पण आज ती माझ्या खोलीत येईना.. तिने सुजाताची कामे उरकली आणि ती बाहेर गाणी ऐकत बसली.. मी तिला किती हाका मारल्या. पण ती ढिम्म.. काल रात्री मी तिला बोलले.. कामावरून काढते म्हणाले ना म्हणून.. माझा पगार घेते आणि त्या काळात नकोते धंदे हिचे.. मला असले सहन होत नाही ग सुधा.. ’

‘पण मी तुला इथे आणलं.. मग तुझा मुलगा सून काही म्हणायची नाहीत ना? ’

‘मला वाटत नाही तसं.. त्यांना आनंदच वाटेल.. म्हातारी माणसं कुणाला हवी असतात? पण आज बघू.. न्यायला येतात का? ’

‘वासंती.. मी तुला माझी मैत्रीण मानलंय.. तुला वाटेल तितके दिवस राहा.. पण तुला तुझ्या मुलाकडे जायचे असेल तेंव्हा सांग.. ’

‘खरच सुधा.. आपली कालची ओळख.. पाच मिनिटाच्या ओळखीवर तू मला मैत्रिण केलंस? ’

‘याचे क्रेडिट माझ्या नवऱ्याला मी देईन.. तो नाही आहे या जगात.. पण चेहेऱ्यावरून कसे माणूस ओळखायचे.. हे त्याने मला शिकवले. त्याने अनेक विद्यार्थ्यांना असेच घरात आणले.. त्यांना शिकवले आणि मार्गाला लावले. तुला आसरा हवा होता हे काल माझ्या लक्षात आले.. मुलगा सून आणि तुझे आजारपण या बेचकीत तू सापडली होतीस.. वाटेल तेवढे दिवस इथे राहा.. कायमची राहिलीस तरी माझी मुलगी तुझं सर्व करेल.. कारण बापाचे तिच्यावर तसे संस्कार आहेत. ’

‘तुझे कसे उपकार फेडू सुधा.. ’

‘अग उपकार कसले? उलट मी कंटाळते.. मुलगी आणि जावई कामात असतात.. माझ्याशी बोलायला कोणी नसतं.. आता तू आलीच आहेस.. आपण गप्पा तरी मारू. ’

एवढ्यात प्रज्ञा दवाखान्यातून आली. तशा सुधा आणि वासंती तयार झाल्या आणि सुधाने वासंतीचा हात पकडला आणि दोघी पार्कमध्ये फिरायला गेल्या.

वासंतीताईचा मुलगा आणि सून सुजाता घरी आली आणि त्यांनी दार उघडले. त्याना आशाने फोन करून कुणीतरी दोन बायका सासूला घेऊन गेल्याचे सांगितले होते.. पण त्यांना वाटले एव्हड्यात त्यांना आणून पोचवले असेल.. पण त्यानी वाकून बेडरूम मध्ये पाहिले.. सामसूम होती.

‘आई आलेली दिसत नाही.. ’ कपिल म्हणाला..

‘जाऊ दे.. नाहीतरी त्त्यांचे नाच बघायला कुणाला वेळ आहे? ही बाई नको… ती नको.. कुठे आहे तिथे सुखाने राहा म्हणावे.. आमच्या संसारात लुडबुड नको.. तू अजिबात फोन करू नकोस.. ती सांगून गेली का.. नाही, मग आपण चौकशी का करायची? ’

कपिल गप्प बसला.

पार्क मधून फिरून दोन मैत्रिणी घरी आल्या. प्रज्ञाने सरबत करून ठेवले होतेच. तोपर्यंत सुधाताईचा जावई प्रवीण आला. सुधाताईंनी त्याच्याशी ओळख ‘माझी मैत्रीण वासंती ‘म्हणून करून दिली. त्याने हाताने नमस्ते केले आणि तो आपल्या रूममध्ये गेला..

प्रज्ञा घरात आली तीच वासंतीताई समोर बसली. तिने त्यांना व्यवस्थित तपासले.. त्यांचे रिपोर्ट्स पाहिले… त्यांच्या डॉक्टरनी दिलेली औषधे पाहिली.. त्यांना थोडे चालवून पाहिले.. मग म्हणाली..

‘मावशी.. तुला फिजिओ करायची गरज आहे.. माझ्या ओळखीची मुलगी आहे मी तिला बोलावते.. ती मालिश करील.. व्यायाम करून घेईल. एक मावशी रोज येतात.. त्या आंघोळ घालतील.. बाकी पूर्ण दिवसभर आई आहेच आणि बाहेर मी दवाखान्यात आहे.. काही वाटलं तर ही बेल वाजवायची.. मी एक मिनिटात हजर. आमची म्हणजे माझ्या बाबांची छोटी लायब्ररी आहे.. भरपूर पुस्तके आहेत.. हवे ते पुस्तक घे आणि वाच. धार्मिक वाचायला आवडत असेल तरी पण ग्रंथ.. पुस्तके आहेत. या तुमच्या बेडरूमला लागून ग्यालरी आहे.. तिथे दोघी बसलात तर रस्त्यावरील रहदारी दिसते आणि आमची छोटी बाग पण दिसते.. तेंव्हा कसलीच काळजी करायची नाही.. एन्जॉय आणि मस्त रहा. ’

वासंतीताई तोंड उघडे ठेऊन ऐकत राहिल्या.. आपली मुले एव्हडी आपली काळजी घेऊ शकतात? त्यांना त्यांचा मुलगा कपिल आणि सून सुजाता आठवली.. आणि त्यांचे तोंड कडू झाले.

वासंतीबाईंना मुलाचा किंवा सुनेचा फोन आला नाही पण सांगलीच्या भाचीचा एक दिवस आड फोन येत राहिला. मावशी एका मैत्रिणीकडे आनंदात आहे, हे ऐकून तिला समाधान वाटले.. मध्येच घाईघाईत ती मुंबईला आली आणि मावशीला पाहून गेली.. तिची ओळख सुधाबाईशी आणि प्रज्ञा बरोबर झाली.

रोजची फिजिओ आणि व्यायाम यामुळे वासंतीताई स्वतः पाऊल टाकायला लागल्या.. हळूहळू चालू लागल्या. चांगले जेवण आणि विश्रांती यामुळे त्यान्च्या अंगात शक्ती आली. सुधा आणि त्त्यांची मैत्री घट्ट झाली होती. सुधा त्याना कथा, कविता वाचून दाखवी आणि दोघी चर्चा करत.. हळूहळू दोघी रिक्षा करून नाटकें पहायला जाऊ लागल्या.. संगीताचे कार्यक्रम ऐकू लागल्या.. हे सर्व सुख असले तरी वासंतीताईना आपला मुलगा आणि सून.. आपली साधी चौकशी पण करत नसल्याने वाईट वाटतं होत.. आणि त्यांना त्यांचा राग पण येत होता. खरे तर त्त्यांचा मुलगा सून रहात असलेली जागा त्यान्च्या नावावर होती आणि ही दोघे त्यात राहत होती. यांना चांगली अद्दल घडवायला हवी असे त्याना वाटतं होते.

एक दिवस त्या सुधाचा जावई आणि प्रज्ञाच्या नवऱ्यासमोर आल्या.

‘प्रवीण.. जर कुणी माझ्या जागेत मला भाडे न देता रहात असेल.. तर मी काय करू शकते?

‘त्याला नोटीस द्यायची.. घर खाली कर म्हणून…’

‘आणि तरी तो खाली करत नसेल तर?

‘कोर्टात जायचे.. तुम्हा जेष्ठ मंडळीसाठी वेगळे नियम आहेत.. तुमचा निर्णय शीघ्र गतीने लागणार.’

‘मग मला नोटीस काढायची आहे.. माझ्या जागेत माझ्या परवानगी शिवाय एक माणूस रहात आहे.. ’

‘कोण ग? कुणाला नोटीस काढणार तू? ’ तिथे बसलेल्या सुधाने विचारले..

‘माझ्या मुलाला नोटीस देणार मी? ’

‘काय? मुलाला नोटीस? ’

‘होय.. माझा मुलगा असला तरी काय झाले.. जो मुलगा आईच्या म्हातारपणी तिची साधी चौकशी करत नाही.. त्याने आई वडिलांच्या प्रॉपर्टी वर तरी हक्क का सांगावा? ’

‘खरे आहे वासंती.. आता आपण वृद्ध लोकांनी सजग व्हायला हवे.. अशा मुलांना धडा शिकवायलाच हवा.. पण काय होते.. आपण इमोशनल होतो… आपण मुलांना जन्म दिलेला असतो.. त्यानी काही केले तरी त्यान्च्या करणीवर आपण पांघरूण घालतो. ’

‘पण मी नाही घालणार पांघरुण.. मी माझ्या मुलाला सुनेला धडा शिकवणार.. ’

‘एव्हडी घट्ट कशी झालीस वासंती.. ’

‘तू पाठी आहेस म्हणून.. सुधा.. तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली म्हणून.. ’

‘काय तो निर्णय घे. पण त्याच्याबद्दल फर्म रहा.. मुलाचा पुळका येऊ शकतो.. ’

‘नाही.. माझा निर्णय पक्का.. ’

वासंतीताईनी आपल्या मुलाला नोटीस पाठवली. ‘एक महिन्यात जागा खाली करावी’ म्हणून.

नोटीस मिळताच मुलाचा फोन आला..

वासंतीबाईंनी ‘माझी जागा खाली करा.. ती माझ्या माहेरहुन मला मिळालेली आहे.. तुझ्या बाबाकडून नाही.. ’ असे ठणकवले..

 मग मुलगा आणि सून भेटायला आले.. दोघे रडू लागली, ‘आम्ही दुसरी जागा घेऊ शकत नाही.. आमची परिस्थिती नाही म्हणून.. ’. वासंतीबाई स्थिर होत्या.. त्यानी मुलाला.. सुनेला ठणकवले..

‘जर तुम्हाला आजारी आईची देखभाल करता येत नसेल तर तिच्या प्रॉपर्टीवर हक्क का सांगता? तुम्ही जागा खाली करा.. नाहीतर ज्येष्ठाच्या कोर्टात जाऊन मी तुम्हाला बाहेर काढेन.. ’

 

चार दिवसात कपिलने जागा खाली केली.

जागेची किल्ली वासंतीताईच्या हातात आली.

‘वासंती… काय करणार या जागेत आता? ’

‘काहीही करेन.. मी राहीन काही काळ किंवा माझ्यासारख्या ज्येष्ठ लोकांना देईन किंवा माझी सांगलीची भाची वसु… तिला देईन.. तिचा मुलगा दोन वर्षात दहावी पास होईल.. त्याला मेडिकलला जायचे आहे… तो शिकेल येथे राहून.. ’

‘खरच वासंती.. मला पार्कमध्ये टॉयलेटला जाण्यासाठी आशाची वाट पहात हवालदिल झालेली वासंती आठवते आणि आज स्वतःच्या मुलाला घराबाहेर काढणारी खंबीर वासंती.. माझ्या समोर बसली आहे.. ’

‘हे तुझ्यामुळे सुधा.. तुझ्यासारखी लाख मोलाची मैत्रीण मिळाली ना.. तिने माझ्यात आत्मविश्वास भरला.. श्रेय त्या मैत्रिणीला… आणि त्या मैत्रीला…‘ 

समाप्त

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares