मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गजरा… ☆ सौ. प्रांजली लाळे ☆

सौ. प्रांजली लाळे

? जीवनरंग ?

☆ गजरा… ☆ सौ. प्रांजली लाळे

“अजूनही तो सुगंध सुखावतो रे.. माझ्या मनी जपून ठेवलेला तो दरवळ रोमांच फुलवतो.. त्याचं ते परसदारी असणंही किती सुखावह होतं.. दरवळ त्याचा मनी अजूनही डोकावतो. “

राधा बाहेरच्या उंच गगनचुंबी इमारती न्हाहाळत आरामखुर्चीत बसली होती. गॅलरीतुन हा व्ह्युव तिला अधिक मागे न्यायचा. सिमेंटच्या जंगलात सगळं आहे. पण तो ओलावा हरवलाय.. हम्म्.. मनाशीच खंतावत ती बडबडली.. श्यामराव खाली फेरफटका मारायला जायचे.. हिला मात्र जमायचं नाही खाली उतरायला. गुडघे साथ नव्हते देत हल्ली.. पण संध्याकाळी चहा, स्वयंपाक तिलाच करावा लागे. सुनबाई थकून यायची. तिलाही सहकार्य अपेक्षित होतं.. दोघी मिळून छान काही तरी बनवायच्या.. आठव्या मजल्यावरचं घर.. थंड हवा.. छान होतं सर्व.. पण मनात कुठंतरी सलत होतं हल्ली..

सकाळी सहालाच जाग यायची राधाला.. तिला उठलं की आधी चहा लागे.. श्यामरावही तिच्या पाठोपाठ उठून चहा घ्यायला तयार असत.. पावसाळा सुरू होता. मस्त अदरकवाली चाय बनाओ.. श्यामराव चेष्टेने म्हणाले.. पण राधा भूतकाळात रमलेली.. तिला आठवत होते तिचे जुने घर.. सडा संमार्जन करुन झाले की आन्हिके उरकायची. श्यामराव टेपरेकॉर्डर लावून लता दिदींचं सुरेल आवाजातलं ‘मोगरा फुलला’ लावायचे. नुकतीच उन्हाळ्यातली सुट्टी संपत आलेली असायची.. मुलं तरीही सुट्टीचा आनंद घेत पहुडलेली असायची. दोन खोल्यांमध्ये का होईना आनंदी होतो आपण!! बाहेर परसदारी मोगरा, जाई जुई, सायली, गुलाब वाटवे फुलवले होते राधेने.. अर्थात श्यामरावही मदत करायचे तिला बागकामात.. उन्हाळ्यात इतर फुले नव्हते येत.. पण मोगरा पुर्ण बागेत राज्य करी.. फुलं तोडून हार करण्याचे काम श्यामराव इमानेइतबारे करत.. एखादा गजरा गपचूप राधेच्या भरगच्च केसात माळत.. हे आठवून आजही राधेला हसू आलं. आजकालच्या वरकरणी प्रेमाच्या जमान्यात, सेल्फी, रिल्सच्या काळात हे प्रेम कुठंतरी काकणभर जास्तच छान होतं. म्हणून ते आजही टिकून आहे.. पण तो मोगरा… हम्म्..

घर सोडून आलो तेव्हा मोगरा परका झाला असेल हे डोक्यात कसे नाही आले आपल्या. पुत्र प्रेमापोटी आपण ते घर, तिथल्या आठवणी सोडून का आलोय?आज त्या घराची प्रकर्षाने आठवण येत होती. डोळ्यात अश्रू तरळले.. रात्री झोपतानाही त्या बागेची आठवण सतत येत राहिली..

सकाळी उठली पण उठताना कण कण जाणवली. श्यामरावांना आवाज दिला. त्यांनी पाहिले तर राधा तापाने फणफणलेली.. मुलांना आवाज दिला.. पटकन पॅरासिटेमल दिली तिला मुलाने.. श्यामरावांना जाणवंल की काही तरी खुपतय हिला.. थोडे बरं वाटलं की बोलुया.. राधा मुलाला वाईट वाटेल म्हणून बोलत नव्हती.. सून मात्र जाणून होती सासूचा स्वभाव. रविवारी सकाळी राधाला सूनबाई म्हंटल्या चला आज जरा जॉगिंगला जाऊया. राधाने आढेवेढे घेत नाही म्हंटले.. पण ती ऐकतेय होय. राधाचा हात धरून लिफ्टने खाली पार्कमध्ये पोहचल्या सुद्धा.. तिच्यासारख्या बऱ्याच जणी तिथे बसलेल्या होत्या. प्रचंड चिवचिवत होत्या. मोकळा श्वास घेत होत्या.. मन मोकळं हसत खिदळत होत्या. हीही त्यांच्यात सामिल झाली.. मन मोकळं हसली. सुनबाई तिथून सटकली. राधाला हायसं वाटत होतं.. खालच्या फ्लोअरवरच्या थत्ते काकूंशी बोलता बोलता मनातलं बोलूनही टाकले तिनं केव्हाचं..

आता असंच रोजचं रुटीन होऊन बसले तिचे. जगण्याला नवीन अर्थ मिळाला तिला..

त्या दिवशी संध्याकाळी सुनबाई ऑफिसमधून आल्या. डोळे झाकले राधाचे.. डोळे उघडले तर समोर राधाचा मुलगा दोन तीन फुलझाडांच्या कुंड्या घेऊन उभा होता.. एका रोपट्याला मोगऱ्याची दोन तीन फुलं आलेली होती.. तो दरवळ घ्राणेंद्रिय आणि मनसुद्धा तृप्त करुन गेला..

…. आता राधेला छान विरंगुळा झाला आहे. तिची आणि श्यामरावांची सकाळ हल्ली मोगऱ्याकडे पहातच उगवते.. दोघेही सकाळचा चहा तिथेच खुर्च्या टाकून घेतात. देवाला वहायला फुलं हल्ली विकत आणावी लागत नाहीत. दुसऱ्या कोणत्या परफ्यूमची गरजच पडत नाही..

© सुश्री प्रांजली लाळे  

मो न. ९७६२६२९७३१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ श्रीमंती… (अनुवादित कथा) – मूळ इंग्लिश लेखक : अज्ञात ☆ अनुवादक – श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ श्रीमंती… (अनुवादित कथा) – मूळ इंग्लिश लेखक : अज्ञात ☆ अनुवादक – श्री मकरंद पिंपुटकर ☆

“काकू, तुमच्याकडे जुनेपाने गरम कपडे आहेत का हो? ” दारात एक ७-८ वर्षांचा मुलगा आणि त्याच्याहून एखाद दोन वर्षांनी लहान मुलगी उभे होते आणि ते मला विचारत होते.

संध्याकाळची वेळ होती, पावसाळ्याचे दिवस होते, अंधारून आलं होतं आणि कोणत्याही क्षणी जोरात पाऊस कोसळणार होता. असा पाऊस आला की आमच्या चाळीतले light हटकून जातात, आणि तसा light जायच्या आधी मला घरातली जास्तीत जास्त कामं उरकायची होती.

मी खरंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष तरी करणार होते, किंवा त्यांना पुढे जायला तरी सांगणार होते. पण क्षणभर त्यांच्याकडे पाहिलं, तर गारठली होती ती दोघं, फाटके भिजलेले कपडे, ओले केस, चिखलाने माखलेल्या चपलाही तुटलेल्या.

“या रे पोरांनो, आत या. हा टॉवेल घ्या, डोकं पुसा आधी. मी तुम्हाला गरमगरम चहा देते, आलं घालून. “

चपला दाराशीच काढून ती दोघंही निमूटपणे आत आली. दाराशीच उभी राहिली. दाराजवळ स्टुलावरच बसले ते दोघं, एक आणखी स्टूल समोर ओढून मी त्यांच्यासमोर दोन कप चहा ठेवला, बशीमध्ये बिस्किटं ठेवली, आणि मी माझ्या कामाला स्वयंपाकघरात आले.

आजची पुढची कामं, किराणेवाला, दूधवाला आणि बाकी सगळ्यांची द्यायची बिलं हा असे अनेक विचार डोक्यात घोळत होते, पण बाहेरच्या शांततेने माझी विचारमाला तुटली.

मी बाहेर येऊन पाहिलं, चहा बिस्किटं संपली होती, आणि ती छोटी मुलगी हातातल्या रिकाम्या कपाकडे एकटक बघत बसली होती.

अचानक तिनं विचारलं, “काकू, तुम्ही श्रीमंत आहात का हो? “

मला हसूच आलं. संडास बाथरूम common असलेली आमची चाळ, त्यातलं आमचं दोन खोल्यांचं घर, दहा वर्षं होऊन गेली त्याला रंगाचा हातही दिलेला नव्हता, आणि ही छोटुकली पूर्ण गांभीर्याने मला विचारत होती, “काकू, तुम्ही श्रीमंत आहात का हो? “

“नाही ग बाळा. पण असं का विचारते आहेस तू? “

“तुमच्या कपांना कान आहेत, आणि तुमच्या कप आणि बशा मॅचिंग आहेत, ” एखाद्या प्रौढ माणसासारखे observe करत ती म्हणाली.

मी त्यांना काही जुनी पांघरुणं दिली, मुलांचे दोन कपडे दिले, एक बिस्किटांचा पुडा दिला, अचानक मिळालेला हा खजिना घेऊन ती दोघं उड्या मारत निघून गेले, साधे आभार मानायचं भानही राहिलं नाही त्यांना.

पण त्यांनी वेगळे आभार मानायची गरजच नव्हती, त्यांनी मला माझ्या श्रीमंतीची जाणीव करून दिली होती.

माझ्या हातातल्या त्या कपबशीकडे मी नव्याने पाहत होते. कुठल्यातरी आठवडा बाजारात घेतलेल्या साध्या कपबशा होत्या त्या – निळी बॉर्डर असलेल्या पांढऱ्या कपबशा. पण त्या कपांना कान होते आणि कपबशा मॅचिंग होत्या.

ती दोघं गेले, मी स्वयंपाकाला लागले. घरात गॅस सिलिंडर होता, दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत नव्हती, घराचे कर्जाचे हप्ते फिटत आले होते, नवरोबा निर्व्यसनी होता, कुटुंबाचं पोट भरता येईल आणि सणासुदीला बजेट सांभाळत हौसमौज करता येईल अशी त्याला पक्की नोकरी होती, आमची मुलं गुणी होती, मेहनती होती.

मी श्रीमंत होते.

स्वयंपाक संपला होता, मी बाहेरच्या खोलीत आले, “हे” यायची वेळ होत आली होती, मी देवापुढे दिवा लावला, उदबत्ती लावली, खोली आवरली.

दारात त्यांच्या चपलांच्या चिखलाचे डाग तसेच होते, पण मी ते लगेच पुसले नाहीत.

मी ते नवऱ्याला दाखवणार होते, आणि अभिमानाने सांगणार होते, “आपण श्रीमंत आहोत. “

मूळ इंग्लिश लेखक : अज्ञात 

मराठी अनुवाद : श्री मकरंद पिंपुटकर (स्वैर अनुवाद)

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाट चुकलेलं वासरू… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ वाट चुकलेलं वासरू… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(वीणा सुधीरकडून नवं बळ घेऊन घरी आली. घरी मंजिरीने पिझा मागवला होता. ”आई त्या डिलिव्हरी चे आठशे रुपये देऊन टाक ग”बसल्याबसल्या मंजिरीने फर्मावले. वीणा सरळ आत निघून गेली. वाट बघून फणफण करत मंजिरीने पैसे दिले.) – इथून पुढे —- 

दुसऱ्या दिवशी सकाळी मंजिरी म्हणाली, “ आई, आम्ही मैत्रिणी चार दिवस गोव्याला जातोय. मला पन्नास हजार रुपये लागतील. उद्या भर माझ्या अकाउंटला न विसरता. ”

” मंजिरी, परवडत नसेल तर गोव्याला जाऊ नकोस. माझ्याकडे पैसे नाहीत. , असले तरी मी यापुढे तुला पैसे देणार नाही. अति झालं आता तुझं हे मला ओरबाडणं. तू आता जॉब बघ आणि मिळवायला लाग. मी तुला पोसणार नाही यापुढे. ” वीणा म्हणाली.

मंजिरी रागाने लाल झाली. “ हो का? का देणार नाहीस ग? मीच वारस आहे ना तुमची? मला नाही तर कोणाला देणारेस ही इस्टेट? “ कुत्सितपणे ती म्हणाली.

“ मी तुला आत्ता तर काहीही देणार नाही हे नक्की. नंतरचे नंतर बघू. दोन महिन्यात नोकरी बघायची आणि जागा सुद्धा. परवडत नसेल तर आपल्या जुन्या वाड्यात दोन खोल्या रिकाम्या आहेत तिथे रहायला लाग. पण आता तुझी अरेरावी आम्ही सहन करणार नाही. कान उघडे ठेवून ऐक. “

मंजिरी रागाने लाल झाली. पाय आपटत बाहेर निघून गेली. वीणा शांत होती. यातून काय निष्पन्न होते तेच तिला बघायचं होतं.

संध्याकाळी वीणाच्या दोघी बहिणी भेटायला आल्या.. “ आक्का, अग हे काय? मंजिरी आली होती आमच्याकडे. तू म्हणे तिला घराबाहेर काढणार आहेस? नोकरी कर म्हणालीस म्हणे? एकुलती एक मुलगी ना तुझी? लोक काय म्हणतील? असं नको करू बाई. ” दोघीजणी म्हणाल्या. “ आधीच बिचारी घटस्फोट झाल्याने दुःखी आहे. ” वीणा काहीच बोलली नाही.

“ तिला तुम्ही दिलेत का पैसे? फार नाही पण पन्नासच हजार हवे होते. ” दोघीनी चमकून एकमेकींकडे बघितलं. माई चाचरत म्हणाली, “ हो. मागत होती खरी आमच्याकडे पण आम्ही कुठून देणार ग? ”

“ हो ना? मग आता तिच्या भानगडीत पडू नका. लाडक्या भाचीचं प्रेम उतू जात असेल तर घ्या ठेवून स्वतःच्या घरी. ” वीणा आत निघून गेली.

बहिणी निघून गेल्या. वीणा शांत होती. पुढे काय होते ते बघायचं होत तिला. वीणाला वाईट वाटलं की आपला नवरा या कशातच आपली साथ देत नाहीये. पण तिने आता त्याच्याकडून अपेक्षा करणंच सोडून दिलं. तो महिना तसाच गेला. एक दिवस मंजिरी वादळासारखी घरात आली आणि सगळं सामान पॅक करायला लागली.

“ मंजिरी, कुठे जाते आहेस? काय करणार आहेस तू? ”

“ तुम्हाला मी नकोय ना तुमच्या घरात? मग मी कुठेही जाईन. ”

“ मंजिरी, माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नाही. तुला तुझ्या जबाबदाऱ्या समजायला हव्यात. मी आई आहे तुझी. वैरीण नाहीये. तू नीट मार्गी लागावंस हीच माफक अपेक्षा आहे माझी “ वीणाच्या डोळ्यात पाणी आलं. ” हे बघ. तुझं नवऱ्याशी पटलं नाही, ठीक आहे. पण आम्ही तुला जन्मभर पुरणार नाही. तू नीट मार्गी लागावीस, पुन्हा संसार थाटून पायावर उभं रहावंस ही अपेक्षा चुकीची नाहीये. नीट विचार कर आणि मग पाऊल उचल. ”

” मला माझं हित कळतं. तुम्हाला बट्टा लागेल असं काही करणार नाही मी. गोव्याला जातेय. माझा गणेश म्हणून मित्र आहे त्याच्याबरोबर मी रहाणार आहे. बघते काय जमतं ते. काळजी नको करू. बघेन मी काय करायचं ते. ” मंजिरीने स्पष्ट सांगून टाकलं.

वीणा आत गेली. पाच लाख रुपयांचा चेक लिहून तिच्या हातात ठेवला. “ मंजिरी, नीट विचार केला आहेस ना सगळा? ”

मंजिरी चेक घेऊन न बोलता घराबाहेर पडली. वीणाला चैन पडेना. ती तडक रूपा- सुधीरकडे गेली. सुधीरला हे सगळं तिनं सांगितलं. सुधीर विचारात पडला. त्या दोघांनाही वाटलं, आता पुढे काय होणार? आपणच वीणाला चुकीचा सल्ला तर दिला नाही ना? उगाच पडलो का यांच्या भानगडीत?

वीणाने जणू त्यांच्या मनातले विचार ओळखले. “ हे बघ रूपा सुधीर, तुम्ही मला योग्यच सल्ला दिलात. तिशी ओलांडलेली मुलगी लहान नाहीये. नाही जमलं तर ती परत येईल हे नक्की. मी माझ्या मुलीला चांगलीच ओळखते. यातून तिचं भलं झालं तर देवच पावला. मी तुम्हाला कधीही दोष देणार नाही. आता वाट बघण्याशिवाय मी काहीही करू शकत नाही. ” 

या गोष्टीला पाच वर्षे झाली. या काळात मंजिरीचा आईवडिलांना कधीही फोन आला नाही, की ती कुठे आहे काय करते हेही कोणाला समजलं नाही. वीणा शांत होती. रूपा सुधीर तिला नेहमी भेटत. वीणा म्हणाली, “आपण जन्म देतो पण कर्म नाही देऊ शकत ग मुलांना. माझेच योग चांगले नाहीत तिच्याशी. ”

एक दिवस अचानक बेल वाजली. वीणाने हळूहळू जाऊन दार उघडलं. हल्ली फार गुडघे दुखत तिचे. दारात मंजिरी उभी होती. मागे बघितलं तर तिच्या मागे एक पुरुष उभा होता.

वीणाने त्यांना आत या म्हटलं. मंजिरीच्या अंगावर छान ड्रेस होता. हातात भारी पर्स, कानात चमकणारे हिरे दिसत होते.

मंजिरी म्हणाली, “ आई, हा गणेश. मी याच्याच बरोबर गोव्याला गेले. हा साऊथ इंडियन आहे. आम्ही तिकडे एक अगदी लहान स्नॅक्स सेन्टर चालवायला घेतले. आई, तू दिलेले पाच लाख मला फार उपयोगी पडले. ”

गणेश म्हणाला “ आई, ते सेन्टर छान चालायला लागले. मी स्वतः चांगला कुक आहे पण पैसे नाहीत म्हणून हॉटेलात नोकरी करत होतो. मंजिरी मला भेटली आणि आम्ही गोव्याला जायचं ठरवलं.

आमचे हे स्नॅक्स सेन्टर फार छान चालायला लागलं. मग आम्ही नवीन साऊथ इंडियन हॉटेल चालवायला घेतलं. आहे छोटंसं पण तेही चांगलं चालतंय. गोवा खूप महाग आहे आणि सीझन नसला की कोणी टुरिस्ट येत नाहीत. पण आमचं हे हॉटेल स्वस्तआहे. ठराविकच पदार्थ आम्ही करतो. मस्त चाललंय आमचं. आमच्याकडे मात्र कायम गर्दी असते. ” 

मंजिरी आईजवळ बसली.

“ आई, मला माफ करशील ना? मी खूप वाईट वागले ग तुमच्याशी. सगळ्या जगाचा राग मी तुझ्यावर काढला. खूप मनस्ताप दिला तुम्हाला. मुळात मी वाईट नाहीये ग. अपयश माणसाला फार कडवट बनवते ग. पण मी खूप चुकले आई. आता समजतं मला, किती वाईट वाटलं असेल तुला, मी अशी त्रास देत होते तुला तेव्हा. बाबा आई, मी चुकले. मला क्षमा कराल ना? ”

वीणाने मंजिरीला जवळ घेतलं. ” मंजिरी, तू गेल्यापासून एक क्षण मी नीट झोपले नाहीये की अन्न गोड लागलं नाही मला. पोटचा गोळा आहेस तू. पण आता तुम्हाला असं छान सेटल झालेलं बघून किती आनंद झाला म्हणून सांगू? गणेश, तुमचेही खूप आभार मानते मी. माझ्या मुलीला आधार दिलात तिला नीट मार्गावर आणलेत. ” 

गणेश म्हणाला, “ मंजिरी चांगलीच आहे हो. आमची कॉलेजपासून मैत्री आहे. मला तिने विश्वासाने तुम्ही दिलेले पाच लाख रुपये दिले. खूप कष्ट केले आम्ही या पाच वर्षात. बँकेचे कर्ज काढले, ते फेडतो आहोत. पण आमचं हॉटेल खूप छान चाललं आहे. आम्ही तुम्हा दोघांना गोव्याला न्यायला आलो आहोत. ” 

वीणाच्या डोळ्यात पाणी आलं. पूर्ण बदललेली आत्मविश्वासाने उभी असलेली ही नवीनच मंजिरी तिच्या समोर उभी होती.

वीणा हसत म्हणाली “ येणार तर. पण मंजिरी गणेश, असेच रहाणार कायम का लग्नही करणार? आम्हाला आवडेल हा जावई. ”

मंजिरी लाजली. “ आई, लग्न करणार आहोत आम्ही, म्हणूनच तू आणि बाबा उद्या गोव्याला या. गणेशला आईवडील नाहीत. म्हणून तुम्ही आमचं लग्न लावून द्या. “ गणेश वीणाच्या आणि बाबांच्या पाया पडला.

वीणाने दोघांना जवळ घेतलं.

“ हा दिवस आयुष्यात येईल असं वाटलं नव्हतं रे बाबांनो. त्या मंगेशाचीच कृपा म्हणायची. मंजिरी, किती आनंद झाला म्हणून सांगू ग? आपलं वाट चुकलेलं वासरू नीट मार्गाला लागलेलं बघून कोणत्या आईला धन्य वाटणार नाही बाळा? माझं चुकलं असलं तर मला माफ कर मंजिरी. पण तुझं भलं व्हावं हीच इच्छा होती बरं आमची. या आता घरात. तुम्ही म्हणता तसंच होईल. छान लग्न करू तुमचं मंगेशीच्या देवळात. ” 

…… डोळे पुसत वीणा देवाला साखर ठेवायला आत वळली.

– समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वाट चुकलेलं वासरू… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ वाट चुकलेलं वासरू… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

काल सगळ्या मैत्रिणींनी बागेत जमायचं ठरवलं होतं. त्यांच्या ग्रुपमधली जया आता चार महिने सुनेकडे चालली होतीजपानला. मग त्यांची भेट होणार नाही म्हणून सगळ्या बागेत जमणार होत्या. मग गप्पागोष्टी झाल्यावर समोरच्या हॉटेलमध्ये खाऊन मग घरी जायचं अस ठरवलं होतं त्यांनी.

या सगळ्या मैत्रिणी जवळ रहाणाऱ्या, तरुणपणीच शेजारी शेजारी फ्लॅट असल्याने आता पक्क्या मैत्रिणी झालेल्या. सगळ्यांची मुलं मोठी झाली, कोणी इथेच छान सेटल झाली. काहींची परदेशी गेली. मग आईवडिलांच्या परदेश वाऱ्या सुरू झाल्या.

आज अजून वीणा कशी आली नाही म्हणून तिची वाट बघत सगळ्या थांबल्या होत्या. इतक्यात धापा टाकत वीणा आलीच.

“ सॉरी ग बायानो. मला घरातून निघायलाच उशीर झाला आणि मग रिक्षाच मिळेना. ” घाम पुसत वीणा म्हणाली. वीणा रूपाच्या शेजारी बसली. रूपा आणि वीणाची फार घट्ट मैत्री होती. दोघीनीही एकाच बँकेत नोकरी केली. दोघींचे नवरेही बँकेतच होते. रुपाला एकच मुलगा. छान शिकून तो परदेशी स्थायिक झाला. वीणाला एकच मुलगी… मंजिरी.

या सगळ्याजणी वीणा आल्यावर समोरच्या हॉटेलमध्ये गेल्या. जयाने आज सगळ्याना पार्टी दिली.

“ आता मी चार महिने जपानला असणार. संपर्कात रहा ग. टेक्स्ट फोन करत रहा. नाहीतर जाल विसरून मला. ” हसत हसत जया म्हणाली. भरपूर खाऊन झाल्यावर सगळ्या निघाल्या.

वीणा म्हणाली “ रूपा, घाई आहे का ग तुला घरी जायची? नसेल तर चल ना जरा बागेतच बसूया. ” सगळ्या गेल्यावर वीणा आणि रूपा बागेतल्या बाकावर बसल्या. वीणा खिन्न होऊन समोर बघत होती. मनात दुसरेच विचार चालले होते तिच्या. रूपा म्हणाली, “आता सांगून टाक बघू काय झालंय ते. ”

वीणा खिन्नपणे म्हणाली, “ काय सांगू ग रोजचीच रडकथा. आपलेच दात आपलेच ओठ. आजही माझं आणि मंजिरीचं वाजलं. अग कशी वागते ग ही मुलगी.. माझी एकुलती एक सख्खी मुलगी ना ही? कोणाला सांगितलं तर विश्वास तरी बसेल का? नुसता छळ झालाय हिच्यामुळे आमचा. चांगलं छान स्थळ बघून थाटामाटात लग्न करून दिलं. देवमाणसं आहेत बरं सासरची माणसं. जेमतेम चार वर्षे नांदली आणि पटत नाही म्हणून कायमची आली माघारी. नोकरी तर कधी केलीच नाही आणि करायचीही नाहीये. कठीण आहे ग बाई सगळं. काल बाहेरून आली आणि म्हणाली, ’आई माझ्या अकाउंटला वीस हजार रुपये ट्रान्सफर कर. मला हवे आहेत लगेच. ’ अग, काय हा त्रास मला? हे तर काहीही बोलत नाहीत. मला फार त्रास होतो ग. माझी सगळी मनःशांती बिघडून गेलीय हिच्या असल्या वागण्याने. ” वीणाच्या डोळ्यात पाणी आलं.

रूपा हे सगळं ऐकत होती. “ काय ग वीणा, हिने घटस्फोट घेतला तेव्हा नवऱ्याने अँलिमनी नाही का दिला? ”

“ नाही ना. चालली आहेत कोर्टात भांडणं. ती म्हणते मी नोकरी केली तर मला तो देणार नाही पैसे म्हणून ही काहीही करत नाही. मला नको जीव झालाय बघ. आलीय परत ते ठीक आहे, माझीच मुलगी आहे ग ती. तिला सपोर्ट करणं आमचं कामच आहे, पण तिला त्याची अजिबात जाणीव नाही. आज तीन वर्षे झाली, हे सहन करतोय आम्ही. किती पैसे पुरवू मी हिला? वर म्हणते, ’नाहीतरी हे सगळं तुम्ही मलाच देणार ना? मग आत्ताच दिलंत तर काय बिघडलं? ‘ बिनदिक्कत म्हणते, ‘ मला पैसे हवेत. ’ आज दहा.. उद्या पंधरा करत आता मीच खंक होईन बघ रूपा. परवा म्हणाली, ‘ हा फ्लॅट माझ्या नावावर करून द्या. मी काय तुम्हाला टाकणार नाहीये, मलाच करायचं आहे ना तुमचं शेवटी? ’ ”

रुपाला हे ऐकून फार वाईट वाटलं. आपली लाडकी मैत्रीण विनाकारण अशी कात्रीत सापडलेली पाहून तिला फार वाईट वाटलं. न बोलता वीणा घरी निघून गेली. रूपाने घरी येऊन खूप विचार केला. आपल्याच मुली अशा वागतात? हक्काने आईवडिलांच्या घरी परत यायचं आणि त्यांना ओरबाडून घ्यायचं? कोणत्या हक्काने? वर ही अरेरावी?

रूपा हे तिच्या नवऱ्याशीही बोलली. त्याला फार वाईट वाटलं. तो म्हणाला, “ तुझ्या मैत्रिणीनेच या बाबतीत फर्म स्टॅण्ड घेतला पाहिजे. जितके हे लोक सहन करत रहातील ना रूपा, तितकी ही मुलगी अरेरावी करत राहील. एकदाच तिला सुनवायला नको का? आपण सगळे गेल्यावर आपल्या संपत्तीवर हक्क सांगणं वेगळं आणि असं आईवडिलांना ब्लॅकमेल करणं तर फार वाईट. हे काय ग मंजिरीचं बोलणं, की नंतर तरी मलाच देणार तर आत्ताच द्या. अत्यंत चुकीचं आहे हे. तुझी वीणा हे का सहन करत राहिली आहे? ” रूपा गप्प बसली. नक्की काय आहे हे तिला तरी कुठं ठाऊक होतं?

त्यानंतर बरेच दिवस झाले. रूपाची वीणाशी गाठभेटच झाली नाही. नंतर अचानक वीणा रुपाला भाजी मार्केट मध्ये भेटली.

रूपाने विचारलं “ कशी आहेस वीणा? काय म्हणते मंजिरी? ” 

वीणा म्हणाली, “ जैसे थे. काहीही बदल नाही. मला आता कंटाळा आलाय ग या सगळ्या न बदलणाऱ्या परिस्थितीचा. काय करावं काही सुचत नाहीये. परवा तर हद्द झाली. म्हणाली, ‘ आई, तुम्ही दोघे वृद्धाश्रमात का जात नाही? मी इथे एकटी राहीन. तुमचे स्वातंत्र्य तुम्हाला आणि माझं मला. कशाला आपण रोज वाद विवाद करत रहायचं? ‘ रूपा, आता हेच शिल्लक राहिलं होतं बघ ऐकायचं. असुनी खास मालक घरचा… ”

वीणाला रूपाने घरी बोलावलं. “ वीणा, आज संध्याकाळी माझ्या घरी ये. आपण बोलूया आणि यावर आता आपण उपाय शोधूच या ग. तुझा नवरा काहीही बोलत नाही. पण तू असं उगीच सहन नको करत बसू. मी माझ्या नवऱ्याशी.. सुधीरशी बोललेय. निघेल निघेल मार्ग. ”

 त्या दिवशी संध्याकाळी वीणा रुपाकडे गेली. सुधीर आणि रूपा हॉलमध्ये बसले होते. चहा खाणे झाल्यावर सुधीर म्हणाला, “ वीणा, हे बघ. मला रूपाने सगळं सांगितलं आहे. तुम्ही आत्तापर्यंत मंजिरीला खूप टॉलरेट केलंत. तिला असं वाटतंय की तुम्ही तिला घाबरता. ती म्हणेल ते ऐकता. असं सहन करू नका वीणा. तुम्हाला असं वाटतंय का, तिने म्हातारपणी आपल्याला विचारलं नाही तर आपलं कसं होईल? असं काही नसतं. मुलं असूनही ती इथे नसलेल्या लोकांना तरी काय उपयोग असतो त्यांचा? तुम्ही आता कठोर पावलं उचलायची वेळ आलीय. माझं ऐकणार असलात तर सांगतो. “ सुधीर बोलायचा थांबला.

वीणा म्हणाली “ सांगा तुम्ही. मी ऐकेन तुमचं. त्यासाठीच तर आलेय ना? ”

सुधीर म्हणाला, “ हे बघ वीणा, मान्य आहे मंजिरी तुमची एकुलती एक मुलगी आहे. दुर्दैवाने ती सासरी नाही राहू शकली. कारणे काही का असेनात पण तुम्हाला तिच्या वागण्याने त्रासच होतोय आणि तिला त्याची जाणीव नाहीये म्हणा किंवा ती मुद्दाम करते म्हणा. तुम्ही तिला याची जाणीव करून द्यायची वेळ आलीय आता. तुम्ही या आठवड्यात तिघेजण एकत्र बसा. तू स्वतः स्पष्ट शब्दात तिला सांग. ‘ मी यापुढे तुझे हे वागणे बोलणे सहन करणार नाही. अति झालं आता. एक तर तुला नोकरी करावी लागेल आणि आमच्याशी नीट वागावे लागेल. नाहीतर काय करायचं ते तू ठरव. मला हा खर्चही परवडेनासा झालाय तुझा. मी फक्त तुला दोनच महिने पैसे देईन. तेवढ्यात तू नोकरी शोध. आणि मला असे हुकूम केलेले चालणारच नाहीत. माझ्या खात्यात पैसे भर आणि काय काय. तुझ्या केसचा माझ्याशी काहीही संबंध नाही. आमचा विचार कधीही करावासा का ग वाटत नाही मंजिरी तुला? किती शोषण करशील आमचं? नीट विचार कर. एवढी शिकलेली मुलगी तू, गेली तीन वर्षे खुशाल आईवडिलांच्या जीवावर मजा मारतेस? वडील काहीही बोलत नाहीत पण मला त्रास होतोय या तुझ्या उन्मत्त वागण्याचा. अशाच वागतात का तुझ्या मैत्रिणी आईवडिलांशी? लवकरात लवकर नोकरी बघायची आणि शक्यतो लवकर वेगळा फ्लॅट भाड्याने बघ. ’ वीणा, हे असं आणि एवढं बोलशील का? “ सुधीर म्हणाला.

“ आणि हे बघ वीणा, रोग जालीम असेल तर उपायही जालीमच करावा लागतो. किती दिवस सहन कराल हे मूर्खांसारखे तिचे वागणे ग? बघ तरी काय करते ती ते. वीणा, तुझ्या म्हातारपणाची काळजी करू नकोस. असंही, ही काय ग तुम्हाला आधार देणार? पुढचं पुढं बघता येईल. ” 

वीणा सुधीरकडून नवं बळ घेऊन घरी आली. घरी मंजिरीने पिझा मागवला होता.

”आई त्या डिलिव्हरीचे आठशे रुपये देऊन टाक ग ”.. बसल्याबसल्या मंजिरीने फर्मावले. वीणा सरळ आत निघून गेली. वाट बघून फणफण करत मंजिरीने पैसे दिले.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “कशाला उगीच!” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “कशाला उगीच!!” ☆ श्री मंगेश मधुकर

ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी निघालेलो. कन्फर्म तिकीट असल्यानं निवांत होतो. बारा तासाचा रेल्वेप्रवास सहप्रवासी चांगले मिळाले तर बहार येईल असं मनात आलं. बॅग ठेवून बसलो. काही वेळातच एकजण समोर बसला. नजरा नजर झाल्यावर दोघांचे चेहरे पडले. तो सुऱ्या होता. एकेकाळचा घट्ट मित्र पण आता…. ज्याचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही असा माणूस. कडाक्याचं भांडण झाल्यापासून आमच्यात बोलचाल बंद होती. तीन वर्षांनी समोरासमोर आलेलो. सुऱ्याला पाहून डोक्यात तिडिक गेली. मागचं सगळं आठवलं पण शांत बसलो. गाडी फुल असल्यानं सुऱ्याचाही नाईलाज झाला. समोरासमोर असलो तरी मुद्दामच बघणं टाळत होतो. खूप विचित्र अन अवघडलेली अशी अवस्था. सहन होईना अन सांगता येईना असा प्रकार. मोबाइलमध्ये तोंड खुपसलं पण मन बेचैन होतं. एकदोनदा लक्ष गेलं नेमकं तेव्हा सुऱ्या माझ्याकडं पाहत होता. असं सारखं व्हायला लागलं. पुन्हा एकदा नजरानजर झाल्यावर दोघंही हसू रोखू शकलो नाही.

 “ए भाxxx, अजून कितीवेळ माज दाखवणारेस”न राहवून सुऱ्यानं तोंड उघडलं.

“साxx, माज मी दाखवतोय की तू? ”

“दोघंही”म्हणत सुऱ्यानं टाळीसाठी हात पुढे केल्यावर मी प्रतिसाद दिला.

हुssश!!

मनावरचा ताण एकदम हलका झाला. काही क्षण पुन्हा शांतता. भरून आलं म्हणून दोघांनी मान फिरवली. एकदम माझा हात हातात घेत सुऱ्या म्हणाला. “किती दिवसांनी भेटतोयेस. कसायेस”

“मी मस्त. तुझं सांग”

“ठीक. रुटीन लाईफ. यार, त्यादिवशी खरंच वाटलं नाही की प्रकरण एवढं मोठं होईल. ”सुऱ्या.

“तू असं बोलशील असं वाटलं नव्हतं. मनाला खूप लागलं आणि प्रचंड राग आला म्हणूनच…. ”

“माफ कर मित्रा!! चूक झाली. ”

“भेटत नव्हतो पण तू डोक्यातून जात नव्हता. रोज आठवण यायची. ” 

“मला पण”सुऱ्या 

“मग फोन करायचा ना”

“कुठल्या तोंडानं करणार. वाट्टेल ते बोललो म्हणून तर आपल्यात फाटलं ना. ”सुऱ्या.

“जे झालं ते झालं. परत तो विषय नको. ”

“नाही रे. बोलू दे. मनात खूप साचलयं. अनपेक्षितपणे आज चान्स मिळालाय. थॅंक्स टु रेल्वे”

“ऐकणार नाहीस. अजून तसाच आहेस. स्वतःला पाहीजे तेच करणार”

“हम नही सुधरेंगे. ”

“हम भी…… लहानपणापासून तुझ्याच संगतीत आहे. ”

“तरीसुद्धा माझ्या नादी लागतोस. माहितीये ना. डोकं फिरलं की स्वतःवर कंट्रोल राहत नाही. ”

“चांगलचं माहितीये. हजारवेळा भांडलो. अगदी अंगावर धावून गेलो. एकमेकांच्या गचांडया पकडल्या आणि शिव्या शिवाय तर बोलणं नाही.

यालाच तर जिवलग मैत्री म्हणतात. ”

“आपल्यात वाद नवीन नाहीत पण यावेळी तू बोलणचं बंद केलं. ”

“कारणही तसंच होतं ना. ”

“मी चुकलोच. पुढाकार घेऊन समेट करण्याऐवजी एकदम संबंध तोडून तीस वर्षाची मैत्री संपवलीस. ”

“सुऱ्या, याचा त्रास मलाही झाला पण नाईलाज होता. आपल्यात घडू नये ते घडलं. त्यादिवशी मैत्रीच्या नात्यातली मर्यादा ओलांडली गेली. ”

“तू इतकं चिडशील असं वाटलंच नाही. ”

“त्यालाही कारण आहे. जसा तुला अभिमान आहे तसाच मलाही आहे. याआधीही चार-पाच वेळेला चेष्टेनं बोललास तेव्हा दुर्लक्ष केलं पण त्यावरून पुन्हा पुन्हा होणारा उल्लेख खटकला. त्यादिवशी तर तू डायरेक्ट जिव्हारी लागेल असं बोललास. आतापर्यंत तुझ्याकडून असं ऐकलं नव्हतं. ”

“डोकं ठिकाणावर नव्हतं. टेन्शनमध्ये होतो. ”

“उगीच काहीही कारणं देऊ नकोस. सोशल मीडियावर काय वाचतोस. कोणाला फॉलो करतोस सगळं माहितीय. मनात प्रचंड राग, चीड होती आपल्यातल्या भांडणाच्या निमित्तानं ती मळमळ बाहेर पडली. कट्टर अभीमानी आहेस. ”

“ते तर अजूनही आहे. ”

“काहीच हरकत नाही. सगळेच आहेत. एवढंच सांगायचयं की विचार, स्वभाव, वागणं वेगवेगळं असूनही आपली मैत्री टिकली. एकमेकांना चांगले ओळखतो तरीही तू एकदम माझ्या जातीवर घसरलास. नको त्या शब्दात उद्धार केलास. गरज नसताना टोमणे मारलेस. ”

“जाऊ दे ना. माझी जीभ घसरली. ”सुऱ्या 

“ते काहीही असो. आपल्यात ‘जात’ कुठून आणि का आली. ”

“भावनेच्या भरात बोललो. माफ कर ”

“प्रश्न माफीचा नाहीये. तू असं बोलशील हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्याचाच धक्का बसला. आपण मैत्री ‘जात’ बघून केली नाही. “

“माहितीये”

“एक सांगतो, ‘जात’ प्रत्येकाच्या मनात असतेच. कोणी दाखवतं तर कुणी लपवतं. प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असतो. त्यात वावगं काही नाही मात्र त्यासाठी इतरांना कमी लेखू नये. मैत्रीसारखी नाती निरपेक्ष असतात. तिथं तर हे नकोच. ” 

“सगळं मान्ययं. हे आधी का बोलला नाहीस. त्याचवेळेस चार शिव्या देऊन कानफाडलं असतंस तरी चाललं असतं. तुला तेवढा अधिकार नक्कीच आहे ”

“त्यावेळी तू बिथरलेला अन मी दुखावलेला. काही बोललो असतो तर वाद वाढला असता म्हणून गप्प बसलो. तुझ्या लक्षात येईल असं वाटलं पण…. ”

“संतापाच्या भरात काय बोलून गेलो हे लक्षात आल्यावर फार वाईट वाटलं. स्वतःचा खूप राग आला. माफी मागण्यासाठी फोन केला. मेसेज केले पण तू रिपलाय दिला नाहीस. ”

“तरी तुला सांगत होतो. सोशल मीडियाच्या नादी लागू नकोस. भावना भडकवणाऱ्यांपासून सावध रहा. काहीच साध्य होणार नाही फक्त नाती तुटतील. संधीसाधू लोक वापरून फेकून देतील. ” 

“अगदी खरंय. अनुभव आल्यावर डोळे उघडले. मनापासून सॉरी यार!! ”

“यापुढं काळजी घे. जातीवरुन कोणाला कधीही काहीच बोलू नकोस. फार भावनिक आणि संवेदनशील विषय आहे. असो… आपल्याला मैत्री अजून पन्नास वर्ष टिकवायचीय. “

“शंभर टक्के!! , यापुढं कानाला खडा. आता बट्टी!! ”लहानपणी करायचा तसं दोन बोटं पुढं करत सुऱ्या म्हणाला तेव्हा मोठ्यानं हसायला आलं. सुऱ्याच्या बोटाला बोट टेकवत म्हणालो…..

…. “बट्टी!! , मैत्रीत जात लांब ठेवू. गंमतीत सुद्धा उल्लेख नको. आपलं इतकं छान नातं असताना कशाला उगीच!!

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मैत्र…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “मैत्र…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आम्ही सोलापूरला निघालो होतो. राजू ड्रायव्हरला हे म्हणाले,

” गाडी चालवताना फोनवर बोलायचं नाही. तुझा महत्त्वाचा फोन असेल तर गाडी थांबवून बोलत जा. “

” हो काका” तो म्हणाला.

संध्याकाळी राजुचा फोन वाजला. तो म्हणाला,

“काका कस्टमरचा फोन आहे. जागा बघून गाडी थांबवतो आणि बोलतो. “

पुढे मोठं वडाचं झाड दिसत होतं. त्याला पार होता. तो म्हणाला,

” झाडाखाली थांबवतो. तुम्ही बसा. नाहीतर पाय मोकळे करा. “

आम्ही उतरून झाडाकडे गेलो. पारावर बसलेल्या मावशींनी विचारले,

” काय गाडी बिघडली का काय? “

” नाही त्याला महत्त्वाचा फोन आलेला आहे. “

” अस का.. बर बरं.. या इथं बसा तोवर निवांत”

कुठे जायचे? कुठुन आलात? कुठले तुम्ही? वगैरे चौकशी सुरू झाली.

हे गावाकडचे लोक मला फार आवडतात. लगेच गप्पा मारायला सुरुवात करतात.

लांबून शेळ्यांचा मोठा कळप घेऊन एक सावळा मुलगा येताना दिसला.

त्या म्हणाल्या,

” हे आलं आमच येडखुळं”

तो येऊन तिथे उभा राहिला. चेहऱ्यावरून तो भोळसर आहे हे लक्षात येत होते. तो थांबला तसा सगळा कळपही तिथे उभा राहिला. मुलाने एक पिल्लू खांद्यावर घेतलं होतं. त्यांच्या रोज गप्पा होत असाव्यात.

आज कुणाच्या शेतात वगैरे बोलणे सुरू झाले.

मी विचारले,

” या पिल्लाला तुम्ही उचलून का घेतले आहे? “

” अहो लहान लेकरू आहे. लांबवर पल्ला आहे. ते दमतयं मग.. ” तो म्हणाला.

तेवढ्यात एक शेळी त्याच्याजवळ आली. काळंभोर असलेले ते गोड पिल्लू त्यानी खाली सोडलं.

तो सहजपणे म्हणाला,

” बाळाला भूक लागलीयं आईला कळलं “

पिल्लू आईकडे गेले. तो खाली बसला. त्याबरोबर कळपातली सगळी छोटी, मोठी पिल्लं त्याच्या भोवती जमा झाली. त्यानी त्या पिल्लांना जवळ घेतलं…. कुरवाळलं… मायेनी त्यांच्या अंगावरून हात फिरवला…. डोक टेकवलं…

त्याच्यातला तो सहज आपलेपणा मी बघत होते.

पाच मिनिटांत तो जायला निघाला. ते छोट पिल्लू परत त्याच्या जवळ आलं.

त्यानी आता मानेच्या मागे काठी आडवी धरली होती. त्यावर दोन्ही हात टाकून तोंडाने टाॅक टाॅक असा आवाज काढला.

पिल्लू निमुटपणे बाकीच्या शेळ्यांच्या मागे चालायला लागलं.

जाता जाता तो म्हणाला,

” शहाणी असतात पिल्ली न सांगता त्यांना कळतंय बघा “असं म्हणून तो निघून गेला.

हे सगळं किती गोड होतं. अवघ्या पाच मिनिटात त्या मुलाची अपार माया मला बघायला मिळाली.

असं निरपेक्ष प्रेम करायला मन तसंच हवं…..

हे निर्मळ मैत्र मुक्या प्राण्यांना आपोआप कळतं… मला तर ते अगदी समोर दिसलं…

या मुलाला येडखुळं कस म्हणावं…

सहज जाता जाता असं काही दिसलं की डोळे आपोआप भरून येतात….

आता डोळे उघडे ठेवून हे बघायचं… त्यांच्याकडून शिकायचं असं ठरवलेलं आहे…….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मिशन अक्षय… भाग-२ ☆ सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

🌸 जीवनरंग 🌸

☆ मिशन अक्षय… भाग-२ ☆ सौ. अंजली दिलीप गोखले

(ऑपरेशनने पूर्ण स्पायनल कॉर्ड तर जुळवला. आता व्हर्टिब्रल कॉलमचे व्हर्टिब्रे जुळवणे कठीणात कठीण होते. अर्थात ही तात्पुरती डागडूजी ठरणार होती. सांधलेल्या हाडांमध्ये ओसिफिकेशन होऊन व्हर्टिब्रल कॉलम पूर्ण तयार व्हायला काही दिवसांच्याच काय, आठवड्याचा, महिन्याचाही अवधी लागणार होता.) इथून पुढे —- 

X आणि Y बाहेरून जोडताना खरी कसरत होती. कंबरेच्या भोवती टाक्यांची मार्च तयार झाली होती. एवढे सगळे टाके घालून पूर्ण होईपर्यंत किरण पूर्ण दमून गेला होता. सिजर आणि नीडल खाली ठेवल्यावर त्याला एकदम ग्लानी आल्यासारखे झाले.

ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतरही दोन ट्रेंड नर्सेस, अनेस्थेटिस्ट, आणि दोन असिस्टंट डॉक्टर्स पेशंट जवळ उभेच होते. त्या उरलेल्या दोन बॉडीज आता निकामी होत्या. पण याही काही काळ बर्फामध्ये प्रिझर्व करणे गरजेचे होते.

किरणने तर फार मोठे काम केले होते. पण सीनियर डॉक्टर नवलकरांपुढे आता खूप प्रश्नचिन्हे आ वासून उभी होती. पोलिसांना, तरुणांच्या पालकांना, पत्रकारांना काहीतरी सांगणे जरुरीचे होते. शांतपणे विचार करून दोन दिवस काहीही न सांगता, त्या नवीन बॉडीचा रिस्पॉन्स बघूनच काय ते सांगावे असे त्यांनी ठरवले.

किरणने आपल्या तिकडच्या गाईड्स ना, कॉलेजच्या डिनना, आणि मित्रांना आपण केलेल्या या ऑपरेशनची इथंभूत बातमी ईमेल करून कळवली होती. इंडियन मेडिकल असोसिएशनलाही आपल्या या धाडसी प्रयोगाचा रिपोर्ट दिला होता.

कोणालाही ऑपरेशन थेटर मध्ये यायला परवानगी द्यायची नाही, अगदी नुसते डोकावायलाही द्यायचे नाही असे सांगण्यात आले.

त्या दोघांचे आई-वडील, मित्र सगळ्यांनी बाहेर गर्दी केली. थेटर मधून बाहेर येताच सगळ्यांनी त्यांना घेरले. ” डॉक्टर डॉक्टर, ” ” हे बघा अपघात अतिशय जोरदार झालेला आहे. आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतच आहोत. केवळ परमेश्वराच्या हातात सगळे काही आहे. नक्कीच सगळे प्रार्थना करूया. दोन-तीन दिवस तरी आम्ही काहीच सांगू शकत नाही. प्रार्थनाकरणे, धीर धरणे, पॉझिटिव्ह थिंकिंग एवढेच आपण आता करू शकतो. कृपा करून हॉस्पिटलमध्ये गर्दी करू नका. आम्हाला आमचे काम करू द्या. दोन्ही मुलांच्या दोन व्यक्ती इथे फक्त बाहेर थांबू शकता.

पुढचे दोन दिवस त्या ऑपरेशन थेटर मध्ये फक्त ठराविक डॉक्टर्स, नर्सेस ये-जा करत होत्या. संध्याकाळपासून स्वतः किरण पेशंट जवळ बसूनच होता.

त्याचा XY पेशंट अजून पूर्ण बेशुद्धच होता. सलाईन, ब्लड सुरू होते. सगळ्यात चांगली गोष्ट एकच होती, ती म्हणजे दोन्ही मित्रांचे ब्लड ग्रुप्स एकच होते. त्यामुळे ब्लड ऍडजेस्ट व्हायला काही प्रॉब्लेम आला नाही.

किरण आपल्या पेशंटकडे पाहत होता. त्याच्या पायाची बोटे हलल्याचे त्याला जाणवले. एकदम ” सिस्टर, सिस्टर! लूक! ” म्हणून त्याने आवाज दिला. डॉक्टर्स सिस्टर्स यांच्या डोळ्यात एकदम आनंद चमकून गेला. अरे वा! म्हणजे मेंदूतून आलेली संवेदना पायाच्या बोटापर्यंत पोहोचली. व्हेरी गुड! एक क्षण त्याच्या बॉडीने चांगलाच रिस्पॉन्स दिला होता. त्याने आपल्या बाबांना लगेचच फोनवरून ही माहिती दिली, तेही ताबडतोब हॉस्पिटल कडे धावले. आपल्या प्रयत्नांना यश येणार याचा आनंद सगळ्या टीमच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

किरण ने आपल्या तिकडच्या डीन आणि इथल्या आय. एम. ए. च्या मेंबर्सना एसएमएस केला. सगळीकडून त्याला अभिनंदनचे मेसेजेस यायला लागले.

दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर नवलकरांनी त्या दोघांच्या फक्त अगदी जवळच्या लोकांना बोलावून घेतले. प्रथमच त्यांनी त्या दोघांची नावे विचारली. एक अतुल रामचंद्र घाडगे आणि दुसरा अभिजीत श्रीकृष्ण पाटील होता.

डॉक्टरांनी या दोन्ही मुलांच्या पालकांना अतिशय शांतपणे पण आत्मविश्वासाने सांगायला सुरुवात केली. ” हे पहा मी आत्ता जे सांगणार आहे ते तुम्ही अतिशय शांत चित्ताने आणि मनावर दगड ठेवूनच ऐकायला पाहिजे. अपघात इतका जबरदस्त होता हे दोघेही वाचणे केवळ अशक्यच होते. पण.. पण.. रिलॅक्स.. मी, माझा मुलगा डॉक्टर किरण परदेशातून आला म्हणूनच आम्ही ही अतिशय रिस्की शस्त्रक्रिया करू शकलो. तुम्ही कुटुंबांनी आपले दुःख थोडे आवरून, मन मोठे करून, दोन्ही कुटुंबे एकत्र येऊन या नवीन मुलाला स्वीकारायचे आहे. दोन्ही मुलांचा जिवंत राहण्याचा विचारच सोडून द्यावा लागला असता. पण या प्रयत्नांमुळे आपल्याला एकाच व्यक्तीत दोघांना भेटायचं आहे. तो पूर्ण बरा व्हायला काही महिने लागतील. त्याला इथेच आमच्या ऑब्झर्वेशन खालीच रहावे लागेल. नंतर काय करायचे आपण नंतर ठरवू. “

डॉक्टरांचे सांगणे संपले. सगळेजण सुन्न होऊन गेले होते. एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू अशी त्यांची अवस्था झाली होती. अतुल आणि अभिजीत दोघेही जिगरी दोस्त होते त्यामुळे दोन्ही घरची पण चांगली मैत्री होती.

दोघांकडच्या घरच्यांनी डॉक्टरांच्या अपेक्षेपेक्षा लवकर, आलेले आव्हान स्वीकारले. दोन्ही घरच्यांनी एक होऊन त्याला सांभाळायचे ठरवले. पण आता मोठा प्रश्न निर्माण झाला “तो “कोण? म्हणजे किरण चा XY. तो नक्की कोण? अतुल की अभिजीत? तोही निर्णय सगळ्यांनी किरण वरती सोपवला.

हळूहळू चांगल्या पद्धतीने त्याच्यात सुधारणा होत होती. सगळ्यांच्या मनावरचा ताण, चिंता कमी व्हायला लागली होती. तोच एक दिवस डॉक्टरांच्या टेबलवर एका वकिलांची नोटीस आली “तुमच्या हॉस्पिटलमध्ये दोन खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचसाठी डॉक्टरांनी अनुकूल तारखेला कोर्टामध्ये हजर राहावे “. हे वाचून डॉक्टर नवलकर सुन्न होऊन गेले.

डॉक्टर किरणनी मात्र त्यांना समजावले. ” बाबा, काही काळजी करू नका. आपण कोणाचे काही वाईट हेतूने केले नाही. मेडिकल असोसिएशन ची या ऑपरेशनला मान्यता आहे. मी सगळे सिद्ध करतो. तुम्ही अगदी रिलॅक्स रहा. “

एव्हाना परदेशामध्ये किरणच्या प्रयोगावर, त्याच्या निष्कर्षावर, त्याला मिळालेल्या रिझल्टवर कितीतरी डिस्कशन झाले आणि त्याला ऑनर व अवॉर्ड घोषित केले गेले. त्यामुळे त्याच्या प्रयत्नांना आणखीनच वजन आले.

आत्तापर्यंत “तो ” डोळे उघडून सर्वांशी बोलायला लागला होता. सरबत, दूध, वरून पातळ भात खायला लागला. किरणनी त्याचे नाव घोषित केले.

अक्षय रामकृष्ण घाडगे पाटील!

ऑपरेशन करतानाच XY असे किरणने मनोमन नाव दिले होते. दोघांच्या आधीच्या नावातले “अ ” अक्षय तयार झाला.

या अक्षयच्या केस चा निकाल ऐकायला आज कोर्टाच्या आवारात प्रचंड गर्दी झाली होती. मुद्दाम पत्रकार परिषद न घेताच, या प्रयोगाला मोठी प्रसिद्धी मिळणार होती. देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध मिळणार होती. देशाची मान ही या क्षेत्रातील कामगिरीमुळे उंचावणार होती.

मरायला आलेले दोन जीव वाचवून एक तरी आयुष्य मार्गी लावले गेले होते. बोलायला हे सोपे वाटले तरी प्रत्यक्षात ऑपरेशन करणे, त्या क्षणी तो निर्णय योग्य वेळेवर घेणे हे धाडसाचे होते जे डॉक्टर नवलकर आणि डॉक्टर किरण ने दाखवले होते. नुसता निर्णय घेतला नव्हता, तर तो प्रत्यक्ष कृतीतही उतरवला होता. नुकताच परदेशातून आल्या आल्या, आपल्या घरी ही न जाता, आईलाही न भेटता तडक हॉस्पिटलमध्ये तो आला होता. यावरून तो किती कर्तव्यदक्ष आहे हे कळून आले होते. ऑपरेशन नंतर पेशंटची दखल घेणे, त्याच्यावर लक्ष ठेवणे, त्यांच्या पालकांची मनस्थिती सांभाळणे, सोपे नव्हते. ते सगळे सीनियर डॉक्टर नवलकरांनी मोठ्या जबाबदारीने पार पाडले होते. त्यामुळे कोणा एका समाजकंटकाच्या मागणीवरून ‘तो’ खून मानून चालणार नव्हते. न्यायदान करताना अक्षयचे आयुष्य, डॉक्टर नवलकरांचे करिअर आणि अक्षयच्या आई-वडिलांची मानसिकता जपली जायला हवी होती.

या केस बद्दल देशमुख साहेब खूप विचार करत होते. देशमुख साहेबांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. वरवर पाहिले तर निश्चितच दोन जीव, दोन शरीरे जिवंत असताना कापली गेली होती. एका दृष्टीने निघृण खूनच होते ते! पण कशासाठी मारले होते? मारण्याचा उद्देश काय होता? अशा प्रकारच्या प्रयोगाला मान्यता द्यावी का? आत्ता दोन मुलांचीच शरीरे जुळवली होती. समजा असा प्रसंग आला की एका पुरुषाच्या शरीराचा एक भाग आणि दुसरा भाग स्त्रीच्या शरीराचा! काय होईल मग पुढे? अशा व्यक्तीला तो म्हणायचे कि ती? पण अशी दोन शरीरे ऍडजेस्ट तरी होतील का? हार्मोनल इम्बॅलन्सचा किती प्रॉब्लेम येईल. त्या दृष्टीने हे विचार करणे जरुरीचे होते.

देशमुख साहेब विचारात गढून गेले होते. या केसच्या बाबतीत मात्र सगळा सॉफ्ट कॉर्नर अक्षय आणि डॉक्टर नवलकर यांच्याच बाजूने होता. आजच्या घडीला तरी जगामधला हा यशस्वी प्रयोग असल्याकारणाने त्यावर काही शंका घेण्याचे कारणच नव्हते. आय. एम. ए. आणि परदेशातील मेडिकल कौन्सिलनेही या ऑपरेशनचा गौरव केल्यामुळे निश्चितच कौतुकास्पद होते. त्यामुळे देशमुख साहेबही निकाल देण्यासाठी सज्ज होते.

– – – आपल्या देशातल्या एका ऑपरेशनचे विश्लेषण करण्याचे, त्या डॉक्टरांचे कौतुक करण्याचे, हॉस्पिटलच्या स्टाफ चा गौरव करण्याचे, ते खून नाहीत हे सिद्ध करण्याचे आणि आपल्या देशाची मान उत्तुंग करण्याचा मोठा अभिमानाचा निकाल ते आज देणार होते. हे मोठे महत भाग्य त्यांच्या वाट्याला आले होते.

– – – किरणचे “मिशन अक्षय“ कमालीचे यशस्वी झाले होते.

– समाप्त – 

© सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मिशन अक्षय… भाग-१ ☆ सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

🌸 जीवनरंग 🌸

☆ मिशन अक्षय… भाग-१ ☆ सौ. अंजली दिलीप गोखले

कोर्टाच्या आवारात आज “न भूतो न भविष्यती” अशी गर्दी उसळली होती. आजचा निकाल ऐकण्यासाठी त्या दोघांच्या घरचे नातेवाईक, मित्र मंडळ, जुने वकील आणि नवशिके, तमाम डॉक्टर्स यांची सगळ्यांची एकत्र जत्राच भरली होती. सगळ्यांच्याच मनामध्ये कुतूहल होते. डॉक्टर लोकांनी ही केस गुप्त ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. पण प्रसार माध्यमाचे लोक थोडेच गप्प बसत आहेत? त्यांनी कुठून कुठून माहिती काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे डॉक्टरांच्या या प्रयोगाची कुणकुण सर्वांनाच लागली होती.

जीव वाचवण्याच्या प्रयत्नात कायद्याच्या अशा विचित्र कचाट्यात आपण सापडू असे त्यावेळी डॉक्टर नवलकर पिता पुत्रांना वाटलेही नव्हते. आपल्यासमोर दोन तरुण देह तडफडत आहेत आणि त्यांना वाचवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, याच भावनेतून त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती.

खरंतर त्या रात्री सीनियर डॉक्टर नवलकर, आपल्या परदेशातून शिकून आलेल्या डॉक्टर मुलाला आणायला विमानतळावर गेले होते. त्याचे विमान आल्यावर, त्याचे सामान त्याच्या ताब्यात मिळेपर्यंत जवळजवळ दोन तास गेले होते. त्यामुळे गाडीमध्ये सामान ठेवून घरी जायला रात्रीचे 12:30 वाजून गेले होते. घरी त्याची आई त्याला निरांजनाने ओवाळण्याची जय्यत तयारी करून वाट पाहत होती. तब्बल दोन वर्षांनी तिचा लाडका लेक, उच्च शिक्षण घेऊन, आपल्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये मदत करायला तयार होऊन आला होता. कधी एकदा आपल्या मुलाला डोळे भरून पाहते असे तिला झाले होते. पण वाट पाहणे काही संपत नव्हते.

आदल्या दिवशीच्या संध्याकाळपासून प्रवास झाल्यामुळे किरण कंटाळला होता. त्यामुळे बाबा ड्रायव्हिंग करतो म्हटल्यावर त्याने आज कोणतीच तक्रार केली नाही. विमानात एका ठिकाणी बसून पाय अगदी अवघडून गेले होते. विमानातले सपक-सपक खाणे, अगोड ज्यूस पिऊन, कधी एकदा आईच्या हातचे, ताजे चमचमीत खातोय असे त्याला झाले होते. तिकडून निघताना विमानतळावर त्याला गुडबाय करायला आलेल्या फ्रेंड सर्कलच्या सुखद आठवणीही अजून मनात रेंगाळत होत्या. इकडे परत यायची ओढ आणि तिथे मजेत घालवलेले दिवस, तिथली प्रॅक्टिकल्स, तिथले छान राहणीमान पण सर्वांचे तुटक तुटक वागणे, सगळ्या सगळ्यांनी मनात गर्दी केली होती. इकडे परत येण्याचा आनंद आणि तिकडचे सोडून येण्याचे थोडे दुःख अशा संमिश्र भावनांनी त्याच्या मनात गर्दी केली होती. शिवाय प्रवासाचा ताण, शिणवटा यामुळे नुसते डोळे मिटून राहणे त्याला बरे वाटत होते.

तेवढ्यात डॉक्टर नवलकरांचा मोबाईल वाजला. त्यांना वाटले घरूनच रिंग केली असणार. कधी येताय? कुठे आहात? पण पाहतात तर काय? त्यांच्या हॉस्पिटल वरून रिंग होती. काहीतरी इमर्जन्सी असल्याशिवाय रिंग येणारच नाही याची त्यांना खात्री होती. मोबाईल ऑन करून त्यांनी विचारले,

” डॉक्टर जोशी काय प्रॉब्लेम? “

” एक्सीडेंटच्या दोन सिरीयस केसेस आल्यात. प्लीज ताबडतोब येता का? “

” आत्ता? .. ठीक आहे ” म्हणून त्यांनी मोबाईल बंद केला.

” काय झालं बाबा? “

” अरे हॉस्पिटल मध्ये दोन सिरीयस केसेस आल्यात. हे बघ मी तुला घरी ड्रॉप करतो आणि ताबडतोब निघतो. “

” छे छे बाबा तसं कशाला? आपण आधी तिकडे जाऊ. घरी कळवतो मी तसे ” 

बाबांच्या होकाराची वाट न पाहता किरणने घरचा नंबर फिरवला.

” आई मी आलोय हं. पण पहिल्यांदा बाबांबरोबर हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो. अगं एक्सीडेंटच्या दोन इमर्जन्सी केसेस आहेत. तेवढ्या पाहतो आणि लगेच घरी येतो. “

काही क्षणातच दोघेजण हॉस्पिटलमध्ये आले. एक्सीडेंटच्या केसेस असल्यामुळे गर्दी जमा झाली होती. पण तिकडे लक्ष न देता दोघेही पेशंटकडे धावले. इमर्जन्सी बोर्ड मध्ये दोन टेबलांवर दोन तरुण मुले बेशुद्ध होऊन पडली होती. एकाला मोटरसायकलवरून सुसाट येताना जोरात धडक बसली होती, मागच्या सीटवरचा मुलगा उडून ट्रकच्या चाकाखाली आला होता आणि गाडी चालवणारा ट्रक वर जोरात आदळला होता. त्यामुळे पुढच्याला हेड इंजुरी सिव्हियर होती आणि कमरेपासून खाली चिरडले गेले होते. हेवी ब्लीडिंग मुळे दोघेही बेशुद्ध होते. काय करावं? दोघे वाचण्याची शक्यता तरी आहे का? डॉक्टर ना काही समजेना.

स्ट्रेचरवरून दोघांनाही ताबडतोब ऑपरेशन थिएटरमध्येच हलवलं, डॉक्टर विचार करायला लागले. दोघांनाही इतका जबरदस्त मार लागला होता, की काही करता येणं अशक्यच होतं. प्रयत्न प्रयत्न तरी काय करायचे? मेंदूचा पार चक्काचूर झाला होता, छातीच्या फासळ्याही तुटल्या होत्या. नाही म्हणायला याचा कमरेखालचा भाग शाबूत होता आणि दुसऱ्याचे डोके आणि छाती शाबूत होतीं. काय करावं? कशी ही हल्लीची बेजबाबदार मुलं? कसा थोडाही विचार करत नाहीत? यांच्या आई-वडिलांनी काय करायचं आता? कसा धक्का सहन करणार आहेत हे? डॉक्टरांनाच काही सुचेना.

 ” बाबा एकच पर्याय दिसतोय मला आणि तोही ताबडतोबच केला पाहिजे ” किरण म्हणाला. आपल्या भुवया उंचावून डॉक्टरांनी किरणकडे पाहिले. याला अजून पर्याय सुचतोय? अरे काहीतरी शक्य आहे का या ठिकाणी? “

 ” बाबा, मी नुकतीच ऑर्गन इम्प्लांटेशनची ऍडव्हान्स सर्जरी शिकलोय. त्याचा प्रयत्न अर्थात प्रयोग करून पाहायचा का? या ज्या दोन इंजुर्ड वेगवेगळ्या बॉडीज आहेत, त्यातले दोन शाबूत भाग एकत्र करून एकच व्यक्ती आपण वाचवू शकतो. कळतंय ना मी काय म्हणतो ते? “

” अरे पण कसं शक्य आहे हे? ” 

” आहे बाबा, तुम्ही फक्त हो म्हणा. मी प्रयत्न करून पाहतो “

 डॉक्टरांनी होकाराची नुसती मान हलवली.

एव्हाना हॉस्पिटलचे अनेस्थेटीस्ट, ट्रेंड नर्सेस, ऑपरेशन थिएटरचा मेन चार्ज असणारे सगळे जमा झाले होते. डॉक्टर किरणनी सगळ्यांना अगदी थोडक्यात आपण करून पाहणार असणारा प्रयोग सांगितला. जितक्या लवकर ऑपरेशन सुरू होईल, तेवढे हवे होते. नाहीतर दोन्ही आयुष्यांचे दिवे विझतच चालले होते.

ऑपरेशन थिएटरचे दार बंद झाले. बाहेर लाल दिवा लागला. इकडे किरणचे हात झपाट्याने कामाला लागले. दोघांना वेगवेगळी ऑपरेशन्स करून वाचवणे शक्यच नव्हते. हेड इंजुरी झालेल्याचे हार्ट ही आता हळूहळूच सुरू होते. दुसऱ्याच्या पायाचा चक्काचूर झाला होता. आता दोन तरुण वाचणे केवळ अशक्यच होते. पण दोघांमुळे एक तरुण तयार होऊन वाचू शकत होता. एक नवीन आयुष्य सुरू करता आले असते.

दोघांचे निकामी भाग पटकन सुटे करून, चांगले भाग लवकरात लवकर जोडणे हेच मोठे दिव्य ऑपरेशन किरण आज करणार होता. आपल्या समोरील पेशंटला वाचवणे हाच डॉक्टरी पेशाचा धर्म होता आणि किरणला तेवढेच दिसत होते.

आपल्या मनामध्ये ऑपरेशनचा आराखडा झटकन त्याने तयार केला. एका शरीरातील डायफ्रॅम च्या वरचा शाबूत असलेला भाग म्हणजे X एक्स आणि डायफ्रॅम च्या खालचा शाबूत असलेला भाग म्हणजे Y वाय. आपल्याला X+Y=XY असे करायचे आहे. आपल्या समोरील आव्हान किती अवघड आहे, याची किरणला कल्पना होती. पण आता डगमगायचे नाही. प्रयत्न करायचे असा निश्चय करून किरणने बाबांना X ची अन्ननलिका Y च्या जठराला जोडायला सुरुवात करायला सांगितले. त्यानंतर रक्तवाहिन्या, स्नायू एवढे बाबांसाठी जोडायचे ठेवून त्याने मुख्य मज्जा रज्जू, spinal cord सांधायला घेतला. त्याचा मेंदू आणि हात कुशलतेने आणि अतिशय एकाग्रतेने कामाला लागले होते.

खरंतर दोन वेगवेगळ्या शरीरातील पेशी, अवयव साधणे म्हणजे दिव्यच होते. जेवढी सर्जरी अवघड होती, तेवढ्याच त्यानंतरचा त्या बॉडीचा मिळणारा रिस्पॉन्स ही अवघड होता. महत्त्वाचा होता. त्यावरच त्या ऑपरेशनचे यशापयश अवलंबून होते.

जर हे ऑपरेशन यशस्वी झाले, तर हे पहिले यशस्वी ऑपरेशन ठरणार होते. संपूर्ण जगात ही अशी कॉम्प्लिकेटेड सर्जरी अजून तरी झाली नव्हती. तिकडे अभ्यास करताना एकाचा तुटलेला हात किरणने आपल्या सरांच्या मदतीने जोडला होता. किडनी ट्रान्सप्लांट केली होती. त्याच्या सरांनी केलेले हार्टचे ऑपरेशन ही त्यानी अगदी जवळून पाहिले होते. पण टोटली दोन वेगवेगळ्या बॉडीज जॉईन करून जीवनदान द्यायचा हा पहिलाच प्रयोग होता. आपल्या या प्रयत्नांना परमेश्वराची कृपा लाभली तरच हे ऑपरेशन यशस्वी होणार याची किरणला खात्री होती. मनोमन देवालाही नमस्कार करूनच त्यांनी या ऑपरेशनचा निर्णय घेतला होता.

ऑपरेशनने पूर्ण स्पायनल कॉर्ड तर जुळवला. आता व्हर्टिब्रल कॉलमचे व्हर्टिब्रे जुळवणे कठीणात कठीण होते. अर्थात ही तात्पुरती डाकडूजी ठरणार होती. सांधलेल्या हाडांमध्ये ओसिफिकेशन होऊन व्हर्टिब्रल कॉलम पूर्ण तयार व्हायला काही दिवसांच्याच काय आठवड्याचा महिन्याचाही अवधी लागणार होता.

 – क्रमश: भाग पहिला 

© सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “चातुर्मास माझ्या आवडीचा…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

☆ “चातुर्मास माझ्या आवडीचा…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

परंपरेनी चालतं आलेलं स्तोत्र, मंत्र, आरत्या, पूजा हे सगळं तिला फार आवडायचं. ती मनोभावे ते करायची.

पुढच्या पिढीचा मात्र तिला मनातून फार राग होता. यांना काही सांगायची सोय नाही…. प्रत्येक गोष्टीचं कारण विचारायचं… हे का.. आणि ते का.. जाऊ दे…. पण आपलं आपण तरी करायचं हे तिने ठरवलं होतं.

आज श्रावणी सोमवार होता. तिची पूजा आरती झाली. कहाणी वाचून झाली. फराळ करायच्या आधी तिला देवदर्शन करायचे होते. म्हणून ती शंकराच्या देवळात जायला निघाली. निघताना नवऱ्याने, घरच्यांनी तिला जरा टोकलंच…. पण त्यांचं न ऐकता ती निघाली.

मैत्रिणीला तरी विचारावे म्हणून ती पलीकडे राहणाऱ्या मैत्रिणीकडे गेली.

मैत्रिणीने दार उघडले. ती गडबडीत होती.

“ये ग”… म्हणाली.

” तू येणार नसशीलच तरी पण विचारते येणार आहेस का शंकराच्या देवळात दर्शनाला ?….. “

“अगं आता कसं ग मला जमणार? सुनबाई दहाला ऑफिसला जाणार. नातं शाळेतून येणार, कामवाली…… “

” दे दे आयुष्यभर तू न येण्याची शंभर कारणं दे. “

ती जरा रागावली मैत्रिणीवर.

” आज एवढा श्रावणी सोमवार आहे तुला काही नाही त्याचं….. “

“तसं नाही ग… जबाबदारी आहे. सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या उद्योगाला जावं लागतं.. “

” संसार आयुष्यभर पाठी लागलेला आहे… त्याच्यात किती गुंतून राहणार आहेस?मग देवधर्म तू कधी करणार?”

” अगं नातं लहान आहे. जरा मोठी झाली की… “

मैत्रीण बोलत होती पण तिचं काही न ऐकता ती निघाली…

साडेनऊ झाले होते. रीक्षा दुसऱ्या रस्त्याला लागलेली बघून तिने विचारले,

“अरे रिक्षा इकडे कुठे?”

” आजी शंकराची रांग इकडे बोळात वळवली आहे. आज खूप गर्दी आहे. श्रावणी सोमवार आहे ना.. “

” हो का? बरं.. “

तिने पूजेचे ताटं घेतलं. नारळ, हारं फुलं, साखर फुटाणे..

ती रांगेत उभी… बायका मुली मजेत होत्या. फोटो घेणं, गप्पा मारणं, व्हीडीओ काढणं चालू होतं. फोन चालू होते. रांग हळूहळू सरकत होती.

पाऊण तास झाला होता.

देऊळ अजून दूर होत. हातातलं ताट जड वाटायला लागलं…

मनातल्या मनात ” शिवमहिम्न” म्हणायचं होत….. “जय शीव ओंकारा” आरती म्हणायची होती… पण गोंधळ गडबड आवाज… ईतका होता की बस्स….. त्यामुळे मनाला शांतता नव्हती..

दीड तासानंतर देऊळ दिसलं. फुलांनी सजवलेलं लाइटिंग केलेलं आज वेगळं दिसत होतं.

आता रेटारेटी सुरू झाली.

 ताट हातात धरून हात भरून आला होता.

लांबून दर्शन घेतलं.

समोर ठेवलेली शंकराची छोटी मूर्ती आज हारात बुडून गेली होती. तिथल्या गुरूजींनी, नारळ, हार देवाला स्पर्श करून बाजुला ठेवला…

जेमतेम एक मिनिट दर्शन मिळालं…

चार माणसं गर्दी हटवायला होते

” चला पुढे चला… ” म्हणत होते. ती आपोआप पुढे सरकली…

आज देवं नीट दिसले नाहीत….

केवळ दर्शनासाठी घरी कुणाचं न ऐकता अट्टाहासानी ती आली होती…

देवळात तिच्याबरोबर न आलेल्या मैत्रिणीची तिला आठवण झाली…

लांबून कसंतरी दर्शन झालं.

खरंतर दर्शन झालं असं उगीच म्हणायचं….

रुखरुख लागली तिला….

रिक्षा करून ती घरी निघाली. दमली होती… दमण्यापेक्षा दर्शन नीट झाले नाही… त्यामुळे मनाला आज समाधान वाटत नव्हते.

मैत्रिणीचे दार उघडे होते. समोर ती खुर्चीवर बसली होती.

मैत्रिणीची नात नाचत समोर आली म्हणाली.

” आजी बाप्पाचा प्रसाद घ्यायला ये ना… “

घरातला शंकराचा फोटो मैत्रिणीने टीपॉयवर ठेवला होता.

त्याला हार, फुलं घातली होती. समई, निरांजन तेवत होतं. प्रसाद समोर ठेवला होता.

मैत्रीण म्हणाली..

” झाल ना दर्शन.. आता ये ग… बैस थोडा वेळ.. तुला काॅफी करते. दमल्यासारखी दिसतेस… “

अस म्हणून मैत्रीण आत गेली.

ती थकून खुर्चीवर बसली. मनात विचार चक्र सुरू झाले…

सकाळी गडबडीत असलेली मैत्रीण आता शांत होती. सुनबाई, नवरा, मुलगा ऑफिसला गेले होते. कामवाली बाई येऊन घर साफ करून गेली होती. नात शाळेतून आली होती.

सकाळी पूजेनंतर वाचलेली खुलभर दुधाची कहाणी तिला आठवली….

ईतकी वर्ष आपण ती कहाणी वाचायची म्हणून नुसतीच वाचली…

मैत्रिणीने केलेली पूजा बघून

तीला आज ते मनोमन जाणवले..

त्यात लपलेला खोल मतीतार्थ आपण कधी समजून घेतला नाही.

तिला आठवली शुक्रवारची कहाणी…

सहस्त्र भोजन घालणारा भाऊ गरीब बहिणीला जेवायला बोलवत नाही. तरी ती जाते. भाऊ तिला हाकलून देतो. काही दिवसांनी तीचं दळींद्र जातं. ती समर्थ होते. मग भाऊ तिला बोलवतो. जेवायला गेल्यावर ती दागिन्यांवर एक एक पदार्थ ठेवते…. या कहाणीतून तर केवढा मोठा बोध घेता येईल………

दानाचं महत्त्व सांगणाऱ्या कहाण्या, व्रत का करावं हे सांगणाऱ्या, देव प्रसन्न कसा होईल ?, जगात कसे वागावे ?, चूक नसताना दोष देऊ नये,

प्रत्येक कहाणीतून केलेले विचार प्रबोधन तिला आठवायला लागले.

ललिता पंचमीची, महालक्ष्मीची, श्रीविष्णूची कहाणी आणि इतरही कहाण्या अर्थ समजून परत नीट वाचायला हव्या आहेत.. हे तिच्या लक्षात आले.

अरेच्या…. म्हणजे यासाठी होत्या का या कहाण्या….

देवा चुकले रे मी..

खुलभर दुधातल्या कहाणीतल्या म्हातारी सारखा मैत्रिणीने मुलाबाळांचा, सुनेचा, नातवंडांचा आत्मा तृप्त करून मग पूजा केली होती.

समाधानानी मनाचा गाभारा कसा भरायचा हे आज मला कळले रे…

या कहाण्यात सांगितलेला बोध प्रत्यक्ष आचरणात आणायला हवा आहे. हे आता तिच्या मनाला पटले.

आपल्याला बऱ्यापैकी भानं आलेल आहे. आता आपण स्वतःला बदलायचचं…

उतायचं नाही मातायचं नाही. आता हा सुदृढ विचारांचा वसा टाकायचा नाही असं मनोमन तिने ठरवलं.

तरच ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होईल…….

हे तिच्या लक्षात आले.

सुखानी नांदायचं असेल तर रोज जगताना कसं वागलं पाहिजे हे या कहाण्या शिकवतात.

मैत्रिणीनी कॉफीचा कप तिच्या हातात दिला.

आणि नातीला म्हणाली,

” तु पाठ केलेलं आजीला म्हणून दाखव”

नातं फोटोसमोर हात जोडून ऊभी राहून म्हणायला लागली..

” कैलास राणा शिवचंद्रमौळी 

फणींद्र माथा मुकुटीं झळाळी

 कारुण्य सिंधू भवदुःखहारी

तुजविण शंभो मज कोण तारी “

नातीने तिला प्रसाद दिला.

तिने शंकराच्या फोटोला मनोभावे नमस्कार केला.

चातुर्मासातल्या या नुसत्या कहाण्या नाहीत तर आपल्याला संपूर्ण जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या आहेत हे तिला समजले…. पुढच्या पिढीला नुसती नावं ठेवून उपयोग नाही तर त्यांना आपण शिकवले पाहिजे.. तरचं ती शिकतील हे तिच्या लक्षात आले.

आता पावलं त्या वाटेनी टाकीन रे….

तिने देवासमोर कबुली दिली…

कहाणी संपली.

तिचे डोळे भरून आले होते…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मिळवती झाले, काय मिळवले? – भाग-२ ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

?जीवनरंग ?

☆ मिळवती झाले, काय मिळवले? – भाग-२ ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

(मुलांच्या शिक्षणासाठी, भवितव्यासाठी, त्यांना कधी काही कमी पडू नये यासाठी, त्यांचे वेगवेगळे छंद सहजपणे जोपासण्यासाठी माझं मिळवतं असणं किती उपकारक आहे हे नोकरी न करणाऱ्या आयांकडे पाहून अधिकच जाणवू लागलं.) – इथून पुढे —

कुठचाही गर्व नव्हता, पैसे मिळवते म्हणून मिजास तर नव्हतीच नव्हती. पण मुलांना उत्तम त-हेने वाढवतोय, त्यांचा व्यक्तित्व-विकास साधू पहातोय याचा अभिमान, त्याहीपेक्षा हा आनंद मात्र नक्कीच खूप जास्त होता. नोकरी करतांना मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही ही खंत होती. ‘‘आई, इतर मुलांच्या आया कशा शाळेत येतात, बाईंशी बोलतात. तू मात्र कध्धीच येत नाहीस शाळेत. ” असं खट्टू होऊन मुलं कधीकधी म्हणायची. मन खूप कातर व्हायचं तेव्हा. वाटायचं चार दिडक्यांसाठी केवढी ही यातायात. आणि नेमक्या अशाच वेळी, मुलांच्या ट्रीपसाठी, गॅदरिंगसाठी, स्कॉलरशिपच्या स्पेशल क्लाससाठी, शाळेच्या इमारतीच्या निधीसाठी या आणि अशा असंख्य कारणांनी किती पैसे वरचेवर खर्च करावे लागतात हे आठवायचं. एकटाच कमावता असणाऱ्याच्या पगारात घरदार चालवितांना घरातल्या सर्वांच्याच मनाची होणारी कुतरओढ, सर्व आघाड्यांवर एकट्यानेच एकाचवेळी लढतांना करावी लागणारी उरस्फोड आसपास दिसायची आणि त्या माझ्या त्या चार दिडक्यांची किंमत झर्रकन् जाणवून जायची. या असल्या वारंवार उद्भवणा-या प्रसंगातून, मुलांच्या सर्व गरजा विनासायास भागविण्यासाठी पैसे मिळवणं अधिक गरजेचं आहे, नोकरी ही एक अविभाज्य गरज आहे हे वास्तव मनाला पूर्ण पटलंच होतं. आणि एकदा हे पटल्यावर उगीच खंत करत बसण्यापेक्षा, मिळणारा रिकामा वेळ जास्तीत जास्त करून मुलांसाठी राखून ठेवावा हे शक्य होतं.

या असल्या झोपाळ्यावरच बसून झुलणा-या विचारांना सोबत घेऊन काळ पळतच होता. मुलं मोठी होत होती. आवश्यक ते सर्व संस्कार, हौस, मौज-कौतुक, सगळं उरीपोटी धडपडून केलं जात होतं. त्यांच्या दुखण्या खुपण्यासाठीच जणू रजा साठत होती – संपत होती. नोकरीत मिळणा-या LTC सारख्या अनेक सवलतींचा उपयोग लहान वयातच मुलांना प्रवासाचा अनुभव, मजा मिळवून द्यायला, आपल्या देशातली सौंदर्यस्थळं दाखवायला करता येत होता. त्यांच्या आवडीचे नाटक सिनेमे, प्रत्येक वेळी भेळ-आईस्क्रीम सकट, या मिळवतेपणामुळेच फारशी तारांबळ न होता पार पडत होते. मुळात संसाराची खूप आवड होतीच म्हणून आणि नोकरीमुळे घराकडे दुर्लक्ष करते असं कोणी म्हणू नये म्हणूनही रात्रीचा दिवस करून, दिवाळीचा फराळ, गौरीगणपतीची आरास, वाढदिवसांचे केक सारं-सारं घरीच केलं जात होतं… कदाचित् जास्तच नेटकेपणाने. रजा काढून, वेळेत सवलत घेऊन, वेगवेगळ्या कारणाने सवाष्ण-ब्राह्मण जेवू घातले जातच होते. स्वत:च्या कुवतीचा परीघ पुरेसा लवचिक करून हवा तसा मोठा करण्याची ही उमेद मला नोकरीनेच दिली होती ना?

आणखी एक गोष्ट प्रकर्षाने याच काळात जाणवली. नवरा काय किंवा सासरचे इतर कोणी काय, त्यांची निगा – हो निगाच म्हणायला हवं, वेळच्यावेळी राखली की मग मी दिवसभर नोकरी करायला त्यांची हरकत नव्हती. कारण मी क्वचितही कर्तव्यात कसूर करणार नाही हे त्यांना ठाऊक होतं. म्हणून जे बरं चाललं होतं त्याला आधार परत मिळवतेपणाचाच.

 आणि हो, घरात निर्माण झालेल्या कुठल्याही प्रश्नाचं खापर फोडायलाही हा नोकरीरूपी दगड होताच – सोशिक, सहनशील, सदैव हवाच असलेला, ‘तुझी काही गरज नाही’ असं गुरकावणारा समोरचा माणूस मनातून आपल्यावर खूशच आहे हे मनोमनी जाणणारा.

जरा वय वाढलं तसं घरात मदतीला कोणी बाई नेमावी असं वाटू लागलं. नोकरीच्या जीवावर उधळपट्टी चाललीय, मिजास वाढलीय् इ. बोलण्यांकडे दुर्लक्ष करण्याएवढा मनाचा घट्टपणा नोकरी करतांना केव्हाच मिळाला होता. जणू एखादा परममित्रच. शिवाय मी दोन बेरोजगारांना रोजगार मिळवून देत होते हा एक समाधान देणारा मुद्दा वेगळाच.

 कितीक प्रसंग – घर की नोकरी हा प्रश्न पाडणारे – पण एव्हाना हे प्रश्न पेंढा भरलेल्या वाघासारखे असतात हे कळलं होतं. कारण प्रत्येक प्रश्नाला घरासाठी नोकरी हेच उत्तर येत होतं. कसाही विचार केला तरी. साड्या-दागिने-हॉटेलिंग यासाठीच नोकरी कधीच नव्हती. हां, नोकरीमुळे मी माझा व्यक्तित्व विकास, मुलांचे उत्तम शिक्षण, आणि एकूणच सर्व घराची आर्थिक उन्नती.. याला नक्कीच हातभार लावतेय याचा मला अभिमानच वाटायला हवा ना? अपराधीपणाची भावना कशासाठी? आल्यागेल्याला काही काळ दिलासा, लायक गरजू माणसाला जमेल तेवढी आर्थिक मदत या मिळवतेपणामुळेच शक्य होत होती. मुलांना वेळ कमी देता येत असला तरी, त्यांच्या बाबतीत कुठल्याच कर्तव्यात मी कमी पडत नाही हे मी कणखरपणाने सांगू शकत होते ना?

बाहेरगावी जावं लागेल, घराकडे, मुलांकडे दुर्लक्ष होईल म्हणून, चालत आलेली प्रमोशनची संधी मी आपणहून नाकारली तेव्हा खूप क्लेश झाले मनाला. मी माझ्यासाठी की इतरांसाठी हे द्वंद्व कित्येक दिवस चालू होतं मनात. शेवटी ‘मिळवती’ पेक्षा ‘आईचा’ विजय झाला. हे compromise – कर्तव्याचा आनंद आणि स्वत्त्व दुर्लक्षिले याचे दु:ख… दोन्हींचा एकदम अनुभव देणारं – हीसुद्धा मिळवतेपणाचीच देणगी.

आता मुलं इतकी मोठी झालीयेत की दोन वेळेची जेवणाची सोय करण्यापलीकडे, आणि बाबांबद्दल खात्री नसेल तेव्हा आईकडे पैसे मागणे यापलीकडे आईची गरज राहिलेली नाही. आणि हो, इतके दिवस, ‘‘आई, तू किती वेळ बाहेर असतेस घराच्या ” असं म्हणणारी तीच मुलं ‘‘आई तुला काही माहिती नाही, बाहेर जगात काय चाललंय् ते ” असं म्हणून माझ्यावरच गुरगुरू पहातात तेव्हा हसूच येतं मला – एक समाधानमिश्रित हसू.

असं वाटतं, ‘बरं झालं नाहीच सोडली नोकरी ते’ – हाच विचार माझ्या समवयस्क मिळवत्यांना मनात येत असणार. नाही माझी खात्रीच आहे तशी. नाहीतर स्वेच्छानिवृत्तीची सवलत असूनही फारशा मिळवत्या बायका त्याचा फायदा घेतांना दिसत नाहीत. सगळ्यांनाच जाणवत असणार की, मुलांचा सहवास, घराचा सहवास, काही प्रमाणात शरीरस्वास्थ्य यासारखं महत्त्वाचं काही गमावलं असलं तरी कितीतरी, एरवी हरवल्यासारख्या झाल्या असत्या त्या गोष्टी या मिळवतेपणामुळेच तर मिळाल्या होत्या ना? स्वत:च्या कर्तृत्वाची जाणीव, धीटपणा, निर्णयक्षमता, आत्मविश्वास, कणखरपणा, सर्वांशी जमवून घेण्याची सवय, अशा कितीतरी आधारकाठ्या, ज्या मिळवती झाल्यावर माझ्याही नकळत सहजपणे माझ्या हातात आल्या, त्यांच्या आधारानेच तर घर-नोकरी ही तारेवरची कसरत जमून गेली. त्याबद्दल नोकरीचे आभार तरी किती मानावे?

Self help is the best help असं म्हणतातच ना?

इतकं शिकूनही फक्त स्वयंपाकपाणी करत घरी बसावं, सर्वांनी आपल्याला गृहीत धरावं, आपापल्या तालावर नाचायला लावावं, स्वत्त्व विसरायला लावावं आणि आपल्या हातात कोणतेच पत्ते नसल्याने, येणाऱ्या सगळ्या अडचणी आणि त्यासाठी फक्त स्वतःला गृहीत धरलं गेलं तरी ते सगळं मुकाट सहन करावं, यापेक्षा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून संसारातल्या संकट वाटाव्यात अशा कितीतरी गोष्टी सहजपणे हाताळायला शिकवणारं.. त्यासाठी बळ देणारं मिळवतेपण नक्कीच चांगलं नाही का?

असं म्हणून हुश्श म्हणता म्हणता दचकलेच. ५ मिनिटात केवढा प्रवास करून आलं मन.

 आणि मग एकदम एक विचार चमकून गेला मनात –

‘‘ कुछ पानेके लिये कुछ खोना पडता है।” असं खेदाने म्हणण्याऐवजी, आपण दिलखुलासपणे असं का नाही म्हणावं… ‘‘ कुछ खोनेके लिए पहले कुछ पाना तो पडता है ना?”

– समाप्त –

© सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares