मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘सांवर सभा…’ ☆ राधिका -माजगावकर- पंडित ☆

राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘सांवर सभा…’ ☆ राधिका -माजगावकर- पंडित ☆

आमचं एक छोटसं ज्येष्ठ कनिष्ठ मंडळींचं एक मंडळ आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीप्रमाणे आनंदी, उत्साही, निराश झालेले तरुण वर्ग आणि त्रासलेले, तसेच विविध स्वभावाचे हंसतमुख उमद्या व्यक्तिमत्त्वाचे आजीआजोबा आजी पण आमच्या हया ‘सांवर’ नावाच्या मित्र मंडळात आहेत.

आज अन्वयचा मूड ठीक दिसत नव्हता तर हात पाय गुडघे दुखतात म्हणून कार्लेकर आजोबा त्रासलेले होते. अशा बऱ्याच जणांची तब्येतीबद्दल कुरकूर तक्रार चालू होती.

मानकर काका म्हणाले “माझ्याच नशिबी कां ही गुडघेदुखी? आजी म्हणाल्या ह्या कमरदुखीने मी हैराण झाले आहे, देवा परमेश्वरा हे जीणं नको रे बाबा! कधी वर बोलावतोस नारायणा? ज्येष्ठांचे हे दुःख तर तरुण तगडाबाज अमर कुरकुरला,

” तुमचं ठीक आहे आजी वय झालंय तुमचं पण आमच्या पुढे उभं आयुष्य पडलय त्यातून एक्सीडेंटमध्ये माझं मनगट मोडलय, माझं का नशीब असं? माझाच कां एक्सीडेंट व्हांवा?

मी म्हणाले, अमर असा निराश होऊ नकोस.

अरे! झाला एक्सीडेंट, व्हायचं ते होऊन गेलंय आता तीच ती गोष्ट उगाळत न बसता पुढे काय करता येईल ते बघ. असाही पॉझिटिव्ह विचार कर की हातावरचं मनगटावर निभावलं जीव वाचला तुझा. लगेच दवाखान्यात उपचारही झाले आणि आता प्लॅस्टर काढल्यावर तुझं मनगट मोकळं होऊन, फिजोओथेरपी होऊन तु दणकट होणार आहेस. तरुण पोरं तुम्ही! म्हाताऱ्यांची काठी व्हायचेय तुम्हाला, मग ती काठी मजबूतच असायला हवी आहे हो ना? मोडून कसं चालेल 

तरी पण अमर निराशेने पुटपुटला, “आमचं नशीबच फुटकं माझ्या इतका त्रास कुणाला झाला नसेल” त्याला शांत करताना मला एक वाचलेली आदर्श कथा आठवली आणि ती अनुभव सिद्ध सत्यकथा ऐकायला जेष्ठांनी उत्सुकतेने कानात मशीन सरकवलं. तरुण मंडळी उतावळी होऊन पुढे सरकली.

मी म्हणाले तुमच्यासारख्याच तरुण जिद्दी तडफदार लेडीज डॉक्टरांची ही आदर्शवादी कहाणी आहे. अनेक जीवघेण्या संकटांशी सामना तिला करावा लागला सुरुवात झाली ती डोळ्यापासून, तुम्हा आम्हाला तरी देवाने हात पाय दिले आहेत. सुंदर डोळे दिलेत.. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.. म्हणतात ना ते अगदी खरं आहे. तिची नजरशक्ती कमी झाली नंतर डोकेदुखी सुरू झाली निदान होईना असहय डोकेदुखी पिच्छा सोडेना, निदान होईना. डोकेदुखी तिला सहन होत नव्हती. डोक्याचा MRI काढला 

ऐक अरे! सुधीर दुर्दैव तिच्या हात धुवून पाठीशी लागलं होतं. मेंदूच्या अगदी तळाशी कठीण जागी ट्यूमरची गाठ होती ती कमालीची हबकली कसली पण हा लढा तिला एकटीलाच द्यायचा होता की नाही! तिने स्वतःला सावरलं. डॉक्टरच होती ती पेशंटला सावरण्याची कला तिला चांगलीच अवगत होती आपण मनाचे गुलाम नाही व्हायचं तर मनाला लगाम घालून त्यालाच आपलं गुलाम बनवायचं. हे वाक्य तिने मनात ठसवलं आता स्वतःला सावरण्याची वेळ तिच्यावर आली होती डॉक्टर स्नेह्यांनी तिला फार मोठी मदत केली. त्यांनी तिला दिलासा देऊन कॉन्फरन्स मध्ये सामील केल. तू लवकरच पूर्ण बरी होशील हे आश्वासन देऊन ती गाठ काढण्यात आली.

पूर्ण हॉलमध्ये कमालीची शांतता होती मग पुढे काय झालं ही उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती मकरंदला रहावले नाही त्यानी सगळ्यांच्या मनातला प्रश्न विचारला, ” सांगा ना मॅडम पुढे काय झालं? कसली गाठ होती ती कॅन्सरची तर नव्हती ना? मी हसून सगळ्यांची उत्सुकता उलगडली. ” मकरंद नाही रे बाळा! जमेची बाजू ही की, गाठ कॅन्सरची नसून ब्रेन ट्यूमर होता.

सगळ्यांनी एकदम निश्वास सोडला इतकी आमची ही मंडळी प्रसंगाशी एकरूप झाली होती. मी कथेची गाडी पुढे चालू ठेवली मानसिक संतुलन सांभाळताना ती बहाद्दर डॉक्टर, छन्दाकडे वळली. मेंदूची आणि छंदाची सांगड घालून ती चित्रकलेकडे वळली छंदाच्या माध्यमातून तिने भावनेची वाट मोकळी केली.

” मॅडम निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे रेखाटली का त्या डॉक्टर मॅडमने? अनघाला कमालीची उत्सुकता होती.

” नाही अनघा ते वेगळे चित्र होतं आपण मनातलं शब्दात, कागदावर उतरवतो. तिने ते चित्रात उतरवलं. आणि बरं का! त्याचं वैशिष्ट्य, वैविध्य म्हणजे तिने मेंदुचे चित्रकाढलं. गाठ अवघड ठिकाणी होती पण ही अत्यंत कठीण शस्त्रक्रिया तिच्या डॉक्टर मित्रांनी किती कौशल्याने काढली, हे चित्र तिने

रेखाटलं इतर पेशंट पुढे मांडल तिचं उद्दिष्ट एकच होतं की कुठलाही रोग दुर्धर नसतो. संकटावर मात करून त्याला मागे सारून पुढे जाण्यातच सार्थकता असते.

नाना आजोबा म्हणाले,

” किती धैर्याची आहे पोरगी डॉक्टरांचेही आभार बोटातल्या कलेतून तिने मांडले ही पद्धत फार आवडली मला. अगदी वेगळ्या पद्धतीने कृतघ्नता व्यक्त केली आहे या कुशल आणि हुशार डॉक्टर महिलेने. “

मी म्हणाले, “नाना काका एवढंच नाही तर तिने हे पेंटिंग सेंटरला भेट दिलंते बघून इतर डॉक्टरटीम मग प्रेमाने जोमाने, पुढील यशस्वी कारकीर्दीसाठी सज्ज झाली. इतर निराश पेशंटनाही तिनेअसं दाखवून दिलं डॉक्टरमंडळींना अवघड केस यशस्वी करण्यात केवढं कसब पणाला लावावं लागतं, विज्ञान खूप खूप पुढे गेलं आहे. विज्ञान प्रगती खरंच कौतुक करण्यासारखीचं आहे” 

दातार आजी, “म्हणाल्या धन्य आहे ग बाई त्या डॉक्टरणीची आणि तिच्या चित्रकलेची. इतर पेशंटला एक नवीन धडा घालून दिला आहे तिने. पुढचं ऐकामंडळी तिने भेट दिलेलं चित्र हॉस्पिटलला हॉलमध्ये उभं आहे त्याखाली तिचं नाव गाव आणि शस्त्रक्रियेचा इतिहास तिने लिहिलाय. हॉलमध्ये प्रवेश करताना निसर्ग चित्राऐवजी हे आगळ वेगळं तैलचित्र माणसं बघतात. खाली लिहिलेला इतिहास वाचून अंतर्मुख होतात. ” 

हे सगळं ऐकून सुधांशु उस्फूर्तपणे म्हणाला, “खरं सांगू मॅडम माझ्या मनात आलंय जणू काही ते मेंदूचं चित्र सगळ्यांना सांगत असेल निराश होउ नका संकटाचा डोंगर ओलांडल्यावर आशेची सूर्यकिरणे समोर येतीलच. आम्हा तरुणांनाही हा बोध घेण्यासारखा आहे. मिस्कीलपणे हंसत पुढे तो म्हणाला, बरं का मित्रानो, पेशंट म्हणून नाही हं जायचं त्या दवाखान्यात पण ते ©®बोधचित्र पाहण्यासाठी आपण नक्कीचतिथे जाऊ आणि त्या हॉस्पिटलला भेट देऊ. सगळीकडून भरभरून होकार आला. अशा प्रकारे हसत खेळत कार्यक्रमाची सांगता झाली आणि आमची सांवर सभा संपली 

धन्यवाद.

© राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आटपाटनगर… ☆ सुरेखा सुरेश कुलकर्णी ☆

सुरेखा सुरेश कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ आटपाटनगर… ☆ प्रस्तुती – सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी ☆

“ऐका गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मने, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे. तिथे विनायकाची देवळे. मनाचा गणेश मनी वसावा आणि त्याचा वसा घ्यावा.. ” चातुर्मास सुरू झाला की घरोघरी कहाणी संग्रह घेऊन त्याचे वाचन सुरू होई. सारे कुटुंब एकत्र येऊन बसायचे, वेळ संध्याकाळची. कामधाम उरकून कुटुंबीय निवांत होण्याची ही संधी असे. सांजवात लावून देवाला व ज्येष्ठांचा वंदन करावे. आणि कहाणीची सुरुवात करावी.

विशेष तर आषाढ अमावास्येपासून कहाण्या सलग येतात. श्रावण महिन्यात तर प्रत्येक वाराची कहाणी आहेच. रविवार आदित्य राणूबाईचा, सोमवार महादेव शंकरांचा, मंगळवारी मंगळागौर! बुधवार, बृहस्पती या बुद्धीच्या देवता. शुक्रवार जिवतीपूजन व लक्ष्मीचा वार, तर शनिवार हा शनि व मारुती यांचा पूजेचा वार. या सर्व वारांच्या कहाण्या खरंच वाचनीय आहेतच. त्यात जीवनाचा बोध असून तो रंजनात्मक आहे 

– – वसा म्हणजे व्रत. ते घेतले तर निभवावे. घेतला वसा टाकू नये. हेच रविवारची कहाणी सांगते.

– – सोमवारच्या दोन तीन कहाण्या आहेत. त्यात खुलभर दुधाची कहाणी साधी तरी बोधप्रद!

देवधर्म श्रद्धेने करावा, पण तो कुटुंबाला तृप्त करून व्हावा. गायीची वासरं, मुलंबाळं याना देऊन राहिलं ते दूध गाभारा भरायला पुरेसं झालं. ते अनुभवी आजीनी करून दाखवलं.

– – मंगळवारची कहाणी सांगते की नशीबात आहे तेवढंच घेऊन समाधानी असावं, हव्यास करू नये. तसेच गौरीचा पूजा ही निसर्ग पूजा आहे, पत्री, फुलं यांची छान माहिती करून घ्यावी व त्याचा उपयोग करावा. आहार, विहार, खेळ, रंजन याची स्त्रियांनीही योग्य सांगड घालावी. बुद्धी हे मानवाला मिळालेले वरदान आहे, त्याचा सदुपयोग करावा, ज्ञान मिळवून उपयोजन व्हावे. जिवतीची पूजा मुलांसाठी, त्यांना ओवाळून आयुरारोग्याचा आशीर्वाद मागावा.

कुटुंब आणि नाते संबंध यामुळे दृढ होतात. कुटुंब हा समाजाचा पाया होय. सुदृढ, उत्तम समाज ही आजही काळाची गरज आहे. ती या कहाण्यामधून पूर्ण होऊ शकते.

– – तसेच लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा, संपत्ती, दागदागिने नव्हे. ती तर चंचल असते. आज आहे, पण उद्या नसेलही! घरातील स्त्री ही खरी गृहलक्ष्मी, मग ती आई, पत्नी, बहीण, कन्या यापैकी असेल. तिला तिचा योग्य सन्मान मिळाला पाहिजे, हेच शुक्रवारच्या कहाणीत गोष्टीरूप सांगितले आहे.

– – शनिवार.. शनिदेवांची कहाणी. आपला देश शेतीप्रधान! कुटुंब सारे शेतीकाम व तेच उत्पन्न. या कहाणीत देव कुष्ठ्याच्या रूपात आले. त्यांचा पाहुणचार करावा, तर कोणी तयार नाही, ते काम धाकट्या सुनेने केले, मग घर समृद्ध झालं, धनधान्याने घर भरलं! कारण तिने देव ओळखला. गरीब, गरजू व निराधार याना मदत, हीच ईश्वर सेवा असते. हाच तर मानवता धर्म होय. माणूस म्हणून कसे असावे, आणि कसे नसावे हेच तर या कहाण्या सांगतात.

कहाण्या सांगितल्या, लिहिल्या तो काळ वेगळा, मान्य! आजच्या काळाची सूत्रे, मूल्ये काही प्रमाणात बदलली असतील, आहेत. तरीही माणूस तोच, त्याचे कुटुंब तेच आहे. त्याला संकटात आधार, पाठिंबा हवा असतो. ते मानसिक बळ त्याला यातूनच मिळू शकते. काही गोष्टी अतिरंजित वाटल्या तरी त्या रंग व रंजनासाठी असतात.

फलश्रुती वाचून आपणही हे करावे असे श्रद्धावान माणसाला वाटते. या नेम धर्मामुळे इंद्रिय निग्रह होतो.

मानसिक ताकद व आत्मविश्वास वाढतो. शिस्त व नियमितता वर्तनात सहज येते. साधे गाव, साधे कुटुंब यांच्या कथा आपल्याच वाटतात. यात कुटुंब, त्यातील व्यक्ती असतात. त्याचबरोबर चतुष्पाद प्राणी आपले सहाय्य करतात. त्यांचेही भले चिंतले आहे.

देव व पूजा या शब्दातच पावित्र्य, शुद्धता आहे. तिथे अमंगल येतच नाही. म्हणून घरचे वातावरण प्रसन्न होते. स्वयंपाक व प्रसाद खूपच गोड लागते. नेहमीपेक्षा अधिक स्वादिष्ट लागतात, कारण आपण देवपूजेकडे लक्ष देतो. देवाला नैवेद्य अर्पण करतो. (फक्त दाखवायचा नसतो.)देण्याचा आनंद फार मोठा असतो. हीच तर आपली घेतला वसा टाकू नये.. संस्कृती व परंपरा आहे. ती टिकवणे व पुढे नेणे हे आपले कर्तव्य आहे.

म्हणूनच हा वसा घ्यावा.

 

सुरेखा सुरेश कुलकर्णी

सातारा

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लंडन ब्रिज… ☆ डॉ. नेहा भटकर ☆

डॉ. नेहा भटकर

? मनमंजुषेतून ?

☆ लंडन ब्रिज… ☆ डॉ. नेहा भटकर ☆

गोष्ट तशी लहानशीच, अगदी ध्यानीमनी नसताना कित्येक वर्षात पूर्णपणे विस्मरणात गेलेला, माझ्या लहानपणीचा म्हणजे ६० ते ७० च्या दशकातला एक खेळ, परवा मला माझ्या लहानग्या नाती सोबत खेळताना आठवला. त्याचं झालं असं की टीव्हीवर सुरू असलेलं “लंडन ब्रीज इज फालिंग डाऊन” हे बालगीत नाती सोबत एन्जॉय करत असतांना डोक्यात तार लकाकली अन् ध्यानी आलं की, आपण लहानपणी असंच काहीसं गाता गाता खेळायचो. आणि हो, हळूहळू मला तो खेळ व त्यासोबतच्या गाण्याची अगदी लख्ख आठवण झाली. कित्येक वर्षांनंतर ते गाणं कानी पडल्यामुळे खूप आनंद झाला परंतु आनंदाचं मुख्य कारण हे होतं की मला त्या गाण्यातील शब्द नेमकेपणाने काय आहेत हे कळलं. मला आजही आठवतं, लहानपणी त्या गाण्यातील कितीतरी शब्द आम्ही गाण्याच्या विशिष्ट चालीवर अगदी बिनधास्तपणे चुकीच्या पद्धतीने म्हणायचो व त्या गाण्याची पार वाट लावायचो (हे आमचा इंग्रजी सोबत परिचय झाल्यानंतर कळले). त्याला कारणही तसंच होतं म्हणा कारण बरीचशी गाणी मुखोद्गत पद्धतीने एका व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाकडून दुसऱ्या व्यक्ती वा समूहाकडे संक्रमित होत असताना शब्दांचे अपभ्रंश होत होत एक वेळ अशी येते की मूळ शब्दांचा थांगपत्ता लागणं फार अवघड होऊन जातं. असंच काहीसं या लंडन ब्रीज इज फॉलींग डाऊन किंवा माय फेअर लेडी या खेळामध्ये गायल्या जाणाऱ्या गाण्याचंही आमच्या बाबतीत झालंय; हे अगदी उघड होतं. आता तर ते शब्द तितकेसे स्पष्टपणे आठवतही नाहीत कारण ते त्या गाण्यातलेच काय पण तसेही खरेखूरे अर्थपूर्ण शब्द नव्हतेच मुळी. पुढे मोठेपणी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आणि भूमिका निभावताना निरनिराळ्या कामांच्या भाऊगर्दीमध्ये संपूर्णपणे विसरलेल्या अथवा कुठेतरी खूप लांबवर मागे सुटलेल्या खेळाची अशी आठवण झाली. पुन्हा एकदा त्या काळात रमायला मिळालं. आणखी एक महत्त्वाचं कारण असं की, कुतुहल चाळवलं आणि डोक्यात किडा वळवायला लागला आणि मी गुगलला हाताशी घेतले. गुगलनेही आपली भूमिका इमानेइतबारे पार पाडली. आज दुनिया मेरी मुठ्ठी मे असं आपल्या सर्वांना म्हणायला लावणाऱ्या गुगलबाबाच्या गुहेमध्ये मला हे गाणं व त्यासोबतचा खेळ आणि गाण्यामध्ये वारंवार उल्लेख होणाऱ्या लंडन ब्रीज बद्दलही आणखीन काही जाणून घेण्याचा योग आला. या तिनही बाबींची (गाणं, गाण्यातील लंडन ब्रीज आणि त्यासोबतचा खेळ) खरोखरीच अत्यंत मनोरंजक माहिती वेचता वेचता अगदी पार मागे बाराव्या शतकातील इंग्लंड पर्यंत कधी पोहोचले हे कळले सुद्धा नाही.

लंडन ब्रीज हा इंग्लंडमधील लंडन आणि साऊधक (Southwark) या दोन शहरांना जोडणारा थेम्स नदीवरील पूल. थेंम्स नदीवर रोमन काळात या दोन शहरांना जोडणारे बाराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत बरेच लाकडी ब्रीज होते. त्या सर्वांना लंडन ब्रीजच म्हणायचे परंतु या सर्वपरिचित बालगीतातील लंडन ब्रीज हा यापैकी कुठलाही लाकडी ब्रीज नव्हे. या बालगीतातील लंडन ब्रीज हा खरोखरीच बऱ्याच दुरुस्त्या वा प्रसंगी अगदी पुन्हा नव्याने देखील बांधलेला असून, लंडनच्या थेम्स नदीवर आजही आपलं ऐतिहासिक महत्त्व जपत संपूर्ण कार्यक्षमतेसह संपूर्ण लंडन निवासी आणि अगणित पर्यटक यांच्या सेवेत जवळपास दोन हजार वर्षांपासून ते आजतागायत दिमाखाने उभा आहे.

“लंडन ब्रीज इज फालिंग डाउन… ”, शेकडो वर्षे मागे, कुण्या अनामिक कवीने १७ व्या शतकात किंवा त्याही आधीच रचलेलं ‌हे बालगीत; मात्र ते पहिल्यांदा १८ व्या शतकाच्या मध्यात कवी टॉमी थंब यांच्या बालगीतांच्या पुस्तकामध्ये प्रसिद्ध झालं आणि हळूहळू जगभरातील इंग्रजी जाणणाऱ्या बहुतांश भागांमध्ये पोहोचलं. तसं नाही म्हणायला या गाण्याचीही स्थलकालपरत्वे बरीच वेगवेगळी शब्दरूपं बघायला मिळतात; मात्र “लंडन ब्रीज इज फालिंग डाऊन” ही ओळ सर्वत्र सारखीच आहे. थेम्स नदीवरील लंडन ब्रीजच्या वेळोवेळी होणाऱ्या दुरुस्त्या ध्यानात घेता कवीला सुचलेलं हे बालगीत असावं असा एक मतप्रवाह आहे. या बालगीताच्या जन्माच्या आधीही आणि नंतरही लंडन ब्रीजने स्वतःच्या रूपामध्ये व सोबतच आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये झालेली अनेक स्थित्यंतरे अनुभवलेली आहेत. इ. स. १२०९ मध्ये कोलचर्चमधील धर्मगुरू आणि आर्किटेक्ट असलेले पीटर यांनी प्रथमतः दगडांचा वापर करून बांधलेला थेम्स नदीवरील अठरा टोकदार कमानी असलेला हा देखणा लंडन ब्रीज. त्याने रहदारीची सोय तर झालीच, पण एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र आणि लंडनच्या वैभवात आणि सौंदर्यात भर टाकणारं वास्तुशिल्प म्हणून सुद्धा तो नावारूपास आला. त्याच्या अरुंद कमानी खालून नदीपात्रातून बोटी पळवताना खलाशांना एक थरारक अनुभव येत असे. हा संपूर्ण इंग्लंडमधीलच पहिलावहिला दगडी लंडन ब्रीज इ. स. १२०९ पासून ते १८३२ पर्यंत एकंदरीत ६२२ वर्षे इतक्या प्रदीर्घ काळ सेवेत होता. या लांबलचक कालखंडामध्ये दोनदा तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला तर कधी प्रचंड हिमवर्षावाने देखील खचला तर अशी कित्येकदा त्याची पडझड झाली. कित्येक दुरुस्त्या नी डागडूज्यांना सामोरा गेला. नेमक्या याच ब्रीजला अनुसरून कवीने हे बालगीत रचलयं. कोणे एकेकाळी लंडनची शान असलेला तसेच या जगप्रसिद्ध बालगीताने अजरामर केलेला पण कालांतराने क्षीण झालेला, शिकस्त अवस्थेतील लंडन ब्रीज इसवी सन १८३२ मध्ये नष्ट करण्यात आला. मात्र तो जमीनदोस्त करण्यापूर्वीच ई. स. १८३० मध्ये जॉन रेनी नावाच्या स्कॉटिश इंजिनिअरच्या कल्पनेतून साकारलेल्या आराखड्यानुसार अधिक मजबुत परंतु दगडांच्याच पाच रूंद कमानी असलेला लंडन ब्रीज बांधून तयार होता. दोन्ही जागतिक महायुद्धांची झळ सोसलेला हा रेनीचा लंडन ब्रीज, सातत्याने १४० वर्षे सेवा देऊन कमकुवत झाला. पुढे बेसुमार वाढणाऱ्या जल आणि रस्ते वाहतुकीचा रेटा लक्षात घेता, अपुऱ्या भासणार्‍या या ब्रीजला सुद्धा मोडीत काढून पर्यायी ब्रीज बांधण्याची कल्पना समोर आली. १९६८ ते १९७२ या कालावधीमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानानुसार संपूर्णपणे काँक्रीट आणि लोखंडाचा वापर करून नव्याने बांधूनही झाला आणि त्याचे उद्घाटनही इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ द्वितिय आणि राजे एडवर्ड यांच्या हस्ते १६ मार्च १९७३ रोजी संपन्न झाले. लंडनच्या थेम्स नदीवरील लंडन ब्रीज म्हणून तो आजही प्रशस्त आणि भक्कमपणे उभा आहे. गोष्ट इतकी साधी सरळ असेल तर ते इंग्लंड कसले. इथेच एका रंजक प्रवासाची सुरुवात होतेय. त्याचं झालं असं की अपुऱ्या पडणाऱ्या रेनींच्या लंडन ब्रीजला पाडण्यापूर्वी, त्याला लंडन शहराच्या शासकीय यंत्रणेने लिलावात विकायला काढला आणि आश्चर्य म्हणजे तो अमेरिकेतील ॲरिझोना प्रांतातील रॉबर्ट मॅक कुल्लोक नावाच्या व्यापाऱ्याने १९६८ मध्ये विकतही घेतला. गोष्ट येथे थांबत नाही तर त्या ब्रीजच्या दर्शनी भागात लागलेला एकेक ग्रॅनाईटचा तुकडा (ब्लॉक) अगदी काळजीपूर्वक सुटा केला, प्रत्येक तुकड्याला अनुक्रमांक दिला. ते संपूर्ण संख्येने दहा हजाराचे वर असलेले ग्रॅनाईटचे तुकडे समुद्रमार्गे, अटलांटिक महासागर, जगप्रसिद्ध पनामा कालव्यातून व पुढे प्रशांत महासागर असा मैलोनमैल लांबचा पल्ला पार करत अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील बंदरात वाहून नेले. येथून पुढे ग्रॅनाईट ब्लॉकची मध्य अमेरिकेतील ॲरिझोना प्रांतापर्यंतची यात्रा भू मार्गाने व्हावयाची होती. रॉबर्ट मॅक कुल्लोक या व्यापारी महाशयांनी आधीच १९६४ मध्ये अमेरिकेतील ॲरिझोना प्रांतामध्ये लेक हवासू सिटी नावाची वसाहत वसवली होती. तेथील हवासू सरोवरावर इंग्लंडहून विकत आणलेल्या या लंडन ब्रीजच्या ग्रॅनाईटच्या तुकड्यांचा अगदी नेमक्या क्रमवारीने अगदी जसाच्या तसा वापर करीत नवीन लंडन ब्रीज अर्थात न्यू लंडन ब्रीज उभारून १० ऑक्टोबर १९७१ रोजी रहदारीसाठी खुला करण्यात आला. जगभरातील पर्यटकांना अमेरिकेतील ॲरिझोना प्रांतातील लेक हवासू सिटी मधील कोलॅराडो नदीच्या हवासू सरोवरावरील हा वैशिष्ट्यपूर्ण न्यू लंडन ब्रीज, त्याच्या निर्मितीच्या मागे असलेल्या अनोख्या कथेमुळे, फार मोठ्या संख्येने आजही आकर्षित करतोय, त्यात नवल ते काय?

लहानपणीचा लंडन ब्रीज इज फालिंग डाऊन… , हा खेळ कदाचित कोणाला आठवत असेल किंवा नसेलही परंतु गंमत अशी की जेव्हा मी आंतरजालावरील वेगवेगळ्या संकेतस्थळांवर जाऊन बघितलं तर काय आश्चर्य, जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी अगदी आम्ही लहानपणी ज्या पद्धतीने खेळायचो अगदी तसल्याच प्रकारे खेळल्या जातोय; याची सचित्र माहिती वाचताना फार मजा वाटली. दोन मुलींनी समोरासमोर उभे राहून एकमेकींच्या हाताची बोटे एकमेकांमध्ये फसवून म्हणजेच चिक्की करून हात वर न्यायचे जेणेकरून त्यांची एक कमान होईल जी की जणू काही थेम्स नदीवरील सुप्रसिद्ध लंडन ब्रीजचीच कमान आहे असे मानायचे. हाताच्या कमानीचा ब्रीज बनवणाऱ्या दोघींनी लंडन ब्रीज इज फॉलींग डाऊन फालींग डाऊन माय फेयर लेडी… हे गाणं गायचं आणि त्याचवेळी खेळात सामील इतर सवंगडी कमानी खालून ओळीने एक एक करून जात असताना हळूहळू ती कमान खाली खाली घेत राहायची. कमानी खालून जाणारा एक एक गडी, संपूर्ण खाली आलेल्या हातांच्या ब्रीजमध्ये अडकवला जायचा. अडकवलेल्या गड्याला दोघींपैकी कोणाच्या बाजूला जायचे आहे, ते विचारायचे. इथे त्या दोघींना काल्पनिक नावे दिलेली असत. अशा तऱ्हेने संपूर्ण गडी दोघींमध्ये विभागल्यानंतर त्यांच्या शक्ती प्रदर्शनाचा खेळ सुरू व्हायचा. असा तो खेळ, उत्कंठावर्धक आणि तितकाच शक्तिवर्धक देखील. गाणं गाता गाता खेळताना केलेली धमाल मस्ती आणि प्रचंड हल्लागुल्ल्यासोबत आम्ही संपूर्ण वेटाळ अगदी डोक्यावर घेतलेल्या कितीतरी संध्याकाळी आज आठवतांना भारीच मौज वाटतेय. हे वेगळे सांगणे न लगे. या आठवणींच्या गुंताळ्यामध्ये मी रममाण झालेली असतांना लहानग्या नातीने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली “आजी तूला परत परत हेच गाणं का बरं ऐकायचं आहे ग, आता दुसरं काहीतरी नवीन खेळू या का आपण” आणि मी लंडन ब्रीज इज फॉलींग डाऊन, फॉलींग डाऊन, माय फेअर लेडी…. च्या आठवणीतून बाहेर आले.

 ┉❀꧁꧂❀┉

©  डॉ. नेहा विनोद भटकर

अमरावती

मो ९९७५०३०६२७ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “हिऱ्याची अंगठी आणि मी…!!!” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “हिऱ्याची अंगठी आणि मी…!!!” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(‘आजी तुम्हाला मुलाचा फोन नंबर माहित आहे का, पत्ता माहित आहे का? मी तुम्हाला सोडतो, ते वाट बघत असतील तुमची. ‘

‘मला समदं म्हाईत हाय बाळा, पन वाट चुकलेल्याची बघत्यात, सोडून दिलेल्याची न्हायी. माजी वाट बघणारं आता तिथं कुणी न्हायी’ तिने डोळ्याला पदर लावला.) 

इथून पुढे – –

निरक्षर आजीने एकाच वाक्यात जीवनाचं कटू सत्य सांगितलं…. *वाट चुकलेल्याची बघत्यात, सोडून दिलेल्याची न्हायी… * माझ्या अंगावर काटा आला.

‘प्रतिष्ठित लोक सुद्धा असे वागतात, खरंच पटत नाही’ मी स्वतःशी पुटपुटलो आजीला ते ऐकू गेलं असावं. ती म्हणाली, ‘बाळा आपल्याकडून दुसऱ्याला काय हवं आसलं, तर दुसरी लोकं आपल्याला किंमत देत्यात, बसाय जागा देत्यात, तूच लय मोठा… तूच लय मोठा म्हून तोंडावर बोलत्यात, त्येला उगंचच झाडावर चढवत्यात… त्येला म्हणत्यात पर्तीशटा….!

‘पर्तीशटा देणाऱ्याला कायतर पायजे आसतं म्हणून त्यो दुसऱ्याला पर्तीशटा देतो…. आन ह्येला वाटतं मी लय परतीष्टीत झालो…! संस्कार महत्त्वाचे बाळा… चरित्र महत्त्वाचं…. पर्तीशटा न्हाय… आपल्याकडचं काई द्यायचं संपलं की लोकं आपल्याला बी पर्तीशटा द्यायची कमी करत्यात, न्हवं देतच न्हायित.. आरं हाड.. आसली पर्तीशटा काय कामाची…? त्या परास संस्कार आनी चरित्र महत्वाचं…

संस्कार आणि चरित्र असं मागून मिळत न्ह्याई रं, ते कमवावं लागतं, आन त्येच कायम राहतं… आशा मानसाला खोट्या पर्तीशटेची गरज नसती, त्यान्ला आपोआप आदर मिळतू…. आपुन गेल्यावर पर्तीशटा बी आपल्या संग जळून जाती… संस्कार आन चरित्र मात्र आपुन गेल्यावर बी हित्तच राहत्यात.. ‘ हित्तच, म्हणताना तिने उकिरड्यावर तीन-चार वेळा हात मारला…

मी आ वासून आजीकडे पाहत राहिलो. ‘आजी कुठे शिकलीस एवढं? शाळेत जाऊन आम्ही फक्त गणित, भूगोल, शास्त्र, इतिहास शिकत असतो. या गोष्टी आम्हाला कोणीच कधी शिकवल्या नाहीत, तू कुठे शिकलीस….? ‘ 

ती बोलली काहीच नाही, एका बोटाने तिने रस्ता, माणसं आणि उकिरडा दाखवला… परिस्थिती सर्व शिकवते बाळा हेच तिला म्हणायचं असावं.. ती पुढे म्हणाली, ‘कंच्याच साळंत आणि वर्गात चारित्र्य म्हंजी काय, मानूसकी म्हंजी काय ते शिकवीत न्हायित, फुडं जावून मोटा झाला कि मानसाचं वागणं – बोलणं आयीकलं कि समजतंय, आत्ता त्यो कंच्या वर्गात आन यत्तेत (ईयत्तेत) हाय….! ‘

सरस्वतीच्या रूपात एखाद्या आजीनं समोर यावं आणि आयुष्याचं तत्त्वज्ञान शिकवावं असं मला वाटायला लागलं. समोर सरस्वतीच बसलीये तर काहीतरी जाणून घ्यावं, म्हणून मी तिला विचारलं, ‘आजी संस्कार म्हणजे नेमकं काय…?

येडा का खुळा? या नजरेने तिने मला पाहून सांगितलं, ‘तू रोज आंगुळ करतो म्हणजे शरीराची सुद्धी करतो, रोज घर आणि अंगण झाडतो म्हणजे घराची आणि अंगणाची सुद्धी करतो, खरकटी भांडी घासतो म्हणजे भांड्याची सुद्धी करतो, जे नको हाय ते टाकून देनं, आन जे चांगलं हाय ते मनात ठेवनं, म्हंजे संस्कार….! ‘

संस्काराची याहून सोपी व्याख्या कुठली असेल….?

*’मनात संस्कार आनि वागन्यात मानूसकी ठिवली तर चरित्र आपोआप घडतंय बग’* उकिरड्या वरची हातात आलेली काडी घेऊन काहीतरी रेघोट्या मारत ती हे वाक्य बोलून गेली.

आजीच्या समोर उकिरड्यावर बसून मी संपूर्ण ब्रह्मांड पहात असल्याचा भास झाला..!

‘तू कंच्या साळंत जातूस? ‘ मला तीने सहज प्रश्न विचारला.

खरंच या शब्दांनी मला लाज वाटली… आयुष्यभर काय शिकलो होतो आणि आज तिने अर्ध्या तासात काय शिकवले… मला खरंच माझी लाज वाटली! तीला समजणार नाही अशा पद्धतीने गळ्यातला स्टेथोस्कोप दुसरीकडे लपवत, खाली मान घालून मी तिला म्हणालो, ‘आजी मी कंच्याच साळंत जात न्हायी…! ‘

तीने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली ‘घोड्या एवढा घोडा झालास तरी अजून कंच्याच साळंत जात न्हायीस… ‘ आत्ता प्रथमच तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्ये हास्य पसरलं होतं.. मी सुद्धा केविलवाणा हसतो आणि उत्तर देतो ‘न्हायी मी कंच्याच साळत जात न्हायी’ हे आणखी खाली मान घालून बोललो आणि विषय बदलतो…

‘आपण पोलिसात जाऊन तुझ्या मुलाविरुद्ध तक्रार देऊया का? पोलीस बरोब्बर त्यांच्या भाषेत तुझ्या मुलाला सांगतील तुला सांभाळायला’ मी म्हणालो.

‘ती घाबरली, चेहऱ्यावरचं हास्य जावून सर्व सुरकुत्यांमध्ये भीती पसरली… ‘नको… नको… पोलीस मारत्याल त्याला, मी अजून चार बोटं न्हाई लावली माज्या लेकाला. त्याला बी तीन लेकरं हायत… बापाला मारताना बघून त्यान्ला कसं वाटल? ‘ 

पोलीस केस नको म्हणून आजीने माझे पाय धरले. पुन्हा शांत होऊन म्हणाली, ‘पोलिसांच्या भीतीने जरी त्यानं मला घरी न्हेली तरी तो प्रेमानं वागल का माज्याशी? बाळा मला भुकेला “घास” नको प्रेमाचा *भास* पायजे. भीतीनं आनि मारून मुटकून आई सांबाळण्यापेक्षा ती उकिरड्यावरच राहिलेली बरी…

माझा नाईलाज झाला.. एखाद्या वृद्धाश्रमात तीची सोय करायची म्हणून मी फटाफट फोन लावले, खूप वेळानंतर एका ठिकाणी सोय झाली, मी रिक्षा बोलावली. मी हाताला धरून तिला उठवत होतो, तिच्या अंगात त्राण नव्हते, त्यातूनही ती कण्हत म्हणाली, ‘तू जेवलास का रं सोन्या, जेवत जा बाळा टायमावर… ‘ 

इतका वेळ दाबून धरलेले अश्रू आता मात्र सावरू शकलो नाही. स्वतः दहा दिवस उपाशी राहून दुसऱ्या लेकराच्या भुकेची काळजी करणारी ही माऊली….! तिला आश्रमात सोडले, रिक्षातून उतरताना आभाळाकडे पहात हात जोडून खूप वेळ ती काहीतरी पुटपुटत होती.

मी हसत म्हणालो ‘आजी हा माझ्या मित्राचा वृद्धाश्रम आहे, तुला काहीही काळजी करायची कारण नाही. अध्ये मध्ये मी तुला भेटायला येथे येत जाईन, तुला कशाचीही कमी येथे पडणार नाही. देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल बरं… ‘ मी पुन्हा हसत बोललो.

ती म्हणाली, ‘माजी मेली कसली आली विच्छा? आता माझ्या पोराला, सुनेला आणि नातवंडांना सुखाचं आयुष्य दे इतकंच शेवटचं मागितलं.. त्यो तर काय हितं भेटायला येणार नाही. ‘ 

ज्याने घराबाहेर काढून दिलं, त्याच्याच सुखाची अपेक्षा धरते, आईनं आज पुन्हा तीचं मातृत्व सिद्ध केलं…! तीने पदराने डोळे पुसले, यानंतर डोक्यावरचा पदर सावरत तीने माझे दोन्ही हात हातात घेतले, ते कपाळाला लावले, ‘कोण कुठला रं बाळा तू.. तुज नाव पण मला म्हाईत न्हाई… तू इतकी माजी येवस्ता केलीस… सुकी ऱ्हा माज्या राजा’ म्हणत ती आश्रमाकडे चालू लागली. आश्रमातला कार्यकर्ता तिला हाताला धरून आश्रमाकडे घेऊन जात होता. मी त्या माऊलीला पाठमोरी पहात हात जोडले. जाताना आजी त्याला सांगत होती, ‘चल बाबा, जगण्याचा “सोहळा” संपला आता मेल्यावर “कावळा” यायची वाट पाहायची..!!! ‘

मी काय बोलू??? उरल्या सुरल्या अश्रूंनी माझा शर्ट भरून गेला… अशा अब्जावधी रुपयांच्या अंगठ्या आणि सोन्याची नाणी मला रस्त्याकडेला तळमळत, उकिरड्यावर आणि गटाराशेजारी सापडतात. कशातही किंमत होणार नाही, अशा या सापडलेल्या हिऱ्यांच्या अंगठ्या आणि सोन्याची नाणी मी मनातल्या मनात म्युझियम करून जतन करून ठेवतो, आणि वेळ मिळेल तेव्हा त्याला शब्दरूप देतो. या अंगठ्यांना, ना वजन, ना आकारमान, ना रुपयातली किंमत.. तरीही त्या आहेत मौल्यवान आणि मूल्यवान…!

आता तुम्हीच सांगा माउली, ज्याला खूप वस्तुमान, आकारमान आणि वजन आहे असे शिव्या शाप, तिरस्कार मी सांभाळत बसू?? कि या मौल्यवान आणि मूल्यवान गोष्टींचं जतन, करू….??? मला मिळालेल्या शिव्या शापांबद्दल लिहू, सुरे लावणाऱ्या लोकांबद्दल लिहू, कि तोंडावर थुंकलेल्या आणि चप्पल फेकणाऱ्या लोकांबद्दल लिहू….??? कि इतिहासात कधीही नोंद न होणाऱ्या माणुसकीचं दर्शन घडवू…?

दिवसभरात मला मिळालेले 99 अपमान तिरस्कार मी रोज गाडून टाकतो जाळून टाकतो… आणि रोज नव्या दमानं उठून, उकिरडे, रस्त्याकडेची गटारे, अस्ताव्यस्त पसरलेले फुटपाथ, सुलभ शौचालयाच्या मागील बाजू मी हुंगत असतो, एखाद्या कुत्र्यासारखा….! न जाणो लोकांनी फेकलेल्या अशा मौल्यवान अंगठ्या आणि सोन्याची नाणी मला सापडतील आणि “माणूस” म्हणून मी सुद्धा कधीतरी “श्रीमंत” होऊन जाईन….!!!

– समाप्त – 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “काकूंचा गणपती” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “काकूंचा गणपती…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

झालं असं की,

तब्बल दहा वर्षांनी गणपतीसाठी सहकुटुंब भारतात आलो.घरचे बाप्पा विराजमान झाल्यावर आईसोबत गप्पा मारताना वाड्यातल्या गणपतीचा विषय निघाला.तेव्हा वाड्यात जायची इच्छा झाली.तिथं पोचलो तर खूप सारं बदललेलं.वाड्यांच्या जागी बिल्डिंग झालेल्या तरी दोनचार वाडे जुन्या काळाची साक्ष देत उभे होते. आम्ही रहायचो त्या वाड्याच्या जागी झालेल्या बिल्डिंगकडे पाहताना खूप साऱ्या आठवणी डोळ्यासमोर आल्या.इतक्यात समोरून साठीपार केलेल्या बाई गणपती घेऊन येताना दिसल्या.कोणीही सोबत नव्हतं.वयानुसार फरक झाला असला तरी मी प्रमीलाकाकूंना ओळखलं.हाक मारल्यावर काकू थांबल्या.

“गणपती बाप्पा मोरया!!”मी उत्साहानं म्हणालो 

“मोरया,आपण??”ओळख सांगितल्यावर काकू एकदम खूष.आग्रहानं घरी घेऊन गेल्या.पंधरा बाय वीस फुटांची खोली होती.“अजूनही एकटीचं गणपती मंडळ चालूयं.”

“अध्यक्ष आणि कार्यकर्ती मीच.शक्य आहे तोपर्यंत चालवायचं.नंतरचं माहीत नाही.तुला तर माझा स्वभाव माहितीये.तुसडी म्हणून फेमस आहे.जरा जास्तच स्पष्ट बोलते.प्रत्येकाशी भांडलेय.लोक अंतर ठेवून वागतात.जास्त नादी लागत नाही.कोणी येत पण नाही ”

“आता उतरत्या वयात एकटेपणाचा त्रास होत असेलच”

“कसला त्रास उलट आयुष्यभर तोच सोबतीला राहिलाय”काकू भकास हसल्या.

“असं का बोलता.बहिणी आहेत की..”

“नावापुरती असलेली रक्ताची नाती म्हणजे अवघड जागेची दुखणी.सहन होत नाही अन सांगता येत नाही.”

“मूर्ती छान आहे”मी मुद्दाम विषय बदलला.

“आवडली ना.आई-वडील गेले.बहिणी संसारात रमल्या.नशिबात लग्नाचा योग नसल्यानं मी एकटी राहिले.तेव्हापासून वडिलांची गणपती सेवेची परंपरा चालवतेय.”

“वाडा जाऊन बिल्डिंग आली तरी तुम्ही मात्र तशाच आहात.”

“आणि शेवटपर्यंत अशीच राहणार.जी काही जमापुंजी आहे त्यात छान चाललंय.”

“तरीपण सोबत पाहिजे ना”  

“आता दहा दिवस साक्षात गणपती सोबतीला आहेत.अजून काय पाहिजे.इतरवेळी नाही पण गणपतीत माझं दार सर्वांसाठी खुलं असतं.संध्याकाळची आरती तर मुलांच्या हस्तेच आणि रोज वेगवेगळा प्रसाद असतो.”

“हो.आठवतंय.लहानपणी मीसुद्धा दोनदा आरती केलीय.”

“पूर्वी वाड्यातली मुलं करायची आता बिल्डिंगमधली मुलं करतात.”

“तुमची गणपतीवर खूप श्रद्धा आहे.”

“तोच माझा एकमेव आधार.हा एकच पाहुणा नियमितपणे माझ्याकडं येतो.दहा दिवसाच्या मुक्कामात वर्षभराची ऊर्जा देतो.आमच्यात खूप गप्पा होतात म्हणजे मी बोलते आणि बाप्पा ऐकतात.मन मोकळं केल्यानं छान वाटतं.”

“नातेवाईक जाऊ दया.तुम्हांला मैत्रिणसुद्धा नाही.”

“खरं सांगू,आलेल्या वाईट अनुभवांमुळे कोणावरच विश्वास राहिला नाही.बहीणींनी फसवलं आणि वडिलांची प्रॉपर्टी आपसात वाटून घेतली अन हे घर मला दिलं.त्यालाही वारस म्हणून स्वतःचीच नाव लावली.मतलबी माणसांपेक्षा एकटेपणा बरा.”काकू बोलायच्या थांबल्या.मलाही काय बोलावं असा प्रश्न पडलेला.काहीवेळ शांतता होती. काकू म्हणाल्या “आवर्जून भेटलास,

बोललास खूप बरं वाटलं.शक्य झालं तर आरतीला ये” मी नकार देऊ शकलो नाही.नमस्कार करून निघालो.जाताना वळून पाहिलं तर तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून पाहणाऱ्या काकूंचा चेहरा निर्वीकार होता पण डोळे मात्र पाणावलेले.

“पाऊस” एकच पण प्रत्येकासोबत त्याचं नातं वेगवेगळं असतं – गणपतीचं बाप्पांचं सुद्धा तसंच !!

मंगलमूर्ती मोरया

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भिंतीच्या पलीकडचं नातं… ☆ तृप्ती देव ☆

तृप्ती देव

? मनमंजुषेतून ?

☆ भिंतीच्या पलीकडचं नातं…  ☆ तृप्ती देव ☆

कधी कधी आयुष्यात एखादा साधा दिवसही मोठा धडा देऊन जातो. त्या दिवशीही तसंच झालं.

मी सकाळी अंगणात झाडांना पाणी घालत होते. हातात पाइप होता, मन मात्र नेहमीच्या कामात गुंतलेलं. तेवढ्यात समोरच्या वर्षाताईंचा आवाज आला- “तृप्ती… ऐकलंस का गं? “

मी वर पाहिलं. “काय हो ताई? “

त्या थोडं जवळ येत म्हणाल्या, “जोशीकाकूंचं घर विकलं म्हणे. “

माझ्या हातातला पाइप तसाच थांबला. पाणी मात्र वाहत राहिलं. “काय?  खरंच? “

“हो गं. मुलगा पुण्यात आहे ना… आता त्यांना कायमचं तिकडे घेऊन जातोय. “

मी नकळत समोरच्या घराकडे पाहिलं. दार उघडं होतं. आत कुणीतरी कपाट हलवत असल्याचा आवाज येत होता.

जोशीकाकू… वीस वर्षांच्या शेजारी. माझ्या लग्नानंतर मी या घरात आले, तेव्हा पहिल्यांदा साखर मागायला मी त्यांच्या दारात गेले होते. मुलांना ताप आला की काकू रात्री येऊन विचारायच्या, “औषध दिलंस का? ” दिवाळीत त्यांच्या घरी फराळ, आमच्याकडे पुरणपोळी. एखादा दिवस असा नव्हता की एकमेकींची चौकशी झाली नाही.

पण मग काहीतरी बदललं. गेली तीन वर्षं आम्ही एकमेकींशी बोललोच नव्हतो. कारण आठवलं, तर आज हसू येईल इतकं छोटं. त्यांच्या जांभळाच्या झाडाच्या फांद्या आमच्या अंगणात खूप वाढल्या होत्या. रोज पानं पडायची. एक दिवस मी सहज म्हणाले होते, “काकू, वेळ मिळाला की फांद्या जरा छाटून घ्या ना. ” 

माझा हेतू तक्रार करण्याचा नव्हता. पण त्यांना तसं वाटलं असावं. त्या म्हणाल्या, “झाड आहे तर पानं पडणारच. “

मलाही राग आला. मीही दोन शब्द जास्त बोलले. त्यातून आवाज चढला. घरातले बाहेर आले. शेजारी जमले. आणि त्या दिवसानंतर दोघींनीही एकमेकींकडे न पाहण्याचा जणू निश्चयच केला.

सुरुवातीला वाटलं, दोन दिवसांत सगळं सुरळीत होईल. पण दोन दिवस आठवड्यात गेले, आठवडे महिन्यात गेले. दिवाळी आली- फराळाचं ताट गेलं नाही. संक्रांत आली- तिळगूळ दिला गेला नाही. गणपतीत आरतीचं निमंत्रण दिलं नाही.

दोघींनाही बहुतेक बोलायचं होतं. पण मनात एकच प्रश्न- “आधी मी का? ” अहंकाराने नात्याच्या मध्ये भिंत उभी केली होती.

त्या संध्याकाळी त्यांच्या घरासमोर ट्रक उभा राहिला. कामगार सामान भरत होते. मी गॅलरीत उभी राहून बघत होते. जोशीकाकू गेटजवळच्या खुर्चीवर शांत बसल्या होत्या. पूर्वीचा त्यांचा हसरा चेहरा आज फार थकलेला दिसत होता.

अचानक त्यांनी वर पाहिलं. आमची नजरानजर झाली. क्षणभर वाटलं, हात हलवावा. पण हात हलला नाही. त्यांनीही नजर वळवली. मीही आत आले.

त्या रात्री जेवताना मिस्टर म्हणाले, “उद्या जाऊन भेटून ये. “

“आता?  तीन वर्षांनी? ” मी विचारलं.

ते शांतपणे म्हणाले, “नाती जपायला उशीर होतो… उपयोग नसतो. “

रात्रभर झोप लागली नाही. डोक्यात सतत एकच विचार. भांडण आठवत होतं, पण कारण क्षुल्लक वाटत होतं. मग आपण इतकी वर्षं नेमकं काय जपलं?  अहंकार?

सकाळी चहा झाला. घरातली कामं उरकली. आणि अचानक मी उठले. स्वतःलाच म्हटलं, “चल, जाऊन येऊया. “

त्यांच्या दारापाशी गेले, तेव्हा हात थोडा थरथरत होता. बेल वाजवली. दार उघडलं. जोशीकाकू समोर उभ्या होत्या.

क्षणभर दोघींनाही शब्द सापडले नाहीत. मी हळूच म्हणाले, “काकू… निघताय म्हणे? “

त्यांच्या डोळ्यात लगेच पाणी आलं. “हो गं… “

एवढंच.

मग त्यांनी माझा हात धरला. हात अजूनही तसाच उबदार होता. “तृप्ती, ” त्या म्हणाल्या, “आपण इतकी वर्षं का नाही बोललो गं? “

माझ्याकडे उत्तर नव्हतं. मी फक्त म्हणाले, “दोघींनीही हट्ट धरला. “

त्या हसल्या. “वयाने मोठी मी… पाऊल आधी मीच टाकायला हवं होतं. “

“नाही काकू, ” मी म्हणाले, “मीही येऊ शकले असते. “

त्या घरभर नजर फिरवत म्हणाल्या, “हे घर सोडताना सामानाची खंत नाही वाटत. पण तुझ्याशी बोलणं राहिलं, याची जास्त खंत वाटते. “

माझे डोळे भरून आले.

त्या आत गेल्या आणि एक छोटी तुळशीची कुंडी घेऊन आल्या. “ही ठेव, ” त्या म्हणाल्या. “दररोज पाणी घालशील… तेव्हा मला एकदा आठव. “

मी कुंडी घेतली. त्या क्षणी मला जाणवलं- ती फक्त तुळस नव्हती, ते पुन्हा जोडलेलं नातं होतं.

निघताना मी त्यांना मिठी मारली. ती मिठी निरोपाची कमी, आणि तीन वर्षांच्या अबोल्याची माफी जास्त होती.

थोड्याच वेळात ट्रक निघाला. जोशीकाकूंनी हात हलवला. मीही हात हलवला. ट्रक वळणावर दिसेनासा झाला.

समोरचं घर रिकामं झालं. पण त्या रिकाम्या घराने मला एक गोष्ट शिकवली – नाती मोठ्या कारणांनी तुटत नाहीत. ती तुटतात छोट्या गैरसमजामुळे, एका हट्टामुळे, आणि “आधी मी का? ” या चार शब्दांमुळे.

रक्ताची नाती जन्माने मिळतात. पण शेजारची नाती आपण आपल्या वागण्यातून कमावतो. म्हणून मतभेद झाले तरी चालतील… अबोला नको. कारण संकटात सर्वात आधी दार ठोठावणारा माणूस अनेकदा नातेवाईक नसतो… तो आपल्या भिंतीच्या पलीकडे राहणारा शेजारीच असतो.

 ┉❀꧁꧂❀┉

© तृप्ती देव

भिलाई, छत्तीसगड.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
3

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “हिऱ्याची अंगठी आणि मी…!!!” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “हिऱ्याची अंगठी आणि मी…!!!” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

भीक मागणाऱ्या लोकांचे पुनर्वसन किंवा त्यांच्यासाठी इतर काही गोष्टी करता करता अनेक भले बुरे अनुभव येतात. तळागाळातल्या या लोकांकडून खूप काही शिकायला मिळतं, माणुसकी म्हणजे नेमकं काय हे समजतं, सकारात्मक बाबी दिसतात, पूर्णतः अडाणी असून सुद्धा जीवनाकडे बघण्याचा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन भारावून टाकणारा असतो, मी मग याच चांगल्या बाबींवर लिहितो.

वाचल्यानंतर बऱ्याच वेळा अनेक जण मला असं विचारतात, ‘हि अशी चांगली लोकं तुम्हालाच कशी भेटतात, आम्हाला का नाही भेटत असं कुणी? ‘ 

‘तुम्हालाच सगळे चांगले अनुभव कसे येतात?  आम्हाला का नाहीत येत? ‘

‘या इतक्या अडाणी, अंगावर धड कपडे नसलेले लोक, जगण्याची आशा नसलेले लोक, यांच्याकडे इतके चांगले विचार कुठून येतात? ‘

‘तुमच्या बाबतीत खूप छान छान घटना घडतात, एकही वाईट घटना तुमच्या बाबतीत घडत नाही दिवसभरात… मग आमच्याच बाबतीत का नाही असं घडत? ‘

अरे हो.. हो… ऐका तर खरं…

माझ्याबाबतीत सर्व काही चांगलं घडायला मी काय आभाळातून पडलोय का?  की मला कोणता वर मिळाला आहे…?  

तर… दिवसभरातून शंभर पैकी 99 घटना, या चिड आणि राग आणणाऱ्या, काम सोडून द्यावं की काय असं क्षणभर वाटायला लावणाऱ्या इतक्या टोकाच्या असतात. माझ्या बाबतीत काय, किती आणि कसं वाईट घडलंय हे मी माझ्या पुस्तकात सविस्तर लिहिलंच आहे. तरीही त्यातल्या काही सांगतो…

आयुष्याच्या सुरुवातीला हे माझं काम सुरू करण्यापूर्वी मी वेश्याव्यवसाय करणाऱ्या मुलींचे पुनर्वसन करणाऱ्या संस्थेत काम करत होतो (माझ्या आणि कुटुंबाच्या पोटासाठी केलेली नोकरी होती ती, याला मी समाजसेवा म्हणणार नाही). दरवेळी मी पुण्यातल्या बुधवार पेठ या रेड लाईट एरिया मध्ये कामानिमित्त फिरत असायचो, तिथल्या महिलांशी बोलायचो, प्रसंगी जिथे हा व्यवसाय चालतो त्या घरात (याला Brothel म्हणतात) सुद्धा जायचो. यावेळी दुरून पाहणारे लोक मला “बायका पुरवणारा एजंट” समजायचे.

भीक मागणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाचे काम सुरू केलं, तेव्हा भीक मागणाऱ्या या लोकांना कोणीतरी सांगितलं, ‘तुमच्यातल्या चांगल्या बाया “हेरायला” हा एजंट तुमच्यात घुसला आहे, हा तुमच्या बायांना “धंद्याला” लावेल, याला दूर ठेवा. ‘ 

भीक मागणाऱ्या लोकांना मेडिसिन देण्यासाठी सुरुवातीला जेव्हा यांच्यात अगदी प्रेमाने मी यांच्या जवळ जायचो, पण “एजन्ट” समजून भीक मागणाऱ्या लोकांनी मला चपला फेकून मारल्या आहेत, गुटखा खाऊन अंगावर थुंकले आहेत, काठ्या घेऊन अंगावर आले आहेत…

रॅकेट चालवणाऱ्या लोकांना वाटायचं, माझ्यामुळे यांचा “बिझनेस” कमी होईल म्हणून कित्येक वेळा गळ्याला सुरे सुद्धा लावले आहेत… आई बहिणी वरून शिव्या देऊन ते मला म्हणायचे, ‘आज आत्ता इथे दिसलास, पुन्हा दिसू नकोस, दिसलास तर नागडा करून मारू, इथेच खल्लास करून टाकू… कुणाला पत्ता सुद्धा लागणार नाही…! ‘

असो, तर सांगायचा मुद्दा हा, की दिवसातून 99 वेळा माझ्या बाबतीत वाईट घटना घडतातच, क्षणभर वाटतं कशासाठी करायचं हे मी…?  पण दिवसभरातून एक तरी माणुसकीचे दर्शन घडवणारी, जन्माला येऊन सार्थक झालं असं वाटायला लावणारी, एक तरी घटना घडतेच. या एकाच घटनेचे वजन 99 वाईट घटनांपेक्षा जास्त भरतं… या चांगल्या घडलेल्या एका गोष्टीच्या फुंकरीमुळे बाकीच्या 99 गोष्टी धुरळ्यागत उडून जातात…! हिच मला मिळणारी ऊर्जा आणि शक्ती! ! !

याच ऊर्जा आणि शक्तीच्या बळावर, गेली अकरा वर्षे रोज भीक मागणाऱ्या लोकांमध्ये राहून त्यांच्या पुनर्वसनाचे, शिक्षणाचे, फुटपाथ वर पडलेल्या लोकांना उचलून सुरक्षित ठेवण्याचे काम सुरु आहे, अर्थात आपल्या सर्वांच्या साथीने…!

ती दिवसभरातून घडलेली एकच चांगली घटना, मग मी शब्दरूपात मांडतो, जेणेकरून समाजापर्यंत एक चांगला संदेश पोहोचेल, आपणही असं काहीतरी करावं हे तरुण मंडळींना सुद्धा वाटेल, निराश झालेले लोक हे वाचून नैराश्यातून कदाचित बाहेर पडतील, सगळंच वाईट नाही, काहीतरी चांगलं सुद्धा आजूबाजूला घडतंय, हे लोकांना कळेल, एरव्ही न दिसणाऱ्या माणुसकीचे दर्शन घडेल, इतकाच माझ्या लिखाणाचा हेतू असतो…!

खूप लोक म्हणतात, ‘तुम्हाला येणाऱ्या वाईट अनुभवांवर सुद्धा काहीतरी लिहीत जा की… ‘ पण पेपर उघडला, टीव्ही लावला, आजूबाजूला पाहिले तर अनंत नकारात्मक आणि वाईट वाटेल अशा घटना घडतच असतात, आपण त्या वाचतो पाहतो… मग पुन्हा माझ्या बाबतीत घडलेल्या नकारात्मक गोष्टी सांगून मी त्यात आणखी कशाला भर घालू…???

‘तुम्हालाच सगळे चांगले अनुभव कसे येतात?  आम्हाला का नाहीत येत? ‘, ‘वाईट आलेल्या अनुभवांवर का लिहीत नाही? ‘ हे मला विचारणाऱ्या त्या सर्वांसाठी हे उत्तर आहे…! असो… अगदी साधी गोष्ट… एखाद्याने आपल्याला विचारलं – तुला मी पाचशे किलो गहू देऊ?  की एक किलो गहू?  दोन्हीतलं एक काहीतरी निवड… कुणीही काय निवडेल?  पाचशे किलो गहू… कारण इथे *वजन* महत्त्वाचं ठरतं.

एखाद्याने विचारलं – तुला मी चांगल्या सोसायटीतला पाच रूम असलेला 3000 स्क्वेअर फुटचा पॉश फ्लॅट देऊ?  की चाळीतलं 100 स्क्वेअर फुटाचं पत्र्याचं एक घर देऊ?  दोन्हीतलं एक काहीतरी निवड… कुणीही काय निवडेल?  अर्थातच पॉश फ्लॅट… कारण इथे महत्त्वाची ठरते *आकारमान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याची किंमत. *

पण…

एखाद्याने विचारलं – तुला मी पाचशे किलो लोखंड देऊ?  की 50 तोळे सोनं… काय देऊ?  दोन्हीतलं एक काहीतरी निवड… आता कुणीही काय निवडेल?  50 तोळे सोनं…!

बघा क्षणामध्ये संदर्भ बदलले…

“वजन” महत्त्वाचं म्हटलं तर 500 किलो लोखंडाचे वजन खूप जास्त आहे… तरीही निवड झाली कमी वजनाच्या सोन्याची!

“आकारमान” महत्त्वाचं मानलं, तर 500 किलो लोखंडाचं आकारमान खूप जास्त आहे… तरीही निवड झाली कमी आकारमानाच्या सोन्याचीच!

एखाद्याने विचारलं – तुला मी अब्जावधी रुपयाची एक छोटी हिऱ्याची अंगठी देऊ?  की पॉश सोसायटीतल्या दहा खोल्या भरतील इतके जुने भंगार सामान देऊ?  दोन्हीतलं एक काहीतरी निवड… कुणीही काय निवडेल?  अर्थातच हिऱ्याची अंगठी…!

बघा इथेही वजन, आकारमान, असं सर्व काही असूनही, निवड झाली कमी वजनाच्या, कमी आकारमानाच्या हिऱ्याच्या अंगठीचीच…!

आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात, जीथे “वजनाला” किंमत नसते आणि “किमतीला” वजन नसतं…! रुपयात होणारी किंमत हि फक्त व्यवहारासाठी आहे…!

“किंमत” आणि “मूल्य” यात खूप फरक आहे…! “किंमत” ही कायम खर्च होते… “मूल्य” आयुष्यभर जपले जाते…!

हॉटेलमध्ये स्वतः दोन हजार रुपयांचं खाणं… आणि एखाद्या भुकेल्या माणसाला दहा रुपयाचा वडापाव घेऊन देणं… दोन हजार रुपयांना किंमत जास्त आहे, परंतु या किमतीला वजन नाही… दहा रुपयांना विशेष किंमत नाही, तरीही याचे “मूल्य” आणि “वजन” खूप जास्त आहे…! दोन हजार रुपये खर्च झाले… दहा रुपये अमूल्य होऊन जमेच्या रकान्यात जमा झाले…

तर… मला रोज मोठ्या “आकाराचे” अपमान मिळतात… खूप जास्त “वजनाचे” तिरस्कार मिळतात…

पेशंट तपासायला रस्त्यावर मी एखादी “मोक्याची जागा” बघून मेडिसिन चे डबे मांडून बसतो, परंतु चालायला अडथळा होतो म्हणून लोक माझ्या या डब्यांना मुद्दाम लाथा मारून जातात, दुकानदारांना गिऱ्हाईक आत यायला अडथळा येतो म्हणून मला ते तिथून हाकलून लावतात… या नंतर, दहा खोल्या भरतील इतक्या शिव्या मिळतात…! ! ! पण मी हे मुद्दाम लिहीत नाही, गरजच काय…?  

पण हे सर्व करत असताना उकिरड्यात काहीतरी चकाकताना दिसतं, मी जवळ जाऊन पाहतो ती बहुधा हिऱ्याची अंगठी असते, वेगवेगळे घाव बसले असावेत म्हणून अंगठीचा आकार बदललेला असतो, हिरा मात्र तस्साच लखलखणारा…! हां, थोडी धूळ बसलेली असते इतकंच…

मी माझ्या रुमालाने धूळ साफ करतो, एक सुरकुतलेला पण डोळ्यात चकाकी असणारा साधारण सत्तरीच्या आजीचा चेहरा मग हिऱ्याच्या रूपात समोर येतो…!

मी तिला बोलतं करतो… , ‘मुलगा चांगल्या खात्यात हाय, मला कसला त्यो टीबी का फीबी रोग झालाय म्हणत्यात, सतत खोकणाऱ्या म्हातारीमुळं आपल्या पोरास्नी काय तरास नगो म्हणून हितं आनून पोरानं बशीवली, परत घ्यायाला येतो म्हनला पण धा दिस झालं तरी आला न्हायी…! ‘

‘आजी तुम्हाला मुलाचा फोन नंबर माहित आहे का, पत्ता माहित आहे का?  मी तुम्हाला सोडतो, ते वाट बघत असतील तुमची. ‘

‘मला समदं म्हाईत हाय बाळा, पन वाट चुकलेल्याची बघत्यात, सोडून दिलेल्याची न्हायी. माजी वाट बघणारं आता तिथं कुणी न्हायी’ तिने डोळ्याला पदर लावला.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गौरी पूजनाच्या काही ह्रद्य आठवणी… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ गौरी पूजनाच्या काही ह्रद्य आठवणी… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

तेव्हा आम्ही कसबा पेठेतील एका वाड्यात रहात होतो हे सर्वांनाच माहित आहे.

त्या छोट्या घरातही गौरी गणपतीचा सण थाटात साजरा व्हायचा. आमच्या गौरी अगदी वेगळ्या आणि युनिक आहेत. पंच्चाहत्तर वर्षापूर्वीच्या आहेत. हे गौरींचे मुखवटे श्री शंकरराव चौधरी (बबूआत्याचे यजमान) यांनी दिलेले आहेत. आजही आम्ही त्यांचीच स्थापना करतो. जगात इतरत्र कुठेही असे मुखवटे उपलब्ध नाहीत.

माझी आई हाडाची कलाकार होती. तिच्या अंगी नेतृत्व गुणही उच्च प्रतीचे होते. गौरायांचे हात, दागिने, वस्त्रे, फुलाच्या वेण्या, मोत्याच्या जाळ्या इ. सर्व ती स्वहस्ते बनवीत असे.

गौरीला रंगीबेरंगी कर्दळी, डेलिया, झेनिया, आँस्टर, गुलाब इ. फुलांची आरास केली जायची. ही फुले आम्हाला श्री गणपतराव वळे (गोदू आत्याचे यजमान) पुणे विद्यापीठातून आठवणीने, न चुकता घरपोच आणून देत असत. अशी ही दुर्मिळ फुले मंडईत सामान्याना सहसा उपलब्ध नसत.

गौरींना महाप्रसाद केला जात असे. त्यात भात, वरण, चटणी, कुरडया-पापड्या, घोसाळ्याची भजी, अळूची पातळ भाजी, वाटलेली सुकी डाळ, उसळलेल्या मिरच्या, बटाट्याची सुकी भाजी, आमटी, साखरी भात, मसाला भात, काकडीची कोशिंबीर, भोपळ्याचे रायते, आणि पोटात पत्री साखर दडवलेले वेलदोडे घातलेले साजूक तुपातले बेसन लाडू.

आमची आई सुग्रण होती. तिचा स्वयंपाक अति रुचकर असे. तिला स्वतः सद्गुरु श्री नारायण महाराजांचे आशीर्वाद लाभले होते. तिचे ‘अन्नपूर्णा’ हे नावही त्यांनीच ठेवले होते. ती खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा होती. शेकडो, हजारो माणसे तिच्या हातचे जेऊन संतुष्ट झाली आहेत.

आमच्या दुसऱ्या, म्हणजे भाऊकाकांच्या घरीही स्वतंत्र गौरी असत. इतर मेनू बहुतेक सारखाच असे पण माझी कुसुमकाकू रव्याचे लाडू करीत असे. तिच्या हातचे रव्याचे लाडू खाणे हा एक स्वर्गीय आनंद होता. तसे लाडू मी आजपर्यंत अन्यत्र चाखले नाहीत. कौतुक म्हणजे काकू माझ्यासाठी हे लाडू राखून ठेवीत असे. मग पुढचे आठ दहा दिवस मी रोज काकांकडे जात असे.

गौरीआगमनाच्या दिवशी ज्वारीची भाकरी आणि शेपूची भाजी हा नैवेद्य असे. दुसऱ्या दिवशीच्या जेवणात पडवळाची कढी, घोसाळ्याची भजी आवश्यक असत. तिसऱ्या दिवशीच्या भोजनाचा मेनू सामान्य असे पण दही भात आवश्यक.

गणपती विसर्जनाला वाटलेली कच्ची हरभऱ्याची डाळ, तिला चरचरीत हिंग-जिऱ्याची फोडणी दिलेली असे. इतर जिन्नस मिरची, कोथिंबीर, जिरे, मीठ, लिंबाचा रस इ. चिमूटभर साखरही घातलेली असे. काही अपवाद वगळता, सर्व तिखट मिठाच्या पदार्थात गूळ किंवा साखर आवश्यक. ते आमच्या पुणेरी खाद्यसंस्कृतीचे वैशिष्ठ्य आहे.

ही खिरापत असे आणि वाड्यातील सर्वांना दिली जात असे.

जेवणात साजूक तुपाचा प्रच्छन्न वापर असे. तूप चमच्याने वाढण्याऐवजी वाटीत वाढले जात असे. (त्या वाट्याही वेगळ्या आकाराच्या असत. त्यांना ‘द्रोण’ म्हणत. राजा केळकर संग्रहालयात आता दिसतात.) मोदक, पुरणपोळी यावर तुपाचे तामले उलटे करण्याची प्रथा होती! कोलेस्टेरॉल, वर्कआऊट, बॅलन्स डाएट असले अभद्र शब्द अजून जन्माला यायचे होते!

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “वाट.. ” ☆ मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

??

☆ “वाट.. ”  ☆ मंजुषा सुनीत मुळे ☆

आयुष्याच्या नेमस्त वाटेवरून चालले होते मी.. मरगळलेले पाय ओढत.. गिरणीच्या पट्ट्यासारखी…

मागे काही नाही.. पुढेही काही नाही.. वाट संपणार कधी हेही ठाऊक नाही! !

 

इतक्यात आली एक झुळूक वाऱ्याची.. तीही एकटीच माझ्यासारखी…

सोबतीसाठी आसावले मी.. पण ती स्वतःतच हरवलेली…

 

साद घातली तिला.. ‘ म्हटलं मला बदलायचीये गं ही वाट.. ‘

म्हणाली ‘ खरंच गं वेडी तू.. ये माझ्या पाठोपाठ..!

 

अलगद धरून तिच्या पंखांना चालले मीही लहरत.. लहरत… अन् गुंगच झाली मती…

जिकडे तिकडे बेहिशोबी पसरलेल्या वाटा पाहून.. ऑक्टोपससारख्या – – 

 

एक वाट छोटीशी.. कोवळ्या बाल पायरवांची…

दुसरी अवखळ उडत्या तरण्या पावलांची… आणि पुढे…

 

पुढे हा हमरस्ता.. संसारीच जसा.. दबत्या श्वासांनी.. अडखळत्या ढकलत्या पावलांनी गजबजलेला.. जणू तुरुंगाचीच वाट चालतोय…

 

त्याच्या अगदी शेजारीच ही एक वाट.. जत्रेतल्या चौकासारखी.. बजबजलेली, भांबावलेली, रस्ता चुकलेली 

– – अज्ञानाच्या अंधारात बुडालेली…

 

आणि हिच्या शेजारीच.. पण विरुद्ध दिशेने धावणारी एक नेटकी डांबरी सडक.. जणू ज्ञानाचे दिवे हातात घट्ट धरून अवकाशाला गवसणी घालायला निघालेली…

 

इथून थोडी पलिकडे.. लपतछपत चाललेली एक वाट.. चोरपावलांची.. डोळे मिटल्याचं नाटक करणाऱ्या बोक्यासारखी.. काळोखलेली तरीही सावध आणि धीट…

 

आणि मध्येच ही सज्जनशी भासणारी लबाड वाट.. लक्ष्मीची पूजा करत तिच्याच भक्तांना लुबाडणारी…

 

… इकडे एक समांतर असा प्रशस्त राजरस्ता… “ फक्त देशप्रेमिकांसाठी “ ही आधीची पाटी केव्हाच काढून फेकून दिलेली… आणि आता बगळ्यांच्या असंख्य थव्यांनी सतत भरून वहाणारा.. राजमुकूटाकडे नजर रोखलेला…

 

.. या बाजूला, इतरांपासून जराशी दूरच.. अगदी एकाकी भासणारी.. विरागी संन्यस्त पावलांनी वेगळेपण जपणारी तेजस्वी वाट… पण कित्येकांना अजिबात माहितीच नाही अशी…

 

… पहाता पाहता माझी नजर थकली.. पण हेच समजेना की चालल्यात कुठे या इतक्या सगळ्या वाटा..

.. लांब क्षितिजाच्या पोटात गडप व्हायला?? ..

.. की सर्व नद्यांनी त्या सर्वसमावेशक सागराकडे झेपावे तशा अवकाशाच्या अज्ञात पोकळीत झेपावायला??  

 

– – – की शोधताहेत अजूनही या वाटा आपली खरी वाट..

.. माझ्यासारख्या? .. तुमच्यासारख्या??  

☆

© मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ टाळ्या थांबल्या… आणि माणुसकी बोलू लागली! ☆ प्रस्तुती – डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

? इंद्रधनुष्य ?

☆ टाळ्या थांबल्या… आणि माणुसकी बोलू लागली! ☆ प्रस्तुती – डॉ मकरंद पिंपुटकर ☆

एक प्रसंग… ज्याने डोळे पाणावले आणि माणुसकीचा अर्थ शिकवला

दिनांक : 13 सप्टेंबर 2026

कधी कधी एखादा प्रसंग घडतो…

शब्द थांबतात, डोळे बोलू लागतात आणि मनाच्या खोलवर कुठेतरी माणुसकीची ज्योत पेटते.

13 सप्टेंबरचा तो दिवसही असाच होता…

‘आम्ही साऱ्या सावित्रीच्या लेकी‘ – शैक्षणिक आश्रयालय, वाघाडी, यवतमाळ येथील पारधी समाजाच्या मुलींनी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून स्वतः मानाचे गणपती तयार केले होते.

गणपती विक्रीसाठी बिरसा मुंडा चौक, आर्णी नाका, यवतमाळ येथे स्टॉल लावण्यात आला होता.

मूर्तीला किंमत नव्हती…

होती ती फक्त शिक्षणासाठी सहयोग राशीची अपेक्षा.

स्टॉलसमोर सहा-सात चिमुकल्या पारधी मुली हातात फलक घेऊन उभ्या होत्या.

“गणपती बाप्पाच्या मूर्तीसाठी मूल्य नाही,

आमच्या शिक्षणासाठी सहयोग राशी द्या.”

“आम्ही मातीला आकार दिला,

तुम्ही आमच्या स्वप्नांना आकार द्या…”

त्या निरागस मुलींच्या हातातील फलक त्यांच्या आयुष्याचीच कहाणी सांगत होते.

तेवढ्यात जवळच तृतीयपंथीयांचा एक समूह आला.

सामान्यतः अशा वेळी टाळ्यांचा आवाज ऐकू येतो…

जगण्यासाठी मदतीची मागणी केली जाते…

पण त्या दिवशी काहीतरी वेगळे घडले.

टाळ्या वाजल्या नाहीत.

पैशांची मागणी झाली नाही.

ते त्या चिमुकल्या मुलींकडे पाहत राहिले…

कदाचित त्या फलकावरील शब्दांनी त्यांच्या मनाला स्पर्श केला असावा.

आणि अचानक…

मिना नावाच्या तृतीयपंथीय भगिनीने पुढे येत स्टॉलसमोर ठेवलेल्या सहयोग राशीच्या दानपेटीत स्वतःचे शंभर रुपये टाकले.

क्षणभर सगळे स्तब्ध झाले!

ज्यांच्या हाताकडे समाज अनेकदा मदतीसाठी पुढे येणारे हात म्हणून पाहतो,

त्याच हाताने आज एका मुलीच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे केला होता.

तिने त्या चिमुकल्या मुलींना आशीर्वाद दिला आणि म्हणाली—

“ तुम्ही खूप शिक्षण घ्या…

माझा फोन नंबर देते.

गरज पडल्यास मला फोन करा. ”

बस्स…

त्या चार-पाच शब्दांनी वातावरणच बदलून गेले.

मुलींच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू होते…

आजूबाजूला उभे असलेले लोक हा प्रसंग पाहतच राहिले…

कारण त्या क्षणी शंभर रुपयांची किंमत शंभर रुपये राहिली नव्हती.

ती झाली होती—

माणुसकीची श्रीमंती!

गणपतीच्या मूर्ती शाडूच्या मातीच्या होत्या…

पण त्या दिवशी माणुसकीचा गणपती एका हृदयात साकारला होता.

ज्या मुली म्हणत होत्या

“आम्ही मातीला आकार दिला, तुम्ही आमच्या स्वप्नांना आकार द्या…”

त्यांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी

एका तृतीयपंथीय भगिनीने पुढे केलेला हा हात

कदाचित रकमेने छोटा असेल…

पण भावनेने तो आभाळाएवढा मोठा होता!

समाजाने अनेकदा माणसांना त्यांच्या बाह्य ओळखीवरून विभागले…

पण त्या दिवशी त्या स्टॉलवर

ना तृतीयपंथीय होता, ना पारधी मुलगी…

होती फक्त दोन माणुसकीची हृदये!

एकीकडे शिक्षणासाठी हातात फलक घेऊन उभ्या असलेल्या चिमुकल्या लेकी…

आणि दुसरीकडे त्यांच्या शिक्षणासाठी आशीर्वादाचा हात पुढे करणारी मिना…

गणरायासमोर घडलेला हा प्रसंग कदाचित योगायोग नव्हता.

कदाचित बाप्पानेच समाजाला सांगितले असावे—

“ माझ्या मूर्तीला नव्हे,

या लेकींच्या स्वप्नांना हात द्या…

कारण शिक्षणाने उजळलेले एक आयुष्य हजारो आयुष्यांना प्रकाश देऊ शकते. ”

त्या दिवशी स्टॉलवर अनेक गणपती विकले गेले असतील…

पण मिनाने दिलेले ते शंभर रुपये या संपूर्ण उपक्रमातील सर्वात अमूल्य ‘ सहयोग ’ ठरले.

कारण त्यात पैशांपेक्षा अधिक काही होते—

आशीर्वाद होता…

आपुलकी होती…

विश्वास होता…

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे—

माणुसकी होती!

 मिना ताई, आपल्या त्या शंभर रुपयांना आणि त्याहूनही मोठ्या मनाला मनःपूर्वक नमन!

 –नरेंद्र शा पवार 

 – रमेश केळकर 

 आणि 

– संचालक मंडळ 

‘आम्ही साऱ्या सावित्रीच्या लेकी ‘ -शैक्षणिक आश्रयालय, वाघाडी 

गणपती बाप्पा मोरया! —

 “ आता टाळ्या थांबल्या… आणि माणुसकी बोलू लागली! ”

 

प्रस्तुती : डॉ. मकरंद पिंपुटकर 

 चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares