मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जन्मठेप – एक अनुभूती… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

??

☆ जन्मठेप – एक अनुभूती… ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

“आज आत्ता या क्षणाला मी एका काळकोठडीत बंद आहे. जेमतेम ७*११ फुटांची खोली, साध्या चुन्याने रंगसफेदी केलेली, बाकी विटांचा खडबडीतपणा तसाच. दाराची जाळी जेमतेम दोन फूट रूंद. खोलीला एकच खिडकी – जमिनीपासून सात फूट उंचावर, नजरेच्या आवाक्यापलीकडे. खिडकीला समोरून आच्छादन, आकाशाचा तुकडाही दिसण्याची सुतराम शक्यता नाही.

चाकाला जसे आरे (spokes) असतात तसे सात आरे – प्रत्येक spoke मध्ये रांगेत कोठड्या. तळमजला, पहिला मजला आणि दुसरा मजला – प्रत्येक मजल्यावर ४०-४५ खुराडेवजा कोठड्या. मध्यभागी सेंट्रल वॉच टॉवर. कोठडीच्या दारासमोर समोरच्या कोठड्यांच्या रांगांची मागची बाजू. सहकैदी नजरेसही पडू नये म्हणून ही रचना.

जे जास्त बनचुके कैदी होते त्यांच्या कोठड्यांच्या समोर फाशीघर – तेही उघड्यावर. आज ना उद्या आपलाही हाच अंजाम होणार या टांगत्या तलवारीची जाणीव करून देणारा.

शिवाय समोर मैदानात उभे केलेले तिकाटणे – कैद्याला इथं बांधलं जायचं, अंगावरचे सगळे कपडे काढून टाकले जायचे आणि उघड्या पाठीवर वेताचे, चाबकाचे, आसूडाचे फटकारे ओढले जायचे.

नाठाळातील नाठाळ कैद्यांचे अनन्वित शारीरिक हाल केले जायचे, जाणून बुजून कदान्न – नासके – सडके – कुजके अन्न खायला घातले जायचे. कैदी सतत आजारीच रहावे आणि जेलमधील अन्यायाविरुद्ध कोणतेही बंड वा उठाव त्यांनी करूच नये यासाठीची ही योजना.

आणि एक वेळ हे छळ परवडले पण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या जो मानसिक छळ व्हायचा तो याहूनही जास्त अमानुष असे. “ – – – –

मी होतो अंदमानच्या श्री विजय पुरम् (पूर्वीचे नाव – पोर्ट ब्लेअर) येथील कुख्यात सेल्युलर जेल येथे. निमित्त होते “शब्दामृत” आयोजित “अंदमान बोलावतंय” या अंदमान सहलीचं. पाच दिवसांच्या या सहलीत, दिवसा सर्वमान्य आणि सर्वसामान्य (general) भटकंत्या व्हायच्या, पण संध्याकाळी पार्थ बावसकर आपल्या ओघवत्या शैलीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनपटातील विविध पैलू उलगडून दाखवायचे.

त्या व्याख्यानाच्या कळसाध्यायाच्या (क्लायमॅक्स) वेळी – सेल्युलर जेलच्या प्रत्यक्ष भेटीच्या वेळी त्यांनी आम्हा सर्वांना आवाहन केले – “त्या ७*११ फुटांच्या खुराड्यात अर्धा तास बसून दाखवा. त्या कोठडीच्या बाहेर, हाकेच्या अंतरावर खुला, मुक्त, मोकळा, अथांग सागर आहे. पण ना तो तुम्हाला नजरेला दिसेल, ना त्याची गाज तुम्हाला ऐकू येईल.

तुरुंगात तुमच्यासोबत जवळपास ७०० कैदी असतील. पण एरवी तुम्हाला अन्य कैदी दिसणार देखील नाहीत, दिसतील ते फक्त जेव्हा त्यांना चाबकाने फोडून काढले जाईल, दिवसभर खडाबेडीच्या शिक्षेसाठी लटकवले जाईल अथवा फासावर चढवले जाईल तेव्हाच.

बाहेरच्या जगाचे कायदेकानू इथं अस्तित्वातच नसतील. इथला कायदा, नियंता, देव – सबकुछ एकच – जेलर डेव्हिड बॅरी. आणि त्याच्यासाठी तुम्ही एक क्षुद्र काला आदमी आहात, एखाद्या किड्यामकोड्यारखे चिरडले जाणारे.

कल्पना करा, की दिवसभरात तुम्हाला बैलासारखं कोलूला जुंपलं जाणार आहे, कोलूत टाकलेल्या नारळांतून तुम्हाला दिवसाला तब्बल १५ लिटर तेल काढायचे आहे. तुम्ही गुरासारखे राबत असताना ढिलाई दाखवलीत की पाठीवर आसूड उठलाच समजा.

किंवा तुम्हाला काथ्या कुटायला सांगितलं जाईल. चुकून एखादी नारळाची ओली शेंडी त्यात जाण्याचा अपराध तुमच्याकडून घडला तर पुन्हा मारहाण.

खायला पातळशी पेज, त्यात पडलेल्या पाली वा अन्य कीडे काढायची तसदी न घेतलेली. नैसर्गिक विधींसाठी जमादाराने ठरवलेल्या वेळांचे बंधन. प्यायला पाणी मागणे, एवढेच काय पण शौचाला जायला परवानगी मागणे हाही दंडनीय गुन्हा.

शब्दशः उठता लाथ आणि बसता बुक्की असा कारभार.

आणि दिवसभर हे झालं की त्या टीचभर खोलीत तुम्हाला कोंडून ठेवणार.

आणि हे आणि हेच सगळं रोज घडत राहणार, तुमचा शिक्षेचा कालखंड पूर्ण होईस्तोवर किंवा हे सहन न होऊन तुम्ही मरेपर्यंत किंवा आत्महत्या करेपर्यंत.

आणि सावरकरांना तर एकापाठोपाठ एक – सलग दोन जन्मठेपा भोगायच्या होत्या, पन्नास वर्षे या नरकात काढायच्या होत्या.

नुसत्या या कल्पनेनेच भल्याभल्यांना कापरे भरेल. पण सावरकर अविचल राहिले.

तुमचं काय होतंय? अनुभवून बघा. “

बावसकरांच्या आवाहनानुसार आणि आव्हानानुसार मी आत्ता इथल्या एका काळकोठडीत बंद आहे. अर्ध्या तासाचा गजर लावून, फोन बंद करून ठेवला आहे. डोळे बंद करून बसलो आहे. अंग घामाने निथळते आहे. हा अंदमानचा उष्मा का इथल्या इतिहासाची दहशत?

सारखा कानोसा घेतोय. वेळ जाता जात नाहीये, काळ अंगावर येतोय. अजून अर्ध्या तासाचा गजर काही होत नाहीये. वेड लागायची पाळी आलीये. एवढ्यातच.

आणि सावरकर इथे एक तप राहिले – तब्बल बारा वर्षे.

शेकडो क्रांतीकारी इथे कोंडले गेले होते. उष्मा, घाम, डास, माणुसकीविहीन गोरा अधिकारी आणि त्याला खुश ठेवण्यासाठी वाट्टेल ते करणारे काळे शिपाई.

आपल्या चौकोनी कुटुंबात, सुखवस्तू घरात राहणाऱ्या आपल्याला या अनाम वीरांच्या हालअपेष्टांची सुतराम तरी जाणीव असते का हो?

सुधा मुर्ती म्हणतात, “रशियात स्त्री असो वा पुरुष, दोन वर्षांसाठी सैन्यात भरती होणे प्रत्येकाला अनिवार्य आहे. जेव्हा रशियात लग्न होते तेव्हा नवपरिणीत दाम्पत्य आवर्जून सर्वप्रथम जवळील शहीद स्मारकाला जाऊन श्रद्धांजली वाहून येतात. तुमच्या बलिदानाने आम्ही आज स्वतंत्र आहोत याची जाणीव ठेवतात. “

आपणही असं करण्याची गरज आहे. विनम्र भावाने अंदमानला या, सेल्युलर जेल पहा, मुद्दाम इथल्या कोठडीत थोडा तरी वेळ बसा, त्या काळी इथे काय अवस्था असेल त्याची कल्पना करा. आणि मग जेलच्या गच्चीवर किंवा सेंट्रल टॉवरवर जा. तिथला वारा, उजेड, मोकळी हवा अनुभवा. अथांग समुद्र पहा. स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला मिळवून दिलेल्या आणि आपल्याला असलेल्या स्वातंत्र्याचा खरा आणि सखोल अर्थ आपल्याला नव्याने उमगेल.

एकदा तरी हे अवश्य करा.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “अंकल…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “अंकल…” ☆ श्री मंगेश मधुकर

“ अंकल ”

“तुजसे नाराज नही जिंदगी, हैरान हू मै, परेशान हू मै… ”

.. गेले काही दिवस अशी अवस्था झालेली. मन थाऱ्यावर नव्हतं. सगळं व्यवस्थित चाललेलं. फार काही टेंशन नव्हतं तरीसुद्धा खूप उदास वाटत होतं. निराशा दाटलेली. मनापासून आनंद घेता येत नव्हता. यांत्रिकपणे रोजची कामं चाललेली. डॉक्टर मित्राच्या सल्ल्यानुसार तपासण्या केल्या पण रिपोर्ट नॉर्मल आले. विचार करून डोकं फुटायची वेळ आली. म्हणून अंकलना भेटायला गेलो.

“अरे वा, वा, चौथा खांब या”अंकलनी नेहमीसारखं हटके स्वागत केलं.

“आता हे काय नवीन? ”

“अरे तू मीडियावाला ना. लोकशाहीचा चौथा खांब… ”

“प्रत्येकवेळी नवनवीन नावं द्यायला कसं सुचतं”

“आई शप्पथ!! मलाही माहीत नाही पण सुचतं आपोआप” डोळे मिचकावत अंकल म्हणाले.

“तुमच्याकडे आलं की छान वाटतं. एकदम मस्त फिलिंग” 

“म्हणूनच बऱ्याच दिवसांनी नव्हे महिन्यांनी भेटतोयेस. ”

“इच्छा होती पण कामाच्या गडबडीत जमलं नाही”

“कसा आहेस”अंकलनी विचारल्यावर ओशाळल्यासारखं झालं वास्तविक मी विचारपूस करायला पाहिजे होती पण लक्षातच आलं नाही. आताशा आपण साधेसुधे मॅनर्स देखील विसरत चाललो आहोत.

“मी ठीकयं. तुम्ही कसे आहात. ”

“मस्त, मजेत नेहमीसारखा”

“फार पेशंट दिसत नाहीत. ”

“आता गर्दी स्पेशालिस्टकडे. आमच्यासारखे जुने डॉक्टर आता आऊटडेटेड. ”

“एक विचारू.. पर्सनल आहे”

“बिनधास्त”

“तुम्हांला कधीच हताश, कंटाळलेलं पाहिलं नाही. इतकी एनर्जी कुठून आणता. कायम फ्रेश असता. याचं सिक्रेट मलाही सांगा. ”

“आयुष्य सोपं केलंय. ”

“म्हणजे”

“मला आनंदी रहायला आवडतं म्हणून तसं राहण्याचा प्रयत्न करतो. ”

“पण तरीही, त्रास असणारच ना. ते कोणाला चुकलेत”

“त्यालाच तर आयुष्य म्हणतात. समोर येईल ते स्वीकारायचं म्हणजे त्रासाची तीव्रता कमी होते. त्यासाठीच काही सवयी मुद्दाम लावून घेतल्यात आणि काही बदलल्या. ”

“उदारणार्थ.. ”

“आपली कुवत, मर्यादा ओळखून वागतो आणि स्पष्टपणे ‘नाही’ म्हणायला शिकलोय. शक्य तेवढंच काम करतो. महत्वाचं म्हणजे कमी अपेक्षा ठेवतो त्यामुळे फार प्रॉब्लेम निर्माण होत नाही. ”

“ऐकायला चांगलं वाटलं तरी प्रत्यक्षात असं वागणं फार अवघडयं. ”

“हो पण अशक्य नाही. ”

“आजकाल पैसा आहे पण मन शांत नाही असं का? .

“दिखाऊपणाच्या नादात आपणच आयुष्य अवघड करतो. अनेक त्रास स्वतःहून ओढावलेले असतात. मोठ्ठ कर्ज काढून खरेदी करायची आणि ईएमआयची वाळवी मेंदूला लावून घ्यायची. त्याचा तब्येतीवर परिणाम होतो. भरिस भर ताण आणि मोबाईल कायम सोबतीला असल्यानं सतत अस्वस्थ. ”क्षणभर अंकल माझ्याविषयीच बोलत आहेत असं वाटलं.

“पण तुम्हांलाही त्रास झाला असेलच ना. ”

“खूप त्रास झाला. धाडस नाही.

अल्पसंतुष्ट, कचखाऊ, पळपुटा, डेरिंग नाही वगैरे वगैरे अशी भरपूर नावं मिळाली. “कुछ तो लोग कहेंगे” म्हणत सोडून दिलं. माझा निर्णय बदलला नाही अर्थात बायकोच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झालं. आता आम्ही आनंदी आहोत. गरजेपुरता पैसा गाठीशी आहे. मुलाच्या संसारात डोकावायला नको म्हणून मुद्दाम वेगळं राहतो. एक रुपयाचं सुद्धा कर्ज नाहीये. रोजचा व्यायाम आणि जिभेवरचा ताबा यामुळं तब्येत उत्तम, जमेल तसं सहलीला जातो. एकूणच मस्त आयुष्य चाललंय. ”अंकलचं ऐकून मला त्यांचा खूप हेवा वाटला.

“अजून एक महत्वाचं सांगतो. ”

“काय ते.. ”

“आपले प्रॉब्लेम्स स्वतःलाच सोडवावे लागतात. प्रेमपत्र कितीह सुंदर लिहिलेलं असलं तरी जाहिरारित्या वाचायचं नसतं. तसंच आपले प्रॉब्लेम कितीही मोठे आणि महत्वाचे असले तरी इतर त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकत नाही. त्यात आजकाल तर मदत करण्याऐवजी सल्लाच दिला जातो. ”

“थोडक्यात काय तर दाढदुखीचा ठणका ज्याचा त्यालाच सहन करावा लागतो. ”

“करेक्ट. नेमकं बोललासं. उदाहरण आवडलं”

“तुमच्याकडूनच शिकलोय. हसू नका पण मी सुद्धा मदत मागायलाच आलोय. ”

“ते लक्षात आलं. तू मागतोय म्हणून सल्ला देईन पण मान्य करायचा की नाही याचा निर्णय तुलाच घ्यायचाय. माझा आग्रह नाही. ” अंकलशी बराच वेळ गप्पा मारल्या. मनातली खदखद मोकळी केल्यावर शांत वाटलं. अंकल काहीच बोलले नाहीत.

“काही सीरियस”भीती भीत विचारलं.

“काहीही झालं नाहीये. हे मानसिक दुखणं आहे. टेंशन घेऊ नकोस. ”

“विनाकारण उदास, निराश का वाटतं. ”

“होतं असं. सर्व काही ठीक असलं तरी अनामिक काळजी वाटतेच. खूप विचार करतोस का? ”

“हो. ”

“विचारांची धुनी कायम पेटलेली. अनावश्यक, संदर्भहीन विचार येतात. स्वतःचाच राग येतो. घुसमट वाढते. शांत झोप नाही. मेंदू कायम सावध. करेक्ट!! ”

“असंच होतयं. परफेक्ट निदान केलंत. पक्के मनकवडे आहात. हे कशामुळं? . ”

“एकसूरी आयुष्य!! आजच्या भाषेत बोलायचं तर मोनोटोनस लाईफ!! सगळंच वरवरचं, तकलादू, तेच ते अन तेच ते आयुष्य. त्यातही आनंद घेण्यापेक्षा दाखवला जातो. त्यामुळे मन अस्थिर. एकाग्रता फार काळ टिकत नाही. भान हरपून जावं असं घडत नाही. स्वतःची नेमकी आवड, छंद कोणते? हेच समजत नाही. मेंढरांसारखे एकमेकांच्या पाठीमागे फरफटत जाऊन नकली आनंदी घेत राहतो. ”

“अगदी खरंय, मी पण तेच करतोय. आवड साफ विरसलोय. ”

“आधी त्याचा शोध घे. जे केल्यानं छान वाटतं, मूड चांगला होतो, आनंद मिळतो ते ते सर्व कर. आतापर्यंत घर, संसार, मुलं यांच्यासाठी केलसं. थोडं स्वतःसाठी जग… आणि आता आज एवढा डोस बास!! बाकी तू हुशार आहेस. चला”

“मी घरी सोडतो. ”

“नको. माझी मर्सिडिज आहे ना” सायकलकडे बोट दाखवत अंकल हसले. मी वाकून नमस्कार केल्यावर “कल्याणस्तु!! ” असा आशीर्वाद देऊन सायकलवर टांग मारून निघून गेले. पाठमोऱ्या अंकलकडे पाहताना अचानक डोक्यात ट्यूब पेटली लहाणपणी मला सायकल खूप आवडायची. भरपूर चालवली आणि नंतर सायकल सुटली ती कायमचीच. गेल्या कित्येक वर्षात सायकलला हातच लावला नव्हता. ठरलं तर मग…. नकळत तोंडातून शब्द बाहेर पडले “ थॅंक्यू अंकल.”

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तर कोणीच आऊट होणार नाही…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “तर कोणीच आऊट होणार नाही…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

 राष्ट्रसेविका समितीच्या शाखेत गेले होते. त्या दिवशी भक्ती म्हणाली,

“आज नवीन खेळ खेळू. “

आम्ही खुश.. ऊत्सुकता. काय असेल बरं…

भक्ती म्हणाली,

” खेळ सोपा आहे सगळ्यांनी गोल फिरायचं. जी खेळ घेत असेल तिनी.. गणितातले शब्द आहेत… अर्धा, एक, दीड दोन… ते म्हणायचे. अर्धा म्हटलं तर थोडा गुडघा वाकवायचा आणि उभं राहायचं. एक म्हटलं तर नुसतं उभं राहायचं. दीड म्हणलं तर दोघींनी जोडी करायची. एकीनी थोडं वाकून उभं राहायचं.. की झाला दीड..

” सोप्पच आहे की… चला खेळूया” आम्ही म्हटलं. भक्ती म्हणाली,

” पण एक लक्षात ठेवा कोणीही आऊट होणार नाही याची दक्षता घ्यायची. त्यासाठी कसही गणित करा. “

खेळायला सुरुवात झाली. अर्धा, एक खेळून झाले. नंतर आला दीड… एक आणि अर्धा…

दोघी दोघींनी जोड्या केल्या.

 एक जण एकटीच राहिली. तिला जोडीच नव्हती. क्षणभर इकडे तिकडे बघत उभी राहिली.

आता काय…… तेवढ्यात पटकन दोघींनी तिला आपल्या गटात घेतलं आणि तिघीही गुडघ्यावर खाली वाकल्या.

 दीड चा हिशोब पूर्ण झाला..

अरे खरंच की…

यातलं खरं मर्म असं होतं की…

सर्वांना सामावून घेऊनच उद्दिष्ट साध्य करायचं आहे… त्यासाठी आम्ही ऍडजेस्टमेंट करायला तयार आहोत.

म्हणूनच त्या वाकल्या… उद्देश सफल झाला.

असा नीट विचार करून खेळलं की की पाव, अर्धा, पाऊण यांचा मेळ घातला तर कोणीच आऊट होणार नाही. शेवटपर्यंत सर्वांना एकत्र खेळता येईल. मजा आली… खेळ संपला घरी आले.

आजच्या खेळात भक्तीने सांगितले होते… कोणीही आऊट होणार नाही याची काळजी घ्या. याचाच अर्थ असा की एखादा मागे राहिला तर त्याला तुमच्यात सामाविष्ट करून घ्या..

 त्याला बरोबर घेऊन पुढे चला…

 नीट संयमानी सर्वांनी मिळून विचार केला की हे जमू शकते..

 मार्ग निघू शकतो…

मग कोणी मागे राहणार नाही.

कितीही नाही म्हटले तरी साध्या खेळातही मागे राहणाऱ्याला थोडे दुःख होतेच. त्यालाही अजून खेळायचे असते. जीवनातही हे तत्वज्ञान उपयोगी आहे.

” एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ ” 

हेच तर या खेळाचे सूत्र असावे असे मला तरी वाटले.

आजच्या खेळाचा विचार करताना नातवाच्या पाचवीच्या स्कॉलरशिपच्या गणिताची आठवण झाली. लक्षात आलं परीक्षा झाली

.. रिझल्ट लागला.. संपलं असं नसतच.. परीक्षा ही आयुष्यभराचीच गोष्ट आहे. त्यातील एका गणिताचं साधं सोप्प उत्तर या खेळाने दिलेले आहे.

ते आपण प्रत्यक्ष आचरणात आणायचे आहे. त्यासाठी मला काय करता येईल.. याचा आपल्या मनाशी आढावा घेऊ या..

अजून थोडा विचार केला…

लक्षात आलं की समाजातही जे आर्थिक, सामाजिक कारणाने मागे आहेत त्यांच्यासाठी भारत सरकार अनेक योजना राबवत आहे.

” सबका साथ सबका विकास”

 हे श्री मोदी साहेब सांगत आहेत. भारत प्रगतीपथावर चाललेला आहे.

आपण अर्धे कच्चे असलो तरी आपल्याला..

राष्ट्र सेविका समितीने तिच्यात सामावून घेतलेले आहे. शाखेत गेल्याने सकस विचार मनात रुजत आहेत. अशा नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत.

त्यासाठी नियमित शाखेत जात राहू..

नविन संकल्पना शिकत राहू.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हौसला होना चाहिये! ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ हौसला होना चाहिये! ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“हौसला होना चाहिए! जिंदगी तो कहीं से भी शुरू की जा सकती हैं ।” ••••

आज ताईचा कौतुक समारंभ आहे. एका ‘केक शो ‘ मध्ये पहिले बक्षीस मिळाले तिला. मी आवर्जून या समारंभाला जायचे ठरविले होते. ताई करिता हा फार महत्वाचा दिवस आहे. आमच्या साठी ताईची ही प्रगती खरंच खूप कौतुकास्पद आहे. वयाच्या चाळीशी नंतर स्वतः चे अस्तीत्व सिद्ध करणे तेवढे सोपे नसते. ••••

आमची ताई सर्व भावंडात मोठी. ग्रॅज्युएशन नंतर लगेचच लग्न झाले. एका मोठ्या परिवारात ती छान रमली. आपले कर्तव्य अगदी छान पार पाडले तिने. फक्त एक खंत तिला नेहमी असे, की मी घरकाम केले, घर सांभाळले, मुलांना सांभाळले, याशिवाय वेगळं असं मी कधी काही केले नाही. तिला ‘ ‘Baking’ ची खूप आवड होती, पण कधी जमलेच नाही. संधी मिळाली नाही म्हणा किंवा थोडा भिडस्त स्वभाव असल्याने, मनातलं कधी बोललीही नाही. •••••

मागच्या वर्षी तिच्या दीराचे लग्न झाले. ‘भाग्यश्री ‘ घरी आली, ती बॅंकेत नोकरी करणारी छान, सुंदर, स्वभावाने पण तेवढीच छान. ताई व भाग्यश्री ची लगेच दोस्ती झाली. वयात दहा, बारा वर्षांचे अंतर म्हणून लहान बहिणीसारखेच ताई तिच्याशी वागत असे. भाग्यश्री नोकरी करणारी असली तरी जमेल तेवढी मदत करायची. ताई ला एक लहान बहीण व मैत्रिण मिळाली. दोघी खूप गप्पा मारतात. •••••

आई बाबा हे सर्व बघून खुश होते. दोघींचे पटते हे चांगले झाले. आता काळजी करायची गरज नाही. आई पण दोघींच्या गप्पांमध्ये भाग घेतात. एकदा सहज बोलता बोलता ताईने आपली बेकिंग ची आवड भाग्यश्री ला सांगीतली. ••••

तिने हे ते मनावर घेतले. आईंबरोबर चर्चा केली. व एका ‘Baking class’ मधे ताईचे नाव नोंदवले. फी भरली. व स्वतः दोन दिवस सुट्टी घेऊन घर सांभाळले. ताईला क्लासला पाठविले. •••••

भाग्यश्रीचे हे करणे, म्हणजे ताईला प्रोत्साहन देणे होते. जणू काही ताईचे भाग्य बदलायचे तिने ठरविले होते. आईंनाही हे पटले. ••••

घरचे सर्व आनंदात होते. ताईचा कोर्स पूर्ण झाला. आवड असल्याने ताईची प्रगती छान होती. आता ताई केक्स चे आॅड्रर घेऊ लागली. हळूहळू ओळखीच्या सर्वांकडून तिला ऑर्डर मिळु लागले. ••• 

भाग्यश्री ऑनलाईन सर्व साहित्य मागवून देत असे. दोघी मिळून चर्चा करत, की हे काम अजून कसं छान करता येईल.??? केक बरोबर ‘ग्रीटिंग कार्ड ‘ देणे त्यावर प्रसंगानुसार मेसेज लिहिणे. वेळेवर केक ची डिलीव्हरी देणे. या सर्व गोष्टींमुळे ताईचे लवकरच नाव झाले. आता तिला आठवड्याला चार पाच आॅर्डर सहज असतात.. •••••

‘Home maker ‘ ताई ‘ business woman ‘ ही झाली •••••

“कौतुक करणाऱ्या दहा व्यक्तिंपेक्षा प्रोत्साहन देणारी एक व्यक्ती तुमचे आयुष्य कसं बदलू शकते. याचे हे सुंदर उदाहरण आहे. “••••

आईंच्या आग्रहाने आता घर कामाला एका मावशींना ठेवलं. ताईने आपल्या कामात लक्ष केंद्रित केले. बिझनेस वाढविण्यासाठी जाहिरात देणे सुरू केले. वेगवेगळे प्रयोग करून, बेकिंगच्या नवनवीन कल्पना, त्यात स्वतः ची कल्पकता, त्यामुळे प्रसिध्दी लवकर मिळाली. •••••

त्यात भर पडली तिच्या स्वभावाची, प्रसन्न व्यक्तिमत्वाची. घरचे सर्व तिला आपापल्या परीने मदत करू लागले. ••••

आज तिचा कौतुक समारंभ बघून भाऊजींच्या डोळ्यात पाणी आले. आपल्या बायकोचा हा गुण मला माहितच नव्हता. तिने कधी सांगितले नाही. व मी कधी तिची काही इच्छा आहे का? हे विचारले नाही. वीस वर्षे झाली बरोबर राहून, पण हे कधी लक्षातच आले नाही. हे काम तर ती आधी पण करू शकली असती. चुकलेच माझे. मला तिला प्रोत्साहन द्यायला हवे होते. •••••

ताई म्हणाली, ••••अहो! मी तरी कधी तुमच्या बरोबर याबाबतीत बोलले का?? . काही हरकत नाही. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. भाग्यश्री ने हे मनावर घेतलं, आईंनी पण सपोर्ट केला. तिने माझ्याही उन्नती चा विचार केला. आता तुम्ही सर्व मला प्रोत्साहन देता. घर कामात मदत करता. म्हणून सर्व जमतंय मला. हे शक्य झालंय. ••••

” नशीबाचे सर्व फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असे नेहमी घडत नाही. पण जसे पडतील, त्या परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द मात्र असावी लागते “. ती ताईत होती. ••••

” समय सबका बदलता/ आता हैं।”••••

 म्हणतात ना, ••••

 

“हौसला होना चाहिए । जिंदगी तो कहीं से भी शुरू हो सकती हैं ।”••••

 

आज कौतुक समारंभात ताई ने सर्वांना धन्यवाद दिले. ती म्हणाली आज एक गोष्ट लक्षात आली. काही जण खूप मोठ्या मनाची असतात. दुसऱ्या च्या प्रगतीचाही विचार करतात. मदत करतात. एकमेकांना आधार दिला तर सर्वांचीच प्रगती होऊ शकते.

प्रत्त्येकाने बाहेर जाऊनच पैसे कमविले पाहिजे असं नाही. •••

सर्वांना एक विनंती आहे. आपला छंद जागृत ठेवा. घरच्यांशी बोला. आपली इच्छा सांगा. कधी कधी काही गोष्टी करायला/ व्हायला उशीर लागतो. पेशंन्स ठेवा. ••••

“चूकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेने हळूहळू चालणे केंव्हाही चांगले नाही का?? ” •••••

मुलं मोठी झाल्यावर नोकरी साठी, शिक्षणाकरिता बाहेर पडली की, आपला एकटेपणा घालवायला, आपले छंद कामी येतात. एकमेकांना मदत केली तर सर्वच पूढे जातात. ••••

ताईने सर्वांना धन्यवाद दिले. भाग्यश्री व आईंना स्टेज वर बोलवून त्यांची ओळख माझे ‘आधार स्तंभ ‘ म्हणून करून दिली. ••••

आयुष्य हे एकेरी मार्गासारखे आहे. मागे वळून पाहता येत पण मागे जाता येत नाही. •••• निसर्ग आपल्याला देतो तो चेहरा, व आपण स्वकर्तृत्वाने निर्माण करतो ती आपली ओळख असते. ••••

फक्त •••• 

“हौसला होना चाहिए, जिंदगी तो कहीं से भी शुरू की जा सकती हैं ।”

आज माझ्या लहान बहिणीने शिकवले आनंद हा सोन्यापेक्षाही मुल्यवान असतो म्हणून. आनंद वाटा, तो लुटा व स्वतः ही आनंदी रहा. सर्वांचा विचार करणारी भाग्यश्री आमच्या घरचा ‘ binding factor ‘ आहे. भाग्यश्री नेहमी म्हणते, •••• 

” ताई तुम्ही सर्व आहात म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आहे ना. ” ••••

“एक स्त्रीच दुसऱ्या स्त्री चे पाय ओढते. हा जूना भ्रम दूर करूया.

एक स्त्री दुसऱ्या स्त्री ची मदत करते. हा मेसेज प्रचलनात आणुया. “

“देणारा कायमच सर्व श्रेष्ठ असतो मग तो आधाराचा शब्द असो, नाही तर मदतीचा हात. ” ••••

म्हणतात ना, ••••

“चांगले व्यक्तिमत्त्व कधीच जन्म घेत नाही, ते निर्माण करावे लागते. आपल्या बरोबर दुसऱ्यांचही भल व्हाव. अशी ज्यांची मानसिकता असते त्यांना आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही. “•••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विवेक… ☆ श्री हेमंत तांबे ☆

श्री हेमंत तांबे 

??

☆ विवेक… ☆ श्री हेमंत तांबे 

एका छोट्याश्या गोष्टीवरून आपण एखादा विचार फुलवत न्यायचा. कारण जेव्हा विचार फुलत जातो त्यानंतर आचार खुलत जातो. *<– याला फार किंमत द्यायची नाही. पण उनाडक्या करण्या पेक्षा वेळ चांगला जातो. तमाशा पाहून लोकं फुकट गेली नाहीत आणि किर्तन प्रवचन ऐकून सुधारली नाहीत ! –>* मी जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, ती वाचताना भाव असा ठेवा की,  आपल्याला मतितार्थ समजावून घ्यायचा आहे, वाक्य रचनेला किंमत द्यायची नाही. — मी एकदा एका हाॅटेलात दुपारी बसलो होतो,  बाहेर ऊन रणरणत होतं, अंगाची काहीली झाली होती. एवढ्यात एक माणूस त्या उपाहारगृतात आला आणि वेटरला म्हणतो, “खूप तहान लागल्येय एक थंड पाण्याचं ग्लास द्या.” — त्या हाॅटेलचा मालक हे ऐकत होता, तो म्हणतो, “आमच्या कडे ग्लासातून पाणी मिळेल, पण थंड पाण्याचं ग्लास नाही, कारण थंड पाण्याचं ग्लास तयार करण्याचं तंत्रज्ञान अजून विकसित झालेलं नाही. तुम्हाला निश्चित काय हवंय ?” — बहुतेक तो हाॅटेल मालक दर्शन शास्त्राचा विद्यार्थी असावा किंवा जातिवंत अत्यंत खडूस असावा. ….. थोडक्यात विपरीतार्थ काढू नयेत, शब्दच्छल करण्यात काही अर्थ नाही !

एकदा एका उच्च दर्जाच्या चित्रकारानं त्याच्या तरुणपणात ठरवलं की, आपण असं चित्र एखाद्या श्रमजीवी व्यक्तीचं रेखाटू या की, त्याच्या हसऱ्या चेहऱ्या सोबतच त्याच्या डोळ्यांतील भावांतून दया, सत्य, सौंदर्य, आनंद व परमात्याचं दर्शन होईल. आपली ही कलाकृती अजोड अद्वितीय झाली पाहिजे, त्यासाठी त्यानं तशा व्यक्तीच्या चेहऱ्याचा शोध सुरू केला. गावोगावी रानोमाळी, खेडं ते शहर, शेतकरी ते कामगार सर्व ठिकाणी त्याचा शोध सुरू झाला. वर्षभर भटकंती केल्यावर एका डोंगरावर एक तरूण शेतकरी आपल्या गायी चरवताना त्याला जसा हवा होता तसा मिळाला. त्याचा चेहरा आणि डोळ्यातील भाव त्या चित्रकाराला सौंदर्यानुभुती व परमात्याची प्रचिती देत होते. त्या चित्रकारानं हुबेहूब त्याचं चित्र रेखाटलं. त्या चित्राच्या डोळ्यांतील भाव त्याला हवे होते तसेच व्यक्त झाले होते, खूप आनंदित झाला तो. जी जी व्यक्ती ते चित्र पाहात होती, ती तर मोहवून जात होती. समाधान, तृप्तता, शांती, आनंद, सौंदर्य, पूण्य, सत्य थोडक्यात परमात्म्याचं दर्शन त्या डोळ्यांतून होत होतं. प्रत्येकजण त्या चित्रकाराचं कौतुक करत होता. अशी अनेक वर्षे निघून गेली. ते चित्र त्या कलाकाराच्याच कला दालनात नव्हे, तर सर्वत्रच कौतुकास पात्र झालं होतं !

आता तो कलाकार म्हातारा झाला होता. त्याला असं वाटलं की, आपण मरण्यापूर्वी असं एखाद्या माणसाच्या चेहऱ्याचं चित्र रेखाटू या की, त्याच्या डोळ्यातून हिंसा, क्रौर्य, कृतघ्नता, घृणा, पापच दिसेल. आपलं पहिलं सुंदर माणसाचं चित्र आणि हे जे चित्र रेखाटणार आहोत ते एकत्र ठेवूया आणि जनतेला ठरवूद्या आपल्याला काय हवं, आपण कसं वागावं, कसं दिसावं. त्यानं त्यासाठी वेगवेगळ्या दुष्कृत्यांत सहभागी असलेल्या लोकांचे चेहरे पाहायला सुरुवात केली. पण त्याला मनासारखा चेहरा काही मिळेना, म्हणून तो शेवटी तुरुंगात गेला. तिथल्या तुरुंगाधीकाऱ्याला त्यानं सांगितलं की, मला वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या, अत्यंत क्रुर खुंखार गुन्हेगाराची भेट हव्येय. तुरुंगाधीकाऱ्यानं त्याची तशा एका गुन्हेगाराशी म्हणजे कैद्याशी भेट घालून दिली आणि तो निघून गेला. या चित्रकारानं त्या कैद्याला पटवून त्याच्या चेहऱ्याचं हुबेहूब चित्र काढलं. ते चित्र इतकं लाजवाब होतं की, त्या चित्रातील डोळ्यांतून त्या चित्रकाराला हव्या असलेल्या सर्व वाईट गोष्टी दिसत होत्या. चित्र पूर्ण झालं आणि तो चित्रकार निघणार तेव्हा, त्या कैद्याच्या चेहऱ्यावर उदासी, दुःख, दैन्य,  अगतिकता, पश्चात्ताप दाटून आला आणि तो रडू लागला. या चित्रकाराला नवल वाटलं, इतक्यात तो कैदीच म्हणतो, “भल्या माणसा, विस वर्षांपूर्वी तुच माझ्या खूप प्रेमळ समाधानी आनंदी चेहऱ्याचं चित्र काढलं होतंस. काळ कसा पटापट निघून गेला पाहा आणि मी चांगल्याचा वाईट कसा झालो कळलंच नाही. श्रमातून मिळणाऱ्या समाधान आनंदा ऐवजी, श्रम न करता पैसा मिळवण्याचा मार्ग म्हणून चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या लुटपाट दरोडेखोरी हत्या सुरू केल्या आणि आज या तुरुंगात खितपत पडलोय. गेल्या विस वर्षांत अनेकानेक चुका गुन्हे मी केले, पण आता पश्चात्ताप करून काही उपयोग नाही. जर शक्य असेल तर आणि ते माझं जुनं चित्र तुझ्या कडे असेल तर, ते पहिलं चित्र आणि हे नविन चित्र एकत्र ठेवून खाली लिही की, “ही दोन्ही चित्रं एकाच व्यक्तीची आहेत. या दोन्ही चित्रांतील व्यक्तीच्या डोळ्यातील भाव पाहा. कारण आपल्या डोळ्यातील भाव आपल्या वागणूकीचे इच्छेचे कर्तृत्वाचे दर्शन देतात. व्यक्ती एकच असली तरी पहिलं चित्र ती व्यक्ती श्रम करत सन्मार्गावर असतानाचं आहे, तर दुसऱ्या चित्रात तिच व्यक्ती श्रम न करता वाममार्गाला लागल्यानंतरचं आहे. मार्ग निवड आपली राहिल !” 

सनातन संस्कृतीत ध्येय महत्वाचं आहेच, पण ध्येयाप्रत जाण्याचा मार्ग त्याहून महत्वाचा आहे. ध्येयाप्रत जाण्याचा मार्ग आपल्याला समृद्ध करत जाणारा असेल, तर ध्येय प्राप्ती नंतर सच्चिदानंद ही परमोच्च अवस्था प्राप्त होते !

© श्री हेमंत तांबे

पाटगाव. 

मो – 9403461688

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “टेलिस्कोप आणि कॅलिडोस्कोप… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

??

☆ “टेलिस्कोप आणि कॅलिडोस्कोप … ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके

सकाळी चालायला गेलो, तेव्हा अंगभर स्वेटर कानटोपी घातलेला एक मुलगा सायकल हाणत भर्रकन क्रॉस झाला. चेहरा आणि सायकल दोन्ही ओळखीची वाटली. परत येताना सुपर मार्केट मधून दूध आणण्यासाठी गेलो. तेवढ्यात मागून तोच सायकलवाला पोरगा हजर..

“वीस घरं झाली बघा. आता घरी जाऊ का मी? ” पोरगा म्हणाला. दुकानदारानं उत्तरादाखल नुसतीच मान डोलावली. पोरगा गेला.

“आत्ता चार-पाच दिवसांपासून सकाळी दूध घालायला जायला लागलाय. ” दुकानदार म्हणाला.

“पण यंदा दहावी आहे ना त्याची? मग? ” मी म्हटलं.

“कसली दहावी अन् कसलं काय? शाळा असती दुपारची. मग सकाळी कुठं काय काम असतं त्याला? झोपलेलाच असतो घरी. मग थोडं केलं काम तर वाया कुठं जाणार आहे? “

“पण तोच वेळ त्यानं अभ्यासासाठी वापरला तर त्याचा फायदा नाही का होणार? “

“फायदा म्हणजे कुठला? मार्कांचाच ना? समजा पडलेच त्याला ८०-९०% मार्क, तरी ऍडमिशन कुठं सहज मिळणार आहे? खाजगी कॉलेजच घ्यावं लागणार. अकरावी आणि बारावी सायन्स म्हटलं तरी दोन वर्षांत सहा ते सात लाख रुपये तर नक्की खर्च होणार. “

“आता एकुलता एक मुलगा आहे ना? मग अडचण काय आहे? “

“एकुलता एक मुलगा आहे, हीच अडचण आहे सर. “

“म्हणजे? “

“एकुलता एक म्हणूनच आजपर्यंत एखाद्या राजाच्या मुलासारखं वाढवलं. जे जे त्यानं मागितलं ते ते सगळं दिलं. काही कमी पडू दिलं नाही. आता मनाविरुद्ध घडण्याची सवयच राहिली नाही त्याला. “

“अरे, पण म्हणून काय दूध घालायला पाठवायचं? “

“तसं नाही सर. दहा पंधरा दिवसांपूर्वी त्याच्या आईला शंका आली. तो आंघोळीला गेल्यावर त्याचं कपाट तिनं उचकून पाहिलं. अंदाज बरोबर निघाला. सिगारेटचं पाकीट, लायटर आणि पैसे सापडले.”

“मग? “

“मग काय? तिनं मला सांगितलं. आता इथं माझ्या जागी माझा बाप असता ना, तर बाथरुममध्येच जाऊन मुलाला तिथंच धुतलं असतं त्यानं. “

“मग तुम्ही केलंत तरी काय? “

“दोन दिवस विचार केला. त्याला काही ओळख दाखवली नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी तो दात घासून डायनिंग टेबलावर येऊन बसला, तेव्हा त्याच्या समोर नवीन सिगारेटचं पाकीट अन् लायटर ठेवलं. आणि म्हटलं, ही सिगारेट घेत जा. पोट एका झटक्यात साफ होतं बघ. “

“काय सांगता? “

“त्याचा चेहराच पडला सर. तिथल्या तिथं जागेवर त्याला घाम फुटला. तिथंच आमचे दोघांचे पाय धरले. परत आयुष्यात कधी करणार नाही असं म्हणायला लागला. सॉरी म्हणाला. “

“मग? “

“तुझ्यासमोर ही सवय सोडवण्याचे दोन पर्याय आहेत. एक मार्ग व्यसनमुक्ती केंद्रात जाण्याचा आणि दुसरा मार्ग माझा. बोल, तू कुठल्या मार्गानं जाशील? “

“मग? “

” म्हणाला, तुम्ही सांगाल तसं करतो. “

“मग तुम्ही काय केलं? “

“त्याच दिवसापासून त्याला घेऊन संध्याकाळचं जिम लावलं. आता रोज संध्याकाळी एक दीड तास तो आणि मी दोघं जिम ला जातो. रात्री आठ वाजता आम्ही तिघं एकत्र जेवायला बसतो. मग मी पुन्हा दुकानात येतो. “

“पण मुलाची भीती गेली का? “

“त्याला आम्ही काही बोललो नाही, मारलं नाही, उपाशी ठेवलं नाही, फोन बिन काढून घेतला नाही. फक्त त्याला सांगितलं. उद्यापासून तू पहाटे साडेचार वाजता दुकानात यायचं. दुकान उघडायचं. सामान लावून घ्यायचं. दुधाची गाडी आली की, दूध उतरवून घ्यायचं आणि सकाळी सहा वाजता मी आलो की, दुधाची एक लाईन टाकून यायची. “

“तयार झाला का? “

“दोन तीन दिवस मी स्वतः सोबत गेलो. सगळं शिकवलं. मग आता जातोय रोज. ” दुकानदार म्हणाला.

“पण यामुळं प्रश्न सुटेल का? ” मी विचारलं.

“मी दोन दिवस विचार केला ना सर. तेव्हा आपल्याच खूप गोष्टी चुकतायत हे माझ्या लक्षात आलं. तो जे मागत गेला ते आपण त्याला देत गेलो. पण कधी त्याच्यासोबत कुठं गेलो नाही. एकत्र शॉपिंगला गेलो नाही. कधी त्याच्या शाळेत गेलो नाही. ते माझं चुकलंच ना. त्यामुळं, मी कुणावरही अजिबात चिडचिड केली नाही. आधी स्वतःलाच बदलायचं ठरवलं. “

“म्हणजे काय केलं? “

“सगळ्यात पहिलं म्हणजे, मी आधी माझ्या सवयी बदलल्या. त्याला वेळ देण्याचा मार्ग शोधला. तो म्हणजे व्यायाम करणे. म्हणून आता गेल्या आठवड्यापासून संध्याकाळी तीन तास मी दुकानात नसतो. आम्ही दोघं जिम ला एकत्र जातो आणि रात्रीचं जेवण एकत्र करतो. पहाटे दुधाच्या लाईनीची आपल्याकडे पाच सहा मुलं आहेत. साधारण त्याच्यापेक्षा वयानं थोडी मोठी आहेत, पण चांगली आहेत. उनाड नाहीत, व्यसनी नाहीत. तीही शिकतातच ना. पण घरची परिस्थिती नाही म्हणून आपल्याकडं तीन-चार हजारावर काम करतात. त्यांच्यासोबत पहाटे तासभर दुकानात काम केलं तर त्यांच्याशी हा बोलेल. जगण्यासाठी काय काय करावं लागतं याचा जरा डोक्यात प्रकाश पडेल. “

“मग पडतोय का प्रकाश? “

“हळूहळू पडेल. आपल्याला कुठं घाई आहे? बदल सावकाश होऊ दे. मुलाला हाणून मारून काय होणार? ” तो एकदम शांतपणे म्हणाला.

“पण त्याच्या दहावीच्या अभ्यासावर परिणाम होऊ देऊ नका. शिकू दे त्याला भरपूर. “मी म्हटलं.

“बरं झालं, आठवलं. थांबा जरा. ” असं म्हणून त्यानं माझ्याकडून माझा युपीआय आयडी घेतला आणि रक्कम भरली.

“त्याला तुमच्या साधना शिबिराला पाठवायचं होतं. त्याची फी भरुन टाकली. त्याचं शिक्षण थांबवणार नाही सर. भरपूर शिकू दे. पण आता त्याच्या बाबतीत खऱ्या जगाची जाणीव आणि पालकांचा सहवास या दोन गोष्टींमध्ये आपण चुकायचं नाही, असं मी ठरवलंय बघा. ” तो छान हसत म्हणाला.

देवाचं आपल्याकडं किती बारीक लक्ष असतं, याची जाणीव मला झाली. माझ्या दिवसाची सुरुवात इतक्या विलक्षण सुंदर संवादातून झाली की, पुढं कितीतरी वेळ मी त्याच भावनेत होतो. पालकत्वाच्या मार्गात असे धक्के बसणारच, अवघड वळणं येणारच. पण आपण दोन कारखान्यांचे मालक झालो की, आपल्याच वागण्यात खूप फरक पडतो. पहिला म्हणजे डोक्यावर बर्फाचा कारखाना आणि दुसरा म्हणजे जिभेवर साखर कारखाना.. प्रसंग कुठलाही आला तरीही अस्वस्थ न होता, चिडचिड न करता, समोरच्यावर आगपाखड न करता, थंड डोक्यानं मार्ग काढता येणं, हे फार कठीण कौशल्य आहे. प्रत्येकालाच ते साधत नाही.

मुलांसोबत वेळ घालवणं, म्हणजे त्यांच्यावर डिटेक्टिव्हगिरी करणं नव्हे. आपलं त्यांच्याकडं लक्ष असायलाच हवं, पण त्यात संशयाचा सूर नको. वयात येणाऱ्या मुलांशी एकदम मैत्रीही नको अन् शत्रुत्वही नको. खरं तर, कुठलाच अतिरेक नको. अभ्यासाचा अतिरेक, करिअरचा अट्टाहास, पद-पैसा – प्रतिष्ठेच्या अपेक्षांचं ओझं, लोक काय म्हणतील याचा ताण, यापैकी काहीही नको. कारण, हे सगळं त्यांच्या चांगला माणूस म्हणून घडण्याच्या आड येणार आहे, हे नक्की.

अतिरेकी ताण घेऊही नये आणि देऊही नये. चांगलं आरोग्य, चांगले विचार, चांगली अभिरुची, चांगला सहवास आणि चांगला संवाद ही पंचसूत्री हा आजच्या Gen Z पिढीसाठीचा इम्युनिटी बूस्टर प्रोग्राम आहे. जग बदलतंय, समाज बदलतोय, कितीतरी गोष्टी नको तशा आणि नको तितक्या बदलतायत. पण भविष्यातही करिअरमधली अनिश्चितता मोठी की, आपल्या मुलांची माणूस म्हणून घडण्यातली अनिश्चितता मोठी? असा प्रश्न कधी ना कधीतरी आपल्यासमोर उभा ठाकणारच.. अशावेळी आपण नेमकं कशाला प्राधान्य द्यावं, असा संभ्रमाचा चक्रव्यूह आपल्यासमोर उभा राहणं साहजिक आहे.

पण इथंच आपली पालक म्हणून खरी परिक्षा आहे. करिअरची शर्यत आणि त्यातले बरेवाईट चढउतार कुणालाही चुकत नाहीत. अपेक्षाभंग होतील, धक्के बसतील. पण माणूस म्हणून मुलं भक्कम झाली तर, अशी आव्हानं छातीवर घेऊन लढण्याचं धैर्य त्यांच्यात येईल. हिंमत बांधून समोरच्या प्रश्नातून योग्य मार्ग त्यांना काढता येईल. चांगलं जगणं म्हणजे काय, हे त्यांचं त्यांनी ठरवण्याएवढं शहाणपण त्यांना नक्की येईल. कुठल्याच गोष्टीच्या आहारी न जाता, चांगुलपणावर विश्वास कसा ठेवायचा, याची त्यांची वैचारिक बैठक पक्की होईल. शहाणपणानं योग्य निर्णय घेता येतील, शिस्तबद्ध नियोजन करुन ते तडीला नेता येतील. एकटेपणा, निराशा, चिंता, भीती, अनिश्चितता अशा गोष्टींचा विपरीत परिणाम त्यांच्यावर होणार नाही. फक्त एक पंचसूत्री जगायला लागलो तर किती मोठा लाभ होईल..! पुढचं वास्तव दिसण्यासाठी आपल्या मुलांच्या हातात टेलिस्कोप सुद्धा दिला पाहिजे, आणि आयुष्याचा आनंद अनुभवण्यासाठी त्यांच्या हातात कॅलिडोस्कोप सुद्धा दिला पाहिजे.. एवढं आपण जमवलं की झालं आपलं काम..!

बघा.. विचार करा.. याहून जास्त काय लिहू?

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘पोकळ बांबू आणि पावा – –” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “पोकळ बांबू आणि पावा – –” ☆ सुश्री शीला पतकी 

काल परवाच एक पोस्ट वाचनात आली. बेगर्स डॉक्टर… खूप छान लिहितात मुख्य म्हणजे अनुभव त्यांचे स्वतःचे सकस आहेत. त्यात एक वाक्य फार छान होतं. त्यांनी एका त्यांच्याकडे आलेल्या म्हाताऱ्या बाईला म्हटलं, ” म्हातारे तुझं तुला होईन हे कशाला दुसऱ्याचं घोंगड अडकून घेतलं “… सवतीचा पांगळा पोरगा ती वाढवत होती आणि आपल्याला नसलेल आई पण मिळाले म्हणून धन्य मानत होती. त्यावर तिनं दिलेलं उत्तर खूप छान आहे. ती म्हणाली, ” आयुष्याच्या पोकळ बांबूला जरा संकटांना कष्टाने त्याला भोकं पडली त्यांन ती सोसली तर त्याचा पावा (मुरली) होतोय ना डॉक्टर! मग पोकळ बांबू होऊन मरण्यापेक्षा पावा होऊन जगाव की चार गोड सूर ऐकायला मिळतील काहीतरी चांगलं होईलच की. ” केवढं मोठं तत्वज्ञान ना? … पोकळ बांबू होण्यापेक्षा पावा व्हा.

त्या अडाणी बाईच्या तत्त्वज्ञानाचे चार शब्द माझ्या चार दिवस डोक्यात घोळत होते. हे असं जगायला माणूस मोठाच असावा लागतो असं नाही. आपल्यापुढे असंख्य मोठमोठ्या कर्तृत्ववान माणसांची चरित्रे असतात आपण ती वाचतो आणि आपल्याला वाटतं छे! आपण इतकं मोठं होऊ शकतच नाही… मग त्यांच्या विचाराचा कदाचित आपण अवलंब करीत नसू पण अशी अनेक छोटी छोटी माणसं आहेत त्यांची उदाहरणे समाजापुढे आली पाहिजेत. तेव्हा माणसाला वाटेल अरे मी सुद्धा काहीतरी करू शकेन की आणि माझ्या डोळ्यासमोर अशी लहान थोर माणसं उभी राहिली. काही जगाला ज्ञात असलेली.. काही नसलेली…!

आमच्या कॉलनी जवळपास 40 वर्षापासून एक बाई काम करतात त्या जवळ झोपडपट्टीत राहतात तिथली दोन पोरं घेऊन यायच्या त्यांची एक मुलगी आणि ती दोन पोर सतत बरोबर. त्यांना खाऊ पिऊ घालायच्या. मी त्यांना नेहमी म्हणायची… तुमच्या खाण्यापिण्याचे वांदे अन लोकांची पोरं कुठे सांभाळताहेत त्या दोन पोरांचे आईबाप भांडून घर सोडून गेलेले बाप भंगार विकायचा आणि आई कुठेतरी कामाला जायची. ते गेले पण दोन पोरं अनाथ झाली मग हिनेच आपल्या आसऱ्याला त्यांना ठेवलं सगळ्यांच्या आलेल्या भाजी भाकरी घेऊन तिथे ती पोरांना जेवायला घालत असे. मी म्हणायचे आपल्यातली अर्धी भाकरी देणे हा संस्कार पण इथे तर लोकांनी दिलेली आपल्यातली अर्धी भाकरी आधी समोरच्याला खाऊ घालायची याला फार मोठेपण लागतं मनाचं! अशी अनेक पोरं तिने झोपडपट्टीतली सांभाळली होती आणि खूप खूप काही काही… नवरा वारला दोन पोरं होती तरी सासून हाकलून दिलं झोपडपट्टीत एकाच्या आसऱ्याने राहिली त्याच्याशी लग्न केलं एक मुलगी झाली पण दुर्दैवानं तिला लग्ना नंतर एड्स झाला ती वारली आता नाती ना उत्तम शिक्षण दिल आहे नौकरी आहे. त्या चांगली कमाई करतात तिने आपल्या आयुष्याच्या पोकळ बांबूचा पावा केला.

माझ्या माहितीतली आणखीन एक बाई… पन्नास वर्षांपूर्वी नगरपालिकेत कामाला होत्या सफाई कामगार. स्वतःच्या पोटी पोर नाही एकदा कचऱ्यात एक पोर सापडलं तेच आपलं म्हणून वाढवलं अर्थात मुलगी होती तिला चांगलं शिकवलं पण नवरा गेला म्हणून पटकन पोरीचं लग्न लावून टाकलं जावयाचा खूप थाटमाट केला जावई वाईट निघाला एका पोरासह पोरीला आणून सोडले. बाई हरली नाही तिने तिला शिक्षण दिलं नोकरीला लावलं त्या मुलीने त्या बाईचा शेवटपर्यंत सांभाळ केला. तिचे म्हातारपण सुखाचे केले. तिच्या मुलीने एकदा सांगितले बाई ही माझी आई नाहीये मी हिला कचऱ्यात सापडले पण हिने ते मला कधीही सांगितलं नाही आणि जाणवू दिलं नाही पण मला हे माहिती आहे हे तिला माहित नाही. सगळ्यांचीच कमाल होती. लेकिने जाणीवपूर्वक आईचं म्हातारपण जपलं दोन्हीही बांबूच्या पोकळ देहाचे बासरीत रूपांतर झाले तिच्या आईच्या जीवनाचे सार्थक झाले तिला आई पण मिळाले आणि कचऱ्यात टाकलेल्या लेकीला आईची माया आणि एक सन्मानाच आयुष्य! आयुष्याचे गोड स्वर नक्कीच त्यातून निघालेत…! ही अज्ञात उदाहरण आहे पण अनेकांना ज्ञात असलेले एका मोठ्या विदूषी चे उदाहरण माझ्यासमोर आहे ते म्हणजे आदरणीय स्वर्णलता भिशीकर…! सर्व आयुष्य एका संस्थेसाठी, समाजामध्ये काही चांगला बदल घडवावा, अनेक विद्यार्थी घडवावेत या भावनेने केलेले लता ताईंचे अथक प्रयत्न मी पाहिलेत. आपलं संपूर्ण आयुष्य एका चांगल्या कामासाठी झोकून देऊन आपल्या कुटुंबापासून दूर राहून लोकसेवेत त्या मग्न झाल्या होत्या. असंख्य लोकांच्या अंतःकरणात या तेजस्वी भगिनीने एक खास जागा निर्माण केली आहे सामान्य माणसे ज्याला सुख म्हणतात त्यापासून किती तरी कोस त्या लांब होत्या आणि समाज घडवण्याच्या कामातच त्यांनी समाधान मानले. त्यांचे ते प्रयत्न मी खूप जवळून पाहिले होते. आयुष्याच्या पोकळ बांबूचे बासरीत रूपांतर झाले आणि सप्तसुरांनी एक अवीट गाणे तयार झाले… समर्पणाचे! ! त्या अडाणी बाईच्या जीवनाचे सूत्र… * आपल आयुष्य म्हणजे काय एक पोकळ बांबू त्याची बासरी करायची का पोकळ बांबू म्हणूनच मरून जायचं हे आपण ठरवायचं* केवढे सुंदर तत्वज्ञान… साधं सहज आणि सोपं…! पूर्वी आपल्याकडे म्हणायचे अगं चार कष्ट केले दुसऱ्यांसाठी तर भोक पडत नाहीत अंगाला…! ते वेगळ्या अर्थाने खरच आहे लोकांसाठी जगताना चार भोकं अंगाला पडली तर त्याचा पावा होतो बर का…!

मग काय मंडळी काय व्हायचंय ते ठरवा निदान विचार तरी करा… पोकळ बांबू होऊन मरायचं का दुसऱ्यासाठी चार कष्ट करून… संकटांना झेलून.. निस्वार्थीपणे जगून आयुष्याच्या जीवनाला चार भोकं पाडून घ्यायची आहेत… ज्यातून मधुर स्वर येतील आणि सारच गोड होईल नाही का…?

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ६९ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… – भाग – ६९ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

आयुष्यात दोन वेळा मला प्रेमाचं, सावलीचं, आनंदाचं घर सोडावं लागलं. पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर. एक वात्सल्याचा मायेचा उंबरठा ओलांडून नवऱ्याबरोबर जीवनाची वेगळी जबाबदारीची वाट चालण्यासाठी आणि दुसऱ्यांदा निवृत्तीनंतर. ज्या बँकेत मी नोकरी करत होते जवळजवळ ३५ वर्षे त्या उबदार परिवाराला अल्विदा करताना. ऑफिसची चौकट ओलांडताना झालेला भावनांचा ओहळ निराळा असला तरी मनावर आलेलं जडत्व तेच होतं.

माझ्या नोकरीच्या काळात माझी ऑफिस मधली प्रतिमा हसरी, आनंदी, कुठल्याही कामाचा कधीही ताण न घेणारी, सर्वांशी अगदी चतुर्थश्रेणीतल्या कर्मचाऱ्यांशीही मित्रत्त्व जोडणारी, खेळकर, खोडकर आणि कधी अंतर्गत मॅनेजमेंटशी मतं जुळली नाहीत तर जोरदारपणे भांडण करणारी, मुद्देसूद बाजू मांडणारी निडर आणि अजिबात पडतं धोरण न स्वीकारणारी अशी होती.

मी काही वर्ष मुंबईतल्या राष्ट्रीयकृत बँकेतही काम केलं होतं आणि लग्नानंतर निवृत्त होईपर्यंत “देना बँक नवी पेठ जळगाव” या शाखेत काम केलं. इथे मात्र माझे सहकर्मचार्‍यांशी आणि बँकेत येणार्‍या ग्राहकांशीही खरे स्नेहसंबंध जुळले. अर्बन भागात काम करण्याचा अनुभव खूप वेगळा आणि माझ्या जडणघडणीत योगदान देणारा ठरला असे म्हटले तर ते योग्यच ठरेल.

मुंबईत जाणवणारे सॅफिस्टिकेशन, पोशाखीपणा, दूरस्थपणा “देना बँक नवी पेठ जळगाव ब्रांच” मध्ये कधीच जाणवला नाही. मला तिथे काम करत असताना नेहमीच एका परिवारात असलेला आपलेपणा जाणवला. याचा अर्थ असाही नव्हे की तिथे वाद नव्हते, हेवेदावे नव्हते, भांडण नव्हती, स्पर्धा नव्हत्या, २०/२५ माणसं जेव्हा एकत्र काम करतात आणि तेही उदरनिर्वाहासाठी, संसाराचा रथ ओढण्यासाठी तेव्हा समर्पितपणापेक्षा स्वार्थीपणा, चढाओढ असणं स्वाभाविकच आहे पण ते जर मर्यादित रेषांमध्ये असेल तर ते तसं हिंसक किंवा कोणाचे जीवन पालथं करणार ठरत नाही.

इथे मी बँकिंग क्षेत्रातले कामासंबंधीचे संबंध आणि काम संपल्यानंतरचे निर्माण झालेले वैयक्तिक संबंध दोन्हीही अनुभवले. सुरुवातीला तर मला आश्चर्य वाटायचे की सकाळी हे दोघेजण मॅनेजरच्या केबिनमध्ये जाऊन एकमेकांविषयी जोरजोरात तक्रारी करत होते आणि संध्याकाळी कामाची वेळ संपल्यानंतर ऑफिस बाहेर रस्त्यावर लागलेल्या गाडीवर जाऊन गळ्यात गळे घालून “चना जोर गरम” खायचे.

आमच्या वेळेचं बँकिंग हे मॅन्युअल होतं तेव्हा संगणक नव्हते. ते अगदी माझ्या नोकरीच्या उत्तरार्धात आले पण तोपर्यंत मोठमोठ्या जड आणि जाड लेजर्स मधून आम्हाला ग्राहकांच्या खात्यात होणारी रोजची उलाढाल हाताने लिहून दिवसा अखेर संपूर्ण, प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये झालेल्या डेबिट क्रेडिटचा ताळा(Tally) करावा लागायचा. वेगवेगळ्या लेव्हलवर वेगवेगळी माणसं काम करायची. एक प्रकारचे सामूहिक काम असतं ते. पुन्हा एकाची छोटीशी चूक सुद्धा दिवसाअखेर क्लोजींगवेळी ज्याला आम्ही “डे बुक” म्हणायचे ते टॅली करताना त्रास व्हायचा पण यातूनच एक सहकार्याची वृत्ती स्टाफमध्ये जोपासली गेली असल्यामुळे आमच्या बँकेत त्या दृष्टीने अत्यंत खेळीमेळीचं वातावरण असायचं. अर्थात ज्याने कोणी चूक केली असेल ज्याच्यामुळे कामात समस्या आणि व्यत्यय निर्माण झाला असेल त्याच्याकडून पेनल्टी वसूल केली जायची. पेनल्टी म्हणजे काय “एक कटिंग चहा. ” घरी तुम्ही पीत असाल चांदीच्या कपात चहा पण इथे या वातावरणात अगदी कडेला कपची उडालेल्या छोट्याशा कपातून ओसंडून बशीत सांडलेला चहा सुद्धा अमृततुल्य वाटायचा.

आमच्या ब्रांच मध्ये एक “नवीन शहा” नावाचा कर्मचारी होता. तसा तो अतिशय हुशार होता पण अत्यंत कंजूष होता. वास्तविक आम्हा सर्वांचे *पे स्केल* कमी अधिक प्रमाणात सारखेच होते पण नवीनची राहणी अतिशय गबाळी, गलिच्छ असायची. आठवडाभर तो एकच शर्ट पॅन्ट घालायचा. त्याच्या पायातली चप्पल दहा वर्षांपूर्वीची असायची. किंबहुना मी त्याच्या पायात कधीही नवीन चप्पल पाहिलीच नाही. तो बँकेपासून तसा दूरच काही अंतरावर राहायचा पण पायी यायचा आणि पायी जायचा. मी त्याला एकही दिवस रिक्षात पाहिले नाही. त्याच्याकडे साधी सायकलही नव्हती आणि असून उपयोग काय त्याला सायकलही चालवता येत नव्हती. ऑफिसमध्ये त्याने कधीही कोणाला एक कप चहा सुद्धा पाजला नाही. त्याचं अक्षर अतिशय गिचमीड, दहा शब्दातल्या लेखनातही चार-पाचदा खोडलेले, ओव्हरलॅपींग वगैरे. चुका नसायच्या पण त्याचं रजिस्टर चेक करणे म्हणजे करणाऱ्याची डोळेफोड, कसोटी असायची. अर्थात या त्याच्या ढिसाळ व्यक्तिमत्त्वामुळे ऑफिसात त्याची खूपच टिंगल व्हायची. सारे जण त्याची मजा घ्यायचे. त्याला वाटेल तसे बोलायचे पण नवीनमध्ये कधीच परिवर्तनीय फरक पडलाच नाही. तो तसाच राहिला. त्याने कधीच कोणाकडे लक्ष दिले नाही पण एक मात्र होतं त्याला तीन मुलगे होते आणि तिघे अतिशय हुशार होते. ते तिघे बारावीला मेरिटमध्ये आले होते. नंतर मेडिकलला गेले. ओपन कॅटेगिरी मध्ये गुणवत्तेच्या आधारे त्यांना प्रवेश मिळाला होता. त्यावेळी मात्र त्याने स्टाफला पेढे वाटले.

काही वर्षांपूर्वी त्याचा मोठा मुलगा मला पुण्यात भेटला होता. तो एक प्रख्यात युरोलॉजिस्ट आहे आणि त्याने केलेल्या एका अवघड किडनी स्टोन शस्त्रक्रियेची गिनीज बुक मध्ये नोंद झालेली आहे. मी त्याला लहानपणापासून ते विद्यार्थीदशेत पाहिला होता पण आज तो माझ्यासमोर एका निराळ्याच शायनिंग व्यक्तिमत्त्वात उभा होता.

खूप गप्पा झाल्या आमच्यात. खरं म्हणजे त्यानेच मला ओळखले. नाहीतर मी त्याला ओळखूही शकले नसते.

तो सांगत होता, ते तिघेही भाऊ अत्यंत सुस्थितीत आणि आलिशान घरात सध्या राहत आहेत. अर्थातच मी नवीन ची चौकशी केली तेव्हा तो म्हणाला, “जिंदगीमे पापाने कभीभी खुद के लिए कुछ नही किया, कुछ नही खरीदा। हमारे एज्युकेशन और वेल्फेअर के लिए जिंदगीभर कडी मेहनत की।मनको मारते रहे लेकिन हमे काबिल बनाया. ”

“ लेकिन अभी तो खुश होंगे ना? ”

मी विचारले.

“ खुश तो है लेकिन हमारे साथ नही रहते। मम्मी पप्पा अभी भी जलगाव मे ही छोटे घर मे रहते है। ना उनकी लाइफस्टाइल चेंज हुई ना उनकी स्वभाव चेंज हुई।”

“ ते नेहमी म्हणतात मी माझं ध्येय पूर्ण केलं. मला पुरेसं पेन्शन मिळतं मला तुमच्या जीवावर वेगळं मजेत, ऐषाआरामाचं आयुष्य नाही जगायचं. ये मेरी जिंदगी है ।अलग होगी पर अपनी है। मै खुश हूँ।”

गबाळा, गलिच्छ, कंजूष नवीन. तो चूक की बरोबर हे माहीत नाही पण आज मला वाटतं आपण एखाद्याबद्दल आधीच का जजमेंटल होतो?

बँकेत काम करत असताना अशाच काही वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तींच्या आयुष्याच्या खिडकीतून जीवन बघण्याचा अनुभव नक्कीच विलक्षण आणि कधीही न विसरण्यासारखाच होता.

“रमेश पांडे” नावाची एक व्यक्ती अशीच लक्षात राहिली आहे. बँकेच्या पायरीला नमस्कार केल्याशिवाय कधीही आत न येणारे, भिंतीवर त्यांनीच लावलेल्या गणपतीच्या फोटोला रोज हार घालणारे, आणि पूजा केल्यानंतरच कामाला सुरुवात करणारे एक अत्यंत धार्मिक व्यक्तिमत्त्व. कामात अतिशय हुशार आणि परफेक्ट. अडीअडचणीतल्या, नाडलेल्या कुणालाही यथाशक्ती आर्थिक मदत करायचे. खिशात असलेल्या चिटोर्‍यांवर कुणाला किती पैसे दिले याचा हिशोब ठेवायचे पण कधी त्याप्रमाणे वसुलीसाठी धडपडलेले आठवत नाहीत. या त्यांच्या सवयीमुळे कित्येक वेळा महिनाअखेरीस त्यांच्या शिलकेत फक्त शून्य असायचं. गंमत म्हणजे त्यांच्या पत्नीनेही कधी त्यांना टोकलं नाही, राग धरला नाही. पतीच्या या परोपकारी वृत्तीत तीही विना कुरकुर कशी काय सहभागी असायची याचे मला नेहमी आश्चर्य वाटायचे.

एकदा मी त्यांना म्हणालेही होते, ”काय हो! तुम्ही काय स्वत:ला टाटा बिर्ला समजता का? ”

तेव्हा ते फक्त हसले होते. म्हणाले होते, ”श्रींची इच्छा! ”

बँकेतले बहुतेक धार्मिक सोहळे विशेषतः “गणेश स्थापना” वगैरे त्यांच्याच पुढाकाराने पार पडत. आम्ही सारे वर्गणी देत असू परंतु त्या व्यतिरिक्तही झालेला खर्च पांडे स्वतःच करायचे. शिवाय रोजचा प्रसाद त्यांच्याच घरून यायचा.

आमच्या बँकेसमोर एक व्याधीग्रस्त भिकारी अत्यंत घायाळ अवस्थेत असताना त्याला उचलून रिक्षात घालून पांडेंनी स्वत: त्याला सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. बँकेच्या वेळात किंवा वेळेनंतर ते रोज त्याला भेटायलाही जात. एक दिवस तो भिकारी मेला आणि त्याचे अंत्यसंस्कारही पांडेनी केले. अशी पांडेंसारखी निस्वार्थी, सेवाभावी माणसे पडद्यामागेच असतात पण स्वतः मात्र आतून समाधानी असतात. याच पांड्यांच्या धाकट्या मुलाला रेल्वे अपघातात पाय गमवावा लागला. तेव्हाही ते शांतपणे एकच वाक्य म्हणाले, ” श्रींची इच्छा! ” सामान्य माणसातली ही स्थितप्रज्ञता कुणालाही थक्क करणारी होती.

मला आठवतं त्यावेळी माझ्या मनात आलं होतं की अशा धर्मात्म्याच्या बाबतीतही देव कुठेतरी न्याय द्यायला चुकला का? पण पांडेंचं एकच वाक्य “श्रींची इच्छा! ” यात स्वीकृतीचं एक महान अध्यात्मिक तत्त्वच नव्हतं का दडलेलं?

मात्र कुठेतरी थेंबाथेंबाने गोळा केलेलं हे पुण्य त्यांच्या मुलांच्या बाबतीत- अजित, अतुल आणि अभयच्या आयुष्यात समृद्धीसाठी नक्की कामी आलं.

निवृत्तीनंतर पांडे मुलांच्या भरभराटीच्या संसारात स्वाभिमानाने आणि सुखात राहिले.

त्यांच्या शेवटच्या दिवसात मी त्यांना भेटायला गेले होते. घरीच होते ते. तेव्हा उमादेवी(त्यांची बायको) प्रेमाने त्यांची दाढी करत होती. खरं सांगते त्या दिवशी त्या दोघांना तसं पाहताना मला साक्षात “शिवपार्वतीचे दर्शन” झाल्यासारखे वाटले.

असं खूप काही लिहिण्यासारखं आहे.

मला निवृत्त होऊन सतरा वर्ष झालीत. अनेक सहकर्मचारी आज या जगात नाहीत. पण जेआहेत ते बर्‍यापैकी संपर्कात आहेत. मग खूपवेळा आठवणींना उजाळा मिळतो. आमच्यावेळचे इअर्लि क्लोजींग, त्यावेळचे खानपान, कामाच्या तणावातली हास्यमस्करी, चांगले वाईट विक्षिप्त मॅनेजर्स, काही नाजूक गुपितं, आणि खूप काही.

पण एकच सांगते, या नोकरीच्या निमित्ताने मला अशी अनेक माणसे भेटली. मनाच्या कोपऱ्यात त्यांना मी टिपत गेले आणि सामान्यातलं असामान्यत्व पाहताना मीही नकळत वेगळ्या प्रकारे पुन्हा पुन्हा घडत गेले. माझ्यातले लेखन गुण खरं म्हणजे तिथेच विकसित झाले. अॉफिसमध्येच वाया गेलेल्या, फाडलेल्या, निरुपयोगी अनेक कागदांवर मी कितीतरी कथा लिहिल्या. सोनार नावाचा एक शिपाई हे असे विखुरलेले कागद गोळा करून माझ्या टेबलवर ठेवायचा. म्हणायचा, ” मॅडम लिहा आता. भरपूर कागद आहेत. ”

निवृत्तीनंतर बेरजा वजाबाक्या, क्रेडिट डेबिट च्या व्यावहारिक कागदी जीवनातून बाहेर पडताना म्हणूनच मला खूप उदास वाटलं होतं.

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ (१)  रंग  (२) कोण्या एकाची जीवनगाथा ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? विविधा ?

☆ (१)  रंग  (२) कोण्या एकाची जीवनगाथा ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

☆ (१) रंग ☆

मानवी जीवन विविध कंगोऱ्यांनी बनलेले असते, असे म्हटले तर वावगे होणार नाही…

कधीकधी मनुष्याला निर्मम, निर्व्याज, निर्मळ प्रेमाची अनुभूति येते…..

कधीकधी एखाद्यावर मनुष्य अकारण प्रेम करू लागतो, तर कधीकधी एखाद्याला अशा अकारण प्रेमाचा लाभ होतो, तो अकृत्रिम स्नेह त्याला अनपेक्षितपणे प्राप्त होतो…

अशावेळी त्या त्या मनुष्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेने हास्य विलसते…

अशा अकृत्रिम, निर्मळ हास्याने त्या मनुष्याच्या चेहऱ्यावर एक विशेष रंग चढतो….

हा रंग कोणालाही दिसत नाही, पण तो जाणवू शकतो….

ज्याच्या चेहऱ्यावर हा रंग खुलतो, तो मनुष्य तो रंग दिवसभर अनुभवू शकतो…..

हा रंग कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही….

तर तो निव्वळ अकृत्रिम स्नेहाचे आणि निर्व्याज प्रेमाने प्राप्त होऊ शकतो…

….

कारण हा रंग अशी दिव्य अनुभूती घेणाऱ्याच्या मनात तयार होत असतो आणि त्याच्या मनातच साठून राहत असतो…

त्याला रंगाला एक्सपायरी नाही…..

हा अनुभव आपण कदाचित कधीतरी घेतला असेल….

******

☆ (२) कोण्या एकाची जीवनगाथा ☆

“कही दूर जब दिन ढल जाए…. “

ही ओळ कानावर पडली आणि मला आनंद सिनेमा आठवला….

राजेश खन्ना आणि त्याचा अजरामर संवाद…..!

“जिंदगी बडी होनी चाहिए..

लंबी नहीं….!! “

विचार केला तर सहा शब्दांचा संवाद, पण त्यात साऱ्या जन्माचं सारं….

मध्ये एक वाक्य वाचनात आले…

येणारा पुढील प्रत्येक श्वास म्हणजे वाढदिवस….

त्या दिवशी हे गीत आठवले नाही, पण हे गीत ऐकल्यावर ते वाक्य आठवले…

जिंदगी बडी करायची असेल तर आयुष्यातील प्रत्येक श्वासाचे मोल जाणले पाहिजे…

विश्वास आहे तो पर्यंत श्वास आहे…

त्याचा आपल्यावरील विश्वास संपला की तो आपले श्वास संपवतो….

ज्याप्रमाणे क्षणा क्षणाने आयुष्य बनते, तसे श्वासा श्वासाने जीवन बनते असे म्हणता येईल…

प्रत्येक श्वास आणि प्रत्येक क्षण आनंदानें व्यतित करता आला तर…

सर्व महान व्यक्तींनी हेच सुचविले आहे…

मी जगायला सुरुवात केली…

……..

शब्दांकन : संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी पाहिलेली झाशीची राणी…! ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी पाहिलेली झाशीची राणी…! ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

मिरचीवाली झाशीची राणी….. हे टायटल वाचून दचकू नका, खरोखर झाशीच्या राणी इतकीच पराक्रमी बाई मी स्वतः पाहिली आहे. पूर्ण एक दिवस त्यांच्या सहवासात घालवला आहे. सोबत त्यांच्या घरी चटणी भाकरी खाल्ली आहे. आणि त्यांनी जिंकलेली जीवनाची लढाई नंतर शब्दात मांडून माझ्या “कर्तुत्वाला सलाम” या पुस्तकात सादर केली आहे. त्यांचीच हि थरारक कहाणी! मुळात माझे ते पुस्तक (कर्तुत्वाला सलाम) हे लिहिण्यामागे हाच उद्देश होता कि, मान्य आहे, अनेक पराक्रमी महिला इतिहासात होऊन गेल्या. त्यांचा आदर्श नक्कीच आहे. पण मग आजच्या काळात तशा सापडणार नाहीत का? हा विचार मनात आला, आणि मग एका पाठोपाठ एक अशा तेजस्वी महिला भेटत गेल्या! एकट्या पुणे परिसरातच मला त्यावेळी ४ महिन्यात ३० महिला भेटल्या!

पुण्यातील फुले मंडईत आजही पाठीमागच्या शेवटच्या लाइनीतील गाळ्यावर कधी गेलात तर तिथे हिरव्या मिरच्या विकणार्‍या (आता जराशा थकलेल्या) बाई दिसतील.

त्याच या बायडाबाई पंडित. आयुष्यभर त्यांनी फक्त आणि फक्त मिरच्याच विकल्या. मंडईत एका बाईमाणसाने तसल्या वातावरणात जीवनाची 30 वर्षे काढली.

तुम्ही म्हणाल यात काय नवल?? तर पुढे ऐका…!!

मुळात तो परिसर तसा अनेक अर्थानी गाजलेला. भांडण / मारामाऱ्या रोजच्या ठरलेल्या. त्यात गर्दीचा “नको” तो फायदा घेणारे मवाली देखील. मात्र या सगळ्यात खंबीरपणे राहून आपला संपूर्ण परिवार या बाईंनी नुसता जगवला असे नाही तर अतिशय सुशिक्षित आणि उच्च पदस्थ करून दाखवला. स्वतः शाळेची पायरी देखील ज्या बाईने कधी चढली नव्हती, आज तिची नातवंडे कॉन्व्हेंट मध्ये शिकत आहेत.

त्या कष्टातून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्चशिक्षीत केले. आणि आता त्यांचा एक मुलगा टाटा कंपनीत अतिशय मोठ्या पदावर अधिकारी आहे. दुसरा मुलगा फॅशन डिझाइनर असून त्याचे स्वत:चे मुख्य बाजारपेठेत स्वत:चे लेडीज गार्मेंटचे दुकान आहे. एकेकाळी घरची गरिबी म्हणून बायडाबाईंनी ते काम केले. पण आता सर्व सुखे हात जोडून समोर उभी आहेत, तरी आजही त्या मिरचीच्या गाळ्यावर बसतात. कष्ट आजही करतात.

वरुन मला म्हणतात, ‘वापरात नसली तर वस्तू पण गंजते. आपण तर हाडामासाची माणसे आहोत. गंज नाही का चढणार? म्हणून हातपाय हालतात तोवर काम करीत रहावे… “

गप्पा मारताना शेवटी मी विचारले होते कि, “आजच्या तरुण मुलांना / मुलींना काय सांगाल? “

तर त्या म्हणाल्या, “आई बापाला विसरू नका, हे मुलांना सांगेन आणि सासू सासऱ्याला स्वतःच्या आई वडीलसारखं जपा, हे मुलींना सांगेल. तरीपण हल्ली मुलांनी देखील घरात मदत करावी. दोघेही कामावर जातात मग दोघेपण थकलेले असणार हे मुलांनी ओळखावे. स्वतः टीव्ही पाहत बसणार आणि बायकोनी परत सैपाक पण करायचा, हे घडू नये. शेवटी हात जोडले तर मानस प्रेमाने जवळ येतात, तेच हात दगड घेऊन उभे राहिले तर मानस दूर जाणार! हे कळले तरी खूप झाले!

***

डॉ डीडी क्लास : नकळत दीर्घायुष्याची आणि निरोगी जगण्याची गुरुकिल्लीच त्यांनी माझ्या हाती दिली. सलाम बायडाबाई, त्रिवार सलाम तुम्हाला फारसे काही हाती नसताना या बाईंनी जर जगण्याची लढाई जिंकली तर आपण जरा स्वतःकडे पाहूया. आज आपल्याला सुदैवाने बरेच काही आहे. पण तरी नकारात्मक भावना का वाढतेय? हा विचार पुसून टाकण्यासाठी हि पोस्ट..

© डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares