मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… सासुबाई- अशीही एक शाळा – भाग – ६६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… सासुबाई- अशीही एक शाळा. – भाग – ६६  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

सासुबाई- अशीही एक शाळा.

जीवनाच्या वाटचालीत अनेक नाती जुळली. काही टिकली काही कालांतराने विरली. कळत नकळत अनेकांनी शिकवण दिली. संस्कार केले. मनावर कायम कोरले गेले. पण आज लिहावसं वाटतंय् ते माझ्या सासुबाईंबद्दल. नवर्‍याची आई म्हणून माझ्या सासुबाई.

हे माझं आणि त्यांचं धार्मिक नातं. पण त्या पलीकडे आमचं एक वेगळं नातं होतं. एक सांगते, मी त्यांना आई म्हणत असले तरी सासु ही आईच असते वगैरे आमच्या बाबतीत नव्हतं. आणि ही आमची सुन नसून मुलगीच आहे बरं का असंही त्या कधी म्हणाल्या नाहीत.

घराचा उंबरठा ओलांडला तेव्हां त्या म्हणाल्या होत्या,

“ये आत सुनबाई. आतां हे तुझंही घर. “

डोईवरुन घेतलेला नऊवारी साडीचा एसपैस पदर, कपाळावरचं ठसठशीत कुंकू, अंगावर चमचमणारी पारंपारिक भारदस्त सौभाग्यलेणी, गौर वर्ण, मध्यम पण ताठ अंगकाठी, आणि नजरेतला एक करारीपणा.

सुरवातीला नातं जुळवायला खूप कठीण गेलं.

सगळंच वेगळं होतं.

मी स्वतंत्र कुटुंबात वाढलेली. मुक्त, मोकळी, स्वत:ची मतं असणारी, शिक्षीत, नोकरी करणारी.

इथे वेगळं होतं. मोठ्ठं कुटुंब, चार भींतीतली निराळी संस्कृती, नात्यांचा गोतावळा, परंपरा आणि या सर्वांच्या केंद्रस्थानी असलेलं आईंचं प्रभावी व्यक्तिमत्व, दरारा, त्यांचं सपासप आणि फटकारुन बोलणं.

पण व्यवसायाच्या निमीत्ताने आम्ही गावापासून काही अंतरावरच्या जळगाव या शहरात राहत होतो त्यामुळे त्या घराचा आणि संस्कृतीचा मी दूरचा भाग होते. पण हे असं वाटणं, भय, तुटणं, वैवाहिक जीवनाची अनिश्चितता, हे सर्व सुरवातीला होतं पण इतक्या विसंगतीतही आमचं नातं एका वेगळ्या स्तरावर घडत गेलं, जुळत गेलं हे विशेष होतं. दोघींनाही आपले किनारे सोडणं सुरवातीला कठीण होतं.

पण हळुहळु मी त्यांच्यात वसलेल्या एका स्त्रीचं स्वरुप पाहू लागले. आणि मला ते आवडायला लागलं.

एकदा म्हणाल्या, “अग्गो आठ मुलं झाली मला. रात्रीचा दिवस करुन वाढवलं पण यांनी कधी हातही लावला नाही. रडलं म्हणून थोपटलंही नाही, उचलून घेतलंही नाही. कुटुंबाच्या रगाड्यात मुलांकडे बघायलाही वेळ नसायचा. सीताबाई म्हणायची हो! ”माई उचल ग लेकराला. घे पदराखाली. मरो ते काम… “

पुढे म्हणाल्या, “तुझं बरं आहे. दादा किती मदत करतो तुला पण मी म्हणते कां करु नये त्याने तुला मदत? संसार दोघांचाही असतो ना? “

घट्ट अटकळी असलेल्या त्यांच्या मनातल्या या उदारमतवादांनीही मी चकीत व्हायची.

कळत नकळत मीही त्यांच्याकडून खूप काही शिकत होते. वैवाहिक जीवनाच्या कवीकल्पना जिथे संपतात तिथून सुरु होतो संघर्ष. एक काटेरी सत्याची वाट. हे काटे बोथट कसे करायचे हे मी आईंकडून शिकले. एक प्रकारे त्या माझ्या वैवाहिक जीवनाच्या गुरुच ठरल्या. त्यांच्याकडून मी खूप धडे घेतले.

एकदा त्या मला म्हणाल्या होत्या, “तुझं बराय. तू मनातलं स्पष्टपणे बोलून मोकळी होतेस. आमचं आपलं, ओठातलं ओठात आणि पोटातलं पोटातच राहिलं. पण असं बघ, नाती सुद्धा टिकवावी लागतात ग! “

एकत्र कुटुंबातले अनेक पडझडीचे किस्से त्या मला सांगत त्यावेळीही त्यांच्यातली एक जबरदस्त निर्णयक्षम, धडाडीची स्त्री मला दिसायची. कधी विद्रोही, कधी भेलकांडलेली, कधी हताश, परावलंबी. स्वप्नं असणारी स्त्रीपण मी त्यांच्यात पाहिली. त्यांच्या या वेगवेगळ्या रुपांमुळे मीही एक स्त्री म्हणून घडत होते.

कळतनकळत तसं त्यांनी मला दुखवलंही आहे. माझ्या धाकट्या जावेला मुलगा झाला. वंशाचा प्रथम दीपक. आनंदाला तोटाच नव्हता. आई तर हर्षाच्या शिखरावर होत्या. त्या भावनाभरात मला म्हणाल्या, ” माझ्या सरोजने आज गड जिंकला. ”

या एका वाक्यानंतरची त्यांनी न बोललेली शंभर वाक्ये अगदी कर्कश्श घंटानादासारखी माझ्या मनाच्या गाभार्‍यात घुमली पण नंतर मलाच वाटले हे त्यांचं बोलणं नव्हतंच खरंतर

त्यांच्या मुखातून आलेल्या तेव्हांच्या अविकसित समाजाचे ते बोल असावेत.

खरं म्हणजे आमच्या परिवारातल्या सर्वच नातींवर त्यांचं विलक्षण प्रेम होतं, त्यांच्याबद्दल अभिमान आणि कौतुक होतं.

ज्योतिका-मयुरा जेव्हा दोघीही विशेष श्रेणी प्राप्त करून इंजीनीअर झाल्या, परदेशी गेल्या तेव्हांही त्या उस्फूर्तपणे म्हणाल्या होत्या, ”आयुष्यात तू कुठे कमी पडलीसच नाही. कुणी दोष द्यावा असं काही ठेवलंस नाही गं बाई तू! ”

एक आभाळमन होतं त्यांच्याजवळ. कधी ढगाळलेलं तर कधी निरभ्र पण मोठं, विशाल.

मी कशी असावे आणि मी कशी नसावे हे त्यांच्यामुळे मला समजत होतं. मला हेही जाणवत होतं की त्यांना

माझ्यातल्या अनेक गोष्टी पटत नव्हत्या, त्या त्यांनी स्वीकारल्या असही नव्हे पण विरोध नाही केला. मी कधी नवर्‍याच्या बाबतीत तक्रार केली तर त्यांचे आपल्याच मुलाविषयी ऐकताना डोळे गळायचे पण म्हणायच्या, ”बयो! स्त्री होणं सोपं नसतं”

आईंशी गप्पा मारताना वाटायचं आई म्हणजे एक स्त्री शिक्षण देणारी शाळाच आहे.

परातीत सरसर भाकरी थापणारे त्यांचे गोरे गोंडस हात तर मला आवडायचेच पण त्याबद्दल त्या जे बोलायच्या ते खूपच महत्वाचं होतं.

“बघ गोळा घट्ट नको, सैल नको, एका हातानं थापत दुसर्‍या हातानं अलगद आकार द्यायचा बरं का! थापताना

परातीत पीठ नीट नाही ना पसरलं तर भाकरी वसरत नाही आणि हे बघ हलकेच मनगट वर करुन तिला उचलून तव्यावर ठेवायचं. तापलेल्या भाकरीला पाण्यानं सारवून थंड करावी लागते. म्हणजे मग ती टिचत नाही, सुकत नाही. “

त्या सहज बोलायच्या. बोलता बोलता चुलीतली लाकडं मागे पुढे करुन जाळ जुळवायच्या. पण भाकरीच्या निमीत्ताने जीवनातलं संतुलन, संयम, चढउतार या सर्व स्थानकांवरचा प्रवास घडायचा.

किती लिहू?

त्यांच्यात वेळोवेळी दिसलेलं जुनं ते सोनं मला खूप भावलं.

नव्वद वर्षाचं परिपूर्ण आयुष्य जगून त्यांनी जगाचा निरोप घेतला.

आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा गादीवर एक क्षीण देह होता. काहीच उरलं नव्हतं. विलासने जवळ जाउन फक्त “आई “म्हटलं.

हळुहळु त्यांनी हात उचलले. आणि त्यांच्या गालावर फिरवून एक थरथरता मुका घेतला.

तेव्हां वाटलं, सगळं संपलं, पण त्यांच्यातील आई नव्हती संपली. ती कधीच संपणार नव्हती.

आज त्या नाहीत. पण त्यांचं अस्तित्व आहे. पण त्यांच्या आठवणी मी मुलींना सांगते.

कळत नकळत त्यांनाही याला जीवन ऐसे नाव हे कळावे.

नातं कसं असावं, कसं जपावं हेही त्यांना समजावं.

– क्रमशः भाग ६६.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आणि बिबट्या पळाला… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

??

☆ आणि बिबट्या पळाला… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

रात्री टीव्हीवर बातम्या पाहत असताना नाशिक आणि नगर भागात बिबट्याने किती थैमान घातले ते दाखवत होते. बिबट्याच्या दहशतीने लोक घाबरले होते. त्या बातम्या पाहतच मी झोपी गेलो. मी गाढ झोपलो असताना अचानक मला एक भीतीदायक डरकाळी ऐकू आली. मी दचकून जागा झालो. पाहतो तर काय समोर चक्क एक बिबट्या! त्याचे डोळे अंधारात चमकत होते. तो अगदी समोर आणि मी त्याच्या शिकारीच्या टप्प्यात. बापरे! आता काही खरं नाही. माझ्या काळजाचा ठोका चुकला. माझ्यात कुठून एवढे बळ आले कुणास ठाऊक, पण भीती वाटण्याऐवजी माझ्या डोक्यात काहीतरी केमिकल लोचा झाला आणि मला थेट ‘शोले’ चित्रपटच आठवला. समोर साक्षात मृत्यू उभा होता आणि माझ्यातला ‘गब्बर सिंग’ जागा झाला होता.

बिबट्याने पुन्हा एकदा गुरगुरत माझ्याकडे पाहिले. मी थरथरत्या हाताने चादर सावरली आणि मनातल्या मनात म्हणालो, “जो डर गया, समझो मर गया! “

बिबट्या एक पाऊल पुढे आला. त्याचा पवित्रा पाहून मला वाटलं तो आता झडप घालणार. पण मी ही काय कच्च्या गुरुचा चेला नव्हतो. मी बेडवर उभा राहिलो आणि पूर्ण ताकदीने ओरडलो, “अरे ओ सांबा! लगा निशाना इस बिबटे पर. अब तेरा क्या होगा बिबट्या? “

माझ्या अशा अनपेक्षित ओरडण्याने बिबट्या सुद्धा दोन मिनिटं कन्फ्युज झाला. तो डोळे विस्फारून माझ्याकडे बघतच राहिला. समोरच्या सावजाकडून त्याला अशा प्रकारच्या प्रतिसादाची अपेक्षा अजिबात नसावी. आतापर्यंत त्याचा अनुभव असा होता की समोरचे सावज त्याला पाहिले की गर्भगळीत होत होते. पण इथे तर वेगळाच प्रकार होता. मनात नक्कीच विचार आला असेल की, “शिकार करायला आलोय की शिकार व्हायला? “

बिबट्याला आतापर्यंत स्वतःबद्दल फार आत्मविश्वास होता. गावोगावच्या माता आपल्या बाळाला झोपवताना त्याची भीती दाखवत होत्या. ” बेटा सो जा नही तो बिबट्या आ जायेगा. ” बिबट्या सुद्धा आपल्या साथीदारांना मोठ्या गर्वाने म्हणत होता, ” कितना इनाम रखा है रे इन फॉरेस्ट वालो ने मुझपर? ” त्याचे साथीदार म्हणायचे, ” पुरे पाच लाख, सरदार. ” आणि मग बिबट्या गडगडाटी हास्य करायचा. पण आता बिबट्याचा हा आत्मविश्वास पार डळमळीत झाला होता.

मी म्हटलं, ” गाववालोने भुखे कुत्तों के सामने रोटी डालना अब बंद कर दिया है. इसलिये यहा कुछ नही मिलेगा.”

बिबट्या बिचारा अजूनच गोंधळला. त्या गोंधळलेल्या अवस्थेत त्याने आणखी एक डरकाळी फोडली. बहुधा त्या परिस्थितीचा निषेध त्याने व्यक्त केला असावा. पण आता त्याच्या डरकाळीत ती पूर्वीची जरब राहिली नव्हती. त्याने एक पाऊल मागे घेतलं. मला वाटलं तो घाबरला. माझा आत्मविश्वास वाढला. मी कोपऱ्यात ठेवलेली काठी उचलली. मी म्हटलं, ” गब्बर से तुम्हे एक ही आदमी बचा सकता, है खुद गब्बर! “

तसं जर बिबट्याने ठरवलं असतं तर समोरच्या भक्ष्याची शिकार करणं त्याला काही अवघड नव्हतं. पण आता त्याच्या डोक्यातही काहीतरी केमिकल लोच्या नक्कीच झाला होता. त्याला आता खात्री पटली होती की हा माणूस खायला योग्य नाही, कारण ह्याला शिकार बनवले तर आपलीच शिकार व्हायची आणि असा माणूस न खाल्लेला चांगला! माणूस जातीचे भवितव्य उज्वल राहण्यासाठी अशी माणसे जगणे आवश्यकच! काही एक न बोलता तो खिडकीकडे चालू लागला. तो पाठ फिरवून जात असताना मी त्याला शेवटचा टोमणा मारलाच, “जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी! “

बिबट्या खिडकीतून उडी मारून पळून गेला.

आता बिबट्याच्या घरी काय परिस्थिती असेल ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर तरळले. त्याचा चेहरा पाहून बिबटीण बाईंनी नक्कीच विचारले असणार. ” काय झाले शिकार मिळाली नाही का? ” बिबट्याचे उत्तर ” नाही. आज माझीच शिकार व्हायची होती पण वाचलो.” सौ बिबट म्हणाल्या, ” का?  पळून आलात?  “

बिबट्या म्हणाला ” होय. ” 

सौ बिबट, ” कितने आदमी थे?  “

बिबट्या, ” सिर्फ एक “

सौ बिबट, ” सिर्फ एक आदमी और फिर भी वापस आ गये? ” 

एवढ्यात कसला तरी आवाज झाला आणि मला जाग आली. सगळं शांत झाल्यावर मी बेडवर धपकन बसलो आणि स्वतःशीच पुटपुटलो, “इतका सन्नाटा क्यूँ है भाई? “

तेवढ्यात बायकोचे उद्गार माझ्या कानावर आले. ” अहो, कसला सन्नाटा आणि झोपेत कसले शोलेचे डायलॉग म्हणत होतात! गब्बर काय, सांबा काय?  उठा सकाळचे आठ वाजले आता.”

तेव्हा मला कळलं, बिबट्या वगैरे काही नव्हता. हा सगळा रात्रीच्या बातम्या पाहण्याचा परिणाम होता. पण आता बिबट्या वगैरे काही नव्हता तो खिडकीतून पळून गेला होता आणि माझ्या अंगात रात्रीचा गब्बर अजून जागा होता. मी बायकोला ऑर्डर केली, ” चहा आण.”

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चटका लाऊन निघून जा… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ चटका लाऊन निघून जा… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

गिरिशिखरीचा नसुदे चंदन

झुडुप तरी हो दरीतले

झुडुप असे हो ज्याला पूर्वी-

कुणी कधी ना बघीतले।।१।।

*

झुडुपही नाही होता आले

इवले हिरवे गवत तरी

गवत असे देखणे, जणू की-

शालू हिरवा जरतारी।।२।।

*

अथांग सागर दूर राहु दे

गर्द निळे कासारची हो

वटवृक्षाची नसे अपेक्षा 

हरि अधरीचा वेळू हो! ।।३।।

*

सारे सेनापती कशाला

कुणी शिपाई हवेत ना

शिवबालाही सवे लागती

गड जिंकाया कुणी ताना।।४।।

*

काष्ठशिल्प उतुंग उभविण्या 

लघु लघु खणखर खिळे हवे

संगमरवरी ताजबांधण्या

क्षुद्र चुन्याचे कणहि हवे।।५।।

*

जसा लागतो शिल्पि तैसा

भार वाहण्या गर्दभही

राजसूय संपन्न व्हावया

शुष्क लागती समिधाही।।६।।

*

राजमार्ग होणे ना जमले

हो एखादी पाउलवाट

चंद्र-सूर्य, जा ठेव बाजुला

हो तारा घनदाट नभात।।७।।

*

आकारावर कधी न ठरते 

महत्व कुठल्या गोष्टीचे

तृणभारे अन् केशरकाड्या

एक दराने तुलायचे? ।।८।।

*

जे वाट्याला आले काही

अनन्यभावे करीत जा

ईश्वरसेवा मानुनि सारी

श्रमभक्तीतचि रंगुन जा।।९।।

*

रंगरंगता रंग धुंद ते

सवंगड्यांवर शिंपित जा

आणि अचानक संघामधुनी

चटका लाउन निघून जा! ।।१०।।

*

(‘Be the best of whatever you are’ या ‘Douglas Malloch’ यांच्या मूळ इंग्रजी कवितेने प्रेरित होऊन केलेली ही रचना आहे.) 

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य –  मनमंजुषेतून ☆ “संविधान दिनाच्या सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा!” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “संविधान दिनाच्या सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा!” ☆ सुश्री शीला पतकी 

(२६ नोव्हेंबर : भारतीय संविधान दिन)

स्वतंत्र झालेल्या आपल्या देशाला आपला कायदा प्राप्त होणे हे खूप मोठे भाग्य आहे. इतक्या मोठ्या देशाला, ज्यामध्ये असंख्य भाषा बोलल्या जातात, असंख्य जाती जमातीचे- विविध धर्माचे लोक राहतात. प्रत्येक राज्याच्या भौगोलिक परिस्थिती वेगळ्या, साक्षरतेचा अभाव, कायदा म्हणजे काय याची जाणीवही नाही, अशा काळामध्ये अत्यंत दूरदर्शीपणाने आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान ही मोठी देणगी दिली आहे, जी १९४९ साली आजच्या दिवशी राष्ट्राला समर्पित करण्यात आली.

आपल्या देशाला आपला स्वतःचा कायदा मिळाला. आपल्या माणसांच्या गरजा, आपल्या माणसांच्या समस्या बारकाईने जाणून घेऊन अत्यंत सूक्ष्मतेने अभ्यास करून हे संविधान बनवले गेले आहे. पुढे काळानुसार काही बदल होत जातील हे लक्षात घेऊन त्यात बदलालाही जागा ठेवली आहे.. केवढी दूरदृष्टी !आम्हाला सगळ्यांना वर्तनाचे नियम दिले. राज्यकर्ते कसे निवडावे, ते कसे असावेत, त्यांनी समाजासाठी काय करावे? समाजाने कोणत्या नियमांचे पालन करावे, जेणेकरून या देशामध्ये सुख शांती नांदेल, सामान्य माणूस – गरिबातला गरीब माणूस सुखी होईल आणि समाधानाने या देशात राहील, – असे सगळे मुद्दे विचारात घेतले गेले. हा देश चालवणारे जे आहेत त्यांना निवडून देण्याचा सर्वात मोठा अधिकार त्यामुळेच सामान्य माणसाला दिला गेला आहे. माझं राष्ट्र कुठल्या तत्वाने, कुठल्या नियमाने चालावं, ते कोणाच्या हातात सुरक्षित राहील, याचा विचार सामान्य माणूस ठरवू शकतो… आजच्या दिवशी फक्त एवढा विचार केला की मला संविधानाने दिलेला इतका मोठा अधिकार मी योग्य पद्धतीने वापरतोय का तरी खूप मोठी गोष्ट आहे.

सामान्य माणसाला सातत्याने वाटत राहतं की माझ्या एका मताने काय होणार आहे किंवा त्या मताच्या बदल्यात मला काय मिळणार आहे? त्याचा केवळ तात्कालिक विचार सुद्धा केला जातो पण सामान्य माणसाला आपली ताकद मात्र कधीच ओळखता आली नाही. परवा एक छान वाक्य वाचलं….

“मुंग्याने जंगलात वारूळ बांधलं की हत्तीसुद्धा जंगल सोडून जातात”. किती सुंदर वाक्य आहे ना! एवढीशी मुंगी- तिची ताकद किती, पण हत्तीला जेरीला आणायची हिम्मत तिच्यामध्ये असते.. पण हे आपण कधी जाणणारच नाही का? आणि म्हणूनच आजची परिस्थिती आली आहे. प्रत्येक ठिकाणी पैसा दिल्याशिवाय काम होत नाही याला जबाबदार आपणच आहोत. आपल्याला सारखं वाटत राहतं की आपला आवाज किती पोहोचणार? आपण काय करणार? आपली ताकद कुठे आहे एवढी?… अरे एकदा आवाज तरी करून बघा.. !

या संदर्भात एक किस्सा आहे माझ्याकडे – –

 2007 साली निवृत्त झाल्यानंतर सहाव्या वेतन आयोगाचा फरक आणि त्याचे पेन्शन याचा एक आदेश मला ट्रेझरी मधून आला, आणि तो फॉर्म भरून दिला की आमची पेन्शन लगेच जमा होणार होती, म्हणजे ती फरकाची रक्कम जमा होणार होती जी बरीच मोठी होती. जिल्ह्यातील अनेक शिक्षक त्या दिवशी ट्रेझरी मध्ये आले होते. परगाववरून आलेले, संसाराच्या ओझ्याने वाकलेले – त्यांच्या मानाने मी बरीच तरुण दिसत होते कारण मला हे ताण नव्हते. असो. मी त्या शिक्षकांचे बरेच फॉर्म भरणे वगैरे काम करून देत होते. खिडकीत ते फॉर्म घेण्यासाठी जो माणूस बसला होता तो सातत्याने प्रत्येक माणसाला विचारत होता – ‘ मग आम्हाला काहीतरी द्या ना ‘.. आणि त्याला ती माणसे ‘ हो देतो साहेब देतो साहेब ‘ असं म्हणत होती.

… त्या फॉर्मच्या रांगेत मी उभी होते. मी तीन-चार जणांचे हे बोलणे ऐकले. माझ्या समोरच्या शिक्षकाने सांगितले की ‘ हो देतो. हे काम झालं की आपण बाहेर जाऊ ‘. त्याबरोबर मी जोरात उसळले ‘ सर काय सांगताय तुम्ही.. त्याला काय द्यायचे आणि कशासाठी?’ मी त्या माणसाला विचारलं ‘ तुमचा डबा खाऊन झालाय का ?’ – आणि माझ्या प्रश्न विचारण्यात इतकी जरब होती की तो पटकन म्हणाला ‘ हो हो… ‘

मी लगेच त्याला म्हटलं.. ‘ मग तो रिकामा डबा घेऊन ऑफिसच्या समोर बसा.. काय चाललंय तुमचं ? भिकाऱ्यासारखे प्रत्येकाला विचारताय काहीतरी द्या काहीतरी द्या.. आम्हाला काही फुकट मिळालेले नाहीये. 35 -35 वर्षे नोकरी केली आहे. तुला काही कमी पडले का बाबा?. तू पण सरकारी नोकरीवाला तुला चांगला पगार आहे…. ’

… माझे एक जोरदार भाषणच झाले तिथे… ! त्याच वेळेला अण्णा हजारेंचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन जोरदार चालू होते.. ‘ तो म्हातारा माणूस तिथे उपोषणाला बसून मरायला लागलाय आणि आपण इथे तेच करायला याला प्रोत्साहन देतोय.. काय केले आपण आयुष्यभर… आपल्या विद्यार्थ्यांना हेच शिकवले का? ’.. या सगळ्या गोष्टीनंतर वातावरण तंग.. सगळं ऑफिस शान्त.. कोणीतरी वरिष्ठ अधिकारी धावत धावत आले. त्यांनी चौकशी केली, त्या माणसाला तेथून उठवले आणि दुसऱ्या माणसाला बसवले.. दिलगिरी व्यक्त केली आणि काम सुरू झाले.. !

 …… ही असते मुंगीची ताकद ! आपण आजमावून पाहायला पाहिजे ना… ?पण आपण त्या फंदात पडतच नाही. चार पैसे टाकून पटकन काम होतं ना, झालं तर मग! ‘

– – मित्रहो एकदा मुंगी होऊन आपली ताकद आजमावून तरी बघा. संविधानाने महिलांना, कष्टकऱ्यांना, तळागाळातल्या माणसाला, खूप विचारपूर्वक अधिकार दिले आहेत. आपण कुठे काम करत असू तर त्यांच्या सगळ्यांच्या अधिकाराला जपू आणि आपला अधिकारही योग्य पद्धतीने वापरू… !

.. मी तर ते वाक्य माझ्या घरातल्या फळ्यावर लिहूनच ठेवले आहे

” मुंग्यांनी वारूळ घातले जंगलात की हत्ती सुद्धा जंगल सोडून जातो “

…. किती सुंदर विचार आहे. आजच्या दिवशी या वाक्यावर विचार करा आणि जमलं तर वागायचा प्रयत्न करा…. जय हिंद !

 आदरणीय बाबासाहेब आजच्या दिवशी तुम्हालाही विनम्र अभिवादन, कारण या संविधानात आम्हा स्त्रियांना तर तुम्ही खूप हक्क दिले आहेत.

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “साडी खरेदी.. एक आनंदाची पर्वणी…” ☆ सौ. स्नेहा देशपांडे पतकी ☆

सौ. स्नेहा देशपांडे पतकी

? मनमंजुषेतून ?

☆ “साडी खरेदी.. एक आनंदाची पर्वणी…” ☆ सौ. स्नेहा देशपांडे पतकी 

घरातील फराळ, मग नवरा मुले, सासुसासरे, नणदा, आला गेला, पै पाहुणा, अंगतुक या सगळ्यांचा विचार झाल्यावर लागतो तो तिच्या साडीचा नंबर, पण याचे तिला अजिबात वाईट वाटत नाही उलट धन्यताच वाटते.

मग सुरु तिच्या साडी खरेदीचा प्रवास…

आधी ती मैत्रिणीच्या कडे चौकशी करते, कुठे काय चांगले आहे वगैरे…

मग होते दुकानाची निवड

सेम चॉईस वाली मैत्रीण सोबत असेल तर सोनेपे सुहागा पण 

कुणीच नसेल तर मग नवरा असतोच हक्काचा.

(हा के हा एवढंच ऑप्शन असलेला)

रंग, पोत, प्रकार सगळे काही तिने मनात ठरलेलं असते.

प्रत्यक्षात दुकानातल्या साड्या बघून तिच्या मनाची चलबिचल होतेच.

मग काठ पदर असेल तर पैठणी, नारायण पेठ, कांजीवरम, धर्मावरम माहेश्वरी, इरकल, जिजामाता, यातून एखादी आवडलीच तर बाजूला काढून ठेवली जाते.

तशी ती चोखंदळ असल्याने दुकानदाराने साड्या काढून आणे पर्यंत सभोवार नजर फिरवून घेते. कुणाच्या हातात काय आहे, पलिकडचा सेल्समन जास्त चांगला स्टॉक दाखवतोय का, असे सगळे निरीक्षण सुरूच असते.

मग रॅक मधल्या साड्या

असे सगळे बघून घेते.

मग मोर्चा फॅन्सी व्हरायटी कडे वळतो.

काठ पदर फार झाल्या. असे म्हणत मोर्चा वळतो ते फॅन्सी साड्यांकडे.

टिश्यू, ऑर्गन्झा, बाटिक, बांधणी, एम्ब्रॉयडरी, टिकली वर्क, जॉर्जेट, लिनन अजरक, बांबू सिल्क….. असे अनंत प्रकार सेल्समन फारच लीलया दाखवत सुटतो.

त्याने जणू शिवधनुष्यच उचलेले असते.

कुठल्या साडीने तुमच्या चेहऱ्याचा रंग खुलतो त्याने बरोब्बर ओळखलेले असते. क्षणभर तिला वाटून जाते की नवऱ्याला असे मनातले ओळखता आले असते तर किती बरे झाले असते. असो.

मग बरोब्बर तुम्हाला तो तशी साडी काढून देतो.

पण इकडे तिने तिचे नेहमीचे काम नेटाने चालू ठेवलेले असते.

या प्रकारात अजून रंग आहेत का

यात वेगळा काठ आहे का

रंग जरा भडकच वाटतोय 

या रंगात हे डिझाइन नाही का…………

असे चोखंदळ वाटावे असे काही तरी डिमांड करत राहते

सेल्समन पण तोडीस तोड असतो

हा बघा. बेबी पिंक, ओनियन पिंक, इलायची ग्रीन, केळी ग्रीन, बर्गंडी, माजेंठा, रज्वाडी ऑरेंज, ऍपल ग्रीन, पेट्रोल ब्लू अशी ऐकिवात नसलेली नावे भराभर तोंडावर फेकतो.

ते ऐकून तिलाही करेक्ट दुकान आणि करेक्ट सेल्समन निवडल्याचा अभिमान जागृत होतो.

नवरा बिचारा या दोघांच्या जुगलबंदीत कोण जिंकते ते निमूट बघत बसतो.

शेवटी एकदा यतल्या आवडलेल्या साड्या घेतल्यानंतर सेल्समन पुन्हा म्हणतो ताई

जाता जाता पैठणी variety बघता का आत्ताच bundle फोडले. अजून रेट पण नाही लावले. बघा एखादी आवडली तर…

हे ऐकून नवऱ्याला मनात वाटत असते ए ताईच्या भावा गप न बे……..

कारण खरे तर ते १० वे bundle सुद्धा असू शकते. पण बंडल बांधण्यात आणि मारण्यात तो पटाईत असतो…..

मग काय पुन्हा पैठणी

कडीयाल, मोर बुट्टा, मुनिया, ट्रीपल मुनिया, चंद्रकोर, हॅण्डलूम, पॉवरलूम, कॉटन पैठणी,….. असे नवीन parcle शिवाय जुन्या स्टॉक मधलेही खूप काय काय समोर येते.

मग काय

त्याला मान देऊन तीही दिमाखात एखादी पैठणी निवडतेच. आणि सेल्समन आजचे टार्गेट पूर्ण झालेले असते.

बरंच वेळ मोबाईल बघत बसलेल्या नवऱ्याची तिला आठवण होते. साहजिकच त्याच्याकडे बिलाची जबाबदारी देऊन, कृतकृत्य झाल्याचा चेहरा करून स्वारी साडी खरेदीच्या आनंदाची पर्वणी लुटून घरी येते.

ही साठा उत्तराची कहाणी इथेच संपत नाही बरे

मग सुरू होतो तो

ब्लाऊज शिवणे, मॅचिग दागिने पर्स, चप्पल…….

यांचा न संपणारा प्रवास…………

© सौ. स्नेहा देशपांडे पतकी

कोल्हापूर

मो. 9823390516

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वाढदिवस… लेख क्र. २२ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

सौ. गीता वासुदेव नलावडे

? मनमंजुषेतून ?

 ☆ वाढदिवस… लेख क्र. २२ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे

पहिलीच्या वर्गात एक मुलीचा वाढदिवस होता, बाहेर तिची आई बसली होती, म्हटलं, “आज लेकीचा वाढदिवस ना? मग काय विशेष बेत ठरलाय? “

तशा त्या गप्पच बसल्या, मी जेव्हा परत विचारलं, तेव्हा नाईलाजाने म्हणाल्या, “बाई, आम्ही सांगतच नाही तिचा वाढदिवस आहे ते. कारण मग ती हट्ट करते चॉकलेट वाटायचा, सर्व मुलांना घरी बोलवायचा. घरी माझे धाकटे दीर राहतात, असा काही कार्यक्रम असला, कोणी पाहुणे येणार आहेत हे माहित असलं, की मुद्दाम ते दारू पिऊन येतात आणि धिंगाणा घालतात. “

त्या बाई आणि तिचे यजमान आमच्या शाळेच्या मागच्या इमारतीत घरकाम करतात, दोघेही खूप कष्ट करतात. पण मुलीचा वाढदिवस – साधेपणाने का होईना – साजरा करू शकत नाहीत, कारण दारू पिणारा दीर.

अशी किती छोटी बाळं असतील की ज्यांना वाढदिवस म्हणजे काय हेच माहित नसेल.

मला आठवण झाली ती २००५ साली माझ्या वर्गात असलेल्या आणखी एका अशाच मुलाची. तो गावाहून शिक्षणासाठी मुंबईत त्याच्या काकांकडे आला होता. अभ्यासात ठीक ठीकच होता, दुसऱ्यांना मदत करण्यात मात्र आघाडीवर असायचा.

त्याच्या वाढदिवशी, शुभेच्छा पत्र (ग्रीटिंग कार्ड) देऊन त्याचं अभिनंदन केलं, तेव्हा त्याने मला विचारलं, “बाई, वाढदिवस म्हणजे काय? या कार्डाचं मी काय करू? “

मग मी त्याला वाढदिवस म्हणजे काय ते नीट समजावून सांगितलं. रंगपेटी आणि चित्रकलेचं पुस्तक त्याला भेट दिलं. त्याला खूप आनंद झाला.

शेतात अहोरात्र राबणाऱ्या त्याच्या आईवडिलांना बहुधा वेळही नसेल त्याचा वाढदिवस साजरा करायला, किंवा पैसेही नसतील. कामाच्या रगाड्यात कदाचित त्याचा वाढदिवस त्यांच्या लक्षातही राहत नसेल.

अशा मुलांना एखादी छोटीशी भेटवस्तूही आनंद देऊन जाते, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपल्यालाही आनंदित करते.

– लेख क्र. २२ 

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “फुलांच्या मनातलं…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “फुलांच्या मनातलं…” ☆ श्री सुधीर करंदीकर

आपल्या रोजच्या जीवनाच्या वाटचालीवर आपल्या सगळ्यांना नेहमीच छान छान आणि मजेशीर अनुभव येतच असतात.

असं म्हणतात, की छान अनुभव नेहमीच जतन करून ठेवावेत आणि मधून मधून त्यामधून फेरफटका मारावा, आणि छानशी आनंदयात्रा करावी.

माझा असाच एक छान अनुभव – “फुलांच्या मनातलं”.

बहुतेक घरांमध्ये देवाची पूजा ही रोज असतेच असते. आणि पूजा म्हटलं की फुलं ही असतातच. बरेच जण सकाळी बाहेर जाऊन फिरून येताना फुलं घेऊन येतात. काहींच्या बाल्कनीमधे फुलझाडे असतात. आमच्या बागेत फुलांची छान छान झाडे आहेत, त्यामुळे सुंदर सुंदर फुलं रोजच घराभोवती असतात.

मी बागेतून गुलाबाचं एक सुंदर टपोरं फुल रोजच देवाला वाहायला तोडून घेतो. आज बागेत गेलो, विचार केला आज छान दिवस आहे, गुलाबाची तीन चार फुलं तोडावी आणि देवाकरता पूजेला घेऊन जावी.

आणि बघतो तर कुठल्याच गुलाबाला एकही फूल नाही. बाजूची झाडं मस्त फुललेली होती. मनात विचार आला – अरे आज गुलाबाला फुल कसं नाही?

आणि चक्क गुलाबाचं झाड हलत आहे असा भास झाला. आणि एक वेगळ्याच टोन मध्ये आवाज आला : मी गुलाबाचं झाड बोलतोय. ऐकू येतय का?

मी : हो हो. ऐकू येतंय. तुम्हाला नमस्कार

गुलाबाचे झाड : नमस्कार, आज आम्ही मुद्दामच फुललो नाही. विचार केला की इतर झाडांच्या फुलांना पण देवाच्या चरणी जाण्याचा योग यायला हवा. आणि म्हणून आम्ही आज मुद्दामच फुललो नाही. विचार केला की, आज गुलाबाला फुलं नाहीत म्हणजे इतर झाडांच्या फुलांना देवाच्या चरणी जाण्याचा छान योग नक्कीच येणार. आणि ती मनापासून खूश होणार.

खरंतर सगळ्याच झाडांची अशी मनापासून इच्छा असते, की, आपली फुलं पण सुंदरच आहेत आणि ती पण देवाच्या चरणी सादर झाली तर मजा येईल. पण त्यांना तसा चान्स मिळत नाही, म्हणून आम्ही आज मुद्दामच फुललो नाही.

मी या बोलण्याचा अर्थ समजलो आणि माझी चूक माझ्या लक्षात आली. मी गुलाबाच्या झाडाला नमस्कार केला आणि म्हणालो आजपासून मी रोज निरनिराळ्या झाडांची फुले आलटून पालटून देवाला वाहायला घेऊन जाईन हे नक्की. त्यामुळे सगळीच झाडं आनंदी राहतील.

गुलाबाचं झाड थोडं हलतय, झाडाला आनंद झालाय आणि मला ते धन्यवाद देते आहे, असं मला जाणवलं. मी झाडाला वाकून नमस्कार केला. आणि पुढच्या कामाला लागलो.

त्या दिवसापासून मी एक दिवस जास्वंदीची फूलं घेऊन जातो, एक दिवस कन्हेरीचं, एक दिवस जुईचं, एक दिवस पारिजातक, एक दिवस गुलबक्षी, झेंडू, चमेली, निशिगंध, शेवंती, मोगरा, वगैरे.

सदाफुली ची फुलं देवाला वहात नाहीत असं म्हणतात. पण एक दिवस ती पण घेऊन जातो. कारण देवाला सगळीच फुले प्रिय असणार. रातराणी फुललेली असली तर तिचं फुल रात्रीच देवाला वाहतो, कारण दिवसा ती कोमेजून जातात. आणि रातराणीला पण आपली फुलं देवाच्या चरणी द्यायला आवडत असणारच.

रोजच दिवसातून तीन-चार वेळा बागेत फिरणे होते. फिरताना झाडांकडे बघून असं जाणवतं की सगळी झाडं एकदम खुश आहेत. झाडं थोडी हलायला लागतात आणि आपला आनंद व्यक्त करतात. त्यांना आनंदी बघून मी पण आनंदी होतो. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारतो. मजा येते.

गुलाबाच्या झाडाला माझे स्पेशल थँक्स देतो, कारण त्यांनीच मला आनंद देण्याचा आणि आनंद घेण्याचा अगदी सोपा म्हणजे सोपा सोपा मार्ग दाखवला.

सृष्टीची खरंतर नेहमीच अशी इच्छा असते, की, सर्व जणांनी कायम आनंदी राहावं. आणि त्याकरता सृष्टीमधले सगळेच घटक आपल्याला कायम काही काही छोट्या छोट्या टिप्स देत असतात. पण आपलं तिकडे लक्षंच नसतं. काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी आपली आनंद मिळण्याची शोध पद्धत असते. आपण वळसेच मारत राहतो आणि कळसा म्हणजे आनंद कधीच मिळत नाही.

चला तर मग, निसर्गाशी मैत्री करूया. बाल्कनी मधे उभं राहून, गच्ची मधे उभे राहून, सोसायटी मधल्या झाडांजवळ उभे राहून, झाडांची गप्पा मारता येतात, वाऱ्याबरोबर हिंडता येतं, पक्षांबरोबर रमता येतं, ढगांबरोबर हिंडता येत, आणि बरच काही, वगैरे वगैरे.

दिवसातून दोन वेळा पाच पाच मिनिटं जरी अशी भ्रमंती केली, तरी ‘आनंद’ या टॉनिकचा दिवसभराचा कोटा सहजपणे मिळतो.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चोर आहे अर्थव्यवस्थेचा कणा! – – ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

??

☆ चोर आहे अर्थव्यवस्थेचा कणा! – – ☆ श्री जगदीश काबरे ☆

लोकांना हे खोटे वाटते, पण लक्षात ठेवा…

⏩ चोरामुळे तिजोरी आहे, कपाट आहे, लॉकर आहे…

⏩ चोरामुळे खिडकीला ग्रील आहे, घराला दरवाजा आहे, दरवाजाला कुलूप आहे, बाहेर अजून एक सेफ्टी दरवाजा आहे…

⏩ चोरामुळे घराला/सोसायटीला कंपाउंड आहे, त्याला गेट आहे, गेटवर वॉचमन आहे, वॉचमनला वर्दी आहे…

⏩ चोरामुळे CCTV कॅमेरे आहेत, मेटल डिटेक्टर मशीन आहेत, चोरामुळे सायबर सेल आहे…

⏩ चोरामुळे पोलीस आहेत, पोलीस स्टेशन आहे, त्यांच्यासाठी गाड्या, काठ्या, पिस्तूल आणि बंदुका आहेत…

⏩ चोरामुळे न्यायालय आहे, तिथं जज आहेत, वकील आहेत, शिपायापासून कारकून आहेत…

⏩ चोरामुळे तुरुंग आहे, जेलर आहे, जेलमध्ये शिपाई आहेत…

⏩ मोबाईल, लॅपटॉप, तत्सम इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच सायकल, बाईक, कार इत्यादी वस्तू चोरीला गेल्यावर माणूस नविन वस्तू खरेदी करतो, आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला हातभार लागतो…

एवढी प्रचंड उलाढाल हात सफाई करणाऱ्या चोरांमुळे घडते. त्यामुळे अर्थचक्र चालू राहते, म्हणून सर्वांनी चोरांचा आदर करावा…

पांढऱ्या कपड्यातील बकध्यान लावलेल्या चोरांपेक्षा पोटाची खळगी भरण्यासाठी चोरी करणारा चोर बरा म्हणायचा. कारण पांढऱ्या कपड्यातील बगळे माणसाचा मेंदू आणि जीव घेतात, तर फाटके चोर फक्त वस्तूच चोरतात.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… – आबा – भाग – ६५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण…  आबा – भाग – ६५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

आबा

आयुष्यातले मनावरचे काही काळांचे ठसे सहजासहजी मिटत नाहीत. माझे सासरे ज्यांना आम्ही “आबा” म्हणत असू ते तसे शांत आणि गंभीर प्रवृत्तीचे होते. त्याचबरोबर ते करारी, ध्येयवादी होते. आमच्या कुटुंबात त्यांचा शब्द शेवटचा असायचा. सहसा कोणीही त्यांच्या विरोधात जात नसत. किंबहुना त्यांच्या विरोधात जाण्याचे धाडसही कोणात नव्हते. शिवाय “आबा” जे सांगतील, जे करतील ते सर्वांच्याच हिताचे आणि भल्याचेच असते अशीही एक मनोधारणा कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याची होती. या पार्श्वभूमीवर आई आबांच्या सहजीवनाचा माझ्या मनात नेहमीच विचार येत असे. खरं म्हणजे आई सुद्धा तशा आबांच्या आज्ञेबाहेर नसतच. शिवाय घरातल्या कुणाही कडून आबांना न आवडणारे वर्तन, वागणं मुळीसुद्धा घडू नये म्हणून त्या फारच सावध असायच्या. “आटपा रे बाबांनो! काय पसारा घालून ठेवलाय आणि जरा हळू आवाजात बोला. आबा आल्यावर त्यांना कळलं तर रागे भरतील बरं? ” आणि खरोखरच आबांच्या सायकलच्या घंटीचा पुढच्या दालनात आवाज आला की घराच्या आतल्या भागात प्रचंड धावपळ सुरू व्हायची. सर्वात प्रथम आमचा मदतनीस आणि अत्यंत एकनिष्ठ, स्वामीनिष्ठ असलेला एकनाथ धावायचा. आबांची सायकल जागेवर लावायची, त्यांच्या हातातलं सामान धरायचं, त्यांनी काढलेली टोपी कोट खुंटीला व्यवस्थित लटकवायची वगैरे वगैरे एकनाथ तत्परतेने करायचा.

पादत्राणं काढून रांगेत ठेवून आबा धोतराचा सोगा सांभाळत न्हाणीघरात हातपाय धुवायला जात. पुढचं दालन ते न्हाणीघर १००/१५०पावलांचा रस्ता नक्कीच असेल. शिवाय दोन वेळा पायऱ्यांचा चढउतार. जवळपास माझ्या नणंदा नयना, वसुंधरा असतच. त्यापैकी कोणीतरी तत्परतेने आबांच्या हातात नॅपकिन ठेवत. या वेळी आबांचं एकच वाक्य ठरलेलं. ”माई कुठाय? ”

 हात तोंड पुसून ते पुन्हा बैठकीच्या खोलीत, तिथे असलेल्या स्वच्छ पांढऱ्या बिनसुरकुतीची ताठ चादर घातलेल्या भारतीय बैठकीवर आराम करण्यासाठी विसावत. त्यांच्या लगोलगच आई थंडगार पाण्याचा स्वच्छ तांब्या- पेला घेऊन बैठकीत जात आणि दिवसभर काय काय घडलं त्याचा वृत्तांत हळूहळू आबा तिथे बसून आईंना सांगत पण त्यातही मला एक गंमत वाटायची की आबा घरात नसताना घरातलं राज्य आईंचं असायचं. जबरदस्त टिपेच्या आवाजात आई सर्वांना म्हणजे घरातल्या काम करणाऱ्या मदतनीस बायांपासून मुला-मुलींपर्यंत (अर्थात नंतर सून म्हणून मीही त्यात असायचीच) सूचना देत असत. ते सारे चित्र आबा घरात असले किंवा बाहेरून घरी आले की पालटलेलं असायचं. आता मात्र या कौटुंबिक राज्याची सारी सूत्रं आबांच्या हाती. म्हणजे आई सुद्धा प्रजाच. आणि बैठकीत आईआबांचा होणारा संवाद पुष्कळवेळा आतल्या खांबाला कान लावून इतर सारे ऐकायचे. मला अशा वातावरणाची आजिबात सवय नव्हती. या घरात माझं नक्की काय होणार या विचारांबरोबर मला या सर्वांची गंमतही वाटायची. असंही कुटुंब असतं की!

विलाससह सर्वच भाऊ बहिणींनी आबांच्या विरोधात- विरोधात म्हणण्यापेक्षा असं म्हणूया की त्यांचा अनादर होईल आणि आपला उद्धटपणा ठरेल असा एकही शब्द आबा हयात असेपर्यंत कधीही उच्चारलेला मला आठवत नाही.

विलाससह ही सारी सात भावंडं. होती आणि त्यांना काही हवं नको, त्यांच्या त्या वेळच्या विश्वातल्या काही मागण्या, अडचणी दूर करायची वेळ आली तर ते सारं काही “आबांपर्यंत” फक्त आईंच्या माध्यमातून पोहोचायचं. आई हे खालचं कोर्ट होतं आणि आबा म्हणजे हायकोर्ट. खालच्या कोर्टात मान्य केलेलं प्रकरण सहसा हायकोर्टात अमान्य व्हायचं नाही हे विशेष आणि यदाकदाचित झालंच तर पुन्हा अपील करण्याची काही राखीव शस्त्रं आईंकडे असत.

कधीकधी “नरोवा कुंजरोवा” या भूमिकेत मोठा “दादा” म्हणून विलासही बऱ्याच वेळा धाकट्या भावंडांची मने मोडू नयेत म्हणून वेगळ्या मार्गाने काही युक्त्या यशस्वीपणे पार पाडत असे. उदाहरणार्थ माझा दीर सुहास कधीकधी मित्रांबरोबर बाहेर जात असे आणि रात्री उशिरा घरी येत असे. जाताना तो फक्त दादाला (विलासला) सांगून जात असे. तेव्हा विलास आबांच्या नकळत त्याची घरी यायची वेळ झाली की दाराची कडी हळूच काढून ठेवत असे जेणे करून आबांना तो गेला आला काहीच समजत नसे. पण हा सगळा गमतीचा, शिस्तीचा, कधीकधी लपवाछपवीचा भाग सोडला तरी हा सारा एकमेकांच्या अंतःकरणातल्या प्रेमाचाच मामला होता.

आपण ज्याला कुटुंब पद्धती, जीवन पद्धती, जडणघडण, संस्कार म्हणतो ते तुम्ही ज्या गावात, ज्या वातावरणात, ज्या परिस्थितीत वाढत असता, घडत असता त्यावरच अवलंबून असतं. त्यासाठी चांगलं वाईट असं काहीच मोजमाप नसतं किंवा हे चांगलं हे वाईट, हे बरोबर ते चूक असं नाही म्हणता येत. नाही ठरवता येत.

खूप वेळा मला आबांच्यात आणि माझे पाश्चात्त्य संस्कृतीचा पगडा असलेले आजोबा(भाई) यांच्यात काही मूलभूत साम्य वाटायचे. पराकोटीचा व्यवस्थितपणा, स्वच्छता, टापटीप, मोजकं पण अर्थपूर्ण बोलणं या बाह्यबाबीं व्यतिरिक्तही त्यांच्यातल्या व्यावहारिक विचार धोरणातही मला साम्य वाटायचं. अधीरता आणि उतावळेपणाचा अभाव आणि त्यांच्या दृष्टीने त्यांनी केलेल्या भविष्याचे गांभीर्य यात मला नेहमी एकच सूर, एकच वैचारिक सूत्र जाणवायचं आणि या सगळ्यांमध्ये त्यांच्या पोटातली अपार माया लपलेली, दडलेली असली तरी ती अस्तित्वात होती याची जाणीव व्हायची. कदाचित ती अव्यक्त असेल पण वेळोवेळी ती आधारभूत ठरलेली असायची. शिवाय आबांबद्दल मी माझं वैयक्तिक मत व्यक्त करण्याचा मला अधिकार का असावा? मी तर त्यांच्या आयुष्याची मध्यान्ह उलटून गेल्यानंतरच्या आयुष्यात आले होते. एखादी व्यक्ती कळण्यासाठी त्या व्यक्तीचा गतकाळ अनुभवलेला नसला तरी परिचित तरी असायला हवा. वेळोवेळी विलास मला त्यांच्या एकेकाळच्या मोठ्या एकत्र कुटुंबाविषयी खूप सांगत असतो.

पाच भावांच्यात सर्वात धाकटे पण उच्चशिक्षित असल्यामुळे आबांनी ज्या पद्धतीने तेव्हा धडधडणाऱ्या तेल गिरण्यांचा, कापूस गिरण्यांचा (जिनिंग प्रेसींग)अवाढव्य शेतीचा डोलारा किती हुशारीने आणि सफलतेने पेलला होता आणि तेही मोठ्या भावाचे (आप्पांचे) “कर्ता करविता” हे पद सांभाळून, स्वतःकडे कसलेही अधिकार न बाळगता नि:पक्षपणे आणि निस्वार्थीपणे कुटुंबासाठी जे झटून केलं होतं त्याचा सुंदर इतिहास मला विलासमुळे अवगत होता. त्यामुळे “आबा” ही नक्कीच साधारण व्यक्ती नव्हती. कुटुंबीयांना त्यांचा अभिमान का वाटू नये? आणि या अभिमानाच्या भावनेतूनच कदाचित हा आदरणीय दुरावा असेल पण या दुराव्यातून डोकावणारा प्रेमाचा रंग मात्र नक्कीच अस्सल होता याची मी वेळोवेळी खातरजमा करत राहिले.

एक दिवस भांडारकर कुटुंबातल्याच एका सोहळ्यात एकत्र जमलेलो असताना एक ज्येष्ठ वहिनी माझ्या शेजारी येऊन बसल्या. सुरेख, रेखीव, गौरवर्णी, दागदागिन्यांनी मढलेली सौंदर्यवतीच! वेगळ्या, स्वकर्तृत्वावर रचलेल्या आमच्या सुरेख,नेटक्या, आखीव संसाराचं भरभरून कौतुकही त्यांनी केलं. भांडारकर कुटुंबाच्या वैभवशाली गतकालात त्याही बोलता बोलता रमल्या आणि नकळत म्हणाल्या “गिरण्यांचे भोंगे थांबले, मशीनची चक्र थंडावली कारण तुझ्या सासर्‍यांनी या कारभारातून निवृत्ती पत्करली आणि त्यानंतरच खरी घसरण सुरू झाली. त्यांनी असं करायला नको होतं. ”

हे ऐकून मी चकीत झाले पण नंतर वाटलं एक प्रकारे त्या ज्येष्ठ व्यक्तीने आबांना दोष देता देता आबांच्या कार्यावर नकळतच “तुम्ही नाही तर कोणीच नाही” असा गुणांकित शिक्काच नाही का मारला? मला वैषम्य वाटण्यापेक्षा त्या क्षणी आबांविषयी अभिमानच वाटला.

आता प्रश्न उरतो तो हा की,” त्या ज्येष्ठ व्यक्ती असं का म्हणाल्या? ”

विलासलाच विचारावं पण त्याआधी हा संवाद त्याला सांगावा लागेल मग ती मनं कलुषित करणारी आगळिक नाही का ठरणार? आणि हे ऐकून तो नक्की कसा रीअॅक्ट होईल?

खरंच जीवन किती गुंतागुंतीचं असतं!

– क्रमशः भाग ६५.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “नवी पेठ जुनी झाली…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “नवी पेठ जुनी झाली…” ☆ सुश्री शीला पतकी 

काही कामानिमित्त नवी पेठ आणि पूर्वी राहत असलेल्या काही भागात फिरण्यासाठी गेले आणि लक्षात आलं. आणि जाणवलं… नवी पेठ जुनी झाली आहे. तरुण पोरीपोरांची गर्दी असणारी आणि चोरून चोरून एकमेकाकडे बघणारे तसेच नव्याने काही दुकानात आले आहे का याची जात आता चौकशी करणारी मंडळी आता तिथे नाहीत. आता गर्दीला चेहरा नाही आणि वयही नाही.

शशिकला इथे राहत होती हे दाखवणारी माडी पण नाही. इंडिया ग्लास दुकान बदललं. बंडे क्लाथ स्टोअर्सची पाटी गेली. मर्दाच दुकान गायब झालं. नॅशनल मधील बायकांची गर्दी कमी झाली. चिवडेवाल्या मारुती समोर फुलांचा सुगंध येत नाही. शारदा स्टोअर्स गायब झालं. तुषार रेस्टॉरंटच्या पुरी भाजीची चव संपली. टांगा स्टॅन्डवर एकही टांगा नाही. स्टार बेकरी गायब झाली. एक नंबर शाळेत असणारी पोरांची पळापळ संपली. आता तिथे दुकानांची रेलचेल झाली. शाळा जाऊन त्या इमारतीत दुकान होणं हे आपल्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्राची पडझड दाखवतं. एक नंबर शाळेसमोर लग्नाच्या हारांची खासियत आणि दररोजच्या पूजेचे हारफुले हमखास मिळणारे मंठाळकरांचे फुलांचे दुकान संपले. चौपाड पोस्ट ऑफिस दिसत नाही. नऊ नंबर शाळा आणि विठोबाचे मंदिर असंख्य टपऱ्याने वेढले गेलयं आहे. भक्तीच्या आणि शिक्षणाच्या वाटेवर खरंच दुकानदारी सुरू झाली.. मकानाच्या बाजूला मोबाईल गल्ली लागली. विवेकानंद वाचनालय आणि जवेरीची ऍडवर्टाइजमेंटची दुकाने बंद झाली. फॅशन कॉर्नरच्यावर असणारी गट्टी सरांची नृत्य शाळा बंद झाली.

शिंदे चौकातलं तानाजी सायकल मार्ट गेलं. असंख्य पुस्तकांची वाचनाची गोडी लावणारं झुंजार वाचनालय संपलं. दळवींची गिरणी गेली. स्वातंत्र्यसैनिक द्वारकाताई देशपांडे यांची देवळातली शाळा संपली. मुलींच्या शिक्षणाचा श्री गणेशा ज्या काळात झाला ती नगरपालिकेची मुलींची एक नंबर शाळा संपली. दगडोबा भागवतांच्या चाळी गरीब माणसांच्या संसाराचे भार पेलून पेलून म्हाताऱ्या झाल्या. काळी मशीदीला लागून असलेली मुस्लिमांची तालीम बंद झाली. कुठल्याही जाती जमातीच्या पोराला व्यायामाला लावून पहिलवान करणारे आणि त्यांच्या छोट्या छोट्या कुस्त्या जिंकल्यावर मिरवणूक काढणारे मशिदीचे वस्ताद नाहीसे झाले. अण्णाप्पा व्हट्टेचे ते दुकान बंद झाले. नगरपालिकेच्या दवाखान्यात सायकलवरून येणारे व गोल टोपी हॅट घालणारे डॉक्टर लेले आता काळाच्या पडद्याआड झाले. नागनाथची ट्रान्सपोर्ट सर्व्हिस बंद पडली. त्याच चौकातलं प्रयाग बाई आणि गंगुबाईचं भाजी मार्केट बंद पडलं. बडबड करत बर्फ किसून विकणाऱ्या अम्माची बर्फ गाडी बंद पडली. वसंत सायकल मार्ट मात्र अजूनही चालू आहे, पण त्याच्या समोर असणारं तेल्याचे दुकान बंद झालं. दिलपाक हॉटेलच्या शेजारी असणाऱ्या पानपट्टीच्या टपरी जवळच्या खांबावर जळणारी दोरी संपली. श्याम सारंगने बनवलेला महाराष्ट्रीय माणसाचे आराध्य दैवत असलेल्या आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मात्र ऐटीने उभा आहे… मुजरा महाराज… 

एसटी स्टँड चा बाज बदलला. ढोनसळ्यांचा आवाज संपला. राजा सलगरांची नाटकाची तालीम करत करत चालणारी कंडक्टरशिप संपली. सायखेडकरांची एसटीतली नाटकं संपली. एस. टी. तला मोठा गणेशोत्सव संपला. आडवा नळ रस्त्याने बंद झाला. लोभा मास्तरांची चाळ विस्मृतीत गेली. भागवत चित्रमंदिर समोरची माणिकचंद चाळ संपली. खिडकीतून इस्त्रीचे कपडे देणारा इस्त्रीवाला संपला. काटकर इंजिनिअरिंगची खटपट संपली. अजंठा लाॅजचा रुबाब संपला. भागवत चित्रमंदिरमधील गर्दी संपली. चित्रमंदिरच्या स्टेजवरती होणारी असंख्य नाटक विस्मृतीत गेली. बुवा तेथे बाया, तो मी नव्हेच, सीमेवरून परत जा, वाहतो ही दुर्वांची जुडी, … एकापेक्षा एक सरस नाटकं त्या मंदिराने आम्हाला दाखवली.

चित्रमंदिरच्या मागच्या बाजूला याला दासींच्या उत्कृष्ट पेंटिंगची जगात कुठेही न आढळणारी आर्ट गॅलरी संपली. भागवत मधला हॉटेलवाला इराणी, डोरकीपर दत्तोबा शिंदे,मखमलीच्या कोटावर कोल्हापुरी टोपी घालणारे छाया मंदिरचे मॅनेजर पांडे काका आणि मोहन पांडे विस्मृतीत गेले. उमा मंदिर चा बटणावर वर खाली होणारा पडदा स्मृतीच्या पटलाआड गेला. मीना टॉकीज शेजारच्या गोविंद विड्यासाठी प्रसिद्ध असणारं कुलकर्णींचं पान शॉप बंद झालं. भारत भुवनचा डोसा संपला. आशा टॉकीजसमोरच्या पैलवान बाईचा फोटो असणाऱ्या चुरमुऱ्याच्या दुकानातला डेक्कन क्वीन उदबत्तीचा वास संपला. गदगमधल्या चहाची चव पूर्वीसारखी राहिली नाही असं आमचे एक सर सांगून गेले. जुनी गिरणीच्या बाजूच्या बोळातलं फाटक संपलं.. आठ आण्यात पिशवीवर भाजी मिळण्याचे गरिबांचं ठिकाण संपलं… कडवंच्या, पात्री, करडई, तांदूळसा,फडक्यावर बांधून बसणारी आणि विक्री करणारी टेंभ्याच्या प्रकाशातली ती माणसं काळाच्या ओघात गायब झाली. जुनी गिरणीचा भोंगा तर केव्हाच बंद झाला. गिरणीतला तो ऐश्वर्यसंपन्न सत्यनारायण आजही लक्षात आहे.. प्रत्येक बाईची खणानारळाने ओटी भरली जायची, मुलांना चांदिचे चार आणे मिळायचे आणि पुरुषांना चांदीचे कमळ.. असा सत्यनारायणाचा थाट असायचा.. ते ऐश्वर्य संपलं.

… गिरणीच्या चाळीतले रात्रीच्या भजनी मंडळाचे सूर आता ऐकू येत नाहीत. टाळांचा आवाज घुमत नाही. गिरणीच्या चाळीतल्या छोट्या देवळासमोरची भूपाळी कानावर पडत नाही.. सप्ताह बंद झाले..! कौटुंबिक मराठी चित्रपटाची मेजवानी देणारे आदरणीय कलगोंडा पाटलांचे पटवर्धन चालवत असलेले प्रभात टॉकीज पार संपून गेले. वडगावकरांची चाळ संपली दुकानाच्या गर्दीत दत्ताचे देऊळ दाटी वाटीत उभे आहे. पावशे सरांच्या क्लासमधली तुडुंब गर्दी संपली. स्वस्तिकच्या दुकानाची पूर्वीची शान राहिली नाही, सुपर फाईनची गर्दी राहिली नाही, लकीत बसून चहा पिणं,.. ती मजाही काळाबरोबर गेली.. गुजरात लॉज संपलं.. भंडारे करवंदे यांची शिंप्याची दुकान संपली…

बघता बघता सोलापूरचा आमच्या जगाला समृद्ध करून गेलेला तो सुवर्ण काळ काळाच्या पडद्याआड गेला. त्या जागेच्या, त्या माणसांच्या, त्यांच्यातल्या माणुसकीच्या, प्रेमाच्या, काळी मशीद जवळच्या हिंदू मुस्लिम भाईचाराच्या, सुंदर दिवसांच्या हुंडेकरी वाड्यातल्या रम्य आठवणी बघता बघता काळाच्या पडद्याआड गेल्या.

गणपती उत्सवात जागोजागी होणारे नकलाकार पतकी यांचे नकलाचे कार्यक्रम,फाटे पार्टीचे कार्यक्रम, बत्तूल डान्सिंग पार्टी,चांद मास्तरचे मेळे काळाच्या पडद्याआड गेले. वीरा पाटलांची निष्ठेने घेतलेली हिंदू महासभेची भाषणे संपली.. रंगा वैद्यांच्या इलेक्शनमध्ये ऐकलेली आदरणीय प्राध्यापक पुजारी सर आणि फडकुले सर यांची भाषणे विस्मृतीत गेली…

… सारं सारं डोळ्यासमोरून तरळून गेलं. काळ किती बदलला याची जाणीव झाली. काळाचे ओघात किती वाहून गेलं हे लक्षात आलं त्या सुंदर काळानं आपल्याला खूप खूप दिलं.. जगणं सुंदर केलं हेही लक्षात आलं… डोळे शांतपणे मिटले तेव्हा अश्रूंचे दोन थेंब पुढच्या कागदावर पडले. मी ते हाताने पुसले आणि कागदावर पसरलेल्या निळ्याशार शाईकडे पहात राहिले … अथांग डोहात पाहिल्यासारखे…!!!

– – या सगळ्या गत-स्मृती समस्त सोलापूरकरांसाठी – – – 

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares