मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाप आहे म्हणून… ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? मनमंजुषेतून ?

☆ बाप आहे म्हणून… ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

काही दिवसापूर्वी मी पुण्यात असताना एका महत्वाच्या मिटिंग बसलो होतो. माझ्या सोबत चारजण क्लासवन दर्जाचे अधिकारी बसलेले होते. तर काही उद्योजक आणि समाजसेवक ही होते. एका मोठ्या कार्यक्रमाच्या संदर्भात आमचं बोलण सुरु झालेलंच होतं. आणि तेवढ्यात माझा फोन व्हायब्रेट व्हायला लागला. फोन समोरच असल्यामुळे माझं लक्ष स्क्रिनवर गेलं. फोन माझ्या वडिलांचा होता. मी सर्वाना चेहऱ्याने खूणवून विनंती केली आणि फोन उचलला.

आणि मी एकदम मोठ्या आवाजात म्हणलं “बोला अण्णा काय म्हणताय.. ”तर पलीकडून अण्णा म्हणले “कुठ हाईस.. ? “ मी म्हणलं, पुण्यात आहे अण्णा जरा मीटिंग मध्ये आहे. अण्णा म्हणाले “ते असू दे, काय खाल्लास का बाबा का पोटाला.. ? मी होय म्हणलं.. अण्णांनी फोन ठेवला.. आमचं बोलणं पुन्हा सुरू झालं.. आणि लगेच पाच मिनिटांनी पुन्हा अण्णांचा फोन आला.. मी पुन्हा सगळ्यांना थांबवलं आणि फोन घेतला…पलीकडून आण्णा म्हणाले “ हे बघ येताना किलोभर बोंबील आणि सुकट घेऊन ये. तुझ्या त्या खडकीच्या दोस्ताकडणं.. मी बर अण्णा म्हणलं…परत फोन ठेवला…मीटिंग सुरू झाली.. आणि परत लगेच दोन मिनिटांनी अण्णांचा परत फोन आला.. मी शांतपणे पुन्हा फोन घेतला.. पलीकडून अण्णा म्हणाले, “आर टिव्हीचा रिचार्ज संपलाय तेवढं बॅलन्स मार त्यावर लगेच…” मी होय आण्णा म्हणून फोन ठेवला आणि ताबडतोब बॅलन्स टाकला..

तर लगेच परत फोन आला.. अण्णा परत म्हणले “ हम्म आलाय आलाय बॅलन्स चालू झालं.. ” मी बर अण्णा म्हणून फोन ठेवला.. सगळ्यांना सॉरी म्हणून मी बोलायला सुरू होणार तेवढ्यात परत फोन आला…मी परत फोन घेतला आणि अण्णांनी विचारलं “ आरं ती भारताची मॅच कवा हाय.. साऊथ आफ्रिका सोबत हाय नव्हं आता.. त्यावेळी वल्डकप सुरू होता.. अण्णांना क्रिकेटचा जरा नाद आहे. मी बाजूच्या एकाला विचारलं, “सर कधी आहे ओ साऊथ आफ्रिकेसोबत आपली मॅच.. ??? त्याने तर तोंडावरचा राग लपवत सांगितलं की उद्या आहे मॅच म्हणून…. मी तसंच अण्णांना सांगितलं…मग अण्णांनी परत फोन कट केला…

चार पाच वेळा एका दमात फोन झाल्याशिवाय आण्णा शांत बसत नाहीत ही सवय मला माहित होती. आता दोन तास तरी त्यांचा फोन येणार नाही याची खात्री मला झाली आणि मी पुन्हा सर्वांना बोललो सर आता करा सुरू…

माझ्या त्या फोनमुळे वातावरण जरा बदलले होते याची जाणीव मला झाली होती.. पण मी काय लै लोड घेतला न्हाय.. मीटिंग संपली..

मीटिंग संपल्यावर नाष्टा आला.. नाष्टा करताना सगळेजण त्यांच्या फोनवर आलेले मिसकॉल पाहत होते. आणि मला ते समजावे म्हणून एकमेकांना कॉल आलेले दाखवत होते. माझ्या ही फोनवर सात ते आठ अनोळखी नंबर वरून आलेले मिस कॉल दिसत होते…मी मात्र त्याकडे दुर्लक्ष करून नाष्टा पोटात ढकलू पाहत होतो..

त्यातला एकजण मला म्हणाला, दादा एक बोलू का? रागावू नका पण मीटिंग सुरू असताना फोनवर लै बोलला तुम्ही.. आणि वडिलांचाच तर फोन होता आणि एवढं काय महत्वाचं ही नव्हतं.. तुम्ही मिटिंग संपल्यावर ही बोलू शकला असता त्यांना. ? त्याच्या सुरात सगळ्यांनी सुर मिसळला आणि शांतपणे ते सर्वजण माझ्यावर राग व्यक्त करू लागले.

त्या सगळ्यांचं बोलण झाल्यावर मी फक्त इतकंच म्हणलं…

आज बापाचा आपल्याला दिवसातून हजारवेळा कॉल येतोय यासारखी सुंदर गोष्ट जगात दूसरी कुठलीच नाही साहेब …आणि साहेब मी जर फोन उचलला नसता ना तर किमान दोन तास तरी माझा बाप माझ्या काळजीत तडफडला असता.. साहेब आज बापाचा फोन येतोय उद्या भविष्यात बाप निघून गेल्यावर या नंबर वरून कॉल येणार नाही.. हा काळजी असणारा आवाज कानावर पडणार नाही.. आणि साहेब मिटिंग, कार्यक्रम वैगेरे होतच राहतील…माझं बोलणं सुरू होतंच तेवढ्यात अण्णांचा परत फोन आला…मी पटकन उचलला आणि स्पिकरवर टाकला…अण्णा जोरात बोलत म्हणाले,

“आर बोंबील घेताना खारा मासाबी जर चांगला भेटला तर किलोभर घेऊन ये.. तोंडाला चव येईना लका…मी शांतपणे होय म्हणाल्यावर फोन ठेवला…

त्यावेळी अचानक समोरच्या खुर्चीत बसलेले परांजपे सर एकदम लहान मुलासारखे रडू लागले.. सगळेजण शांत झाले…डोळे पुसत ते म्हणाले, चंदनशिवे खरं आहे तुमचं…मी आयुष्यात काय गमावून बसलोय याची आज तुम्ही मला जाणीव करून दिली. पण आता वेळ निघून गेली ओ.. आता नाही येत फोन माझ्या वडिलांचा. कारण वडीलच गेले ओ निघून पार पार दूर निघून गेले. रेंजच्या बाहेर गेले. सगळ्याचे डोळे पाणावले. आणि गंमत म्हणजे ज्यांचे वडील रेंज मध्ये आहेत त्यांनी त्यांनी आपापल्या वडिलांना फोन करायला सुरवात केली. का कुणास ठाऊक पण सर्वजण अगदी लहान मुलासारखे बापाशी बोलू लागले. मात्र परांजपे सरांचा हंबरडा आतल्या आत हंबरत राहिला.

आम्ही बाहेर पडलो. सगळेजण त्यांच्या त्यांच्या गाडीतून निघून गेले. आणि मी माझ्या खडकीच्या मित्राला म्हंजे रुपेशला फोन केला.. पलीकडून रूप्या शिवी देतच म्हणाला काय रे नालायक माणसा आज आठवण आली का तुला??. मी पण तसाच शब्द फिरवत म्हणलं, नालायका कोथरूडला ये ना बोंबील, सुकट आणि खारा मासा घेऊन.. आण्णाने घेऊन यायला लावलं आहे. तसा रुप्या हसत म्हणाला मी तुला फोन करणारच होतो कारण अण्णांचा मला फोन आला होता मघाशीच.. येतो घेऊन थांब तिथंच…तासाभराने रुप्या सगळं घेऊन आला. मी मात्र त्या बोंबलाच्या दरवळनाऱ्या वासात अण्णांचा हसरा चेहरा शोधू लागलो..

मित्रहो, बापाचा फोन येतोय ना.. येतोय ना.. तर दुनिया गेली उडत.. बापाचा फोन उचलायचा आधी.. तुमची मिटिंग, तुमचं ऑफिस कुठेही पळून जाणार नाहीय. दुनिया जिथं आहे तिथंच असणार आहे. पण केव्हा ना केव्हा तरी बाप जाणार आहे रेंजच्या बाहेर. तिथून बाप फोन करू शकणार नाहीय. त्यावेळी कितीही तडफडून वाट बघितली तरी स्क्रिनवर हा नंबर येणार नाहीय. म्हणून दोस्ता दुनियेला जरा वाळत घालायचं आणि बापाच्या प्रेमात ओलं होऊन जायचं. बस्स इतकंच सांगायचं होतं. वाचून झालं असेल तर पहा वडिलांचा मिस कॉल पडलाय का? चला लावा बरं फोन आपल्या बापाला वाट पाहतोय ना तो तुमच्या फोनची…

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिव्याची अमावस्या… लेखिका : सुश्री अनुराधा दि. पाटील ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

सुश्री मीनल केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ दिव्याची अमावस्या… लेखिका : सुश्री अनुराधा दि. पाटील ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

आज दिव्याची अमावस्या म्हणून कालच दिवे घासून चकचकित केले. आज सकाळी दिवे मांडून, सगळे दिवे लावून पूजा केली. फुले लाह्या वाहून झाल्यावर त्यांची शोभा तर अधिकच वाढली. नंतर खीर आणि दिव्यांचा नैवेद्य दाखवला. कहाणी वाचली. मनोमन दिव्याची प्रार्थना केली. मन अगदी प्रसन्न झाले.

… दर वर्षी प्रमाणे सर्व झाले पण आज कहाणी वाचल्यावर माझ्या मनात थोडा वेगळा विचार आला आपल्या पुढच्या पिढीला या कहाणीचे महत्व कळेल का ? त्यांना ती काल्पनिक तर वाटणार नाही ना?

माझ्या मते या कहाणीत समाजात माणसाने कसे असावे हे सांगितले आहे.. म्हणजे बघा हं……

आटपाट नगरचा राजा म्हणजे घरातील कर्ता पुरुष. जो सर्व निर्णय स्वतः घेतो. कहाणीतल्या राजाची बायको चोरून पदार्थ खाते आणि आळ उंदरावर घेते. खरे तर घरात असे वातावरण हवे की कोणीही एकमेकांना न सांगता काही चुकीचे करू नये आणि केलेच तर आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या व्यक्तीवर आळ घेऊ नये, त्याला दोषी ठरवू नये. कारण आपण ज्यांना कमी लेखतो त्यांना दुखावले तर त्यांची बुद्धी वाईट विचार करू लागते आणि कहाणीतल्या उंदराप्रमाणे घरात गैरसमज पसरवते. कहाणीतल्या राजाने शहानिशा न करता आपल्या बायकोला घराबाहेर काढले.. तसे आपण करू नये. पूर्ण चौकशी केल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये. कारण सत्य हे कधीही लपत नाही. ज्याप्रमाणे राजाला त्याच्याच घरच्या दिव्याकडून सत्य समजले त्याप्रमाणे एक ना एक दिवस सत्य समजल्याशीवे रहात नाही.

हा विचार दिव्याची पूजा करतांना आवश्यक आहे.

लेखिका : सुश्री अनुराधा दि. पाटील 

संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… तार – भाग – ५२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… तार – भाग – ५२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

तार

“भांडारकर गल्ली, सखाराम वाडी जवळ, अमळनेर. ” येथील भल्या मोठ्या घरात आयुष्याच्या एका नव्या टप्प्यात मी स्वतःला सामावून घेण्याचा प्रयत्न करत होते. “प्रयत्न” हा शब्द मी अशासाठी वापरला की कुठलाही बदल, कुठलेही नवीन वातावरण, भोवतालची नव्या नात्याने जोडली गेलेली माणसं यांच्याशी जुळवून घेताना मनात काहीशी घालमेल होणे हे स्वाभाविकच असते आणि आपल्या कुटुंबात येणाऱ्या नव्या व्यक्तीला सांभाळून घेण्याचं त्यांनाही काहीसं आव्हानात्मकच असतं. एक अवघड वळण असतं सर्वांसाठीच. या सुरुवातीच्या वळणावर आयुष्याची पुढची योग्य दिशा ठरत असावी. स्वभाव, संस्कृती आणि संस्कार यांच्या प्रात्यक्षिकाची एक कठीण परीक्षा असते असं म्हटलं तर गैर ठरु नये.

एक दिवस याच वरील पत्त्यावर एक तार आली. तार म्हणजे आणीबाणीच. शक्यतो तारेतला मजकूर हा सुखद नसतोच. त्यामुळे घरात पोस्टमन तार घेऊन आल्यामुळे संपूर्ण खेळीमेळीच्या वातावरणात एक तणाव निर्माण झाला. बैठकीच्या खोलीत नित्यनियमित कामकाजात व्यग्र असणाऱ्या आबांनी (माझे सासरे) जडावलेल्या हाताने पोस्टमन कडून तार घेतली आणि बाहेरूनच त्यांनी माझ्या सासूबाईंना हाक मारली. ” माई ठाण्याहून ढग्यांची तार आली आहे ग.! ”

हातातलं काम सोडून आई उंबरठे ओलांडत बैठकीच्या खोलीत पटपट आल्या. त्यांच्याबरोबर आम्ही सारेच जे घरात होतो तेव्हढे.

आई आबांना म्हणाल्या, ” उघडा तरी. वाचल्याशिवाय कसं कळेल? ”

 त्यांनी लगेच माझाही हात धरला. मी खूप घाबरले असणार असे समजून, मला धीर देण्यासाठी. मी घाबरले होतेच मनातून. “पप्पांनी तार का केली असेल? जीजी बरी असेल ना? ”

आबांनी तार उघडली आणि मोठ्याने वाचूनही दाखवली.

तारेत लिहिलं होतं, ” बाबी! इथे पाऊस सुरू झालाय आणि तू लावलेल्या सोनटक्क्यांच्या रोपांना खूप फुले आली आहेत. त्या दरवळणाऱ्या सुगंधात तूच आहेस असं वाटतं. ” 

तारेतला मजकूर ऐकल्यानंतर क्षणभर सारे स्तब्ध झाले. हायसंही वाटलं आणि दुसऱ्याच क्षणी सगळ्यांना हसूही आले. मला आता आठवत नाही पण त्या गमतीच्या आणि हास्यभरल्या वातावरणात माझे डोळे ओलसर झालेच असणार.

“ किती गं घाबरवलं तुझ्या पप्पांनी. ” असं म्हणत सासूबाई परत घरात वळल्या.

पण त्यानंतर माझ्या सासरच्या लोकांना पप्पांच्या तारांची सवय झाली. विचार करा.. त्यावेळी टेलिफोन सुद्धा घरोघरी नसत. संपर्क यंत्रणा खूपच दुर्बल होती. पत्र पोहोचायलाही तीन-चार दिवस लागत मग दूरच्या व्यक्तीला मनातलं ताबडतोब पोहोचवण्याचं एकमेव साधन म्हणजे तार.

पप्पांच्या त्यानंतर आलेल्या तारा मात्र आबा थेट मलाच देत. ” वाच” म्हणत, पप्पांच्या तारांत काय असायचं?

“आज अनुराधा अंकात तुझी कथा आली आहे तुला अंक पाठवायची व्यवस्था करतो. ”

“आज मासळी बाजारात तुला खास आवडणारी अगदी ताजी तडफडीत जिताडी आणि शेताडी कोलंबी मिळाली. ”

“आज निचुकलीने (धाकटी बहीण) तुझ्यासारखी खांडवी करायचा प्रयत्न केला. तिला सांगू नकोस पण नाही जमली तिला. ” 

अशा अनेक तारा! आज वाटतं मी त्या का नाही जपून ठेवल्या? तार पाठवताना पप्पांनी कधी शब्दसंख्या, त्यांना लागणारे पैसे याचा विचारही केला नसावा. सासरी गेलेली आपली मुलगी आनंदात आहे ना यासाठी लेकीच्या बापाचा जीव किती तळमळतो याचा तो एक हृद्य अनुभव होता. कदाचित त्यांच्या मनात माझ्या विषयीच्या प्राथमिक शंकाही असतील. अत्यंत मुक्त, स्वतंत्र वातावरणात वाढलेली, काहीशी उद्धट, बंडखोर, पटकन मत देऊन मोकळी होणारी आपली ही कन्या तिथल्या शांतताप्रिय, मितभाषी, विविध नात्यांच्या गोतावळ्यात रमेल का?

माझी पाठवणी करताना पप्पांनी विलासना एका कोपऱ्यात नेऊन सांगितलं होतं, ” माझं हे मौल्यवान रत्न आहे. तुम्ही काळजीपूर्वक सांभाळाल, त्याचा मान राखाल याचा मला विश्वास आहे.”

“स्त्री” म्हणजे काय असं जर मला कोणी विचारलं ना तर मी म्हणेन” सासर आणि माहेर यात भिन्नपणे विभागले गेलेले एक संतुलित व्यक्तिमत्त्व. सून आणि कन्या यातली सूक्ष्म रेषा ओळखणारी, जाणणारी एक समंजस व्यक्ती. ”

आणखी एक. पप्पा एक प्रेमळ पिता तर होतेच पण सासरी गेलेली आपली कन्या म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत “आपली जबाबदारी” हे मानणारे होते तिच्या आयुष्यात जर काही उलट सुलट घडलेच तर तिच्या पाठीशी उभं राहणं हे “त्यांचं कर्तव्य” असे मानणारे होते. ही पिता म्हणून त्यांची भूमिका होती. पप्पा म्हणजे नेहमीच आमच्यासाठी एक अभेद्य सुरक्षा कवच होतं हे नक्कीच.

आज मागे वळून पाहताना आणि वैष्णवी सारख्या अभागी मुलींच्या बाबतीत घडणाऱ्या घटना वाचल्या की मनात विचार येतो विवाह म्हणजे एक “अंधारातील उडी आहे” त्याबाबतीत मी किती भाग्यवान ठरले! सुदैवाने अशा कुठल्याही माणसातलं माणूसपण हरवल्याचा अनुभव देणाऱ्या घटनांना सामोरे जाण्याची कधीही वेळ आली नाही. अत्यंत साध्या, सुसंस्कृत, सुंदर विचारसरणीच्या कुटुंबात माझं भविष्य आणि आयुष्य नेहमीच सुरक्षित राहिलं. माझ्यातल्या “मीपणालाही” कधीही धक्का पोहोचला नाही.

मी नेहमीच म्हणते जडणघडणीची प्रक्रिया ही कधी संपत नाही. केवळ धर्माने जुळली गेलेली ही “आपली माणसं”.. यांनीही मला जीवन जगण्याची कलात्मक टिपणं नेहमी दिली हे निश्चित.

– क्रमशः भाग ५२.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक अविस्मरणीय अनुभव ☆ सुश्री संध्या बेडेकर☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ एक अविस्मरणीय अनुभव ☆ सुश्री संध्या बेडेकर 

एक अविस्मरणीय अनुभव……

आणि त्यावर केलेली मात

२४ नोव्हेंबर १९७८ या दिवशी एका भारतीय सैनिकाबरोबर सहजीवन सुरू झाले. आणि आयुष्याला एक वेगळेच वळण आले. जसजशी वळण येत गेली तसतसा ३३ वर्ष हा प्रवास सुरू होता.

या ३३ वर्षाचे High lights सांगायचे झाले तर •••

१. वेगवेगळ्या प्रदेशात, वेगवेगळ्या शहरात एकंदर १५ बदल्या, प्रत्येक Posting काही तरी शिकवून गेली. अनुभव देऊन गेली. •••

२. एकंदर २० घरात संसार थाटला. कधी दहा खोल्यांचा ब्रिटिशकालीन प्रशस्त बंगला तर कधी दोन खोल्यांचे घर. कधी भाड्याच्या घरात, तर कधी दुसऱ्यांच्या घरात (ते सुट्टीवर गेले असताना त्यांच्या घरात) ••••

३. मुलीचे १२ वी पर्यंतचे शिक्षण १२ शाळांमध्ये पूर्ण झाले. •••

४. आमच्या आजपर्यंतच्या सुखी संसाराच्या त्या टिपिकल काळया ७० लाकडी पेट्या घेऊन आम्ही फूल नाही फुलाची पाकळी एवढं योगदान देऊन अभिमानाने आणि समाधानाने रिटायर्ड झालो. •••

या ३३ वर्षात एक नाही अनेक अविस्मरणीय प्रसंगांना सामोरे गेलो. अनेक उतार चढाव बघितले. कधी अपेक्षित तर कधी अनपेक्षित होते. अनेक स्वाद चाखायला मिळाले. त्याबरोबर जीवन समृद्ध, श्रीमंत होत गेले. किती तरी प्रसंग मनावर कोरले गेलेत. •••••

मी कधी *uniform * घातला नाही. हातात बंदूक धरली नाही. पण मी आर्मी लाइफ जगले आहे. गोळ्यांच्या आवाज ऐकला आहे. अप्रत्यक्षपणे कारगिल युद्धात भाग घेतला आहे. या सर्व अविस्मरणीय आठवणी म्हणजे मनावर कोरले गेलेले एक पुस्तकच आहे. •••

त्यातलाच एक अविस्मरणीय प्रसंग म्हणजे, •••••

*आमची अंदमान निकोबार ची Posting. *••••

१९८८ ते १९९0 माझे पती Col (Dr) P. M. Bedekar त्यावेळचे Maj (Dr) P. M Bedekar यांना Nicobar Group Of Island च्या NanCowry या बेटावर पन्नास बेडेड दवाखाना सांभाळायची जबाबदारी मिळाली. आजूबाजूला असलेले नऊ Island चे लोक पण याच दवाखान्यावर निर्भर होते. त्यामुळे भरपूर पेशंट्स असायचे. ••••

Posting आली त्यावेळेस आम्ही लखनऊ ला होतो. •••

NanCowry ला पोहचण्यासाठी आम्ही केलेला प्रवास म्हणजे ••••

ट्रेनने लखनऊ ते कलकत्ता — कलकत्ताहून जहाजाचा चार दिवसांच्या प्रवासानंतर — Portblair (Andaman Nicobar ची राजधानी) —- तेथून पुन्हा जहाजाने तीन दिवसानंतर आम्ही NanCowry येथे जुलै महिन्यात पोहचलो. ••• समुद्री प्रवासात खूप वेगवेगळे अनुभव आले. आम्ही या समुद्री प्रवासात फक्त एकच दिवस सरळ चाललो होतो. बाकी प्रवास खवळलेल्या समुद्रात, भयंकर लाटांमुळे झोपूनच पूर्ण झाला. या प्रवासात एका प्रवाशाचे निधन झाले. तेंव्हा त्यांच्या शरीरावर वजन बांधून त्याचे समुद्रात विसर्जन केले. ही घटना ऐकून आता मनानेही हेलकावे घ्यायला सुरुवात केली. अनेक काल्पनिक विचारांनी मन भरून गेले. बरे असो. ••••

पोर्ट ब्लेअरला एका बाईने सांगितले की NanCowry ला खूप साप आहेत, तेव्हा सांभाळुन रहा. मुलींना शाळेत पाठवताना एकदा त्यांचे शूज जरूर चेक करत जा… हा माईंड सेट घेऊन, आम्ही आमच्या जागी पोचलो. आर्मी डॉक्टरच्या स्वागतार्थ पूर्ण गाव एकत्र झालं होतं. पण माझे लक्ष नव्हतंच, कारण मी तर साप शोधण्यात बिझी होते…. आमच्या पूर्ण *NanCowry stay * मध्ये मला एकही साप दिसला नाही. हे विशेष.

यांचा मानसन्मान बघून सहजच मनात आलं •••

आज या देशात पंतप्रधान श्री राजीव गांधी नंतर बहुतेक माझ्याच नवऱ्याचा नंबर असावा. ••••

NanCowry Island म्हणजे

5000 लोकसंख्या असलेले एक गांव. चारी बाजूला समुद्र. लाकडी मचाणावर उभे असलेले आमचे लाकडी घर. म्हणजे छोटासा टुमदार बंगलाच होता तो. आवारात नारळाची तीस झाडे होती. स्वयंपाक घराच्या खिडकीतून मला समुद्र दिसत असे. पहिल्याच दिवशी रात्री घर हलू लागले. बहुतेक समुद्राचे पाणी आले की काय?? या भीतीने घाबरून उठून बघितले, तर घराच्या खाली गाय बसली होती. आणि ती उठायचा प्रयत्न करत होती. त्यामुळे घर हालत होते. ••••

मनात म्हटलं, ••• ऐसा भी होता है!!! ••• आमचे घर म्हणजे या गावातील *प्रेक्षणीय स्थळ * होते. मुलींची शाळा मात्र नावालाच होती. तेथे मच्छर भरपूर. त्यामुळे cerebral maleria चे भरपूर पेशंट्स असत.

१५ आॉगस्ट १९८८ चा तो दिवस, आजपण जसाचा तसा मला चांगला आठवतोय. •••

** पिलपिलो ** नावाचे बेट •••आमच्या आयलँडपासून तीन साडेतीन तासांच्या अंतरावर होते. तेथील कॅप्टन (सरपंच) आम्हाला आपली एक छोटी बोट घेऊन घ्यायला आला होता. म्हणाला, •••

“सर!! आजतक कोई भी डॉक्टर हमारे गांव नहीं आया । आप आर्मी के डॉक्टर हैं । आप ज़रूर आयेंगे ।ऐसा मैं गांव वालों को बताके आया हूं ।” •••• आता तर *युनिफॉर्म की इज्जत का सवाल होता. *••••

खरंतर आॅगस्ट महिना, अफाट समुद्र, लहान बोट •••सर्व कंडीशन्स प्रवासासाठी अनुकूल नव्हत्याच. नुकताच जहाज प्रवासाचा अनुभव अजून डोक्यात होताच. •••(हे सर्व आमचा पिलपिलोचा प्रवास संपल्यावर जास्त चांगलं समजलं.) ••••

“ सर!! कोई प्रोब्लेम नहीं सर!! चिंता नहीं सर!! आरामसे चले जाऐंगे सर!! । “••• कॅप्टन (सरपंच) म्हणाला. ••••

आम्ही निघालो, क्षणाक्षणाला माझे विचार, भावना, चेहऱ्यावरील भाव बदलत होते. कलकत्ता ते पोर्टब्लेअर प्रवास बंद आणि खूप मोठ्या जहाजांतून VIP Room मधून झाला होता. आता मात्र विशाल समुद्र, दूरदूरपर्यंत पाणीच पाणी. तेथे फक्त आमची एक बोट जात होती. कॅप्टनच्या गप्पा सुरूच होत्या. •••

सुरवातीला दीड तास प्रवास अगदी संथ स्मूथ काहीही विशेष हालचाल न होता झाला. मनावरील दडपण थोडं कमी झालं. ••• थोडाच वेळ जरा बरा गेला असेल आणि समुद्राने आपलं रौद्र रूप दाखवायला सुरुवात केली. ओपन बोट असल्यामुळे दूरून येणारी मोठ्ठी लाट दिसायची. लाटेनुसार बोट वेगवेगळे हेलकावे घेत होती. कधी कधी तर दहा फूट उंच वर जात होती. लाट बघून कल्पनेनेच पोटात गोळा यायचा. •••• * प्राण तोंडाशी येणे *. *जीव मूठीत घेऊन बसणे *. या वाक्यांशाचे अर्थ तेंव्हा अनुभवायला मिळाले. बरोबर दोन लहान मुलींना सांभाळायचे होते. हा असा प्रवास दीड तास चालू होता.

त्यातच कॅप्टन म्हणाला, “ मॅडम!! डरना नहीं । अगर बोट उल्टा हो गया, तो बोट को पकड़ कर रखना। तूफान खत्म हो जायेगा तो हम सब मिलकर बोट को सीधा कर लेंगे। “ व्वा!! काय जोरदार option होते.!!!! म्हणजे बोटला पकडून उभे रहायचे. आपलं शरीर पाण्यात, आणि मग मुलींना कोण सांभाळणार??? ••••

*डरना मत * असं म्हणून आम्हाला पूर्णपणें चित करून दिलं. आत्ता प्राण जातायेत की पुढच्या क्षणाला, जलसमाधी होणार की काय?? बस एवढीच वाट आम्ही बघत होतो. •••

फायनली प्रवास संपला. आणि आश्चर्य म्हणजे आम्ही सर्व सुखरूप होतो. •••

तेथे पोहोचल्यावर पुन्हा तेच स्वागत, तोच सम्मान. पूर्ण गाव डॉक्टरला बघायला भेटायला आलं होतं. ••••

पण पुन्हा एकदा माझे मन तेथे नव्हतंच. कारण परतीचा तोच प्रवास डोळ्यासमोर हेलकावे घेत होता. •••• असा हा अविस्मरणीय प्रसंग. ••••

घरी आल्यावर जेंव्हा जीवात जीव आला, तेंव्हा मात्र मी येथील लोकल लोकांना एक जोरदार कडक सॅल्युट मारला. हे येथील लोकांचे दैनंदिन जीवन आहे. किती कठीण जीवन.??? ••••

तरीही सरपंचाच्या हिशोबाने * आरामसे पहुंच जायेंगे * । असं तो म्हणाला होता. •••

आज हा प्रसंग म्हणजे, ••• life चे एक Achievement / Adventure वाटतंय. स्वतःचेच कौतुक वाटतंय. ••••

अंदमान च्या posting नंतर १९ दिवस प्रवास करून (त्यात जहाजाचा आठवडयाभराचा waiting period पण आहे) आम्ही पंजाब मधील *बठिंडा * या शहरात पोचलो. पुन्हा एकदा नव्याने आयुष्याची सुरुवात नवीन शहरात करणार होतो. •••

तेथे आर्मीच्या पद्धतीप्रमाणे आमचे welcome करायला एक आॅफिसर आला होता. बरोबर चहा पिण्याची व्यवस्था प्लॅटफॉर्मवर होती. आम्हा चौघांना चारी बाजूने बंदूकधारी जवानांनी आमच्या safety करता घेरले होते. त्यावेळी पंजाब मध्ये terrorism peak वर होते … आमच्या लक्षात आलं ••• या स्टेशनवर challenges वेगळेच आहेत. •••• असो,

या जन्मी आर्मी ऑफिसरच्या बायकोची भूमिका केली. पुढच्या जन्मी पण मला हीच भूमिका करायला आवडेल. •••

लग्नाआधीचा तो दिवस आजही मला आठवतो जेंव्हा मी यांना विचारले होते. •••

How much do you earn??

And He said, •••

“Roughly 100 salutes a day and we got married. ”

… माझ्या लग्नात मिळालेला सर्वात मौल्यवान दागिना म्हणजे यांच्या खांद्यावर लागलेले ते तीन स्टार्स होते. ज्यांची प्युरीटी किंवा किंमत आखणारे मशीन कोणत्याही सोनाराजवळ नाही. •••

आजही यांच्या युनिफॉर्मचे खांद्यावरचे ते चमकणारे स्टार्स आठवून मन अभिमानाने भरून येते. •••

जय हिंद ••

© सुश्री संध्या बेडेकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आज का सगळेच वेगळे??” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “आज का सगळेच वेगळे??” ☆ श्री सुधीर करंदीकर

आज सगळेच वेगळे दिसत होते, कां? ते मात्र माहीत नाही.

काल श्रावण महिन्यातला रविवार. सकाळी ९च्या सुमारास नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडलो. दार उघडून बाहेर आलो आणि समोरच गेटवर भारद्वाज पक्षी बसलेला दिसला. फिरायला बाहेर पडताना गेटवर भारद्वाज पक्षी दिसला, कि त्यादिवशी हमखास मनवा आणि मेघना यांची मृत्युंजय मंदिराजवळ भेट होते. पण आज रविवार म्हणजे ऑफिसला सुट्टीचा दिवस असल्यामुळे ती शक्यता जवळजवळ नव्हतीच. म्हणजे आज काहीतरी वेगळे आणि छान शुभ घडणार असा संकेत असणार असा विचार करून मी हात जोडून भारद्वाज पक्षाला नमस्कार केला आणि फिरायला बाहेर पडलो.

मेन रोड लागल्यावर, नेहमीचे दृश्य असते, की रस्त्यावर प्लास्टिकच्या पिशव्या पडलेल्या असतात/ कचरा पडलेला असतो/ कागदाची खोकी पडलेली असतात. आज मात्र रस्ता एकदम चकाचक दिसत होता. कुणीच कचरा फेकलेला दिसत नव्हता. कां? ते माहीत नाही.

सिटी प्राईड च्या रस्त्यावर आलो, की तिथे, कुत्री घेऊन फिरणारे स्त्री-पुरुष नेहमीच दिसतात. रस्त्यावर कुठेही कुत्र्यांच्या मनात येईल त्याप्रमाणे त्यांचे शी – शू करणे सुरू असते. कुत्रे फिरवणाऱ्याला मात्र त्याचे काही देणे घेणे नसते. आज पण कुत्र्याला घेऊन हिंडणारी मंडळी दिसत होती. फुटपाथवर एका ठिकाणी एका कुत्र्यानी शी केली, आणि मालकाने लगेच प्लास्टिकच्या पिशवीत शी गोळा केली. आणि आश्चर्य म्हणजे आज कुत्री फिरवणाऱ्या सगळ्यांच्याच हातात प्लास्टिकच्या पिशव्या दिसत होत्या. इतर दिवशी अशी मंडळी असते पण अगदी बोटावर मोजण्याइतकी. हा बदल कशामुळे घडला? हे मात्र समजत नव्हते.

पुढे मेन रोडला आलो. नेहमीचा देखावा म्हणजे, हॉर्नचे कर्कश आवाज, काही चौकांमध्ये सिग्नल सुरू असतात, काही ठिकाणी बंद असतात. सिग्नल पाळणारे अगदी बोटावर मोजण्या इतकेच असतात. सगळ्याच गाड्या बेफाम वेगाने धावत असतात. झेब्रा क्रॉसिंग वर रस्ता ओलांडणारे जीव मुठीत घेऊन धावत असतात. काहीजण उलटी कडून वेगाने येत असतात. काहीजण फुटपाथवर गाड्या घालत असतात. आज मात्र सगळेच बदललेले दिसत होते. सगळे सिग्नल चक्क सुरु होते. कोणी हॉर्न वाजवत नव्हते. सिग्नल तोडून जाणारी एकही गाडी दिसत नव्हती. झेब्रा क्रॉसिंग वरून पादचारी आरामात रस्ता ओलांडत होते. सगळ्या गाड्या २० – ३० च्या वेगाने जात – येत होत्या. उलटी कडून येणारी किंवा फुटपाथ वरून जाणारी एकहि टु व्हीलर दिसली नाही. वळणारी प्रत्येक गाडी चक्क साईड इंडिकेटर देत होती.

… हा बदल बघून, मी माझे फिरणे विसरलो, आणि ट्रॅफिकचा हा नवीन रंग बघण्यात रममाण झालो. काहीतरी कारणामुळे तंद्री मधून बाहेर आलो आणि पुढे निघालो. ट्रॅफिक मध्ये एकदमच ही सुधारणा कशामुळे झाली, ते काही समजत नव्हते.

पुढे मारुती मंदिर लागते, तिथे फुटपाथवर नेहमीच लोक कबुतरांकरता धान्य टाकत असतात. त्यामुळे कबुतरांचे थवे कायम तिथे असतात. कबुतरांमुळे काही आजार पसरतात, त्यांना रस्त्यावर धान्य टाकू नका, असे बरेच वेळा पेपरमध्ये आपण वाचतो. पण त्याची दखल कुणीच घेताना दिसत नसते. आज मात्र फुटपाथ वर कोणीही धान्य टाकले नव्हते. त्यामुळे आज एकही कबूतर दिसत नव्हते. हा बदल कशामुळे? हे मात्र समजत नव्हते. श्रावण महिन्याचा महिमा असेही असू शकेल!

थोडं पुढे गेलं की मृत्यूंजयेश्वर मंदिर आहे. रोज मी बाहेरून दर्शन घेतो आणि पुढे जातो. आज मात्र मी दर्शन घेण्याकरता चक्क मंदिराच्या आत गेलो. माझ्यामधे हा बदल कशामुळे झाला याचे उत्तर मात्र नक्कीच माझ्याकडे होते……

… एक म्हणजे, इतका सुंदर बदल घडवून आणल्याबद्दल मला देवाचे आभार मानायचे होते आणि आणि नंबर दोन म्हणजे असाच बदल कायम ठेव अशी मला देवाकडे प्रार्थना करायची होती.

© श्री सुधीर करंदीकर

(थोडी गंमत: मी मोबाईल नंबर नेहमीच इंग्रजीमध्ये देत असतो. कारण मराठी अंक असलेले keypad अजून तरी कुठल्याहि मोबाईल वरती नाही)

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पंचमीचे गारूड… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ पंचमीचे गारूड… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

वयाची सत्तरी ओलांडली तरी नागपंचमीचे गारुड काही मनातून जात नाही! आषाढ अमावस्या झाली की श्रावणाचे वेध लागतात आणि पहिला सण येतो तो नागपंचमी! लहानपणी कोकणात राहत असल्याने नागपंचमीची मजा काही वेगळीच होती! पाऊस भरपूर असे, त्यामुळे देशावर जसे नागोबाला पुजायला शेतावर किंवा गावाबाहेर एखाद्या वारुळाजवळ सगळ्या सख्या जाऊन वारुळाची पूजा करणे, झोके बांधणे, झोके खेळणे या गोष्टी करतात त्या कोकणात नव्हत्या… आमच्या घरी आई पाटावर चंदनाने नाग- नागिण, तिची पिल्ले काढत असे आणि हळदीकुंकू, फुले वाहून लाह्या, दूध याचा नैवेद्य दाखवत असे.

जेवणात तांदळाच्या रव्याची खांडवी किंवा उकडीचा मोदक असे. त्यातून हा सण एखाद्या मंगळवारी आला तर मंगळागौरीचा वेगळा थाट असे!

पुढे देशावर आल्यावर नागपंचमीची वेगळी मजा अनुभवायला मिळाली. गावाबाहेर झाडांना मोठमोठे झोके बांधलेले असत, तसेच गावातही विविध संस्था मोठे मोठे झोके बांधून झोक्यावरचे खेळ घेत असत. मुलीबाळी, स्त्रिया व इतर मुले झोके खेळण्यासाठी येत. नागोबाची पूजा करून त्याला नैवेद्य होत असे. कर्नाटक महाराष्ट्राच्या बॉर्डर वरील आमच्या सांगली मिरजेकडे चवथीचा भाजका उपास असे. त्या दिवशी भावाची (नागाची) बहीण म्हणून स्त्रिया डाळ- तांदळाची खिचडी किंवा भाजणीचे थालीपीठ किंवा ओल्या नारळाची करंजी असा जेवणासाठी भाजक्या उपासाचा बेत करत असत. संध्याकाळी मुली फेर धरत, झोके घेत, वेगवेगळी गाणी म्हणत.. या सणाला माहेरवाशीणी हमखास माहेरी येत असत! “चल ग सये वारुळाला, नागोबाला पुजायला! ” अशी गाणी नागासाठी म्हणजे भाऊरायासाठी म्हणत. तो एक आनंद उत्सव असे. बऱ्याच जुन्या मराठी सिनेमांमध्ये आशा काळे, जयश्री गडकर, सुलोचना यासारख्या नट्यांनी या नागपूजन, वडपौर्णिमा यासारख्या उत्सवांचा आनंद आपल्या डोळ्यांना दिला आहे!

घरोघरी मातीच्या बनवलेल्या नागांची पूजा केली जात असे नागांच्या जोड्या बाहेर जरी विकत मिळत असल्या तरी माझा मुलगा, केदार नागांची छान जोडी बनवत असे. चार दिवस आधी हे नाग बनवून ठेवायचे, त्याला जोंधळ्याचे डोळे लावायचे हे त्याचं वैशिष्ट्य! नागपंचमीच्या दिवशी त्या नागाची वस्त्र, लाह्या, फुलं वाहून पूजा करायची. नागाला दुधाचा नैवेद्य दाखवायचा या गोष्टी आवर्जून करत होतो.

हा सण मुलींचा असल्याने मुलींना बांगड्या भरणे, नवीन परकर पोलका शिवणे होत असे. माहेरवाशीणीला बांगड्या, साडी, सौभाग्यालंकार देऊन तिची बोळवण करणे आवर्जून होत असे.

मी सांगलीच्या होस्टेलवर 1971 ते 73 पर्यंत राहत होते. सांगली जवळ बत्तीस शिराळा येथे नागाचा मोठा उत्सव पारंपारिक पद्धतीने होतो. घरोघरी नागाची पूजा तर होतेच, पण संध्याकाळी नागांची मिरवणुक ही होत असे. गावाबाहेरच एका ठिकाणी जत्रा असे. तिथे नागांचे प्रदर्शनच असे. सर्व प्रकारचे सरपटणारे प्राणी तिथे बघायला मिळत. विषारी, बिनविषारी साप, धामीण, अगदी अजगर सुद्धा तिथे बघायला मिळे. फोटोग्राफर गळ्यात साप घालायला देऊन फोटो काढत असत. अशी ही जत्रा बघायची खूप इच्छा तेव्हा होती. आम्हाला हॉस्टेल वरून दुसऱ्या गावी जाण्यासाठी रेक्टर मॅडमची परवानगी घ्यावी लागत असे.

पण एक वर्ष आम्ही हॉस्टेल वरून सांगली शहरात जातो असे सांगून ४/५ जणी थेट बत्तीस शिराळ्याला गेलो. तेथील एक मुलगी आमच्या होस्टेलवर राहणारी होती. तिच्या घरी गेलो. तिच्याकडे खाणे पिणे करून दुपारभर जत्रेत हिंडलो! नाग सापांचा सगळीकडे सुळसुळाट दिसत होता. मनातून भीती वाटत होती, पण मज्जा म्हणून सगळं बघत होतो. आम्ही मैत्रिणींनी ही धिटाई दाखवत साप गळ्यात घालून फोटो काढून घेतले. एका तासात फोटोची कॉपी मिळाली. त्यामुळे एक संस्मरणीय आठवण आमच्याकडे राहिली होती. दुपारी चार वाजता बैलगाड्यांवरून नागांची मिरवणूक निघत असे. ती थोडीशी पाहून मिळेल त्या बसने सांगलीला हॉस्टेलवर परत आलो. सातच्या आत घरात! तरीही मॅडमना कळायचे ते कळलेच, मग थोडी आमची खरडपट्टी! पण तेव्हा जो आनंद मिळाला होता तो पुन्हा मिळणार नव्हता, त्यामुळे सगळा ओरडा मुकाट्याने गिळून टाकला आणि पुढील दिवसाला सामोरे गेलो.

आज इतक्या वर्षानंतरही नागपंचमीचा तो दिवस स्मरणात आहे लग्नानंतर सांगली भागात इतकी वर्ष राहिले पण नागपंचमीला बत्तीस शिराळ्याला जाण्याचा योग आला नाही. तरीही सांगलीत असताना सर्वांच्या बरोबर मेहंदी काढणे, बांगड्या भरणे, नवीन कपडे शिवणे हे उत्साहाने होत होते च!

देशावरील नागपंचमी खरोखरच उत्साहात आहे असे!

पुन्हा एकदा मनाशी हिंदू संस्कृती आठवते ती याच कारणाने की, आपला प्रत्येक सण निसर्गाला, प्राण्यांना धरून आहे! वडपौर्णिमा असो की बैलपोळा असो, नागपंचमी असो की नारळी पौर्णिमा, आपण निसर्गाप्रती कृतज्ञ असतो! ज्या पंच महाभूतांच्या सहाय्याने निसर्गात आपला जीवनक्रम चालू असतो त्या निसर्गाबद्दल आपुलकी, प्रेम, कृतज्ञता असावी हेच खरे!

.. ही भावना आधुनिकतेच्या नावाखाली काही प्रमाणात कमी झालेली आहे असे वाटते. गावाकडचे सण काहींना गावंढळ वाटतात, पण तसं नाही. शेतकरी जीवनाचा तो अविभाज्य भाग आहे. शेतकऱ्याचे शेत हा त्याचा अनमोल ठेवा आहे. त्याच्याशी जोडलेली कृषी संस्कृती ही शेतकऱ्याचा सन्मान करणारी आहे आणि आपल्या कृषिप्रधान भारतात त्या त्या संस्कृती प्रमाणे, काळाप्रमाणे आणि स्थानाप्रमाणे असे सण साजरे केले जातात हेच भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे, असे मला मनापासून वाटते! विशेष म्हणजे मी यंदा दुबई ला लेकी कडे आहे. आणि ती आता माझे माहेरपण करत आहे हेही माझे भाग्य च! जवळपास 50/ 52 वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र आता राहिला नसला तरी, संस्कृती आणि सुधारणा यांची सांगड घातली तर आपण चांगल्या प्रतीचे जीवन जगू शकतो हे मात्र निश्चितच!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “लाह्या आणि गणंग…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “लाह्या आणि गणंग…” ☆ सुश्री शीला पतकी 

श्रावणात सर्वात घाई असायची लाह्या फोडायची. आमच्या शेतातून ती ज्वारी यायची.. लाह्याची वेगळी असायची.. ती मग आई त्याचे उमले घालायची – म्हणजे काय ते आता मला नक्की सांगता येणार नाही पण ते भिजवून ते उपसून काढायचे.. ठेवायचे रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी लाह्या फोडायचा शेगडी वरती निखारा असायचा बेताचा त्यावर लोखंडाची पाटी त्यामध्ये ते ज्वारीचे पसापसा दाणे टाकायचे त्याचे फाड फाड फाड फाड उडायचे एका दांडूला कापड बांधलेला… त्यात त्यांनी आई ते सगळं फिरवायची मग आम्ही आजूबाजूच्या सगळ्या पडलेल्या लाह्या गोळा करत असू बघता बघता लाह्याचा डबा गच्च भरून जायचा. डबा कसला पिप होते ते. सगळ्या वाड्यात त्या लाह्या वाटायच्या असायच्या… मग ते खाली गडंग उरायचे ते पुढे दळणात घालून आई त्याच काय काय करायची.

– – हे सगळं आठवायचं कारण म्हणजे श्रावण तर आहेच पण आमच्या शाळेमध्ये एक शिक्षण तज्ज्ञ आले होते लिमये नावाचे… शिक्षण क्षेत्राचा दांडगा अनुभव… एक दिवसभर आमच्याकडे होते… मला नोकरी लागून तेव्हा पाच सहा वर्ष झाली होती… माझी त्यांची चार-पाच तासात चांगली गट्टी जमली… ते माझ्या वडिलांसारखे होते… मी त्याना म्हणाले “ सर मी गणित खूप मेहनतीने शिकवते आणि मला असं वाटत असते सगळ्या मुलींना ते आलेच पाहिजे अगदी शेवटच्या मुलीला येईपर्यंत मी शिकवत राहते पट्टी हातात धरून…. पण तरीही काही मुलींना कितीही शिकवलं तरी येत नाही असं का? … ” त्यावर त्यांनी एक छान उत्तर दिलं होतं.

मला म्हणाले ” तू कधी लाह्या फोडताना पाहिल्या आहेत का? ” मी म्हणलं “हो पाहिलेत “.

“मग त्याच्यामध्ये सगळे दाणे फुटतात का? ” 

मी म्हणलं ‘ नाही ‘.

ते म्हणाले “काही दाणे पूर्ण फुटतात काही अर्धवट फुटतात आणि काही खाली गडंग राहतात – तसंच असतं विद्यार्थिनीच. आपण पहिल्यांदा शिकवतो तेव्हा काही विद्यार्थ्यांना लगेच समजतं. काही विद्यार्थीनिंना दोनदा शिकवावं लागतं. काही विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्गात गेल्यावर मग पहिलं चांगलं कळतं, आणि काहीना कितीही केलं तरी कळत नाही – ते म्हणजे हा ‘गणंग’ – मग आपल्या विषयाचा नाद सोडायचा, पण त्यांचा काही ना काहीतरी उपयोग होत असतो. ते अगदी वाया जात नाही. तेव्हा एवढा अट्टाहास तू करू नकोस “.

– – मला ते उदाहरण खूप छान पटलं. दरवर्षी लाह्या फोडताना मला त्यांची आठवण येते आणि त्यांच्याकडून मी शिकले – – काही गणंग असतात ते सोडून द्यायचे. त्यांच्या नशिबाप्रमाणे त्यांच्या आयुष्यात घडत असतं…. सर्वांनी सगळा भार आपल्यावर दिलाय असं कधी मानू नये.

शब्दांकन : सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ कुणी रद्दी देता का रद्दी…? ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “कुणी रद्दी देता का रद्दी…?☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

भिक्षेकरी म्हनून जगलो, आता काम करून 

गावकरी होयाची आलीया संधी…

नशिबानं थट्टा केली,

मानुस म्हनून जगायची केली व्हती बंदी….

आता गावकरी होयाची आलीया संधी…

कुणी रद्दी देता का रद्दी…?

पेपरापसनं ब्याग बनवतो, फिरू फिरून इकतो 

आता भीक न्हायी मागत शहरामंदी…

गावकरी होयाची आलीया संधी…

कुणी रद्दी देता का रद्दी…?

ल्येकरं रस्त्यावर टाकून सोडून गेली,

माऊली तुमी तरी नका करू गावबंदी

गावकरी होयाची आलीया संधी…

कुणी रद्दी देता का रद्दी…?

साखर होती तवा आई बाबा म्हनत मुंगळे चिकटले

साखर संपली आनी आमी पडलो उकिरड्यामंदी…

गावकरी होयाची आलीया संधी…

कुणी रद्दी देता का रद्दी…?

(“मध्यरात्रीचे सूर्य” हा भिक्षेकर्‍यांच्या पुनर्वसनासाठी सुरू केलेला प्रकल्प! इथे अंध, अपंग आणि वृद्ध आई-बाबा आणि आजी आजोबा रद्दीतील पेपर पासून बॅग बनवतात, आपण त्याची विक्री करत आहोत आणि त्यातून मिळणारा निधी हा प्रत्येक आई-बाबा आजी-आजोबांना दररोज पगार म्हणून सन्मानाने देत आहोत, माणूस म्हणून जगण्याची संधी देत आहोत) 

आपली रद्दी, रस्त्यावरील आई-बाबांना जगण्याची देणार आहे एक संधी…

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रिय लोकमान्य टिळक यांस…!!! ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

🪷 मनमंजुषेतून 🪷

☆ प्रिय लोकमान्य टिळक यांस…!!! ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

कसंय ना टिळक !

तुम्ही ‘स्वराज्य स्वराज्य’ असं म्हणत होतात. पण ते कान गोष्टीप्रमाणे ‘स्वैराचार स्वैराचार’ ऐकलं गेलं.

आता कसंय, कान गोष्टीच्या खेळात कुणालाच दोष देता येत नाही. कारण ऐकताना मानसिकता काय आहे यावर त्या शब्दाचा उच्चार ठरतो. त्यामुळे सोडून दिलं एक खेळ समजून…

फक्त तुमच्या स्मृती दिनाच्या दिवशी ‘स्वराज्य’ हा शब्द आम्हाला नीट आठवतो. आणि बरं का टिळक!

आम्ही तो व्यवस्थित उच्चारतो.  त्या शब्दाच्या उच्चाराने मनात देशप्रेमाच्या भावना निर्माण होतात…

अगदीच नाही असं नाही… पण फार तात्कालीक. दुसऱ्या दिवशी आमच्यासाठी ……

” स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि तो मी मिळवणारच ” हे लोकमान्य टिळकांनी उच्चारलेलं फक्त ऐतिहासिक विधान असतं.

टिळक ! आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण अजून स्वराज्य आलं का हा प्रश्न मला पडतो. निदान माझ्या पिढीला तरी. कारण स्वातंत्र्यानंतर पुष्कळ वर्षांनी आम्ही जन्माला आलो. पण आजही आपली भाषा, आपली संस्कृती, आपले आचारविचार, या सगळ्यावरती येणाऱ्या मर्यादा बघितल्या, त्या सगळ्याचं

संकुचीकरण होताना बघितलं  की  वाटतं नक्की काय मिळवलं आपण??? “ स्वातंत्र्य “ मिळवून?

फक्त भौगोलिकदृष्ट्या आपला प्रदेश स्वतंत्र झाला. आणि राजकीयदृष्ट्या आपली माणसं सत्तेवर आली.

पण या पलीकडे स्वराज्य कुठे आहे? …. भाषेवरून वाद होत आहेत. प्रांतावरून वाद होत आहेत. सीमावाद बोकाळला आहे‌. जातीभेद, धार्मिक द्वेष याबाबतीत तर बोलायलाच नको…. त्याबाबतीत उघडपणे बोलण्याचं स्वातंत्र्यसुद्धा गमावलंय. आता …

आता … भ्रष्टाचार हा शिष्टाचार आहे. तुम्हाला सांगते टिळक तुम्ही शिक्षक होतात ना. तर या व्यवस्थेनं शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पार खेळखंडोबा करून टाकलाय.

आता काही साधं राहिलं नाही बरं का , आता सगळं ‘महा’ झालंय, आणि आता फक्त पाट्यांमध्येच, नावांमध्ये  ‘अखिल भारतीय’ हे शब्द दिसतात.  कृतीमधला भारत तर गल्लीनुसार वेगळा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्हा क्रांतीकारकांना, देशभक्तांनासुद्धा सोडलं नाही इथल्या लोकांनी. त्यांच्या चुकांचे ताशेरे ओढण्यात अग्रगणी आहेत मंडळी.

टिळक!  आता अग्रलेखाचे महत्त्व नाही,  तर ‘ब्रेकिंग न्यूजचे’ महत्त्व आहे. अखंडितपणा केव्हाच संपला आहे अगदी बातम्यातूनसुद्धा ! तेव्हा तुम्ही अखंड असावं म्हणून धडपडलात आणि आता…

आता सतत तोडण्यामोडण्याच्या गोष्टी घडतात…माणसं म्हणू नका, वस्तू म्हणू नका , राजकीय पक्ष, नीती , नियम, मूल्य, म्हणू नका किंवा अजूनही काही जे असेल ते …. तोडणं आणि मोडणं हे नेहमीच झालंय ! ‘ब्रेकिंग’ न्यूजचा जमानाय ना!

तुम्ही लोकांनी ज्या भारताबद्दल इतकी स्वप्नं पाहिली, ती स्वप्नं तुमच्याखेरीज कुणाच्या लक्षात तरी आहेत का हाच प्रश्न आहे. …

…. त्यामुळे तुम्हा लोकांना एक नम्र विनंती आहे. …

…. एक तर परत भारतात जन्म घेऊ नका. आणि समजा घेतलात ना, तर आधीसारखे येऊ नका.

… म्हणजे ते तत्त्वनिष्ठ,

… उच्च विचारसरणी असणारे

… साधी राहणी असणारे

… सामाजिक कळवळा असणारे

… दया, सहानुभूती असणारे

… विचार आणि विवेक शाबूत असणारे

अंहं …

अंहं ….

यातलं काही म्हणजे काहीही घेऊन येऊ नका.

अहो का म्हणजे काय? तुम्हाला परग्रहवासी ठरवतील इथली लोकं !

यायचं झालं ना तर तुम्हाला वेश बदलून, भाषा बदलून, आणि विचार बदलून ,यावं लागेल

…. निदान तसं दाखवावं लागेल.

भाषा तर इंग्लिशच वापरा ! काय आहे, आपल्या स्वतंत्र भारतात कोणी इंग्लिशमध्ये बोललं ना की ते खरं वाटतं.  त्याला ‘व्हॅल्यू’ येते आणि अर्थातच ते फेमस होतं… मगच लोक त्यालाच फॉलो करतात.

बरं का टिळक ! आता पूर्वीसारखं काही राहिलं नाही. तुम्हाला सांगते .. आता फॉलोवर्सचा जमाना आहे.

काम करणाऱ्यांचा नाही.

आणि सगळ्यात महत्त्वाचं… पहिले ए आय शिका.

अहो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ! तो न येणारा माणूस इथून पुढच्या भारतात आणि जगातही जगू शकणार नाही. आता इथे सगळं ऑनलाईन होतं, त्याचे पासवर्ड असतात.

तुम्हाला देशामध्ये बदल घडवायचे असतील तर …

तर तुम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप, ट्विटर, हॅशटॅग असं सगळं शिकावं लागेल. रिल्स बनवावे लागतील….. तेव्हा कुठे तुम्हाला लोक ऐकतील, पाहतील, लाईक करतील, कमेंट करतील…

पण लोक स्वतः काही करतील याबाबत मात्र मी काही सांगू शकत नाही.

आणि हो ..  ही शेवटची गोष्ट सांगून मी इथे थांबते.  कारण त्या नंतर सांगण्यासारखं काहीच उरत नाही.

…. इथून पुढे काहीही झालं तरी चुकूनही ‘ परदेशी वस्तूवर बहिष्कार ’ टाकण्याची भाषा करू नका.

नाहीतर आपण आपलं रोजचं जगणंसुद्धा जगू शकणार नाही. इतके आपण त्यावर अवलंबून आहोत.

त्यामुळे नक्की कुठल्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही लढलात?? … हा आता परत एकदा विचार करा.

आणि मगच पुन्हा भारतात यायचं की नाही याचा निर्णय घ्या.

– – –  तोपर्यंत आम्हाला शक्य आहे, आमची स्मृति आहे, तोपर्यंत दर एक ऑगस्टला आम्ही तुम्हाला अभिवादन करूच…

….. पुढचं मात्र काही माहीत नाही.

© तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ “पाखरं उडून गेल्यानंतरचा रिकामा आशियाना…” – लेखिका : सुश्री लीना पांढरे ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ “पाखरं उडून गेल्यानंतरचा रिकामा आशियाना…” – लेखिका : सुश्री लीना पांढरे ☆ सुश्री प्रभा हर्षे 

मी जेथे राहते त्या वसाहतीत घरटी मूलं साता समुद्रापल्याड शिकण्यासाठी वा नोकरीसाठी कायमची उडून गेलेली आहेत आणि घरटी रिकामी झालेली आहेत.

माझ्या शेजारणीच्या दिवाणखान्यात दोन घड्याळं लावलेली आहेत. एक घड्याळ भारतातील वेळ दाखवते तर दुसऱ्या घड्याळात तिचा मुलगा टोरांटो येथे आहे तेथील वेळ दाखवलेली असते. ती फक्त शरीराने भारतात आहे आणि मनाने टोरांटोमधील तिच्या मुलाच्या घरात.. मुलगा आणि सून कामाला गेले असतील मग त्यांचं बाळ म्हणजे हिचा नातू ; त्याला पाळणा घरात पोहोचवला असेल. तेथील असुरक्षित वातावरण, गुंडागर्दी कर्जाचे हप्ते भरताना पोरांची होणारी दमछाक.. काळजी काळजी आणि काळजी. या माझ्या शेजारणीच्या बोलण्यामध्ये फक्त तेवढाच विषय असतो आणि मोबाईल मध्ये सगळे तिकडच्या देशातील मुलाच्या घराचे फोटो.

माझी एक अत्यंत सुज्ञ मैत्रीण आहे. तिच्या दोन्ही लेकी अमेरिकेमध्ये कायमच्या स्थायिक झालेल्या आहेत. ही वर्षातून एकदा अमेरिकेला जाते आणि त्या दोघी पण वर्षातून एकदा भारतात तिला भेटायला येतात. कायमचं परदेशात जाऊन राहणं आणि तिथलं घरामध्ये बंद करून टाकणारं पूर्ण वेगळं आयुष्य घालवणे अनेक पालकांना जमत नाही आणि ते इथेच राहणं पसंत करतात.

आयुष्यभर आपण स्वतंत्रपणे राहिलेलो आहोत तसंच राहावं आणि मुलांना पण राहू द्यावं त्यांच्या संसारात जाऊन लुडबुड करू नये अडीअडचणीला त्यांच्या पाठीशी जरूर उभं रहावं पण त्यांची गरज संपल्यावर शांतपणे माघारी यावं हा सुजाणपणा माझ्या मैत्रिणीमध्ये आहे. पाच-सहा वर्षांपूर्वीच तिचा जोडीदार वारला. तिचा आलिशान बंगला, बगीचा यामध्ये ती एकटीच मागे उरली. पण आउटहाउस मध्ये असणाऱ्या तिच्या जुन्या मोलकरणीच्या कुटुंबाच्या मदतीने ती आनंदाने आणि धीराने राहते आहे. मुख्य म्हणजे तिच्यामध्ये एक कण सुद्धा कडवटपणा नाही.

पंख फुटल्यावर पाखरं उडून जाणारचं. आपल्याला वात्सल्याची आच होती म्हणून आपण मुलं जन्माला घातली. मुलांनी आपल्याला वेळ दिलाच पाहिजे फोन केलेच पाहिजेत रोज उठून आई-वडिलांप्रती कृतज्ञता आणि आभार दर्शवणारी भाषणं ठोकलीच पाहिजे अशा अपेक्षा आपण मुलांकडून करू नये हेच योग्य. मुख्य म्हणजे आपल्या मुलांची निर्भत्सना आणि इतरांची मुलं श्रावण बाळं अशी तुलना न करता प्राप्त परिस्थिती आनंदाने स्विकारावी.

पुण्यामध्ये माझे काका राहत होते. ९५ वर्षाचे होऊन ते नुकतेच वारले. त्यांना कॅन्सर झाला होता आणि त्यानंतरही ते तब्बल पंधरा वर्ष आनंदाने जगले. त्यांची पत्नी माझी काकी सात-आठ वर्षांपूर्वी त्यांच्या आधीच वारली. त्यांचा मुलगा आणि मुलगी दोघेही अमेरिकेमध्ये कायमचे स्थायिक झालेले आहेत. पण त्यांच्या आर्थिक मदतीमुळे आणि यांनी साठवलेल्या शिलकीमुळे शेवटपर्यंत काका त्यांच्या बंगल्यात आनंदाने राहू शकले.

आमचा एक मित्र आहे तो मजेत म्हणतो की आता म्हातारपणी मला शेवटच्या क्षणापर्यंत सोबत करणारे दोन सोबती मिळाले आहेत एक आहे बीपी आणि दुसरा डायबिटीस.. आजारपण आल्यावर निदान उपचार करायला आपल्याकडे पैसे आहेत ही सकारात्मक गोष्ट अनेक आर्थिक सुबत्तेमध्ये राहणार्‍या वृद्धांना जाणवत सुद्धा नाही हे दुर्दैव.

अगदी सुकून खारीक झालेली एक म्हातारी रोज शेळ्या राखत भर दुपारच्या टळटळीत उन्हात माझ्या दारावरून जायची. मी दारात लावलेल्या झाडांच्या सावलीत घटकाभर बसायची. मी तिला माठातून तांब्याभर थंड पाणी नेऊन द्यायचे. एसी मध्ये आपले मांजर कुरवाळतं नेहमीप्रमाणे मन रमवायला आता कुठल्या देशात फिरायला जायचे याचे प्लॅनिंग करणारी माझी आई त्या म्हातारीवर फार चिडायची.

“आपल्याच घरासमोरच्या दारात का बसते ही बया? तू कॉलेजमधून दमून आल्यावर लगेच तिला का पाणी नेऊन देतेस? तिचा आता अगदी वहिवाटीचा हक्क झाला आहे. ” अशी बडबड करायची. ग्रामीण साहित्य आणि दलित साहित्य यावरती पुस्तकं खरडणं आणि व्याख्यानं देणं हे बहुदा आई आपल्या शिरपेचामध्ये अजून एक रंगीत रेशमी पीस खोवून ऐट करण्यासाठी करत असावी. आर्थिक सुबत्ता, वैद्यकीय उपचार सारं काही असूनही कॅन्सर आणि करोनाने आई या जगातून निघून गेली. तिची मांजरी अजूनही आहे.. अजूनही शेळ्या राखत ती म्हातारी झाडाखाली रोज येऊन बसते. तुजी ती वरडणारी माय कुटं ग्येली? असं मला पुसते.

पोरांना उंटाच्या पाठीवरून फिरवणारा उंटवाला अजूनही दारात येतो. हाक घालून दूर देशी असणाऱ्या माझ्या लेकरांचं कुशल पुसतो, बुड्ढे की बालवाला, आईस्क्रीमवाला, चॉकलेट देणारा कोपऱ्यावरचा किराणा दुकानदार सारे जण जाता येता पोरांबद्दल विचारत राहतात. माझ्या स्वयंपाकाच्या मावशीला माझ्या धाकट्याशी बोलायची हुक्की येते मग मी त्यांना व्हिडिओ कॉल करून धाकट्याला जोडून देते. “आता कधी येशील रे घरी? “असं मावशी त्याला विचारत राहतात. लेकरांवाचून घर किती सूनं सूनं वाटतं असं मला सांगतात.

अशा वेळेस मला पहेलगामच्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मारला गेलेल्या गरीब सैयद आदिल हुसैनची आई डोळ्यासमोर दिसते. ‘आमच्या कुटुंबाचा एकमेव आधार रोटी कमावून आणणारा गेला आता आम्ही काय करायचं? ‘

हा सवाल ती माऊली करत असते.

गरीबीमुळे खेड्यापाड्यातून पोट भरण्यासाठी सैन्यात भरती झालेल्या आणि शहीद झालेल्या असंख्य तरुणांचे वृद्ध थकलेले आईबाप, शहीद झालेल्या सैनिकांच्या तरुण बायका, लहान लेकरं टीव्हीच्या स्क्रीनवर दिसत रहातात. मग आपण आपल्या टीचभर दुःखाचा किती कांगावा करावा बरं!

लेखिका-  सुश्री लीना पांढरे

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares