मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”फक्त समजून घेता यायला हवं…” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “फक्त समजून घेता यायला हवं… ☆ संध्या बेडेकर ☆

Life is a balance of holding on and letting go

आपण नेहमी ऐकतो वाचतो की वर्तमान काळात जगावं. भूतकाळ म्हणजे जे घडायचे होत ते घडून गेलं. चांगलं वाईट, नमकीन खटठा मीठा सर्व स्वाद चाखायला मिळाले. तरी भूतकाळ अगदी भूतासारखा मागे लागलेलाच असतो. त्याला कितीदा सांगितलं अरे बाबा!!

“Pl do not knock at my door, I do not have anything new to tell you. ”

सर्व माहित असून सुद्धा पुन्हा पुन्हा त्रास द्यायला मागेच असतो.

मी आता तुला (भूतकाळ) मागे सोडलय.

हे नक्की की भूतकाळात घडलेल्या घटना, आपण घेतलेले निर्णय, माणसांचे खरे चेहरे, यावरून मी खूप शिकले आणि आता बऱ्यापैकी हुशार झाले आहे.

Life is a balance of holding on and letting go.

आयुष्यात खूप अनुभव आले. खूपदा हेच कळत नाही की सरळ उभ रहाव की थोडं तिरकच , कारण तिरक ऊभ राहिल्याशिवाय काही लोक सरळ उभे रहात नाही. हे कळलय. कधी कधी आपले मत मांडणे ही गरजेचे असते. नाही तर भोवऱ्यात अडकायला होत.

आयुष्याच्या परीक्षेपेक्षा शाळेची परीक्षा सोपी होती.

तेंव्हा एक सिलेबस तरी असायचा.

आपण कोणत्या वर्गात आहोत. हे माहीत असायचे. परीक्षा झाली की पास की फेल हेही कळायचे.

म्हणजे असं म्हणावस वाटतं

शाळेतला अभ्यासाचा आयुष्यात तसा काही फारसा उपयोग होत नाहीं. तो अभ्यास फक्त डिग्री मिळविण्यापूरताच असतो. मी पदवीधर आहे. हे जगाला सांगायला. बाकी अभ्यासाची हुशारी आयुष्यात उपयोगात येत नाही. कारण येथे कोणताही एक नियम नसतो जो Universal नियम म्हणता येईल. येथे परिस्थीती प्रमाणे नियम बदलतात. येथे चेहरा बघून, गरजेप्रमाणे लोक बदलतात म्हणून नियमही बदलतात..

“एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही, जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते. ”

पायथागोरस चे प्रमेय किंवा न्युटन चे नियम काही आयुष्यात लागू पडत नाहीत.

आता आपण नेहमी चांगल वागावं हा आयुष्यातील एक नियम आहे,

न्युटनच्या नियमाप्रमाणे

Every action has equal and opposite reaction.

पण त्या नुसार तसं काही आयुष्यात घडत नाही. चांगल्या वागण्याचे परिणाम नेहमीच चांगले मिळतात असं नाही. चांगल्या वागण्याने लोक बुद्धू समजतात. They take you for granted. म्हणजे खूप दा तर असं वाटतं

आपल status Fill in the Blank सारखं आहे. म्हणजे,

वेळ आल्यावर/ गरज पडल्यावर लोक जसं कावळ्याला ही मानाने बोलावतात ना तसंच काहीसं वाटतं.

म्हणजे असं म्हणावस वाटतं,

जिंदगी इन लोगों के नखरों से बेहतर तो स्कूल की किताबें थी, जो देर से ही सही लेकिन समझ में तो आ जाती थी।

येथे माणसं समजतच नाहीत.

चांगुलपणा असण चांगलंच आहे. पण त्या बरोबर तितकच सजग सावध डोळसही असायला हवे.

आता वयानुसार, अनुभवावरून बऱ्याच गोष्टी समजायला लागल्या.

कोणी आपल्याला सोडून जातंय तर जाऊ दे. का?? कशाला? काय झालं?? वगैरे विचारायच नाही. त्यात वेळ घालवायचा नाही.

हे असं वागणं म्हणजे माझा घमंड, गुरूर नाही, मी सर्वांना आवडली पाहिजे असा माझा हट्टही नाही. कधी नव्हताच.

People pleasing च्या चक्रात फसायचंच नाही.

What people think about me is not important for me, What I think about myself means a lot for me.

लोक असं का वागतात? याच दुःख आता मला होत नाही. फक्त वाईट याच वाटतं हे सर्व समजेपर्यंत माझं अर्ध्याहून अधिक आयुष्य संपल. याच दुःख जास्त होतंय.

आता वयानुसार विचारांची range वाढली. एकाच ठिकाणी पोहचण्याचे अनेक मार्ग असतात, त्याचप्रमाणे एकाच गोष्टीला बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात. हे कळलय.

सर्वांबरोबर आपले विचार जुळणे शक्यच नाही. बेमेल विचारांना ही समजून घेता आले पाहिजे. हे कळलय.

खरी परिस्थिती ही आहे की

जब तक जिंदगी के रास्ते समझे में आते हैं तब तक लौटने का वक्त हो जाता हैं ।

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “भिकारी…???” – भाग १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ भिकारी…???” – भाग १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

भिकारी…???

अं… हं……. भिक्षेकरी किंवा याचक म्हणूया हवं तर…..!

समाजात मात्र भिकारी हाच शब्द प्रचलित आहे…….

कोण असतो हा भिकारी…..?

सध्या आंब्याचा सिझन चालू आहे, लोक आंबे आणतात, तो कापून खातात किंवा आमरस करतात…….

परंतु त्याची कोय जी असते तीला मात्र कोणी जपून ठेवत नाही, एका क्षणामध्ये या कोयीला डस्टबिन मध्ये टाकलं जातं…….!

 

– – – काही माणसं अशीच गोड असतात आंब्यासारखी, हा *गोडवा* असतो दरमहा मिळणाऱ्या पगाराचा / पेन्शनचा, प्रॉपर्टीचा किंवा सोन्या नाण्याचा, FD चा किंवा आणखी कशाचाही…….!

मग हा गोडवा त्यांच्याच घरातले लोक चाटून-पुसून खातात किंवा खरवडून खरवडून गर काढून त्यांचा आमरस करतात…….

एकदा का हा *”गोडवा”* संपला की, मग पुन्हा उरते ती कोयच…….!

आता गोडवा नसलेल्या या कोयीचा काय उपयोग…….?

गोडवा संपल्यानंतर या कोयीना सुद्धा डस्टबिन, म्हणजेच उकिरड्यात फेकलं जातं…….!

 

मी लहान असताना खेड्यात “कोयनापानी” नावाचा खेळ खेळायचो…….

यात एका कोयीला दुसऱ्या कोयीने नेम धरून  उडवायचे……. या कोयी जिंकायच्या……. ज्याच्याजवळ जास्त कोयी त्याला सर्वात श्रीमंत समजले जाई…..!

ज्याच्याजवळ जास्त कोयी, तो स्वतःला अलेक्झांडर समजून चालत असे, आणि आम्ही त्याच्याकडे आदर युक्त भीतीने नम्रतेने पाहत असु…….!

 

जे खेड्यातील असतील त्यांना हा खेळ नक्की आठवेल…..!

– – कोयनापानी खेळून, कोयी जमवून श्रीमंत होणे हा खेळ आता कधीच संपला आहे, या गर आणि गोडवा नसलेल्या *कोयी* घरात ठेवणे आता कोणाला परवडणार आहे???

आई बापाला घरात ठेवण्याचा “डाव” सुद्धा आता संपला आहे…..!

 

आज अशा रस गर आणि गोडवा संपलेल्या कोयी घरातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात पडून असतात, थेरडी, म्हातारी, मरायला टेकलेलं म्हातारं, रिटायर्ड झालेला बिनकामाचा बाप किंवा आजारपणात अडकलेली, लवकर मरत पण नसणारी म्हातारी आई……. अशी या कोयीना नावं आहेत…….!

कधीतरी सुंदर आंबा असणाऱ्या, या कोयी आता घरातल्या जागा अडवून ठेवतात, खाटा अडवून ठेवतात, खातात चारच घास परंतु स्वयंपाक करावा तर लागतोच ना…….?

‘यांची फालतूची आजारपणं काढायची का पोरांच्या शाळेचं बघायचं…….? यांच्यामुळे सगळं महिन्याचं गणित बिघडतं…….! ‘ 

“मरत पण नाहीत मेली लवकर”, “खायला कार भुईला भार’

……. हे शब्द ऐकून त्या कोयी आणखी कोमेजून जातात…..!

डोक्यावर घेतलेली फाटकी चादर किंवा पदर भिजून जातो, बघायला कोणाला वेळ असतो…….?

चादर किंवा तो पदर हेच या मूक अश्रूंचे “माफीचे साक्षीदार”…….!

कारण आई बाप कधी कोणाला शिक्षा करतात का?

त्यांनी मुलांना माफ केलेलं असतं…….!

– – किती दिवस सांभाळायचं अशा या कोयीना? म्हणत मुलं, सुना, नातवंडं यांचा बांध फुटतो आणि  वैतागून, घरातले हेच लोक या “कोयी”……. रस्त्यावरच्या उकिरड्यात फेकून देतात.

 

कसं सांगू…..???  

सूर्य मावळल्यावर नाही, “बाप विझला” की आयुष्यात अंधार होतो…..!

 

आई गेली की आईचा नाही, “बाळा” या कानावर येणाऱ्या गोड शब्दाचा, कायमचा  “अंत्यविधी” होतो…..

आई कुठेच कधी जात नाही….. जातो तो “हा शब्द”…!!!

घरातल्या या कोयी फेकणाऱ्या मित्रानो आणि अगं ताई…..

इथून पुढच्या आयुष्यात जखमांनी जेव्हा जीव जाईल थकून……… तेव्हा मायेच्या ओलाव्याने आता कोण सांग, हळद लावेल फुकून…….????

 

आणि हो……. आता पावसाळा सुरू होईल, दारं नीट लागणार नाहीत……. ती फुगून बसतील, तेव्हा मित्रा आणि अगं ताई पावसाला दोष देऊ नकोस…….

कदाचित तुमच्या आई बापाचे, सासू सासऱ्यांचे पाय उंबऱ्यात अजूनही अडकून बसले असतील, तुमच्याच आठवणीत……. म्हणून दारं नीट लागत नाहीत…….!

कसं सांगू तुम्हाला…….????

तरीही या कोयी फेकल्या जातात उकिरड्यावर…….

 

अंगात त्राण नाही, या वयात कुठलंही काम करायचे बळ नाही, हातात डिग्र्या घेऊन कितीतरी तरुण बेरोजगार म्हणून भटकत आहेत, अशावेळी या म्हाताऱ्या माणसांना काम कोण देणार…..?

……. इथून खेळ सुरू होतो जगण्याचा…..

जगण्यासाठी नाईलाजाने भीक मागण्याचा…….!

आता या कोयीना नवीन नाव आपण देतो… भिकारी…!

 

मी आणि मनीषा मग या उकिरड्यात पडलेल्या कोयी उचलतो, त्यांना साफ करतो, आणि मायेचं पाणी घालतो, एक छोटासा खड्डा खणून त्यात यांना पुन्हा रुजवतो, थोडं खत घालतो आणि पुन्हा त्यांच्यापासून एखादं हापूसचं आंब्याचं झाड तयार करण्याचा प्रयत्न करतो….!

– – – आमच्या भाषेत आम्ही याला पुनर्वसन म्हणत होतो…!

 

(आम्ही पुनर्वसन त्यांचेच करतो, ज्यांना भीक मागायची नाही, सन्मानाने जगायचे आहे, जे घरातून बाहेर फेकले गेले आहेत, किंवा ज्यांना कोणाचाही आधार नाही आणि यांना भीक मागण्याशिवाय पर्याय सुद्धा नाही.)

काम नको म्हणून ज्यांनी भिकेचा धंदा केला आहे, असे धंदेवाईक भीक मागणारे, भिकेच्या दलदलीतून बाहेर येण्याची इच्छाच नाही असे, यांनी यातून बाहेर यावे यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत, परंतु जोपर्यंत समाज, पुण्य मिळेल या भावनेने  यांना “दान” समजून “भीक” देत आहे, तोपर्यंत धंदेवाईक लोक यातून बाहेर येणार नाहीत, हे सुद्धा एक कटू सत्य आहे…..! )

 

मी दरवेळी सर्वांना सांगतो, कोणालाही “भीक” देऊ नका, “दा” म्हणून त्याला “मदत” करा…..!

 भीक आणि मदत मध्ये फरक आहे…..

“भीक” म्हणजे आपली कोणतीही कृती, ज्यामुळे समोरची व्यक्ती आपल्यावर किंवा दुसऱ्यावर पुन्हा अवलंबून राहणार आहे, परावलंबी होणार आहे…….

आणि “मदत” म्हणजे आपली कोणतीही कृती, ज्यामुळे समोरची व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल किंवा कोणावरही अवलंबून राहणार नाही, स्वावलंबी होणार आहे…!

एखाद्याला सन्मानाने जगण्यासाठी, खड्ड्यातून बाहेर येण्यास “मदत” करूया…….!

एखाद्याला “भीक” देऊन, त्याला परावलंबी करून पुन्हा खड्ड्यात नको ढकलुया…..!!

 

असो, मला अपेक्षित असलेल्या गोष्टी साध्य करण्यासाठी हरतऱ्हेने आपण “मदत” करत आहात आणि म्हणून हा लेखाजोखा आपणास सविनय सादर…….!

विषय आंब्यापासून सुरू झालाय, तर आंब्यापासूनच सुरुवात करतो.

अन्नदान….. नव्हे क्षुधाशांती आणि तृषाशांती

  1. रस्त्यावरील आमच्या या लोकांना आंबे खायला कधी मिळत नाहीत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वृद्ध आणि बाल बच्चे यांना हापूसचे आंबे खायला दिले आहेत.
  2. रस्त्यावर अन्नावाचून रस्त्याकडेला पडून असणारे वृद्ध आणि आजारी लोक तथा वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणारे अत्यंत गरीब लोक यांना दररोज संपूर्ण जेवण दिले आहे.

अन्नदान म्हणण्यापेक्षा “क्षुधाशांती” हा शब्द जास्त योग्य वाटतो. दान देण्याइतपत मी अजून श्रीमंत झालो नाही, जे काही दिलं, ते आपण… ती आपल्या मनाची श्रीमंती होती…!

  1. तीव्र उन्हाळ्यात एकतर अंगाची लाही लाही होत असताना त्यात पाण्याची कमतरता, अशावेळी रस्त्यावरील वृद्धांना आणि लहान मुलांना पॅक केलेल्या पाण्याच्या बाटल्या दिल्या आहेत.

याच सोबत शरीरातील कमी झालेले पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स (क्षार) भरून काढण्यासाठी “ओरल रिहायड्रेशन सोल्युशन (ORS)” संपूर्ण उन्हाळ्यात आपण दिले आहे.

  1. खराटा पलटण – (Community Cleanliness Team)- 

पूर्वी भीक मागणाऱ्या आज्या आणि मावश्या यांची एक टीम तयार केली आहे, या टीम मार्फत परिसरातील स्वच्छता करून घेत आहोत. स्वच्छता केल्यानंतर ज्यांच्याकडे स्वयंपाक करण्याचे काही साधन आहे अशांना  7 किलो साखर तथा महिनाभर पुरेल इतका कोरडा शिधा / किराणा / राशन दिले आहे.

– – मागितलेली भीक हि लाचारीने मिळते, पण आपण केलेल्या कष्टाचा मोबदला सन्मानाने मिळतोय… तोही भरपूर प्रमाणात, हा विचार त्यांच्यात रुजावा हि यामागे भावना आहे.

हातात नको भिकेची वाटी… चल हातात घेऊ पेन्सिल आणि पाटी”… अर्थात शैक्षणिक मदत…! 

भीक मागणाऱ्या लोकांचे संपूर्ण पुनर्वसन करताना, मुलांची भीक थांबवणे हा एक फार मोठा चॅलेंज आहे.

एक तर भरपूर खायला – प्यायला आणि पैसे मिळत असल्यामुळे मुलांना शाळेत जायची इच्छाच होत नाही आणि मुलांकडून दररोज भिकेतील पैसे पालकांना मिळतात यासाठी  पालकांना मुलांनी शाळेत जावे असे वाटतच नाही.

– – परंतु गेल्या अकरा वर्षाच्या त्यांच्याबरोबर झालेल्या एका चांगल्या रिलेशनशिप मुळे आपण भिक्षेकर्‍यांच्या अनेक मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणले आहे.

यात नर्सरीपासून ते बीबीए / एमबीए पर्यंतची मुले आहेत, हे सांगायला अभिमान वाटतो.

आपण या सर्व मुलांना गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक मदत करत आहोत.

यात शाळा कॉलेजच्या फी, वह्या, पुस्तके, गाईड, युनिफॉर्म शाळेचे दप्तर, बूट सॉक्स, काही वेळा प्रायव्हेट ट्युशन इत्यादीचा अंतर्भाव असतो.

यावर्षी दरवर्षी पेक्षा जास्त मुलं आणि भिक्षेकरी पालक यांच्याकडून आम्हाला सुद्धा शैक्षणिक मदत करा, म्हणून विचारणा झाली.

खरं तर माझ्यासाठी ही अत्यंत आनंदाची, जमेची आणि सकारात्मक बाजू आहे!!!

भीक मागणाऱ्या पालकांची, नवीन पिढी शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली, तर हळूहळू का होईना, परंतु भीक मागणाऱ्या समाजाची संख्या आपोआप कमी होत जाईल.

दरवर्षाचे जून जुलै ऑगस्ट हे तीन महिने आमचे प्रचंड शैक्षणिक खर्चाचे असतात.

यावर्षी जून महिन्यात जे करायचे ठरवले होते, त्याहीपेक्षा जास्त मुलांना आपल्यामुळे मदत करता आली.

ओळख – देख नसणाऱ्या या मुलांच्या भविष्यासाठी आपण आपल्या घासातला घास काढून दिलात, ऋण व्यक्त करायला खरोखर माझ्याकडे शब्द नाहीत.

नुकताच अकरावी कॉमर्स ला गेलेला एक मुलगा, मला आत्तापासूनच टॅलीचे क्लास लावून द्या म्हणून हट्ट धरून बसला.

– – टॅली (Tally) हे एक (गणितातील) अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे. जमा-खर्च, हिशोब, बिले, कर अशा व्यवहारांची नोंद ठेवण्यासाठी याचा प्रामुख्याने वापर केला जातो. या क्षेत्रातील नोकरी मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेले हे सॉफ्टवेअर.

– – आत्ता आत्तापर्यंत आईचा पदर धरून भिकेतले मिळालेले पैसे वाटून घेण्याचा “हट्ट” धरणारा ‘तो” आणि आता टॅलीचे क्लास लावा म्हणून “हट्ट” धरणारा “हा”…!

 एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत झालेला हा अचंबित करणारा बदल ज्याच्या समोर झाला आहे, त्या कुणाच्याही डोळ्यात, हा बदल पाहून नक्की पाणी येईल… मी तरी काय वेगळा…?

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तृषार्त… ☆ सुश्री सुरेखा चिखलकर ☆

सुश्री सुरेखा चिखलकर

? मनमंजुषेतून ?

☆ तृषार्त… ☆ सुश्री सुरेखा चिखलकर

आयुष्याच्या काठावर उभे राहून,

रित्या लाटांकडे पाहत…

एक विरागी भावना घेऊन,

एकांत आणि शुष्क होऊन जगत,

मी अंतरातल्या वादळांना कवटाळत 

जोडत राहिले स्वतःची नाळ

या निशब्द झालेल्या जगाशी आणि मनाशीही,

अंतर्मनातील नात्यांना रिते करत,

एकटेपणाचा दुष्काळ उरात घेऊन,

उंबरठ्यावर अडकलेल्या आशेला विसावून…

निशब्दाच्या कुशीत समांतर,

प्रवास करावा म्हणते आता

अनंताचा… अनंताकडे,

आठवणींच्या खुणा अंगभर कोरून,

रुजून जावे मातीच्या त्या कणाकणात,

आणि प्रत्येकाच्या मनामनात…

कायमचे, अनंतकाळ…

 © सुरेखा चिखलकर

 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माझी वारी ! माझा अनुभव !”- लेख क्र. २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

??

माझी वारी ! माझा अनुभव ! – लेख क्र. २ ☆ श्री संभाजी बबन गायके 

वारकरी भिकारी नव्हेत… भिकारी वारकरी नव्हेत!

होईन भिकारी । पंढरीचा वारकरी ॥१॥

हाचि माझा नेम धर्म । मुखी विठोबाचें नाम ॥ध्रु. ॥

हेचि माझी उपासना । लागेन संतांच्या चरणा ॥२॥

तुका म्हणे देवा । हेचि माझी भोळी सेवा ॥३॥

माझे निगडी प्राधिकरण येथील मित्रस्नेही जयंत गोपीनाथ नित्सुरे यांच्या घरी दर महिन्याच्या एका विशिष्ट तिथीला एक वृद्ध वारकरी रात्रीच्या मुक्कामास येत असत. बाहेरच्या खोलीतील कोप-यात त्यांचा प्लास्टिकचा कागद अंथरून बसत. एक वेळच्या भुकेला पुरेल एवढेच अन्न घेत. आणि अंगावर एक धोतर पांघरून निजून जात. अगदी पहाटे उठून थंड पाण्याने स्नान करून, धोतर वाळायला घालून नित्यनेमासाठी बसत. मुखाने हरीनाम घेत कपाळी गंध रेखीत. छोट्या लोखंडी पत्र्याच्या पेटीत त्यांचा सारा सरंजाम असे. केवळ एक कप चहा घेत आणि त्यांच्या मार्गाला निघून जात. कधी घरातल्या गोष्टींत लक्ष नाही की मध्ये बोलणे नाही. दूर कुठल्याशा गावातून येत असत. जयंत यांच्या वडिलांपासून या वारकरी बाबांचा हा नेम कित्येक वर्षे सुरु होता……. आणि एका महिन्याच्या त्या तिथीला बाबा आले नाहीत….. आणि पुढेही कधी आले नाहीत! मग त्यांनी सांगितलेली गोष्ट आठवली!

वारकरी वर्षातून चार वा-या करतात हे अनेकांना ठाऊक नसेल….. चैत्री, आषाढी, कार्तिकी आणि माघी! आणि काही वारकरी दर महिना! होय. दर महिना! देहू-आळंदी ते पंढरपूर चालत जायला बारा दिवस. पंढरीत दशमीला पोहोचून एकादशीचे दर्शन आणि द्वादशीला भल्या सकाळी बारस सोडून त्र्ययोदशीला आळंदीकडे प्रस्थान….. असा हा क्रम असे. अर्थात हा अवघड मार्ग अनुसरणारी मंडळी मोजकीच असतात, यात नवल नाही!

या नेमाच्या वारक-यांची अर्थातच एकमेकांशी ओळख असे. एखादे द्वादशीस त्या नेहमी येणा-या वारक-यांपैकी कुणी अनुपस्थित असेल, तर उरलेले वारकरी त्याचे चंद्रभागा तीरावर पिंडदान करीत…………. कारण तो वारकरी वारीस न येण्याचे एकमेव कारण असू शकते ते म्हणजे त्याचा मृत्यू! आणि ज्या अर्थी तो वारकरी वारीस आलेला नाही त्याअर्थी त्याचा मृत्यूच झालेला असला पाहिजे….. अन्य कोणतेही कारण त्याला वारीळा येण्यापासून रोखू शकत नाही, असा विश्वास असे. म्हणून त्याला श्रद्धांजली म्हणून त्याचे पिंडदान! हे अत्यंत अभावाने घडत असले, खरे वाटत नसले, अतिशयोक्तीचे वाटत असले तरी अशी वारकरी मंडळी या संप्रदायाने अनुभवलेली आहेत….. हे नाकारता यायचे नाही! वर उल्लेख केलेले वारकरी बाबा पुन्हा आले नाहीत याचा तोच अर्थ होता!

पूर्वी पायी प्रवास होई. कालांतराने झालेल्या सुविधा आणि वाढते वय यांमुळे काही वारकरी एस. टी. , रेल्वेनेही प्रवास करू लागले होते. याही काळात असे काही नेमाचे वारकरी निश्चित आहेत पण अर्थात संख्या कमी झालेली असेल, इतकंच!

काही लोकांनी संसारातून निवृत्त झाल्याने तर काहींनी त्यांच्या वैय्यक्तिक कारणांनी, धार्मिक श्रद्धेपोटी हा मार्ग स्वीकारलेला असू शकतो. काही जण घराण्याची परंपराही सुरु ठेवतात. असो.

पायी प्रवास, वाहनांचा प्रवास, वाटेतील अनुषंगिक खर्च यासाठी अनेक लोक स्वखुशीने या वारक-यांना आर्थिक साहाय्य करतात. आणि यांनीही केवळ गरजेपुरतेच अन्न, धन स्वीकारावे असे अपेक्षित असते. काही वारक-यांनी प्रत्येक गावातील विशिष्ट घरे नेमून घेतलेली असतात आणि हा क्रम वर्षानुवर्षे चालायचा पूर्वी. आता जमाना बदलला आहे!

वारकरी लोकांना जनता खुशीने दान देते याचा गैरफायदा घेणारेही पुढे निपजले. त्यामुळे कालांतराने वारकरी आणि भिकारी यांत फरक दिसेनासा झाला!

जगदगुरु संत श्री तुकोबारायांनी ‘होईन भिकारी’ हे अत्यंत वेगळ्या आणि अध्यात्मिक अर्थाने म्हटले आहे. अन्यथा त्यांच्या सारख्या मूळच्या श्रीमंतास असे लिहायची गरज पडली नसती.

हल्ली जवळजवळ सर्वच संतांच्या पालखी सोहळ्यासोबत चालणारा समाज संख्येने प्रचंड दिसून येतो. याची काही अध्यात्मिक कारणे असली तरीही सोहळ्यात केवळ पोटार्थी लोकांची, भिका-यांची संख्याही वाढलेली दिसते आहे. विशेषत: ज्ञानेश्वर महाराजांच्या श्रीमंत पालखी सोहळ्यासोबत शहरे जवळ आली की वारीत संख्या वाढते… त्यात काही टक्के भिकारी मंडळी असतात. कारण माऊलीच्या मार्गावर पुणे आणि अशीच काही सधन शहरे येतात. आणि येथील लोकही मोठ्या प्रमाणावर, अगदी चढाओढ लावून दान, अन्नदान करताना दिसतात. हाच सोहळा पुढे पुढे गेला की मधल्या मोकळ्या रस्त्यांवर वारीतील भिका-यांची संख्या रोडावते… कारण काही मिळण्याचे प्रमाण कमी होत असते. यामुळेच कुठे काही वाटप होत असेल तर ही भिकारी मंडळी खूप गोंधळ करतात, अधिकच्या वस्तू, अधिकचे अन्न पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि हे भिकारी चक्क वाहनांनी पुढील सधन गावांत जाऊन थांबतात!

वारीत सहभागी असलेल्या अधिकृत दिंड्या स्वयंपूर्ण असतात. संबंधित वारकरी आपसांत वर्गणी (ज्याला भिशी असं म्हणतात) जमा करतात, दानशूर लोकांकडून देणग्या, वस्तू मिळवतात आणि संपूर्ण खर्च भागवतात. बरीचशी कामे वारकरी कार्यकर्ते स्वत:च करीत असले तरी स्वयंपाक, वाहने आणि इतर काही व्यवस्थांसाठी मानधनावर लोक नेमावे लागतात. आणि हे लोकही केवळ पैशांसाठी नव्हे तर सेवा म्हणून हे कार्य स्वीकारताना दिसतात. स्वयंपाकासाठी लागाणारे सर्व साहित्य, पदार्थ वाहनांमध्ये सोबत घेत प्रवास सुरु असतो. वाटेतील दुपारच्या, रात्रीच्या भोजनासाठी प्रायोजक असतात… त्याला पंगत देणे असे संबोधले जाते!

पालखी रथामागे किंवा रथापुढे चालणा-या दिंड्यांना विशिष्ट क्रमांक दिलेले असतात. आणि ही शिस्त पाळावीच लागते. शेगावच्या संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा तर अत्यंत कडक शिस्तीसाठी सुप्रसिद्ध आहे. यात वेशभूषा आणि नित्यनेमाला खूप कटाक्षाने महत्त्व दिले जाते. स्वयंपूर्ण दिंडीतील वारक-यांना इतर कुणाकडून अन्न किंवा वस्तू घेण्याची गरज रहात नाही. अर्थात खेडोपाड्यातून येणा-या काही साध्या, छोट्या दिंड्या, ज्यांना आर्थिक पाठबळ कमी असते, अशा दिंडीतील वारकरी काहीवेळा भाविकांनी देऊ केलेले अन्न, वस्तू स्वीकारतात. पण ही याचना नव्हे!

कित्येक गावातील भाविक मंडळी दिंड्यामधील वारक-यांना अगदी आग्रहाने घरी नेऊन जेऊ घालतात. विशेषत: तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात हे प्रमाण मोठे आहे.

पूर्वी तुकोबारायांचा सोहळा कमी संख्येचा असे. मार्गही खडतर असे. त्यामुळे सोहळ्यात भिका-यांची संख्याही कमी असे. आता परिस्थिती बदलली आहे!

पालखी सोहळ्यासोबत विविध व्यवसाय करणारे हजारो लोक चालत असतात. ही मंडळी सुद्धा वारीतील दानाचा बराच लाभ घेताना दिसतात. सामान्य लोकांना बरेचदा केवळ वारीसाठी भक्तीभावाने चालणारी माणसे आणि व्यवसायानिमित्त, काही हेतू मनात ठेवून चालणारी माणसं यांतील फरक समजू शकत नाही! याला काही इलाज नाही. शेवटी माऊली, महाराज आणि सर्वच संत मंडळी पालखी सोहळ्यात सहभागी असणा-या कुणालाही रिक्तहस्त ठेवीत नाहीत, अशी श्रद्धा आहेच!

देशभरातल्या विविध धार्मिक यात्रा, कुंभमेळे यांत व्यावसायिक भिकारी नित्यनेमाने हजेरी लावत असतात, हेही खरेच आहे. पंढरीची वारीही त्याला अपवाद नाही! पण खरे वारकरी भिकारी नसतात आणि भिकारी वारकरी नसतात….. हे या निमित्ताने नमूद करावेसे वाटते!

सोहाळ्यात कुणीही उपाशी राहत नाही… मराठी भाविक मने त्यांना त्यांना उपाशी राहू देत नाहीत… या सर्वांना सोबत घेऊन ज्ञानोबाराय, तुकोबाराय आणि इतर असंख्य संत दरवर्षी पंढरीची वाट चालत असतात… हा सुखसोहळा स्वर्गी नाही! रामकृष्णहरी!

– लेख क्र. २ 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ तारीख पे तारीख… ☆ तृप्ती देव ☆

तृप्ती देव

? मनमंजुषेतून ?

तारीख पे तारीख… ☆ तृप्ती देव

तारीख पे तारीख…

आणि माझं भविष्य वेटिंगवर!

मी धनु राशीची आहे… आणि माझी एक मोठी चूक झाली. चुका तर नेहमी होतात माझ्याकडून.

एकदा काय झालं, उत्सुकतेपोटी धनु राशीचं एक पॉडकास्ट पाहायला गेले! पण त्या एका व्हिडिओने माझ्या मोबाईलच्या अल्गोरिदमला बहुतेक वाटलं असेल की, “ही बाई आता ग्रह-ताऱ्यांच्या भरवशावरच जगणार!”

तेव्हापासून मोबाईल उघडला की धनु राशी, युट्युब उघडलं की धनु राशी, फेसबुक उघडलं की धनु राशी आणि रील्स स्क्रोल केल्या की धनु राशी! अगदी वाटतं, माझ्या मोबाईलमध्ये गुगल नाही, तर थेट एखादा ज्योतिषीच राहायला आलाय!

गेले काही दिवस मला एक नवीनचं छंद लागलाय… सकाळी चहा हातात आणि मोबाईलमध्ये पॉडकास्ट! आणि प्रत्येक पॉडकास्टमध्ये एकच मोठी घोषणा… “धनु राशीवाल्यांनो, तयार राहा! तुमच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे!” हे ऐकून मी पण अगदी उत्साहात मनात म्हटलं, “चला! अखेर ग्रहांना माझा पत्ता सापडला वाटतं!” 

पहिला ज्योतिषी म्हणाला, “१० तारखेपासून गुरूची कृपा सुरू होईल. ” मी १० तारखेपर्यंत कसातरी संयम ठेवला. १० तारीख आली… गुरू आला की नाही माहीत नाही, पण वीजबिल मात्र अगदी वेळेवर आलं!

मग दुसरा पॉडकास्ट समोर आला, तो म्हणाला— “२१ तारखेनंतर अडकलेले पैसे मिळतील. ” हे ऐकताच मी माझ्या देणेकऱ्यांचे नंबर पुन्हा व्यवस्थित सेव्ह केले. कोणी स्वतःहून पैसे देईल म्हणून मोबाईलकडे अगदी प्रेमाने पाहू लागले. २१ तारीख आली… पैसे काही आले नाहीत, उलट एका मैत्रिणीने मेसेज केला, “थोडे पैसे पाठवशील का? ” 

त्यानंतर आला तिसरा ज्योतिषी, तो म्हणाला— “या महिन्याच्या शेवटी तुमचं नाव होईल! ” मी मनात म्हटलं, “वा! आता पुरस्कार, मुलाखती, सत्कार सगळं काही! ” महिना संपला… नाव झालं खरं! पण शेजारच्या किराणा दुकानाच्या उधारीच्या वहीत सगळ्यात वर!

आता तर परिस्थिती अशी झाली आहे की, मी तारखांची वाट बघते आणि तारखा माझी मजा बघतात! ५ तारीख… १० तारीख… १५ तारीख… २१ तारीख… २८ तारीख… तारखा बदलतात, महिने बदलतात, व्हिडिओ बदलतात, ज्योतिषी बदलतात… पण माझं भविष्य मात्र सरकारी फाईलसारखं. पुढील आदेशापर्यंत प्रलंबित! ” 

खरं सांगायचं तर, या सगळ्या व्हिडिओंनी माझ्या मनात एक गोड लालसा आणि आशा निर्माण केली. मलाही माझे जुने अडकलेले पैसे परत हवे आहेत, मलाही माझं नाव कमवायचं आहे, माझ्या मनासारखं आयुष्य जगायचं आहे आणि मलाही एक दिवस अभिमानाने म्हणायचं आहे— “हो! आता माझा काळ बदललाय! “

आणि प्रत्येक पॉडकास्ट हेच स्वप्न पुन्हा पुन्हा रंगवतो— “बस ही तारीख… मग सगळं बदलेल! ” पण या सगळ्यातून आता मला एक मोलाची गोष्ट समजली आहे… गुरू ग्रह राशीत येण्यापेक्षा, आपण स्वतः कामाला लागणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण ग्रहांचा प्रवेश कधी होईल माहीत नाही, पण प्रयत्नांचा प्रवेश रोज करता येतो!

तरीसुद्धा… उद्या जर एखादा नवीन पॉडकास्ट म्हणाला, “धनु राशीवाल्यांनो, उद्यापासून तुमचा सुवर्णकाळ सुरू! ” तर काय करणार, मी पुन्हा तो व्हिडिओ पूर्ण बघणारच! कारण भारतीय माणूस आशेवर जगतो… आणि धनु राशीवाला? तो तर पुढच्या तारखेवर! ” आता परिस्थिती अशी आहे की, मी भविष्य ऐकण्यासाठी पॉडकास्ट लावते… आणि पॉडकास्टवाले माझं भविष्य ऐकूनच नवीन तारीख देतात! ” 

थोडक्यात सांगायचं तर, स्थिती सध्या अशी आहे : “गुरू येतोय… शनी जातोय… राहू फिरतोय… केतू वळतोय… तारखा धावतायत… फक्त माझे अडकलेले पैसे आणि माझे मोठे यश, बहुतेक अजून GPS शोधत आहेत! ” 

टीप: (या लिहिण्यामागे कोणालाही दुखवण्याचा हेतू नाही, हा सहज माझ्या मनात आलेला एक विनोदी विचार आहे.) मी शास्त्राचा सन्मान करते.

┉❀꧁꧂❀┉

© तृप्ती देव

भिलाई, छत्तीसगड.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “काळजी वाटते म्हणून” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “काळजी वाटते म्हणून…” ☆ श्री मंगेश मधुकर

सकाळची नऊची वेळ, रस्त्यावर बऱ्यापैकी ट्राफिक होतं. अचानक “बुंगsssबुंग”असा मोठंठा आवाज आणि कर्कश हॉर्न वाजवत एक बाईकवाला  ओव्हरटेक करून वेगानं पुढे गेला. काही वेळातच धाड….. धाड असा आवाज झाला. गाडी घसरून तोच सुसाट बाइकवाला रस्त्यावर पडलेला. हातापायाला खरचटलेलं. सुदैवानं गंभीर दुखापत नव्हती पण मुका मार बराच लागलेला. बाईकवाला थरथर कापत होता. बघ्यांची गर्दी जमली. काही विचारपूस तर काही व्हिडिओ शूटिंग करत होते. तितक्यात पन्नाशीचे एक काका पाण्याची बाटली घेऊन आले. बाईकवाल्याला उठवून बसवलं. स्वतःच्या हातानं पाणी पाजलं. बिस्किटं खायला दिली. प्रेमानं, आपुलकीनं विचारपूस करत होते.

“बरं वाटतंय का? ”काका 

“हो”

“घाबरू नकोस. काही झालेलं नाही घरी फोन कर”

“नको. मी ओकेयं. ”

“माझं ऐक. कोणाला तरी बोलावून घे. एकटा जाऊ नकोस. ”

“नको. ममी टेंशन घेईल आणि पप्पांना कळलं तर…  ”हे ऐकल्यावर काकांनी खाडकन बाईकवाल्याच्या मुस्काडात मारली. सगळ्यांनाच धक्का बसला. बाईकवाला तर बधीर.

“ओ मारताय कशाला? ”संतापलेला बाईकवाला म्हणाला.

“अजून दोन देईन”

काकांनी पुन्हा मारायला हात उचलल्यावर बाईकवाला त्यांच्या अंगावर धावून गेला तेव्हा इतरांनी मधे पडत दोघांना शांत केल्यानं पुढचा अनर्थ टळला तरी बाईकवाला संतापानं धुमसत असताना  काका एकदम रडायला लागले.

“सॉरी!! माफ कर भावनेच्या भरात तुझ्यावर हात उचलला” काकांनी हात जोडले.

“तुम्ही हाफ मॅड ये का? ”बाईकवाला.

“फुल मॅड सुद्धा म्हणू शकतोस. माझी काळजी तुला कळणार नाही. घरी फोन कर म्हटल्यावर भीती वाटली पण जीव धोक्यात घालून गाडी चालवताना काही बरं वाईट झालं तर आईबापाची काय अवस्था होईल याचा कधी विचार केलायस का? केवळ आई-वडिलांची पुण्याई म्हणून आज वाचलास. ”बाईकवाला काहीच बोलला नाही.

“गाडी सावकाश चालव असं आईबाप सांगतात ती कटकट वाटते. माझ्या मुलगा सुद्धा तुझ्यासारखाच गाडी चालवायचा. हजारदा सांगितलं पण ऐकलं नाही. शेवटी अद्दल घडली.”

“काय झालं”

“गाडी स्लिप झाली. तीन महिने झाले. दोन्ही हात प्लास्टर मध्ये घेऊन घरात बसलाय. जीव वाचला पण परीक्षा बुडाली, वर्ष वाया गेलं. वेगाच्या नादात आयुष्याचं मातेरं करून घेतलं”काकांना खूप भरून आलं.

“आजकाल शायनिंगच्या नादात जोरात गाडी चालवण्याचं प्रमाण वाढलंय. गरज नसताना जीव धोक्यात घालतात. खूप भीती वाटते. कोणी जोरात गाडी चालवताना दिसलं की काळजात धस्स होतं. मुलगा डोळ्यासमोर येतो. कधी, काय होईल याचा भरवसा नाही. गाडी सावकाश चालव आणि हेल्मेट वापर. ”

काही क्षण शांततेत गेले.

“आजपासून नीट गाडी चालवेन. ममी-पप्पांची आणि तुमचीही शपथ. ” काकांचा हात हातात घेत बाईकवाला म्हणाला 

“अजून खूप आयुष्य आहे आणि रागवू नकोस. जे केलं ते फक्त काळजीपोटी… बाकी काही नाही. ” बाईकवाल्याच्या डोक्यावरून हात फिरवून काका निघून गेले.

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वागत सोलापुरी… ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ स्वागत सोलापुरी☆ शीला पतकी 

स्वागत सोलापुरी – – 

 – – एक संवाद

 

पाच दिवस कोरड्या नळातून परवा पाणी आलं 

दुसऱ्या दिवशी त्यातूनच दुःख गळायला लागलं

 

अरेरे किती हाल.. आणि किती हा त्रास

पाण्यावाचून कसे राहता तेच बघायला आलोय खास

 

ये दुःखा मित्रा ये…

पण दार उघड असताना नळातून? अरे चोर सुद्धा खिडकीतून येतात आणि तू…?????

 

ते चक्क हसले…

मी म्हणलं ये बैस 

अरे पाहुणा आहे का मी…?

इथेच तर राहतो या गावात

 बंद गिरण्यांच्या उजाड आवारात 

कामगारांच्या चाळीत 

कष्टकऱ्यांच्या झोपडीत 

बिडी कामगार बाईच्या दारात 

आणि घरात सुद्धा 

 

अरे ती चक्क रांगोळी काढून स्वागत करते 

 इथल्या धुणे भांडेवाल्या चक्क सतसंगात बसतात 

त्यांच्या मांडीवरची पोर सुद्धा खुदकन हसतात 

कसल्या उन्हात मिरवणुकीत तरुण पोरं नाचतात

अन म्हातारे भक्ति भावाने भजन गातात

 

 सूर्य तापवून पोळवतो

 रस्त्याच्या खड्ड्यातून धूर निघतो.

 वीज सुद्धा मजेत लपंडाव खेळते

 

आता नळाच्या आत पाहिलं ना खपली सुद्धा नाही…

म्हणे खपली धरायला इथे सुखाचा ओलावा कुठेय?

मलाच आपलंसं करून म्हणतात आता दुरावा नाही…!

 

मी म्हणालो ऐक मित्रा

 ईथे कष्टकरी सुखात घोरतात

बेवडे अर्ध्या ग्लासात बुडतात

 

 बायकाना तर ठाऊकच आहे 

तुला पाचवीलाच पुजलंय 

इतक्या सहवासाने त्यांच तुझ्याशीच नातं जडलय…!

 

आमची बांधावरची माय तुला गाण्यात बांधते 

अन घरात दारिद्र्य असतानाही बाई तुला गाडग्यात रांधते 

 

बर सोड.. काय घेतोस सरबत का चहा?

 

शांतता…

दुःख म्हणालं, अरे काय माणसं आहात का काय रे तुम्ही?

अगदी खरं आहे मित्रा माणसंच आहोत आम्ही

 माणूस होण्याच्या रांगेत तुला सोलापूरकर जास्त दिसतील 

 

आम्ही दुःखात सुद्धा सुखाने हसतो 

 

घरी आलेल्या पाहुण्यासह जेवायला बसतो

आमच्या पानातला अर्ध त्याला देतो

 

निघताना निमंत्रण… या पुन्हा या घरी

कारण आम्ही अस्सल सोलापुरी

 

ते खाली मान घालून म्हणाले, येतो 

 

मी हसून…

ये बेsss हा पण नळातून नको

काळजी वाटते तुझीवाट चुकशील

उद्या पाण्याचा वार आहे

 येणाऱ्या पाण्याबरोबर गटारात जाशील

 

???????????

मित्रा

इथे पहिल पाच मिनिट येणार पाणी आम्ही गटारात सोडतो…!!!

 

(खूप जण आम्हाला विचारतात कसं काय करता पाच दिवसांनी एकदा पाणी? त्यांना वाटतं आम्ही या गोष्टीने फार दुःखी आहोत.

– – असल्या छोट्या छोट्या प्रश्नांना डगमगणारा सोलापूरकर नाही

तो दुःखाला सुद्धा कवेत घेऊन भेटतो मित्र म्हणून… आणि म्हणतो… ये बे…! ) 

 

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”माणुसकीचा धर्म आणि देवधर्म..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “माणुसकीचा धर्म आणि देवधर्म.. ☆ संध्या बेडेकर ☆

माणुसकीचा धर्म म्हणजेच देव धर्म का??

सध्या पुण्यात वारीमय वातावरण. किती वाट बघतो या दिवसांची. या भव्य दिव्य उत्सवाची. महाराष्ट्रातील एक पारंपरिक सोहळा. पंधरा दिवस चालणारा हा उत्सव. लोकांचे थवेच्या थवे पंढरपूर मार्गी चालताना दिसतात. पालखी प्रस्थान सोहळा बघण्यासारखा असतो. जागोजागी त्यांचे स्वागत, त्यांची व्यवस्था बघणारे सेवेकरी सज्ज असतात. ‘फूल नाही फूलाची पाकळी’ समजून, आपली सेवा म्हणून, लोक श्रध्दाभावाने साधारण जनमाणूस हे सर्व करतो. स्वतः ला धन्य समजतो. मी वारी करू शकत नाही. तेंव्हा जेवढं जमेल तेवढं करावे, अशा विचाराने मनापासून सेवा करण्याचा प्रयत्न असतो त्यांचा.  

पंढरपूर वारी म्हणजे अगदी भक्तिमय वातावरण. विठ्ठलाचा नामगजर, माऊली माऊली चा उदघोष आसमंतात दुमदुमतो. ही वेळ म्हणजे जणू काही वातावरणाचे शुध्दीकरणच चालू आहे असे वाटते. एक वेगळीच उर्जा अनुभवायला मिळते. बातम्या वर्तमानपत्रात अनेक माहिती, घटना ऐकून, प्रमूख पाहुण्यांचे विचार वाचून / ऐकून आपल्याही विचारांत परिवर्तन नकळत होते. नकळत हात जोडले जातात. थोड्या प्रमाणात का होईना घर गृहस्थीतून बाहेर पडून मनात वेगळे विचार येतात. वारी ला जाता आलं नाही म्हणून लोकांची तगमग बघून त्यांच्या श्रद्धेचा अंदाज येतो.

माझी पण देवावर खूप श्रद्धा आहे. देवाचे रोज मी अनेकदा आभारही मानते. मला खूप साग्रसंगीत पूजा करता येत नाही. म्हणजे अगदी साधी रामरक्षा म्हणताना सुद्धा माझे लक्ष इथे तिथे जाते. त्या पाच मिनिटांत पाचशे विचार मनात येतात. मला नेहमी वाटतं जर भक्तांची देवासमोर लाइन‌ लावली तर माझा नंबर कुठे लागेल बरं?? बहुतेक सगळ्यात शेवटचे स्थान मिळेल का मला??

मी वारी करू शकत नाही हे मला चांगले माहीत आहे. माझी शारीरिक शक्ती कमी झाली आहे. किंवा भक्तित तेवढी शक्ति नसावी. मला जमणार नाही असे मात्र वाटते. आपल्याला जेवढं शक्य आहे, आपल्या क्षमतेप्रमाणे देवधर्म करावा. असे मी खूपदा ऐकलंय. वाचलंय. मी माझ्या करिता हाच नियम पाळते.

माझ्या आजीचे एक वाक्य माझ्या मनावर बिंबलेले आहे, ते म्हणजे,  आजी म्हणायची,

“मी माणुसकी चा धर्म पाळते. ” तो धर्म मी लक्षपूर्वक, विचार पूर्वक पाळू शकते. माझ्या सहवासात येणाऱ्या लोकांशी चांगले वागायचे. जमेल तेवढी मदत करायची. हेच माझं आयुष्यातील ध्येय मी ठरवून टाकले आहे. मलाही आजीचे हे विचार, म्हणणे पटले.

खरच लक्ष देऊन बघीतल तर माझ्या आजूबाजूला खूप माऊली दिसतात. पंढरपूर ला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेता येत नाही. पण माझ्या आजूबाजूला बऱ्याच माऊलींचे दर्शन मला रोज घडते. मला रोज दूधाचे पॅकेट घरपोच देणारा ‘अजिंक्य’, मला घर कामात मदत करणारी ‘साक्षी ‘, ‘मंदाताई ‘, माझ्या घरचा कचरा घ्यायला येणाऱ्या ‘मावशी ‘. रोज न चूकता आपले काम व्यवस्थित पार पाडतात. सर्वांनी कोरोनाच्या कळातही स्वतः चा जीव धोक्यात घालून आमची सेवा केली. मला या नेहमी म्हणायच्या “काकू स्वतः ला जपा. बाहेर निघू नका. काळजी घ्या. “

नाइलाजाने काम करायला घरा बाहेर निघणाऱ्या या माऊली, स्वतः रोज रिस्क घेऊन बाहेर पडतात, तरीही दुसऱ्यांचा विचार करतात. दुसऱ्यांची काळजी घेतात. देवाच्या रूपात असणाऱ्या या माऊलीचे मला रोज दर्शन होते. फक्त पंढरपूर वारी काळातच नाही तर नेहमीच या सर्व माऊली, माझे सख्खे शेजारी माझ्या आजूबाजूला आहेत. हे सर्व माझ्या extended family चेच मेंबर्स आहेत..

देवाला बघीतले नाही. पण देवाचे representative बरेच दिसतात. कोरोना काळात तर माणसातल्या देवाचे दर्शन झाले. जिव्हाळ्याचे ॠणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येतं नाही. माझे व यांचे पूर्व जन्मीचे काही तरी संबंध नक्कीच असावेत. आपणही नेहमी त्यांच्या समाधानाचा हिस्सा असावं. समस्याचां नाही. त्यांच्या बद्दल आदर असावा.

ही माझ्या’ contact ‘मधे असणारी सर्व मंडळी माझ्या ‘connection’ मधे पण आहे. जीवाभावाचे नाते आहे आमचे. माझा त्यांच्या शी संपर्क आहे, संवाद आहे. आम्ही एकमेकांना समजतो. जाणतो.

हा माणुसकीचा धर्म पाळला तर देवधर्म झाला का??

आपल्या आजूबाजूला समाधान, आनंदी वातावरण ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हा एक चांगला संसर्गजन्य रोग आहे जेवढा पसरेल तेवढा चांगला.

“We rise by lifting others “.

म्हणतात ना,

“मधूर संबंध ज्ञान और पैसे सेभी बड़ा होता है।जब ज्ञान और पैसा विफल हो जाता है, तब मधूर संबंध से स्थिति संभाली जा सकती हैं ।”

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “शोध अवकाशाचा” ☆ मोहिनी किंहिकर हेडावू ☆

मोहिनी किंहिकर हेडावू

अल्प परिचय 

कला शाखेतून पदवी घेतली

सध्या नागपूर मध्ये सहायक राज्यकर आयुक्त (Assistant Commissioner of State Taxes)

वाचनाची लिखाणाची आवड. ललित लेखन, कविता तसेच सामाजिक विषयावर लिखाण करायला आवडते. लोकप्रभा, तरुण भारत, देशोन्नती, मातृ सत्ता व जन्मंगळ मधून लेख प्रकाशित झाले.
नुकतच ‘मनातलं’ हा ललित लेखांचा संग्रह प्रकाशित.

??

☆ “शोध अवकाशाचा☆ मोहिनी किंहिकर हेडावू 

अमृता प्रीतम चा चौथा कमरा मला का नसावा?

म्हणून मी माझ्या अवकाशाचा शोध घ्यायचा ठरविले..

“आम्ही नाही बाई, कधी अश्या शोधाच्या मागे लगलो?

पोटापाण्याच्या प्रश्नातच अवकाश गुदमरून गेले… “असे अनेकांचे ताशेरे!

मी दुर्लक्ष केले..

बहिणाबाईंनी कुठे अवकाशाचा शोध घेतला? पण तिला गवसलेचना!

 

“कामात असतानाच ओवीच इन्क्यूबेशन..

तर जात्यावर बसल्यावर, त्या शब्दबध्द व्ह्यायच्या”

एका विदूषीचा मार्मिक टोमणा.

पण मी तिकडे दुर्लक्ष केले..

 

मी जिद्दीने मार्गक्रमण केले.. माझे अवकाश मला गवसले..

शरीराने कात टाकली. आणि मनानेही…

तिथे भाऊसाहेबांनी शायरीची मैफिल!

आर्किमिडीज बाथटब मध्ये युरेका म्हणत बसलेला..!

सिद्धार्थ ला बुद्धत्व प्राप्त होण्याचा क्षण अनुभवला!

तर काही हे क्षण आपल्या आयुष्यात येण्यासाठी रांगा लावून उभे!

मी गर्दीत माझ्यासाठी एक कोपरा शोधला.. उभे राहिले तिथेच… दाटीवाटीत!

ध्रुवला अढळ पदासाठी किती संघर्ष करावा लागला… हे उमगले.. !

‘भगीरथप्रयत्न ‘या शब्दाचा अर्थ ही!

 

मी होते माझ्याच धुंदीत!

मोकळा श्वास घेत!

 

भानावर आले…

पहाते तर मी एकटीच उभे!

सगळे घराकडे परतले.

माउंट एव्हरेस्ट चढल्यावर ही उतरावंच लागत… जगरहाटीत यावेच लागते…

व मीही जागी झाले.

स्वप्नातून…

अन् आले वास्तवात!

© मोहिनी किंहिकर हेडावू

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “यश हे अमृत झाले?” ☆ वर्षा बालगोपाल ☆

वर्षा बालगोपाल 

??

☆ “यश हे अमृत झाले☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

यश हे अमृत झाले सुख स्वर्गीचे आले

दिग्विजयाच्या मनोरथावर नक्षत्रांचे झुलते अंबर

मागेपुढती राजपथावर

लक्ष दीप लागले

यश हे अमृत झाले 

 *

स्तुतिसुमनांचे उधळित झेले जनगौरव तो जयजय बोले

कीर्तध्वजावर लावून डोळे भाग्य पुढे चालले

यश हे अमृत झाले 

 *

वैभव मिरवीत मंदिरी येता दिसेल डोळी ती मंगलता

सुख अंधारी मन व्याकुळता दु:ख सुखे हासले

 *

यश हे अमृत झाले

सुख स्वर्गीचे आले

परि दु:ख सुखे हासले

पुत्र व्हावा ऐसा चित्रपटातील पी सावळाराम यांचे गीत ऐकता ऐकता सुखदा आपला मुलगा सुशील याचे सायकल शिकणे आनंदाने पहात होती. सुशील अंगणात सायकल चालवायला शिकत होता. पहिल्यांदा हाफ पॅडलिंग करता करता दमून गेला. नंतर सीटवर बसण्याचा प्रयत्न करताना दोनदा तीनदा आपटला. हाताला लागलं, कपडे तर मातीत घोळून निघाले. पण तरीही जिद्दीने तो स्वतः सीटवर बसून पूर्ण पॅडलिंग करत सायकल चालवायला शिकला. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. त्याच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून सूर्य सुद्धा थोडा ओशाळा झाला असेल.

अतिशयोक्तीचा भाग सोडला तर खरंच कष्टानंतर मिळालेल्या यशाचे वर्णन कितीही केले तरी कमीच असते. खरंच यश हे अमृत झालेले असते आणि त्या यशासाठी घेतलेले दुःख, झालेल्या यातना या सुद्धा सुखात परावर्तीत होतात.

त्या सुखात नकळत अजून चांगल्या गोष्टी कशा दडलेल्या असतात, तर सुशील आनंदात घरात आला. त्याने इकडे तिकडे पाहिले आणि हळूच कोणी नाही पाहून प्रथम बाथरूम गाठले. आपले कपडे पाहून आई रागवेल असे वाटून स्वतःचे कपडे स्वतः धुतले. स्वच्छ आंघोळही केली.

आई सुखदाने सगळे पाहिले होते. त्यामुळे तिने तेल हळद तयार ठेऊन खरचटलेल्या जागेवर ते लावले. लगेच गरम दूध प्यायला देऊन बेसनाचा लाडू पण दिला. आनंदाने जेव्हा सुशिलने आई आता मला सायकल येते हे सांगितले तेव्हा सुखदाने त्याला शाब्बासकी दिली. म्हणाली खरंच खूप आनंद होतोय. पण यशाहुनीही प्रयत्न सुंदर असतात बाळा.

बघ तू पडलास, तुला लागलं तरी तू प्रयत्न सोडले नाहीस जिद्द पक्की केलीस माघार घेतली नाहीस म्हणूनच तुला सायकल तर आलीच. पण आईच्या कामाची जाण येऊन तुला तुझे कपडे धुण्याइतके स्वावलंबी केले. तुला स्वच्छतेचे महत्व वाटून तुला कोणी न सांगताही आंघोळही केलीस.

जीवनातही असेच असते. भिंतीवर तोंडात खाऊ घेऊन जाणारी मुंगी पण खाली खाली घसरते, कधी पडते पण वर जाण्याची जिद्द धरून ती वर जातेच. एडिसनने हजार वेळा प्रयोग करून मग 1001 व्या वेळी ब्लबचा शोध लागला. त्यावेळी त्याच्या मुलाखतीत तो म्हणाला होता की काय केले नाही तर ब्लब लागतो हे मी वेगवेगळ्या हजार मार्गानी शिकलो. अपयश हे आपल्याला अनुभव देत असते आणि तोच मोठा गुरू होउन आपल्याला ज्ञानी करत असते.

सोहनलाल द्विवेदी यांची लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। ही कविता आपल्याला एक सकारात्मकता देते.

म्हणूनच यशाचा सागर पार करायचा असेल तर प्रयत्नांच्या बेटांवर विसावायला हवं. ती बेटे कदाचित पैलतीरापेक्षा अधिक सुंदर असतात.

परवाच एक जण अतिशय निराश होउन बसला होता. कारण upsc परिक्षा सलग तिसऱ्यांदा अगदी थोड्या मार्कांने नापास झाला होता. म्हणाला अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे माहित होते पण येथे तर जीनाच तयार होताना दिसतोय. पण बाळा हे सुद्धा काही खोटे नसते. प्रत्येकवेळी जरी अपयश आले असे वाटत असले तरी तुम्ही यशाच्या कडे अजून थोडे पुढे गेलेला असता. यशाच्या शिखरावर जायला पायऱ्या चढयलाच हव्या. हेलिकॅप्टरने यश शिखरावर उतरणे याला काही अर्थ नसतो. तुम्ही तो जीना नजरेपुढे आणा. पहिली पायरी अपयश, दुसरी पायरी अपयश +निर्धार, तिसरी पायरी अपयश +निर्धार+प्रयत्न, चौथी पायरी अपयश +निर्धार+प्रयत्न +कष्ट, पाचवी पायरी अपयश +निर्धार+प्रयत्न +कष्ट+सातत्य, सहावी पायरी अपयश +निर्धार+प्रयत्न +कष्ट+सातत्य +सराव, सातवी पायरी अपयश +निर्धार+प्रयत्न +कष्ट+सातत्य +सराव+आत्मविश्वास, मग सातव्या पायरीनंतर यश तुमचेच असते. याचा अर्थ अपयशा नंतरपुन्हा तुम्ही तितकी अपयशे पचवण्याची मानसिकता ठेवली पाहिजे असा नाही. तर तुम्ही बाकीच्या सगळ्या पायऱ्या एका दमात सुद्धा चढू शकता आणि पुढच्या वेळेस लगेच यश मिळेलही. पण जर लगेच यश नाहीच मिळाले तर त्याने नाराज होउन प्रयत्न सोडून देण्या पेक्षा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिले तर यश मिळणारंच हा आत्मविश्वास हवा.

सुशिलला मनोमन पटले आणि तो सहज म्हणाला 

यशाहुनीही प्रयत्न सुंदर 

दिलेस मंत्रा जपे निरंतर 

मिळेल याने मला पुरंदर 

म्हणेल आई मला धुरंदर ||

© वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares