मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स. न. वि. वि. … – लेखक : अज्ञात ☆ सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ स. न. वि. वि. … – लेखक : अज्ञात ☆ सौ. अंजली दिलीप गोखले

सुरुवातीला स. न. वि. वि. असे लिहिल्यामुळे मी काही सांगतोय किंवा कशाबद्दल तरी आमंत्रण देतोय, असे कदाचित वाटू शकेल.

पण….

अशी सुरुवात करुन लिहिण्याचा मोह आवरला गेला नाही.

*हल्ली लग्नपत्रिका, आमंत्रण पत्रिका यावरच असे लिहिलेले बघायला मिळते. एरवी असे शब्द लिहिले जात होते, हे सुध्दा विसरायला झाले आहे. *

उतारवयात स्मरणशक्ती कमी होते म्हणून काही गोष्टी विसरायला होतात. पण आता असे शब्द वाचण्यात आणि लिहिण्यात येत नसल्याने विसरायला झाले आहेत.

*खरेच मोबाईलसारख्या सहज संभाषण करता येणाऱ्या वस्तू उपलब्ध झाल्यामुळे, नवनवीन शोधामुळे काही गोष्टी सोप्या झाल्या असल्या, तरीही पत्रलेखन मात्र जवळपास बंदच झाल्यामुळे पत्रात लिहिले जाणारे काही शब्द लुप्त झाल्यासारखे वाटतात. *

आज सहज अशा काही शब्दांची आठवण झाली…….

*•.. • श्री •.. •* लिहून पत्राची सुरुवात.

*श्री. रा. रा. * – श्रीमान राजमान्य राजश्री.

*स. न. वि. वि. * – सप्रेम नमस्कार विनंती विशेष.

*तीर्थरुप* आई / बाबा.

*शि. सा. न. * – शिरसाष्टांग नमस्कार.

या सारखे शब्द वाचायलाच मिळेनासे झाले आहेत.

*कळविण्यास आनंद होतो की, असे लिहून पत्राची सुरुवात झाली, तर पुढे आनंदाची बातमी आहे, म्हणून पत्र अक्षरशः अधिरतेने वाचले जायचे. (दोन वेळेस)*

पत्राच्या शेवटी लिहिले जाणारे…….

– *कळावे, लोभ असावा. *

– *आपला. *

– *तुझाच/ तुझीच (किती रोमँटिक! )*

– *आपला आज्ञाधारक*

– *मो. न. *

– *ल. अ. उ. आ‌. *

– *छो. गो. पा. * 

– *मोठ्यांना नमस्कार, *

– *लहानांना अनेक उत्तम आशिर्वाद*

– *छोट्यांना गोड पापा, *

 *असे लिहून तान्हुल्यांची सुध्दा आवर्जून आठवण ठेवली जायची. यात गोड पापा असे वाचताना सुद्धा खरेच लहानांचा गोड पापा घेतला जातोय असा भास व्हायचा. *

हे आणि या सारखे शब्द शाईच्या पेनासारखेच झाकण (टोपण) लावून जवळपास कायमचे बंद झाले आहेत असे वाटते.

*त्यामुळेच असे आपलेपणा जपणारे शब्द पेनने कागदावर उतरण्याचे थांबलेच नाहीत, तर बंद झाले आहेत. *

पत्र लिहून संपविताना एखादी गोष्ट आठवली तर *ता. क. * (ताजा कलम) असे लिहून उरलेल्या जागेत ती मावेल अशा अक्षरात लिहिली जायची. त्यात सुध्दा गंमत वाटायची.

*कदाचित शाईमुळेच त्या शब्दात आपलेपणाचा ओलावा येत असावा. नंतर बॅाल पॅाईंट पेनमुळे तो ओलावा कमी होत गेल्याचे जाणवले. *

आता तर मोबाईलवरच टाईप केल्याने ओलावा सुध्दा काही वेळा कृत्रिम वाटायला लागतो. खरेच या शाईने लिहिलेल्या अशा शब्दात एक आपलेपणाचा गोडवा होता.

*पत्राची सुरुवात यापैकी कशानेही झाली, तरीही ते सुद्धा वाचलेच जायचे. आजच्या ई मेल, व्हॅाटसअप, फेसबुक च्या जमान्यात या शब्दांची मजा हरवली आहे. *

पत्रांच्या ऐवजी आता ई-मेल येतात. यात सुध्दा, Dear, Sir/Madam, Respected Sir/Madam अशी सुरुवात आणि Regards, Yours असे लिहून शेवट होतो. यात आपलेपणा जाणवतच नाही. कार्यालयीन आणि कोरडे वाटतात हे शब्द. त्यात नात्यातला ओलावा नाहीच.

*Yours faithfully यापैकी फेथफुली वर तर मला फुलीच (X) माराविशी वाटते. * 

*यातही स. न. वि. वि. सारखेच नुसतेच GM, GN असे लिहिण्याची सवय आहे. पण सुप्रभात, शुभ रात्री, शुभ रजनीची मजा GM (गम) GN (गन) मध्ये नाही. *

आजकाल फोनवरच बोलणे (त्यातही काही वेळा व्हिडिओ काॅल) होत असल्याने साष्टांग नमस्कार, आशिर्वाद, गोड पापा अशा शब्दांच्या ऐवजी मग *”काय? कसे काय? बाकी सगळे ठिक आहेत ना? “* असे बाकी (चे) विचारुनच नात्यांची शिल्लक (बाकी) विचारली जाते किंवा पाहिली जाते.

पत्र आले की आनंद व्हायचाच, पण मोठे पत्र (अंतर्देशीय) आले की ते व्यवस्थित उघडून (खरेतर फोडून) रविवारच्या पुरवणी सारखे त्याचे वाचन व्हायचे. पण आता हे सगळे हरवले आहे असे वाटते.

आपला / आपली नम्र,

– – – – 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तिचं जग… तिचं अवकाश… – लेखिका : सुश्री पुष्पा गोटखिंडीकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ तिचं जग… तिचं अवकाश… – लेखिका : सुश्री पुष्पा गोटखिंडीकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

पुतण्याच्या लग्नाच्या निमित्ताने मला अमेरिकेहून वीस दिवसांसाठी भारतामध्ये यायला मिळणार होते. त्यामुळे मी फारच खुश होते. भारतात येण्यासाठी विमानात बसले आणि माझ्या डोक्यात विचार चक्र सुरू झाले. भारतात गेल्यावरती सासर.. माहेर नातेवाईकांच्या भेटीगाठी, मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी, बँकांची कामं या सगळ्यांचा विचार करता करता सर्वात महत्त्वाचं म्हणजे लीलू मावशीची प्रथम भेट घ्यायची, असं मनानं मी निश्चित केले. लीलु मावशी माझी अत्यंत प्रिय मावशी, लाडकी मावशी. तिचाही माझ्यावर तेवढाच जीव. पण सहा महिन्यांपूर्वी तिच्या मिस्टरांचे नारायण काकांचे अकाली दुःखद निधन झाले. कोणताही आजार नाही काही नाही, चांगले हिंडते फिरते. अचानक हार्ट अटॅक यावा काय अन् मृत्यू यावा काय! ही बातमी ऐकून मी तर फार खचून गेले होते. मावशीला अमेरिकेतून फोन केला होता पण माझ्याच्याने जास्त बोलवले गेले नाही. तिचं सांत्वन कोणत्या शब्दात करावं ते मला सुचत नव्हतं. मी फोनवर नुसती रडत राहिले होते आणि म्हणून आता पुण्यात गेल्यावर पहिल्यांदा लीलु मावशीची भेट घ्यायची असे मी मनाशी पक्क ठरवलं.

ठरल्याप्रमाणे मी पुण्यात पोहोचल्याबरोबर दुसऱ्या दिवशी मावशीकडे गेले. दार उघडताच तिने माझे हसून स्वागत केले. मावशी जशी होती तशीच छान दिसत होती. तिच्या राहणीमानात मला काही फरक जाणवला नाही. कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, साडीला पिन अप केलेलं. तिला बघून मला छान वाटलं.

मला म्हणाली, “आत्ताच मी वृद्धाश्रमातून आले आहे. ” (वृद्धाश्रमातून हा शब्द ऐकताच माझ्या मनात चर्र झाले अन् असंख्य विचार दाटून आले. बापरे! मावशीला संजय दादानी वृद्धाश्रमात ठेवले. किती नालायक आहे! संजयदादा असं करेल असं मुळीच वाटलं नव्हतं. किती स्वार्थी असतात ना माणसं! )

माझ्या कपाळावरील आठी आणि माझा तोंडाचा झालेला आ बघून मावशी म्हणाली, “अग, इथे जवळच सावली नावाचा एक वृद्धाश्रम आहे. तिथल्या आजीआजोबांना मी भजन शिकवायला जाते. त्यांची दहा-बारा भजने तयार झाली आहेत आणि आता त्यांना नवरात्रात ठिकठिकाणी भजनं म्हणायला बोलवलं आहे. म्हणून त्यांची मी सध्या रोज प्रॅक्टिस घ्यायला जाते.

सगळेजण खूप खुश आहेत. मलाही त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूप छान वाटते आणि माझे दुःख विसरायला मला मदत होते. “

शनिवार रविवार माझ्याच घरी ४ ते ६ या वेळात संस्कार वर्ग घेते. १५-२० मुले येतात. लहान मुलांच्यात वेळ चांगला जातो बघ. आणि इथे मागच्याच गल्ली मध्ये ‘यशस्वी फाउंडेशन ‘नावाची एक सामाजिक संस्था आहे. तिथे इयत्ता दहावी मधील जी मुले अभ्यासात थोडी कच्ची आहेत आणि आर्थिक दृष्ट्या मागास आहेत, अशा मुलांना कोणतेही मानधन न घेता इंग्लिश, गणित शिकविण्यासाठी मी रोज दोन तास तेथे जाते. खर सांगू का शिक्षकी पेशा हे मी स्वीकारलेलं व्रत आहे आणि सेवानिवृत्तीनंतर ते या निमित्ताने निभावण्याचा मी प्रयत्न करत आहे. अग, हे गेल्यानंतर १५ दिवसातच मी माझ्या सामाजिक कामांना वाहून घेतले. “

“किती छान ग मावशी. छान बिझी ठेवलयस स्वतःला. “

“अग मनु, जाणारा जातो म्हणून मागे राहणाऱ्यांनी किती दिवस रडत राहायचे? मरण तर एक ना एक दिवस येणारच आहे. ते तर न मागताही मिळणार आहे. मग जोपर्यंत जीवात जीव आहे, तब्येत चांगली आहे तोपर्यंत आपल्या आवडीचं काम करावं असा विचार करून मी *पुनश्च हरी ओम* सुरू केलं. चल आता आपण जेवण करून घेऊ या. मी तुझ्या आवडीच्या पुरणपोळ्या सकाळीच करून ठेवल्या आहेत. “

मावशी, स्वयंपाकाला बाई ठेवली आहेस का? असं मी विचारताच मावशीने फणकाऱ्याने उत्तर दिले, “स्वयंपाकाला बाई कशाला ग? मला काय धाड भरली आहे? रोज सकाळ संध्याकाळ ताजा स्वयंपाक करते. सकाळी नऊ वाजता नाष्टा करते. एकदा केलेला नाष्टा आठ दिवस रिपीट होता कामा नये असा माझा कटाक्ष असतो. माझं रूटीन व्यवस्थित चालू आहे. बागेत एक तासभर काम करते. झाडांशी बोललं ना की मन छान प्रसन्न राहते. माझाही वेळ जातो आणि तब्येत चांगली राहायला मदत होते ना. मैत्रिणी ही भरपूर आहेत. अधून मधून भटकंती चालू असते. भरपूर वाचन लेखन चालू ठेवलय. रोज सकाळी योगा करते, देवाची पूजाअर्चा, पोथी वाचनही चालू असते. त्यामुळे एकलपण जाणवतच नाही बघ.

संजय आणि धनंजय.. एक पुण्याला एक मुंबईला असले तरी दोघेही अधून मधून मला भेटायला येतात. मीही त्यांच्याकडे माझ्या सवडीनुसार जाते. त्यांनी मला बजावले आहे आई, तू आम्हाला जशी होतीस तशीच आनंदी हवी आहेस. दोघी सूना नातवंडेही खूप काळजी घेतात माझी. आणखी काय हवे? “

“खरंय मावशी, दुःखातून तू सुखाचा शोध घेतला आहेस. मला तुझा जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक, आनंदी दृष्टिकोन फारच आवडला. तू खऱ्या अर्थी गीता जगली आहेस मावशी! “

मावशीशी गप्पा मारत मारत सुगरण असलेल्या माझ्या मावशीच्या हातच्या पुरणपोळ्या खाऊन मी तृप्त झाले होते. आणि दुःखातून स्वत:ला सावरून ती करत असलेले सामाजिक काम पाहून मी खरोखरच भारावून गेले होते.

लेखिका : सुश्री पुष्पा गोटखिंडीकर

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकर 

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ झणझणीत मिसळ… – लेखिका : सौ. भारती भाईक ☆ प्रस्तुती – सौ. मीनल केळकर ☆

सौ. मीनल केळकर

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ झणझणीत मिसळ… – लेखिका : सौ. भारती भाईक ☆ प्रस्तुती – सौ. मीनल केळकर ☆

संपली दिवाळी…. आता मात्र ऐरणीवरचा प्रश्न…. उरलेले फराळाचे सुयोग्य समापन कसे करावे…कोण सायास घेऊन तयार केलेली. ती समस्त अंग बांध्याची शेव.. ती खारी बुंदी… ती खारी शंकरपाळी…. चिवडा… यांचं करावं काय?… नव्याची नवलाई संपलेली असते…. दिलेली डिश साभार परतत असते…. मग या अती मेहनत घेऊन केलेल्या जिन्नसांना योग्य पध्दतीने मार्गी लावणं यायला हवंच…… मग काय.. ?… मिसळ आहे ना…. सर्वांवर रामबाण उपाय…. रविवार एखादा उमलून यावा… नि अवचित बेत मिसळीचा ठरावा… असं अजिबात नाही हं… पूर्वतयारी लागतेच.. मिसळ म्हणजे उचलली जीभ लावली टाळूला… तसला झटपट अंगलट… मुखलट म्हणूया …. येणारा प्रकार नाही. तर जोजवून जोजवून शिजवून सामोरा येणारा प्रकार. बेत ठरायचा आदल्या दिवशी आणि मग मात्र पूर्वतयारी ला लागावं लागत ….. सर्व प्रथम कडधान्याला डब्यातून जागं करुन त्यांना “चला वीर जवानांनो…. कर्तव्यपूर्तीची वेळा आली…”म्हणत पाण्यात डुंबविणे ओघाने आलंच. रात्रीच घट्ट सायीखाली निवांत निजलेल्या दूधाला दह्याचं नैमित्तिक मिलन घडवून आणत विरजायला ठेवावं लागतं. विरजतांनाच अर्धा चमचा माधुर्य घातलं तर क्या कहने… । सकाळी घट्ट, गोडूलं, सायीचं दही तयार. वास्तविक याची डीशमध्ये सर्वात शेवटी वर्णी लागते…. पण तयारी सर्वात आधी करावी लागते.

पहाटे पहाटे उठायची काही गरज नसते. अंमळशाने उठुन मिसळीच्या तयारीला लागता येतं… इथे बहुतेक सुगरणींनी निःश्वास सोडला असेल. खमंग फोडणीसाठी लागणारं शस्त्रसाहित्य पुरेसं गोळा करावं… नि गँसवर पातेलं चढवावं…. गरम तेलात झणझणीत फोडणी देऊन कडधान्य टाकावं… मीठ पेरीत आमचूराचा स्वाद घालावा.. नि कुकरला दणदणीत पाच सहा शिट्ट्या कराव्या.

आता तुम्ही म्हणाल.. यात काय विशेष? हे तर आम्ही नित्य करतोच… पण थांबा हं… इथवर लीलया पाकसिध्दी करणाऱ्या ललनांनो… खरी लढाई यानंतरच बरं… म्हणजे चवीने रसनेवर चढाई करावी असं वाटत असेल… तर ही लढाई लढावीच वागते. उसळ नीट बोटचेपी शिजली तरी पातेल गँसच्या डोईवरुन काढू नये…तसंही गँसला सवयच असते हो याला त्याला डोक्यावर घेऊन मिरवायची….. तर तसंच राहू द्यावं…. एकीकडे खास कच्च्या मसाल्याचं वाटण घालून झणझणीत रस्सा फोडणीस घालावा… इथे चवीढवीचं गणित मात्र चपखल जमावयास हवे…. न कम न जादा… हो तडके का इरादा….. चटकदार मिसळ सर्वस्वी या रश्श्यावरच अवलंबून असते.

आता मात्र तुमचा रसिक पदर कंबरेला खोचायलाच हवा… चला…. एक एक जिन्नस जमवायला घ्या… अंमळशाने उठल्याची अर्धी कैफ तर ही तयारीच घालवते… कांदे मध्यमपेक्षा जरा बारीक कापून घ्यावे…. खूप बारीक कापलेले असतील… तर ते रश्श्यात नेस्तनाबूत होऊन हवी ती कचर कचर चव चाखता येत नाही हो…. … तर साधारण चार कांदे कापावेत…. कांद्याने शंभरी ओलांडली तरही आपण चवीपर्यंत मजल मारण्यासाठी… अशा नाही तर तशा कारणाने नयनी नीरेस येऊ द्यावे…. भले हो जादा दाम…. पूरा करेंगे तडके का काम…. … अशा बाणेदारपणे कांदे कापून हातावेगळी करावी… त्यानंतर हिरवीगार कोथिंबीरीचे पाय कडाकडा मोडून तिला मात्र बारीक कापावी…. दोन तीन प्रकारच्या चिवड्यांचे, घरच्या चिवड्याशी भरत मिलाप घडवून आणत, त्यांची गळाभेट मोठ्या डब्यात ठेवावी…. सडपातळ, मध्यम, मोठी… अशा….. सर्वच कँटेगिरीच्या शेवेला समान योग्य मान देत बाऊलमध्ये काढावेत… उगाचच बारीक शेव जाड शेवेकडे तिरपा कटाक्ष टाकीत हसली… नि पुटपुटली…”काय बाई जाड ध्यान.. “तरीही जाड्या शेवेसह आपणही दुर्लक्ष करावे……. फ्रिजमध्ये पहाटेसच ठेवलेलं नि तिथे ते निवांत AC मध्ये नीजलेलं गोडुलं दही काढून घ्यावं… त्याला अजिबात कल्पना नसते…. आपला आता लवकरच कडेलोट होऊन उकळत्या रश्श्यावर घालणार याची…. अज्ञानातलं सुख तयाला जरा लाटू द्यावं…. त्याला थोडं तसंच सुस्ताऊ द्यावं….

मिसळीची डिश तयार करायला घ्यावी.. भैय्या स्टाईलने प्लेटमध्ये मुबलक मोठ्या हाताने उसळ घालावी. ती तिच्या मनाविरुद्ध पातेल्यातून काढल्यामुळे अद्याप धुसफुसत असेल… आपण लक्ष देऊ नये…… मग चिवड्यांचे सर्व प्रकार हसत खेळत तयावर सोडावीत…….. मग सर्वसमभाव दर्शक सर्वच प्रकारच्या शेवेस… सेवेत घेत आनंदाने समोर सरकत मिसळीवर पहुडावी…पिवळीधम्म खारी बुंदी शिंपडावी….. मग मात्र सर्वांच्या भेटीस उत्सुक असलेल्या, आणि म्हणून अत्यानंदाने आनंदाच्या उकळ्या फुटणाऱ्या रश्श्याची अखेर भेट घडवून आणावी…. नीजलेलं, आळसावलेलं दही आता पुरेसं जागं झालं असेल… त्याला पाचारण करुन प्लेटमध्ये घालावं… ते कुरबुरेल.. पण गय न करता… लगेचच कांदे घालून त्याचं तोंड चूप करावं…. त्याच्या जोडीला हिरवीगार कोथिंबीर घालून लगेचच खवैय्यांच्या हवाली प्लेट करावी… ।…..

… आता… खाणा-याला पहिल्या घासातच जबरदस्त ठसका लागला तर समजावं.. मिशन फत्ते…”कुणीतरी आठवण काढली असेल.. “अशा फडतूस गोष्टींवर त्यांचा विश्वास बसू न देता…”मिसळ सही झाली य…” यावर पक्का विश्वास बसू द्यावा…. म्हणजे जमली तुमची झणझणीत मिसळ…!!!… लागलेला ठसका आवरता आवरता त्याला पुरेवाट झाली तरी आपण पुरे न करता उकळता रस्सा आणखीच घालीत जावे…म्हणजे प्लेटमध्ये हं…. जराही उसंत न घेऊ देता मिसळीचा समाचार घ्यावयास हवा.. न थांबता.. मिसळीसवे एकमत व्हावयास हवे…. फक्त मिसळीची वाफाळती डीश….. आणि ती वेडी तंद्री …. बस… जग इथेच सुरु होऊन इथेच संपावं……”Don’t disturb me…”अशी अलिखित सूचना आपल्या अंगप्रत्यांगातून प्रकट व्हावयास हवी…. गरम गरम रश्श्याने ओतप्रोत साकळलेला चमचा अंतर कापीत अधीर ओष्ठद्वयींपर्यंत येता येता, कुणी भोचकपणा करीत उगाचच अधेमधे काही विचारायला कडमडलंच…. तर तिकडे लक्षही न देता.. “ऊ.. हू हू हू…”असे काहीसे उद्गार काढून “नंतर बोल.. “सुचवावं…. जेणे करुन रसास्वाद घेण्याची समाधी भंग होणार नाही…… तेव्हा मिसळीस समाधान प्राप्त होतं…. खाणा-यासही… नि आपणासही…!!!

लेखिका : सौ. भारती भाईक

प्रस्तुती: सौ. मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गळून पडलेली फुले… – लेखक : अज्ञात ☆ सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ गळून पडलेली फुले… – लेखक : अज्ञात ☆ सौ. अंजली दिलीप गोखले

चालणे ही एक सामान्य क्रिया आहे पण चालण्याचं सौंदर्य हे आहे की आपल्या आजूबाजूला घडत असलेले जीवन पाहता येते.

मी रोज सकाळी फिरायला जातो तेव्हा मला एक वृद्ध गृहस्थ झाडाखाली पडलेली फुले उचलून मंदिरात दर्शनासाठी टोपलीत ठेवताना दिसतात.

त्यांचा हा उपक्रम माझ्यात कुतूहल निर्माण करत होता.

एका सकाळी, मी त्यांना पुन्हा तेच करताना पाहिले आणि मी माझी उत्सुकता शांत करण्याचा निर्णय घेतला.

मी त्यांना गळून पडलेल्या फुलांच्या ध्यासाबद्दल विचारले की इतर वृद्ध लोक तर ताजी फुले तोडतात.

मी त्यांना विचारले, “सर, मी तुम्हाला नेहमी जमिनीवरून ही ताजी पडलेली फुले उचलताना पाहतो.

तुम्ही त्यांचे काय करता? “

“मी ही फुले माझ्या पूजेच्या खोलीत देवतांच्या चरणी अर्पण करतो, ” त्यांनी अतिशय शांतपणे उत्तर दिले.

मी पहिल्यांदाच असं काही ऐकलं होतं.

म्हणून, मी त्यांना पुन्हा विचारले,

“तुमची काही हरकत नसेल, तर मी तुम्हाला विचारू का की, झाडावर सहज तोडता येणारी फुले असताना तूम्ही ही पडलेली फुले देवाला का अर्पण करता? “

त्यांच्या उत्तराने मी थक्क झालो, “मी फुलांना त्यांचा उद्देश पूर्ण करण्यास मदत करतो – त्यांच्या शेवटच्या दिवसात देवासोबत राहण्याचा!

त्यांनाही जीवन आहे; आमच्याप्रमाणे त्यांनाही त्यांच्या शेवटच्या दिवसात देवासोबत राहायचे आहे, नाही का? ” 

त्यांनी मला विचारले.

मी सहमती दर्शविली.

मग ते म्हणाले,

“काही लोक ज्या कळ्या अजून फुलल्या नाहीत अशा कळ्या खुडतात आणि काही फक्त नुकत्याच फुललेल्या कळ्या काढतात, त्यांना त्यांचा सुगंधही सोडू देत नाहीत किंवा त्यांचे जीवन जगू देत नाहीत.

प्रत्येकजण जे सुंदर आहे ते ओरबाडतो आणि त्यातून वनस्पतीचे सौंदर्य काढून घेतो.

मग पहा, ही झाडे कशी दिसतात – रंगहीन आणि निर्जन. “

ते पुढे म्हणाले, “प्रत्येक फुलाचा एक उद्देश असतो, देवासोबत राहण्याचा.

प्रत्येकजण झाडांवर असलेली फुले घेतो, पण मी ती निवडत नाही.

ती गळून पडणे हा फुलांचा दोष नाही.

या म्हातारपणात मी कुणालाही साथ देऊ शकत नाही, पण किमान या फुलांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी मदत करू शकतो. “

मी फक्त होकार दिला, हसलो त्यांना शुभेच्छा दिल्या आणि चालू लागलो.

मी चालत होतो तेव्हा माझे मन धावत होते.

या नव्या प्रेरणेने आणि कल्पनेने मी निश्चय केला की यापुढे पूजेसाठी फक्त पडलेली फुलेच गोळा करावयाची.

दुसऱ्या दिवशी सकाळी फिरण्यासाठी गेलो असता एका झाडाखाली पडलेली फुलं मी फुलं उचलून तळहातावर ठेवली. तळहातावर फुले ठेवताच, मला अंगावर रोमांच आले आणि माझे हृदय धडधडू लागले.

माझ्या शरीरासाठी या फुलांबद्दल मला वाटणारा तो एक वेगळाच अनुभव होता.

मी ती फुले घरी आणली, धुऊन ती कुठे असावीत तिथे म्हणजे परमेश्वराच्या चरणी ठेवली!

हा संपूर्ण अनुभव फक्त अप्रतिम होता.

मला आतून खूप छान वाटलं.

मला असे वाटले की मी कोणाचा तरी जीव वाचवला आहे किंवा एखाद्याला त्याच्या दुःखातून बाहेर येण्यास मदत केली आहे.

फुलांचे असे समाधान मला यापूर्वी कधीच जाणवले नव्हते आणि मला वाटते की मी असेच करत रहावं.

जे अकाली पडले आहेत त्यांना उचलून योग्य जागी ठेवा.

आयुष्यात आपल्याला नेहमी चांगल्या आणि सुंदर लोकांच्या आसपास राहायचे असते.

आपल्या उंचीच्या लोकांबरोबर आपल्याला स्वतःला पहायचे असते आणि जे आपल्या उंचीच्या खाली आहेत, त्यांना आपल्यापेक्षा खाली बघायचे असते.

पण खरे समाधान तेव्हा मिळते जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो, त्यांचे जीवन चांगले बनवतो आणि त्यांना आनंद साजरा करण्यास मदत करतो – मग तो माणूस, प्राणी, पक्षी किंवा इतर कोणत्याही प्रकारचे जीवन असो. मग फुले का नाहीत?

*जे पडले आहेत, पदभ्रष्ट आहेत त्यांना उचला मार्गी लावा आणि पहा तुम्हाला स्वतःला उंचावल्यासारखे वाटेल. *

लेखक : अज्ञात 

© सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “रद्दी…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ “रद्दी…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

एक चीनी महिला चुई दररोज गल्लीबोळातून फिरत रद्दी विकत घ्यायचा व्यवसाय करीत असते. एके दिवशी एक चीनी गृहिणी रद्दी विकताना बरीच घासाघीस करते. चुई भाव वाढवून द्यायला तयार होते. हातगाडीवरील तराजू आणण्यासाठी चुई रस्त्यावर येते आणि त्या गृहिणीच्या मनात पाप येते. ती रद्दीच्या गठ्यात एक जाडजूड विट बेमालुमपणे सरकवून देते. रद्दीचा गठ्ठा विस्कटून न बघताच चुई त्याचे वजन करते आणि पैसे देऊन गठ्ठा घेऊन जाते. 

संध्याकाळी नवरा घरी येतो तेव्हा बायको नटूनथटून तयार झालेली असते. नवर्‍याला म्हणते, आटपा लवकर, आज आपण सिनेमाला जाऊ आणि बाहेरच जेवण करुन येऊ. नवरा म्हणतो, माझ्याकडे पैसे नाहीत, पुढच्या आठवड्यात बघू. बायको म्हणते, माझ्याकडे आहेत पैसे! आज मी घरातली सगळी रद्दी विकली! नवरा लगबगीने आपल्या खोलीत जातो. बरीच शोधाशोध करतो आणि त्रासिक चेहर्‍याने बायकोवर खेकसतो, टेबलावर माझा एक जाडजूड लिफाफा होता, तो कुठाय? तू घेतलास का? बायको म्हणते, तो होय? मी रद्दीत विकून टाकला! नवरा मटकन खाली बसतो. काय केलंस तू हे? अगं, गेल्या काही महिन्यात टेबलाखालून घेतलेले पंधरा लाख होते त्यात? आपल्या घरी रद्दीची वर्गवारी करीत असताना कागदात गुंडाळलेली विट चुईच्या नजरेस पडते. क्षूद्र स्वार्थासाठी लोक किती खालच्या पायरीवर घसरतात, हे बघून ती दुःखी-कष्टी होते. विट बाजुला ठेवते आणि कामाला लागते. तो लिफाफाही तिच्या हाती लागतो. आत पंधरा लाखाच्या कोर्‍या करकरीत नोटा! ती बघतच राहते. ती नोटा लिफाफ्यात होत्या तशा परत घालून, लिफाफा विटेवर ठेऊन शांतपणे झोपी जाते. 

इकडे त्या नवराबायकोला रात्रभर झोप येत नाही. एकमेकांवर खेकसाखेकशी होते. सकाळ होताच त्या रद्दीवालीला शोधून काढले पाहिजे. रद्दीवालीच ती! रद्दीत एक लिफाफा मिळाला आणि त्यात पंधरा लाख मिळाले, हे ती कबूल करील का? त्यातली काही रक्कम तिने खर्च तर केली नसेल ना? पोलिसात तक्रार केली असेल का? पोलिसाचे नाव काढताच बायकोच्या पोटातही गोळा येतो. हरामाचा पैसा बुध्दी भ्रष्ट करतो म्हणतात! झोप कशी येणार? 

दुसर्‍या दिवशी चुई नेहमीप्रमाणे, रद्दी विकत घेणार, उचित दाम देणार, असा पुकारा करत रस्त्यावरुन जात असते. नवरा धावत पळत जाऊन चुईला गाठतो. म्हणतो, काल तू माझ्या बायकोकडून रद्दी घेऊन गेलीस? त्यात तुला एक जाडसर लिफाफा मिळाला का? तुझ्यासाठी तो रद्दीचा भाग असला, तरी माझ्यासाठी तो लिफाफा फार महत्वाचा आहे. चुई त्याला आपादमस्तक न्याहळते. थोडीफार चौकशी करुन लिफाफा त्याच्या हातात ठेवते. तो नोटा मोजून बघतो आणि त्यातली एक नोट चुईला देऊ करतो. चुई त्याला नम्रपणे नकार देते आणि हातगाडी ढकलत पुढे निघून जाते. 

नवरा-बायकोच्या आनंदाला उधान येते. नवरा म्हणतो, नाही तरी माझे हे पंधरा लाख गेलेच होते, घे तुला शाॅपिंगला! रद्दीवाली खरंच बावळट आहे. आयुष्यभर पायपीट करुनही तिला पंधरा लाख मिळायचे नाहीत. ती खोटं बोलली असती, तर मी काय करु शकलो असतो? चोरीचा मामला! बायको म्हणते, अहो, मी पण तुमचीच बायको आहे म्हटलं! कमी समजू नका मला? त्या रद्दीवालीशी आधी घासाघीस करुन भाव वाढवून घेतला आणि नंतर रद्दीत विट सरकवून दहा किलोचे पैसेही लाटले! आहात कुठे? रद्दीवाली खरंच बावळट आहे! 

नवरा-बायकोचे संभाषण ऐकत दाराआड उभी असलेली चुई म्हणते, ही घ्या तुमची विट. काल रद्दीत चुकून आली माझ्याकडे! रद्दीच्या व्यवसायात मी माझ्या आयुष्यभरात पंधरा लाख मिळवू शकेन की नाही, मला माहीत नाही, पण प्रामाणिकपणे जे काही मिळविते, त्यावर मी आयकरही भरते! दिवसभर रद्दी गोळा करत फिरते आणि रात्री शांतपणे झोपी जाते, कारण मी स्वतःला कधीच फसवत नाही! मी समाधानी आहे. तुमच्या घरातली रद्दी बाहेर काढण्यासाठी मला केव्हाही बोलवा. तुमच्या मनातली रद्दी मात्र तुम्हालाच बाहेर काढून फेकून द्यावी लागेल! कारण, ती विकत घेऊ शकत नाही आणि कुणी फुकटही घेणार नाही! …..! 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “शहाण्या माणसांचा क्लास” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “शहाण्या माणसांचा क्लास” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

“अरे, पण गरज काय आहे याची?” 

हे वाक्य ज्यांना योग्यवेळी, योग्य ठिकाणी, योग्य गोष्टीविषयी आणि योग्य व्यक्तीशी बोलताना वापरता येतं ना, ती माणसं शहाणी असतात. जपून वागतात, जपून जगतात आणि जगताना इतरांनाही जपतात.

ऊठसूठ हाॅटेलात जाऊन खाणार नाहीत, सतत बाहेरून पार्सल मागवणार नाहीत, सारखी खरेदीही करणार नाहीत. रेल्वे स्टेशन किंवा एसटी स्टॅन्डवर पहाटे साडेचार किंवा पाच वाजता एकटे उतरले तर अर्धा तास तिथंच थांबतील. भल्या पहाटे जाऊन घरच्यांच्या साखरझोपेचा विचका करणार नाहीत आणि दुप्पट-तिप्पट पैसेही खर्च करणार नाहीत. अर्धा तास थांबतील, बसेस सुरू झाल्या की शांतपणे घरी पोचतील. सकाळचा पहिला चहा घरीच घेतील, सात वाजता आलेला वर्तमानपत्राचा ताजा अंक वाचतील. अर्धा तास वाचवण्यासाठी जिवाचा आटापिटा करून तिप्पट पैसे खर्च करणार नाहीत. पण कुटुंब असेल, लहान बाळ असेल तर असं वागणार नाहीत. रिक्षा करतील, थोडीफार घासाघीस करतील, आणि घरी जातील. हे जगण्यातलं व्यावहारिक शहाणपण पिढ्यानपिढ्या रक्तात मुरलेला एक वर्ग आपल्या समाजात आहे. अनेकजण त्यांना मिडलक्लास म्हणतात, पण माझ्या लेखी ती खरी शहाणी माणसं असतात. त्यांना ‘मजेत जगावं कसं?’ हे समजायला पुस्तक वाचावं लागत नाही, ते मजेतच जगत असतात. किंबहुना, जगण्याचा आस्वाद घेण्याची कला त्यांना जन्मजात अवगत झालेली असते.

आपलं मूल अनवाणी शाळेत जाणार नाही याची काळजी त्यांना असते. ती काळजी वूडलँड, क्राॅक्स, ली कूपर, बाटा यांनी शांत करण्याचा उद्योग ते करत बसत नाहीत. लखानी किंवा पॅरागाॅन ते आनंदानं निवडतात, आनंदानं वापरतात, गरजा पूर्ण करतात आणि मस्त राहतात.

स्वत:ची वाहनं ते स्वत: धुतात, पुसतात. सायकलला स्वत:च आॅईलिंग करतात. घरातल्या पंपानं सायकलच्या टायरमध्ये हवा भरतात. सुटी फुलं आणतील, देवाच्या पूजेचे हार स्वत: तयार करतील. बुटांना पाॅलिश स्वत:च करतील. ते रोज जमणार नसेल तर बाहेरून आल्यावर बूट काढले की, मोज्यानंच ते बूट स्वच्छ पुसतील, आत ठेवतील आणि मग मोज्यांचा जोड धुवायला टाकतील. हे काटकसरीचं जगणं नसतं, हे योग्य जगणं असतं.

ज्या खोलीत कुणी नसेल तिथले लाईट्स आणि पंखे बंद ठेवतात. गरज नसताना घरभर दिवे आणि पंखे विनाकारण चालू ठेवण्याचा शौक त्यांना नसतो. रात्री खिडक्या उघड्या ठेवून झोपतात, एसीची गरज पडत नाही. गरज नसताना ‘बाय वन गेट वन फ्री’ च्या शंभर जाहिराती पाहिल्या तरीही त्यांना काहीही फरक पडत नाही. पण गरज असेल तेव्हा रेमण्ड, सियाराम, अरविंद मिल्स, विमल असंच कापड घेतील. रेडिमेड घेण्यापेक्षा शिवून घेतील. मस्तपैकी चार-पाच वर्षं तरी सहज वापरतील.

घरी कुणी आलं की, पोह्याचा चिवडा, भडंग, खोबऱ्याची वडी किंवा शेंगादाण्याचा-रव्याचा-बेसनाचा लाडू मनापासून देतील आणि नंतर आलं घातलेला कपभर चहा.. (हे सगळे पदार्थ घरीच स्वहस्ते केलेले असतात आणि चहापत्ती घाऊक मार्केटमधून आणलेली असली तर आलं, गवतीचहा, चिमूटभर सुंठ घालून तिला फक्कड रंगत कशी आणायची, हे तंत्र बरोब्बर समजलेलं असतं.) आल्यागेल्याचा, पै-पाहुण्यांचा पाहुणचार मस्त करतात, रिटर्न गिफ्ट म्हणून उगाचच महागड्या गोष्टी देऊन इंप्रेशन मारायला जात नाहीत.

सणावाराला घरी गोड पदार्थ तर होणारच. घरच्या तुपातला शिरा, खीर, चक्का आणून घरी केलेलं श्रीखंड (अनेकदा चक्कासुद्धा घरीच करतात) हे पदार्थ पेटंट असतात. अचानकच गोड खाण्याची हुक्की आलीच तर केळ्याचं शिकरण दोन मिनिटांत तयार..!

घरात कुणी नसेल आणि एकटाच मुलगा किंवा पुरूष जरी असेल तरी स्वत:च्या वेळेपुरती मुगाची खिचडी त्याला करून खाता येते. दुपारच्या उरलेल्या पोळ्यांची वरणफळं त्याला बरोबर जमतात. कालचा उरलेला भात फोडणी देऊन सकाळी खाता येतो. किंवा वेळप्रसंगी दहीपोहे करूनही उदरभरणाची सोय करता येते. त्यासाठी हाॅटेलची पायरी चढण्याची गरजच पडत नाही. ह्या जगण्याला लो प्रोफाईल, मिडलक्लास किंवा चिक्कूपणा म्हणणारी माणसं बिनडोक असतात. कारण,

हे परफेक्ट आत्मनिर्भर जगणं आहे.

 

 

यांच्या घरातले पुरूष दळणं आणतात, वाणसामान आणतात, भाजी आणतात, इस्त्रीचे कपडे लाॅन्ड्रीत नेऊन देतात आणि घेऊनही येतात. रद्दीवाल्याकडे स्वत:च रद्दी घेऊन जातात. स्वत: पानं घेणं आणि जेवण झाल्यानंतर स्वत:चं ताट स्वत: घासणं, फरशी पुसणं यात त्यांना काहीही गैर वाटत नाही. पहिल्या पगारात घेतलेलं घड्याळ ते रिटायर होईपर्यंत छान वापरतात. पाच-सात वर्षं चष्म्याची फ्रेम बदलत्या नंबरनुसार काचा बदलून वापरतात. याच्यात त्यांना कसलाही कमीपणा वाटत नाही.

 

 

मुलाचा पहिला वाढदिवस, पाचवा वाढदिवस खाजगी हाॅल किंवा पार्टी हाॅल घेऊन साजरा-बिजरा करत नाहीत. असल्या कृत्रिम आनंदाची त्यांना गरज नसते. पण मुलांच्या शिक्षणाविषयी मात्र अजिबात तडजोड नसते. अगदी निगुतीनं मुलांना शिकवतात. महागड्या ब्रॅन्डेड गोष्टी चांगल्या असतातच असं नाही, यावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. त्यामुळं, चांगली शाळा ते बरोबर निवडतात आणि मुलांना शिक्षण देतात. मुलांना खाऊनही माजू देत नाहीत आणि टाकूनही माजू देत नाहीत. सापशिडीतल्या ९८ आकड्यावरच्या सापाला घाबरायचं नाही, हे आपल्या मुलांना शिकवायला त्यांना कुठल्याही मोटिव्हेशनल ट्रेनरची गरज भासत नाही, ते स्वत:च खंबीर असतात. आवश्यक तेवढी यथाशक्ती बचत करून, साधी सरळ भरवशाची गुंतवणूक आणि साधा जीवनविमा एवढ्यावर त्यांना सुरक्षित वाटतं. गडगंज श्रीमंत होण्याचा हव्यास ते धरत नाहीत. अनैतिक मार्गानं काहीही कमावण्याचा विचारही करत नाहीत. “जोडोनियां धन उत्तम व्यवहारें, उदास विचारें वेच करीं”

या तुकोबारायांनी सांगितलेल्या पक्क्या धारणेनं जगतात. म्हणून त्यांची वखवख होत नाही, त्यांना भस्म्या होत नाही. षड्रिपूंचा त्रास तर अजिबात नाही..

हेच तर खऱ्या अर्थानं निरामय आयुष्य आहे ना..!

 

 

घरात महागडं इंटिरिअर नसलं तरी, घरी कामाला येणाऱ्या बाईंच्या मुलांच्या वह्यापुस्तकांसाठी मात्र बरोबर पैसे दिले जातात, अगदी न चुकता. सकाळी दारी आलेल्या वासुदेवाला किंवा समर्थ संप्रदायातल्या माधुकरी मागणाऱ्यांना तांदळाचं माप मिळतंच. दरवर्षी दिवाळीला पोस्टमनला शंभराची नोट मिळते. सगळ्या रेषा कशा अगदी समांतर..

कशाचंही तंगडं कशातही अडकत नाही, कसला गुंता नाही, वैचारिक गोंधळ नाही. बेष्ट आयुष्य..!

समंजस आयुष्य..!

विनाशर्त विनातक्रार संपूर्ण स्वीकारलेलं आयुष्य..!

 

 

‘क्रेझ’ या गोष्टीशी यांचा लांबून-लांबून संबंध नसतो. म्हणून यांचे व्याप मर्यादित असतात. आयुष्याकडून फार अपेक्षा नसतात, हट्ट-दुराग्रह तर अजिबातच नाहीत. वर्षाकाठी दिवाळीसारख्या एखाद्-दुसऱ्या प्रसंगी कापड खरेदी वगैरे होते, जमल्यास गुरूपुष्यामृताच्या दिवशी एक ग्रॅम सोनं घरी येतं आणि देवघरात देवासमोर ठेवलं जातं. अट्टाहास कुठलाच नाही. ह्या जगण्याला ते 

‘हा माझा मार्ग एकला’ 

असं म्हणू शकतात, पण 

‘मैं जिंदगी का साथ निभाता चला गया’ 

हे म्हणणं त्यांना साधलेलं असतं. ह्या जगण्याला काय म्हणाल? मिडलक्लास? नाही.

हा तर खरा वरचा क्लास.. विषमभुज त्रिकोणाला सुद्धा समभुज करण्याची अफाट विलक्षण शक्ती ज्यांच्या दृष्टीकोनात ठासून भरली आहे असा क्लास…!

 

 

मला फार आनंद आहे की, मी याच क्लासमधला आहे..

मग कुणी त्याला मिडलक्लास म्हणो किंवा मध्यमवर्गीय..

पण हाच आहे खऱ्या शहाण्या माणसांचा क्लास…

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘आईसारखं…’ — लेखिका : सुश्री उर्मिला देवेन ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर ☆

सौ. बिल्वा शुभम् अकोलकर

?  वाचताना वेचलेले ? 

☆ ‘आईसारखं… — लेखिका : सुश्री उर्मिला देवेन ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर 

“आई, मी ऑफिसला जाते आहे… तुमचं औषध वेळेवर घ्या हं. मोबाईल सोबत ठेवा. “

नम्रता दररोज सकाळी हेच वाक्य पाठ केल्यासारखं बोलायची. आवाज गोड, चेहऱ्यावरचं हास्य हलक्याशा थकव्याने झाकलेलं असायचं. बोलण्यात आदर असायचा पण आपुलकी हरवलेली…

कमला काकू, म्हणजे तिची सासू, खिडकीतून तिला पाहायच्या. ती मागे परतूनही बघत नसायची. कमला काकू सत्तर वर्षांची. पूर्वी शिक्षिका. बोलकी, थोडी रुक्ष, आणि थोडीशी “मी म्हणते तेच खरं” अशा स्वभावाची.

ती नेहमी म्हणायची, “मी सुनेला मुलीसारखं वागवलं! “

आणि नम्रता म्हणायची, “हो, पण कधी आईसारखं काही केलं नाही. “

दोघींच्या मध्ये फारसं काही घडलं नव्हतं. ना मोठं भांडण, ना काही गोडही, पण घरात एक जडसर शांतता कायम असायची. जी बोलण्यातून नाही, तर न बोलण्यातून पाझरत होती. कमला काकुला जणू साऱ्यांची सवय झाली होती. नम्रताही तिचं रोजचं जगणं, फोनवर मिटिंग्स, वेळेवर डबे, ऑफिस

सगळं तिचं व्यवस्थित होतं. तिच्यासाठी “आई म्हणजे आपुलकी, पण सासू म्हणजे शिस्त. ” एवढचं समीकरण तिने मांडलं होतं. त्याला कमला काकूने मोडलेही नव्हते. सुनेने घरची काम करावी आणि सासूने ती बघावी असे कितीतरी वर्षापासून सुरु होते. नम्रता तिच्या राज्यात आनंदी होती, पण कमला काकूचा जीव ह्या शांत नात्यात गुदमरत होता. नम्रतासाठी सासू जसं म्हणेल तसंच ती करायची, मग आपुलकी आणि प्रेम कुठे असणार होतं. कमला काकू जे शोधत होत्या ते त्यांना असं मिळणं शक्य नव्हतं.

एक दिवस त्या घरी एकट्याच होत्या. त्यांच्या खोलीत जुना पसारा काढून बसल्या होत्या. त्यात काही जुने नवऱ्यासोबतचे फोटो, काही तिच्या सासूसोबतचे फोटो, बऱ्याच आठवणी आठवत राहिली… त्या आठवणीत ती सून झाली आणि अलगद आठवण झाली… शब्द बाहेर आले, “मी सासू कशी झाले, मी तर आई आहे… निदान नम्रताच्या नवऱ्याची… त्या नात्याने मी तिच्या आईसारखी होऊ शकते, सासू कशी झाले… ”

त्या दिवशी नम्रता जरा उशिरा घरी आली, नेहमीच्या सवयी प्रमाणे तिने रोजचे प्रश्न केले, “आई औषधी घेतल्या होत्या ना वेळेवर. फिरायला गेल्या होत्या, मला वेळ झाला आज, तुमचा संध्याकाळाचा चहा लगेच आणते. ” तो ‘आई’ हा शब्द कमला काकूला बोचला होता.

नम्रता आधी नियमाप्रमाणे हातपाय धुवायला आणि आवरायला तिच्या खोलीत गेली. आणि कमला काकुने तिच्यासाठी चहा तिच्या खोलीत आणला. तिचा कप तिला देत म्हणाल्या, “आज तुझ्यासाठी केला गं. तू करतेस दररोज माझ्यासाठी. कदाचित माझ्या हातचा चहा तुला आवडणार नाही, पण… आज मी ‘आईसारखं’ काहीतरी करावं वाटलं. “

नम्रता क्षणभर स्तब्ध झाली. ती कपाकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यांत पाणी आलं, जणू आतमध्ये साठवलेली थोडीशी दाट धुके विरून गेली. काकुच्या त्या थकलेल्या चेहऱ्यावर तिला अनेक जाणीवा दिसल्या. हातात असलेला गरम, धुरकट चहाने तिला शांत केले…

“आई… हा चहा फार दिवसांनी प्यायले. माझ्या लहानपणी… आई पण असाच करत असायची. हल्ली असा चहा मिळणे दुर्मिळ… “

त्या दिवशी दोघींच्यामध्ये काहीतरी उमजलं. ते शांत होतं पण एका नवीन नात्यासारखं होतं… नम्रता दुसऱ्या दिवशी ऑफिसला निघाली होती, पण त्या दिवशी जाताना ती मागे वळून म्हणाली,

“आई, संध्याकाळी आपण एकत्र बसून चहा पिऊया. “

कमला काकू हसल्या. खरं हसल्या. कदाचित पहिल्यांदाच…

लेखिका : सुश्री उर्मिला देवेन

प्रस्तुती : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सध्यातरी मी कौरव नंबर “१०१” आहे…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “सध्यातरी मी कौरव नंबर “१०१” आहे…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

मी जर महाभारत काळात जन्माला आलो असतो तर माझा समावेश कौरवांच्या पार्टीतच झाला असता.

कारण..

श्रीकृष्णाची कधी प्रत्यक्षात गाठ पडलीच तर मी त्याला एकमेव प्रश्न हा विचारेन की ” देवाधिदेवा, भगवद्गीता अर्जुनाला सांगण्याऐवजी, दुर्योधनाला आणि दु:शासनाला सांगितली असतीस तर हे महाविनाशी युद्ध टाळता आले असते ना! इतका मोठा संहार झाला नसता. तू असे का केले नाहीस? भगवद्गीतेचे हे दिव्य ज्ञान कौरवांना झाले असते तर महाभारत हे युद्धाच्या तत्त्वज्ञानाऐवजी बंधुभावाच्या, प्रेमाच्या तत्त्वज्ञानाची शिकवण देणारे झाले नसते का? ”

सध्यातरी कृष्णाने प्रत्यक्ष दर्शन देणे शक्य नव्हते. त्यामुळे इंटरनेटच्या जंजाळात मी हा प्रश्न प्रसूत केला. बघताबघता हा प्रश्न प्रचंड व्हायरल झाला. फेसबुक, whatsapp, quora, युट्युब सगळीकडे या प्रश्नाने धुमाकूळ घातला आणि अखेरीस इतक्या ट्रॅफिकमुळे प्रत्यक्ष श्रीकृष्णाला त्याची दखल घ्यावी लागली.

आणि… एके दिवशी मला श्रीकृष्णाचा video कॉल आला.

अक्षयकुमार आणि परेश रावलचा OMG बघितलेला असल्यामुळे, श्रीकृष्ण अगदी साध्या वेशभूषेत येणार हे मला अगोदरच ठाऊक होते.

थेट स्वर्गातून, पृथ्वीवर कॉल लावलेला असल्यामुळे, खूप डेटा खर्च होत असणार, त्यामुळे श्रीकृष्णाने थेट मुद्द्याला हात घातला.

“ वत्सा, कशाला इतके अवघड प्रश्न नेटवर टाकतोस? सगळे ट्रॅफिक जाम झाले. ”

“ देवा, हा अखिल मानवजातीच्या मार्गदर्शक धर्मग्रंथाचा प्रश्न आहे. तुम्ही हे युद्ध टाळण्यासाठी हे ज्ञान कौरवांना दिले असते तर युध्दचं झाले नसते.. हा प्रश्न इंटरनेटच्या ट्रॅफिकपेक्षा कितीतरी महत्वाचा नाही का? ”

“मला उपदेश करू नकोस ” श्रीकृष्णांचा एकदम बदललेला स्वर ऐकून मी भांबावलो.

“ देवा, माझी काय बिशाद तुम्हाला उपदेश करण्याची” मी गयावया केली.

“ वत्सा… अरे तुला नाही म्हणालो. ”

… मला हायसे वाटले.

“ मला उपदेश करू नका… ” असे दुर्योधन मला म्हणाला होता.

… तुला काय वाटते? मी हे युध्द टाळण्यासाठी दुर्योधनाकडे गेलो नसेन? भग्वद्गीतेमधील न्याय अन्याय, नैतिकतेच्या गोष्टी त्याला सांगितल्या नसतील? ”

“काय सांगताय देवा? दुर्योधनाला प्रत्यक्ष तुम्ही गीतेचे ज्ञान सांगून देखील त्याला ते कळाले नाही? तो सरळसरळ तुम्हाला उपदेश करू नका म्हणाला? ”

“ वत्सा, अगदी असेच घडले बघ.

 दुर्योधन म्हणाला,. मला चांगले वाईट, पाप पुण्य, नैतिक अनैतिक सगळ्याचे ज्ञान आहे. सद्वर्तन आणि दुर्वर्तन यातील फरकही मी जाणतो. त्याचा उपदेश मला करू नका. ” 

“ वत्सा, पाप काय आहे हे दुर्योधनच काय तुम्ही सुद्धा जाणता… पण त्यापासून दूर रहाणे तुम्हालाही जमत नाही. अनैतिकता म्हणजे काय हे दुर्योधनही अन् तुम्हीही ओळखता,

पण टाळत नाही. तुमच्यासाठी चांगले काय आहे आणि वाईट काय आहे हे तुम्ही जाणता, पण तुम्ही वाईटाचीच निवड करता. दुर्योधनाने स्वत:च्या वर्तनाची अगतिकता सांगून बदल नाकारला, त्याने स्वत:चा ‘नाकर्तेपणा’ ढालीसारखा वापरला”.

आता मात्र मला दुर्योधनाच्या जागी माझा चेहरा दिसायला लागला.

“मला उपदेश करू नका” वडिलांना उद्देशून हे वाक्य मी शंभर वेळा उच्चारले असेल. मित्रांबरोबर उनाडक्या करणे चुकीचे होते हे मला माहिती होते, पण मी त्याचीच निवड करीत होतो आणि वडिलांना “उपदेश करू नका” असे सांगत होतो.

सकाळी लवकर उठून व्यायामाला जाणे माझ्या फायद्याचे होते हे मला ठावूक होते. पण अंथरुणात लोळत पडणे हे माझे वर्तन होते, आणि “लवकर उठत जा” असे सांगणाऱ्या आईला “उपदेश करू नकोस” असे सांगणारा “दुर्योधन” मीच होतो.

“तंबाखू खाऊ नका, दारू पिऊ नका, हे उपदेश आम्हाला ऐकायचे नाहीत. त्यामुळे शरीराचे नुकसान होते हे आम्हाला ठाऊक आहे पण त्याची अंमलबजावणी आम्हाला करायची नाही कारण आम्ही ‘दुर्योधन’ आहोत. आम्ही कौरव आहोत.

अर्जुन आणि दुर्योधनात हाच फरक होता की, दुर्योधनाने समजत असूनही स्वत:चे वर्तन बदलले नाही आणि अर्जुनाने स्वत:चे वर्तन श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून बदलले…

संस्कार, प्रकृती, राग, श्रेय, प्रिय, प्रतिक्रिया, कर्म याबद्दलच्या संकल्पना जाणून घ्या. कधीतरी स्वत:च्या आतल्या श्रीकृष्णाला प्रश्न विचारा… तरच भगवद्गीता वर्तनात येईल… वाचण्याची इच्छा होईल.

इच्छा होईल तोच सूर्योदय.

… सध्यातरी मी कौरव नंबर “१०१” आहे…

तुम्ही?

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ खेळ पुढे सरणार… – लेखिका : सुश्री मंगला खानोलकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ खेळ पुढे सरणार… – लेखिका : सुश्री मंगला खानोलकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

खेळ पुढे सरणार…!

अलीकडेच एक पोस्ट वाचली. एका एकट्याच राहाणा-या चिनी आजीबाईची. तिने स्वतः, एका नर्सिंगहोममध्ये कायमसाठी राहायला जाण्यापूर्वी लिहिलेली…

‘तिने आता आपल्या आयुष्याच्या कटू सत्याचा स्वीकार केला आहे. आपली मुलं त्यांच्या आयुष्यात गर्क आहेत आणि त्यांच्यावर, स्वतःच्या मुलांना मोठं करण्याची जबाबदारी असल्यामुळे ती आता आपल्या आईची काळजी घ्यायला असमर्थ आहेत..  हे तिला पटतं आहे आणि म्हणून तिने आपलं उर्वरित आयुष्य व्यतीत करण्यासाठी सर्व सोयी असलेल्या नर्सिंगहोम मध्ये कायमचं राहायला जायचा निर्णय घेतलेला आहे. तिथे जाऊन राहाणं हे तसं खूप महागडं असणार आहे. त्यासाठी तिला स्वतःचं रहातं घर विकावं लागणार आहे. आणि ते तिच्या मुलांना मान्यही आहे.’

 – – नर्सिंग होममध्ये तिची एक छोटी खोली असणार आहे. त्यात पलंग, एक कपाट, टेबल, फ्रीज, TV, मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन इतक्याच गोष्टी असणार आहेत. तिचा आयुष्यभराचा संसार…   कपडे, स्वयंपाकाची भांडी, हौसेने घेतलेलं महागडं फर्निचर..  आवड म्हणून घेतलेल्या असंख्य शोभेच्या वस्तू..  वाचनाचा छंद म्हणून घेतलेली विविध विषयांवरची पुस्तकं… ह्या सगळ्या गोष्टींमधून, एका कपाटात मावेल एवढंच सामान ती बरोबर नेऊ शकणार आहे… आणि उरलेल्या ढीगभर सामानाची विल्हेवाट कशी लावायची हा मोठाच प्रश्न आहे… ना तिच्याकडे या सगळ्या गोष्टी विकून टाकण्यासाठी लागणारा वेळ आहे..  ना तेवढी शक्ती आहे… त्यातल्या महागड्या वस्तू कोणाकोणाला भेट म्हणून द्यायचं म्हटलं तरी सुद्धा देणार तरी कोणाला…? अगदी तिची मुलंबाळं.. नातवंडं.. अगदी जवळची माणसं..  ह्यांनाही त्यातलं काहीही नको आहे…  

….   नर्सिंगहोममध्ये जाताना ती फक्त जरुरीपुरती भांडी, थोडे कपडे, काही पुस्तकं आणि आता तिच्यासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या गोष्टी म्हणजे…   स्वतःचं ओळखपत्र, हेल्थ इन्शुरन्स कार्ड, बँकेचं कार्ड..  ज्येष्ठ नागरिक कार्ड…   वगैरे वगळता आणखी काहीही घेऊन जाऊ शकणार नाहीये.

….   आता तिला जाणवतंय की तुम्ही आयुष्यभर खूप प्रसिद्धी, मानपान, यश, बंगले, गाडीघोडे, काहीही मिळवलं असेलही..  पण आयुष्याच्या शेवटच्या दिवसांसाठी, तुम्हाला राहायला फक्त एक खोली..  आणि झोपायला एक बिछाना..  एवढंच लागतं…  

…..   आणि या जगातला मुक्काम हालवून जाताना तर तुम्ही अक्षरशः रिकाम्या हाताने निघून जाणार आहात…!

– – ही post वाचली आणि क्षणभर तर मला काही सुचेचना..  घशाशी आवंढा दाटून आला आणि पोटात कसंसंच व्हायला लागलं. सगळ्या सगळ्या गोष्टींबद्दल अनासक्ती मनात दाटून आली…   सगळं फोल वाटायला लागलं…   स्वतःचा पन्नास वर्षांचा गोळा केलेला संसार डोळ्यासमोर उभा राहिला. खरंतर मी त्यामानाने खूपच कमी हौशी आहे. तरीसुद्धा पन्नास वर्षांत खूप सामान गोळा झालंय. मुली कधीच्या लग्न होऊन गेल्या. त्यांचे कपडे, त्यांच्या सर्व वस्तू त्या घेऊन गेल्या. घरात आम्ही दोघेच उरलो, तरीही घरातली सगळी कपाटं आपली भरलेलीच होती… आता तर मी एकटीच उरले आहे मागे. ना दुकानात जायची इच्छा ना खरेदीची आवड, त्यामुळे नवीन कपडे वगैरे नाहीच येत घरात. पण तरीसुद्धा कपाटं रिकामी पडलेली काही दिसत नाहीयेत.

मी ही post वाचली, तेव्हा घरातला हा पसारा डोळ्यासमोर येऊन धडकलंच. माझ्यासाठी नव्हे तर माझ्या मुलींचा विचार करून. त्या दोघी आपल्या देशातच असत्या तर इतका प्रश्न नव्हता. मी गेल्यावर त्यांनी दहा फे-या घालून घर आवरलं असतं… पण त्या दोघी तर परदेशात. मी गेल्यावर एकदा येतील. नंतर त्या येणार तरी कोणासाठी…? मग त्या एका खेपेत काय काय कामं करतील..? सगळं भंगारवाल्याला देतील कदाचित…   पण आईची आठवण म्हणून काय काय घेऊन जातील…?

….   मला एकदम माझ्या सासूबाई गेल्या, तेव्हाची आठवण झाली. खूप वर्षं लोटली त्यांना जाऊन. त्या गेल्या तेव्हा मी अगदी मनापासून त्यांचा चष्मा घेतला होता, ‘ हा मला त्यांची आठवण म्हणून हवा. ‘ असं वाटून. पण आता तो कधी कुठे गेला ते आठवतही नाही. अगदी आई अण्णांच्याही किती वस्तू मी जपल्या आहेत..? अण्णांची एक वही ठेवली आहे जपून. पण ती देखील इतकी जपून कुठे तरी ठेवली आहे, की मलाही हवी तेव्हा सापडणार नाही…..  मग माझ्या मुली तरी ‘ आईची आठवण ‘ म्हणून काय घेतील…?

फारतर माझी एकेक साडी घेऊन जातील बरोबर…   आणि ती ही त्यांच्या कपड्यांच्या ढिगा-यात, कुठेतरी तळाला अगदी जपून ठेवली जाईल…   सुरुवातीला आठवण आली की ती घडी बाहेर काढतील आणि तिच्यावर प्रेमाने हात फिरवतील…   आणि मग बघता बघता स्वतःच्या संसारात पुन्हा गुंतून जातील.

..  आई बाबांची आठवण येणार नाही असं नव्हे. पण ती आठवण मनातल्या मनात असेल. त्यासाठी आमची एखादी वस्तू बाहेर काढून तिच्यातून आमचा स्पर्श शोधला जाईल असं नाही मला वाटत…   हळूहळू ती साडी तशीच घडीतल्या घडीत जीर्ण होत जाईल…!

– – पाणी नेहमी पुढे पुढेच वाहत जातं ना..? वाहताना खूपशा गोष्टी, आयुष्याच्या वळणावळणांच्या प्रवाहात कुठल्या तरी तीरावरच मागे सुटून जातात..  आणि त्या प्रवाहात शेवटी काही आंबटगोड चवीच फक्त शिल्लक उरतात…  

….   आपल्याला कदाचित आपले शेवटचे दिवस वृध्दाश्रमात किंवा नर्सिंगहोममध्ये नाही घालवावे लागणार…   पण आपणां सर्वांनाच, शेवटच्या प्रवासाला जाताना सर्व धनदौलत..  घरदार..  जीवापाड जपलेल्या वस्तू..  नातीगोती…   आठवणी..  रागलोभ..  प्रेम…   रुसवा..  माया मोह..  सारं सारं इथेच सोडून जायचं आहे.. 

….   आपली मुलं, नातवंडं, आपले प्रियजन, यांच्यात अडकलेला आपला जीव जेव्हा हे शरीर सोडून बाहेर पडेल, त्याक्षणीच आपण या सगळ्या पासून खूप खूप दूर…   एका वेगळ्याच जगात निघून जाणार आहोत….   आणि थोड्या काळानंतर आपली मुलंबाळं, आपली मित्रमंडळी…   सगळे सगळेही आपल्याला विसरून त्यांच्या जीवनात नव्याने रमून जाणार आहेत…!

‘जन पळभर म्हणतील हाय हाय…!’ हे अटळ सत्य आपल्याला स्वतःच्या वागण्यातूनही आयुष्यभर जाणवत आलं आहे…   हा जगाचा नियमच आहे…!

 या खेळातले खेळाडू बाद झाले की कायमसाठी आपल्या आयुष्यातून आणि हळूहळू सर्वांच्या आठवणीतूनही नाहीसे होतात, हे त्रिकालाबाधित सत्य प्रत्येकाने समजून घ्यायचं आहे आणि एकच गोष्ट स्वतःला पुन्हा पुन्हा बजावत राहायची आहे…   

 ठाऊक आहे मला न काही,

 मजवाचुनी अडणार…  

 एक सोंगटी बाजू सारून,

 खेळ पुढे सरणार…!!!

लेखिका : सुश्री मंगला खानोलकर

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकr

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ लहानपणीची अर्धी राहिलेली गोष्ट… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ लहानपणीची अर्धी राहिलेली गोष्ट… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

एक होती चिमणी आणि एक होता कावळा….

चिमणीचं घर होत मेणाचं, याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं….

…. एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाटयाचा वारा सुटला. टप् टप् पाऊस पडू लागला. झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं.

…..   कावळयाच घर होत शेणाचं, ते गेले पाण्यात वाहून, कावळा काकडला. आता कुठे जावं बरं? एवढयात त्याला आठवलं, चिमणीच घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे.

पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. ‘चिऊताई, चिऊताई, दार उघड! ‘ 

चिमणी आतून म्हणाली ‘थांब माझ्या बाळाला काजळ-पावडर लावते’

थोडावेळ थांबून पुन्हा कावळयाने कडी वाजवली ‘चिऊताई, चिऊताई, दार उघड! ‘ 

चिमणी आतून म्हणाली ‘थांब माझ्या बाळाला झोपवते’ 

…. इकडे कावळ्याला खूप भूक लागली होती. पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा! एवढंस तोंड करून कुडकुडत उभा राहिला पण चिमणीने काही केल्या दार उघडले नाही.

गोष्टीचा पूर्ण केलेला उत्तरार्ध – 

चिमणीचे सगळे काम आटोपले. ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की,

‘ अरेच्च्या! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही. ’ 

तिला विलक्षण अपराधी वाटलं. तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती.

ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता.

‘गेला असेल कुठेतरी…   येईल परत’ …. तिने स्वत:च्या मनाची समजूत काढली.

मात्र, रात्र मावळली…   दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता.

चिमणीचं मन आज कशातच रमेना … बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-पावडर करण्यातही नाही … कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची …… 

तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं…   

अनेक दिवस उलटले … चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना.

मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली.

एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला…   

तो ‘कावळ्याचा’ आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला काय आनंद झाला. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला.

…. तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पहाते तर काय! कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता.

कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला,

‘या या चिमणाबाई. तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी? ‘..  कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली,

– ‘तुला राग नाही आला माझा? ‘

– ‘का यावा? ’ 

– ‘मी माझ्यात विश्वात गुंग होते म्हणून? ’

– ‘छे छे! प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं..  जसं तुझं होतं. तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती 

माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली.

माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येउन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोनीही गोष्टी ‘अतिक्रमणा सारख्याच’ घडल्या असत्या नाही का? आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर ‘अतिक्रमण’ करण चूकच नाही का? ..  म्हणून मग मी स्वत:च वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच …. तुझ्या विश्वापासून दूर. ’

– ‘मला एकट करून? अरे, मला सवय झालीय आता तुझी. ’

– ‘चिमणाबाई, या जगात एकट कोणीच नसतं. जेव्हा आपण एकट आहोत असं वाटतं ना तेव्हा तो एकांतच असतो आपला सोबती, जो दाखवत असतो आपल्याला वाट आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची.

मलाही दाखवली त्याने आणि बघ ……. आज मी किती आनंदी आहे … माझ्या ‘घरट्यात’… माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या ‘माझ्या माणसांमध्ये’’

चिमणी नि:शब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला –

– ‘चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल … क्षणाचाही विलंब न करता. ’

चिमणीचे डोळे पाणावले…   भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे…   

पण आज तिच्या पंखात पूर्वीइतकं बळ राहिलं नव्हतं….   

– – – आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाबाई सारखी झालीय.

– म्हणजे?

– म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साद घालतंय हे आपल्या ध्यानीच नसतं.

ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहिण, मित्र, मैत्रीण आई, वडील बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात…   

त्यांची आर्त साद आपल्याला ऐकूच येत नाही

…. म्हणजे ते पोटतिडकीने साद घालतात आणि आपण म्हणतो 

…’ थांब मला जरा करिअर करु दे….   थांब जरा मला आता घर घ्यायचय…   थांब जरा मला आता कार घ्यायचीय … थांब मला काम आहे…   थांब मला विश्रांती घ्यायची आहे…   थांब जरा मला आता …. ‘ 

– – आणि मग ही जंत्री वाढतच जाते.

त्यांची सहन शक्ती संपते … ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात…   त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं…   आपल्या ते लक्षात नसतं आणि जेव्हा येतं तेव्हा ….

….   आपण फार एकटे झालेले असतो….!!

– – – आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर?

तर मला कोणाचीच गरज नाही हा अहंपणा बाळगु नका 

– वेळीच ‘टकटक’ ऐकायला शिका.

…. वेळ प्रत्येकाची येते.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : शुभदा भा. कुलकर्णी 

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares