☆ भक्तीचा उद्गार– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆
☆
सुधीर गाडगीळ यांनी सांगितलेला हा प्रसंग अतिशय हृदयस्पर्शी आहे.
ते सांगतात—पुण्यातील मंडईत संतवाणीचा कार्यक्रम संपत आला होता. शेवटचा अभंग झाला होता. पेटी, तबला आवरले जात होते. कलाकार उठू लागले होते. भीमसेन जोशीही शांतपणे उभे राहून स्टेजवरून उतरण्याच्या तयारीत होते. सभागृहात ‘कार्यक्रम संपला’ अशीच भावना होती.
तेवढ्यात, प्रेक्षकांमधून एक हमाल पुढे आला. साधा, घामेजलेला, काम करून आलेला. हात जोडून, थोड्या संकोचाने तो म्हणाला—
“जोशीबुवा… ‘तीर्थ विठ्ठल’ म्हणाल का? ”
क्षणभर सगळे थांबले. कार्यक्रम संपलाच होता. साथीदारांनी वाद्यं आवरली होती. अशा वेळी अभंग म्हणणं म्हणजे पुन्हा सगळं उलगडणं. काहींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं.
पण भीमसेन जोशी थांबले. त्यांनी त्या हमालाकडे नीट पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर आग्रह नव्हता, हट्ट नव्हता—फक्त भक्ती होती. जोशीबुवांनी क्षणाचाही विचार न करता मागे वळून म्हटलं, “अहो, पेटी-तबला ठेवू नका… तीर्थ विठ्ठल म्हणूया. ”
सगळे स्तब्ध झाले.
पुन्हा पेटी उघडली गेली. तबल्यावर हात बसला. आणि मग भीमसेन जोशींनी
“तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल…”
सुरू केलं.
सुधीर गाडगीळ सांगतात—तो अभंग मैफिलीचा भाग नव्हता; तो करुणेचा, माणुसकीचा आणि भक्तीचा उद्गार होता. आवाजात विलक्षण आर्तता होती. जणू त्या हमालाच्या आयुष्याचं ओझं त्या स्वरांत उतरलं होतं. हमाल रडत उभा होता. प्रेक्षक नुसते ऐकत नव्हते—ते अनुभवत होते.
अभंग संपल्यावर टाळ्या नव्हत्या. फक्त गहिरं मौन होतं.
गाडगीळ शेवटी म्हणतात—
“त्या दिवशी कळलं, भीमसेन जोशी हे मोठे गायक होतेच; पण त्याहून मोठं होतं त्यांचं मन. कार्यक्रम संपला होता, पण भक्ती संपलेली नव्हती—आणि जोशीबुवांनी ती ओळखली.”
हा प्रसंग, संतवाणी म्हणजे नेमकं काय, हे कायमचं समजावून जातो.
☆
लेखक: अज्ञात
प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
‘कुब्जा’ हे नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर येते ती मथुरेतील कंसाची दासी. कुरुप, कुबड असलेली एक वृद्धा. कंसासाठी ती चंदन घेऊन जात असते. वाटेत कृष्ण भेटतो. म्हणतो, ‘सुंदरी, मला देशील चंदन? ’
कुणी तरी तिला प्रथमच ‘सुंदरी’ म्हणाले होते. तिने कृष्णाला चंदनाचा लेप लावला. कृष्ण कुणाकडून तसेच काही कसे घेईल? त्याने कुब्जेच्या हनुवटीला धरून ती वर उचलली आणि कुब्जा खरेच सुंदर झाली.
भक्तांना हे सहजच पटते. चिकित्सकांना ही निव्वळ कल्पित कहाणी वाटते. मला या कथेतून वेगळाच आनंद मिळतो.
कुणी असुंदर असेल तर मान उंचावून कसे वावरेल? त्यात दासी असल्याने तिला ‘तोंड वर करायचा’ अधिकार तरी कसा असेल? कृष्णाने कुब्जेची हनुवटी उंचावली. तिला ताठ व्हायला शिकवले. कुरूप असो की दासी असो; मान वर करूनच जगले पाहिजे, हे भान कृष्णाने तिला दिले.
‘दिसण्या-असण्यातून’ न्यूनगंड निर्माण होऊ न देता आपणही दिमाखात जगू शकतो, हे दाखवण्याची संधी ईश्वराने किती विश्वासाने आपल्याला दिली आहे. कुब्जा सुंदर झाली की नाही हे मला ठाऊक नाही; पण तिच्या मनातली असुंदरतेची जाणीव कृष्णाने दूर केली, असे मला वाटते.
इकडे विठुरायानेही कंबरेवर हात ठेवून, थाटात उभे राहत हे दाखवून दिले की, सौंदर्य नाही तर औदार्य महत्त्वाचे. सौंदर्य येते आणि वयोमानाने ओसरतेही.
औदार्य अठ्ठावीस युगे टवटवीतच राहते.
खूपदा भक्ती करणारेही जेव्हा म्हणतात की, देवा-धर्माचे इतके आम्ही करतो; पण ईश्वराची कृपा काही होत नाही.
पण, पारमार्थिक साधना म्हणजे जग बदलणे नाही, तर आपला दृष्टिकोन बदलणे. हे समजले की आपल्या वृत्तीच्या कुब्जेला सुंदर व्हायला वेळच लागत नाही.
रखरखत्या उन्हात कुठून कोकीळ कुजन ऐकू आले की मनाला निवलेपण जाणवते ना?
पहिल्या पावसाने आसमंतभर दरवळणाऱ्या मातीच्या गंधाने चित्ताला हरखून जायला होते की नाही?
तान्हे मूल कुणाचेही असो; गर्दी-गोंधळातही आपल्याकडे बघून गोड हसते, तेव्हा आपल्याही ओठांवर स्मितरेषा दरवळते की नाही?
आपल्याबाबत हे घडते तेव्हा निश्चित मानावे की आपल्याला कृष्णस्पर्श झाला आहे.
अंतरीची ही निरपेक्ष संवेदनशीलता हाच कृष्णाचा साक्षात्कार.
मनातली असुंदरतेची, अपूर्णतेची जाणीव संपली की सारे सुंदरच आहे. हे जाणवते.
माझ्या कृष्णाने निर्माण केलेले काहीही असुंदर असूच शकत नाही, ही श्रद्धा दृढ असली की झाले!
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी` |
कर कटिवरी ठेवूनीया ||
लेखक:अज्ञात
प्रस्तुती:सौ.राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘तंत्रज्ञानाचा असाही उपयोग…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆
☆
अक्षय हा एक आयटी इंजिनिअर. पुण्याच्या हिंजवडी भागात राहायचा. त्याचा स्वभाव असा होता की, कुठेही अन्याय झाला की त्याला राग यायचा.
अक्षयच्या ऑफिसच्या खाली एक म्हातारी आजी, ‘सकुबाई’, भाजी विकायला बसायच्या. त्यांचं वय ७० च्या घरात होतं, पण तरीही त्या ताजी भाजी विकायच्या.
अक्षय नेहमी त्यांच्याकडून भाजी घ्यायचा. पण त्याला एक गोष्ट खटकायची.
जेव्हा कधी अक्षय पेमेंट करायला फोन काढायचा, तेव्हा आजी गळ्यात लटकवलेला एक ‘QR Code’ पुढे करायच्या.
अक्षयने स्कॅन केल्यावर त्यावर नाव यायचं – “जीवन हॉस्पिटल ट्रस्ट”.
अक्षयला शंका यायची. ‘एखाद्या भाजीवालीच्या खात्याचं नाव हॉस्पिटलच्या नावाने कसं असू शकतं? ‘
त्याला वाटलं, नक्कीच एखादा दलाल किंवा एजंट या आजीला फसवतोय. तिच्या कमाईचे पैसे परस्पर हॉस्पिटल किंवा ट्रस्टच्या नावाखाली लाटतोय आणि या अडाणी म्हातारीला काहीच समजत नाहीये.
एका संध्याकाळी अक्षयला राहवलं नाही. त्याने भाजी घेतली आणि स्कॅन करताना पुन्हा तेच नाव आलं.
अक्षय चिडला. तो आजींना म्हणाला, “आजी, तुम्हाला समजतं का? हा कोड तुमचा नाहीये. तुमचे पैसे कोणा दुसऱ्यालाच जातायत. कोण आहे हा एजंट? का त्याला पैसे देताय? “
सकुबाई घाबरल्या. त्या म्हणाल्या, “नाही बाळा… एजंट नाहीये कोणी. तू पेमेंट कर ना बाबा. “
अक्षय म्हणाला, “नाही, मी करणार नाही. जोपर्यंत तुम्ही मला खरं सांगत नाही, की हा ‘घोटाळा’ काय आहे, तोपर्यंत मी तुम्हाला एक रुपया देणार नाही. आणि उद्या पोलिसात तक्रार करेन की एक म्हातारी फसवली जातेय. “
‘पोलीस’ शब्द ऐकताच सकुबाईंच्या हातातली भाजी खाली पडली. त्या रडू लागल्या.
त्या म्हणाल्या, “नको रे बाबा… पोलिसात नको जाऊस. सांगते तुला खरं. “
सकुबाईंनी पदराने डोळे पुसले आणि म्हणाल्या,
“बाळा, हा कोड माझा नाही, आणि पैसे मला मिळतही नाहीत. हा कोड समोरच्या ‘जीवन हॉस्पिटल’ च्या अकाउंटचा आहे. “
अक्षय गोंधळला. “पण का? तुम्ही दिवसभर उन्हात बसून कष्ट करता, आणि पैसे हॉस्पिटलला का? “
सकुबाई म्हणाल्या, “माझा ६ वर्षांचा नातू आहे, ‘मनू’. त्याचे आई-बाप कोरोनात वारले. तेव्हापासून तो माझ्याच जवळ आहे.
सहा महिन्यांपूर्वी त्याचे दोन्ही किडनी निकामी (Kidney Fail) झाल्या. त्याला आठवड्यातून दोनदा डायलिसिस करावं लागतं.
माझ्याकडे पैसे नाहीत रे बाळा. मी डॉक्टरांच्या पाया पडले.
तेव्हा तिथल्या एका चांगल्या डॉक्टरने सांगितलं की, ‘आजी, उपचाराचा खर्च ट्रस्ट करेल, पण औषधांचा खर्च तुला करावा लागेल. ‘
त्यांनीच मला हा बोर्ड बनवून दिला. मी गिऱ्हाईकाला सांगते की यावर पैसे टाका. जेवढे पैसे या कोडवर जमा होतात, ते थेट हॉस्पिटलला जातात आणि त्यातून माझ्या नातवाची औषधं येतात.
माझं काय रे? मी दिवसभर एक वडापाव खाऊन जगू शकते. पण जर मी रोख पैसे घेतले, तर कदाचित मला भुकेचा मोह होईल आणि मी ते पैसे खाण्यावर खर्च करेन. म्हणून मी ठरवलंय… हातात पैसा घ्यायचाच नाही. जे येईल ते थेट नातवाच्या जिवासाठी जाईल. “
हे ऐकून अक्षय सुन्न झाला.
त्याला वाटत होतं की आजी फसवल्या जात आहेत, पण इथे तर त्या एखाद्या ‘योद्ध्यासारख्या’ लढत होत्या. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन, पैशाला स्पर्शही न करता त्या फक्त एका QR कोडच्या भरवशावर नातवाचा जीव वाचवत होत्या.
अक्षयने शांतपणे आपला फोन खिशात ठेवला.
त्याने आजींना विचारलं, “आजी, नातवाचं पूर्ण ऑपरेशन करायला किती खर्च येईल? “
आजी म्हणाल्या, “डॉक्टर म्हणालेत ५ लाख लागतील. आतापर्यंत १० हजार जमा झालेत. मरेपर्यंत जमवेन, पण नातवाला वाचवेन. “
अक्षयने त्याच क्षणी आपल्या ऑफिसच्या ग्रुपवर आणि मित्रांना हा प्रसंग मेसेज केला. आजींचा फोटो आणि तो QR कोड व्हायरल केला.
पुढच्या २४ तासांत, त्या QR कोडवर ५ लाख नाही, तर १५ लाख रुपये जमा झाले.
दुसऱ्या दिवशी अक्षय जेव्हा भाजी घ्यायला गेला, तेव्हा आजी तिथे नव्हत्या.
त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. मनूच्या ऑपरेशनची तयारी चालू होती. अक्षय तिथे गेला. त्याला बघताच सकुबाईंनी त्याचे पाय धरले.
“बाळा, तू देवदूत बनून आलास. आज माझ्या नातवाला नवीन आयुष्य मिळालं. “
अक्षयने आजींना उठवलं आणि म्हणाला, “आजी, देवदूत मी नाही, तुम्ही आहात. ज्यांनी शिकवलं की, तंत्रज्ञान (Technology) फक्त चॅटिंगसाठी नाही, तर कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी सुद्धा वापरता येतं. “
आपण अनेकदा समोरच्या गोष्टी बघून चुकीचे अंदाज (Judge) लावतो. पण त्यामागे एक मोठं सत्य असू शकतं. तंत्रज्ञानाचा वापर जर चांगल्या मनाने केला, तर एका क्लिकवर कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. मदत करायला खिसा नाही, मन श्रीमंत असावं लागतं.
*
लेखक: अज्ञात
प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
नुकतेच KBC Junior 2025 संपले. आजकालच्या मुलांचे सर्व विषयांवरील व्यापक ज्ञान पाहून आपण थक्क होतोच; पण ज्ञानापेक्षा अधिक भावून जातो तो त्यांचा confidence, बिनधास्त बोलणे, खदखदून हसणे आणि तो निरागस innocence. सरळसोट, कुठलाही आडपडदा नाही… खूप छान वाटतं.
अशाच एका भागात एक दहा- बारा वर्षांची चिमुरडी आली होती. काही प्रश्नांनंतर गप्पा मारताना अमिताभ बच्चन तिच्यावर खूश झाले आणि त्यांनी प्रेमाने आशीर्वाद दिला, “चिरंजीवी भव. ”
ती चिमुरडी आधी नम्रपणे “Thank you, sir” म्हणाली. पण मग… कथेमध्ये ट्विस्ट आला.
ती अगदी बिनधास्तपणे म्हणाली,
“Thank you, sir! लेकिन मैं चिरंजीवी नहीं बनना चाहती. म्हातारपणी हात-पाय दुखतात, कंबर दुखते, नीट चालता येत नाही, काठी लागते. काही लोक bedridden होतात, तर काहींना कायम मदतनीस लागतो. त्यापेक्षा मला वेळेवर exit घ्यायला आवडेल. आज नाही तर उद्या exit घ्यायचंच आहे, तो मुझे time पे exit लेना हैं”. अमिताभ बच्चन पण ह्या उत्तराने थक्क झाले.
इतक्यावरच ती थांबली नाही. पुढे ती अमिताभ बच्चन यांना म्हणाली,
“आप हो जाओ चिरंजीव. आपके पास इलाज करने के लिये पैसा है. आप चिरंजीव हो गये, तो भी ठीक. ”
क्षणभर सगळेच स्तब्ध झाले. कदाचित तिने कुणाचंतरी आजारपण अगदी जवळून पाहिलं असेल. आजारपणातली हतबलता बघितली असेल – आजारी व्यक्तीची अणि कुटुंबाचीसुद्धा.
पण तरीही… ही Gen Alpha काहीतरी वेगळीच आहे, हे नक्की.
तिच्या या बोलण्याने मला ‘इच्छा मरण’ या संकल्पनेची आठवण झाली. नाव ऐकतानादेखील आपल्याला ती संकल्पना अजूनही विचित्र, अस्वस्थ करणारी वाटते. पण प्रत्यक्षात काही देशांमध्ये euthanasia कायदेशीर आहे—ठरावीक नियम आणि अटींसह. नेदरलॅंड, बेल्जियम, लक्झेम्बर्ग, कॅनडा, कोलंबिया स्पेन, न्यूझीलंड, पोर्तुगाल तसेच ऑस्ट्रेलिया आणि यूएसमधील काही states मध्ये terminal illness असलेल्या रुग्णांसाठी हा पर्याय उपलब्ध आहे. आपल्या देशात अरुणा शानबागच्या वेळी हा मुद्दा उठला होता. आयुष्यातली बेचाळीस वर्ष… बेचाळीस वर्ष ……
पण आज ह्या चिमुरडीच्या बोलण्याने मनात एक विचार आला. किमान इतकं तरी करता आलं पाहिजे की आपण स्वतःच आधीच जाहीर करू शकू—
एका ठरावीक वयानंतर किंवा ठरावीक परिस्थितीत मला ventilator वर ठेवू नका किंवा कृत्रिमरीत्या जगवू नका.
असं एखादं will किंवा living directive असणं किती दिलासादायक ठरेल!
यामुळे आपल्या पुढच्या पिढीला निर्णय घ्यायला सोपं जाईल…
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे—
त्यांच्या मनावर कधीही guiltचं ओझं राहणार नाही.
आपण नेहमी “आई-वडिलांसाठी काहीही करायला तयार आहोत, ” असं म्हणतो. पण कधी कधी काहीही न करणे हाच सर्वात मोठा करुणेचा निर्णय असू शकतो, हे स्वीकारायला आपल्याला अजून वेळ लागेल. आज वैद्यकीय प्रगतीमुळे आयुष्य वाढवता येतंय, पण प्रश्न असा आहे की—फक्त श्वास चालू ठेवणं म्हणजे जगणं का?
जगणं म्हणजे आठवणी, संवाद, स्वाभिमान, स्वतःच्या शरीरावर आणि निर्णयांवरचा अधिकार. ते सगळं हरवल्यावर फक्त मशीनवर अवलंबून असलेलं अस्तित्व आपण “जीवन” म्हणू शकतो का? कदाचित हीच पिढी हा प्रश्न निर्भीडपणे विचारेल.
त्या चिमुरडीने ‘इच्छा मरण’ हा शब्द वापरला नाही. तिने फक्त वेळेवर exit घ्यायची इच्छा व्यक्त केली. किती साधं, किती स्पष्ट आणि तरीही किती खोल! मृत्यूची भीती नसून, वेदनांची आणि परावलंबित्वाची भीती तिने मांडली होती.
उद्या हीच पिढी policy बनवेल, कायदे ठरवेल, आणि “जगण्याचा अर्थ” नव्याने define करेल. तेव्हा कदाचित ‘इच्छा मरण’ ही संकल्पना भीतीदायक न वाटता, करुणेची, समजुतीची आणि सन्मानाची भाषा वाटेल.
आणि तेव्हा कदाचित ह्या वाक्याचा खरा अर्थ आपण लावू…
“बाबू मोशाय! ज़िंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं! ”
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: सौ. शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘वडिलांचा नकार…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै☆
☆
“मॅडम, तुमची फ्लाईट दोन तासात आहे… ” पीएने आठवण करून दिली. ईशाने डोळ्यावरचा चष्मा काढला. लंडनच्या ५० व्या मजल्यावरून खाली बघताना तिला आज खूप रिकामं वाटत होतं. तिच्या वडिलांचं, सदाशिवरावांचं काल रात्री पुण्यात निधन झालं होतं.
ईशा एक यशस्वी बिझनेस वूमन होती. पण गेल्या १० वर्षांत ती एकदाही वडिलांना भेटायला भारतात आली नव्हती. कारण? कारण होता १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ दिवस.
ईशाला अमेरिकेतल्या मोठ्या युनिव्हर्सिटीत ऍडमिशन मिळाली होती. फी होती २५ लाख रुपये. सदाशिवराव एक साधे कारकून. ईशाने हट्ट धरला होता, “बाबा, लोन काढा, घर गहाण ठेवा, पण मला अमेरिकेला जायचंच आहे. “
सदाशिवरावांनी स्पष्ट नकार दिला होता.
“ईशा, आपली ऐपत नाही ग. मी घर गहाण ठेवू शकत नाही. तुझं लग्न, तुझा भाऊ, म्हातारपण… मी रिस्क घेऊ शकत नाही. “
ईशा संतापली होती.
“तुम्ही भित्रे आहात! तुम्हाला माझ्या प्रगतीची जळजळ होते. मला तुमची मुलगी म्हणवून घ्यायची लाज वाटते. “
असं म्हणून ईशाने घर सोडलं होतं.
तिने रागाच्या भरात एका ट्रस्टकडून स्कॉलरशिप मिळवली आणि ती अमेरिकेला निघून गेली. जाताना तिने बापाच्या तोंडाकडे पाहिलंही नव्हतं.
गेल्या १० वर्षात तिने स्वतःला सिद्ध केलं, करोडो रुपये कमावले, पण बापाला एक फोनही केला नाही.
वर्तमान:
ईशा पुण्यात पोहोचली. जुनाट वाडा तसाच होता. दारात मोजकी लोकं होती. सदाशिवरावांचा देह अंगणात ठेवला होता. ईशाने पाहिलं, बापाच्या अंगावरचा सदरा जुनाच होता, जो १० वर्षांपूर्वी तिने पाहिला होता.
तिला रडू आलं नाही, फक्त एक विचित्र ओझं वाटलं. विधी उरकले. लोकं पांगली. शेवटी घरात ईशा आणि सदाशिवरावांचे जुने मित्र, वकील देशपांडे काका उरले. देशपांडे काकांनी ईशाच्या हातात एक जुनी, फाटकी डायरी आणि एक पासबूक दिलं.
“ईशा, सदाने हे तुझ्यासाठी ठेवलंय. “
ईशाने उपहासाने विचारले, “काय असणार यात? हिशोब? की मी किती वाईट वागले याच्या तक्रारी?”
काका गंभीर झाले. “वाच तू. तुला काही प्रश्नांची उत्तरं मिळतील. “
ईशाने डायरी उघडली. हळूहळू वाचू लागली.
काहीवेळाने आलं ते पान – तारीख १० वर्षांपूर्वीची.
“आज ईशा रागावून गेली. ती मला भित्रा म्हणाली. पण तिला कसं सांगू, की ज्या घराला गहाण ठेवायला ती सांगत होती, ते घर तर मी तिच्या इंजिनिअरिंगच्या वेळीच विकलं होतं. आता आम्ही भाड्याच्या घरात राहतोय, हे तिला कळलं असतं तर तिला गिल्ट (अपराधीपणा) वाटला असता. म्हणून मी खोटं बोललो. “
ईशाच्या हाताला कंप सुटला. तिने पुढचं पान उलटलं. “आज ईशाला अमेरिकेच्या ‘ज्ञानदीप ट्रस्ट’ ची २० लाखांची स्कॉलरशिप मिळाली. ती खूप खूश आहे. तिला वाटतंय, तिच्या हुशारीवर मिळाली. बरंच झालं. तिला हे कधीच कळू नये की ‘ज्ञानदीप ट्रस्ट’ मध्ये मी माझ्या PF चे सगळे पैसे, आणि गावी असलेली वडिलोपार्जित जमीन विकून आलेले पैसे जमा केलेत. तिला वाटेल, बापाने मदत नाही केली. ती माझा तिरस्कार करेल… पण चालेल. माझा तिरस्कार करून का होईना, पण ती जिद्दीने शिकेल. ती माझ्या उपकाराखाली दबली असती तर आकाशात उडू शकली नसती. “
ईशाच्या पायाखालची जमीन सरकली. ती ज्याला ‘स्कॉलरशिप’ समजत होती, ते तिच्या बापाचं रक्त आणि घाम होतं?
ज्या बापाला तिने ‘भित्रा’ आणि ‘कंजूस’ म्हटलं होतं, त्याने स्वतःचं म्हातारपण विकून तिचं भविष्य विकत घेतलं होतं?
ती रडत रडत शेवटच्या पानावर आली. तारीख – २ दिवसांपूर्वीची.
”ईशा, आज डॉक्टर म्हणाले- माझ्याकडे २ दिवस आहेत. तू खूप मोठी झाली आहेस. टीव्हीवर तुझा फोटो बघतो तेव्हा छाती अभिमानाने फुलून येते. बाळा, तुझा राग अजून गेला नसेल, पण एक सांगतो… मी तुला पैसे दिले नाहीत, असं नाटक केलं, कारण तुला ‘बापाच्या पैशावर जगणारी मुलगी’ नाही, तर ‘स्वतःच्या हिंमतीवर उभी राहिलेली स्त्री’ व्हायचं होतं. तू जिंकलीस बाळा. मी हरलो, पण मी आनंदाने हरलो.
फक्त एक खंत आहे… मरताना एकदा तुला डोळे भरून बघायचं होतं.
तुझा ‘कंजूस’ बाबा. “
ईशाने डायरी छातीशी कवटाळली. ती जमिनीवर कोसळली आणि ओक्साबोक्शी रडू लागली.
“बाबा… बाबा उठा ना… मला माफ करा… मी चुकले… “
तिचा आक्रोश त्या रिकाम्या घरात घुमत होता. आज तिच्याकडे करोडो रुपये होते, जगातल कुठलंही सुख ती विकत घेऊ शकत होती.
पण ज्या माणसाने स्वतःची राख करून तिला प्रकाश दिला होता, त्या बापाची एक ‘भेट’ आता ती जगातल्या कुठल्याच दौलतीने विकत घेऊ शकत नव्हती. बाहेर देशपांडे काका डोळे पुसत होते.
त्यांना माहिती होतं, सदाशिवरावांनी शेवटचे १० वर्षे फक्त ‘चटणी-भाकरी’ खाऊन दिवस काढले होते, जेणेकरून ईशाला परदेशात कधी पैशाची कमी पडू नये म्हणून ते गुपचूप तिच्या खात्यात पैसे पाठवत होते.
ईशाला आता कळलं होतं…
बाप कधीच गरीब नसतो, फक्त त्याची श्रीमंती मोजायची ताकद आपल्याकडे नसते.
आई-वडिलांच्या नकारामागे अनेकदा असा त्याग लपलेला असतो, जो आपल्याला उशिरा समजतो. जोवर ते आहेत, तोवर त्यांची कदर करा. कारण एकदा वेळ निघून गेली, की पश्चातापाशिवाय हाती काहीच उरत नाही.
☆
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: श्री. ब्रह्मानंद पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “तुमची मैत्री कुठे होती?” – लेखक : अज्ञात☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
उद्धवाने कृष्णाला विचारलेला कठोर प्रश्न: “तुमची मैत्री कुठे होती? ”
महाभारत युद्धानंतर उद्धवाने श्रीकृष्णासमोर तो प्रश्न ठेवला, जो आजही आपल्या सर्वांच्या मनात उमटतो. हा संवाद केवळ एक कथा नसून, जीवन जगण्याचा एक अत्यंत गहन ‘मॅनेजमेंट लेसन’ आहे.
“हे माधवा! तुम्ही म्हणता, की खरा मित्र तोच, जो न मागता मदत करतो. मग पांडवांबरोबर असे का घडले?
युधिष्ठिरांना जुगार खेळण्यापासून तुम्ही का थांबवले नाही?
त्या फाशांना धर्मराजाच्या बाजूने का वळवले नाही?
आणि द्रौपदीचा सभेत अपमान होत असताना, तिच्या चीरहरणाची पराकाष्ठा होईपर्यंत तुम्ही वाट का पाहिली?
हीच का तुमच्या मैत्रीची व्याख्या? ”
भगवान मंद स्मित करून म्हणाले,
“उद्धवा, संसारात विजय त्याचाच होतो ज्याच्याकडे विवेक असतो.
दुर्योधनाकडे विवेक होता—त्याने स्वतः न खेळता शकुनीला पुढे केलं. युधिष्ठिरही विवेकाने वागून, स्वतःऐवजी मला खेळायला सांगू शकले असते. सांग, जर माझ्यात आणि शकुनीत खेळ झाला असता, तर विजय कुणाचा झाला असता?
धर्मराजांनी मला विनंती केली होती, की बोलावल्याशिवाय सभेत यायचे नाही.
त्यांना स्वतःचा पराभव माझ्यापासून लपवायचा होता. मी त्यांच्या त्या विनंतीच्या मर्यादेत बांधला गेलो आणि बाहेरच उभा राहिलो. ते हरत गेले, पण मला आठवण्याऐवजी फक्त आपल्या नशिबालाच दोष देत राहिले.
द्रौपदीला जेव्हा सभेत ओढून आणले गेले,
तेव्हाही तिचा स्वतःच्या शक्तीवर आणि पांडवांवर विश्वास होता. पण ज्या क्षणी तिने स्वतःवरील आधार सोडून, पूर्ण शरणागतीने हाक मारली—
‘हे हरि! अभय दे, कृष्णा! ’—
त्या क्षणीच मी प्रकट झालो. सांग उद्धवा, उशीर माझ्याकडून झाला होता की तिच्या पुकारण्यात? ”
उद्धवाने टोचून विचारले,
“म्हणजे तुम्ही फक्त बोलावल्यावरच येता? शांतपणे सगळं पाहत राहता? ”
कृष्ण म्हणाले,
“उद्धवा, सृष्टी कर्मफलाच्या नियमावर चालते.
मी हस्तक्षेप करत नाही; मी केवळ साक्षी आहे. प्रत्येक क्षणी तुमच्याजवळ उभा राहून तुम्हाला पाहतो—हाच माझे धर्म आहे. ”
उद्धवाने पुन्हा प्रश्न केला,
“वा! म्हणजे आम्ही पाप करत राहायचे आणि तुम्ही फक्त पाहत बसायचे? ”
तेव्हा भगवानांनी मर्म सांगितले:
“उद्धवा, ज्या क्षणी तुला हे जाणवेल की ‘मी’ तुला पाहतो आहे,
त्या क्षणी तू कोणतेही चुकीचे कृत्य करू शकशील का?
मनुष्य पाप तेव्हाच करतो, जेव्हा त्याला वाटते की त्याला कोणीही पाहत नाही.
युधिष्ठिरांची चूकही हीच होती. “
उद्धव निरुत्तर झाले.
हा संवाद आपल्याला हे शिकवतो की—
ईश्वराची अनुपस्थिती पाप नाही,
तर ईश्वराच्या उपस्थितीचे विस्मरण हेच पापाचा खरं मूळ आहे.
जर आपण प्रत्येक क्षणी त्याला आपल्या सोबत अनुभवले,
तर जीवन आपोआप दिव्य होऊन जाईल.
☆
लेखक: अज्ञात
प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “शून्य मार्क…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆
रशियाच्या शिक्षण पद्धतीत परीक्षेचा कमाल गुण ५ असतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे—एखाद्या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिका पूर्णपणे कोरी दिली तरी त्याला २ गुण दिले जातात.
मॉस्को विद्यापीठात शिकायला गेलो, तेव्हा पहिल्याच दिवशी हे कळल्यावर मी अक्षरशः चकित झालो. मला ते अजिबात तर्कसंगत वाटले नाही.
कोणी काहीही लिहिले नाही, तर त्याला शून्यच मिळायला नको का?
कुतूहलापोटी मी माझे प्राध्यापक डॉ. थिओडोर मेद्रायेव यांना विचारले,
“सर, एखादा विद्यार्थी काहीही लिहित नाही, तरी त्याला २ गुण देणे कसे योग्य आहे?”
डॉ. मेद्रायेव हसले. शांत आणि विचारपूर्वक आवाजात ते म्हणाले,
“शून्य म्हणजे अस्तित्वच नसणे. एखादी व्यक्ती प्रयत्न करत असताना ती शून्य कशी असू शकते? जरा विचार कर—फक्त वर्गात येण्यासाठीही विद्यार्थी किती प्रयत्न करतो. कदाचित पहाटे उठून, कडाक्याच्या थंडीत, लांबचा प्रवास करून, बस-ट्राम-ट्रेनमध्ये उभा राहून तो इथे आला असेल.
उत्तरपत्रिका कोरी असली तरी तो आला, याचा अर्थ त्याने प्रयत्न केला आहे. मग मी त्याला शून्य कसा देऊ?”
ते पुढे म्हणाले,
“कदाचित तो उत्तर लिहू शकला नसेल. पण म्हणून त्याचे सगळे प्रयत्न मिटवून टाकायचे का?
रात्रभर जागून केलेला अभ्यास, घेतलेली वही, उघडलेली पुस्तके, केलेली धडपड—हे सगळे आपण दुर्लक्षित करायचे का?
नाही रे, माझ्या मुला. माणूस कधीच शून्य नसतो.
आपण शून्य देतो, तेव्हा आपण त्याचा आत्मविश्वास चोरतो, त्याच्या आतली जिद्द विझवतो.
आणि शिक्षक म्हणून आपले काम विद्यार्थ्यांना पुन्हा-पुन्हा उभे राहायला मदत करणे आहे—त्यांना शरण जायला भाग पाडणे नाही.”
मी शांतपणे ऐकत राहिलो. त्या क्षणी माझ्या आत काहीतरी हलले.
तेव्हाच मला उमगले—
शिक्षण म्हणजे केवळ गुण देणे किंवा उत्तर तपासणे नाही.
शिक्षण म्हणजे माणसाला जिवंत ठेवणे, प्रयत्नांची दखल घेणे, आशा जपणे.
शून्य गुण अनेक विद्यार्थ्यांसाठी जणू मृत्यूची घंटा ठरतात.
त्या कागदावरचं शून्य त्यांना घाबरवतं, त्याची शिकण्याची आवड संपवतं आणि हळूहळू शिक्षणाबद्दल चीड निर्माण करतं.
पण शिक्षकाची जबाबदारी वेगळी आहे.
ती म्हणजे प्रोत्साहन देणं, धीर देणं, आणि म्हणणं—”तू करू शकतोस. पुन्हा प्रयत्न कर.”
रिकाम्या उत्तरपत्रिकेसाठीही किमान गुण देण्याचा अर्थ असा असतो—
“तू शून्य नाहीस.
तू महत्त्वाचा आहेस.
तुझ्यात क्षमता आहे.
तू अपयशी झालेला नाहीस—फक्त यावेळी यश मिळाले नाही.पुन्हा प्रयत्न कर.”
हेच खरे शिक्षण आहे.
विद्यार्थ्यांचे भविष्य शिक्षकांच्या हातात असते.
जर शिक्षक थोडे अधिक माणुसकीने पाहू लागले,जर त्यांनी आकड्यांपलीकडे प्रयत्न पाहायला शिकलं,तर अनेक निराश विद्यार्थी पुन्हा स्वप्न पाहण्याचे धाडस करतील.
मला वाटते ही गोष्ट फक्त रशियापुरती मर्यादित राहू नये.
ती जगभरातील शिक्षकांपर्यंत पोहोचायला हवी.
कारण—
शून्य गुण म्हणजे शिक्षणच नाही,
तर अनेकदा एखाद्याचा प्रवास संपवणे.
जोपर्यंत एखादी व्यक्ती प्रयत्न करत आहे,
तोपर्यंत तिला किमान आश्वासन तरी मिळायलाच हवे,
किमान मान्यता तरी मिळायलाच हवी.
— रशियात शिक्षण घेणाऱ्या एका अज्ञात विद्यार्थ्याने लिहिलेली ही गोष्ट एखाद्या आदर्श शिक्षकासोबत जरूर शेअर करा.
कदाचित ती आपल्या शिक्षण व्यवस्थेत एखादा छोटासा, पण अर्थपूर्ण बदल घडवेल.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती: सौ. शोभा जोशी
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ आत्मविश्वास व धाडस… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆
☆
काय गंमत असते पहा..
असाधारण बुद्धिमत्ता, उच्च शैक्षणिक गुणवत्ता असलेल्या बहुतांशी लोकांचे मन कायम शंका, भीती आणि संशयांनी भरलेले असते. त्यामुळे ते सुरक्षिततेचा मार्ग पसंत करतात आणि मोठी जोखीम घेणे टाळतात. परिणामी, त्यांचे संपूर्ण आयुष्य निर्धोक चाकरी (नोकरी) करण्यात व्यतीत होताना दिसते. याउलट, अनेक वेळा दिसते की साधारण बुध्दिमत्ता व शैक्षणिक गुणवत्ता असलेले अथवा ज्यांनी गमवायला जीवनात फारसं काही कमावलेलं नसलेले, जास्त विचार न करता प्रचंड आत्मविश्वासाने एखाद्या व्यवसायात उतरून त्यात यश मिळवतात व कालांतराने उच्च शिक्षित लोकांना आपल्याकडे कामाला ठेवून त्यांच्या बुद्धिमत्ता आणि ज्ञानाच्या जोरावर व्यवसायाला नव्या उंचीवर नेतात.
कारण कोणत्याही माणसाचा आत्मविश्वास पर्वतालाही हलवू शकतो. हे केवळ एक सुभाषित नसून, ते एक सत्यवचन आहे… असाधारण बुद्धिमत्ता असलेल्या व उच्चशिक्षित व्यक्तींकडे अनेकदा ‘ॲनालिसिस पॅरालिसिस’ (Analysis Paralysis) ही समस्या दिसून येते. ते प्रत्येक परिस्थितीचा इतका सखोल विचार करतात की, शेवटी कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे ज्ञानाचा साठा मोठा असतो, त्यामुळे त्यांना प्रत्येक संभाव्य धोका स्पष्टपणे दिसतो. ‘चुकीचा निर्णय घेतला तर काय होईल?’, ‘अपयश आले तर समाजात मान कसा राहील?’अशा अनेक शंका त्यांच्या मनात घर करतात. ही गमावण्याची भीती (Fear of Loss) त्यांना सुरक्षित ठेवते, पण त्याच वेळी त्यांना मोठे काही साध्य करण्यापासून रोखते. सुरक्षित नोकरीचा मार्ग त्यांना निश्चित उत्पन्न आणि सामाजिक प्रतिष्ठा देतो, पण उद्योजकतेचे किंवा धाडसाचे मोठे फळ मिळवण्याची संधी ते गमावून बसतात. अन् दुसरीकडे, साधारण बुध्दीमत्ता व शैक्षणिक गुणवत्ता असलेल्या व्यक्तींकडे गमावण्यासाठी फारसे काही नसते. त्यांच्यासाठी प्रत्येक नवीन प्रयत्न ही एक संधी असते, धोका नव्हे. त्यांच्यातील आत्मविश्वास शंकांना मनात जागा देत नाही. ते परिस्थितीचा अतिविचार न करता थेट कृती (Action) करण्यावर भर देतात. अन् व्यवसायात यश मिळवतात.
व्यवसायात किंवा जीवनातील इतर क्षेत्रांत यश मिळवण्यासाठी केवळ ज्ञानाची नव्हे, तर लवचिकता (Flexibility), बाजाराचे निरीक्षण, संवाद कौशल्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे धोका पत्करण्याची तयारी (Risk Taking Ability) आवश्यक असते. हे गुण औपचारिक शिक्षणातून नव्हे, तर जीवनाच्या अनुभवातून आणि आत्मविश्वासातून माणसात रुजतात. यामुळेच जगभरात अनेक यशस्वी उद्योजक पाहायला मिळतात, ज्यांनी शिक्षण अर्धवट सोडून दिले किंवा ज्यांच्याकडे उच्च पदव्या नव्हत्या, पण त्यांनी केवळ आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर मोठे व्यावसायिक साम्राज्य उभे केले. त्यांच्याकडे काम करणाऱ्या अनेक व्यक्ती उच्चशिक्षित असतात, कारण या उद्योजकांनी केवळ आत्मविश्वासाच्या बळावर योग्य लोकांना योग्य कामासाठी नेमण्याची कला आत्मसात केलेली असते.
थोडक्यात शिक्षण आणि ज्ञान महत्वाचे आहे, पण जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास आणि धाडस यांचे महत्त्व अधिक आहे !
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈