मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २६ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २६ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

व्यावहारिक ज्ञान

ठरल्याप्रमाणे लेखमालेच्या या २६व्या भागात आपण तुकाराम महाराजांच्या काही व्यावहारिक ज्ञानाविषयीच्या अभंगांचा विचार करू.

दान, धर्म, पुण्य कर्म करणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे, परंतु पुण्य कर्म करताना ते योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

या अभंगात महाराज काय सांगतात पहा…

सर्वांभूती द्यावे अन्न/ द्रव्य पात्र विचारोन//

उपतिष्ठे कारण/ तेथे बीज पेरीजे//

सर्व भूतमात्रांना अन्नदान करावे, पण द्रव्य मात्र योग्यता पाहूनच द्यावे. जेथे बी उगवेल असे वाटते तेथेच ते पेरावे. थोडक्यात दान हे सत्पात्री असावे.

पुण्य करिता होय पाप/ दुग्ध पाजोनी पोशीला साप//

करोनी अघोर जप/ दुःख विकत घेतले//

भूमी पाहता नाही वेगळी/ माळ बरड एक काळी//

उत्तम निराळी/ मध्यम आणि कनिष्ठ //

म्हणोनी विवेके /काही करणे ते निके//

तुका म्हणे फिके/ रुची नेदी मिष्ठान्न//

सापाला दूध पाजले तर पुण्य कर्म न होता पाप होते, कारण दूध पिऊनही साप गरळच ओकणार. एखादा जारण मारण मंत्र म्हणून दुसऱ्याचे वाईट करता करता, आपले स्वतःचेच वाईट करून घेतो. पृथ्वी सगळी सारखी असली तरी त्यातही माळ जमीन, खडकाळ जमीन, काळी जमीन, कमी जास्त कसाची जमीन असे भेद असतात, म्हणून कोणतीही गोष्ट करताना विचारपूर्वक करणे, नीट पारखून करणे फार महत्त्वाचे आहे. मिष्ठान्न केले आणि त्यात साखरच घातली नाही, तर ते चविष्ट लागेल का? याचसाठी आयुष्यात कोणतीही गोष्ट मोठ्या विवेकाने केली पाहिजे.

माणूस कसा ओळखावा याविषयी तुकाराम महाराज सांगतात.

नाही सर्व येत जोडील्या वचनी/

कवित्वाची वाणी कुशलता//

सत्याचा अनुभव वेधी सत्यपणे/

अनुभवाच्या गुणे रुचो येते//

काय आगी पाशी शृंगारिले चाले/

पोटीचे उकले कसा पाशी//

तुका म्हणे येथे करावा उकल/

लागेचिना बोल वाढवूनी//

मनात ईश्वराची भक्ती नसताना जर कोणी शब्दाला शब्द जोडून काव्य करील तर ते देवाला कसे मान्य होईल? ज्याच्या ठिकाणी खरा अनुभव आहे, त्याच्या बोलण्याने दुसऱ्याला वेधक वाटते कारण ते सत्य असते. अनुभवामुळे त्यातील तथ्य कळते. तुकाराम महाराज अधिक स्पष्टतेसाठी उदाहरणे देतात. हिणकस धातूला सोन्याचा मुलामा केला तर तो शृंगार अग्निपुढे उघडा पडतो. आणि कसोटी पुढे त्याच्या आतील हिणकस धातू ओळखू येतो. ज्या ठिकाणी हृदयात खरा अनुभव असेल तेथे स्पष्टीकरण देण्याची जरुरी पडत नाही, खरी योग्यता लगेच कळते. ते पुढे म्हणतात…

लचाळाच्या (अजागळ) कामा नाही ताळा वाळा/

न कळे ओंगळा उपदेश//

वचनचर्येची नकळे चाचणी/

ऐसी संघस्टनी अमंगळ//

समय न कळे वेडगळ बुद्धी/

विजाती ते शुद्धीचाच चाट//

तुका म्हणे याचा धिक्कारची बरा/

बहुमती खराहुनी हीन//

याचाच अर्थ असा की, जो कोणी अजागळ मनुष्य आहे, त्याच्या कामात काहीच ताळमेळ नसतो आणि त्या मुर्खाला (महाराज त्याला घामट म्हणतात) कितीही समजावून सांगितले तरी त्याची समजण्याची क्षमताच नसते. त्याला शास्त्र, त्यातील मर्म, काही कळत नाही. तेव्हा अशा लोकांपासून चार हात दूरच राहावे. या मतिमंद लोकांना काळ, वेळ समजत नाही. त्यांची बुद्धी विसंगत असते. अशा लोकांपासून दूर राहणे उत्तम! अशी कितीतरी माणसे आपल्या आयुष्यात येतात. ” बरे बाबा तुझेच खरे. ” असे बोलून जास्त वाद न घालता त्याच्यापासून लांब जावे असे महाराज सांगतात. अशा माणसांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटतात. ते लोक गाढवाहुनही नीच समजावे. त्यांचा धिकार करावा.

स्वभावोदुरतिक्रमः– भिन्न भिन्न स्वभावाची माणसे रोजच्या रोज आपल्या जीवनात येत असतात. महाराज म्हणतात की ज्यांचा स्वभावच चोरी करण्याचा असतो, त्यांच्या ध्यानीमनी तोच ध्यास असतो.

चोराचिया धुडका मनी / वसे ध्यानी लांछन//

त्याचप्रमाणे पाऊस पडावा तसे आम्ही बोलत असतो. परंतु ज्यांच्या अंगी दोषच आहेत त्याला आमचे बोलणे झोंबते. आम्ही हिताचे बोललो तरी त्याची तडफड होते. आपल्यालाही हा अनुभव वारंवार येतो कारण आपले सरळ बोलणे समोरचा वाकडेच धरतो. अशा माणसांच्या वाऱ्याला उभे राहू नये.

एक एका सहाय्य करू/ अवघे धरू सुपंथ//

कोण जाणे कैसे परी/ पुढे उरी ठेविता//

अवघे धन्य होऊ आता/ स्मरविता स्मरण//

तुका म्हणे अवघी जोडी/ ते आवडी चरणांची//

यासाठी तुकाराम महाराज सर्व लोकांना सांगतात की, तुम्ही आम्ही मिळून एकमेकांच्या सहाय्याने चांगल्या वाटेवरून चालू या, चांगले जगूया, नाहीतर म्हातारपणी परमार्थ करू अशी चालढकल केली तर पुढे काय वाढून ठेवले आहे ते कोणास ठावे? म्हणून उद्या वर काही ढकलू नका. जे काही करायचे ते आज करा, आत्ता करा. नामस्मरण करणारा व करून घेणारा असे आपण सर्वजण धन्य होऊ. विठोबाच्या चरणांची आवड धरली म्हणजे सर्व काही जोडले जाते व महान पुण्य प्राप्त होते.

चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती/

व्याघ्रही न खाती सर्प तया//

विष ते अमृत आघात ते हित/

अकर्तव्य नीत होत त्यासी//

दुःख ते देईल सर्व सुख फळ/

होतील शितळ अग्नी ज्वाळा//

आवडेल जीवा जीवाचिये परी/

सकळा अंतरी एक भाव//

तुका म्हणे कृपा केली नारायणे/

जाणिजे ते येणे अनुभवे//

तुकाराम महाराज सांगतात, आपले चित्त शुद्ध असेल तर शत्रूही मित्र होतात. वाघासारखे हिंस्र आणि सापासारखे विषारी प्राणी आपल्याला काही त्रास देत नाहीत. (भगवान शंकराच्या गळ्यातील नागाप्रमाणे) विषाचे अमृत होते.

मीराबाईच्या सच्य्या भक्तीमुळेच तिने राणाजीने दिलेला विषाचा प्याला रिचविला.

शरीरावर आघात झाले तरी ते हितकर ठरतात. आपल्या हातून चुकून एखादे अनुचित कर्म घडले पण ते नीतीला धरून असले तर शुभंकरच ठरेल. दुःखातही सुख प्राप्त होईल आणि आगीचा जाळ शांत होईल. शुद्ध चित्ताचा माणूस लोकांना प्राणप्रिय असेल. त्याच्याविषयी सर्वांच्या मनात आदरभावच राहील. असा अनुभव स्वतःबद्दल ज्याला येतो त्याला भगवंत कृपावंत झाला आहे असे समजावे.

कंथा प्रावर्ण/ नव्हे भिक्षेचे ते अन्न//

करी यापरि स्वहित/ विचारूनी धर्मनित//

देऊळ नव्हे घर/ प्रपंच परउपकारक//

विधीसेवन काम/ नव्हे शब्द राम राम//

हत्या शास्त्र धर्म/ नव्हे निष्काम ते कर्म//

तुका म्हणे संती/ करुनी ठेविली आईती//

वरील अभंगात तुकाराम महाराज काय सांगतात?

व्यावहारिक आणि अध्यात्मिक दृष्टीने काही वस्तूंमध्ये कसा फरक असतो याविषयी महाराज बोलतात.

संन्याशाची कंथा(झोळी) आणि सामान्य जनांची वस्त्रे सारखी समजू नयेत. त्याचप्रमाणे पवित्र भिक्षान्न इतर अन्नाप्रमाणे समजू नये. धर्म व नीती विचारात घेऊन स्वहित साधावे. देवालय हे इतर घरांप्रमाणे सामान्य घर नव्हे. परोपकार करताना तो संसारी माणूस इतरांप्रमाणे नव्हे. शास्त्राने सांगितलेल्या नियमांनुसार विषय सेवन केले असता तो माणूस विषयलोलूप नव्हे. राम हा शब्द इतर शब्दांप्रमाणे साधा नाही. क्षत्रियाने युद्धात शत्रूचा वध केल्यास ती हत्या न होता क्षात्रधर्मपालन होते. आणि निष्काम बुद्धीने केलेले कोणतेही कर्म हे इतर कर्माप्रमाणे बंधक नाही. हे नीतिशास्त्र आहे, याप्रमाणे सर्वांनी वागावे.

याचाच अर्थ असा रोजच्या जीवनात इतरांसमवेत वावरत असताना व्यावहारिक ज्ञान वापरून आणि नैतिक धर्माचे पालन करून माणसाने आपले आचरण ठेवावे.

क्रमशः… २६ 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “कपडे दाखवण्याचा कार्यक्रम…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “कपडे दाखवण्याचा कार्यक्रम…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

घराघरात अनेक कार्यक्रम होतात. काहीवेळा ते अचानक तर काहीवेळा ठरवून होतात. हा दाखवण्याचा कार्यक्रम म्हणजे घरात मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरल्यानंतर खरेदी केलेले कपडे दाखवण्याचा कार्यक्रम.

मुलगा किंवा मुलगी पाहण्याचे कार्यक्रम काही प्रमाणात कमी झालेले आहेत. तेच अगोदर बघतात, आणि नंतर आपल्याला सांगतात. यात आपल्याला बघण्याशिवाय किंवा बघत राहण्याशिवाय काही करायचं नसतं. तो भाग निराळा. महत्वाचा आहे तो घेतलेले कपडे दाखवण्याचा.

क्रिकेटचे सामने कसे दोन तीन राऊंड मधे होतात, तसाच हा दाखवण्याचा कार्यक्रम दोन तीन राऊंड मधेच होतो. टिम पण वेगळ्या असतात. त्याचा फायनल राऊंड सुध्दा होतो. क्रिकेटचा सामना पहायला जसे काही प्रेक्षक हे सगळ्या राऊंडला असतात, तसेच काही या वेळी सगळ्या राऊंडला असतात.

या प्रत्येक वेळी जो उत्साह असतो तो कमालीचा असतो. बर्‍याचदा तर खरेदीला जेवढा वेळ लागला त्यापेक्षा थोडासाच कमी या दाखवण्याच्या कार्यक्रमाला लागतो. पण कार्यक्रम सगळा साग्रसंगीत असतो.

खरेदीला कुठून सुरुवात झाली, सोबत कोण होत, कोण आल नाही, तर कोण आल नाही तरीही चाललं असतं पण अगदी वेळेवर त्यांनी येऊ का… अस विचारल्याने एक जास्तीची गाडी वेळेवर घ्यावी लागली, रस्त्यात कुठे, कशासाठी, कितीवेळ थांबलो याची रनिंग काॅमेंन्ट्री सुध्दा असते. यात कौतुुक आणि थोडी तक्रार दोन्ही असतं.

मग अगदी कार्यालयात जाण्यापासून परत घरी येईपर्यंत कोणकोणते कार्यक्रम कोणकोणत्या क्रमाने आहेत त्याच पध्दतीने हे कपडे लावलेले असतात. व त्या कपड्यांच्या दर्शनाचा व प्रदर्शनाचा कार्यक्रम सुरु होतो.

दुकानात सगळे बसल्यावर जसं पहिल्यांदा थंड पाण्याचा राऊंड होतो, तसाच घरातही होतो. दुकानात जसा सुरुवातीला आपला थंड प्रतिसाद असतो तसाच इथेही काही प्रमाणात जाणवतो. पण नंतर वाढतो.

दुकानात सगळे लाईट लावलेले असतात तस्सेच हाॅल मधले सगळे लाईट लावत लाईट कलर पासून दाखवायला सुरुवात होते. आणि रंग खुलत जातात तसतसा या गप्पा पण रंगत आणि खुलत जातात.

अगोदर साध्या, देण्याघेण्याच्या साड्या दाखवल्या जातात. या साड्या वरवर पाहून बाजूला ठेवल्या जातात. म्हणजे खास जेवणात वरणभात जरी आवडीने खाल्ला तरी तो जेवढ्या प्रमाणात वाढतात, व जेवढ्या लवकर संपतो तितकाचवेळ या साड्यांना मिळतो.

मग सुरुवात होते… ही कार्यालयात जातांना, मुद्दामच थोडी हलकी घेतली… ही सिमंती पुजनाला, ही रात्रीच्या जेवणाला, ही सकाळी विधी करतांना, ही लग्नाच्या वेळी, ही जेवताना, ही लक्ष्मी पुजनाला, आणि ही कार्यालयातून घरी येतांना… ही पण थोडी हलकीच आहे… सांगण जरी भरभर वाटलं तरी दाखवणं मात्र हळूहळूच असतं…

थोडी हलकीच घेतली यावर वजनाला… कि किमतीला… हा प्रश्न कोणाच्या तरी चेहर्‍यावर पडतो. आणि मग साडी सारखाच तो प्रश्न उलगडला जातो. अग खरंच… पण वजनालाच हलकी वाटते… किंमत साधारण इतकीच असते हल्ली…

आपल्या हलक्या साडीचीही किंमत (मान) ठेवली म्हणून दाखवणार्‍यालाही बरं वाटतं… हलक्या साडीला कोणीच हलक्यात घेतलं नाही याचं समाधान चेहर्‍यावर दिसतं. आता खास विधीसाठी घेतलेल्या खास साड्या परत एकदा त्या गर्दीतून बाहेर येतात. आणि मग त्याचा रंग, डिझाईन, पोत, प्रकार यावर नाना प्रकाराने चर्चा होते. साड्यांचा एक एक पदर उलगडला जातो त्याच प्रमाणात साडी बद्दल काय वाटतं याचे विचार सुध्दा उलगडले जातात. हळूहळू त्या साड्या आणि विचार दोन्ही पसरतात.

या साड्या, त्यांचे पदर, व त्यावर व्यक्त केलेले विचार जसजसे पसरत जातात तसेच पाहणारे सुध्दा असलेल्या जागेवर जमेल तस पसरण्याच्या प्रयत्नात असतात. व याच पसार्‍यात चला चहा, किंवा थंड करते याची घोषणा होते.

थोडक्यात पहिल्यांदा झालेल्या पाण्याच्या राऊंड नंतर चहाचा राऊंड करावा वाटतो इतका वेळ (खरतर काळ म्हणायचं होतं पण काळ जरा जास्तच लांबल्यासारखं वाटतं) मधे गेलेला असतो.

चहा, किंंवा थंड झाल्यावर परत देण्याघेण्याचे काही खास कपडे असतात. ते नातेवाईक, त्यांच वय, व त्यांची शारिरीक स्थिती यानुसार ड्रेस मटेरियल पासून नऊवारी साडीपर्यंत लांब असतं. आणि मग कोणाकोणाला काय, का देणार याची चर्चा होते. यात कोणाला काय द्यायच यावर आपली मतं सुध्दा व्यक्त केली जातात. यात बराच वेळ घालवला अस लक्षात आल्यावर, सिनेमाच्या शेवटी जशी नामावली दाखवतात पण ती पटापट पुढे सरकते, तशी माणसांची खरेदी सरकते. हा झब्बालेंगा, हे कपडे पॅट शर्ट साठी. सुट घ्यावा का असा विचार झाला होता. शेवटी ठरवलं तुम्हाला जे सुट वाटतील तेच घ्या. होना… यांच्या कपड्यांना काही जास्त वेळ लागत नाही खरेदीला. आमच्या चार पाच साड्यांपैकी नक्की कोणत्या तीन घ्याव्या याचा विचार करे पर्यंत यांचे कपडे पिशवीत घालून तयार होते. शेवटी दिड तास घालवल्यावर सगळ्याच ठेवाव्या असं ठरलं. मागे पुढे लागतातच. आणि मग निघतांना या दोन परत ठेवायची इच्छाच होत नव्हती, मोह आवरतच नव्हता. आणि आता इतकी खरेदी झाल्यावर लगेचच काही परत खरेदीची वेळ येणार नाही म्हणून या पण ठेवल्या.

त्या दोन ठेवलेल्या साड्यांबरोबर मग सगळ्या साड्या परत नीट ठेवल्या जातात.

चर्चा इथेच संपत नाही. मग चर्चा सुरु होते ती ब्लाऊज पीसची. घेतले नसतील तर कुठे घ्यायचे. आणि घेतले असतील तर कोणाकडे, कधी, आणि कसे शिवायला टाकायचे. याची…

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मन म्हणजे काय?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “मन म्हणजे काय?☆ श्री जगदीश काबरे ☆

मनात आलं, मन जड झालं, मन उदास आहे, या वाक्प्रचारांनी आपली भाषा व्यापलेली आहे. कवींनी मनाला हृदयात बसवलं, प्रेमीजनांनी मनाची गाणी गायली, तत्त्वज्ञांनी मनाचे तत्त्व शोधण्याचा प्रयत्न केला. पण खरोखरच मन म्हणजे काय? ते कुठे असते? ते दिसते का? स्पर्श करता येते का? मोजता येते का? या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न तत्त्वज्ञान, धर्म, आणि विज्ञान या तिन्ही क्षेत्रांतून शतकानुशतके चालू आहे. साध्या भाषेत सांगायचे तर मन म्हणजे विचार, भावना, स्मृती, कल्पना, इच्छा आणि जाणीव यांचा एकत्रित अनुभव. पण हे अनुभव कुठून येतात? आधुनिक न्यूरोसायन्स सांगते की मनाचे मूळ स्थान म्हणजे मेंदू. आपला सुमारे दीड किलो वजनाचा, तीन पौंड इतका, राखाडी-पांढऱ्या रंगाचा, आक्रोडासारखा दिसणारा अवयव म्हणजे मेंदू. मन आणि मेंदू यांचे नाते समजावून घेणे हे आजच्या विज्ञानातील सर्वात कठीण आव्हानांपैकी एक आहे.

प्राचीन काळी मन हृदयात असते असा व्यापक समज होता. प्राचीन इजिप्शियन लोक मृत व्यक्तीचे हृदय जपून ठेवत, पण मेंदू नाकातून काढून फेकून देत. कारण त्यांच्या मते हृदयच विचार करते, आत्मा हृदयात राहतो. अॅरिस्टॉटल या महान ग्रीक तत्त्वज्ञानेदेखील मन हृदयात आहे असे मानले. त्याच्या मते मेंदू हा फक्त रक्त थंड करण्याचे काम करतो! मराठी आणि हिंदी भाषेतही दिलसे सोचो, मनापासून काम करा, हृदयात कुछ कुछ होता है, असे शब्दप्रयोग याच सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब आहेत. भावनिक अनुभव छातीत, हृदयाजवळ जाणवतात, धडधड वाढते, श्वास जड होतो, त्यामुळे हा गैरसमज नैसर्गिकच होता. परंतु हिप्पोक्रेटस (इ. स. पू. ४०० च्या आसपास) आणि नंतर गॅलेन यांनी मेंदूचे महत्त्व ओळखले. मेंदूला दुखापत झाल्यावर माणसाचे वर्तन, विचार, स्मृती बदलतात असे निरीक्षणांती त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हापासून हळूहळू मेंदू-केंद्रित दृष्टिकोन विकसित होत गेला आणि आज न्यूरोसायन्सने हे निर्विवादपणे सिद्ध केले आहे की मनाचे अस्तित्व मेंदूशी निगडित आहे.

मानवी मेंदूत सुमारे ८६ अब्ज न्यूरॉन्स असतात. प्रत्येक न्यूरॉन हजारो इतर न्यूरॉन्सशी जोडलेला असतो. म्हणजे मेंदूत एकूण सुमारे १०० खर्व सिनॅप्टिक कनेक्शन्स आहेत. हा आकडा इतका प्रचंड आहे की आपल्या आकाशगंगेतील ताऱ्यांच्या संख्येपेक्षाही जास्त आहे. या न्यूरॉन्सच्या जाळ्यातून विद्युत-रासायनिक संदेश सतत प्रवाहित होत असतात आणि त्यातूनच विचार, भावना, स्मृती, निर्णय हे सारे उत्पन्न होतात. मेंदूचे मुख्य भाग म्हणजे सेरेब्रम, सेरेबेलम आणि ब्रेन स्टेम. सेरेब्रमचा बाहेरचा थर म्हणजे सेरेब्रल कॉर्टेक्स, हाच भाग तर्कशक्ती, भाषा, नियोजन, आणि जटिल विचार निर्मितीसाठी जबाबदार आहे. सेरेब्रमला फ्रंटल, पॅरायटल, टेम्पोरल, आणि ऑक्सिपिटल असे चार लोब्स आहेत. प्रत्येकाची वेगळी कार्ये आहेत. फ्रंटल लोब निर्णय घेणे, व्यक्तिमत्त्व आणि भावनिक नियंत्रण यांसाठी; टेम्पोरल लोब स्मृती आणि भाषेसाठी; ऑक्सिपिटल लोब दृष्टीसाठी असे प्रत्येकाचे वेगळे कार्य आहे. लिम्बिक सिस्टिम हा मेंदूचा भाग भावनांशी विशेषतः निगडित आहे. यात अमिग्डाला भय आणि क्रोध यांचे केंद्र आहे आणि हिप्पोकॅम्पस स्मृती निर्माण करण्याचे केंद्र आहे.

मेंदू हा भौतिक अवयव आहे हे मान्य केले, तरी एक मूलभूत प्रश्न अनुत्तरित राहतो तो म्हणजे जाणीव म्हणजे काय? मला ‘मी आहे’ असे जाणवते, मला रंग दिसतात, संगीत ऐकू येते, वेदना होतात, हे व्यक्तिनिष्ठ अनुभव मेंदूच्या न्यूरॉन्सच्या क्रियांमधून कसे उत्पन्न होतात? हे तत्त्वज्ञान आणि विज्ञान या दोन्हींना पडलेले सर्वात कठीण कोडे आहे. तत्त्वज्ञ डेव्हिड चाल्मर्स यांनी याला “The Hard Problem of Consciousness” असे नाव दिले आहे. न्यूरॉन्स कसे काम करतात हे आता वैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे. पण या क्रियांमधून अनुभव कसा निर्माण होतो हे अजून पूर्णपणे आकळलेले नाही. भौतिक पदार्थातून व्यक्तिनिष्ठ अनुभव कसा उगम पावतो, याचे संपूर्ण वैज्ञानिक उत्तर अद्याप मिळालेले नाही. या प्रश्नावर मुख्यतः दोन भूमिका आहेत — द्वैतवाद आणि भौतिकवाद. रेने देकार्त यांनी मांडलेल्या द्वैतवादानुसार मन आणि शरीर या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. त्यांच्या मते मन अभौतिक असते आणि मेंदूशी कसेतरी संपर्क साधते. आधुनिक विज्ञान मात्र प्रामुख्याने भौतिकवादी भूमिका घेते. मन हे मेंदूच्या क्रियांचे उत्पादन आहे. त्याला वेगळे अस्तित्व नाही.

आधुनिक न्यूरोसायन्सने मेंदूचा नकाशा काढून विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकविसाव्या शतकात मेंदू संशोधनात क्रांतिकारी प्रगती केली. FMRI (Functional Magnetic Resonance Imaging) या तंत्रज्ञानाने मेंदूचा आतील भाग जिवंत व्यक्तीमध्ये अभ्यासणे शक्य झाले. जेव्हा आपण विचार करतो, भावना अनुभवतो, निर्णय घेतो तेव्हा मेंदूच्या कोणत्या भागात रक्तप्रवाह वाढतो हे FMRI द्वारे दिसते. यावरून मेंदूच्या वेगवेगळ्या कार्यांचा नकाशा तयार झाला आहे.

मन म्हणजे केवळ विचार नाही, तर त्यात स्मृतींचा प्रचंड साठा असतो. ‘मला लहानपणी आजोबा सांगत असत… ‘ हे आठवणे म्हणजे काय? स्मृती कुठे असतात? न्यूरोसायन्सच्या मते स्मृती कोणत्या एका ठिकाणी साठवलेल्या नसतात. त्या मेंदूच्या विविध भागांतील न्यूरॉन्सच्या जाळ्यांमध्ये वितरित असतात. जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो तेव्हा न्यूरॉन्समधील सिनॅप्सेस मजबूत होतात. याला ‘लॉन्गटर्म पोटेन्सीएशन’ म्हणतात. ही प्रक्रिया स्मृतीचा जैविक आधार आहे. हेन्री मोलायसन हे न्यूरोसायन्सच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध रुग्ण. त्यांच्या हिप्पोकॅम्पसची शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते नवीन दीर्घकालीन स्मृती तयार करू शकेनासे झाले. प्रत्येक भेटीत ते डॉक्टरांना नव्याने भेटल्यासारखे वागत. पण जुन्या आठवणी शाबूत होत्या. कारण त्या इतर भागांत साठवलेल्या होत्या. यावरून हिप्पोकॅम्पस नव्या स्मृती तयार करण्यासाठी अपरिहार्य आहे हे सिद्ध झाले.

मला खूप राग आला आहे, मला प्रेम वाटते, मला भीती वाटते या भावना मेंदूत कुठे निर्माण होतात? लिम्बिक सिस्टिम, विशेषतः अमिग्डाला, भावनिक प्रतिक्रियांसाठी केंद्रीय भूमिका बजावते. धोका जाणवताच अमिग्डाला सेकंदाच्या आधी प्रतिक्रिया देते… लड किंवा पळ असा प्रतिसाद तात्काळ दिला जातो, हृदयाचे ठोके वाढतात, अॅड्रेनालिन वाढते. पण फ्रंटल कॉर्टेक्स या भावनांवर नियंत्रण ठेवतो. म्हणूनच माणूस भावनांच्या आहारी न जाता तर्काने विचार करू शकतो. हे इतर प्राण्यांपेक्षा मानवाचे वैशिष्ट्य आहे. फ्रंटल कॉर्टेक्स नुकसान झालेल्या व्यक्तींमध्ये भावनिक नियंत्रण बिघडते. फिनियस गेज या माणसाच्या प्रसिद्ध ऐतिहासिक प्रकरणात एका अपघातात लोखंडी सळई फ्रंटल लोबमधून आरपार गेली आणि त्या व्यक्तीचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व बदलले.

अँटोनियो दामासियो या न्यूरोशास्त्रज्ञाने ‘सोमॅंटिक मार्कर हैपोथेसिस’ची मांडणी करून सांगितले की आपले निर्णय केवळ तर्काने नव्हे, तर भावनांनी मोठ्या प्रमाणात प्रभावित होतात. फ्रंटल लोब खराब झालेले रुग्ण तर्काने बरोबर उत्तरे देतात, पण साध्या व्यावहारिक निर्णय घेण्यात अपयशी ठरतात. कारण त्यांचे भावनिक मार्गदर्शन बंद झालेले असते. ‘मी आहे’ हे जाणवणे म्हणजे चेतना. ही जाणीव कुठून येते? मेंदूचे कोणते भाग जागृत असताना आपल्याला जाणीव असते? झोपेत ती जाणीव का नसते? भूल दिल्यावर का नाहीशी होते? न्यूरोशास्त्रज्ञ क्रिस्टॉफ कॉख आणि जुलिओ टोनोनी यांनी इंटिग्रॅटेड इन्फॉर्मशन थेअरी मांडली. त्यानुसार चेतना म्हणजे माहितीचे एकात्मिक प्रक्रियाकरण होय. ते जितके जास्त एकात्मिक, तितकी जास्त चेतना. या सिद्धांतानुसार एक साध्या थर्मोस्टॅटला अतिशय कमी प्रमाणात चेतना असते, तर मानवी मेंदूला सर्वाधिक, हे त्यांनी सिद्ध केले. दुसरा महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे ग्लोबल वर्क्सस्पेस थेअरी. बर्नार्ड बार्स यांनी मांडलेला. यानुसार चेतना म्हणजे मेंदूतील ग्लोबल वर्कस्पेस जिथे विविध भागांतून माहिती एकत्र येते आणि उपलब्ध होते, जसे रंगमंचावर प्रकाशझोतात आलेला नट. जे विचार/संवेदना या वर्कस्पेसमध्ये येतात त्यांचीच आपल्याला जाणीव होते.

अलीकडे प्रेडिक्टिव्ह प्रोसेसिंग हा सिद्धांत लोकप्रिय होत आहे. हा सिद्धांत कार्ल फ्रिस्टन आणि अँडी क्लार्क यांच्या संशोधनावर आधारित आहे. यानुसार मेंदू हे भाकीत ओळखणारे मशीन आहे, तो सतत आपल्या अनुभवाचे भाकीत करत असतो आणि इंद्रियांकडून येणाऱ्या माहितीशी ते जुळवत असतो. जे जुळत नाही तेच आपल्याला जाणवते. म्हणजेच आपण जग जसे आहे तसे पाहत नाही तर मेंदूने बनवलेले अंदाजित जग पाहतो! फ्रॉइडने नेणिवेतील मनाची संकल्पना मांडली होती. आपल्या वर्तनावर आणि भावनांवर नेणिवेतील इच्छा आणि भीती प्रभाव टाकतात असे त्यांनी सांगितले. आधुनिक न्यूरोसायन्सने नेणिवेतील प्रक्रियांचे अस्तित्व वेगळ्या पद्धतीने सिद्ध केले आहे. मेंदूत बहुतांश माहितीचे प्रक्रियाकरण जाणीवेच्या बाहेर होते. आपण सायकल चालवतो, टायपिंग करतो, या क्रिया स्वयंचलितपणे होतात. त्यासाठी जाणीवेची गरज नसते. बेंजामीन लिबेट यांच्या प्रसिद्ध प्रयोगात असे दिसले की एखादी क्रिया करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय होण्याआधी मेंदूत त्याची विद्युत जोडणी सुरू होते.

एकेकाळी असे मानले जात होते की मेंदू एकदा पूर्ण विकसित झाला की बदलत नाही. पण आधुनिक संशोधनाने हा समज खोटा ठरवला आहे. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे मेंदू नवीन अनुभव, शिक्षण, आणि सरावाने स्वतःची रचना बदलू शकतो. लंडनच्या टॅक्सी ड्रायव्हरांचा प्रसिद्ध अभ्यासात असे लक्षात आले की त्यांचा हिप्पोकॅम्पस सामान्य माणसांपेक्षा मोठा होता, कारण त्यांना लंडनच्या गुंतागुंतीच्या रस्त्यांची सखोल माहिती असते. ध्यानधारणा करणाऱ्यांच्या मेंदूत संरचनात्मक बदल दिसतात, त्यांचा फ्रंटल कॉर्टेक्स घट्ट होतो, अमिग्डालाची प्रतिक्रियाशीलता कमी होते. याचाच अर्थ मानसिक सराव मेंदूला शब्दशः बदलतो.

एक गमतीचा भाग म्हणजे मन समजण्याच्या प्रयत्नातून AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा जन्म झाला. मेंदूच्या न्यूरल नेटवर्कची नक्कल करून कृत्रिम न्यूरल नेटवर्क बनवण्यात आले. आज चॅटजीपीटी, क्लाऊड, जेमिनीसारखे AI मॉडेल्स भाषा समजतात, उत्तरे देतात, पण त्यांच्यात जाणीव असते का? ते खरोखर विचार करतात का? हे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. जे काही निश्चित आहे ते म्हणजे आजचे AI मॉडेल्स मानवी मनाची प्रतिकृती नाहीत. मानवी मन केवळ माहितीवर प्रक्रिया करत नाही, तर त्याला शरीर आहे, भावना आहेत, जाणीव आहे, उत्क्रांतीचा इतिहास आहे. या सर्व गोष्टी मिळून मन बनते. मनाते शरीराचे अविभाज्य नाते असते. म्हणून मन फक्त मेंदूत नाही असेही काही संशोधक सुचवतात. देहाधारीत जाणीव या नव्या दृष्टिकोनानुसार विचार आणि अनुभव हे संपूर्ण शरीराशी निगडित असतात. आतड्याला दुसरा मेंदू म्हणतात. कारण त्यात ५०० मिलियन न्यूरॉन्स आहेत आणि ते सेरोटोनिन सारखे न्यूरोट्रान्समीटर तयार करतात. आतड्याचे आणि मेंदूचे सतत संभाषण चालू असते.

मन म्हणजे काय याचे उत्तर विज्ञानाने अनेक पातळ्यांवर द्यायला सुरुवात केली आहे. न्यूरॉन्स, सिनॅप्स, न्यूरोट्रान्समीटर्स, मेंदूचे विविध भाग यांचे कार्य आता बऱ्याच अंशी समजले आहे. fMRI, EEG, ऑप्टोजेनेटिक्स, आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या मदतीने संशोधन वेगाने पुढे जात आहे.

पण ‘जाणीव’, ‘मी आहे’ हे अनुभवणे अजून पूर्णपणे उलगडलेले नाही. हे खरे रहस्य आहे. मेंदूतील विद्युत-रासायनिक प्रक्रियांमधून अनुभव कसा उत्पन्न होतो हे समजणे हे एकविसाव्या शतकाचे सर्वात मोठे वैज्ञानिक आव्हान आहे. मन हे हृदयात नाही हे आता निश्चित झाले आहे. ते मेंदूत आहे, पण मेंदूच्या एका कोपऱ्यात नव्हे, तर संपूर्ण मेंदूच्या आणि कदाचित संपूर्ण शरीराच्या गुंतागुंतीच्या क्रियांमध्ये विखुरलेले आहे. मन ही एक सतत बदलणारी, शिकणारी, जुळवून घेणारी प्रक्रिया आहे. आणि हीच प्रक्रिया समजणे म्हणजे स्वतःला समजणे. तरीही कवींनी मनाला जे गूढ दिले ते नाहीसे झालेले नाही. विज्ञानाने त्या गूढाची खोली आणखी वाढवली आहे. आपण मेंदू जितका समजतो तितका आपल्याला तो अधिक अद्भुत वाटतो. आणि म्हणूनच मनाचा शोध हा विज्ञानातील सर्वात रोमांचक प्रवास आहे.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail.com मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ २१ जून… “जागतिक संगीत दिन”… ☆ मंजुषा सुनीत मुळे  ☆

मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ?

☆ २१ जून… “जागतिक संगीत दिन” ☆ मंजुषा सुनीत मुळे 

संगीत म्हणजे जगभरातल्या कुठल्याही संवेदनशील माणसाच्या आत्म्याला स्पर्श करणारी एक अमूर्त भावना… संगीत म्हणजे गायन-वादन-नृत्य यांचा जणू त्रिवेणी संगम.. हीच भावना व्यक्त करण्यासाठी आणि संगीत व कलाकारांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २१ जून रोजी ‘ जागतिक संगीत दिन ‘ साजरा केला जातो. आणि सगळ्या संगीतप्रेमींना स्वरमयी शुभेच्छा दिल्या जातात

‘जागतिक संगीत दिन‘ हा केवळ एक उत्सव नसून संगीताच्या वैश्विक भाषेला जागतिक पातळीवर दिला जाणारा सन्मान आहे. याचं कारण म्हणजे माणूस आणि संगीत यामधलं अतूट नातं. माणूस आनंदी असतो तेव्हा गातोच, पण दु:खी असतो तेव्हाही शांत हळवे सूर त्याचं मन शांत करू शकतात. संगीत कानांना तर आनंद देतंच पण त्याआधी ते सप्तसूर मनाला जणू साक्षात भिडतात. म्हणूनच मानवी जीवनात संगीताला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. आणि म्हणूनच आता अनेक आजारांवरही ‘ म्युझिक थेरपी ‘ एक परिणामकारक उपाय म्हणून वापरली जाते.

या विशेष दिनामागचा इतिहास थोडक्यात सांगायचा झाला तर — — हा दिन साजरा करण्याची कल्पना सगळ्यात आधी फ्रान्समध्ये १९८१ साली मांडली गेली. आणि २१ जून १९८२ रोजी फ्रान्सचे तेव्हाचे सांस्कृतिक मंत्री मॉरीस फ्ल्यूरेट यांच्या पुढाकाराने आणि जॅक लंग यांच्या सहकार्याने फ़्रान्समध्ये ‘फेटे द ला म्युझिक‘ (Fete de la Musique) हा कार्यक्रम सादर करण्यात आला. ही संकल्पना त्या देशात तर खूपच लोकप्रिय झाली, आणि काहीच दिवसात ती आधी संपूर्ण युरोपमध्ये आणि नंतर जगभरात लोकप्रिय झाली. या दिवशी जगभरातले संगीतप्रेमी अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करतात.. अनेक देशांमध्ये संगीताच्या विविध शैली उलगडून दाखवणारे कार्यक्रम आयोजित करून जणू संगीताच्या ‘विविधतेचा सन्मान’ केला जातो. आणि यामागचा उद्देश एकच.. संगीताच्या माध्यमातून प्रेम, शांतता, आणि एकात्मकतेचा संदेश पोहोचवणे. आजच्या डिजिटल युगात तर यासाठी वेगवेगळे अनेक मार्ग उपलब्ध झालेले आहेत.

संगीताचे कुठल्याही माणसाला वैयक्तिक पातळीवर होणारे शारीरिक आणि मानसिक फायदे सांगायचे तर – –

.. मन शांत होतं.. चिंता आणि मानसिक ताण कमी होतो … मेंदूच्या कार्यक्षमतेला नकळत चालना मिळते ज्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते … रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी मदत होते … आणि एक वेगळा उपयोग म्हणजे आनंद, दु:ख, प्रेम अशासारख्या भावना व्यक्त करण्यासाठी हे एक प्रभावी साधन असते.

भारतापुरतं बोलायचं तर “ अभिजात शास्त्रीय संगीत “ ही भारताने इतर संपूर्ण जगाला दिलेली एक सुंदर आणि अनमोल देणगी आहे यात दुमत होणे शक्यच नाही. त्याबरोबरच आपल्याकडे भावसंगीत, भक्तीसंगीत, नाट्यसंगीत, सिनेसंगीत अशा विविध प्रकारातून आणि अनेकविध वाद्यांच्या उत्तम आणि सुरील्या वादनातून, संगीत रसिकांपर्यंत सतत पोहोचत असते. त्यामुळे ज्याला ज्या प्रकारच्या संगीताने आनंद मिळत असेल किंवा मानसिक स्वास्थ्य लाभत असेल ते संगीत त्याच्यासाठी सदैव उपलब्ध असते ही विशेष म्हणावी अशी समाधानाची गोष्ट आहे.

सा रे ग म प ध नी सां.. हे संगीतातले सात स्वर… कुठल्याही प्रकारच्या संगीतासाठी आवश्यक असणारे.. किंबहुना संगीताचा अविभाज्य भाग असणारे … वेगवेगळ्या भाव-भावनांचा आविष्कार करणारे..

पण त्याव्यतिरिक्त हे सात सूर माणसाला वेगळाच एक संदेश देत असतात असे कुठेतरी वाचनात आले, जो संदेश प्रत्येकाने आचरणात आणला तर आयुष्य आणखी समृद्धच होईल असे खात्रीने वाटले..

आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरेल असा तो संदेश असा – – –

  • सा – सतत “सा”वध असावे,
  • रे – आपली वाणी, बोलणे “रे”शमा सारखे मृदु असावे,
  • ग- कुठल्याही गोष्टीचा “ग”र्व नसावा,
  • म- “म”धुर शब्द- सुरांनी परमेश्वराची आळवणी करावी.
  • प- आपली वृत्ती “प”रोपकारी असावी.
  • ध -सतत ईश्वरनामाची कास “ध”रावी.
  • नि -“नि”त्य हरीकथा श्रवण करावी
  • सा – “सा”धक बनून गुरूभजनी रंगून जावे.

“ संगीत “ या अतुल्य देणगीची मुक्त हस्ते उधळण करणाऱ्या संगीत क्षेत्रातल्या सर्व कलाकारांना आणि सर्व संगीत-प्रेमींना या जागतिक संगीत-दिनाच्या मनापासून सप्तरंगी शुभेच्छा.

© मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग – माझं जीवन हाच माझा संदेश… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ उगवतीचे रंग – माझं जीवन हाच माझा संदेश… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

नाशिक आजचं आणि पूर्वीचं…! जमीन-अस्मानाचा बदल झाला आहे यात. काळानुसार शहराचे चेहरेमोहरे बदलले, पण एक गोष्ट मात्र शतकानुशतके तीच राहिली आहे—ती म्हणजे ही संथ वाहणारी गोदामाई! पण तिचं पाणी तेव्हा मुक्तपणे, अवखळपणे वाहत होतं. आज ते ठिकठिकाणी सिमेंटच्या भिंतींनी अडवलंय. ते पाणी तेव्हा ओंजळीने सहज पिता यायचं; आजची परिस्थिती तर तुम्ही जाणताच. इथे बारा वर्षांतून एकदा कुंभमेळा भरतो, त्यानिमित्ताने शहरात नव्या तयारीची लगबग सुरू असते. मी काठावर उभा राहून ती सगळी गर्दी, तो कोलाहल पाहत असतो… आणि मग माझ्या मनात चक्रं फिरतात, मला आठवतात ते पूर्वीचे दिवस!

साधारण ७,००० वर्षांपूर्वीची ही गोष्ट. ज्या काळात आजच्यासारखी वाहने नव्हती, रस्ते नव्हते, चहूकडे फक्त अथांग आणि घनदाट जंगले होती. अशा अरण्यांमध्ये हिंस्ट्र श्वापदे आणि क्रूर प्रवृत्तीच्या राक्षसांची वस्ती होती. अशा एका भीषण कालखंडात या जीवनकथेची सुरुवात होते.

माझे नुकतेच लग्न झाले होते. डोळ्यांत भविष्याची सुंदर स्वप्ने रेंगाळत होती. सुखाचे दिवस आता मोरपिसारा फुलवून अंगणात आले असे वाटत असतानाच, अचानक परिस्थितीने एक क्रूर वळण घेतले. नियतीच्या एका फटकाऱ्यासरशी मला अचानक राजवैभव, राजमुकुट सोडून १४ वर्षांचा वनवास पत्करावा लागला. महालात सुखासीन आयुष्य जगलेली माझी सुशील, सुकुमार आणि सुंदर पत्नी मला संकटात साथ देण्यासाठी राजवैभवाचा त्याग करून स्वतःहून माझ्यासोबत वनवासात आली. मी कितीही नाही म्हणत असताना, माझ्यावर अपार प्रेम करणारा आणि जणू माझेच प्रतिबिंब असलेला माझा धाकटा भाऊदेखील आमची सावली बनून सोबत निघाला. उत्तरेकडून प्रवास करत करत आम्ही या दक्षिणायनात येऊन पोहोचलो. सोपा नव्हता हा प्रवास; या वाटेने आम्हाला जगण्याचं खूप मोठं तत्त्वज्ञान शिकवलं.

असे भटकत आम्ही आलो नाशिकच्या या रम्य परिसरात. घनदाट अरण्य, वटवृक्षांची केवढी ती गर्दी आणि त्यांची ती शीतल छाया! हे ठिकाण आमच्या मनाला खूप भावले. ठरवले, आता काही काळ तरी इथंच मुक्काम करायचा. खळाळत वाहणारी गोदामैयाही जणू आम्हाला साद घालत होती, “आता दुसरीकडे कुठे जाऊ नका, माझ्याच कुशीत विसावा घ्या. ” मग गोदेच्या त्या सुंदर, निर्मळ जलाच्या काठी, पंचवटीच्या निसर्गरम्य परिसरात आम्ही आमची छोटीशी पर्णकुटी बांधली. तिथल्या पावन वातावरणात आमचा संसार सुखाचा सुरू झाला. दिवस सुखाचे जात होते… पण एक दिवस अचानक घात झाला!

मी कुटीत नव्हतो आणि परतून पाहतो तर माझी लाडकी, प्राणप्रिय पत्नी तिथे नव्हती! कोणीतरी तिचे कपटाने हरण केले होते. माझ्या पायाखालची जमीनच सरकली, डोळ्यांसमोर गहिरा अंधार दाटून आला. कोण होता तो? कुठे घेऊन गेला असेल तिला? काहीच ठाऊक नव्हते. आयुष्यात असं काही वादळ येईल, याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.

सामान्यांसारखे डोळ्यात पाणी आणून खचून बसण्याचा तो क्षण होता. पण अंतरात्म्याने हार मानणे नाकारले. मी ठरवले, ‘ छे असं हताश होऊन नाही चालणार. परिस्थितीपुढे गुडघे टेकायचे नाहीत! मी आणि माझ्या धाकट्या भावाने पाठीवर धनुष्यबाण चढवले, विझलेला निखारा पुन्हा पेटवला आणि त्या अनोळखी, खडतर वाटेवर पाऊल ठेवले. वाट दिसेल तिकडे आम्ही मार्गक्रमण करू लागलो. पायात पादत्राणे नव्हती की पाठीशी राज्याचे लष्कर नव्हते की हाती कोणती सत्ता नव्हती. होते ते फक्त मनातले ध्येय आणि सत्यावरची अढळ निष्ठा!

आम्ही दक्षिण दिशेने पायी चालू लागलो. वाटेत संकटांचे महाकाय डोंगर उभे होते. पण या प्रवासात मला एक गोष्ट उमजली—आयुष्यात संकटं कितीही मोठी आली, तरी निराश होऊन थांबायचं नसतं. जो थांबला तो संपला, जो चालत राहिला तोच जिंकला! या प्रवासात आम्हाला जंगलात राहणारी, वंचितांचे आणि शोषितांचे आयुष्य जगणारी साधी-भोळी वनवासी माणसे भेटली. त्यांच्यावर एका बलाढ्य, उन्मत्त आणि अत्यंत शक्तिशाली सम्राटाचा भयंकर जुलूम सुरू होता. तो शत्रू इतका बलाढ्य होता की त्याच्याकडे सोन्याची नगरी होती, अथांग सैन्य होते आणि अफाट ताकद होती. ही साधीभोळी माणसे त्याच्या दहशतीच्या छायेत आपले रोजचे आयुष्य कंठत होती. या अशा भयाण जगण्याला काय जगणं म्हणायचं? हे सगळं माझ्या मनाला खटकत होतं. मी ठरवलं, स्वतःचं दुःख काही काळ बाजूला ठेवायचं आणि या भोळ्या-भाबड्या लोकांना एकत्र करून त्यांना अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवायचं!

वेळ पडली तर मला देखील या अन्यायी महासत्तेशी लढावं लागणार होतं. मी विचार केला, मी एकटा या महासत्तेशी कसा लढणार? पण अंतर्मनाने सांगितले की खरी शक्ती ही केवळ शस्त्रात नसते, ती असते माणसांच्या एकजुटीत आणि आत्मबळात! मी त्या जंगलातील आदिवासींना, वानर समूहाला एकत्र केले. त्यांना हाक दिली, “मित्रहो, जुलूम सहन करणे हे मरणाहून वाईट आहे. घाबरू नका, मी तुम्हाला लढायला शिकवीन! ” त्यांचा माझ्या शब्दावर विश्वास बसला. आम्ही त्यांना एकत्र आणले, संघटित केले, युद्धकलेचे प्रशिक्षण दिले, त्यांना त्यांच्या आत्मसन्मानाची जाणीव करून दिली; आणि पाहता पाहता एका मातब्बर हुकूमशहाविरुद्ध एक अभेद्य ‘लोकचळवळ’ उभी राहिली. त्या वनवासी मंडळींनी मग माझ्या संकटात सावलीसारखे उभे राहण्याची तयारी दाखवली.

तिथून पुढे आम्ही भारताच्या दक्षिण टोकापर्यंत, म्हणजेच अथांग समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचलो. समोर पसरलेला महासागर गर्जत होता. आपल्याला ज्या शत्रूशी मुकाबला करायचा आहे, तो पार या समुद्रापलीकडे आहे हे समजले होते. पण आता वाट संपली होती. शत्रू समुद्रापलीकडे वैभव उपभोगत होता आणि आम्ही अलीकडे किनाऱ्यावर उभे होतो. पुन्हा तोच यक्षप्रश्न—हा अथांग समुद्र कसा ओलांडायचा? पण जेव्हा हेतू प्रामाणिक आणि पवित्र असतो, तेव्हा निसर्गही रस्ता देतो. आम्ही दगड-धोंडे गोळा केले, प्रत्येकाने आपापल्या ताकदीप्रमाणे खारीचा वाटा उचलला आणि विश्वासाच्या बळावर समुद्रावरही सेतू बांधून पूर्ण केला! आजपर्यंत समुद्रावर सेतू कोणी बांधला नव्हता. पण ते आश्चर्य घडले. सगळ्यांच्या साथीने आणि सहकार्याने ही अशक्य वाटणारी गोष्ट साध्य झाली.

त्यानंतर काय झाले, तो एक इतिहासच आहे. अटीतटीचे, घनघोर युद्ध झाले. आम्ही आमचे सर्वस्व पणाला लावले होते. अखेर तो बलाढ्य, उन्मत्त शत्रू पराभूत झाला; अधर्माचा नाश झाला आणि सत्याचा विजय झाला! पण हे सगळे यश केवळ माझे नव्हते. माझ्यासाठी प्राणाची आहुती द्यायला तयार असणाऱ्या माझ्या साऱ्या वनवासी, सहकारी बांधवांच्या एकजुटीचे हे यश होते. तिथेच माझी प्राणप्रिय पत्नी मला पुन्हा भेटली. विजय मिळवल्यानंतर माझ्या हातात त्या शत्रूचे अथांग, सोन्यासारखे लखलखणारे साम्राज्य चालून आले होते. कोणीही असते तर त्या वैभवाला भुलले असते. माझ्या भावानेही भावनावश होऊन मला विचारले, “दादा, आपण आपले राज्य तर सोडलेच आहे, तर या सुवर्ण भूमीतच राहायला काय हरकत आहे? “

पण मी मंद हसलो. मी त्या सुवर्णनगरीकडे पाहिले आणि म्हणालो, “नाही बंधो, हे वैभव कितीही अथांग असले, तरी माझ्या मातृभूमीची सर याला येऊ शकत नाही! “

अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते।

जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी॥

(ही सोन्याची लंका मला भुरळ पाडू शकत नाही. जननी आणि जन्मभूमी हे स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत.)

 मित्रांनो, हा माझा ७, ००० वर्षांपूर्वीचा प्रवास आज तुम्हाला का सांगतोय? कारण, तुम्हा प्रत्येकाचं जीवन ही देखील एक अविरत लढाई आहे, हे मी जाणतो. आज तुम्हीही अशाच अनंत संकटांशी, अपयशाशी लढत आहात. तुमच्या जगातील समस्या कदाचित वेगळ्या असतील, आधुनिक जीवनशैलीने त्या तुमच्यासमोर उभ्या केल्या असतील. पण परिस्थिती कशीही असू द्या, शाश्वत जीवनमूल्ये कधीही कालबाह्य होत नाहीत!

हिंमत हरू नका. अनंत संकटे वेगवेगळ्या रूपात तुमच्या समोर उभी राहतील. कधी पराभव स्वीकारावा लागेल, कधी अपमान होईल, तर कधी विपरीत परिस्थिती मानसिक खच्चीकरण करेल. कधी एखादा बलाढ्य वाटणारा आजार किंवा बिकट आर्थिक परिस्थिती तुमच्यासमोर रावणासारखी उभी ठाकेल. पण लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही अंधःकारमय असली, तरी धीर सोडू नका. तुमच्यातल्या सुप्त आत्मबळाला जागवा, प्रामाणिक माणसांची साथ घ्या आणि लढत राहा. मात्र, कोणतीही किंमत मोजावी लागली तरी आपली जीवनमूल्ये आणि आदर्श कधीही सोडू नका.

कदाचित तुम्हाला वाटेल, या पडत्या काळात हा अनुभव सांगणारा मी कोण?

मी दुसरा कोणी नसून, ७, ००० वर्षांपूर्वी नाशिकच्या याच गोदावरीच्या काठावरून, पंचवटीतून पायी निघून, अथांग समुद्र ओलांडून लंकेवर विजय मिळवणारा, दशरथाचा पुत्र ‘राम’ आहे. आणि हा माझा, तुमचा, आपल्या सर्वांचा जीवनप्रवास आहे. लक्षात ठेवा, अंधार कितीही गडद असला, तरी शेवटी विजय ‘उगवत्या रंगांचाच’ म्हणजेच प्रकाशाचाच होतो!

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ योग दिवस ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

☆ योग दिवस ☆ शालिनी जोशी

२१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर १४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत २१ जून हा योग दिन म्हणून साजरा करायचा प्रस्ताव मांडला. १९३ पैकी १७५ देशांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. २१ जून २०१५ हा पहिला योगदिन ठरला. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली.

भारतीय संस्कृतीतील योग संकल्पनेचा याला आधार आहे. यामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आध्यात्मिक उन्नती साधते. यामध्ये योगासने, प्राणायाम आणि ध्यान व पातंजल योग यांचा समावेश होतो. सूर्यनमस्कारानेही सर्व साध्य होते म्हणून सूर्यनमस्काराना विशेष महत्त्व आहे. सर्व लोक एकत्र येऊन योग करतात. यातून विविधतेत एकता आणि जागतिक शांततेचा संदेश मिळतो. योग (युज्) जोडणे किंवा एकत्र येणे. जीवा शिवाचे ऐक्यही साधता येते.

योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी जगभर हा दिवस साजरा केला जातो. ही चळवळ एका दिवसापूर्वी न राहता कायमची झाली पाहिजे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद आहे.

२१ जून या दिवसाचे महत्त्व म्हणजे उत्तर गोलार्धातील हा सर्वात मोठा दिवस. या दिवशी रात्र लहान असते. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण  पूर्ण होऊन दक्षिण दिशेकडे मार्गस्थ होतो. या दिवसाला उन्हाळा अयन दिन असेही म्हणतात.सुर्याचे भासमान भ्रमण आणि पृथ्वीचा आस साडेतेवीस अंशांनी कललेला असल्यामुळे दिवस-रात्र असमान होतात.या विशेषामुळे २१जूनला योग दिनाचा मान मिळाला.

 

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा  ☆ शून्य ते पूज्य ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? विविधा ?

☆ शून्य ते पूज्य ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

भारतीय विचारधारा खूप प्राचीन आहे. निव्वळ प्राचीन नसून ती तितकीच महान देखील आहे. शून्य ही संख्या भारताने विश्वाला दिलेली सर्वात महान देणगी आहे असे म्हटले तर वावगे होऊ नये.

शून्य म्हणजे शून्य. पण हे शून्य जेव्हा एखाद्या संख्येच्या मागे लागते तेव्हा ते त्या संख्येचे मूल्य वाढवित असते. आपल्याकडे शून्याला पूज्य म्हणण्याची पद्धत आहे. मूल्य वाढविणारे शून्याला पूज्य म्हटले जाते असे आपल्या लक्षात येईल. थोडा अधिक विचार करता, किंवा थोडी अतिशयोक्ती करून असे म्हणता येईल की ज्याला आपले मूल्य वाढवायचे आहे त्याने आधी शून्य व्हावं आणि आपल्या आधी सद्गुरू, आराध्य देवता अथवा भगवंताला ठेवावे, म्हणजे तो मनुष्य खात्रीने पूज्य होऊ शकतो. आपल्याकडील अनेक संतांची चरित्रे पाहिली तर आपल्याला याची साक्ष पटू शकेल.

संत तुकाराम महाराज हे प्रापंचिक लोकांसाठी महान असे आदर्श म्हणता येईल. आधी सावकारी आणि नंतर कफल्लक झालेले तुकाराम महाराज जगद्गुरू झाले, ते त्यांनी स्वतःला शून्य केले म्हणूनच, नाही का?

मनुष्याचा जीवन प्रवास सुद्धा शून्यापासून सुरुवात होऊन शून्यापर्यंत येऊन थांबतो असे आपल्याला म्हणता येईल. बाळ जन्माला येताना ते शून्य असते आणि त्या बालकाचा जेव्हा म्हातारा होऊन मृत्यू होतो, तेव्हा तो एकप्रकारे शून्यच होत असतो…! सर्व संत असे सांगतात की शून्यापासून सुरू होणारा प्रवास शून्यापर्यंत येऊन न थांबता, तो पूज्या पर्यंत येऊन ठेपला तर त्या मनुष्याचे, जिवांचे सार्थक झालं असे नक्कीच म्हणता येईल.

शून्य ते शून्य नव्हे शून्य ते पूज्य हा प्रवास वाचायला अगदी सहज, पण आचरण करायला, क्रमण करायला तितकाच खडतर…

सर्व संतांनी हा मार्ग स्वतः आचरून दाखवला आहे. अपवाद सोडले तर अनेक संतांनी अनेक प्रकाराची सुखदुःखे सहन केली, अनंत यातना सोसल्या, उपेक्षा, मानहानी, किती सांगावे…?

पण या संतांनी कायम प्रतिसाद दिला…!

प्रत्येक मनुष्याला संत होणे जमेलच असे नाही, पण त्याला पूज्य (शून्य) होणे नक्कीच जमू शकेल…! यासाठी काही विशेष करायला लागेल असे नाही…

काही गोष्टी मनाशी दृढ करून करण्याचा प्रयत्न केला तर शून्य ते पूज्य हा प्रवास शक होईल.

बाळ जन्मते तेव्हा ते कोणाचेच नसते, त्यामुळे सर्वांचे असते. त्या बालकाची काळजी अगदी परके वाटणारे लोकं सुद्धा स्वयंस्फूर्तीने घेत असतात असे आपल्या लक्षात येईल. बाळ. जसजसे मोठे होऊ लागते, तसतसा त्याचा अहंकार मोठा होऊ लागतो. तो कोणी होत जातो, त्याच्या असण्याला, होण्याला समाज कमीअधिक प्रमाणात खतपाणी घालत असतो.

पन्नाशी पर्यंतचे आपण पाच टप्पे ठरवता येतील.

  • दहाव्या वर्षी त्याला सगळे आपले आहेत असे कळायला लागते…?
  • विसाव्या वर्षी त्याला आपल्याला काय हवे हे कळायला लागते…?
  • तिसाव्या वर्षी त्याला आपले नक्की कोण आहे कळायला लागते…?
  • चाळीसाव्या वर्षी त्याला आपले आणि परके यातील सूक्ष्म रेषा कळू लागते…
  • पन्नाशीला त्याला जग काय आहे कळते असे म्हणता येईल… (कदाचित जग काय आहे हे त्याने समजून घ्यावे अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी…)

“एका वाक्यात सांगायचे झाल्यास मनुष्याचा अहंकार पन्नास वर्षाचा होतो…!! “

“पूर्व सुकृत उदयास आले आणि त्याला संताची संगत लाभली तर त्याचा विवेक जागृत होतो, पण सत्संगती लाभली नाही तर त्याचा विवेक जागृत होत नाही आणि मनुष्य अहंकाराचे टोक गाठतो…! “

काही कारणाने सत्संग लाभलेला नाही, पण शून्य होण्याची मनाची तयारी आहे, त्याने अहंकार दूर करण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी संताचे ग्रंथ (संतांनी लिहिलेलं…) वाचावेत, त्यांचा अभ्यास करावा, आणि त्याच्या जोडीला नामस्मरण करावे…

मनुष्याचे आयुष्य शंभर वर्षाचे मानले तर पन्नास हा मध्यबिंदू म्हणता येईल…! चढत्या भाजणीने वाढत गेलेला अहंकार उतरत्या भाजणीने पन्नास ते शंभर पर्यंत शून्यावर आला तर मनुष्य पूज्य होणे सहज सोपे…!

पन्नाशी पर्यंत वाढवलेला प्रपंचाचा पसारा पुढील पन्नास वर्षात आवरता आला तर तो मनुष्य खऱ्या अर्थाने जिंकला असे म्हणता येईल…!! शून्य ते पूज्य या प्रवासाला सुरूवात करू इच्छिणाऱ्या सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा!!!

मनुष्य सुरुवात तरी नक्की करू शकतो… , प्रयत्न करू शकतो…! यश देणे न देणे रामाची इच्छा!!

पहा पटतंय का?

 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २५ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २५ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

नीती आणि धर्म

आत्तापर्यंतच्या चोवीस भागातून आपण संत तुकारामांच्या अनेक विषयांवरील अभंगांचा अभ्यास केला. या भागात त्यांनी माणसाच्या नीती आणि धर्माविषयी रचलेले काही अभंग आपण पाहू.

रडोनिया मान/ कोण मागता भूषण/

देवे दिले तरी गोड/ राही रुची आणि कोड//

लाविता लावणी/ विके भिके केज्या दानी//

तुका म्हणे धीरा/ विण कैसा होतो हिरा//

या अभंगात माणसाने खरेपणाने आणि धीराने वागावे असे महाराजांना लोकांना सांगायचे आहे. मला मान द्या असे रडगाणे लावून जर कोणी मान देत असेल तर त्यात काय मोठे भूषण आहे? लहान मुलाने रडावे आणि आपला हट्ट पुरा करावा तसाच हा प्रकार आहे. न मागता मिळतो तो खरा मान, मोठेपणा. म्हणून माणसाची वृत्ती समाधानी असावी. परमेश्वराने माझ्या पदरात जे दान टाकले आहे, ते गोड मानले आणि त्यात समाधान ठेवले तर ते खरे सुख आहे. उदाहरणादाखल महाराज पुढे सांगतात की, शेतात स्वतः राबून पिकवलेले धान्य दान केले तर त्यात खरे समाधान आहे. भीक मागून किंवा दुसऱ्याचे ओरबाडून घेतले आणि दानात दिले तर त्या दानाला काही अर्थ नाही. कोणत्याही प्रकारच्या उतावळेपणाने मोठेपणा मिळत नाही. जो धैर्यवंत असतो त्यालाच हिऱ्याची योग्यता लाभते.

पुढे ते सांगतात, ज्याला स्वहित साधायचे आहे त्याने नीती धर्माच्या खुणा, संकेत पाळणे अत्यंत जरुरीचे आहे.

पूज्या एकासनी आसनी आसन/

बैसता गमन मातेशी ते//

सांगतो ते धर्म नितीचा संकेत/

सावधान हित व्हावे तरी//

संता ठाया ठाव पूजनाची इच्छा/

जीवनीच वळसा सापडला//

तुका म्हणे एकाएकी वरासने/

 दुजे तेथे भिन्न अशोभ ते//

प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून वागावे. ज्या आसनावर पूज्य अशा देवांची मूर्ती असेल किंवा गुरु बसलेले असतील, त्या आसनावर आपण बसू नये. ते पाप आहे. स्वतःची योग्यता नसताना, संतांप्रमाणे आपली ही पूजा व्हावी असे ज्याला वाटते, तो भवसागरात गटांगळ्या खातो आहे असे समजावे. श्रेष्ठ आसनावावर संत बसले असताना आपण तेथे जाऊन बसणे म्हणजे स्वतःची शोभा करून घेण्यासारखे आहे.

यासी कोणी म्हणे नींदेची उत्तरे/

नागवला खरे तोचि एक//

 आडवाट जाता लावी नीट सोयी/

धर्मनिती तेही ऐसी आहे//

नाइका सुखे करावे ताडण/

पाप नाही पुण्य असे फार//

जन्मव्याधी फार चुकतील दुःखे/

खंडावा हा सुखे मान त्याचा//

तुका म्हणे निंब दिधल्यावाचून/

अंतरीचा शीण कसा जाय//

 महाराजांना या अभंगात मुख्यतः काय सांगायचे आहे? तर ते म्हणजे दुर्जनाला शासन झालेच पाहिजे. कोणाला माझे हे भाषण निंदा वाटेल, पण ही निंदा नाही. कोणी आड मार्गाला जात असला तर त्याला सुयोग्य मार्गाला लावणे ही खरी धर्मनिती आहे. चांगल्या नीतीची गोष्ट सांगत असता जर कोणी ती ऐकली नाही तर त्याला खरपूस मार द्यावा. (शब्दांचा) त्यात पाप नसून ते पुण्यकर्मच ठरेल. असे केल्याने जन्मरूपी व्याधी आणि इतर अनेक दुःखातून त्याची सुटका होईल. म्हणून त्याची मानखंडना सुखाने करावी. अंग तापाने फणफणल्यावर त्याला कडुलिंबा सारखे कडू औषध द्यावे लागते ना? दुर्जनाला सुधारण्यासाठी शिक्षा करणे क्रमप्राप्त आहे.

एका विठ्ठलाच्या चरणाशी सर्व नीती, धर्म शास्त्र आहे. म्हणून तुकाराम महाराज सर्व लोकांना विठ्ठलापाशी भक्ती भाव ठेवण्यास सांगतात.

पृथक मी सांगो किती/ धर्म नीती सकळ/

अवघीयांचा एक ठाव/ शुद्ध भाव विठ्ठली//

क्षरा अक्षराचा भाग/ करा लाग पंढरीये/

तुका म्हणे आगामीचे/ मथिले साचे नवनीत//

 महाराज म्हणतात की ते प्रत्येकाला धर्म आणि नीती विषयी वारंवार किती सांगणार? एकच करा, सर्वांनी विठ्ठलाच्या चरणी शुद्ध भाव ठेवावा. हेच धर्म आणि नीतीचे तात्पर्य आहे. तो क्षर ( सगुण) आणि अक्षररूप ( निर्गुण) पंढरपुरात आहे, त्या ठिकाणी सगळ्यांनी अवश्य जावे. सर्व शास्त्ररुपी दही घुसळून काढलेले लोणी म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठल हे दैवत तेथे आहे. भगवंताचे ध्यान अंतःकरणांमध्ये करणे हीच त्याची पूजा आहे. या वाचून सर्व वेगवेगळ्या उपाधी पापमूलक आहेत. त्या उपाधींचा संकल्प सुद्धा करू नये. लोकहो, भगवंताने श्रुती आणि स्मृती मध्ये ज्या आज्ञा दिल्या आहेत, त्याप्रमाणे आचरण ठेवणे, हाच खरा धर्म आहे. हा धर्म पाळल्याने सहज स्थिती प्राप्त होईल, ज्या स्थितीचा तुम्हाला कधी वीट येणार नाही. मनाची स्थितप्रज्ञता ही सहज स्थिती आहे. त्यामुळे सुखाने अति आनंद होणार नाही किंवा दुःखाने अतीव दुःख होणार नाही.

नीतिमत्तेबद्दल तुकाराम महाराज आणखी काय सांगतात ते पाहूया.

नये पाहो मुख मात्रागमन्याचे/

तैसे अभक्त्याचे गुरुपुत्रा//

म्हणउनी बरे धरिता एकांत/

तेणे नवे घात भजनासी//

नये होऊ कदा निंदकाची भेटी/

जया द्वैतपोटी चांडाळाच्या//

*तुका म्हणे नको बोलो त्यासी गोष्टी/

जयाचिया दृष्टी पापवाढे/

त्यांचे म्हणणे असे आहे की, जो विकृत वृत्तीचा आहे, (मात्रागमन्या )- मातेशी गैर वृत्तिने वागणार्‍याचे तोंड कधी पाहू नये. गुरुची निंदा करणाऱ्या शिष्याचे, हरीची निंदा करणाऱ्याचे मुखही पाहू नये. आपल्या भक्तीत, भजन कीर्तनात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये यासाठी एकांतात राहणे सर्वोत्तम! निंदकाची भेट घेणे टाळावे, कारण त्याच्या तोंडात गोडवा असला तरी पोटात कपट असते. अशा माणसांना नुसत्या पाहण्याने सुद्धा पाप वाढते. नीती धर्माच्या कल्पना जनसामान्यांच्या मनात रुजविण्यासाठी तुकाराम महाराज काही दृष्टांत देतात.

अग्निमाजी पडे धातू/ लीन होऊनी राहे आंतु/

होय शुद्ध न पावे धातू/ पटतंतूप्रमाणे//

बाह्य रंगाचे कारण/ मिथ्या अवघेची भूषण/

गर्व ताठा हे अज्ञान/ मरण सवे वाहतसे//

पुरे मातलिया नदी/ लव्हाळा नांदे जीवनसंधी*/

वृक्ष उन्मळोनी भेदी/ परी तो कधी भंगे ना//

हस्ती परदळ जो भंगी/ तया पायी न मरे मुंगी/

कोण जाय संगी/ पाणोवाणी तयाच्या//

पिटीता घणेवरी सैरा/ तया पोटी राहे हिरा/

तैशा काय तगती गारा/ तया थोरा होऊनी//

लीन दीन हेचि सार/ भव उतरावया पार/

पुढे माथा भार/ तुका म्हणे वाहोनी*//

माणसाने नेहमी दीन असावे. हा गुण किती चांगला आहे त्याची उदाहरणे महाराज देतात.

१) अग्नीमध्ये पडलेले सोने न जळता शुद्ध होते, परंतु वस्त्र किंवा धागा आगीत पडला तर त्याचा नाश होतो. बाह्यात्कारी भूषणे हा केवळ दिखावा असतो.

२) गर्व किंवा ताठा हे केवळ अज्ञान आहे. जीव गेला तरी अज्ञान तसेच राहते.

३) महापूर आला तर वृक्ष उन्मळून पडतात आणि लव्हाळी मात्र तशीच टिकून राहतात. * वृक्षवल्ली जाती तेथे लव्हाळे वाचती ज्ञानेश्वरांनी सुद्धा हेच सांगितले आहे.

४) हत्ती शत्रूचा विध्वंस करतो, परंतु त्याच्या पायाखाली मुंगी मरत नाही. म्हणून हत्तीच्या मागोमाग झुंज खेळायला कोण जाणार?

५) हिरा घणाने फुटत नाही, पण गारा हिर्‍या पेक्षा मोठ्या असल्या तरी त्या घणाखाली टिकतात का?

 या सर्व उदाहरणांचा अर्थ एकच की, सर्वांनी दीन पणाने नम्र होऊन रहावे. मोठेपणाची ऐट कधी, कशाने गळून पडेल हे सांगता येत नाही. नम्रता, लीनता हे भवसागर पार करण्याचे फार मोठे साधन आहे. ज्याला मोठेपणाचा गर्व असेल

तो या भवसमुद्रात बुडून जाईल.

पुढील लेखात तुकाराम महाराजांनी रचलेल्या व्यवहार ज्ञानाविषयीच्या अभंगांचा आपण परामर्श घेऊ.

क्रमशः… १५ 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पायवाटा… ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?  विविधा ?

☆ पायवाटा… ☆ श्री आनंदहरी ☆

बालकवींची ‘औदुंबर‘ कविता शाळेत शिकताना आणि नंतरही ‘ पायवाट पांढरी तयातून आडवी-तिडवी पडे.. ’ ही ओळ आली की मन तिथेच थबकायचे, आजही थबकते..

ग्रामीण भागात, गाव-खेड्यात, वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्यांसाठी तर पाय चालायला लागले की रस्त्यापेक्षा पायवाटा याच चालणाऱ्या पायांच्या सोबती असतात. अगदी बालपणापासूनची ही सोबत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या कारणांसाठी हवीशी वाटत राहते.

आमच्या शाळेच्या परीक्षा झाल्या की खऱ्या अर्थाने आमची उन्हाळ्याची सुट्टी सुरू व्हायची. या सुट्टीचे वेध खूप आधीपासून लागलेले असायचे. ही सुट्टी म्हणजे नुसती धमाल असायची. बांधलेल्या खोंडाचे दावं सोडल्यावर जसे खोंड उधळतं तशीच सर्वांची स्थिती असायची.. वार्षिक परीक्षांची दावी सुटलेली असायची.. दावणीत उभा राहून कंटाळलेले पाय उड्या मारत उधळायला आतुरलेले असावेत तशी अवस्था व्हायची. काहींच्या घरातल्यांनी ‘झाल्या एकदाच्या परीक्षा ‘ म्हणत निश्वास सोडलेला असायचा.. सगळी बंधने सैल केली जायची. काहींच्या घरात तर परीक्षा होत्या हे ही ठाऊक नसायचे.. पोट भरण्यासाठी येरवाळी जाऊन सांजंला परत येण्यावाचून त्याच्याकडे पर्यायच नसायचा.. पण गल्लीतल्या कुणा वडीलधाऱ्याचं सगळ्यांकडे बारीक लक्ष असायचे.. शाळेच्या वेळात एखादे पोरगं दिसले तर “ काय रं, शाळंला गेला न्हाईस ? “ लगेच विचारलं जायचं. दोन-चार दिवस पोरं उंडारताना दिसली की कुणीतरी विचारायचं, “ झाल्या व्हय रं परीक्षा ? “

परीक्षा एकदाची झाली की ओढ असायची ती पोहायला जायची. सकाळ म्हणू नका, दुपार म्हणू नका, पोहण्यासाठी गुरवांच्या विहिरीवर पोरांची झुंबड असायची.. विहीरवर जाण्याची प्रत्येकालाच एवढी आतुरता असायची की जो तो पायवाटा शोधायचा, काहीजण तर सांदी-कुपाडीतून नव्याच पायवाटा तयार करायचे.. अंतर कमी करून आपल्या आपल्या इप्सितापर्यंत, ध्येयापर्यंत लवकरात लवकर नेणाऱ्या या पायवाटा किंवा पाऊलवाटा सर्वांनाच प्रिय असतात. रस्ते, राजमार्ग तयार करावे लागतात पण पायवाटा कुणी बनवत नाही किंवा तयार करत नाही.. जिथून, माणूस असो किंवा जनावरे अनेकांचे पाय गेले की त्या आपोआप बनतात. गुरवांच्या विहिराला बक्कळ पाणी असल्याने आम्ही मठातून ओघळीत उतरून कधी बांधावरून तर कधी रानातून पोहोण्यासाठी पळतच जायचो..

येताना मात्र कडकडून भूक लागली असली तरी रमत गमत, गप्पा मारत पायवाटेवरून यायचो. आम्हां पोरांना त्यावेळी पायवाट ही प्रियच असायची आणि कुठेही जायचे यायचे झाले तरी पायवाटाच हव्याशा वाटायच्या.

माणूस गावातील असो किंवा शहरातील, प्रत्येकाचा फिरण्याचा, वावरण्याचा, जाण्या-येण्याचा एक क्षेत्रपरीघ असतो. खेडेगावात प्रत्येकाचा तो क्षेत्रपरिघ जवळपास सर्वांना, त्यातल्या त्यात मोठ्यांना ठाऊक असायचाच.. त्या बाहेर, आडवाटेलासुदधा कुणी पोरगं दिसलं तर “ काय रं, हिकडं कुणीकडं निगालायस ? “ म्हणून हटकलं जायचं. सांगितलेलं कारण पटलं नाही तर माघारी घराकडं पिटाळालं जायचं.. मोठ्या माणसांनासुद्धा “ आज हिकडं आडवाटंला कुणीकडं ? “ विचारलं जायचं.

आडवाटा या पायवाटा किंवा पाऊलवाटाच.. पण न गेलेल्यासाठी आणि क्वचित कधीतरी जाणाऱ्यासाठी त्या आडवाटा. तसेच काही कारण असल्याशिवाय कुणी आडवाटेला आढळायचं नाही. नाहीतरी सरळमार्गी माणसं आडमार्गाला जातीलच कशाला ?

एकदा मित्राच्या मावशीकडे, पेरिडला गेलो होतो.. डोंगरातल्या गावातली जनावरे चरायला डोंगरात जातात ती पायवाटेनच.. डोंगरातल्या पायवाटा तशा खडतर.. त्या सगळ्याच जनावरांच्या जाण्यायेण्याने तयार झालेल्या.. डोंगर चढण्या-उतण्याचे जनावरांचे ज्ञान आश्चर्य वाटण्याजोगे असते. जनावरे वर डोंगरात ज्या पायवाटेने जातात त्याच पायवाटेने उतरतात असे नाही. काही ठिकाणी त्यांची उतरताना घसरून पडू नये अशा विचाराने घसरणीच्या जागी उतरणीच्या पायवाटा जरा लांबून आलेल्या दिसतात.

पायवाटा वेड्या-वाकड्या, राना-वनातून जाणाऱ्या, उंच सखल असल्या तरी पावलांना त्या रस्त्यांपेक्षाही प्रिय.. प्रवासाचे आणि भवतालाशी, निसर्गाशी असणारे अंतर कमी करणाऱ्या.. पूर्वसुरीच्या पावलावर पाऊल टाकून वाट चालत रहावी असे अप्रत्यक्षरित्या सांगणाऱ्या.. शिकवणाऱ्या. पूर्वसुरीच्या पावलांनी आणि वहिवाटीने तयार झालेल्या पायवाटा.. वहिवाट थांबली की काही काळातच भवतालाशी एकरूप होऊन जातात. जीवनातली इतिकर्तव्यता संपली.. जीवनकार्य संपले याची जाणीव झाल्यावर आदितत्वाची एकरूप होऊन जाणाऱ्या, पंचमहाभूतात स्वतःला विलीन करणाऱ्या एखाद्या साधू-संतासारख्याच. पायवाटा तशाच असतात निरपेक्ष भावाने आपले कार्य करणाऱ्या.. त्यांना पायाखाली तुडवत जाणारा महापुरुष असो किंवा एखादा चोर-दरोडेखोर त्यांच्यालेखी सारे सारखेच असतात.

दिवसभर डोंगरात चरायला जाणारी जनावरे सांज उतरू लागली की पायवाटेने गोठयाकडे परततात.. कधी गोधुळ उडवीत तर कधी आतुर पावलांनी चालताना गळ्यातल्या घंटीच्या मंजुळ नादाने भोवतालाला सुखावत.. आमच्या तिळगंगेकडे जाणाऱ्या अनेक पायवाटा, एखाद्या पट्टीच्या पोहणाऱ्याने या तीरावर पाण्यात डुबकी मारून पुढच्या तीरावर प्रकट व्हावे तशा, पाण्यात डुबकी मारायच्या ते पुढच्या काठालाच नदीबाहेर यायच्या.. दिवसभर रानात कष्ट करणारे शेतकरी डोईवर वैरणीचा भारा घेऊन पायवाटेने नदीत उतरून दुसऱ्या काठावर येईपर्यंत पाण्याच्या स्पर्शाने शीण हरवून ओलेत्या पायांनी घरी परतायचे तशीच पायवाट सुस्नात होऊन दुसऱ्या काठावर यायची..

आयुष्यातील सुख-दुःखाचे कितीतरी सांगावे इकडून तिकडे, तिकडून इकडे येता-जाताना पायवाटेने पाहिलेले असतात.. कधी ती मनातून सुखावत असेलही. कधी ती कष्टीही होत असेल पण वरून मात्र ती असते एखाद्या स्थितप्रज्ञासारखी ! ‘ ‘ सुख-दुःख समे कृत्वा !’ म्हणत असल्यासारखी…. पांथस्थाचे मुक्कामापर्यंतचे अंतर कमी करायचे.. जवळची वाट होऊन त्याची वाट जवळ करायचे हे पायवाटेचे जीवनकार्य.. माहेराच्या ओढीने येणाऱ्या माहेरवाशिणीसाठी, पाडसाच्या ओढीने येणाऱ्या गाईंसाठी ती उरकती होते तर अनिच्छेने जड पावलांनी जाणाऱ्यासाठी ती उरकता उरकत नाही.

आता काळ बदलत गेलाय. माणूस वाहनांनी प्रवास करायला लागलाय. रस्त्यावरसुद्धा पाऊलांपेक्षा वाहनांची चाकेच जिथं जास्त धावायला लागलीत तिथं पायवाटांवर पाऊले कुठुन पडणार ? पायवाटांवरून पाऊलेच पडत नसल्याने कितीतरी पायवाटा, आडवाटा निर्सगात, भावतालात विरून गेल्यात.. तरी अजूनही रानावनात, डोंगरखोऱ्यात पायावाटा भेटतात तेंव्हा मन सुखावते.. त्यावरून चार पावले तरी चालावे असे वाटते.. कधी कधी या पायवाटा उदास असल्यासारख्या वाटतात.. एखादी माऊली सासुरवाशीण लेकीच्या आठवणीने उदास व्हावी तशा.

पायावाट पाहिली की वाटते, कितीतरी पावलांनी या पायवाटेवरून आपले घर जवळ केले असेल, कितीतरी माहेरवाशीणी, सासूरवाशींणी याच पायवाटांवरून आल्या-गेल्या असतील. कुणातरी एखाद्या सासुरवाशीणीला कधीतरी माहेर जवळ करणाऱ्या पायवाटेची आठवण येत असेल आणि ती मनात म्हणत असेल,

 रामरगाड्यात साऱ्या

 राब सुटता सुटंना

 हरवली पायवाट

 बापमाऊली भेटंना

 

 मना माहेराचा ओढा

 बाई मिटता मिटंना

 पायवाटेचं ह्या रिण

 बाई फिटता फिटंना

 खरंच, या पायवाटांचं ऋण कधीच फिटता फिटणार नाही.

 **

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ – नकार पचविता आला पाहिजे… – ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆

अलका ओमप्रकाश माळी

?  विविधा ?

☆ – नकार पचविता आला पाहिजे… – ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆

रोज न्यूज पेपर उघडला की अगदी सहज दोन चार तरी बातम्या सहज वाचायला मिळतात.. प्रेमात नकार.. आयुष्य संपवले.. , परिक्षेमध्ये मिळालेल्या अपयशा मुळे विद्यार्थांनी उचलले टोकाचे पाऊल.. , मुलाना हवे ते खेळणे न मिळाल्यामुळे अल्पवयीन मुलाने जीवन संपवले.. , आयुष्यात मिळालेला नकार आणि प्रेमिकाचे टोकाचे पाऊल.. आपल्या मित्राची मैत्रिणीची हत्या.. अशा अनेक बातम्या वाचल्या की मन सुन्न होत.. नकार, अपयश न स्वीकारता आल्यामुळे टोकाची भूमिका घेतली जाते.. यातून येणारे नैराश्य स्वतःचे किंवा समोरच्याच्या मृत्यूचे कारण बनते, अपयश, नैराश्य ह्याने अहंकार दुखावतो आणि त्याचे परिणाम समाजाला, कुटुंबाला भोगावे लागतात.. छोट्या छोट्या नकारांमुळे मनावर परिणाम होतो आणि टोकाची पाऊले उचलली जातात.. आजकाल सगळ्यानाच इन्स्टंट सुख यश हव असत वाट बघण कोणालाच मंजूर नाही आणि याच मानसिकतेमुके अनेक अपराध घडतात अशा बातम्या विचार करायला भाग पाडतात.. काय चूक काय बरोबर ह्यातला फरक न कळल्यामुळे अहंकार निर्माण होतो आणि आयुष्याची गाडी वळणावरून कधी घसरते आणि चुकीच्या मार्गावर कधी जाते हे कळत सुद्धा नाही.. हे सगळं टाळण्यासाठी आपल्या मनावर असणारा संयम आणि स्वतःवरील विश्वास फार महत्वाचा असतो.. नकार, अपयश ह्याकडे एक संधी म्हणून पाहिले तर आयुष्याच्या गाडीला योग्य दिशा मिळते आणि ही गाडी आपोआप ध्येयापर्यंत पोहचतेच गरज असते ती संयम आणि विश्वासाची..

नकार पचविता आला पाहिजे…

जीवनात प्रत्येक वेळी आपल्या मनासारखं घडतंच असं नाही. कधी नोकरीत, कधी व्यवसायात, कधी नात्यांमध्ये तर कधी आपल्या स्वप्नांच्या वाटेवर आपल्याला नकाराचा सामना करावा लागतो. नकार मिळाला की मन दुखावतं, आत्मविश्वास डळमळतो आणि आपण स्वतःलाच दोष देऊ लागतो. पण खरं तर नकार हा अपयश नसतो; तो पुढे जाण्याचा आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा एक टप्पा असतो.

नकार स्वीकारण्याची क्षमता माणसाला अधिक परिपक्व बनवते. प्रत्येक नकार आपल्याला काहीतरी शिकवून जातो—आपल्या चुका दाखवतो, सुधारण्याची संधी देतो आणि नवीन मार्ग शोधायला प्रेरित करतो. ज्याला नकार पचविता येतो, तोच संकटांवर मात करून यशाच्या दिशेने वाटचाल करू शकतो.

जीवनातील अनेक यशस्वी व्यक्तींना सुरुवातीला अनेकदा नकार मिळाले होते. पण त्यांनी त्या नकारांना शेवट न समजता नव्या सुरुवातीची संधी मानली. म्हणूनच नकार मिळाला तर खचून न जाता त्यातून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे..

नकार हा आपल्या किमतीचा मापदंड नसतो. तो फक्त त्या क्षणी मिळालेला एक प्रतिसाद असतो. त्यामुळे नकार स्स्वीकारून त्यातून धडा घेतला पाहिजे आणि नव्या उमेदीने पुन्हा प्रयत्न केले पाहिजेत कारण कधी कधी एक नकारच आपल्याला अधिक मोठ्या यशाकडे घेऊन जात असतो.

नकार हा प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा अपरिहार्य अनुभव आहे. परंतु नकार मिळणे जितके महत्त्वाचे आहे, त्यापेक्षा तो कसा स्वीकारला जातो हे अधिक महत्त्वाचे असते. अनेकदा आपण नकाराला आपल्या व्यक्तिमत्त्वाचा, कर्तृत्वाचा किंवा अस्तित्वाचा नकार समजतो. त्यामुळे मन दुखावते, अहंकार जखमी होतो आणि आत्मविश्वास कमी होतो. पण वास्तवात नकार हा व्यक्तीचा नसतो; तो एखाद्या परिस्थितीचा, निर्णयाचा किंवा त्या क्षणाच्या गरजेचा असतो.

नकार स्वीकारणे म्हणजे पराभव मान्य करणे नव्हे. उलट, वास्तव स्वीकारण्याचे धैर्य दाखवणे असते.. जीवनातील प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार घडेल, अशी अपेक्षा ठेवणे हेच दुःखाचे मूळ आहे. जेव्हा आपण आपल्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवायला शिकतो, तेव्हा नकाराचे दुःखही कमी होते. कारण आपल्याला समजते की प्रत्येक गोष्ट मिळवणे हेच यश नाही; काही गोष्टी न मिळणेही आपल्या भल्यासाठी असू शक तात..

नकार माणसाला अंतर्मुख करतो. यशाच्या क्षणी आपण स्वतःकडे फारसे पाहत नाही; पण नकार मिळाल्यावर आपण स्वतःला प्रश्न विचारतो. माझ्यात काय कमी पडले? मी आणखी काय सुधारू शकतो? हा आत्मपरीक्षणाचा प्रवास माणसाला अधिक सक्षम आणि प्रगल्भ बनवतो. म्हणूनच नकार हा अनेकदा व्यक्तिमत्त्व घडवणारा सर्वोत्तम शिक्षक असतो.

अहंकाराला नकार सहन होत नाही. कारण अहंकाराला नेहमी स्वीकार, कौतुक आणि मान्यता हवी असते. परंतु जीवन प्रत्येक वेळी आपल्याला मान्यता देईलच असे नाही. ज्याने स्वतःची किंमत इतरांच्या स्वीकारावर अवलंबून ठेवली आहे, तो प्रत्येक नकाराने तुटत जातो. पण ज्याला स्वतःची ओळख आणि स्वतःवरील विश्वास आहे, तो नकाराने ढासळत नाही. कारण त्याला माहीत असते की इतरांचा निर्णय माझ्या यशाची व्याख्या असू शकत नाही.

नकार पचविणे म्हणजे मनातील कटुता सोडणे असते अस मला वाटतं. अनेक जण नकार मिळाल्यानंतर राग, द्वेष किंवा सूडभावना बाळगतात. पण अशा भावना सर्वात जास्त नुकसान स्वतःचेच करतात. ज्या गोष्टी बदलता येत नाहीत त्या स्वीकारणे आणि पुढे जाणे हीच खरी मानसिक ताकद आहे. नदीला दगड आडवा आला म्हणून ती थांबत नाही; ती नवीन मार्ग शोधते. तसेच जीवनातही अडथळे आणि नकार यांच्यावर अडकून न पडता पुढे वाहत राहणे गरजेचे असते.

खरे तर प्रत्येक नकारामध्ये एक संदेश दडलेला असतो. काही नकार आपल्याला अधिक मेहनत करण्याची आठवण करून देतात. काही नकार चुकीच्या दिशेने जाण्यापासून वाचवतात. तर काही नकार आपल्या संयमाची परीक्षा घेतात. त्या संदेशाला समजून घेतले तर नकार ओझे राहत नाही; तो मार्गदर्शक बनतो.

ज्याला नकार स्वीकारता येतो, त्यालाच खऱ्या अर्थाने स्वीकार मिळतो. कारण नकारातूनच सहनशीलता, नम्रता, संयम आणि आत्मविश्वास यांचा जन्म होतो. यश माणसाला प्रसिद्धी देऊ शकते, पण नकार माणसाला गहन विचार करायला मदत करतो. यश तुमची ओळख निर्माण करते; नकार तुमचे व्यक्तिमत्त्व घडवतो.

म्हणून आयुष्यात जेव्हा नकार भेटेल तेव्हा त्याला शत्रू समजू नका. त्याच्याकडे शिक्षक म्हणून पाहा. कारण प्रत्येक नकार हा तुमच्या प्रवासाचा शेवट नसतो; तो तुम्हाला अधिक सक्षम, अधिक शहाणा आणि अधिक मजबूत बनवणारा एक महत्त्वाचा टप्पा असतो.

“ज्याला नकार पचविता येतो, त्याला जीवनातील कोणतीही परिस्थिती पचविता येते. कारण नकार स्वीकारणे म्हणजे वास्तवाशी मैत्री करणे होय. ”

“नकार हा शेवट नसतो; तो नव्या सुरुवातीचा पहिला टप्पा असतो.”

© अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares