मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३५ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३५ ☆ मराठी भावानुवाद – डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

रवींद्रनाथ टागोरांच्या इंग्रजी गीतांजली मधील १०३ कवितांचा भावानुवाद आम्ही बहिणींनी, मंजिरी येडूरकर व शोभना आगाशे, मिळून केला. हे कोविड काळातील अपत्य!

घरातल्या सगळ्यांनी त्या कवितांचं खूप कौतुक केलं आणि यांचं पुस्तक छापायचं हे ठरवून टाकलं. शेवटी ‘गीतांजली जशी भावली तशी’ हे पुस्तक प्रकाशित झालं, वर्षभरात चार संस्थांनी त्याचा गौरवही केला. हे सगळं आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच व अनपेक्षीत घडल्यामुळं भारी वाटत होतं.

पण खरं भारी वाटलं ते कवितांचा अनुवाद करतांना! मूळ इंग्रजी कविता, गद्य स्वरूपाच्या आहेत. जुन्या स्टाईलचं अवघड इंग्रजी आहे. आम्ही सुरवातीलाच ठरवलं होतं की आपण दुसऱ्या कुणाचाही अनुवाद आधी वाचायचा नाही; कारण कोणताही पूर्वग्रह घेऊन केलेला अनुवाद ‘आपला’ वाटणार नाही. मग त्यातल्या बऱ्या वाईटाची जबाबदारी आपण कशी घेणार! आपल्या कविता शक्यतो गेय होतील, असा प्रयत्न करायचा. मन अगदी स्वच्छ ठेऊन, आपल्याला काय वाटतंय ते लिहायचं. अर्थात याचं पुढे जाऊन पुस्तक होईल हे ध्यानी मनी सुद्धा नव्हतं. जवळजवळ महिनाभर आम्ही चर्चा करून प्रत्येक कवितेचा कीस पाडलाय.

एक मुख्य अडचण वाटली, ती म्हणजे, या कविता आध्यात्मिक विषयावर आहेत, असं वाचलं होतं. पण आमच्या लक्षात आलं की, अगदी अध्यात्मिक नाही पण प्रत्येक कविता एक विचार व्यक्त करते. मात्र तो विचार व्यक्त करण्यासाठी रविंद्रनाथ जी रूपकं वापरतात, ती समजायला जरा अवघड, त्यातून इंग्रजीमध्ये, त्यामुळे काही काही कवितांवरील चर्चा दिवस दिवस चालायची. पण शेवटी एकतर एकमत व्हायचं किंवा दोघींपैकी एकीवर पूर्ण जबाबदारी टाकली जायची.

त्यांच्या बऱ्याच कविता गोष्टीसारख्या आहेत. ३१ व्या कवितेत कवीला खूप श्रीमंत व्हायचं असतं. जगावर सत्ता मिळवायची, म्हणजे अनभिषिक्त सम्राट व्हायचं असतं. त्यासाठी तो सगळ्या जगाला कैदी बनवणार असतो. त्यासाठी तो रात्रभर बसून जड साखळदंड बनवतो. सकाळी उठून पाहतो तर त्या साखळदंडांनी तो स्वतःच जखडला गेलेला असतो. यातून आपण सुविचार सांगू शकतो, दुसऱ्याचं वाईट चिंतून किंवा मोहात लिप्त राहून आपलं भलं होत नाही.

६४ व्या कवितेत नदीच्या उतरणीवरून संध्याकाळी एक स्त्री दिवा घेऊन निघालेली असते. कवी तिला तो दिवा आपल्याला देण्याची विनंती करतो कारण त्याच्या घरात अंधार असतो. ती म्हणते हा नदीच्या प्रवाहात सोडण्यासाठी नेते आहे. पुन्हा ती अशीच दिवा घेऊन येते. पुन्हा कवी तिला दिवा मागतो. ती म्हणते नभाला अर्पण करणार आहे. पुन्हा रात्री येते. ती म्हणते दिव्यांची आरास करायची आहे. कवीला सर्व दिवे तिनं व्यर्थ घालवले असं वाटतं. वर वर पाहता यात दडलेला अर्थ लक्षात येत नाही पण विचार केल्यावर समजतं की कवीला इथे सांगायचं आहे की, आपल्या अज्ञानाचा अंधार दुसऱ्यांच्या आयत्या दिव्यांनी नष्ट होत नाही. त्यासाठी आपणच प्रयत्नपूर्वक ज्ञानाचा दीप चेतवून हा अंधार दूर करावा लागतो. किंवा जे ज्ञानी लोक असतात ते पूर्ण आसमंत उजळून टाकण्याची इच्छा बाळगतात.

आणखी एक उदाहरण द्यावं असं वाटतंय. ५८ व्या कवितेत आनंद कुठं कुठं राहतो याचं वर्णन आहे. त्यातील एक वाक्य असं आहे, the ‘joy that sits still with its tears on the open red Lotus of pain’ याचा अर्थ काय असेल याचा विचार करताना मनात आलं उमलताना कमळाला त्रास होत असेल का, त्याच्या अश्रूच्या थेंबात आनंद राहत असेल का? की तो थेंब ओघळू नये, अश्रू आहेत हे कळू नये म्हणून राहतो, का त्या चमकणाऱ्या थेंबाकडे पाहताना आपण खूप आनंद मिळवावा म्हणून तिथे आनंद राहतो. किंवा आणखी काय काय चर्चा करत होतो, शेवटी लक्षात आलं की कवीला म्हणायचं आहे की सुखदुःख, हसू-आसू हे एकत्रच असतात, एका पाठोपाठच येतात.

ह्या निर्मितीच्या काळात होणाऱ्या आमच्या बौद्धिक चर्चा, त्यासाठी केलं जाणारं वाचन सगळं फार भारी वाटायचं. कारण शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यापासून बुद्धीला खाद्य मिळणे बंद झालं होतं. एकूण सगळं खूप कष्टाचं, पण खूप आनंददायी होतं.

त्यानंतर सांगलीतल्या साहित्यिक मैत्रिणींच्यामुळे ई अभिव्यक्तीची माहिती कळली. सुश्री उज्ज्वला केळकर, श्री सुहास पंडित, सुश्री मंजुषा मुळे व अन्य सर्व सुहृदांच्या प्रोत्साहनामुळे इतरही काहीबाही लिहायला लागलो व साहित्य, साहित्यिक यांच्या संगतीमुळं आमचा बौद्धिक विकास होऊ लागला.

१० डिसेंबर २०२५ पासून आमच्या गीतांजलीतील कविता, मूळ इंग्रजी कवितांसह ई अभिव्यक्तीवर प्रकाशित व्हायला सुरवात झाली. आजच्या या ३५ व्या भागाबरोबर ही मालिका संपन्न होत आहे. आम्हाला ही संधी दिल्याबद्दल ई-अभिव्यक्ती साहित्य-मंचाच्या संपादक मंडळाचे मनापासून आभार.

शोभना आगाशे 

मंजिरी येडूरकर 

—–

☆ गीत : १०२ ☆

I BOASTED among men that I had known you. They see your pictures in all works of mine. They come and ask me, “Who is he? ” I know not how to answer them. I say, “Indeed, I cannot tell. ” They blame me and they go away in scorn. And you sit there smiling.

I put my tales of you into lasting songs. The secret gushes out from my heart. They come and ask me, “Tell me all your meanings. ” I know not how to answer them. I say, “Ah, who knows what they mean! ” They smile and go away in utter scorn. And you sit there smiling.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : १०२ ☆

अभिमानाने मी सांगितले

तुझ्या ओळखीची खूण म्हणोनि

मोरपीस मी तुझे दाविले॥

*
तू दिससी मम गीतांमधुनी

जागोजागी त्यां जाणविसी

तसेच सार्‍या कलाकृतीतुनी॥

*

पुसती मज ते उत्सुकतेने

संभ्रमित अन् पाहती मजला

कोण तो‘, कथी विस्ताराने॥

*

उत्तर त्यांना देऊ न शकतो

उपहासाने जाती निघुनी 

तिथेच असुनी, तो मज हसतो॥

*

तुझ्या कथांची गीते लिहिता

उचंबळुनि ये गुपित हृदीचे 

गूढ ते मम शब्दात उमटता॥

*

पुसती मज ते उत्सुकतेने

संभ्रमित अन् पाहती मजला

अर्थ गीतांचा, कथी विस्ताराने॥

*

उत्तर त्यांना देऊ न शकतो

उपहासाने जाती निघुनी 

तिथेच असुनी तो मज हसतो॥

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—–

☆ गीत : १०३ ☆

IN one salutation to thee, my God, let all my senses spread out and touch this world at thy feet.

Like a rain-cloud of July hung low with its burden of unshed showers let all my mind bend down at thy door in one salutation to thee.

Let all my songs gather together their diverse strains into a single current and flow to a 

sea of silence in one salutation to thee.

Like a flock of homesick cranes flying night and day back to their mountain nests let all my life take its voyage to its eternal home in one salutation to thee.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : १०३ ☆

तुझ्याच चरणी जग हे सारे 

तुझ्या दर्शने भगवंता रे

शांत होतसे तनमन सारे

उद्धरुनि मज स्वीकारी रे॥

*

ओथंबुनी घन येत धरेवर

लीन तसा मी तव चरणांवर

आस घेऊनि आलो इथवर

पडो कृपा कटाक्ष मजवर॥

*

पक्षी जाती दिगंतरासी

फिरुनी येती घरट्यापाशी 

थकलेला रे मी प्रवासी

निजधामासी मजला नेसी॥

*

माझी गीते वेडीवाकुडी

आली ओंजळी दीनबापुडी

अर्पण करितो, अता ही कुडी

सारुप्य घडो, येता जगबुडी॥

(लेखमाला समाप्त)

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली, दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नायक ☆ श्री राजेश्वर बी. पारखे ☆

श्री राजेश्वर बी. पारखे

अल्प परिचय

व्यवसाय : राहता तालुक्यात शेती, बॉश पंप, इंजेक्टर दुरुस्ती.

? इंद्रधनुष्य ?

☆ नायक ☆ श्री राजेश्वर बी. पारखे 

भल्या पहाटे माझ्या मुलीला डॉ. प्राप्तीला व माझ्या आईला शिर्डी ला सहा वाजताच्या भुसावळ एस. टी. बसने जळगाव ला जाण्यासाठी सोडवून परत माघारी श्रीरामपूर ला निघालो,

पहाटेची वेळ होती पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे एकदम मस्त आल्हाददायक वातावरण होते,

आदल्या तीन दिवस आधीच जवळ जवळ एक हजार किलोमीटर च्या आसपास एस. टी. प्रवास झालेला होता,

प्रवासात नेहमी मला कोणी न कोणी असामान्य व्यक्तिमत्त्व नक्कीच भेटते… परंतु पूर्ण प्रवासात असा कोणीच भेटलेला नव्हता,

आपली 2006 सालची मारुती व्हॅन घेऊन राहत्याच्या चौफुलीत गाडीचा वेग कमी केला आणि तिथेच एका 19 ते 20 वर्षाचा तरुणाने मला हात केला त्याला पाहून आपसूक माझा पाय ब्रेक वर अलगद गेला,

रस्ता पूर्ण मोकळा होता तिथेच हा मुलगा उभा होता,

उंचा पुरा, सडपातळ शरीरयष्टी, निमगोरा, उभट चेहरा असलेला, हलकीशी कोवळी दाढी चेहऱ्यावर असलेला, हॅवर सॅक पाठीमागे लटकवलेली, कानात अगदी साध्या पद्धतीचे हेड फोन चे बोळे अडकवलेले, चेहरा मात्र प्रचंड आकर्षक असलेल्या या तरुणाला बघून त्याच्या जवळच मी गाडी थांबवली,

त्याने एक स्मित हास्य दिले,

माहीत नाही तो किती वेळेपासून इथं असा एकटाच उभा राहिला असेल, ही जाणीव ठेवूनच थांबलो आणि त्याला पुढील सीट वर बसायला सांगितले,

विनम्र पणे तो थँक्यू म्हणायला विसरला नाही…

श्रीरामपूर च्या दिशेने प्रवास सुरु झाला, मस्त सकाळच्या वातावरणात त्या गार हवेचा आनंद घेत सहज मी त्याच्या कडे बघितले,

तसा तो हळुवार हसला,

मी त्याला विचारले कुठे जायचे आहे तो म्हणाला”बाभळेश्वर”,

मी म्हटलं तिथेच की अजून कुठे,

तो म्हणाला “मला ममदापूर ला जायचे आहे”

मी म्हटलं अरे वा!    रस्त्यातच आहे “सोडतो मी तुला”

पुढे अजून विचारले “तिथं कुठं राहतो”,

तो म्हणाला “माझे वडील येतील मला घ्यायला”

मी म्हटलं कुठून… उत्तर आले “वाकडी तुन”

मी त्याला म्हटलं मग आपण अस्तगाव मधून जाऊ तिथे वाकडी चौफुली तच तुला सोडतो,

त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला,

गाडी ने मस्त वेग घेतला होता,

मी मध्येच विचारले तू कुठून आलास, तो म्हणाला “लातूर” हुन…

असे म्हणताच तिथून का बरे?

तो म्हणाला ते “माझा सत्कार होता लातूरला”

मोटेगावकर सरांनी सत्कार केला,

माझ्या कपाळावर विस्मयकारी आठ्या आल्या,

आणि पुन्हां उत्सुकता ताणून राहिली म्हणून विचारले कसला सत्कार?

तो म्हणाला ते “नीट परीक्षेत मला 592 मार्क्स पडले म्हणून”!

मला तर आश्चर्याचा धक्का च बसला…

भले भले कितीतरी मुलं कष्ट, पैसा खर्च करून या “नीट” च्या अति अवघड परीक्षेत यशस्वी होत नाही अन या बहादराने तर कमाल च केली होती,

मी अक्षरशः कंट्रोल करून गाडी साईडला थांबवली,

आणि पुन्हां त्याला विचारले, किती मार्क्स? तो उत्तरला 592 मार्क्स,

मी आश्चर्यकारक रित्या सुखद धक्का पोहचल्यागतच त्याला मनोभावे हस्तांदोलन केले,

त्याचे अभिनंदन केलें,

मनात म्हटलं अरे! हा तर टॉप च्या गव्हमेंट कॉलेज ला डॉक्टर डिग्री घेणारा विद्यार्थी आहे…

माझ्या व्हॅन मध्ये पहिलांदाच एव्हढे मोठे “नीट” मध्ये मार्क्स पडलेला भावी डॉक्टर विद्यार्थी बसलेला होता,

आता त्याची विचारपूस करायला सुरुवात केली त्याने त्याचे नाव “विनायक विठ्ठलराव एलम” असे सांगितले,

वडील विहिर खोदकामाच्या ट्रॅक्टर वर ब्लास्टींग चे अतिशय जोखमीचे काम करतात असे सांगितले,

मोठी बहीण “पूजा” तिलाही दहावी ला 97. 70% मार्क्स मिळाल्याचे त्याने सांगितले, तीनेही Msc (maths) केले आहे आणि दोन नंबर ची बहीण “स्वप्नाली” इंजिनिअरिंग ची डिग्री करून MPSC ची पहिली परीक्षा पास झाल्याचे सांगितले,

तो सांगत होता आणि मी फक्त आणि फक्त ऐकतच होतो…

एका मागून एक शैक्षणिक धक्के मला बसत होते…

मी विचारले तुझ्या वडिलांचे शिक्षण ते किती?

तो म्हणाला पाचवी आई दुसरी झालेली,

हातावरचे मिळेल ते काम करून या आई वडिलांनी पोटाला चिमटा देऊन शिकवले असे तो भावुक होऊन सांगू लागला…

त्याचे डोळे हे सांगताना पाणावलेले मला जाणवले,

मी म्हंटले तुमच्या वडिलांची ही आता माझी भेट होईल खूप समाधान व आनंद वाटेल मला!

तो गाळातच हसला,

तो म्हणाला माझ्या वडिलांनी दिवसा ट्रॅक्टर व रात्री मिळेल ते काम करून आम्हां तिघांही भावंडाना शिकविले,

त्यांच्या कष्टाचे चीज झाले,

तेव्हढ्यात वाकडी गावाची चौफुली आली, मी गाडी थांबवली,

त्याने वडिलांना फोन करून तशी कल्पना दिली होती,

मी व भावी डॉक्टर खाली उतरलो,

तेव्हढ्यात जुनाट होंडा गाडीवर त्याचे वडील विठ्ठलराव आले, उंचे पुरे, रापलेला चेहरा,

अक्षरशः कामाचे मळके कपडे, वरची गुंडी उघडी पण अतिशय लोभस व कष्टाळू व्यक्तिमत्त्व मी जवळून पहात होतो,

मी अदबीने हस्तांदोलना साठी हाथ पुढे केला…

त्यांनीही लाजत आपला हाथ पुढे केला,

एका प्रचंड कष्टकऱ्याचा कडक व यशस्वी हाथ मी पहिल्यांदाच अनुभवत होतो…

त्यांचे मनःपुर्वक खूप खूप अभिनंदन केले,

मी म्हंटलो “विठ्ठलराव मानलं राव तुम्हांला पोरांनी तुम्हां आई बापाचं नाव कमावलं”,

त्यांचं उत्तर आलं “आपण काढलेले वाईट दिस लेकरांना येऊ नये बस एव्हढंच मनासनी ठेवलं… बाकी भगवंताची क्रिपा…

हे वाक्य म्हणताना डोक्यापासून ते पाया पर्यंत नागमोडी वेव्हज घेत ते ओशाळून अगदी अदबीने सांगत होते…

“मी तुम्हाला पण ओळखतो मी अन सचिन मोमले लई वर्षांपूर्वी एकदा ट्रॅक्टर चा पंप तुमच्या कडे घेऊनआलो होतो… “

बऱ्याच वेळ विचार करीत असतानाचे उत्तर मला मिळाले ‘यांची स्मरणशक्ती दांडगी आहे आणि तीच या मुलात आल्यामुळे त्याची हुशारी उदयास आली…

मी म्हणालो आता जग तुम्हांला ओळखील…

मनाला खूप समाधान वाटले,

एक फोटो होऊन जाऊ द्या “डॉक्टर” त्या मुलाला म्हणताच; तो लाजला,

आपल्या वडिलांना इशारा करून वरची गुंडी लावायला त्याने आवर्जून सांगितली,

या वयात परिपक्वतेचा अनुभव घेणारा हा “विनायक” आता आमच्या पंचक्रोशीत नव्हे तर जवळपासच्या सगळ्या तालुक्यात मधील शिक्षणातला “नायक”झाला होता…

मोटारसायकल लिलया फिरवत विठ्ठलराव यांनी विनायक ला पाठीमागे बसवून टाटा करीत आपल्या घरी निघाले, काळ्या मातीत राब राब राबून एक “नायक” या बापानी या समाजाला दिला होता कारण त्याची पै न पै कष्टाची होती आणि सृष्टीनिर्म्यात्याला ती मान्य होती…

ते दिसेनासे होइपर्यंत मी फक्त एकटक त्यांच्या कडे बघतच होतो…

अनुभवातील शब्द…

© श्री राजेश्वर पारखे

जिल्हा अहिल्यानगर, श्रीरामपूर

 9822258403

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सद्गुरू… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  स्वाती मंत्री ☆

स्वाती मंत्री

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सद्गुरू… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  स्वाती मंत्री ☆

चुकले ते एकाच ठिकाणी… शरणागती ही कृती नाही, ती अवस्था आहे. पाया पडणे ही शरणागतीची सुरुवात असेल, पण ती शरणागती नाही. शरणागती म्हणजे माझे मला कळत नाही, माझ्या मनाचा मला भरवसा नाही, माझ्या बुद्धीची मर्यादा मला माहीत आहे आणि म्हणून मी आता तुमच्यावर सोडतो. हे ओठांवरी येणे सोपे पण मनाने म्हणणे हेच खरे कठीण आहे. कारण आपला अहंकार हे म्हणणे देत नाही. तो म्हणतो अरे, आपण काय कमी आहोत? आपण स्वतः करू.

दत्त महाराजांच्या परंपरेत एक गोष्ट नेहमी सांगितली जाते सद्गुरू हे आपल्याला नको त्या गोष्टी देत नाहीत, पण हव्या त्या गोष्टी आपल्याला तयार केल्याशिवाय देत नाहीत. म्हणजे काय? म्हणजे असे की आपण जेव्हा खऱ्या अर्थाने शरण जातो, तेव्हा सद्गुरू आधी आपल्या आतील अनावश्यक प्रश्न गोष्टी साफ करायला सुरुवात करतात. आणि हे साफ करणे सुखाचे नसते. जुन्या सवयी जातात, जुने आधार सुटतात, जे माझे वाटत होते ते एकेक करून निघून जाते. हे सुरू झाले की माणूस घाबरतो अरे, हे काय होतेय? मी शरण गेलो तर आणखी त्रास?

पण हाच तो क्षण असतो जेव्हा सद्गुरू खरे काम करत असतात. कुंभाराने मडके बनवताना आधी माती मऊ करावी लागते, चांगली तुडवावी लागते, मग आकार द्यावा लागतो, मग भट्टीत टाकावे लागते तेव्हा कुठे ते मडके पाणी धरायला तयार होते. आपले आयुष्यही असेच असते. सद्गुरूच्या हाती स्वतःला सोपवणे म्हणजे त्या मातीसारखे होणे जी स्वतःचा आकार विसरते आणि कुंभाराच्या हातात स्वतःला झोकून देते.

शरणागतीनंतर जे होते ते शब्दांत सांगणे कठीण आहे पण एक गोष्ट नक्की होते. भीती कमी होते. जी माणसे, जी परिस्थिती आधी असह्य वाटायची त्यांच्याकडे बघण्याची नजर बदलते. हे का झाले माझ्यासोबत? हा प्रश्न हळूहळू यातून मला काय शिकायचे आहे? असा होतो. हा बदल लहान वाटतो, पण हाच सर्वात मोठा बदल आहे. कारण प्रश्न बदलला की उत्तर बदलते, उत्तर बदलले की जगणे बदलते.

सद्गुरूला शरण गेल्यावर माणूस परिपूर्ण होतो असे नाही. चुका होतात, अडखळणे होते, मन पुन्हा भरकटते. पण फरक एकच असतो आता एकट्याने भरकटत नाही. सद्गुरू सोबत असतात. अंधारात चालताना दिवा हातात असेल तर वाट चुकत नाही असे नाही पण पडलो तरी उठता येते, कारण काय झाले ते दिसते. सद्गुरू हा असा दिवा आहे जो विझत नाही, जो थकत नाही, जो माघार घेत नाही… अगदी खरं आहे..

संकल्प करायला काय हरकत आहे मी आजपासून सद्गुरूवर विश्वास ठेवतो. माझ्या समजुतीपेक्षा त्यांची कृपा मोठी आहे. इतकेच पुरे आहे. बाकी सारे सद्गुरू पाहतात ना…

ll श्री गुरुदेव दत्त ll

ll दत्तरुप ll

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: स्वाती मंत्री

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ यत्न तो देव जाणावा… ☆ दीपा नारायण पुजारी ☆

दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ यत्न तो देव जाणावा…  ☆ दीपा नारायण पुजारी ☆

“आई, मला हे झाड काढून दे ना. ” चित्रकलेच्या वहीत चित्र काढत बसलेला चारू आईला म्हणाला. चारुच्या आईनं त्याला स्पष्ट नकार दिला. चारू थोडा हिरमुसला. आजी, आजोबा, दादा आणि बाबा कुणीच त्याला मदत करायला तयार नव्हतं. आता त्याला हे चित्र पूर्ण करावंच लागणार होतं. ते त्याचं काम होतं. त्यालाच करावं लागेल, शिकावं लागेल, आपलं काम आपणच करावं, असा एक महत्त्वाचा संस्कार एका नकारानं झाला होता. खरंच, आपणच आपल्याला घडवायचं असतं, कुबड्या न वापरता चालायला शिकायचं असतं हे मुलांच्या मनावर ठसवणं हे मोठ्यांनी शिकायला हवं.

शिकता शिकता, तरबेज होता येतं, मोठं होता येतं. आपला प्रयत्न आपला आपण करायचा असतो. ज्याचा त्यानं करायचा असतो. ‘यत्न तोचि देव जाणावा. ’, असं सांगत समर्थांनी सुद्धा प्रयत्नांवर जोर दिला आहे. काही जण मात्र सगळं दैवाच्या हवाली करून मोकळे होतात. दैव मोठं की प्रयत्न हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण दैवाला जीवनात थोडे महत्त्व असलं तरी माणसानं जास्तीत जास्त जोर प्रयत्नांना द्यायला हवा.

“म्हणोनी अभ्यासास काही सर्वथा दुष्कर नाही. ” असं सांगणारे ज्ञानेश्वर प्रयत्नवादाला महत्त्व देतात. आत्मोन्नतीचा असा प्रयत्न आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मदत करतो.

 “असाध्य ते साध्य करता सायास

 कारण अभ्यास”, तुका म्हणे.

अलौकिक बुद्धिमत्ता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून, दोन टक्के प्रतिभा आणि अठ्ठ्याणव टक्के प्रयत्न आहे. जो स्वतः: साठी, स्वतः प्रयत्न करतो तो स्वतः, स्वतःचा मित्र असतो. जो प्रयत्न करणं सोडून देतो, दुसऱ्याची मदत घेतो, तो स्वतःच स्वतःचा शत्रू होतो. स्वत:ला पांगळा करतो, स्वतःला दुबळं बनवतो.

स्वतः प्रयत्न करणं याचा अर्थ मार्गदर्शनाची गरजच नाही असा नाही बरं. योग्य मार्गदर्शन मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. पण देणाऱ्याचा हात घ्यायचा नसतो हे ध्यानात ठेवावं लागतं. एका दिव्यानं दुसरा दिवा लागतो हे खरंच आहे. पण दुसऱ्या दिव्यात तेल, वात घालून तो सुसज्ज असेल तरच तो लागणार, हो ना? तेल, वात किंवा दिवा यातलं काही एक जरी जवळ नसेल, तर दिवा पेटणार कसा? या गोष्टी तयार ठेवाव्या लागतात. तसंच केवळ गुरुकृपा, उपदेश, गुरुसंगती यांनी प्रगती होत नाही. ज्ञान मिळत नाही. ते प्रयत्न पूर्वक प्राप्त करून घ्यावं लागतं. कोणीच कोणाला सर्व ज्ञान देऊ शकत नाही. स्वतःच कष्ट करून ते मिळवावे लागतं. आयतं काही मिळत नाही. म्हणून आत्मविश्वास पूर्वक, निष्ठेनं प्रयत्न करत राहणं हाच एक योग्य मार्ग आहे. आपण तो विसरता कामा नये. मार्गदर्शन घ्यावं पण मार्गक्रमण आपल्याला स्वतःलाच करायचं आहे हे लक्षात ठेवावं. सावधानता, सातत्य, चिकाटी या गोष्टी ध्येय प्राप्तीसाठी खूप महत्वाच्या आहेत. यात कुठंही उणीव निर्माण झाली तर अंध:पतन होणारच. म्हणतात ना, “सावधानता हटी तो दुर्घटना घटी. ” विवेक, सातत्य, उत्साह हे गुण आपल्याला आपला मित्र बनवतात. आळस, अळंटळं, अशा गोष्टी आपल्याला आपलाच शत्रू बनवतात.

जे अभ्यासाचं तेच आरोग्याचं. आरोग्य संपन्न राहणं अथवा आजारी पडणं, आपल्यावरच अवलंबून असतं. योग्य आहार, योग्य विहार असेल तर आरोग्य चांगलं राहतं. आजारी पडल्यावर डॉक्टर औषध देतात. पण ते वेळेवर आणि योग्य प्रमाणात घ्यावं लागतं. तसं न केल्यास आजार बरा होत नाही. म्हणूनच आपणच आपले शत्रू असतो.

“उद्धरेदात्मनात्मानाम् नात्मानमव साधयेत् |

 आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मन: ||”

गीतेतील सहाव्या अध्यायातील हा श्लोक प्रत्येकानं लक्षात ठेवला पाहिजे. आचरणात आणला पाहिजे. चारुच्या पालकांनी तो आचरणात आणला आहे ना, तसा.

© दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

deepapujari57@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कावळेमामा – – -☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

??

☆ कावळेमामा – – – ☆ विभावरी कुलकर्णी

(एक वात्सल्यगाथा)

आमच्या घरासमोर एक उंच, डेरेदार अशोकाचे झाड आहे. हिरवीगार पानांची झालर पांघरलेले हे झाड नेहमीच अनेक पक्ष्यांचे आश्रयस्थान राहिले आहे. पण काही महिन्यांपूर्वी या झाडावर घडलेला एक प्रसंग माझ्या आणि आमच्या संपूर्ण गल्लीच्या कायमचा लक्षात राहिला आहे. निसर्गाचे वात्सल्य, पक्षांची आपल्या पिल्लांविषयीची टोकाची माया आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी दाखवलेला शौर्यप्रताप आम्ही सर्वांनी अनुभवले. या सर्वांचा एक जिवंत आणि थरारक अनुभव आला. आणि छोटे किंवा मैत्री असलेले पक्षी पिल्लू प्रेमामुळे कसे आक्रमक होतात हे प्रत्यक्ष अनुभवले.

गोष्ट सुरू होते उन्हाळ्याच्या दिवसांत. अशोकाच्या झाडाच्या एका उंच, सुरक्षित वाटणाऱ्या फांदीवर कावळ्याच्या एका जोडीने आपले घरटे बांधायला सुरुवात केली. दोन्ही कावळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत राबत होते. कुठे वाळलेली काडी, कुठे एखादी लहान दोरीची चिंधी, तर कुठे गवताचे पाते – एक-एक वस्तू शोधून आणून त्यांनी अत्यंत निगुतीने ते घरटे विणले. निसर्गाने त्यांना दिलेली ही एक जन्मजात कलाच होती.

काही दिवसांतच कावळीने त्यात अंडी घातली. त्यानंतर सुरू झाला खरा संयमाचा काळ. ती कावळी तासनतास त्या अंड्यांवर बसून अंडी उबवत असे. तर कावळा तिचे आणि घरट्याचे रक्षण करण्यासाठी आसपासच्या फांद्यांवर पहारा देत बसे. तो तिच्यासाठी अन्न शोधून आणायचा. रणरणत्या उन्हात, वारा-पावसाची पर्वा न करता त्या जोडीने अत्यंत प्रेमाने आणि निगुतीने ती अंडी उबवली.

शेवटी तो आनंदाचा दिवस उजाडला, जेव्हा अंड्यातून छोटी-छोटी पिल्ले बाहेर आली. घरट्यातून येणारा तो बारीक, मऊ आवाज त्या कावळ्याच्या जोडीसाठी जगातला सर्वात गोड संगीत होता. आता कावळा आणि कावळी दोघांचीही जबाबदारी दुप्पट झाली होती. आपल्या पिल्लांचे छोटे चोच उघडणे आणि त्यात किडे, अन्नाचे कण आणून भरवणे, हा त्यांचा दिवसभराचा दिनक्रम बनला.

दिवस निघून गेले आणि पिल्ले हळूहळू मोठी होऊ लागली. त्यांची काळीभोर पिसे दिसू लागली होती. निसर्गाच्या नियमानुसार आता त्यांना पंखांत बळ आणून आकाश कवेत घेण्याची वेळ आली होती. कावळ्याची जोडी आपल्या पिल्लांना उडायला शिकवू लागली. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारणे, पंख पसरवून समतोल साधणे – हे सर्व धडे पिल्ले अगदी उत्सुकतेने शिकत होती.

पण एका दुर्दैवी दिवशी एक दुर्घटना घडली.

ते कावळे आपल्या पिल्लांना घरट्याच्या काठावरून ढकलून देतात. ते पिल्लू काही अंतर हवेत गटांगळ्या घेते आणि आपले पंख पसरून मस्त विहार करु लागते. अशी उडण्याचे धडे चालू होते.

त्यातच एका पिल्लाने पंख फडफडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याच्या चिमुकल्या पंखांत अजून हवेचा वेग पेलण्याचे सामर्थ्य नव्हते. फांदीवरून सुटलेले ते पिल्लू थेट खाली येऊन पडले.

सुदैवाने त्याला मोठी दुखापत झाली नाही, पण ते प्रचंड घाबरले होते. रस्त्यावर पडलेले ते निसहाय पिल्लू स्वतःहून पुन्हा झाडावर उडून जाण्यास असमर्थ होते. रस्त्यावरून गाड्यांची ये-जा सुरू होती, कुत्री-मांजरींचा धोका होता आणि सर्वांत मोठा धोका होता तो म्हणजे माणसांचा!

आपले पिल्लू खाली पडल्याचे पाहताच झाडावर असलेल्या कावळ्याच्या जोडीचा जीव तीळ तीळ तुटला. त्यांचा आक्रोश आसमंतात घुमू लागला. त्यांनी संपूर्ण परिसर आपल्या आवाजाने डोक्यावर घेतला. आणि त्या आवाजाने आम्ही बाहेर आलो. तर आम्ही पिल्लाला इजा करु या भीतीने कावळ्याने हल्ला केला.

त्या नंतर सुरू झाली खरी संघर्षाची कहाणी!

आपल्या पिल्लाचे रक्षण करणे आणि त्याला उडायला शिकवून सुरक्षित ठिकाणी पोहोचवणे, हा त्या कावळ्यांच्या जोडीचा एकमेव उद्देश होता. पण खाली रस्त्यावर माणसांची सतत वर्दळ होती. कावळ्यांना वाटले की हा प्रत्येक माणूस त्यांच्या पिल्लाला हानी पोहोचवण्यासाठीच जवळ जात आहे. मग काय? त्या कावळ्यांनी मानवी आक्रमणाविरुद्ध आपला बचाव सुरू केला.

रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या प्रत्येक माणसावर कावळ्यांच्या जोडीने हवेतून थेट हल्ले करायला सुरुवात केली.

एखादी व्यक्ती शांतपणे चालत चालला असला, तरी अचानक वरून एक कावळा वेगाने खाली यायचा आणि थेट त्या व्यक्तीच्या डोक्यावर किंवा पाठीवर चोचीने मारून पुन्हा वर उडून जायचा.

रस्त्यावरून जाणाऱ्या सायकलस्वारांपासून ते भाजीवाल्यांपर्यंत – कोणीही या ‘कावळेमामांच्या’ तावडीतून सुटत नव्हते.

लोकांनी डोक्यावर हात धरून, छत्र्या उघडून किंवा धावत पळत तो रस्ता पार करायला सुरुवात केली.

अनेक लोकांनी त्या दिवसांत कावळ्यांच्या चोचीचा चांगलाच मार खाल्ला. काही जण वैतागले, तर काहींना यामागचे कारण समजल्यावर पक्ष्यांच्या या वात्सल्याचे कौतुक वाटले. ते कावळे एका क्षणासाठीही पिल्लावरून आपली नजर हटवत नव्हते.

जवळपास तीन चार दिवस हा थरार सुरू होता. पिल्लू हळूहळू रस्त्यावरून सरकत एका बाजूच्या लहान झुडपाजवळ गेले होते. कावळ्याची जोडी सतत त्याच्या डोक्यावर घिरट्या घालत त्याला प्रोत्साहन देत होती. “काव-काव” करून त्याला पंख पसरवण्याची जाणीव करून देत होती.

अखेर, सततच्या प्रयत्नांनंतर आणि आई-वडिलांच्या हिमतीमुळे त्या पिल्लाने आपली संपूर्ण ताकद एकवटली. त्याने आपले पंख पूर्ण पसरवले, जमिनीवर पायांनी जोर दिला आणि एक मोठी झेप घेतली!

ते चिमुकले पिल्लू हवेत तरंगले आणि थेट समोरच्या एका दूर असलेल्या झाडाच्या फांदीवर जाऊन बसले.

कावळ्याच्या जोडीचा आणि आनंद गगनात मावेनासा झाला. संपूर्ण परिसरात त्यांचा विजयोत्सव सुरू झाला. पण या सगळ्यात सर्वात मोठा ट्विस्ट आणि गंमत पुढे होती.

ज्या पिल्लाला कावळ्यांनी स्वतःची अंडी समजून उबवले, ज्याला जीवापाड जपले आणि ज्याच्यासाठी अख्ख्या गल्लीतील लोकांच्या डोक्यावर चोची मारल्या… ते पिल्लू दूरच्या फांदीवर बसून अचानक आपल्या घशातून गोड आवाज काढू लागले – “कुहू… कुहू…!”

ते पिल्लू कावळ्याचे नव्हतेच, तर ते कोकिळेचे पिल्लू होते!

निसर्गाची ही एक अतिशय प्रसिद्ध आणि अद्भूत गंमत आहे. कोकिळा कधीही स्वतःचे घरटे बांधत नाही. ती चलाखीने कावळ्याच्या घरट्यात जाऊन आपली अंडी घालून येते. कावळीला अंड्यांमधील फरक समजत नाही आणि ती आपल्या अंड्यांसोबतच कोकिळेच्या अंड्यालाही तितक्याच प्रेमाने उबवते.

त्या कावळ्याच्या जोडीने ज्याला आपले बाळ समजून संपूर्ण गल्लीतील लोकांना मार दिला. आम्हाला आमच्याच घरात जायला बंदी केली. सर्व धोके पत्करले, ते शेवटी एक कोकिळेचे पिल्लू निघाले. दूर फांदीवर बसून जेव्हा त्याने “कुहू कुहू” असा कुजन सुरू केला, तेव्हा अशोकाच्या झाडावर बसलेली कावळ्याची जोडी क्षणभर शांत झाली असावी!

त्यांनी एकमेकांकडे पाहिले असेल आणि विचार केला असेल, “आम्ही एवढी मेहनत करून याला उडायला शिकवले, लोकांच्या डोक्यावर चोची मारल्या आणि हा शेवटी ‘कुहू कुहू’ करतोय?”

निष्कर्ष –

अशोकाच्या झाडावर घडलेली ही घटना आजही आमच्या मनात ताज्या आठवणींसारखी आहे. जरी ते पिल्लू कोकिळेचे निघाले असले, तरी निसर्गातील ‘वात्सल्य’ हे जात, धर्म किंवा प्रजाती पाहत नाही, हेच या घटनेने सिद्ध केले.

त्या कावळ्याच्या जोडीने आपले कर्तव्य शेवटापर्यंत निभावले. पिल्लू कोणाचेही असो, आई-वडिलांचे प्रेम आणि निसर्गाची ही लीला खरोखरच अगाध आहे. आज जेव्हा जेव्हा आम्ही घरासमोरील त्या अशोकाच्या झाडाकडे पाहतो किंवा कोकिळेचा “कुहू कुहू” आवाज ऐकतो, तेव्हा मला त्या ‘कावळेमामांची’ आणि त्यांच्या या अद्भूत पराक्रमाची आठवण आल्याशिवाय राहत नाही!

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी एकविसाव्या शतकातील स्त्री… ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

??

☆ मी एकविसाव्या शतकातील स्त्री☆ उज्ज्वला केळकर

मी दोन हजार सव्वीसच्या काळातील स्त्री. मी सुशिक्षित आहे. सुसंस्कारितही आहे. मी सुजाण आहे. संवेदनाशील आहे. इतरांची सुख-दु:ख मला माझी वाटतात. मी अशी आहे… तशी आहे… हे काही मीच माझं वर्णन करत नाही. माझ्या आस-पासचे, भवतालचे लोक याची खात्री देतील. विचारा वटलं तर माझ्या शेजार्‍या – पाजार्‍यांना.

मी २०२२मधील स्त्री. मला हवं आहे, मोकळं निरभ्र आकाश, मनमुक्त विहार करण्यासाठी. मला हवा आहे, माझा मोकळा अवकाश, ज्यात मी माझ्याशी संवाद कारेन. माझे आनंदक्षण गोंजारत राहीन. माझी दु:खे कुरवाळीन. मी कोणती चांगली कामे केली, इतरांच्या दृष्टीने उपयुक्त असं काय केलं, हे मी तिथे आठवेन. तिथे मी माझ्या चुकांचा मागोवा घेईन. त्यावर विचार करेन. माझ्या भविष्याच्या योजना आखेन, असा मोकळा अवकाश (स्पेस) हवाय मला. पण खरंच का असं निरभ्र आकाश आणि मोकळा अवकाश मला उपलब्ध आहे?’ 

मला वाटलं, माझ्या आईच्या आणि त्याहीपेक्षा आजीच्या काळातील स्त्रियांच्या तूलनेत, म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धा आणि उत्तरार्धापेक्षा माझं आकाश अधीक मोकळं आणि स्वच्छ आहे. निरभ्र आहे पण जसजसा विचार करू लागते, तसतसं लक्षात येतं, माझ्याही आकाशात समस्यांचे ढग आहेतच. माझ्या आजीच्या काळातील स्त्रियांचा वावर अंगणापलीकडे मंदिर, पापड-कुरडया करण्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी मैत्रिणींकडे जाणं, एवढाच मर्यादित होता. माझ्या आईच्या काळातील स्त्रिया अंगण ओलांडून बाहेर पडल्या. नोकरी करू लागल्या. पण घर-संसार, मुलं-बाळं, नवर्‍याचं, असतील तर सासू-सासरे यांचं सगळं सांभाळून नोकरी करायची अशी पूर्वअट होती. नोकर्‍या बहुतेक शिक्षिकेच्या किंवा कार्यालयात कारकुनाच्या असत. बदली नोकर्‍यांना घरच्यांचा विरोध असे. तिचीही मानसिकता नव्हतीच. तिनेही आपलं स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी ते सारं सहन केलं. त्यावेळेपर्यंत विभक्त कुटुंबपद्धती समाजात रूळली होती.

आजच्या स्त्रीला त्या मानाने कमी कष्ट करावे लागताहेत. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे घरात मिक्सर, गीझर वगैरे सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. अलीकडे पुरुषही घरकामात मदत करू लागले आहेत. पूर्वीच्या तूलनेत माझं आजचं जीवन अधीक आरामदायी झालं आहे.

आजच्या काळात घरोघरी एक किंवा दोन मुले पुरेत, असा दृष्टीकोण दिसून येतो. सहजच मनात येतं, पुढच्या पिढीला काका, मामा, मावशी, आत्या ही नाती तरी समजावून सांगता तेथील का? अलीकडे मुलांच्या जन्मापासून पालक त्यांच्या करिअरचा विचार करू लागली आहेत. त्यांचं जीवन करियरकेन्द्रित होतय. आता मुली, मुलांच्या बरोबरीने शिकताहेत. ही गोष्ट चांगलीच आहे. शिक्षण झालं की त्यांना चांगल्या पगाराची नोकरी लागते. उत्तम पगार मिळतो. त्यांना घर, शहरच नव्हे, तर राज्य आणि अनेकदा दुसरं राज्यही सोडून, दुसर्‍या देशात जाऊन रहावं लागतं. मुले-मुली अशी स्वतंत्रपणे राहू लागल्याने आता समाजाची वाटचाल एकल कुटुंबाच्या दिशेने होऊ लागली आहे. एकेकटे रहात असतील, तर त्याला कुटुंब तरी म्हणायचं का? असा प्रश्न आहे.

कुटुंबात एकेकटी मुले असल्याचे प्रमाण खूप आहे. त्यांना तडजोडीची सवय, दुसर्‍याचा विचार करण्याची सवय लहानपणापासूनच लागलेली नाही. त्यामुळे विवाहानंतर घरस्फोटाचे प्रमाण खूप वाढले आहे. एरवी स्त्री-पुरुष समान, असं आग्रहाने म्हणणार्‍या मुलींना आपला जोडीदार मात्र आपल्यापेक्षा जास्त शिकलेला आणि जास्त पगारदार हवा असतो. तिच्या आई-वडलांचीही तशीच इच्छा असते. इथे कुठे तरी वैचारिक विसंगती नाही का वाटत? 

मुला-बाळांसाठी, त्यांच्या संगोपनासाठी करिअरमध्ये तडजोड कुणी करायची, आईने की वडलांनी हाही प्रश्न दिवसेंदिवस आ वासून उभा आहे. मुलांचे आजी-आजोबा मुलांकडे बघणारे नसतील, तर मुलंच नकोत. दोघंच मजेत राहूयात, असं म्हणण्याची वृत्ती बाळवतेय. हातात भरपूर पैसा असल्यामुळे ऐशोआराम, चंगळवादी वृत्तीही वाढीला लागलीय. मुलंच नको, या विचारांच्या दिशेने समाजाची वाटचाल होऊ लागली, तर पुढच्या पिढ्या तरी कशा निर्माण होणार? लग्नच नको, लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू, असं म्हणणार्‍या मुला-मुलींचे प्रमाणही वाढते आहे. अनुरूप जोडीदाराच्या वाढत्या अपेक्षेमुळेही मुला-मुलींचे लग्नाचे वय वाढते आहे. हे सारे बघू जाता मला प्रश्न भेडसावतो, पुढच्या पिढीचे काय? हे सगळे लगेच घडेल, असे नाहीच, पण जीवनाचा प्रवाह त्या दिशेने वाहू लागलाय, एवढं निश्चित. हे दिसतं समाजाच्या एका घटकाचं चित्र. माझ्या पिढीतील मध्यमवर्गीय पांढरपेशा घरातलं हे चित्र. पण हा एक घटक म्हणजे काही सगळा समाज नव्हे.

समाजाच्या आणखी काही घटकांमध्ये दिसतं, मुलं- मुली शालांत परीक्षा पास झालीत. कुणी कुणी पदवी मिळवलीय. कुणी व्यावसायिक शिक्षण घेतलय. मिळेल, ती नोकरी-व्यवसाय, मुलं- मुली करताहेत. काहींच्या घरात शेती आहे, पण शेती असूनही अनेक मुलांना शेती करायची नाही. त्यांना नोकरीच करायचीय, मग ती किती का सामान्य असेना. शेतीचं अनिश्चित उत्पन्न हे एक कारण असेल, पण महत्वाचं कारण म्हणजे शेतीत काबाड-कष्ट जास्त करावे लागतात. त्या तूलनेत नोकरी आरामाची. मुलींनाही शेतकरी नवरा नकोय. नोकरदार हवाय, मग तो शिपाई का असेना. घरात शेती म्हंटलं, की कष्ट आलेच. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ‘श्रमप्रतिष्ठा’ या मूल्याचा भाषण-लेखनातून खूप गवगवा होतोय, पण श्रमप्रतिष्ठेला जेवढं महत्व त्यापूर्वी होतं, तेवढं नंतर राहिलेलं दिसत नाही. याबाबतीत ज्ञान आहे, पण त्याचं उपयोजन होताना दिसत नाही. मुलांचा दृष्टीकोण बदलत नाही. आपला देश कृषिप्रधान आहे, पण पुढची पिढी शेतीपासून लांब पळते आहे, ही शोकांतिका माझ्या मनाला वेदना देते. बळीराजाचा गौरव फक्त पुस्तका-मासिकांपुरता होताना दिसतोय. शेतकर्‍यालाही आपण शेतकरी असल्याचा अभिमान वाटताना दिसत नाही. मुली बळीराजाची राणी होण्यापेक्षा शिपायाची शिपाईण होणं पसंत करतात.

बर्‍या परिस्थितीतील मुलींचे आई-वाडील मुलीसाठी स्थळ शोधताना, घर-दार, शेती-भाती, शिक्षण-नोकरी असं सगळंच हवं, असा आग्रह धरतात. घरात शेती हवी, पण मुलाने मात्र शेती न करता नोकरीच करावी, असं त्यांना वाटतं. आता शेती करायचीच नाही, तर शेतीचा आग्रह का? मुलगा चांगला मिळवता आहे, एवढं पुरेसं नाही का? शिवाय, लग्नाच्या वेळी घर-दार नसलं, तरी नंतर तो आपल्या कर्तृत्वाने घर घेऊ शकेल, पण तेवढा काळ जाऊ द्यायला मुलीच्या वडलांना धीर नसतो. घर-दार, शेती-भाती यातून मिळणारी प्रतिष्ठा मनात कुठे तरी घर करून राहिलेली असते. मुलावर घरच्यांची, आई-वडील, भावंडे यांची फारशी जबाबदारी नको, अशीही मानसिकता असते. आता आपल्या मुलाच्या लग्नाच्या वेळी मुलीकडच्यांनी असाच विचार केला तर? तर आपण कुठे जायचं? हे तेव्हा का लक्षात येत नाही? मुलगी नोकरी करत असेल, तर एकत्र रहाण्याची तिची तयारी असते, पण कारण असतं, पुढे मुलाला सांभाळायला घरातील हक्काची माणसं मिळावित. अशा अनेक अपेक्षा. अपेक्षा वाढतात, तसं लग्नाचं वायही वाढतं. अर्थात ही समस्या या घटकांमध्ये पहिल्या घटकाइतकी गुंतागुंतीची अजून तरी झालेली नाही.

या घटकांमध्ये लग्नात अलीकडे रुखवत हे मोठेच प्रस्थ झाले आहे. डबल बेड, कपाट (तिजोरी), ड्रेसिंग टेबल, सोफा या गोष्टी आवश्यक झाल्या आहेत. मुलीकडच्यांना ते परवडो की न परवडो, मुलाच्या घरी ते सारं ठेवायला जागा असो की नसो, लग्नात या गोष्टी द्यायच्याच. ऋण काढायचं पण रुखवत साजरं करायचं. अनेक ठिकाणी मुलींचाच हट्टाग्रह असतो, की आई-वडलांनी या गोष्टी आपल्याला द्यायलाच हव्यात. मुली काही अडाणी नव्हेत. चांगल्या शिकलेल्या. पण शिक्षणाने सुजाणता, सामंजसपणा येतोच, असे नाही ना! 

माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाचं पाच वर्षापूर्वी लग्न झालं. तिची तीन खोल्यांची जागा. त्यात डबल बेड, सोफा, टेबल असं सगळं होतं. तिने मुलीच्या आई-वडलांना सांगितलं, जो रुखवतासाठी तुम्ही खर्च करणार, ते पैसे मुलीच्या नावे बँकेत ठेवा. गरजेप्रमाणे ती त्याचा उपयोग करेल. बेड, सोफा घेण्यात खर्च करू नका. घरात या गोष्टी आहेत. पण तिच्या सुनेला सगळं नवं कोरं हवं होतं. तिने मनाप्रमाणे नवा बेड, सोफा, टेबल करून घेतलं. शेवटी मैत्रिणीला आपल्या घरातल्या या जुन्या वस्तू शेजारी नेऊन ठेवायला लागल्या. ही मानसिकता बदलण्यासाठी काय करायला हवं, माझ्यासारखीला प्रश्न पडतो.

सगळं आई-वडलांनी किंवा सासू –सासर्‍यांनी द्यावं अशी अपेक्षा करताना, मी माझ्या कर्तृत्वाने मिळवेन, हा अभिमान, ही आत्मनिर्भरता कमी होत चाललीय का, असंही आताशी वाटू लागलय. काही प्रथा-परंपरा वरच्या स्तरातून खालच्या स्तराकडे झिरपत येतात. हुंडा आणि डोईजड रुखवत ही प्रथादेखील दुसर्‍या स्तराकडून तिसर्‍या, खालच्या स्तराकडे झिरपत आलीय. हा घटक श्रमजीवी लोकांचा. कामवाल्यादेखील आपल्या मुलींना लग्नात डबलबेड, कपाट, पंखा, खुर्च्या, मिक्सर वगैरे देताना दिसतात. अर्थात हा खर्च त्यांना परवडत नाही. कर्ज काढायचं, पण वस्तू द्यायच्याच. नाही दिलं तर? लोक काय म्हणतील? समाज नावे ठेवेल, ही धास्ती. एकीने मुलाकडच्यांना सांगितले, तुम्ही आम्हाला पंचवीस हजार रुपये द्या आणि आम्ही रुखवत मांडतो. आमच्याकडे पैसे नाहीत. मुलाकडचे म्हणाले, आम्ही पैसे देत नाही. तुम्ही रुखवत मांडू नका. आम्हाला काही नको. त्यावर तिचं म्हणणं असं की पण लोक काय म्हणतील? काही दिलं नाही, म्हणून आम्हालाच नावं ठेवतील ना! आता बोला! लोक काय म्हणतील, म्हणून न परवडणार्‍या आणि न पटणार्‍या गोष्टी करायच्या या मानसिकतेत बदल झाला पाहिजे. पण कसा आणि कधी? मी संभ्रमात आहे. मला जिथे, जसं समजावून सांगता येईल, तेवढं मी सांगत असते. पण मला माहीत आहे, माझे हे प्रयत्न अगदीच अपुरे आहेत. शिवाय मला हेही ऐकून घ्यावं लागतं, ‘आमच्या चालत न्हाई तसं! लोकं नावं ठेवत्यात!’

आणखी एक प्रश्न, प्रत्येकाला हव्या असणार्‍या स्पेसचा. माझ्या मुला-मुलींना, सुना, नातवंडांना वाटतं, त्यांना हवी असणारी स्पेस त्यांना मिळायला हवी. पण त्याच वेळी त्यांच्या हे लक्षात येत नाही, की त्यांच्या आई-आजीलाही त्यांच्यासारखीच स्पेस हवी असते. मी ती मिळवायचा प्रयत्न करते, पण अनेकदा मुला-सुनांचं, नातवंडांचं त्यावर आक्रमण होतं. माझ्या रिकाम्या वेळेत, मुलांना-सुनेला बाहेर जायचं असतं. मी घरातल्या मुलांकडे बघावं किंवा त्यांच्यासाठी मी एखादी गोष्ट करावी, ही त्यांची अपेक्षा असते. मला हव्या असलेल्या रिकाम्या वेळेचा विचार त्यांच्या मनात येत नाही. मी त्यांना स्पष्टपणे ‘नाही’ही म्हणू शकत नाही. मग वाटतं, दुसर्‍यांचा विचार करण्याची सवय लावण्यात आम्ही कुठे कमी पडलो का? 

असे अनेक प्रश्न. अनेक समस्या मनाचं आभाळ झाकोळून टाकताहेत. दोन हजार बावीसच्या थांब्यावर आज उभं राहून, घेतलेल्या अनुभवांचा मागोवा घेताना आणि भविष्याचा कानोसा घेताना, जे विचार मनात आले, जे बोलावसं वाटलं, त्यापैकी काही गोष्टी इथे लेखरूपाने मांडल्या आहेत. आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून मी केला आहे.

© उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈ संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रक्तमाखली अक्षरे ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ रक्तमाखली अक्षरे! ☆ श्री संभाजी बबन गायके 

रक्तमाखली अक्षरे !

 – – – ते ‘अधिकारी’ मोक्षाचे !

लग्नाला उणेपुरे दहाच तर महिने झाले होते. नवरा शिपाई गडी, त्यामुळे सहवास आजवर फारसा लाभला नाही, अशी स्थिती. त्यात त्याच्या पहिल्या पत्नीने त्याला हाक मारली आणि हा गेलाही लगोलग… सेनेतील नोकरी म्हणजे सैनिकाचे पहिले लग्नच मानले जाते गंमतीने! 

आजच्या सारखं मोबाईलचं गारुड नव्हतं तेंव्हा. त्यामुळे लिखित शब्दांवरच सारी मदार असायची. शिवाय हे शब्द दुस-यांच्या नजरेखालून तपासून घेतले जाऊनच आपल्या माणसाच्या हाती लागणार… देशाच्या संरक्षणाचा सवाल असतो! कुणी नजरचुकीने का होईना संवेदनशील माहिती उघड करू नये, हा उद्देश असतो. विशेषत: युद्धकाळात तर यावर कटाक्ष असतो.

त्याचं पत्र आलं आणि ते वाचण्यात किती तरी वेळ ती हरवून गेली होती. खूप वेळा पत्र वाचल्यानंतर तिने उत्तर लिहायला घेतलं… आणि त्यातही बराच वेळ गेला! शब्दांत सर्वच गोष्टी मावत नाहीत… आणि त्या पत्राचा आकारही एवढा नव्हता की सर्व काही लिहिता यावं! तिने काही ओळी लिहिल्या आणि पत्र धाडलं! 

मेजर राजेशसिंग अधिकारी यांच्या मनात त्यावेळी केवळ तोलोलिंग शिखर होतं… आज रात्री निघायचं आहे त्या पंधरा हजार फुटावर असलेल्या कड्याकडे… ! शिखराच्या थोड्या अलीकडच्या बुरुजांवर ‘त्यांनी’ खंदक बनवून ठेवले आहेत. आणि त्यातून ते आपल्या सैनिकांना अचूक लक्ष्य करताहेत. त्यांना गप्प केलं पाहिजे… कायमचं! कारण त्यांना ओलांडता आलं तरच आणखी वर जाऊन शिखरावर ताबा मिळवता येईल… आणि मग इतर ठिकाणं ताब्यात घेणं शक्य होईल… अन्यथा सारंच केवळ अशक्य आहे! 

खरं तर तोलोलिंग आपल्या मालकीचं शिखर. अत्यंत उंच, तिथलं तापमान कित्येक महिने शून्याखाली असतं. पलीकडे पाकिस्तानी सैनिकही त्यांच्या बाजूने भारतावर नजर ठेवून असतात. तापमान मानवी सहनशीलतेच्या मर्यादेपलीकडे खाली घसरले की तिथं थांबणं म्हणजे मरणाला आमंत्रण. म्हणून दोन्ही देशांनी हिवाळ्यात आपापल्या सैन्य-चौक्या रिकाम्या करून मागे जायचे आणि बर्फ वितळले की पुन्हा तिथं येऊन बसायचे, असे ठरवले होते! आणि असं काही वर्षे सुरळीत सुरूही होतं. पण मग एकदा पाकिस्तानी सडक्या मेंदूत एक काळी योजना शिजली. भारतीय सैनिक त्यांच्या चौक्यांत दाखल होण्याआधीच आपण तिथवर पोहोचायचं. मग त्यांनी भर हिवाळ्यात त्यांचे अनेक सैनिक गमावून त्या अतिशीत हवामानात आधुनिक साधनांच्या साहाय्याने पक्की व्यवस्था तयार करवून घेतली. आणि भारतीय हद्दीत कित्येक किलोमीटर्स आतपर्यंत घुसखोरी करीत भारतीय सैन्य-चौक्यांचा कब्जा मिळवला… आणि एखादा लबाड शिकारी सावजाची प्रतीक्षा करीत बसावा तसे दबा धरून बसले.

याचा सुगावा लागल्यानंतर भारताने तपासणी गस्ती पथक पाठवलं… त्यावर भीषण हल्ला करून त्यांनी कॅप्टन सौरव कालिया साहेब आणि त्यांच्या सहका-यांना ताब्यात घेतलं… त्यांचे पुढे त्यांनी किती हाल केले ही स्वतंत्र हकीकत आहे… मानवतेला काळीमा फासणारी! 

कॅप्टन सौरभ कालिया यांच्या शोधार्थ गेलेल्या पथकांवरही तुफान हल्ले झाले. नेहमीप्रमाणे चौक्या ताब्यात घ्यायला गेलेल्या सैनिकांवर तिथे आधीपासूनच घुसून बसलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी आरामात हल्ला केला आणि या बेसावध शूर वीरांना कपटाने संपवले! 

सर्व परिस्थिती लवकरच ध्यानात आली… आणि ऑपरेशन विजय हाती घेण्यात आले. योजना आखल्या गेल्या. भारतीय वायूसेनेची मदत घेण्यात आली.

ज्या ठिकाणी पाकिस्तानी मशीनगन्स घेऊन सज्ज बसलेले असत्तात, खालून वर चढत येणा-या भारतीय सैनिकांवर अचूक गोळीबार करत त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलत असतात, त्यांच्यापर्यंत पोहोचायचंच होतं… ! 

या उंच शिखरांवर पाकिस्तानी नेमके कुठे दडून बसलेत याची पाहणी करण्याचा एक मार्ग होता… हवाई पहाणी! मेजर अधिकारी साहेबांना तो परिसर उत्तम माहीत होता. त्यांनी स्वत:हून या हवाई पहाणीमध्ये सहभागी होण्याची तयारी दाखवली आणि ती पहाणी करूनही दिली. कारण त्यांना स्वत:च इथपर्यंत पोहोचण्याची कामगिरी मिळाली होती… तयारी तर पूर्ण पाहिजे! 

तोलोलिंगच्या या शिखराच्या अनेक बाजूंनी सैनिकी तुकड्या चढणार होत्या. योजना तयार होती. शिखराच्या एका सुळक्यावर असलेले शत्रूचे खंदक नेस्तनाबूत करून तिथे आपल्या सैनिकांसाठी पक्के ठिकाण तयार करून देण्याची जबाबदारी अधिकारी साहेबांना मिळाली होती. जेणेकरून इथून आणखी वर असलेल्या शिखरांवर बसलेल्या शत्रूवर चालून जाता येईल! 

खरं तर मेजर साहेब 2nd Battalion, Mechanised Infantry Regiment (2 Mech Inf) या तुकडीतील अधिकारी. पण युद्धाच्या गरजेनुसार त्यांना 18th Battalion, The Grenadiers सोबत संलग्न करण्यात आले होते. आणि जून महिन्याच्या अखेरीस त्यांना पुन्हा त्यांच्या मूळच्या दलात पाठवले जाणार होते… तेथून ते सुट्टीवर जाणार होते आणि लग्नाचा वाढदिवस साजरा करणार होते! 

मोहिमेवर जाणार का? अशी विचारणा ब्रिगेडीअर खुशाल ठाकूर साहेबांनी केली तेंव्हा त्यांनी अतिशय त्वरेने होकार दिला होता. त्यांच्याकडे एक कंपनी म्हणजे दहा सैनिकांची एक तुकडी सोपवण्यात आली. हे सैनिक commandoes होते… विशेष प्रशिक्षित सैनिक. ज्या भौगोलिक परिस्थितीत लढायचे आहे, त्या परिसरातील वातावरणाशी जुळवून घेण्याचा सराव आधी करून घेतला जातो. तुकडी तयार होती.

मेजर राजेश सिंग अधिकारी साहेबांच्या हाती त्यांच्या पत्नीने धाडलेलं उत्तराचं पत्र पडलं! यावेळी साहेबांच्या एका हातात रायफल आणि एका हातात तोलोलिंगचा नकाशा होता… आणि डोक्यात केवळ शत्रू! त्यांनी ते पत्र शांतपणे आपल्या युनिफॉर्मच्या वरच्या खिशात ठेवलं… काळजाच्या वर… काळजाला लागून! मोहिमेवरून परतल्यावर वाचू… त्यांनी मनात म्हटलं… आणि त्यांचं दुसरं मन सांगत होतं… ही मोहिम अत्यंत धोक्याची आहे… परत येण्याची शाश्वती नाही!

२८ मे, १९९९ची रात्र. तोलोलिंग… उंची सुमारे १६ हजार फूट. नव्वद अंश म्हणजे एकदम सरळ भिंत. त्यापेक्षा थोडा कमी अंशाचा डोंगरकडा चढत जायचं होतं आणि त्यासाठी बर्फात गिर्यारोहण करायला लागतात ती साधनंही घेणं आलं. रात्रीची वेळ असली तरी शत्रू सावध होताच. त्याला चाहूल लागली… त्यांनी प्रकाशाचे गोळे हवेत उडवले… त्यामुळे आपले सैनिक त्यांना दिसले… लपून बसलेल्या स्नायपर बंदूक वाल्याने एका ज्येष्ठ सैनिकास अचूक टिपले! सर्वजण जागच्या जागी थांबून राहिले… मिळेल त्या दगडांचा आडोसा घेत. रात्र पुढे सरकली… तापमान उणे पाच झाले. त्या रात्री आणि पुढचा सारा दिवस तिथेच लपून राहण्याचा निर्णय झाला! इथं आल्यावर समजलं… त्या बंकर्स मध्ये पाच-सात मुजाहिदीन (पाकिस्तानी अतिरेकी.. जे नेहमी पाकिस्तानातून कश्मिरात घुसखोरी करून येत असतात!) नव्हते… प्रशिक्षित पाकिस्तानी सैनिक होते… संख्येने कितीतरी पटीने अधिक आणि शस्त्रसज्ज! 

२९ मे, १९९९ची रात्र. पुन्हा चढाई आणि लढाई सुरु. यावेळी मेजर साहेबांनी निराळी व्यूहरचना आखली. खांद्यावरून डागण्याचे मोठे शस्त्र स्वत:च्या खांद्यावर पेलले आणि अचूक अग्निअस्त्र डागली… शत्रूचा एक बंकर उध्वस्त झाला… आणि साहेब तसेच पुढे निघाले… साथीदार सैनिकांच्या तीन-चार मीटर्स पुढे! ११ वाजता ब्रिगेडीअर ठाकूर साहेबांना त्यांनी रेडीओ सेटवरून निरोप दिला… साहेब… लढाई सुरु आहे… एक बंकर काबीज झालाय!

बाकी कमांडोज इतर मार्गांनी वर चढत होतेच… पाऊस सुरु आहे आणि त्यातून न भिजता पळत जाणे शक्य असते? मेजर साहेबांना अगदी समोरून, छातीवर गोळ्या लागल्या… शत्रूच्या खंदकातून आलेल्या! तशाही दुस-या बंकरच्या अगदी वीस एक मीटर अंतरावर ते पोहोचले होते… सहकारी सैनिकांनी त्यांना तिथून सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला… त्यांनी नकार दिला! गोळीबार करीत ते त्या खंदकात झेपावले… दोघा शत्रूंना हातांनी लोळवले आणि यमसदनी धाडले

१. ३० वाजता ठाकूर साहेबांनी रेडीओ सेटवर संपर्क साधला… यावेळी रेडीओ ऑपरेटर लान्स नायक राजेंद्र यादव म्हणाले… ”अधिकारी साहेब बंकर मध्ये घुसलेत आणि त्यांची शत्रूशी जोरदार लढाई सुरु आहे… हातांनी… समोरासमोर! आणि दुस-याच क्षणी रेडीओ ऑपरेटरच्या तोंडून शब्द बाहेर पडले… ”ओह! मां!” हाच तो क्षण होता… ब्रिगेडीअर साहेबांना समजायला वेळ लागला नाही… वाघ गमावला आपण! 

अधिकारी साहेबांच्या छातीवरच्या खिशातील कागदी लिफाफा रक्ताने भिजून गेला होता… पत्रातील अक्षरं लाल झाली असतील! 

तेरा दिवस मेजर साहेबांचा देह तिथून आपल्याला ताब्यात नाही घेता आला. कारण तोलोलिंगवरून मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु राहिला. पण अधिकारी साहेबांनी ताब्यात घेतलेल्या बंकर्समुळे तिथे नंतर पोहोचलेल्या भारतीय सैनिकांना पाय ठेवण्याची जागा मिळाली होती… ही जागा ताब्यात आली होती… हा पहिलं मोठं यश होतं!

१४ जून, १९९९… मेजर राजेशसिंग अधिकारी… तिरंगी राष्ट्रध्वज पांघरून घरी आले! खरं तर त्यांना लढाईला निघण्याच्या वेळी satellite phone वरून पत्नी सौ. किरण नेगी-अधिकारी यांच्याशी बोलता आले असते… पण त्यांनी त्यांच्या इतर सैनिकांना आधी त्यांच्या त्यांच्या घरी call करू दिले… आणि यांना बोलायचे होते तेंव्हा phone battery उतरली होती! 

देह घेऊन घरी आलेल्या अधिका-यांनी मेजर राजेश अधिकारी साहेबांचा गणवेश आणि ते पत्र किरण यांच्या हाती दिलं… ! न वाचलं गेलेलं पत्र!… त्यातील प्रत्येक अक्षराला मेजर साहेबांच्या रक्ताचा लालिमा लागलेला होता! जणू सुवासिनीच्या कपाळावरचं लालभडक कुंकू!

किरण यांनी स्वत:च लिहिलेल्या ओळी… भरलेल्या डोळ्यांनी पुन्हा कशाबशा वाचल्या… ”प्रिय राजेश… आपलं होणारं बाळ मुलगा असेल की मुलगी… ठाऊक नाही! तुम्ही परत सहीसलामत येऊ शकलात लढाईतून तर माझ्यासारखी आनंदी मीच असेन या जगात… पण तसं नाहीच झालं तर… एका हुतात्मा सैनिकाची पत्नी म्हणून मी अभिमानाने जगेन. आणि एक सांगू… आपल्या बाळाला केवळ कारगिल दाखवणार नाही… त्याला तुमच्या सारखं भारतीय फौजेचा अधिकारी बनवून दाखवेन… शब्द देते! या परत… वाट पाहते!

एक सैनिक गमावला जातो तेंव्हा एक पुत्र, एक पती, एक पिता, एक भाऊ, एक मित्र गमवला जातो… आणि मेजर राजेश सिंग अधिकारी यांच्यासारखा सैनिक गमावला जातो तेंव्हा एक शूर सैनिक, एक दिलदार माणूस, गोड गळ्याचा एक गायक, एक उत्तम चित्रकारही कायमचा दृष्टीआड होऊन जातो! ही एवढी मोठी किंमत मोजतात सैनिक आपल्या रक्षणार्थ! 

कै. मेजर राजेशसिंग अधिकारी यांच्या सारख्या ‘महावीर’ शूरांना ‘मोक्ष’ मिळण्याचा अधिकार आहेच! 

जय हिंद.!! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पालवी” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “पालवी☆ श्री जगदीश काबरे ☆

श्रीमती मंगल शहा.

 एचआयव्हीबाधित लहानग्यांच्या आयुष्यात आशेचा किरण फुलवणारी ‘पालवी’ 

पंढरपूर म्हटलं की डोळ्यांसमोर उभी राहते ती विठ्ठल-रखुमाईची नगरी, वारकऱ्यांचा अखंड हरिनामाचा गजर आणि संतांच्या करुणा, समता व मानवतेचा संदेश. पण या पवित्र नगरीत देवळांच्या कळसांपेक्षाही उंच असे एक कार्य शांतपणे सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पंढरपूर येथील पालवी प्रकल्पाला भेट देण्याचा योग आला आणि हा अनुभव मनाला अक्षरशः स्पर्श करून गेला. काही भेटी या केवळ औपचारिक राहत नाहीत; त्या मनाच्या तळाशी कायमस्वरूपी घर करून राहतात. एखाद्या संस्थेची इमारत, तिची व्यवस्था किंवा तिची प्रसिद्धी पाहून आपण प्रभावित होतो; पण ‘पालवी’ प्रकल्पात पाऊल टाकल्याक्षणी जाणवते ती माणुसकीची ऊब, मायेचा स्पर्श आणि निरपेक्ष सेवाभाव. तेथून परतताना मनात अनेक प्रश्न होते, डोळ्यांत नकळत पाणी होते आणि या कार्याबद्दल अपार आदरही होता. विठ्ठलाच्या या पंढरीत माणुसकीचे आणखी एक मंदिर उभे राहीले आहे, याची जाणीव या भेटीतून झाली. येथे घंटानाद नाही, आरत्या नाहीत, सोनेरी कळस नाहीत; पण निराधार मुलांचे हसरे चेहरे आहेत, मायेने डोक्यावरून फिरणारा हात आहे आणि निःस्वार्थ सेवेतून साकारलेली खरी भक्ती आहे.

सन २००१ मध्ये सामाजिक कार्यकर्त्या मंगल शहा यांनी अवघ्या दोन एचआयव्ही बाधित मुलांपासून या कार्याची सुरुवात केली. समाजाने नाकारलेल्या, आई-वडिलांपासून वंचित झालेल्या आणि आयुष्याच्या सुरुवातीलाच मृत्यूची सावली सोबत घेऊन जन्मलेल्या या मुलांना त्यांनी आपलेसे केले. आज हे छोटसं रोपटं वटवृक्ष बनले असून येथे दीडशेहून अधिक मुलांचे संगोपन होत आहे. या मुलांमध्ये सहा महिन्यांच्या अर्भकांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत अनेक जण आहेत. या मुलांना जन्मत:च एचआयव्हीची लागण झाली होती. ती रस्त्याच्या कडेला बेवारस अवस्थेत सापडली, रेल्वेस्टेशन, एसटी स्टँड, स्मशानभूमीत किंवा कचराकुंडी सारख्या सार्वजनिक ठिकाणी टाकून दिलेली होती. या निष्पाप मुलांचा त्यांच्या परिस्थितीत काहीही दोष नाही; पण समाजाने अनेकदा त्यांच्याकडे दयेने किंवा भीतीने पाहिले. पालवी प्रकल्पाने मात्र त्यांच्याकडे माणूस म्हणून पाहिले. त्यांना केवळ आसरा दिला नाही, तर आई-वडिलांच्या मायेची उब, शिक्षणाची संधी, सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि आनंदाने हसण्याचे कारण दिले.

पालवी प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे केवळ औषधोपचार केले जात नाहीत. एचआयव्हीबाधित मुलांना नियमित औषधे, वैद्यकीय तपासणी, पौष्टिक आहार आणि आरोग्याची सर्वतोपरी काळजी दिली जाते. त्याचबरोबर त्यांच्या मानसिक, भावनिक आणि बौद्धिक विकासालाही तितकेच महत्त्व दिले जाते. या मुलांसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्यात आली आहे. येथे शिक्षण म्हणजे केवळ पाठांतर नाही, तर जीवन समृद्ध करण्याची प्रक्रिया आहे. अलीकडे या शाळेत रघुनाथ माशेलकर विज्ञान केंद्र सुरू करण्यात आले असून त्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आम्हाला या प्रकल्पाला भेट देण्याची संधी मिळाली. शहरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा पाहायलाही मिळत नाही किंवा स्वतः प्रयोग करण्याची संधी मिळत नाही. त्याउलट ‘पालवी’तील या मुलांसाठी विज्ञान प्रत्यक्ष अनुभवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रयोग, निरीक्षण आणि प्रश्न विचारण्याची सवय या मुलांमध्ये विकसित व्हावी, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन जागा व्हावा, हा या उपक्रमामागचा विचार अत्यंत प्रेरणादायी आहे. त्याचबरोबर शहरातील इतर शाळांमधील विद्यार्थ्यांनाही या प्रयोगशाळेचा लाभ घेता यावा असा त्यांचा प्रयत्न रहाणार आहे. आयुष्य किती मोठे आहे यापेक्षा ते किती अर्थपूर्ण आहे, याला येथे अधिक महत्त्व दिले जाते.

या प्रकल्पाचे कार्य फक्त एचआयव्हीबाधित मुलांपुरते मर्यादित नाही. येथे मतिमंद मुलांसाठी स्वतंत्र विभाग आहे. तसेच एकल महिलांच्या पुनर्वसनासाठीही उल्लेखनीय काम केले जाते. समाजात विविध कारणांनी एकाकी पडलेल्या महिलांना येथे कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. शिवणकाम, हस्तकला, विविध उपयुक्त वस्तू तयार करणे अशा अनेक माध्यमांतून त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला जातो. एवढेच नव्हे, तर त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे विपणन करण्याची जबाबदारीही संस्था स्वीकारते. त्यामुळे मदतीवर जगण्याऐवजी स्वाभिमानाने उभे राहण्याचा आत्मविश्वास या महिलांना मिळतो.

या संपूर्ण कार्यामागची प्रेरणाशक्ती म्हणजे मंगल शहा. पंच्याहत्तरी ओलांडल्यानंतरही त्यांचा उत्साह, कार्यतत्परता आणि मुलांवरील प्रेम पाहून आश्चर्य वाटते. त्या स्वतः मुलांसाठी स्वयंपाक करतात, त्यांना प्रेमाने भरवतात, त्यांच्याशी खेळतात, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात. त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही प्रसिद्धीची अपेक्षा नाही, तर केवळ समाधानाचे तेज दिसते. या मुलांसाठी त्या केवळ संस्थापिका नाहीत, तर आई आहेत. त्यांचा हा सेवाभाव पाहताना संतांच्या करुणेचा प्रत्यय येतो. विशेष म्हणजे हे कार्य आता एका व्यक्तीपुरते मर्यादित राहिलेले नाही. शहा कुटुंबातील दुसरी पिढीही त्यात पूर्णपणे सहभागी झाली आहे. आशिष शहा, त्यांच्या पत्नी आणि आता तिसरी पिढीही या कार्यात समर्पित भावनेने सहभागी होत आहे. ही परंपरा केवळ संस्था चालविण्याची नसून माणुसकी जपण्याची आहे.

या प्रकल्पातील निवासी शिक्षकांचाही उल्लेख आवर्जून करावा लागेल. विशेषतः वैभव मोरे या तरुण शिक्षकाने मुलांशी निर्माण केलेले नाते विलक्षण आहे. तो केवळ शिक्षक म्हणून शिकवत नाही, तर या मुलांच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. मुलांसोबत राहणे, त्यांच्यासोबत शिकणे, खेळणे, त्यांना भावनिक आधार देणे हे त्याच्या दैनंदिन जीवनाचेच अंग झाले आहे. शिक्षणाचा खरा अर्थ विद्यार्थ्यांच्या जीवनाशी जोडला गेला पाहिजे, याचे हे सुंदर उदाहरण आहे. शिक्षणात प्रेम आणि आपुलकी किती महत्त्वाची असते, याचा तो जिवंत आदर्श आहे.

आजही समाजात एचआयव्हीविषयी अनेक गैरसमज आहेत. एचआयव्हीबाधित व्यक्तींबरोबर राहिल्याने, हात मिळवल्याने, एकत्र जेवल्याने किंवा स्पर्श केल्याने संसर्ग होत नाही, हे विज्ञानाने अनेक वर्षांपूर्वी स्पष्ट केले आहे. तरीही भीती, अज्ञान आणि पूर्वग्रह यांमुळे या मुलांना समाजापासून दूर ठेवले जाते. त्यांच्या आई-वडिलांच्या परिस्थितीची शिक्षा या निष्पाप मुलांना मिळू नये. त्यांना दयेची नव्हे, तर स्वीकाराची गरज आहे. त्यांच्याकडे सहानुभूतीने नव्हे, तर समानतेच्या नजरेने पाहण्याची आवश्यकता आहे.

पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या चरणी लाखो रुपये अर्पण केले जातात. मंदिरांचे कळस सोन्याने मढवले जातात. अनेकांना त्यातून पुण्य मिळवायचे असते. पण संतांचा संदेश वेगळा होता. “जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा; देव तेथेच जाणावा. ” हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवणारी काही माणसे समाजात अजूनही आहेत आणि त्यापैकी शहा कुटुंब हे एक उज्ज्वल उदाहरण आहे. त्यांनी देवाला दगडात शोधण्याऐवजी माणसात शोधले. त्यांनी आपल्या संपत्तीचा उपयोग मंदिरांच्या कळसांसाठी नव्हे, तर उपेक्षित मुलांच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवण्यासाठी केला. हीच खरी भक्ती, हाच खरा धर्म आणि हीच खरी समाजसेवा आहे. पंढरपूरच्या एका बाजूला विठ्ठल मंदिरात भक्तिभावाचा अखंड गजर सुरू असतो. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, चोखामेळा आणि गाडगेबाबा यांनी देव शोधायचा असेल तर तो माणसात शोधा, असा संदेश दिला. दुर्दैवाने आपण अनेकदा हा संदेश ऐकतो, पण आचरणात आणत नाही. मंदिरांचे कळस सोन्याने मढवले जातात, मोठमोठे धार्मिक सोहळे होतात, कोट्यवधी रुपयांच्या देणग्या दिल्या जातात; पण एखाद्या निराधार मुलाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आणणारे हात फार कमी दिसतात. शहा कुटुंबाने मात्र आपल्या संपत्तीचा आणि आयुष्याचा उपयोग समाजातील सर्वाधिक उपेक्षित मुलांसाठी केला आहे. हीच खरी मानवसेवा आणि हाच खरा धर्म आहे.

पालवी प्रकल्पाला भेट देताना जाणवलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे येथे कुणालाही त्याच्या आजाराने ओळखले जात नाही; प्रत्येक मुलाला त्याच्या नावाने, स्वभावाने, हसऱ्या चेहऱ्याने आणि स्वप्नांनी ओळखले जाते. या मुलांच्या चेहऱ्यावरचे निरागस हास्य आणि त्यांच्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यांतील माया पाहिली की माणुसकी अजून जिवंत आहे, यावर पुन्हा विश्वास बसतो. पालवी प्रकल्पातून बाहेर पडताना मनात एकच विचार घोळत होता, तो म्हणजे आपण देवाला प्रसन्न करण्यासाठी किती प्रयत्न करतो; पण देवासारखी निरागस मुले आपली वाट पाहत असताना आपण त्यांच्यासाठी किती वेळ देतो? समाजातील प्रत्येक व्यक्तीने अशा संस्थांच्या पाठीशी उभे राहिले, तर अनेक मुलांचे आयुष्य उजळून निघू शकते. मदतीचा हात नेहमी पैशाचाच असावा असे नाही; वेळ, कौशल्य, प्रेम, ज्ञान आणि आपुलकीही तितकीच मौल्यवान असते. त्यामुळे अशा संस्थांना समाजाने केवळ टाळ्यांचा नव्हे, तर प्रत्यक्ष सहकार्याचा हात दिला पाहिजे. आर्थिक मदत, स्वयंसेवा, वस्तूरूपाने योगदान किंवा समाजात योग्य जनजागृती, ज्याला जे शक्य आहे ते त्याने करावे.

पालवी प्रकल्प ही केवळ एक संस्था नाही; ती आशेची पालवी आहे, माणुसकीचा श्वास आहे आणि करुणेला कृतीची जोड देणारा एक जिवंत आदर्श आहे, माणुसकीचे विद्यापीठ आहे आणि संतांच्या विचारांचा आधुनिक काळातील साक्षात अविष्कार आहे. मंगल शहा आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब, वैभव मोरेसारखे समर्पित शिक्षक आणि या सेवायज्ञात सहभागी असलेले अनेक कार्यकर्ते समाजासाठी दीपस्तंभ आहेत. अशा कार्यकर्त्यांना मनःपूर्वक प्रणाम. कारण त्यांनी दाखवून दिले आहे की, देव शोधायचा असेल तर तो मंदिरात नव्हे, तर निराधारांच्या डोळ्यांतील आशेच्या किरणात आणि त्यांच्यावर प्रेमाने हात ठेवणाऱ्या माणसाच्या हृदयात सापडतो. त्यांचे कार्य समाजाला केवळ प्रेरणा देणारे नाही, तर प्रत्येकाने आपल्या जीवनात माणुसकीची एक छोटी पालवी फुलवावी, अशी अंतर्मुख करणारी हाक देणारे आहे.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “राजे आणि दुसरं घर..!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “राजे आणि दुसरं घर..!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

अवघ्या त्रेपन्न वर्षांचा एक सत्पुरुष..

पंचतत्त्वात विलीन झाला आणि…

चित्रगुप्ताच्या दरबारात हजर झाला..

चित्रगुप्तानं बसायला मानाचं आसन दिलं,

अन् राजांना अपमान झालेला तो दरबार आठवला..

दोघांनीही त्यावर स्मितहास्य केलं.

 

चला राजे, तुम्हांला स्वर्गाच्या दारापर्यंत

सोडायची जबाबदारी माझी आहे.

आयुष्यभर पायाला भिंगरी लावून फिरलात,

आता जरा उसंत घ्यावी.

चित्रगुप्त अंमळ हुशारीने म्हणाला.

 

राजे जागचे हलले नाहीत, अन् तो चिंताक्रांत झाला.

चलावं महाराज, याचसाठी तर असतो मानव जातीचा अट्टहास.. यावेळी स्वरात जरा अजीजी होती.

 

नको देवा, अर्ध्यातच बोलावलंस न विचारता,

अन् ह्या स्वर्गाचा आग्रह नव्हताच कधी मनात.

श्रींच्या इच्छेचं स्वराज्य तर झालं,

सुराज्यासाठी तू वेळ कुठे दिला..

इथे स्वर्गात गेलो तर देवत्व मिळेल,

आणि खाली मूर्ती आणि टाक होतील माझ्या.

मला मानवच राहू देत आणि राहिलेला अर्धा डाव पूर्ण करु दे.

 

भाग्य लिहीलं गेलंय राजे, आता बदल नाही.

या दरबारातून थेट स्वर्गात, याला पर्याय नाही.

 

राजे पुन्हा हसले,

देवा, माझी वही नीट तपासलीत ना,

तुरी द्यायची कला अवगत आहे मला.

 

स्वर्ग सोडून राजाने पृथ्वीचाच हट्ट धरला

आता मात्र चित्रगुप्ताचा नाईलाज झाला.

जगत्पिता ब्रह्मदेवाशी बोलणी करुन,

राजांसोबत महाराष्ट्रातील गर्भवतींच्या स्वप्नात दाखल झाला.

 

गर्भवती १

देवी, हे मूल देतोय तुला, तेजस्वी आहे.

राजकारणात जाईल, सुराज्य देईल.

नको देवा, शिकून सवरुन नोकरी करेल,

असंच मूल हवंय मला. दुसरं घर बघ.

 

गर्भवती २

देवी, हे मूल देतोय तुला.संस्कारी आहे,

रांझ्याच्या पाटलाचे हात तोडेल, शत्रूकडच्या स्त्रीलाही सन्मान देईल.

नको देवा.आपण भलं आणि आपलं घर भलं,असं मानणारंच मूल दे मला, दुसरं घर बघ.

 

गर्भवती ३

देवी, हे मूल देतोय तुला, परोपकारी आहे,

रयतेचं हित बघेल, कुणाला उपाशी ठेवणार नाही,

प्रसंगी धनिकाकडून घेईल व गरीबाला देईल.

नको देवा, भौतिक सुखांची सवय झालीय मला,

असं उपद्व्यापी मूल नकोय मला, दुसरं घर बघ.

 

गर्भवती ४,५,६…..

देवींनो, होऊ घातल्या मातांनो,

इतिहास बदलू शकणारं एक मूल कूस मागतंय,

स्वर्गाचा दरवाजा सोडून, चंद्रमौळी अंगण मागतंय,

सुराज्याच्या राहिलेल्या स्वप्नासाठी,

स्वतःच निर्मिलेल्या राज्यात,

पुनर्जन्मासाठी एक जिजामाता शोधतंय..

कुणीतरी या पुढे आणि आपल्या उदरात

सामावून घ्या हा सूर्य.

 

देवा, कितीदा सांगावं तुला,

जे आहे ते सहन करावं, जे होईल ते स्वीकारत जावं,

निगुतीनं वागावं अन् स्वतःचं पहावं, हेच अंगात भिनलंय आता.

अन्याय बिन्याय, सत्यासाठी लढा, वगैरे वगैरे म्हणजे

लष्कराच्या भाकरी आहेत रे, नाही भाजायच्या आम्हांला.

हे सूर्याचं तेज सांभाळणारी जिजाऊ शेजारच्या घरात आहे बहुतेक.

आमचा पिच्छा सोड देवा आणि कृपा करुन दुसरं घर बघ.

 

हताश झालेल्या स्वरात चित्रगुप्त म्हणाला,

राजे, उणीपुरी तीनशे चाळीस वर्ष फिरवताएत मला.

एव्हाना तुमचा देव केलाय हो लोकांनी,

मणभर सोन्याचं सिंहासन, आणि रुप्याचे टाक झालेत तुमचे आणि मूर्तीही विसावल्यात देव्हा-यात.

पुतळे तर तुम्ही न पाहिलेल्या, न जिंकलेल्या प्रदेशातही उभारलेत. 

तुमचा पुनर्जन्म हा तर तुमचं नावं घेऊन मनमानी करणा-यांनाही घात ठरेल. त्यांनाही नकोसा असेल हा पुनर्जन्म. आता तरी स्वर्गात चला.

 

देवा, असा हताश झालो असतो तर,

चार मित्र घेऊन भवानीसमोर शपथ घेतलीच नसती,

कोवळ्या पोराला घेऊन आग्र्याहून सुटलोच नसतो,

सर्व काही गमावलेल्या तहातून उभा राहिलोच नसतो,

अमर्याद सागराशी पैज घेतलीच नसती,

दक्षिणेचा दिग्विजय मिळवलाच नसता,

स्वराज्यासाठी आदर्श आज्ञापत्रे लिहीलीच नसती,

आणि..

माझ्यानंतरही चालणारं राज्य निर्माण केलंच नसतं.

एकदा सुराज्य येऊ दे देवा, तुम्ही म्हणाल तेथे येईन.

तोपर्यंत…?

तोपर्यंत,

राजांचा आत्मा न मागितलेल्या देवत्वाच्या माळेत गुंफलेला राहणार,

आणि

मावळ्यांचे हात केवळ ढोल-ताशांच्या गजरात गुंतलेले राहणार..!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ धुंद वाऱ्या… कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – नीलिमा खरे ☆

नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆ धुंद वाऱ्या… कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – नीलिमा खरे ☆

आयुष्य उत्फुल्ल पणे, आनंदाने जगणे ही एक कला आहे. त्यासाठी अंतरीच्या भाव भावना जागृत असणे नितांत गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टीकडे, आजूबाजूच्या परिसराकडे जाणीव पूर्वक पाहणे हा अनुभव खूप काही शिकवणारा असतो. असे करताना निसर्गाशी एकरूप न होणारे मन अतिशय विरळाच.. त्यातून ते जर कवी मन असेल तर भावनांची प्रतिबिंबे त्यात शब्द बध्द करणे हे ओघानेच आले. कधी आनंद देणारा तर कधी दुःख देणारा अनुभव कवितेत शब्दांकित होतो. असाच अनुभव व्यक्त करणारी “धुंद वाऱ्या” ही डॉ निशिकांत श्रोत्री सरांची कविता मनाला भुरळ घालते.

वाऱ्यावर वाऱ्यासवे विहरताना मन वाऱ्याप्रमाणे तरल झालेले असते. त्यात हा वारा धुंद करणारा असेल तर प्रीतीचे विचार मनामध्ये येणे साहजिक आहे. आणि मग ते काव्य रुपात प्रकट होताना डॉ श्रोत्री सरांसारख्या प्रतिभावंत कवीला प्रतिभेचे वेगळेच धुमारे गवसललेले दिसतात.

☆ धुंद वाऱ्या… ☆ कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

धुंद वाऱ्या थांब येथे दूर तू जाऊ नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||ध्रु||

*

गुपित जपले मन्मनी जे ते उगा पसरू नको

लाजरीचा रंग गाली तू नभा देऊ नको

*

दाटले माझ्या मनी साऱ्या जगा सांगू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||१||

*

भाव माझे तूच नेता मी सख्या सांगू कशी

शीळ होता बोल माझे मी मुकी राहू कशी

*

भाववेडी स्वप्नगंधी छेड तू काढू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||२||

*

अंतरी दाटून माझ्या तू तुला विसरून जा

विरून येथे तूच माझे स्वप्नही होऊन जा

*

आण माझ्या प्रीतीची रे अंतरी मोडू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||३||

२५ फेब्रुवारी १९८६

धुंद वाऱ्या हे शीर्षक कवीची वाऱ्याशी असलेली सलगी जाणवून देते. त्या वाऱ्याने कवी मनाला आगळी धुंदी प्राप्त झालेली आहे हे समजते. तसेच हा वारा स्वतः ही धुंद झालेला आहे हे लक्षात येते.

धुंद वाऱ्यामुळे धुंद होणारे कवी मन खुलून आले नाही तरच नवल!! अशा वातावरणात अपुले मन, त्यात जपलेल्या गूजाला/गुपिताला प्रकर्षाने उधाण येते. पण त्याच वेळी ते गूज दडविण्यास मन आतुर असते. ते कुणाला ही कळू नये अशी मनाची भावावस्था असते. अगदी हीच भावना सखोलपणे, सहजपणे कवी डॉ निशिकांत श्रोत्री यांनी या कवितेत व्यक्त केली आहे.

या कवितेत व्यक्त केलेल्या भावना स्री च्या आहेत हे कळते. भिन्नलिंगी काव्य रचताना कवी डॉ निशिकांत श्रोत्री स्त्री भावनांशी एकरुप होऊन तशा तऱ्हेने व्यक्त झाले आहेत. हे आवर्जून उल्लेख करण्यासारखे व तितकेच कौतुकास्पद ही !!

धुंद वाऱ्या थांब येथे दूर तू जाऊ नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||ध्रु||

एखाद्या सख्याशी, मित्राशी बोलावे तसा संवाद वाऱ्याशी घडतो आहे. या धुंद करणाऱ्या वाऱ्याला ती विनंती करते की तू इथेच थांब. दूर कुठेही जाऊ नकोस. या धुंद वाऱ्यामुळे मनाला लाभलेली धुंदी तिला विसरायची नाहीये. कदाचित तिच्या मनातल्या गुपितामुळे ही वारा धुंद झाला असावा असे वाटत असावे.
लहरत, विहरत जाणाऱ्या वाऱ्यासवे मनातले गूज सर्व दूर पसरु नये अशी तिची इच्छा आहे. अतिशय सहजपणे सुलभ भाषेतून केलेले हे आर्जव आर्त भासते. व त्यातला खरेपणा अधोरेखित होवून तिची प्रांजळ भावना मनाला मोहविते. बोजड शब्दांना जाणीव पूर्वक दूर ठेवल्याने काव्य मनाला भावते. यथार्थ शब्दांनी गेयता लाभली आहे. वाऱ्याला थांबवताना लाभलेल्या धुंदीने ही थांबावे असा संकेत, संदेश जाणवतो.

गुपित जपले मन्मनी जे ते उगा पसरू नको

लाजरीचा रंग गाली तू नभा देऊ नको

दाटले माझ्या मनी साऱ्या जगा सांगू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||१||

ती वाऱ्याला म्हणते की तिच्या स्वतःच्या मनात जपलेले प्रीतीचे गूज मात्र उगाचच दूरवर पसरू नको. प्रीत भावनेच्या जाणीवेने लज्जेने गालांवर आलेली लाल गुलाबी लाली नभास देवू नको. यातला गर्भितार्थ फार सुंदर. तो अतिशय सूचकपणे मांडला आहे.. लाजरी शब्दावरील श्लेष मोहक.. अर्थाला अर्थ देणारा.. लाजरी ती स्वतः व लज्जा..
स्वप्नवत वाटणारी भावना तशीच शिल्लक राहू दे. रात्र सरु नये. व प्रातः काळी नभास उषेची लाली लाभू नये. ती तिच्या गालांवर तशीच राहावी असा अर्थ. रात्रीस जागणारी ही प्रेम भावना रात्रीच्या कुशीत तशीच निरंतर राहू दे.

माझ्या मनात दाटून आलेल्या प्रीत भावना माझ्या पुरत्या मर्यादित राहोत. त्या तू साऱ्या जगाला सांगू नको असे आर्जव करुन पुन्हा एकदा ती वाऱ्याला तिचे ते गुपित गुप्त ठेवण्याविषयी सांगत आहे. नको या नकारात्मक क्रियापदाचा वापर कवी मनाची प्रगल्भता दर्शवितो.. त्यातून गूज इतरांना कळू नये यासाठीची धडपड प्रकर्षाने जाणवते.. दाटले या शब्दाची योजना ही लक्ष व लक्ष्यवेधी.. साधारणपणे दाटले हा शब्द नकारात्मक विचार, भावना सूचित करतात. पण इथे प्रीतीची भावना दाटून आली असे म्हणताना प्रेम भावनेची सखोलता कळते. भावनेची व्यापकता व संपृक्तता जाणवते..

भाव माझे तूच नेता मी सख्या सांगू कशी

शीळ होता बोल माझे मी मुकी राहू कशी

भाववेडी स्वप्नगंधी छेड तू काढू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||२||

वाऱ्याला आहे तिथेच थांबण्याची आजर्वी विनंती ती अजूनही करतेच आहे.

पुढे ती म्हणते की माझ्या मनातले हे प्रीतीचे भाव जर तू वाऱ्यावरी वाहून नेले तर हे भाव, माझी ही प्रेम भावना मी माझ्या मुखाने माझ्या सखयाला कशी सांगणार? आणि ते तर मलाच त्याला सांगायचे आहे. तू विनाकारण लुडबूड करू नकोस अशी विनवणी करत थोडेसे दटावणी वजा सूचित करते.

ती पुढे वाऱ्याला जाणीव करून देते जर तिचे बोल त्याने (वाऱ्याने) व्यक्त केले तर ते बोल बोल ना राहता त्या बोलांची मधुर शीळ होईल व अशा वातावरणात ती तरी अबोल कशी राहू शकेल? तिची भावना व्यक्त न करता ती मूक कशी राहील? तिलाही काही बोलावे लागेल. बोलण्याने तिची ही स्वप्नवत धुंदी नाहीशी होईल याचे भय तिला वाटते.. पण मग अशी भावनेने वेडी झालेली व अश्या स्वप्नगंधात बुडालेली/डुबलेली छेड वाऱ्याने काढूच नये अशी विनंती ती करते.

व पुन्हा एकदा तिचे गूज त्याने पसरवू नये अशी आंतरीक भाक/ आण त्याला देते.

अंतरी दाटून माझ्या तू तुला विसरून जा

विरून येथे तूच माझे स्वप्नही होऊन जा

आण माझ्या प्रीतीची रे अंतरी मोडू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||३||

२५ फेब्रुवारी १९८६

या भाक देण्यापलीकडे जाऊन ती त्याला विनंती करते की या धुंद वाऱ्याने तिचे अंतर /हृदय दाटून यावे. अर्थात ही धुंद करणारी बेधुंद धुंदी तिच्या अंतःकरणात दाटून राहावी. वाऱ्याने स्वतःचे अस्तित्व विसरून जावे व तिच्या अंतरंगात विरून तिचे स्वप्न म्हणून सतत तिच्या डोळ्यांत/ हृदयात स्थान मांडून राहावे. अशा प्रकारे वागण्याची आण ती वाऱ्याला देत आहे. आणि विनवते आहे की ही तिची प्रीतीची आण त्याने त्याच्या हृदयातून त्याच्या अंतरातून मोडू नये. त्याने ही तिला तसाच प्रतिसाद द्यावा.
आण माझ्या प्रीतीची रे अंतरी मोडू नको या ओळीतील श्लेष कवीच्या साहित्यिक जाणीवांकडे निर्देश करणारा.. वाऱ्याने प्रीतीची आण त्याच्या अंतरातून तसेच तिच्या अंतरातली प्रीती ची आण मोडू नये असा अर्थ!!

या कवितेत धुंद वारा हा तिचा प्रियकरच असावा.. या वाऱ्याला चेतनागुणोत्तिचे रूप देऊन तसेच वाऱ्याचे रूपक योजून या कवितेच्या अर्थाला आगळा वेगळा आयाम दिला आहे..

सोपी परंतु तरीही कवितेतील भावनेला, आशयाला न्याय देणारी चपखल शब्दयोजना साधली आहे. त्याच वेळी माझ्या मनी, माझे मी मुके असे योजलेले अनुप्रास व त्या व्यतिरिक्त रुपक, श्लेष, चेतना गुणोक्ती, यमक इ. साहित्यिक अलंकारांनी ही कविता एक उत्तम भावगीत ठरते..
या कवितेला श्री विलास आडकर यांनी संगीतबद्ध केले आहे. व माधुरी सुतावणे यांनी नावाप्रमाणेच मधुर आवाजात गायले आहे.. हे गीत ऐकून रसिकजन मंत्रमुग्ध होतील यात शंका नाही..

धुंद वाऱ्यासवे पसरु नये अशी कामना करणारी कवितेतील धुंदी वाचकांच्या मनात घर करून राहते हे नक्की..

© नीलिमा खरे

६-५-२०२४

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares