मराठी साहित्य – विविधा ☆ निसर्ग पाहू,आस्वादक होऊ ☆ श्री ओंकार कुंभार ☆

?  विविधा ?

☆ निसर्ग पाहू,आस्वादक होऊ ☆ श्री ओंकार कुंभार ☆ 

सजगतेने निसर्ग पाहू.

निसर्गाचे आस्वादक होऊ.

एका बाजूला उन्हाळ्याचा दाह वाढत आहे आणि दुसरीकडे याच कालावधीत निसर्गात सुंदर अशी फुले फुलली आहेत. आपण आपल्या माना वर करून सजगतेने इकडे तिकडे पहायला हवे बस्स.

सुरुवातीला दिसू लागला तो निलमोहोर . सुंदर गडद निळसर असे झुबके संपूर्ण झाडावर पसरलेले आपणाला पहायला मिळतात. निलमोहराची मोहिनीच आपल्यावर झाल्याशिवाय राहत नाही. पाहातच रहावे असे वाटते.

त्यानंतर दिसू लागला तो पळस . आहाहा…

हाताची बोटे एकत्र करून वरती केल्याप्रमाणे याचा आकार. तशी जाडसर पाने असलेली भरपूर फुले. पानच नसतं या कालावधीत पळसाला. इतरवेळी उघडा बोडका वाटणारा पळस उन्हाळ्याची चाहूल लागताच आग लागावी तसा बहरतो. जंगलात पळसाची अगदीच कुठेकुठे झाडे असतील तर संपूर्ण झाडाला आग लागल्यासारखा भास होतो. म्हणून याला Flame of the Forest संबोधले जाते. पळसात पण विविधता आढळते. पळसाला पाने तीनच. असे म्हंटले जाते. पळसाच्या पानांच्या जेवणासाठी पत्रावळ्या केल्या जातात. काही ठिकाणी पळस गर्द लाल चुटुक, तर काही अबोली, फिकट लालसर, तर पिवळाही काही ठिकाणी. पळस फुलल्यावर पक्ष्यांना एक छान मेजवानीच असते. पळसावर विविध प्रकारचे पक्षी मधुपानासाठी आलेली आपणाला पहायला मिळतात. त्यातल्या त्यात सूर्यपक्षी, साळुंखी,मैना आणि बुलबुल जास्तीत जास्त काळ पळसाचा आस्वाद घेताना आढळतात. पळसही दिसायला देखणा दिसतो. झाडाखाली पळस फुलांचा सडा पडलेला पहायला मिळतो.

याच कालावधीत काटेसावर ही फुलते. पळसासारखेच इतर मोसमात रुक्ष असणारे हे झाड उन्हाळा जवळ येताच सुंदर फिकट लाल वा गुलाबी वा केशरी फुलांनी बहरते. याला कमी पण सुंदर फुले लागतात. हाताची बोटे वर करून पसरल्याप्रमाणे याचा आकार असतो. यातही विविधता आढळते. ही फुलेही सुंदर, डोळ्यांना आनंद देणारी वाटतात. काटेसावर फुलांच्या मकरंदाचा आस्वादही अनेक पक्षी घेतात.

यानंतर वर्षातून दोनवेळा बहरणारा सोनमोहोर ही आपले लक्ष वेधून घेतोच. याचे झाड मात्र मोठे असते आणि भरपूर पिवळाई या कालावधीत या झाडाला आलेली असते. या कालावधीत झाडाखाली पिवळा सडाच पडलेला असतो. हेही झाड रखरखत्या उन्हात डोळ्याना छान आनंद देणारे असते.

जरा उशिरा फुलणारा गुलमोहर . यातही विविध प्रकार पहायला मिळतात. काही गुलमोहोर लालभडक, तर काही फिकट लालसर, तर काही फिकट गुलाबी. तर काही अबोलीच्या जवळ जाणारी रंगसंगती असते. काही गुलमोहर वर्षभर उघडे बोडके असतात, काही वर्षभर हिरवळ धारण करतात. पण जसा उन्हाळा जवळ येईल तसे झाडाला शेंगा लागायला सुरुवात होते. नंतर हळूहळू शेंगा फुटून लाल फुलांचा बहर झाडभर पसरतो. काही पूर्ण झाडे लाल भडक दिसायला लागतात, तर काहींवर थोडी हिरवी पालवी आणि गुलमोहराची लालिमा पसरलेली दिसते. खरच विविध प्रकारचा गुलमोहोर अबालवृद्धांचे मन मोहून टाकतो.

याच कालावधीत उशीरा फुलणारे आणखी एक सुंदर झाड म्हणजे बहावा ( गोल्डन शाँवर ). याही झाडाला कुसुमसंभार येण्यापूर्वी लांबुळक्या शेंगा लागतात आणि काही कालावधी नंतर शुभ्र पिवळी फुले लागायला सुरुवात होते. पाहतापाहता काही दिवसातच शुभ्र पिवळ्या फुलांनी संपूर्ण झाड लगडते. याचे गोल्डन शाँवर हे नाव समर्पक आहे. कारण, झाडभर शुभ्र पिवळे झुबके लोंबत असतात. या झाडावरही भरपूर पक्षी मधुपानासाठी येतात. विशेषकरून भरपूर प्रमाणात विविध प्रकारचे भुंगे मधुपानाचा आस्वाद घेताना दिसतात. काय अप्रतिम नजारा असतो. आहाहा…

पाहतच रहावे असे वाटते.

रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करायला बाहेर पडावे आणि कोठूनतरी रातराणी चा सुगंध दरवळावा. सुगंध नाकात शिरताच एक क्षणभर समाधीच लागते. काय तो मोहक मंद सुगंध.     वाSSह.

 

© ओंकार कुंभार

📱9921108879

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उबुंटू….अनामिक ☆ संग्राहिका – सौ. स्मिता पंडित ☆

?  विविधा ?

उबुंटू….अनामिक ☆ संग्राहिका – सौ. स्मिता पंडित ☆

उबुंटू ही आफ्रिका देशातील एक सुंदर गोष्ट आहे.

उबुंटू हे प्रेरणादायी मानवतावादी तत्त्वज्ञान आहे.  

आफ्रिकेतील आदिवासी लहान मुलांचा एका तत्त्ववेत्याने एक खेळ घेतला.  त्या खेळामध्ये एका झाडाखाली एक मिठाई चे बास्केट ठेवले. सर्व मुलांना त्या झाडापासून 100 मीटर अंतरावर उभे केले. तिथून धावत जाऊन ते मिठाई चे बास्केट घ्यायचे, जो आधी पोहोचेल त्यास ती मिठाई मिळेल असे सांगण्यात आले. आता त्या व्यक्तीने खेळ सुरू करण्याची सूचना केली. परंतु त्या नन्तर जे घडले ते आश्चर्य वाटणारे होते. त्या सर्व मुलांनी एकमेकांचे हात हातात धरले आणि सर्वच्या सर्वजण एकत्रितपणे झाडाखाली ठेवलेल्या मिठाई च्या बास्केट कडे धावत सुटले. एकाचवेळी तिथे पोहोचले. ती मिठाई सर्वानी समान वाटून घेतली व सर्वानी मिळून त्याचा आस्वाद घेतला.

यावर त्या तत्त्वज्ञाने मुलांना असे करण्याचे कारण विचारले असता, उत्तर मिळाले…..उबुंटू.

उबुंटू चा अर्थ आहे… ‘I am because We are.’

म्हणजेच ‘मी आहे कारण आपण सर्व आहोत’.

इतर दुःखात असताना मी एकटा कसा सुखी होऊ शकतो ?? या प्रश्नाचे उत्तर उबुंटू आहे.

‘सर्वांचे सुखी असणे हेच मला सुखी बनविणारे आहे’

हा फार मोठा माणुसकीचा, समतेचा, एकीचा संदेश, सर्व च पिढ्यांना उबुंटू देत आहे.

चला तर मग आपण सर्वजण उबुंटू  जगूया अणि जिथे जाऊ तिथे सगळीकडे आनंद पसरवुया.

I am Because We are.

संग्राहिका : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ संगीताचा विकास – भाग-३ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? सूर संगत ?

☆ संगीताचा विकास – भाग – ३ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

४) आधुनिक कालखंड ~ इ.स. १८०० पासून

ख्याल गायनाचा भरपूर प्रसार व त्याचबरोबर वाद्यसंगीताची विलक्षण क्रान्ती या कालखंडांत दिसून येते.

संगीताचे स्वरलेखन, संगीत संस्थांच्या निरनिराळ्या परीक्षा, संगीतावरची पुस्तके आणि व्याख्याने यामुळे संगीत शास्त्राचा प्रचंड प्रसार झाला. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर, भातखंडेबुवा, विनायकराव पटवर्धन वगैरे संगीतज्ञांनी तर भारतीय संगीत प्रसाराचे व्रतच घेतले होते.

संगीताचा सतत अभ्यास व रियाज करून कलावंत वैयक्तिक विचाराने स्वतःची विशिष्ट गायनशैली तयार करतो.प्राचीन काळापासून ते अगदी आधुनिक काळांत एकोणीसाव्या शतकापर्यंत गुरूगृही राहून, गुरूची मनोभावे सेवा करीत संगीत साधना करण्याची प्रथा होती. गुरू त्यांची वैशिष्ठ्यपूर्ण गायनशैली शिष्याच्या गळ्यांत जशीच्या तशी उतरविण्याचा प्रयत्न करीत असे. यालाच त्या गायन शैलीचे घराणे म्हटले जाऊ लागले. अशा रीतीने काही प्रतिभावंत कलाकारांनी त्यांची स्वतंत्र गायनशैली शिष्यांकरवी

जतन करण्याचा प्रयत्न केला. ह्यातूनच आज प्रचलित असलेली किराणा, जयपूर, मेवाती, ग्वाल्हेर, आग्रा वगैरे एकूण १६ घराणी तयार झाली.

अब्दूलकरीमखाॅं साहेब हे किराणा घराण्याचे पट्टीचे गायक.

आपल्या सर्वांचे लाडके कै.भीमसेन जोशी (अण्णा, सवाई गंधर्व यांचे शिष्य), आघाडीच्या गायिका प्रभा अत्रे हे किराणा घराण्याचे गायक. अल्लादिया खाॅं यांचे जयपूर घराणे स्व.किशोरीताई अमोणकर यांनी त्यांच्या गायन कौश्यल्याने लोकप्रिय केले व आज अश्विनी भिडे देशपांडे या ते पुढे नेत आहेत. स्व.विनायकबुवा पटवर्धन, शरद्चंद्र आरोलकर, गोविंदराव राजूरकर हे ग्वाल्हेर घराण्याचे आघाडीचे गायक.

आधुनिक काळांत काही कलावंतांची मात्र कोणा एका घराण्याला चिकटून न राहता अनेक घराण्यांची वैशिष्ठ्ये लक्षात घेऊन स्वतःची शैली तयार करण्याची धडपड चालू असते.याचे एक उत्तम उदाहरण म्हणून कै.पंडित जितेंद्र अभिषेकीबुवांचा उल्लेख करणे  योग्य होईल. त्यांनी ग्वाल्हेर,आग्रा,अत्रौली अशा विविध घराण्यांची गायकी आत्मसात केली. आणि बुद्धीचातूर्याने स्वतःच्या गाण्याचा वेगळा ठसा उमटविला.जसे जयपूर घराण्यांतील एकारातील स्वरलगाव,आग्रा घराण्याची आकारयुक्त आलापी,किराणा घराण्याची मेरखंड पद्धतीने केलेली आलापी.उस्ताद बडे गुलाम अलीखाॅं यांच्या गायनांतील चपलता,मृदुता,भावुकता इत्यादी गुणविशेष त्यांनी उचलले तर ठुमरी पेश करताना पतियाळा घराण्याची पद्धत जवळ केली.

पं.उल्हास कशाळकरांचाही स्वतंत्र शैलीचे गायक म्हणून उल्लेख करावा लागेल.त्यांनी गजाननबुवा जोशी यांजकडून ग्वाल्हेर घराण्याची तालीम घेतली,त्याचबरोबर जयपूर गायकीचे निवृत्तीबुवा सरनाईक, डी.व्ही.पलुस्कर, मास्टर कृष्णराव, कुमार गंधर्व  इत्यादी नामवंतांच्या गायकीचा प्रभाव त्यांच्या गायकीवर आहे.

मध्ययुगीन काळांत राजाश्रय असलेले संगीत नाटके, चित्रपट, आकाशवाणी, मागील पन्नास वर्षांत लोकप्रिय झालेले दूरदर्शन या प्रसारमाध्यमांमुळे  घरोघरी पोहोचले. रसिकांची नाट्यसंगीत, भक्तीगीते, अभंग गायन, भावगीते तसेच गझल, ठुमरी दादरा अशा उपशास्त्रीय संगीतात अधिकाधिक रुची उत्पन्न झाली. त्यामुळे ख्यालगायकीची मैफल असली तरी एखाद दोन राग पेश झाल्यानंतर प्रेक्षकांची भजन, नाट्यपद किंवा ठुमरी कलावंताने सादर करावी अशी फरमाईश असतेच.

भीमसेन जोशींनी “चलो सखी सौतनके घर जईये” ही गुजरी तोडीतील दृत बंदीश किंवा “रंग रलिया करत सौतनके संग” ही मालकंसमधील दृतबंदीश संपविल्यानंतर अण्णांचे तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, इंद्रायणी काठी हे अभंग ऐकल्याशिवाय मैफल पूर्ण झाल्याचे समाधान होतच नव्हते.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता जग जवळ आले आहे. संगीतांत अनेकविध नवेनवे प्रयोग होऊ लागले. फ्यूजन,रिमिक्स वगैरे. चित्रपट संगीताने तर संगीतविश्व पारच बदलून टाकले. भारतीय आणि पाश्चात्य वाद्यांचा मेळ पहावयास मिळतो. काही ठिकाणी तो चांगलाही वाटतो पण कधी कधी संगीतातील माधूर्य हरपून त्याची जागा गजराने घेतली आहे असे वाटते.

गुरूकूल पद्धतीने संगीत साधना करणे आज लुप्त झाले आहे.केवळ संगीतावरच लक्ष्य केंद्रीत करणे आजच्या काळांत अवघडच आहे.ज्ञानार्जन किती झाले यापेक्षा प्रसिद्धि केव्हा मिळेल याकडे अधिक लक्ष आहे.त्याचबरोबर मात्र शास्त्रीय संगीताचा अभ्यास व साधना करणारी युवा मंडळीही भरपूर आहेत.त्यामुळे वेदकाळी रोपण केलेला शास्त्रीय संगीताचा हा डेरेदार वृक्ष नवोदीत कलाकारांच्या खत~पाण्याने सतत बहरतच राहील यांत संशय नाही.

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रश्न ?? # 2☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रश्न ?? # 2 ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

 

१. आयुष्य संथ झालं म्हणून तक्रार करत होतो. तेव्हा मैलाचा दगड भेटला अन म्हणाला ;
“मी स्थिर आहे म्हणूनच लोकांना त्यांची गती मोजता येत्ये रे!”

२. माझ्या एका सत्कार समारंभात मला आकाश भेटलं कानात कुजबुजत म्हणालं, “एवढ्यात शेफरलास ?
जी मोजता येत नाही ती खरी उंची.”

३. कुठलीही गोष्ट हसण्यावारी नेतो म्हणून मी मित्रावर रागावलो. तो मला समुद्रकिनारी घेऊन गेला आणि त्याने मला विचारलं,” या समुद्राची खोली किती असेल सांगू शकशील?” तेव्हापासून मी मत बनवत नाही कुणाबद्दल.

४. मला वाटलं कठीण हृदयाच्या माणसांना सौंदर्य कसं समजणार ?
एक हिरा लुकलुकला. म्हणाला, “वेडा रे वेडा !!”

५. कमी मार्क मिळाले म्हणून एका कोकराला कोणीतरी बदडत होतं. त्या कोकराच्या डोळ्यातले भाव वाचले मी ! ते म्हणत होतं, ‘करून बघायचं कि बघून करायचं,
ठरवू दे की मला मी कसं जगायचं !’

 

संग्राहिका : सुश्री मंजिरी गोरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 8 – आई ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 8 – आई ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

आपल्या जीवनात आईचं अत्यंत महत्वच स्थान आहे. अनन्यसाधारण महत्व आहे.सोन्याच्या लंकेपेक्षा आणि स्वर्गापेक्षाही  माझी जन्मभूमी अयोध्याच श्रेष्ठ आहे असे श्रीरामचंद्र सांगतात. जन्मभूमीची तुलना ते आपल्या आईशी करतात.

आपल्या मुलाचं/मुलीचं भवितव्य घडविणारे आई आणि वडील दोघेही असतात. पण प्रत्येक व्यक्तिचं चारित्र्य घडविणारी आई असते.तिची भूमिका जास्त महत्वाची असते. जन्मल्यापासून त्याला भाषा शिकविणारी, पहिला घास भरवताना चिऊ काऊ सारख्या पक्ष्यांची ओळख करून देणारी, पहिलं पाऊल टाकताना नीट चालायला  शिकविणारी, शाळेत डबा खाताना सर्वांबरोबर वाटणी करून खाण्याचा, सामूहिक समानता मूल्यांचा संस्कार करणारी, भावंडांमध्ये एकमेकांना समजून घेण्याचे बीज पेरणारी, कुटुंबातली नाती सांभाळण्याचे आणि ती टिकविण्याचे ही संस्कार कळत्या वयात देणारी इथ पासून पुढील आयुष्यात येणार्‍या संकटांना धैर्याने तोंड द्यायला शिकविणारी आणि मुलाला घडवताना त्याच्यात साहित्य, कला, तत्वज्ञान, इतिहास यासाठी योग्य ते कष्ट घेणारी अशी आई असते.

आपला मुलगा ‘यथार्थ’ मनुष्य निपजावा असं प्रत्येक आईलाच वाटत असतं. पण असा माणूस घडवण्याची कला सर्वच मातांजवळ नसते, म्हणूनच स्वामी विवेकानंद यांच्यासारखे चारित्र्यवान व्यक्तिमत्व एखादेच घडत असते. कारण सुसंस्कृत आणि अभिजात माता भुवनेश्वरी देवी पण एखादिच असते.

नरेंद्रनाथांच्या  चारित्र्यात जे जे महान, जे जे सुंदर होतं ते ते सर्व त्यांच्या सुसंस्कृत मातेच्या सुशिक्षणाचं  फळ होतं  असंच म्हणावं लागेल. त्यांनी नरेंद्र ची योग्य ती जोपासना केली. आपल्या मुलांच्या चारित्र्यात कोणत्याही प्रकारचा हिणकसपणा येऊ नये म्हणून त्यांनी डोळ्यात तेल घालून जपले होते. मातृभक्त नरेन्द्रनेही आपल्या आईची आज्ञा कधीही मोडली नव्हती. स्त्री सुलभ गुणांपेक्षाही धैर्य, खंबीरता, असत्य आणि अविचाराचा प्रतिकार करण्याचा बेडरपणा भुवनेश्वरी देवींकडे होता. आपल्या मुलांना उच्च ध्येयं आणि व्रतं अंगिकारण्यासाठी त्या स्फूर्ति आणि उत्तेजन देत असत.

स्वामी विवेकानंदांच्या देहत्यागा नंतर सुद्धा ही माता पुढील नऊ वर्ष हयात होती. तिनं आपल्या लाडक्या नरेंद्रनाथाचे जगप्रसिद्ध ‘स्वामी विवेकानंद’ होताना पाहिले होते. भागीरथीच्या पवित्र तीरावर पुत्राच्या धडधडत्या  चितेजवळ अंतिम प्रार्थनेत सहभागी झालेल्या या दु:खी मातेच्या मनात आले की जर, ‘विवेकानंद आणखी काही दिवस इहलोकी राहिले असते तर, अखिल मानवजातीचे केव्हढे तरी कल्याण झाले असते’.  पुत्रवियोगपेक्षा मानवजातीचे कल्याण हीच भावना तिच्या मनात यावेळी होती.

ती विवेकानंन्दाची आई होती या गौरवाचा सात्विक गर्व तिच्या संयमित,गंभीर आणि शांत चेहर्‍यावर दिसत होता.

खाण तशी माती अशी म्हण आहे. आजकाल मुलांच्या आया म्हणजे माता घरगुती कलागतीत नको ते संस्कार करत असतात. अजाणतेपणी का असेना नको ते मुलांना शिकवीत असतात. (आज मालिका/माध्यमे  सुद्धा असे आदर्श घालून देण्यात अग्रेसर आहेत.)मूल घडविण्याच्या काळात, त्या मुलांमध्ये द्वेष, मत्सर, लोभ पेरत असतात. कौटुंबिक नाती तोडतात. त्यामुळे मोठे होऊन ती मुले दुसर्‍याच्या प्रगतीमुळे जळफळणारी, हलक्या मनाची व कानाची अवलक्षणीच निघातील याची त्यांना कल्पना नसते. त्याचा वाईट परिणाम त्या मुलांच्या भविष्यावर होणार असतो. म्हणून मुलांच्या आई /मातांनी सुशिक्षित आणि सुसंस्कृत असणे फार आवश्यक आहे. चारित्र्यवान मुलं घडवणं सोप्पं नाहीच मुळी !

क्रमशः ….

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक गंमत सांगू तुला …? ….अनामिक ☆ प्रस्तुती… श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

एक गंमत सांगू तुला …? ….अनामिक ☆ प्रस्तुती… श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

एक गंमत सांगू तुला …?

लहानपणी चणे फ़ुटाणे खूप आवडायचे खायला..

पण दहा पैसेही परवडायचे नाहीत खिशाला..

म्हातारपणी रुपयांनी खिसा भरला

पण मोडके दात बघून चणे लागले चिडवायला…

😗

 

एक गंमत सांगू तुला …?

लहानपणी वाटायचं,

नविन पुस्तके हवीत वाचायला..

पण चोरुन, लपुन,उसनी मित्रांची पुस्तके  घेवून अभ्यास पूर्ण केला..

म्हातारपणी नवीन पुस्तकांचा ढीग येवून पडला

पण तो पर्यंत चष्म्याचा नंबर सोडावाँटर झाला…

😍

 

एक गंमत सांगू तुला ….?

लहानपणी रिक्षातून आवडायचे फ़िरायला

पण सव्वा रुपायासुध्दा नसायचा कनवटीला..

म्हातारपणी ड्रायव्हर म्हणतो गाडी तयार आहे, चला फ़िरायला

पण जीना उतरेस्तवर

पाय लागतात लटपटायला…

😓

 

एक गंमत सांगू तुला …..?

लहानपणी 10✘10 ची खोली होती रहायला,

दमून भागून आलो की क्षणात लागायचो घोरायला..

म्हातारपणी चार खोल्यांचा मोठा ब्लाँक घेतला,

पण एकेक खोली आ वासून येते खायला…

😵

 

एक गंमत सांगू तुला ……?

खूप शिकून मुलगा अमेरिकेला गेला,

फ़ार फ़ार आनंद झाला पण भिती वाटते मनाला..

मृत्युसमयी येईल का तो पाणी द्यायला,

का

ई-मेलवरच शोकसंदेश पाठवेल आपल्या आईला.

😰😒😭

 

म्हणून म्हणतो मित्रांनो……आताच जगणं शिका.

👆आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरून जगा…💐

💎…ज्या क्षणी तुम्ही मरण पावता,👼

 

 त्या क्षणी तुमची ओळख एक बॉडी ” बनुन जाते

,”बॉडीला” 👽आणा , बॉडीला झोपवा ,😑

 

लोक तुमच्या नावाने सुद्धा हाक मारत नाही.

 

म्हणूनआव्हाने स्वीकारा,😠

 

आवडत्या गोष्टीसाठी ख़र्च करा,💴

 

आवडत्या लोकांना वेळ दया,💑

 

पोट दुखेपर्यन्त हसा, कोणीबालीश

😂

म्हणाले तरी चालेल. 

 

मनसोक्त नाचा,लग्नात, वरातीत.जिथे भेटेल तिथे नाचा.

💃

अगदी लहान बाळासारख़ जगा.

कारण,👶

 

“मृत्यु” हा जीवनतला सर्वात मोठा लॉस नाहिये , लॉस तर तो आहे जेव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमच्यातला “जिवंतपणा”मेलेला असतो.🙏

 

प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आपली भाषा…पु.ल.देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ आपली भाषा…पु.ल.देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

कुसुमाग्रजांची एक कविता आहे,

‘नवलाख तळपती दीप विजेचे येथ,

उतरली जणु तारकादळे नगरात,

परि स्मरते आणिक करिते व्याकुळ केव्हां,

त्या माजघरातील मंद दिव्याची वात.’

आपल्या माणसांपासून, आपल्या भाषेपासून हजारो मैल दूर असलेल्या आपल्यासारख्या मराठी माणसांच्या मनाच्या माजघरामध्ये आजूबाजूला एवढं सारं ऐश्वर्य असूनही जिवाला व्याकूळ करणार्‍या मंद दिव्याच्या वाती या असणारच. या मेळाव्यात अशा माजघरातल्या मंद दिव्याच्या वातींचं स्मरण न होणारं असं कुणी असेल, असं मला वाटत नाही. ती रुखरुख नसती, तर मराठी भाषेची ज्योत तशीच पेटत राहावी, या भावनेनं तुम्ही असे एकत्र आला नसता. ज्या भाषेचे संस्कार तोंडावाटे शब्द फुटण्याच्या आधी आपल्या कानांवर झाले, त्या भाषेची नाळ ही नुसती कानाशी जुळलेली नसते, प्राणाशी जुळलेली असते. शरीरात रक्त वाहावं तशी आपल्या व्यक्तिमत्त्वातून भाषा वाहत असते, तो प्रवाह थांबवणं अशक्य असतं. आईच्या दुधाबरोबर शरीराचं पोषण होत असताना तिच्या तोंडून येणार्‍या भाषेनं आपल्या मनाचं पोषण होत असतं. केवळ देहाच्या पोषणानं माणसाचं भागत नाही. किंबहुना मानव म्हणजे ज्याला मन आहे तो, “मन एव मनुष्यः”, अशी योगवासिष्ठामध्ये माणसाची व्याख्या केलेली आहे. या मनाचं पोषण भाषा करत असते. त्या पोषणाचे पहिले घास ज्या भाषेतून मिळतात, ती आपली भाषा.

(पुलंनी अमेरिकेत केलेल्या एका भाषणातून)

संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ साॅरी… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ साॅरी… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

‘सॉरी’ हा इंग्रजी शब्द खूपच कॉमन आहे. सरसकट तो सगळीकडं वापरलेला दिसतो. गंमत म्हणजे तान्हुल्या बाळालाही आई साॅरी म्हणताना आढळते. विनोदाचा भाग सोडला तरी हा खरोखरच एक जादुई शब्द आहे हे मात्र नक्की. सॉरी जितक्या सहजपणानं तोंडी येतं तितकं सहज; ‘ माफ करा हं!’,म्हंटलं जात नाही. तसं पाहिलं तर हे दोन्ही शब्द कानावर पडताच रागाचा पारा खाली जातोच.

आपल्या नकळत जेव्हा काही चूक घडते तेव्हा सॉरी म्हणताच वातावरण निवळते. उदा. एखाद्याला चुकून धक्का लागला तर सॉरी म्हणताच त्याच्या चेहऱ्यावर इट्स ओके ची स्मितरेषा उमटतेच. पण खरच चूक होते तेव्हा? ज्या व्यक्तीची चूक असते तीनं सॉरी म्हणणं अपेक्षित असतं. परंतु मीच का सॉरी म्हणू अशी आढ्यता बाळगणारे अधिक असतात.

हा शब्द नाती जपतो. मान, अपमान, अहंकार यापेक्षा नाती ज्याला महत्त्वाची वाटतात तो सहजपणानं माफी मागून रिकामा होतो. तर ज्याला अहंकार , मी पणा महत्त्वाचा वाटतो, तो दुसऱ्याला नाक  कसं खाली घालायला लावलं यातच समाधानी राहतो. अशी अहंकाराची वाळवी लागलेली नाती टिकणं दुरापास्त असतं. गंमत म्हणजे असे लोक जिथं गरज नाही तिथं साॅरी म्हणताना दिसतात.

सॉरी योग्य वेळी म्हणणं ही तितकंच गरजेचं असतं बरं. समजा एखाद्या ची काही वस्तू हरवली किंवा आपल्याकडून कोणाचं काही नुकसान झालं तर लगेचच सॉरी म्हणावं. नुकसानभरपाईचा प्रयत्न ही जरुर करावा. परंतु बघू, म्हणू केंव्हातरी किंवा त्यात काय एवढं असा विचार केला , माफी मागायला वेळ झाला तर नात्यातील तणाव वाढत गेलेला दिसतो. बऱ्याचदा अशा नात्यातून बदसूरच उमटतो.

सॉरी वेळेवर म्हणणं जसं महत्त्वाचं तसंच माफी मागण्याची पद्धत ही महत्त्वाची! रागारागानं, आदळ आपट करत सॉरी म्हणताना माफी मागणाऱ्याची नाराजी व्यक्त होते. आक्रस्ताळेपणानं चिडचिड करत माफी मागणं अयोग्यच. तर गोड लडिवाळ आवाजात सॉरी म्हणणारी व्यक्ती मनापासून माफी मागतेय हे जाणवतं. हात जोडून किंवा कान हातात पकडून माफी मागितली की समोरच्याचा पारा एकदम उतरतो.

एखादी जादूची कांडी फिरवावी तसा हा शब्द काम करतो. समोरच्या माणसाला हसवतो. त्याच्या चेहऱ्यावरील शंका दूर करतो. पुन्हा नव्यानं संवाद साधायला मदत करतो. रागाला पळवून लावतो. जाने दो म्हणत पुन:श्च हातात हात गुंफले जातात. खांद्याला खांदा लावून कामं केली जातात. माणसा माणसांमधील सहकार्य वाढतं. खेळीमेळीचं वातावरण निर्माण होते. हा शब्द मैत्री टिकवायला, मैत्री निभावून न्यायला, मैत्री निर्माण करायला देखील धावून येतो.

हा शब्द आपल्या शब्द कोशातला नाही आहे. तसा तो परकीय आहे. तरीही तो आपला मित्र आहे. कितीतरी गोष्टींसाठी सीमा, प्रांत, देशाच्या सीमा आपण ओलांडल्या आहेत. रितीरिवाज, परंपरा, वेषभूषा, खाद्यसंस्कृती अशा खूपशा बाबतीत आपण बदल करतो.गरजेपेक्षा सोयीचा विचार करुन वेषांतर  किती सहज केले ना आपण? धोतरा ऐवजी शर्ट पॅंट आले, साडी ऐवजी देखील ट्राऊझर्स- टॉप्स आले. हे बदल जितके आवश्यक तितकेच चांगलेही आहेत. मग शिष्टाचाराचे नियम तितक्याच प्रमाणात वापरायला काहीच हरकत नसावी.

ग्लोबल च्या नावाखाली लोकल विसरतो. अगदी रोज बोलताना देखील कितीतरी इतर भाषेतील शब्द वापरतो.पण सॉरी म्हणण्यात बहुतेक वेळा कमीपणा समजतो. या लहानशा शब्दाला ओठांवर आणायचे टाळतो.

तसंही नकळतपणे का होईना, दुसऱ्याचं मन दुखावलं गेलं की आपणही थोडे उदास होतो. खरं ना? मग काय हरकत आहे या जादूवाल्या शब्दाशी दोस्ती करायला?

माणूस हा सोशल प्राणी आहे. तो एकटा राहू शकत नाही.  समाजात, नातेवाईंकांबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर तो करतो ते व्यवहार भावनांनी युक्त असतात. कोरडेपणानं होत नाहीत. एकूण काय , नात्यातील, व्यवहारातील, सकारात्मकता वाढवण्यासाठी, नाती अधिक सुदृढ करण्यासाठी थॅंक्यू इतकंच सॉरी म्हणणं महत्त्वाचं.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

deepapujari57@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आईपण… डॉ.सोनिया कस्तुरे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆  आईपण… डॉ.सोनिया कस्तुरे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

☘️ सहजच जगता जगता

आज 25 फेब्रुवारी अनुजाचा वाढदिवस. या दिवशी 2003 साली मी दूसऱ्यांदा आई झाले. पहिल्यांदा 1998 साली डॉ.प्रेरणाचा जन्म झाला तेव्हा. आईपण हे काय रसायन आहे हे मी गेली 25 वर्षे अनुभवती आहे. पण आईपण सुरु झाल्यापासून मी मला शोधण्याचा प्रयत्न करते. मी मला कायम आई म्हणूनच सापडते. मी माला दवाखान्यात काम करताना शोधले. मी मला माझ्या नात्यात शोधले. मी मला घरात, घरा बाहेर शोधले पण मी मला नेहमी आई म्हणूनच सापडले. आईपण खूप पछाडून टाकतं हे मला इतकं माहितच नव्हतं. आणि आज मुली मोठ्या झाल्या तरीही आईपण थोडं सोडवू पाहते पण अजिबात सुटत नाही.

माझ्या जीवनाला कलाटणी म्हणजे आईपण.  माझ्या जगण्यातला सर्वोच्च अविष्कार म्हणजे आईपण. माझ्या जीवनाचं अतिम सत्य म्हणजे आईपण. माझ्या माणूसपणातील सर्वात रोमांचकारी, अनाकलनीय, सर्वोत्कृष्ट निर्मितीचा आनंद म्हणजे आईपण. प्रेम, विश्वास, जिव्हाळा, निष्ठा, कर्तव्यतत्परता, जबाबदारी, काळजी, समर्पण म्हणजे आई. आईपणात वेदना आणि दुःख अमाप आहे. आई त्या वेदनांचा, दुःखाचा सोहळा उत्सव करते. ही आईपणाला गवसलेली अनोखी शक्ती आणि युक्ती म्हणायला हरकत नाही.

मी अजूनही स्वतःला शोधत राहते पण आई म्हणूनच सापडते. माझ्या दवाखान्यात, माझ्या  कवितेच्या ओळीतही मी आई म्हणूनच सापडते…!

नाही उमगत मी मला अजूनही…!

मला आईपण बहाल केल्याबद्दल मी माझ्या दोन्ही मुलींची ऋणी आहे. माझा जोडीदार या दोघींच्या बाबांचे    नामदेवचे धन्यवाद मानालाच हवेत !

सर्व आईंना मनापासून सलाम !  🙏🏻

  

– डॉ.सोनिया कस्तुरे

9326818354

25/02/2022

संग्राहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्त्री कालची आणि आजची…! भाग 2 ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  विविधा ?

☆ स्त्री कालची आणि आजची…! भाग 2 ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

‘कशी आहे ती?’  शेवटी तिच्या कष्टानाही मर्यादा असतेच ना!

 आताची स्त्री समाजाभिमुख झाली. तिचे कार्यक्षेत्र बदलले. त्यानुरूप पोषाख ही बदलला. स्त्री सौंदर्याच्या कल्पना ही बदलल्या. लांबसडक केसांची निगा राखण्यास वेळ कमी मिळू लागला. त्यामुळे तिथेही शॉर्टकट शोधण्यात आले. आताच्या काळात खऱ्या दागिन्यांनी मढण्यापेक्षा  आर्टिफिशियल, आकर्षक दागिने बाजारात आले. अर्थात सोन्याच्या दागिन्यांना चोरीचा धोकाही होताच! कामाला जाण्यासाठी लागणारा वेळ, कामाच्या तासाच्या वेळा जर वेगवेगळ्या असतील तर असे नटून-थटून जाणे स्त्री ला आवडत तर नाहीच पण सोयीचेही नसते!

त्यामुळे स्त्रीची एक वेगळीच प्रतिमा गेल्या दहा-वीस वर्षात आपल्या डोळ्यासमोर उभी झाली आहे. पारंपारिक गोष्टींचा काही प्रमाणात त्याग करावा लागला आहे. तरीही स्त्रीची नटण्याची हौस ही संपलेली नसते. ती स्वतःला सोयीनुसार सजवून आकर्षक ठेवते.यातून  तिची जगण्याची उर्मी दिसते. लोकल मधून जाणाऱ्या मुंबई-पुण्याच्या स्त्रिया लोकल मध्येच सण उत्सव साजरे करतात. अगदी केळवण, डोहाळजेवण, हळदीकुंकू यासारखे कार्यक्रम सुध्दा हौसेने करतात. स्त्री अशी उत्सवप्रिय आहे. ती मायाळू आहे. आयुष्य जगण्याची तिला आस आहे. स्त्रीचे सारे जगणे एक उत्सव आहे. लहानपणापासूनच मुलगी म्हणून स्त्री स्वतःला व्यक्त करत असते. संसार मांडण्याची तिला आतून ओढ असते. पूर्वीच्या काळी छोट्या मुली चूल,बोळकी घेऊन खेळत असत. आत्ताच्या मुलींच्या खेळात मायक्रोवेव्ह, फ्रीज, गॅस या  सारख्या उपकरणांची खेळण्यात भर पडली आहे. परकर पोलकं घालणारी आणि आईला साडीत पाहणारी मुलगी आता लहानपणापासून च ड्रेस,मिडी,मॅक्सी यामध्ये सहजतेने वावरते. हे बदल आपल्याला आता दिसतात.

स्त्रीचे पोषाखा बरोबरच व्यक्तीमत्व ही बदलत गेले आहे.

काळ बदलला, आता स्त्री ही पायपुसण्यासारखी नसून ती समाजात स्वतंत्रपणे वावरणारे व्यक्तिमत्व आहे! शैक्षणिक सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात आपला ठसा ती उमटवत असते. अजूनही खेड्यापाड्यातल्या स्त्रीला अजूनही हे स्वातंत्र्य पूर्णतः मिळालेले नाही, तरीही शिक्षणाची धडपड आणि इतरही क्षेत्रात तिचा कार्यभाग नक्कीच वाढला आहे. नजीकच्या काळात असे भाग्य, उत्कर्ष स्त्रीच्या वाट्याला येणार हे नक्कीच! तिला समानतेच्या सर्व संधी उत्तरोत्तर मिळोत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!

                      क्रमशः ….

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares