☆ केळवे गावची श्री शितला देवी ☆ संग्रहिका – सुश्री संगीता कुलकर्णी ☆
!! तू केळव्याची शितल आई
तुझ्या महतीची ही पुण्याई
तुझ्या कीर्तीनेच धाव घेती जर्जर
तुझ्या प्रसादाने मुक्त होती सत्वर
तुझी थोरवी ही देशोदेशी जाई !!
मनाला शितलता देणारी केळव्याची केळवे गावची श्री शितला देवी
केळव्याच्या समुद्र किनाऱ्या जवळ असलेले श्री शितला मातेचे सुंदर आणि अति प्राचीन मंदिर आहे. मंदिरात अतिप्राचीन अशी तेजस्वी शितला मातेची मूर्ती आहे. केळवे गावाचे प्राचीन नाव कर्दलीवन केळवे हे एक बेट आहे… गावाला पौराणिक आणि ऐतिहासीक महत्व लाभले आहे…. राम वनवासात असताना त्याचा प्रवास केळवे (कर्दलीवन) या गावतून झाला होता अशी आख्यायिका आहे. या मंदिरात अतिप्राचीन अशी तेजस्वी शितला मातेची मूर्ती आहे..
चैत्र शुद्ध पौर्णिमेला श्री शितलाईची खूप मोठी यात्रा भरते.. नवरात्रोत्सव आणि यात्रोत्सव हे दोन देवीचे उत्सव मानले जातात.. नवरात्रोत्सवात संपूर्ण मंदिर आणि परिसरातील दिव्यांची रोषणाई केली जाते.. देवीपुढे नऊ प्रकारची धान्ये पेरतात नऊ घर रामकुंडातल्या पाण्याने भरून स्थापिले जातात.. रोज झेंडू फुलांच्या दोन माळा देवीसमोर टांगल्या जातात.. देवीला नूतन वस्त्रांनी, अलंकारांनी सजविले जाते
भरजरी कपड्यांनी सुवर्णलंकारांनी नटलेल्या देवीचे अतिशय विलोभनीय सौंदर्य व तेजस्वी रूप डोळ्यांत साठवत आपण तिच्या समोर आपोआप नतमस्तक होतो..
नऊ दिवसात रोज निरनिराळे कार्यक्रम सादर होत असतात.. भजन, कीर्तन, गायन इ. कार्यक्रम उत्साहाने होत असतात.. अष्टमीला होमहवन होतो..यावेळी मातेचे दर्शन अतिशय विलोभनीय व सुखकारी असते.. माता दोन्ही हातांनी भाविकांना भरभरून देते.
या मंदिराचा जिर्णोद्धार अहिल्याबाई होळकर ह्यांनी केला होता. शितला मातेच्या मंदिरात सिद्धीविनायक, पार्वती बरोबर शंकराची पिंडी स्थानापन्न आहे.. मंदिराच्या बाहेर हनुमानाचे छानसे मंदिर आहे. शितला मातेच्या समोर राम कुंड आहे.. सितामातेला जेव्हा तहान लागली होती तेव्हा श्री रामाने आपल्या बाणाने त्या तलावाची निर्मिती केली होती अशी आख्यायिका प्रचलीत आहे आणि म्हणून ह्या तलावाला रामकुंड असे म्हणतात. हनुमान जयंतीच्या दिवशी शितला देवीची यात्रा उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा होतो.. यात्रा उत्सव कालावधीत शितलादेवी मंदिराच्या आजुबाजूचा परिसर आनंदाने, रोषणाईने आणि भक्त भाविकांच्या अलोट गर्दीने भरुन गेलेला असतो…
हे शितला देवी तू जगाची माता तूच जगाचा पिता आणि तूच जग थारण करणारी आहेस अशा शितला देवीला
माझा नमस्कार…
संग्रहिका – सुश्री संगीता कुलकर्णी
लेखिका /कवयित्री
ठाणे
9870451020
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ घाल घाल पिंगा वा-या – कृष्ण बलवंत निकंब ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. अमृता देशपांडे ☆
घाल घाल पिंगा वा-या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात ll
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आईभाऊसाठी परि मन खंतावत ll
विसरली का ग भादव्यात वर्ष झालं
माहेरीच्या सुखाला ग मन आंचवलं ll
फिरुन फिरुन सय येई जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग शेव ओलाचिंब होतो ll
काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार
हुंगहुंगुनिया करी कशी ग बेजार ll
परसात पारिजातकाचा सडा पडे
कधी फुले वेचायाला नेशील तू गडे ll
कपिलेच्या दूधावर मऊ दाट साय
माया माझ्या वर तुझी जशी तुझी माय ll
आले भरुन डोळे पुन्हा गळाही दाटला
माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला ll
********
का आणि कसे कुणास ठाऊक, एखाद्या कवितेची, गीताशी, एखाद्या वाक्याशी किंवा व्यक्तिशी आपले नाजुक भावबंध जुळले जातात. कधीही, कुठेही क्षणभर जरी आठवण झाली तरी त्यांच्याशी संलग्न भावना तीव्रतेने जाग्या होतात आणि झपकन मन तिथे पोचतं.
माझंही त्यादिवशी असंच झालं. माझ्या अतिशय आदरणीय प्राध्यापकांनी ह्या कवितेची आठवण करून दिली. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं गाणंच मला भेट दिलं. हे गाणंअसं मला अचानक भेटेल, अशी मी कधी कल्पना सुध्दा केली नव्हती. मी थोडीशी चकित झाले, खूप खूप आनंदित झाले. ” कशी करू स्वागता ” अशी माझी धांदल उडाली.
ही कविता मी इयत्ता चौथीत असताना पहिल्यांदा ऐकली.मराठी च्या तासाला बाईंनी शिकवायला सुरुवात केली. शब्दांचे अर्थ सांगितले.
पिंगा, मन खंतावतं, चंद्रकळेचा शेव, यांचे अर्थ समजले. कपिला गायीची नंदा कशी खोडकर होती, हे न सांगताच कळलं.पण ” आले भरुन डोळे पुन्हा गळाही दाटला l माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला” हे सांगत असताना बाईंचा आवाज वेगळाच झाला आणि डोळ्यात पाणी आलं, हे जाणवलं. ( तेव्हा बाईंना आज बरं वाटंत नाही असं वाटलं)
पुढे आठव्या इयत्तेत परत या कवितेनं पिंगा घातला. ही कविता परत एकदा अभ्यासक्रमात आली. आतापर्यंत कवितेचे शब्दशः अर्थ समजले होते. आता शिकवताना बाईंनी कवितेचा भावार्थ सांगितला, त्यातल्या स्त्री सुलभ भावनांची घडी उलगडली, आणि तेव्हा अनेक भावना आणि कल्पना मनाच्या उंबरठ्यावर फुलांसारख्या उमलल्या. त्यांची नवी ओळख झाली. तो एक सुंदर अनुभव होता.
” लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला आपल्या आईची, भावाची, माहेरची आठवण होऊन तिचे मन गलबलते आणि ती भिरभिरणा-या वा-यालाच सांगते की, ” अरे वा-या, असाच पिंगा माझ्या माहेरच्या परसात घाल आणि आईला सांग, मला तिची आणि सगळ्यांचीच खूप आठवण येते. आपली कपिला आणि तिची नंदा यांचीही आठवण येते. परसातला पारिजातकाचा सडा मला खुणावतोय. कधी नेशील मला फुलं वेचायला? कपिलेच्या दुधावरची मऊ दाट साय अजून माझ्या जिभेवर रेंगाळते आहे. आई, विसरलीस का? अग, एक वर्ष झालं भाद्रपद महिन्यात मला इथे येऊन. माहेरी जायला मन आतुरलं आहे. परत परत आठवण येते सर्वांची आणि डोळे भरून येतात, ते पुसून पुसून माझ्या चंद्रकळेचा पदरही ओलाचिंब होतो. “
इतका सारा निरोप ती वा-याला सांगते, पण सुरवातीलाच सांगते कि,
” आईच्या कानात सांग, तुझी लेक सासरी सुखात आहे “.
कारण आईची काळजी तिला ठाऊक आहे, माझी लेक कशी असेल? या विचारात ती हरवली असेल, म्हणून निरोपाच्या सुरवातीलाच ती आईचे मन निर्धास्त करते. आणि मग पुढे ती माहेरच्या आठवणीनी भिजलेला पदर दाखवते. माहेरच्या लाडक्या लेकीचं लग्न झाल्यावर तिला आलेल्या एक प्रकारच्या पोक्तपणाचं , शालीनतेचं हे लोभस रूप.
मन आठवणींनी गदगदून गेलंय. ” आले भरुन डोळे पुन्हा गळाही दाटला, माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला ll ” असं म्हणत ती गप्प होते. आणखी काही बोलणं शक्यच नसतं!
इथेच कविता संपते. मन व्याकुळ असतानाही ती वा-याला विनवीते की, माझ्या माहेरच्या परसात जा आणि सुवासाची बरसात कर.
सुवासाची बरसात ‘ या शब्दातून माहेरी सर्वजण सुखात असोत, सर्वांना स्वास्थ्य मिळो , ही तिच्या मनातली इच्छा ती व्यक्त करते. पृथ्वीतलावरच्या प्रत्येक स्त्रीची , मग ती कोणत्याही वयाची असो, तिच्या मनातली ही भावना कवीने ” माहेरी जा सुवासाची कर बरसात ” पाचच शब्दात व्यक्त केली आहे. सासरी गेलेल्या मुलीच्या अंतःकरणातला एक हळवा कोपरा म्हणजे ” माहेर” . कवी कृ.ब. निकुंब यांनी स्त्री मनाची तरल स्पंदने अतिशय साध्या पण थेट काळजाला भिडतील अशा शब्दात मांडली आहेत.
गायी – वासरे, चंद्रकळेचा उल्लेख, ऐसपैस किंवा टुमदार घर, दारातला पारिजातकाचा सडा या सगळ्या खुणा तो पूर्वीचा काळ सुचवतात.
कृ.ब. निकुंब यांनी ‘ उज्वला’,
‘ उर्मिला’ या काव्यसंग्रहातूनही स्त्रीमनाचे हळुवार तरंग व्यक्त केली आहेत. त्यांच्याच एका कवितेतली ओळ आहे,
” जिथे वाळू-रणी झाले, जीव तृषार्त व्याकुळ l
तेथे होऊ द्या हो रिती,
माझ्या अश्रूंची ओंजळ ll
आता काळ बदलला, सर्वच बदलले. कवितेतले संदर्भ कालबाह्य झाले. पण अजूनही अगदी पन्नाशीतल्या, साठीतल्या, सत्तरीतल्या स्त्रीला विचारलं कि कवितेतल्या खजिन्यातली कुठली कविता तुला वाचायला आवडेल तर ती नक्कीच ही कविता पसंत करेल.
अतिशय संवेदनशील शब्द, काळजाला हात घालणारे भावदर्शन, आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं मन हेलावून टाकणारी व्याकुळता. कविता वाचून झाल्यावर किंवा हे गाणं ऐकत असताना इतक्या वर्षांनी सुद्धा अश्रूंची ओंजळ रिती होतेच. हा परिणाम म्हणजे शब्दांचं आणि स्वरांचं सामर्थ्य म्हणायचं का हळुवार स्पंदनांची परमोक्ती? दोन्हीही.
जेव्हा माझं विश्व माहेर आणि सासर यात विभागलं गेलं, तेव्हा मला कळलं कि ‘ कविता वाचताना बाईंचा आवाज कापरा का झाला, डोळ्यात पाणी का आलं’ . जेव्हा कवितेतल्या संवेदना स्वतः अनुभवल्या तेव्हा या अजरामर गीताच्या ओळी मनात सतत रुंजी घालू लागल्या. आता ते बालपण ही सरलं आणि तारुण्य ही सरलं, माहेरी आईही नाही . आई असलेलं माहेर आणि आई नसलेलं माहेर यात फरक असला तरी ” घाल घाल पिंगा वा-या माझ्या परसात l माहेरी जा सुवासाची कर बरसात ‘ ह्या ओळी कानावर पडल्या कि डोळे भरलेलं मन मागे, आठवणींच्या खुणा शोधत धावतंच. भाऊ- भावजयीच्या संसारात हरवलेलं माहेर शोधत धावतं. माहेराची फुले वेचायला आसुसतं. नकळत जड मनातून शब्द येतात,
” आले भरुन डोळे पुन्हा गळाही दाटला l
माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला ll”
आता भाऊ वहिनी भाचे कंपनी यांच्या रूपातल्या माहेरासाठीही परत मन वायुदूताला निरोप धाडतं,
तू नऊ दिवस नऊ रंग परिधान केलेस किंवा नाही केलेस तरी, हे कबूल आहे की, तू आहेस म्हणून रंगहीन आयुष्य रंगीत होतं!
केवळ शास्त्रात सांगितलंय म्हणून नाही, तर त्यानिमित्ताने वर्षभर कपाटात पडून राहणाऱ्या जरीच्या साड्या बाहेर पडून तुला उत्साहाने नेसायला मिळतात हे सत्य नाकारू शकत नाही!
दांडिया खेळलीस किंवा नाही खेळलीस, तरी आपण हे नाकारू शकत नाही की घरातील सर्वांच्या आयुष्याचा खेळ केवळ तू आयुष्यात असण्याने सुखकर होतो!
तू नऊ दिवस उपवास कर किंवा उठता बसता उपवास कर, तरी सर्वांना हे माहिती आहे की घरातल्यांची उपासमार होऊ नये म्हणून तू आयुष्यभर तुझ्या जीवाचं रान करतेस!
तू घट बसव किंवा तुझ्या देवीला फुलांनी सजव, पण पुरुषांच आयुष्य मात्र तूच सजवलं आहेस!
तू दिवा लाव किंवा पणती लाव, पण या विश्वाच्या निर्मितीपासून तुझ्यामुळेच पुरुषांच्या आयुष्यात प्रकाश आहे!
थोडक्यात काय तर…
तूच धरती आहेस…
तूच आकाश आहेस…
तूच सुरुवात आहेस…
आणि शेवटही तूच आहेस!
तुझ्याच कुशीत जन्माला येऊन तुझ्याच कुशीत विसावून निर्धास्तपणे आयुष्य जगणाऱ्या समस्त पुरुषांनी तुझ्यातील स्त्रीत्वाला सलाम करायला हवा!
प्रत्येक स्त्री मधील नारी शक्तीला मानाचा मुजरा!!
संग्रहिका – सौ.अंजली दिलिप गोखले
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
आजपासून नऊ दिवस, नऊ रात्री जगद्जननी, “जगदंबा” मातेचा उत्सव सुरू होत आहे. सर्वत्र तिच्या विविध रूपांची खूप श्रद्धेने पूजा केली जाते. सुमधुर स्तुति स्तोत्र गात तिला प्रसन्न करून घेऊ या. शिवशक्तीच्या कृपेनेच या विश्वात सर्व प्राणीमात्रांचा संसार सुरू आहे. तिचा गौरव, जागर करण्याने सर्वत्र नवाचेतना जागृत होते. त्यामुळे या पूजे कडे डोळसपणे पाहू या. नऊ दिवसांसाठी नऊ आदर्श संकल्प करू या. व ते सिद्धीस नेण्याचा मनापासून प्रयत्न करू या.
१) आपल्या आसपास कितीतरी सुबोध, सगुण संपन्न, सुविचारी, प्रेमळ स्त्रिया विविध क्षेत्रात वावरताना दिसतात. त्यांच्या गुणांचा गौरव करण्याचा निश्चय करू या. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ या.
२) प्रत्येक स्त्री मध्ये माता पार्वती अंश रूपात सामावली आहे. याचा कधीही कोणत्याही स्त्रीला विसर न व्हावा.असा प्रयत्न करू या.
३)पीडित महिलांना त्यांच्या जीवन प्रवासात सोबत करू या. योग्य मार्गक्रमण, करण्यासाठी प्रोत्साहन देऊ या. धीर देऊ या.
४)वृद्ध स्त्रियांना हळुवार आधार देऊन, आनंदाने त्यांची सेवा करू या.
५) कुमारिकांच्या डोळ्यांतील सुंदर स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करू या.
६) कष्टकरी महिलांना प्रेम व सन्मान देऊ या. त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ या. त्यांचा आत्मविश्वास वाढवू या.त्यांना आधार देऊ या.
७)गुरुस्थानी असलेल्या महिलां कडून चार चांगल्या गोष्टी शिकून घेऊ या.
८)निरागस मैत्रिणींच्या, बहिणींच्या प्रेमळ हाकेला प्रतिसाद देऊ त्यांची प्राधान्याने सोबत करू या.
९)विविध क्षेत्रात सर्वोच्च पातळीवर कार्यरत असणाऱ्या असणाऱ्या स्त्रियांचा जीवनप्रवास अभ्यासू या.इतिहास समजून घेऊ या.
मैत्रीणींनो, प्रत्येक दिवशी अशी पूजा बांधून नवरात्रीचा नंदादीप अखंड तेवत ठेवू या. मग, नक्कीच सरतेशेवटी नवरात्र आपल्या स्वतःमध्येच आमूलाग्र सकारात्मक बदल घडवून आणेल. ज्यामुळे आपण नव विचारांना अंगीकारण्यात आनंदाने व उत्साहाने सिद्ध होऊ. म्हणजे खऱ्या अर्थाने नवरात्र पूजा सुफळ संपूर्ण होईल.असा आज विश्वास वाटतो.
( याच दिवशी ते चौघे पुन्हा याच ‘पॉल्स लाउंज’ रेस्टोरंट मधे दुपारी बारा वाजता परत भेटतील.)—- इथून पुढे
चौघांमधे सर्वात जो उशीरा येइल तो त्या रियुनीयनचे बील देइल अशी गंमतशीर अटही त्या एग्रीमेंट मधे त्यांनी टाकली होती. आजच तो दिवस होता जेंव्हा पन्नास वर्षांनी ते चौघे परत भेटणार होते.
रेस्टॉरंट च्या बाहेर एक लैंडरोवर गाडी येउन थांबली अन त्यातून इयान उतरला. त्याने गाडीची चावी व्हैले कडे दिली व तो रेस्टोरंटच्या दिशेने चटचट चालत आला. पोलीस सुपरीटेंडेंट म्हणून पाच वर्षांपूर्वी रिटायर झाल्यावरही त्याने आपला फिटनेस चांगला ठेवला होता. कुठूनही तो पासष्ट वर्षांचा म्हातारा वाटत नव्हता.
हेड वेटर त्याला टेबलशी घेउन आला तसा रिचर्ड उठून उभा राहिला व गळाभेट घेत त्याने इयानचे स्वागत केले. दोघे मित्र लंडनमधे असले तरी ब-याच काळाने, कदाचित तीस एक वर्षांनी भेटले होते.
हेड वेटरने पन्नास वर्षे जुनी फ्रेंच वाईन टेबलवर आणून ठेवली. ती महागाची वाईन बॉटल बघून रिचर्डच काय पण इयानदेखील चरकला. पोलीस खात्यात वरच्या हुद्दयावर असतानाही इतकी उंची वाईन तो कधी प्यायला नव्हता.
त्या दोघांच्या चेह-यावरचे भाव वाचत हेड वेटर चटकन म्हणाला
‘सर..ही वाईन कॉम्पलीमेंटरी आहे या रेस्टॉरंटच्या मालकांकडून. पन्नास वर्षांनी चार मित्र आमच्या रेस्टॉरंट मधेच परत भेटताहेत हा साधा योग नाही. आमच्यासाठीही ही अभिमानाची गोष्टच आहे.’
‘ठीक आहे..तुमच्या मालकांना धन्यवाद सांगा. बाकी दोघे मित्र आले की मग ही बॉटल उघडूत’ इयान म्हणाला.
तो पुढे काही विचारणार इतक्यात पोर्चमधे कार थांबल्याचा आवाज आला..व ‘एक्स्क्युज मी’ असे म्हणत हेड वेटर तिकडे धावला.
बाहेर एक आलिशान लिमोझीन गाडी उभी होती. ड्रायवरने पटकन मागे येत कारचा मागचा दरवाजा उघडून धरला व लिमोझीन मधून टिमोथी उतरला, नव्हे ‘सर टिमोथी’ उतरले.
दोनच वर्षांपूर्वी इंग्लंडच्या राणीने बकिंगहम पैलेस मधे इतर मान्यवरांबरोबर टिमोथीला नाईटहूड प्रदान केले, व तो सर टिमोथी झाला.
त्याला रुबाबात आत येताना पाहून इयान आणि रिचर्ड दोघांची छाती दडपली. एकेकाळी आपला मित्र असला तरी आज तो ब्रिटन मधल्या टॉप पाच उद्योगपतींपैकी एक होता व आता त्याला नाईटहूड मिळाली होती. त्यामुळे त्याच्याशी वागता बोलताना आब सांभाळूनच वागावे लागणार होते.
पण झाले वेगळेच. मित्रांसमोर येताच स्वतः टिमोथीने मोठेपणाचे सगळे संकेत झुगारुन, फेकून दिले, व अत्यानंदाने दोन्ही मित्रांना घट्ट आलिंगन दिले. मोठ्या पोझीशनवरील लोकांना जवळचे मित्र नसतात. ख-या मित्रांसाठी ते नेहमीच तरसतात हे वाक्य इयान व रिचर्डला आज पटले.
आता तिघे मित्र एकत्र आले तसे गप्पांचा फड रंगला. एकमेकांची व तिघांच्या कुटुबियांची चौकशी झाली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. अर्थात अजून स्टुअर्ट यायचा होता.
पण तेवढ्यात हेडवेटरनी येउन सांगितले की स्टुअर्ट यांना यायला थोडा वेळ होइल तरी त्यांनी त्याच्यासाठी न थांबता सुरवात करावी.
‘अच्छा, म्हणजे स्टुअर्टला आजचे बिल द्यायची संधी मला द्यायची नव्हती तर…त्यासाठी एवढा खटाटोप’ असे टिमोथीने म्हणताच तिघेही हसले.
वाईनची बॉटल उघडली गेली व ती पन्नास वर्षे जुनी विंटेज वाईनचे ग्लास हातात घेत तिघांनी चियर्स म्हंटलं..
‘टू फिफ्टी इयर्स ऑफ फ्रेंडशीप’ टिमोथीने टोस्ट केले व बाकी दोघांनी त्याला दुजोरा दिला.
गप्पा मारत वाईन व रेस्टोरंट मधून त्यांनी ऑर्डर केलेले उंची पदार्थांचा आस्वाद घेत त्यांनी आपला फर्स्ट कोर्स पूर्ण केला.
अजूनही स्टुअर्टचा पत्ता नव्हता.
वाईनची बाटली संपली तरी स्टुअर्ट अजून आला नव्हता त्यामुळे नाईलाजाने त्यांना मेन कोर्स ऑर्डर करावा लागला. टिमोथीला नंतर एक बोर्ड मिटींग असल्याने स्टुअर्टसाठी अजून थांबणे शक्य नव्हते.
हेड वेटरने त्यांना त्या दिवसाच्या स्पेशल मेनू बद्दल सांगितले. यातल्या ब-याच डिशेस तिघांच्या आवडीच्या होत्या. हा योगायोग समजून त्यांनी त्या डिशेस ऑर्डर केल्या. गप्पा मारत, हास्य विनोद करीत त्यांनी मेन कोर्स पूर्ण केला.
बाबा आणि मी, दोघांच्या बऱ्याच आवडी-निवडी सारख्याच…..
….लहानपणी ते माझे सुपरहिरो.. त्यांचीच कॉपी करायचो…
….आयुष्याच्या शाळेत ठामपणे उभं रहायला त्यांनीच भक्कम आधार दिला….. काळानुसार दोघांचे आयुष्य वेगवेगळे झाले…. मी माझ्या व्यापात आणि त्यांचे रिटायर्ड लाईफ…..
….वाद नव्हता, पण संवाद कमी मात्र नक्कीच कमी झाला….. अचानक…. आम्ही दोघंच.. असे खूप वर्षांनी हॉटेलात जाण्याचा योग आला…… पायऱ्या चढताना नकळत आधारासाठी बाबांचा हात हातात घेतला….. बाबा हसले…… त्यांच्या मनात काय आले असेल याची कल्पना आली…..
:पस्तीस वर्षापूर्वी परिस्थिती बरोब्बर उलटी होती……
….तेव्हा त्यांनीच मला आधार दिला होता, आता मी…… *
…. काळानुसार आमच्या दोघांच्या जागा बदलल्या आणि जबाबदाऱ्यासुद्धा…..
…बाबांच्या चेहऱ्यावरचे समाधान खूप काही सांगून गेले…. बाप-लेकाचे नाते अपडेट झाले…..
…. खुर्चीवर बसताना त्यांनी पाठीवर थोपटले…. तेव्हा खूप इमोशनल झालो…. वेटर आला, तेव्हा दोघांनी एकदम ऑर्डर दिली “मसाला डोसा”…….
2 “पाणीपुरी”
लग्नानंतर तिने संसारालाच सर्वस्व मानले……
…..शिक्षण, करियर…. नोकरी बाजूला ठेवून हाउसवाईफ झाली…..
….. तिचं आयुष्य घर… मुले आणि मी यांच्यापुरतेच झाले तर मी माझ्याच विश्वात… तिचा कधी विचारच केला नाही… कायमच टेकन फॉर ग्रँटेड…..
….आठ दिवसांपूर्वी आजारपणामुळे ती झोपून होती.. तेव्हा घर थांबले, कारण सगळे प्रत्येक गोष्टीत तिच्याचवर अवलंबून… याचाच तिला प्रचंड गिल्ट आला… मीच समजूत काढली….
“दोन दिवस घरीच थांबता का?” तिने विचारले……
…त्यामागची तळमळ जाणवली….. मी थांबलो…. ती प्रचंड खूष… परिणाम… रिकव्हरी लवकर झाली…..
मी आठवडाभर सुट्टी घेतली… तिला सुखद धक्का!!
तिला पाणीपुरी प्रचंड आवडायची…. मला अजिबात नाही….. म्हणून तिने कधीच आग्रह केला नाही…..
तिला सरप्राईज…. “चल आज पाणीपुरी खाऊ”… असे मी म्हणल्यावर भूत पाहिल्यासारखे तिने पाहिले…..
….तिला प्रचंड आनंद झाला होता, पाणीपुरी खाताना ती खूप बोलत होती, हसत होती. तिला खूप काही सांगायचे होते…..
फक्त माझ्यासोबत वेळ घालविण्याची किती साधी अपेक्षा, पण तीसुद्धा मला समजली नाही. माझे डोळे भरून आले, तिच्या लक्षात आले….
“काय झाले?”….
“पाणीपुरीची चव आज कळली” मी हसत उत्तर दिले…. ‘अजून खाणार?’ विचारल्यावर तिने आनंदाने मान डोलावली….
मी आता ठरवलंय… तिला जपायचं…. तिच्या आवडीत माझी आवड शोधायची…..
संसारसुद्धा आंबट, गोड, तिखट, चटपटीत, रुचकर असतो – जणु काही पाणीपुरीच….
३. “वडापाव”
रुटीन ऑफिस वर्कमुळे खूप दमलो आणि कंटाळलो होतो.
उगीचच चिडचिड चालू होती, बोर झालो…..
अचानक डोक्यात ट्यूब पेटली. ….जिवलग मित्राला फोन केला… तोसुद्धा रुटीनला वैतागलेला… दोघं समदु:खी लहानपणी कायम सोबत असणारे आम्ही… बऱ्याच दिवसात भेटलोच नव्हतो….
समोरासमोर आल्यावर गळाभेट घेतली… “किती बदललोय यार… एकमेकांपासून लांब गेलो”, मी…..“बघ ना… एकाच शहरात राहून भेटू शकत नाही….. साली लाईफ फालतू झाली आहे”… मित्र भावुक झाला…..
….आतापर्यंत शेकड्याने खाल्ले, पण मित्रासोबत खाण्याची मजा काही औरच…
…..नेहमीच्या दुकानात गेलो, वडापाववर ताव मारायला सुरूवात केली….. दोन राउंड झाले, सोबत कटिंग चहा… पोटभर गप्पा मारल्या…. फार मस्त वाटले…. एकदम फ्रेश झालो…..!!!!
….मी, मित्र आणि वडापाव असा झकास सेल्फी काढला…..
…..दोस्ती रिचार्ज करून पुन्हा आपापल्या वाटेने निघालो…..
…. आयुष्य वेगळे झाले, तरी दोन गोष्टी अजूनही तशाच होत्या – आमची मैत्री आणि आवडीचा वडापाव……
☆ गणेशविद्या – भाग 2 – प्रा. अनिल गोरे ☆ प्रस्तुती – सौ कुंदा कुलकर्णी ☆
कोणीही केलेल्या संशोधनाची नोंद त्या संशोधकाच्या नावाने करण्याची पद्धत सध्या आहे. पूर्वी अशी पद्धत नव्हती. कोणी संशोधन केले, कविता रचली तर त्याबाबतच्या लिखित आशयातच संशोधकाचे, कवीचे नाव गुंफण्याची अथवा त्या संबंधी नामानिधान किंवा संज्ञांमध्येच संबंधिताचे नाव गुंफण्याची पद्धत होती.
शल्याने शरीर कापून त्यात दुरुस्तीची पद्धत सुरु केली, त्या पद्धतीला शल्यकर्म म्हणतात. रुग्णांची नियोजनपूर्वक देखभाल पद्धत शुश्रुताने सुरु केली, त्या पद्धतीला शुश्रूषा म्हणतात. डिझेल नावाच्या शास्त्रज्ञाने शोधलेल्या इंधनाला त्याचे नाव आहे. सुखकर्ता दुखहर्ता…. या आरतीत दास रामाचा वाट पाहे म्हणून रामदासांनी ओळख दिली. एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, तुका म्हणे, येणे वरे ज्ञाना सुखिया झाला, केशवासी नामदेव भावे ओवाळिती, कहत कबीर सुन भाई साधू या ओळींतून जनार्दन स्वामी, तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, कबीर यांनी आपले नाव गुंफले.
देवनागरी वर्णाक्षरांच्या सध्याच्या स्वरुपात ग, ण, श ही अक्षरे इतरांपेक्षा वेगळी असून त्यांच्या बाराखडीत पहिल्या स्थानी सुट्टा काना आहे! ग, ण, श यांच्या बाराखडीत पहिल्या स्थानी सुट्टा काना असणे हाच, ही वर्णव्यवस्था गणपतीने निर्माण केल्याचा संकेत मानून या लिपीला गणेशविद्या म्हणतात.
देवनागरी लिपीत १८ स्वर, ३६ व्यंजने असून स्वरांचा मानवी मुखाशी तर व्यंजनांचा मानवी मणक्यांशी संबंध आहे. कान या मराठी शब्दाची सुरूवात क अक्षराने होते. चेहरा व दोन कान दिसतात तसे क अक्षरचिन्ह दिसते. ड, ळ अक्षरांनी डोळा शब्द बनतो. उघडा डोळा, भिवई, पापणी मिळून ड चा भास होतो. दोन डोळे एकत्र पाहताना ळ चा भास होतो. झोपलेल्या माणसाचे नाक पाहून न चा भास होतो. घसा तपासताना वैद्यबुवांना घ दिसतो.
मानवाला प्राथमिक अवस्थेत ज्या वस्तूंना नावे देण्याची गरज भासली, ती नावे लिहिण्यासाठी देवनागरी अक्षरांना त्या वस्तूंचे आकार दिले असावेत. मुखाशी संबंधावरून ३६ व्यंजनांचे दंतव्य, तालव्य, ओष्ठव्य, मूर्धन्य, अनुनासिक हे पाच प्रकार आहेत. वेगवेगळी व्यंजने उच्चारताना वेगवेगळ्या मणक्याजवळ संवेदना जाणवतात.
व्याकरणकार पाणिनीने देवनागरी वर्ण आणि मानवी मणके यातील हा संबंध सूचित केला आहे. कोणत्या मणक्याचा कोणत्या अक्षराशी संबंध आहे याबाबत पाणिनीने जे सुचवले त्याचा आधार घेऊन मी ते एका चित्रात दाखवले आहे. मानवी शरीराशी, मानवी जीवनाशी देवनागरी लिपीचा घनिष्ठ संबंध असल्याने मानवी उच्चारांना अचूक लेखनाची जोड देण्यास आवश्यक सोयी देवनागरी लिपीत, जोडाक्षर पद्धतीत आहेत.
कोणत्याही मानवी भाषेतील ९९.९९ टक्के शब्द या लिपीतून हुबेहूब लिहिता येत असल्याने ही लिपी जगाची भाषिक एकात्मता साधू शकेल. लेखन, उच्चारात सर्वाधिक सुसंगतीसाठी ही जगातील सर्वोत्तम लिप्यांपैकी एक आहे. देवनागरी लिपीचिन्हांत आणि बंगाली, गुजराती, कन्नड, पंजाबी, तमिळ, उडिया, तेलुगू, मल्याळी लिपीचिन्हांत थोडा बदल जाणवतो पण सर्व भारतीय लिप्यांमध्ये लक्षणीय एकात्मता आहे !
लिपीचिन्हांतील या बदलांची कारणे भौगोलिक, राजकीय आहेत. लिखाणासाठी भारताच्या उत्तरेत भूर्जपत्रे तर दक्षिणेत ताडपत्रे वापरत. भूर्जपत्राला पुरेशी उंची असल्याने देवनागरी लिपीतील मात्रा, रफार, रुकार, उकार, अनुस्वार, चंद्र, हलन्त उपचिन्हे वर्णाक्षरांच्या वर, खाली लिहिता येत.
ताडपत्रावर उंची कमी, रुंदी अधिक म्हणून दक्षिणी लिप्यांमध्ये ही उपचिन्हे वर्णाक्षरांच्या डावी, उजवीकडे लिहिणे सोयीचे होते. अनेक देवनागरी अक्षरे आडवी केल्यास दक्षिणी लिपीतील अक्षरे मिळतात. शत्रूला संदेश समजू नये म्हणून काही भारतीय राजांनी स्वत:ला व त्याच्या अधिकार्याना, प्रजाजनांना समजणारी, पण इतरांना न समजणारी भाषा, लिपी तयार केली.
देवनागरी लिपीशी बरेच साम्य आणि किरकोळ बदलाने नव्या लिप्या झाल्या. अनेक भारतीय लिप्यांतून लिहिताना कमी जागा, कमी कागद, कमी शाई वापरली जाते. कागद कमी लागल्यास जंगलतोड कमी होते. शाईत शिसे किंवा जड धातू वापरतात. शाई कमी लागल्यास शिशाचे व जड धातूंपासून होणारे प्रदूषण कमी होते.
समाप्त
ले : प्रा. अनिल गोरे
संग्राहक : कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
क्यू 17, मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे
मो. 9527460290
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
भारतीय वर्षा मधील नवरात्र उत्सव… दसरा..हा सण विशेष महत्वाचा सण समजला जातो. आपला देश शेतीप्रधान देश या नावाने ओळखला जातो. म्हणून , आपली भारतीय संस्कृती ही शेती प्रधान संस्कृती समजली जाते. त्यामुळे आपण जे सण साजरे करतो, त्या सणांच्या मूळाशी प्रामुख्यानं पर्यावरण, निसर्ग आणि हवामानाचा विचार केलेला आहे. या व्यतिरिक्त हे सण कोणत्या तरी पौराणिक, धार्मिक आणि सामाजिक कथांशी , विचारांशी जोडलेले असल्याने ,ते साजरे करण्यामागे पारंपरिक श्रध्दा निर्माण झालेली आहे. म्हणूनच या सणांची आपणाला आपूर्वाई असते.
काल पासून सुरू झालेला नवरात्र उत्सव हा या सगळ्यांचंच प्रतिक आहे. हा उत्सव प्रामुख्याने स्त्री शक्तीची थोरवी सांगणारा आहे. महिषासुराशी नव दिवस युद्ध करून त्याचं मर्दन करणारी देवी ही साक्षात किती सबला आहे , याचं उदाहरण तमाम स्त्री वर्गाला प्रेरणादायी ठरेल याची खबरदारी आपल्या पूर्वजांनी घेतली आहे.
हा सण साजरा करताना , निसर्गाला किती प्रमाण मानले आहे , हेही आपल्या लक्षात येते. त्याचबरोबर आप ,तेज ,वायू , आकाश आणि अग्नी या पंचमहाभूतांचाही किती खुबीने वापर केला आहे हे सुद्धा समजून येते.
नवरात्र उत्सवाची सुरुवात घटस्थापनेने होते. हा घट म्हणजेच आकाश तत्व आहे. त्या घटात पाणी भरून ठेवले जाते .ते जल तत्व.घटा खाली काळी माती पसरली जाते .ते भूमी तत्व . त्या मातीत धान्य टोकलं जातं . तो त्या भूमीचा रजोगुण . नवरात्रात अखंड नंदादीप तेवत असतो. ते अग्नी तत्व. त्या घाटावर पिवळ्या फुलांची माळ रोज वाहिली जाते. पिवळा रंग हा रजोगुण आहे.
अशी नव दिवस पुजा करून , खंडे नवमीला शस्त्रांची म्हणजेच शेती अवजारांची पूजा केली जाते.शेवटी दशमीला शमी वृक्षाची , म्हणजेच आपट्यांची पानं सोन्याच्या मोलानं वाटली जातात. एका वृक्षाच्या पानांनां सोन्याची किंमत देणारा भारत देश जगात एकमेव देश असावा. आणि त्या देशात साजरे केले जात असलेले सणही त्याच किंमतीचे असावेत ,यात शंकाच नाही.
एवढा एकच प्रश्न त्यांनी विचारला.. आणि रोज दिसणाऱ्या पण जास्त परिचय नसणाऱ्या त्या व्यक्तीसमोर मी मनसोक्त रडलो..
तो म्हणाला.. “भरपूर रडून घ्या.. मला वेळ आहे. आजच रडायचं आणि नंतर कधीसुध्दा डोळ्यांतून पाणी काढायचं नाही..”
त्यानंतर त्याने जे काही सांगितलं– त्यामुळे माझा आंतरबाह्य असा कायापालट झाला..!
“त्याने काय सांगितलं..??”
तो शांतपणे म्हणाला की, “आपण हा जो मनुष्यजन्म घेतलाय, तो आपल्या अपेक्षापूर्तींकरिता नाही किंवा नसावा.. कारण आयुष्यात आपण नेहमी दुसऱ्यांकडूनच अपेक्षा ठेवत असतो आणि बऱ्याचदा त्या पूर्ण होत नाहीत.. त्यामुळे उरतात त्या फक्त जाळणाऱ्या व्यथा..!”
“माझ्या मते हा जन्म आपल्या अपेक्षांपूर्तींकरिता नाहीच आहे. तर हा आहे कुठे तरी, केव्हा तरी राहून गेलेल्या दुसऱ्यांच्या परतफेडीसाठी…”
जसं तुमच्या आयुष्यात अचानक जोडीदार हे जग सोडून गेला, तुम्ही त्याचा संसार पूर्ण केलात, तुम्ही त्याचा संसार पूर्ण करण्याकरिता हा जन्म घेतला, ह्याचा अर्थ कोणत्यातरी एका जन्माची परतफेड तुमच्याकडून झाली.. तो अकाउंट तुमचा संपला..! आता ह्याच दृष्टिकोनातून आयुष्यातील सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा..
मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत, किंवा आपल्या लाडक्या लेकीने तुमच्या मनाविरुद्ध जाऊन परस्पर लग्न केले, ही सुध्दा तुम्ही कोणतीतरी परतफेड करत आहात.. परतफेडीचा हा हिशोब ह्या जन्मात संपवल्याशिवाय तुम्हांला मरण नाही… तेव्हा मनातल्या मनांतसुद्धा परमेश्वराला उद्देशून, “तू मला का जगवलंस..?” हा प्रश्न विचारू नका.. *जे झाले ते चांगले झाले,जे होईल ते चांगले होईल “ असा दृष्टिकोन ठेवून सकारात्मक जीवन जगा व इतरांना प्रेरणा द्या.
कुठलीही व्यक्ती असो, ती तुमच्याशी विचित्र वागली.. तुमचा अपमान केला.. तुमच्याकडे दुर्लक्ष केलं.. तुमच्या उपकारांचं कोणाला विस्मरण झालं—तेव्हा “एकेक अकाउंट पूर्ण झाला “ असे समजा आणि तसं आजपासून स्वतःला सांगायला लागा..
बँकेतली शिल्लक संपली की पासबुकावर, ‘Account Closed..’ असा शिक्का मारतात ना… त्याप्रमाणे जेव्हा एकांत मिळेल तेव्हा आपले किती ‘Account Closed’ झाले, ह्याचा विचार करा आणि पासबुकं जाळून टाका.. परतफेडीचा एकही क्षण टाळू नका…
कदाचित सुरुवातीला तुम्हांला जड जाईल.. पण आपलं मन जेवढं बलदंड असतं ना, तेवढंच ते लवचिक पण असतं..
तेव्हा मनाला सांगा.. “बाबा रे.. आयुष्यभर तुझं ऐकलं.. तुझ्या हुकमात राहिलो.. आता तुझी गुलामी मी सोडून देत आहे.. आजपासून तुला मी मुक्त केलं..!”
हा प्रयोग करा… आणि किती खाती पटापट बंद होतायत ह्याची प्रचिती घ्या.. मीसुद्धा उद्या तुम्हांला ओळख दाखवली नाही.. तर तुमच्या पासबुकात माझी एकच entry होती, असं समजा..
परमेश्वराला दोष देण्यापेक्षा फक्त.. “परतफेड आणि परतफेड” हा एकच मंत्र ध्यानात ठेवा आणि बघा तुम्हाला तुमचे आयुष्य किती सुंदर वाटेल, तुमच्या आयुष्यातून निगेटीव्हीटी कायमची निघून जाईल…..
आणि मी येतो…” असं म्हणत तो निघून गेला..
इतकं सगळं बोलून मी उठलो आणि म्हणालो..
” आज ही मुक्ती मिळून पाच वर्षं झाली.. मी आयुष्य खूपच मस्त जगत आहे.. तृप्त आहे..” तुम्ही
“ सहन करतो, सहन करतो..” हे इतक्या वेळा सांगितलंत, ह्याचा अर्थ तुम्ही काहीच सहन करत नाहीत.. तुम्ही फक्त दुःख वाटत असता..”
“जो सहन करतो ना.. तो कधी बोलत नाही..!”
चला तर मित्रांनो, आजपासून आपणसुध्दा आपल्या आयुष्यात कोणाकडून अपेक्षाभंग करुन घेण्याऐवजी फक्त ” परतफेडीचं ” आयुष्य जगायला सुरुवात करुन आयुष्य मजेत घालवूया..
एक छोटासा प्रयत्न…
– ले. अज्ञात
संग्राहक : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
प्रश्न जरा विचित्र वाटतो खरा, पण बघा जरा विचार करून शेवटचं कधी डोकावलं होत ते.
आपण आपल्या घरातल्या अडगळीच्या खोलीत अधून मधून डोकावत असतो. नेहमी नाही पण महिन्यातून एकदा तरी नक्की डोकावतो. एखादी वस्तू जी क्वचित लागते ती तिथे ठेवलेली असते, ती आणायच्या कारणाने तरी, आणि नाहीच तर साठलेले धुळीचे थर झटकून खोली स्वच्छ करण्याच्या हेतूने तरी. सगळं सामान, अर्थात बरचस नको असलेलं झटकून स्वच्छ पुसून नीट लावून ठेवतो. उगीचच सगळ्या वस्तूंवरुन हात फिरवतो, काही खास गोष्टींवर घातलेले कव्हर बाजूला सारून ते झटकून परत घालतो.
काय काय सापडत म्हणून सांगू—. आरामखुर्ची, पेंड्युलमचे घड्याळ, कधी काळी शिवणकाम शिकलो आहे ह्याचा शिक्कामोर्तब करणारे मशीन, एफेम रेडियो, पिढ्यानपिढ्या चालत आलेला पाळणा, तीनचाकी सायकल जी आता कोणीही चालविणार नाही, पाटावरवंटा ज्यावर चटणी वाटण्यासाठी आपल्याकडे शक्तीही नाही, रॉकेल वरचे कंदील- आता रॉकेल न का मिळेना, स्टोव्ह जो पेटवता सुद्धा येत नाही अशा एक ना अनेक वस्तू असतात.
परवा मी पण सहज माझ्या अडगळीच्या खोलीत गेले होते. तिथे धूळ झटकून खोली आवरताना एक खुर्ची सापडली. ती पाहून मला माझ्या माळीकाकांची आठवण झाली. परवाच ते मला विचारत होते, ताई एखादी खुर्ची असेल तर द्याल का? त्यांचे वडील आले होते गावाकडून आणि त्यांना खाली बसता येत नव्हतं. पटकन ती खुर्ची काढली, झटकली आणि देण्यासाठी सज्ज केली. तेव्हाच ठरवलं अश्या वस्तू ज्या आपल्याला नको आहेत त्या आता ठेवायच्या नाहीत. ज्या चांगल्या आहेत त्या देऊन टाकायच्या. खराब झालेल्या टाकून द्यायच्या. नाही तर भंगारात द्यायच्या.
हा विचार करत असतानाच मला असं वाटलं—-की माणूस नुसते अडगळीच्या खोलीतच अडगळ ठेवत नाही, तर त्यापेक्षाही जास्त अडगळ मनात ठेवतो. ती साठवतो आणि त्याला खतपाणीही घालतो. त्या गाठोड्यात असतात अनेक गोष्टी— जसे मान, अपमान,अपयश, काही तुटलेली अपूर्ण राहिलेली स्वप्न, दुखावलेली दुरावलेली नाती, आपल्या मित्र मैत्रिणीशी झालेले भांडण, ते कोण मिटवणार म्हणून मनात असलेली अढी, अश्या एक ना अनेक गोष्टी. एकावर एक थर चढतच जातात, आणि नकळत त्याची अडगळीच्या खोलीपेक्षाही जास्त मोठी खोली मनांत तयार होते.
तेव्हा ठरवलं– घरात नको असलेल्या वस्तूंची खोलीच ठेवायची नाही. नको असलेल्या वस्तू ठेवायच्याच नाहीत, ना घरात आणि ना मनात. नको असलेल्या वस्तू देऊन मोकळं व्हायचं. सगळया गोष्टींचा कसा रोखठोक हिशोब ठेवायचा. एखाद्याची एखादी गोष्ट आवडली नाही तर तिथल्या तिथे सांगून मोकळे व्हायचे. त्याचे व्याजावर व्याज चढवायचे नाही मनांत. एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली म्हणून कुढत बसायचे नाही, धुळी सारखी झटकायची आणि पुढे जात रहायचे. अपयशाला गोंजारत बसायचे नाही, तर त्याला यशाची पहिली पायरी समजून यश मिळेपर्यंत प्रयत्न करत रहायचे.
आज ह्या गोष्टी तुमच्या समोर मांडायच कारण आपण सगळेच जणं मनात खूप काही साठवून ठेवतो. भूतकाळाला जास्त महत्त्व देऊन वर्तमान हरवून बसतो. तसं न करता वर्तमानात जगूया ह्या क्षणाचा आनंद घेऊया.
बघा आठवून तुम्ही शेवटचे कधी डोकावले होते मनातल्या खोलीत??
आज नक्की डोकावा. नको असलेल्या साचलेल्या विचारांना काढून टाका, काही गैरसमज झाले असतील तर त्या व्यक्तीशी बोलून दूर करा. कुढत बसू नका आणि सगळ्यात महत्वाचे— विचार साठवून ठेवूच नका. कोणापाशी तरी बोलून मन मोकळं करा. साठलेली धूळ आपोआपच निघून जाईल—-एक स्वच्छंद, निरोगी मनाचे आयुष्य जगता येईल.