☆ “स्वतःच बना स्वतःची आई…” – लेखिका: डॉ. शुभदा गोडबोले ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक☆
☆
नमस्कार मी शुभदा गोडबोले. पेशाने मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे. माझ्या 27 वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे प्रत्येक माणूस वयाच्या कुठल्याही टप्प्यावर का असेना तो प्रेमाला मिस करतो. आता प्रेम म्हटल्यावर लगेच आपल्याला ते हिरो आणि हिरॉईनचं सिनेमामधलं प्रेम आठवतं. पण ते प्रेम नाही म्हणत मी. तर ज्याला आपण माया, ममता, वात्सल्य म्हणतो, ते आईचं प्रेम प्रत्येकाला आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्यावर हवं असतं.
थोडं स्वतःच्या आयुष्यात डोकावून बघा ना… मग तुमच्या लक्षात येईल की, मी काय म्हणते ते. कारण प्रत्येक फॅमिलीमध्ये कोणीतरी खूपच प्रेमळ असतं, जे दुसऱ्यांसाठी खूप झटतं, त्यांची जीवापाड सेवा करतं, कारण त्याचा तो स्वभाव असतो. त्याला ते जमतं. ती व्यक्ती स्वतःचे छंद, आवडी निवडी बाजूला ठेवून दुसऱ्यांसाठी झटते (आणि जास्त करून घरातली स्त्रीच हे करत असते.) पण पुरुषही थोड्या फार प्रमाणात असे असलेले आपण पहातो.
तर सांगायचा मुद्दा हा की, त्या व्यक्तीला दुसऱ्यांकडून तितकसं अटेंशन मिळत नाही. तिला नेहमी गृहीत धरलं जातं. ती व्यक्ती त्याची फिकीरही करत नाही, पण एखादी वेळ अशी येते की, त्या व्यक्तीलाही प्रेमाची गरज असते. मग त्या व्यक्तीला एकाकी वाटतं आणि कुठे तरी आधार हवा, असं वाटतं.
ह्या मनाच्या अस्वस्थतेमुळेच काही व्याधी निर्माण होतात उदा : ऍसिडिटी, डोकेदुखी, डिप्रेशन, रक्तदाब, मधुमेह वगैरे…
तर ह्याला उपाय एकच आहे की, तुम्हीच तुमची आई व्हा. जसं प्रेम तुम्ही तुमच्या मुलांवर, नातवांवर करता तसं स्वतःवर करायला शिका. कारण प्रेम करणं, हा तुमचा स्वभाव आहे. मात्र स्वतःकडे प्रेमाने पाहायला तुम्ही विसरून गेला आहात, आणि सगळं प्रेमाचं भांडं दुसऱ्यांवर ओतता आहात.
एखाद्या स्त्रीची कंबर खूप काम करून दुखली, किंवा गुडघा दुखला तरी ती स्त्री त्या अवयवाचा राग करते आणि ‘काय मेलं झालं ह्याला दुखायला, ‘ असं म्हणून ती अपेक्षा करते की, नवऱ्याने किंवा मुलांनी तरी विचारावं की ‘दमलीस का?’ काही बाम वगैरे लावून देऊ का.. एक तर मूव्हची जाहिरात बघून अपेक्षा दुणावतात. पण प्रत्येक वेळी कोणी वेळ देईलच, असं नाही.
अशावेळी मनात कुढण्यापेक्षा स्वतःच स्वतःची आई बना. थोडा वेळ एकटं बसा, आणि दुखणाऱ्या भागावरून जमल्यास हात फिरवा.. आता पाठ दुखत असेल तरी डोळे मिटा आणि हात फिरवताना फील करा… स्वतःच्या शरीराकडे प्रेमाने बघा, आणि तुमच्या मुलाला किंवा नातवाला म्हणता ना… तसं म्हणा… काय झालं माझ्या बाळाला.. बरं नाही का?
आणि मग स्वतःच्याच डोक्यावरून हात फिरवा. दुखऱ्या भागाला थोडा वेळ गोंजारा.. आणि बघा जादू… दुखणं दूर पळतं की नाही. सुरुवातीला लाज वाटेल, पण हे मनातल्या मनात आपण आपल्याशीच बोलत असल्यामुळे कोणाला ऐकायलाही जात नाही, आणि खूप बरं वाटतं.
ह्या सगळ्यात भावना खूप महत्वाची आहे. तुमच्या मुला-नातवासारखं स्वतःबद्दल प्रेम निर्माण करा. तुम्हाला जो खाऊ खावासा वाटेल, तो सगळ्यांसाठी घेऊन या आणि त्यांच्यासोबत मनसोक्त खा. तुम्हाला आवडणारी भाजी आवर्जून बनवा आणि दुसऱ्यांसाठी काही वेगळं बनवा.
पण स्वतःची आई बना आणि स्वतःचे लाड करा. ते ही दुसऱ्यांना न दुखावता.
कारण हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही आणि मग आयुष्यात हे करायचं राहिलं, ते राहिलं… ह्याची खंत करून दुःख करण्यात काय अर्थ आहे? दुसऱ्यांसाठी प्रेमाचा सागर असणारे तुम्ही स्वतःच कोरडे राहिलात तर काय उपयोग.
विचार करा आणि एकदा का होईना, हे करून पहा. ह्या मुळे आपल्यावर एकटं राहायची वेळ आली, तरी आपली प्रॅक्टिस असते, मग डिप्रेशन येत नाही.
☆
लेखिका: डॉ. शुभदा गोडबोले
प्रस्तुती : शशी नाडकर्णी-नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ४ – स्टोव्ह – ☆ विभावरी कुलकर्णी ☆
स्टोव्ह (रॉकेलचा) सारख्या वस्तू आता कालबाह्य झाल्या आहेत. पण आठवणीत मात्र अजूनही आहेत. कारण चूल ते रॉकेल स्टोव्ह हे स्थित्यंतर पाहिले आहे आणि त्यातील सुख अनुभवले आहे. गॅस सिलिंडर येण्यापूर्वी घराघरात याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात होता.
या स्टोव्ह चे मुख्य दोन प्रकार असायचे.
१) वातीचा स्टोव्ह – हा अगदी साधा, सुरक्षित! यात सुती वात पेटवण्याची सोय असते. आवाज अजिबात नाही. यात सर्वात खाली रॉकेलची टाकी असते त्यात रॉकेल भरायचे असते. त्याच्या वरच्या भागात गोलाकार वाती असतात. त्या टाकीला तिवई प्रमाणे स्टॅन्ड असतो. त्यावर एक गोलाकार ताटली वातीचा भाग मोकळा ठेवून बसवलेली असायची त्यावर भांडे ठेवता यायचे. त्याची ज्योत लहान मोठी करण्यासाठी वातिच्या खाली एक मोठी किल्ली असायची. निळी ज्योत असली की भांडी काळी व्हायची नाहीत. ज्योतीचा रंग पिवळा झाला की वातीवर काजळी जमली आहे हे कळायचे. मग वाती वरचे झाकण काढून वाती काजळी असलेल्या जागेवर थोड्या कापाव्या लागायच्या. मग तो चांगला पेटायचा.
२) पंपाचा स्टोव्ह किंवा दाबयुक्त स्टोव्ह बोलीभाषेत मात्र त्याला पितळी किंवा फरफऱ्या स्टोव्ह म्हणायचे. कारण त्याला पेटवले की त्याचा मस्त फर्रर्रर्र आवाज यायचा. यालाही एक टाकी असते. त्यावर एक पंप असतो. त्यावर बर्नर असते. त्याला एक छोटे छिद्र असलेले निपल असते. आणि टाकीला जोडलेल्या स्टॅन्ड वर एक भांडे ठेवण्यासाठी ताटली असते. जेथून टाकीत रॉकेल भरायचे तिथे एक छोटे झाकण असायचे आणि त्याला एक किल्ली असायची. रॉकेल टाकीत भरल्यावर पंप मारून हवा भरायची आणि त्या हवेच्या दाबाने रॉकेल निपल मधून बर्नर मध्ये चढायचे. त्या आधी काकडा लावून बर्नर तापवले जायचे. त्यामुळे चढलेल्या रॉकेलचे हवेत रूपांतर होऊन बर्नर भोवती ज्योत पेटायची. या स्टोव्हला काही झाले की प्रथमोपचार म्हणजे त्या निपलच्या छिद्रात पीन करायची म्हणजे तेथील कचरा साफ व्हायचा. मात्र हवा जास्त भरली किंवा बर्नर फुटले तर भडका उडायचा तो थेट घराच्या छता पर्यंत पोहोचायचा. मग सर्वांचीच पळापळ व्हायची. मग तो त्याच्या दवाखान्यात न्यावा लागायचा. आमच्या घरा शेजारी जे दुरुस्तीचे दुकान होते त्या दुकानाला त्याने स्टोव्ह व सायकलचा दवाखाना असे नाव दिले होते.
हा पितळी स्टोव्ह सुद्धा चिंच लावून चकचकित घासला जायचा. आणि घरातील स्टोव्हची चकाकी बघून गृहिणीची स्वच्छतेची आवड ठरवली जायची. मी इयत्ता ९ वीत असताना शालेय अभ्यासक्रमात आम्हाला स्टोव्ह दुरुस्ती विषय होता. शाळेत शिकलेले घरी केलेच पाहिजे. या न्यायाने मी घरी येऊन चांगला उत्तम चालणारा स्टोव्ह खोलला आणि त्याचे सगळे अवयव सगळ्यांना दाखवले. आणि त्याची सफाई कशी करायची, दुरुस्ती कशी करायची हे पण दाखवले. घरात, वाड्यात, शेजाऱ्यांना सर्वांनाच कौतुक वाटले. पण ते थोडाच वेळ टिकले. कारण तो स्टोव्ह म्हणजे त्याचे सुटे भाग काही जोडता येईना. मग तो सुटा स्टोव्ह वडिलांना पिशवीत घालून दुकानात नेऊन जोडून आणावा लागला.
नंतर मैत्रिणीच्या घरी एक साईडला असलेली टाकी आणि दोन बर्नर असा स्टोव्ह वापरला खूप मज्जा वाटायची एकाच वेळी दोन पदार्थ करता यायचे. या स्टोव्ह मुळे नोकरी करणाऱ्या स्त्रियांची सोय झाली होती. आणि चुलीच्या धुरापासून त्यांची मुक्तता झाली होती.
पुढे काही वर्षांनी गॅसची सोय झाली परंतु तोपर्यंत सर्वसामान्यांना या स्टोव्हनेच आधार दिला. अशा जुन्या वस्तूच्या आठवणी! वस्तू कालबाह्य झाल्या पण आठवणी मात्र मनात ताज्या आहेत.
☆ श्रीपाद वल्लभ दिगंबरा… कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – नीलिमा खरे ☆
☆
भावना प्रधान, भावुक मन आजूबाजूला व समाजात घडणाऱ्या घटनांकडे सजगतेने आणि सहृदयतेने पाहत असते. जागृत झालेल्या जाणिवा आणि आलेल्या अनुभूती यांच्याशी भावनांचा संबंध जोडू पाहते. त्यात आपल्या जगण्याच्या आचार- विचारांचे प्रतिबिंब शोधू लागते. प्रत्येक वेळी/ दरवेळी ते मनाला आवडेल, रुचेल असे असेलच असेही नाही. अशावेळी मनातल्या विचारांना केवळ स्वतःच्या आचरणाची जोड देऊन भागणार नाही हे लक्षात येते. समाजातल्या लोकांच्या मनाचे परिवर्तन घडावे, त्यात चांगले हितकारक बदल व्हावेत असे मनोमन वाटू लागते. परंतु हे विचार प्रत्यक्षात उतरणे आणि उतरवणे खूप अवघड असते. काही वेळा प्रत्यक्ष कृती करूनही ध्येय साध्य होईलच असेही नाही. साहजिकच हतबल, व्याकुळ झालेले मन नेहमीप्रमाणेच सर्व विश्वाचा स्वामी, निर्माता, कर्ता करविता जो ईश्वर त्याच्याकडे धाव घेते. त्याला भक्तिभावाने साद घालते. अशा आर्त भक्ती भावनेचा प्रत्यय देणारी डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांची “श्रीपाद वल्लभ दिगंबरा “ही कविता आज आपण वाचणार आहोत. त्यातील विचार, त्यातला भक्तिभाव जाणून घेणार आहोत. ही नुसती कविता नाही तर भक्ती भावनांनी ओथंबलेले कवन आहे..
श्रीपाद वल्लभ दिगंबरा या शीर्षकातून ही कविता सदृश्य आरती श्री गुरुदेव दत्त यांच्या प्रती लिहिलेली आहे हे लक्षात येते. श्रीपाद वल्लभ दिगंबरा या त्रि अक्षरी नामाचा महिमा इतका जबरदस्त आहे की निव्वळ शीर्षक वाचल्यावर आपल्या मनातही भक्तीचे भावतरंग उमटू लागतात. आपल्या डोळ्यासमोर श्री दत्तगुरूंची सात्विक मूर्ती साकार होते. साहजिकच ही कविता वाचताना त्या भक्ती भावाने ती आतुरतेने वाचण्याची इच्छा होते.
*
कलियुग जगती जगदोद्धारा घेउनि या अवतारा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||ध्रु||
*
कलियुगातील अस्थिर, अनैतिक, अनिर्बंध, अविचारी, अविवेकी आचार विचार सुज्ञ माणसाला रुचणे खरंच अवघड आहे. चुकीच्या मार्गाचा विचार करणारी व त्या नुसार जगणारी माणसे ही समाजाला लागलेली कीड आहे. त्यांचे अंतर्बाह्य परिवर्तन करणे /होणे अत्यंत जरुरी आहे. यासाठी केवळ मानवी प्रयत्न पूरे पडणारे नाहीत हे सत्य आहे. हा बदल घडवून आणणे केवळ ईश्वरालाच शक्य आहे. ब्रम्हा, विष्णू, महेश या अनुक्रमे सृष्टीचा निर्माता, पालक व विनाश या तिन्ही शक्तींचे प्रतीक असलेल्या श्री दत्तगुरूंना कवी आवाहन करतो आहे. या जगती कलियुगाच्या बजबजपुरीतला अंधःकार दूर करण्यासाठी, जगाच्या उद्धारासाठी तुम्ही अवतार घ्या असे कवी विनवतो आहे. “अवतार घेऊन या “यातील श्लेष महत्त्वाचा. स्वतः श्री दत्तगुरूंनी अवतरावे. किंवा निदान अशी शक्ती /विभूती बनून भूतलावर यावे जी दैवी अवतारा सम असेल. त्याला घेऊन/ तसे बनून तुम्ही पृथ्वीवर या अशी याचना/आंतरिक प्रार्थना कवी करत आहे. “दिगंबरा दिगंबरा “या सुप्रसिद्ध जपातून कवी श्री दत्तगुरूंना आवाहन करतो आहे. श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे सारे शब्द मूळ संस्कृत भाषेतील आहेत. संस्कृत ही देववाणी असल्याने या शब्दांना मंत्र रूप लागले आहे, मंत्र सामर्थ्य लाभलेले आहे. या मंत्ररुपाने कवी श्री दत्तगुरूंची आराधना करून त्यांना साद घालतो आहे. हा मंत्र सत्व, रज, तम या त्रिगुणांच्या परे आहे. अशा या परमात्म्याचे अनुसंधान करून त्याला जगताच्या उद्धारासाठी कवी मनापासून आवाहन करतो आहे. जगती जगदोद्वारा हा अनुप्रास व अवतारा- दिगंबरा हे यमक अतिशय सहजतेने या कवितेच्या ध्रुवपदात आले आहे. त्यामुळे ध्रुव पदाला एक उत्तम लय लाभलेली आहे. साहजिकच ध्रुवपदापासूनच या कवितेची गेयता लक्षात येते जी या आरती स्वरुप कवितेच्या रचनेसाठी अत्यंत जरुरी आहे.. यामुळे कवीच्या साहित्यिक जाणीवांची जाण वाचकांना होते. *
परधर्माचा नाही आदर स्वधर्माची ना जाण
मी अन् माझे यातच गेले गुरफटुनी जीवन
पीडितास पाहुनी मनी ना आपुलकीचा झरा
माणुसकीचा खेळ मांडुनी मानवास उद्धरा ||१||
*
समाजातील परिस्थितीचे /वातावरणाचे अतिशय मोजक्या व प्रांजल शब्दांत वर्णन केले आहे. ही परिस्थिती पूर्णपणे वास्तविक, सत्यदर्शी आहे. यात कुठेही कवी कल्पना नाही. धर्माच्या आधारावर विशिष्ट गट निहाय संस्कृती /धर्म जाणून-बुजून निर्माण केले जात आहेत. सर्वधर्मसमभाव ही संकल्पना कोणीही मानत नाही/ जाणत नाही. परधर्माविषयीचा आदर, त्यासंबंधी जाणीव, त्यातील जीवनमूल्ये, धर्मविषयक विचार कुणालाही जाणून घेण्याची इच्छा नाही. परधर्माला नावे ठेवणे एवढा एकच क्षुल्लक आणि निकृष्ट विचार सर्वांच्या मनावर राज्य करतो आहे. साहजिकच परधर्माविषयी आदरभाव मनात नाही आणि त्याचवेळी स्वधर्माची ही पुरेशी किंबहुना किंचितही जाणीव नाही असे आढळून येते. स्वधर्म आणि परधर्म या शब्दांवरील श्लेष अतिशय उत्तम. येथे केवळ धार्मिक, अध्यात्मिक ग्रंथ, वेद पुराणे यांचा संदर्भ नक्कीच अपेक्षित नाही. स्वतः सोडून जो दुसरा तो परका असे मानले जाते. अशा व्यक्तीविषयी माणूस म्हणून काही धर्म, काही कर्तव्ये आहेत असा विचार किंवा असे आचरण बिलकुल ही नाही. अशा दृष्टीने परधर्माविषयी आदरभाव/जाण नाही. एवढेच काय स्वधर्म म्हणजे स्वतःची स्वतःबद्दलची व इतरांना अपेक्षित असलेली कर्तव्ये यांचीही पुरेशी जाणीव नाही. थोडक्यात परधर्म आणि स्वधर्म या दोन्ही विषयी समाजात घोर अज्ञान आहे किंवा ज्ञान असूनही त्याप्रमाणे वागण्याचा सूज्ञपणा व विवेक बुद्धी नाही. मी, माझा स्वार्थ, माझे हित इतक्या संकुचित वृत्तीत जनसामान्यांचे मन गुरफटून गेले आहे. त्या व्यतिरिक्त कुठलीही भावना, वेदना, संवेदना कुणाच्याही मनात जागी होत नाही. एखाद्या दु:खी, खिन्न, गरजू व्यक्तीला पाहून मनात आपुलकीचा झरा वाहत नाही. ही खरंतर सहज सोपी गोष्ट ती ही अतिशय दुर्मिळ झाली आहे. कुणाच्याही मनाला पाझर फुटत नाही. सर्वांची मने पाषाण हृदय झालेली आहेत. येथे “मन गुरफटून गेले आहे” हा जो शब्द प्रयोग केला आहे तो अतिशय समर्पक. या शब्दातून एखाद्या गोष्टींमध्ये अडकणे, गुंतणे, गुंतागुंतीच्या जाळ्यात सापडणे ही अपेक्षित भावना सुस्पष्टपणे व्यक्त होते. ती या कवितेतील आशयाला पूरक आहे.
कुणाला वेदना /पीडा असतील तर त्यांना मदत करून त्या दूर करणे हा साधा विचारही हल्ली पटकन कोणाच्या मनात येत नाही. त्याप्रमाणे आचरण करणे तर दूरच!! सर्वज्ञानी परमेशाने जगाची निर्मिती करून संसाराचा/ भवसागराचा हा खेळ मांडला आहे असे पण मानतो. आता कवी त्याला विनवितो आहे की हे ईश्वरा! तू आता माणुसकीचा खेळ मांड. कुठल्याही खेळात माणूस जसा रमून जातो तसा माणुसकीच्या खेळात माणसाने रमावे अशी इच्छा कवी व्यक्त करत आहे. प्रत्येकाच्या मनात माणुसकी जागव, त्याचे महत्व त्यांना पटवून दे आणि असे करून मानवाचा उद्धार कर असे प्रतिपादन कवीने केले आहे. येथे संपूर्ण मानवजातीचा उद्धार अपेक्षित आहे. परधर्म व स्वधर्म यातील श्लेष, पीडितास -पाहुनी मधील अनुप्रास, झरा -उद्धरा हे यमक हे अतिशय सुलभतेने साधले आहे. त्यामुळे ध्रुवपदापासून कवितेला लाभलेली गेयता जपली गेली आहे..
*
मानवतेची ओळख नाही स्वार्था जोपासले
चैन दाम अन् ऐशोरामी देवाला पाहिले
मोहाच्या जाळ्यात गुंतला वैभवाचा तोरा
भवसागरी नर बुडून गेला हात देऊनी तारा ||२||
*
मानवतेची ओळख मानवालाच राहिली नाही हे सखेदपूर्वक मांडून कवी म्हणतो की माणसाने स्वार्थ फक्त जाणले नाही तर ते जोपासले. स्वार्थाच्या पलीकडे जाऊन मानवतेची माणसाचीच ओळख उरलेली नाही. संबंध उरला नाही. किंवा त्याला त्याची जाण नाही, जाणीव नाही या अर्थानेही ओळख हा शब्द वापरलेला आहे. ओळख या शब्दावरील हा श्लेष अतिशय समर्पक आहे. येथे जाणीवपूर्वक स्वार्थाने वागणे या सत्याकडे निर्देश केला आहे. चैन, दाम म्हणजे पैसा व ऐशोराम यालाच आणि याच्यातच देव पाहिला. स्वार्थ लोलुप, स्वार्थाने अंध झालेला हा समाज आहे. कितीही लाभले तरी अजून हवेच हा माणसाच्या मनाचा व मनातला जप काही संपत नाही. त्याला सतत” अजून काहीतरी हवे “याची आसक्ती आहे, त्याचा मोह आहे. या मोहाच्या जाळ्यात मानव गुंतला. मोहाचे जाळे मधील श्लेष अतिशय समर्पक.. अजून हवे हा मोह व ते मिळवण्यासाठी वापरले जाणारे चुकीचे मार्ग यांचा मोह..
येथे अजून एक अर्थ आपल्याला लक्षात येऊ शकतो. सध्याच्या युगात देवाची मंदिरे ही पूजा, अर्चना, साधना, आराधना यासाठीची ठिकाणे राहिली नसून तेथेही देवाला अद्ययावत सुख सोयी देऊन त्याला करोडोंचे अलंकार घालण्याची प्रथा रुजली आहे. देवाला दागिन्यांनी मढवून स्वतःच्या वैभवाचा तोरा मिळवणे म्हणजेच भक्ती असा चुकीचा अर्थ लोकांच्या मनात रुजू पाहत आहे. वैभवाचा तोरा मिरवणे यातच प्रत्येकाला आपल्या आयुष्याची इति कर्तव्यता वाटते. वैभव मिळवणे त्यासाठी प्रयत्न करणे हे पाप नाही, गुन्हा नाही. पण त्यासाठी/ त्याच्या प्राप्तीसाठी माणूस मोहाच्या जाळ्यात गुंतला. या वास्तवाकडे सुस्पष्टपणे निर्देश केला आहे अतिशय सहजतेने आणि प्रभावीपणाने. वैभवाचा तोरा मिरवणे यामध्ये बडे जाव दाखवण्याची आसक्ती दिसून येते. हा शब्दप्रयोग एकदम यथार्थ आहे. कवितेतील आशयाला ठोसपणे मांडणारा व पुष्टी देणारा. वैभवाचा तोरा मोहाच्या जाळ्यात गुंतला.. येथे योजलेल्या रुपक व चेतना गुणोत्ति अलंकारांनी कवितेतील भावना प्रकर्षाने मांडली आहे. भव सागरात नर म्हणजे मानव जात बुडून गेली आहे असे म्हणून कवी मानवाला तारा, त्याला सांभाळा असे विनवतो आहे. “बुडून” या शब्दावरील श्लेष अतिशय उत्तम. एक अर्थ त्यात गुरफटला, गुंतला व दुसरा अर्थ म्हणजे लोप पावला, हरवला, त्याचे अस्तित्व संपले. अशा या बुडणाऱ्या नराला आधाराचा हात देऊन, त्याला योग्य ज्ञान देऊन, मार्गदर्शन करून त्याचा तारणहार बना असे कवी श्री गुरुदेव दत्तांना विनवितो आहे. नराचा नारायण करायचा असेल तर खुद्द नारायणाने, ईश्वरानेच त्याला मदत करणे आता आवश्यक आहे व ते केवळ त्याला शक्य आहे. वैभवाने आणि दिखाऊ पणाने देव मूर्तीला सजवून आपल्या भक्तीचे प्रदर्शन करणे ही चुकीची प्रथा सध्या रुजलेली दिसते. देव मूर्तीत नाही, त्याच्या सजावटीत नाही तर मानवतेच्या/ माणुसकीच्या आचरणात देव असतो. माणसाने माणसाशी चांगले वागणे हाच खरा धर्म आणि हीच खरी देवपूजा. आता नारायणाने स्वतः अवतार घेऊन नराला या सर्व परिस्थितीत तारावे अशी कामना कवी व्यक्त करतो आहे.
जोपासले -पाहिले, तोरा -तारा अशी शब्द योजना करून सहजपणे यमक अलंकार साधला आहे. तसेच ओळख व बुडून या शब्दावरील श्लेषही अतिशय सुंदर..
*
बुद्धीचा त्या माज चढला ज्ञानयोग विसरला
कर्मयोगाची नाही जाण कर्मकांडी रमला
भक्तीचा बाजार मांडिला धनवैपुल्य गुबारा
द्युलोका सोडूनी येउनी मानवास आवरा ||३||
*
माणसाला स्वतःच्या बुद्धीचा सार्थ अभिमान न उरता तो माजला आहे. तसे पाहिले तर बुद्धीचे दान हे ही ईश्वर मर्जीनेच /ईश्वर कृपेनेच लाभलेले आहे. तरीही त्या बुद्धीच्या जोरावर वाटेल ते करता येते आणि तसे केले तरी अडवणार कोण असा मस्तीचा /मिजाशीचा भाव मानवाच्या मनात राज्य करतो आहे. मला हवे तसे, हवे तेव्हा, हवे तेवढे मिळवण्यासाठी बुध्दीचा वापर करणे यात त्याला काही ही गैर वाटत नाही. असे करताना इतरांना त्रास झाला, काही गोष्टींचा ऱ्हास झाला तरी तो बेफिकीर असतो. ज्ञानाने सर्वांचे हित साधावे कुणाला त्रास देऊ नये हा अर्थ तो सोईस्करपणे विसरला आहे येथील ज्ञानयोग या शब्दावरील श्लेषही अतिशय सुंदर आणि समर्पक. जीव, जगत व परब्रम्ह यांचे यथार्थ ज्ञान शास्त्रांच्या, वेदांच्या अभ्यासाने व गुरुच्या साह्याने करून घेणे आणि त्यातून ब्रह्म ऐक्य जपणे/ अनुभवणे याला ज्ञानयोग म्हणतात. पण दुर्दैवाने माणूस हेही विसरला आहे. त्या प्रती त्याच्या मनात आस्था उरलेली नाही. या प्रमाणे अध्यात्मिक ज्ञान व विविध विषयांबाबतचे ज्ञान असे दोन्ही अर्थ इथे अभिप्रेत आहेत. माणूस ज्ञानयोग तर विसरलाच पण कर्मयोगाची ही जाणीव तो बाळगत नाही. आपल्या वाट्याला आलेले कर्म फळाची अपेक्षा न करता करावे हा खरंतर कर्मयोग! कर्मयोग साधता साधता मोक्षाची अपेक्षा करणे, त्या दिशेने प्रवास करणे हा भावही मनात उरलेला नाही. केवळ कर्मकांडात म्हणजे मूर्ती पूजा, जपतप, व्रत वैकल्ये यातच तो रमला. त्याचा खरा अर्थ जाणून न घेता मंदिरात व घरीही विविध याग, होम अशा प्रकारे कर्मकांड करण्यात तो धन्यता मानत आहे. देवा संबंधी विविध कर्मे करणे चूक नाही. किंवा वाईट तर मुळीच नाही. पण त्यामागचा खरा अर्थ जाणण्याची इच्छाशक्ती किंवा प्रयत्न माणूस करत नाही. हे सर्व केले म्हणजे आपण देवधर्म केला असा खोटा अहंकार आणि खोटा आनंद माणूस मिळवतो आहे. हा समज नक्कीच चुकीचा आहे. खरा भक्ती भाव, समर्पण भाव दूरच राहिला एवढेच नव्हे तर त्याचा केवळ बाजार मांडला आहे. बाजार शब्द योजिताना त्याचे केलेले प्रदर्शन हा भाव अभिप्रेत आहे. तसेच येथे बुवाबाजीकडे अंगुली निर्देश असावा असे वाटते. हे लोक देव असल्याचा आविर्भाव आणतात, त्यातून स्वतःचे हित साधतात. या भक्तीतून समाजाचे प्रबोधन किंवा हित करणे हा हेतू बरेचदा मनात नसतो ही. भक्तीचा बाजार मांडून त्यात विपुल धनाचा /संपत्तीचा देखावा मांडतात. त्याचा गुबारा म्हणजे फुगा होतो ही शब्दयोजना अप्रतिम. केवळ टाचणीने फुटणारा हा गुबारा किंवा फुगा अर्थात त्याला तेवढे मोल नाही, महत्त्व नाही तो खोटा पोकळ अभिमान आहे हे लक्षात आणून दिले आहे. अशा बेभान बेफाम, बेलगाम वर्तनापासून /वागण्यापासून मानवाला आवरण्यासाठी, त्याला थांबवण्यासाठी, परावृत्त करण्यासाठी, योग्य मार्गदर्शन करण्यासाठी हे ईश्वरा! द्यू लोक म्हणजे स्वर्गलोक जेथे देवांचा वास आहे(जिथे देव राहतात अशी कल्पना /धारणा आहे) सोडून पृथ्वीवर सत्वर या असे आवाहन कवीने केले आहे. विसरला -रमला, गुबारा -आवरा हे सहज सुंदर यमक कवितेला नादमयता प्राप्त करून देते. तसेच ज्ञानयोग आणि कर्मकांड या दोन शब्दांवरील श्लेष खरोखर अप्रतिम आहेत. कांड करणे म्हणजे चांगला मार्ग सोडून त्याचा त्याग करून चुकीचा मार्ग अनुसरणे, वाईट वागणे जसे द्वेष, वैषयिक वासना इत्यादी.. तसेच दुसरा अर्थ आपल्या वाट्याला आलेले कार्य किंवा कर्म करताना त्याविषयी प्रामाणिक नसणे.
*
चराचरांचा स्वामी म्हणवित मानव हा मातला
दया कणव न याला ठावे क्रौर्याचा हा पुतळा
वृक्षवल्लींचा पशुपक्ष्यांचा निर्घृण हा हत्यारा
इह्लोकाव्र अवतारुनी या सृष्टीला सावरा ||४||
*
स्वतःला चराचराचा, सृष्टीचा, तिच्या वैभवाचा, सौंदर्याचा, संपत्तीचा स्वामी समजून मानव हा माजला आहे. ज्या गोष्टींची निर्मिती करता येत नाही त्या निसर्गाकडून लुटणे, लुबाडणे हेच मानवाचे ध्येय बनले आहे. स्वतःच्या सुखा पलीकडे त्याला दुसरे काहीही लक्षात येत नाही. सृष्टीचे जतन, संवर्धन याविषयी जराही जाण तो मनात बाळगत नाही. स्वामी जसा उपलब्ध साधन सामग्रीचा/ संपत्तीचा उपभोग घेण्यात धन्यता मानतो, त्यावर स्वतःचा हक्क प्रस्थापित करतो तद्वतच मानवाची मनोधारणा झाली आहे. कुठल्याही व्यक्तीबद्दल, प्राणी पक्षी यां बद्दल, झाडांबद्दल कसलीही दया, कणव या भावना मनात उरलेल्या नाहीत. क्रौर्याचा स्वार्थांध पुतळा म्हणावा असे रूप त्याने धारण केले आहे. क्रोध, राग, संताप, वध/ हत्या, असूया, इर्षा, सुखलोलुपता, वासनांधता अशा काम क्रोधादी विकारांनी त्याला पछाडले आहे, तो त्यांच्या अधीन झाला आहे. लता- वेली, झाडे झुडपे, पशुपक्षी यांच्या विषयी कसलाही ममत्त्वाचा, कृतज्ञपणाचा भाव त्याच्या मनात शिल्लक नाही. त्यांची निर्घृण हत्या करताना तो मागे पुढे पाहत नाही. जी झाडे त्याला सावली देतात, फळे -फुले देतात त्यांच्या जतनाबद्दल, त्यांच्या संवर्धनाबाबत अजिबात जागरुकता दिसून येत नाही. मन मानेल तसे झाडे, फुले, पाने तोडणे, झाडे मुळासकट नष्ट करणे, त्यांचे अस्तित्व नेस्तनाबूत करून त्या जमिनी बळकावणे असे कृतघ्न पणाचे कार्य मात्र अविरत चालू आहे. पक्षांची -प्राण्यांची शिकार करणे हेही तो साहसाचे/धाडसाचे लक्षण समजतो त्यामुळे त्यांचा जीव जातो त्याची थोडीही जाण तो ठेवत नाही. संपूर्ण सृष्टीच्या जीवन चक्राचा ऱ्हास होतोय हे लक्षात घेत नाही किंवा लक्षात आले तरी तसे आचरण करत नाही. साऱ्या चराचराचा स्वामी स्वतःला समजून, अप्पलपोटेपणा मनात बाळगून, स्वार्थ साधून स्वतःचा जास्तीत जास्त फायदा करून घेऊन, चराचराचा ऱ्हास मात्र तो करतो आहे. कवी श्री दत्तगुरुना विनंती करतो आहे की इहलोकी अवतार घेऊन या सृष्टीला सावरा, सांभाळा. अन्यथा तिला अपरिमित हानी पोहोचवण्याचे क्रूर काम मानव करतच राहील. म्हणून- मानव हा अनुप्रास, हत्यारा -सावरा हे यमक सहजपणे साधून कवितेतील लय आणि नादमयता जपली आहे.
अतिशय वास्तववादी कविता आहे ही. सांप्रत स्थितीचे विदारक शब्दचित्र रेखाटले आहे कवितेतून. साध्या सोप्या शब्दातून, बोजड शब्दांचा वा अतिरेकी अलंकारिक भाषेचा मोह अजिबात ठेवलेला नाही. साहजिकच सर्व स्तरातील लोकांना समजेल, कळेल अशी ही कविता. कवितेतील वास्तव/ सत्यता नाकारता न येण्यासारखी आहे. डोळ्यात अंजन घालणारी, माणसाला माणूसकीच्या भावनांची जाणीव करून देणारी कविता. सध्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे, हाताबाहेर गेली आहे ही केवळ परमेश्वरच या परिस्थितीतून मानवाला आणि सृष्टीला तारून नेऊ शकतो. माणसाला लवकरात लवकर या साऱ्या परिस्थितीचे भान येवो, सद्बुद्धी लाभो अशी प्रार्थना ही आजच्या काळाची नितांत गरज आहे. उच्च शिक्षित, विद्याविभूषित डॉक्टर या नात्याने जगताना संवेदनशील जाणीव जपल्याने कवीला या भावना समजल्या आहेत. आणि त्यांनी त्या कवितेत शब्दबद्ध केल्या आहेत. ही कविता म्हणजे एक सामाजिक भक्ती काव्य आहे. मानवतावादी प्रार्थना आहे असे म्हणणे उचित ठरेल. मानवतेप्रती/समाजाप्रती अतिशय दुर्मिळ ठरेल अशा ध्येयवादी भक्ती भावनेने शब्दबद्ध केलेली प्रार्थना आहे. अशा प्रकारची प्रचारक, सुधारक भूमिका मांडण्याचे धैर्य आणि धाडस कवीने केले आहे. त्या साठी सादर प्रणाम!!!
हे वाक्य खूप ऐकतो. ऐकत आलो आहोत. शाळेत ही एक पीरियड संपला की त्या विषयाचा अभ्यास झाला. कोणताही वर्ग योग वर्ग, डान्स क्लास, music class, असो एका निश्चित वेळेत तो संपतो. एका निश्चित वेळेनंतर ‘saturation ‘होत. लक्ष कमी होतं •••
आणि त्या कामाचा आनंद ही कमी होतो. म्हणजे अगदी उत्तम गाणारे असले तरी, त्या कार्यक्रमाचा आनंद एक तासभर चांगला वाटतो. ••••
लहानपणापासून आपण हे शिकतो की काही ही करताना थांबण्याची एक वेळ असते. थांबणे आवश्यक आहे. कुठे थांबायचे??? हे वेळेवर कळणे गरजेचे आहे. •••
लहानपणी शिकलेल्या काही गोष्टी माणूस जसा जसा मोठा होतो, तसा तसा विसरतो. •••
कोणतेही काम असो, कष्टाचे किंवा मनोरंजनाचे कुठे थांबायचे?? हे कळले पाहिजे. ठरविता आले पाहिजे. आणि थांबलेही पाहिजे. ••••
तो ना ‘ workoholic ‘ आहे. workoholic असो, नाही तर ‘Alcoholic’ असो, एका वेळेनंतर थांबलेच पाहिजे. •••
खाणे, झोपणे, काम करणे, काळजी करणे, बोलणे, हसणे, रडणे एका वेळेनंतर थांबलेच पाहिजे. पैसे खर्च करणे किंवा कंजुषी करणे. हेही करताना कुठे थांबायचे कळले पाहिजे. ••••
“अति तिथे माती ” म्हणतात ना ते लक्षात ठेवल्यास सर्व आटोपशीर राहतं. ••••
आयुष्यात नोकरी••• पैसे कमविणे, कष्ट करणे, धावपळ करणे चालूच असते. केंव्हा थांबवायचे??? हे ठरविता आले पाहिजे. राब राब राबणे, कष्ट करणेच म्हणजे आयुष्य जगणे नव्हे. ••••
प्रसिद्ध खेळाडू, Actors ला केव्हा संन्यास घ्यायचा हे कळले पाहिजे. ••••
आपली जागा दुसऱ्याला देता आली पाहिजे ••••
मला सध्या (वयाच्या तिशीनंतरही) ‘लग्न करायचे नाही’. हा विचार, किंवा माझे करीयर जास्त महत्वाचे आहे. ‘सध्या मुलं नको ‘असे विचार, केव्हा थांबवायचे???? कळले पाहिजेच ••••
आपल्या dignity ला सांभाळून किती झुकायचे?? किती ऐकायचे?? किती दबायचे? किती ‘ gossip करायचे?? किती भाव खायचा??? किती कोणाला लुबाडायचे??? किती कोणाच्या गळ्यात पडायचे??? किती आपलंच कौतुक करायचे?? किती पाल्हाळ लावायचा?? या सर्व गोष्टी थांबवायचे… कळले पाहिजे. ••••
फोनवर किती वेळ बोलायचे??? केंव्हा बोलायचे??? किती जोरात बोलायचे??? किती दादागिरी करायची??? सर्व गोष्टी कळल्या पाहिजेत. •••••
ज्याला हे जमले तो हुशार व आजूबाजूचे पण सुखी होतात.
‘ Life is a game of Timing ‘
बरोबर निर्णय पण उशिरा घेतला तर त्याचा फायदा होत नाही. ••••
आपल ‘assessment ‘करता आल पाहिजे. आपली क्षमता, बुध्दी, साहस याच भान ठेवून निर्णय घेता आला पाहिजे. नाही तर कौन बनेगा करोडपती?? मधे पंचवीस लाख जिंकत असताना एका चूकीच्या निर्णयाने खाली पडताना आपण बघतोच.
••••
लोकांनी म्हणायच्या आत आपल्याला कळले पाहिजे केव्हा थांबायचे??? . एकुलता एक मुलगा असला तरी लाड करणे, कुठे थांबायचे?? केंव्हा ‘हो ‘आणि ‘नाही’ म्हणायचे हे कळलेच पाहिजे. नाहीतर मुलगा ‘बबडया’ व्हायला वेळ लागणार नाही. डोईजड होईल सर्व. •••••
‘ Balance ‘ समतोलपणा मग ते कोणतेही क्षेत्र असो सांभाळता आला पाहिजे. भाजीत जास्त मीठ चालत नाही. मग ती भाजी dry fruits ची का असेना.
अति काहीच चांगले नाही. •••••.
थांबणे ही एक कला आहे.
कुठे?
केंव्हा?
कसे? थांबावे
ही एक कला आहे. ती सर्व कलांमध्ये लागू होते. ••••!!
☆ “जागतिक महिला दिन – ८ मार्च” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
मी नेहेमीच बायकोला खुश करण्याची संधी शोधत असतो. आणि मी तर म्हणीन कि सगळ्यांनीच अशा संधींच्या शोधात राहायला पाहिजे. बायको खुश असेल तर काय काय मज्जा येते – ये तो सभी जानते है. आज अनायसे अशी संधी चालत आली आहे. सकाळी चहा घेतांना बायकोला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विचार केला, बायकोला घेऊन जरा बाहेर फिरून यावं. तेवढ्यात बायकोला मैत्रिणीचा फोन आला. बायकोनी मला खूण करून सांगितले – तुम्ही जाऊन या, मला वेळ लागेल.
फिरत फिरत मृत्युंजय मंदिराच्या जवळच्या चहाच्या दुकानापर्यंत पोहोचलो आणि ओळखीचा म्हणजे मेघना आणि मनवा यांचा आवाज आला – काका, आहात कुठे? कित्येक महिन्यात भेट नाही.
मी – सांगतो, सांगतो,. पण त्याआधी –
मी : आज ८ मार्च – आज खास दिवस आहे – जागतिक महिला दिवस. मेघना आणि मनवा तुम्हाला जागतिक महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या मैत्रिणींना पण शुभेच्छा द्या.
मेघना आणि मनवा : काका, धन्यवाद. आज पहिल्या शुभेच्छा तुमच्याकडूनच मिळाल्या, मजा आली.
चहावाल्या काकांना मी बाहेर बोलावलं. त्यांनी पण शुभेच्छा दिल्या. आणि गम्मत म्हणजे आजूबाजूला उभे असणाऱ्या चहा पिणाऱ्या सगळ्यांनीच मेघना आणि मनवा यांना शुभेच्छा दिल्या.
मेघना आणि मनवा एकदम खुश झाल्या. त्यांनी सगळ्यांना थँक्स दिल्या.
तेवढ्यात आमच्या हातात गरमागरम चहाचे ग्लास आले.
मनवा : काका, आजच्या दिवसामागची हिस्ट्री काय आहे, ते माहित आहे का?
मी : नक्कीच. बाहेरची कामे करतांना पुरुष आणि स्त्रिया यांना समान हक्क मिळावेत म्हणून पूर्वी जगभर आंदोलने झाली आणि स्त्रियांना त्यात यश मिळाले. आणि हा आनंद साजरा करण्याकरता ८ मार्च १९१७ या दिवशी “जागतिक महिला दिन” चा जन्म झाला. सगळ्याच देशांमध्ये हा दिवस साजरा होतो.
मेघना : आता बहुतेक देशात स्त्रियांना समान हक्क मिळाले आहेत. सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रिया आज कार्यरत आहेत. काही ठिकाणी त्या उच्च पदांवर काम करत आहेत.
मनवा : मैदानी खेळांमध्ये आणि राजकारणात पण पुढे आहेत. पंतप्रधान / राष्ट्रपती या पदांपर्यंत पण महिला पोहोचल्या आहेत. आता तर मंगळावर उतरणारी पहिली व्यक्ती हा बहुमान स्त्रीला मिळणार आहे, असे सांगतात.
मेघना : कला क्षेत्र, चित्रकला, गाणी, नृत्य, साहित्य, सिनेमा वगैरे मधे पण स्त्रिया आघाडीवर आहेत.
मी : खरंच अभिमान वाटावा असंच आहे. पण सिनेमा / टीव्ही या क्षेत्रांमध्ये आघाडी घेण्याकरता त्यांनी निवडलेली अंगप्रदर्शनाची वाट मात्र मनाला खटकते. आणि त्याचेच अनुकरण घराघरात होतांना दिसते.
मनवा : ग्लॅमर पुढे स्त्रिया बुद्धी गहाण ठेवतात हे न रुचणारे सत्य आहे. स्त्रिया या बाबतीत बदलतील अशी शेजारीच असलेल्या देवळा मधल्या देवतेला आपण प्रार्थना करूया..
मेघना : जागतिक महिला दिन सुरु करण्यामागचा जो मूळ उद्देश होता, तो आता पूर्ण होऊनही बरीच वर्ष झाली आहेत. त्यामुळे सध्यातरी या दिवसाचं महत्व फक्त शुभेच्छांची देवाणघेवाण करणे इतपतच राहिलं आहे
मी : बाहेरच्या जगामधे समान हक्क मिळालेल्या स्त्रियांना आपल्या घरांमध्ये पण समान हक्क आहेत कां?
मनवा : सगळ्या स्त्रियांनी जर मनापासून याचं उत्तर दिलं, तर ‘नाही’ असेच त्यांचं उत्तर येईल. जागतिक महिला दिनाच्या दिवशी त्यांना नुसत्या “हॅपी महिला दिन ” अशा शुभेच्छा देऊन त्या घरामधे आनंदित होतील का? स्त्री शिवाय घराला घरपण येत नाही असं म्हणतात. मग या स्त्री ला घरामध्ये आनंद देण्याकरता, आपण घरातली मंडळी हिच्या करता काय वेगळं करतो? बहुतेकांकडून उत्तर येईल – काहीच वेगळं करत नाही.
मेघना : प्रत्येक घरात स्त्री ही आई म्हणून रोल करत असते, बायको म्हणून रोल करत असते, सून म्हणून रोल करत असते आणि बाहेर नोकरी, व्यवसाय हे पण करत असते. असे असूनही, घरातले सगळे जण हिला “टेकन फॉर ग्रंटेड” म्हणून घेत असतात. घरातलं सैपाक पाणी / आवराआवर / मुलांचे डबे भरणे / मुलांची शाळेची तयारी / किराणा आणणे / भाजी बाजार आणि सगळी अवांतर कामे, ह्या सगळ्या तिच्याच जबाबदाऱ्या असतात. ती घरात असतांना सगळे जण, हे कुठे आहे / ते कुठे आहे / हे दे / ते दे, असा तगादा तिच्या मागे लावत असतात. सकाळी ऑफिसला जातांना मोबाईलसकट सगळे साहित्य आपल्या हातात यावे अशी नवऱ्याची बायकोकडून अपेक्षा असते. मग नोकरीला जाणाऱ्या स्त्रीने नवऱ्याकडून अशी अपेक्षा का करू नये.
मनवा : मुलगा आणि सून दोघेही ऑफिस ला निघतांना डबा, पाणी, मोबाईल असे सगळे त्यांच्या हातात देणारे सासू / सासरे कुणाच्या बघण्यात आहेत का?
मी : कधी ऐकण्यात नाही. किंवा कुठल्या टीव्ही सिरीयल मधे पण नाहीत
मनवा : किती नवरे घरी जातांना बायकोकरता प्रेमानी गजरा घेऊन जातात / बायको ऑफिस मधून आल्यावर तिच्या ऑफिस च्या कामाबद्दल चौकशी करतात / तू दमली असशील, जरा गाणी वगैरे ऐक, मी चहा करतो / कुकर लावतो / वगैरे, असे म्हणतात. कितीजण तिला सैपाकघरातून तिचा हात धरून सोफ्यापर्यंत घेऊन जातात आणि प्रेमानी खाली बसवतात? आणि हातात चहाचा कप देतात! उत्तर येईल बोटावर मोजण्याइतपतच. आपण केलेल्या कामाचं कौतुक व्हावं, असं सगळ्यांनाच वाटत असतं. आजची डब्यातली पालक – पनीर भाजी एकदम हटके होती, किंवा आज डब्यात पुऱ्या आणि श्रीखंड मुळे मजा आली, एवढं बायकोचं कौतुक पण खरंतर पुरेसं असत. घरातले किती जण असं कौतूक करतात! .
मेघना : किती सासवा सून ऑफिसमधून आल्यानंतर तिच्या हातात खाण्याची डिश देतात / चहा देतात. उत्तर येईल अगदी एखादी.
मनवा : सुनेची विचारपूस करणे / सुनेला मदत करण्याची जेंव्हा गरज असते तेव्हा सासरे त्यांच्या कट्ट्यावर गप्पा मारायला गेलेले असतात किंवा घरात मेडिटेशन करत असतात.
या सगळ्याला अपवादात्मक मंडळी नक्कीच आहेत, किती आहेत, हे मोजायला मात्र आपली हाताची बोटे पुरेशी आहेत.
मी : तुम्ही दोघी म्हणता ते अगदी बरोबर आहे. पण काही बाबतीत, स्त्रियांचे पण चुकत असते. घरातली सगळी कामे स्वतःवर ओढून घेण्याची त्यांची सवय त्यांनी बदलायला पाहिजे. धकाधकीच्या जीवनात आनंदी आणि हेल्दी राहणे पुरुष आणि स्त्रिया या दोघांना पण गरजेचे आहे. आणि याकरता रोज एक ते दीड तास प्रत्येकाने स्वतः करता राखून ठेवलाच पाहिजे.
मनवा : काका, आपने सही फर्मया है. स्त्रियांना जर असा वेळ काढायचा असेल तर घरामधल्या कामाची विभागणी हि करायलाच पाहिजे. आणि त्याकरता कोण काय म्हणेल, याला गौण महत्व द्यायला शिकले पाहिजे.
मेघना : सकाळचा चहा / खाणे, संध्याकाळचे खाणे पिणे, घरातली अवांतर कामे, थोडी आवराआवर, मुलांचे अभ्यास घेणे ह्या कामात सासू सासरे नक्कीच हातभार लावू शकतात. इतर कामे नवऱ्याबरोबर शेअर करता यतात. ध्येय एकच, कि घर चालवण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे आणि मला पण माझ्या हॉबी जपायला, व्यायाम करायला, वगैरे वेळ मिळालाच पाहिजे आणि मी तो मिळवणारच.
मनवा : थोडक्यात काय? तर स्त्रियांनी स्वतःवर प्रेम करणे, याला पहिली प्रायोरिटी दिलीच पाहिजे.
मेघना : आता मजा बघा, स्त्री आणि पुरुष हि नक्कीच दोन वेगळी रसायने आहेत. त्यामुळे एकमेकांना समजण्यात थोडे अंतर पडू शकते. पण घरामधली सासू आणि सून यांचे स्त्री रसायन तर एकच असते. तरीपण कुठल्याही स्त्री च्या मागे सासू हे शीर्षक लागलं, की त्यांचं सून या स्त्री च्या बाबतीत वागणे कां बदलते, सुनेला आपलीच मुलगी असे मनापासून समजून तिच्यावर त्या प्रेम का करत नाहीत? आणि स्त्रीच स्त्रीची दुश्मन कां व्हावी, हे एक न उलगडणारे कोडेच आहे.
मी : मला वाटतं सासू या शब्दामधेच ती मेख आहे. लग्न झाल्यानंतर जर नवऱ्याच्या आईचे सासुऐवजी मावशी असे नामकरण केले, तर हे न उलगडणारे कोडे सहज सुटेल. मावशी या नात्यात एक वेगळेच प्रेम आहे. आपल्याकडे म्हण आहे – माय मरो पण मावशी जगो.
मनवा आणि मेघना : काका, एकदम जालीम उपाय आहे. आम्ही घरी गेल्यावर सासूबाईंना आपल्या गप्पांचा संदर्भ देऊन मावशी म्हणायला सुरुवात करतो.
बाजूला चहा पित उभा असलेला ग्रुप : काका कल्पना आवडली. संध्याकाळी घरी गेल्यावर बायकोला सांगतो, की, आईला आता मावशी म्हणत जा. पुढच्या भेटीत तुम्हाला फीडबॅक देतो.
मेघना : काका, तुम्ही आल्यामुळे गप्पा मस्त रंगल्या, काही छान उपाय पुढे आले, मजा आली. चला आम्हाला ऑफिसला निघायला पाहिजे.
सगळ्यांना बाय केले आणि आम्ही आपापल्या मार्गाला लागलो.
२०२५, २०२६ मध्ये बऱ्याच लेखक, कवी, नाटककार, संगीतकार, गायक यांची जन्मशताब्दी होती आणि काहींची अजून आहे. त्यातील दोघांच्या स्मृती जागविण्याचा मी प्रयत्न केला आहे. एक आहेत नारायण सुर्वे, जन्म १५ ऑक्टोबर १९२६ आणि दुसरे आहेत बाळ कोल्हटकर, जन्म २५ सप्टेंबर १९२६
कुणीतरी एक बाळ रस्त्यावर टाकून देतं, एका पन्नाशी ओलांडलेल्या गिरणी कामगाराला ते दिसतं, तो उचलून घरी आणतो, दोन घास स्वतःला मिळायची मारामार पण त्यातलाच एक घास देऊन पोराला जगवतो, वाढवतो, आपलं नांव देतो. तुम्हाला वाटेल व्वा! अनाथ मुलाला घर मिळालं, माणसं मिळाली. नशीबवान आहे पोर! पण नाही, अजून त्याचे हाल संपले नव्हते. जरा पोर मोठ्ठं होत नाही तोच हा उसना बाप रिटायर होतो. आता खायचं काय? मोठ्ठा प्रश्न आवासून उभा राहतो. मग तो बाप गावाकडे जाऊन रहाण्याचा विचार करतो. आपल्याच पोटापाण्याचं काय नक्की नाही, हे पोर नेऊन काय करायचं? इथं काहीतरी काम करेल पण जगेल, याविचारानं मुलाच्या हातावर १० रुपयाची नोट ठेवतो, आणि म्हणतो, पुढचं आयुष्य कसं जगायचं तुझं तू ठरव. आणि ते पोर पुन्हा एकदा अनाथ होतं. मुंबईच्या अफाट जनसागरात लोटलं जातं. मग काय हॉटेल मधल्या पोऱ्यापासून मिळेल ते काम करून पोटाचं खळगं भरू लागलं. कधी कधी ते ही भरायचं नाही, पण मिळेल तिथलं पाणी होतंच. हाच तो मुलगा पुढे साहित्यिक होणारा नारायण गंगाराम सुर्वे!
नंतर त्यांना गिरणी कामगार म्हणून नोकरी मिळाली, आणि ते कामगार चळवळीशी जोडले गेले. त्यावेळी पत्रकं तयार करणं, ती वाटणं, भाषणे करणं, मतदान कसं करायचं याचं कामगारांना प्रशिक्षण देणं, पोस्टर्स चिकटवणं, ही कामे करताना कामगारांच्या वेदनेने त्यांना कवी बनवलं. त्यामुळे त्यांच्या कवितात कष्टकरी वर्गाची भाषा होती. मारकस बाबा या कवितेत ते आपली कार्ल मार्क्सशी ओळख कशी झाली ते सांगतात. मार्क्स वादाने ते प्रभावित झाले होते. त्याच दरम्यान कामगार वस्तीमधील आपल्या काकांच्या घरी राहणाऱ्या अनाथ मुलीबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले, परिणिती लग्नात झाली.
मुळातच हुशार होते. त्यांनी एका शाळेत शिपाई म्हणून नोकरी धरली. कविता करणं सुरूच होतं. त्यांची पहिली कविता नवयुग मासिकात ‘ डोंगरी शेत माझं गं ‘ प्रसिद्ध झाली. नोकरी करता करता सातवीची परीक्षा पास झाले. अध्यापक प्रमाणपत्र कोर्स पूर्ण केला व त्याच शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले.
त्यांना स्वतःचं पुस्तक काढायचं होतं. पण खिसा कधीच परवानगी द्यायचा नाही. शेवटी पत्नी कृष्णाबाई यांनी गळ्यातलं मंगळसूत्र काढून दिलं आणि पाहिलं पुस्तक ‘ऐसा गा मी ब्रह्मा’ प्रकाशित झालं. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचे १००० रु बक्षिसही मिळाले. त्यामुळे कृष्णाबाई नव्या मंगळसूत्रात मानाने सजल्या. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिलंच नाही. त्यांच्या ‘ माझे विद्यापीठ ‘ ह्या काव्य संग्रहाची अनेक भाषांत भाषांतरे झाली. प्रतिष्ठेचा सोविएत लँड नेहरू पुरस्कार मिळाला. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झाले.
त्यांनी अनेक साहित्य संमेलने गाजवली. काव्य मैफिलीत ते खड्या सुरात कविता म्हणायचे. ‘ मास्तर तुमचंच नाव लिवा ‘ ही त्यांची कविता प्रचंड गाजली. त्यांच्या साहित्यात जीवनानुभव होते. त्यांनी जीवनातील संघर्षाच्या कविता केल्या पण कधीच जातपात, उच्चनीच, ईश्वरवाद, प्रारब्ध यांचा कधीही उल्लेख केला नाही. अशा या वल्लीचा पदपथापासून विद्यापीठापर्यंत व कामगारापासून बुद्धिनिष्ठ समीक्षकापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. शेवटी त्यांच्याच ‘माझे विद्यापीठ’ मधून
ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती
दुकानांचे आडोसे होते, मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती ———
२) दुसरे आहेत नाट्य वेडे म्हणजे अक्षरशः वेडेच, छोटा गडकरी, बाळ कोल्हटकर! एक नाट्यलेखक, कवी, दिग्दर्शक, उत्कृष्ठ कलाकार असे बहुगुणसंपन्न!
लहानपणीच मातृ – पितृ छत्र हरवलं. साताऱ्याला एकत्र कुटुंबात राहणाऱ्या बाळ ने १५ व्या वर्षी नाट्यगृह पाहू न शकलेलं जोहार हे नाटक लिहिलं. नाटकाच्या वेडाने पछाडल्याने घर सोडलं आणि मुंबईचा रस्ता धरला.
ह्या नाती व माणसं सांभाळणाऱ्या अवलियाचाही खारच्या झोपडपट्टीपासून अंबरनाथच्या भूषण बंगल्यापर्यंतचा प्रवास कल्पनातीत आहे.
सुरवातीला तर हा माणूस नाटक लिहायचा, त्यातील गाणी लिहायचा, महत्त्वाची भूमिका स्वतः करायचा, बाकीचे नट शोधायचा, नाटक बसवायचा, वेशभूषा, मेकअप स्वतः करायचा, नाटकासाठी स्टेज मिळवणं, प्रकाशयोजना, स्टेज सजावट सगळी कामं एकहाती करायचे. कारण पैसा नसायचा. अशी एक दोन नाहीत तर ३० पेक्षा जास्त नाटके त्यांनी लिहिली. सुरवातीला साधी कौटुंबिक नाटके होती. त्यांचे विषय, प्रेमविवाह त्याला विरोध, मुलांच्या शिक्षणात आर्थिक अडचणी, मुलीचं लग्न, सासर माहेर यातली ओढाताण
असे सामान्यांचे प्रश्न घेतले होते. त्यांचे काव्यात्मक संवाद, सुभाषित वजा वाक्ये अशी की टाळ्यांचा कडकडाट झाल्याशिवाय राहायचा नाही. त्यांना प्रेक्षकांची नस सापडली होती. पडदा उघडल्यावर घराला छोटे फाटक, बाहेर टाकलेली खाट, पाय धुवायला छोटी मोरी, दारात रांगोळी, तुळशी वृंदावन, त्यासमोर तेवणारी पणती, मनाच्या श्लोकाचे पडसाद इतकं प्रभावी, पवित्र वातावरण बघूनच प्रेक्षक भरवून जायचे. प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या घरी किंवा आपल्या आसपास घटना घडताहेत असंच वाटायचं. इतकी नाटकातल्या पात्रांशी जवळीक निर्माण व्हायची. त्याचे संवाद इतके प्रभावी, संवेदनशील असायचे की प्रेक्षक नाट्यगृहात ढसाढसा रडताना, मनमोकळं हसताना दिसायचे. त्यांच्या काही नाटकांवर, कथानकांवर खूप टीकाही झाल्या, पण त्यांची नाटके प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. दुरितांचे तिमिर जावो, वाहतोही दुर्वांची जुडी, मुंबईची माणसं, एखाद्याचे नशीब या नाटकांचे तर १०००ते २००० प्रयोग झाले.
त्यांनी काही वेगळे प्रयोगही केले. देव दीनाघरी धावला, या नाटकातून कृष्ण व सुदामा यांच्यातील निःस्वार्थ मैत्री दाखवतात. त्या काळातील राजकारणावरही भाष्य करतात. सीमेवरून परत जा, या नाटकात अलेक्झांडर व पौरस यांच्यातील संघर्ष मांडला आहे. त्यातून देशप्रेम, संघटन यांचे महत्व प्रतीत होते. उघडले स्वर्गाचे दार यात वशिष्ठ व विश्वामित्र यांच्यात राजर्षी की महर्षी म्हणावे यातून झालेला बौद्धिक वाद आहे. त्यांची नाटके व्यावसायिक असली तरी प्रत्येक नाटक काही मूल्यं अधोरेखित करतं.
त्यांची गेय काव्य लिहिण्याची हातोटीही वाखाणण्याजोगी आहे. काही गाजलेली गाणी, आई तुझी आठवण येते, मलयगिरीचा चंदन गंधित, निघाले आज तिकडच्या घरी, ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, तू जपून टाक पाऊल जरा इत्यादी.
त्यांना शिक्षणात, शाळेत फारसा रस नव्हताच पण नशीब चांगले की याच शाळेत त्यांना शां. गो. गुप्ते यांच्यासारखे नाटककार शिक्षक म्हणून लाभले. पण खरं सांगू, मला असं वाटतं हे जर नाटक वेड नसतं तर यांनी सहज ३० एक कादंबऱ्या, ३० एक कथासंग्रह, ३० एक कवितासंग्रह सहज प्रसिद्ध केले असते, इतका अफाट कल्पनासंग्रह, भाषेवर प्रभुत्व, लेखनासाठी लागणारे बारीक सारीक तपशील, लिखाणात सातत्यता त्यांच्याकडे होती. नाही, पण मग हा इतका विविध विषयांवरील नाटकांचा खजिना आपल्याला कसा मिळाला असता?
☆ एक ‘बेल्जियन’ गुपित – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆
एक ‘बेल्जियन’ गुपित – – –
पुरणयंत्राची रंजक कहाणी – –
बाहेर रणरणतं ऊन पडलंय आणि स्वयंपाकघरातून खमंग हरभऱ्याच्या डाळीचा आणि गुळाचा सुवास घरभर दरवळतोय. आजी एका लाकडी पाटावर बसून, समोर एक स्टीलचं चक्र असलेलं यंत्र घेऊन वेगाने हात फिरवतेय. वरून डाळ टाकली की खालून अगदी मऊशार, लोण्यासारखं पुरण बाहेर पडतंय. “हे यंत्र आलं आणि आमचं मरण चुकलं गं, ” असं म्हणत आजी कपाळावरचा घाम पुसते. पण तिला किंवा आपल्यालाही हे ठाऊक नसतं की, ज्याला आपण अगदी ‘आपलं’ मानतो, ते पुरणयंत्र खरं तर सातासमुद्रापारून आलेला परका पाहुणा आहे.
****
ऐका तर, ही गोष्ट सुरू होते आजपासून साधारण १०० वर्षांपूर्वी, बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रुसेल्समध्ये. वर्ष होतं १९२८. व्हिक्टर सायमन नावाचा एक गृहस्थ आपल्या किचनमध्ये बसून काहीतरी विचार करत होता. युरोपमध्ये त्या काळी भाज्या उकडून त्या हाताने स्मॅश करणं किंवा त्याचं सूप बनवण्यासाठी त्या गाळून घेणं हे खूप जिकिरीचं काम होतं. व्हिक्टरला वाटलं, हे रोजचं काम सोपं करण्यासाठी काहीतरी जुगाड करायला हवा.
त्याने एक गोल भांडं तयार केलं, ज्याच्या तळाला छिद्र असलेली जाळी होती आणि वरून फिरवण्यासाठी एक हँडल असलेला फिरता ब्लेड. याला त्याने नाव दिलं ‘फूड मिल’ (Food Mill). बेल्जियमच्या त्या छोट्याशा प्रयोगशाळेत जन्मलेलं हे यंत्र पुढे जगभर प्रवास करेल, असं व्हिक्टरला स्वप्नातही वाटलं नसेल.
****
आता इथे एक जबरदस्त ट्विस्ट आहे. हे यंत्र युरोपमध्ये बटाटे स्मॅश करण्यासाठी किंवा टोमॅटो प्युरी करण्यासाठी वापरलं जाऊ लागलं. पण जेव्हा हे यंत्र भारतात, विशेषतः महाराष्ट्रात पोहोचलं, तेव्हा आमचा खाद्यसंस्कृतीचा वारसा इतका तगडा होता की आम्ही त्या यंत्राचा चेहरामोहराच बदलून टाकला.
बघा काय होतं, महाराष्ट्रात पुरणपोळी म्हणजे सणासुदीचा राजा. पण ते पुरण पाटा-वरवंट्यावर वाटणं म्हणजे बाईच्या जिवाचं अक्षरशः पाणी व्हायचं. तो जड वरवंटा तासनतास फिरवून हात गळून जायचे. पण जेव्हा हे ‘फूड मिल’ भारतात आलं, तेव्हा कुणा एका कल्पक महाराष्ट्रीयन माणसाने ओळखलं की, अरे, हे तर आपलं पुरण बारीक करायचं हुकमी अस्त्र आहे!
आणि मग काय? ज्या यंत्राचा जन्म बटाटे स्मॅश करण्यासाठी झाला होता, त्याला आम्ही ‘पुरणयंत्र’ हे नाव देऊन आपल्या स्वयंपाकघरात मानाचं स्थान दिलं. एका संस्कृतीचं यंत्र दुसऱ्या संस्कृतीत इतक्या सहजपणे कसं सामावून घेतलं जातं, याचं हे उत्तम उदाहरण आहे. आज आपल्याला वाटतं की पुरणयंत्र हे आपल्या मातीतलं आहे, पण त्याचा शोध मात्र ब्रुसेल्सच्या व्हिक्टर सायमनने लावला होता.
****
ही गोष्ट इथेच संपत नाही. थांब, अजून पुढे ऐका. आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला ‘देशी’ वाटतात, पण त्या आहेत विदेशी. दाण्याचं कूट करायचं ते छोटं मशीन आठवतंय? लाल किंवा पांढऱ्या रंगाचं, वरून दाणे टाकले की खालून कूट पडणारं. हे मशीन सुद्धा युरोपातूनच आलं. खलबत्त्यात दाणे कुटताना होणारा तो आवाज आणि श्रम या मशीनमुळे वाचले.
भाजलेले शेंगदाणे कुटण्याच्या त्रासातून सुटका करण्यासाठी हे युरोपियन तंत्रज्ञान आपल्या मदतीला धावून आलं. आपण फक्त ते आपलं करून घेतलं. खरं तर हीच आपली म्हणजे माणसांची खासियत आहे. जगातलं जे जे चांगलं आणि सोयीचं आहे, ते आपण आपल्या संस्कृतीत असं काही मिसळून घेतो की काही काळाने ते परकं राहतच नाही.
****
आज जेव्हा आपण पुरणयंत्राचं हँडल फिरवून झटपट पुरण काढतो, तेव्हा त्यामागे व्हिक्टर सायमनची ती १९२८ सालची रचना असते. पाटा-वरवंट्याची जागा या यंत्राने घेतली आणि कष्ट कमी झाले. पण गंमत बघा, यंत्र परकं असलं तरी त्यातून बाहेर पडणाऱ्या पुरणाची चव आणि त्यामागचं प्रेम मात्र अगदी अस्सल मराठीच राहिलं. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पुरणपोळीचा घास घ्याल, तेव्हा त्या मऊशार पुरणामागे लपलेला बेल्जियमचा तो व्हिक्टर सायमन आठवल्याशिवाय राहणार नाही. आपल्या रोजच्या जगण्यात अशा कितीतरी गोष्टी असतील ज्यांची मुळं सातासमुद्रापार आहेत, पण त्या आता आपल्या कुटुंबाचा हिस्सा बनल्या आहेत.
कधी विचार केलाय का, आपल्या स्वयंपाकघरातलं अजून असं कोणतं गुपित आहे, जे स्वतःची खरी ओळख लपवून बसलं असेल?
****
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “जगातले सर्वात श्रीमंत मुख्याध्यापक…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆
“सरू, चाळीस वर्षं… तब्बल चाळीस वर्षं रक्ताचं पाणी केलं ग मी या पोरांसाठी! स्वतःच्या लेकरावाणी जपलं एकेकाला. पण आज माझा शाळेतला शेवटचा दिवस होता. निरोप समारंभ तर सोडाच, पण एकानेही साधं १ रुपयाचं गुलाबाचं फूलही दिलं नाही ग. मी काय कमी पडलो होतो का ग शिकवायला? का आजकालच्या पोरांच्या काळजात पाझरच उरला नाही? “
देसाई सर सोफ्यावर बसून लहान मुलासारखे धाय मोकलून रडत होते आणि त्यांची बायको त्यांना निमूटपणे सावरत होती.
देसाई सर… जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक. शिस्तीचे पक्के, पण मनाने मेणासारखे मऊ. हातातल्या छडीचा मार आणि डोळ्यातलं प्रेम, दोन्हीही विद्यार्थ्यांनी अनुभवलं होतं. आज ३१ मार्च. देसाई सरांच्या रिटायरमेंटचा (सेवानिवृत्तीचा) दिवस.
सकाळपासून देसाई सर आरशासमोर उभे राहून तयारी करत होते. त्यांनी आपली जुना पण कडक इस्त्री केलेला पांढरा शुभ्र शर्ट आणि खाकी पॅन्ट घातली होती. मनात एक वेगळीच हुरहुर होती.
“आज नक्कीच शाळेत मोठा कार्यक्रम असेल. सगळी जुनी पोरं येतील, भाषणांवर भाषणं होतील, गळ्यात हारांचे ओझे असेल… ” या विचारानेच त्यांचे डोळे पाणावले होते.
सर शाळेत पोहोचले. पण हे काय? शाळेचं फाटक उघडंच होतं, पण तिथे ना फुलांची सजावट होती, ना मंडप टाकला होता. पटांगण सुनं सुनं होतं. सर ऑफिसमध्ये गेले.
सहकारी शिक्षकांनी “गुड मॉर्निंग सर” म्हटलं आणि आपापल्या कामाला लागले. शिपाई रामूकाकासुद्धा नेहमीसारखेच चहा घेऊन आले.
दुपार झाली, शाळा सुटायची वेळ झाली. पण काहीच हालचाल नाही. शेवटची घंटा वाजली. मुलं दप्तरं घेऊन पळाली. शिक्षकांनी रजिस्टरवर सह्या केल्या आणि “सर, येतो आम्ही, निवांत भेटा आता, ” असं रुक्षपणे म्हणून निघून गेले.
देसाई सर आपल्या खुर्चीतून उठले. त्यांनी त्या रिकाम्या वर्गांकडे पाहिलं. भिंतीवरचे फळे, ती बाकडी… सगळं काही शांत होतं. त्यांच्या गळ्यात हुंदका दाटून आला. ‘ज्या शाळेला मी मंदिर मानलं, तिथे आज माझ्या जाण्याने कुणालाच काही फरक पडत नाही? ‘
जड पावलांनी, मान खाली घालून सर शाळेबाहेर पडले. रस्ताभर त्यांना लोकांचे चेहरा बघवत नव्हते. त्यांना वाटत होतं, आपण आयुष्यभर फुकट राबलो. कुणालाच कदर नाही.
घरी येताना त्यांच्या डोक्यात एकच विचार चक्रावून गेला – ‘कर्ज’.
०देसाई सरांनी मुलीच्या लग्नासाठी आणि घराच्या दुरुस्तीसाठी बँकेतून ५ लाखांचे कर्ज काढले होते.
पेन्शनमधून अर्धे पैसे जाणार होते. म्हातारपण कसं जाईल, या चिंतेने त्यांना ग्रासलं होतं. पण त्याहीपेक्षा जास्त दुःख होतं ते ‘उपेक्षेचं’.
घरी आल्यावर त्यांनी पत्नीसमोर मन मोकळं केलं आणि रडू लागले. तेवढ्यात दारावरची बेल वाजली.
सरांनी डोळे पुसले आणि दार उघडलं. समोर पोस्टमन उभा होता.
“देसाई साहेब, बँकेतून पत्र आलंय. अर्जंट आहे, सही करा. “
सरांच्या पोटात गोळा आला. ‘नक्कीच कर्जाच्या हप्त्याची नोटीस असेल. रिटायर झालो नाही, तोच बँकेने तगादा लावला, ‘ असं वाटून त्यांनी थरथरत्या हाताने पाकीट घेतलं.
ते सोफ्यावर बसले आणि त्यांनी पाकीट फोडलं. आत बँकेचं अधिकृत पत्र आणि एक दुमडलेला कागद होता.
सरांनी बँकेचं पत्र वाचायला सुरुवात केली आणि… वाचता वाचता त्यांचे डोळे विस्फारले. त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्यांनी चष्मा पुसून पुन्हा वाचलं.
त्यात स्पष्ट लिहिलं होतं – “श्री. देसाई सर, तुमचे घराचे ५, ००, ००० (पाच लाख) रुपयांचे गृहकर्ज आज दिनांक ३१ मार्च रोजी पूर्णपणे परतफेड (Nil/Closed) करण्यात आले आहे. आता बँकेची तुमच्यावर कोणतीही देणी बाकी नाहीत. “
सर गोंधळले. “हे कसं शक्य आहे? मी तर पैसे भरलेच नाहीत. “
त्यांनी तो सोबतचा दुसरा कागद उघडला. ते एक हाताने लिहिलेलं पत्र होतं.
पत्र:
“आदरणीय देसाई सर,
आम्हाला माहीत आहे, आज तुम्ही शाळेतून रिकाम्या हाताने आणि जड अंतःकरणाने घरी गेलात. तुम्हाला वाटलं असेल की तुमच्या विद्यार्थ्यांची आठवणशक्ती कमी झाली आहे. पण सर, तुमची शिकवण आम्ही विसरलो नाही.
आम्ही सर्वांनी (तुमच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी आणि सहकारी शिक्षकांनी) मिळून ठरवलं होतं की, तुम्हाला हार-तुरे, शाल-श्रीफळ आणि पेढे देऊन तुमचा सत्कार करायचा नाही. त्या हार-फुलांची किंमत दोन दिवसात कोमेजून जाते.
त्याऐवजी आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून ‘गुप्त वर्गणी’ जमा करत होतो. त्यात आम्हां विद्यार्थ्यांसोबत शाळेतल्या सगळ्या शिक्षकांनी, शिपायांनी आणि मुख्य म्हणजे तुमच्या मार्गदर्शनाखाली मोठमोठ्या पदावर असलेल्या तुमच्या माजी विद्यार्थ्यांनी तर खूप मदत केली. आम्हाला माहीत होतं की तुमच्या डोक्यावर कर्जाचं ओझे आहे आणि निवृत्तीनंतर तुम्हाला त्याची काळजी सतावणार आहे.
म्हणून, तुमच्या निवृत्तीच्या दिवशी, आम्ही तुम्हाला ‘ताणमुक्त’ आयुष्य भेट देत आहोत.
सर, तुम्ही आम्हाला घडवलंत, आता तुमचं म्हातारपण सुखात जावं, हीच आमची खरी गुरुदक्षिणा!
तुमच्यावर प्रेम करणारी… तुमची ‘कृतघ्न’ वाटलेली पोरं! “
पत्राखाली शेकडो विद्यार्थ्यांच्या सह्या होत्या.
देसाई सर स्तब्ध झाले. त्यांच्या हातातून कागद गळून पडला.
तेवढ्यात घराबाहेर “देसाई सर आगे बढो, हम तुम्हारे साथ है! ” अशा घोषणा ऐकू आल्या.
सरांनी खिडकीतून बाहेर पाहिलं. संपूर्ण गल्लीत त्यांचे शेकडो विद्यार्थी, शिक्षक आणि गावकरी उभे होते. कुणी ढोल वाजवत होतं, तर कुणी डोळ्यात पाणी आणून बघत होतं.
देसाई सर धावत बाहेर आले. त्यांनी कोणा एकाला नाही, तर समोरच्या गर्दीला हात जोडले आणि गुडघे टेकून जमिनीवर डोकं ठेवलं.
त्यांच्या डोळ्यातून आज दुःख नाही, तर अपार कृतज्ञतेचे अश्रू वाहत होते.
त्यांना उमजलं होतं – ‘माणसं जोडली की पैसा गौण ठरतो. हार गळ्यात नाही, तर लोकांच्या हृदयात असावा लागतो. ‘
आज देसाई सर जगातले सर्वात श्रीमंत मुख्याध्यापक होते.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : शोभा जोशी
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मराठी भाषा समुद्रापलीकडे जावी यासाठी काय करावे? ☆ सौ राधिका भांडारकर ☆
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि समस्त मराठी मनामनात आनंदाचा सागर उचंबळला. वास्तविक हा मनामनातला आनंद मायमराठी बद्दलच्या अभिमानाचेच प्रतीक आहे पण नुसता भाषेचा अभिमान, अस्मिता बाळगणं पुरेसं नाही तर आपल्या भाषेला जागतिक दर्जा मिळवून देण्याचं प्रत्येक मातृभाषिकाचं कर्तव्य आहे. जगात कितीतरी परकीय भाषा बोलल्या जातात, अभ्यासल्या जातात, मग जगाच्या कानाकोपऱ्यात सातासमुद्रापलीकडेही आपली मराठी भाषा त्याच आत्मियतेने अथवा औत्स्युक्याने, त्यातलं सौंदर्य, संस्कृती, परंपरा जाणून, आपल्या अफाट ग्रंथसंपदेचा मान राखून का अभ्यासली जाऊ नये? आज अनेक मराठी कुटुंबातील मुले परदेशी स्थायिक आहेत. तिथे जन्माला येणाऱ्या मुलांना मराठी भाषा ही त्यांची ही मूळ मातृभाषा आहे याची जाणीव करून देणे हे त्यांच्या पालकांचं कर्तव्य आहे. त्यांच्या शैक्षणिक कालावधीमध्ये परदेशी भाषेला पर्याय नसला तरी जिथे आपलं मूळ आहे त्या भाषेचं ज्ञान असायला हवं याची जाणीव जरी करून देता आली तरी मराठी भाषेसाठी चाललेली चळवळ अर्धी जिंकलो असं म्हणायला हरकत नाही.
तिसऱ्या पिढीशी आपला संवाद जुळला पाहिजे आपल्याच नातवंडांशी आपल्याला बोलता यावं, त्यांच्याशी गप्पा गोष्टी, गमती जमती सांगता, करता याव्यात म्हणून मराठी मातृभाषेची ओळख आणि त्यातून आवड निर्माण करण्याची गरज ही मागच्या पिढीकडून अपेक्षित आहे,
माझ्या नाती माझ्याशी मराठीत बोलू शकतात याचं मला कौतुकच नाही पण अभिमानही वाटतो. त्यांच्या सुट्टीच्या काळात मी त्यांना आंतरजालावर वर्णमाला, बाराखडी, शब्दांची ओळख, जोडाक्षरे आणि वाक्यं लिहायला आणि ओळखायला शिकवली, त्यांना मराठी आलंच पाहिजे हा माझा दुराग्रह नक्कीच नव्हता पण एका सुंदर, आणि त्यांचं मातृमूळ असलेल्या भाषेशी त्यांचं नातं जुळावं म्हणून माझा खटाटोप होता आणि तो नक्कीच यशस्वी झाला. हळूहळू मी त्यांना काही बडबड गीते काही बालगीते शिकवली, भारतातून पुस्तके पाठवली. त्यांनी तर ती वाचलीच पण या मराठी भाषेचे कौतुक त्यांनी त्यांच्या सवंगड्यांपर्यंत पोहोचवले. हे काही थोडकं आहे का?
आज तिथे शनिवार रविवारी काही मराठी संघटनाच्या माध्यमातून अथवा खाजगीरित्या काही तास मराठीचे वर्ग घेतले जातात आणि अशा वर्गात आपल्या मुलांना पालक मराठी भाषेचं जतन व्हावं म्हणून आपुलकीने पाठवतात. तिथे मराठी शब्दांचे उच्चार, पाठांतर, श्लोक पठण, प्रार्थना या माध्यमातून मराठी भाषा शिकवली जाते.
अगदी अलीकडेच एका समारंभात एका मराठी कुटुंबातल्या परंतु जन्माने अमेरिकन असलेल्या तेरा वर्षीय मुलाने शिवरायाचा पोवाडा अस्खलितपणे सादर केला तेव्हा सभागृहातील समस्त मराठी समुदायाने त्याला उभे राहून मानाचा मुजरा दिला.
।ईये मराठीचिये नगरी अवतरली जणू अटकेपार सागरी।।
तिथल्या संपन्न वाचनालयात गेल्यानंतर एका विभागात मला सुप्रसिद्ध मराठी लेखकांची पुस्तके दिसली आणि माझं मन एकदम भरून आलं पण त्यांची अल्पसंख्या पाहून मात्र थोडसं वाईटही वाटलं. हा विभाग इथल्या वाचकांसाठी अधिक समृद्ध करायला हवा त्यासाठी मराठी साहित्य संपदेचा इथे जाणीवपूर्वक भरणा झाला तर मराठी पुस्तकांसाठी एक चांगला वाचक वर्ग तयार होईल.
एक विचार माझ्या मनात आला की इथे जशी ठिकठिकाणी धार्मिक श्रद्धास्थाने मंदिरे आढळतात तशी भाषिक वाचनालये का असू नयेत इथल्या मराठी भाषिकांनी एखादं समृद्ध संपन्न मराठी वाङ्मयाचेच स्वतंत्र वाचनालय सुरू करणे मुळेच अशक्य नाही. शेवटी भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी आवश्यक असते ती दर्जेदार सातत्याने होणारी साहित्य निर्मिती आणि मोठा वाचक वर्ग. ही जागरूकता असेल तर भाषा का विझेल? ती निरंतर, चिरंतन राहील. चला तर मग सागरापलीकडे रुजवूया हे रोप मराठी भाषेचे.
अनेक वर्षांपासून ऑस्टिन, टेक्सास, USA येथे वास्तव्य.
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असून, सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमधील कामाचा २५ वर्षांचा अनुभव. सध्या सेमीकंडक्टर चीप डिझाईन कंपनीमध्ये सिनियर प्रिंसिपल पदावर कार्यरत.
या व्यतिरिक्त मराठी आणि इंग्रजी लेख, कविता अशा लेखनाबरोबरच मराठी नाटकात प्रमूख भूमिका, संगीत कार्यक्रमांचे सूत्रसंचालन आणि कवितांवर आधारित कार्यक्रम यातही सक्रिय. त्याचबरोबर गिरिभ्रमणाचीही आवड.
✦ मराठी माझ्या घरी… ✦ प्राजक्ता नरवणे ☆
☆
माझे नवीन नवीन लग्न झाले तेंव्हाची गोष्ट, २५ वर्षापूर्वीची! पुण्यात नवर्याबरोबर त्याच्या एका नातेवाईकांकडे गेले होते. मला सगळेच नवीन होते. तेथे एक ८-९ वर्षाचा मुलगा खाकी चड्डी आणि बनियन घालून “सकाळ” वाचीत बसला होता. मी सहजच त्याला विचारले, “कुठल्या शाळेत जातोस? ” त्याने पटकन कुठल्याश्या शाळेचे नाव सांगितले आणि म्हणाला, “ही शाळा कॅलिफोर्नियात आहे. ” मी तीनताड उडाले आणि आपल्या मुलाला नुसते मराठी बोलायलाच नाही तर वाचायलाही शिकवणार्या त्याच्या NRI पालकांना मनातल्या मनात शतश: दंडवत घातले! तेव्हा मीही नवर्याच्या मागे मागे देशांतराची तयारी चालवली होती, त्यामुळे या प्रसंगानंतर मी ही ठरवले की माझ्या मुलांनाही असेच मराठी येत असेल!
पुढे सिंगापूरला स्थायिक झाल्यावर आम्हाला एक गोंडससा मुलगा (आपला तो बाब्या) झाला. त्याला आम्ही प्रेमाने “डामू” म्हणायचो… “डामरट मुलगा! “. हा डामू ७ महिन्यांचा असताना आम्ही त्याला घेऊन चीनला माझ्या आत्येभावाकडे गेलो होतो. हे आमचे यजमान कुटुंब अमेरिकेचे नागरिक, पण नोकरीच्या निमित्ताने २ वर्षांसाठी चीनमधे आले होते. त्यांची २ मुले साधारण ८ ते १२ वयोगटातील.. पण घरात छान मराठीत बोलायचे. इमारतीमधील इतर गोर्या मुलांशी झकास अमेरीकन उच्चारासकट इंग्रजी बोलायचे आणि बाजारात चिनी दुकानदारांशी अस्खलित चिनी भाषेत बोलायची. ते पाहून वाटले की मुलांची नवीन काही शिकण्याची क्षमता जबरदस्त असते हे खरेच, आणि म्हणून याच वयात आम्ही “डामू” ला ही वेगवेगळ्या भाषांचा परिचय करून दिला पाहिजे!
डामूच्या जन्माआधीपासूनच आम्ही दोघे घरात मराठीतच बोलायचो, तसेच त्याच्या बरोबरही मराठीतच बोलायला लागलो. कधी कोणी प्रश्न विचारला की “अग पण मग याला बाहेर गेल्यावर “प्रोब्लेम” येईल. ” पण म्हंटलं, “नाही तरी तो बाहेर म्हणजे कुठे शाळेतच जाणार ना.. मग तिथे तो शिकेल आपल्या आपण इंग्रजी. पण त्याची मराठीची शाळा फक्त घरच असणार आहे. “
या आमच्या विचारधारणेची पहिली कसोटी लागली ती तो १८ महिन्यांचा असताना त्याला पाळणाघरात घातले तेंव्हा! त्याला इंग्रजीचा फारसा गंध नव्हता. मला थोडीशी चिंता वाटत होती हा कसा तिथे रुळेल? त्याला जर इंग्रजीमधे शिक्षिका काय म्हणत आहेत हे कळले नाही तर त्यांना सांगायला याला धड बोलतही येत नाही. अजून आईलाही नुसता “ई” म्हणून हाक मारतो. पण माझा विश्वास सार्थ ठरला. काही दिवसातच तो तिथे इतका रुळला की थोडे बोलता येऊ लागताच तो आमच्याशी मराठीत आणि तिथे मस्त इंग्रजी + मलय + चीनी अशा खिचडीसदृश्य “सिंगलीश” मधे बोलायला लागला. घरात मराठी हे नकळत्या वयात मनात जिरले. बळजबरी करावी लागली नाही. उलट एकदा त्यानेच माझी एक वाईट खोड पकडली. मी त्याला कशावरून तरी प्रचंड रागावत असताना त्याने थंडपणे विचारले, “तू इंग्लिश मध्ये का रागवतेस”?
जसजसा डामू मोठा होत गेला तसतसा त्याची मराठी आणि इंग्रजीही सुधारत गेली. नवीन मराठी शब्द शिकण्याची इच्छा प्रबळ होत गेली आणि मुख्य गोष्ट म्हणजे आता “आपण मराठी बोलतो” याचा त्याला अभिमान आहे. पण या अभिमानाने माझी एकदा मोठी गोची झाली! सिंगापूर महाराष्ट्र मंडळाच्या मी काम करत असलेल्या “रात्र थोडी सोंगे फार” या नाटकाचे दिग्दर्शक होते गुजराथी. पण बरेच वर्ष मुंबईमधे काढल्याने त्यांना छान मराठी कळायचे. पण आता अनेक वर्ष सिंगापूरमधे काढल्याने त्यांचा मराठी बोलण्याचा सराव तुटला होता. त्यामुळे ते आमच्याशी हिंदी किंवा इंग्रजीमधे बोलायचे. डामू नेहमी माझ्या बरोबर नाटकाच्या तालमीला यायचा. एक दिवस हे वय वर्षे ७ चे कार्टे सरळ आमच्या दिग्दर्शकांना म्हणाले, ” हे महाराष्ट्र मंडळ आहे. इथे सगळ्यांनी मराठीमधेच बोलायचं! ” खुद्द दिग्दर्शकांना असे म्हटल्या मुळे मला धरणी दुभंगून पोटात घेईल का असे वाटू लागले. पण आमच्या मोठ्या मनाच्या दिग्दर्शकांनी मोठ्याने हसून त्याच्याशी मराठीमधेच बोलायला सुरुवात केली! यातील विनोद बाजूला.. पण मुलांच्या मनात मराठीबद्दल अभिमान उत्पन्न होणे महत्वाचे!
इथे परदेशात स्वत:चे मराठी राखताना आणि मुलाचे वाढवताना एक मर्यादा जाणवते ती म्हणजे इथे मराठी ऐकायला मिळणाच्या संधीची! आपली पिढी भारतात वाढताना आपण घरीदारी, शाळेत, बाजारात, मंदिरात, अगदी कट्ट्यावर सुद्धा मराठी शिकलो. पण इथे घर हाच फक्त मराठी कानावर पडण्याचा स्त्रोत आहे. त्यामुळे घरात वापरात येणारे शब्दच फक्त आपल्या शब्द्कोशात राहात आहेत. त्यावर थोडासा उपाय म्हणून आम्ही शरण गेलो, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या “पु. ल. देशपांडे” यांना. आमच्या गाडीमध्ये डामू लहान असल्यापासून पु. लं चे अभिवाचन सतत लागलेले असायचे आणि असते. आम्ही कधीच त्याच्यासाठी इंग्रजी बालकविता लावल्या नाहीत. लावली तर मराठी बडबड गीते. पण सतत “पु. ल. देशपांडे” ऐकून ऐकून त्याच्या मराठीचा दर्जा सुधारला. आजही महाविद्यालयात येणाऱ्या ताणावर रामबाण उपाय म्हणून तो “पु. ल. देशपांडे” ऐकतो.
तो चौथीत असताना आम्ही ऑस्टिनला स्थलांतरित झालो. पुढच्याच वर्षी त्याने “सांगा सांगा शब्द सांगा” या मराठी मंडळाच्या लहान मुलांसाठीच्या प्रश्नमंजुषेचे सराईतपणे मराठीत सूत्रसंचालन केले. त्याचे मराठी बोलणे, उच्चार ऐकून काही लोकं स्वतःच निष्कर्ष काढू लागले, “हां, बरोबर आहे. तो सिंगापूरला होता ना! ” आम्ही बुचकुळ्यात पडायचो कारण सिंगापूरची मराठी लोकसंख्या ऑस्टिनच्या मराठी लोकसंख्येपेक्षाही कमी आहे. आमच्या मते हे स्थळाचे नसून, इच्छाशक्तीचे आणि देशोदेशी पसरलेल्या मराठी मंडळांसारख्या व्यासपीठांचे फळ आहे. स्थळाचा फायदा थोडाफार झाला असेल तर तो त्याला देवनागरी लिपी शिकवायला. पण इथेही मराठी शाळेचे माध्यम उपलब्ध आहे.
मराठीबद्दल प्रेम निर्माण झाल्यावर पुढची पायरी म्हणजे मराठी वाचनाची गोडी. सिंगापूरच्या पहिल्या ४ वर्षांच्या त्याच्या शालेय अभ्यासक्रमातील ‘हिंदी’ या विषयामुळे देवनागरी लिपीची ओळख त्याला होतीच, तीच पुढे मराठीमधील सुंदर साहित्य वाचायला डामूला उपयोगी पडली. आजकाल अधूनमधून मला पिंटरेस्ट वरील मराठी कविता येत असतात. सुटीला घरी आल्यावर ग. दि मा. , शांताबाई, बहिणाई, इंदिरा संत यांच्या कविता आम्ही दोघे मिळून वाचत असतो. आम्हाला म्हणतो, आपण आता फक्त शुद्ध मराठीत बोलायचं, मराठी वाक्यात एकही इंग्रजी शब्द न वापरण्याचा “पण” करायचा. पण हा पण सांभाळता सांभाळता सगळ्यांच्या तोंडाला फेफरे येते.
२२ वर्षांपूर्वी सुरु झालेला हा ‘हसत खेळत “मराठी माझ्या घरी”’ चा प्रयोग आता सुफळ संपूर्ण झाल्याची पावती आम्हाला गेले दोन वर्ष निर्विवाद मिळत आहे.
कोलंबिया युनिव्हर्सिटी मधील “मातृभाषा दिनाच्या” निमित्ताने डामू जेव्हा मी केलेल्या कविता सर्वांसमोर अस्खलित मराठीमध्ये सादर करतो तेव्हा असे वाटते की ज्या मराठीला माऊलींनी प्रत्यक्ष भगवतगीता भाषांतरीत करून पावन केले, तिचा गुंजारव जर असाच अनेक येणार्या पिढ्यानपिढ्या निनादत ठेवायचा असेल, तर प्रत्येक मराठी माणसाने आपल्या अंतरंगातील तिच्या प्रेमाचा झरा कधीही आटू देऊ नये. त्यात जर कधी प्रतिष्ठेचा, निष्क्रियतेचा किंवा इतर कुठल्याही गोष्टीचा गाळ साठत असेल तर तो वेळोवेळी बाजूला करून तो प्रवाह अगदी खळखळून वाहू दिला पाहिजे.