मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “अ न मोल…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? जीवनरंग ?

☆ “अ न मोल…” ☆ श्री मंगेश मधुकर

रात्री नऊच्या सुमारास फोन वाजला. पलीकडून आवाज “साहेब, नमस्कार”

“नमस्कार!! कोण? ”

“मी अनमोल, आपला जुना परिचित, स्मरणात आहे का? ”

“आहे तर, वा वा, बऱ्याच दिवसांनी.. ”

“आपली तीव्रतेनं आठवण आली म्हणून फोन केला. रागावू नका. ”

“अजिबात नाही. उलट आठवणीनं फोन केल्याबद्दल छान वाटलं”

“आपलं आरोग्य कसंयं”

“उत्तम, तुझं”

“चांगलयं. नियतीनं संधी दिली तर भेट होईल. धन्यवाद!! शुभ रात्री” एवढं बोलून फोन कट. थोडं विचित्र वाटलं पण अनमोल असाच आहे.

त्याची पहिली भेट आठवली. खूप महिन्यांपूर्वी आमच्या कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून भरती झाला. गोल चेहरा, बारीक कापलेले केस, शिडशिडीत बांधा, उंचापूरा, लांब नाक, मोठाले डोळे आणि किंचित हसरा चेहरा असलेल्या अनमोलला भेटल्यावर काही विशेष वाटलं नाही पण जेव्हा त्यानं बोलायला सुरवात केली तेव्हा वेगळेपण जाणवलं. तो बोलीभाषेत न बोलता पुस्तकी बोलायचा. काम नीट करण्याविषयी सांगितल्यावर ताबडतोब विनम्रपणे नमस्कार करत तो म्हणाला“आपणास तक्रार करण्याची संधी मिळणार नाही याची पुरेपूर आणि शक्य ती काळजी घेईन. फक्त लोभ असू द्या. यथाशक्ती उत्तम प्रयत्न करीन. ” खरं सांगायचं तर मला त्याचं वागणं आणि बोलणं नाटकी वाटलं.

“गुड, ऑल द बेस्ट” मी शेकहँडसाठी हात पुढे केल्यावर नमस्कार करत म्हणाला “धन्यवाद”.

अनमोलचं व्यक्तिमत्व, वागणं, काम आणि बोलणं यात प्रचंड विरोधाभास होता. केवळ वाचलेले जड जड मराठी शब्द तो बोलताना सर्रास वापरायचा आणि तेच ऐकायला विचित्र वाटत होतं. इंग्रजी शब्द मात्र कटाक्षानं टाळायचा. कुणी ‘गुड मॉर्निंग’ म्हटलं की ‘आपला दिवस सुखकर जावो”असा प्रतिसाद द्यायचा. जरा हटके बोलण्यामुळं साहजिकच कंपनीत अनमोल चर्चेचा आणि चेष्टेचा विषय झाला. अनेकजण मुद्दाम त्याच्याशी बोलून मजा घ्यायचे. हे कळत असूनही अनमोलनं बोलण्याची पद्धत बदलली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर अतिसौजन्यानं वागणारा अनमोल कामाच्या बाबतीत एकदम ढिला. कायम मोबाइल नाहीतर वाचत बसलेला. कामाकडे फारसं लक्ष नसल्यानं वारंवार चुका व्हायला लागल्या तेव्हा पुन्हा पुन्हा समज दिली परंतु काही फरक पडला नाही म्हणून सिक्युरिटी मॅनेजरला कळवल्यावर दुसऱ्याच दिवशी अनमोल भेटायला आला. “खूप व्यस्त तर नाही ना. काहीसं बोलायचं होतं”

“आता नको. उद्या बोलू. महत्वाचं काम चालूयं”

“व्यत्यया बद्दल क्षमा असावी. माझ्याकडून कामात कुचराई झाली. अक्षम्य चुका झाल्या म्हणून तुम्ही दबाव टाकलात”

“कसला दबाव? काहीही काय बोलतोयेस. ”

“आमच्या व्यवस्थापकांनी सांगितलं की तुम्ही नाराज आहात. ”

“तुझ्या कामात सुधारणा हवी एवढंच सांगितलं. दबाव बिबाव काही नाही. बाबा रे, चुकीचे शब्द वापरू नकोस. फार वेगळे अर्थ निघतात. असलं काही बोलण्यापेक्षा कामाकडे लक्ष दे. नाहीतर… ”मी पुढचं मुद्दामच बोललो नाही.

“जसा आपला आदेश, मनपूर्वक आभार आणि धन्यवाद”

“एक मिनिट, फक्त काम नीट कर एवढंच सांगितलंय. आदेश वगैरे काही दिलेला नाही. कळलं”माझा आवाज वाढला तेव्हा अनमोलचा चेहरा पडला. नमस्कार करून निघून गेला. मी कामात हरवलो.

 

संध्याकाळी घरी जाताना कळलं की दुपारीच अनमोल नोकरी सोडून गेला. धक्काच बसला. अनमोल असं काही वागेल असं अजिबात वाटलं नव्हतं. एकदम नोकरी सोडण्याइतकं काहीच घडलं नव्हतं. फोन केला पण त्यानं उचलला नाही. पुन्हा प्रयत्न केला तेव्हा फोन स्वीच ऑफ. त्यानं आपल्यामुळे नोकरी सोडली याचं वाईट वाटलं. भेटून समजावं असं वाटलं पण प्रयत्न करूनही भेट झाली नाही तेव्हा मीदेखील नाद सोडला. दोन महिन्यानंतर एका पुस्तक प्रदर्शनात अचानक अनमोल भेटला.

“अरे, भल्या माणसा, तुला किती फोन केले पण एकदाही उत्तर दिलं नाहीस. इतका रागावलास. ” 

“मी व्यर्थ कशाला रागवेल. घरच्यांचा अतीव आग्रह, दबाव आणि चांगला पगार म्हणून ते काम स्वीकारलं. इच्छेविरुद्ध काम म्हणजे मनाला जाच. आता पुस्तकांच्या दुकानात काम करतोय. हे आमचंच प्रदर्शन आहे. इथं पगार कमी असला तरी काम आवडीचं आहे. माझ्यासाठी ते जास्त महत्वाचं. ”

“तू कामावर परत ये. मॅनेजरशी बोलतो”

“आपण दाखविलेल्या आपुलकीबद्दल धन्यवाद!! मला जीवनाचा मार्ग सापडलायं. ”

“म्हणजे”

“कायम पुस्तकांच्या सानिध्ध्यात रहायचं म्हणून या दुकानात काम करतोय. खजिन्याची चावी हातात आलीय असं समजा. वेगवेगळी पुस्तकं पहायला, हाताळायला, वाचायला मिळतात आणि पगारसुद्धा मिळतो सुख म्हणजे अजून काय असतं. ”

“नाहीतरी तुला वाचनाची आवड आहेच. ”

“आवड नाही वेड म्हणा. ”

“ते कसं”

“वडिलांची कृपा!! मजुरी करणारे वडील चौथीपर्यंत शिकले. इच्छा असूनही पुढं शिकता आलं नाही पण त्यांना वाचायचा नाद. रोज पेपर विकत घेऊन वाचायचे. वडिलांना पाहून मलाही वाचनाचा नाद लागला. माझी आवड समजल्यावर वडील रद्दीतून जुनी पुस्तकं आणून द्यायचे. कोणताही विषय वर्ज्य नव्हता. वाचत गेलो. त्यांच्या अपेक्षा होत्या पण माझं अभ्यासात फार डोकं चाललं नाही. कसाबसा दहावी पास झालो. आमच्याकडं पिढीजात गरीबी, आजूबाजूची परिस्थिती भयावह. भांडणं, मारामाऱ्या, शिव्या हे नित्याचच. परिस्थितीत फार सुधारणा झाली नसली तरी वाचनामुळं माझ्यात लक्षणीय बदल झाला. विचार सुधारले आणि बोलणं तर मी ठरवून बदललं अर्थातच त्यासाठी वाचनाचा खूप फायदा झाला. ”

“अच्छा म्हणजे मुद्दाम तू… ”

“म्हणून तर दखल घेतली जाते. गर्दीत आपलं अस्तित्व दाखवायचं असेल तर वेगळेपणा पाहिजेच”

“हुशारेस, फार पुढे जाशील” 

“आपल्यासारख्यांचा आशीर्वाद आहे म्हटल्यावर काळजी नाही. पुन्हा नक्की भेटू यात. पुस्तकं जरूर घ्या. तुम्हांला विशेष सवलत द्यायला मालकांना आग्रह करतो. धन्यवाद!! ”अनमोलच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडत होता. निरोप घेऊन तो आपल्या कामाला गेला.

“बाबा, इज ही नॉर्मल”माझ्या मुलानं विचारलं.

“हंड्रेड पर्सेंट”

“मग असं का बोलत होते. ”अनमोलविषयी सविस्तर सांगितल्यावर मुलगा म्हणाला. “लकी मॅन”

“ काम तर सगळेच करतात. पैसे, प्रतिष्ठा मिळवतात. आवड मनाच्या खोल कप्प्यात बंद करून भलतंच काम करत राहतात. अनमोलच्या स्टाईल मध्ये बोलायचं तर आवडीचं कामच उदरनिर्वाहाचं साधन असणं यासारखे परमसुख नाही. प्रत्येकाच्या नशिबात हे नसतं. त्याबाबतीत हा खरंच सुदैवी. नावाप्रमाणेच अ न मोल.

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘आयेचा फोटु…’ ☆ शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

?जीवनरंग ?

☆ ‘आयेचा फोटु…’ ☆ शांभवी मंगेश जोशी 

सकाळी झाडू मारायला गेली, तेव्हा 705 मधल्या मॅडमनी इडल्या दिल्या होत्या. रखमानी त्या तेलावर परतून त्यावर तिखट-मीठ भुरभुरून सदाला दिल्या. सदा खूष झाला. नाष्ट्याचं काम झालं.

दोन-तीन दिवसांपासून त्याचं सारखं चालू होतं ‘मोबाईल पायजे’. माजा समदा अभ्यास त्याच्यावरच असतुया. रखमाला काही कळंना. पैसे कुठून आणावं त्या मोबाईलसाठी. पर अभ्यास त्यावर असतो म्हणतुया. रखमानं परोपरानं त्याला समजावलं. दिवाळी पत्तुर दम धर. दिवाळी मिळंल त्यातनं बघते.

पण त्याला काही पटत नव्हतं. त्याची आदळ-आपट अन् अबोला, यामुळं रखमा मनातून कष्टी होती. रोज कुणी काही शिळं पाकं द्यायचं त्यावरच दोघांचं भागायचं. आज दुपारी त्याला ताजी भाकर करून द्यावी, लेकराला जरा बरं वाटंल असं ठरवून रखमा पुढच्या कामाला गेली. सारी सोसायटी झाडायची म्हणजे तिला बराच वेळ व्हायचा. पण आज रविवार. शाळेची सुट्टी. त्यामुळे आज तिनं भाजी-भाकरीचा बेत ठरवला होता.

कामावरून येतांना भाजीला पाच रुपयांचा पाला घेऊन आली. भराभरा पाला फोडणीला घातला. भाकरी थापली न् सदाला हाक मारली. ‘‘ये रं पोरा. ज्यवायला ये. ताजी भाकर केलिया तुझ्यासाठी. माझ्या सोताच्या हातानं. आपल्या घरात. ये माझ्या राजा. ’’

सदानं हू, की चू केलं नाही. जेवायलाही आला नाही. रखमानं उठून पाहिलं, तर फुरगंटून बसला होता. तिच्याकडं बघायलाही तयार नव्हता. रखमानं लाख मिनतवार्‍या केल्या, पण तो काही बधला नाही. शेवटी तणतणत पाय आपटत खोपटातनं निघून गेला.

रखमाच्या काळजाचं पाणी-पाणी झालं. कधी नव्हं ते घरला ताजी भाकरी केली. लेकरासाठी. पण त्यां ती शिळीच केली. शिळी करून बी खायचं नाव नाही. रखमानं डोळ्याला पदर लावला. तिच्या तरी घशाखाली घास कसा उतरणार? त्या दिवशी दोघंही उपाशीच झोपले. रखमाला त्या भाकरीकडं पाहून राहून राहून दुःखाचे कढ येत होते. पोरासाठी जीव तुटत होता. त्याचा बाप गेल्यापासून रखमानं तळहाताच्या फोडासारखा जपला होता पण पैश्याची सोंगं ती कुठून आणणार? पोरगं हट्टापायी जिवाला त्रास करून घेतंय म्हणून तिला वाईट वाटायचं. आज तर अबोलाच धरून बसला होता.

दुसर्‍या दिवशी शाळेत गेला तोही उपाशीच. आला तो ओरडतच. ‘‘आये, मपले शाळेचे कपडे धून ठीव. उद्याच्याला कारेक्रम हाय शाळत. ’’

‘‘कसला रं? ’’

‘‘मला न्हाय म्हाइत. पर गांधीबाबाचं काय तरी हाय! ’’ पर कापडं चमकून ठीव झाक. दोन ऑक्टोबरचं स्वच्छता अभियान होतं शाळेत. बरं बरं म्हणून रखमा उठलीच. कालचा राग सोडून पोरगं दोन शब्द बोललं म्हणून रखमा हुरळून गेली. तिनं डाळ-भात शिजवला. त्यानंही मुकाट्यानं खाल्ला. रखमाचा जीव भांड्यात पडला.

दुसर्‍या दिवशी दुपारी चार वाजता रखमा समोरची सोसायटी झाडून आली तर सदा धावत आला. ‘‘चल शाळेत चल. लौकर चल’’ असं म्हणून ओढतच तिला शाळेत घेऊन गेला. अंगावरच्या मळक्या पातळातच तिला ओढून शाळेत घेऊन गेला.

शाळेत सगळी पोरं पटांगण साफ करत होते. मास्तर लोकही पोरांना सांगून साफसफाई करून घेत होते. पाहुणे, पुढारी आलेले होते.

सदानी आईला मास्तरांसमोर उभं केलं. रखमाचा जीव लाजेनं कांडकोंडा झाला. मास्तरांनाही कळंना. कोण आहे ही? कशाला आली आहे?

त्यांनी सदाला विचारलं, ‘‘काय रे सदा, कोण आहेत ह्या? कशाला आणलंस त्यांना? ’’

‘‘मास्तर, मपली आय हाय ती. ’’

‘‘कशाला आणलंस शाळेत आईला? आज पालकांना नाही बोलावलेलं. ’’

‘‘मास्तर का न्हाय बोलावलं मपल्या आयेला आज? आज तिचा खरा मान हाये. म्हून म्या आणलंय तिला फोटू काढाया. ’’

‘‘काय? कसला मान? कसला फोटू? ’’

‘‘आज शाळेत स्वच्छता… (अभियान) चालू हाय ना? त्यासाठी आणलंय आयला. त्या फोटुग्राफरला सांगा आयेचा फोटो काढाया लावा त्येंना. ’’

लाज-शरमेनं रखमाचा जीव पाणी पाणी झाला. ‘‘हत् येड्या. मपला कसला फोटु? येडा का खुळा? सोड मला. जाऊं दे घरला. अजून सारी सोसायची झाडायची हाय मागली. ’’

न्हाय-न्हाय, मी तुला जाऊन देणार न्हाय. रोज सारा जनमभर झाडत असतीया. मंग तुझाच फोटु काढाय पायजे. हे सगळे काय रोज झाडतात का कधी? तुझ्यावाणी? नुसता हातात झाडू घेऊन फोटु काढत्याती अन् पेपरात देतात.

सूज्ञ प्रेस फोटोग्राफरला इथं काही तरी बातमी दिसली. त्यानी लगेच रखमाच्या हातात झाडू दिला अन् तिचा फोटो काढला.

दुसर्‍याच दिवशी झाडझूड करताना आमदार साहेबांच्या फोटोशेजारी रखमाचाही फोटो छापला होता. ‘विशेष’ मधे. खाली लिहिलं होतं- ‘‘सत्कार्यासाठी फोटो – अन् फोटो हेच सत्कार्य’’

शाळेतही नोटीस बोर्डवर तो पेपर लावला होता. सदानं धारिष्ट्यानं सरांना तो पेपर मागितला. सरांनी शाळा सुटल्यावर सदाला तो पेपर दिला. सार्‍या वस्तीत तो पेपर दाखवत सदा धावत सुटला. ‘‘मपल्या आयेचा फोटु पेपरात. बघा-बघा आयेचा फोटु. मपल्या आयेचा फोटु. ’’

हसता-हसता डोळे पुसून रखमाचा पदर ओला झाला.

© शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, shambhavijoshi76@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अद्वैत… भाग – २ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? जीवनरंग ?

☆ अद्वैत… भाग – २ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

(नकळतच तिने आपले दोन्ही ओठ अंमळ विलग केले. मुलीने त्यात ओतलेले गंगाजलाचे थेंब तिच्या तोंडात गेले. तरीही ते थेंब घशातून गिळायचे त्राण काही तिच्यात शिल्लक नव्हते. आता आपल्या या देहाच्याने झाली तर केवळ एखादीच हालचाल होऊ शकेल याची कल्पना तिला आली.) 

इथून पुढे – – 

जीवाच्या करारावर मोठ्या कष्टाने तिने आपले डोळे उघडायचा प्रयत्न केला तिने. डोळे संपूर्ण तर उघडवेच ना तिला. मोठ्या मुश्किलीने तिने आपले डोळे किलकिले केले. अंधुकपणे का होईना पण तिला समोर लेक, सून, नातू आणि मुलगा दिसले – पण तेही क्षणभरच; दुसऱ्याच क्षणी तुला आपल्या नाभीत काही विचित्र संवेदना जाणवली आणि एकदम हलके हलके जाणवायला लागले. तिने आपले लक्ष्य क्षणभरासाठी जडददेहावर केंद्रित केले.

आता ना तिचे श्वसन होत होते ना इतर काही हालचाल; तिचा रजतरज्जू देखील तिच्या जडदेहापासून पूर्ण विलग झाला होता.

त्याच्या सूक्ष्मदेहाजवळ तिचा सूक्ष्म देह पोहोचला.

‘आ ऽऽऽऽऽ ई ऽऽऽऽऽ, ’ संपूर्ण खोली सगळ्यांच्या वियोग विलापाने आक्रोशून उठली.

‘इथे नको आता, देवघरात जाऊ, ’ त्याच्या सूक्ष्मदेहाची स्पंदने तिला जाणवली. आता तिच्या बरोबरच त्याचा सूक्ष्मदेहातही जांभळट छटा पसरू लागली होती. ‘नाही म्हटले तरी आपल्या अपत्यांचा दुःखाचा आक्रोश विचलित करणारच ना! 

विचारहीन अवस्थेन दोघेही देवघरात संक्रमित झाले. लेकरांच्या टाहो मुळे दोघांच्याही विचारात अंमळ नैराश्य आले आणि त्यांच्या सूक्ष्मदेहावर निळसर छटा झाकोळू लागली.

‘संपलं, ’ क्षणभरात सावरल्याने तिचा सूक्ष्मदेह पुन्हा नारिंगी झाला.

‘काय संपलं?’ त्याचाही सूक्ष्मदेह पुनरपि पूर्ववत झाला.

‘या इहलोकीचे लागेबांधे संपले; आप्तेष्टांचे तर संपलेच, आता आपली ओळख सांगणाऱ्या त्या नश्वर देहाचे देखील संपले. आता जो काय कालखंड या सूक्ष्मपातळीवर काढायचा तेवढाच, ’ तिच्या विचारातील स्पष्टपणा त्याला जाणवू लागला.

‘मुलांवरची माया… ’ तो जरासा चकितच झाला.

‘तेव्हा तू मला – आम्हाला सगळ्यांना सोडून गेलास आणि मला जीवनाचे फार मोठे तत्वज्ञान शिकवून गेलास, तिचा सूक्ष्मदेह आता विलक्षण तोजोम्य झाल्याचे त्याला जाणवले. ‘नश्वर देहात आहोत तोपर्यंत सगळे आपले किंवा परके ; आणि आपण सगळ्यांचे, नातेसंबंध तेवढ्यापुरताच! त्यानंतर कोण कुठे जाणार कोणालाच ठाऊक नसते. मग कशाला या भावनांमध्ये गुंतवून ठेवायचे!? देह सोडतांना आपल्या भावनाही त्या देहबरोबरच सोडून यावे हेच उचित! क्षणभर मलाही आपल्या मुलाबाळांचा वियोग असह्य झाला होता; पण तो केवळ क्षणभरच! तू गेल्यापासून मी माझ्या मनाला याबाबत वरचेवर पढवत आले आहे. खरं सांगायचं तर तुझी अशी आणि ही भेट अपेक्षितच नव्हती मला. ’

‘नाही रुचली आपली ही भेट तुला?’

‘आता गैरसमज करून घ्यायची वेळ नाही; आणि आपल्यापाशी कदाचित तेवढा वेळाही नसेल, ’ तिच्या विचारांतील स्पष्टता कल्पनतीत होती. ‘आपण एकत्वाचे जिणे जगलो; आणि मी देहात होते तोंवर तरी माझ्या मनात तीच भावना होती. ’

‘मग आता… ?’ त्याचे विचार कंपायमान झाले.

‘आता आपल्या हातात काय आहे याची काहीच कल्पना नाही. ’

‘पण एवढ्यासाठी तर मी इतकी वर्षे या सूक्ष्मपातळीवर अजून तग धरून आहे ना!’ आता मात्र त्याने पुढाकार घ्यायचे ठरविले.

‘ते देखील एक आश्चर्यच म्हणावे लागेल! तरीही मला वाटते की ज्या अर्थी तू या अवस्थेत इतकी वर्षे काढलीस त्या अर्थी तुझ्या सगळ्याच भावनांपासून एव्हाना तू मुक्त झाला असावास. अन्यथा तू पुन्हा कुठे तरी जन्म घेतलाच असतास, ’ तिने आपला कयास त्याच्यासमोर उघड केला.

‘खरे आहे, ’ त्याला पुन्हा हुरूप आला. ‘एक भावना सोडून मी यशस्वीपणे सगळ्या भावनांचा, वासनांचा त्याग करू शकलो. ’

‘कोणती भावना?’ या प्रश्नाची आवश्यकता नाही हे समाजात असून देखील तिच्यातून तो उद्भवलाच.

‘तुझ्यावरचं अमाप प्रेम, ’ त्याचे विचार खूप मुलायम झाले. ‘केवळ त्याच्यावरच मी जीवन जगलो आणि मरणही स्वीकारले. त्यापोटीच माझ्या इतर सगळ्या भावना एक एक करत गळून पडत होत्या. केवळ तुझीच प्रतीक्षा होती. ’

‘प्रतीक्षापूर्ती तर झाली; आता काय विचार आहे?’ 

‘आता आपण वेळ घालवायला नको, ’ आपल्या विचारांच्या मार्गावर ती आपोआपच आल्यामुळे तो जरासा सुखावला. ‘लगेचच पुढची कृती करूयात. ’

‘ती कोणती?’

‘सध्या पलीकडच्याच रस्त्यावर दोन जोडपी आहेत, ’ तो आपली योजना समजावून देऊ लागला. ‘शेजारीच आहेत ते एकमेकांचे. त्यांच्या बायका आता गरोदर आहेत; दोघीनाही पाचवा महिना चालू आहे. आपण त्यांच्या गर्भात शिरुयात. मग पुढच्या जन्मातही आपण पुन्हा एकत्र येऊ शकतो. ’

‘किती गोष्टी गृहीत धरल्या आहेस तू!’ जडदेहात असती तर ती अगदी खळखळून हसली असती. ‘दोघींच्या गर्भधारणा व्यवस्थित पार पडल्या तर आपण जवळजवळ जन्माला येऊ इतकेच! त्यानंतर आपले लग्न होणे किती तरी कौटुंबिक आणि सामाजिक घटकांवर अवलंबून असणार; त्या आपल्या हातात थोड्याच असणार?!’

‘पुढच्या जन्मात तुला माझ्याबरोबरच नाही रहायाचे?’ तिचा हा इतका व्यवहारी प्रतिसाद त्याला अगदीच अनपेक्षित होता.

‘पुन्हा गैरसमज! आपण एकत्वाचे जिणे जगलो ना रे? तुला सोडायचा विचार माझ्यात उद्भवेलच कसा?!’

‘मग असे का म्हणतेस?’

‘इतकी वर्षे तू या सूक्ष्मपातळीवर यशस्वीपणे तग धरून राहिलास, पुढच्या जन्माची आंस न बाळगता, ’ तिच्या सूक्ष्मदेहाला आता एक वेगळेच तेज प्राप्त झाल्याचे त्याला जाणवले. ‘म्हणजे आता तुझी कोणतीही अतृप्त वासना किंवा इच्छा उरलेली नाही. ’

‘केवळ एकच, ’ त्याने प्रांजळपणे कबुली दिली. ‘तुझ्याखेरीज मला दुसरे काहीच नको आहे. ’

‘आता माझा देह तर मागेच राहिला; अन् थोड्या वेळातच तो भस्मसात देखील होईल. ’ तिने पुन्हा त्याला परिस्थितीची जाणीव करून दिली.

‘आपले प्रेम काय केवळ देहापुरतेच मर्यादित होते – किंबहुना आहे? मी देहात असतांना देखील आपण आत्म्याने एकरूपच झालो होतो ना!’

‘हो ना? मग आता पुनर्जन्माची आंस का?’ तिचे विचार पुन्हा मूळपदावर आले. ‘तू म्हणतोस तसा जन्म घेतल्याने पुन्हा जननमरणाच्या फेऱ्यात अडकायचे, जीवनातील सगळे टप्पेटोणपे खायचे, कधी यश पदरी पडेल तर कधी अपयशाला तोंड द्यावे लागेल. पुन्हा नवे संबंध, नवी नाती! कोण केव्हा सोडून जातील सांगता येत नाही. बाकीच्यांचे तर सोडा, आपले काय? पुन्हा आपल्यातील एकजण आधी जाणार. मागे राहिल्याची काय अवस्था होते ते मी गेली काही वर्षे अनुभवते आहे – मरण जगणे म्हणजे काय ते समजले आहे मला. पुन्हा तसले अनुभव नकोत आता – ना मला, ना तुला. ’

तिच्या मुद्द्यांनी तो स्तंभितच झाला.

‘तुझ्या आता दुसऱ्या काही अतृप्त वासना शिल्लक राहिलेल्या नाहीत, माझ्याही नाहीत. त्यामुळे आता काही कर्मपूर्तीसाठी देह धारण करायचा प्रश्नच उद्भवत नाही. केवळ आपण पुन्हा एकत्र यायच्या हव्यासापोटी पुन्हा जन्म घ्यायचे म्हणजे सगळे जीवन पुन्हा जर-तरच्या भोवर्‍यात गटांगळ्या खायच्या!’

‘म्हणजे आता काही वेळानंतर आपण विलग व्हायचे एकमेकांपासून?’ त्याचे तेजोवलय पुन्हा काळवंडू लागले. ‘इतकी वर्षे तुझ्या प्रतीक्षेत सूक्ष्मपातळीवर ताटकळत राहिलो ते सगळे फोल जाणार?’

‘नाही रे राजा, ’ तिने त्याला उभारी द्यायचा प्रयत्न केला. ‘तथापि आपल्या एकत्र येण्यासाठी आता मला कोणत्याही प्रकारची अनिश्चितता नको आहे; किंवा त्यानंतर पुन्हा असे वियोगाचे जिणे नको आहे. जे काही निर्णय घ्यायचे ते पूर्ण विचारांतीच!’

‘म्हणजे काय करायचे?’ त्याचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता.

‘आपली आत्मीयता केवळ देहांवर नव्हतीच – नाहीच; बरोबर? देह हे केवळ एकत्र येण्यासाठी एक साधन. आत्ता आपल्या दोघांचेही देह नसून देखील आपल्या आपलेपणात कुठे तरी कमतरता जाणवते आहे का आपल्यातील कोणालाही; नाही ना?’ तिला काहीही प्रतीविचार न देता केवळ विचारग्रहण करायचे ठरविले त्याने. ‘मग पुन्हा अवतरण करायच्या ऐवजी उद्धरण का करू नये!?’

‘म्हणजे नक्की काय करायचे आपण?’ तो पूर्णतः भांबावून गेला.

‘सूक्ष्मदेह, जडदेह, आणि आनंददेह या देहाच्या तीन अवस्था आहेत ना!’ आता ती अधिक मोकळी होऊ लागली. तिचे तेजोवलय विलक्षण तेजाने झळकू लागले. ‘सूक्ष्मदेहातून पुनरपि जडदेहात जायचे, पुनश्च जननमरणाच्या फेऱ्यात अडकायचे हे अवतरणच नव्हे तर काय! त्यापेक्षा काही वासना नसतांनाच सूक्ष्मदेहातून आनंददेहाकडे गेलो तर जीवनाच्या अनिश्चिततेपासून सुटका नाही का होणार?’

‘म्हणजे आता आपला शाश्वत वियोग होणार?’ भावनांच्या हिंदोळ्यांवर स्वतःला कसे सावरायचे हेच त्याला उमगेना. त्याच्या तेजोवलयाचे स्वरूप क्षणाक्षणाला बदलत होते.

‘नाही रे; समजून तर घे मला, ’ आता तिला त्याच्या प्रतीविचाराची आवश्यकता वाटेना. ‘या सूक्ष्मदेहातच आपण एकत्र होऊ. हे आपले शाश्वत अद्वैत असेल. अशा अद्वैतातच आपण आनंददेहात प्रवेश करू; तात्पुरताच! त्यानंतर आपण थेट ब्रह्मतत्वाकडे झेपावूयात ना! मग आपल्याला कोणीच विलग करू शकणार नाही. हेच शाश्वत अद्वैत आहे आपले!’

आणि विलक्षण समाधानाने, तृप्तीने त्याचा सूक्ष्मदेह पुन्हा झळाळू लागला.

‘ये’

‘त्याचे विचार जाणवतच, दुसऱ्याच क्षणी तिचा सूक्ष्मदेह त्याच्या सूक्ष्मदेहाच्या दिशेने सरकला. त्या दोन सूक्ष्मदेहाचे मीलन झाले; दोघांनाही वासनाविरहित एकत्वाची अनुभूती आली. आता कोणतीच इच्छा शेष नाही या भावनेने तत्क्षणी त्यांच्या अद्वैती सूक्ष्मदेहाचे आनंददेहात परिवर्तन झाले

अन् दुसऱ्याच क्षणी अद्वैत पावलेला तो आनंददेह निर्विकारपणे ब्रह्मतत्वाकडे झेपावला – अद्वैताच्या शाश्वत आनंदप्राप्तीसाठी – मुक्तीसाठी – मोक्षासाठी !

समाप्त –

कवी : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

एरंडवणे, पुणे ४११००४, मो- ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अद्वैत… भाग – १ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? जीवनरंग ?

☆ अद्वैत… भाग – १☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

‘अजून मोह संपत नाहीत?’

शब्दांची जाणीव झाली आणि ग्लानीमध्ये तिच्या डोळ्यावर आलेली झापड अंमळ ओसरल्यासारखी झाली.

‘कोण बोलले हे?’ तिच्या तोंडून शब्दफुटणे तर शक्यच नव्हते; मनातच विचार आला अन् होता होईल तितके डोळे किलकिले करून तिने आजूबाजूला पाहायचा प्रयत्न केला.

तिच्या देखभालीसाठी ठेवलेली रुग्णसेविका खोलीतल्याच दुसऱ्या शेजेवर शांत झोपली होती. तिथे दुसरे कोणी नव्हतेच. मुलगी देखील शेजारच्या खोलीत झोपली असणार! खोलीत अगदीच अंधार नको, थोडातरी उजेड असावा म्हणून लावलेला मिणमिणता दिवा खोलीत जी काही जाग ठेवत होता तेवढीच! बाकी खोली अगदीच सुमसाम होती.

‘मग कोण बोलले हे?’ पुन्हा तिच्या मनातील विचारांनी जीभेपर्यंत जायचा केविलवाणा प्रयत्न केला; पण आता या अवस्थेत तिची सगळीच इंद्रिये काहीही कार्य करण्याच्या पार पलीकडे गेली होती. तो विचार तिच्या मनातल्या मनातच रुंजी घालू लागला.

‘मीच ग; विसरलीस मला?’ आणि तिला जाणवले की हे शब्द नाहीत, विचार आहेत.

‘तू?’ तिच्या विचारांना आता काहीतरी दिशा सापडली; पण दिसत तर काहीच नव्हते. आता तर डोळे किलकिले करणे देखील शक्य होत नव्हते. ‘तुला जाऊन तर…… ’

‘काही वर्षे झाली, असंच ना?’ 

पुन्हा तिच्या अंतर्मनाला जाणीव झाली.

‘हो!’

‘पण मला नाही जाववत तुला सोडून. ’ 

‘कुठे आहेस तू?’ विचार जाणवले आणि त्या बेभान अवस्थेतही ती अंतर्यामी हादरली. ‘मला दिसत कसा नाहीस?’ 

‘दिसेन कसा ग वेडे? मला आता देह कुठे आहे?

‘मग?’ तिच्या मनातील गोंधळ वाढतच होता.

‘अशी गोंधळून जाऊ नकोस; आणि तुझ्या डोळ्यांनी मला पाहायचा निष्फळ प्रयत्नही करू नकोस. तुझ्या समोरच्याच भिंतीवर चार फुट वरती तुझे आज्ञाचक्र केंद्रित कर. ’

‘पण कसे?’ ती आणखीनच बुचकळ्यात पडली. ‘मला तर जागेवर देखील हलता येत नाही. ’

‘तू अजिबात हळू नकोस; अन् ते तुला शक्यही होणार नाही. तू फक्त तुझे लक्ष्य मी सांगितले तिथे केंद्रित कर. ’

आता तिच्या लक्ष्यात आले, हे शब्द नाहीत, विचार आहेत. आपल्या मनातले विचार त्याला समजतायत. म्हणजे हे केवळ विचारसंक्रमण! 

क्षणार्धात तिने आपले ध्यान समोरच्या भिंतीवर लावले; अन् तिला तिथे जाणवले एक केशरी तेजाचे वलय.

‘आता तरी ओळखलंस?’ विचार त्या तेजोवलयापासूनच येत आहेत याची तिला जाणीव झाली.

‘तुला कसं रे विसरेन मी?! तू तर माझं आयुष्य होतास, सर्वस्व होतास – अजूनही आहेस!’ अचानक तिच्या विचारात देखील भावनांचे कढ भरून आले.

‘हो ग राणी, मला कल्पना आहे त्याची, ’ त्या तेजोवालयात किंचीतशी नारिंगी छटा तिला जाणवली. ‘पण आता काही वर्षे झाली………… ‘

‘तरीही अजूनही तूच आहेस माझ्या अंतर्यामी, ’ हळूहळू आपण तरंगतोय असे तिला जाणवायला लागले; अन् क्षणार्धात आपण त्या तेजोवालायाच्या अगदी समीप पोहोचल्याची जाणीव तिला झाली. नकळतच तिने खाटेकडे लक्ष नेले. तिचा देह तिच्या खाटेवर निपचित पडला होता; मोठ्या कष्टाने जी काय श्वासोच्छवासासाठी छातीची हालचाल होत होती तेवढीच! 

अन् तिला जाणवले की आपल्या सूक्ष्म देहाने आपण जडदेहातून बाहेर पडून त्याच्या सूक्ष्म देहाजवळ आलो आहोत. मात्र तिला त्या जडदेहाकडे अधिक वेळ बघवेना. तिने आपले अंतर्चक्षु त्याच्या सूक्ष्मदेहाकडे वळवले.

‘अजून मोहापासून मुक्ती मिळत नाही ना?’ त्याचे विचार पुन्हा तिला जाणवले. ‘जरा तुझ्या देहाकडे पहा; तुझा रजतरज्जू किती क्षीण झालाय पहा. बहुतेक सगळा काळाच पडलाय; जेमतेम एखाददुसराच धागा तग धरून आहे आता. ’

‘कळतय मला ते सगळ; आता किती काळ राहिलंय या देहाचा भोग देव जाणे!’ 

‘पण मोह सुटत नाही ना?!’

‘कसला मोह?’ 

‘या देहाचा, जगण्याचा, मुलांचा, घराचा, सगळ्या सगळ्याचा, ‘ त्याने त्याच्या प्रश्नात अधिक सुस्पष्टता आणली.

‘खर सांगते, विश्वास ठेव माझ्यावर; तू आम्हाला सोडून गेलास तेव्हापासून कशातच मन रमत नाही माझं, ’ तिच्या विचारातील कातरता त्याच्या सूक्ष्मदेहाला जाणवायला लागली. ‘तुझ्या पाठोपाठ खरतर लगेचच मला ही यायचे होते. पण तू काही जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवून गेला होतास ना; माझ्याकडून मृत्युशय्येवर असतांना वचन घेतले होतेस की त्या जबाबदाऱ्या पूर्ण करेपर्यंत तग धरून राहशील म्हणून. ’

‘काय करणार ग मी तरी? अचानकच काळाने माझा घास घेतला, ’ त्याचे विचार पुनश्च भूतकाळात गेले. ‘मुलाला नोकरी लागायची होती. तरी त्याने माझ्या कडे पाहून लग्न तरी केले. अजून नातवंड घरात यायची होती. मुलीलाही उजवायाचे होते. ही सगळी माझी कर्मे होती. पण काळापुढे कोणाचे काय चालते! मग हे सगळे तुझ्याखेरीज दुसऱ्या कोणाला सांगू शकणार होतो मी हक्काने?’ 

‘कल्पना होती मला साऱ्याची, ’ त्याच्या सूक्ष्म देहाला ग्रासू पाहणारी जांभळट छटा तिला जाणवू लागली. ‘ती सगळी कर्तव्ये मी पूर्ण केली. आता का असा निराश होतोस?’

‘निराश नाही ग, ’ जांभळटपण जाऊन त्याचा सूक्ष्मदेह पुनरपि नारिंगी झाला. ‘घराच्या जबाबदाऱ्यांबरोबरच तू जे काही समाजकार्य करत होतीस त्याने मी अभिमानाने फुलून येत होतो. तू निवृत्त झाली होतीस तरी देखील तुझ्या ज्ञानाचा तू समाजाला अविरत फायदा करून देत होतीस. ’

‘ज्ञान हे देण्यासाठीच असते ना!’ तिच्या विचारात देखील संतृप्तता जाणवत होती. ‘गेली काही वर्षे मला विविध संस्थांच्या बैठकींना जाणे प्रकृतीमुळे जमले नाही; पण त्यांच्या शब्दाचा मान ठेवून मी कॉम्प्यूटरवरून त्यांच्या मिटींग्स मध्ये सहभागी होत होते. पण चार महिन्यांपूर्वी मिटिंग चालू असतांना मी घरातच खुर्चीवरून खाली पडले अन् मग मात्र मी अगदी मनाविरुद्ध त्यातून देखील निवृत्त व्हायचा निर्णयघेतला. ’

‘त्या सगळ्यांना तुझ्या सहकाराची जाणीव अजूनही आहे पण, ’ त्याच्या विचारात देखील तिच्याविषयीचा अभिमान तिला जाणवला; ती मोहरून आली. ‘म्हणून तर तू मृत्युशय्येवर असून देखील ते तुला भेटायला वरचेवर येत असतात. ’

‘ते काम आता मी करू शकत नाही याचे वैषम्य मात्र अजूनही आहे, ’ आपल्या कामावरची श्रद्धा तिच्या तेजोवलयात जाणवली.

‘अखेर प्रत्येकाचा कर्मयोग केव्हातरी संपणारच असतो. भगवान श्रीकृष्ण काय किवा प्रभू रामचंद्र काय; अगदी अलीकडच्या इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज काय, त्यांचा कर्मयोग संपल्यावर त्यांना आपापल्या देहाचा निरोप घ्यायला लागलाच ना! संपूर्ण कौरवांना एकट्याने हरविणारा, भगवान शंकरांशी देखील तुल्यबळ युद्ध करणारा अद्वितीय योद्धा अर्जुन त्याचा कर्मयोग संपल्यावर काही गुराख्यांच्याकडून युद्धात हरलाच ना!’ 

‘हो ना! कर्मयोग तर संपलाय, ’ आता तिच्या सूक्ष्मदेहावर अंमळ मरगळ जाणवू लागली. ‘आता असं किती दिवस पडून राहायचंय देव जाणे. ’

‘ते तुझ्यावरच अवलंबून आहे, ’ तो पुन्हा पूर्वपदावर आला. ‘म्हणून तर विचारले अजून मोह सुटत नाही का?’

‘मोह? तो तर केव्हाच संपलाय! केव्हापासून तुझ्याकडे यायला मन आसुसलय. पण काय करणार दिवस तर भरायला हवेत! योग आहेत तोंवर देह सोडून तर चालणार नव्हते, ’ ती आपली बाजू त्याला समजावून सांगू लागली. ‘नाही तर केवळ उरलेले दिवस भरून काढण्यासाठी पुन्हा जन्म घ्यायचा आणि बालवयातच आपल्या मात-पित्याला अपत्यवियोगाचे दुःख देऊन जगाचा निरोप घ्यायचा! म्हणजे पुन्हा पुढच्या जन्माची बेगमी! नाही; या जन्माचे जे भोग आणि योग आहेत ते याच जन्मात भोगून संपवायला हवेत. ’

‘आता तू सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्यांमधून मोकळी झाली आहेस. सामाजिक जबाबदाऱ्या काय कधीच संपत नाहीत. पण आता तुझ्याच्याने नाही होणार काही, अगदी मनात असले तरी देखील, ’ त्याने तिला परिस्थितीची संमिश्र जाणीव करून दिली. ‘जरा तुझ्या रजतरज्जूकडे पहा; किती खंगलाय तो. ’

तिचे लक्ष पुन्हा एकदा रजतरज्जूकडे गेले आणि ती शहारलीच! जेमतेम एखाददुसरा धागा सोडला तर संपूर्ण रजतरज्जू निस्तेजला होता, काळवंडला होता. तिच्यातून पुन्हा एक मोठा थरकाप उठला. आणि तो थरकाप तिच्या जडदेहापर्यंत पसरला.

अंथरुणावर निपचित पडलेल्या तिच्या देहाला अचानक काय झाले? त्या अशा थरथर का कापत आहेत? 

शेजारीच पहुडलेली रुग्णसेविका हडबडून उठली. रुग्णाकडे नजर टाकल्यावर तिला काही चिन्ह बरी वाटेनात. घाईघाईने तिने रुग्णाच्या मुलीला शेजारच्याच खोलीतून बोलावून आणले. मुलीला देखील आता आपली आई काही क्षणांचीच सोबतीण आहे हे जाणवले. मोठ्या त्वरेने तिने आपल्या भावाला आणि वाहिनीला बोलावले आणि देवघरातील गंगाजलाचा कलश घेऊन ती आपल्या आईपाशी आली.

‘आता देहत्याग करायलाच हवा; नाही सोसवत आता हे जिणे, ’ तिचे विचार त्याच्या सूक्ष्मदेहाला जाणवू लागले. ‘मोह तर केव्हाच सुटलाय; पण तरीही आता शेवटचे कर्तव्य म्हणून गंगाजलाचे दोन घोट तोंडात घेते, एकदाच अखेरचे सगळ्यांकडे चर्मचक्षुंनी नजर टाकते आणि येतेच. ’

मोठ्या कष्टाने रजतरज्जू सांभाळत सांभाळत तिच्या सूक्ष्मदेहाने आपल्या जडदेहात प्रवेश केला. बाजेवरच्या देहातला फरक तिच्या मुलीला देखील जाणवला. इतका वेळ अगदी निपचित पडलेल्या देहात थोडीशी धुगधुगी तिला जाणवू लागली.

‘आई, ’ अगदी हलक्या अस्फुट स्वरात मुलीची हाक तिच्या कानावर आली. ‘तोंड उघडतेस?’

नकळतच तिने आपले दोन्ही ओठ अंमळ विलग केले. मुलीने त्यात ओतलेले गंगाजलाचे थेंब तिच्या तोंडात गेले. तरीही ते थेंब घशातून गिळायचे त्राण काही तिच्यात शिल्लक नव्हते. आता आपल्या या देहाच्याने झाली तर केवळ एखादीच हालचाल होऊ शकेल याची कल्पना तिला आली.

– क्रमशः भाग पहिला 

कवी : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १६ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १६ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

पद्मविभूषण श्री दत्तात्रेय उर्फ काकासाहेब कालेलकर यांनी कविवर्य ‘ऋग्वेदी’ यांच्या ‘अभंग गीतांजली’ (टागोर यांच्या ‘गीतांजली’चा मराठी भावानुवाद) साठी लिहिलेल्या प्रस्तावनेतील वेचक भाग आपल्या माहितीसाठी आज प्रस्तुत करीत आहे.

श्री काकासाहेब कालेलकर हे थोर स्वातंत्र्यसेनानी, म. गांधींचे अनुयायी व सहकारी, थोर समाजसेवक, मराठी, गुजराती, हिंदी व इंग्रजी भाषांतील साहित्यिक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, अनेकविद्यापीठांचे कुलगुरू असले तरी तेकविवर्य ‘ऋग्वेदी’ यांचे एके काळचे विद्यार्थी होते व रविंद्रनाथ टागोरांबरोबर शांतिनिकेतन मध्ये राहिले असल्यामुळे त्यांच्यामधील माणूस व कवी यांना जवळून ओळखणारे होते; याच कारणांमुळे त्यांनी ‘ऋग्वेदी’ यांच्या ‘अभंग गीतांजली’स प्रस्तावना लिहिण्याचे मान्य केले असावे.

कालेलकर लिहितात, “गीतांजली मध्ये टागोरांनी परमात्म्याला हृदयापासून साद घातली आहे. आपल्या हृदय सागरात भरती /ओहोटी, लहान मोठ्या लाटांचा महोत्सव अखंड चालूच असतो आणि जोपर्यंत असे आहे तोपर्यंत गीतांजली सारख्या हृदय काव्याची आवश्यकता मनुष्याला असणारच. गीतांजली वाचत असताना आपण काव्यसुख घेत आहोत असा अनुभव येत नाही तर हृदयाला दिव्य आहार मिळत आहे, पौष्टिक रसायन पोहोचत आहे, असे वाटते. म्हणूनच गीतांजली हा ग्रंथ जगाच्या धार्मिक साहित्यात कायमचे स्थान मिळवणार आहे याविषयी शंका नाही. ” 

“रवींद्रनाथांनी मानसशास्त्र आणि समाज शास्त्र यामध्ये खूप खोल उतरून कवित्वाचा एक नवाच आणि कष्टसाध्य असा आदर्श आपल्यापुढे ठेवला आहे. या कवीने भारतीय संस्कृतीच्या अंगप्रत्यंगाचे आकलन केलेले असले पाहिजे. प्रेम भावना आणि धर्म भावना यांचे रहस्य त्याला अवगत असले पाहिजे. कोणत्याही कवी मध्ये अद्भुत वशीकरण विद्या असते. तो परिचित आणि अपरिचित सर्वच लोकांचे हृदय काबीज करतो. आणि जणू कांही त्याची ही मोहिनी विद्या पाहूनच सरस्वती देवी त्याला वाचाशक्तीचे वरदान देते. जो भाव व्यक्त करावयाचा असेल त्याला अनुरूप असे शब्द जणू कांही आपोआप न बोलावता येऊन उभे राहतात. एकही शब्द प्रयत्नपूर्वक आणून बसवला असेल अशी शंका देखील मनात येत नाही. तद्वतच या विभुतीने मनुष्य जीवनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच त्यांच्या वाणीमध्ये आत्मविश्वास, सामर्थ्य आणि व्यापकता आली आहे. टागोरांनी कवित्वाचा एक महान आदर्श जगापुढे मांडला आहे. “

“रवींद्रनाथांची प्रतिभा जितकी स्वतंत्र आहे तितकीच ती आर्य संस्कृतीचे परिपक्व फळ आहे. त्यांच्या लेखात, भाषणात, कवितेत आणि नाटकात हिंदुस्थानातील साहित्याच्या उत्तमांशाची छाप स्पष्ट दिसते. भास, कालिदास यांचा हा कवी वारस आहे, हे ओळखावयास फारसे परिश्रम पडत नाहीत. हिंदुस्थानच्या संत कवींच्या साहित्याचे त्यांनी आकंठ पान केले आहे; याची गीतांजलीतील कोणतेही पद्य साक्ष देऊ शकेल. उपनिषदे, बौद्ध वाङ्मय, वैष्णव संप्रदायाचे साधुसंत आणि महर्षी देवेंद्रनाथ अशा अनेक तत्वज्ञांची छाप रवींद्रनाथांच्या काव्यावर पडलेली दिसते. “

“गीतांजलीत सर्वत्र आर्य भावनाच दिसून येते. गीतांजली ही एक कवी वृत्ती नसून एक सबंध संस्कृतीच आहे. येथून तेथून सर्वत्र ईश्वरभक्ती, ईश्वरनिष्ठा आणि मांगल्याचीच उपासना या कवितांमधून दिसून येते. “

शांतिनिकेतन मध्ये असताना एके दिवशी काकासाहेब त्यांना म्हणाले, ” गुरुदेव, आपल्याकडून काही बोध ऐकावा अशी माझी इच्छा आहे. ” तेव्हा टागोर म्हणाले, “मी कवी आहे. कवीची वृत्ती हीच माझी साधना! मी कोणाचा गुरु होऊ शकत नाही. “

अशा यानिरभिमानी, निरलस, व निरुपाधिक महाकवीस सादर प्रणाम!

—–

☆ गीत : ४९ ☆

YOU came down from your throne and stood at my cottage door.

I was singing all alone in a corner, and the melody caught your ear. You came down 

and stood at my cottage door.

Masters are many in your hall, and songs are sung there at all hours. But the simple carol of this novice struck at your love. One plaintive little strain mingled with the great music of the world, and with a flower for a prize you came down and stopped at my cottage door.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ४९ ☆

गात होतो तुझीच गीते

सूर, लय, ताल काहीच नव्हते

*

होती फक्त भक्तीने ओथंबलेली

म्हणूनच तुला ती इतकी भावली

*

शाही तुझे तख्त सोडून आलास

बावरलो मी, पाहून हसलास

*

पाऊल तुझे माझ्या कुटीत

अडखळलो मी तिथेच ताटीत

*

वाटलं, तुझा यक्ष-किन्नरांचा दरबार

मी गीतसागरातील एक तुषार

*

तुझे सारेच प्रहर गीतांचे

माझे सारे तुझ्याच नादाचे

*

भाग्य थोर, ते तुझ्या कानी पडावे

अन् तू माझ्या झोपडीत यावे

*

एक फूल माझ्या हाती दिलंस

आणि हे तुझं बक्षीस म्हणालास

*

अजून कवटाळतो ते फूल उराशी

अन् तुझी चरणधूळ कपाळाशी

*

– भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—–

☆ गीत : ५० ☆

I HAD gone a-begging from door to door in the village path, when thy golden chariot 

appeared in the distance like a gorgeous dream and I wondered who was this King of all kings! 

My hopes rose high and me thought my evil days were at an end, and I stood waiting for 

alms to be given unasked and for wealth scattered on all sides in the dust.

The chariot stopped where I stood. Thy glance fell on me and thou earnest down with a smile. I felt that the luck of my life had come at last. Then of a sudden thou didst hold out thy right hand and say “What hast thou to give to me?” 

 

Ah, what a kingly jest was it to open thy palm to a beggar to beg! I was confused and 

stood undecided, and then from my wallet I slowly took out the least little grain of corn and gave it to thee.

 

But how great my surprise when at the day’s end I emptied my bag on the floor to find a least little grain of gold among the poor heap. I bitterly wept and wished that I had had the heart to give thee my all.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ५० ☆

भीक मागत होतो दारोदार,

मी एक भिक्षेकरी

सुरेख स्वप्नांसारखा,

दिसला रथ तुझा सोनेरी

*

तू फेकलेल्या सुवर्णमुद्रा,

गोळा करीन म्हणतो

वाईट दिवस सरले,

आशेचे किरण पाहतो

*

अचानक थांबला रथ,

माझ्याच समोर येऊन

त्याचं तेज चमकलं,

नशीब उभं दार उघडून

*
‘ओम् भवती भिक्षां देही’ 

तू म्हणालास हात पसरून

असा कसा हा राजा जगतो 

भिकाऱ्याकडे भीक मागून

*

गोंधळलो मी, झोळीतून चार 

दाणे काढून दिले तुला

आल्यावर केली झोळी रिकामी,

तितकेच सुवर्ण दिलेस तू मला

*
मी रडलो, नाही ओळखले 

तुला कसे मी रे!

देण्यासाठी सर्वस्व होते,

सोने झाले असते की रे!

*

– भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—–

☆ गीत : ५१ ☆

THE night darkened. Our day’s works had been done. We thought that the last guest 

had arrived for the night and the doors in the village were all shut. Only some said, The king was to come. We laughed and said “No, it cannot be!” 

It seemed there were knocks at the door and we said it was nothing but the wind. We put out the lamps and lay down to sleep. Only some said, “It is the messenger!” We 

laughed and said “No, it must be the wind!” 

There came a sound in the dead of the night. We sleepily thought it was the distant 

thunder. The earth shook, the walls rocked, and it troubled us in our sleep. Only some said, it was the sound of wheels. We said in a drowsy murmur, “No, it must be the rumbling of clouds!” 

The night was still dark when the drum sounded. The voice came “Wake up! Delay not! “We pressed our hands on our hearts and shuddered with fear. Some said, “Lo, there is the king’s flag!” We stood up on our feet and cried “There is no time for delay!” 

The king has come but where are lights, where are wreaths? Where is the throne to seat him? Oh, shame! Oh utter shame! Where is the hall, the decorations? Some one has said, “Vain is this cry! Greet him with empty hands, lead him into thy rooms all bare!” 

Open the doors, let the conch-shells be sounded! In the depth of the night has come the king of our dark, dreary house. The thunder roars in the sky. The darkness shudders with lightning. Bring out thy tattered piece of mat and spread it in the courtyard. With the storm has come of a sudden our king of the fearful night.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ५१ ☆

दिवस सरला, रात्र झाली

कष्टकरी दमला, दारे लागली

*

कुणी म्हणालं,

“राजा अजून यायचा आहे”

*

आम्ही हसलो, थाप पडली

वारा असेल, ज्योत विझली

*

कुणी म्हणालं,

“राजाचा दूत आला आहे”

*
गडगडू लागलं, पृथ्वी हलली

थरथरल्या भिंती, सारी दचकून उठली

*

कुणी म्हणालं,

“रथाच्या चाकांचा आवाज आहे”

*

आणखी गडद रात्र, ढोल वाजले

उठा, उशीर नको, शब्द कानी आले

*
कुणी म्हणालं,

“राजाचं निशाण फडकतं आहे”

*

रडू लागलो, दिवे कुठे आहेत?

रथ, दरबार कुठे, पुष्पहार कुठे आहेत?

*

कुणी म्हणालं,

“आता रडणं व्यर्थ आहे “

*

दारे उघडा, रिकाम्या खोलीत बोलवा

रिकाम्या हातांनीच भेटा, शंख वाजवा

*

कुणी म्हणालं,

“मध्यरात्री, भकास घरात राजा आला आहे “

*

अंधाराचा थरकाप, वीज आकाशात

फाटकी चटई, पसरा आवारात

*
कुणी म्हणालं,

“वादळाबरोबर, भयावह रात्रीचा राजा आला आहे”

*

कांही तयारी नको, दार फक्त उघडे ठेवा

तो भावाचा भुकेला, मन मात्र शुद्ध ठेवा

*

कुणी हुषार बोलला, “त्रैलोक्याचा राजा आला आहे”

*

– क्रमशः भाग १७..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ त्या दिवशी असं झालं… भाग ३ (भावानुवाद) – गौतम राजऋषी ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ त्या दिवशी असं झालं… भाग ३ (भावानुवाद) – गौतम राजऋषी ☆ उज्ज्वला केळकर

(अचानकच विहीरीच्या अधिक खोलवरून निघाल्यासारख्या अधीकच गुदमरलेल्या आवाजाने कहाणीचा धागा पकडला..) – इथून पुढे – – 

 ‘सगळं कसं पापणी लावते न लावते, तोच घडलं. सुरूवातीला ठरलं होतं, त्याच्या उलट जागा बदलल्या गेल्या. गौरव आणि सिद्धार्थच्या बड्डींनी आपआपल्या रायफल तळघराच्या तोंडाच्या निशाणावर ठेवल्या. सिद्धार्थ आपल्या दोन्ही हातात एक एक ग्रेनेड घेऊन सिद्ध झाला. लांस नायक खुशहालने तळघर झाकलेली लाकडाची पट्टी उचलायला सुरुवात केली, इतक्यात ती पट्टी जोराच्या आवाजासहित खालून वर उसळली गेली. आणि तळघरातून होणार्‍या गोळ्यांच्या वर्षावाने लांस नायक खुशहालला धराशायी केलं आणि दूसर्‍या फैरीत सिद्धार्थला. एका ओझरत्या क्षणी गौरवला खुशहाल आणि सिद्धार्थ एक चित्कार करत धराशायी होताना दिसले आणि दुसर्‍या क्षणी उघडलेल्या तळघरातून पठाणी कुर्ता घातलेले आणि लांब लांब दाढया असलेलेले दोघे जण उडी मारून बाहेर येताना दिसले. दोघे आतंकवादी आपली एके -४७ चारी दिशांनी फिरवत अंदाधुंद गोळीबार करू लागले. क्षणार्धात गौरवला त्याच्या शरिराच्या मध्यात कसला तरी झटका बसल्यासारखं जाणवलं. डाव्या हातात आणि पोटात काही तरी तीव्रसं टोचलं. पुढच्या क्षणी तो माळ्याच्या पायर्‍यांवरून गडगडत पहिल्या मजल्यावर येऊन पडला. पडता पडता त्याला, कॅप्टन सिद्धार्थचा बड्डी हेमचंद्र, पहिल्या मजल्यावरील खिडकीतून बाहेर उडी मारताना दिसला. सगळीकडे फक्त धूरच धूर आणि जिथे गौरव धडपडत येऊन पडला होता, त्याच्या आजूबाजूला होत होता धूळ उडवणार्‍या गोळ्यांचा वर्षाव. स्वत:ला घसटत घसटत पहिल्या मजल्यावरच्या एका खोलीत जाऊन भिंतीचा आडोसा घेत त्याने वरच्या बाजूला गोळीबार करणं सुरू केलं.

गौरवच्या आठवणीत आता सगळं दृश्य धूसर धूसर दिसतय. गोळीबार आणि त्यामुळे पसरलेला धूर याच्यामधून, माळ्यावर उठणार्‍या दोघा आतंकवाद्यांच्या घोषणा ‘नारा-ए – तकबीर – अल्लाह- ओ- अकबर’, ऐकू येत होत्या. याच वेळी गौरवचे आपल्या डाव्या हाताकडे लक्ष गेले. त्यातून रक्ताची धार वहात होती. रायफलवरील त्याच्या डाव्या हाताची पकड ढिली होत होती. त्याचबरोबर त्याने आपल्या वर्दीवर घातलेल्या बुलेट प्रूफ जॅकेटखाली पोटात वेदना जाणवू लागल्या होत्या आणि वर्दी ओलसर चिपचिपित झाली होती. वरच्या माळ्यावरून दोघे आतंकवादी थांबून थांबून गौरवच्या दिशेने गोळीबार करत होते. गौरव भिंतीच्या आडून, थांबून थांबून त्यांच्या फायरिंगला प्रत्युत्तर देत होता. त्याचा डावा हात सुन्न होऊ लागला होता. त्यातून वहाणारं रक्त त्याचे बूट आणि खालची फरशी रंगवत होतं. बुलेट प्रूफच्या आतील त्याची वर्दीही वाहणार्‍या रक्तामुळे अधिकच चिपचिपित होत होती. या सगळ्या आवाजात एक क्षीणसा आवाज त्याला ऐकू आला, खूप दबका आवाज… त्याला स्पष्ट ऐकू आला… ‘गौरव सर सेव्ह मी प्लीज… ’ थोड्या वेळाने पुन्हा हाक आली, ‘गौरव सर…. ’ त्या हाकेने जणू गौरवच्या धमण्यांमधून टपकणार्‍या रक्ताच्या थेंबांना ठिणग्यांमध्ये परावर्तीत केलं. आपल्या सार्‍या वेदना विसरून गौरव खोलीतून बाहेर आला आणि वर माळ्याकडे धावणार, इतक्यात ‘मर काफिर, मर’च्या आवाजाबरोबर गोळ्यांचा आवाज आला आणि शेवटी घुमली कॅप्टन सिद्धार्थची किंचाळी. सुन्न झालेला गौरव तिथेच फरशीवर धप्पकन बसला.

एनकाऊंटर सुरू होऊन जवळ जवळ एक तास झाला होता. सूर्य आता माथ्यावर आला. होता. गौरवला आता खूप थकल्यासारखं वाटत होतं. आता त्याच्याजवळ तीस गोळ्यांची फक्त एक मॅगझीन शिल्लक होती. त्याला नक्की माहीत होतं की त्या दोन आतंकवाद्यांजवळ गोळ्यांची काही कमतरता नाही. त्यांच्या स्वत:जवळच्या गोळ्या आणि आता लांस नायक खुशहाल नि सिद्धार्थच्या जॅकेट मध्ये असलेली मॅगझीन्स आता त्यांचीच संपत्ती बनलेली असणार. त्याचा बड्डी खुशहाल आणि सिद्धार्थ यांच्या जिवंत असण्याची कुठलीही आशा आता उरली नव्हती. वर्दीच्या खिशात ठेवलेला रेडियो सेट सुरुवातीच्या फायरिंगमधे कधीचाच बंद पडला होता. घराच्या बाहेर तैनात असलेल्या आपल्या तुकडीला संदेश पाठवण्याचा कुठलाच मार्ग आता गौरवकडे नव्हता. एकच आशा होती. सिद्धार्थचा बड्डी, शिपाई हेमचंद्र बाहेर उडी मारून गेला होता, तो काही मदत घेऊन आला, तर आला, पण मदत येणार असती, तर एव्हाना यायला हवी होती. प्रत्येक जाणारा क्षण घातक वाटत होता. खूप रक्त वाहून गेल्यामुळे आपल्या शरीरात अजिबात ताकद नाही, असं त्याला वाटत होतं. त्याचे डोळे मिटू लागले होते. डोळे मिटता मिटता टिप्सीचा चेहरा डोळ्यापुढे तरळला आणि मनात विचार आला की टिप्सीला आता या जगात आपल्या पप्पांशिवायच मोठं व्हावं लागेल. गीतालीचा गोल चेहरा डोळ्यापुढे नाचू लागला. टिप्सीला मांडीवर घेऊन बसेलेली गीताली…. त्याच्या मोबाईलच्या स्क्रीनवर असलेल्या वॉलपेपरवरचं छायाचित्र…. मोबाईल बघता बघता, अचानक काही तरी गौरवला आठवलं आणि तो त्याच्या कॉँटॅक्ट लिस्टवरचे काही नंबर डिलीट करू लागला. डोक्यावर असलेल्या मृत्यूच्या व्याकुळ छायेतही गौरवचे विचार कुठे कुठे भटकत होते. मग त्याने एक निर्णय घेतला की मरायचच जर आहे, तर या माथेफिरूंना मारून का मरू नये? आणि तो आपली शेवटची मॅगझीन आपल्या रायफलवर चढवत त्यासाठी तयार झाला.

त्यानंतरचं सगळं गौरवच्या स्मृतीत धूसर घूसरच आहे. त्याला स्पष्ट आठवत नाही. इतकच आठतय की तो आपली रायफल घेऊन गोळ्यांची बरसात करत जिन्यावरून धावत गेला. त्याच्या बुलेट प्रूफ जॅकेटला तीन – चार गोळ्या लागल्या आणि त्याच वेळी खालच्या जिन्यावरून फौजी बुटांचा धप धप आवाज ऐकू येऊ लागला. दुसर्‍या दिवशी त्याचे डोळे उघडले, तेव्हा तो बेस हॉस्पिटलच्या बेडवर होता. डावा हात प्लॅस्टरमध्ये हवेत लटकत होता. एका क्लिपने तो स्टॅंडला अडकवलेला होता आणि त्याच्या पोटावर मोठीशी पट्टी बांधलेली होती. नंतर कळलं त्याच्या पोटातून चार गोळ्या, आणि डाव्या हाताच्या बोटांचा जोड व कोपरापासून एक आशा तीन गोळ्या काढल्या होत्या. त्याच्या उन्मादी आक्रमणात ते दोघे आतंकवादी ठार झाले होते. त्यांच्या मृत शरीरातून काढून जप्त केलेल्या कागदपत्रावरून, ते अफगाणी असल्याचं कळलं होतं.

आपली सगळी कहाणी ऐकवल्यावर गौरव एकदम गप्प गप्प झाला. धापा टाकू लागला. जसा काही मैलो – न – मैल पळून आत्ताच इथे येतोय. मणा मणाचं ओझं जसं काही त्याच्या छातीवर पडलय आणि गेले पंधरा-वीस दिवस तो ते आपल्या छातीवर वागवतोय. क्षणभर त्याला औदासिन्यानं घेरलं आणि मग… मग भारी भक्कम ओझ्याखाली अस्वस्थ, झालेल्या, तळमळणार्‍या त्याला, थोड्या वेळासाठी अगदी थोड्या वेळेसाठी का होईना, पण त्याच्या उखडलेल्या श्वासाच्या अवती भवती, थंडगार झुळुक फिरत असल्याचा भास झाला.

‘गॉड ब्लेस यू माय सन… माझं नशीब किती चांगलं की तुझ्यासारख्या ब्रेव्ह सोल्जरची देखभाल करण्याची संधी मला मिळाली. ’ आपल्या ओलसर झालेल्या डोळ्यांच्या कडा पुसत शकुंतला मॅम म्हणाल्या.

‘कसला ब्रेव्ह सोल्जर मॅम? दररोज सिद्धार्थ माझ्या बेडच्या जवळ उभा राहतो आणि माझ्याकडे टवकारून बघतो. ज्या गोळ्यांनी त्याचा जीव घेतला, ती खरं तर माझ्या नावाने निघाली होती. ’

‘मी समजू शकते गौरव, तुझ्यावर कोणता प्रसंग ओढवलाय! पण आता काही करता येणार नाही ना! इतका विचार केलास, तर तुझी तब्बेत सुधारणं अवघड होऊन जाईल. ’

‘मला बरं व्हायचंच नाहीये. आय वॉँट टू सफर… कदाचित तेच माझं प्रायश्चित्त असेल! ही वेदना, हे दु:ख माझ्याजवळ राहावं… अगदी कायमसाठी… ’

‘असा विचार करू नकोस बेट! . आपल्या फौजेचे हे बलीदान थेट गॉडसमोर रुजू होतं! ’

‘ही सगळी नुसती बडबड आहे. सांगण्या-ऐकण्याच्या मोठमोठ्या गोष्टी…. कुणालाच या बलिदानाची जाणीव नाही की त्याचं महत्व कळलेलं नाही. नाही तर गेल्या तीस-चाळीस वर्षात काश्मीरमध्ये इतके जीव गेले आहेत की त्या हिशेबाने बघितलं तर हा स्वर्ग, खराखुरा स्वर्ग व्हायला हवा होता पण इतक्या सगळ्या बलिदानानंतरही आम्ही लोक फक्त गोळ्याच खात रहातोय. देशवासीयांना आमच्या सगळ्या चुकाच चुका दिसताहेत फक्त! ’

‘मला कळतय गौरव… बरं ते जाऊ दे… त्या शेवटच्या क्षणी तुला काय वाटलं? मृत्यूला इतकं जवळ उभं राहिलेलं पाहून… ओह… माझा तर केवळ विचारानेच थरकाप होतोय. ’

‘काही खास नाही मॅम.. बस! मुलीची आठवण झाली. सहा वर्षाची होईल आता ती. मला असं वाटलं की आता तिला मोठं होताना तिचे पापा पाहू शकणार नाहीत. ’ गौरवच्या या बोलण्यावर हॉस्पिटलची ती हेड नर्स स्फुंदून स्फुंदून रडू लागली. खूप वेळेपर्यंत ऑफिसर वॉर्डच्या त्या कोपर्‍यातल्या अवती-भवती दबलेले हुंदके गुंजत राहिले. मग वातावरण तणावमुक्त करण्यासाठी शकुंतला मॅम म्हणाल्या, ‘आपल्या बायको-मुलीला बोलाव ना इथे! त्या इथे राहिल्या, तर पेन किलरच्या डोसाची गरजही कमी भासेल. मीदेखील बघीन माझ्या ब्रेव्ह सोल्जरची गोड छोकरी! ’

‘नाही मॅम! त्या दोघींनी मला आशा स्थितीत पाहावं, असं मला वाटत नाही. मी त्या दोघींचा हीरो आहे आणि हीरो कधी बेडवर पडलेला, पट्ट्या लपेटलेला असतो का? ’

‘ गॉड… तू आणि तुझे विचार… बरं हे सांग, तिथे तुझ्यावर गोळ्यांची बरसात होत होती आणि अशातही तू मोबाईलवरून कुणाचे नंबर डीलीट करत होतास? ’

शकुंतला मॅमच्या या प्रश्नावर गौरव काहीसा संकोचला पण त्याने जे उत्तर दिले त्यामुळे शकुंतला मॅम चकीतच झाली.

तो काहीसा शरमिंदया स्वरात म्हणाला, ‘मॅम, त्याचं काय आहे की मी दोन-तीन मुलींचे नंबर डीलीट करत होतो. ’

‘काय? … पण का? ’

‘त्याचं काय आहे ना मॅम, सोल्जरच्या बॉडीबरोबर त्याचं सगळं सामान त्याच्या फॅमिलीकडे पाठवलं जातं. मी मेल्यावर माझा मोबाईल माझ्या बायकोकडे गेला असता आणि तिने बघितलं असतं की त्या दोन-तीन मुलींच्या संपर्कात मी अजूनही आहे, तर तिला किती वाईट वाटलं असतं! मी तर तिला सांगितलं होतं की आता माझा त्या जुन्या गर्ल फ्रेंडशी काहीही संबंध नाही.

मेजर गौरव वत्सच्या बोलण्यावर हेड नर्स शकुंतला बर्मन इतकी मोठमोठ्याने हसू लागली, की तो हास्यध्वनी, किती तरी वेळ तिथे रेंगाळत राहिला. ते हसू, ऑक्टोबरच्या त्या कुडकुडणार्‍या दुपारी, ऑफिसर वॉर्डमधल्या त्या ठणक्याला थोडीशी ऊब देण्याची मेहरबानी करत राहिलं.

समाप्त –

मूळ हिंदी  कथा – ‘गर्लफ्रेंड’  मूळ लेखक – गौतम राजऋषि

अनुवाद –  उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ त्या दिवशी असं झालं… भाग २ (भावानुवाद) – गौतम राजऋषी ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ त्या दिवशी असं झालं… भाग २ (भावानुवाद) – गौतम राजऋषी ☆ उज्ज्वला केळकर

(‘मी त्याला वाचवू शकलो असतो मॅम.. आपल्या सिद्धार्थला मी वाचवू शकलो असतो.. ’ असं म्हणत तो स्फुंदून स्फुंदून रडू लागला.

‘इतका विचार करू नकोस गौरव! झालं ते झालं…. सगळं काही नियतीच्या हाती… ’ लहान मुलाप्रमाणे हमसून हमसून रडणार्‍या, सैन्यातील त्या मेजरला कसं समजावावं, ते शकुंतला मॅमच्या लक्षात येत नव्हतं.) 

इथून पुढे – – 

‘खूप वेदना होताहेत मॅम… प्लीज… मला पेन किलरचा आणखी एक डोस द्या. ’

‘आत्ता दोन तासांपूर्वी जेवणानंतर तुला इंजक्शन दिलं होतं ना! इतकं जास्त पेन किलर घेणं योग्य नाही. तुझ्या शरिरावर पुढे त्याचा वाईट परिणाम होईल. ’

‘मला त्याची पर्वा नाही. इंजक्शन द्या. बस्स! ’ गौरव अशा काही अवस्थेत बोलून गेला की शकुंतला मॅमचं अंतर कापत कापत गेलं आणि मग त्याला इंजक्शन देणं त्यांना भागच पडलं. इंजक्शन देता देता त्या म्हणाल्या, ‘त्या दिवसाबद्दल… ऑपरेशनबद्दल तुला काही बोलावंसं वाटलं, तर तू मला तुझी फ्रेंड समज…. बोलण्यामुळेसुद्धा वेदना थोड्या कमी होतील. ’ गौरव काहिशा विचित्र नजरेने, काही वेळ त्या बेस हॉस्पिटलच्या मायाळू हेड नर्सकडे बघत राहिला आणि हळू हळू इंजक्शनच्या गुंगीत निद्रेच्या कवेत शिरला.

दर दुसर्‍या तिसर्‍या दिवशीचं हेच दृश्य असायचं. ते बेचैन दिवस आणि त्रासदायक रात्रीच्या दरम्यान एक हसवणारा क्षणदेखील आला होता. मोबाईलवर बोलता बोलता गीतालीनं एकदा एक विचित्रच मागणी केली. मोबाईलवरच्या नेहमीच्या सांभाषणानंतर, टिप्सीच्या नवनवीन करामती, बोलणं, ऐकवता ऐकवता ती एकदम म्हणाली, ‘मला त्या गोळ्या हव्या आहेत हीरो…. डॉक्टरांनी तुझ्या पोटातून आणि हातातून काढलेल्या सगळ्या गोळ्या… ’

‘काय? ? ? ’ चमकून गौरवने विचारलं. आपण जे ऐकलं, त्याच्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता.

‘शोना, मला त्या गोळ्या हव्या आहेत…. सगळ्याच्या सगळ्या.. तुला लागलेल्या. जेव्हा घरी येशील तेव्हा आपल्याबरोबर घेऊन ये. सगळ्याच्या सगळ्या.. सात गोळ्या. ’

‘अरे, तू काय करणार त्यांचं? ’

‘काहीही करीन. तुला काय करायचय? नवी रेसिपी बनवीन एखादी. ’

‘काय फलतु गोष्ट बोलतेयस गीतू, इथे हॉस्पिटलमध्ये त्या गोळ्यांचा डिस्प्ले केला जातो. कमॉन… डोन्ट बी चाइल्डिश.. काय करणार तू त्यांचं? ’ गौरवचं हसू थांबता थांबत नव्हतं.

‘तू बस, घेऊन ये. ,. कमीत कमी एक तरी गोळी मला हवीच! ’

तो हसरा क्षण किती तरी वेळपर्यंत वॉर्डाच्या भिंतींवर रेंगाळत राहिला. श्रीनगरच्या त्या आर्मी बेस हॉस्पिटलच्या एका खोलीत एक खास असं संग्रहालय बनवलेलं होतं…. दुनियेतील सगळ्यात वेगळं असं ते संग्रहालय असावं बहुतेक. इथे मागच्या काही युद्धात आणि आतंकवादाशी जोडल्या गेलेल्या सगळ्या ऑपरेशन्समध्ये, घायाळ झालेल्या सैनिकांच्या शरिरावर झालेल्या सर्जरीनंतर काढलेल्या गोळ्या, ग्रेनेडचे तुकडे, बॉम्बमध्ये वापरले गेलेले टोकदार खिळे, छर्रे इ. गोष्टींचा संग्रह होता. ज्या हुतात्म्यांच्या वा घायाळ सैनिकांच्या शरीरातून ते काढले होते, त्यांचे नाव, ते कधी काढले याची तारीख, तो सैनिक घायाळ कधी झाला, त्याची तारीख या सगळ्या गोष्टींच्या नोंदी तिथे होत्या. जगातील सगळ्यात वेगळा असा कोलाज संग्रह होता तो… जसा काही जखमांचंही नक्षीकाम केलय. पाच वर्षांपूर्वी गौरव जेव्हा काश्मीरमध्ये पहिल्यांदा पोस्टींगवर आला होता, तेव्हा एक दिवस असाच, इथे भरती झालेल्या एका जवानाला तो भेटायला आला होता. त्यावेळी त्याने हे अद्भूत संग्रालय पाहिलं होतं. त्या दिवशी एक उनाड विचार त्याच्या मनात चमकून गेला. कधी आपलंही नाव या जखमांच्या नक्षीकामात सामील होईल का? काही भटक्या विचारांना वास्तवाचा पदर ओढून घेण्याची मोठी वाईट सवय असते.

बेस हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या पडल्या गौरव विचार करत होता, जर त्या दिवशी… इतक्या दिवसांच्या पूर्वी, त्याने जो विचार केला, तसा केला नसता तर आज खुशहाल आणि सिद्धार्थ जिवंत असते का? कसं सगळं उलटं पालटं होऊन गेलं. त्या दोघा आतंकवाद्यांना मारण्याचं किती व्यवस्थित, छान प्लॅनिंग केलं होतं. खरं म्हणजे ते अगदी साधं आणि सोपं ऑपरेशन होतं. सिद्धार्थचा हट्ट त्याने का बरं पुरवला? गोळ्यांचा आवाज कानात अजूनही घुमतोय आणि धूसर धूसर झालेल्या स्मृतीच्या पडद्यावर किती तरी दिवसांनंतर त्या दिवसाचं दृश्य स्पष्ट उमटू लागलय. एवढ्यात शकुंतला मॅम त्याची नेहमीची औषधं देण्यासाठी त्याच्याजवळ आल्या, तेव्हा त्याने हात धरून त्यांना बसवून घेतलं आणि भिंतींवरच्या समोरच्या झरोक्याकडे एकटक बघत त्या दिवशीची कहाणी सांगू लागला. त्याचा आवाज जसा काही खोल विहीरीतून येत होता… घुसमटल्यासारखा.

सप्टेंबरला ढकलून पळवत लावत, कुडकुडायला लावणारा, हुडहुडी भरवणारा, ऑक्टोबर येऊन पोहोचला होता. जिथे तिथे उघडे-बोडके चिनार उभे होते. जमीन त्याच्या लाल, तपकिरी पानांनी नटली होती। बर्फाची पांढरी शुभ्र चादर पांघरण्याच्या त्रासापूर्वी जणू ती आपल्या परीने उत्सव साजरा करत होती. धरतीच्या या उत्सवाकडे गौरवच्या बटालियनचं मुळीच लक्ष नव्हतं. आत्ता आत्ताच हाती आलेल्या ताज्या बातमीमुळे, बटालियनला जसा काही विद्युत करंटने स्पर्श केला होता. बटालियनचा खास खबर्‍या शौकतचा फोन आला होता. कॅंम्पपासून काही अंतरावर असलेल्या दल सरोवराला लागून असलेल्या गावात दोन आतंकवादी लपून बसले आहेत. बातमीनुसार गावातील सगळ्यात मोठा सफरचंदाचा बागायतदार मोहम्मद रसीद अहमदने एवढ्यातच दोन मजली घर बांधले होते. त्याच्या या नव्या घरात काही दिवसांपासून दोन विदेशींनी… बहुदा अफगाणी आतंकवादींनी आश्रय घेतला होता. शौकतच्या विस्तृत वर्णनानुसार पहिल्या मजल्यावर बनवलेल्या दोन खोल्यांच्यामधील भिंत जरा जास्तच रुंद दिसते. त्याच्या आत एक लहानसं तळघर बनवलेलं आहे. पोलीस किंवा फौजेची तुकडी जेव्हा तिकडच्या बाजूने गस्त घालत जाते, तेव्हा हे दोन आतंकवादी तळघरात उतरून लपून बसतात. भिंतीत बनवलेल्या त्या तळघरात उतरण्यासाठीचा रस्ता, दुसर्‍या मजल्यावरून आहे. सर्वसामान्य काश्मिरी घरांप्रमाणे धान्य वगैरे ठेवण्यासाठी जसा माळा बनवला जातो, तशा माळ्यावरून तळघरात उतरण्याचा रस्ता आहे. एका लाकडी पट्टीने तो झाकला आहे. ऑपरेशनचं प्लॅनिंग सुरू झालं. गावाचा नकाशा चांगल्या रीतीने समजून घेतला गेला. जवळ जवळ पस्तीस घरांचं हे गाव दल सरोवराच्या दक्षिणेकडून निघणार्‍या नाल्याने दोन्ही बाजूंनी घेरलेलं होतं. रसीद अहमदचं घर आणि बाग गावाच्या एका कडेला होती. प्लॅनप्रमाणे असं ठरलं की दहा दहा जवानांच्या दोन तुकड्या मेजर गौरव वत्स आणि कॅप्टन सिद्धार्थ रायच्या नेतृत्वाखाली औपचारिक गस्तीच्या स्वरुपात गावात प्रवेश करतील… गावातील लोकांची सहजच चौकशी करत, अचानक रसीद अहमदचं घर घेरतील. तिसरी रिझर्व्ह तुकडी नाल्याजवळ, अचानक काही परिस्थिती उद्भवली, तर त्याचा निपटारा करण्यासाठी तिथे थांबेल.

गावात जाण्यासाठी नाल्यावरचा छोटा पूल ओलांडताना गौरवच्या छातीत धडधड होऊ लागली होती. गावात प्रवेश केल्यावर दोन्ही तुकड्या वेगवेगळ्या दिशेने विभक्त झाल्या. गाववाल्यांकडून दुआ-सलाम घेत पुढे जाताना, जवळ जवळ प्रत्येकाच्या चेहर्‍यावर एक प्रकारचा विचित्र तणाव जाणवत होता. त्यांचा हा तणाव शौकतच्या बातमीला पुष्टी देत होता. दुआ-सलाम करत आणि वाटेत भेटणार्‍या लहान मुलांना चॉकलेट्स वाटत, दोन्ही तुकड्या स्वत:ला अगदी सामान्य असल्याचं भासवत दोन्ही दिशांनी रसीद अहमदच्या घराच्या दिशेने पुढे निघाल्या. काही क्षणातच रसीद अहमदचं घर चारी बाजूंनी घेरलं गेलं. तुकडीमध्ये असलेल्या लाइट मशिनगन्स योग्य जागी लावून ठेवल्या गेल्या. घरातून बाहेर पडणारे त्यांच्या निशाणावर रहातील आशा तर्‍हेने त्या लावल्या गेल्या. गौरव आणि सिद्धार्थ आपल्या एक एक साथीदार जवानाला घेऊन घराच्या समोर आले. ट्रेनींगच्या दरम्यान शिकवलेलं असतं की कुणीही सनिक एकेकटा कुठलीही गोष्ट करत नाही. सगळ्या गोष्टी जोडी जोडीने होतात. इंग्रजीत त्याला बड्डी – पेअर असं म्हणतात. त्यानुसार दोघांनी आपल्या आपल्या बड्डी – पेअरसह चाल केली होती. घरातल्या सगळ्या व्यक्तींना बाहेर येण्यास सांगितलं गेलं. जेव्हा रसीद अहमदला विचारलं गेलं की घरात आणखी कोण कोण आहेत, तेव्हा रसूल निष्पापपणे म्हणाला, ‘पता मत है! अल्लाह कसम सब खैरियत है’ त्याचं उत्तर निष्पापपणाची एक नवी परिभाषा लिहीत होतं आणि त्यावर गौरवला वाटत होतं, वळून त्याला एक जोरदार थप्पड मारावी…

आत्तापर्यंत सगळं गपचूप ऐकणार्‍या शकुंतला मॅमनी अचानक गौरवला थांबवत म्हंटलं, ‘त्यांची तरी काय चूक आहे यात गौरव? त्यांचं म्हणणं ऐकलं नाही, तर ती एके-47 ने मरणार आणि फौजेचं म्हणणं ऐकलं नाही, तर त्यांच्याकडून मार खाणार. कधी कधी मला वाटतं, या काश्मीरी लोकांचे जितके हाल होताहेत ना, तितके जगातल्या दुसर्‍या कोणत्याच लोकांनी सहन केले नसतील. ठीक आहे… तू पुढे सांग. ’

रसीद अहमद आणि त्याच्या घरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी बसवल्यानंतर गौरवने मशिनगन घेतलेल्या सैनिकाला समोरच्या दरवाजावर लक्ष ठेवण्याची ताकीद दिली आणि नंतर त्याने आणि सिद्धार्थने आपआपल्या बड्डी – पेअरबरोबर अतिशय सावधगिरी बाळगत घरात प्रवेश केला. पहिल्या मजल्यावर पोचल्यावर जिन्याजवळ असलेया दोन खोल्यांमधील भिंतींची जरा जास्तच असलेली जाडी पाहिल्यावर शंकेला कुठे जागाच नव्हती. बटालियन कॅंम्पमध्ये विचार विनिमय होऊन ठरल्यानुसार, वर माळ्यावर पोचून गौरवला माळ्याच्या फरशीवर पडून आपल्या रायफलच्या नळीने त्या लाकडी पट्टीला उचलायचं होतं. ही पट्टी भिंतीमध्ये काढलेल्या जागेला लपवून ठेवत होती. पट्टी उस्कटताच गौरवच्या बड्डीने, लांसनायक खुशहाल सिंहने त्या खालच्या जागेत दोन ग्रेनेड फेकायचे होते. बस्स! काम तमाम! सिद्धार्थ आणि त्याच्या बड्डीला जिन्यावरून आपआपल्या रायफलद्वारे तळघराच्या तोंडाशी कव्हरिंग फायर द्यायचं होतं. गडबडीला सुरुवात इथून झाली. सिद्धार्थ त्याला म्हणाला, ‘गौरव सर आपण आत्तापर्यंत खूप यशस्वी ऑपरेशन्स केलीत. माझी ही पहिलीच वेळ आहे. आत तळघरात ग्रेनेड मी फेकेन. सर.. प्लीज… ’ सिद्धार्थच्या त्या ‘प्लीज’मध्ये काय होतं कुणास ठाऊक, गौरव एकदम ‘होय’ म्हणून गेला.

‘ती माझी सगळ्यात मोठी चूक होती. त्यासाठी मी कधीच स्वत:ला माफ करणार नाही. आमच्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला हे शिकवलं गेलं होतं की ऑपरेशनच्या शेवटच्या भागात कुठलाही बदल करता कामा नये पण मी तीच चूक केली. ’ शकुंतला मॅम त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला थोपटत राहिल्या आणि पुन्हा पुन्हा म्हणत राहिल्या, ‘ही सगळी नियती आहे बेटा… ’

अचानकच विहीरीच्या अधीक खोलवरून निघाल्यासारख्या अधीकच गुदमरलेल्या आवाजाने कहाणीचा धागा पकडला….

– क्रमशः भाग दुसरा 

मूळ हिंदी  कथा – ‘गर्लफ्रेंड’  मूळ लेखक – गौतम राजऋषि

अनुवाद –  उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ त्या दिवशी असं झालं… भाग १ (भावानुवाद) – गौतम राजऋषी ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ त्या दिवशी असं झालं… भाग १ (भावानुवाद) – गौतम राजऋषी ☆ उज्ज्वला केळकर

‘तुला काही झालं असतं ना… तू मेला असतास ना… तरी मी तुझ्याशी आजिबात बोललो नसतो… कधीच… ’ संग्रामचा हा मोबाईलवर आलेला डायलॉग ऐकताना, त्याही स्थितीत गौरवला खदाखदा हसू आलं. त्याही स्थितीत… म्हणजे गेले पाच-सहा दिवस असह्य वेदनांमुळे बाहेर पडणार्‍या किंकाळ्यांना मोठ्या संयमाने रोखून धरत असतानाही, त्याला संग्रामच्या बोलण्याचं हसू आलं. त्याला असं खदाखदा हसताना आहून बेस हॉस्पिटलची हेड नर्स शकुंतला मॅमनी त्याच्याकडे चमकून पाहीलं. त्याच्या या अशा मोठमोठ्याने हसण्यामुळे, तीन दिवस आधी पोटावर आणि डाव्या हातावर घातलेल्या टाक्यांवर अतिरिक्त ताण तर पडणार नाही ना, अशी त्यांना शंका येत होती आणि तसं होणं मुळीच योग्य नव्हतं. शकुंतला मॅमच्या चमकून बघण्यामागे ही काळजी होती. पण गौरवला असं हसताना पाहून तिचं मन द्रवलंही. गेल्या पाच-सहा दिवसाच्या त्याच्या मूक अश्रूपाताची ती एकटीच साक्षीदार होती.

श्रीनगरच्या या आर्मी बेस हॉस्पिटलच्या भितींवर या दिवसात दु:ख, वेदनेचा, नवा मजकूर लिहिला जात होता. बदामी बागेच्या आर्मी कॅंन्टोंन्मेंटच्या विशाल पसरलेल्या परिसराच्या मधे असलेले ते बेस हॉस्पिटल किती तरी वर्षांपासून किती तरी किंचाळ्यांचं, कण्हण्याचं मूक साक्षीदार बनलय. विशेषत: गेल्या दहा-पंधरा वर्षापासून, जेव्हापासून आतंकवादाने या घाटीत आपलं डोकं वर काढलय, तेव्हापासून जरा जास्तच. गोळ्यांनी विंधलेल्या, बॉम्बनी क्षत-विक्षत झालेल्या सैनिकांच्या शरिरांनी या हॉस्पिटलचे बेड भरलेलेच असायचे.

ऑफिसर वॉर्डच्या दहा बेडच्या हॉलमध्ये एका कोपर्‍यातल्या बेडवर गौरव पडलेला होता. शेजारी ठेवलेल्या एका उंच स्टॅंडवर प्लॅस्टर घातलेला त्याचा डावा हात क्लिपमध्ये बांधून ठेवलेला होता. ओठातून उमटत असलेलं दबक्या आवाजातलं कण्हणं, त्या भिंतींवर नव्या काव्यपंक्ती लिहीत चाललं होतं. गौरव… मेजर गौरव वत्स… सात गोळ्या आपल्या शरीरात सामावलेला. केवढा तरी रक्तपात झाल्यानंतर, हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या मते, त्याचं जीवंत रहाणं हा मोठाच चमत्कार होता. डॉक्टरांच्या या कथित चमत्कारानंतर, त्याच्या शौर्याची, वीरतेची सगळीकडे चर्चा होत होती. ‘कॉन्ग्रेचुलेशन मेजर.. ’ आणि ‘वेल डन माय बॉय… ‘ सारखे उद्गार भेटायला येणार्‍यांच्या ओठांवर विराजमान होते. अशा सगळ्या ‘कॉन्ग्रेचुलेशन्स’ आणि ‘वेल डन’वर, गौरवला सगळ्या मर्यादा तोडून आभाळाला जाऊन भिडेल, इतक्या मोठयाने किंचाळावसं वाटतं. कसलं शौर्य? कसली वीरता? जेव्हा त्याचा बड्डी… साथीदार लांस नायाक खुशहाल सिंह याने त्याच्यासमोर प्राण सोडला होता… जेव्हा त्याच्यासाठी बाहेर पडलेल्या गोळीने त्याच्या लाडक्या अतिप्रीय सिद्धार्थचा जीव घेतला, तेव्हा तो काहीच करू शकला नाही. मग यात शौर्य कुठून आलं? किती तरी वेळा त्याला वेदना असह्य होते. खूप मोठयाने ओरडावसं वाटतं पण त्याने स्वत:वर कामालीची बंधने घालून घेतली आहेत. ओठातून बाहेर पडण्यापूर्वीच किंचाळीला मूक व्हावं लागत होतं. तसंही, कुठल्याही सैनिकाला, आपलं दु:ख, आपल्या वेदना, यामुळे कण्हण्याची, ओरडण्याची परवानगी, त्यांची वर्दी देत नाही. ‘गट्स’ आणि ‘ग्लोरी’चा परीघ, क्रूरतेच्या हद्दीपर्यंत सगळा अंधार, वर्दी आपल्या चमकत्या आवरणाखाली लपवून ठेवते.

तीन दिवस आय. सी. यू. मध्ये बेशुद्धावस्थेत पडून राहिल्यानंतर आज जेव्हा त्याला ऑफिसर वॉर्डमध्ये आणलं गेलं, तेव्हा त्याला त्याचा मोबाईल हातात घेण्याची परवानगी मिळाली. शेकडो एसएमएसनी त्याचा इनबॉक्स तुडुंब भरला होता. पहिला कॉल त्याने गीतालीलाच केला.

‘हाऊ आर यू माय हीरो? ’ स्वत:ला सहज असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करता करता ती हमसून हमसून रडू लागली.

’कमॉन सोना… तूच जर असं करू लागलीस, तर कसं होणार? तूच तर माझी ताकद आहेस ना! ’

‘किती दुखतय? ’

‘आता कुठलं दु:ख सोना! तू विचारलंस आणि सगळं दु:ख गायब. हा… हा… ’ गौरवनं जबरदस्तीने हसण्याचा प्रयत्न केला.

’राहू दे… राहू दे… हा डायलॉग तुझ्या गर्लफ्रेण्डससाठी राखून ठेव! ’

‘कुठल्या गर्लफ्रेण्डस बेबी? कधीच सुटल्या सगळ्या… तुझ्याशी बांधला गेलो तेव्हा. बरं मला सांग, मम्मी, पप्पा कसे आहेत? आणि माझी टिप्सी? ’ गौरवने विषय बदलत विचारलं. त्याच्या मनात अनेकानेक एसएमएसनी भरलेला इनबॉक्स चमकत होता. पण ते कुणाचे आहेत, ते त्याला कळणार नव्हतं कारण काही दिवसांपूर्वीच त्याने स्वत:च सगळे नंबर डीलिट केले होते.

‘न्यूज कळल्यापासून मम्मींचं रडणं थांबतच नाही आहे. पप्पा गप्प गप्प आहेत. आजीचं रडणं पाहून टिप्सीला कळलं, आपल्या पापांना गोळी-बिळीसारखं काही लागलय. काल आपल्या सगळ्या दोस्तांना सांगत होती की तिच्या पापांना गुंडांशी लढताना जखम झालीय. ’ गीतालीचे हुंदके मोबाईलच्या स्पीकरमधून बाहेर पडून वॉर्डमध्ये तरंगू लागले.

हॉस्पिटलच्या मूक भितींवर आधीपासूनच लिहिलेल्या दु:ख, वेदनांच्या कहाण्यांवर नवीन नवीन थर चढत होते. त्याला संग्रामच्या कॉलने थोडासा विसावा मिळाला होता. कोणत्याही परिस्थितीत, प्रत्येक क्षणी त्याची हसरी, खेळकर वृत्ती कायम असायची. अथांग पीडेच्या क्षणीही, त्याच्या कॉलने हसण्यासाठी गौरवला विवश केलं होतं. गौरवकडून सगळं जाणून घेण्यासाठी तो उतावीळ झाला होता. ऑपरेशनमध्ये कुठे गडबड झाली की ज्यामुळे आतंकवाद्यांचा निपटारा करताना गौरवच्या बटालियनला इतकं नुकसान सोसावं लागलं? झालेल्या क्षितीसाठी नुकसान शब्द छोटाच म्हणायला हवा. यावेळी गौरवला ते जाणवत असणार, ही गोष्ट संग्रामच्या लक्षात येत होती. दोन आतंकवाद्यांना मारून टाकण्यात भारतीय सेनेचा एक कॅप्टन आणि एक जवान यांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं आणि एक मेजर अतिशय घायाळ होऊन हॉस्पिटलमध्ये पडला होता. संग्रामने दोन-तीन वेळा विचारल्यावर गौरवने कण्हल्यासारख्या आवाजात म्हंटलं होतं, ‘हे सांग संग्राम, कुणाच्या असण्यासाठी कुणाचं नसणं, नियतीच्या कोणत्या कायद्यात बसतं? ’

‘मला माहीत आहे गौरव तू कॅप्टन सिद्धार्थबद्दल बोलतो आहेस ना? कसं झालं दोस्त हे सगळं? तुम्हाला जर पक्की खबर होती की त्या घरात विदेशी आतंकवादी लपलेले आहेत, तर घरात घुसण्याची काय गरज होती? बाहेरूनच बॉम्ब टाकून घर का नाही उडवलंत? सरकार मालकाला पूर्ण पैसे देतंच की! ’

‘सगळं कसं धूसर धूसर आहे संग्राम… आत्ता मला तू माफ कर. ’

‘ठीकाय! ठिकाय! आत्ता तू आराम कर. स्वत:ची काळजी घे. जे झालं ते झालं. यू डीड युअर बेस्ट… गीतालीचा कॉल आला होता. तुला बघायला श्रीनगरला यायचं म्हणतेय. मला म्हणत होती, घेऊन चल… मलासुद्धा तुला बघावसं, भेटावसं वाटतय. ’

‘कुणीही येणार नाही इथे… मला एकट्यालाच राहू दे. ’ गौरवने ओरडत फोन कट केला.

सगळी मीडिया या ऑपरेशनच्या वेळी सेनेच्या झालेल्या त्रुटीबद्दल हा:हा:कार माजवत होती. संग्रामला माहीत होतं की सत्य काय आहे, ते केवळ आणि केवळ त्याचा जिगरी दोस्त गौरवच सांगू शकतो आणि ते सत्य तो आपल्या चॅनेलद्वारा सर्वांपुढे आणू इच्छितोय. दोघांची दोस्ती लहानपणापासूनची. ‘दो जिस्म मगर एक जान’ सारखा एखादा बिल्ला लावून वाढलेली. मोठी झालेली. आता गौरवच्या आवाजात असलेली वेदना संग्राम आपल्या छातीत अनुभवत होता. संग्रामच्या प्रश्नांनंतर गौरवला पेन-किलरच्या इंजक्शनची अवश्यकता कित्येक पटीने जास्त वाटू लागली होती. शकुंतला मॅमला थोडी काळजी वाटत होती. पेन-किलरच्या इतक्या जास्त डोसाचा काही विपरीत परिणाम तर गौरवच्या शरीरावर होणार नाही ना? . या काळजीपोटीच गौरवने वारंवार केलेल्या विनंतीवरून त्याला हॉस्पिटलच्या परिसरात सिगरेट ओढण्याची परवानगी देण्यात आली होती. गौरवचं म्हणणं होतं की विल्सवाल्यांनी आपली ‘क्लासिक’ नावाची जी चौर्‍याऐशी मिलीमीटरची नळी… सिगरेट बाजारात उतरवलीय, तिच्या तोडीचं दुसरं पेन-किलर सध्या तरी शक्य नाही. यावर, शकुंतला मॅम आणि गौरवच्या डॉक्टरांचं हसू त्या ऑंफिसर वॉर्डमध्ये किती तरी वेळ खळखळत राहीलं.

वेदनेच्या उत्तुंग लहरींनी भिजलेला फेसाळ किनारा, केव्हढ्या तरी दु:खाचा फेस घेऊन हळू हळू वाहणारा काळाचा प्रवाह गुपचुप बघत होता. काश्मीरच्या त्या ऑक्टोबरच्या कुडकुडणार्‍या थंडीत धुक्यात न्हालेल्या दुपारी आणि उदास हुडहुडी भरवणार्‍या रात्रींच्यामध्ये पेन कीलरच्या इंजक्शनच्या गुंगीत असताना मधेच खडबडून जागा व्हायचा गौरव. दूरवरून, ’गौरव सर.. ’ अशी हाक यायची आणि खूप वेळपर्यंत त्याच्या कानाच्या अनंत खोलीत, त्याची झोप उडवत ती गुंजत राहयाची. दूरवरून येणार्‍या प्रत्येक हाकेसरशी त्याला उठून तिकडे जावंसं वाटायचं पण पोटावर बांधलेल्या भरभक्कम पट्ट्या आणि क्लिपमध्ये अडकवलेला त्याचा प्लॅस्टर घातलेला डावा हात त्याला तसं करण्यापासून रोखायचा. त्या रात्री सिद्धार्थचा आवाज ‘गौरव सर… सेव्ह मी प्लीज… ’, वॉर्डचे झरोके आणि खिडक्या यातून खाली उतरून वॉर्डच्या चारी बाजूच्या भिंतींवर टांगला गेला. डॉक्टरांनी त्याचे पोट आणि डाव्या हातावर अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून टाके घातले होते, त्याला अवघा दीड आठवडा झाला होता.

आकाशातून बारीक बारीक बर्फाचे फाये हळू हळू खाली उतरत होते. मध्यरात्र होऊन गेली होती. कॅप्टन सिद्धार्थ राय आपल्या फूल बॅटल गिअरमध्ये रक्तरंजित वर्दीसहित वॉर्डच्या एका झरोक्यातून तरंगत तरंगत त्याच्या बेडच्या जवळ येऊन उभा राहिला. त्याच्या चेहर्‍यावरून टपकणारं रक्त गौरवाच्या पोटावर पडत होतं आणि न जाणे, कसल्या उदास, विरक्त दृष्टीने तो टकामका गौरवकडे बघत होता. क्षणभरातच गौरवच्या चित्काराने सगळा वॉर्ड गडबडून उठला. थोड्या वेळापूर्वी शिफ्ट ड्यूटीवर आलेल्या शकुंतला मॅम पळतच गौरवच्या बेडपाशी आल्या. ऑक्टोबरच्या त्या थंडीतही घामाने भिजलेल्या गौरवला पाहून त्या घाबरून गेल्या. त्याच्या डोक्यावर मायेने हात फिरवत त्यांनी विचारलं,

‘काय झालं बेटा? आर यू ऑल राईट? ’

‘मी त्याला वाचवू शकलो असतो मॅम.. आपल्या सिद्धार्थला मी वाचवू शकलो असतो.. ’ असं म्हणत तो स्फुंदून स्फुंदून रडू लागला.

‘इतका विचार करू नकोस गौरव! झालं ते झालं… सगळं काही नियतीच्या हाती… ’ लहान मुलाप्रमाणे हमसून हमसून रडणार्‍या, सैन्यातील त्या मेजरला कसं समजावावं, ते शकुंतला मॅमच्या लक्षात येत नव्हतं.

– क्रमशः भाग पहिला 

मूळ हिंदी  कथा – ‘गर्लफ्रेंड’  मूळ लेखक – गौतम राजऋषि

अनुवाद –  उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सेकंड बेस्ट — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ सेकंड बेस्ट — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(अपर्णाची जुळी मुलं मनूला फार फार आवडत आणि लाघवी अपर्णा अति माया करी मनूवर.

दिवस कसे पळत होते नुसते. अपर्णाचे मोहित रोहित आता आठ वर्षांचे झाले. अपर्णा संसारात बुडून गेली.)

इथून पुढे – – 

एक दिवस ती मनूला म्हणाली”मनू, माझ्याबरोबर तुझ्या कोणी चांगल्या डॉक्टर असल्या तर येशील का त्यांच्याकडे? ”

मनू म्हणाली “का ग अपर्णा? काही होतंय का तुला? ”अपर्णा म्हणाली मनू, मला छातीत गाठ वाटतेय. पण उगीच शंका नको म्हणून चांगल्या डॉक्टरला दाखवूया. मी अजून यांना पण बोलले नाहीये काही. ”

अपर्णा संकोचून म्हणाली.

मनूने त्याच आठवड्यात डॉ मोने यांची अपॉइंटमेंट घेतली. डॉ मंजिरी मोने मनूची खूप चांगली मैत्रीण होती. अपर्णा आणि मनू डॉ मोनेच्या क्लिनिकवर गेल्या. डॉक्टरांनी अपर्णाला नीट तपासलं.

त्यांनी मनूला सांगितलं आपण यांची बायॉप्सी करूया.

लगेचच त्यांनी छोटासा तुकडा घेतला आणि म्हणाल्या“ मी हा पॅथॉलॉजी ला पाठवते. घाबरू नको अपर्णा. ही गाठ साधी असण्याची शक्यता जास्त आहे. चार दिवसांनी रिपोर्ट मिळेल तुला”.

चार दिवसांनी पॅथॉलॉजी चा रिपोर्ट आला. , दुर्दैवाने ती गाठ malignant होती. मनूला अतिशय वाईट वाटलं.

अपर्णा शांत होती. तिची आई गावाकडून आली. अपर्णाचं mastectomy म्हणजे पूर्ण ब्रेस्ट काढून टाकायचं ऑपरेशन झालं. भास्कर आणि मनू चोवीस तास तिच्याजवळ होते.

अपर्णा दहा दिवसांनी घरी आली. नंतर केमो थेरपीचे चक्र सुरू झालं. सगळ्या केमो पार पडल्या

मनू ऑफिस मधून रोज अपर्णाकडे जाई. तिला छान खायला करून देई. गप्पा मारून तिचे मनोरंजन करी. अपर्णा बरी झाली. तिचे सगळे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले. मनूला खूप आनंद झाला. अपर्णाची आई पुन्हा गावाला गेली.

मुलं आता बारा वर्षांची झाली.

अचानक अपर्णाला पुन्हा बरं नाहीसं व्हायला लागलं. अचानक वजन कमी व्हायला लागलं.

तिला पुन्हा डॉक्टरांकडे नेलं.

अपर्णाच्या कॅन्सरच्या सेकंडरीज आता सगळीकडे पसरल्या होत्या. मध्यंतरीची वर्षे इतकी चांगली गेली आणि अचानक या कॅन्सरने पुन्हा डोकं वर काढलं.

एम आर आय स्कॅन सगळं सगळं झालं. दुर्दैवाने हा कॅन्सर सगळीकडे पसरलेला दिसला. आता ओपन करण्यात काही अर्थ नव्हता.

बिचारी अपर्णा हळूहळू अंथरुणाला खिळली. फक्त वेदना शामक गोळ्या हेच औषध उरले तिच्यासाठी.

अपर्णा शांतपणे सहन करत निमूट पडलेली असे. मनूला तिचे हाल बघवत नसत. भास्कर सतत तिच्या जवळ बसलेला असायचा. मुलं कावरीबावरी होत. अपर्णा आता तर अंथरुणात न दिसण्याइतकी बारीक झाली होती.

कधी ती छान उत्साही असे तर कधी निराशेच्या आवर्तनात गुदमरून जाई.

मनूला विचारी”, मीच का ग मनू, मीच का? मला नाही ग मरायचं इतक्या तरुणपणी. जेमतेम चाळीशी ओलांडलीय मी. यांच्या कितीतरी अपेक्षा स्वप्नं आहेत ना. ती अर्धवट सोडून मी कशी जाऊ मनू? ”

मनूच्या डोळ्यांना धारा लागत.

“अपर्णा, होशील ग तू बरी. आता नवीन गोळ्यांनी तुला बघ छान वाटेल. ”मनू सांगायची. कधी बरे कधी खूप वाईट असे दिवस चालले होते.

आता घरी चोवीस तास ऑक्सिजन सिलिंडर आणून ठेवावा लागला. भास्करने ऑफिस मधून रजाच घेतली. अपर्णाच्या सासूबाई सतत सुनेजवळ बसत होत्या. मनू तर फक्त ऑफिसला जाण्यापुरतीच बाहेर असे. शेवट काय होणार हे सगळ्याना कळून चुकलं होतं.

त्या दिवशी अपर्णा खूप घाबरी झाली. तिला सतत ऑक्सिजन द्यावा लागला. ग्लानीत पडून राहिली अपर्णा.

दुसऱ्या दिवशी मनूने रजा घेतली आणि दिवसभर अपर्णा शेजारी बसून राहिली. अपर्णाने डोळे उघडले.

“मनू मला एक वचन देशील?

मी तर आता चालले. माझा हा संसार मी मधेच सोडून चाललेय. माझी मुलं अडनिड्या वयाची आहेत. नवरा तर फक्त पंचेचाळीस वर्षाचा. माझ्या भास्करशी लग्न करशील?

मला सगळं माहीत आहे ग, तुझं त्याच्यावर खूप प्रेम होतं. त्याने सांगितलं होतं मला. आम्ही एकमेकांपासून कधीही काही लपवलं नाही ग. मलाच वाईट वाटायचं की तुझ्यासारख्या गुणी मुलीला भास्करने का नकार दिला असेल? आणि मग माझ्यात होकार देताना त्याने काय पाहिलं असेल?

केवढं मोठं मन तुझं ग, हे सगळं विसरून तू माझ्यासारख्या सामान्य मुलीशी मैत्री केलीस. ”

अपर्णा दमून गेली. तिला धाप लागली. मनूने तिचा हात हातात घेतला. अपर्णाला झोप लागली हे बघून तिने हळूच तिला पांघरूण घातले आणि ती घरी आली.

आई ही मनूची सगळ्यात जवळची मैत्रीण.

“मनू, बरी आहे का ग अपर्णा? काय ग देव तरी. दृष्ट लागावी असा संसार करत होती पोर आणि हे काय ग अरिष्ट? ”मनूच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं.

मनू, नक्की काय झालंय? तू अस्वस्थ का?

मनूच्या डोळ्यात पाणी आलं. तिने आईला अपर्णा म्हणाली ते सगळं सांगितलं.

आई म्हणाली, तू काय म्हणालीस मग तिला? ”

आई, तुला काय वाटतं, मी काय करावं? ”आई गप्प बसली.

“मनू, मला काही सुचत नाहीये ग. एकीकडे वाटतं तुझा संसार उभा रहावा, इतक्या उशिरा का होईना..

मनू शांत होती. ”आई मी अपर्णाला हो म्हणणार नाही. त्या जात्या जिवाला मी खोटे वचन नाही ग देणार.

आई, तुला सगळं माहीत आहे. मी भास्करवर मनापासून प्रेम केलं. पण तो मला कधीच आपलं म्हणाला नाही. त्याचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं आणि नाही. ,

त्याच्या अपर्णाबरोबरच्या संसारात तो पूर्ण सुखी होता. मीसुद्धा मनोमन आनंदच मानला त्यांच्या सुखात. अपर्णा माझी खरोखर जिवलग मैत्रीण झाली.

ती म्हणाली मला, भास्कर पण तुझ्याशी लग्न करायला तयार आहे.

आई, पण मलाच आता त्याच्याशी लग्न नाही करावंसं वाटत.

माझं कोवळ्या वयातलं प्रेम त्याला नको होतं.

तो कधीही माझा नव्हता. मग आता हा निष्क्रीय संसार मी का करू? मला त्याच्यावर काही सूड नाही ग उगवायचा.

पण तूच सांग, वठलेल्या झाडाला पुन्हा तो कोवळा बहर येईल का?

मी खरोखर त्याला माझं मानलं पण असं जबरदस्तीनं थोडंच कोणी आपल्यावर प्रेम करतं का?

बरं मी तयार झालेही लग्न करायला जयशी.. तर त्या जयची आई मध्ये आली आणि लग्न मोडलं माझं. माझ्या नशीबातच लग्न नाहीये कदाचित.

आता जर मी भास्करशी लग्न केलं तर मला त्या संसारात जागोजागी अपर्णा दिसेल.

भास्कर तिला कसा विसरेल आई?

माझ्याशी लग्न ही एक तडजोड करणार आहे तो.

त्याचा अवेळी विस्कटलेला संसार सावरायला मी हवीय त्याला.

त्याचे गोड मुलगे मला मनू मावशी म्हणतात. एकदम मी त्यांच्या आईची जागा कशी घेऊ? पण मलाच हे काहीच नकोय.

मला सगळे नक्की स्वीकारतील.

ओळखीची मुलगी बरी हाही विचार तेही करतील.

भास्करसुद्धा ही तडजोड म्हणूनच करणार.

त्याच्या आयुष्यत फक्त अपर्णाच होती आणि रहाणार.

मी आता एक स्वतंत्र बाई झालेय.

मला आता ही तडजोड जमणार नाही आई.

खर बोलायचं तर मला त्याच्या संसारात तो देऊ करत असलेलं हे दुय्यम स्थान नकोय.

हे सेकंड बेस्ट म्हणतात तसं आहे. पहिलं नाही म्हणून दुसरं स्वीकारणं.

मी भास्करची कधीही प्रायॉरिटी नव्हते आणि नाही. अजूनही नाहीये.

मला नाही आता या दुय्यम स्थानावर जायचं. मला आता अपर्णाने सजवलेला तिचा संसार नको. मला तिची सतत आठवण येत राहील तिथे.

आई, मी अपर्णाला असं वचन देणार नाही.

ती गेल्यानंतर काय करायचं हा सर्वस्वी भास्कर आणि त्याच्या कुटुंबीयांचा प्रश्न आहे. तूच सांग. मी बरोबर करतेय ना? ”

मनू आईला मिठी मारून हुंदके देऊन रडायला लागली. आईने तिला जवळ घेतलं. आपल्या या अतिशय सद्गुणी मुलीसाठी आईला अत्यंत वाईट वाटलं. काय विचित्र योग असावेत या मुलीचे असं मनात आलं आईच्या.

बाळा, तुझं बरोबर आहे. तू मनाविरुद्ध नको लग्न करू भास्करशी.

एवढ्या मोठ्या पोस्टवर नोकरी करतेस तू मनू. पुन्हा या संसारात पडणं जर तुला मनापासून नको असलं तर नको पडू. तू जो निर्णय घेशील तो मला, बाबांना मान्यच असेल.

त्याच रात्री अपर्णा गेलीच.

मनूने तिला वचन देण्याचा किंवा न देण्याचा अवघड प्रश्न उभाच राहिला नाही.

– समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सेकंड बेस्ट — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ सेकंड बेस्ट — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

मनू अगदी मनस्वी मुलगी.

लहानपणापासून ती स्वतंत्र विचारांची होती. चाळीत शेजारी शेजारी लागून खोल्या. मनूचे वडील अगदी सामान्य नोकरीत आणि आई शिक्षिका.

मनू दिसायला काही सुंदर नाही पण अतिशय स्मार्ट आणि आरोग्याचं तेज होतं तिच्या सर्वांगावर. सुंदर तजेलदार वर्ण आणि मोठे डोळे.

मनू अभ्यासात हुशार तर होतीच पण उत्तम स्पोर्ट्स् पर्सनही होती. मनूच्या मैत्रिणीसुद्धा खूप. सतत घोळका तिच्या घरी यायचा आणि मनूच्या आई प्रेमाने त्यांना खायला करायच्या.

मनूच्या चाळीत खालच्या मजल्यावर नवीन बिऱ्हाड आलं. मनू तेव्हा असेल तेरा चौदा वर्षाची.

मनूच्या आई आणि मनू त्यांना भेटायला गेल्या. काही लागलं तर सांगा, बाई हवी तर पाठवू का असं विचारायला.

मनूला त्यांचा मुलगा भास्कर तिथे दिसला. तिच्यातून दोन तीन वर्षांनी मोठा असेल. किती देखणा होता तो दिसायला. उंच, लख्ख गोरा निळे घारे डोळे. मनू बघताक्षणी त्याच्या जणू प्रेमातच पडली.

भास्करला आणखी एक बहीण होती. ती नव्हती भास्कर सारखी देखणी. पण स्वभावाने खूप गोड आणि अभ्यासात हुशार. रेवतीची आणि मनूचीही छान दोस्ती झाली.

मनूला भास्कर फार आवडायचा. या ना त्या निमित्ताने मनू त्यांच्या घरी जायची. घरी काही छान केलेलं असलं तर आवर्जून भास्करच्या घरी द्यायची. चाळीतल्या बायका हसायच्या.

“मनू, प्रेमात पडलीस काय गो भास्करच्या? बघ हो. तू एवढी हुशार आणि तो आपला बेताबेताचा.  रूप काय चाटायचं असतं का? ”

मनू काही बोलायची नाही. पण आपलं वागणं सोडायची नाही.

भास्कर तर तिच्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करायचा. तो बरा त्याचा अभ्यास बरा.

मनू उत्तम मार्क्स मिळवून अकरावी झाली आणि कॉलेजला गेली. मनू एमकॉम् झाली आणि तिला बँकेत नोकरी मिळाली. फार आनंद झाला तिला.

भास्करला मात्र कमी मार्क्स मिळाले. तो कॉलेजला गेला पण फार मोठं ध्येय काही नव्हतं त्याच्या डोळ्यासमोर. डिग्री घ्यायची आणि मिळेल ती नोकरी करायची असं माफक ध्येय होतं त्याचं.

त्या दिवशी मनू भास्करच्या घरी गेली. , तो एकटाच होता घरी.

“भास्कर, सरळच विचारते, मला फार आवडतोस तू. लग्न करशील माझ्याशी? मी छान संसार करीन बघ तुझा. माझ्या मनात फक्त तूच असतोस नवरा म्हणून कायम. करशील लग्न माझ्याशी? ”

भास्कर शांतपणे म्हणाला, ”मनू माझ्या मनात तुझ्याबद्दल अशा भावना मुळीच नाहीत. तू हुशार आहेस देखणीही आहेस. मी तुझ्याइतका मुळीच हुशार नाही.

आपलं लग्न झालं तर कायम माझ्या मनात ही तुलना राहील, की आपण मनूपुढे सामान्य आहोत. नकोच हे व्हायला

“अरे हे काय बोलतोस तू? मला जर तू आवडतोस तर या गोष्टींचा विचारच कसा येईल माझ्या मनात?

अजून विचार कर भास्कर. आपला संसार सुंदर होईल. मीही नोकरी करते आहेच. आपण मोठं घर घेऊ. ”

“हेच नकोय मला. तुझ्या जिवावर मला मोठं व्हायचं नाहीये. मला नाकापेक्षा मोती जड नकोय. आई पण हेच म्हणते माझी. ”,

मनूला आता राग आला. ”हो का? म्हणजे काकूंचं मत आहे हो हे? तुला स्वतःला नाही का काही समजत? ठीक आहे मग. ”

मनू तिथून निघून गेली. तिला रेवती भेटली.

“मनू आमचा दादा अगदी मूर्ख आहे बघ. मी पण स्वप्न बघितलं होतं की मनूच माझी वहिनी होईल. ,

सोड तू. त्याला अक्कल नाहीये. तुला खरंच याच्याहून चांगला हुशार जोडीदार मिळेल. हिरा टाकून घेईल काच हातात. मूर्ख आहे दादा. ”रेवती म्हणाली.

भास्करने एका फर्ममध्ये अकाउंटंटची नोकरी घेतली.

मनूला तिचे आईबाबा म्हणाले,

मनू, आता लग्नाचं वय झालं तुझं. बघायला लागू या ना मुलगे? बघ. ते घैसास विचारत होते त्यांच्या पुतण्या बद्दल. छान मुलगा आहे बघ अगदी. ”

“आई मला फक्त भास्करशीच लग्न करायचं आहे. पण तो नाही म्हणतो. ”

”मनू हा काय वेडेपणा? मूर्ख आहे असं म्हण तो मुलगा. अग हातात आलेला हिरा टाकतोय तो. असं समज की तोच तुझ्या योग्यतेचा नाहीये. असं नको करू मनू. ”

आई बाबांनी खूप समजूत घातली. मनू घैसासांचा जय बघायला तयार झाली. संध्याकाळी घैसास मनूच्या घरी आले. जय आणि आईबाबा आणि जयची बहीण.

जयला बघताक्षणीच मनू आवडली.

तिथेच त्याने सांगून टाकलं, “मनू मला आवडलीस तू. तुमचा होकार असेल तर अगदी साधे लग्न करायला मला आवडेल. मला डामडौल आणि उधळपट्टी आवडत नाही. ”

घैसास गेल्यावर बाबा म्हणाले, मनू, काय मग? आवडला का जय? किती स्मार्ट हुशार आणि पुन्हा खूप शिकलेला मुलगा आहे ग. काय कळवू त्यांना?

“बाबा हो सांगा त्यांना.

मला आवडला हा मुलगा.

आता भास्कर इतका सुंदर नाहीये पण हुशार आहे. ” 

बाबा हसले. अजून ते भास्करचं खूळ आहेच का डोक्यात? मनू, संसार रूपावर होत नाही. पुरुषाची बुद्धिमत्ता महत्वाची. ”मनूला हे पटलं.

त्या रात्री ती भास्करला भेटली.

“भास्कर असं असं माझं लग्न ठरतंय.

तू हो म्हणालास तर अजूनही मी त्यांना नकार कळवू शकते”.

भास्कर म्हणाला, छे छे.. तू जरूर लग्न कर त्याच्याशी. माझ्या शुभेच्छा. ”

मनू घरी आली. साखरपुड्याची तारीख ठरली. मनूची आई हौसेने तयारीला लागली.

इतक्यात घैसासांचा निरोप आला. येऊन भेटा. मनूचे आईबाबा 

घैसासांना भेटायला गेले.

जयच्या आईनी त्यांचे स्वागत केलं आणि म्हणाल्या,

“तुम्ही आमच्यावर अवलंबून राहू नका. लग्न ठरलं आणि माझी आई गेली अचानक काहीही हासभास नसताना, कोणताही आजार नसताना..

मनूचा पायगुण बरा नाही. कशाला विषाची परीक्षा बघायची? नकोच ते. आपण साखरपुडा रद्द करूया. ”

अहो पण.. जयचं काय म्हणणं आहे? या युगात कसले हो पायगुण आणि अशा गोष्टी? ”

जय माझ्या शब्दा बाहेर नाही. तर हे लग्न आता होणार नाही हे निश्चित. ”

आईबाबा हताश होऊन घरी आले.

मनू बँकेतून आल्यावर त्यांनी हे तिला सांगितलं. ,

”जाऊ दे ना आई. काही नका वाईट वाटून घेऊ. , आता मलाच लग्न करायचं नाहीये. माझ्यासाठी आता स्थळं बघू नका. ”मनू तिथून निघून गेली.

दरम्यान बऱ्याच गोष्टी घडल्या.

भास्करचे आईवडीलआणिभास्कर कोकणात जाऊन भास्करचं लग्न गुपचूप उरकून आले. कोणालाही पत्ता न लागता.

दुसऱ्या दिवशी घरात सत्यनारायणाला मात्र सगळ्या लोकांना बोलावलं. भास्करची बायको सगळ्याना प्रसाद देत होती. काकूंनी ओळख करून दिली.

ही अपर्णा. आमची नवी सून हो.

अगदी गडबडीत ठरलं सगळं. ”

कोणी काही बोललं नाही. मनू, तिचे आईवडील सगळे सत्यनारायणाला जाऊन आले.

अपर्णा मनूएवढीच होती दिसत.

“छान आहे ग अपर्णा. ” मनू म्हणाली. साधी दिसतेय अगदी. ”

दुसऱ्या दिवशी अपर्णा आपण होऊन मनू कडे आली. “मनू, काल नीटसं बोलणं झालं नाही आपलं. मला तुझ्याशी मैत्री करायला खूप आवडेल. इथे माझ्याएवढं कोणीच नाही. आणि तू नोकरी करतेस ना? मी फार शिकलेली नाही पण मला संसाराची खूप आवड आहे. मला स्वयंपाक करायला खूप आवडतो. ”

ही साधी सरळ मुलगी मनूला फार आवडली. चहा घेऊन ती निघाली आणि म्हणाली

” येत जा ग मनू. मीही येत जाईन तुमच्याकडे. चालेल ना काकू? ”

हसत हसत ती निघून गेली.

किती सरळ साधी आहे पोरगी ही.

भास्करपुढे दिसायला थिटीच आहे हो. ”मनूच्या आई म्हणाल्या.

अपर्णाने आपल्या गोड वागण्याने सगळ्याना आपलंसं करून टाकलं.

मनू तर तिची घट्ट मैत्रीण झाली. आपली सगळी गुपितं सांगायला हक्काची मैत्रीण मिळालीअपर्णाला.

“काय ग मनू. करून टाक की ग लग्न. मला बघू दे ना माझी मैत्रीण सुखात असलेली. ”

अपर्णा, आत्ता कुठे मी दुःखात आहे ग? नको वाटतं आता ते लग्न. तू तुझ्या नवरा आणि ही तुझी दोन गोड पोरं मस्त आहेत की. मी नाही ग बाई त्या फंदात पडणार.

मस्त पगार आहे, बँक फ्लॅट देतेय पण आईबाबा तयार नाहीत ना तिकडे यायला. ”मनू हसून म्हणे.

अपर्णाची जुळी मुलं मनूला फार फार आवडत आणि लाघवी अपर्णा अति माया करी मनूवर.

दिवस कसे पळत होते नुसते. अपर्णाचे मोहित रोहित आता आठ वर्षांचे झाले. अपर्णा संसारात बुडून गेली.

 – क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares