मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सोनफूल हे ओंजळीत मम (सोनटक्का) ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सोनफूल हे ओंजळीत मम (सोनटक्का) ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(वृत्त लवंगलता.. मात्रा- 8+8+8+4=28)

पर्ण्य भासते पंख पसरुनी फांदी वरती बसले

श्रावणमासी सुबक पांढरे फूल सुगंधी दिसले ||ध्रु||

*

रिमझिमताना सणवारांची रेलचेल ही सारी 

सोनटक्क्यास बहर साजरा धुंदी दरवळणारी

मोह घालती फुले पाहुनी देव देवता हसले

श्रावणमासी सुबक पांढरे फूल सुगंधी दिसले ||1||

*

तलम मुलायम श्वेत पाकळी गंधयुक्त झालेली

तिन्ही सांजेला जणू देखणी सुकुमारी आलेली

चंद्र चांदणे तिजला पाहुन चमचम करुनी हसले

श्रावणमासी सुबक पांढरे फूल सुगंधी दिसले ||2||

*

तीन पाकळ्या त्यात जाहले तुषार सिंचन पिवळे

पातळ पातळ जणू नाजुका काय करावे न कळे

शब्दाने मी कोमलकांती सोनटक्क्यास विणले

श्रावणमासी सुबक पांढरे फूल सुगंधी दिसले ||3||

 *

बेधुंद होत गंध मोहिनी इकडे तिकडे घुमली

कवने माझी पानथळीला तिथेच सारी रमली

सोनफूल हे ओंजळीत मम् अत्तर देण्या बसले 

श्रावणमासी सुबक पांढरे फूल सुगंधी दिसले ||4||

*

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ तेव्हा आणि आत्ता!☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?


☆ तेव्हा आणि आत्ता! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

फार पूर्वी दिवाळीला 

पहाटे बंब पेटवायचो,

सुगंधी उटणं लावून 

अभ्यंग स्नान करायचो!

*
फार पूर्वी दिवाळीला 

कडक्याची थंडी पडायची,

मग फटाके लावतांना 

दातखिळी बसायची!

*
फार पूर्वी दिवाळीला 

घरी कंदील बनवायचो,

मातीचे किल्ले करून 

देखावे उभे करायचो!

*
फार पूर्वी दिवाळीला 

होती रोषणाई पणत्यांची,

चार मजली उंच चाळ

मग वर्षातून उजळायची!

*

फार पूर्वी दिवाळीलाच 

नवीन कपडे मिळायचे,

नातेवाईक एकमेकांकडे 

तेंव्हा फराळाला जायचे!

*

आणि आता…..

झाला गोडवा ऑनलाईन

आता सारा दिवाळीचा,

न उरे ओलावा उत्सवाला

माणसातल्या मायेचा!

माणसातल्या मायेचा!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # २८८ ☆ दिवाळी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # २८८ ?

☆ दिवाळी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुखाची, सुगंधी, दिवाळी

प्रकाशे दिव्याची, दिवाळी !

*

किती ही नवी वाटणारी

तरीही, पुराणी दिवाळी !

*

करंजी पुडाची असावी

तशी नाजुका ही दिवाळी !

*

तुझी साथ आहे सदाची

मला सांगते ही दिवाळी !

*

उभा जन्म एका ठिकाणी

कशी सोसली ही दिवाळी?

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ उद्या… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ उद्या… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

काय ‘उद्या’ च्या मनात..?

‌काही वेगळे भयाण..?

आहे तेच’  की त्याहून

काही स्वप्नवत छान.?

*

गूढ काळोखाची रात्र..?

दैवी पहाट प्रसन्न..?

ताजी तळहाती फुले..?

की हे काळीज विछिन्न..?

*

रिमझिमता श्रावण..?

दारी ऊन सोनसळी..?

की तो वैशाख वणवा..?

ऋतू भकास..वादळी.?

*

काय असेल ‘उद्या’चे

बंद माझ्यासाठी दार.?

मग हवा कश्यासाठी

व्यर्थ आज त्याचा भार…?

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शाश्वत निळाई… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ शाश्वत निळाई… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

सद्विचार आपुले

पंख पसरोन उडती

वर वर जावूनी

भगवंतासी भेटती..

*

स्वर्गीय शांतीचा

अनुभव ती घेती

तीच शांती मग

अलवार मनी नांदती…

*

सद्विचारांचा खग

उडता उडता लुप्त होई

अथांग त्या गगनी

निर्विचार मन मग होई…

*

आता मन निर्मळ

नाही विचारांचे येणे-जाणे

शाश्वत निळाईच्या

आत्मानंदात डुंबणे..

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संतांची दिवाळी…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ संतांची दिवाळी… ☆ सौ शालिनी जोशी

ज्ञानेश्वरी वाचताना लक्षात येतं की, संतांचा दिवाळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांची दिवाळी पाच-सहा दिवसापूर्वी मर्यादित नाही. जीवनात कायमची दिवाळी कशी राहील ते संताने पाहिलं व तसं मार्गदर्शन आपल्या ग्रंथातून केलं. संतांची दिवाळी ही ज्ञानप्रकाश देणारी, दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून सुष्ट प्रवृत्ती जागृत करणारी आहे. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात,

मी अविवेकाची काजळी l फेडूनि विवेक दीप उजळी l

तरी योगिया पाहे दिवाळी l निरंतर ll ज्ञा.४/५४

यातून ते आपल्या अवताराचा हेतूच स्पष्ट करतात. भगवंतांनी तीन सांगितले हा चौथा. माणसाच्या जीवनात अविवेक हेच दुःखाचे मूळ आहे. काजळी दीपाच्या प्रकाशाला झाकून टाकते. तसाच अविवेक माणसाच्या सद्बुध्दीला झाकून टाकतो. तोच दूर झाला तर सद्विचाराची वाट दिसेल. अविवेक म्हणजे कामक्रोधादि षड्रिपु. ते दूर झाले की आत्मानात्म विवेकाचा दीप प्रकाशेल.अनात्म, त्याज्य गोष्टीचा त्याग आणि मग राहील ते एकमेव ब्रह्म. ते मी आहे हा विवेक आणि त्या ब्रह्मासारखे सच्चिदानंद आपले रूप ही खात्री म्हणजे अखंड आनंद. अशी अवस्था योग्यांना प्राप्त होते तशी सर्वांनाच होऊदे अशी ज्ञानेश्वरांची इच्छा.

जैशी पूर्वदिशेच्या राउळी l उदयाची सूर्ये दिवाळी l

की येरा हि दिशा तियेचि काळी l काळीमा नाही ll ज्ञा.५/८६

ज्याप्रमाणे पूर्व दिशेच्या राजवाड्यात सूर्योदय रुपी दिवाळी आली असता दुसऱ्या दिशेतील अंध:कार ही दूर होतो . तशीच

तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची l दिवाळी करी ll ज्ञा.१५/१२

तसेच ज्ञानेश्वरानी आपल्या रसाळ व आल्हाददायक  वाणीने सांगितलेले ज्ञान सगळ्या श्रोत्यांना ज्ञानी करून टाकते. ‘ज्ञानेश्वरांच्या वाणीतून जो ज्ञानाचा प्रकाश पडेल तो इतका व्यापक असेल की जो कोणी ते शब्द ऐकेल तो ज्ञानप्रकाशाने न्हावून निघेल. त्यांना ज्ञानाची दिवाळी अनुभवायला येईल.’ अज्ञान गेले त्रैलोक्य  ऐक्याने प्रकाशित होते. हीच जीवब्रह्म ऐक्याची  स्थिती व ब्रह्मानंद आणि महासुखाची दिवाळी हाच मोक्ष.

तैसे होय तिये मेळी l मग सामरस्याच्या राउळी l

महासुखाची दिवाळी l जगेसि दिसे ll ज्ञा.६/८९

अशाप्रकारे ज्ञानेश्वरांना ज्ञानाची दिवाळी म्हणजे निरंतर महासुख देते ती अभिप्रेत आहे. ज्ञान, विवेक आणि सामरस्य अवस्था अशा तत्वातून ती साजरी केली आहे. म्हणून ती महासुखाची ठरली.

ज्ञानाचा दिवा अंतर्बाह्य उजळून टाकतो. सर्वच संताना अशी दिवाळी अपेक्षित होती म्हणून संत तुकाराम म्हणतात,

साधु संत येती घरा l तोचि दिवाळी दसरा l

संत निवृत्तीनाथ म्हणतात, नित्यता दिवाळी l नाही तेथे द्वैत l

संत नामदेव म्हणतात, विठोबाचे राज्य l आम्हा नित्य दिवाळी l

संत सेना महाराज म्हणतात,

देखता संतचरण lआजी दिवाळी दसरा l

संत सखु म्हणते,

आनंदाची दिपवाळी l घरी बोलवा वनमाळी l

घालीते मी रांगोळी l गोविंद गोविंद l

अशा प्रकारे सर्व संतानी देवाच्या सान्निध्यात आनंदाची दिवाळी भोगली.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मधुमती सूक्तम्… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘मधुमती सूक्तम्‘ — भावानुवाद ☆ श्री दिवाकर बुरसे

मधुमती सूक्त” हे वैदिक साहित्यातील एक अत्यंत सुंदर आणि रहस्यमयी स्तुति है, ज्यात “मधु” अर्थात् मधुरता, आनंद आणि सौम्यतेचे गुणगान केले आहे. हे सूक्त ऋग्वेदातून घेतले आहे. विशेषतः ऋग्वेदाच्या नवम मंडलाशी (सोम मंडल) संबंधित आहे जिथे सोमरस आणि त्याच्या दिव्यतेचे वर्णन केले आहे.

आध्यात्मिक अर्थ

हे सूक्त “मधु” म्हणजे सकारात्मकता, शुभता आणि समरसतेची सर्वत्र कामना करते. ब्रह्मांडाच्या प्रत्येक अंगाने आमच्या जीवनात मधुरता आणि सौम्यता यावी. हे सूक्त मुख्यतः शांति, आनंद आणि संतुलनाची प्रार्थना आहे.

☆ मधुमती सूक्तम् ☆

(ऋग्वेद १/१०/६-९)

ॐ मधुवाता ऋतायत l। मधु क्षरन्तु सिन्धवः।

माध्वीर्नः सन्त्वोषधी। मधुनक्ततुतोषसि। मधुवत् पार्थिवं रजः। मधु द्यौरस्तुनः पिता। मधुमान्नोवनस्पतिः। 

मधु माँ अस्तु सूर्यः। माध्वीर्गावो भवन्तु नः।।

ॐ शांति शांति शांतिः।

भावानुवाद

समीर मंद मंदसे असेच नित्य वाहु दे।

सलील या नद्यांतुनी असेच गोड वाहु दे।

अशाच औषधी अम्हा रस मधूर देउ दे।

निशा-प्रभातही अशाच सौख्यदायि राहु दे।

अम्हासवे असेच लोक नम्र गोड वागु दे।

नीर सिंचुनी जगा नभ असेच रक्षु दे।

वृक्षवल्लरीतुनी रस मधूर वाहु दे।

नभातला रवी अम्हास रोगमुक्त ठेउ दे।

गोधने अम्हा सदा मधुर दूध देउ दे।

सौख्यदायि हे असेच सकल विश्व होउ दे।

ॐ शांति शांति शांतिः।।

भावानुवाद : श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “फराळ…” – कवयित्री: श्रीमती सुषमा नांदुर्डीकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे  ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “फराळ…” – कवयित्री: श्रीमती सुषमा नांदुर्डीकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

ह्यावर्षी ठरवलं

फराळाची बाहेर ऑर्डरच देऊ

नको ते गुढग्यांचे कुरकुरणे

नको खांद्याचे दुखणे

आणि नकोच ते घामाने निथाळणे

ह्या दिवाळीला अगदी फ्रेश राहू

स्वतःकडे जरा लक्ष देऊ.

*

तेवढ्यात मुलाने काढले फर्मान

आई चिवडा सोडून सगळं बाहेरून आण

म्हटलं, पटकन चिवडा करू

बाकी मात्र बाहेरूनच आणू

*

तेवढ्यात नातू लाडाने म्हणाला

ए आजी, तुझे बेसन लाडू वर्ल्डमधे बेस्ट

कशी सांगू त्याला अरे माझी दुखतेय वेस्ट

म्हटलं ठीक आहे. लाडू तेवढे करू

बाकी मात्र बाहेरूनच आणू

*

तेवढ्यात नात जवळ आली

तुझीच शंकरपाळी आवडतात, म्हणाली

शंकरपाळ्यांची तयारी केली सुरू

दुधावरच्या सायीला कसं नाराज करू

मनात म्हटलं बाकी सगळं मात्र बाहेरूनच आणू

*

तेवढ्यात सूनबाई म्हणाली

आई लक्ष्मीपूजनाला करंजीची

तुम्हीच तर सवय लावली

मग काय लागले करंजीच्या तयारीला

घरच्या लक्ष्मीला नाराज करणे परवडेल का मला?

*

शेवटी सगळा फराळ करून झाला

सूनबाईनेही मला खूश करण्याचा चंग बांधला

माझ्यासाठी बॉडी मसाज बूक केला

आणि बघता बघता माझा थकवा दूर पळाला

*

पण खरं सांगू का तुम्हाला

फराळाचे भरलेले डबे बघून मीही झाले तृप्त

आता तुम्हीच सांगा मला

आईला होता येईल का हो कधी अलिप्त?

कवयित्री: श्रीमती सुषमा नांदुर्डीकर

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३०३ ☆ मृत हिरवळ… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३०३ ?

☆ मृत हिरवळ… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

ओल्या अंगाने

ती युवती

नदी बाहेर आली

तिची नाजूक पावले

पाणी निथळत

पाऊल वाटेने निघाली

दुसऱ्या दिवशी मीही

कोरड्या पावलांनी

त्याच वाटेने निघालो

तर ती पाऊलवाट

हिरवळीत परिवर्तीत झालेली

श्रीरामाच्या पदस्पर्शाने

जशी दगडातून

अहल्या प्रगट झाली

तशीच

ही मृत हिरवळ

त्या युवतीच्या पदस्पर्शाने

उगवून आलेली दिसते…!

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भक्ती अंतरंग… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ भक्ती अंतरंग… ☆ श्रीशैल चौगुले ☆

देव पहातो जिथे

उभे असेल तिथे

हवी आत्मभक्ती

*

उगी गर्दी का जमे

पंढरीतच रमे

जीव साधाभोळा.

*

ज्ञानेश-तुका भेटी

पांडुरंगाचे गाठी

भक्ती आलौकिक.

*

चित्त मन नि ध्यान

एक करोनी प्रण

साक्षात् प्रसन्न.

*

वायू आप गगन

चंद्रभागेचे ऋण

अभंगी विठ्ठल.

*

वेळ काळ नसे

नित्य पावतसे

सत्संगा वारीस.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares