☆ तुका म्हणे – देखीचा दिमाख… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
*
देखीचा दिमाख शिकोनियां दावी /
हि-याऐसी केवीं गारगोटी//१//
*
मर्यादा ते जाणे अरे अभागिया /
देवाच्या ऐसिया सकळ मूर्ती//२//
काय पडिलासी लटिक्याचे भरी /
वोंवाळुनि थोरी परती सांडी//३//
*
तुका म्हणे पुढें दिसतसे घात /
करितों फजित म्हणउनि //४//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
दुसऱ्याचे अनुकरण करून तसे वागण्याचा प्रयत्न करणाराला तुकाराम महाराज अनुभवाचे खडे बोल सुनावताना म्हणतात.
दुसऱ्याचे काही तरी शिकून आपणही तसे वागण्याचा खोटा खटाटोप करू नये. कारण कितीही मिजास दाखवली तरी गारगोटीला ही-याचे तेज येईल का? गारगोटी कधीच हि-यासारखी दिसणार नाही.
अभागी माणसाला मर्यादा कुठे, किती आणि कशा पद्धतीच्या असतात हेच कळत नाही. त्यांचा अंदाज घेता येत नाही. देवासारख्या दिसणा-या मूर्तीचे आपण दर्शन घेतो. तिच्यात प्रत्यक्ष देहधारी देव कधीच दिसणार नाही. ती फक्त मूर्तीच दिसेल. म्हणून आपण जे खोटे आणि प्रतिकात्मक आहे त्याच्या नादी कधीच लागू नये. त्याची खरी ओळख करून घ्यावी आणि आपल्या मनात त्याची जी भ्रामक ओळख आहे किंवा प्रतिमा तयार झाली आहे ती पुसून टाकावी. आपल्या पासून दूर करावी. आपण जर तसे केले नाही तर आपल्या जिवनात पुढे धोका होण्याचा संभव असतो. आणि मग पुढे जाऊन आपली फजीती देखील होऊ शकते. तसे होऊ नये म्हणून ख-या खोट्याची पूर्ण जाणकारी घेऊन कसे वागायचे ते ठरवायला पाहिजे. म्हणजे काहीच नुकसान होणार नाही.
अश्विन पौर्णिमा… महर्षी वाल्मिकी जयंती….. त्यानिमित्त महर्षींना वाहिलेली ही आदरांजली…..
श्रीबुधकौशिक ऋषींनी रामरक्षा स्तोत्रात वाल्मिकींचे केलेले वर्णन किती समर्पक आहे!
कूजंतं रामरामेति मधुरं मधुराक्षरम्।
आरुह्यकविताशाखां वंदे वाल्मीकि कोकिलम्।
भावार्थ:-
राम राम अशा मधुर अक्षरांनी कूजन करणाऱ्या, कवितारूपी शाखेवर बसलेल्या वाल्मिकीरुपी कोकिळास वंदन असो.
वाल्मिकींची स्तुती करणारे हे दुसरे सुभाषित पहा,
सदूषणोsपि निर्दोषः सखराsपि सुकोमलः।
नमःस्तसै कृतायेन रम्या रामायणी कथा।।
भावार्थ:-
‘दूषण (दोष, एक राक्षस) असूनही निर्दोष आहे, ‘खर’ (खरखरीत, एक राक्षस) असूनही जी कोमल आहे अशी रम्य रामयण कथा ज्याने रचली, केली त्याला (वाल्मिकींना) नमस्कार असो.
रामायणात ‘खर’ आणि ‘दूषण’ या नावाच्या दोन राक्षसांचा उल्लेख आहे. पंचवटीतील वास्तव्यात रामाने त्यांचा वध केला. वरील श्लोकात सुभाषितकाराने या राक्षसांच्या नावावर ‘श्लेष’ केला आहे. ‘श्लेषालंकार’ हे संस्कृत भाषेचे वैशिष्ट्य आहे. जगातील अन्य कोणत्याही भाषेत इतका विपुल व समृद्ध श्लेष अभावानेच आढळतो. असो.
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः।
यत्क्रौञ्चमिथुनादेकमवधीः काममोहितम्।।
– – या श्लोकाद्वारे अनुष्टुप् छंदाचा आविष्कार करून ‛रामायण’ या लोकविलक्षण काव्याची रचना करणारे आद्यकवी महर्षी वाल्मीकि यांची आज (अश्विन पौर्णिमा) जयंती. या आद्यकवीला शतशः वंदन!
महर्षि वाल्मिकींच्या काव्यकर्तृत्वाला अभिवादन म्हणून कविवर्य भा. रा. तांबे यांनी रचलेली पुढील सुंदर कविता वाचनात आहे.
जय वाल्मीकी!
*
जय वाल्मीकी! तुज हें तर्पण;
तव चरणीं सर्वस्व समर्पण! ।।ध्रु।।
*
त्रिभुवनपति जो राम रघूत्तम
सुरनरकिन्नरनुत पुरुषोत्तम
हे वाङ्मयतरुकोकिल, निरुपम
त्या रामा तूं देशि रामपण ।।१।।
*
विधिहि शकेना द्याया कवणा
तीं दश वदनें देशि रावणा
राम यमाधिप दे ज्यां मरणा
अमर करिशि तो सुरारि रावण ।।२।।
*
अधनांचें धन, अबलांचें बल
अमंगलांचें श्रेयोमंगल
जन्मांधांचे लोचन निर्मल
दुर्वृत्तांचें दुरितनिवारण ।।३।।
*
हात दिला तूं किती बुडत्यांना!
धीर दिला किती तूं व्यथितांना!
उरीं लाविलें किती पतितांना!
जय भवनाविक पतितोद्धारण! ।।४।।
*
कालाच्या अति कराल दाढा
सकल वस्तुंचा करिति चुराडा
कालशिरिं झडे तुझा चौघडा
जय मृत्युंजय! जय कविभूषण! ।।५।।
*
भा. रा. तांबे
तमसा नदीवर स्नानाला जात असताना एका काममोहित क्रौंच मिथुनातील नराला बाण मारण्याचे क्रौर्य बघून महर्षिंच्या मुखातून बाहेर पडलेली ही शापवाणी……
“मा निषाद प्रतिष्ठां……. ”
शाप दिल्यानंतर महर्षिंना वाईट वाटले. आपली सारी तपश्चर्या वाया गेल्याचे दुःख झाले.
ते तसेच विचारमग्न अवस्थेत आश्रमात परतले. त्यांची विचारमग्न चर्या पाहून एका शिष्याने कारण विचारले, तेव्हा महर्षिंनी सारा वृत्तांत कथन करून आपल्या मुखातून निघालेली शापवाणीही पुन्हा सांगितली.
ते सांगत असताना त्यांच्या लक्षात आले की ह्या शापवाणीत काही छंद दडलेला आहे. महर्षींना त्या ही अवस्थेत आश्चर्य वाटले. हा योगायोग पाहून ते अधिकच विचारमग्न झाले… तेवढ्यात महर्षि नारद तेथे आले. घडलेला वृत्तांत वाल्मिकींनी नारदांना सांगितला. नारदांनाही आश्चर्य वाटले आणि त्यामागचा ईश्वरी संकेतही जाणवला. यावर चिंतन करून नारदांनी वाल्मिकींना रामकथा लिहिण्याचा समादेश दिला.
… त्या रचनेसाठी नव्याने गवसलेल्या या वृत्ताचा उपयोग करण्याचे महर्षिंनी ठरविले. ते वृत्त म्हणजेच ‘अनुष्टुप् छंद’. या वृत्ताचे द्रष्टेपण जाते आद्य कवी महर्षि वाल्मिकींकडे जगातील व रामायणातील पहिला अनुष्टुपातील श्लोक ‘मा निषाद प्रतिष्ठां…’
आद्यकवींनी रामायणासाठी हा सुलभ असा अनुष्टुप् छंद योजला. या नंतर बहुतेक सर्व महाकवींना आपल्या प्रदीर्घ रचनांसाठी हाच छंद सोईस्कर वाटला.
– – एका पंक्तीत आठ अक्षरे, पाचव्या अक्षरावर यति इ. यमक, अनुप्रासादि अलंकाराचा हट्ट नाही. सरळ लिहित रहा, वर्ण्यविषय संपेपर्यंत, असे साधे प्रवाही स्वरूप या वृत्ताचे. म्हणून सर्वांनाच तो सोईचा वाटला.
स्वा. सावरकरांनी अंदमानात जेव्हा महाकाव्य रचायचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनीही हाच छंद निवडला.
पण वृत्तदर्पणातून शिकलेली लक्षणे त्यांना कारावासात काही केल्या नीट आठवेनात. संदर्भग्रंथ उपलब्ध नाहीत. मिळण्याची सुतराम शक्यता नाही. अशा परिस्थितीत काही पाठ असलेल्या श्लोकांवरून त्यांनी अनुष्टुपाची लक्षणे शोधून त्याप्रमाणे आपल्या रचना केल्या. पुढे काही सहस्र रचना झाल्यावर लक्षात आले की आपण केलेल्या रचनांमधे अनुष्टुप् छंदाच्या नियमाचा भंग झालाय. आठ ऐवजी आपण नऊ अक्षरांचे एक वेगळेच, पण अस्तित्वात नसलेले वृत्त नकळत योजले आहे! अपघात असला तरी ही एक वेगळी निर्मिती आहे. अपघाताने ज्या नव्या वृत्ताचा शोध लागला त्याला मग स्वा. सावरकरांनी “वैनायक वृत्त” असे नाव दिले.
– – सात सहस्त्र वर्षापूर्वी आद्य महाकवीने आम्हाला ‘अनुष्टुप्’ दिले तर एका अधुनिक महाकवीने ‘वैनायक’ दिले!
पुरंदर तालुक्यात, पालखी मार्गावर ‘वाल्हे’ नावाचे एक गाव लागते. या गावात वाल्या कोळ्याचा जन्म झाला. वाल्मिकींचे हे जन्मग्राम आहे असा येथील लोकांचा विश्वास आहे. तिथे वाल्मिकींचे मंदिरही आहे.
रामचरित्र सात सहस्त्र वर्षापूर्वीचे आहे. त्यावेळी महाराष्ट्रात दंडकारण्य होते. याच अरण्यात ‘वाल्हे गावचा वाल्या’ वाटमाऱ्या करीत होता.
☆ तुका म्हणे – कळेल हे खूण … – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
*
कळेल हे खूण /
तरि दावी नारायण //१//
*
सत्य संतांपाशी राहे /
येरां भय आड आहे//२//
*
अणुचिया ऐसे /
असे भरले प्रकाशें //३//
*
इंद्रियांचे धनी /
ते हे जाती समजूनि //४//
*
तर्क कुतर्क वाटा /
नागवे घटापटा //५//
*
तुका म्हणे ल्यावें /
डोळा अंजन बरवे//६//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
आपणास जे कळत नाही, ज्याची उकल होत नाही, काय करावे ते सुचत नाही अशावेळी ते जाणून घेण्यासाठी शांतचित्ताने आपण परमेश्वर चरणी लीन झाल्यावर, त्याची मनोभावे भक्ती केल्यावर परमेश्वर आपणास योग्य तो मार्ग दाखविल. अशावेळी नेमके काय करावे याच्या स्वानुभवाचे खरे सत्य ख-या संताजवळच आहे. इतरांजवळ त्यांचा स्वानुभव नाही. जो संत नाही त्यांच्याकडे भय भ्रमाचा घोटाळच साठलेला आहे. येवढे मात्र नक्की. इथे आपल्या अवतीभवती असणारा अणू रेणू ही परमेश्वरी परमतेजाने आणि प्रखर प्रकाशाने भारावून ठेवलेला आहे. पण ज्यांनी आपल्या इंद्रियांच्या अधीन न होता इंद्रियानाच आपल्या ताब्यात ठेवले आहे, त्यांच्या वर विजय मिळवला आहे असे जे जाणकार आहेत तेच हे सगळे समजून उमजून घेऊन वागतात. व योग्य ते मार्गदर्शन करतात.
पण जे कोणी ही वाट सोडून तर्क कुतर्कांच्या मागे धावतात तेथे सगळ्याच भल्याभल्यांना ही नागवले जाते. फसवले जाते. हे कळण्यासाठी व जाणून घेण्यासाठी आपण आपल्या डोळ्यात भक्तीचे अंजन घालून त्याच्याकडे पाहिले तरच आपल्याला सारे कळून येईल. अन्यथा आपण ही भ्रमातच गुरफटले जाऊ. या अभंगातून तुकाराम महाराजांनी संतसहवासात राहिल्याने आपल्याला काय मिळेल ते स्पष्ट केले आहे. आणि ख-या भक्तीचा अगदी सरळ सोपा मार्ग ही दाखवून दिला आहे. सर्व सामान्य माणसाने याच मार्गाचा अवलंब करून परमेश्वराची भक्ती करावी असे सांगितले आहे.
प्लांट हेड किंवा बिझनेस हेड म्हणून बऱ्यापैकी वरिष्ठ पदांवर अनेक वर्षांच्या कारकिर्दीसह भारत आणि परदेशातील उद्योगात पस्तीस वर्षे काम केल्यानंतर, 2005 मध्ये ते फिलिप्समधून चीनमध्ये निवृत्त झाले.
सेवानिवृत्तीनंतर, १५ वर्षे, प्रगती लीडरशिप इन्स्टिट्यूट, पुणे, यांच्याशी संलग्न झाले. ४१ विविध व्यवसायांना, व्यवसाय सल्लागार, गुणवत्ता आणि व्यवस्थापन विकासामध्ये प्रशिक्षण आणि समुपदेशन सुविधा देणारा म्हणून मदत केली.
त्यांचे इंग्रजीतील पुस्तक ‘Hi There! – माझ्या कॉर्पोरेट प्रवासातील कथा आणि विचार’ आता बाजारात असून कॉर्पोरेट् आणि शैक्षणिक संस्थांद्वारे, एक ‘लर्निंग गिफ्ट आर्टिकल’ म्हणून वापरले जात आहे.
वेगवेगळ्या व्यवस्थापन संकल्पनांवर आधारित त्यांचे दुसरे कथांचे मराठी पुस्तक ‘नमस्कार, ऐकलत का?’ प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक विशेषतः लघु आणि मध्यम (SME) उद्योजक / व्यवस्थापकांसाठी आणि नोकरीच्या बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले आहे.
‘Friendly Stories’ हे काल्पनिक गोष्टींचे आणि ‘काजव्याचे कवित्व’ हे कविता आणि लेख असलेले, अशी दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
‘Learning Management through Q&A’ आणि ‘संकोच’ ही दोन पुस्तके प्रकाशनासाठी तयार आहेत.
लेखक अभियांत्रिकीचा पदवीधर असून व्यवसाय व्यवस्थापनात पदविका घेतली आहे.
वयाच्या ७९ व्या वर्षी, विश्वास, पुणे येथे, त्याच्या पत्नी, दोन विवाहित मुले आणि चार नातवंडांसह समाधानी जीवन जगत आहे.