☆ विलक्षण योगायोगाची एक भावुक सत्यकथा…☆ डॉ. धनंजय देशपांडे☆
कथा घडली सुमारे ३५ वर्षांपूर्वी.. मराठवाडय़ातील लातूर या गावात!! मी त्यावेळी लातूरच्या राजस्थान विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकत होतो. आवडीचा विषय अर्थातच इतिहास आणि मराठी!!
त्यातही मराठी जास्तच जवळची..!! कारण तो विषय शिकवणाऱ्या बाई खूपच मन लावून शिकवायच्या. त्यामुळे त्यांचा तास म्हणजे आम्हाला वैचारिक मेजवानीच असायची. केवळ पुस्तकात आहे, तितकेच न शिकवता त्याच्या अनुषंगाने इतरही बरेच काही त्या शिकवायच्या. त्यामुळे नकळत दृष्टी आणि मनदेखील व्यापक होत गेले.
आज जाहिरातीच्या क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून वावरताना मी केलेल्या जाहिरातीमधील मराठी वाक्यरचना, त्याचे व्याकरण अतिशय नेटके व उठावदार असते, त्याचे सर्व श्रेय त्या ‘मराठी’ शिकवणाऱ्या बाईंचेच!!!
त्या काळात त्यांनी जे मन लावून शिकवले, ते केवळ परीक्षेतील दहापाच मार्कापुरते नव्हते, तर अंत:करणापासून शिकवलेले असल्याने आमच्याही काळजात ‘मराठी’ ही संस्कृती रुजली आहे. याचे संपूर्ण श्रेय त्यांनाच!!
तर एके दिवशी अशाच नेहमीप्रमाणे त्या तासावर आल्या. मराठवाडय़ातील परभणीचे एक महान कवी बी. रघुनाथ यांची ‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली’ ही कविता आम्हाला त्यावेळी पाठय़क्रमात होती. ती कविता बाईंनी शिकवायला सुरुवात केली. ती कवितादेखील त्या कवींच्या वैयक्तिक जीवनातील एक सत्यकथाच होती. ती त्यांनी शब्दांतून सजवली होती.
कवितेचा थोडक्यात सारांश असा होता की, कवीची मुलगी लहान असताना भातुकलीच्या खेळातील एक लाकडी विठोबाची मूर्ती नेहमी आवडीने खेळायची. त्याच्याशी लाडेलाडे बोलायची. खोटा खोटा दूधभात त्या विठोबाला ती कधी कधी खाऊ घालायची तर कधी लटके रागवायचीदेखील..!! तिच्या विश्वातला तो ‘लाकडी विठोबा’ म्हणजे सर्वस्व होते.
कालांतराने भातुकली खेळणारी कवीची ती मुलगी मोठी होते. यथावकाश परंपरेप्रमाणे तिचे लग्न होते आणि ती मुलगी सासरी निघून जाते. आणि इकडे माहेरी (म्हणजे कवीच्या घरी) एका कोनाडय़ात त्या भातुकलीचा खेळ पडून राहतो. त्यातच तिचा तो लाकडी विठोबादेखील पडून असतो. त्याच्याकडे पाहिल्यावर कवीला सासरी गेलेल्या आपल्या त्या लेकीची आठवण येते, आणि कवी गहिवरून जातो. कारण मुलगी नसल्याने ते घर, ती भातुकली एकूणच सारे काही मुके मुके झालेले असते.
तो एकलेपणाचा गहिवर शब्दात मांडताना कवी बी. रघुनाथ.. जणू बाकीच्यांना सांगत असतात की.. हा विठोबा असा का एकटा पडलाय? तर त्याची देखभाल करणारी मुलगी जणू त्याची मायच होती, तीच आता तिच्या गावाला (म्हणजे सासरी) गेली आहे.
त्या भावनेतून साकारले गेलेले ते अजरामर काव्य म्हणजेच… ‘‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली.. तिच्या मायेची ही पंढरी.. आज ओस झाली’’
ही कविता आमच्या त्या शिक्षिका बाई शिकवत असताना इतक्या तन्मयतेने शिकवत होत्या की नकळतपणे आमच्याही डोळ्यात ‘ती लेक सासरी गेल्यानंतरची वडिलांची भाव विव्हलता’ पाणी आणून गेली..!!
कविता शिकवून संपली. वर्ग संपायला अजून पाच मिनिटे शिल्लक होती. वर्गातील सर्व मुले नि:शब्द झालेली..!! आणि त्या शांततेचा भंग करीत हळुवार आवाजात त्या बाई म्हणाल्या..
‘‘मुलांनो… ती जी सासरी गेलेली मुलगी होती ना.. ती म्हणजे मीच आहे. कवी बी. रघुनाथ हे माझे वडील.. माझे लग्न झाल्यावर वडिलांनी माझ्यावर लिहिलेली ती कविता.. होती..’’
हे ऐकताच आमच्या अंगावर सरसरून काटा आला. किती अलौकिक भाग्याचा तो क्षण होता. आम्ही सारेच दिड्मूढ झालो. काय बोलावे काहीच सुचेना.. साक्षात जिच्यावर कविता करण्यात आलेली, तीच मुलगी मोठी झाल्यावर आम्हाला तीच कविता शिकवायला येते.. किती विलक्षण योगायोग ना..???
त्या बाईंचे नाव.. सुधा नरवाडकर… आता त्या निवृत्त झाल्या असून नांदेड येथे आपल्या दोन्ही डॉक्टर मुलांसह आनंदाने उर्वरित जीवन जगत आहेत..!!
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख २१ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
।। श्री नारद उवाच ।।
यथा व्रजगोपिकानाम् ॥ २१ ॥
अर्थ: आपल्या भक्तिलक्षणाकरिता नारदमहर्षी उदाहरण देतात – जशी गोकुळातील गोपिकांची (अवस्था होती.)
विवेचन: स्वतःचे भक्तिलक्षण नारद सोदाहरण पटवून देतात. कोणतीही महत्त्वाची भावना किंवा ज्ञान हे अमूर्तच असते. त्याच्या अभिव्यक्तीकरिता एखाद्या व्यक्त उदाहरणाची अपेक्षा असते. मूर्तात प्रविष्ट झाल्यावाचून अमूर्त प्रगट होऊ शकत नाही. नारदांनी ज्या भक्तीचे स्वरूप एकोणिसाव्या सूत्रात सांगितले, ती भक्ती उत्कटतेने पूर्ण रूपाने कोठे प्रगट दिसली असेल तर ती नारदांना गोकुळात दिसली. गोकुळातील पुरुष, स्त्रिया, गोप, बालक सर्वच भगवान श्रीकृष्णावर प्रेम ठेवणारेच होते. पण नारदोक्त भक्तिलक्षणाचा पूर्ण आविष्कार गोपिकांच्याच ठिकाणी दिसला म्हणून त्यानी गोपिकांचेच उदाहरण घेतले आहे. नुसते ‘गोपिकानाम्’ म्हटले असते तर कोणत्याही मोठ्या नगरात गोप गोपिकाची वस्ती असते. पण ते भक्त नसतात. केवळ गोकुळातील व्रज भूमीतील गोपिकाच भक्त होत्या. म्हणून ‘व्रजगोपिकानां’ म्हटले आहे.
गोपिका म्हणतात, “हे दीनबन्धो, तू जन्मल्यापासून हे गोकुळ अधिक उत्कर्षाला प्राप्त झाले आहे, येथे लक्ष्मी अखंड आश्रयाला आली आहे.” मुळात ती व्रजभूमी ही पुण्यभूमीच होती. पण श्रीकृष्णअवतारामुळे तिला फार श्रेष्ठत्व प्राप्त झाले. त्या व्रजवासी ज्या गोपिका होत्या, त्यांचे उदाहरण नारद आपल्या भक्तिलक्षणाच्या पुष्टीकरिता देतात. आपल्या इंद्रियांच्याद्वारे जी श्रीकृष्णभक्तिरसाचे पान करते ती गोपी.
‘गोपायति’ इति गोपी म्हणजे आपल्या भक्तिभावनेचे जी रक्षण करते ती गोपी.
नाथ भागवतात गोपींचे वर्णन पुढील प्रमाणे आले आहे.
*”गोपिका करूनि माझी भक्ती । मी प्रसन्न केलों श्रीपती ।
रास मागीतला एकांतीं । माझी सुखप्राप्ती पावावया ॥६२॥
*
त्या जाण वेदगर्भींच्या श्रुती । श्रुतिरूपें नव्हे मत्प्राप्ती ।
तैं परतल्या म्हणोनि ‘नेति नेति’ । माझी सुखसंगती न पवेचि ॥६३॥
*
विषयबुद्धी तें मुख्य अज्ञान । तें असतां मी न भेटें जाण ।
असतां वेदोक्त जाणपण । तेणेंही संपूर्ण न भेटें मी ॥६४॥
रासक्रीडामिसें एकांतीं । माझी सुखप्राप्ती पावल्या ॥६६॥
दुसरीही एक कथा उपलब्ध होते. त्रेतायुगात श्रीरामचंद्राचा अवतार झाला. सीतास्वयंवराकरता श्रीरामचंद्र मिथिला नगरीला आले, धनुर्भंग झाला, सीतेने रामचंद्राला माळ घातली, विवाहसोहळा समारंभपूर्वक पार पडला, तेथे ज्या मिथिला नगरीतील स्त्रिया जमल्या होत्या त्याही श्रीरामचंद्राचे ते कोटिकंदर्पदर्पहारी लावण्य बघून मोहित झाल्या. त्यांचीही उत्कट इच्छा झाली की आम्हांलाही हेच पती लाभले तर किती चांगले होईल, त्याकरिता आम्ही वाटेल तो त्याग करू. त्यानी आपली उत्कट वासनाही श्रीरामापुढे प्रगट केली, पण राम अवतार हा मर्यादापुरुषोत्तम होता, एकपत्नीत्वाची मर्यादा पाळणे अवश्य होते. त्या मिथिलानिवासी स्त्रियांचा उत्कटभाव पाहून श्रीरामचंद्र त्यांना म्हणाले, ‘तुम्ही शोक करू नका.’ द्वापार युगात तुम्ही गोपी व्हाल, त्यावेळी मी आपली इच्छा पूर्ण करेन.
.गोपिका गायीच्या दुधाचे दोहन करतेवेळी, साळी इत्यादी कुटताना, सडासंमार्जन करताना, बालकाना झोके देताना, दह्याचे विरजण घालताना, बालके रडत असताना गाणी म्हणत असता सर्व व्यवहारात प्रेमपूर्ण चित्ताने, अश्रुपूर्ण नेत्रांनी श्रीकृष्णाचे गुणगान करीत असत. गोपिकांना क्षणभरही श्रीकृष्णाची विस्मृती पडत नव्हती; पण जर क्षणही त्यांना श्रीकृष्णाचा वियोग झाला तर मात्र प्राणांतापेक्षाही त्यांना अधिक दुःख होत होते.
गोपींच्या प्रेमाचे वर्णन माउलींनी आपल्या विहरणी मध्ये केले आढळते. श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अभंग पुष्कळ आहेत. त्यापैकी प्रसिद्ध म्हणजे,
धनु वाजे घुणघुणा वारा वाजे रुणझुणा ।
भवतारकू हा कान्हा वेगी भेटवा का ॥ १ ॥
चांदवो चांदणे चापे वो चंदनु ।
देवकीनंदनुविण नावडे वो ॥ २ ॥
चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी ।
कान्ही वनमाळी वेगी भेटवा का ॥ ३ ॥
सुमनांची सेज शीतळ वो निकी ।
ओले आगीसारिखी वेगें विझवा कां ॥ ४ ॥
यावर कोणी शंका घेईल की, गोपिका श्रीकृष्णाना परमात्मा समजत होत्या का? त्या तर त्याला एक सुंदर पुरुष म्हणून मानीत होत्या व जार बुद्धीने त्याच्यावर प्रेम करीत होत्या, त्या कामासक्त होत्या, असे असता त्यांच्या त्या वैषयिक प्रेमाला भक्ती कसे म्हटले जाईल? याच शंकेचे उत्तर देण्याकरिता पुढील दोन सूत्राची रचना झाली आहे.