☆ क्षण सृजनाचा ☆ अंतिम सत्य ☆ श्री प्रमोद वामन वर्तक
वाळल्यावर गळून पडलेल्या एका पानाने, आपल्या मातेसमान झाडाबद्दल तक्रार करण्यास सुरवात केली. तेंव्हा त्या मातेने त्याला कशा प्रकारचे उत्तर दिले असते, ते या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 🙏
☆ या झोपडीत माझ्या… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆
परवाची गोष्ट..सांगलीतून माझ्या बनपुरी गावी निघालो होतो. हा माझा नेहमीचा प्रवास आणि नेहमीचाच रस्ता…अगदी खडतर रस्ता असल्या पासूनचा! या मार्गाचे सर्व उन्हाळे पावसाळे पहात आणि सोसत होत असणारा हा माझा नेहमीचाच प्रवास. चकचकित आणि प्रशस्त झालेल्या या डांबरी रस्त्याशी हितगूज करत आणि सभोवतालची हिरवळ डोळ्यात साठवत सक्कासक्काळचा हा प्रवास नेहमीच आनंदाची पर्वणीच देऊन जातो. तसाच आजचाही असाच प्रवास.. मनात येतील ती गाणी मोठ्यानं म्हणत आपल्याच तालातला हा प्रवास मला नेहमीच सुखावतो.तीच ती गाणी रिपिट करत रस्ता कधी सरत राहतो ते कळतही नाही.
आणि प्रवाशाच्या या टप्प्यावर नेहमी थांबून गप्पा मारत चहा घेण्याचं ठिकाण म्हणजे भिवघाट… त्याचं कारणही तसंच.. इथं असणारा माझा मित्र किरण माने. गेली कित्येक वर्षं भिवघाटचं हे हक्काचं थांबण्याचं ठिकाण झालंय माझं..
या प्रवासात त्याची भेट घेत.. त्याच्या सोबत चहा घेत अर्धा पाऊण तास गप्पा मारून भिवघाट उतरायचा नेहमीचाच शिरस्ता. करंज्यांत आल्या आल्याच त्याला फोन करायचा म्हणजे पाच मिनिटात तो हजरच राहतो. मनमिळावू आणि बोलक्या स्वभावाचा किरण सामाजिक आणि राजकीय अशा सगळ्या कामात नेहमीच रस घेतलेला हसतमुख असणारा माझा मित्र. तिथंच त्याचं घर आणि मेडिकलही.त्यामुळेच मी किरण आणि भिवघाट हा त्रिवेणी संगम नेहमीच असा जुळत असतो. त्याची भेट घेतल्याशिवाय भिवघाट उतरता येत नाही आणि सोडताही येत नाही असं पक्कंच होऊन गेलंय म्हणा ना!
..असो त्या दिवशीही त्याची भेट, चहा आणि गप्पानंतर भिवघाट उतरत होतो.तसा छोटासाच हा घाट भिमाशंकर मंदिर आणि घाटातल्या म्हसोबानं पवित्र आणि पावन झालाय.हळूहळू वळणे घेत पायथ्याला पोहचताच उजवीकडे अचानक वेगळेपण जाणवलं आणि गाडी थांबवली. रस्त्याच्या कडेला प्लॅस्टिकच्या बाटलीच्या भिंती बनवून उभी असणारी झोपडी मला खुणावू लागली.
तिथं पोहचून मागोवा घेत आवाज दिला.आत असणाऱ्या पन्नास वयाच्या आसपासच्या स्त्रीने प्रतिसाद देत बाहेर पाहिलं आणि ” काय पाहिजे वं पावणं ” म्हणत बाहेर आली.
..'”काही नाही तुमची झोपडी पाहतोय तुमची, प्लॅस्टिकच्या बाटलीपासून बनवलीय म्हणून वेगळी वाटली आणि कौतुक वाटलं, किती दिवसापासून राहताय मावशी इथे.आणि गाव कोणतं तुमचं, ” त्यांच्याशी संवाद साधत झोपडी न्याहळू लागलो. आतमध्ये त्या स्त्रीचा नवरा काही तरी कामात मग्न होता. मी आल्याच्या चाहूलीनं ते काम थांबवून आमच्या संवादात सामील झाला. तो मोजकंच बोलत होता. मावशी मात्र इकडच्या तिकडच्या ओळखी सांगत होत्या.- ” काय करायचं.अशी राहायची येळ आलीया बघा.माझं माह्यार हे पलिकडं अर्जुनवाडी हाय.सगळं चांगलं हाय तकडं, मस्त तिसरा हिस्सा हाय माझा तिथं, पण काय करायचं, असं वाऱ्यावर राहायची येळ आलीया बघा.सरकार काय मदत करतूया का बघा, घर बिर मिळतंय का? आमाला “,, ..महाराष्ट्राची ही’ लाडकी बहिण ‘तिचं दुःख सांगत होती.
” चहा करू का पावणं” म्हणून आपुलकीही दाखवत होती.
…भिवघाटातल्या नेहमी भरणाऱ्या जत्रंमुळं तिथं नेहमीच गर्दी असते.लोकं पाण्याची बाटली विकत घेतात आणि रिकामी बाटली तिथेच फेकून देतात.त्याच बाटल्या गोळा करून तिच्या नवऱ्याच्या मदतीनं हा निवारा उभा केलाय त्यांनी. आणि हे बनवण्याची आयडीया तिच्या नवऱ्याचीच.
घरात दारिद्र्य घेऊन उभा असलेला हा प्लॅस्टिकच्या बाटलीच्या भिंतीनं बनलेला प्रपंचाचा डोलारा… डोक्यावर हिरवं शेडनेट असलेल्या छतालाही ठिकठिकाणी ठिगळं लागलेली… मळकटलेल्या शेडनेटचंच पडद्यासारखं फडफडणारं दार.अशा झोपडीत विपरीत परिस्थितीत आलेल्या प्रत्येक संकटावर मात करीत प्लॅस्टिकच्या बाटलीच्या भिंती तयार करून पर्यावरणपूरक झोपडं असं ऊन वारा पाऊस झेलत लक्ष वेधतंय. या झोपडीतही एक दुर्दम्य इच्छाशक्ती वसलीय. माणसाच्या जगण्याच्या उमेदीला खडतर मार्गावरूनही असा संसार थाटता येतो याची जाणीव ही झोपडी देते राहते. टोलेजंग इमले आसपास वाढत असताना ही झोपडी मात्र येणाऱ्या जाणाऱ्याचं लक्ष वेधते.
…त्यांच्या दु:ख दारिद्रयाची कहाणी काही असेल ती असेल पण पर्यावरणाला घातक असणाऱ्या आणि लोकांनी पाणी पिऊन रस्त्याकडेला फेकून दिलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्याचं घर मात्र त्या वळणावर अनेकांचं लक्ष वेधतंय हे मात्र नक्की..!
………….
राष्ट्र संत तुकडोजी महाराजांची रचना आठवून पुन्हा पुन्हा गुणगुणत माझा पुढचा प्रवास सुरु झालेला……!
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥
*
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥
*
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥३॥
*
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥
*
महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥
*
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥
*
पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥
….संत तुकडोजी महाराज
………………
आपणही त्या भागात गेलात की नक्की पहावी अशी ही प्लॅस्टिक बाटल्यांची झोपडी….!
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
।। श्री नारद उवाच ।।
(नारद भक्तिसूत्रे १२ व १३ – लेख क्र. १२)
भवतु निश्चयदार्ढ्यादूर्ध्वं शास्त्ररक्षणम ॥१२॥
अन्यथा पातित्याशङ्कया ॥१३॥
अर्थ: (अलौकिक अशा भगवत्प्रेमाचा मनात) निश्चय दृढ झाल्यानंतर शास्त्राचे रक्षण व्हावे. ॥१२॥
अन्यथा पातित्याची संभावना आहे. ॥१३॥
विवेचन:~ मागील सूत्रात लौकिक व वैदिक कर्मापैकी भगवद्भक्तीस अनुकूल कर्मे करावीत व भगवद्भक्तीविरोधी व्यवहारात उदासीनता राखावी, असे म्हटले आहे. त्याचा विचार त्या सूत्राच्या विवेचनात झाला आहे. भक्ताचे विशेष कर्तव्य अंतःकरणात भगवान् व त्याच्या प्राप्तीचे साधन भक्तिप्रेम याच विषयाचा निश्चय दृढ राखणे हे आहे; आणि हाच साधकाचा धर्म सांगितला आहे.
याविना अन्य धर्माचरणात भक्ताने स्वतःला बांधून घेऊ नये. श्रीतुकाराममहाराज हेच पुढील अभंगात सांगतात –
निष्काम निश्चळ विठ्ठलीं विश्वास । पाहों नये वास आणिकांची ॥२॥
तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला । नाहीं ऐकिला ऐसा कोणीं ॥३॥
(अभंग क्रमांक. ९४०, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)
मी साधक झालो, साधक म्हणून माझी प्रगती सुरू झाली, आता मला कोणताही नियम पाळण्याची अथवा बंधने पाळण्याची गरज नाही असे काही साधकांना वाटू शकते.
श्रीमद्भगवद्गीतेतील बाराव्या अध्यायात जी भक्तलक्षणे सांगितली आहेत, त्यांत ‘यतात्मा दृढनिश्चयः’ असे एक महत्त्वाचे लक्षण आहे.
विनोबाजी याचे गीताई मध्ये पुढील प्रमाणे भाषांतर करतात.
सदा संतुष्ट जो योगी संयमी दृढ निश्चयी|
अर्पी मज मनो_बुद्धि भक्त तो आवडे मज||
(गीताई १२. १४)
मन शुद्ध केल्याशिवाय साधकाची अध्यात्मातील प्रगती होऊच शकत नाही. साधकाचा ‘मन ते अमन‘ असा प्रवास असतो.
संत तुकाराम महाराज यांचा पुढील अभंग आपल्याला खूप काही सांगून जातो.
नाही निर्मळ जीवन । काय करील साबण॥ १ ॥
तैसे चित्तशुद्धी नाही । तेथे बोध करील काई ॥२॥
वृक्ष न धरी पुष्पफळ। काय करील वसंत काळ ॥ ३ ॥
वांजे न होती लेकुरे । काय करावे भ्रतारे ॥ ४ ॥
नपुंसका पुरुषासी । काय करील बाईल त्यासी ॥ ५ ॥
प्राण गेलिया शरीर । काय करील वेव्हार ॥ ६ ॥
तुका म्हणे जीवने विण । पिक नव्हे नव्हे जाण ॥ ७ ॥
(अभंग क्रमांक ४०४, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)
ज्याला परमेश्वराची प्राप्ती करवून घ्यायची आहे त्याने अनेक पथ्ये पाळण्याची गरज असते. संत तुकाराम महाराज म्हणतात, “जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, तेणें पथ्ये सांभाळावी”. अर्थात हा नियम दैनंदिन व्यवहारात देखील पाळावा लागतो. ज्या कार्यालयात आपण नोकरी करतो, तेथील नियम आणि अटी मनुष्याला कधी नाईलाजाने तर कधी आवडीने पाळाव्याच लागतात आणि इथे तर साक्षात भगवंताची चाकरी आहे तर मग नियम अधिक कठोर असणार आणि लबाडी चालणे शक्यच नाही. सर्व संत असे सांगतात की देव कुठे बाहेर भेटत नाही तर तो आपल्या अंतरंगात असतोच, फक्त मन आणि शरीर शुद्ध झाले की तो प्रगट होतो, साधकाचेला आत्मप्रचिती होते.
आपण कुठे बाहेरगावी फिरावयास गेलो तर आपल्या आवडीचे आणि खिशाला परवडेल असे राहण्याचे ठिकाण शोधतो. इथे तर साक्षात भगवंत राहायला येणार असेल (अंतरंगात प्रकट होणार! ) तर आपले शरीर आणि मन त्याला आवडेल असे ठेवायला नको का? समजा तसे ते नसेल तर तो एखादवेळेस येईल पण कायम राहील याची शाश्वती कोण देणार? म्हणून साधकाने आपले आचार, विचार आणि आहार अतिशय शुद्ध ठेवायला हवा. शरीर शुद्ध राहण्यासाठी साधकाने योग्य तितका व्यायाम नियमितपणे करावा तसेच सात्विक आहार घ्यावा. आहार पचायला हलका असावा, तसेच चवीला तीव्र नसावा. पोट भरेल आणि सुस्ती येणार नाही याची काळजी साधकाने जरूर घ्यावी. वाढत्या वयाबरोबर जिभेची चव आणि पोटाची भूक कमी व्हावी तसेच जिभेलाही थोडा आराम द्यावा. पचनसंस्थेस आराम मिळावा म्हणून साधकाने महिन्यातून किमान दोनदा किंवा जास्तीतजास्त चार दिवस उपवास करावा (निराहार राहावे). “एकादशी आणि दुप्पट खाशी” असे होऊ नये. अतिउपवास केल्यामुळे नैसर्गिक भूक मरते आणि शरीरात विकृती निर्माण होतात, असे पू. बाबा आपल्याला सांगतात. आहारावर नियंत्रण आले की झोपेवर नियंत्रण मिळविणे सोपे होते.
“ज्याने जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला” असे म्हणतात ते याचसाठी.
या विषयाशी निगडीत संतश्रेष्ठ श्रीएकनाथ महाराजांचा एक अभंग महत्त्वाचा आहे.
“हरिनाम स्मरतो म्हणोनि आचरसी दोष । श्रवण स्मरण भक्ति तेणें पडली वोस ॥१||हरिनामाचेनि बळे करिसी अदर्ध । देवाचेनी तुमचें शुद्ध नोहें कर्म ॥२॥ दुर्वासाचेनि कोपे अंबऋषीस शाप । देवाचे चक्रें त्या दिधलें संताप ॥३॥ सत्यवती धर्म सदयज्ञनिष्ठ । असत्य वचनी त्याचा झाला अंगुष्ठ ॥४॥ निष्पाप मांडव्य शुळीं वाइला । इतुकियास्तव यम दासीपुत्र केला ॥५॥ एका जनार्दनीं संत सोयीनें चाले । सदगुरुवचनें सबाह्म शुद्ध जालें ॥६॥”
(अभंग क्रमांक १६७१, एकनाथी अभंग गाथा)
याच दृष्टीने नारद महर्षीनी अन्यथा पातित्याशंकया’ असे सूत्रात म्हटले आहे की साधकाचे विहित कर्माचरण सुटले, अधर्मप्रवृत्ती वाढली तर कदाचित भक्तिमार्गापासून साधक पतित होण्याचा संभव आहे.
संतांची उच्छिष्टें। बोलतों उत्तरे।
काय म्यां पामरें। जाणावें हें।।
– संत तुकाराम महाराज
जय जय रघुवीर समर्थ!!
(वरील दोन्ही सूत्रे एकमेकांशी निगडीत असल्याने त्यांचे विवेचन एकत्र केले आहे.)