सौ. रेणुका धनंजय मार्डीकर
चित्रकाव्य
कोरांटी मनात बसली…
सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆
☆
जांभळी नि पांढरी
नाजूकशी पिवळी
हळूच पानात हसली
कोरांटी मनात बसली
*
जांभळी नी पांढरीचे
माळून मी गजरे
काळेभोर कुंतल हे
दिसती साजरे
*
बिया अन् पानफुल
खोड, मूळ सारे
रामबाण औषधाचे
खजिनेच न्यारे
*
नसेना का सुगंध
रंग हिचे छान
कुठेही उगवते
नको मानपान
*
मुलायम रेशमी
बिया हिच्या सोनेरी
वज्रदंती म्हणती हिला
नावात ही जादुगरी
*
आजीच्या बटव्यात
आहे हिला स्थान
पिवळ्या कोरांटीचा
जरा जास्तच मान
*
आठवांची झुळूक येता
मन जाते तेथे
फुलांच्या ताटव्यात
उभी होते जेथे
*
काव्य गजऱ्यात आज
कोरांटी मी माळली
काव्यास शृंगारून
शब्दावर भाळली
☆
© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर
औसा.
मोबा. नं. ८८५५९१७९१८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

















