मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “देवांचा व्हाट्सअप ग्रुप …” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “देवांचा व्हाट्सअप ग्रुप …” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

देवसुद्धा कंटाळले

सारखा ऐकून जप

ठरवलं मग त्यांनी

करु सुरू व्हाॅटस अप

*

मनात करून विचार नारदांनी

मारली ब्रह्मदेवांना Pin

म्हणाले महाराज,

आपणच व्हा ना Group Admin

*

खूप करून विचार

दिली ब्रह्मदेवांनी संमती

मग Netpack आणि Wi-Fi संगे

आली Smartphones ना गती

*

सर्व देवांना Add करुन

रात्री ब्रम्हदेवांनी गाठली शेज

सकाळी आला गणरायाचा

पहिला Good Morningचा मेसेज

*

पण नेमकी त्यावेळी

कैलासावर नव्हती Range

तिन्हीसांजेला मिळाला

कैलासपतींना तो GM चा Message

*

क्रोधित होऊन त्यांनी,

पुत्राला केले Connect

कोपलेल्या महादेवांनी

नंतर ग्रुपच केला Left

*

सरस्वतीदेवींनी पाठवले

ज्ञानाचे Message

तर अप्सरांनी केल्या

Beauty Tips पेश

*

धनप्राप्तीसाठी लक्ष्मी-नारायणांनी

लिहीले अनुभवाचे बोल

तर गुरुदेव दत्तांनी लिहीले

शांती व वैराग्याचे मोल

*

गोपाळकृष्णांनी केले

Photo Upload

पण प्रभू रामचंद्रांची एक पत्नी व्रताचीच

कविता ठरली तोडीस तोड

*

आई अन्नपूर्णेने ग्रुपवर

टाकल्या छान छान पाककृती

तर धन्वंतरी म्हणाले

सगळं खा पण जपा आपली प्रकृती

*

मारुतीरायांनी लिहिला लेख

योगा आणि Gym चे फायदे

संतप्त दुर्गादेवी म्हणाल्या

पाळा सर्व नियम आणि कायदे

*

यमराजांनीसुद्धा रेडा सोडून,

फोटोसाठी मागितली Bike

तर पंढरीच्या विठ्ठल रखुमाईंच्या

फोटोला आले प्रचंड  Like

*

Whats Appच्या या खेळात,

देव पुरते झाले दंग

पण धरतीवरची सारीच,

यंत्रणा झाली की हो भंग

*

माणसाच्या कर्तृत्वाला

नव्हते देवांचे आशीर्वाद

होऊ लागले त्यांच्यात

तंटे, बखेडे, वितंडवाद

*

मग मात्र नारदमुनींचे

धाबे पुरते दणाणले

ब्रम्हदेवांना ते परत

एकदा शरण गेले

*

म्हणाले देवा, Group

सारा करा Delete

सगळ्याच देवांना

याचा आला आहे वीट

*

माणसांनाच करू द्या

त्यांचे हे रोजचे काम

आपण फक्त देऊ आशीर्वाद

ऐकूनी आपुले नाम

☆  

कवी: अज्ञात

प्रस्तुती : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #289 ☆ श्रावण होऊ… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 289 ?

☆ श्रावण होऊ… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

दीन उपाशी त्याच्यासाठी जेवण होऊ

पालनकर्त्या बापासाठी श्रावण होऊ

*

ह्या कष्टाळू रांगा पाहुन बरे वाटते

मुंग्यांसाठी थोडासा साखर कण होऊ

*

उघड्यावरती विकार त्याची लाज वाटते

त्याच्यासाठी अलमारीचा रे खण होऊ

*

शेतामधली माती घेतो अंगावरती

निर्मळ होण्यासाठी त्याचा साबण होऊ

*

फाटक्याच या पोत्यामधुनी कष्ट सांडती

गोणपाट हे शिवण्यासाठी दाभण होऊ

*

ब्राह्मण होता राक्षस होता विद्या होती

केवळ विद्या घेण्यासाठी रावण होऊ

*

भाळावरचे कुंकू झालो भाग्यवान मी

आज प्रियेच्या हातावरचे गोंदण होऊ

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ओळख… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

 

? कवितेचा उत्सव ?

☆ ओळख… ☆ श्रीशैल चौगुले ☆

मी आहे कुणाचा सांगाल तरी

कुणी द्यावै माझी ओळख खरी

*

जात नाही, धर्म नाही कोणता

मानवच जगलो आजवरी

*

सत्यसेवा आहिंसा बाणवूनी

निती मुल्ये आचरणली अंतरी.

*

अहंकार ना मोह धरियेला

थोर पुरुष संत सेवाच बरी.

*

नाव घेऊनी अनेकांची हाक

नको भेद मानवा भिन्न उरी.

*

त्यागावे हिंसा अत्याचाराची

ज्ञान संस्कार हि शस्त्र सुरी.

*

ओळखावे मला पुनः पुन्हा

एक स्वातंत्र्य सेवा पुजारी.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रेषा माझ्या मनातली… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ रेषा माझ्या मनातली☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆  

रेष अपुली जास्त मोठी वाढवावी लागते

उन्नतीसाठी कुणाची खोडणे नाकारते

*

मार्ग असतो शांततेचा लाख मोलाचा जरी

मार खाणे बघ तुझ्या क्षमतेसही ललकारते

*

खोदतो खड्डा कुणासाठी नसे हे चांगले

खोदण्यातच व्यस्त राहत पूर्ण जीवन संपते

*

पायव्याला द्वेष, मत्सर अन् इमारत बांधली

मंदिराची मग अपेक्षा काय म्हणुनी ठेवते

*

अंतरंगी पेरलेले बीज केवळ सूड का?

भाव फुटतो अंकुराला जो मनी तू पेरते

*

झेप घे अवकाश आहे छान मोठे मोकळे

मन तुझे आभाळ झाले हे जगाला सांगते

*

डाग चारित्र्यास कोठेही न लागावा कधी

ती शहाणी वाटते जी योग्य वाटा चालते

 

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ढोरं तरी बरी। वर्तनात ॥ ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ढोरं तरी बरी। वर्तनात ॥ ? श्री आशिष  बिवलकर ☆

अठरा वर्षांनी | पाळणा हलला |

आरसीबी झाला | जेतेपदी ||१||

*
बंगळूर मध्ये | विजयी आनंद |

क्रीडा प्रेम धुंद | विजयात ||२||

*

विना नियोजन | विजयाची यात्रा |

उत्साहाची मात्रा | अतिरेक ||३||

*

उसळली गर्दी | चेंगराचेंगरी |

अनागोंदी सारी | भोवताली ||४||

*

निष्पाप लोकांचे | नाहकच बळी |

मृत्यू अवकाळी | नशिबासी ||५||

*

क्रिकेटपटूंना | प्रसिद्धी व पैसा |

सामान्यांचा कैसा | जीव गेला ||६||

*

माणूस तो ऐके | फक्त ज्ञानेश्वरी |

ढोरं तरी बरी | वर्तनात ||७||

© श्री आशिष  बिवलकर

दि. 05 जून 2025

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तू… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ तू… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तू श्वास, तू ध्यास, तू हव्यास

जन्मजन्मांतरीचा

 

तू ध्येय, तू श्रेय, तू प्रमेय

जन्मभर न सुटणारे

 

तू वलय, तू प्रलय, तू मलय

आयुष्याच्या वास्तवाचा

 

तू हात, तू साथ, तू प्रपात

कर्तृत्वाच्या वाटेवरचा

 

तू कामना, तू वासना तू साधना

संभ्रमात टाकणारी

 

तू हीत, तू प्रीत, तू गीत

जीवन प्रवासातले

 

तू कर्म, तू धर्म, तू मर्म

जगताना पाळलेले

 

तू आशा, तू मनिषा, तू प्रतिक्षा

अंतीम प्रवासाची

 

तू आवेश, तू आदेश, तू संदेश

तेजोवलय निर्मितीचा

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अघटित…☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ अघटित ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

विधिलिखित ते कुणा न चुकले दैव गती ही न्यारी

सारे काही ठरले म्हणतो, म्हणतो कृष्ण मुरारी..

अवघ्या काही क्षणात घडले घडले ते धडपडले

घास मुखी अन्नाचा ज्यांच्या त्यांना घेऊन गेले…

*

कुणी बाप तो कुणी आजोबा काका मामा होता

आधाराचा खांब घराचा कर्ता घराचा होता

काय तिथे आकांत उसळला कल्पनेत ना येतो

जीवघेणा हा प्रवास जीवनी क्षणात बुडबुडा फुटतो…

*

क्षणभंगुरता पदोपदी ही सामोरी ती येते

किती कोळसे झाले पहा ना जीव ते ओळखू न येती..

काळे कोळसे अवयवांचे जळून उघडे पडले

असे काय रे पाप तयांनी सांग जीवनी केले…

*

मुलाकडे कुणी घरटी आपुल्या आनंदे जात ते होते

रात्री उशिरा येतील परतून, तोडून गेले नाते

दृष्टीला हे पुन्हा न दिसतील कुणी कल्पिले होते

अर्ध्यावरती सोडून यात्रा असे कुणी का जाते..

*

उत्तर नाही जवळी आपुल्या कळसुत्री बाहुल्या

नाचनाचता सुटली दोरी यमसदनास पोहोचल्या

किती तो पैसा सुविधा सुखदा क्षणात विरूनी गेले

चटका लावून सुहृदांना ते होत्याचे नव्हते झाले..

*

डोंगर दु:खाचा तो पहाड कराड का कोसळली

का रे विधात्या सांग जरा तू पापे कोणती घडली

मनमानी तू करतो म्हणावे, म्हणतो सारे ठरले

जीवनरेषा बघ संपली दैव इथेही हरले…

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

मो. ९७६३६०५६४२; ईमेल – svpawar6249@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मूळ शोधता दु:खाचे… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ मूळ शोधता दु:खाचे… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

धागे तुटता स्नेहाचे,

कसे गणगोत शोधू!

क्षीण उमेदीने कशी,

जुनी वास्तू बांधू!

तेल संपता दिव्याचे,

वात सैरभैर झाली.

वळचणीस तमाच्या,

जीर्ण स्मरणे ही आली.

ठेव खिडकी उघडी,

मिट निग्रहाचे दार.

सोबतीला वृक्षावर,

पक्षी जमतील चार.

उपहास नि उपेक्षा,

हेच माझे धरोहर.

मूळ शोधता दुःखाचे,

भेटे सुखाचे माहेर.

माझा दुर्दम्य विश्वास,

आणि संयम कठोर.

करुणेने कधीतरी,

तुझा द्रवेल ईश्वर.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ निर्मात्याचे वर्तुळ… कवयित्री : सुश्री आश्लेषा महाजन ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

सुश्री नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆ निर्मात्याचे वर्तुळ… कवयित्री : सुश्री आश्लेषा महाजन ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

☆ कविता ☆ निर्मात्याचे वर्तुळ

अगाध विश्वाच्या

अनाकलनीय संरचनेचा

अज्ञात निर्माता असावास तू…

 

चराचरातील गुंतागुंतीमधील

संगती-विसंगतीचा डाव मांडणारा

बुद्धिमान सूत्रधार बहुदा तू….

 

विवेकी तर्काला आव्हान देत

नियतीला लीलया नाचवणारा

बिलंदर खेळिया भासतोस तू…

 

पण युगांपासून तुझ्या निराकाराला

आकार देऊ पाहणारा,

तुझ्या अमूर्ततेला गोचर करू धजणारा

माणूसच तर आहे हाडामासाचा,

हे ज्ञात आहेच की तुला…!

 

तुला अनुभवताना त्या माणसातूनच

आरपार पाहते मी पल्याडचे निर्गुण!

त्यावेळी लगडून आलेल्या मानव्याशी- तदाकार होतात निर्मम भाव.

 

मूर्ती पाहताना शिल्पीच मोहवतो अधिक मला!

छिन्नी मारताना ठिबकलेल्या –

त्याच्या घामाचा गंधच भुरळ घालतो…

 

तू विश्व निर्माण केले असले तरी –

तुला पुन्हा मानवानेच चित्रांकित केले…!

वर्तुळाच्या ह्या अंत्यबिंदूपाशी

काही क्षण तरी मी स्थिरचित्त होते…

 

म्हणूनच तू आणि तुला सगुण करणारा

माणूस,

ह्या ‘दोन्ही निर्मात्यांना’

मी निःशब्द नमन करते…

© सुश्री आश्लेषा महाजन

मोब. ९८६०३८७१२३, ashlesha27mahajan@gmail. com

रसग्रहण ☆ नीलिमा खरे ☆ 

जाणिवांचे भान असलेली, परिस्थितीविषयीची सत्यता व असत्यता बुद्धीच्या निकषावर तपासून पाहणारी एक सजग, विवेकी, विचारी व अत्यंत प्रगल्भ कवयित्री म्हणून आश्लेषाताई महाजन सुपरिचित आहेत. त्यांची “निर्मात्याचे वर्तुळ” ही कविता वाचनात आली. आणि मी खरोखर अंतर्बाह्य हलले, हेलावले व त्या “वर्तुळाच्या” आवर्तनाच्या प्रत्ययात हरवले देखील! ! जाणीवांना व भावनांना विचाराची जोड देऊन जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनाचे प्रतिबिंब वाटावे अशी ही कविता..

“निर्मात्याचे वर्तुळ” या वेधक, अतिशय समर्पक व सूचक काव्यशीर्षकामुळे कवितेच्या विषयाची थोडी कल्पना येवू शकते.. वाचकाच्या सजग दृष्टिकोनाला आवाहन झाल्याने एक विशिष्ट भावविचार मनात उमटतो. त्यामुळे कविता वाचल्यावर आशयाचे सुस्पष्ट आकलन ही होते. कदाचित कवयित्रीला हेच अपेक्षितही असावे..

अगाध विश्वाच्या

अनाकलनीय संरचनेचा

अज्ञात निर्माता असावास तू…

हे विश्व अगाध म्हणजेच अमर्याद, गहन आहे. याचा आरंभ व अंत शोधणे महा कर्मकठीण आहे. किंबहुना ते सर्वथैव अशक्य ही आहे. या विश्वाच्या अनाकलनीय अर्थात आकलनाच्या पलीकडे असलेल्या संरचनेचा निर्माता “तो”असावा अशी सामान्यतः मनोधारणा आहे. संचरना या अत्यंत अर्थपूर्ण शब्दातून विश्वातील अनेक प्रणाली, त्यातील विविध घटकांची व्यवस्था याकडे लक्ष वेधले आहे. विश्व निर्मिताना हे असे व असेच का असावे, त्यातील कार्यकारण भाव, त्याचे परिणाम, दुष्परिणाम, त्याचा समतोल इत्यादी विचारांची दखल घेणारा “तो” निर्माता कदाचित तू असावास असे कवयित्रीला वाटते आहे. हा विचार वास्तवाला, सत्याला धरुन आहे. जग निर्माण करताना त्याने अनेक गोष्टींचा विचार केला आहे हे कळते, प्रकर्षाने लक्षातही येते. “तो” जो कोणी आहे तो अज्ञात आहे हे मात्र नक्की…

कदाचित या शब्दातून कुठलेही ठाम मत वा विचार मांडलेला नाही. कारण अजूनही या विषयावर शास्त्रीय आधारावर कुठलीच गोष्ट पूर्णतःसिद्ध झालेली नाही. अर्थात ज्या काही गोष्टी कळल्या आहेत त्याही पलीकडे काहीतरी आहे हे निश्चित. अतिशय अर्थपूर्ण व मोजक्या शब्दातून त्या निर्मात्याविषयीची भावना प्रभावीपणे मांडली आहे.

हे वास्तव या कवितेचा आधार आहे. कविता केवळ कवी कल्पना नाही.. अगाध, अनाकलनीय, अज्ञात या “अ”ने सुरू होणाऱ्या शब्दांचा वापर कवितेला साहित्यिक सौंदर्य प्रदान करतो.

चराचरातील गुंतागुंतीमधील

संगती-विसंगतीचा डाव मांडणारा

बुद्धिमान सूत्रधार बहुदा तू….

चराचरातील, वातावरणातील व त्यातील घटकांच्या गुंतागुंतीच्या, क्लिष्ट वर्तनाचा, त्यातील संगती व विसंगतीचा डाव मांडणारा बुद्धिमान सूत्रधार तू आहेस असे प्रतिपादन कवयित्रीने केले आहे. खरोखरच अशा पद्धतीचा रंजक व त्याचवेळी कल्पनेच्याही पलीकडे काही आहे ही भावना जागृत करून आगळा वेगळा डाव मांडणारा हा सूत्रधार नक्कीच अतिशय बुद्धिमान, कल्पक असणार हे निर्विवाद.. “बहुदा” या शब्दातून परत कुठलेही मत वा भूमिका ठामपणे मांडलेली नाही. कारण कवितेतील आशयाला हीच भूमिका योग्य आहे. मानवी जीवन व सृष्टीचे, चराचराचे जीवन यात खरोखरच अनेकदा सुसंगती दिसून येत नाही. तसेच त्यातील गुंतागुंत अनाकलनीय भासते.

विवेकी तर्काला आव्हान देत

नियतीला लीलया नाचवणारा

बिलंदर खेळिया भासतोस तू…

कवयित्रीला विवेकी बुद्धीप्रामाण्याला, तर्काला आव्हान देणारा, ठरणारा व नियतीलाही लीलया नाचवणारा हा बिलंदर खेळाडूच भासतो. हे विश्व जणू एक भास आहे या अर्थाने भास शब्दाची योजना अर्थपूर्ण आहे. खरोखरच बुद्धीच्या निकषावर बुद्धी वापरून कितीही शोध घ्यायचा प्रयत्न केला तरी या निर्मात्याविषयीचे गूढ अजूनही आपल्या आवाक्यात आलेले नाही. परंतु त्याचवेळी आजूबाजूला घडणाऱ्या घटना घडवणारा “कुणीतरी” आहे ही जाणीव सतत होत असते. लीलया शब्दातून या घटना अगदी सहजतेने घडत असतात हे कळते. तसेच त्याची ही “लीला” आहे हे लक्षात येते. नाचवणारा म्हणजे खरोखर शब्दशः अगदी कळसूत्री बाहुली प्रमाणे स्वतःच्या इशाऱ्यांवर, बोटांवर नाचवणारा, खेळवणारा हा अपेक्षित भाव ध्यानात येतो. त्याने हा खेळ मांडला आहे ही भावना अधोरेखित करताना त्याला खेळिया संबोधले आहे. बिलंदर या शब्दातून अपेक्षित लबाड, धूर्त, लुच्चा, ठक, फसविणारा या सर्व अर्थाचे भाव अगदी सुयोग्य व प्रभावी पद्धतीने व्यक्त होतात.

पण युगांपासून तुझ्या निराकाराला

आकार देऊ पाहणारा,

तुझ्या अमूर्ततेला गोचर करू धजणारा

माणूसच तर आहे हाडामासाचा,

हे ज्ञात आहेच की तुला…!

वास्तवाला धरून असलेले हे निर्मात्याच्या अस्तित्वा विषयीचे मत मांडून झाल्यानंतर कवयित्री स्वतःच्या बुद्धीला पटणारे विचार व्यक्त करताना म्हणते की या अदृश्य, अगम्य, निराकार अस्तित्वाला रूपाचे रुप देवू पाहणारा, देणारा तसेच अमूर्ततेला गोचर करू धजणारा, भासमान अस्तित्वाला आपल्या भावनेतून, विचारातून व कल्पनेतून युगानुयुगांपासून आकार देणारा हाडामासाचा माणूसच आहे. व हे सत्य अर्थातच तुलाही ज्ञात आहेच ही जाणीव स्पष्ट शब्दात व्यक्त केली आहे. कारण माणसाला निर्मिणारा व त्याला बुद्धी देवून त्याच्या हातून काही घडवून आणणारा हा तोच निर्माता आहे या वास्तवाकडे अगदी सहजतेने निर्देश केला आहे.

“अमूर्त” म्हणजे जी गोष्ट थेट इंद्रियांद्वारे जाणली जात नाही. निर्मात्याच्या अस्तित्वाविषयी हेच सत्य आहे. गोचर रूप म्हणजे इंद्रियांद्वारे होणारे ज्ञान, प्राप्त होणारा अनुभव. अदृश्य निर्माणकर्ता व त्याचे अस्तित्व जाणून घेण्याचा प्रयत्न माणूस पंचंद्रियांनी निरंतर करीत आहे. “धजणारा” या शब्दातून माणूस जे काही करतो आहे ते धारिष्ट्य आहे ही बाब जाणवते. अर्थात तो या अदृश्य निर्मात्याला पूर्णपणे जाणून घेऊ शकलेला नाही, शकणार नाही. त्याच्या रूपाला आकार देण्याचे सामर्थ्य त्याच्यात नाही. युगानुयुगे या शब्दामुळे हा प्रयत्न सतत चालू आहे, त्यात माणसाला न लाभलेले यश व या प्रयत्नातील फोलपणा जाणवतो.

तुला अनुभवताना त्या माणसातूनच

आरपार पाहते मी पल्याडचे निर्गुण!

त्यावेळी लगडून आलेल्या मानव्याशी- तदाकार होतात निर्मम भाव.

या विचारांच्या पार्श्वभूमीवर व अनुभूतींच्या टप्प्यावर कवयित्री म्हणते की त्या अमूर्ततेला “अनुभवताना”, त्याविषयी जाणून घेताना कवयित्री माणसातूनच, त्याच्या अस्तित्वातूनच”आरपार” पाहते. “आरपार” या शब्दाचे महत्त्व अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण. दृष्टिकोनातील पारदर्शकता जाणवते. कुठलेही भ्रम, पूर्वग्रहदूषित वा पूर्वाधारित मते जाणीवपूर्वक बाजूला सारली आहेत. ती पाहते… काय पाहते तर पल्याडचे निर्गुण… पैलतीरावर असणारे, जाणवणारे, भासणारे गुणरहित आकारहिन “त्याचे” अस्तित्व.. अर्थातच हे अमूर्ततेचे, “निर्मात्याचे वर्तुळ”,

“वलय” परत अमूर्ततेला पोहोचवते, भिडते. पण त्याला स्पर्श करता येत नाही. गुणांचे दिव्यत्व व त्याचे प्रकाशमान आणि प्रकाशदायी अस्तित्व महत्त्वाचे.. निर्गुणाची ही भक्ती म्हणजे सामान्य भक्तीची पुढील पायरी समजली जाते. त्यामुळे लगडून आलेल्या मानव्याशी कवयित्रीचे निर्ममभाव तदाकार होतात. “लगडून “मधे “लगटून” शब्दाचा भाव जाणवतो. जवळ असणे, भरभरून येणे असा भावार्थ. तसेच संख्येतील अधिकाचे प्रमाण अपेक्षित आहे. कवयित्रीच्या मनात भावना भरभरून दाटून येतात. या भावना मानव्य अर्थात मानव, मानवी रुपाशी, जीवनाशी संबंध जोडतात. एकूणच धर्म, संस्कृती, संगीत, इतिहास, तत्त्वज्ञान, कला, संस्कृती या सर्वांगीण व सर्वंकष बाबींविषयी, त्यातील सत्याशी तदाकार पावतात, एकरूप होतात, समरस होतात. त्यांच्या प्रमाणेच त्यांच्या स्व-रूपासम भाव मनात निर्माण होतो. उदाहरणार्थ तदाकार ब्रह्म.. बहरुन आलेल्या या भावना निर्मम आहेत. निर्मम या शब्दातून माया, ममता, प्रेम व आसक्ती नसणारा तसेच अहंकार विरहित भाव जाणवून दिला आहे. अर्थातच मानवी जीवनाशी संबंधित असलेले मोह माया हे विचार बाजूला होतात.

मूर्ती पाहताना शिल्पीच मोहवतो अधिक मला!

छिन्नी मारताना ठिबकलेल्या –

त्याच्या घामाचा गंधच भुरळ घालतो…

मनात विचारांचे आवर्तन तसेच त्यातील परिवर्तन घडत असताना, अनुभवत असताना त्याविषयीचे उदाहरण कवयित्रीने दिले आहे. मूर्ती पाहताना ती घडवणारा शिल्पीच तिला अधिक भावतो, मोहवितो. याचे प्रमुख कारण तो त्या मूर्तीचा निर्माता, जनक आहे. तो त्याच्या कल्पनेने, कलेने, कष्टाने मूर्तीमध्ये सजीवता आणि भाव ओतण्याचा प्रयत्न करतो. छिन्नी मारताना त्याने घेतलेल्या श्रमांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ते कष्ट करत असताना ठिबकलेल्या घामाचा गंध तिला भुरळ घालतो. अर्थात केवळ दैववादी असण्यापेक्षा कर्मयोगाकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न आहे हे कळते. “ठिबकणे” या शब्दातून एखादी क्रिया हळूहळू घडणे हा भाव, ही भावना व्यक्त होते. कर्मयोग आचरताना हा विचार मनात असावा. निरंतर कर्म करत राहावे असा दृष्टिकोन लक्षात येतो. अशा कर्मयोगातून मिळालेला, लाभलेला समाधानाचा, कीर्तीचा गंध हा आयुष्यात जास्त महत्त्वाचा आहे हे जाणवून दिले आहे. कवयित्रीची कर्मयोगावरील ही निष्ठा मनाला स्पर्शून जाते व आपल्यालाही विचार करायला लावते.

तू विश्व निर्माण केले असले तरी –

तुला पुन्हा मानवानेच चित्रांकित केले…!

वर्तुळाच्या ह्या अंत्यबिंदूपाशी

काही क्षण तरी मी स्थिरचित्त होते…

त्या अज्ञात शक्तीने जरी विश्व निर्माण केलेले असले तरी त्याला पुन्हा चित्रांकित करण्याचे काम मानवानेच केले आहे. त्याला दृश्य स्वरूप देऊन चित्रमय रूप पुन्हा मानवानेच दिले आहे. त्यामुळे ज्या मानवाची निर्मिती त्या अज्ञात निर्मात्याने केली त्याचे अदृश्य स्वरूप दृश्य रुपात

निर्माण करण्याचे काम त्यानेच निर्माण केलेला माणूस करतो. अशा पद्धतीने हे वर्तुळ पूर्ण होताना त्याच्या अंत्यबिंदूपाशी असे कवयित्रीचे बावरे, गोंधळलेले मन काही क्षण का होईना स्थिरचित्त होते. या सर्व अनुभूतीतून ती तिच्यापुरता निष्कर्ष काढते. जणू तिला या सर्व वैश्विक पसाऱ्याचा खराखुरा अर्थ समजला आहे. यातील गोष्टींविषयीची अनाकलनीयता, गहनता क्षणभर का होईना बाजूला सरली आहे, त्यातली दुर्बोधता दूर झाली आहे. अर्थात कवयित्री हे स्पष्टपणे मान्य करते की ही अवस्था, भावावस्था केवळ क्षणभरच टिकते आणि पुन्हा पुन्हा मानवी मन सगुण रूपाकडे धाव घेते. तिला झालेला हा भावनिक साक्षात्कार तात्पुरता असतो व परत व्यावहारिक गोष्टींकडे तिचे मन ओढ घेते व त्यात गुंतते.

म्हणूनच तू आणि तुला सगुण करणारा

माणूस,

ह्या ‘दोन्ही निर्मात्यांना’

मी निःशब्द नमन करते…

विवेकी मनाने केलेला वैचारिक ऊहापोह तिला एका ठोस निष्कर्षाप्रती घेऊन जातो. आणि म्हणून ती त्या अज्ञात निर्मात्याला आणि त्याच्या निर्गुण निराकार रूपाला सगुणरूप देणारा माणूस… अशा या दोन्ही निर्मात्यांना ती नि: शब्द नमन करते. दोघां प्रतीची तिची भावना महत्त्वाची आहे. नि:शब्द म्हणताना तिच्या जवळील शब्दसंपदा ही अनुभूती वर्णन करण्याकरता अपुरी पडते आहे हे ती प्रामाणिकपणे कबूल करते. ही भावना केवळ हृदयातून जाणवण्याचीच आहे हे लक्षात येते आणि सरते शेवटी कर्मयोगावरील श्रद्धा ठेवून जगणे आणि अज्ञात निर्मात्याकडे त्याच श्रद्धेने पाहणे व त्याप्रती विनीत असणे ही भावना वाचकाच्या मनातही जागी होते. निर्गुण व सगुण रूपाप्रती नतमस्तक होणे हे नक्कीच आपल्या हातात आहे.

तसं पाहिलं तर आयुष्यात क्षणोक्षणी अज्ञात शक्ती विषयीची भावना मनात येत असते. त्याचवेळी बुद्धीच्या जोरावर आपण सर्व काही करू शकतो ही मानवाच्या मनात असलेली भावना किती फोल आहे हे लक्षात येते. कुठलीतरी अज्ञात शक्ती आहे हे मानावे असा विचार प्रबळ होतो. पण अशा वेळी “असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी” अशी हतबलतेची, विवशतेची आंधळी श्रद्धा उपयोगाची नाही. प्रयत्नांची जोड देत कर्म करत राहणे हेच मानवी जीवनाचे सार आहे. अतिशय सुयोग्य, अर्थपूर्ण, अर्थवाही शब्दांतून कवयित्रीने ही सार्वत्रिक भावना कवितेत मांडली आहे. विचार मांडताना योजलेल्या शब्दांमधील, शब्दांतील अर्थ कवितेतील आशयाला पुष्टी देतो. एक सुंदर वैचारिक, व्यावहारिक व प्रामाणिक अनुभवाचा आनंद देणारी ही कविता…

© सुश्री नीलिमा खरे

२५-५-२०२५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दुसरे मी काय केले? –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ दुसरे मी काय केले? –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

एक दिवस लेकीला आई बोले –

 रांधा, वाढा, उष्टी काढा

दुसरे मी काय केले?

लेक म्हणे हसून,

श्लोक, ओव्या, सुरेल गाणी

तूच ना आम्हा ऐकवलेस?

स्वच्छ वाणी, सुरेल शब्द

भांडार तूच खुले केलेस

 *

तुझा स्वयंपाक बघून बघून

मलाही लागली गोडी,

तुझ्यातली अन्नपूर्णा

माझ्यातही आली थोडी.

 *

संस्कार वर्गात नाही जावे लागले आम्हाला! कसे वागावे, कसे बोलावे ठेवा तुझाच सर्वांना!

 *

नव्हते यू ट्यूब, नव्हते गुगल,

तरी काहीच अडले नाही

तुझ्यासोबत. बोलताना

गोष्टी कधीच संपल्या नाहीत.

 *

सण, सोहळे, लग्नकार्य

तुझेच इव्हेंट मॅनेजमेंट

जमाखर्च, देणीघेणी

तूच शिकवलीस ॲडजेसमेंट

 *

आमच्या छोट्या दुखण्यांसाठी

डाॅक्टर आमचा तूच होशी

ओवा, हळद, शेपा, हरडा

आजही असते माझ्यापाशी

 *

तुझी रांगोळी, तुझे भरतकाम

कलात्मकता शिकवून गेली

माहीत नाही कशी केव्हा

सुंदरता या जीवनी आली.

 *

पै पाहुण्यात वाढलो म्हणून

कंटाळा आजही येत नाही,

माणसं जोडण्याची कला.

जणू जगण्याचाच भाग होई!

 *

तरीही आई आता असं का म्हणतेस

 आयुष्यात मी काय केले?

तुझ्याशिवाय का गं आई

 माझ्यातल्या कळीचे फूल झाले?

कवी:अज्ञात

प्रस्तुती : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares