ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २६ नोव्हेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? २६ नोव्हेंबर –  संपादकीय  ?

आज २६ नोहेंबर :- 

फक्त आधुनिक मराठी साहित्यातच नाही, तर एकूणच भारतीय  साहित्यात मोठी भरारी घेतलेले अग्रेसर लेखक असा गौरव प्राप्त केलेले श्री.भाऊ पाध्ये यांचा आज जन्मदिन. (२६/११/१९२६ — ३०/१०/१९९६) 

‘साहित्यिक ‘ या ठळक ओळखीबरोबरच, कामगार चळवळकर्ते, पत्रकार, म्हणूनही सुपरिचित असणारे श्री. भाऊ पाध्ये ( प्रभाकर नारायण पाध्ये ) यांनी कादंबरी, कथा , नाटक अशा सर्व माध्यमांमधून मुख्यतः सामाजिक विषयांवर आधारित असे विपुल लेखन केलेले आहे. वैतागवाडी, वासूनाका, राडा, वणवा, करंटा, अग्रेसर, वॉर्ड नं. ७–सर्जिकल, होमसिक ब्रिगेड, बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर, जेल बर्ड्स, डोंबाऱ्याचा खेळ, या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यापैकी ‘ वैतागवाडी ‘ या कादंबरीच्या ५ आवृत्त्या काढल्या गेल्या आहेत . वासूनाका, राडा, बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर, या कादंबऱ्या आधुनिक मराठी साहित्यातील ‘ क्लासिक ‘ कादंबऱ्या म्हणून नावाजल्या गेल्या आहेत. ‘ वासूनाका ‘ ही कादंबरी काहीशी  विवाद्य ठरली होती खरी, पण दुर्गा भागवत, विजय तेंडुलकर यासारख्या लेखकांनी त्या कादंबरीतील मानवतेचे वास्तव चित्रण आणि मौलिकता याचे फार कौतुक केले होते. 

थोडीसी जो पी ली, थालीपीठ, मुरगी, डोंबाऱ्याचा खेळ , असे त्यांचे कथासंग्रह, आणि पिचकारी ही विनोदी कथाही वाचकांच्या पसंतीस पूर्णपणे उतरले होते. “ गोदाम “ या चित्रपटाची कथाही श्री. पाध्ये यांनीच लिहिलेली होती. त्यांनी “ ऑपरेशन छक्का “ हे नाटकही लिहिले होते. रहस्यरंजन, अभिरुची, माणूस, सोबत क्रीडांगण, दिनांक, चंद्रयुग, अशा लोकप्रिय मासिकांसाठी ते सातत्याने स्तंभलेखन करत असत. 

भाऊ पाध्ये यांच्या साहित्यावर, “ वासूनाका सांगोपांग “ हे वसंत शिरवाडकर यांनी संपादित केलेले पुस्तक, आणि “ मी आणि माझे समकालीन “ हे श्री. दिलीप पु. चित्रे यांनी लिहिलेले पुस्तक,अशी दोन पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. 

त्यांच्या “ वैतागवाडी “ या कादंबरीला महाराष्ट्र राज्य पुरस्कार, “ बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर “ या कादंबरीला ललित पुरस्कार, आणि त्यांना स्वतःला ‘ महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ गौरववृत्ती ‘ देऊन गौरवण्यात आले आहे. 

आधी ‘ हिंद मजदूर ‘,’ नवा काळ ‘, आणि नंतर सलग दहा वर्षे ‘ नवशक्ती ‘ या दैनिकांसाठी त्यांनी पत्रकारिता केलेली होती. 

“ विश्वसाहित्यात हे नाव कायमचे कोरले जाईल “ असे ज्यांच्याबद्दल म्हटले जायचे, त्या श्री. भाऊ पाध्ये यांना हार्दिक अभिवादन. ?

☆☆☆☆☆

महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत कम्युनिस्ट कामगार नेते कॉ.गोविंद पानसरे यांचाही आज जन्मदिन. ( २६/११/१९३३ — २०/०२/२०१५ ) 

एक वर्तमानपत्र-विक्रेता, मग नगरपालिकेत शिपाई, मग प्राथमिक शिक्षक, अशी वाटचाल करत शिवाजी विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत झालेले कॉ. पानसरे, कामगारांचे वकील म्हणून कोल्हापुरात नावाजले गेले होते. आणि पुढे वकील संघटनेचे अध्यक्षही झाले होते. समाजातील सर्वात जास्त शोषित असणाऱ्यांच्या, तसेच असंघटित कामगार, शेतमजूर, घरगडी, अशासारख्यांच्या  हक्कांसाठी, कुठलीही तडजोड न करता लढणारे कार्यकर्ता अशीच त्यांची सर्वमान्य ओळख होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, यात त्यांचा सक्रीय सहभाग होता. शांतता व निरपेक्षता यासाठीच्या अभियानांमध्येही ते सातत्याने कार्यरत होते. 

त्यांनी,– अवमूल्यन : कळ सोसायची कुणी ?, काश्मीरबाबतच्या कलम ३७० ची कूळकथा, कामगार-विरोधी कामगार धोरणे, धर्म-जात-वर्ग आणि परिवर्तनाच्या दिशा, पंचायत राज्याचा पंचनामा, मार्क्सवादाची  तोंडओळख, शेतीधोरण परधार्जिणे, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी–पर्यायी दृष्टिकोन, अशी अनेक अभ्यासपूर्ण आणि विचार-प्रवर्तक पुस्तके लिहिली होती. राजर्षी शाहू : वसा आणि वारसा हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध होते. त्यांचे सर्वात जास्त प्रसिद्ध पुस्तक म्हणजे “ शिवाजी कोण होता ?”.– ‘ शिवाजी महाराजांची इतिहासाशी इमान राखणारी प्रतिमा लोकांपर्यंत पोहोचवून, त्याद्वारे लोकशिक्षणाची महत्वाची कामगिरी या पुस्तकाने केली आहे ‘ असे या पुस्तकाबद्दल आवर्जून म्हटले गेले होते. आणि या पुस्तकाची १. ५ लाखांहून जास्त विक्री झाली होती. विशेष म्हणजे या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर केले गेले आहे. 

संपादक अशोक चौसाळकर यांनी “ कॉ. गोविंद पानसरे : समग्र वाङ्मय “ हे दोन खंडातले पुस्तक प्रकाशित केलेले आहे. २००३ साली श्री. पानसरे यांचे चित्र असणारे पोस्टाचे तिकीट काढले गेले आहे. त्यांच्या नावाने २०१५ सालापासून एक ‘ प्रबोधन पुरस्कार ‘ ही दिला जातो. 

आयुष्यभर प्रामुख्याने फक्त सामाजिक विचार करत राहिलेल्या कॉ. गोविंद पानसरे यांना विनम्र आदरांजली. ?

☆☆☆☆☆

लोककलाकार, शाहीर विठ्ठल उमप यांचा आज स्मृतिदिन. ( १५/७/१९३१ — २६/११/२०१० ) 

लहानपणापासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीकडे आकर्षित झालेल्या शाहीर उमप यांनी वयाच्या आठव्या वर्षांपासून स्वतः लोकगीतांचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली होती. डॉ. बाबासाहेबांनी लोकगीते आणि पथनाट्ये या माध्यमांमधून दलितांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरु केला होता. उमपांनी हेच कार्य आयुष्यभर पुढे चालू ठेवले. एक हजाराहून अधिक लोकगीते लिहून लोकांसमोर स्वतः ती सादर करतांना, पोवाडे, भारूड, भजन, गण-गवळण, लावणी, कवने, तुंबडी, धनगरी गीते, वासुदेव, डोंबारी, पोतराज, गोंधळी, नंदीबैल असे अनेकविध प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले. कव्वाली आणि गझल गायनातही ते अव्वल समजले जात. आपल्या गाण्यांमधून सतत सामाजिक संदेश दिला जावा, यासाठी ते आग्रही असायचे. 

माझी वाणी भीमाचरणी, आणि रंग शाहिरीचे, हे त्यांचे काव्यसंग्रह, आणि  “ उमाळा “ या नावाने त्यांच्या गझलांचा संग्रहही प्रसिद्ध झाला होता.  पण त्याचबरोबर, अबक दुबक तिबक, अरे संसार संसार, खंडोबाचं लगीन, जांभूळ आख्यान, दार उघड बया दार उघड, विठ्ठल रखुमाई, ही त्यांनी लिहिलेली नाटकेही अविस्मरणीय म्हणावी अशीच होती. ‘ फू बाई फू,फुगडी फू ‘ हे त्यांचे आत्मचरित्र रसिकमान्य ठरले होते. 

विशेष म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, टिंग्या, विहीर, नटरंग, अशासारख्या १० चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या होत्या. १९८३ मध्ये आयर्लन्ड इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेत 

भारताचे प्रतिनिधित्व करून त्यांनी आपल्या देशाला प्रथम क्रमांक मिळवून दिला होता हेही आवर्जून सांगायलाच हवे. 

राज्य सांस्कृतिक पुरस्कार, व दलित-मित्र पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते. महा. राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित शाहिरी शिबिराचे ते चार वर्षे संचालक होते. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे सल्लागार, नभोवाणीवर परीक्षक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या कामात सक्रीय सहभाग,— अशा अनेक लोकाभिमुख कामांसाठी आयुष्यभर मनापासून कार्यरत असणारे शाहीर विठ्ठल उमप यांना भावपूर्ण श्रद्धांजली.  ?

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

माहितीस्रोत :- इंटरनेट

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २५ नोव्हेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? २५ नोव्हेंबर  –  संपादकीय  ?

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ( २५ नोहेंबर १८७२ ते ऑगस्ट १९४८)

नाटक आणि पत्रकारिता या दोन्ही क्षत्रात मोठे कर्तृत्व दाखवलेल्या कृ. प्र. खाडिलकर यांचा आज जन्मदिन.

नाटककार खाडिलकर – आपल्या प्रखर राष्ट्रवादाच्या समर्थनार्थ त्यांनी नाटके लिहिली.  कांचनगडची मोहना, सवाई माधवरावांचा मृत्यू , कीचकवध, संगीत बायकांचे बंड, भाऊबंदकी, संगीत मेनका, इ. १५ नाटके त्यांनी लिहिली. त्यात संगीत मानापमान, सगीत स्वयंवर, भाऊबंदकी, कीचक वध ही नाटके खूप गाजली. त्यांची  नाट्यप्रतिभा पुराण काळ आणि ऐतिहासिक काळ यात रमली. पण नाटके लिहिताना जिथे शक्य असेल, तिथे त्यांनी वर्तमानाचा धागा पुराण काळाशी जोडला. कीचकवध या नाटकात कर्झनशाहीचे वर्णन आहे. कीचक हे पात्र कर्झनवरूनच रंगवले आहे. त्यामुळे १९१० साली या नाटकावर बंदी आली होती.

 त्यांच्या लेखणीमुळे मराठी नाटकांना वैभवाचा काळ आला, असं म्हंटलं जातं. राघोबा, आनंदी, रामशास्त्री, द्रौपदी, कंकभट अशी अविस्मरणीय पात्रे त्यांनी निर्माण केली.

१९२१पत्रकार खाडिलकरखाडिलकर यांनी १८९३ मध्ये लेखनाला प्रारंभ केला. १८९५ मध्ये विविधज्ञान विस्तारात त्यांनी लिहीलेल्या एका लेखामुळे लो. टिळकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले आणि त्यांनी खाडिलकरांना केसरीकडे बोलावून घेतले. १८९७ मधे ते केसरीत दाखल झाले. लो. टिळकांच्या जहाल भूमिकेशी तन्मय होऊन त्यांनी केसरीत लेखन केले. १९०८ ते १९१०मध्ये  टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात ते केसरीचे संपदक झाले. पुढे त्यांनी केसरीचे संपादकपद सोडले. १९१८ मधे टिळक व केळकर विलायतेला गेल्यानंतर ते पुन्हा केसरीचे संपादक झाले. १९२०ला टिळकांच्या निधंनानंतर त्यांचा केसरीशी संबंध संपला.त्यानंतर टिळक संप्रदायापासून ते वेगळे झाले व गांधीजींच्या राजकारणाचे समर्थक बनले.

त्यांनी १९०१ मधे गनिमी काव्याचे युद्ध, १९१३ मधे बाल्कन युद्ध, १९१४ मध्ये चित्रमय जगत मधे पहिले महायुद्ध यावर लेखमाला लिहिल्या.  

१९२५ मधे नवाकाळ साप्ताहिक सुरू केले. हे साप्ताहिक, दैनिकाच्या स्वरुपात अजूनही चालू आहे. १९२७ मधे ‘नवाकाळ’ या वृत्तपत्रात त्यांनी ‘हिंदू-मुसलमान वादाबद्दल एक लेख लिहिला होता. त्याबाद्दल त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला होऊन त्यांना एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.

१९३५, ते ४७ या काळात त्यांनी अध्यात्म ग्रंथमालेतील पुस्तकांचे लेखन केले.

१९०७ साली झालेल्या तिसर्‍या मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

१९२१ साली गंधर्व विद्यालयातर्फे आयोजित केलेल्या संगीत परिषदेचे ते अध्यक्ष होते.

१९३३ मधे नागपूर येथे झालेल्या १८व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

खाडिलकरांचा लेखसंग्रह – ( भाग१ व  २) – यात त्यांच्या महत्वाच्या लेखनाचा व भाषणांचा संग्रह केलेला आहे.

 नाट्य परिषदेतर्फे नाट्यक्षेत्रात विशेष लक्षणीय कामगिरी करणार्‍या रंगकर्मीस, दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जातो.      

☆☆☆☆☆

यशवंतराव चव्हाण – ( १२ मार्च १३ त२ २५ नोहेंबर ८४ )

यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे ते पहिले मुख्यमंत्री हे सर्वपरिचित आहे. नंतर केंद्रात ते संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री झाले, हेही सर्वांना माहीत आहे. ते राजनीतिज्ञ होते, तसेच थोडे साहित्यिक आणि श्रेष्ठ रसिक होते, हेमात्र सर्वांना माहीत असेलच असे नाही.

त्यांचे प्रकाशित साहित्य – १. आपले नवे मुंबई राज्य (१९५७), २. ऋणानुबंध (ललित लेख ) – १९७१, ३. कृष्णाकाठ ( आत्मचरित्र) – १९८४ ४. भूमिका – १९७९ ५. विदेश दर्शन, ६. सह्याद्रीचे वारे ( भाषण संग्रह), ७. युगांतर –स्वातंत्र्यपूर्व व स्वतत्र्योत्तर हिंदुस्थानच्या  प्रश्नांची चर्चा इ. त्यांची पुस्तके आहेत.

यशवंरावांवरही अनेक पुस्तके लिहिली आहेत. रामभाऊ जोशी, अनंत पाटील, गोविंद तळवलकर , कृस्मृतीदिन. भा. बाबर इ. नी त्यांच्यावर लिहिले आहे.

त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना विनम्र श्रद्धांजली   ?

☆☆☆☆☆

लीलावती भागवत  (  ५ सप्टेंबर १९२० २५ नोहेंबर २०१३ )

आज लीलावती भागवत यांचाही स्मृतीदिन. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १९२०चा. मराठीत बाल-कुमारांसाठी त्यांनी विपुल लेखन केलं. आकाशवाणीवरील वनिता मंडळ हा स्त्रियांचा कार्यक्रम २० वर्षे चालवला. त्यांचा विवाह भा.रा. भागवत यांच्याशी ९ ने १९४० मध्ये  झाला. या दोघांनी मिळून ५१ मध्ये मुलांसाठी ‘बालमित्र हे मासिक सुरू केले. त्यात नामवंतांचे लेख व द.ग. गोडसे यांची चित्रे होती. मुलांचे ते आवडते मासिक होते. पण त्या काळात पुस्तके विकत घेऊन वाचायची मानसिकता नव्हती. त्यामुळे पुढे ते आर्थिक तोट्यात आले आणि बंद करावे लागले. उभय पती- पत्नींनी आपल्या घराभोवतालचा परिसर  मुलांसाठी मोकळा ठेवला. तिथे मुलांनी येऊन कोणतेही पुस्तक त्यांच्याकडून घेऊन वाचावे, अशी सोय केली. त्यांनी भा.रा. भागवतांच्या पुस्तकाचे संकलन केले आणि त्यांच्या नावातली काही महत्वाची अक्षरे घेऊन

त्या संकलनाला भाराभर गवत असे गमतीदार नाव दिले.    

पुण्याच्या अखिल भारतीय बाल-कुमार सस्थेच्या उभारणीत त्यांचा महत्वाचा वाटा आहे.वयाच्या ९०व्या वर्षीही त्या उत्साही आणि क्रीयाशील होत्या.

त्यांनी मुलांसाठी बरीच पुस्तके लिहिली. त्यापैकी काही – १. अभयारण्याची चोरी, २.आला विदूषक आला, ३. इंजीन हे छोटे,  ४.कुडकुड थंडी ५. कोण असे हे राव ६. कोणे एके काळी७. चिट्टू पिट्टूच पराक्रम ७.झुमझुम झोका नि चमचम चांदण्या,८. स्वर्गाची सहल इत्यादी पुस्तके आहेत.  

त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन.   ?

☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : १.शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी  २. माहिती स्त्रोत – इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २४ नोव्हेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? २४ नोव्हेंबर –  संपादकीय  ?

केशव तानाजी मेश्राम.

मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक कवी,कादंबरीकार आणि समीक्षक कै. केशव तानाजी मेश्राम यांचा 24नोव्हेंबर1937 हा जन्मदिन. त्यांनी एम्.ए. केल्यानंतर काही वर्षे पश्चिम रेल्वेत नोकरी केली. त्यानंतर महाड येथील महाविद्यालयात व महर्षी दयानंद महाविद्यालय, मुंबई येथे अध्यापनाचे कार्य केले.

त्यांचे लेखन हे दलित साहित्य,दलित चळवळ,नवलेखक यांना प्रेरणा देणारे होते.ग्रामीण व शहरी दलितांची गुंतागुंत,गुन्हेगारीकडे झुकलेल्या पिढीचे चित्रण असे विविध विषय त्यांच्या साहित्यात दिसून येतात. त्यांनी अनेक समीक्षा ग्रंथ लिहिले आहेत.आस्वादक आणि सामाजिक चिंतन हे त्यांच्या समीक्षेचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

त्यांच्या विपुल ग्रंथ संपदेपैकी काही —

कथा– धूळ वावटळ

कविता– जुगलबंदी,अकस्मात,उत्खनन,चरित इ.

कादंबरी– पोखरण,हकिकत,जटायू,

लेखसंग्रह — ओलाव्यातले ठसे,छायाबन इ

समीक्षा– समन्वय,शब्दांगण,बहुमुखी,प्रश्नशोध,साहित्य संस्कृती मंथन,साहित्य प्रवर्तन,प्रतिभा स्पंदने इ.

प्राप्त पुरस्कार — म. सा. परिषदेचा डाॅ.भालचंद्र फडके पुरस्कार  2000,

दलित समीक्षा पुरस्कार2000,महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार 2003, शाहूफुले परिवर्तन अकादमी लेखक सन्मान पुरस्कार2003, जीवन गौरव पुरस्कार 2005,

उत्खनन या कवितासंग्रहास कवी केशवसुत पुरस्कार, चरित ला विशेष पुरस्कार,हकिकत आणि जटायू या कादंब-याना ह.ना.आपटे पुरस्कार आणि पोखरण या कादंबरीस विशेष पुरस्कार.

3  डिसेंबर2007 ला त्यांचे कॅन्सरने दुःखद निधन झाले. ?

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ:  विकीपीडिया,महाराष्ट्र नायक,मराठी ग्लोबल व्हिलेज,मिसळपाव,महाराष्ट्र टाईम्स.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २३ नोव्हेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? २३ नोव्हेंबर –  संपादकीय  ?

आज २३ नोहेंबर :- 

थोर शिक्षणतज्ज्ञ  ग. वि. अकोलकर यांचा स्मृतिदिन. ( १७सप्टेंबर १९०९ ते २३ नोहेंबर १९८३)

गणेश विनायक अकोलकर हे कुशल अध्यापक, विद्यार्थीप्रिय आणि  प्रयोगशील, उपक्रमशील शिक्षक म्हणून ख्यातनाम होते . नंतर मुख्याध्यापक म्हणूनही ते कार्यरत होते. आपल्या शाळेत त्यांनी विविध शैक्षणिक प्रयोग केले. विविध योजना राबवल्या. विद्यार्थ्यांना लोकशाही कार्यपद्धतीची ओळख करून दिली. स्नेहसंमेलनात बसवण्यासाठी,  मुलांसाठी त्यांनी नाटकेही लिहिली.  

आपल्या अध्यापन काळात त्यांनी शिक्षणाच्या अनेक स्तरावर आणि पैलूंवर लेखन केले आहे. त्याबद्दलची त्यांची काही पुस्तके डी.एड., बी. एड. ला पाठ्यपुस्तके म्हणूनही  लावली गेली आहेत. त्यांचा संस्कृत वाङ्मयाचा मोठा व्यासंग होता. त्यावरचीही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. 

भारतातील प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण, गांधींचे शैक्षणिक विचार , ग्रामीण विकास आणि शिक्षण, नवशिक्षण, शालेय व्यवस्थापन आणि प्रशासन अशी अनेक पुस्तके त्यांनी शिक्षणाविषयी लिहिली आहेत. मराठीचे अध्यापन कसे करावे, यावरही त्यांचे पुस्तक आहे. 

शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त, मादाम  मेरी क्युरी यांचे चरित्र त्यांनी लिहिले आहे. कुसुमाग्रज गौरव ग्रंथ, नवी क्षितिजे नवी दृष्टी , भाषा संस्कृती व कला इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. बाणभट्टाच्या कादंबरीचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे. दिव्या गीर्वाण भारती, तर्क दीपिका, व्यासकुसुमे, श्रीमद्भागवत कथा व शिक्षण  इ. पुस्तके त्यांच्या संस्कृत व्यासंगाची साक्ष देतात. त्यांनी समर्थ चरित्र हे रामदासांचे चरित्र लिहिले आहे, तर स्वराज्याचा श्रीगणेशा व स्वराज्याची स्थापना ही त्यांची ऐतिहासिक पुस्तके आहेत. पाठ्यपुस्तक निर्मितीतही त्यांचा सहभाग होता. साहित्यप्रभा ( भाग १ ते ३) , इयत्ता ९वीसाठी कुमार भारती या पाठ्यपुस्तकांचे त्यांनी संपादन केले. या शिवाय लेखन विकासाचे ७ भाग त्यांनी तयार केले. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे १९६३साली जे अधिवेशन झाले, त्याचे ते अध्यक्ष होते

अशा थोर शिक्षणतज्ज्ञाला त्यांच्या स्मृतिदिनी सादर वंदन. ?

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : १) शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी  २) इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २२ नोव्हेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? २२ नोव्हेंबर  –  संपादकीय  ?

त्र्यं. वि.सरदेशमुख ( २२ नोहेंबर १९१९  ते १२ डिसेंबर २००५ )

ग्रंथालयातून एकदा ‘बखर एका राजाची’ हे पुस्तक खूप आवडलं म्हणून पुन्हा एकदा     लेखकाचा नाव पाहिलं. त्र्यं. वि.सरदेशमुख. मग त्यांची पुस्तकं आणायला लागले. त्यांच्या कादंबर्‍या लोकप्रिय आहेत, तसेच जाणत्यांच्या पसंतीलाही उतरल्या आहेत. सर्जनशीलता आणि संवेदनशीलता या दोन्ही गोष्टींचा प्रत्यय त्यांच्या लेखनातून दिसून येतो. त्यांच्या ‘डांगोरा एका नगरीचा’ या कादंबरीला साहित्य अ‍ॅकॅडमीचा२००३ साली पुरस्कार मिळाला. ‘ससेमिरा’ ही त्यांची पहिली कादंबरी. उच्छाद  ही त्यांची आणखी एक कादंबरी.

त्यांनी आपल्या लेखनाची सुरुवात ज्योत्स्ना, वाङ्मायशोभा, धनुर्धारी  या मासिकांमध्ये लेख लिहून केली. त्यांनी कादंबरीप्रमाणेच, कविता आणि समीक्षादेखील लिहिल्या. काव्यलेखन त्यांनी वैशाख या टोपणनावाने केले. १९५५साली त्यांचा ‘उत्तररात्र’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला.

साहित्याची निर्मिती, आकलन, स्वरूप आणि आस्वाद या संदर्भातील आपले चिंतन त्यांनी आपल्या समीक्षा ग्रंथतून मांडले. मानवी जीवनातील शोकात्मकता आणि त्याचे साहित्यातील  व्यक्तिकरण या संदर्भात ‘ बालकवी, केशवसुत , गोविंदाग्रज, मर्ढेकर’ यांच्या काव्याचा ‘अंधारयात्रा’ या पुस्तकात वेध घेतला. गडकरी, ग्रेस, सुर्वे, शरद्चंद्र मुक्तिबोध यांच्या कवितांबद्दल मूलगामी चर्चा त्यांनी केली आहे. काफ्काशी संवाद ( ललित ), कालिदास आणि शाकुंतल- एक अर्ध्यदान (समीक्षा ग्रंथ), गडकर्‍यांची संसार नाटके यात रा.ग. गडकरी यांच्या नाटकांचे आस्वादन आणि समीक्षा आहे. असे त्यांचे काही समीक्षा ग्रंथ. कवितांच्या कार्यक्रमाची संहिता त्यांनी तुरे चंद्र्फुलांचे या पुस्तकात लिहिली आहे.

त्र्यं. वि.सरदेशमुख यांचे बरेचसे साहित्य अप्रसिद्ध व हस्तलिखित स्वरुपात होते. यात ३ कादंबर्‍या, ३ व्यक्तिचित्रणे, काही मुलाखती, पुस्तक प्रीक्षणे, प्रस्तावना, प्रदीर्घ निबंध इ.  साहित्य होते. नीतिन वैद्य, अनुराधा कशाळीकर ,डॉ. सु.रा. चुनेकर  यांच्या प्रयत्नाने त्यांचे सुमारे १००० पृष्ठांचे साहित्य प्रकाशात आले.

या महान लेखकाला त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन. ?

☆☆☆☆☆

रविंद्र भट (१७ सप्टेंबर १९३९ – २२नोहेंबर २००८ )

१९६३ साली  राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, तो चित्रपट म्हणजे ‘ते माझे घर’ या चित्रपटाचे निर्माते, कथा आणि पटकथाकार म्हणजे सब कुछ होते, रविंद्र भट. कॉलेजमध्ये असताना नाटके बसवणे, त्याचे दिग्दर्शन , कविसंमेलने  आयोजित करणे इ. मध्ये ते गुंतलेले असायचे. पुढे ते प्रसिद्ध कवी, कथा-कादंबरीकार, पटकथाकार झाले. काही वर्षे ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह होते.

अनादि मी अनंत मी , आभाळाचे गाणे, इंद्रायणी काठी, एका जनार्दनी, घरट्यात एकटी मी, घास घेई पांडुरंगा, देवाची पाऊले, भागीरथ, भेदिले सूर्यमंडळा. इ. कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास इ. ची चरित्रे त्यांनी रसाळपणे आपल्या कादंबर्‍यातून मांडली. या संतांवर तसेच विवेकानंद, सावरकर यांच्यावर त्यांनी  बाल कादंबर्‍याही लिहिल्या.

‘ओठांवरची गाणी, जाणता – अजाणता, मन गाभारा, मोगरा फुलला, हे त्यांचे कविता संग्रह, तर ‘सारी पाऊले मातीची, कृष्णाकाठचा भुत्या या पुस्तकातून त्यांनी ललीत लेखन केले आहे.   त्यांनी काही नाटकेही लिहिली. अरे संसार संसार, अवघी दुंदुमली पंढरी  अससासा नवरा नको ग बाई, एक कळी फुलली नाही. इ.. नाटके त्यांनी लिहिली आहेत.

साहित्य क्षेत्रात असं चौफेर लेखन करणार्‍या रवींद्र भट यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन. ?

☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : १.शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी  २. माहिती स्त्रोत – इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २१ नोव्हेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? २१ नोव्हेंबर –  संपादकीय  ?

शंकर नारायण तथा शं. ना. नवरे.

आपल्या लेखनातून मध्यमवर्गीय जीवनाचे दर्शन घडवणारे लेखक शं. ना. नवरे यांचा आज जन्मदिन. (1927). कथा, पटकथा, कादंबरी, नाटक, स्तंभलेखन एकांकिका, व्यक्तीचित्रण, आठवणी, विनोदी असे सर्व प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले आहे. याबरोबरच नाट्य क्षेत्रातील रंगकर्मींना आर्थिक मदत करून सामाजिक कार्यातही आपला वाटा उचलला आहे. डोंबिवली येथे

2003 मध्ये भरलेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

त्यांची काही साहित्यसंपदा:

कथासंग्रह– अनावर, इंद्रायणी, एकमेक, कस्तुरी, कोवळी वर्षे, खलिफ जत्रा, तिळा दार उघड, परिमिता, बिलोरी, सखी इ.

कादंबरी– अट्टाहास, आनंदाचे झाड, कौल, दिनमान, दिवसेंदिवस, सुरूंग इ.

पटकथा– कळत नकळत, कैवारी, घरकुल, तू तिथं मी, निवडुंग, बाजीरावाचा बेटा.

नाटक– खेळीमेळी, गहिरे रंग, गुंतता ह्रदय हे, गुलाम, देवदास, दोघांमधले अंतर, धुक्यात हरवली वाट, मन पाखरू पाखरू, सूर राहू दे  इ.

प्राप्त पुरस्कार– पु. भा. भावे पुरस्कार, सु. ल. गद्रे मातोश्री पुरस्कार, नाट्यभूषण पुरस्कार, अ. भा. नाट्य परिषदेचा गडकरी पुरस्कार, मराठी साहित्य परिषदेचा कमलाकर सारंग पुरस्कार, लो. टिळक पुरस्कार, वि. वा. शिरवाडकर, गदिमा, प्रज्ञागौरव पुरस्कार आणि विष्णूदास भावे पुरस्कार.

प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या या चतुरस्त्र लेखकाचे  25/09/2013 ला दुःखद निधन झाले. ?

☆☆☆☆☆

राजन गवस 

अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, जातीयता, देवदासी, दारिद्र्य अशा सामाजिक प्रश्नांना आपल्या साहित्यातून समाजासमोर हिरहिरीने मांडणारे डॉडा. राजन गवस यांचा आज जन्मदिवस. (1959).

कथा, कविता, ललित, समीक्षा, संपादन असे त्यांचे विपुल लेखन आहे. भाऊ पाध्ये यांच्या साहित्यावर त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. गवस यांचे साहित्य कन्नड, गुजराथी, असामिया, हिंदी, इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. त्यांनी देवदासी निर्मुलन चळवळीत महत्वाचे योगदान दिले आहे.

श्री. गवस  यांच्या साहित्याचा विचार करताना प्रामुख्याने चौंडक, भंडारभोग, धिंगाणा, तणकट आणि ब–बळीचा या पुस्तकांचा उल्लेख करावा लागेल. तणकट या त्यांच्या कादंबरी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

याशिवाय हुंदका हा कवितासंग्रह, आपण माणसांत जमा नाही हा कथासंग्रह, काचाकवड्या, कैफियत, लोकल ते ग्लोबल ही पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. समीक्षा व संपादित साहित्याचे दहा ग्रंथ व इंग्रजीतील लेखनही त्यांनी केले आहे. या साहित्य सेवेचा विविध पुरस्कारांनी गौरव केला आहे.

त्यातील काही पुरस्कार. . . .

ह. ना. आपटे राज्य पुरस्कार 1985, वि. स. खांडेकर पुरस्कार 1989, भंडारभोग कादंबरीस संस्कृती प्रतिष्ठान, दिल्ली चा संस्कृती पुरस्कार1992 व राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरी लेखन पुरस्कार 1994, भैरूरतन दामाणी पुरस्कार 1999, महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार 2000 व वर उल्लेख केल्याप्रमाणे तणकट या कादंबरीस 2001 चा साहित्य अकादमी पुरस्कार!

अशा या दमदार साहित्ययात्रीस त्यांच्या जन्मदिनी पुढील लेखनासाठी शुभेच्छा. ?

☆☆☆☆☆

चारूता  सागर

दिनकर दत्तात्रय भोसले यांना आपण ओळखतो का? दि. द. भोसले म्हणजेच आपले कथाकार  चारूता सागर! आज त्यांचा जन्मदिवस. (1930).

प्राथमिक शिक्षक म्हणून दीर्घकाळ सेवा केली असली तरी त्यांनी लष्करात ही सेवा बजावली होती.  तरूण वयात बिहार, बंगाल अशा दूरच्या प्रांताची भ्रमंती केली. शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या साहित्याने प्रभावित झाले. त्यांच्याच एका कादंबरीतील पात्राचे नाव त्यांना खूप आवडले व तेच नाव ‘चारूता सागर’ त्यांनी स्वतःच्या लेखनासाठी वापरले. धोंडू बुवा किर्तनकार या नावाने ते काही काळ किर्तनही करत असत.

चारूता सागर यांच्या काही कथा कन्नड भाषेत भाषांतरीत झाल्या आहेत. ‘दर्शन’या त्यांच्या कथेवर आधारीत ‘जोगवा’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. नदीपार, नागीण, मामाचा वाडा हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘नागीण’या कथासंग्रहास 1971 चा कॅ. गो. ग. लिमये पुरस्कार प्राप्त झाला आहे. 1977 ला सर्वोत्कृष्ट लघुकथाकार म्हणून ते सन्मानित झाले आहेत.

सांगली जिल्ह्यातील मळणगाव हे त्यांचे मूळ गाव. त्यांच्या मृत्यूनंतर (2011) येथे दरवर्षी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ ग्रामीण साहित्य संमेलन भरवले जाते. ?

☆☆☆☆☆

मंजुश्री गोखले  

लघुकथा, कादंबरी, कविता, पाककला, प्रवासवर्णन असे विविध विषय हाताळणा-या मंजुश्री गोखले यांचा आज जन्मदिवस. त्या प्रथम इचलकरंजीच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये शिक्षिका होत्या. नंतर कोल्हापूर येथील महाराष्ट्र महाविद्यालातून उपप्राचार्य या पदावरून निवृत्त झाल्या. त्यांचे काही साहित्य असे:

कथा– ओंजळीतले मोती, स्वस्तिकाची फुले, बुफे आणि फेफे.

कादंबरी– ओंकाराची रेख जना, जोहार मायबाप जोहार, तुक्याची आवली, ज्ञानसूर्याची सावली.

रहस्यकथा– अग्निलाघव, अधाराच्या सावल्या.

अध्यात्मिक– अमृतसंदेश महात्म्य

कविता– रानगंध, शिशिरसांज.

पाककला– फास्ट-ब्रेकफास्ट

प्रवासवर्णन–  रंगपश्चिमा

चारोळीसंग्रह– आकृतीगंध, फुलपाखरांचा गाव

प्राप्त पुरस्कार:-

‘जोहार मायबाप जोहार ‘ला वरणगावकर स्मृती पुरस्कार

‘तुक्याची आवली’ ला तुका म्हणे पुरस्कार व प्रतिभा पाटील पुरस्कार.

वाचनवेध पुरस्कार.

त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ?

☆☆☆☆☆

चिं. वि. जोशी आणि शरदचंद्र मुक्तिबोध यांचा आज स्मृतीदिन.

चिंतामणी विनायक जोशी हे चिं.  वि. जोशी या नावाने विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा पाली भाषेचाही चांगला अभ्यास होता. बडोदा येथील महाविद्यालयात ते प्राध्यापक होते.

त्यांचे विनोदी साहित्य—-

आणखी चिमणराव, चिमणचारा, चिमणरावांचे, च-हाट, आमचा पण गाव, एरंडाचे गु-हाळ, ओसाडवाडीचे देव, घरबसे पळपुटे, वायफळाचा मळा इ.

त्यांच्या एका कथेवर ‘सरकारी पाहुणे’हा मराठी चित्रपट 1942 ला चित्रित झाला होता. तसेच मुंबई दूरदर्शनवरील गाजलेली  ‘चिमणराव गुंड्याभाऊ’ ही मालिकाही त्यांच्या साहित्यावर आधारीत होती.

21/11/1963 ला त्यांचे निधन झाले. त्यांचे स्मृतीस वंदन. ?

☆☆☆☆☆

शरदचंद्र मुक्तिबोध 

मार्क्सवादाचा प्रभाव असणारे आणि सामाजिक दृष्टी लाभलेले नागपूर येथील शरदचंद्र मुक्तिबोध यांचे निधन 21/11/1984 ला झाले. त्यांनी नागपूर विद्यापीठात एम्. ए.  व एल. एल्. बी. केले . शिक्षक व वकिली  व्यवसाय केला. नंतर राज्य शासनाच्या भाषा संचालनालयाचे उपसंचालक म्हणून काम केले. त्यानंतर नागपूर महाविद्यालयात प्राध्यापक पदावरून निवृत्त झाले.

नव्या जाणीवा व्यक्त करण्याचा ध्यास हे त्यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या कविताही आशावादी असत.

जन हे वोळतू जेथे, सरहद्द, क्षिप्रा या त्यांच्या कादंब-या. नवी मळवाट, सत्याची जात, यात्रिक, हे त्यांचे कविता संग्रह. सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य या त्यांच्या समीक्षा ग्रंथास 1979चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे.

त्यांच्या स्मृतीस अभिवादन! ?

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ:   विकीपीडिया, मराठी विश्वकोश, मराठी सृष्टी, बाइटस्ऑफइंडिया

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २० नोव्हेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? २० नोव्हेंबर –  संपादकीय  ?

आज २० नोव्हेंबर —-

साहित्यिक वर्तुळात “ एक असाधारण गद्य शिल्प “ अशी ज्यांची अगदी अनोखी ओळख होती, अशा श्री. वसंत पोतदार यांचा आज जन्मदिन. ( १९३७ — २००३ )

मराठी लेखक, कथाकथनकार, स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. पोतदार, संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र यांच्याबरोबर त्यांचे स्वतःचे सहाय्यक म्हणून मुंबईत आले.  श्री. पु.ल.देशपांडे यांच्याशी त्यांची गाठ पडली, आणि त्यांना जणू एक नवी वेगळी दिशा सापडली. पु.ल. यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी “ वंदे मातरम “ या क्रांतीगाथेवर आधारित एकपात्री प्रयोग भारतभर सादर केले. त्यानंतर, “सेर सिवराज“ (शिवाजी), “एका पुरुषोत्तमाची गाथा“ ( पु.ल. ), “योद्धा संन्यासी“ (विवेकानंद), महात्मा फुले, अशा थोर व्यक्तींच्या चरित्रांवर आधारित असणारे एकूण १० एकपात्री नाट्यप्रयोग ते सादर करत असत. विशेष म्हणजे, मराठीबरोबरच हिंदी आणि बंगाली या भाषांमध्येही हे प्रयोग ते सादर करत असत, आणि त्यासाठी तब्बल ४० वर्षे ते देशात आणि परदेशातही फिरत होते. “ आक्रंदन एका आत्म्याचे “ हे त्यांचे एकपात्री नाट्यही खूप गाजले होते. 

मराठी-हिंदी-बंगाली या तिन्ही भाषेतल्या वर्तमानपत्रांमधूनही पोतदार यांनी भरपूर स्फुटलेखन केलेले होते. अग्निपुत्र, नाळ, अजब आजाद मर्द मिर्झा गालिब, अनिल विश्वास ते राहुलदेव बर्मन, तोचि साधू ओळखावा ( गाडगे महाराजांचे चरित्र ), योद्धा संन्यासी ( विवेकानंद ), एका पुरुषोत्तमाची गाथा हे पु.ल.देशपांडे यांचं चरित्र, नाझी भस्मासुर, पुन्हा फिरस्ता, रामबाग टोळी 

(कथासंग्रह), वेध मराठी नाट्यसंगीताचा, कुमार- हे कुमार गंधर्वांविषयीचे पुस्तक —- अशी अगदी वेगवेगळ्या विषयांवरची त्यांची सगळीच पुस्तके वाचकांमध्ये प्रसिद्ध ठरली होती.    

‘अग्निपुत्र‘ या पुस्तकाचे विशेष हे की, चंद्रशेखर आझाद, जतींद्रनाथ दास, बटुकेश्वर दत्त, राजगुरू-सुखदेव- भगतसिंग, हे सर्वज्ञात वीर आणि माहोर, मलकापूरकर, वैशंपायन, यासारखे अज्ञात वीर, यांच्याबद्दलची नेमकी आणि तपशीलवार माहिती श्री. पोतदार यांनी त्यात नोंदवलेली आहे. यापैकी ‘ नाळ ‘ या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, ‘ कुमार ‘ला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, आणि ‘ योद्धा संन्यासी ‘ ला  मुंबई ग्रंथ संग्रहालयाचा पुरस्कार मिळाला होता. 

असे विविधांगी लेखन करणारे श्री वसंत पोतदार यांना मनःपूर्वक नमस्कार ?

☆☆☆☆☆

सुप्रसिद्ध न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचाही आज जन्मदिन. ( २०/११/१९२७- ३/१/२०१९ )  

मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. धर्माधिकारी, स्वातंत्र्यसैनिक आणि लेखक म्हणूनही सुपरिचित होते. स्वतः म. गांधी आणि त्यांच्या विचारांवर श्रद्धा बाळगत असतांनाच , त्या विचारांवर जिज्ञासूवृत्तीने, निरपेक्षपणे आणि तटस्थतेने, आजच्या संदर्भात विचार करायलाच हवा,असे ते आग्रहाने सांगत असत. अंतर्यात्रा, काळाची पाऊले, भारतीय संविधानाचे अधिष्ठान, मंझिल दूरच राहिली, माणूसनामा, मानवनिष्ठ अध्यात्म, समाजमन, सूर्योदयाची वाट पाहूया, अशी त्यांची मराठी पुस्तके, आणि, न्यायमूर्तीका हलफनामा, लोकतंत्र एवं राहोंके अन्वेषण, ही त्यांची हिंदी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. 

२००४ साली “ पद्मभूषण “ पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या न्यायमूर्ती धर्माधिकारी यांना विनम्र अभिवादन. ?

☆☆☆☆☆

बोधनकार‘ या उपाधीनेच ख्यातनाम असलेले श्री. केशव सीताराम ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. ( १७/९/१८८५–२०/११/१९७३ ) 

मराठी पत्रकार, वक्ते, समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी, अशा अनेक भूमिका पार पाडत असतांना, सामाजिक सुधारणा हेच त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय सतत नजरेसमोर ठेवलेले होते. आणि या ध्येयप्राप्तीसाठी त्यांनी कधीही आणि कोणतीही तडजोड केली नाही. त्यांचे आदर्श असणारे महात्मा फुले यांच्या समाजसुधारणेच्या संकल्पनांनी प्रेरित होऊन, फुले यांचा लढा पुढे चालवण्याचा त्यांनी निर्धार केला होता. त्या काळात प्रचलित असलेल्या अन्याय्य रूढी-परंपरा,जातीव्यवस्था, अस्पृश्यता, या समाजविघातक गोष्टी आणि त्यांचे समर्थन करणारे पुराणमतवादी, यांच्याशी अतिशय त्वेषाने लढतांना त्यांनी लेखन, वक्तृत्व, आणि प्रत्यक्ष कृती अशी तीनही शस्त्रे प्रभावीपणे वापरली. कर्मकांडे आणि धंदेवाईक भटभिक्षुकी व्यवस्था यावर एकीकडे टीका करत असतांनाच, संत एकनाथ महाराजांच्या जीवनावर “ खरा ब्राह्मण  “ हे नाटक त्यांनी लिहिले, आणि खऱ्या ब्राह्मणाची भूमिका काय असावी हे स्पष्टपणे मांडले. स्वतः सुधारणावादी असणारे राजर्षी शाहू महाराज, ठाकरे यांना खूप मानत असत. 

प्रबोधनकार हे एक उत्तम लेखक आणि इतिहास-संशोधकही होते. सारथी, लोकहितवादी, आणि प्रबोधन, या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी कायम आधुनिक विचारांचा अतिशय द्रष्टेपणाने प्रसार केला. आणि त्याच विचारांच्या अनुषंगाने अनेक पुस्तके लिहिली. ऊठ मऱ्हाठ्या ऊठ हा लेखसंग्रह, कुमारिकांचे शाप, देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे, देवांची परिषद,शेतकऱ्यांचे स्वराज्य, अशासारखी त्यांची वैचारिक पुस्तके, कोदंडाचा टणत्कार, ब्राह्मण्याचा साद्यन्त इतिहास, भिक्षुकशाहीचे बंड, प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी, अशी ऐतिहासिक संशोधनावर आधारित पुस्तके, संत गाडगेबाबा, तसेच पं. रमाबाई सरस्वती यांचे चरित्र, माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र, संगीत विधिनिषेध, सीताशुद्धी, टाकलेले पोर, अशी नाटके, आणि हिंदू जनांचा ऱ्हास आणि अधःपात हे अनुवादित पुस्तक, असे त्यांचे विविध प्रकारचे विपुल साहित्य प्रसिद्ध झालेले आहे.

 “ प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्मय “ असा ५ खंडांमधला ग्रंथ महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेला आहे, हे विशेषत्वाने सांगायला हवे. 

‘ प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन ‘ २०१३ आणि २०१४ साली पुण्यात भरवले गेले होते. मारवाडी फाऊंडेशनतर्फे त्यांच्या नावाने ‘ समाज प्रबोधन पुरस्कार ‘ दिला जातो, ही आवर्जून सांगायला हवी अशी आणखी एक गोष्ट.   

“ प्रबोधन“ या संज्ञेला आपल्या कार्यकर्तृत्वाने जणू मूर्तरूप देणारे श्री. के.सी.ठाकरे यांना भावपूर्ण आदरांजली ?

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

माहितीस्रोत :– इंटरनेट

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १९ नोव्हेंबर – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? १९ नोव्हेंबर  –  संपादकीय  ?

कॅ. गोपाळ गंगाधर लिमये (२५सप्टेंबर१८८१  ते १९ नोहेंबर १९७१ ) हे कथाकार आणि विनोदी लेखक होते. ते व्यवसायाने डॉक्टर. वैद्यकीय परीक्षेत त्यांना सुवर्ण पदक मिळाले होते. ’इंडियन मेडिकल सर्व्हिस’ साठी त्यांची १९१८ साली कॅप्टन म्हणून निवड करण्यात आली. ३वर्षे त्यांनी सैन्यात काम केले. १९२२ पासून ते मुंबई महानगर पालिकेत आरोग्याधिकारी होते.

१९१२ मध्ये त्यांची पहिली कथा मासिक मनोरंजन मध्ये प्रकाशित झाली. कथेचा नाव होतं ‘प्रेमाचा खेळ.’ ’बापूंची प्रतिज्ञा’ ही विनोदी दीर्घ कथा पुस्तक रूपात प्रकाशित झाली. वनज्योत्स्ना हेही त्यांच्या दीर्घ कथेचे पुस्तक. तिच्याकरिता, हेलकावे हे त्यांचे कथा संग्रह. कॅ. गो. गं. लिमये यांच्या निवडक कथा हे पुस्तक राम कोलारकर यांनी संपादित करून प्रसिद्ध. केले.

कथेइतकेच मोलाचे कार्य त्यांनी विनोदाच्या क्षेत्रात केले. विनोद सागर, जुना बाजार, गोपाळकाला, तुमच्याकरता विनोदबकावली, इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे विनोदी लेखन लोकप्रिय झाले कारण त्यांचे सूक्ष्म अवलोकन. साध्या साध्या घटनातून त्यांनी विनोद निर्मिती केली. त्यांच्या विनोदात कधीही बोचरा उपहास नसे.

‘सैन्यातील आठवणी’ हे त्यांचे आत्मनिवेदनात्मक पुस्तक. याशिवाय त्यांनी वैद्यक, सुश्रुषा यावरही पुस्तके लिहिली आहेत.

या महान लेखकाला त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. ?

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : १.शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी  २.इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १८ नोव्हेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? १८ नोव्हेंबर –  संपादकीय  ?

काही महिन्यांपूर्वीच म्हणजे 28/8/2021 ला ज्यांचे निधन झाले त्या आनंद अंतरकर यांचा आज जन्मदिन.(1941)

हंस, मोहिनी आणि नवल ही मासिके मराठी वाचकांत अत्यंत लोकप्रिय.या मासिकांचे संपादक अनंत अंतरकर.त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव आनंद अंतरकर यांनी या मासिकांचे संपादन केले.या मासिकांतून त्यांनी गूढ,विज्ञान,संदेह,रहस्य अशा वेगळ्या वाटेवरील साहित्याला प्राधान्य दिले.हंस चे अनेक अंक हे अनुवाद विशेषांक होते तर मोहिनीने रसाळ विनोदाची मोहिनी घातली.

श्री.आनंद अंतरकर यांनी संपादकीय जबाबदारी बरोबरच साहित्य निर्मितीत ही यश संपादन केले.घूमर,झुंजूरवेळ,रत्नकीळ,सेपिया,एक धारवाडी कहाणी ही त्यांची साहित्य संपदा.सेपिया ही व्यक्तीचित्रे आहेत तर  एक धारवाडी  कहाणी हे पुस्तक अनंत अंतरकर आणि सुप्रसिद्ध कथा लेखक जी.ए.कुलकर्णी यांच्यात झालेल्या पत्रव्यवहारावर आधारीत आहे. या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे.

हणमंत नरहर जोशी, अर्थात “काव्यतीर्थ” कवी सुधांशु

इथेच आणि या बांधांवर, भुलविलेस साजणी, या धुंद चांदण्यात तू  यासारखी भावनांनी ओथंबलेली भावगीते आणि गुरूदत्त पाहिले कृष्णातिरी, दत्त दिगंबर दैवत माझे, देव माझा विठू सावळा, या मुरलीने कौतुक केले, स्मरा स्मरा हो दत्तगुरू ही भक्तीरसपूर्ण अवीट गीते ज्यांच्या  एकाच लेखणीतून पाझरली असा शब्दांचा पुजारी म्हणजे काव्यतीर्थ सुधांशु !

हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचा आज स्मृतीदिन. (1917). तरूण वयातच त्यांनी काव्यलेखनाला प्रारंभ केला.गीत दत्तात्रेय या त्यांच्या गीतांचा कार्यक्रम लोकप्रिय झाला होता. आपल्या मित्राच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी त्यांच्या गावी औदुंबर येथे साहित्य संमेलन भरवण्यास प्रारंभ केला. पहिले संमेलन 1939 ला मकर संक्रांतीला आयोजित करण्यात आले होते. तेव्हापासून आजतागायत दरवर्षी संक्रांतीला हे संमेलन भरत आले आहे.पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष होते महामहोपाध्याय दत्तो  वामन पोतदार.अशाच नामवंतांची परंपरा पुढे चालू राहिली आहे. साहित्य क्षेत्रातील या कार्याव्यतिरिक्त सुधांशु यांनी स्वातंत्र्य लढ्यातही भाग घेतला होता. खादीचे कपडे व खांद्यावर एक शाल असा त्यांचा साधा पेहराव होता. आपल्या परिसरात त्यांनी ग्रामसुधारणेचे अनेक प्रयोग यशस्वी केले.

कवी कुंजविहारी यांनी त्यांना सुधांशु हे नाव बहाल केले. श्री शंकराचार्यानी त्यांना ‘काव्यतीर्थ’ ही उपाधी दिली. 1974मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ ने गौरविले. वाराणसी विद्यापीठाने त्यांना डी.लीट्. पदवी प्रदान केली. मराठी साहित्य परिषदेने त्यांना कवी यशवंत पुरस्कार दिला. तर समस्त सांगलीकरांच्या  वतीने त्यांना ‘सांगलीभूषण’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.

सुधांशु यांचे पद्य लेखन:

कौमुदी, गीतदत्तात्रय, गीत सुगंध, गीतसुधा, जलवंती, झोपाळा, भावसुधा, यात्री, विजयिनी, स्वर इ.

त्यांचे गद्य लेखन:

खडकातील झरे(कथा), दत्तजन्म(एकांकिका), चतुरादेवी, सुभाष कथा(बालसाहित्य) इ.इ.

या भावुक सत्वशील कवीस सादर वंदन! ?

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ:   विकीपीडिया, मराठी विश्वकोश, मराठी सृष्टी, बाइटस्ऑफइंडिया

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १७ नोव्हेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? १७ नोव्हेंबर –  संपादकीय  ?

आज १७ नोव्हेंबर :–

फक्त ’ साहित्यिक ‘ एवढीच उपाधी ज्यांच्यातल्या जन्मजात चतुरस्त्र लेखकासाठी खरोखरच अपुरी वाटते, अशा श्री. रत्नाकर मतकरी यांचा आज जन्मदिन. 

( १७/११/१९३८ — १८/५/२०२० ) 

नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य, अशा साहित्य-विश्वातल्या अनेक महत्वाच्या प्रांतांमध्ये, आश्चर्य वाटावे इतकी भारावून टाकणारी मुशाफिरी करता-करता, त्यांनी स्वतःतला साहित्यिक तर कायम उत्तम तऱ्हेने जोपासलाच, पण त्याचबरोबर, स्वतःमधला एक सृजनशील दिग्दर्शक, निर्माता, रंगकर्मी, आणि उत्तम चित्रकारही सतत कार्यरत राहील, आणि स्वतःच्या साहित्याइतकाच रसिकांना कमालीचा आनंद देत राहील, याची रसिकांना खात्री पटवून दिली. 

मालिका-चित्रपट यासाठी लेखन आणि दिग्दर्शन, वृत्तपत्रांमध्ये वैविध्यपूर्ण सदरलेखन, कथाकथन,  असे सगळे करत असतांनाच, ‘ माध्यमांतर ‘ हा एक अवघड लेखन- प्रकारही श्री मतकरी यांनी अगदी लीलया पेललेला आहे. या प्रकाराबद्दल थोडक्यात असे सांगता येईल की, एखादी साहित्यकृती रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरलेले माध्यम बदलून, दुसऱ्या वेगळ्या माध्यमातून ती सादर करणे — जसे की एखाद्या कथेचे नाटकाच्या माध्यमातून , किंवा एखाद्या नाटकाचे चित्रपटाच्या माध्यमातून मूळ माध्यमाइतक्याच सशक्तपणे सादरीकरण करणे. या कामांमधूनही  त्यांचे लेखन-कौशल्य दिमाखदारपणे रसिकांसमोर आलेले आहे. दर्जेदार गूढकथा-लेखक ही त्यांची ओळख वाचकांना वेगळेपणाने करून देण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. 

त्यांनी केलेले अतिशय महत्वाचे आणि आवश्यक काम हे, की त्यांनी महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. स्वतः उत्तम बालनाट्ये लिहिली. आणि नुसते लिहून न थांबता, स्वतः खर्च करून त्या नाटकांची निर्मितीही केली. हा सगळा उद्योग त्यांनी जवळजवळ तीस वर्षे अगदी मनापासून पेलला. त्यासाठी ‘ बालनाट्य ‘ ही स्वतःची नाट्यसंस्था त्यांनी स्थापन केली होती. “ झोपडपट्टीतील मुलांना त्यांच्यामुळे ‘ नाटक ‘ हा आनंददायक प्रकार फक्त कळलाच नाही, तर स्वतःला तो शिकताही आला, “ असेच अगदी सार्थपणे म्हणता येईल. 

‘ बालनाट्य ‘, आणि ‘ सूत्रधार ‘, या नाट्यसंस्थांचे लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार, निर्माते, या सगळ्या भूमिका तर त्यांनी समर्थपणे सांभाळल्याचं, आणि बरेचदा त्या नाटकांमध्ये नट म्हणूनही काम केले. दूरदर्शनवरील ‘ शरदाचे चांदणे ‘, ‘ गजरा  ‘ अशा कार्यक्रमांचे सादरकर्ते,  म्हणूनही त्यांची रसिकांना ओळख होती. दूरदर्शनवर लोकप्रिय ठरलेल्या ‘ गहिरे पाणी ‘, अश्वमेध ‘, ‘बेरीज वजाबाकी ‘, या मालिकांचे लेखन श्री. मतकरी यांनीच केलेले होते. 

उत्तम चित्रकार, प्रभावी वक्ते, याबरोबरच श्री. मतकरी यांची आवर्जून सांगायलाच हवी अशी एक ओळख म्हणजे, ‘ नर्मदा बचाओ आंदोलन ‘, ‘ निर्भय बनो आंदोलन ‘ अशामधला त्यांचा सक्रिय सहभाग. 

त्यांचे असे वेगवेगळ्या प्रकारचे काम पाहता, “ श्री रत्नाकर मतकरी म्हणजे चौफेर कर्तृत्व “ असेच म्हणायला हवे. 

बावीस नाटके, अनेक एकांकिका, तेवीस कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेखसंग्रह , आणि या विपुल लेखनाबरोबरच, आपल्या रंगभूमीवरच्या कामाचा सखोल विचार करणारा “ माझे रंगप्रयोग “ हा आत्मचरित्रात्मक ग्रंथही त्यांनी लिहिलेला आहे.

रत्नाकर मतकरी यांचे एक माणूस म्हणून, एक कलावंत म्हणून असलेले व्यक्तिमत्व, त्यांचे एकूण लेखन, या विषयांवरच्या त्यांच्या मुलाखती, हा पहिला भाग;; त्यांच्या कथा, नाटके, कादंबऱ्या, एकांकिका, लेख, कविता, पत्रे अशा साहित्यप्रकारांचा समावेश असणारा दुसरा भाग,; इतर मान्यवरांना मतकरी कसे वाटतात हे सांगणारा तिसरा भाग; आणि त्यांच्या संग्रहित आणि असंग्रहित अशा संपूर्ण साहित्याचा आणि नाट्यप्रयोगांचा तपशील देणाऱ्या दीर्घ सूचीचा चौथा भाग; अशा चार भागात त्यांचा  “ रत्नाक्षरं “ हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. त्यांची सगळीच पुस्तके इतकी लोकप्रिय झालेली आहेत, की त्यातल्या कोणत्या मोजक्या पुस्तकांचा इथे उल्लेख करावा हा मोठाच प्रश्न मला पडला आहे. 

श्री मतकरी यांना कितीतरी पुरस्कार देऊन अनेकदा गौरवले गेलेले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या ज्योत्स्ना भोळे पुरस्कार, २१ पुस्तकांना साहित्य पुरस्कार, ‘ माझं घर माझा संसार ‘ या चित्रपटाच्या उत्कृष्ट पटकथेसाठी  दादासाहेब फाळके पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, महाराष्ट्र फौंडेशन अमेरिका याचा विशेष साहित्य-गौरव पुरस्कार, साहित्य अकादमी बाल -साहित्य पुरस्कार, उद्योग भूषण पुरस्कार, केंद्रशासनाची ‘ सामाजिक जाणिवेचा ज्येष्ठ रंगकर्मी ‘ म्हणून २ वर्षांची शिष्यवृत्ती, हे त्यापैकी काही पुरस्कार. २००१ साली पुण्यात झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. 

मराठी साहित्य-शारदेला इतक्या विविध आणि सुंदर अलंकारांचा साज चढवणाऱ्या श्री रत्नाकर मतकरी यांना आजच्या जन्मदिनी अतिशय आदरपूर्वक विनम्र प्रणाम ?

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares