मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आठ हजार आठशे नव्वद दिवसांची प्रतीक्षा !” भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“आठ हजार आठशे नव्वद दिवसांची प्रतीक्षा ! भाग – १  ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

भारतीय सेना… जिंदगी के साथ भी… जिंदगी के बाद भी! 

(आणि लेकाच्या आठवणीत हे दोन म्हातारे डोंगर आयुष्याचा सूर्यास्त होण्याची वाट पाहू लागले! लष्करी पार्श्वभूमी असल्याने जोसेफ साहेबांचे वडील तरी काहीसे खंबीर होते… मात्र आईची तगमग सुरूच होती..! ) 

इथून पुढे – – 

पंचवीस वर्षांचा काल उलटला आणि इंडियन मिलिटरी अकादमीच्या क्र. ८८-नियमित अभ्यासक्रम-७१व्या तुकडीचा रौप्यमहोत्सव साजरा करण्याची कल्पना काही माजी अधिका-यांच्या मनात आली. कर्नल सजन मोईद्दीन आणि दिवंगत जोसेफ साहेबांच्या सोबत एन. डी. ए. मध्ये आणि पुढे इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडून येथे प्रशिक्षण घेतलेल्या सैनिकी-अधिका-यांनी त्यांच्या तुकडीचा रौप्य महोत्सव २४ जून, २०१६ रोजी साजरा करण्याचा कार्यक्रम आखला.

निवृत्त अधिकारी, जवान यांच्या घरी संपर्क साधण्यात आला. एक देखणा कार्यक्रम आयोजित केला… अगदी परदेशातूनही सैनिक-कुटुंबे आली होती. या तुकडीतील १९ अधिकारी देशसेवेत हौतात्म्य प्राप्त करते झाले होते… या १९ अधिका-यांची त्या यादी विक्रम गिल साहेबांनी तयार केली… त्यात जोसेफ साहेबांचे नाव अग्रस्थानी होते. सर्व हुतात्म्यांचे स्मरण करण्यात आले… उपस्थित सर्वांना स्मृतीचिन्हे देण्यात आली… पण या नातेवाईक लोकांत E. जोसेफ साहेबांचे कुणी नव्हते…! कारण त्यांच्याशी संपर्कच होऊ शकला नाही. त्यांच्या पत्त्यावर पाठवलेली सर्व पत्रं माघारी आली होती. आणि संपर्क जरी झाला असता तरी केरळमधून नागालँड मध्ये पोहोचायचे तर खर्च, प्रवास व्यवस्था… कितीतरी समस्या आल्याच असत्या आणि एकतर एवढे दूरचे अंतर! पण कार्यक्रमात काही अधिका-यांच्या मनात एक शल्य निश्चित होतं… जोसेफ साहेब असते तर? किमान त्यांचे आई-वडील तरी आज इथं पाहिजे होते!

समारंभास उपस्थित राहू न शकलेल्या कुटुंबियांना स्मृतीचिन्हे त्यांच्या घरी नेऊन देण्याची व्यवस्था करण्यात आली. दक्षिणेत कर्तव्यावर असलेल्या एका केरळी अधिका-यावर जोसेफ कुटुंबियांचा शोध घेण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी खूप नेटाने शोध घेत दोन महिन्यांनी केरळ मधल्या ग्रामीण भागात जाऊन जीवन कंठणा-या निवृत्त सुभेदार मेजर जोसेफ साहेब यांच्या घराचा शोध लावला… आपल्या लेकाच्या नावाचे स्मृतिचिन्ह पाहून जोसेफ साहेब आणि त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले… आणि बोलण्याच्या ओघात सौ. जोसेफ म्हणाल्या… ”माझ्या लाडक्या लेकाचा चेहराही मला शेवटचा पाहता आला नाही! त्याच्या कबरीवर फुलं वाहून मला त्याला श्रद्धांजली वाहायची होती… आणि त्याचे आभार मानायचे होते! देवाने मला इतका शूर मुलगा दिला… त्याचा अभिमान आहे मला! … पण तो इतक्या दूर आहे त्याच्या कबरीत विसावलेला… माझ्या जीवनाची संध्याकाळ नजीक आली आहे… बहुदा त्याची आणि माझी भेट देवाच्या घरीच होणार आता… ” आणि पुढे अश्रूंचा महासागर लोटला… सायंरेषा अधिकाधिक गडद होत गेल्या!

स्मृतिचिन्ह घेऊन गेलेला अधिकारी एका निश्चयाने परतला. सर्व माजी अधिकारी एकत्र बसले… आणि त्यांनी निश्चय केला… आपल्या मित्राला त्याच्या आईकडे पाठवायचेच! आणि सुरु झाला एका शूर मुलाच्या देहाच्या अवशेषांचा त्याच्या आईपर्यंतचा प्रवास!

जोसेफ साहेबांच्या कबरीचा शोध घेणे हे मोठे जिकीरीचे काम होते. लष्करी परिसरात अंत्यविधी झाला होता… तरीही ही जागा तशी विस्मरणात गेली होती. पण कागदपत्रे आणि इतर बाबी तपासल्या असता कोहिमा मध्ये चाकाबामा येथे एकूण सहा कबरी सापडल्या… चार मुस्लीम अधिका-यांच्या तर दोन ख्रिस्ती अधिका-यांच्या. त्यातील जोसेफ साहेबांची कबर शोधण्यात आली… मित्रांना त्यांचा मित्र पुन्हा गवसला होता.!

हुतात्मा जोसेफ साहेब एन. डी. ए. खडकवासला च्या ७८व्या तुकडीचे विद्यार्थी. त्यांचे सहपाठी पुढे नौदल, वायुदल आणि पायदळात अधिकारी झाले होते… त्यातले बहुतांश आता सेवानिवृत्त झालेले होते. या सर्वांशी संपर्क साधला गेला. आणि काही वेळात मोठी रक्कम जमा झाली.

कर्नल अतुल सालुखे साहेबांनी वायूसेनेतून निवृत्त झालेल्या आणि त्यावेळी इंडिगो विमान कंपनीत वैमानिक असलेल्या कॅप्टन मनोज कुमार यांच्या कानांवर एक गोष्ट घातली… त्यांच्या पुढाकाराने इंडिगो विमान कंपनीने जोसेफ साहेबांच्या कुटुंबियांची आणि जोसेफ साहेबांच्या अवशेषांसाठी विनामूल्य प्रवास व्यवस्था करून दिली. वाटेतील प्रवास, निवास आणि भोजन व्यवस्था संबंधीत ठिकाणच्या लष्करी केंद्रामधील सैनिक, अधिका-यांनी मोठ्या विनयाने आणि बंधू भावनेने करून दिली.

या दरम्यान सर्व सैनिकी अधिकाऱ्यांनी सूत्रे हलवली होती… आणि न भूतो असा निर्णय घेण्यात आला… भारतीय सैन्यातील अत्यंत वरिष्ठ अधिका-यांनी एका अत्यंत भावनिक निर्णयाला संपूर्ण पाठिंबा दिला… जोसेफ साहेबांना त्यांच्या घरी पाठवण्याचा… लष्करी इतमामात! सर्व कागदपत्रे, परवानग्या मिळवण्यात आल्या. ११ ऑक्टोबर, २०१६… जोसेफ कुटुंबीय कोहिमा येथे पोहोचले… जड पावलांनी त्या सर्वांनी दफनभूमीत प्रवेश केला… आईच्या अश्रूंनी कबरीवरची माती ओलीचिंब झाली… तिथल्या गवतावर उगवलेली नाजूक फुलं कावरीबावरी झाली!

कबर विधीवत उकरण्यात आली… प्रार्थना सुरु होत्या… साहेबांचे अवशेष मोठ्या सन्मानाने गोळा करण्यात आले… एका स्वतंत्र शवपेटीत बंदिस्त करण्यात आले… त्यावर राष्ट्रध्वज पांघरला गेला… सलामी झाली… बिगुल वाजला… एक सैनिक अधिकारी आपल्या आईच्या घरी निघाला… १३ ऑक्टोबर, २०१६ रोजी कोची विमानतळावर जोसेफ साहेबांचे पार्थिव पोहोचले… स्थानिक पोलिस, लष्करी अधिका-यांनी पुष्पचक्रे वाहिली… मिरवणूक निघाली… कंजारीमोत्तम इथल्या ख्रिस्ती दफनभूमीत खास व्यवस्था केली गेली होती… कबर तयार होती… १४ ऑक्टोबर रोजी विशेष प्रार्थना सभा आयोजित करून होली क्रॉस चर्च येथे भारतमातेचे सुपुत्र हुतात्मा सेकंड लेफ्टनंट ई. टी. जोसेफ साहेब यांना कायमचा निरोप देण्यात आला! आठ हजार आठशे नव्वद दिवसांनी पोरगं आईकडे परतले होते… आता आई थ्रीसिएम्मा रोज तिच्या लाडक्या लेकाच्या कबरीवर फुलं वाहायला जाऊ शकणार होती… जोसेफ साहेबांच्या मित्रांनी अत्यंत निकराने प्रयत्न करून हेही ऑपरेशन यशस्वी करून दाखवले होते! प्रशिक्षण आणि सैन्यसेवेमध्ये जीवाला जीव देणा-या अधिका-यांनी आपल्या साथीदाराची साथ अखेरपर्यंत सोडली नाही… जय हिंद… जय हिंद की सेना!

(सैनिकांचा इतिहास जिवंत रहावा यासाठी कार्यरत असणा-या उमाताई कुळकर्णी यांच्या पोस्टवरून हा लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली.

समाप्त –

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # अडला हरी नि शाळेपेक्षा स्पेशल ट्यूशन बरी… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # अडला हरी नि शाळेपेक्षा स्पेशल ट्यूशन बरी… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

शी. आई मला किनई नुसती शाळा ते घर नि घर ते शाळा दिवसभर करण्यात बोअर होतयं… रोजचं जा लडदू आणि ये लडदू करण्यात काही थ्रील वाटत नाही बघं… आणि तसंही शाळेत कुठल्याही विषयाच्या टिचर तरी कुठे त्यांच्या तासाला बाय हार्ट शिकवतात… अर्धेअधिक पुस्तक आणि गाईडचं रेफर करून आम्हाला वाचून सांगतात… मग तो मराठीचा तास असूदे नाही तर गणित नाही तर गेलाबाजार सायन्स… सगळ्या टिचरची शिकवण्याची एकच काॅपीपेस्ट मेथड असते… हं या टाॅपिकला यावर्षी च्या पेपरला व्ही. व्ही. आय. एम. पी. मार्क करा आणि त्यातला तो पाचवा प्रश्न यावेळेस विचारला जाण्याची शक्यता आहे… तेव्हा फक्त त्याचं उत्तर तेव्हढं लक्षात ठेवा.. बाकी या लेसन मध्ये काही नाही… आता उद्या दुसरा लेसन आपण बघणार आहोत… आतापर्यंत आपले अकरा लेसन या प्रकारेच तुम्हाला शिकवून झाले आहेत… सगळ्यांना समजलेलं तर आहेच आणि ज्यांना काही डिफिकल्टी असतील तर त्यांनी माझ्या स्पेशल ट्यूशनला ॲडमिशन घेऊन क्लिअर करून घ्यावी… शाळेत तासाला विषयाचा सिलॅबसच जेमतेम पूर्ण होईपर्यंत मारामार तिथे डिफिकल्टी कुठून साॅल्वह करता येणार… आणि माझ्या स्पेशल ट्यूशनमधे नव्वद मिनिटाचा तास असल्याने तुमच्याकडे वेळ देता येतो… शिवाय टेस्ट सिरीजमध्ये विषय चांगला पक्का होऊन डिसटिंक्शन मार्क मिळतात… हा माझा लौकिक आहे… तेव्हा तुम्ही मुलांनी आपल्या पेरेंटसना या क्लासला जायचे आहे म्हणून सांगा. जे येतील त्यांचं भविष्य उज्ज्वल झालंच म्हणून समजा आणि जे येणार नाहीत ते या विषयात फेल झालेच म्हणून समजा… चाॅईस ईज युवर… असं शाळेतला उठसुठ जो तो टिचर आम्हाला रोजच ही

 टेप वाजवून दाखवतो… आणि पंचेचाळीस मिनिटाच्या तासात फक्त दहा मिनिटात विषय गुंडाळला जातो बाकी सगळं ट्यूशनमधे सांगितलं जाईल म्हणतात… मग मम्मी आम्ही घरी तरी अभ्यास कशाला आणि का करायचा… का उगाच आताच माथेफोड करायची… सगळी परीक्षेची काळजी जर स्पेशल ट्यूशनमधे घेतली जाणार आहे तर शाळेत तरी कशाला जायचं… तिकडे बाहेरच्या बाहेर ट्यूशन जाॅइन केललं काय वाईट… परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेची नक्कल उत्तरासकट हाती मिळत असेल तर शाळेची गरज काय… आणि कोण आता ते सेल्फ स्टडीज च्या ओल्ड ट्रॅडिशनला फाॅलो करेल… ट्यूशनची फी एकदा भरली कि आपलं फ्युचर सेफ होते… फर्स्टक्लास विथ मेरिटचं भलंमोठ्ठं सर्टिफिकेट हाती येतं तेव्हा तर याचसाठी केला होता अट्टाहास हेच ओठी येतं… (हो ते तेव्हढचं.. डोक्यात काय घुसलयं कोणत्या देवाला ठाऊक).. पण आताच्या डिजीटल जमान्यात उसका भी डर नही… कारण डर के आगेही गुगल कि… चुकलं चुकलं… अपनीही जीत होती है… नाहीतरी तुम्ही माझ्यासाठी या शाळेतल्या आणि पुढच्या काॅलेजच्या शिक्षणासाठी किती खर्च करत राहणार आणि सगळ्यात महत्त्वाचं या वेळखाऊ सव्यापव्यसात माझा टाईम किती बरबाद होईल… ते मला चालायचं नाही… मला त्या टाईम स्लाॅट मधे कुछ तो क्रिएटिव्ह करायचं आहे.. जसं कि पब जी ग्राफिक्स सुपरफास्ट कसं होईल… बंद तिजोरी कशी उघडता येईल… सायलेंट बाॅम्ब कसा बनवता येईल… वगैरे वगैरे.. या सगळ्या गोष्टी काय शाळेत किंवा काॅलेजच्या धड्यात मिळतात काय… त्यासाठी गुगल सर्च करावं लागतं आणि तसं गुगलच आता महागुरू असल्याने बाकी गुरूंची सुट्टी झालीय… माझा आता पाचवीच्या वार्षिक परिक्षेचे सगळे पेपर विथ आन्सर गुगलवरच तर अपलोड झालेले आहेत.. त्याला गुगल पे ने फी भरली कि आपल्याला ॲक्सेस मिळतो… आणि येथून पुढे हिच प्रोसेस फाॅलो केली कि जीवन में खुशीयाही खुशीया आ जाएगी… तेव्हा पप्पा नि मम्मी तुम्ही फक्त पैसै तयार ठेवा… बाकी मी बघून घेतो… आणि लवकरच तुम्हाला माझ्या तर्फे यशसिध्दीचा आनंदाचा मेवा देतो…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २५ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २५ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

नीती आणि धर्म

आत्तापर्यंतच्या चोवीस भागातून आपण संत तुकारामांच्या अनेक विषयांवरील अभंगांचा अभ्यास केला. या भागात त्यांनी माणसाच्या नीती आणि धर्माविषयी रचलेले काही अभंग आपण पाहू.

रडोनिया मान/ कोण मागता भूषण/

देवे दिले तरी गोड/ राही रुची आणि कोड//

लाविता लावणी/ विके भिके केज्या दानी//

तुका म्हणे धीरा/ विण कैसा होतो हिरा//

या अभंगात माणसाने खरेपणाने आणि धीराने वागावे असे महाराजांना लोकांना सांगायचे आहे. मला मान द्या असे रडगाणे लावून जर कोणी मान देत असेल तर त्यात काय मोठे भूषण आहे? लहान मुलाने रडावे आणि आपला हट्ट पुरा करावा तसाच हा प्रकार आहे. न मागता मिळतो तो खरा मान, मोठेपणा. म्हणून माणसाची वृत्ती समाधानी असावी. परमेश्वराने माझ्या पदरात जे दान टाकले आहे, ते गोड मानले आणि त्यात समाधान ठेवले तर ते खरे सुख आहे. उदाहरणादाखल महाराज पुढे सांगतात की, शेतात स्वतः राबून पिकवलेले धान्य दान केले तर त्यात खरे समाधान आहे. भीक मागून किंवा दुसऱ्याचे ओरबाडून घेतले आणि दानात दिले तर त्या दानाला काही अर्थ नाही. कोणत्याही प्रकारच्या उतावळेपणाने मोठेपणा मिळत नाही. जो धैर्यवंत असतो त्यालाच हिऱ्याची योग्यता लाभते.

पुढे ते सांगतात, ज्याला स्वहित साधायचे आहे त्याने नीती धर्माच्या खुणा, संकेत पाळणे अत्यंत जरुरीचे आहे.

पूज्या एकासनी आसनी आसन/

बैसता गमन मातेशी ते//

सांगतो ते धर्म नितीचा संकेत/

सावधान हित व्हावे तरी//

संता ठाया ठाव पूजनाची इच्छा/

जीवनीच वळसा सापडला//

तुका म्हणे एकाएकी वरासने/

 दुजे तेथे भिन्न अशोभ ते//

प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून वागावे. ज्या आसनावर पूज्य अशा देवांची मूर्ती असेल किंवा गुरु बसलेले असतील, त्या आसनावर आपण बसू नये. ते पाप आहे. स्वतःची योग्यता नसताना, संतांप्रमाणे आपली ही पूजा व्हावी असे ज्याला वाटते, तो भवसागरात गटांगळ्या खातो आहे असे समजावे. श्रेष्ठ आसनावावर संत बसले असताना आपण तेथे जाऊन बसणे म्हणजे स्वतःची शोभा करून घेण्यासारखे आहे.

यासी कोणी म्हणे नींदेची उत्तरे/

नागवला खरे तोचि एक//

 आडवाट जाता लावी नीट सोयी/

धर्मनिती तेही ऐसी आहे//

नाइका सुखे करावे ताडण/

पाप नाही पुण्य असे फार//

जन्मव्याधी फार चुकतील दुःखे/

खंडावा हा सुखे मान त्याचा//

तुका म्हणे निंब दिधल्यावाचून/

अंतरीचा शीण कसा जाय//

 महाराजांना या अभंगात मुख्यतः काय सांगायचे आहे? तर ते म्हणजे दुर्जनाला शासन झालेच पाहिजे. कोणाला माझे हे भाषण निंदा वाटेल, पण ही निंदा नाही. कोणी आड मार्गाला जात असला तर त्याला सुयोग्य मार्गाला लावणे ही खरी धर्मनिती आहे. चांगल्या नीतीची गोष्ट सांगत असता जर कोणी ती ऐकली नाही तर त्याला खरपूस मार द्यावा. (शब्दांचा) त्यात पाप नसून ते पुण्यकर्मच ठरेल. असे केल्याने जन्मरूपी व्याधी आणि इतर अनेक दुःखातून त्याची सुटका होईल. म्हणून त्याची मानखंडना सुखाने करावी. अंग तापाने फणफणल्यावर त्याला कडुलिंबा सारखे कडू औषध द्यावे लागते ना? दुर्जनाला सुधारण्यासाठी शिक्षा करणे क्रमप्राप्त आहे.

एका विठ्ठलाच्या चरणाशी सर्व नीती, धर्म शास्त्र आहे. म्हणून तुकाराम महाराज सर्व लोकांना विठ्ठलापाशी भक्ती भाव ठेवण्यास सांगतात.

पृथक मी सांगो किती/ धर्म नीती सकळ/

अवघीयांचा एक ठाव/ शुद्ध भाव विठ्ठली//

क्षरा अक्षराचा भाग/ करा लाग पंढरीये/

तुका म्हणे आगामीचे/ मथिले साचे नवनीत//

 महाराज म्हणतात की ते प्रत्येकाला धर्म आणि नीती विषयी वारंवार किती सांगणार? एकच करा, सर्वांनी विठ्ठलाच्या चरणी शुद्ध भाव ठेवावा. हेच धर्म आणि नीतीचे तात्पर्य आहे. तो क्षर ( सगुण) आणि अक्षररूप ( निर्गुण) पंढरपुरात आहे, त्या ठिकाणी सगळ्यांनी अवश्य जावे. सर्व शास्त्ररुपी दही घुसळून काढलेले लोणी म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठल हे दैवत तेथे आहे. भगवंताचे ध्यान अंतःकरणांमध्ये करणे हीच त्याची पूजा आहे. या वाचून सर्व वेगवेगळ्या उपाधी पापमूलक आहेत. त्या उपाधींचा संकल्प सुद्धा करू नये. लोकहो, भगवंताने श्रुती आणि स्मृती मध्ये ज्या आज्ञा दिल्या आहेत, त्याप्रमाणे आचरण ठेवणे, हाच खरा धर्म आहे. हा धर्म पाळल्याने सहज स्थिती प्राप्त होईल, ज्या स्थितीचा तुम्हाला कधी वीट येणार नाही. मनाची स्थितप्रज्ञता ही सहज स्थिती आहे. त्यामुळे सुखाने अति आनंद होणार नाही किंवा दुःखाने अतीव दुःख होणार नाही.

नीतिमत्तेबद्दल तुकाराम महाराज आणखी काय सांगतात ते पाहूया.

नये पाहो मुख मात्रागमन्याचे/

तैसे अभक्त्याचे गुरुपुत्रा//

म्हणउनी बरे धरिता एकांत/

तेणे नवे घात भजनासी//

नये होऊ कदा निंदकाची भेटी/

जया द्वैतपोटी चांडाळाच्या//

*तुका म्हणे नको बोलो त्यासी गोष्टी/

जयाचिया दृष्टी पापवाढे/

त्यांचे म्हणणे असे आहे की, जो विकृत वृत्तीचा आहे, (मात्रागमन्या )- मातेशी गैर वृत्तिने वागणार्‍याचे तोंड कधी पाहू नये. गुरुची निंदा करणाऱ्या शिष्याचे, हरीची निंदा करणाऱ्याचे मुखही पाहू नये. आपल्या भक्तीत, भजन कीर्तनात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये यासाठी एकांतात राहणे सर्वोत्तम! निंदकाची भेट घेणे टाळावे, कारण त्याच्या तोंडात गोडवा असला तरी पोटात कपट असते. अशा माणसांना नुसत्या पाहण्याने सुद्धा पाप वाढते. नीती धर्माच्या कल्पना जनसामान्यांच्या मनात रुजविण्यासाठी तुकाराम महाराज काही दृष्टांत देतात.

अग्निमाजी पडे धातू/ लीन होऊनी राहे आंतु/

होय शुद्ध न पावे धातू/ पटतंतूप्रमाणे//

बाह्य रंगाचे कारण/ मिथ्या अवघेची भूषण/

गर्व ताठा हे अज्ञान/ मरण सवे वाहतसे//

पुरे मातलिया नदी/ लव्हाळा नांदे जीवनसंधी*/

वृक्ष उन्मळोनी भेदी/ परी तो कधी भंगे ना//

हस्ती परदळ जो भंगी/ तया पायी न मरे मुंगी/

कोण जाय संगी/ पाणोवाणी तयाच्या//

पिटीता घणेवरी सैरा/ तया पोटी राहे हिरा/

तैशा काय तगती गारा/ तया थोरा होऊनी//

लीन दीन हेचि सार/ भव उतरावया पार/

पुढे माथा भार/ तुका म्हणे वाहोनी*//

माणसाने नेहमी दीन असावे. हा गुण किती चांगला आहे त्याची उदाहरणे महाराज देतात.

१) अग्नीमध्ये पडलेले सोने न जळता शुद्ध होते, परंतु वस्त्र किंवा धागा आगीत पडला तर त्याचा नाश होतो. बाह्यात्कारी भूषणे हा केवळ दिखावा असतो.

२) गर्व किंवा ताठा हे केवळ अज्ञान आहे. जीव गेला तरी अज्ञान तसेच राहते.

३) महापूर आला तर वृक्ष उन्मळून पडतात आणि लव्हाळी मात्र तशीच टिकून राहतात. * वृक्षवल्ली जाती तेथे लव्हाळे वाचती ज्ञानेश्वरांनी सुद्धा हेच सांगितले आहे.

४) हत्ती शत्रूचा विध्वंस करतो, परंतु त्याच्या पायाखाली मुंगी मरत नाही. म्हणून हत्तीच्या मागोमाग झुंज खेळायला कोण जाणार?

५) हिरा घणाने फुटत नाही, पण गारा हिर्‍या पेक्षा मोठ्या असल्या तरी त्या घणाखाली टिकतात का?

 या सर्व उदाहरणांचा अर्थ एकच की, सर्वांनी दीन पणाने नम्र होऊन रहावे. मोठेपणाची ऐट कधी, कशाने गळून पडेल हे सांगता येत नाही. नम्रता, लीनता हे भवसागर पार करण्याचे फार मोठे साधन आहे. ज्याला मोठेपणाचा गर्व असेल

तो या भवसमुद्रात बुडून जाईल.

पुढील लेखात तुकाराम महाराजांनी रचलेल्या व्यवहार ज्ञानाविषयीच्या अभंगांचा आपण परामर्श घेऊ.

क्रमशः… १५ 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ मराठीचा घसरलेला टक्का ! – ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मराठीचा घसरलेला टक्का ! – ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

परवा ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा चित्रपट पाहिला. आजच्या गल्लाभरू चित्रपटांच्या दुनियेत एका वेगळ्या विषयावरचा हा चित्रपट पाहताना आनंद वाटला. मराठी शाळांची खालावत चाललेली धक्कादायक अवस्था आणि अस्तित्वाचा संघर्ष या चित्रपटाने अत्यंत ढळढळीतपणे समाजासमोर आणला आहे. हा चित्रपट पाहत असताना मला नुकताच काही दिवसांपूर्वी लागलेला इयत्ता दहावीचा निकाल आठवला. निकालानंतर वर्तमानपत्रात ठळक अक्षरांमध्ये एक मथळा (हेडलाईन) प्रसिद्ध झाला होता ‘ दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात ९४, ००० विद्यार्थी अनुत्तीर्ण !’ आपल्याच मातृभाषेला दुय्यम स्थान दिल्यामुळे मुले चक्क मराठीत नापास झाली आहेत. ही संख्या थोडीथोडकी नाही.

” मला सगळ्या विषयात चांगले मार्क आहेत पण फक्त मराठीत गेलो… ” दहावी उत्तीर्ण एका विद्यार्थ्याचे हे उद्गार ! आम्हाला सगळ्या विषयात चांगले मार्क्स असले तरी आमच्या टॉप फाईव्ह मध्ये मराठी नसते. “आमची उज्ज्वल यशाची परंपरा ! आम्ही सर्व विषयांची उत्तम तयारी करून घेतो, ” असे मोठे मोठे बोर्ड लावणारे क्लासेस मराठी विषयाची तयारी करून घेताना कुठे जातात ?

एका बाजूला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आपण आनंदाने आणि अभिमानाने स्वतःची पाठ थोपटून घेत आहोत; अर्थात, यात वावगे काहीच नाही. पण खरंच माझी मराठी टिकावी, तिची समृद्धी आणखी वाढावी यासाठी आपण मुळापासून काही प्रयत्न करतो आहोत का ? जेव्हा मुलांच्या मराठीतील नापासांचे हे धक्कादायक प्रमाण समोर येते, तेव्हा आपण क्षणभर गडबडतो, आपल्याला धक्काही बसतो. पण तो तेवढ्यापुरताच! या स्थितीला जबाबदार असलेला प्रत्येक घटक आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून मोकळा होतो. मुले म्हणतात, ” शाळेत मराठीचे तास नियमितपणे झालेच नाहीत. ” बऱ्याच वेळा मराठीचे तास दुसऱ्या विषयाला वापरले जातात. मराठी काय घरीही अभ्यासता येईल. अशी मानसिकता निर्माण केली जाते. दहावीचे शिक्षक म्हणतात, ” मुले आमच्याकडे येताना खालूनच कच्ची आली. ” प्रत्येकजण अशा सबबी देऊन आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून मोकळा होत असतो. पण या विषयावर आपण कधी मुळापासून यावर विचार करणार आहोत की नाही ?

‘असर’ (Annual Status of Education Report) चा मागील एक अहवाल सांगतो की, जी मुले दहावीत होती, त्यांना इयत्ता तिसरीत असताना पहिलीचे मराठी धडे वाचता येत नव्हते; तर आठवीत असताना दुसरीच्या स्तरावरील उतारा वाचता येत नव्हता. आज इतक्या वर्षांनंतरही या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. आपल्या मुलांचे मार्कांचे एकूण टक्के वाढले असतीलही, पण ज्ञानाचा आणि मराठीचा खरा टक्का मात्र घसरला आहे. मराठी साहित्य संमेलनांचे भव्य आयोजन करणे, पुस्तक प्रदर्शने भरवणे किंवा दुकानाच्या पाट्या मराठीत लिहायला लावणे या गोष्टी भाषेच्या प्रसारासाठी उपयुक्त असतीलही; पण जोपर्यंत आपण मूळ आजारावर उपाय करत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती सुधारणार नाही.

ज्यांनी ‘शांतिनिकेतन’ची स्थापना केली, ते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर बंगाली भाषेबाबत कमालीचे आग्रही होते. त्या काळात बंगालमधील सरकारी नोकरदार आणि मध्यमवर्गीय लोक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालण्यात आणि इंग्रजी बोलण्यात धन्यता मानत होते. अशा विपरीत परिस्थितीत गुरुदेवांनी “मातृभाषेतील शिक्षण हेच सर्वात उत्तम शिक्षण” असल्याचा उद्घोष केला. केवळ बोलून न थांबता त्यांनी शांतिनिकेतनमध्ये केवळ बंगालीतूनच शिक्षण देण्यास सुरुवात केली आणि पाठ्यपुस्तकेही बंगालीत तयार केली. ‘आमार जीवन, आमार बानी’ (माझे जीवन, हीच माझी वाणी) हे त्यांचे घोषवाक्य होते. आम्ही मात्र आज स्वातंत्र्याला ऐंशी वर्षे होत आली, तरी इंग्रजी भाषेचे गोडवे गाण्यातच मग्न आहोत.

एकदा एका विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला रवींद्रनाथांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. त्या काळी असे समारंभ आणि त्यातील भाषणे केवळ इंग्रजीतूनच होत असत (जी आजही होतात). उपस्थितांचीही तीच अपेक्षा होती; पण गुरुदेवांनी तो सगळा इंग्रजी राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) धुडकावून लावला आणि थेट बंगालीत भाषण करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आपल्या भाषेचा असा अभिमान आपल्यात कधी जागी होणार?

आपले सरकार इंग्रजी शाळांना धडाधड परवानग्या देत आहे आणि दुसरीकडे मराठी शाळांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. “मराठी शाळांचा दर्जा खालावला आहे” असा बागुलबुवा उभा करून पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये पाठवणे बंद केले. परिणामी, ‘विद्यार्थी नाहीत’ हे कारण पुढे करून शासनाने शाळा बंद करण्याचा सपाटा लावला आहे. ज्या काही शाळा आज कशाबशा सुरू आहेत, त्यांची अवस्था केविलवाणी आहे; कुठे छप्पर गळतेय, तर कुठे पुरेसे शिक्षक नाहीत.

‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या चित्रपटात हेच विदारक वास्तव अचूक मांडले आहे. विद्यार्थीसंख्या कमी झाली म्हणून शासनाकडून शाळा बंद होण्याची टांगती तलवार जेव्हा मानेवर येते, तेव्हा त्या शाळेचे मुख्याध्यापक दिनकर शिर्के (सचिन खेडेकर) शाळा वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांना हाक मारतात. हा चित्रपट आपल्याला एक मोठा धडा देतो. सरकार शाळा बंद पाडत असले आणि समाज उदासीन असला, तरी ज्या शाळेने आपल्याला घडवले, तिच्या पडत्या काळात तिच्या पाठीशी उभे राहणे ही प्रत्येक माजी विद्यार्थ्याची आणि समाजाची नैतिक जबाबदारी आहे. हे दुष्टचक्र मोडून काढण्यासाठी समाज, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी आणि शासन या सर्वांनी आता एकत्र यायलाच हवे.

‘मी मराठी, माझी शाळा मराठी’ हे आता केवळ वाक्य न राहता आपले ब्रीदवाक्य व्हायला हवे. आमचा इंग्रजीला अजिबात विरोध नाही, ती काळाची गरज म्हणून महत्त्वाची भाषा आहेच आणि ती पुढेही शिकता येते. पण ज्या गोष्टी मातृभाषेतून आमचे मूल सहजपणे आणि आत्मविश्वासाने शिकू शकते, त्या गोष्टी सुरुवातीलाच परक्या भाषेतून लादून त्याच्यावर ताण का आणायचा ? मराठी शाळांमधून केवळ कोरडे शिक्षण दिले जात नाही, तर आपली संस्कृती, शिष्टाचार आणि उत्तम संस्कार तिथे जोपासले जातात. जर आपल्याला आपली संस्कृती टिकवायची असेल आणि मुलांवर सुसंस्कार हवे असतील, तर मराठी शाळा आणि मराठी माध्यम अपरिहार्य आहे.

मुलांना मराठीची खरी गोडी शालेय स्तरापासूनच लागली पाहिजे; ती केवळ ‘एक परीक्षा’ म्हणून अभ्यासली जाऊ नये. ही गोडी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षक, पालक आणि संपूर्ण समाजाने उचलली पाहिजे. मुलांच्या पाठ्यपुस्तकातील धडे, कविता त्यांना मराठीची गोडी निर्माण होईल अशा असाव्यात. घरातही मराठी पुस्तके, वर्तमानपत्रे यावीत. पालकांनी देखील मुलांसमोर दर्जेदार अशी मराठी पुस्तके स्वतः वाचावीत. सुरुवात नेहमी स्वतःपासून करावी लागते. नुसते वाचन करा म्हणून सांगितले तर मुले ऐकणार नाहीत. यासोबतच, भविष्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये आणि नोकऱ्यांमध्येही मराठीला मानाचे व अनिवार्य स्थान मिळाले पाहिजे. “मराठी शिकल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही” हे जेव्हा मुलांच्या आणि पालकांच्या लक्षात येईल, तेव्हाच मराठीच्या अभ्यासाला खऱ्या अर्थाने प्राधान्य मिळेल.

आपल्याला केवळ गणित, विज्ञान, इतिहास किंवा भूगोल येऊन उपयोग नाही; आपल्याला आपली मातृभाषाही उत्तम लिहिता, बोलता आणि वाचता आली पाहिजे. “माझा मराठाचि बोलू कौतुके। परी अमृतातेही पैजा जिंके।” या माउलींच्या उद्गाराची अनुभूती आमची मुले केव्हा घेणार ? जेव्हा त्यांना मराठी भाषेत खरोखर रस वाटू लागेल तेव्हाच ना ! आणि याच मराठी मातीतून उद्याचे उत्तम साहित्यिक, वक्ते, शास्त्रज्ञ आणि समाजाला दिशा देणारे समाजसेवक निर्माण होतील. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने आणि गर्वाने म्हणू शकू…

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी… “

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”मला ब्रेक हवाय !” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “मला ब्रेक हवाय !” ☆ संध्या बेडेकर ☆

If you are tired, learn to take a rest. Take break.

मला break हवाय.

आज सकाळपासूनच माझी चिडचिड सुरू होती. इतक्यात हे अस बरेचदा होतय. म्हणजे उगीच चिडचिड करायला मी काही वेडी नाही. तसा माझा स्वभाव ही नाही. ही चिडचिड सध्या तरी स्वतःपर्यंतच आहे. मी नोकरी करत नाही, पण घर सांभाळण घरातील सर्वांची ची वेळ, डबे, त्यांचे मूड, चिडचिड खाण्याचे नखरे, जेष्ठांचे औषधपाणी, घराचे मेंटेनन्स, सांभाळणे हे काही सोप्प काम नाहिये. आणि ते फक्त काही दिवसांचे / महिन्यांचे नाही तर वर्षानुवर्ष तेच ते चालू आहे. थोडक्यात हे म्हणजे सर्वांच्या तालावर नाचणेच झाले नाही का ? खरतर हे सर्व करण्यात मला आनंदच मिळतो. आवडत मला. त्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून स्वयंपाक करण खरच आवडत मला. जसजस माझ वय वाढतय तसतशी माझ्या एक गोष्ट लक्षात आली की थोडी चूक झालीच आहे माझी. सर्व मनासारख, सतत त्यांच्या सेवेत मागेपूढे हजर राहणे.

हे बरोबर नाही. एकतर त्यांच्या सवयी बदलतात. काम करायची सवय नाही. उद्या अजयचे लग्न झाले तर ती सून पण कदाचीत अजयला म्हणेलही… की तुमच्या आईने तुम्हाला काही सवयी लावल्या नाहीत. खूप लाडावून ठेवल आहे. आज नोकरी करणारी सून येण्याची शक्यता जास्त आहे, तेंव्हा नवर्याचे सहकार्य अपेक्षित असतेच.

 हे सर्व विचार मला अस्वस्थ करतायेत. हे अस का होतय ? हा विचार मला अस्वस्थ करतोय. वय झालय म्हणण्यापेक्षा वय वाढतय, हे म्हणण जास्त योग्य होईल., तस म्हंटल तर 50/52 वर्ष वय म्हणजे काही खूप नाहीच. शक्ती कमी झालीय की काही आजार वगैरे? आता कुठे सून आणायची वेळ आली आहे.

मी माझा प्रोब्लेम घरात सांगीतला नाही तर, त्यांना कळेल कसा ? हे अस ओढून ताणून घर चालवण बरोबर आहे का ? उद्या मी च आजारी पडले, तर सर्वांनाच जास्त त्रास होईल. मला विश्रामाची गरज आहे का ? ब्रेक हवाय का ?

हे विचार मनात घर करून बसले आहेत.

 आज दुपारी आईंना चहा देतांना, आई म्हणाल्याच… काय ग अनिता ? काय विचार करतेय ? आज तुझ्या भावाचा फोन आला होता ना. सर्व ठीक आहे ना त्यांच्याकडे. बर वाटत नाहीये का ? अजय काही बोलला का ? इतक्यात लक्षात आलय, तू नेहमीसारखी प्रसन्न दिसत नाही.

आईंच्या तीक्ष्ण नजरेत काहीच सूटत नाही. हे खरय.

मी म्हंटल… आई अहो.. माहित नाही का ? पण मला सध्या थकवा जाणवतोय. उत्साह वाटत नाही.

अग! मग सांगायच न. तू सांगितल नाही तर कळेल कस?

 आई अहो ! तुम्हाला सांगायच अस माझ बरेचदा ठरवून झाल हो. पण पुन्हा तेच… पुत्र प्रेम, पति प्रेम आड येत, जबाबदारी आठवते.

आणि मी काहीच बोलत नाही.

 आता मात्र बदल करायची वेळ आली आहे. हे कळतय मला.

आई म्हणाल्या… अग बाई !

आता आईपणा, सूनपणा, बायकोपणा, सर्वच बाजूला ठेव जरा. अग ! देवी बनायचा प्रयत्न करू नको. ब्रेक घे.

 नाही म्हणजे.. सहन करायची / ऐकायची एक लिमिट असते ग.

उद्या तुझी तब्येत बिघडली तर ? कोण लक्ष देणार आहे ? 

घर एक घर आता पूरे झाल.

अग! मी केलेली चूक तू करू नकोस.

अग! शांत राहण चांगली सवय आहे. ज्या घरातील स्त्री शांत स्वभावाची असते, ते घर छानच चालत. पण कोणत्याही परिस्थितीत, कितीही त्रास असताना शांत राहण म्हणजे आत्महिंसाच असते ती.

स्वतःपेक्षा जास्त दुसर्यांचा विचार करणे, महत्व देण हे कुठे तरी थांबवायला शिकलेच पाहिजे. स्वतःकडे दुर्लक्ष करण बरोबर नाही.

आई पूढे म्हणाल्या… अग! घर सांभाळताना मी पण स्वतःला विसरले होते. आणि आता मला स्वतःला आठवायला औषधांची गरज लागते.

आमच्या जमान्यातही बायका भजन क्लास, जेष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमांना जायच्याच. त्या पण छानच घर सांभाळत होत्याच की.. मी आपली आता यांची यायची वेळ झाली, त्याची वेळ झाली याच विचारात असायची. मला कोणी नको जाऊ अस कधी म्हंटल नाही. माझ पण तेच असायच ना… घर एक घर 

अग! खूप पर्याय असतात / आहेतच.

आपल्या सोयीनुसार त्यांची सर्वीस घ्यायची. स्वतःसाठी हक्काने पैसे खर्च करायला शिकायच असत.

घरी खूप संपत्ती आहे मालमत्ता आहे. त्याचा उपभोग घ्यावा. जीवनशैली गरज पडेल तशी बदलावी ना. मीच सर्व काम करेन, हा हट्ट का ? 

आजोबा सर्व शांतपणे ऐकत होते.

थोड्याच वेळात अजय आणि बाबा ऑफिस मधून परत आलेच.

अजय म्हणाला… या रविवारी Mother’s Day I love. My Mom, and Aaji too.

कस celebrate करायच ? Mom आजी कुठे जायच? सांगा.

आजोबा म्हणाले… अरे फक्त Mother’s Day लाच आई, आजी आठवतात का ? बाकी कधी काही चौकशी केली आहे का ? अरे! आमची देखरेख तुझी आई करते. तिला काय हवय ? काय आवडत ? एखादा तिच्या आवडीचा सिनेमा तिला बघायचा आहे का ? हे कधी विचारल का तिला ? 

तिच्याजवळ बसून काही विचारपूस वगैरे केली का ? कधी.

अरे! लग्न झाल्यावर तुझी जबाबदारी वाढणार आहे. तिच्या बरोबर पण असच वागशील का ? 

आईवर तुझ प्रेम आहे, हे माहित आहे आम्हाला, कधी कधी ते दाखवायच पण असत ना… आपल्या कृतीतून, वागण्यातून, बोलण्यातून. नाहीतर तुझ्या मनातल तिला कस कळेल ?

हे बघ सध्या अनिताला डोॅक्टर कडे न्यायची गरज आहे. तिला काम केल्यावर थकवा वाटतोय.

आधी हे काम कर. मग जंगी पार्टी करूयात.

अरे!लहानपणी शिकवलय ना… रस्ता पार करताना आधी डावीकडे, मग उजवीकडे… पुन्हा डावीकडे बघायच आणि मग रस्ता पार करायचा.

अरे! आयुष्यातही वेगवेगळया वळणावर जरा थांबाव. सर्व दृष्टिने विचार करावा. आपली जबाबदारी, कर्तव्य आपण बरोबर करतोय ना. काही ऐकायच / विचारायच/ सांगायच राहून तर नाही गेल. याचा विचार करावा. फक्त महिला दिवस, Mother’s Day ला नाही तर हे आपल्या वागण्यात असाव.

प्रेमाच्या दोन शब्दांत खूप जादू असते. काळजीने केलेल्या विचारपूस मध्ये अर्ध अधिक बरे होण्याची ताकद असते.

बरे असो…

उद्यापासून आपल्या घरी स्वयंपाक करायला मावशी असणार आहेत. अनिता ! त्यांची पूर्ण तयारी झाल्यावर फोडणीचे काम मात्र तूच कर. तुझ्या हातची भाजी आमटी आवडते सर्वांना. फक्त तेवढच करायच हं.. हे लक्षात ठेव.

माझ्याकडून Mother’s day ची दोन्ही आयांना हीच भेट.

हो फक्त Mother’s Day ला नाही तर नेहमीसाठी.

बाबा म्हणाले…

अग ! अनिता घरातील सगळ्यांची देखभाल करताना, स्वतःला विसरायच नसत. स्वतःवर प्रेम करायला शिकायच असत. तू या घरासाठी खूप मौल्यवान आहेस.

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आठ हजार आठशे नव्वद दिवसांची प्रतीक्षा !” भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“आठ हजार आठशे नव्वद दिवसांची प्रतीक्षा ! भाग – १  ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

भारतीय सेना… जिंदगी के साथ भी… जिंदगी के बाद भी! 

दोघांच्या मध्ये सुमारे चार हजार किलोमीटर्सचं भलं थोरलं अंतर होतं… ती त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. नवरा फौजेत होताच… सुभेदार मेजर पोस्टवर होता Shillong मध्ये. पोराला दुसरं-तिसरं काहीही व्हायचंच नव्हतं… बापाच्या पाठोपाठ पोरगंही फौजेत गेलं तसं तिच्या काळजाचे दोन भाग झाले. एक भाग कुंकवाची चिंता करी तर दुसरा भाग म्हातारपणाच्या आधाराची. एकुलता एक तर लेक होता तो. त्याच्या आधी दोन मुली पदरात होत्या… पण पोरी लोकाच्या घरी जायच्या… उतारवयात आधार पाहिजेच की! पोराचे दोनाचे चार हात झाले आणि अंगणात नातवंडं खेळायला लागली की जन्माचं सार्थक झाल्याची स्वप्नं ती माऊली रंगवत दोघांचीही वाट पहात बसायची!

मुलाचं पत्र आलंय चारच दिवसांपूर्वी… ”अम्मा, येतोय सोळा-सतरा जूनला. माझ्या आवडीची ओल्या नारळाची बर्फी, चटणी आणि गरमागरम दोसे तयार ठेव. आणि हो, यावेळी माझ्या मागं लग्नाचं टुमणं नकोस लाऊस गं… एकच वर्ष तर झालंय मला फौजेत जाऊन. आणखी जरा स्थिर स्थावर होऊ दे. पुढची पोस्टिंग शांतता क्षेत्रात मिळेल बहुदा. अगं, इकडं खूप दमछाक होते… रोज अतिरेक्यांना शोधायला जातो आम्ही… कधी त्यांचे लोक मारले जातात.. कधी आमचे. पण तू काळजी करू नको. मला छान पैकी मी इथून निघण्याच्या आधी आमच्या मेस मध्ये सर्व अधिकारी, जवान सुग्रास जेवण देतील आणि निरोप देतील! पुन्हा कधी त्यांची भेट होईल न होईल… देव जाणे! पप्पा तिकडे शिलॉंगमध्ये पोस्टेड आहेत. त्यांना सुट्टी मिळाली असती तर आम्ही दोघेही एकाचवेळी घरी आलो असतो… शेतातली कामं मार्गी लावली असती. या दोघी अभ्यास करताहेत ना? त्यांच्यासाठीही काही आणीन छान यावेळी Nagaland मधून. येतो… काळजी घे… तुझाच… E. Thomos Joseph. Corps of Military Intelligence attached with 1/5 Gorkha Rifles. तारीख ११ जून १९९२.

उद्या निघायचं म्हणून ई. जोसेफ साहेब आज रात्रीच तयार झाले होते सामानसुमान बांधून. कालच मेसमध्ये पार्टी झाली निरोपाची. उद्या निघायचं कोट्टयमला.. सुंदर केरळमध्ये… पोहोचायला तीन-चार दिवस तर सहजी लागतील. बिछाण्यावर अंग टाकले आणि युनिटमध्ये जोरदार हालचाली सुरु झाल्या… अतिरेक्यांच्या मागावर एक QRT Quick Action Team निघाली होती… तिथून जवळच अतिरेक्यांचा एक मोठा गट असल्याची पक्की खबर होती! जोसेफ साहेब गणवेश परिधान करून तातडीने बाहेर पडले… सहकारी अधिकारी म्हणाले, “आप तो कल छुट्टीपर निकलने वाले हो… आज ऑपरेशनसे लौटने में देर होगी.. आप मत साथ आईये!” त्यावर सेकंड लेफ्टनंट जोसेफ साहेब म्हणाले, “छुट्टी तो कल से है… मैं तो आज duty पर हूं… मैं भी साथ चलूंगा!”

ते अतिरेकी विरोधी अभियान रात्रभर चालले… अतिरेक्यांना या अभियानाची खबर आधीच लागली होती… गावाजवळच्या जंगलात त्यांनी सापळा रचून ठेवला होता… त्यांच्या तावडीत गोरखा सैनिकांची ही तुकडी दुर्दैवाने सापडली… आपल्या सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले… काही अतिरेकी जोसेफ साहेबांनी अचूक उडवले होते… पण अतिरेक्यांना यमसदनी धाडताना आपले तीन अधिकारी आणि दहा सैनिक धारातीर्थी पडले… त्यात ई. टी. जोसेफ साहेबही होते! त्या सर्वांचे कुटुंबीय आता कायम प्रतीक्षेत राहणार होते… जोसेफ साहेबांच्या मातोश्री थ्रीसिएम्मा जोसेफ सुद्धा!

Nagaland त्यावेळी धुमसत होतं… रस्ते बंद… रस्त्यांत हिंसक निदर्शने, लष्करी वाहनांवर दगडफेक, गोळीबार… एक ना अनेक गोष्टी सुरु होत्या. लष्कर याही परिस्थितीमध्ये संयम ठेवून काम करीत होतं… नेहमीप्रमाणे. जोसेफ साहेबांचे वडील सुभेदार मेजर थॉमस जोसेफ यांच्यापर्यंत लेकाच्या हौताम्याची बातमी पोहोचली… किती मोठा धक्का असेल त्या पितृहृदयासाठी… बाप के कंधे पे बेटे का जनाजा… किती मोठं ओझं हे! हे शल्य वागवीत ते शिलाँगवरून नागालँडकडे जायला निघाले… तेरा तासांचा प्रवास… पोहोचायला चार दिवस लागले… मालगाडीमधून प्रवास करावा लागला… काही ठिकाणी पायी जावे लागले! हुतात्म्यांचे देह आता कणा-कणाने निसर्गाच्या स्वाधीन होऊ लागले होते. त्याची दुर्गंधी सुटू लागली… भारतीय लष्कराच्या त्यावेळच्या व्यवस्थेनुसार गोरखा सैनिकांचे दाह-संस्कार युनिटमध्येच केले गेले. जोसेफ साहेब धर्माने ख्रिस्ती. त्यांना कोहिमामध्येच विधिवत दफन केले गेले… कारण तो देह इतक्या दूरवर पाठवणे दुरापास्त होते… अंत्यसंस्कार प्रसंगी केवळ त्यांचे वडीलच उपस्थित राहू शकले… आई, बहिणी आणि नातेवाईकांना अंत्यदर्शन होऊ शकले नाही!

सुभेदार मेजर जोसेफ साहेबांनी त्याच वर्षी सेनेतील नोकरी सोडली आणि ते आपली पत्नी, आणि दोन मुली यांना घेऊन त्यांच्या मूळ गावी निघून गेले… काळजात लेकाचा विरह घेऊन! यात सर्वांत दु:खी होत्या त्या मातोश्री थ्रीसिएम्मा!

त्या गावातल्या चर्चच्या मागील बाजूस असलेल्या दफनभूमीकडे बघायच्या तेंव्हा त्यांना भास होई… लेक तिथल्या एका कबरीमध्ये विसावला आहे… आणि आपण त्याच्या कबरीवर साधं फूल वाहू शकत नाही… इकडे हजारो किलोमीटर्स दूर अंतरावर एका तशा अज्ञात स्थळी, एकाकी अवस्थेत जोसेफ साहेबांचा आत्मा त्या कबरीत तळमळत असेल… आई नजरेस नाही पडली शेवटच्या क्षणी!

एक एक क्षण युगासारखा असतो दुखावलेल्या मनांसाठी. संसार सुरु राहतो… पण पायात रुतलेल्या काट्यासारखे दु;ख पावलोपावली साथ देत राहतं… वाटचाल वेदनेकडून आणखी वेदनेकडे. आई-बापाचे दु:ख दुस-या कुणाला कसे समजावे?

काळ पुढे सरकत गेला. जोसेफ कुटुंबीयांनी मग मुलींकडे लक्ष केंद्रित केले, त्यांना योग्य ते शिक्षण दिले… त्या दोघीही शिक्षिका झाल्या! आणि लेकाच्या आठवणीत हे दोन म्हातारे डोंगर आयुष्याचा सूर्यास्त होण्याची वाट पाहू लागले! लष्करी पार्श्वभूमी असल्याने जोसेफ साहेबांचे वडील तरी काहीसे खंबीर होते… मात्र आईची तगमग सुरूच होती… !

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “किचन = डिग्रीशिवायची युनिव्हर्सिटी”…  – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆

शामला पालेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “किचन = डिग्रीशिवायची युनिव्हर्सिटी”…  – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर

आपण IIT-IIM च्या डिग्रीला “इंटेलिजन्स” म्हणतो, पण जी बाई रोज सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत किचन नावाची कंपनी CEO सारखी चालवते, तिच्या IQ चं सर्टिफिकेट कोण देणार?

तू सांगितलेले 8 विषय + माझ्याकडून 2 एक्स्ट्रा:

विषय: किचनमध्ये काय होते?    बाहेरच्या जगात काय म्हणतात?

गणित: “4 लोकांसाठी 2 वाटी डाळ, पण सासूबाई आल्या तर 2. 5”     Resource Planning, Demand Forecasting

भौतिकशास्त्र: तेलाचा “तडतड” आवाज ऐकून तापमान कळणं     Thermodynamics + Acoustics

रसायनशास्त्र : दही लावताना ‘ऊब’ बरोबर लागली का?           Bio-chemistry + Fermentation Tech

मॅनेजमेंट:    गॅसवर डाळ, कुकरमध्ये भात, तव्यावर पोळी, मनात उद्याचा स्वयंपाक     Parallel Processing + Time Management

निरीक्षण:    पोळीचा ‘फुगा’ बघून गॅस कमी-जास्त करणं Quality Control + Visual Analytics

मल्टिटास्किंग : फोनवर नणंद, कुकरची शिटी, मूल “भूक” म्हणतंय – सगळं एकाच वेळी  Crisis Management + Prioritization

अर्थशास्त्र:    महिन्याचं बजेट 8 हजार, तरी 30 दिवस पोटभर जेवण     Microeconomics + Zero-Waste Policy

मानसशास्त्र: नवऱ्याचा चेहरा बघून ‘आज ऑफिसमध्ये टेन्शन आहे’ हे ओळखणं     Emotional Intelligence + Behavioral Science

बोनस 1: Nutrition: ताप आल्यावर पेज, पावसाळ्यात गरम सूप, परीक्षेला दूध-बदाम      Dietician + Preventive Healthcare

बोनस 2: Diplomacy: सासूला कमी तिखट, नवऱ्याला जास्त तिखट – एकाच भाजीत 2 चव Stakeholder Management

3 गोष्टी ज्या कुठल्याही MBA मध्ये शिकवत नाहीत:

  1. “उरलं-सुरलं” ची कला: रात्रीची पोळी → सकाळचा कुस्करा. भात उरला → दुसऱ्या दिवशी फोडणीचा भात. Waste = 0%. हे आहे Circular Economyचा बेस्ट नमुना.
  2. “मूड डिटेक्टर”: घरात कोणी उपाशी झोपलं तर तिला झोप लागत नाही. ती कॅलरी मोजत नाही, चेहऱ्यावरचं समाधान मोजते.
  3. “अदृश्य ओव्हरटाइम”: ऑफिसमध्ये 9-5 नंतर OT चे पैसे मिळतात. किचनमध्ये रात्री 11 ला मुलाला भूक लागली तर बिनपगारी एक्स्ट्रा शिफ्ट. तरी तक्रार नाही.

 म्हणूनच रावणाच्या सोन्याच्या लंकेपेक्षा आईच्या हातच्या वरण-भाताची किंमत जास्त.

 तू आधी पाठवलेल्या “Silent Kitchen” मेसेजचा पुढचा भाग हा आहे. अमेरिका किचन विसरली, म्हणजे तिने “डिग्रीशिवायच्या CEO”ला रिटायर केलं. परिणाम: कुटुंब तुटलं.

 जपान आजही जगात सर्वात जास्त जगतो कारण तिथे “ओफुकुरो नो अजी” = आईच्या हातची चव ही सांस्कृतिक संपत्ती मानली जाते.

 आज काय करायचं? 3 मिनिटांचं “थँक यू किचन” प्रोटोकॉल:

  1. जेवायच्या आधी: 3 सेकंद थांब. ताटाकडे बघ. मनात म्हण: “हे बनवणाऱ्या हातांना सलाम”.
  2. जेवताना: 1 घासानंतर “मस्त झालंय” बोलून दाखव. तिला पगार नको, पावती हवी.
  3. जेवणानंतर: स्वतःचं ताट स्वतः उचल. 2 मिनिटं तिला आराम दे. ती पण माणूस आहे, रोबोट नाही.

 डिग्री पेपरवर असते, इंटेलिजन्स तव्यावर असते.

इंग्लिश येत नसेल, पण ती 5 भाषेत बोलते – प्रेमाची, मायेची, जबाबदारीची, त्यागाची आणि संयमाची.

आज घरी गेल्यावर किचनच्या CEO ला एक कप चहा करून दे. बघ, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद कुठल्या नोबेलपेक्षा कमी नसेल.

तुझ्या घरची “किचन युनिव्हर्सिटीची चॅन्सलर” कोण आहे – आई, बायको, ताई की तू स्वतः?

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : शामला पालेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पायवाटा… ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?  विविधा ?

☆ पायवाटा… ☆ श्री आनंदहरी ☆

बालकवींची ‘औदुंबर‘ कविता शाळेत शिकताना आणि नंतरही ‘ पायवाट पांढरी तयातून आडवी-तिडवी पडे.. ’ ही ओळ आली की मन तिथेच थबकायचे, आजही थबकते..

ग्रामीण भागात, गाव-खेड्यात, वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्यांसाठी तर पाय चालायला लागले की रस्त्यापेक्षा पायवाटा याच चालणाऱ्या पायांच्या सोबती असतात. अगदी बालपणापासूनची ही सोबत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या कारणांसाठी हवीशी वाटत राहते.

आमच्या शाळेच्या परीक्षा झाल्या की खऱ्या अर्थाने आमची उन्हाळ्याची सुट्टी सुरू व्हायची. या सुट्टीचे वेध खूप आधीपासून लागलेले असायचे. ही सुट्टी म्हणजे नुसती धमाल असायची. बांधलेल्या खोंडाचे दावं सोडल्यावर जसे खोंड उधळतं तशीच सर्वांची स्थिती असायची.. वार्षिक परीक्षांची दावी सुटलेली असायची.. दावणीत उभा राहून कंटाळलेले पाय उड्या मारत उधळायला आतुरलेले असावेत तशी अवस्था व्हायची. काहींच्या घरातल्यांनी ‘झाल्या एकदाच्या परीक्षा ‘ म्हणत निश्वास सोडलेला असायचा.. सगळी बंधने सैल केली जायची. काहींच्या घरात तर परीक्षा होत्या हे ही ठाऊक नसायचे.. पोट भरण्यासाठी येरवाळी जाऊन सांजंला परत येण्यावाचून त्याच्याकडे पर्यायच नसायचा.. पण गल्लीतल्या कुणा वडीलधाऱ्याचं सगळ्यांकडे बारीक लक्ष असायचे.. शाळेच्या वेळात एखादे पोरगं दिसले तर “ काय रं, शाळंला गेला न्हाईस ? “ लगेच विचारलं जायचं. दोन-चार दिवस पोरं उंडारताना दिसली की कुणीतरी विचारायचं, “ झाल्या व्हय रं परीक्षा ? “

परीक्षा एकदाची झाली की ओढ असायची ती पोहायला जायची. सकाळ म्हणू नका, दुपार म्हणू नका, पोहण्यासाठी गुरवांच्या विहिरीवर पोरांची झुंबड असायची.. विहीरवर जाण्याची प्रत्येकालाच एवढी आतुरता असायची की जो तो पायवाटा शोधायचा, काहीजण तर सांदी-कुपाडीतून नव्याच पायवाटा तयार करायचे.. अंतर कमी करून आपल्या आपल्या इप्सितापर्यंत, ध्येयापर्यंत लवकरात लवकर नेणाऱ्या या पायवाटा किंवा पाऊलवाटा सर्वांनाच प्रिय असतात. रस्ते, राजमार्ग तयार करावे लागतात पण पायवाटा कुणी बनवत नाही किंवा तयार करत नाही.. जिथून, माणूस असो किंवा जनावरे अनेकांचे पाय गेले की त्या आपोआप बनतात. गुरवांच्या विहिराला बक्कळ पाणी असल्याने आम्ही मठातून ओघळीत उतरून कधी बांधावरून तर कधी रानातून पोहोण्यासाठी पळतच जायचो..

येताना मात्र कडकडून भूक लागली असली तरी रमत गमत, गप्पा मारत पायवाटेवरून यायचो. आम्हां पोरांना त्यावेळी पायवाट ही प्रियच असायची आणि कुठेही जायचे यायचे झाले तरी पायवाटाच हव्याशा वाटायच्या.

माणूस गावातील असो किंवा शहरातील, प्रत्येकाचा फिरण्याचा, वावरण्याचा, जाण्या-येण्याचा एक क्षेत्रपरीघ असतो. खेडेगावात प्रत्येकाचा तो क्षेत्रपरिघ जवळपास सर्वांना, त्यातल्या त्यात मोठ्यांना ठाऊक असायचाच.. त्या बाहेर, आडवाटेलासुदधा कुणी पोरगं दिसलं तर “ काय रं, हिकडं कुणीकडं निगालायस ? “ म्हणून हटकलं जायचं. सांगितलेलं कारण पटलं नाही तर माघारी घराकडं पिटाळालं जायचं.. मोठ्या माणसांनासुद्धा “ आज हिकडं आडवाटंला कुणीकडं ? “ विचारलं जायचं.

आडवाटा या पायवाटा किंवा पाऊलवाटाच.. पण न गेलेल्यासाठी आणि क्वचित कधीतरी जाणाऱ्यासाठी त्या आडवाटा. तसेच काही कारण असल्याशिवाय कुणी आडवाटेला आढळायचं नाही. नाहीतरी सरळमार्गी माणसं आडमार्गाला जातीलच कशाला ?

एकदा मित्राच्या मावशीकडे, पेरिडला गेलो होतो.. डोंगरातल्या गावातली जनावरे चरायला डोंगरात जातात ती पायवाटेनच.. डोंगरातल्या पायवाटा तशा खडतर.. त्या सगळ्याच जनावरांच्या जाण्यायेण्याने तयार झालेल्या.. डोंगर चढण्या-उतण्याचे जनावरांचे ज्ञान आश्चर्य वाटण्याजोगे असते. जनावरे वर डोंगरात ज्या पायवाटेने जातात त्याच पायवाटेने उतरतात असे नाही. काही ठिकाणी त्यांची उतरताना घसरून पडू नये अशा विचाराने घसरणीच्या जागी उतरणीच्या पायवाटा जरा लांबून आलेल्या दिसतात.

पायवाटा वेड्या-वाकड्या, राना-वनातून जाणाऱ्या, उंच सखल असल्या तरी पावलांना त्या रस्त्यांपेक्षाही प्रिय.. प्रवासाचे आणि भवतालाशी, निसर्गाशी असणारे अंतर कमी करणाऱ्या.. पूर्वसुरीच्या पावलावर पाऊल टाकून वाट चालत रहावी असे अप्रत्यक्षरित्या सांगणाऱ्या.. शिकवणाऱ्या. पूर्वसुरीच्या पावलांनी आणि वहिवाटीने तयार झालेल्या पायवाटा.. वहिवाट थांबली की काही काळातच भवतालाशी एकरूप होऊन जातात. जीवनातली इतिकर्तव्यता संपली.. जीवनकार्य संपले याची जाणीव झाल्यावर आदितत्वाची एकरूप होऊन जाणाऱ्या, पंचमहाभूतात स्वतःला विलीन करणाऱ्या एखाद्या साधू-संतासारख्याच. पायवाटा तशाच असतात निरपेक्ष भावाने आपले कार्य करणाऱ्या.. त्यांना पायाखाली तुडवत जाणारा महापुरुष असो किंवा एखादा चोर-दरोडेखोर त्यांच्यालेखी सारे सारखेच असतात.

दिवसभर डोंगरात चरायला जाणारी जनावरे सांज उतरू लागली की पायवाटेने गोठयाकडे परततात.. कधी गोधुळ उडवीत तर कधी आतुर पावलांनी चालताना गळ्यातल्या घंटीच्या मंजुळ नादाने भोवतालाला सुखावत.. आमच्या तिळगंगेकडे जाणाऱ्या अनेक पायवाटा, एखाद्या पट्टीच्या पोहणाऱ्याने या तीरावर पाण्यात डुबकी मारून पुढच्या तीरावर प्रकट व्हावे तशा, पाण्यात डुबकी मारायच्या ते पुढच्या काठालाच नदीबाहेर यायच्या.. दिवसभर रानात कष्ट करणारे शेतकरी डोईवर वैरणीचा भारा घेऊन पायवाटेने नदीत उतरून दुसऱ्या काठावर येईपर्यंत पाण्याच्या स्पर्शाने शीण हरवून ओलेत्या पायांनी घरी परतायचे तशीच पायवाट सुस्नात होऊन दुसऱ्या काठावर यायची..

आयुष्यातील सुख-दुःखाचे कितीतरी सांगावे इकडून तिकडे, तिकडून इकडे येता-जाताना पायवाटेने पाहिलेले असतात.. कधी ती मनातून सुखावत असेलही. कधी ती कष्टीही होत असेल पण वरून मात्र ती असते एखाद्या स्थितप्रज्ञासारखी ! ‘ ‘ सुख-दुःख समे कृत्वा !’ म्हणत असल्यासारखी…. पांथस्थाचे मुक्कामापर्यंतचे अंतर कमी करायचे.. जवळची वाट होऊन त्याची वाट जवळ करायचे हे पायवाटेचे जीवनकार्य.. माहेराच्या ओढीने येणाऱ्या माहेरवाशिणीसाठी, पाडसाच्या ओढीने येणाऱ्या गाईंसाठी ती उरकती होते तर अनिच्छेने जड पावलांनी जाणाऱ्यासाठी ती उरकता उरकत नाही.

आता काळ बदलत गेलाय. माणूस वाहनांनी प्रवास करायला लागलाय. रस्त्यावरसुद्धा पाऊलांपेक्षा वाहनांची चाकेच जिथं जास्त धावायला लागलीत तिथं पायवाटांवर पाऊले कुठुन पडणार ? पायवाटांवरून पाऊलेच पडत नसल्याने कितीतरी पायवाटा, आडवाटा निर्सगात, भावतालात विरून गेल्यात.. तरी अजूनही रानावनात, डोंगरखोऱ्यात पायावाटा भेटतात तेंव्हा मन सुखावते.. त्यावरून चार पावले तरी चालावे असे वाटते.. कधी कधी या पायवाटा उदास असल्यासारख्या वाटतात.. एखादी माऊली सासुरवाशीण लेकीच्या आठवणीने उदास व्हावी तशा.

पायावाट पाहिली की वाटते, कितीतरी पावलांनी या पायवाटेवरून आपले घर जवळ केले असेल, कितीतरी माहेरवाशीणी, सासूरवाशींणी याच पायवाटांवरून आल्या-गेल्या असतील. कुणातरी एखाद्या सासुरवाशीणीला कधीतरी माहेर जवळ करणाऱ्या पायवाटेची आठवण येत असेल आणि ती मनात म्हणत असेल,

 रामरगाड्यात साऱ्या

 राब सुटता सुटंना

 हरवली पायवाट

 बापमाऊली भेटंना

 

 मना माहेराचा ओढा

 बाई मिटता मिटंना

 पायवाटेचं ह्या रिण

 बाई फिटता फिटंना

 खरंच, या पायवाटांचं ऋण कधीच फिटता फिटणार नाही.

 **

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझे सुट्टीपुराण! ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

??

☆ माझे सुट्टीपुराण☆ उज्ज्वला केळकर

खूप दिवसांपूर्वीची गोष्ट. दिवस कुठले, वर्षे लोटली. म्हणजे वीस – पंचवीस वर्षे सहज. आणि गोष्ट म्हणजे काय, तर हकीकत म्हणा, किंवा अनुभव म्हणा. त्यावेळी मी डी. एड. कॉलेज सांगलीमधे अध्यापन करत होते. मला शिकवायला आवडायचं आणि मुलींमध्ये रामायलाही. तेवढंच तरुण झाल्यासारखं वाटायचं. म्हणजे जॉब सटिस्फॅक्शन वगैरे म्हणतात नं, ते होतं, पण तरीही दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीचे वेध लागायचेच. तेव्हा सुट्टी लागली, की मी यंव करीन अन् त्यव करीन असे मांडे मनात भाजत आणि खात रहायची. त्यातले काही मांडे असे —

पहाटे लवकर उठून व्यायाम आणि प्राणायाम करणे. सकाळी फिरायला जाणे. हे अगदी मस्टच, मी ठरवलं. सुट्टी असल्यामुळे सगळं काही आरामात आवरायचं, दुपारी पंख्याखाली अडवारायचं आणि मनसोक्त दिवाळी अंक किंवा पुस्तकं वाचायची. संध्याकाळी शेजारणी, सख्या- मैत्रिणी यांच्याकडे जाऊन गप्पांचे फड उठवणे, हाही आखलेला बेत असे. एरवी कॉलेजमधून घरी येताना नजरेच्या टप्प्यात जेवढ्या येतील, त्यांना ‘काय कसं काय?’ विचारणं आणि ‘ठीकय. ’ ऐकणं, या पलीकडे संवादाची मजल जात नसे.

पहाटे उठण्यासाठी गजर लागे. आधी घड्याळाचा, नंतरच्या काळात मोबाईलचा. गजर झाला की मनात येई, लवकर उठणं नि नंतरची लगबग नेहमीचीच आहे मेली. आज आरामात पांघरूणात गुरफटून पडून राहण्याचं सुख अनुभवू या. उद्यापासून सुरुवात करू. पण तो उद्या कधी उजाडत नसे. तो ‘आज’ होऊनच उगवे. व्यायाम, प्राणायाम, पक्ष्यांची किलबिल हे सगळं राहूनच जायचं. नाही तरी किलबिल ऐकायला आता शहरात पक्षी राहिलेतच कुठे, मी मनाशी म्हणे. मला आणि मुलांना सुट्टी असे, पण यांना ऑफीस असल्यामुळे यांचा डबा साडे नऊला तयार असणं गरजेचं असे. त्यामुळे सकाळची कामाची धांदल नेहमीसाराखीच करावी लागे, सुट्टी असूनसुद्धा. माझ्याप्रमाणे मुलांनीही सुट्टीचे कार्यक्रम ठरवलेले असायचे. पोर्चमध्ये उभे राहून गप्पा, किंवा मोबाईलवर चॅटिंग, यू ट्यूबवरचे सिनेमे बघणे, घरात पसारे करणे, त्यांच्या सवडीने जेवायला येणे, आई घरात आहे, म्हंटल्यावर आईनेच जेवायला वाढणे, अपेक्षित. त्यातून बाहेर पडले की माझे लक्ष, कपड्यांनी, भांड्यांनी, पुस्तकांनी ओसंडून वहाणार्‍या कपाटांकडे जाई॰ दिवाळीसारखा महत्वाचा सण. घर स्वच्छ, नीटनेटकं नको, असं मला आणि मलाच फक्त वाटे. घरातल्या इतर कुणाला नाही. ही आवारा-सावर होईपर्यंत दिवाळीचे पदार्थ करायचीच वेळ येई. पणत्या, वाती, उटणं, नवा साबण किती म्हणून तयारी करावी लागायची. दिवाळीच्या दिवसात रोज एक नवीन पक्वान्न हवंच. ‘तुझं गोड नको बाई, काही तरी चमचमीत कर’, अशी मुलांची मागणी. मागणी तसा पुरवठा करायलाच हवा ना, शेवटी आपलीच मुलं. जेवणं- मागचं आवरणं. दुपारचे सहज तीन वाजून जात. मग एखादा दिवाळी अंक घेऊन फॅनखाली पडावं, तर डोळे मिटू मिटू होत. मासिकातील अक्षरे पुसट होत जात आणि मासिक हातातून कधी गळून पडे, कळतच नसे. नाही म्हणायला, संध्याकाळी शेजारणी, सख्या- मैत्रिणी यांच्याकडे जाऊन गप्पांचे फड उठवणे, हा आखलेला बेत बराचसा तडीला जाई.

दिवाळी येई-जाई. कॉलेज पुन्हा सुरू होई. दिवस- महिने संपत. मार्च उगवे. पोर्शन शिकवून संपलेला असे आणि आता पुन्हा मोठ्या सुट्टीचे वेध लागत. आता मांडे मनात नाही, ताटात घेऊन खायचे, मी नक्की ठरवते. वाटतं, सुट्टीत कुठे तरी फिरून यावं. नवा प्रदेश पहावा. निसर्गाच्या सहवासात काही काळ घालवावा. ताजं-तवान होऊन, नवी ऊर्जा घेऊन परत यावं आणि नव्या दमाने, नव्या उत्साहाने नेहमीच्या दिनचर्येला सुरुवात करावी. पण या महिन्यातल्या क्लासचे, परीक्षांचे मुलांचे वेळापत्रक, कधी कुणाचे आजारपण, घरातली, जवळच्या नात्यातील लग्ने या गोष्टी अ‍ॅडजेस्ट करता करता ट्रीपचं वेळापत्रक कोलमडून जाई. दिवाळी काय किंवा उन्हाळी सुट्टी काय, दरवर्षी थोड्या-फार फरकाने असंच काही-बाही होत राहिलं.

दिवस- महिने- वर्षे सरत आली. माझ्यासाठी कॉलेजची शेवटची घंटा वाजण्याची वेळ आली. एकीकडे कासावीस होत असतानाच मी मनाला समजावू लागले,

आता मला सुट्टी मिळणार मिळणार

खूप खूप मज्जा मी करणार करणार.

आता मला खरंच सुट्टी मिळाली आहे. आता आरामात उठायला हरकत नाही. आता साडे नऊच्या डब्याची घाई नाही. मुलांची जबाबदारी पण आता उरलेली नाही. ती आपापल्या नोकरीच्या गावी, आपआपल्या संसारात, मुलाबाळात रमली आहेत. सकाळी आता उशिरा, आरामात उठायचं. मी निश्चय करते. पण काय करू? जागच लवकार येते आणि एकदा जाग आल्यावार नुसतंच आंथरूणावर पडून रहावत नाही. पूर्वी पाहिलेली स्वप्ने आता आळोखे- पिळोखे देत जागी होऊ लागली.

आता सकाळी जाग आल्यावर उठून फिरायला जायचं मी ठरवलं. उत्साहाने जिना उतरू लागले, तर गुढगे आणि कंबर म्हणाली, ‘बाई ग, आता आमचा छळ थांबव!’ कमरेला चुचकारत नवा महागडा कंबरपट्टा आणून तिला नटवलं. गुढग्यांवरही छान उबदार वेष्टण चढवलं. पण त्यांचं तोंड वाकडंच. ते काही बेटे सहकार्य करेनात. शेवटी डॉक्टरांशी बोलले. डॉक्टरांनी क्ष-किरण फोटो काढला. फोटो बघत ते म्हणाले, ‘ आता या गुढग्यांना निरोप द्या काकू! आता नवे गुढगे आणा!’ तसे केले. नवे गुढगे घेऊन आले पण चालताना, इतकंच काय, बसताना, झोपतानाही पायाला वेदना होऊ लागल्या. पुन्हा डॉक्टर. पुन्हा क्ष-किरण फोटो. डॉक्टर म्हणाले, ‘ पाठीच्या कण्याच्या चौथ्या – पाचव्या मणक्यांनी गळामिठी घातलीय, ती सोडवायला हवी. ती सोडवली. मग मात्र माझे पाय वेदनारहित झाले. हळू हळू फिरणं वगैरे जमू लागलं. पण डॉक्टरांनी बजावलं, ‘आता चालताना हातात काठी घ्या. ’ आणि एक लोढणं गळ्यात नव्हे हातात आलं.

आता टी. व्ही. बाघायला वेळच वेळ होता. पण हळू हळू लक्षात येत गेलं, आपल्याला सिरियल्समधले संवाद नीट ऐकू येत नाहीयेत. टी. व्ही. च्या जरी जवळ बसलं, तरी फारसा उपयोग होत नाहीये. कानांकडे तशी तक्रार केली, तर ते म्हणाले, ‘आम्हाला गळामिठी घालायला एक सखा आण. त्याचे लाड-कोड पुरवले. पण त्यांचा हा सखा इतका नाठाळ निघाला, सगळा गलकाच ऐकवू लागला. नको ते आवाज मोठ्या प्रमाणात घुमवू लागला. हवे ते दडवून ठेवू लागला. थोडक्यात, हा कांनांचा सखा, असून अडचण अन् नसून खोळंबा झाला. शेवटी मूकपट पाहून नाही का आपण आनंद घेत, तसाच टी. व्ही. बाघायचा, असं ठरवून टाकलं.

आता वाचायला खूप वेळ होता. चांगली पुस्तकेही हाताशी होती. पण—-

इथेही पण आलाच. निवृत्तीपूर्वीच डोळ्यांवर डोळे चढवून झाले होते. ते साथही चांगली देत होते. पण बालहट्टाप्रमाणे त्याचे काही हट्ट पुरवावे लागायचे. बसून वाचायाचं. झोपून वाचायाचं नाही. तसं वाचलंच तर उताणं झोपायचं कुशीवर नाही. हे हट्ट पुरवल्यावर त्याची काही तक्रार नसायची. पण तो डोळयांवरचा डोळा जरी चांगलं काम करत असला, तरी मूळ डोळा अधून मधून म्हणायला लागला, ‘आता मी शिणलो. आता पुरे कर तुझं वाचन!’ मी नाहीच ऐकलं, तर तो सारखी उघड –मीट करत स्वत:ला मीटूनच घ्यायचा.

तर असं हे माझं सुट्टीपुराण. जेव्हा दात होते, तेव्हा चणे नव्हते. आता भरपूर चणे आहेत, तर खायला दातच नाहीत.

© उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈ संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “चक्क डाव्या हाताने पुण्यकर्म !” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “चक्क डाव्या हाताने पुण्यकर्म !” ☆ श्री सुधीर करंदीकर

“पुण्यात पाणी कपात आणि चक्क डाव्या हाताने पुण्य कर्म”

आपल्या डाव्या हाताला छान पुण्य कर्म करण्याची संधी लाभणार आहे.

देवाने आपल्याला दोन हात दिले आहेत. दोन्ही अगदी तंतोतंत सारखे आहेत, तरीपण का ते माहित नाही, आपण सगळेच जण उजव्या हातावर जास्त प्रेम करतो.

जेवण उजव्या हाताने करतो,

देवाची पूजा करताना देवाला गंध लावणे; हळदीकुंकू वाहणे; फुलं वाहणे; हे सगळे उजव्या हाताने करतो,

कुणी प्रसाद दिला तर तो उजव्या हातावर घेतो, दानधर्म उजव्या हाताने करतो, वगैरे वगैरे.

आणि आपण डाव्या हाताला फक्त टॉयलेट मध्ये असतानाच न आवडणारे काम देतो.

आता डाव्या हाताला पुण्य कर्म करायला देण्याची पुणेकर मंडळींना छान संधी येत आहे.

कशी ते आता बघू –

येत्या सोमवारपासून म्हणजे १५ जून पासून नळाला पाणी एक दिवसाआड येणार आहे. म्हणजे पाणी वाया न घालवता वापरले तरच साठवलेले पाणी दोन दिवस पुरणार आहे. आणि पाणी वाया न घालवणे हे छानच पुण्य कर्म आहे.

आपल्या घरांमध्ये पाणी कुठे कुठे वाया जाते याचा जर आपण आढावा घेतला तर लक्षात येईल, बेसिन च्या नळांमधून दिवसभरात खूप पाणी वाया जात असतं.

दिवसातून आठ ते दहा वेळा आपण प्रत्येक जण नक्कीच वॉश बेसिन पाशी जातो.

सकाळी उठल्यावर दात घासणे, काही खाल्ल्यानंतर /जेवल्यानंतर तोंड धुणे; चुळा भरणे, मधून मधून चेहरा स्वच्छ करण्याकरता चेहऱ्यावर पाणी मारणे, मधून मधून नाक शिंकरणे, वगैरे वगैरे.

आणि आपल्या बहुतेकांची सवय अशी असते, की, बेसिन जवळ जायचे, नळ सुरु करायचा (काहीजण तर नळ अगदी फुल उघडतात) आणि वर दिल्याप्रमाणे दात घासणे, वगैरे कार्य करायचे आणि मग चेहरा बघायचा, आ करून जीभ बघायची / मान डावीकडे उजवीकडे वळवून आपण छान दिसतोय ना, हे बघायचे आणि शेवटी बेसिनचा नळ बंद करायचा.

थोडक्यात काय, तुमचं काम छान होते, पण ज्या कामा करता अर्धा मग पाणी पूरलं असतं, त्याकरता चार-पाच मग पाणी ड्रेनेज मध्ये जात असतं.

बहुतेक जण बेसिनचा नळ पूर्ण का उघडतात हे कोडेच आहे. आपल्याला एका हाताच्या ओंझळीत मावेल एवढेच पाणी प्रत्येक वेळी घ्यायचे असते, त्याकरता अगदी बारीक नळ पण चालतो. (प्रत्येक बेसिनच्या खाली एक कॉक असतो. आपण सगळ्यांनीच तो कॉक कायम अर्ध्याच्या वर बंद करून ठेवावा म्हणजे बेसनची धार आपोआपच लहान येते. हे जरूर करा).

आता तुम्ही म्हणाल की डाव्या हाताला पूण्य कर्म कसे करायला मिळणार.

सांगतो – 

बेसिन पाशी गेल्यानंतर डावा हात नळावर ठेवायचा. जेव्हा जेव्हा उजव्या हातावर पाणी घ्यायचे असेल, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी डाव्या हाताने नळ उघडायचा, ओंजळ भरली की डाव्या हाताने प्रत्येक वेळी नळ बंद करायचा. जोपर्यंत आपण बेसिन जवळ आहोत तोपर्यंत डावा हात नळावरच ठेवायचा.

म्हणजे आपण डाव्या हाताने काय केले आहे – पाहिजे तेव्हा नळ सोडला, नको तेव्हा नळ बंद केला. आणि यामुळे भरपूर पाण्याची बचत होणार आहे. आणि ती पण रोजच्या रोज, आणि घरामधल्या प्रत्येकाकडून.

पाणी वाचवणे / वाया न घालवणे हे पुण्य कर्म नक्कीच आहे.

आज करून बघा.

जलदेवता खुश होईल, आपल्याकडून पुण्य कर्म होत आहे म्हणून डावा हात खुश होईल, शरीर देवता पण खुश होईल. आपल्या वास्तूमध्ये हे पुण्यकर्म होत आहे म्हणून वास्तुदेवता पण खुश होईल.

वाचवलेल्या पाण्यामुळे काही लोकांची तहान भागणार आहे त्यामुळे निसर्ग देवता पण खुश होईल, आणि वरच्या देवता पण खुश होतील…

एखादी गोष्ट सतत एक महिना केली तर ती सवय लागते असे म्हणतात. पुण्यामध्ये एक दिवसाआड पाणी बंद हे महिनाभर नक्की चालू राहणार.

अशा रीतीने एक दिवस पाणी बंद यामुळे आपल्याला अगदी सोप्या रीतीने पुण्य कर्म करत राहण्याची सवय लागणार आहे.

ज्या ज्या ठिकाणी पाणी बंदी नाही, त्यांनी पण ही सवय जरूर लावून घ्यावी, आणि पुण्य कर्म करत राहावे… आणि खुश रहावे.

खुशिया ही खुशिया हो,

दामन में जिसके,

क्यू ना खुशी से वो दिवाना हो जाये…

आणि याकरता करायचे काय आहे – तर काहीही कारणाकरता बेसिन जवळ गेल्यावर डावा हात बेसिनच्या नळावर ठेवणे, पाहिजे तेव्हा नळ उघडणे आणि नको तेव्हा बंद करणे.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares