मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ खूप छान वाटतंय… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ खूप छान वाटतंय… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

आयुष्याच्या संध्याकाळी आपली मुले जेव्हा काळजी घेतात तेव्हा

खूप छान वाटतंय..

 

एका आईच्या हृदयातून निघालेले बोल:

बालपणी ज्यांना चिऊ काऊ चे घास भरवले,

आज ते मला, आई, खाऊन बघ छान आहे, म्हणून

आपल्या घासातला घास भरवतात..

खूप छान वाटतंय..

 

इवल्याशा पाठीवरचं दप्तर मी उचलून घेई,

आज माझ्या हातातले ओझे उचलायला धावत येतात..

खूप छान वाटतंय..

 

ज्यांची बोटं धरुन अक्षरांशी ओळख करून दिली,

आज ते माझी नवीन टेक्नॉलॉजीशी ओळख करुन देतात..

किती मजा वाटते आहे..

 

ज्यांना हात धरुन रस्ता ओलंडला,

आज ते माझा हात धरुन रस्ता ओलंडतात,

हातांची अदलाबदल कधी झाली कळलंच नाही..

पण खूप छान वाटतंय..

 

चालताना उड्या मारु नकोस रे पडशील, असं म्हणणारी मी..

आणि आज, आई हळू, पुढे खड्डा आहे म्हणणारे ते,

एवढा प्रवास कधी झाला कळलंच नाही..

पण खूप छान वाटतंय..

 

रिक्षाने जाताना त्यांना आतल्या बाजूला बसवणारी मी..

आज जागा केव्हा बदलल्या समजलंच नाही..

पण खूप छान वाटतंय..

 

प्रयत्न करून बघ, शिकवलंय ना मी तुला, असे म्हणणारी मी आणि आज.. सोपंय ग, एकदा शिकलीस की येईल तुला, असे सांगणारे ते..

किती गंमत वाटते आहे..

 

ज्यांच्याबरोबर बडबड गीते आणि छान छान गोष्टी ऐकल्या, आज ते आई, हे गाणं ऐकलंस का, बीट्स आवडतील बघ तुला, असं म्हणतात तेव्हा काय सांगू काय वाटतं…

लय भारी वाटतंय..

 

शाळेच्या पिकनीकला जाताना, बस मध्ये बसवून देणारी मी आणि आज मी प्रवासाला जाताना मला बसमध्ये बसवणारे ते..

शब्द तेच, काळजी तीच, भूमिका बदलल्या

किती मस्त वाटतंय..

 

त्यांना काही होत असेल तर, घाबरणारी मी आणि मला जरा बरं नसलं तर, कासावीस होणारे ते..

किती कृतकृत्य वाटतंय..

 

लहानपणी त्यांचा अनाठायी हट्ट कसा चुकीचा आहे, हे सांगणारी मी, आज माझे एखादे मत कसे चुकीचे आहे हे माझे मन न दुखावता मला पटवण्याचा प्रयत्न करतात..

किती अभिमान वाटतो..

 

मुले घरात दिसली नाहीत तर, कासावीस होणारे बाबा आणि आज, हे काय, बाबा अजून आले नाहीत म्हणणारी मुलं..

परत शब्द तेच, काळजी तीच, भूमिका कधी बदलल्या समजलंच नाही..

इवलेसे गळ्यात पडणारे हात, आज आधार द्यायला खंबीर झाले..

खूप छान वाटतंय..

 

नकळत संस्कार घडले,

नकळत भूमिका बदलल्या,

नकळत त्यांच्यात एक संवेदनशील पती आणि हळूवार पिता आकार घेऊ लागला..

 

खूप धन्य वाटतंय..

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: शुभदा कुलकर्णी

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “सैराट होऊन ये…” ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “सैराट होऊन ये…” ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

वेशीपर्यंत आलायस… आता नव्या नवरीसारखा लाजू नकोस… पटकन माप ओलांड आणि आत ये… कंजूसपणा करू नको… दिल खोलके बरस… येताना चोर पावलांनी नको, राजासारखा सनी चौघडे वाजवत ये… येता-येता सगळ्यात आधी शेतातल्या एखाद्या घरात डोकाव… तू आल्याचं कळताच तिच्या काळजात चर्र होईल… एरवी आभाळातून बरसणारा तू तिच्या डोळ्यांतून बरसशील… ती तुला मनातल्या मनात एखादी कचकचीत शिवीही देईल, पण तरी पण तिथे थांब… कारण तिचा धनी गेल्यावर पोराबाळांसकट सगळ्या संसाराचा गाडा तिलाच ओढायचाय… म्हणूनच तिच्या शेतात सगळ्यात आधी जा… आणि तिथल्या मातीत रुजून राहा… मग रानावनांत पड, रस्त्यारस्त्यांवर पड, खिडक्यांना पागोळ्या होऊन लगड… नद्या भर, विहीरी भर, धरणाचे दरवाजे उघड… हंड्या घागरींतून बरस, गच्चीतल्या टाकीवर बरस, म्युन्सिपाल्टीच्या नळांतूनही बरस… धन-धान्यासाठी ये, छत्र्या, रेनकोटच्या बिझनेससाठी ये, सगळी अर्थव्यवस्था बळकट करायला ये… पानाफुलांना सजव, गाईगुरांना भिजव, पक्षी-पाखरांना नाचव… आसुसलेल्या मनांना रिझव, सुकलेल्या ओठांनाही भिजव… सगळ्यांना पाणी दे, प्रेमात पडलेल्यांना गाणी दे, फेसबुकवर टाकायला तुझ्याबरोबरचा सेल्फी दे… वाफाळलेल्या चहासाठी ये, गरमा-गरम भज्यांसाठी ये, शेगडीवरच्या कणसासाठी ये… तर्राट होऊन ये… सैराट होऊन ये… आणि सगऴीकडे झिंग झिगं झिंगाट करुन टाक…

 लेखक: अज्ञात

प्रस्तुती: श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २६ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २६ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

व्यावहारिक ज्ञान

ठरल्याप्रमाणे लेखमालेच्या या २६व्या भागात आपण तुकाराम महाराजांच्या काही व्यावहारिक ज्ञानाविषयीच्या अभंगांचा विचार करू.

दान, धर्म, पुण्य कर्म करणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे, परंतु पुण्य कर्म करताना ते योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

या अभंगात महाराज काय सांगतात पहा…

सर्वांभूती द्यावे अन्न/ द्रव्य पात्र विचारोन//

उपतिष्ठे कारण/ तेथे बीज पेरीजे//

सर्व भूतमात्रांना अन्नदान करावे, पण द्रव्य मात्र योग्यता पाहूनच द्यावे. जेथे बी उगवेल असे वाटते तेथेच ते पेरावे. थोडक्यात दान हे सत्पात्री असावे.

पुण्य करिता होय पाप/ दुग्ध पाजोनी पोशीला साप//

करोनी अघोर जप/ दुःख विकत घेतले//

भूमी पाहता नाही वेगळी/ माळ बरड एक काळी//

उत्तम निराळी/ मध्यम आणि कनिष्ठ //

म्हणोनी विवेके /काही करणे ते निके//

तुका म्हणे फिके/ रुची नेदी मिष्ठान्न//

सापाला दूध पाजले तर पुण्य कर्म न होता पाप होते, कारण दूध पिऊनही साप गरळच ओकणार. एखादा जारण मारण मंत्र म्हणून दुसऱ्याचे वाईट करता करता, आपले स्वतःचेच वाईट करून घेतो. पृथ्वी सगळी सारखी असली तरी त्यातही माळ जमीन, खडकाळ जमीन, काळी जमीन, कमी जास्त कसाची जमीन असे भेद असतात, म्हणून कोणतीही गोष्ट करताना विचारपूर्वक करणे, नीट पारखून करणे फार महत्त्वाचे आहे. मिष्ठान्न केले आणि त्यात साखरच घातली नाही, तर ते चविष्ट लागेल का? याचसाठी आयुष्यात कोणतीही गोष्ट मोठ्या विवेकाने केली पाहिजे.

माणूस कसा ओळखावा याविषयी तुकाराम महाराज सांगतात.

नाही सर्व येत जोडील्या वचनी/

कवित्वाची वाणी कुशलता//

सत्याचा अनुभव वेधी सत्यपणे/

अनुभवाच्या गुणे रुचो येते//

काय आगी पाशी शृंगारिले चाले/

पोटीचे उकले कसा पाशी//

तुका म्हणे येथे करावा उकल/

लागेचिना बोल वाढवूनी//

मनात ईश्वराची भक्ती नसताना जर कोणी शब्दाला शब्द जोडून काव्य करील तर ते देवाला कसे मान्य होईल? ज्याच्या ठिकाणी खरा अनुभव आहे, त्याच्या बोलण्याने दुसऱ्याला वेधक वाटते कारण ते सत्य असते. अनुभवामुळे त्यातील तथ्य कळते. तुकाराम महाराज अधिक स्पष्टतेसाठी उदाहरणे देतात. हिणकस धातूला सोन्याचा मुलामा केला तर तो शृंगार अग्निपुढे उघडा पडतो. आणि कसोटी पुढे त्याच्या आतील हिणकस धातू ओळखू येतो. ज्या ठिकाणी हृदयात खरा अनुभव असेल तेथे स्पष्टीकरण देण्याची जरुरी पडत नाही, खरी योग्यता लगेच कळते. ते पुढे म्हणतात…

लचाळाच्या (अजागळ) कामा नाही ताळा वाळा/

न कळे ओंगळा उपदेश//

वचनचर्येची नकळे चाचणी/

ऐसी संघस्टनी अमंगळ//

समय न कळे वेडगळ बुद्धी/

विजाती ते शुद्धीचाच चाट//

तुका म्हणे याचा धिक्कारची बरा/

बहुमती खराहुनी हीन//

याचाच अर्थ असा की, जो कोणी अजागळ मनुष्य आहे, त्याच्या कामात काहीच ताळमेळ नसतो आणि त्या मुर्खाला (महाराज त्याला घामट म्हणतात) कितीही समजावून सांगितले तरी त्याची समजण्याची क्षमताच नसते. त्याला शास्त्र, त्यातील मर्म, काही कळत नाही. तेव्हा अशा लोकांपासून चार हात दूरच राहावे. या मतिमंद लोकांना काळ, वेळ समजत नाही. त्यांची बुद्धी विसंगत असते. अशा लोकांपासून दूर राहणे उत्तम! अशी कितीतरी माणसे आपल्या आयुष्यात येतात. ” बरे बाबा तुझेच खरे. ” असे बोलून जास्त वाद न घालता त्याच्यापासून लांब जावे असे महाराज सांगतात. अशा माणसांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटतात. ते लोक गाढवाहुनही नीच समजावे. त्यांचा धिकार करावा.

स्वभावोदुरतिक्रमः– भिन्न भिन्न स्वभावाची माणसे रोजच्या रोज आपल्या जीवनात येत असतात. महाराज म्हणतात की ज्यांचा स्वभावच चोरी करण्याचा असतो, त्यांच्या ध्यानीमनी तोच ध्यास असतो.

चोराचिया धुडका मनी / वसे ध्यानी लांछन//

त्याचप्रमाणे पाऊस पडावा तसे आम्ही बोलत असतो. परंतु ज्यांच्या अंगी दोषच आहेत त्याला आमचे बोलणे झोंबते. आम्ही हिताचे बोललो तरी त्याची तडफड होते. आपल्यालाही हा अनुभव वारंवार येतो कारण आपले सरळ बोलणे समोरचा वाकडेच धरतो. अशा माणसांच्या वाऱ्याला उभे राहू नये.

एक एका सहाय्य करू/ अवघे धरू सुपंथ//

कोण जाणे कैसे परी/ पुढे उरी ठेविता//

अवघे धन्य होऊ आता/ स्मरविता स्मरण//

तुका म्हणे अवघी जोडी/ ते आवडी चरणांची//

यासाठी तुकाराम महाराज सर्व लोकांना सांगतात की, तुम्ही आम्ही मिळून एकमेकांच्या सहाय्याने चांगल्या वाटेवरून चालू या, चांगले जगूया, नाहीतर म्हातारपणी परमार्थ करू अशी चालढकल केली तर पुढे काय वाढून ठेवले आहे ते कोणास ठावे? म्हणून उद्या वर काही ढकलू नका. जे काही करायचे ते आज करा, आत्ता करा. नामस्मरण करणारा व करून घेणारा असे आपण सर्वजण धन्य होऊ. विठोबाच्या चरणांची आवड धरली म्हणजे सर्व काही जोडले जाते व महान पुण्य प्राप्त होते.

चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती/

व्याघ्रही न खाती सर्प तया//

विष ते अमृत आघात ते हित/

अकर्तव्य नीत होत त्यासी//

दुःख ते देईल सर्व सुख फळ/

होतील शितळ अग्नी ज्वाळा//

आवडेल जीवा जीवाचिये परी/

सकळा अंतरी एक भाव//

तुका म्हणे कृपा केली नारायणे/

जाणिजे ते येणे अनुभवे//

तुकाराम महाराज सांगतात, आपले चित्त शुद्ध असेल तर शत्रूही मित्र होतात. वाघासारखे हिंस्र आणि सापासारखे विषारी प्राणी आपल्याला काही त्रास देत नाहीत. (भगवान शंकराच्या गळ्यातील नागाप्रमाणे) विषाचे अमृत होते.

मीराबाईच्या सच्य्या भक्तीमुळेच तिने राणाजीने दिलेला विषाचा प्याला रिचविला.

शरीरावर आघात झाले तरी ते हितकर ठरतात. आपल्या हातून चुकून एखादे अनुचित कर्म घडले पण ते नीतीला धरून असले तर शुभंकरच ठरेल. दुःखातही सुख प्राप्त होईल आणि आगीचा जाळ शांत होईल. शुद्ध चित्ताचा माणूस लोकांना प्राणप्रिय असेल. त्याच्याविषयी सर्वांच्या मनात आदरभावच राहील. असा अनुभव स्वतःबद्दल ज्याला येतो त्याला भगवंत कृपावंत झाला आहे असे समजावे.

कंथा प्रावर्ण/ नव्हे भिक्षेचे ते अन्न//

करी यापरि स्वहित/ विचारूनी धर्मनित//

देऊळ नव्हे घर/ प्रपंच परउपकारक//

विधीसेवन काम/ नव्हे शब्द राम राम//

हत्या शास्त्र धर्म/ नव्हे निष्काम ते कर्म//

तुका म्हणे संती/ करुनी ठेविली आईती//

वरील अभंगात तुकाराम महाराज काय सांगतात?

व्यावहारिक आणि अध्यात्मिक दृष्टीने काही वस्तूंमध्ये कसा फरक असतो याविषयी महाराज बोलतात.

संन्याशाची कंथा(झोळी) आणि सामान्य जनांची वस्त्रे सारखी समजू नयेत. त्याचप्रमाणे पवित्र भिक्षान्न इतर अन्नाप्रमाणे समजू नये. धर्म व नीती विचारात घेऊन स्वहित साधावे. देवालय हे इतर घरांप्रमाणे सामान्य घर नव्हे. परोपकार करताना तो संसारी माणूस इतरांप्रमाणे नव्हे. शास्त्राने सांगितलेल्या नियमांनुसार विषय सेवन केले असता तो माणूस विषयलोलूप नव्हे. राम हा शब्द इतर शब्दांप्रमाणे साधा नाही. क्षत्रियाने युद्धात शत्रूचा वध केल्यास ती हत्या न होता क्षात्रधर्मपालन होते. आणि निष्काम बुद्धीने केलेले कोणतेही कर्म हे इतर कर्माप्रमाणे बंधक नाही. हे नीतिशास्त्र आहे, याप्रमाणे सर्वांनी वागावे.

याचाच अर्थ असा रोजच्या जीवनात इतरांसमवेत वावरत असताना व्यावहारिक ज्ञान वापरून आणि नैतिक धर्माचे पालन करून माणसाने आपले आचरण ठेवावे.

क्रमशः… २६ 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ म्हातारा नव्हे महातारा! ☆ श्री नागेश शेवाळकर ☆

श्री नागेश शेवाळकर

? मनमंजुषेतून ?

☆ म्हातारा नव्हे महातारा! श्री नागेश शेवाळकर

वयाची पन्नाशी उलटली की मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे निवृत्तीनंतर काय करावे? वेळ कसा घालवावा? अनेक जण या विचाराने एवढे बेचैन, अस्वस्थ असतात की, निवृत्तीच्या दिवशी त्यांच्या डोळ्यात पाणी येते. नोकरी असताना वेळच नसतो आणि निवृत्तीनंतर वेळच वेळ असतो.

काही व्यक्ती अशाही असतात त्या निवृत्तीला विरक्ती समजतात! आपण सेवेतून निवृत्त होत आहोत म्हणजे आपण संसाराच्या मायाजालातून निवृत्त होत आहोत, असा विचार असतो. परंतु तसे नाही, संसार हे असे चक्रव्यूह आहे, त्यातून बाहेर पडणे भल्याभल्यांना जमत नाही. आजकाल बहुतेक कुटुंबातील मुलगा आणि सून दोघेही कामानिमित्त दिवसभर बाहेर असतात. त्यांच्या पश्चात नातवंडांची जवाबदारी साहजिकच कुटुंबातील ज्येष्ठांवर येऊन पडते. नातवांच्या बाललीला, त्यांची छोटी मोठी कामे करणे हा फार मोठा विरंगुळा असतो. नातवंडासोबत रमले की, सारे दुःख दूर पळून जातात.

निवृत्तीनंतर घरातील छोटी मोठी कामे करताना स्वतःच्या आवडीच्या छंदाकडे लक्ष दिले पाहिजे. अशा छंदामुळे आयुष्य सुसह्य होते, सकारात्मक होते. नोकरीमुळे आवडीच्या छंदाकडे दुर्लक्ष झालेले असते. भजनाची, लेखनाची, गायनाची, वाद्य वाजवण्याची, वाचनाची आवड अनेकांना असते. त्यामुळे निवृत्ती म्हणजे आपल्या आवडत्या छंदांना पुनरुज्जीवित करण्याची संधी सहर्ष स्वीकारली पाहिजे…

दुसरीकडे अनेक जण निवृत्ती ही आसक्ती समजून वाटचाल करतात. ‘मला हे हवं, ते हवं. मला हे मिळालेच पाहिजे… ‘ अशा हटवादी भूमिकेत वावरतात. निवृत्त होईपर्यंत असलेल्या ‘हम करे सो कायदा… ‘ ही सवय या वळणावर घातक ठरते. मुले मोठी झालेली असतात, कमावती असतात, त्यांचे अनुभव विश्व वेगळे असते त्यामुळे लहानसहान गोष्टींमध्ये वारंवार सल्ला द्यायलाच पाहिजे असे नसते. मुलांच्या चुका सातत्याने दाखवून दिल्याने मुले कंटाळतात. ते ज्येष्ठांपासून दुरावतात, संवाद कमी होतो. त्यामुळे ज्येष्ठांमध्ये आपण एकटे पडल्याची भावना बळावते. एकटेपणाची जाणीव होताच चिडचिड, संताप, अशा भावना बळावतात.

वयाची साठी गाठलेली व्यक्ती म्हणजे जणू छोट्या मोठ्या आजाराचे माहेरघर! गुरूवर्य प्राचार्य राम शेवाळकर यांनी असे म्हटले आहे की, साठीनंतर येणारा आजार कधी एकटा येत नाही तर सोबत अनेक आजारांना घेऊन येतो. एकदा का आजाराचा समूह मानवाच्या शरीरात शिरला की, हे आजार मानवाच्या अंतापर्यंत त्याच्या सोबतीला असतात. त्यामुळे प्रत्येकाने पन्नाशीनंतर असे कोणतेही आजार होऊ नयेत ही काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी निवृत्ती म्हणजे संसाराबाबतीत जशी विरक्ती नसावी तशीच संसाराबद्दल अतिरिक्त आसक्तीही नसावी.

प. पू. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी एक छान मंत्र दिला आहे, ते म्हणतात, ‘स्वतः च्या मुलाकडे राहतानाही पाहुण्याप्रमाणे राहिले पाहिजे. ‘ वरवर पाहिले तर हे वाक्य अत्यंत साधे वाटत असले तरी आनंदी, समाधानी जीवन जगण्याचा तो एक साधा मार्ग आहे. सुखी जीवनाचे सार आहे…

त्यादिवशी नेहमीप्रमाणे आम्ही पाच-सहा ज्येष्ठ नागरिक एकत्र बसलो होतो. एकानंतर एक असे अनेक विषय चर्चेला येत होते. प्रत्येक जण, चर्चेत भाग घेऊन स्वतःचे मत मांडत होता. चर्चा सुरू असताना एक जण स्वतःचा उल्लेख ‘म्हातारा’ असा करत होता. ते ऐकून एक व्यक्ती म्हणाली,

“स्वतः ला म्हातारा समजू नका तर महातारा असे म्हणा. म्हातारा हा साडेतीन अक्षरांनी सुरू होणारा शब्द किती अर्थपूर्ण आहे ते लक्षात घ्या. म्हातारा या शब्दातील अर्धा ‘म’ आहे ना, त्याला आपण पूर्णत्व देऊ! म्हातारा या शब्दाचा झाला ‘महातारा’! महातारा किती छान संकल्पना आहे ना! आता या नवीन शब्दाचा थोडा वेगळा विचार करू या.

ग्रहमंडळातील महातारा म्हणजे प्रत्यक्ष सूर्यदेव! धरणीमातेला अंधारातून बाहेर काढून लख्ख प्रकाशमान करणारा महातारा म्हणजे भास्कर… रवी..! आपणही म्हातारे होऊन अडगळीत पडण्यापेक्षा महाताऱ्याप्रमाणे आपल्या गृहमंडळाला प्रकाशित करीत राहूया. मुलांच्या संसाराला, जमेल तसा प्रकाश देत राहू… अनुभवाची ऊर्जा देत राहू. म्हणजे मदत करीत राहू. “

त्या व्यक्तिने समोर ठेवलेली ही नवीन परिभाषा आणि ज्येष्ठांची थेट सूर्यासोबत केलेली तुलना ऐकून आम्ही सारे भारावून गेलो. त्याचवेळी आम्हाला आमच्याकडे असलेल्या एका अनोख्या तेजस्वी शक्तीची जाणीव झाली.

एका वेगळ्या स्फूर्तीदायक अवस्थेत निघताना वाटले, खरेच साठ वर्षाचे जीवन म्हणजे समृद्ध अनुभवाची शिदोरी गाठीशी असलेली एक नौका! सुख-दु:ख, संकटं, हाल अपेष्टा, अपेक्षा, समाधान, आनंद, यशापयश असे अनेक अनुभव असलेल्या महाताऱ्यांनी आपल्या समृध्द अनुभवाचे दालन हळूवार, सहजतेने खुले केले तर त्या लखलखीत प्रकाशात त्यांच्या घरातील ग्रहमंडळ तर प्रकाशित होईलच परंतु, आजूबाजूचे ‘ग्रह- उपग्रह’ यांच्याही जीवनात लख्ख प्रकाश पडेल. तेव्हा महाताऱ्यांनो, चला, उठा. पसरवा अनुभवाचा लख्ख प्रकाश! करा सारी सृष्टी प्रकाशमान! … अशा तेजोमय विचाराने प्रेरित होऊन मी घरी पोहोचलो. सौभाग्यवती वाहिनीवर एक नाटक बघत होती. मी महातारा या विचाराने एवढा प्रभावित झालो होतो की, मला त्या नाटकाचे नावही ‘म्हातारा नव्हे महातारा! ‘ असेच असल्याचे दिसत होते…

००००

© श्री नागेश शेवाळकर

पुणे

मोबा. ९४२३१३९०७१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “काळजी करण्यासारखी परिस्थिती” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “काळजी करण्यासारखी परिस्थिती…” ☆ श्री मंगेश मधुकर

काळजी करण्यासारखी परिस्थिती झालीये खरी…

झालं असं की,

 

सध्या 

स्त्री-पुरुष 

मुलं-मुली 

लहान 

मोठा 

श्रीमंत 

मध्यमवर्गीय 

गरीब 

पैसेवाला 

कफ्फलक 

या धर्माचा 

त्या धर्माचा 

या जातीचा 

त्या जातीचा

हुशार 

भोळा 

शिकलेला 

अडाणी 

पुढारी 

कार्यकर्ता 

उद्योगपती

कामगार 

शिक्षक

विद्यार्थी 

नोकरीवाला 

बिझनेसवाला 

बंगल्यातला 

फ्लॅटमधला 

झोपडपट्टीतला 

कारवाला 

रिक्षावाला 

बाईकवाला 

सायकलवाला

सगळ्यांची 

एकच गरज 

पाणी

—-

नेहमी चिंब भिजवणाऱ्या पावसानं आता डोळ्यात “पाणी” आणलयं.

धोक्याची घंटा जोरजोरात वाजतेय.

जुन्या सवयी बदला.

‘पाणी’ जपून वापरा.

आत्ताच नाही तर नेहमीच.

नाहीतर..

“पा णी बा णी”

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “कॅडेव्हर!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“कॅडेव्हर! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

हा शब्द अनेक सर्वसामान्य लोकांसाठी नवा शब्द असण्याची शक्यता आहे. नवा म्हणजे नव्याने निर्माण झालेला नव्हे तर वाचकासाठी नवा असलेला, आजवर अज्ञात असलेला शब्द! वैद्यकीय परिभाषेतील असे अनेक शब्द आपल्याला अनोळखी असतात.

Cadaver कडेवअर असा याचा साधारण उच्चार आढळतो.. आणि अर्थ आहे मृतदेह… corpse!

विकार, आजार, वेदना आणि मृत्यू यांपासून तात्पुरती का होईना सुटका मिळावी म्हणून मानवाने वैद्यकीय शास्त्राचा डोलारा उभारला. शरीराचा आतून अभ्यास करणे अनिवार्य झाले. मुळात शरीर रचना हाच एक चमत्कार आहे. कोणत्याही कृत्रिम रचनेला मानवी देहाची सर कधीच येणार नाही. म्हणून अभ्यासासाठी खरेखुरे शरीरच लागते. जिवंत देहांचा अभ्यास करण्यावर मर्यादा असतात, पण मृतदेहांबाबत पूर्ण मोकळीक मिळते. या गरजेतून मग मृतदेह प्रत्यक्ष उघडून पाहून त्यांच्या अंतर्गत रचनांचा अभ्यास करण्याचा प्रघात पडला. आणि मग या देहांच्या साहाय्याने वैद्यकीय अभ्यास, संशोधन, प्रयोग सुरू झाले.

Andreas Vesalius (1514-1564) यांनी वैद्यकीय अभ्यासासाठी सर्वप्रथम शवविच्छेदन केल्याचे समजले जाते. १८३२ मध्ये याबाबतीत ब्रिटनमध्ये कायदा अस्तित्वात आला. भारतात आरोग्य हा राज्य विषय असल्याने आपल्याकडे राज्यांचे स्वतंत्र कायदे दिसतात. महाराष्ट्रात १९४९ मध्ये सदर कायदा केला गेला.

अधिकृत शासकीय परवानगी मिळाल्याने देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मृतदेह भावी डॉक्टर्स मंडळींचे पहिले गुरू म्हणून भूमिका बजावू लागले! जणू हे मृतदेह पुन्हा सजीव झाले. असुरांचा नाश करण्यासाठी आपल्या देहाचे दान देण्याची बाब भारताला नवी नाही. दधिच ऋषींनी राक्षस निर्मुलनासाठी स्वत:ची हाडे देण्यासाठी देह अग्नीच्या स्वाधीन केल्याचे सांगितले जाते. विविध प्रकारच्या व्याधी या जर राक्षस मानल्या तर त्यासंदर्भात मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प करणारे व तो संकल्प सिद्धीस जाण्यास साहाय्य करणारे सर्वच ऋषी मानले गेले पाहिजेत!

कायदेशीर देहदान १९४९ पासून अस्तित्वात आले. तर अवयवदान १९९४ पासून कायदेशीर मान्यताप्राप्त झाले. देहदान आणि अवयवदान स्वतंत्र बाबी आहेत. देहादानात व्यक्तीचा देह काही काळ वापरला जातो. तर अवयवदानात आवश्यक अवयव काढून इतरांसाठी वापरले जातात आणि देह अंत्यसंस्कारासाठी परत केला जातो. वैद्यकीय अभ्यासात एक मृतदेह आणि दहा विद्यार्थी असे प्रमाण अपेक्षित असताना आता वीस ते पन्नास विद्यार्थी आणि एक मृतदेह अशी स्थिती आहे.. कारण वाढती वैद्यकीय महाविद्यालये आणि सतत विकसित होणारे संशोधन.

देहदानाची चळवळ सुरू होण्याआधी वैद्यकीय महाविद्यालये बेवारस प्रेते उपलब्ध होण्यावर अवलंबून असत. आधुनिक पोलिस तपास पद्घती, संपर्क व्यवस्था, माहिती संप्रेषण व्यवस्थेमुळे मृतांच्या वारसांचा शोध घेण्याची प्रक्रिया जलद आणि परिणामकारक झाल्याने बेवारस प्रेतांची संख्या खूप कमी झाली! शिवाय एड्स, काविळ यांसारख्या गंभीर कारणांनी मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह, भाजणे आणि तत्सम बाबींमुळे मरण पावलेल्या व्यक्तींच्या देहांचा प्रशिक्षणासाठी वापर केला जाऊ शकत नाही. यामुळे cadevers उपलब्ध होण्याचे प्रमाण खूपच कमी झाले. देहदान चळवळीतील कार्यकर्त्यांनी अपार कष्ट घेऊन ही कल्पना रुजवली आणि उदात्त विचारांच्या सुसंस्कृत, शिक्षित नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. पुण्याची प्राप्ती, समाधान, समाजसेवा या विविध भावना प्रबळ ठरल्या.

देहदानाची कार्यवाही ही पूर्णत: कायदेशीर, नैतिक मूल्यांचे भान ठेवून पूर्ण केली जाते. अभ्यासासाठी मृतदेह दान मिळाल्यावर संपूर्ण व्यवस्था संबंधित वैद्यकीय महाविद्यालय करते. सर्व कर्मचारी, डॉक्टर्स, विद्यार्थी एकत्र येऊन प्रार्थना करतात, या वेळी नातलग उपस्थित राहू शकतात, आणि मगच तो देह वैद्यकीय विद्यार्थांच्या अभ्यासासाठी उपलब्ध करून दिला जातो. आणि साधारणत: वर्षभरानंतर उर्वरीत देह, अवशेषांवर त्या त्या व्यक्तीच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार केले जातात.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात विद्यार्थ्यांना हिप्पोक्रटिक आणि कडेवअर शपथा दिल्या जातात. त्यांपैकी अभ्यासासाठी उपयोगात आणावयाच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यापूर्वी साधारणपणे पुढील प्रमाणे शपथ दिली जाते, जी इंग्रजी भाषेत असते. पुढे मराठी भाषांतर दिले आहे.. जे इंटरनेटवरून घेतले आहे.

“मी अत्यंत गंभीरपणे आणि निष्ठेने प्रतिज्ञा करतो की, मी या मृतदेहाचा (शवाचा) सर्वोच्च आदर, सन्मान आणि प्रतिष्ठा कायम ठेवीन. मी या देहदात्याला माझे ‘प्रथम शिक्षक’ (पहिले गुरु) मानतो, ज्यांचे निःस्वार्थ दान मला वैद्यकशास्त्राचे ज्ञान आणि कला शिकण्यास मदत करेल. मी माझ्या संपूर्ण अभ्यासात व्यावसायिकता, गोपनीयता (निजता) आणि नैतिक आचरण पाळेन. मी या दात्याने केलेल्या सर्वोच्च त्यागाचा सन्मान करेन आणि मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग मानवतेच्या सेवेसाठी, करुणेने आणि सचोटीने करेन. माझ्या या ‘मौन शिक्षकांचे’ (Silent Teachers) अमूल्य योगदान माझ्या सदैव स्मरणात राहील आणि मी त्याचा आदर करेन. ” समाजात आणि समाजातील विविध स्तरांमध्ये विविध प्रकारचे लोक असतात. विशिष्ट व्यक्ती विशिष्ट स्तरामधली आहे म्हणून ती अमुक एक प्रकारे वागेल असे नसते. सध्या चर्चेत असलेल्या प्रकरणातील व्यक्तीला वैद्यकीय अभ्यासक्रमात कसा प्रवेश मिळाला आहे, याच्या चर्चेस अर्थ नाही! व्यक्तीवरील संस्कार हे हल्ली काही समाजसापेक्ष राहिलेले नाहीत. एकूणच तरुणांची बदललेली मानसिकता आणि सामाजिक अस्वास्थ्य ही मुख्य कारणे आहेत. असो.

मृतदेह वैद्यकीय अभ्यासासाठी देणे आणि मग विद्यार्थ्यांना त्याच्या साहाय्याने शिकवले जाणे आणि त्यासाठी त्या देहाचे विच्छेदन करणे वेगळे… आणि मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी शवविच्छेदन करणे वेगळे. शिकवण्यासाठी उपयोगात आणला जाणारा देह क्रमाक्रमाने विच्छेदीत केला जातो. अभ्यास शाखेनुसार ते ते विद्यार्थी विशिष्ट अवयवाचा विशेष अभ्यास करतात. उदा. नेत्रतज्ज्ञ होण्यासाठी विद्यार्थी डोळे आणि तत्सम भागाचा अभ्यास करतील आणि त्यासाठी दान दिलेल्या देहाच्या संबंधित भागाचा अभ्यास करतील. आणि हे तज्ज्ञ, अनुभवी, निष्णात वैद्यकीय अधिकारी, प्राध्यापक यांच्या देखरेखीखाली केले जाते! तर उत्तरीय तपासणीत देह एकदाच विच्छेदित केला जातो, निष्कर्ष नोंदवले जातात आणि देह अंत्यसंस्कारासाठी दिला जातो. मृत्यूच्या कारणांची सखोल तपासणी आवश्यक असल्यास त्यादृष्टीने महत्वाचे अवयव/त्यांचे नमुने राखून ठेवून ते संबंधित प्रयोगशाळांकडे पाठवले जातात. गुन्ह्यासंदर्भात काहीवेळा पुन्हा विच्छेदन केले जाऊ शकते.

मनुष्य जिवंत असताना त्याचा देहाचा योग्य तो सन्मान राखला जाणे गरजेचे, अपेक्षित असले तरी निर्जीव देहाचाही तेवढाच सन्मान राखला जाणं नीतिमत्तेस धरूनच आहे. सर्वच माणसांची वागण्याची, विचार करण्यची पद्धत एकच असेल, असं होत नाही. किमान सार्वजनिक जीवनात आदर्श नीतीमत्तेने वागणे हा संबंधित व्यक्तीवर झालेल्या संस्कारांचा, किंवा त्या व्यक्तीने स्वत:वर केलेल्या संस्कारांचा, परिसर, मित्र यांनी टाकलेल्या प्रभावाचा भाग असू शकतो. कुणाच्या मनात काय सुरु आहे, त्याला काय म्हणायचे आहे, त्याला काय वाटते यावर इतरांचे काहीही नियंत्रण असू शकत नाही.

वैद्यकीय क्षेत्राचे मानवी जीवनात अत्यंत मोठे स्थान आहे. त्यामुळे या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती सन्माननीय ठरतात. यांत अनेक त्यागी व्यक्ती समाजाने पाहिल्या आहेत. काही व्यक्तींच्या वर्तनाने संपूर्ण गटाला दोषी ठरवणे खूप चुकीचे आहे. या क्षेत्रातील लोक दुर्गंधी सहन करतात, बहुतेक वेळा आव्हानात्मक, नकारात्मक वातावरणात काम करीत असतात, त्यांच्या प्रती आपण आभारी असले पाहिजे!

देहदान, त्या देहाचे विच्छेदन करताना संबंधित वैद्यकीय विद्यार्थ्यांचा आपापसांत झालेला तथाकथित अश्लील संवाद याबाबत सध्या अत्यंत चर्चेत असलेल्या विषयावरून देहदानाबाबत काही ऊहपोह सुरु आहे. या चर्चेच्या दरम्यान एका महिलेने फेसबुक comment मध्ये “मी देहदानाचा संकल्प रद्द करते आहे” अशा आशयाचे विधान केलेले वाचले. यावरून सार्वजनिक ठिकाणी, उघडपणे बोलल्या गेलेल्या शब्दांचे परिणाम समाजावर किती दूरगामी होऊ शकतात, याची कल्पना यावी. हे नुकसान सहजी भरून येणारे नाही. मात्र देहदान चळवळीतील कार्यकर्त्यांपुढे आता एक नवे आव्हान उभे राहिले आहे. आपले जनमानस तसे विचारी आहे, या एका प्रकारामुळे लोक य देहदानासारख्या पवित्र कार्यापासून दुरावले जाणार नाहीत, अशी खात्री आहे आणि अपेक्षासुद्धा!

देहादानात आलेला देह आपल्या सास-यांचा आहे हे माहीत असूनही त्या देहाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण देणा-या एका महिला डॉक्टर यांच्या विषयी मी वाचले आहे… त्यामुळे किमान माझी तरी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांबद्दलची आदराची भावना कायम आहे. कुणा अविचारी, उथळ व्यक्तीच्या तद्दन घाणेरड्या शेरेबाजीमुळे ही भावना दुखावली जाणार नाही! जगाच्या बाजारात मातीही मिळते आणि मोतीही… काय घ्यायचे आपण ठरवायचे!

(मी वैद्यकीय तज्ज्ञ नाही. केवळ माहिती घेऊन लिहिले आहे. यातील तांत्रिक माहिती चुकीची, अपुरी असू शकते. देहदानास पाठिंबा आणि कायद्याने अत्यावाशाय्क असलेल्या मरणोत्तर वैद्यकीय तपासणीचा पुरस्कार यासाठी हा लेख लिहिला आहे. खम्मम येथील वैद्यकीय महाविद्यालयात घेतल्या गेलेल्या शपथेचे छायाचित्र संदर्भांसाठी साभार वापरले आहे.)

 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गर्भगृह… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्वाती मंत्री ☆

स्वाती मंत्री

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ गर्भगृह… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  स्वाती मंत्री ☆

 

गर्भगृह – जिथे “मी” संपतो, तिथेच सत्य सुरू होतं.

 

एक प्रश्न विचारतो.

उत्तर देण्याची घाई नको.

फक्त… आत जा.

तुम्ही कधी तरी गर्भगृहात उभे राहिलात?

नक्कीच राहिले असाल,

तेव्हा —

तुम्हाला नक्की काय वाटलं?

शांतता?

भीती?

ओढ?

रडू?

याखेरीज असंख्य भावना

की… काहीच नाही?

ते “काहीच नाही” हेसुद्धा उत्तर आहे.

कारण गर्भगृह तुम्हाला काहीतरी देत नाही —

ते तुमच्याकडून काहीतरी घेतं.

 

 गर्भगृह म्हणजे फक्त एक खोली नाही.

मंदिराच्या आत जाताना आपण दरवाजे ओलांडतो —

पण ते दरवाजे केवळ भौतिक सामग्रीचे नसतात.

ते मनाच्या थरांचे दरवाजे असतात.

पहिला दरवाजा — बाहेरचा गोंगाट सोडून येणारा “मी”

दुसरा — प्रश्नांनी भरलेला, अपेक्षांनी थकलेला “मी”

तिसरा — उत्तराच्या शोधात असलेला, एकटा “मी”

आणि चौथा —

जिथे “मी” उरत नाही.

तिथेच गर्भगृह सुरू होतं.

 

 गर्भगृहात अंधार का असतो?

 

गर्भगृह अंधारं असतं — हा योगायोग नाही.

जसा आईच्या उदरात अंधार असतो, तरीही तिथेच जीव आकार घेतो —तसंच गर्भगृहाच्या त्या काळोखात तुमचे संकल्प, तुमची श्रद्धा, तुमचं भविष्य आकार घेतं.

बाहेरचा प्रकाश डोळ्यांना दिसतो.

आतला प्रकाश आत्म्याला जाणवतो.

गर्भगृह तुम्हाला त्या आतल्या प्रकाशाकडे वळवतं.

म्हणून तिथे दिवे कमी असतात — कारण तिथे तुमचीच ज्योत पेटायची असते.

 

 मंत्र का म्हणतात तिथे?

कारण तिथे भाषा चालत नाही — तर तिथे चालते कंपन, स्पंदन.

तुम्ही जेव्हा “ॐ नमः शिवाय” म्हणता —

तेव्हा तुम्ही फक्त शब्द उच्चारत नाही,

तुम्ही स्वतःच्या पेशींना एक संदेश देत असता.

त्या नादात तुमची भीती विरघळते,

तुमचा अहंकार झुकतो,

आणि त्या क्षणी —

देव तुमच्यात शिरतो, तुमच्यासमोर नव्हे.

 हजारो वर्षांची ऊर्जा

जुन्या मंदिराच्या गर्भगृहात एक वेगळाच भार असतो —

तो दगडांचा नाही.

तो हजारो माणसांच्या अश्रूंचा, प्रार्थनांचा, श्रद्धेचा भार आहे.

शतकानुशतके तिथे कोणी आलं —

मुलासाठी, आजारासाठी, दारिद्र्यासाठी, प्रेमासाठी.

त्या सगळ्यांनी आपापलं काहीतरी तिथे ठेवलं.

ती मूर्ती दगडाची किंवा धातूची नाही — ती लक्षावधी माणसांच्या विश्वासाची घनमूर्ती आहे.

म्हणून तिथे गेलं की काहीतरी होतं.

ते “काहीतरी” विज्ञानाला अजून ज्याला नाव देता आलेलं नाही.

 

 गर्भगृह “सगळ्यांसाठी” का नसतं?

इथे एक खरं बोलतो —

गर्भगृहाचे नियम कोणाला कमी लेखत नाहीत.

ते त्या जागेची कंपनशक्ती टिकवण्यासाठी आहेत.

जसं एखाद्या शस्त्रक्रियागृहात

सगळ्यांना आत सोडत नाहीत —

तिथे तयारी लागते, शुचिता लागते —

तसंच गर्भगृहात मनाची शुचिता लागते.

तुम्ही स्वच्छ आहात की नाही हे कपड्यांवरून नाही —

ते तुमच्या हेतूवरून ठरतं.

 आणि हे सगळ्यात महत्त्वाचं — गर्भगृहात जायलाच पाहिजे असं नाही.

जर तुमचं मन स्थिर असेल, आणि जर तुम्ही कुठेही बसून डोळे मिटलेत आणि त्या शक्तीशी जोडले गेलात तर ती स्पंदनं तुमच्यापर्यंत येतात. अंतर नाही. भिंत नाही. दरवाजा नाही. तरीही ती स्पंदने पोचतात

श्रद्धा हाच रस्ता आहे.

 

शेवटी एकच प्रश्न —

तुमच्या कुलदेवतेचं स्थान तुमच्यासाठी काय आहे?

एक जिवंत ऊर्जास्थान —

जिथे तुम्ही रिकामे होऊन जाता आणि भरून येता?

की एक फोटो काढण्याची जागा?

की एक पर्यटन स्थळ?

हे वाचताना जर आत कुठेतरी काहीतरी हललं,

एखादा श्वास खोल गेला,

डोळे ओले झाले —

तर तुमचं गर्भगृह आत आहे.

ते कधीच बंद नसतं.

गर्भगृहात तुम्ही प्रवेश करत नाही —

तिथून परतताना

तुमचं सत्य घरी परततं.

*

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: स्वाती मंत्री

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “कपडे दाखवण्याचा कार्यक्रम…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “कपडे दाखवण्याचा कार्यक्रम…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

घराघरात अनेक कार्यक्रम होतात. काहीवेळा ते अचानक तर काहीवेळा ठरवून होतात. हा दाखवण्याचा कार्यक्रम म्हणजे घरात मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरल्यानंतर खरेदी केलेले कपडे दाखवण्याचा कार्यक्रम.

मुलगा किंवा मुलगी पाहण्याचे कार्यक्रम काही प्रमाणात कमी झालेले आहेत. तेच अगोदर बघतात, आणि नंतर आपल्याला सांगतात. यात आपल्याला बघण्याशिवाय किंवा बघत राहण्याशिवाय काही करायचं नसतं. तो भाग निराळा. महत्वाचा आहे तो घेतलेले कपडे दाखवण्याचा.

क्रिकेटचे सामने कसे दोन तीन राऊंड मधे होतात, तसाच हा दाखवण्याचा कार्यक्रम दोन तीन राऊंड मधेच होतो. टिम पण वेगळ्या असतात. त्याचा फायनल राऊंड सुध्दा होतो. क्रिकेटचा सामना पहायला जसे काही प्रेक्षक हे सगळ्या राऊंडला असतात, तसेच काही या वेळी सगळ्या राऊंडला असतात.

या प्रत्येक वेळी जो उत्साह असतो तो कमालीचा असतो. बर्‍याचदा तर खरेदीला जेवढा वेळ लागला त्यापेक्षा थोडासाच कमी या दाखवण्याच्या कार्यक्रमाला लागतो. पण कार्यक्रम सगळा साग्रसंगीत असतो.

खरेदीला कुठून सुरुवात झाली, सोबत कोण होत, कोण आल नाही, तर कोण आल नाही तरीही चाललं असतं पण अगदी वेळेवर त्यांनी येऊ का… अस विचारल्याने एक जास्तीची गाडी वेळेवर घ्यावी लागली, रस्त्यात कुठे, कशासाठी, कितीवेळ थांबलो याची रनिंग काॅमेंन्ट्री सुध्दा असते. यात कौतुुक आणि थोडी तक्रार दोन्ही असतं.

मग अगदी कार्यालयात जाण्यापासून परत घरी येईपर्यंत कोणकोणते कार्यक्रम कोणकोणत्या क्रमाने आहेत त्याच पध्दतीने हे कपडे लावलेले असतात. व त्या कपड्यांच्या दर्शनाचा व प्रदर्शनाचा कार्यक्रम सुरु होतो.

दुकानात सगळे बसल्यावर जसं पहिल्यांदा थंड पाण्याचा राऊंड होतो, तसाच घरातही होतो. दुकानात जसा सुरुवातीला आपला थंड प्रतिसाद असतो तसाच इथेही काही प्रमाणात जाणवतो. पण नंतर वाढतो.

दुकानात सगळे लाईट लावलेले असतात तस्सेच हाॅल मधले सगळे लाईट लावत लाईट कलर पासून दाखवायला सुरुवात होते. आणि रंग खुलत जातात तसतसा या गप्पा पण रंगत आणि खुलत जातात.

अगोदर साध्या, देण्याघेण्याच्या साड्या दाखवल्या जातात. या साड्या वरवर पाहून बाजूला ठेवल्या जातात. म्हणजे खास जेवणात वरणभात जरी आवडीने खाल्ला तरी तो जेवढ्या प्रमाणात वाढतात, व जेवढ्या लवकर संपतो तितकाचवेळ या साड्यांना मिळतो.

मग सुरुवात होते… ही कार्यालयात जातांना, मुद्दामच थोडी हलकी घेतली… ही सिमंती पुजनाला, ही रात्रीच्या जेवणाला, ही सकाळी विधी करतांना, ही लग्नाच्या वेळी, ही जेवताना, ही लक्ष्मी पुजनाला, आणि ही कार्यालयातून घरी येतांना… ही पण थोडी हलकीच आहे… सांगण जरी भरभर वाटलं तरी दाखवणं मात्र हळूहळूच असतं…

थोडी हलकीच घेतली यावर वजनाला… कि किमतीला… हा प्रश्न कोणाच्या तरी चेहर्‍यावर पडतो. आणि मग साडी सारखाच तो प्रश्न उलगडला जातो. अग खरंच… पण वजनालाच हलकी वाटते… किंमत साधारण इतकीच असते हल्ली…

आपल्या हलक्या साडीचीही किंमत (मान) ठेवली म्हणून दाखवणार्‍यालाही बरं वाटतं… हलक्या साडीला कोणीच हलक्यात घेतलं नाही याचं समाधान चेहर्‍यावर दिसतं. आता खास विधीसाठी घेतलेल्या खास साड्या परत एकदा त्या गर्दीतून बाहेर येतात. आणि मग त्याचा रंग, डिझाईन, पोत, प्रकार यावर नाना प्रकाराने चर्चा होते. साड्यांचा एक एक पदर उलगडला जातो त्याच प्रमाणात साडी बद्दल काय वाटतं याचे विचार सुध्दा उलगडले जातात. हळूहळू त्या साड्या आणि विचार दोन्ही पसरतात.

या साड्या, त्यांचे पदर, व त्यावर व्यक्त केलेले विचार जसजसे पसरत जातात तसेच पाहणारे सुध्दा असलेल्या जागेवर जमेल तस पसरण्याच्या प्रयत्नात असतात. व याच पसार्‍यात चला चहा, किंवा थंड करते याची घोषणा होते.

थोडक्यात पहिल्यांदा झालेल्या पाण्याच्या राऊंड नंतर चहाचा राऊंड करावा वाटतो इतका वेळ (खरतर काळ म्हणायचं होतं पण काळ जरा जास्तच लांबल्यासारखं वाटतं) मधे गेलेला असतो.

चहा, किंंवा थंड झाल्यावर परत देण्याघेण्याचे काही खास कपडे असतात. ते नातेवाईक, त्यांच वय, व त्यांची शारिरीक स्थिती यानुसार ड्रेस मटेरियल पासून नऊवारी साडीपर्यंत लांब असतं. आणि मग कोणाकोणाला काय, का देणार याची चर्चा होते. यात कोणाला काय द्यायच यावर आपली मतं सुध्दा व्यक्त केली जातात. यात बराच वेळ घालवला अस लक्षात आल्यावर, सिनेमाच्या शेवटी जशी नामावली दाखवतात पण ती पटापट पुढे सरकते, तशी माणसांची खरेदी सरकते. हा झब्बालेंगा, हे कपडे पॅट शर्ट साठी. सुट घ्यावा का असा विचार झाला होता. शेवटी ठरवलं तुम्हाला जे सुट वाटतील तेच घ्या. होना… यांच्या कपड्यांना काही जास्त वेळ लागत नाही खरेदीला. आमच्या चार पाच साड्यांपैकी नक्की कोणत्या तीन घ्याव्या याचा विचार करे पर्यंत यांचे कपडे पिशवीत घालून तयार होते. शेवटी दिड तास घालवल्यावर सगळ्याच ठेवाव्या असं ठरलं. मागे पुढे लागतातच. आणि मग निघतांना या दोन परत ठेवायची इच्छाच होत नव्हती, मोह आवरतच नव्हता. आणि आता इतकी खरेदी झाल्यावर लगेचच काही परत खरेदीची वेळ येणार नाही म्हणून या पण ठेवल्या.

त्या दोन ठेवलेल्या साड्यांबरोबर मग सगळ्या साड्या परत नीट ठेवल्या जातात.

चर्चा इथेच संपत नाही. मग चर्चा सुरु होते ती ब्लाऊज पीसची. घेतले नसतील तर कुठे घ्यायचे. आणि घेतले असतील तर कोणाकडे, कधी, आणि कसे शिवायला टाकायचे. याची…

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”आगळा वेगळा Father’s Day” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “आगळा वेगळा Father’s Day.. ☆ संध्या बेडेकर ☆

आज morning walk ला श्री साठे आले नाहीत. सर्वांचे एकमेकांना विचारून झाले. ज्येष्ठांचा हा दहा जणांचा गृप रोज बगीच्यात एकत्र होतो. प्रत्येक जण आपापल्या क्षमतेनुसार व्यायाम करतात. walk करतात. सात ते आठ ही यांची व्यायामाची / walk ची ठरलेली वेळ आहे. त्यानंतर एक तास गप्पा गोष्टी.

वर्तमान पत्रातील बातम्या, आयुष्याचे अनुभव, किस्से या जेष्ठांजवळ भरपूर असतात. नवीन टेक्नॉलॉजी चे अर्धवट ज्ञान असते, शेअर्स चे चढ उतार, अनेक अनुभवांनी श्रीमंत असलेला हा वर्ग, कधी कधी तर बायकांच्या वरताण गप्पा मारण्यात पटाईत आहेत, असं वाटतं. सध्या तर Cricket World Cup च्या रोजच मॅचेस असतात, त्यावर चर्चा होते, खरंतर गप्पा थाबवाव्या लागतात.

 येथे त्यांना हळु बोला,

अहो! हे खूपदा सांगनू झाले तुमचे,

असं म्हणणार कोणी नसतं.

सांगता सांगता विसरल तरी चालतं. नाव आणि आडनाव तर बहुतेक आठवत नाहीच, तरी सर्व ऐकतात, दाद देतात.

नाईलाजाने साधारण नऊ वाजता सगळे जण आपापल्या घरी जातात. या पिढीची शिस्त मात्र वाखाणण्याजोगी आहे. सर्व रिटायर्ड पण वेळेवर येणार अन् वेळेवर जाणार.

संध्याकाळी पुन्हा बस स्टॉप वर एकत्र भेटतात, तास दोन तास गप्पा झाल्या की आपापल्या घरी जातात.

ही मंडळी काही लहान पणापासून चे मित्र वगैरे नाहीत. Retired झाल्यावर हळूहळू एकमेकांशी ओळख झाली आणि हा गृप वाढत गेला. आता तर भेटणे हा त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमांपैकी एक आनंदाचा कार्यक्रम झाला आहे. रोज सकाळी उठल्यावर बगीच्यात जायचा त्यांचा उत्साह बघण्यासारखा असतो.

काही कारणास्तव कोणी येऊ शकलं नाही तर ते स्वतः आणि बाकीचे सुद्धा बैचेन होतात. विचारपूस करताना कुठेतरी काळजी चे सूर असतात. आपली काळजी करणारे कोणी आहेत, ही भावना शक्ति देते. निराशा दूर करते. जगण्याचा आनंद वाढवते.

यांना एक गोष्ट चांगली समजलेली आहे ती म्हणजे आयुष्य आनंदात जगायला, गप्पा मारायला मित्र लागतात.

 हमारे दुनिया में अकेलेपन की कोई जगह नहीं है। किसी को अपना हम बनालो

हा मंत्र त्यांना समजला आहे.

यातील प्रत्येकाचा फॅमिली बॅकग्राऊंड वेगळा आहे. कोणी खूप चांगल्या नोकरीतून अवकाश प्राप्त अधिकारी आहेत. तर काही सर्व साधारण नोकरी केलेले आहेत. काही आजही सहजीवन जगतायेत, तर काही आज आयुष्याच्या संध्याकाळी एकटे आहेत. कोणी एकटेच राहतात तर कोणी आपल्या मुलासूने बरोबर आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या घरांतील वातावरण, समस्या, आधार, प्रश्न वेगळे आहेत. प्रत्येकाची लढाई वेगळी आहे.

या गृपचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतः चां एकटेपणा घालवायला, active रहायला एक उत्तम मार्ग शोधला आहे. मधून मधून बाहेर जेवायला जातात. पार्टी करतात.

या गृपचे काही नियमही आहेत बरं का??

आपल्या घरातील गोष्टींची चर्चा येथे करायची नाही. औषध आजारपण याबद्दल ही बोलायचे नाही. मदत हवी असल्यास निःसंकोचपणे बिनधास्त मागायची. घरच्या चांगल्या गोष्टी, आनंददायी घटना सांगायच्या, बरोबर त्यादिवशी चां चहा पण सर्वांना द्यायचा.

थोडक्यात रडगाणे गायचे नाही. आनंद शोधायचा आणि साजरा करायचा. त्यामुळे चहाच्या टपरीवर हा गृप वारंवार दिसतो.

आज माझ्याकडून चहा यांची सर्वांना आता सवय झाली आहे.

आनंदी जगायची यांनी सवय लावून घेतली आहे.

बरोबर आहे,

म्हणतात ना,

आनंदी जगणे ही निवड असावी, अपेक्षा नाही. तुम्हाला तोपर्यंत कोणतीच गोष्ट आनंद देणारं नाही, जोपर्यंत तुम्ही त्याची निवड करणार नाही.

Sometimes you hv to remind yourself that life can even more beautiful even though the things are not moving in your own way.

आज Father’s Day

बहुतेकांची मुलं जवळ नाहीतच. बहुतेकांना मुलांचा

Happy Father’s Day 

असा मेसेज आला…

पण श्री साठे या मेसेज ची, फोन ची वाट बघत होते. जूने अल्बम बघत होते, डोळ्यांतून अश्रू घळघळ वाहात होते. आयुष्याचा सिनेमा Real storyडोळ्यासमोरून सरकत होती. श्री व सौ. साठे उदास होते. कधी कधी असं होतं, कितीही मनाला समजवा, पण चांगल्या तर नाहीच नाही, पण वाईट आठवणी मनाच्या कोपऱ्यातून आपलं अस्तित्व दाखवायला जराही वेळ लावत नाही.

आज श्री साठे मुलांच्या आठवणीने उदास होते.

मागच्या वर्षी श्री साठे आजारी पडले, दवाखान्यात भर्ती होते. सकाळी साताऱ्याहून तो आला आणि संध्याकाळी परत गेला. एक दिवस थांबला असता तर बरं वाटलं असतं.

एक फोन करण्याइतपत ही त्याला वेळ मिळत नाही का?? मग मेसेज चे तरी काय करायचे म्हणा??

श्री साठे म्हणाले,

अग!! आपण मुलांकडून जास्त अपेक्षा ठेवतो का?? एखादं दिवस थांबला असता तर बरं वाटलं असतं.

सौ. साठे म्हणाल्या,

अहो!! असेल त्याला काही महत्वाचे काम. तुमची मित्रावळ आहे की आपल्याकडे, आधार द्यायला. सोबत आहे की त्यांची.

तेंव्हाच श्री कुलकर्णी श्री साठेंची विचारपूस करायला म्हणून घरी आले होते. दोघांच्या गोष्टी त्यांच्या कानावर पडल्या.

एकंदर दोघांच्या मनस्थितीचा अंदाज त्यांना आला.

ते तसेच परत फिरले. श्री कुलकर्णी स्वतः बरोबरच बोलत होते. विचार करत होते.

खरंच श्री व सौ साठे मनाने हळवे झाले आहेत. बायका छोट्या छोट्या गोष्टीं आठवून रडतात. मन हलकं करतात. परंतु आज श्री साठे रडतायेत, तर रडू द्यावे. मनात साचून ठेवण्यापेक्षा रडून मोकळ व्हावे.

का पुरूषांना रडायची बंदी आहे का?? त्यांना मन नसतं की भावना नसतात?? त्यांना दुःख होत नाही का?? त्यांनी भावना का दाबून ठेवायच्या?? दुःख एकत्र झालं आणि हा बांध अचानक फुटला, स्फोट झाला तर अनर्थ होईल.

भावनांचा बांध फुटण्याआधी त्याला out let देणे आवश्यक आहे.

काय करणार?? लहान पणापासून मुलांनी हेच ऐकलेल असतं ना.

अरे!! तू मुलगा आहेस ना तरी रडतो. मुलं रडत नाहीत.

हे चूकच आहे.

मनसोक्त हसावं, तसंच जेंव्हा रडावसं वाटतंय तेंव्हा मनसोक्त रडाव सुद्धा. रडून मन हलकं होतं. मनावरचं प्रेशर कमी होत. मनातील अडगळ, कचरा बाहेर पडणं आवश्यक आहे.

आपल्याच विचारात श्री कुलकर्णी घरी आले. त्यांना अस्वस्थ बघून सौ कुलकर्णी नी विचारले

काय झाले.?? तुम्ही एवढे अस्वस्थ का आहात??

श्री कुलकर्णीचें बोलणे ऐकून सौ कुलकर्णी ना वाईट वाटले. त्या म्हणाल्या,

आज सर्वांना घरी बोलवा हो. बहुतेकांची मुले बाहेरच आहेत. आपण सर्व एकत्र बसून, गप्पा मारू. सर्वांनाच बरं वाटेल आपला अजय तरी आपल्या जवळ कुठे आहे??

 आज गृपवर श्री कुलकर्णी यांनी सर्वांना आमंत्रणाचा मेसेज पोस्ट केला.

आज माझ्याकडून वडापाव आणि चहा पार्टी.

सर्वांनी संध्याकाळी घरी यावे.

मी आणि आपण सर्वच चांगले बाबा होतो. आपली सांपत्तिक परिस्थिती, क्षमता, कुवतीनुसार आपण सर्वांनी आपापले परिवार छान सांभाळले. आज आपण सर्व आपल्या स्वतः चाच कौतुक समारंभ साजरा करूया. स्वतः चीच पाठ थोपटूया.

Father’s Dayसाजरा करूया.

आज श्री कुलकर्णींच्या घरी आगळावेगळा Father’s Day झाला. काहींच्या सौ. पण आल्या होत्या.

श्री व सौ साठेही आले होते. गप्पांत रंगले होते.

श्री व सौ कुलकर्णी यांचा उद्देश सफल झाला होता. खरंतर आजची पार्टी खास करून त्यांच्या साठीच होती.

बरोबर आहे,

 आज कोणीतरी आपल्या मुळे आनंदी आहे.

ही एक सर्वोत्तम feeling आहे.

 

When life gives you hundred reasons to break down and cry. Show life you have millions reasons to smile and laugh.

एकतर म्हातारपण म्हणजे वेगळीच फेज, त्यात शरीर नाजूक आणि मन हळव झालेलं असतं. त्यात भरपूर रिकामा वेळ हातात असतो. प्रत्येकाचे प्रश्न, समस्या, वेगवेगळे असतात. फक्त ते

स्वीकार करायची हिम्मत असावी/ ठेवावी, आणि त्याच परिस्थितीत सुधार करण्याची ईच्छा असली तर,

 life becomes easy and happy.

 

म्हणतात ना,

 

You can not find happiness with negative mindset. Start thinking positive and happiness will find you.

श्री व सौ कुलकर्णी सारखा एक तरी मित्र प्रत्येकाला नक्की असावा.

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ खरा फादर्स डे!!! – लेखिका : तृप्ती देव ☆ प्रस्तुती – सुहास रघुनाथ पंडित ☆

सुहास रघुनाथ पंडित

? मनमंजुषेतून ?

☆ खरा फादर्स डे!!! – लेखिका : तृप्ती देव ☆ प्रस्तुती – सुहास रघुनाथ पंडित

रोजप्रमाणेच सकाळ उजाडली होती. आज मला थोडी उशिराच जाग आली. मी निवांत चहाचा कप हातात घेतला आणि किचनमधून हॉलकडे आले.

आई नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात सकाळच्या कामात गुंतली होती. बाबांचं आज ऑफिस उशिरा असल्यामुळे घरात एक वेगळाच निवांतपणा होता. मोबाईलवर मंद आवाजात भजन सुरू होतं आणि खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या उन्हाने संपूर्ण हॉल उजळून निघाला होता.

तेवढ्यात आजोबांचा हलकासा हसण्याचा आवाज कानावर पडला.

मी सहज नजरेने समोर पाहिलं…

माझे बाबा खुर्चीवर बसलेल्या आजोबांचे केस अगदी हळुवारपणे विंचरून देत होते.

“बाबा, जरा स्थिर बसा ना… नाहीतर कंगवा अडकेल. “

– आजोबा लहान मुलासारखे हसले.

“अरे, आता या वयात माझे केस तरी कुठे उरलेत रे? “

– बाबांनीही हसत उत्तर दिलं,

“केस कमी झाले म्हणून काय झालं? आमच्या डोक्यावरचं छत्र अजूनही तुम्हीच आहात. “

– – – मी चहाचा कप हातातच धरून तिथेच थबकले.

त्या सकाळी मला घरात भजनाचा आवाज ऐकू येत होता, पण समोर दिसत होतं ते त्याहूनही मोठं स्तोत्र होतं—एका मुलाने आपल्या वृद्ध वडिलांवर केलेल्या निःशब्द प्रेमाचं.

थोड्याच वेळात बाबांनी आजोबांच्या हातावर औषध ठेवलं, पाण्याचा ग्लास पुढे केला आणि त्यांच्या आवडीचं भजन मोबाईलवर लावून दिलं.

“आज बरं वाटतंय ना, बाबा? “

– आजोबांनी फक्त मान हलवली.  त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं.

दुपारी डॉक्टरांकडे जायचं होतं. संध्याकाळी त्यांना आवडणारं धार्मिक पुस्तक आणायचं होतं. रात्री जेवणात मऊ आमटी आणि गरम भात करायचा होता.

हे सगळं बाबा इतक्या सहज करत होते, जणू ती जबाबदारी नव्हतीच… ती त्यांच्या प्रेमाची रोजची सवय होती.

मी आईला हळूच विचारलं,

“आई, बाबा आजोबांची एवढी मनापासून काळजी कशी घेतात गं? “

– आई पोळी लाटत लाटत शांतपणे म्हणाली,

“बाळा, ज्यांनी आयुष्यभर आपल्याला बोट धरून चालायला शिकवलं, त्यांचा हात उतारवयात सोडायचा नसतो. “

त्या एका वाक्याने माझ्या मनात अनेक चित्रं तरळली.

– – लहानपणी आजोबांनी बाबांना शाळेत सोडलं असेल…

सायकल शिकवली असेल…

पहिल्या पगारावर अभिमानाने त्यांच्या पाठीवर थाप मारली असेल…

आणि आज…

– – आज काळाने फक्त भूमिका बदलल्या होत्या.

आज बाबा त्यांच्या स्वतःच्या बाबांचे आधार झाले होते.

आजोबांना औषधाची वेळ आठवत नव्हती, पण बाबांना प्रत्येक गोळीची वेळ पाठ होती.

आजोबांना मोबाईल वापरता येत नव्हता, पण बाबा त्यांच्या आवडीची भजनं, प्रवचनं आणि जुन्या गाण्यांची यादी तयार करून ठेवत होते.

आजोबांना चालताना आधाराची गरज होती, आणि बाबा सावलीसारखे त्यांच्या प्रत्येक पावलासोबत चालत होते.

त्या क्षणी माझ्या मनात एक विचार अलगद उमलला…

– – आयुष्यातील सर्वात मोठा वारसा पैसा, जमीन किंवा दागिने नसतात; आपल्या वडिलांचा हात कधीच सुटू न देण्याची सवय हा सर्वात मोठा वारसा असतो. “मुलांसाठी वडील आणि वडिलांसाठी सावली होऊन जो जगतो, त्याच्या रूपानेच देव प्रत्येक घरात रोज वावरत असतो. “

त्या रात्री सहज मोबाईल हातात घेतला.

सोशल मीडियावर फादर्स डेच्या शुभेच्छांचा पाऊस पडत होता.

कोणी केक कापत होतं…

कोणी फोटो टाकत होतं…

कोणी महागड्या भेटवस्तू देत होतं…

… मी मोबाईल शांतपणे बाजूला ठेवला.

– – समोर बाबा आजोबांना प्रेमाने चादर पांघरून देत होते.

उशी नीट करत होते.

– दिवा बंद करण्याआधी त्यांनी हळूच विचारलं,

“बाबा, अजून काही हवंय का? “

आजोबा हसले. .. “नाही रे… तू आहेस ना, मग अजून काय हवं? “

– – त्या चार शब्दांनी माझ्या मनात फादर्स डेचा अर्थ कायमचा बदलून गेला.

त्या दिवशी मला समजलं…

… एक पिता होणं म्हणजे फक्त मुलांना जन्म देणं नाही.

आपल्या वृद्ध होत चाललेल्या वडिलांचे पुन्हा वडील होणं, त्यांच्या हट्टांना समजून घेणं, औषधांची वेळ लक्षात ठेवणं, त्यांच्या एकटेपणात त्यांच्यासोबत शांत बसणं, त्यांच्या चालण्याचा आधार होणं आणि त्यांना कधीच ओझं वाटू न देणं… हेच पितृत्वाचं सर्वोच्च रूप आहे.

त्या रात्री मी स्वतःशी एक छोटासा निश्चय केला.

– – उद्या मी कोणाचा बाबा होईन की नाही, हे काळ ठरवेल.

पण माझे बाबा जेव्हा थकतील, तेव्हा त्यांच्या आयुष्यात मी नक्कीच त्यांचा आधार बनेन.

कारण वडिलांना दिलेला गुलाबाचा गुच्छ एक दिवस कोमेजतो…

महागडी भेटवस्तूही विसरली जाते…

पण उतारवयात त्यांच्या हातात दिलेला आपला हात आणि त्यांच्या डोळ्यांत दिलेला विश्वास आयुष्यभर ताजा राहतो.

– – मुलांसाठी बाबा होणं ही जबाबदारी आहे; पण आपल्या वडिलांसाठी पुन्हा बाबा होणं हा संस्कार आहे.

– – आणि जो माणूस एका हाताने आपल्या मुलांचं भविष्य घडवतो आणि दुसऱ्या हाताने आपल्या वृद्ध वडिलांना आधार देतो…

… त्याच्यासाठी फादर्स डे कॅलेंडरवरच्या एका तारखेचं नाव नसतं.

त्याच्या आयुष्यातला प्रत्येक दिवसच “खरा फादर्स डे” असतो.

┉❀꧁꧂❀┉

लेखिका : तृप्ती देव

भिलाई, छत्तीसगड.

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares