मराठी साहित्य – विविधा ☆ ‘काळाच्या भाळावरील निळा टिळा : शनि’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘काळाच्या भाळावरील निळा टिळा : शनि’ ☆ श्री दिवाकर बुरसे

आमावास्या, शनिवार आणि शनिजयंतीच्या दुर्मिळ त्रिपेडी संगमातून उलगडणारा विश्व, पुराण आणि कर्मतत्त्वाचा गूढ महोत्सव

१६ मे २०२६. वैशाख अमावास्या. शनिवार. आणि शनिजयंती.

कालगणनेच्या अथांग पटावर क्वचितच उमटणारा हा योग — जणू वेळेने स्वतःच्या कपाळावर निळा तिलक धारण केलेला दिवस!

भारतीय संस्कृतीत काही दिवस हे केवळ पंचांगातील अंक नसतात; ते सामूहिक स्मृतीतील गूढ दीपस्तंभ असतात. हा दिवस तसाच — गंभीर, चिंतनशील आणि आत्मपरीक्षणाला बोलावणारा.

शनिचे नाव उच्चारताच अनेकांच्या मनात भीती दाटते. पण शनी म्हणजे भय नव्हे;

शनी म्हणजे शिस्त.

शनी म्हणजे दंड नव्हे;

तर कर्मांचे निर्विकार प्रतिबिंब.

“जिथे इतर ग्रह झंकारत आहेत,

तिथे शनी हा गंभीर मंद्रनाद आहे.”

 

सूर्यमालेतील निळा संन्यासी

सूर्यापासून सातव्या क्रमांकावर विराजमान असलेला शनी हा सूर्यमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा महाकाय ग्रह. गुरुच्या नंतरचा विराट अधिपती. पृथ्वीपेक्षा जवळजवळ नऊ पट मोठा!

त्याचा व्यास सुमारे १,२०,५०० किलोमीटर. इतका प्रचंड की त्यात पृथ्वीसारखे शेकडो ग्रह सामावू शकतील.

परंतु त्याचे खरे वैभव त्याच्या भोवतीच्या वलयांत आहे.

“नभाच्या कपाळी कोणी

रुपेरी वर्तुळांची रेघ ओढली?”

शनीभोवती फिरणारी बर्फ, धूळ, खनिजे आणि सूक्ष्म खडकांनी बनलेली वलये म्हणजे विश्वातील सर्वात अद्भुत दृश्यांपैकी एक. वैज्ञानिक त्यांना “रिंग्स” म्हणतात; भारतीय कविमनाला मात्र त्यांना “शनीची दिव्य किरीटमाला” म्हणावेसे वाटते.

त्या वलयांकडे पाहताना वाटते —

“विधात्याने एखाद्या तपस्व्याच्या जटांभोवती

हिमकणांची रुद्राक्षमाळ गुंफली आहे.”

किंवा जणू —

“काळाच्या अथांग जलधीवर

अनंततेची वर्तुळे उमटली आहेत…”

शनीभोवती चौदा मुख्य वलये आणि हजारो सूक्ष्म कड्यांची रचना आहे. लोकपरंपरेत “चौदा कडींचा शनी” अशीही प्रतिमा आढळते — अनंत वलयांच्या त्या गूढ विस्ताराचीच ती काव्यमय छाया.

पृथ्वी आणि शनी : दोन टोकांची कथा

पृथ्वी — जल, वनराई, चैतन्य आणि जीवनाची धावपळ.

शनी — थंडी, अंधार आणि गंभीर शांततेचा अधिपती.

“पृथ्वीवर जीवन धावते;

शनीवर काळ ध्यानस्थ बसतो.”

पृथ्वीवर एक वर्ष पूर्ण व्हायला ३६५ दिवस लागतात; तर शनीवर एक वर्ष पूर्ण व्हायला जवळजवळ २९.५ पृथ्वीवर्षे!

याच मंद गतीमुळे त्याचे नाव पडले शनैश्चरशनैः शनैः चरति इति शनैश्चर

म्हणजे — “जो हळू हळू चालतो तो शनी.”

तो धावत्या ग्रहांचा अधीर अधिपती नाही;

तो संथ सावल्यांचा सम्राट आहे.

शनीच्या वातावरणात मुख्यतः हायड्रोजन आणि हिलियम वायू आहेत. त्याचे तापमान उणे १७० अंश सेल्सिअसपर्यंत घसरते.

घन पृष्ठभाग नाही; सर्वत्र वायूंचे अथांग साम्राज्य.

तिथले वारे इतके प्रचंड असतात की पृथ्वीवरील वादळेही त्यांच्या पुढे बालखेळ वाटावीत.

 

पुराणातील कृष्णवर्णीय तपस्वी

भारतीय पुराणांनुसार शनी हा सूर्यदेव आणि छाया (संवर्णा) यांचा पुत्र.

सूर्याची प्रखरता आणि सावलीची गंभीरता — या दोन टोकांच्या मिलनातून जन्मलेला देव!

त्याचा भाऊ यम. बहीण भद्रा.

एक मृत्यूचा न्यायाधीश; दुसरा कर्मांचा.

कथेनुसार, शनीच्या जन्मावेळी त्याची माता कठोर तप करीत होती. त्या तपाच्या प्रभावाने बालक शनी कृष्णवर्णीय झाला. सूर्याने संशयाने त्याच्याकडे पाहिले, आणि शनीच्या कटाक्षाने सूर्यालाच क्षीणता जाणवली.

“त्याच्या नेत्रांत क्रोध नव्हता;

तिथे फक्त कर्मांचा आरसा होता.”

शनीचे वाहन — कावळा.

हातात दंड.

वेष गंभीर.

स्वभाव कठोर; पण अन्यायी नव्हे.

“शनीची दृष्टी जाळत नाही;

ती आडोशांनाही वितळवते.”

 

शनीच्या लीला आणि लोककथा

हनुमंत आणि शनी

लोककथेनुसार, रावणाने ग्रहांना बंदी बनवले होते. हनुमंताने त्यांची सुटका केली. तेव्हा प्रसन्न होऊन शनीने वर दिला —

“जो तुझी भक्ती करील, त्याला माझ्या पीडेचा त्रास कमी होईल.”

म्हणूनच शनिवारी मारुतीपूजनाची परंपरा दृढ झाली.

 

राजा विक्रमादित्याची कथा

नवरत्नांमध्ये श्रेष्ठत्वावरून झालेल्या वादात विक्रमादित्याने शनिला कमी मान दिला. शनिदशा सुरू होताच राजाला राज्य, वैभव, प्रतिष्ठा सर्व गमवावे लागले. अनेक संकटांतून गेल्यावर अखेरीस शनीने त्याची परीक्षा पूर्ण झाल्याचे घोषित केले.

ही कथा सांगते —

“शनी अहंकार मोडतो;

पण पात्रता घडवतो.”

 

ज्योतिषातील कर्मफलदाता

भारतीय ज्योतिषशास्त्रात शनीला “कर्मांचा लेखाधिकारी” म्हटले जाते.

तो विलंब करतो; पण अन्याय करत नाही.

जन्मकुंडलीत शनी ज्या भावात असेल, त्या क्षेत्रात संघर्ष, संयम आणि परिपक्वता निर्माण होते.

 

साडेसाती : भीती की बोध?

जेव्हा शनी जन्मराशीच्या मागील, जन्मराशीतील आणि पुढील राशीत अडीच अडीच वर्षे भ्रमण करतो, तो काळ “साडेसाती” म्हणून ओळखला जातो.

लोक त्याला घाबरतात; पण अनुभवी ज्योतिषी म्हणतात —

“शनी देतो ते उशिरा देतो;

पण दिलेले टिकाऊ असते.”

तो मकर आणि कुंभ राशीचा स्वामी.

तुला राशीत उच्च, मेषेत नीच.

श्रम, लोखंड, तेल, कारखाने, न्याय, कारागृह, तत्त्वज्ञान, वैराग्य, श्रमिक — या सर्वांचा कारक ग्रह म्हणजे शनी.

“शनीची चाकरी आणि लोखंडाची भट्टी —

दोन्ही माणसाला तावूनसुलाखून काढतात.”

 

भारतीय मनातील शनी

भारतीय जनमानसात शनीविषयी भीती आणि भक्ती यांचे विलक्षण मिश्रण दिसते. शनिवारचे तेलदान, काळे तीळ, कावळ्यांना अन्न, शनीमंदिरातील प्रदक्षिणा — या केवळ धार्मिक कृती नाहीत; ती सामाजिक श्रद्धाप्रतीकेही आहेत.

कारण शनी हा राजांचा नव्हे, तर श्रमिकांचा देव मानला जातो.

गरीब, उपेक्षित, श्रमजीवी आणि पीडित यांच्याशी करुणेने वागणे — हीच खरी शनिभक्ती, असा लोकविश्वास आहे.

“काळ, कर्म आणि कठोर करुणेचा कारभारी —

हाच शनी.”

 

आमावास्या, शनिवार आणि शनिजयंती : त्रिसंगमाचे गूढ

आमावास्या म्हणजे अंतर्मुखतेची रात्र.

शनिवार म्हणजे कर्मपरीक्षणाचा दिवस.

आणि शनिजयंती म्हणजे न्यायदेवतेच्या अवताराची स्मृती.

या तिन्हींचा संगम म्हणजे आत्मपरीक्षणाची सुवर्णसंधी.

हा दिवस देवाला प्रसन्न करण्यापेक्षा स्वतःला प्रामाणिकपणे पाहण्याचा आहे.

“विश्वात काही तारे तेजाने स्मरले जातात;

पण शनीसारखे काही ग्रह

शांत अंधाराने लक्षात राहतात.”

शनी : भयाचा नव्हे, बोधाचा ग्रह

शनीची भीती वाटण्याचे कारण त्याचा कोप नसतो;

तर आपल्या कर्मांबद्दलची अस्वस्थता असते.

जो सत्यप्रिय, श्रमशील, संयमी आणि न्यायी असेल, त्याच्यासाठी शनी हा कृपादाता आहे.

“जळून सोनं शुद्ध होतं,

तसंच दुःखातून माणूस.”

आणि म्हणूनच —

शनी म्हणजे शिक्षा नव्हे — शुद्धीकरण.

शनी म्हणजे अंत नव्हे — अंतरंगाचा आरंभ.

 

उपसंहार

त्या दूर निळसर ग्रहाकडे पाहताना, त्याच्या वलयांत आपल्यालाच वेढून ठेवणारे काळाचे चक्र दिसते. सूर्याच्या तेजात जो ग्रह सावलीसारखा फिरतो, तोच मानवाला प्रकाशाचा खरा अर्थ शिकवतो.

नभात तो निळा दिसतो,

पण त्याचा खरा रंग कर्मांचा आहे.

“सावल्यांच्या सिंहासनावर

निळा न्यायाधीश बसला;

कर्मांच्या कणाकणांचा

हिशेब काळाने जपला.

मंद चालतो शनी,

पण चुकत नाही पाऊल;

कर्मांच्या शेतात उगवतो

न्यायाचा निळा फुलोरा…”

 

शनीचा  वैदिक मंत्र-

ॐ शन्नोदेवीर-भिष्टयऽआपो भवन्तु पीतये शंय्योरभिस्त्रवन्तुनः।

शनीचा पौराणिक मंत्र-

नीलांजनसमाभासं रविपुत्र यमाग्रजम्

छायामार्तण्डसंभूत तं नमामि शनैश्चरम् ॥

शनीचा गायत्री मंत्र-

ॐभगभवाय विद्महैं मृत्युरुपाय धीमहि तन्नो शनिः प्रचोद्यात्।

शनीचा तांत्रिक मंत्र-

ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः।

 शनिदोष निवारण मंत्र-

ॐ त्रयम्बकं यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम।

 🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ साक्षीभाव ☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ साक्षीभाव ☆ विभावरी कुलकर्णी

जर आयुष्यात निर्भेळ आनंद मिळवायचा असेल तर मन आनंदी असावे लागते. त्यासाठी जे करावे लागते त्यातील काही गोष्टी आधीच्या आनंद व आवड या लेखात लिहिले होते. मन आनंदी ठेवण्यासाठी जे करावे लागते, त्यातील एक गोष्ट म्हणजे आपला साक्षीभाव जोपासणे व वाढीस लावणे.

साक्षीभाव (Witness Consciousness) असणे हे केवळ आध्यात्मिक प्रगतीसाठीच नाही, तर दैनंदिन जीवनात शांतता टिकवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:

भावनांवर नियंत्रण ठेवता येते

​जेव्हा आपण एखाद्या घटनेत पूर्णपणे गुंतून जातो, तेव्हा राग, भीती किंवा दुःख आपल्याला अस्वस्थ करतात. साक्षीभावामुळे आपण आपल्याच भावनांकडे ‘बाहेरून’ पाहू शकतो. यामुळे भावनांचा आवेग ओसरतो आणि आपण वाहवत न जाता स्थिर राहू शकतो.

आपल्या विचारात स्पष्टता येते

​आपले मन सतत विचारांच्या चक्रात अडकलेले असते. साक्षीभावामुळे आपण विचारांचे कर्ते न होता किंवा त्या विचारांचा भाग न होता केवळ ‘द्रष्टा’ (Observer) बनतो. जेव्हा आपण विचारांकडे त्रयस्थपणे पाहतो, तेव्हा गोंधळ कमी होतो आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते.

प्रतिक्रियेऐवजी प्रतिसाद द्यावा

​साधारणपणे आपण परिस्थितीला त्वरित ‘प्रतिक्रिया’ (Reaction) देतो, जी अनेकदा चुकीची असू शकते. साक्षीभावामुळे आपल्याला विचार करण्यासाठी काही वेळ मिळतो, ज्यामुळे आपण अधिक समंजसपणे ‘प्रतिसाद’ (Response) देऊ शकतो.

तणावमुक्ती होते (Stress Reduction)

​जीवनातील अनेक क्लेश हे ‘मी’ आणि ‘माझे’ या आसक्तीतून निर्माण होतात. साक्षीभाव आपल्याला हे शिकवतो की परिस्थिती येते आणि जाते, पण आपला मूळ स्वभाव (आत्मा किंवा चैतन्य) अपरिवर्तनीय आहे. ही जाणीव मनावरचा ताण हलका करते.

स्व-ओळख होते (Self-Realization)

​आपण म्हणजे केवळ आपले शरीर किंवा मन नाही, हे समजण्यासाठी साक्षीभाव हा पहिला टप्पा आहे. स्वतःच्या कृतींकडे आणि विचारांकडे तटस्थपणे पाहिल्याने आपल्याला आपल्यातील उणिवा आणि बलस्थाने स्पष्टपणे दिसू लागतात, ज्यामुळे आत्मविकासाची वाट सोपी होते.

​थोडक्यात आपण पडद्यावरचा सिनेमा पाहताना त्यातल्या सुख-दुःखाचा आनंद घेतो पण ते ‘सत्य’ नाही हे जाणून असतो, तसेच जीवनाच्या प्रवासात ‘साक्षी’ राहिल्याने आपण जीवनाचा समतोल न गमावता आनंद घेऊ शकतो.

एखाद्या गोष्टीकडे साक्षी भावाने बघणे म्हणजे तटस्थपणे, कोणताही पूर्वग्रह न ठेवता आणि स्वतःला त्या घटनेशी न गुंतवता केवळ एक ‘द्रष्टा’ म्हणून पाहणे. ही वृत्ती विकसित करण्यासाठी खालील काही गोष्टींचा सराव उपयुक्त ठरतो.

वर्तमानात राहणे (Mindfulness)

​जे घडत आहे, त्याकडे लक्ष द्यायचे. जेव्हा आपण भूतकाळात किंवा भविष्यात गुंतलेले असतो, तेव्हा आपण साक्षीभाव हरवून बसतो. म्हणून सध्याच्या क्षणी जे समोर आहे, त्यावर आपले पूर्ण लक्ष केंद्रित करावे.

विचारांपासून अलिप्तता ठेवणे

​मनात येणारे विचार म्हणजे ‘आपण’ नाही, हे समजून घ्यायचे. मनातील विचारांना एका वाहत्या नदीसारखे बघायचे. नदीच्या काठावर बसून पाणी वाहताना पाहणे म्हणजे साक्षीभाव. त्या पाण्यात उतरून वाहून जाणे म्हणजे विचारांत गुंतणे.

‘लेबल’ लावणे थांबवायचे.

​आपल्याला प्रत्येक गोष्टीला ‘चांगले’ किंवा ‘वाईट’ असे लेबल लावण्याची सवय असते. साक्षीभाव म्हणजे गोष्टी जशा आहेत तशाच स्वीकारणे. त्याबद्दल कोणतेही मत (Judgment) न बनवता केवळ त्यांचे अस्तित्व मान्य करणे.

श्वासावर लक्ष केंद्रित करणे.

​जेव्हा मन विचलित होते किंवा भावना अनावर होतात, तेव्हा आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचे. श्वास आत येणे आणि बाहेर जाणे हे केवळ पाहत राहिल्याने (किंवा श्वास मोजायचे). यामुळे

आपल्याला शरीराच्या आणि मनाच्या हालचालींकडे तटस्थपणे पाहण्याची सवय लागते.

‘मी’ पणाचा त्याग करायचा

​”हे माझ्यासोबत घडत आहे” ऐवजी “अशी एक घटना घडत आहे” असा विचार करण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा आपण स्वतःला केंद्रस्थानी ठेवतो, तेव्हा भावनांचा परिणाम जास्त होतो. स्वतःला त्या चौकटीतून बाहेर काढून एका प्रेक्षकाप्रमाणे (Observer) त्या घटनेकडे पहायचे. त्या साठी ​एक छोटा सराव रोज करायचा.

दिवसभरातून किमान ५ मिनिटे शांत बसायचे. आजूबाजूचे आवाज, शरीरातील संवेदना आणि मनात येणारे विचार यांना केवळ ओळखायचे. त्यांना बदलण्याचा किंवा थांबवण्याचा प्रयत्न करायचा नाही. हाच ‘साक्षीभाव’ आहे.

​हा सराव सातत्याने केल्यास कठीण प्रसंगातही मन शांत ठेवण्यास मदत होते.

साक्षीभाव जोपासणे या साठी ​आकाश आणि ढगांची गोष्ट खूप उपयुक्त वाटते. ​एका विस्तीर्ण आणि अथांग आकाशाची कल्पना करायाची. हे आकाश कायम स्थिर आणि शांत असते.

​आकाशाची स्थिती कायम बदलती असते.

कधी या आकाशामध्ये पांढरे शुभ्र, कापसासारखे सुंदर ढग येतात, तर कधी काळेकुट्ट आणि विजा कडाडणारे पावसाचे ढग येतात. कधी कधी खूप जोराचे वादळ येते, तर कधी कडक ऊन पडते.

आकाशाची भूमिका खूप महत्वाची असते.

ती अशी की, काळे ढग आले म्हणून आकाश ‘दुःखी’ होत नाही किंवा पांढरे ढग आले म्हणून ते ‘आनंदी’ होत नाही. पाऊस पडला तरी आकाश ओले होत नाही आणि ऊन पडले तरी आकाश जळून जात नाही. ढग येतात आणि निघून जातात, पण आकाश मात्र ‘जसे आहे तसे’ स्थिर राहते. आकाश केवळ त्या ढगांचा ‘साक्षी’ असते.

​या उदाहरणाचे आपल्या जीवनाशी नाते आहे असे नेहेमी वाटते.

​आकाश म्हणजे आपले मूळ स्वरूप (स्वत्व), जे कधीच बदलत नाही आणि कायम शांत असते.

​ढग म्हणजे आपले विचार आणि भावना! मनात येणारे रागाचे, आनंदाचे, दुःखाचे किंवा चिंतेचे विचार हे त्या ढगांसारखे आहेत. ते येतात आणि थोड्या वेळाने निघून जातात. हे बघून

​साक्षीभाव कसा जोपासायचा याची शिकवण मिळते.

जेव्हा मनामध्ये एखादा त्रासदायक विचार येईल, तेव्हा स्वतःला सांगायचे “मी हे विचार (ढग) नाही, मी तर हे विचार पाहणारे आकाश आहे. ” जेव्हा आपण स्वतःला विचारांपासून थोडे बाजूला करून ‘पहायला’ शिकतो, तेव्हा आपण त्या विचारांच्या प्रवाहात वाहून जात नाही. यालाच ‘साक्षीभाव’ म्हणतात.

सरावासाठी एक सोपी कृती करायची.

​दिवसभरात जेव्हा कधी तुम्हाला अस्वस्थ वाटेल, तेव्हा एक मिनिट डोळे मिटून असा विचार करायचा की, मन म्हणजे एक मोकळे आकाश आहे आणि आपले विचार त्यावरून तरंगत जाणारे ढग आहेत. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करायचा नाही किंवा त्यांच्यावर रागव्हायचे नाही. फक्त ते ढग जात आहेत हे पहात राहायचे.

​या शांतपणे पाहण्याच्या प्रक्रियेतूनच आपल्यामध्ये ‘साक्षीभाव’ विकसित होऊ लागेल.

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “चांगुलपणा अजूनही आहे.. म्हणूनच…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “चांगुलपणा अजूनही आहे.. म्हणूनच…” ☆ श्री मंगेश मधुकर

झालं असं की …

दिवसाची सुरवात पेपर वाचून करायची जुनी सवय,

आजकाल राजकारण, भ्रष्टाचार, खून, फसवाफसवी, बलात्कार असल्याच बातम्यांचा भरणा असतो. चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात. आजही तसंच जास्तीत जास्त नकारात्मक बातम्या. वाचून उदास वाटायला लागलं. मोबाईलवर सर्फिंग केलं त्याचाही कंटाळा आला. मूड फ्रेश करण्यासाठी घराबाहेर पडलो. मनात आलं भाजी घेऊन जाऊ. बायकोला सरप्राईज. मंडईत पोचल्यावर मोबाइल घरीच विसरल्याचं लक्षात आलं. नशीब पाकीटात थोडी कॅश होती. ताज्या हिरवेगार भाज्या बघून मस्त वाटलं. बघता बघता अडीचशे रुपयांची भाजी खरेदी झाली. माझ्याकडं दोनशेच होते. भाजीवाल्याला विनंती केली की पन्नास नंतर देतो.

“ऑनलाइन करा” भाजीवाला.

“मोबाइल सोबत नाहीये. इथं जवळच राहतो. घरी गेलो की लगेच पैसे पाठवतो. तुमच्याकडून बऱ्याचदा भाजी घेतलीये”

“असेल. सगळे पैसे द्या नाहीतर पन्नासची भाजी कमी करा. ”भाजीवाल्याचं अरेरावीचं बोलणं ऐकून डोकं सटकलं. सगळी भाजी परत केली. भाजीऐवजी फळं घेऊ म्हणून नेहमीच्या फळविक्रेत्याकडे गेलो.

“रामराम!! माऊली, या. !!”सत्तरीच्या मामांनी नेहमीसारखं प्रसन्न हसत स्वागत केलं.

“नमस्कार. मामा, ”मी प्रतिसाद दिला. सगळ्यांशीच मामा आपुलकीनं, प्रेमानं बोलतात म्हणूनच त्यांच्याकडे गर्दी असते. दोनशे रुपये डोक्यात ठेवून फळं घेतली. पैसे देऊन निघालो. तेव्हा मामांनी हाक मारली.

“माऊली, पैसे घेऊन जा”

“बरोबर दोनशे झाले की.. ” 

“बराबर हाय, तरिबी हे घ्या”मामांनी वीसची नोट हातात ठेवली.

“मामा, काय विशेष, एकदम डिस्काउंट” 

“मागच्या येळेला तुमी वीस रुपये जास्त दिलं व्हतं. ”

“कधी???”

“पंदरा दिस झालं असतील”

“एवढी साधी गोष्ट लक्षात ठेवलीत. मानलं तुम्हांला, ग्रेट!!. मला तर माहितीपण नव्हतं” 

“पण मला अन पांडुरंगाला माहित व्हतं ना. ” 

मामांचं ऐकून नि:शब्द झालो. एकाच दिवशी भाजीवाला आणि माळकरी मामा दोन टोकाचे अनुभव. दोन व्यक्ती आणि वृत्ती.

आजकाल जिथं तिथं स्वार्थ आणि व्यवहार पाहिला जाण्याऱ्या काळातही मामांसारखे लोक आहेत. ज्यांच्यामुळेच अजूनही चांगुलपणा शिल्लक आहे. त्यांच्या पुण्याईवरच जगरहाटी सुरू आहे. एवढं मात्र नक्की!! —

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ॥ बापाचं कातडं ॥ ☆ कावेरी सुतार ☆

कावेरी सुतार

? मनमंजुषेतून ?

☆ ॥ बापाचं कातडं ॥ ☆ कावेरी सुतार ☆

स्वतःची फाटकी चप्पल तो, वर्षानुवर्षे शिवतो, पण मुलांच्या पायात काटा टोचू नये, म्हणून तो झिजतो.

बाप म्हणजे एक वडाचं झाड, जो ऊन स्वतःवर सोसतो, आणि आपल्या पिल्लांना मात्र, सावलीत सुखात हसवतो.

निसटला जरी काळ, तरी तो कधीच थकत नाही, बाप नावाचा हा पर्वत, कुणासमोर कधी झुकत नाही…

पोराची फी भरण्यासाठी, तो लोकांपुढे हात पसरतो, पण पोरासमोर येताना मात्र, तो राजा होऊन वावरतो.

त्याच्या ताठ मानेमागे, किती अपमान लपलेले असतात, हे फक्त त्याच्या देवाला अन्, त्याच्या काळजाला ठाऊक असतात.

मुलगी सासरी जाताना, तो कोपऱ्यात जाऊन रडतो, पण जगासमोर मात्र, तो पुन्हा खंबीर होऊन उभा राहतो.

त्याला हवं असतं फक्त, आपल्या माणसांचं भरलेलं घर, त्यासाठी तो रक्ताचं पाणी करतो, आयुष्यभर छतावर.

बाप म्हणजे फक्त शिस्त नाही, त्यात प्रेमाचा झरा असतो …

ऊर फाटेपर्यंत राबणारा, तो घराचा खरा हिरा असतो…

मुलांना वाटतं.. बापाला आपल्या स्वप्नांची काय किंमत?

….. पण बापानेच दिलेली असते, त्या स्वप्नांना खरी हिम्मत.

…… तो गेल्यावर कळतं की, छप्पर कसं असतं डोक्यावरचं …

……… आणि बाप असल्याशिवाय नसतं महत्त्व, त्या सोन्याच्या घराचं !

© कावेरी सुतार

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३९ आणि ४० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३९ आणि ४० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ३९ – – 

जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे |

जयाचेनि योगे समाधान बाणे|

तयालागी हे सर्व चांचल्य दीजे |

मना सज्जना राघवी वस्ती कीजे|३९|

अर्थ : ज्या परमेश्वराचे वर्णन वेद, शास्त्रे आणि पुराणे करतात, ज्याच्या जवळ गेल्याने आपल्याला अक्षय समाधान लाभते, अशा परमेश्वराला आपल्या मनातील सर्व प्रकारची चंचलता अर्पण करावी. मनाने त्याचेच होऊन राहावे.

विवेचन : माणूस आयुष्यभर सुखाच्या पाठी धावत असतो परंतु एवढी धावपळ करूनही आयुष्याच्या अखेरीपर्यंत त्याला ते गवसत नाही. आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी देखील समाधानाचा शोध घेतला अखेरीस त्यांना ते भगवंताच्या ठिकाणीच आहे असे आढळून आले. त्याचेच वर्णन आपले वेद, शास्त्रे आणि पुराणे करतात. म्हणून समर्थ देखील आपल्याला सांगतात की जयाचेनि योगे समाधान बाणे. त्याचा योग म्हणजे संबंध आला की अंगी समाधान बाणते म्हणजे त्याची प्रचिती येते.

संत तुकाराम महाराज म्हणतात, “ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ” हे आपल्याला कळते पण वळत नाही आणि आपला सुखाचा आणि समाधानाचा शोध सुरूच राहतो. प्रत्येक परिस्थितीत आपली सुखाची आणि समाधानाची व्याख्या बदलत जाते. मला नोकरी लागली म्हणजे मी सुखी होईल, माझ्या पगारात वाढ झाली म्हणजे मी सुखी होईल, माझ्याकडे आज चार चाकी आहे, उद्या त्यापेक्षा आणखी चांगल्या प्रकारचे वाहन आले म्हणजे मला समाधान लाभेल. आणखी जमीन, आणखी घरे, बंगले यासारख्या गोष्टी माणूस मिळवण्यासाठी माणूस धडपड करतो आणि त्यासाठी आयुष्यभर धाव धाव धावतो. परंतु त्याची हाव संपत नाही. कुठे थांबायचे हे त्याला कळत नाही.

एका शेतकऱ्याची गोष्ट फार सुंदर आहे. तो आपल्या शेताच्या बांधावर आरामात झोपला होता. त्याची एका मोक्याच्या ठिकाणी शेतजमीन होती. शहरातून आलेला एक कारखानदार ती जमीन विकत घेऊन तिथे कारखाना काढण्याच्या तयारीत होता. तो त्या शेतकऱ्याला म्हणाला, “तू मला ही जमीन दिलीस तर मी तुला भरपूर पैसे देईन. तू श्रीमंत होशील. ” शेतकऱ्यांनी विचारले, ” भरपूर पैसे मिळाल्यावर आणि श्रीमंत झाल्यावर काय होईल ?” जमीनदार म्हणाला, ” वेडा आहेस का ?अरे तू अत्यंत समाधानात राहशील. ” शेतकरी म्हणायला, ” मग त्यासाठी जमीन विकायची काय गरज आहे ? मी आत्ता देखील समाधानीच आहे. ” एका सामान्य शेतकऱ्याला जी गोष्ट कळली ती आपल्याला कळत नाही.

परमेश्वर प्राप्तीच्या आड जर काही येत असेल तर ते म्हणजे आपले मन ! आपले मन अतिशय चंचल आहे आणि ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून तर एका गाण्यात म्हटले आहे, ” माझिया मना जरा जरा थांब ना, तुझे धावणे अन् मला वेदना !” म्हणून समर्थ म्हणतात की आपले हे चांचल्य म्हणजे चंचलता भगवंताला अर्पण करून आपली चित्त त्याच्याकडे केंद्रित करावे. त्याचे ध्यान लागावे.

गीतेत भगवंत म्हणतात ” सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ” सर्वधर्म म्हणजे आपली सुखदुःखे, कर्म, वासना आदी सगळे भगवंताला अर्पण करून त्याला शरण जावे. तो आनंदनिधान आहे. अक्षय सुख आणि समाधान त्याच्याच ठायी आहे.

स्वसंवाद :: 

१) मी ज्या सुखाच्या शोधात धावत आहे, ते खरोखरच मला समाधान देणारे आहे का? की ही केवळ अंतहीन धावपळ आहे?

२) माझ्या मनातील चंचलता, अपेक्षा आणि असंतोष मी कधी परमेश्वराला अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे का?

३) “समाधान” ही बाह्य गोष्टींमध्ये नसून अंतर्मनात आहे हे मला खरेच पटले आहे का? (क्रमशः)

– – – – 

श्लोक क्र. ४० – – 

मना पाविजे सर्वही सुख जेथे ।

अती आदरे ठेविजे लक्ष तेथे ।

विवेके कुडी कल्पना पालटीजे ।

मना सज्जना राघवी वस्ती कीजे ।४०।

अर्थ :  समर्थ आपल्या मनाला सांगतात की हे मना, सर्व सुखे जिथे प्राप्त होतात अशा त्या परमेश्वराकडे अतीव अशा आदराने आपले लक्ष केंद्रित कर. योग्य अयोग्यतेचा विचार करून वाईट विचारांचा/कल्पनांचा त्याग कर आणि राघवाच्या ठिकाणी आपले मन असू दे.

विवेचन : आधीच्या श्लोकात आपण पाहिले की सुखाची आणि समाधानाची प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असते. कोणाला पैसा हवा असतो, कोणाला यश तर कोणाला कीर्ती तर कोणाला आणखी काही… माणूस क्षणिक मोहाला बळी पडतो आणि त्या सुखाच्या मागे धावतो परंतु अंतिमतः सुखाऐवजी दुःखच पदरात पडते. क्षणकाल टिकणाऱ्या सुखासाठी आपण फार मोठी किंमत मोजून दुःख पदरात घेतो.

काम, क्रोध, लोभ, मोह यासारख्या विकारांनी मन दूषित होते. असे मन आणखी वाईट विचारांना जन्म देते. माणसाची दिवसेंदिवस अधोगती होत जाते. ज्याप्रमाणे गढूळ पाण्यात आपल्याला प्रतिबिंब दिसत नाही तसेच नाना प्रकारच्या विकारांनी दूषित झालेल्या मनात भगवंताचे प्रतिबिंब पडणे शक्य नसते. म्हणूनच अशा वाईट विचारांचा विवेकपूर्वक त्याग करणे आवश्यक असते. कुडी कल्पना म्हणजे वाईट विचार. ज्या गोष्टी किंवा जे विचार भगवंतापासन दूर नेतात, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे कुडी कल्पना असे म्हणता येईल. म्हणून तर “सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तोचि तो मानवी धन्य होतो” हे समर्थांनी सुरुवातीलाच आपल्याला सांगितले आहे.

एखाद्या विद्वत् सभेत जर विद्वानांना एखाद्या विषयावर त्यांचे मत विचारले तर प्रत्येकाची वेगवेगळी मते येतील. तात्पर्य त्यांच्यामध्ये एकाच विषयावर एकवाक्यता नसते. पण जर सर्व खऱ्या संतांचा (भोंदू बाबा नव्हे) मेळा भरला आणि त्यांना जर अंतिम सुख आणि समाधान कशात आहे हे विचारले तर त्या विषयावर त्यांचे एकमत होईल, एकवाक्यता असेल आणि एका सुरात “भगवंत” असेच उत्तर त्यांच्याकडून येईल.

संत हे ईश्वराचे प्रतिनिधी असतात नव्हे ईश्वर स्वरूपच असतात. परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग ते आपल्याला दाखवतात. त्यांना लोकांच्या कल्याणाची तळमळ असते. जर अशा सर्व संतांचे अंतिम समाधान हे भगवंताच्या ठायी आहे असे एकमत असेल तर आपण ते का स्वीकारू नये ? 

क्षणिक सुखाच्या मागे लागण्यापेक्षा मग संत सांगतात तो मार्ग का स्वीकारू नये ? पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे.. असे संत चोखामेळा आपल्याला सांगतात. तर देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या… असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. संतांचे हे सांगणे आपण लक्षात घ्यायचे नाही का? थोडा विचार केला म्हणजेच विवेकाने वागायचं ठरवलं तर ही गोष्ट आपल्याला पटेल. म्हणून संतांचे सांगणे शिरोधार्य मानून आपण विवेकाने वाईट विचारांचा त्याग करावा आणि राघवाकडे आपले मन लावावे.

स्वसंवाद :: 

१) माझे मन गढूळ आहे की स्वच्छ – आज माझ्या मनात कोणते विचार जास्त असतात, चांगले की वाईट ?

२) विद्वान आणि संत यांच्यात फरक आहे – मी माझ्या जीवनात कोणाचे मार्गदर्शन घेतो, बुद्धीचे की श्रद्धेचे ?

३) “विवेके कुडी कल्पना पालटीजे” – आज मी कोणत्या एका वाईट विचाराचा किंवा सवयीचा विवेकाने त्याग करण्यास तयार आहे ?

४) संत चोखामेळा, ज्ञानेश्वर, तुकाराम सर्वांनी एकमताने भगवंत हेच अंतिम सुख सांगितले – हे माझ्या मनाने खरोखर स्वीकारले आहे का ?

– क्रमशः श्लोक ३९ आणि ४०.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आधुनिक संताजीराव… धनाजीराव…” – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“आधुनिक संताजीराव… धनाजीराव… – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके 

कश्यप साहेब आणि कौशलेन्द्र साहेब

 २१, स्पेशल फोर्सेसची दोन वाघनखं ! 

(धन्यवाद, कश्यप साहेब, धन्यवाद कौशलेन्द्र साहेब! बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय! २१, स्पेशल फोर्सेसची दोन वाघनखं! आधुनिक संताजीराव-धनाजीराव!) 

इथून पुढे – – 

युद्ध कथा रम्य असतात, हे खरेच आहे. पूर्वीची युद्धं आणि आधुनिक जगातील युद्धं यांत जमीन-आस्मानाचा फरक आहे, हेही तेवढंच खरे आहे. राजे-रजवाड्यांच्या काळात सैन्य एकमेकांवर चालून जाई, मोकळ्या मैदानात जणू एखादा खेळ खेळावा, तशी युद्धं लढली जात. पुढे दोन देशांमधील युद्ध म्हणजे एका देशाने दुस-या देशाची सीमा ओलांडून तो देश काबीज करणे. विमानांच्या वापराने ही आक्रमणे अधिक खोलवर आणि धारदार होत गेली. भारत-पाकिस्तान यांच्यात झालेली युद्धंही याला अपवाद ठरली नाहीत. परंतू १९८० च्या दशकापासून भारताचे अभिन्न अंग असलेल्या जम्मू-काश्मीर राज्यात भारतीय सैन्याला पाकिस्तानी, अफगाणिस्तानी घुसखोर भाडोत्री सैनिक आणि स्थानिक अतिरेकी यांचा सामना खूप मोठ्या प्रमाणात करावा लागला… आणि आजही हीच परिस्थिती आहे. अर्थातच हे पारंपारिक युद्ध नाही. त्यामुळे आपले सैनिक या भागांत नेमक्या कोणत्या परिस्थितीला सामोरं जात आहेत, हे जनतेला माहीत असणे गरजेचे होते. पण जनतेला ही माहिती होण्याचे मोजकेच स्रोत होते. एक चित्रपट आणि दुसरा स्रोत म्हणजे पुस्तके… जी बहुतेक वेळा इंग्रजी भाषेत लिहिलेली असतात. या स्रोतांच्या मर्यादांमुळे नेमके चित्र उभे राहत होतेच असे नाही.

पण विडीओ मुलाखती, खाजगी वाहिन्या यांमुळे प्रत्यक्ष संबंधित व्यक्तींच्या तोंडून युद्धाची वर्णने ऐकून परिस्थिती ब-यापैकी स्पष्टपणे समजून घेता येते आहे.

युद्धकथा समाजाला आवडतात. त्यामुळे हल्ली त्या मोठ्या प्रमाणावर सांगितल्या जात आहेत. यांतून तरुणांना प्रेरणा मिळते, ही चांगली गोष्ट आहे. पण याचे व्यापारीकरणही मोठ्या प्रमाणावर झालेले दिसते. पण त्याला इलाज नाही. मुलाखती घेणारे या क्षेत्राशी संबंधित असण्याचे प्रमाणही पूर्वी कमी होते. त्यामुळे अनेकवेळा हास्यापद प्रश्न विचारले जात. पण प्रत्यक्ष युद्धात, मोहिमांमध्ये सहभागी होऊन शौर्य गाजवलेले काही लोक या क्षेत्रात आलेले आहेत, हे खूप छान होते आहे. यांत भारतीय सैन्यातील काही सेवानिवृत्त अधिकारी आहेत. यांत सर्वांत प्रभावी काम दिसते आहे ते The Monks And The Warriors हे podcast चालवणा-या दोघां तरुण, शूर आणि अनुभवी निवृत्त लष्करी अधिका-यांचे! 

यातील एक आहेत कर्नल कौशल कश्यप (निवृत्त), शौर्य चक्र विजेता आणि दुसरे आहेत लेफ्ट. कर्नल कौशलेन्द्र सिंग (निवृत्त) सेना मेडल विजेते. कर्नल कौशल कश्यप साहेबांनी मणिपूरमध्ये अनेक अतिरेकी ठार मारले… त्यासाठी त्यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले होते. तर लेफ्ट. कर्नल कौशलेन्द्र सिंग यांनी सहा सहा दिवस जंगलातून पायी प्रवास करीत अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. हे दोघेही MARATHA LIGHT INFANTRY मधून निर्माण केल्या गेलेल्या 21, PARA SPECIAL FORCES या सैन्यविभागाचे मोठे शूर अधिकारी. यांनी निवृत्तीनंतर सेनेतील अधिकारी, सैनिक यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन त्या PODCASTच्या माध्यामातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य सुरु केले आहे.

नुकतीच या जोडगोळीने 7 PARA SF चे ब्रिगेडीअर निलेश भानोट (सेवानिवृत्त) साहेबांची अतिशय रोमांचक मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीच्या आरंभी त्यांनी एक विशेष कृती करून त्यांच्यातल्या जिवंत सैनिकांची जणू ओळखच करून दिली.

२१, स्पेशल फोर्सेस वाघनख दलाचे आराध्य दैवत म्हणजे आपल्या सर्वांचे भाग्यविधाते छत्रपती श्री शिवाजी महाराज साहेब. शिवरायांनी अफझल खानास मातीत घालण्यासाठी वापरलेलं वाघनख हे हत्यार या दलाचे चिन्ह म्हणून स्वीकारले गेले आहे. हे चिन्ह स्वीकारले जावे यासाठी कर्नल व्ही. बी. शिंदे (निवृत्त) साहेबांनी अतोनात कष्ट घेतले आहेत. त्यांच्याच प्रयत्नांमुळे शिवरायांचा अश्वारूढ पण अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पुतळा आसाममध्ये स्थापित झाला आहे. हा पूर्णाकृती पुतळा पुण्यातील श्री. विराज खटावकर (शिल्पकार) यांनी बनवून दिला आहे. आणि पुण्यातून आसामपर्यंत या पुतळ्याचा गौरवशाली प्रवासही प्रसिद्ध झाला आहे.

कर्नल विश्वासराव भास्करराव शिंदे साहेबांनी MARATHA LIGHT INFANTRY तून २१ स्पेशल फोर्सेसची निर्मिती करताना देशासाठी मोठे योगदान दिले. या स्पेशल सैनिकांनी मणिपूर आणि संबंधित राज्यांत खूप मोलाची कामगिरी बजावली आहे. पण देशाला याबाबत फारशी माहिती आहे, असे दिसत नाही. कारण जम्मू-कश्मीर, चीन सीमा यांबाबत जास्त लिहिले, बोलले जाते. असो.

कर्नल कौशल कश्यप (निवृत्त), शौर्य चक्र विजेता आणि लेफ्ट. कर्नल कौशलेन्द्र सिंग (निवृत्त) सेना मेडल विजेते यांनी त्यांच्या स्टुडीओमध्ये ठेवण्यासाठी शिवरायांची एक प्रतिमा खास बनवून घेतली आहे. या PODCAST ची सुरुवात करताना भानोत साहेबांसारख्या वीर अधिका-याच्या हस्ते महाराजांच्या या अर्धाकृती पुतळ्याचे साधेसे, औपचारिक अनावारण करून घेतले व महाराजांना पुष्पे अर्पण केली. त्यांची ही कृती आपल्यासाठीही खूप अभिमानास्पद ठरावी. याप्रसंगी त्यांनी थोडक्यात शिवरायांची महती सांगितली जी ऐकण्यासारखीच आहे. महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर असलेल्या आसाममध्ये कार्यरत सैनिकांनी आपल्या महाराजांच्या शिकवणुकीचा अंगीकार करीत देशाच्या शत्रूला नामोहरम केले… गनिमी कावा वापरीत मोठा पराक्रम गाजवला… हे किती विशेष आहे.

अतिशयोक्तीचा दोष स्वीकारून असे म्हणावेसे वाटते की, कश्यप साहेब आणि कौशलेन्द्र साहेब हे दोघे अधिकारी जणू स्वराज्याचे संताजीराव-धनाजीराव म्हणूनच कार्य करत आहेत. हे कार्य सैनिकांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आहे. हे दोघे ज्यांना सैन्यात भरती व्हायचे आहे, त्यांना मार्गदर्शनही करतात. अत्यंत उत्तम व्यक्तिमत्व लाभलेले हे अधिकारी इतरांच्या मुलाखती घेताना स्वत:च्या अनुभवाच्या जोरावर नेमके प्रश्न विचारत वक्त्यांना बोलते करतात, त्यांचा योग्य तो सन्मान राखतात. हे काम अतिशय महत्त्वाचे आणि अभिनंदनीय असेच आहे. तरुणांनी THE MONKS AND WARRIORS VIDEO PODCST जो YOUTUBE वर दिसतो, तो जरूर पहावा… प्रेरणादायी आहे.

खरं तर भारतीय सैन्यदलाने स्वत:ची अशी खास PODCASTS केली पाहिजेत. यासाठी या दोघा अधिका-यांची मदत घेता येईल. कारण सैन्याची बाजूही जनतेला प्रभावीरीत्या समजली पाहिजे.

मी यांच्यापासून प्रेरणा आणि माहिती घेऊन सैन्यकथा दर रविवारी लिहिण्याचा उपक्रम सुरु केला आहे. मराठीत सुद्धा असे PODCAST होणे गरजेचे आहे… फक्त व्यावसायिकीकारण टाळले गेले पाहिजे. महाराष्ट्रात तर सैन्यकथांची अजिबात वानवा नाही.

धन्यवाद, कश्यप साहेब, धन्यवाद कौशलेन्द्र साहेब! बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय! हे प्रभू, ऐसा वर दे मोहें, विजय मिले या वीरगती… जय हिंद! 

समाप्त 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ पुत्रसुख…! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी ☆

शीतल कुलकर्णी

📖 वाचताना वेचलेले 📖

पुत्रसुख…! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी 

कंडक्टरनं एस.टी.चं दार उघडलं. आणि सामंतकाका दारापाशी आले. हातात एक गोंडस बाल गणेशाची मूर्ती… कंडक्टरनं ते पाहिलं आणि काकांना आधार देत आत घेतलं. मागून दोन पॅसेंजर चढले..! एस.टी.सुरु झाली. कंडक्टरनं ड्राईव्हरला ओरडून सांगितलं, ” थांबा जरा ..गणपती मूर्ती आहे….!” त्यानं गाडी थांबवली. लोकांनी मागे वळून मूर्तीकडं पाहिलं. ते गोंडस रुप पाहून काही जणांचे हात नकळत जोडले गेले.

कंडक्टरनं शेवटी सामंतकाकांना आपल्या शेजारी बसायला सांगितलं. डबलबेल दिली. एस.टी.सुरु झाली..! कंडक्टर इतरांची तिकीटं काढून येऊन काकांपाशी बसला…!

काकांच्या पँटच्या खिशात पैसे होते. पण मांडीवर मूर्ती असताना त्यांना पैसे काढता येईनात तिकीटासाठी. त्यांची ती धडपड पाहून कंडक्टर म्हणाला, “राहू दे काका. उतरतांना द्या. एस.टी. थांबवून माझ्या या सीटवर मूर्ती ठेवू. तेव्हा द्या.”

थोडं अंतर जाताच कंडक्टरनं विचारलं, “काका, एक विचारू? तुमच्या गावात गणेशमूर्ती मिळत असेलच नं? मग दुस-या गावांतून ही घेऊन येणं ; तेही एस.टी.च्या प्रवासाची दगदग करुन? “

सामंतकाकांनी स्मित केलं..मग म्हणाले, “आमच्या गावात मिळतात मूर्त्या. पण अशी नाही. ही मूर्ती पाहिलीत नं? कशी गोंडस आहे? जिवंत वाटते. अगदी लहान बाळच..!”

कंडक्टरनं होकारार्थी मान हलवली व अगदी अंत:करणापासून पुन्हा हात जोडले. हलकेच स्पर्शही केला. ” आम्हा नवरा-बायकोला मूलबाळ नाही. सगळे उपाय करुन थकलो. मग प्रारब्ध म्हणून सोडून दिलं. माझी पत्नी या गावी पंधरा वर्षांपूर्वी आली होती कामानिमित्त. तिनं अशी मूर्ती तिथं पाहिली अन् तिचं वात्सल्य जागं झालं जणू काही… तिचे डोळे भरून वाहू लागले. तोंडातून नकळत शब्द फुटले, “माझं बाळ…! “

हे असं घडल्यापासून ह्या गावातून मूर्ती नेणं हा प्रघात सुरु झाला. हिला सांधेदुखीनं आता प्रवास झेपत नाही. म्हणून मी आणतो. “

कंडक्टर हे ऐकून स्तिमित झाला. थोड्या वेळानं त्यानं विचारलं ” पण काका, तुमच्या तिथं दाखवून घ्यायची, मोल्ड बनवून गावात ..”

” तेही केलं पण… जास्त मूर्ती केल्या तरच त्यांना इंटरेस्ट.. आणि असे भाव येतीलच,याची शाश्वती नाही.”

हे संभाषण एव्हाना आजूबाजूचे ऐकत होते. एका स्त्रीनं विचारलं, “काका, मग विसर्जित करायचीच नाही मूर्ती ..!”

सामंतकाका फिकटसे हसले व म्हणाले,”विरहामुळं प्रेम उदंड पाझरतं तिचं..! आत्ताही दारात वाट पहात बसली असेल. रांगोळी काय, आंब्याची तोरणं काय..! भाकरतुकडा काय.., दृष्ट काढण्यासाठी ..! त्याच्या कपड्यांची छोटी बॅग आहे. छोटा तांब्या भांडं ….काय विचारू नका.. मला तिचं ते सुख हिरावून घ्यायचं नाहीए. “

यावर कुणाचे डोळे पाणावले. कुणी स्मित केले. नंतर मौन राहिलं. काकांचं गाव आलं. एका व्यक्तीनं पुढं होऊन मूर्ती हातात घेतली. म्हणाला “काका, तुम्ही तिकीट काढा. तोपर्यंत धरतो मी..” काहीजण त्या मूर्तीकडं जवळून पहात राहिले. आता लोकांची नजरच बदललेली….! सामंतकाकांनी कंडक्टरला पैसे दिले, “दीड तिकिट द्या. एक हाफ आणि एक फुल “

कंडक्टरनं आश्चर्यानं विचारलं ” दीड ? तुम्ही तर एकटेच आला आहात नं? “

काकांनी स्मित केलं, “दोघं नाही का आलो? मी आणि हा बालगणेश आमचा? “

हे ऐकून सगळे एकमेकांकडं पाहू लागले..!

काका म्हणाले, “असे कोड्यात का पडलात बरे? त्याला नमस्कार केलात. त्याला आपला देव मानता.. व प्राणप्रतिष्ठेपूर्वी तो केवळ माती आहे का हो? तो आपल्यापेक्षा जास्त जिवंत नाहीए? तुमचा भाव जागृत झाला नं? आपणच त्याला मातीची मूर्ती याच भावाने भजतो; पूजतो.. अगदी पूजा केल्यावरही …

पण त्याला एकाचीच गरज प्रेमाची.. आपल्या आलिंगनाची .. द्या दीड तिकिट..!” हे बोलताना काकांचा गळा दाटून आला होता. कंडक्टरनं दीड तिकीट दिलं..!

सामंतकाका जेव्हा एस.टी.तून उतरले तेव्हा एस.टी.तील प्रवाशांचे डोळे पाणावलेले व हात जोडले गेलेले….. अगदी अनाहूतपणे …!

 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : शीतल कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ पेन्शन हिच आयुष्याची ‘एव्हरग्रीन’ नायिका!… # ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

? प्रतिमेच्या पलिकडले ?

पेन्शन हिच आयुष्याची एव्हरग्रीननायिका!… # ☆ नीलांबरी शिर्के 

जेव्हा केसांत चांदणं उतरू लागतं, गुडघ्यांच्या हालचालीत संगीताची मैफल भरते आणि चष्म्याशिवाय जग ‘धुसर’ भासू लागतं…

नेमक्या त्याच वळणावर एक निष्ठवान नायिका खंबीरपणे हात धरते.

तिचं नाव – पेन्शन‘!

अढळ निष्ठा

पगार ही केवळ तारुण्यातील एक ‘चंचल प्रेयसी’ होती, पण पेन्शन मात्र उत्तरार्धातील खरी ‘हक्काची अर्धांगिनी’ आहे.

विनाअट साथ

ना तिला नखरे ठाऊक आहेत, ना रुसवा-फुगवा. ती कधी तारीख चुकवत नाही की कधी ‘ब्रेकअप’चा विचारही करत नाही.

सुखद सोबत

संध्याकाळच्या वाफाळलेल्या चहाच्या सोबतीने ती दर महिन्याला कानात सांगते – “घाबरू नकोस हिरो, चित्रपट संपेपर्यंत मी तुझ्या खांद्याला खांदा लावून उभी आहे!”

आयुष्याचा हा प्रवास ‘हनीमून’सारखा गोड आणि निश्चिंत ठेवणाऱ्या या लाडक्या महबूबेसाठी, दर नोव्हेंबरला आपल्याला फक्त एकाच गोष्टीची साक्ष द्यावी लागते…

“टायगर अभी जिंदा है!”

सर्व पेन्शनधारकांना समर्पित!

© नीलांबरी शिर्के

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – २० ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – २० ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

दुर्जन निंदा – (२) ~पाखंडी लोक

मागील भागात तुकाराम महाराजांनी किती बीभत्स शब्दांत दुर्जनांची त्यांच्या अभंगातून निर्भत्सना केली आहे, हे आपण पाहिले. याही भागात आणखी काही अभंगांद्वारे तुकारामांचे अशा लोकांविषयीचे मत जाणून घेऊया, कारण दुर्जन निरनिराळ्या प्रकारचे असू शकतात. पाखंडी, म्हणजे वरवर दाखवायला सज्जन, भक्तीचे उपासक परंतु मनाने अत्यंत नीच अशा लोकांचा तुकाराम महाराजांना फार संताप आहे. त्यांच्याविषयी तुकाराम महाराज काय म्हणतात ते आपण आज त्यांच्या अभंगांतून पाहूया…

भक्तीचे सोंग करणाऱ्या ढोंगी माणसांविषयी या अभंगात महाराज म्हणतात,

 न ये नेत्रा जळ/ नाही अंतरी कळवळ/

 तो हे चावटीचे बोल/ जन रंजवणे फोल//

 न फळे उत्तर/ नाही स्वामी जो सादर/

 तुका म्हणे भेटी/ जंव नाही दृष्टादृष्टी//

ज्याच्या डोळ्यात भावभक्तीच्या पाण्याचा टिपूस नाही, आणि जोपर्यंत अंतरंगात हरी विषयी कळवळा नाही, तोपर्यंत त्याच्या भक्ती विषयी भारलेल्या सर्व गप्पा पोकळ आणि फक्त करमणूक करणाऱ्या असतील. स्वामींची कृपा असल्याशिवाय ते अभक्ताला कधीही भेटणार नाहीत. वरवरची प्रार्थना केवळ पोकळ आहे.

ढोंगी भक्तांविषयी या अभंगात महाराजांनी उदाहरणे देऊन स्पष्टीकरण केले आहे.

 टिळे माळा मैद मुद्रा लावी अंगी/

 देखो नेदी जगी फासे जैसे//

 धीवर या मत्स्या/ चारा घाली जैसा/

 भीतरील फासा /कळो नेदी //

 खाटीक हा स्नेह वादे पशु पाळी /

 कापावया नळी तयासाठी//

 तुका म्हणे तैसा भला मी लोकात/

 परी तू कृपावंत पांडुरंग//

जो बहुरूपी असतो तो त्याचे वरचे सोंग पालटतो आणि मासा पकडण्यासाठी बगळ्यासारखा ध्यानस्थ बसतो. त्याचप्रमाणे मैद म्हणजे ढोंगी लोक स्वतःला भक्त म्हणविणारे, कपाळावर सतरा टिळे लावतो, गळ्यात कसल्या कसल्या माळा घालतो, नामाच्या मुद्रा कोरून लावतो आणि जगाला लुटण्याचे त्याचे आतील बेत कळू देत नाही. या लोकांची जात जशी काही फासेपारध्यांसारखीच असते. गळाला काहीसे आमीष लावून मासे अडकविण्याचा हा प्रकार आहे. खाटीक बोकड पाळून त्याला धष्टपुष्ट करतो आणि नंतर त्यास कापतो. अभक्त मंडळी याहून वेगळी नसतात, असे तुकारामांचे स्पष्ट मत आहे.

पाखंडी लोकांना महाराज सतत सांगत आहेत की तुम्ही अनुभवावाचून बडबड करणे थांबवा. ही तुमची बडबड म्हणजे बाळंत न होता बाळंतीणीप्रमाणे स्वतःवर सर्व सोपस्कार करून घेणे आहे.

 व्याल्याविण करी शोभून तातडी/

 चार ते गधडी करीतसे//

अशा लोकांना ते गधडी म्हणतात. (बिनडोक)

 काही नित्यनेमाविण/ अन्न खाय तो श्वान/

 वाया मनुष्यपण/ भार वाहे तो वृषभ//

 त्याचा होय भूमी भार/ नेणे जातीचा आचार//*

 जाला दावेदार/ भोगवी अघोर पितरासी//

 अखंड अशुभवाणी / खरे नच बोले स्वप्नी//

 पापी तयाहुनी नाही/ आणिक दुसरा//

 पोट पोसी एकला/ भूती दया नाही ज्याला/

 पाठी लागे आल्या/ अतिताचे द्वारेशी//

 काही संतांचे पूजन/ न घडे तीर्थाचे भ्रमण//

 यमाचा आंदण/ सीण थोर पावेल//

 तुका म्हणे त्यांणी/ मनुष्यपणा केली हाणी//

 देवा विसरूनी/ गेली म्हणती मी माझे//

वरील अभंगात तुकाराम महाराजांनी अभक्त लोकांचे वर्णन केले आहे. भोजनाआधी देवपूजा करणे, गीता, विष्णुसहस्त्रनाम किंवा जप जाप्य करणे असा काही नियम जो पाळत नाही, तो मनुष्य कुत्र्यासमान आहे. मनुष्यपणाचा तो व्यर्थ भार वाहतो. खरंतर तो बैलच म्हणावा. अशा माणसाचा भूमीला केवळ भार आहे. आपल्या पितरांचा तो केवळ दावेदार आहे, कारण तो त्याच्या कुकर्माने त्यांना नरक भोगवितो. त्याची वाणी अशुभ आहे, स्वप्नातही त्याला खरे बोलता येत नाही. फक्त स्वतःपुरता विचार करून दारी आलेल्या अतिथीला तो हाकलून देतो. कधी संतांचे पूजन करीत नाही, की तीर्थाटन करीत नाही. असे लोक म्हणजे मनुष्यपणाची केवळ हानीच आहेत.

तुकाराम महाराजांना पाखंडी, (स्वतःला हरीचे दास म्हणणारे, ज्ञानी समजणारे) लोकांचा अनुभव फार जवळून मिळाला. अशा लोकांविषयी त्यांचे एक ठाम मत बनले, ते या अभंगातून आपण पाहूया.

 अतिवादी लावी/ एका बोट सोंग दावी/

 त्याचा बहुरूपी नट/ नव्हे वैष्णव तो चाट//

 प्रतिपादी वाळी/ एका पूजी एका छळी/

 तुका म्हणे नाही/ भूतदया ज्याचे ठायी //

एक मनुष्य कपाळाला काळी रेघ लावून आपण वैष्णव आहोत असे सांगत सुटतो. वादविवादही करतो, परंतु तो खरा वैष्णव नव्हे. तो वेशधारी बहुरूपी आणि खोटा आहे. तो एकाची स्तुती करतो तर दुसऱ्याचा धिक्कार करतो, आणि एकाला पूजनीय मानतो व दुसऱ्याला छळतो. खरे वैष्णव तर सर्वांशी समान वागतात. ते भूतदयेने परिपूर्ण असतात. या पाखंडी लोकांच्या ठायी भूतदया जराही नसते.

ढोंगी लोकांना तुकाराम महाराज रोखठोक बोलण्यास मागेपुढे पाहत नाहीत, त्याचे उदाहरण म्हणजे हा खालील अभंग…

 जाऊनिया तीर्थ/ काय तुवा केले/

 चर्म प्रक्षाळीले/ वरी वरी//

 अंतरीचे शुद्ध कासयाने झाले/

 भूषण ते केले आपणया//

 वृंदावन फळ घोळले साकरा/

 भीतरील थारा मोडेची ना//

 तुका म्हणे नाही शांती क्षमा दया/

 तोवरी कासया फुंदा तुम्ही //

ते म्हणतात, ” अरे ढोंगी माणसा, तू तीर्थास जाऊन केलेस काय? तर तुझ्या चामड्याचे प्रक्षा लन केलेस, तुझे कातडे फक्त पाण्यात भिजवलेस. तुझ्या अंतराचे काय? कडू वृंदावन फळ साखरेत किती घोळले तरी त्याचा उपजत कडूपणा जात नाही, तुझे तसेच आहे. तीर्थ स्नान करून तुझ्या मनाचे मालीन्य कसे जाणार? जोपर्यंत तुझ्या ठिकाणी दया, क्षमा, शांती या भावना नाहीत तोपर्यंत तुम्ही हरीचे दास म्हणून गर्वाने फुलून जाऊ नका. “

तुकाराम महाराजांना खऱ्या भक्तीचा अर्थ म्हणजे मानवता, भूतदया, अंतःकरणाची शुद्धता हेच सामान्यांना सांगायचे आहे असे मला वाटते. तो खरा हरीचा दास आहे, त्यालाच माऊली आपल्या चरणी आश्रय देते.

क्रमशः… २० 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक भेट अशीही… ☆ श्री संजय जोगळेकर ☆

श्री संजय जोगळेकर 

? मनमंजुषेतून ?

☆ एक भेट अशीही☆ श्री संजय जोगळेकर 

आजच मी आईला मातृदिनानिमित्त हा दगड भेट म्हणून दिला.

वास्तविक पेपरवेट आणि शोपीस याव्यतिरिक्त तसा काही याचा फारसा उपयोग नाही. पण या एका छोट्याशा भेटीने माझी एका गरजू आईला मदत होणार होती.

****

काही महिन्यापूर्वी मी एका आदिवासींनी भरवलेल्या प्रदर्शनाला भेट दिली तीही प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी, प्रदर्शन संपायच्या फक्त काही मिनिटे आधी. जवळजवळ 25 एक तरी स्टॉल होते आदिवासींचे.

– – त्यात एका स्टॉल वर मला हा दगड सापडला बहुतेक माझ्याच नशिबात होता तो.

स्टॉल वर एक आई आणि तिचा मुलगा होता. स्टॉल जवळ जवळ रिकामाच होता.

एक अगदी अशिक्षित बाई होती स्टॉलवर पण खरोखरच तिच्या अंगात कला होती. तिच्याबरोबर तिचा मुलगाही होता कारण आता तो मोकळा होता त्याला दिवाळीची सुट्टी लागली होती.

 या स्टॉल मधून मिळणाऱ्या पैशातून त्याच्या शिक्षणाचा खर्च करायचा होता तिला.

आत्तापर्यंत तिने रंगवलेल्या दगडांचे फोटो होते त्या मुलाच्या मोबाईल मध्ये. लोकांचा पत्ता लिहून घेणे त्यांच्याकडून पैसे घेणे त्याचा हिशोब ठेवणे वगैरे काम चोख पणे करीत होता तो.

तिने रंगविलेल्या दगडांवर काही देवांची नावे होती शहरांची होती. अगदी आपण ऑर्डर दिली, सांगितले तर तुमच्या मित्रांचे देखील नाव रंगवून द्यायला तयार होती ती आई.

आणि त्यातला शेवटला न विकला गेलेला असा दगड जो बहुतेक माझ्याच नशिबात होता तो मी विकत घेतला.

आपल्याला देखील बागेत, रस्त्यात येता जाताना, प्रवासात, असे अनेक आकाराचे दगड दिसतात पण त्याला व्यवस्थितपणे रंगवून ते विकणे… वा खूपच कौतुकास्पद.

दगडांमधून अर्थार्जन… किती सुंदर कल्पना.

कल्पना आणि कला यांना योग्य रीतीने स्कोप/दिशा मिळणे गरजेचे आहे हेच खरे.

असो.

मातृदिनाच्या सर्व मातांना मनःपूर्वक शुभेच्छा.

© श्री संजय जोगळेकर

मो 9867180426

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares