मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “गृहिणीपणाचा उत्सव -चैत्रगौर” – लेखक : श्री विनय मधुकर जोशी ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “गृहिणीपणाचा उत्सव -चैत्रगौर” – लेखक : श्री विनय मधुकर जोशी ☆ शोभा जोशी ☆

चैत्र शुद्ध तृतीया म्हणजे गौरी तृतीया. या तारखेपासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत गौरीची पूजा करून महिनाभर हा उत्सव साजरा होतो. देवघरातली अन्नपूर्णा लख्ख करून तिची षोडशोपचारे पूजा केली जाते आणि तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेऊन हा उत्सव साजरा होतो. अनेक शुभ चिन्हांची रांगोळी ‘चैत्रांगण’ काढली जाते.

गौरी अन्नपूर्णा कशी झाली याची सुंदर कथा पुराणात येते. गौरी ही भौतिक समृद्धीची देवता. अन्नधान्य, वात्सल्य, धन संपत्ती, सौंदर्य, मांगल्य, कौटुंबिक सौख्य ही सारी काही तिचीच कृपा. आणि शिव म्हणजे विशुद्ध ज्ञान! . योग, वैराग्य, ब्रह्मज्ञान यांचे ते अधिष्ठान.

शिव-पार्वती एकदा कैलाशी निवांत गप्पा मारत होते. बोलण्याच्या ओघात शिव म्हणाले, “ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. फक्त ब्रह्म सत्य आहे बाकी सब झूट. “

 

पार्वती म्हणाली, “अहो हे सुंदर विश्व? “

शिव म्हणाले, “साफ खोटं, आभासी आहे हे. “

“विश्वातील सौंदर्य, मांगल्य, नातीगोती?

तेही असत्य?

बरं. मग आपण खातो ते अन्न तरी? “

“तेही खोटं, असत्य, आभासीच, फक्त ब्रह्मतत्त्व सत्य! “

 

झालं …. गौरीला आला थोडा राग. ती म्हणाली, “बरं तुमचं ज्ञान वैराग्यच खरं. बाकी सगळं आभासी ना? या क्षणी मी अंतर्धान होते. “

गौरी गुप्त होताच जगातले मांगल्य लोपले, नात्यांचा गोडवा उडाला, घराचे घरपण हरपले, सात्त्विक सौंदर्य विरले, आणि मुख्य म्हणजे जगातले सगळे अन्नधान्यसुद्धा अकस्मात संपले.

 

शिवांना वाटले, हरकत नाही. या वाचून जगाचे काही बिघडत नाही. पण थोड्याच वेळात अख्ख्या जगातले देव, मानव, ऋषी, पशुपक्षी, सारे प्राणीमात्र भुकेले होऊन शिवांपाशी आले.

महादेव म्हणाले, “थांबा. तुम्हाला जरा ज्ञान देतो. ” पण भुकेल्या पोटी कसलं ब्रह्म? कसलं ज्ञान?

“आधी अन्न द्या. मग पुढचं बोला. “

पण अन्न आणायचे कुठून. कोणीतरी सांगितलं, ” संपूर्ण विश्वात फक्त काशी नगरीत एक घर आहे. तिथेच अन्न उपलब्ध आहे. सगळ्या प्राणिमात्रांच्या वतीने शिव याचक म्हणून तिथे भिक्षा मागायला गेले.

“ओम भवति भिक्षां देही|”

आतून एका गृहिणीचा नाजूक आवाज आला, ” महादेवा, भिक्षेत काय देऊ? ज्ञान की वैराग्य?

महादेवांनी पाहिलं, आत सुवर्ण सिंहासनी साक्षात पार्वती बसली आहे, मांगल्य लेवून, पावित्र्य पांघरून, समृद्धीचे अलंकार घालून आणि तिच्या हातात आहे अन्नाचे अक्षयपात्र, वात्सल्याच्या पळीने ती प्रत्येक जिवाला अन्न देऊन तृप्त करते आहे.

प्रपंचाशिवाय परमार्थ, प्रवृत्तीवाचून निवृत्ती, शक्तीविना शिव अपूर्णच आहेत हा साक्षात्कार शिवांना झाला. शिव म्हणाले, “ज्ञान -वैराग्य प्राप्त होण्यासाठी आधी शरीरात शक्ती आणि मनात शांती हवी. त्यासाठी सकस अन्न हवे. अन्न हे पूर्णब्रह्म. त्याचीच भिक्षा दे!

ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ।।”

पार्वती हसली. तिने आनंदाने शिवांना भोजन दिले. शिव तृप्त होताच जगातले सगळे जीवदेखील तृप्त झाले.

त्या तृप्त अंतकरणाने महादेव म्हणाले, ” तू सदाशिवालासुद्धा पूर्ण करणारी सदापूर्णा आहेस. जगाची आई बनून अन्न पुरवणारी तू अन्नपूर्णा आहेस. “साध्या गृहिणीच्या रूपातली ती शंकराची प्राणवल्लभा अन्नपूर्णा म्हणून विख्यात झाली.

ही अन्नपूर्णा जगातल्या सगळ्या गृहिणींचं प्रतीक आहे. सोनेरी महालात राहणाऱ्या रुख्मिणीवरदेखील द्वारकेतील सगळ्यांना अन्न देण्याची जबाबदारी होती आणि झोपडीत राहणारी सुदामाची बायकोसुद्धा मिळेल ते रांधून घराला जेवू घालत होती. परिस्थितीचा फरक असेल, पण कुटुंबाला तृप्त करण्याची वृत्ती सारखीच आहे. कदाचित ही आठवण राहावी म्हणून नववधूला लग्नात माहेरून अन्नपूर्णा देतात. तिची रोज पूजा करत गृहिणीने सकस अन्न शिजवावं, नाती जपावीत, घराला घरपण द्यावं. हे सगळं करत असताना “गृहिणी कुठे काय करते? ” असा प्रश्न कोणी विचारला तर गृहिणीच्या रुपात अवतीर्ण होऊन जगाचे पोषण करणाऱ्या अन्नपूर्णेची कथा आठवावी.

या गृहिणीपणाचा उत्सव ही चैत्रगौर. रोजची देवघरातली अन्नपूर्णा मखरात हिंदोळ्यात बसवली जाते. किंवा काही ठिकाणी पंचगौरचे छोटे झोपाळे पुजले जातात. त्यात मध्यभागी ही गौरी आणि सभोवताली तिचा परिवार -शिव, गणेश, नंदी वगैरे. गृहिणी हीच घराचा केंद्रबिंदू आहे हे यातून बिंबवलं जातं.

स्वयं पञ्चाननः पुत्रौ गजाननषडाननौ।

दिगम्बरः कथं जीवेदन्नपूर्णा न चेद्गृहे॥

पाच मुखे असणारे शंकर; गजमुख गणेश आणि सहा मुख असणारा कार्तिकेय अशी खाणारी बारा तोंडे घरी असताना भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवाचा संसार सुरळीत चालला आहे; कारण त्याच्या घरी अन्नपूर्णा गृहिणी म्हणून आहे.

शिवांपासून तर जगभरातल्या सगळ्यांचे संसार ज्यांच्यामुळे सुरळीत चालले आहेत अशा गृहिणींच्या रुपात असणाऱ्या अन्नपूर्णेला नमन

अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरः प्राणवल्लभे ।

ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ।।

लेखक: श्री विनय मधुकर जोशी

प्रस्तुती : शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “श्रद्धा आणि विश्वास” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “श्रद्धा आणि विश्वास☆ श्री जगदीश काबरे ☆

“श्रद्धा” आणि “विश्वास” हे शब्द रोजच्या बोलण्यात अनेकदा परस्परांना पूरक म्हणून वापरले जातात; परंतु त्यांच्या आशयात मूलभूत फरक आहे. भाषाशास्त्रीय आणि तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर “विश्वास” हा प्रामुख्याने अनुभव, पुरावा, तर्क आणि पुनर्परीक्षण यांवर आधारलेला असतो; तर “श्रद्धा” ही भावनिक, सांस्कृतिक किंवा धार्मिक संदर्भातून निर्माण झालेली अंतर्मनाची बांधिलकी असते. विश्वास हा एखाद्या विधानाबद्दलचा स्वीकार असतो, जो उपलब्ध माहितीवर उभा असतो. उदाहरणार्थ, सूर्य पूर्वेकडूनच उगवतो हा विश्वास आपण पूर्वानुभव आणि वैज्ञानिक स्पष्टीकरणांवरून ठेवतो. परंतु एखाद्या देवतेवर, गुरुवर किंवा ग्रंथावर असलेली निष्ठा (येथे बरेचदा लोक विश्वास हा शब्द वापरतात) ही बहुधा श्रद्धेच्या चौकटीत येते; ती अनुभवापेक्षा परंपरेवर आणि भावनिक नात्यावर अधिक आधारित असते.

विश्वासाचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे त्याची परिवर्तनीयता. एखादी गोष्ट खरी आहे असे आपण मानतो; परंतु नवे पुरावे, संशोधन किंवा अनुभव आपल्याला दाखवतात की ती गोष्ट चुकीची आहे, तर आपला विश्वास बदलतो. विज्ञानाचा संपूर्ण प्रवास याच तत्वावर उभा आहे. विज्ञानात कोणताही सिद्धांत अंतिम नसतो; तो नव्या प्रयोगांनी, नव्या माहितीने तपासला जातो. म्हणूनच विश्वास हा परिवर्तनीय असतो… तो वाढतो, बदलतो, कधी मोडतो, तर कधी अधिक बळकट होतो. ज्यावर आपला विश्वास आहे त्याला प्रश्न विचारणे हा त्याचा अपमान नसतो; उलट ती त्याची शक्ती असते. कारण प्रश्नांच्या कसोटीवर टिकणारा विश्वासच खरा ठरतो.

याच्या उलट श्रद्धेचे स्वरूप बहुतेकदा अपरिवर्तनीय असते. अनेक धर्मसंस्थांमध्ये किंवा परंपरांमध्ये श्रद्धेची चिकित्सा करणे म्हणजे पाप किंवा अवमान मानला जातो. परिणामी श्रद्धेला प्रश्न विचारण्याची मुभा नसते. ती तपासली जाऊ नये, बदलली जाऊ नये, अशी मानसिक चौकट तयार केली जाते. अशा वातावरणात श्रद्धा ही स्थिर, अपरिवर्तनीय आणि अंध स्वरूप धारण करते. श्रद्धेचा पाया भावनिक असतो; म्हणून ती तर्काच्या कसोटीवर टिकली नाही तरी टिकवून धरली जाते. एखादी गोष्ट चुकीची आहे हे कळूनही “माझी श्रद्धा आहे” या कारणाने ती सोडली जात नाही. म्हणूनच विश्वास आणि श्रद्धा यांतील मुख्य भेद म्हणजे बदल स्वीकारण्याची तयारी आहे की नाही हा आहे. विश्वास हा सत्याच्या शोधात असतो. तो सत्य सापडल्यावर आपले रूप बदलतो. श्रद्धा मात्र सत्यापेक्षा स्थैर्याला महत्त्व देते. विश्वास म्हणतो, “मला पटते, पण जर चुकीचे ठरले तर मी बदलेन. ” श्रद्धा म्हणते, “मला पटते, आणि तेच अंतिम आहे. ” या दोन भूमिकांतील फरक लक्षात घेतला तर समाजातील अनेक वादांची मुळे स्पष्ट होतात.

याचा अर्थ श्रद्धा नेहमीच नकारात्मक असते असे नाही. ती व्यक्तीला मानसिक आधार, प्रेरणा आणि धैर्य देऊ शकते. पण जेव्हा श्रद्धेला प्रश्नांपासून दूर ठेवले जाते, तेव्हा ती विचारस्वातंत्र्यावर मर्यादा आणते. म्हणूनच मी असे नेहमी म्हणतो की, ज्या श्रद्धा चिकित्सेला नकार देतात त्या सगळ्या अंधश्रद्धाच असतात. सर्वसाधारणपणे प्रत्येक वेळेला असे निदर्शनास आलेले आहे की, कोणत्याही धर्मातील श्रद्धा ही चिकित्सेला नकारच देत असते म्हणून प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते. विश्वास मात्र व्यक्तीला संशय, शोध आणि आत्मपरीक्षणाची सवय लावतो. म्हणूनच विचारशील समाज घडवायचा असेल, तर विश्वासाच्या परिवर्तनीय स्वभावाला मान्यता देणे आणि श्रद्धेलाही प्रश्नांच्या प्रकाशात पाहण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे. श्रद्धा आणि विश्वास यांचा हा सूक्ष्म पण मूलभूत फरक ओळखला, तर वैचारिक प्रगल्भतेकडे एक मोठे पाऊल टाकता येईल.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “हडळ…!!!” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “हडळ…!!!” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

मी नववीत असेन बहुधा.

साताऱ्यातून मी त्यावेळी आजीकडे आलो होतो उन्हाळ्याच्या सुट्टीला.

मे महिन्याचा शेवटचा आठवडा असावा, ढग दाटून यायचे पण पाऊस पडायचा नाही. खूप रडावसं वाटतं, मन भरून येतं, पण रडू येत नाही तसंच काहीसं.

 

त्या दिवशी आजीबरोबर माझी काहीतरी वादावादी झाली होती. रागानं दिवसभर जेवलो नव्हतो, तिनेही बोलावलं नाही.

रागाच्या तिरीमिरीत गल्लीतल्या मित्राकडे जायला निघालो. संध्याकाळचे ७ वाजते असावेत.

अंधार आणि उजेड एकमेकांना आलिंगन देत ‘पहले आप पहले आप’ म्हणून निरोप देत असावेत.

निम्म्या वाटेवर आल्यावर नेमका गडगडाट सुरू झाला, काळोख पडला आणि काय होतंय कळायच्या आत धो-धो पाऊस सुरू झाला. मी चिंब…!

 

पावसापासून बचाव करायचा म्हणून जवळच्याच एका घरात शिरलो. घर कसलं? पत्रे, गोणपाट लावून केलेला तो एक निवारा होता.

आमच्या गल्लीतलं सगळ्यात गरीब कुटुंब हे!

आम्ही जिथे रहायचो. तिथे एक पन्नाशीची बाई रहायची. शेजारच्या आयाबाया तिला ‘हडळ’ म्हणायच्या.

 

ती दिसायलाही होती तशीच. डावा डोळा एकदम बारीक, या डोळ्यात काळे बुब्बुळ नव्हतंच, अख्खा डोळा पांढराफेक, उजवा डोळा बाहेर आल्यासारखा बटबटीत, आतलं बुब्बुळ तिच्या मर्जीविरुद्ध कुठेही गरागरा फिरायचं, या वयातही चेहरा सुरकुतलेला, पांढरे केस पिंजारलेले, तोंडात मोजके दात, त्यातून समोरचा एक पडलेला. दुसरा ओठातूनही बाहेर आलेला, अंगावर लुगडं घातलंय की चुकून अंगावर पडलंय अशी शंका यावी असं नेसलेलं, रंगही इतका काळा, की काळ्या रंगानं लाजावं…!

… एकूण अवतार भेसूर!

त्यात बोलण असं की भांडल्यासारखं, प्रत्येक वाक्यात शिवी.

 

कुणीही हिच्या नादी लागत नसे, समोर दिसली तरी विटाळ व्हायचा लोकांना, अपशकून व्हायचा त्यांना. कोणत्याही सण समारंभात हिला जाणीवपूर्वक बाजुला ठेवायचे. लहान मुलांना तर ती हडळ तुला खाईल, अशी भिती घालायचे. तिला जादुटोणा येतो, तिच्या घरात कवट्या आहेत वगैरे असंही बोललं जायचं. हे घर तिचंच..!

 

मी नेमका याच घरात शिरलो होतो. पत्र्याच्या त्या घरात मंद चूल पेटली होती. शेजारचा टेंभा (जुन्या डब्यात रॉकेल भरून, जुनी नाडी टाकून, उजेडासाठी वात पेटवलेली असे. गावाकडचा जुगाड) मिणमिणता प्रकाश देत होता.

 

ती चुलीशेजारीच बसली होती. त्याच नेहमीच्या विस्कटलेल्या अवतारात.. केस तसेच पिंजारलेले. चूल आणि टेंभ्याचा संमिश्र प्रकाश तिच्या भेसूर चेहऱ्यावर पडला होता. मूळचाच भीषण चेहरा अजून भीतीदायक वाटत होता. विरुद्ध बाजूला तिचीच सावली जमिनीवर पडली होती. एकूण वातावरण भितीदायक!

मी घाबरलो. पण बाहेर पडायची सोय नव्हती.

 

‘काय रं? ‘ घोगऱ्या आवाजात ती गरजली.

‘काय नाय, ते आपलं भायेर पाऊस म्हणून.. ‘ मी पायाने जमीन टोकरत चाचरत बोललो.

 

ती बसली होती. समोर काटवटीत भाकरीचं पीठ ओतलं होतं. पूर्वी डालड्याचा पिवळा डबा मिळत असे. त्यावर कसल्याशा झाडाचं चित्र असे. डब्यातला डालडा संपला की त्याचे अनेक उपयोग असत. कुणी डाळी तांदुळ त्यात साठवत असत, कुणी बाहेर शौच्यासाठी जाताना टमरेल म्हणूनही वापरे. तिनं याच डब्यात पाणी भरून ठेवलं होतं.

डबा काटवटी शेजारी. डब्यातलं पाणी पिठावर शिंपडून ती पीठ तिंबत होती.

 

मांजरानं उंदराला खेळवावं तसं ती पिठाशी खेळत होती. इकडून तिकडे फिरवत होती, मध्येच चापट्या मारत होती, मध्येच पिठाचा गालगुच्चा घेत होती. मी हा खेळ पाहण्यात रंगून गेलो. शेवटी त्या गोळ्याचा भला मोठा लचका तिनं तोडला. दोन हाताच्या तळव्यात धरून या लचक्याला तिनं गोल आकार दिला आणि हातातून पडू न देता त्या गोळ्याला हवेतच थापट्या मारू लागली. दोन्ही बाजूंनी ढोलकी बडवतात तसं…

 

एका क्षणी तर जादू झाली. या गोल गोळ्यापासून एक सुंदर गोलाकार अशी ताटाएवढ्या आकाराची पोळी तयार झाली. माझी आजी पोळपाटावर भाकरी थापते, हिनं हवेतच ती केली. हिच्या अंगात नक्की जादुटोणा असावा अशी आता माझी खात्री पटली.

 

यानंतर तिने बनवलेली ती कलाकृती धाप्पदिशी, चुलीवरल्या तापलेल्या काळ्या लोखंडी तव्यावर पसरली. डब्यात पाणी घेऊन पुन्हा पाण्याचा हात त्या भाकरीवरन फिरवला. शेणाने सारवलेल्या जमिनीवर उलथन पडलं होतं, तिनं आधी ते पदराला पुसलं. उलथन्यानं तव्याला थोडं ढोसून चुलीवरल्या तव्याला नीट केलं आणि हातानं तव्यावरची भाकरी उलटली. उलटलेली भाकरी पुन्हा तव्यावरनं काढून चुलीच्या तोंडावर तिला धग लागेल अशी ठेवली.

 

आता त्या बाजरीच्या भाकरीला मस्त पापुद्रा आला. ती टम्म फुगली. दिवसभर मी फुगलो होतो, तस्साच!

 

तिचं माझ्याकडे लक्ष नव्हतंच. बाजरीच्या भाकरीचा मंद सुवास माझ्या नाकात शिरला. पत्र्याबाहेर अंधार, नुकताच पडून गेलेला पाऊस, हवेत झोंबरा गारवा, पत्र्याच्या आत चुलीमुळे निर्माण झालेली उबदार धग आणि माझ्या पोटात पडलेली आग!

 

मी आशाळभूतपणे भाकरीकडे पहात होतो.

तिचं माझ्याकडे लक्ष गेलं. म्हणाली, ‘खातु का भाकर? ‘ छ्या… छ्या… नको मला. ‘ एकदम हो कसं म्हणणार?

एखादी गोष्ट मनापासून हवी असताना… ती मिळत असताना, नको म्हणणं काय असतं, हे त्या नको म्हणणारालाच कळेल.

 

तोंडानं नाही म्हटलं तरी काही गोष्टी चेहऱ्यावर ओघळतातच, मनात असलं नसलं तरी! डोक्यावर ओतलेल्या तेलाचे गालावर ओघळ यावेत तसे.

तिला या अंधारातही ते दिसलं असावं. म्हणाली, ‘हिकड ये… ‘

 

‘जावू का नको? ‘ मी घुटमळलो.

 

‘ये रं ल्येकरा, माज्याजवळ बस… ये हिकडं… जमिनीवर हात आपटत ती बोलली… तीच्या बोलावण्यात आर्तता होती.

 

मी प्रथमच तिचा हा नाजूक आणि प्रेमळ आवाज ऐकत होतो. मायेनं भिजलेला तो आवाज होता.

तरीही जवळ बोलावून भाकरीबरोबर ही मलाच खावून टाकणार नाही ना? या विचारानं मी घाबरलो.

तिनं पुन्हा हाक मारली.

मी पाय ओढत तिच्या दिशेनं घाबरत निघालो. मी जवळ येताना पाहताच ती गालातल्या गालातल्या मंद हसली. मी असं हसताना याआधी कधीच पाहिलं नव्हतं. का हसली असेल ती अशी मला बघून? मी आणखी घाबरलो.

 

आता पळायची सोय नव्हती. तिनं माझे हात धरले होते. माझे थरथरते हात तिने हातात घेतले आणि झटका देत मला चुलीजवळ खाली बसवलं.

… चुलीजवळ असूनही मला कापरं भरलं. ती पुन्हा हसली. ओठाबाहेर आलेला दात मला अजून भ्या दावत होता. ‘कवापस्नं जेवला न्हाईस? ‘ डोक्यावर हात फिरवत मायेनं तिनं विचारलं. ‘सकाळपस्नं… ‘ मी चाचरत बोललो.

 

शेणानं सारवलेल्या जमिनीवरच एक जर्मनची ताटली पडली होती. तिन ती पदरानं पुसली. त्यावर ती गरमगरम भाकरी ठेवली. मी अजूनही साशंक होतो. ती पुढे काय करणार मला माहीत नव्हतं.

 

तिच्याबद्दल लोक काय काय बोलतात ते सारं आठवलं. अंगावर शहारे आले. ‘तू भाकर खायाला सुरवात कर, मी तवर भाजी करते. ‘ या वाक्यान माझी तंद्री भंगली.

 

तेवढ्यात तिनं, बाजूला असलेली कळकटलेली एक छोटी किटली काढली, दुसऱ्या हातानं तितकीच कळकट एक कढई चुलीवर ठेवली. किटलीतलं तेल कढईत टाकलं. किटलीच्या तोंडाला लागलेलं तेल तिनं बोटानं पुसून घेतलं आणि ते बोट माझ्या केसांना लावत म्हणाली, ‘रोजच्या रोज आंगुळ झाल्यावर, डोस्क्याला त्याल लावावं.. कसं भुतावानी झाल्यात क्यास…! ‘ असं म्हणत पुन्हा तेच बोट स्वतःच्या पदराला पुसलं.

 

मी तिच्या पिंजारलेल्या केसांकडे पाहिलं, वाटलं, मला सांगते तर मग ही का लावत नसेल डोक्याला तेल?

.. “भुतावानी” हा तिच्या तोंडून आलेला शब्द ऐकून मी अजून घाबरलो.

 

तिला याचं काही सोयरसुतक नव्हतं. शांतपणे जरा लांब हात करून तिने मग लसणाची गड्डी काढली. जमिनीत उकरून केलेल्या उखळात टाकली, वरवंट्यानं दणादणा चेचली आणि कढईतल्या तेलात टाकली. उखळ पुन्हा त्याच पदरानं पुसून घेतलं. त्यानंतर गुडघ्यावर हात ठेवत ती भिंतीच्या आधारानं उठली आणि कसल्याशा फडक्याखाली झाकलेली मेथीची गड्डी काढली.

 

बुडख्याकडचा (देठाकडचा) भाग हातानंच पिळून तटदिशी तोडला आणि अख्खी मेथीची गड्डी तिनं अक्षरशः हातानं कुस्करुन कढईत टाकली. ना निवडणं, ना साफ करणं, ना देठ काढणं…!

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २१ आणि २२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २१ आणि २२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. २१ – – 

मना वासना चुकवी येरझारा ।

मना कामना सांडि रे द्रव्यदारा |

मना यातना थोर हे गर्भवासी ।

मना सज्जना भेटवी राघवासी |२१ |

अर्थ: हे मना, वासनेमुळे जीव जन्म मरणाच्या फेऱ्यात (येरझारा)अडकतो. त्या वासनेचा त्याग कर म्हणजे जीव जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकणार नाही. पैसा आणि स्त्री सुख यांच्याबद्दल मोह बाळगू नकोस. कारण वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागतो आणि गर्भवासाच्या यातना भयंकर असतात. म्हणून हे मना भगवंताची भेट करून घे.

विवेचन: जन्माआधी आणि जन्माच्या प्रसंगी होणाऱ्या यातना किती भयंकर असतात हे समर्थांनी आधीच्या श्लोकात सांगितले आहे. या श्लोकात ते आपल्याला म्हणतात की वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागतो म्हणून या वासनांचा त्याग करायला हवा. वासनाच नसतील तर जन्म मृत्यूचा प्रश्नच उद्भवणार नाही. या श्लोकात ‘ चुकवी ‘ हा शब्द वासना आणि येरझारा या दोन्हीसाठी आहे. आपल्याला वासना आणि येरझारा दोन्हीही चुकवायच्या आहेतच. वासना चुकवली तर येरझारा आपोआपच चुकतील.

वासना या निरनिराळ्या प्रकारच्या असतात त्यातही त्यांचे दोन प्रमुख प्रकार सांगता येतील. सद् वासना आणि दुर्वासना. दोन्हींपैकी कोणत्याही प्रकारची वासना असेल तरी पुनर्जन्म हा अटळ आहे. परंतु त्यातल्या त्यात सद्वासना म्हणजे चांगल्या वासना असतील तर पुन्हा जन्म मिळाला तरी हरकत नसते. समाजोपयोगी कार्य करणे, संतांचा सहवास लाभणे किंवा परमेश्वर भक्तीची इच्छा धरणे या सद्वासना आहेत. या सद्वासनांमुळे आत्मिक उन्नती होण्यासाठी मदत होते. षडरिपूंच्या नादी लागून त्या वासना अपूर्ण जर राहिल्या असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागतो. परंतु त्याने शेवटी मनुष्याची अधोगतीच होते आणि मुक्तीपासून तो दूर जातो.

संत तुकाराम महाराजांना संतसंग आणि भगवद्भक्तीची आस होती. ते म्हणतात – – 

न लगे मुक्ती आणि संपदा, संतसंग देई सदा|

तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी ||

संतांचा, सज्जनांचा संग म्हणजे सहवास मिळावा, परमेश्वराची भक्ती कायम लाभावी म्हणजे जेणेकरून त्यातील गोडी कायम अनुभवता येईल. म्हणून त्यांना गर्भवास म्हणजे पुन्हा जन्म घेणेदेखील मान्य आहे.

तुकाराम महाराजांसारख्या संतांची ही सद्वासना झाली. परंतु या ऐहिक जीवनात सामान्य मनुष्य एवढा गुंतून जातो की त्याच्या अनेक प्रकारच्या वासनांची पूर्ती कधी होतच नाही. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये जेवढे इंधन घालावे तेवढा तो अधिक प्रज्वलित होतो. तशा या दुर्वासना देखील वाढत जातात आणि अंतकाळी या वासना कायम असतील तर त्या पोटी मनुष्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. सत्ता, संपत्ती आणि स्त्री संबंधित वासना कधी संपतच नाहीत. कामिनी आणि कांचन यांच्या वासना सर्वात जास्त प्रबळ आहेत. त्यांच्यावर मात करणे सोपे नाही. इतर वासना त्यामानाने गौण आहेत. आज जगातील घडणारे बहुतेक गुन्हे आणि वाईट घटना कामिनी आणि कांचनाच्या हव्यासापायीच घडत आहेत. चित्रपटातून आणि टीव्हीवरील विविध प्रकारच्या धारावाहिकांमधून अशाच घटना समोर येतात. त्यापासून बोध घेण्याऐवजी त्यातील वाईट गोष्टींचा प्रभाव समाजमनावर अधिक पडतो. भ्रष्टाचाराच्या घटनांबद्दल तर न बोललेले बरे इतक्या त्या नित्याच्या झाल्या आहेत.

वासना अपूर्ण राहिल्या की पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जन्माला आल्यानंतर या वासनांचा भोग तर मिळतो परंतु माणसाची अधिकाधिक अधोगती होते आणि त्याने तो मुक्ती पासून दूर जातो.

परद्रव्य कांता पराची पाहता 

स्मरादि रिपु ओढिती मानसाता 

– – असे श्री दत्त स्तुतीत म्हटले आहे. दुसऱ्याचे धन, दुसऱ्याची स्त्री यांची अभिलाषा धरली तर काम, क्रोध यांसारखे शत्रू मनावर आक्रमण करतात आणि शेवटी ते माणसाचा नाश घडवून आणतात.

म्हणूनच जन्म मृत्यूचा फेरा म्हणजेच येरझारा चुकवायचा असेल तर समर्थ वासनेवर मात करायला सांगतात. आणि त्यासाठी ईश्वर प्राप्तीचे पवित्र ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवावे लागते. केवळ ध्येयवादी मनुष्य असा त्याग करू शकतो. माया मोहात अडकलेले मन आपण ईश्वराकडे लावले तर तेच मन आपल्याला (राघवाची) ईश्वराची भेट घडवून देईल.

स्वसंवाद : 

  • माझ्या आयुष्यात कोणत्या वासना मला सर्वाधिक बांधून ठेवतात?
  • कामिनी आणि कांचनाच्या मोहापासून दूर राहण्यासाठी मी सजग आहे का?
  • संतसंग, सत्संग किंवा आध्यात्मिक चिंतनाला माझ्या जीवनात किती स्थान आहे?
  • माझ्या जीवनाचे ध्येय केवळ भोग आहे की ईश्वरप्राप्ती?

– – – – 

श्लोक क्र. २२ – – 

मना सज्जना हीत माझे करावे ।

रघुनायका दृढ चित्ती धरावे ।

महाराज तो स्वामि वायूसुताचा ।

जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ।।२२।।

अर्थ :

हे सज्जन मना, तुला जर तुझे खरे कल्याण करून घ्यायचे असेल तर रघुकुलाचा नायक असलेल्या श्रीरामाला चित्तामध्ये दृढ धारण कर. तो वायूसुत हनुमंताचा स्वामी आहे आणि तिन्ही लोकांचा उद्धार करणारा आहे. म्हणून अशा त्या श्रीरामाला तू घट्ट धरून ठेव—म्हणजेच नेहमी त्याच्या चिंतनात राहून आपला उद्धार करून घे.

विवेचन :

आधीच्या श्लोकांमध्ये जन्माला येताना जीवाला किती यातना सहन कराव्या लागतात हे समर्थ सांगतात. आयुष्य जगताना देखील नाना प्रकारची दुःखे, संकटे आणि क्लेश सहन करावे लागतात. हे सर्व म्हणजे जन्म-मृत्यूच्या अखंड फेऱ्यांमुळे घडणारे आहे. या येरझाऱ्यातून सुटका करून घ्यायची असेल तर माणसाने आपले खरे हीत करून घ्यायला हवे. मग हे हीत म्हणजे नेमके काय आणि ते कसे साध्य करायचे—याचे उत्तर समर्थ या श्लोकात देतात.

हे जग मायेचा एक मोहक पिसारा आहे. त्याला आपण भुलतो, तेच अंतिम सत्य आहे असे मानतो आणि त्यातच अडकून पडतो. नाना प्रकारची प्रलोभने, विकार आणि वासना आपल्या मार्गात अडथळे निर्माण करतात. परिणामी, आपल्या कल्याणाचा जो अंतिम मार्ग आहे—श्रेयसाचा मार्ग, त्याऐवजी आपली वाटचाल प्रेयसाच्या मार्गाने होत राहते.

खरे पाहता मनच आपला मित्र आणि मनच आपला शत्रू असते. तेच आपले हीत किंवा अहित करू शकते. विषयसुख आणि शरीरसुखालाच आपण जीवनाचे अंतिम ध्येय मानतो. कामिनी आणि कांचनाच्या मागे धावत राहतो. परंतु या सर्व गोष्टी म्हणजे मृगजळासारख्या आहेत. मृगजळ दिसते, पण प्रत्यक्षात अस्तित्वात नसते. तसेच हे बाह्य जग—ते सत्य वाटते, पण ते भासमान आहे. आपण त्याच्या मागे धावत राहतो आणि जे अंतिम सत्य आहे—ब्रह्म किंवा परमेश्वर—त्याकडे दुर्लक्ष करतो.

आपली अवस्था कस्तुरीमृगासारखी होते. कस्तुरी स्वतःच्या नाभीत असतानाही तो तिच्या शोधात रानोमाळ भटकत राहतो. त्याचप्रमाणे आपल्या हृदयातच असलेल्या आत्मारामाला आपण विसरतो आणि बाह्य सुखांच्या मागे भटकत राहतो.

मानवी जीवनाचे खरे हीत म्हणजे त्या रघुनायकाला दृढ चित्ती धारण करणे. चित्तामध्ये भगवंताला घट्ट धरून ठेवणे म्हणजेच आपले कल्याण करणे होय. एखाद्या वस्तूचा सतत सहवास लाभला तर ती वस्तू आपल्याला प्रिय वाटू लागते. तसेच भगवंताच्या नामाचा आणि स्मरणाचा सतत सहवास लाभला तर भगवंतही आपल्याला प्रिय वाटू लागतो. आणि जेव्हा भगवंत प्रिय वाटू लागतो, तेव्हा समजावे की आपण योग्य मार्गावर चाललो आहोत.

श्रीराम हे वायूसुत हनुमंताचे स्वामी आहेत. हनुमंत म्हणजे शक्ती, युक्ती आणि बुद्धिमत्तेचे मूर्तिमंत प्रतीक. तरीही तो स्वतःला रामाचा दास मानतो. भक्ती कशी करावी हे हनुमंताकडून शिकावे. त्याने श्रीरामांना आपल्या हृदयात कायमचे धारण केले आहे. श्रीरामांच्या कृपेने तो चिरंजीव झाला आहे.

शौर्य, धैर्य, औदार्य आणि शरणागताचे रक्षण—हे श्रीरामांचे वैशिष्ट्यपूर्ण गुण आहेत. ते रघुकुलाचे भूषण आहेत. त्यांचे नाम पापातून मुक्त करणारे आहे, भवसागरातून तारून नेणारे आहे. हजारो वर्षांपासून असंख्य लोकांनी श्रीरामनामाचा आश्रय घेतला आणि या संसारसागरातून तरून गेले.

त्रैलोक्याचा नाथ असलेल्या त्या श्रीरामांनी लोककल्याणाचे व्रत स्वीकारले आहे. म्हणूनच समर्थ अत्यंत तळमळीने आपल्या मनाला सांगतात—

“हे सज्जन मना, त्या श्रीरामांना आपल्या हृदयात दृढ धारण कर; त्यातच तुझे खरे कल्याण आहे. ”

स्वसंवाद : 

  • माझ्या जीवनातील खरे “हीत” काय आहे याचा मी कधी गंभीरपणे विचार केला आहे का?
  • विषयसुख आणि भौतिक यश यांनाच मी जीवनाचे अंतिम ध्येय मानतो आहे का?
  • माझ्या मनाला ईश्वरनाम, सद्गुण आणि सत्कर्म यांचा सहवास मिळतो आहे का?
  • हनुमंताप्रमाणे श्रद्धा, नम्रता आणि सेवाभाव माझ्या जीवनात कितपत आहे?

– क्रमशः श्लोक २१ आणि २२

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पश्चात्ताप! ☆ अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

? इंद्रधनुष्य ?

☆ ✍️ पश्चात्ताप! ☆ अपर्णा परांजपे

आपल्या मनात जर अपराध भावना आली तर दोन मार्ग जाणवतात एक देवाजवळ जायचे व प्रसाद द्यायचा व दुसरा ज्याच्यावर अन्याय झाला त्याला प्रत्यक्ष क्षमा मागायची!

आपण पहिला देवाजवळ जाण्याचा मार्ग धरू! हे ही उत्तमच आहे पण त्याने फारसा उपयोग होणार नाही कारण अंतःकरण शुद्ध नाही. आपण सोपा, सहज मार्ग आपण निवडला. पण प्रत्यक्ष क्षमा मागणे, कमीपणा वाटणे म्हणजेच देहबुद्धी नष्ट न होणे व देहबुद्धी नष्ट न होता केलेली क्षमायाचना भगवंतांना सुद्धा आवडत नाही मग तो नुसता व्यवहार ठरतो

प्रायश्चित्त विरुद्ध शुद्धीकरण 

शास्त्रात दोन संकल्पना आहेत: ‘द्रव्यशुद्धी’ आणि ‘आत्मशुद्धी’.

पहिला मार्ग (देवाजवळ जाणे): जेव्हा आपण देवाला प्रसाद चढवून अपराधमुक्त होऊ पाहतो, तेव्हा ते अनेकदा एक प्रकारची ‘तडजोड’ असते. शास्त्र सांगते की, देव भावाचा भुकेला आहे, द्रव्याचा नाही. जोपर्यंत अंतःकरणात पश्चात्ताप नाही, तोपर्यंत बाह्य उपचारांना केवळ ‘कर्मकांड’ म्हटले जाते. हे मनाला तात्पुरती शांती देऊ शकते, पण अपराधाचे मूळ (बीज) नष्ट करत नाही.

 दुसरा मार्ग (क्षमा मागणे): हा मार्ग ‘सत्य’ आणि ‘धर्मा’वर आधारित आहे. ज्याच्यावर अन्याय झाला त्याला सामोरे जाणे म्हणजे स्वतःच्या चुकीचा आरसा पाहण्यासारखे आहे.

 २. देहबुद्धी आणि अहंकार

प्रत्यक्ष क्षमा मागण्यात ‘कमीपणा’ वाटणे हे देहबुद्धीचे लक्षण आहे.

शास्त्रीय दृष्टिकोन: देहबुद्धी म्हणजे ‘मी शरीर आहे आणि माझी एक सामाजिक प्रतिष्ठा आहे’ हा भ्रम. जेव्हा आपण क्षमा मागायला कच खातो, तेव्हा आपण त्या व्यक्तीला नाही, तर आपल्या ‘अहंकाराला’ वाचवत असतो.

जोपर्यंत हा अहंकार शाबूत आहे, तोपर्यंत केलेली कोणतीही भक्ती ‘सकाम’ असते. भगवद्गीतेनुसार, जो स्वतःला कर्ता मानतो आणि अहंकाराने ग्रासलेला असतो, त्याची बुद्धी शुद्ध नसते.

३. क्षमा‘ – एक आध्यात्मिक साधना

क्षमस्व प्रवृत्तीला शास्त्रात ‘तप’ मानले गेले आहे.

मनःप्रसाद: मनाची प्रसन्नता ही खरी भक्ती आहे. जर एखाद्या व्यक्तीचे मन दुखावून आपण देवापुढे उभे राहिलो, तर ते मन विचलित असते. विचलित मनाने केलेली भक्ती भगवंतापर्यंत पोहोचत नाही, कारण तिथे ‘द्वैत’ (मी आणि तो वेगळा आहे ही भावना) प्रबळ असते.

व्यवहार की परमार्थ: मनाची शुद्धी नसेल तर तो केवळ एक ‘व्यवहार’ ठरतो. व्यवहारात आपण काही देऊन काहीतरी विकत घेतो (प्रसाद देऊन पुण्य विकत घेण्याचा प्रयत्न). पण परमार्थ हा ‘समर्पणाचा’ विषय आहे.

४. मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक सुसंगती

आजचे मानसशास्त्रही सांगते की, जोपर्यंत आपण आपल्या चुकीची जबाबदारी स्वीकारत नाही, तोपर्यंत अपराधभाव मनातून जात नाही. प्रत्यक्ष क्षमा मागितल्याने ‘हृदयग्रंथी’ सुटतात.

जेव्हा आपण नम्र होऊन क्षमा मागतो, तेव्हा देहबुद्धीचा लय होऊ लागतो आणि खऱ्या अर्थाने ‘सात्विक’ भावाचा उदय होतो. असा शुद्ध भाव असलेला भक्तच भगवंताला प्रिय असतो.

थोडक्यात सांगायचे तर:

देवाजवळ जाणे हा ‘भाव’ असेल तर उत्तम, पण तो ‘पळवाट’ असेल तर व्यर्थ आहे. ज्याच्यावर अन्याय झाला त्याची क्षमा मागणे हे कठीण असले तरी तोच ‘चित्तशुद्धीचा’ खरा आणि शास्त्रीय मार्ग आहे. कारण देव हा मंदिरात असण्यापेक्षा सर्व भूतांच्या (व्यक्तींच्या) हृदयात ‘अंतर्यामी’ म्हणून वास करतो. त्यामुळे त्या व्यक्तीची क्षमा मागणे हीच प्रत्यक्षात देवाची क्षमा मागणे होय.

श्रीमद्भगवद्गीता (अहंकार आणि भक्ती)

भगवद्गीतेच्या १८ व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात:

अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम् ।

विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ॥ (१८. ५३)

अर्थ: जो मनुष्य अहंकार, शक्ती, गर्व, काम, क्रोध आणि परिग्रह (संग्रहवृत्ती) यांचा त्याग करतो, जो ‘ममत्व’ (माझेपणा) रहित आणि शांत असतो, तोच ब्रह्मभाव प्राप्त करण्यास पात्र ठरतो.

तुम्ही म्हटल्याप्रमाणे, क्षमा मागताना वाटणारा ‘कमीपणा’ हा या अहंकाराचाच भाग आहे. जोपर्यंत हा अहंकार सुटत नाही, तोपर्यंत देहबुद्धी नष्ट होत नाही.

२. संत तुकाराम महाराज (अंतःकरण शुद्धी)

तुकोबारायांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, जोपर्यंत मन शुद्ध नाही, तोपर्यंत बाह्य उपचारांना महत्त्व नाही:

चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र ही न खाती सर्प तया ॥”

तसेच, प्रसादाच्या किंवा केवळ बाह्य भक्तीच्या संदर्भात ते म्हणतात:

भावेविण भक्ति भक्तिविण मुक्ति । बळेविण शक्ति बोलू नये ॥”

म्हणजेच, जर मनात ‘भाव’ (चुकीची प्रांजळ कबुली) नसेल, तर ती भक्ती केवळ प्रदर्शन ठरते.

३. मनुस्मृती आणि प्रायश्चित्त शास्त्र

धर्मशास्त्रात ‘अनुताप’ (पश्चात्ताप) याला सर्वोच्च प्रायश्चित्त मानले गेले आहे:

ख्यापनेन अनुतापेन तपसा अध्ययनेन च । पापकृन्मुच्यते पापात्… ” (मनुस्मृती ११. २२७)

अर्थ: स्वतःच्या पापाची/चुकीची कबुली देणे (ख्यापन), मनातून पश्चात्ताप होणे (अनुताप) आणि तप करणे, यांमुळेच पापाचे क्षालन होते. केवळ वस्तू अर्पण करून किंवा ‘व्यवहार’ करून पापमुक्त होता येत नाही.

४. संत ज्ञानेश्वर महाराज (अमानित्व गुण)

ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायात ‘अमानित्व’ (अहंकाराचा अभाव) या गुणाचे वर्णन करताना माऊली म्हणतात की, ज्याच्या ठिकाणी ‘मी मोठा आहे’ हा भाव उरलेला नाही, त्याच्याच हृदयात ज्ञान प्रकाशते. प्रत्यक्ष क्षमा मागणे हे ‘अमानित्व’ या गुणाचे प्रकटीकरण आहे.

शास्त्राप्रमाणे, देव हा ‘अंतर्यामी’ आहे. ज्याच्यावर आपण अन्याय केला, त्या व्यक्तीच्या हृदयातही तोच देव आहे. म्हणून त्या व्यक्तीची क्षमा न मागता देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे “मूळ सोडून फांद्यांना पाणी घालण्यासारखे” आहे.

या चिंतनावर काही ओळी सुचल्यात..

अंतरीचा भाव ॥

अपराध घडता हातूनि । मनी दाटे ग्लानी भारी ॥

देवापाशी धावे मन । प्रसादाची थाळी धरी ॥ १ ॥

काय उपेग प्रसादाचा । चित्त शुद्ध नाही जरी ॥

व्यवहाराची ही भक्ती । देवा आवडते का तरी? ॥ २ ॥

क्षमा मागता वाटे हो । कमीपणा देहबुद्धीचा ॥

अहंकाराचा तो पडदा । मार्ग रोखी मुक्तीचा ॥ ३ ॥

ज्यावरी झाला अन्याय । देव वसे त्याच्या हृदयी ॥

पाया पडता तयाच्या । क्षमा करी “आत्मारामा” ॥ ४ ॥

१: जेव्हा आपल्याकडून चूक होते, तेव्हा मन अस्वस्थ होते. पण आपण सोपा मार्ग शोधतो—देवाला काहीतरी ‘अर्पण’ करून स्वतःला मुक्त करून घेण्याचा प्रयत्न करतो.

२: हे ‘व्यवहाराचे’ नाते आहे. अंतःकरण शुद्ध नसल्यास बाह्य उपचार केवळ उपचारच राहतात, त्यात ‘भाव’ नसतो.

३: प्रत्यक्ष क्षमा मागताना जो अडथळा येतो, तो म्हणजे आपला ‘अहंकार’. हाच ‘मी’पणा आपल्याला देहबुद्धीच्या पलीकडे जाऊ देत नाही.

४: ईश्वराचे अधिष्ठान सर्वव्यापी आहे. ज्या व्यक्तीचे आपण मन दुखावले, तिच्यातील ईश्वराची क्षमा मागणे म्हणजेच खऱ्या अर्थाने देवाला शरण जाणे होय.

 भगवंत हृदयस्थ आहे 🙏

©  अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “श्री एकनाथ महाराजांचे एक भारुड” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “श्री एकनाथ महाराजांचे एक भारुड” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री एकनाथ महाराजांचे एक भारूड – निरुपणासह:

चिंचेच्या पानावर देऊळ रचिले,

आधी कळसू मग पाया रे ।

देव पुजू गेले तव देऊळ उडाले,

खेळिया सद्गुरुराया रे ।

पाषाणाची सांगड मृगजळ डोही,

वांझेचा पुत्र पोहला रे ।

दुहीतोंडी हरणी पाणी पिण्या आली,

मुखाविण पाणी प्याली रे ।

आंधळ्याने देखिले, बहिऱ्याने ऐकिले,

पांगळ्याने पाठलाग केला रे ।

एकाजनार्दनी एकपणे विनवी,

हरिच्या नामे तरलो रे ।।

 अर्थ:

चिंचेच्या पानाइतके छोटेसे असे आईचे उदर. त्या उदरात देऊळ म्हणजे नरदेह, त्याची रचना परमेश्वर करतो. हा नरदेह चिंचेच्या पानावर म्हणजे आईच्या उदरात रचला जात असताना, आधी डोके तयार होते. प्रथम मस्तकाची निर्मिती केली जाते व मग इतर अवयव हळूहळू निर्माण होऊ लागतात म्हणून आधी कळस म्हणजे मस्तक आणि मग पाया म्हणजे इतर सर्व अवयव अशी या तुमच्या आमच्या नरदेहरुपी देवळाची रचना आईच्या उदरात म्हणजेच चिंचेच्या पानावर होते असे एकनाथ महाराज सांगतात.

पुढे ते म्हणतात की, बालपण खेळण्यात व तरुणपण कामात निघून जाते. या देवळामध्ये म्हणजे माझ्या नरदेहात देव आहे हे कळून तो पाहायला जाईपर्यंत देऊळ उडून जायची म्हणजे नरदेहात राहण्याची आपली मुदत संपायची वेळ येते म्हणून तत्पूर्वीच, हा खेळ ज्या सद्गुरुरायाने मांडला आहे त्या सद्गुरुला शरण जाऊन देऊळ उडण्याआधी म्हणजे नरदेह हातून निसटून जाण्याआधीच, सद्गुरुला शरण जावे.

दोन पाषाण एकत्र करून बांधलेली सांगड म्हणजे दोन जड देहांचे मिलन. अर्थात लग्न! ते देहाशी देहाचे लावले जाते. तो देह जड असल्याने त्याला पाषाण असे म्हटलेले आहे आणि या दोन जड देहांचे मिलन म्हणजे पाषाणाची सांगड एकत्र झाल्यावर मृगजळ म्हणजे संसार, खऱ्या अर्थाने सुरू होतो. मृगजळ ज्याप्रमाणे प्रत्यक्षात नसूनही भासते त्याप्रमाणेच संसारही प्रत्यक्षात नसून भासत असतो. या संसाररूपी मृगजळात म्हणजे खोट्या कल्पित संसारात अहंकाररुपी वांझेचा पोर पोहून जातो. म्हणजेच संसारात, सर्व काही मी केले म्हणूनच झाले, माझ्याशिवाय इथले पानही हलत नाही हा जो मनुष्य अहंकार बाळगतो त्याला नाथ महाराज वांझेचा पोर म्हणतात. या अहंकाराला आई किंवा बाप नाहीत. हा अहंकार खोटा आहे म्हणूनच त्याला वांझेचा पोर असे म्हटले आहे आणि तो अहंकार आपल्याला खोट्या खोट्या संसारातून पोहून जायला मदत करतो आहे असे आपल्याला भासते.

पुढे ते म्हणतात, या मृगजळाच्या डोहात, दोन तोंडांची हरणी म्हणजे वासना पाणी प्यायला आली. जरी शरीराकडून प्रत्यक्षात वाईट कृती किंवा विषयांचा उपभोग घेतला गेला नाही, तरी वासना मनाकडून वाईट चिंतन घडवते आणि म्हणूनच मुखाविण पाणी प्याली रे. प्रत्यक्षात एखादी व्यक्ती हरिस्मरण करत असेल, तरीही वासनेला जिंकलेले नसल्यास ती वासना त्याला, शरीराने भजनात रमत असतानाही, मनाने विषयांची गोडी चाखवतेच.

आंधळ्याने पाहिले. आंधळे असते ते आमचे ज्ञान कारण ते आपल्यात सुप्तावस्थेत आहे. सद्गुरूंनी चालना दिल्याशिवाय ते ज्ञान डोळस, दिव्य होऊ शकत नाही म्हणून आंधळा असलेला जीवही पाहू लागतो म्हणजे ज्ञानही डोळस बनते जर सद्गुरुला शरण गेलो तर. बहिऱ्याने ऐकिले बहिरा म्हणजे ज्याला कान नाहीत तो.

याबाबतीत पुराण काळातील महादेवांनी पार्वतीला मंत्र दिल्याची गोष्ट उदाहरणादाखल घेता येईल. त्यांनी जेव्हा गुह्य ज्ञान तिला एकांतात बसून सांगितले तेव्हा ते सांगत असताना त्यांना सतत हुंकार ऐकू येत होता. ज्ञान देऊन झाल्यावर त्यांनी डोळे उघडून पाहिले तर पार्वती झोपली होती. मग इतका वेळ हुंकार कोण देत होते, याचा शोध केल्यावर एका मासळीच्या पोटातील गर्भाने ते ज्ञान ऐकताना हुंकार दिल्याचे कळले व त्या मासळीचे पोट फाडल्यावर मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला म्हणून आदिनाथ हे मच्छिंद्रनाथांचे गुरु म्हणून ओळखले जातात. आता, मासळीचे शरीर पाहिल्यास त्या शरीराला कान हा अवयव नसल्याचे आढळते. तिथे फक्त स्पर्श ज्ञान आहे. मग तरीही मासळीच्या पोटातील गर्भाने ते गुह्य ज्ञान ऐकून हुंकार द्यावा याचाच अर्थ आत्मज्ञान प्राप्तीसाठी बाहेरील कान या अवयवाची गरज नसून सर्वांगाचे कान करून एकचित्ताने ते ज्ञान ऐकणे इथे अभिप्रेत असावे असे वाटते म्हणून बहिऱ्याने ऐकिले. याचाच अर्थ बाकी सगळीकडचे चित्त काढून, सर्वांगाचे कान करून, गुरूंनी दिलेला मंत्र, गुह्य ज्ञान ऐकणे हा अर्थ नाथांना अभिप्रेत असावा असे वाटते. शिष्य कितीही बहिरा असला म्हणजे आत्मज्ञान ऐकण्याच्या तयारीचा नसला, तरी सांगणारा गुरु जर ब्रह्मनिष्ठ व श्रोत्रीय मिळाला तर बहिराही ऐकू शकतो म्हणजे त्याच्याकडूनही उत्तम श्रवण घडते. पांगळ्याने पाठलाग केला रे. इथे पांगळे आहे ते आमचे मन कारण मनाला पाय हा अवयव नाही. पण तरीही ते आमच्या पायांपेक्षा कितीतरी जलद गतीने, कुठेही, केव्हाही जाऊ शकते म्हणून पांगळे म्हणजे मन ते या गुरुवचनाचा पाठलाग करू लागते आणि म्हणूनच नाथ महाराज म्हणतात की, जनार्दन स्वामींच्या कृपेने, जी अनुभूती मला मिळाली, त्यावरून मी सांगतो की, जरी तुमच्याजवळ अहंकार असेल, वासना असेल, ज्ञान आहे पण ते सदोष आहे, किंवा आंधळे आहे, दिव्य ज्ञान नाही, गुरूंचा बोध ऐकण्याची उत्सुकता नाही, मन सैरावैरा विषयांकडे धावत आहे. अशा सर्व परिस्थितीतही जर गुरूंनी दिलेले नाम जवळ बाळगले तर तुम्ही नक्की तरून जाल. गुरुकडून हरिनाम मला मिळाले, त्या हरिनामामुळेच मी तरून गेलो म्हणून मी एकपणाने तुम्हाला विनवित आहे की, एकचित्ताने सर्वांनी नाम घ्या आणि देऊळ उडण्याआधीच त्या देवळातील देवाची ओळख करून घ्या.

।। श्री राम जय राम जय जय राम।।

 लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ धटिंगण… (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ क्षण सृजनाचा ☆

☆ धटिंगण … (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

परवा आणि काल राज्यात अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस सुरू असल्याच्या बातम्या सतत ऐकू येत होत्या … अनेक ठिकाणी पडत असलेल्या मुसळधार पावसाचे .. कुठे कुठे पडत असलेल्या गारांचे व्हिडीओज व्हाट्सअप वर आणि टी व्ही वरच्या बातम्यांमध्ये सतत बघायला मिळत होते. आमच्या गावातही दुपारभर स्वच्छ असलेलं आकाश दुपारनंतर झाकोळायला लागलं होतं… आणि ते सगळं वातावरण पाहून पावासाच्याही आधी मनात शब्दांची टपटप सुरू झाली … गारा वेचाव्यात तसे घाईघाईने ते शब्द वेचतांना अचानक कागदावर तशीच घाईघाईने उतरली एक कविता .. .. .. ..

☆ धटिंगण … ☆

निळ्याशार त्या आकाशात

अवचित आला ढग काळा

एकटं न येता, सोबतीला 

आणला सगळा गोतावळा .. .. ..

*

पाहून त्याला घाबरले

सगळे ढग पांढरे पांढरे

निवांत मुक्त बागडणारे

क्षणात झाले कावरेबावरे .. .. .. 

*

इथे तिथे जागा शोधून

बसले सगळे लपून

मग आभाळाची निळाईही

बसली मागे दडून .. .. ..

*

यजमान गायब झाले सगळे

पाहुणे काळे चिडले

सैरभैर होऊन आभाळभर

शोधत त्यांना राहिले .. .. ..

*

संताप झाला .. संयम संपला

अन गर्जना सुरु झाल्या

शीर कपाळी तडतडे तशा

विजा तडतडू लागल्या .. .. ..

*

संतापाचे अश्रू अनावर

भान विसरून कोसळले

धटिंगणाने धरेला उगीच

धो धो झोडपून काढले .. .. .. 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भगिनी निवेदिता ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

☆ भगिनी निवेदिता ☆ शालिनी जोशी

भगिनी निवेदिता

 जी स्वतःचा उल्लेख ‘ रामकृष्ण- विवेकानंद यांची निवेदिता’ असा करत असे, ती स्वामी विवेकानंदांची मानस कन्या म्हणजे मार्गारेट एलिझाबेथ नोबल. यांचा जन्म २८ ऑक्टोबर १८६७ रोजी उत्तर आयर्लंड मध्ये झाला. वडील सॅम्युएल आणि आई मेरी यांचे हे पहिले अपत्य. कुटुंब धार्मिक, सात्विक व सुशील होते. मेरी नोबेलने इतर अनेक धर्मशील स्त्रियांप्रमाणे मनात प्रार्थना केली होती, ‘ ईश्वरा, माझं बाळ सुखरूप जन्माला आलं तर तुला अर्पण करीन’. ती प्रतिज्ञा खरी ठरली. मार्गारेटने आपले जीवन भारतीय समाजाच्या सेवेसाठी अर्पण केले. आपले सद्गुरु विवेकानंद यांचे कडून निवेदिता म्हणजे ‘जीवन समर्पित केले आहे अशी’ हे अभिधान प्राप्त केले.

 मार्गारेट यांचे प्राथमिक शिक्षण मँचेस्टर येथे झाले. वडिलांच्या निधनानंतर लंडन येथे शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. हसतहसत बालशिक्षण या शिक्षण पद्धतीचा सखोल अभ्यास करून १८९२ मध्ये नव्या शिक्षण पद्धतीने शिक्षण देणारी शाळा सुरू केली. १८९४ मध्ये क्रांतिकारकानी स्थापन केलेल्या सिनफेन या पक्षाचे सदस्यत्व स्विकारले. १८९३ च्या सर्वधर्म परिषदेनंतर विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. १८९६ मध्ये लंडन येथे विवेकानंदांची व्याख्याने त्यांनी ऐकली. त्यांना सद्गुरु मिळाले. स्वामी विवेकानंदांच्या कार्यात भाग घेण्यासाठी १८९८ मध्ये निवेदिता भारतात आल्या.

 भारतात त्या कलकत्ता येथे राहिल्या. हिंदू चालीरीती परंपरा समजावून घेतल्या. रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी शारदादेवी यांची भेट घेतली. हिंदू धर्म स्वीकारला. हिंदुस्थान हेच कार्यक्षेत्र निश्चित केले. १८९८ मध्ये ब्रह्मवादीनी व्रताची दीक्षा घेतली. इंग्लंडकडून भारताला मिळालेली अमोल देणगी, असा विवेकानंद निवेदिताचा उल्लेख करत. हिंदू पुराणांचा व ग्रंथांचा अभ्यास निवेदिताने केला. विवेकानंदांच्या बरोबर सर्वत्र त्या जात. १८९८ मध्ये आलेल्या प्लेगच्या साथीत स्वामीजी व इतर शिष्यांबरोबर रोगग्रस्तांची सेवा त्यांनी केली. स्वच्छता केली व त्याचे महत्त्व लोकांना पटवून दिले. वेदांतील निष्काम कर्मयोग आचरणात आणला. बंगालच्या दुष्काळात लोकांना मदत केली. बालिका विद्यालय सुरू केले. त्याचे उद्घाटन शारदा देवीनी केले. बालविवाहित व अनाथ स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी घरगुती उद्योगांबरोबर आणि भूगोल, इतिहास, गणित हे विषय शिकवले. जेणेकरून स्त्रिया सर्व अंगानी कर्तबगार व्हाव्या. बालिका विद्यालयातील तीन मुलींची संख्या ३० झाली. स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी मातृमंदिराची स्थापना केली. व्याख्याने, लेखन करून सत् मार्गाने मिळवलेला पैसा या कार्यात खर्च केला. मी हिंदू आणि सर्व स्त्रिया माझ्या मुली हा त्यांचा भाव होता. गरजवंताला मदत हे ध्येय होते. त्यामुळे लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला. त्या सर्वांच्या भगिनी झाल्या.

 स्वातंत्र्य चळवळीतही त्यानी सहभाग घेतला. हे रामकृष्ण मिशनच्या विचाराविरुद्ध होते म्हणून काही काळ ते काम थांबवले. लेखन, भाषण द्वारे स्वदेशी चळवळीत सक्रिय भाग घेतला. स्वामी विवेकानंद यांच्या निधनानंतर त्यांचा कसोटीचा काय होता. पण हाती घेतलेले काम सुरू ठेवण्याचा त्यांनी निश्चय केला. बंगालच्या विभाजनाला इंग्रजांना निषेध केला. अशीही अद्वितीय प्रतिभावंत स्त्री विवेकानंदांच्या परिश्रमाने भारतीयत्वात पूर्ण विलीन झाली. मी विवेकानंदांची मानसकन्या जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची विस्मृती लोकांना होऊ देणार नाही. असा पण त्यांनी केला होता. निवेदितांचे जहाल विचार, ब्रिटिश सरकार विरुद्धच्या हालचाली, युवकांच्या मनात स्वातंत्र्याबद्दल आस निर्माण करणे या कार्यामुळे ब्रिटिश गुप्तहेरांची पाळत त्यांच्यावरती राहू लागली होती. युवकांसमोर आपल्या राष्ट्राचे चिन्ह असावे या भावनेने वज्राचे चिन्ह असलेला ध्वज तयार केला. तरुणांनी परदेशी जाऊन प्रशिक्षण घ्यावे ही कल्पना मांडली व अमलात आणली. परदेशातील क्रांतिकारी चळवळीची ग्रंथसंपदा भारतीय तरुणांना मिळवून दिली. जगदीशचंद्र बसू (वनस्पती शास्त्रज्ञ), रवींद्रनाथ टागोर, त्यांचे बंधू अवनीन्द्रनाथ, अरविंद घोष, बंगाली इतिहासतज्ञ रमेशचंद्र दत्त या सर्वांशी त्यांचे संबंध चांगले होते. त्यांनी बरेच ग्रंथ व लेख लिहिले. हिंदू संस्कृती आणि समाज पद्धती याविषयीचा त्यांचा ग्रंथ गाजला.

 १३ ऑक्टोबर १९११ रोजी त्यांनी इहलोकाचा प्रवास संपवला. त्यांचे अखेरचे वाक्य होते, ‘ मी आता चालले तरी भारतात ध्येयसूर्याचा उदय मी पाहिनच पाहिन. ‘ त्यांचे कार्य आणि शेवटचे वाक्य युवकांना प्रेरणादायी असेच आहे.

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘पडद्यामागची माणसं…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘पडद्यामागची माणसं…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

माझ्या मुलाने चि. प्रसादने माझ्यासाठी मोठ्ठा खजिना म्हणजे, मोबाईल मला दिला आणि व्हाट्सअप तर्फे खूप ओळखी होऊन तो मोबाईल आता जग्नमित्र झाला आहे’ अनेक मान्यवरांच्या ओळखी झाल्या – – ज्योतसे ज्योत जगाके चलो l प्रेम की गंगा बहाते चलो l – – तशा ओळखी वाढून अनेक पडद्यामागच्या कलाकारांची ओळख झाली आणि धुळ्याचे अशोक भाऊ सोनार यांची ओळख वाढली.

धुळ्याच्या पेट्रोल पंपावर ते काम करतात. नोकरीची उंची महत्वाची नसते तर विचारांची उंचीचं श्रेष्ठ ठरते. आमच्या प्रत्यक्ष ओळखी झाल्या नव्हत्या. पण तंत्रज्ञानाच्या करामतीमुळे व्हाट्सअप तर्फे ओळख झाली ती अशी की आमच्या कथा सामायिक झाल्या की पहिला फोन अशोक भाऊंचाच येतो. ते सांगतात पेट्रोल पंपावर काम करतांना मधल्या वेळेत मोबाईल उघडून मी अगदी अधाशासारखा तुम्हां लेखकांच्या कथा वाचतो आणि ताबडतोब लेखकांना कथा आवडल्याचा फोन करतो. लेखी उत्तर देण्याइतका मी सज्ञान नसलो तरी तोंडी कौतुक अभिप्राय द्यायला मी पुढे सरसावतो. ” 

मेघ:श्याम सोनवणे सरांचा कथा सामायिक करण्याचा उत्साह, उपक्रम प्रशंसनीय आहे अनेक कथांना न्याय देताना त्यांना लेखकांना वेळ द्यावा लागतो. माझ्या कथेलाही त्यांच्या प्रकृती अस्वाथ्यामुळे त्यांना वेळ द्यावा लागला. अशोक भाऊनी त्यांना लगेच फोन केला, “अहो सर पंडित मॅडमच्या कथा पाठवा की लवकर, म्हणजे मला त्यांना फोन करता येईल. “

… फारसे शिक्षण नसतांनाही त्यांची साहित्याची ‘जाण’, वाचनाची उडी उंच आहे. एखादा वक्ता काय बोलेलं इतकी त्यांची लेखकांना प्रतिक्रिया देण्याची पद्धत अवाक करणारी असते. पहिलं गिऱ्हाईक वाटेला लावून दुसरं गिऱ्हाईक येईपर्यंत ते मधल्या वेळात मिळेल ती कथा अगदी भुकेल्या माणसासारखी वाचतात. ते म्हणाले, “माझी साहित्याची भुक बकासुरासारखी आहे ” 

मी हसून प्रश्न विचारला, ” अशोक भाऊ इतकी तल्लख बुद्धी, इतकं संभाषणचातुर्य तुम्ही शिकलात कुठे? ” त्यावर त्यांचं परखड उत्तर आलं, ” अहो मॅडम कुठलं शिक्षण आणि कुठलं काय! शिक्षण घ्यायला शाळेत जावं लागतं ना? मी शाळेतच गेलो नाही तर कोणते गुरुजी मला वरच्या वर्गात चढवणार? गरीबीनी आणि रिकाम्या पोटाने मला वर्गात बसू दिले नाही. कारण दिवसभर नुसत्या चहाच्या पाण्यावर राहणं सोपं आहे का? तुम्हीच सांगा मला, “

मी नवलाईने विचारलं “हो पण मग, तुमचं इतके वाचन, साहित्यिक भाषा, जनरल नॉलेज शाळेत न जाता तुम्ही कसं काय मिळवलत? ” 

 “काय सांगू मॅडम भुकेने पोटात लचके तोडल्यासारखं वाटायचं. मग मास्तरांचं शिकवण म्हणजे माझ्या बुद्धी पलीकडचं काम व्हायचं. कशातच लक्ष लागायचं नाही मग एक दिवस गुरुजींच्या पायाला हात लावून शाळेकडे पाठ फिरवून मी घरचा रस्ता धरला घरी आल्यावर आईने मला चांगलंच धोपटलं. आणि माझी ‘शाळा’ घेतली. असाच उनाडक्या मारत फिरत असताना त्या मायने मला मारतच घरी आणलं. आणि म्हणाली, ” मी भाकर करतीया तर बैस इथे, हे घे बालभारतीचे पुस्तक आणि वाचं. ” – – 

– “अग पण माय! मला कुठे वाचता येतया? “शाळला जात नाहीस गावभर भटकतोस कसं येईल तुला वाचता? ते काय नाय आज पासून तू घरीच शिकायचंस कसं वाचता येत नाही ते बघतेचं मी” मायने मला फटकारले… “ अग पण! अग पण! “ मी अडखळलो. मला म्हणायचं होतं “तुला तरी कुठे येते य वाचता? आणखी मला तिला म्हणायचं होतं, माय भाकरीचा खरपूस वास नाकात शिरतोय, आणि पोटात भुकेचा डोंब उसळलाय ग बाई! आधी भाकर तरी दे” – – हे मनांत म्हणताना, माझी नजर पुन्हा पुन्हा तव्यावरच्या भाकरीकडे वळत होती. मायच्या ते लक्षात आलं. क्षणभर ती कळवळली. पण लगेच कठोर होऊन ती कडाडली, ”हा धडा वाच. धड्याचे नाव आहे खरा दागिना ‘ “ 

“अगं पण! “पुन्हा मी तुणतुणं वाजवलं, तर चित्र माझ्यापुढे नाचवत ती म्हणाली “हे चित्र बघ आणि त्याच्यावरून काय दिसतं ते पाहून वाक्य तयार कर. हळूहळू असं वाचायला पण शिकशील. ”

– – आणि काय सांगू मॅडम! माझ्या आईचे शब्द खरे ठरले. चित्र बघून वाक्य जोडत मी वाचायला शिकलो. आमचं खोपट म्हणजे माझी शाळा झाली, आणि त्या शाळेतली माझी गुरु झाली होती माझी माय. ” 

– – तो धडा अशोकभाऊंच्या मनात कायम कोरला गेला. एक श्रीमंत उंची कपडे घातलेला दागिन्यांनी मढलेला किडकिडीत मुलगा, तर दुसरा हुशार धष्टपुष्ट, आरोग्यपूर्ण मुलगा दोघांच्या तुलनेत मास्तरांच्या परीक्षेत खरा दागिना म्हणजे शिक्षणात आणि आरोग्यात दुसरा मुलगा उत्तीर्ण झाला. अशोक भाऊंच्या मनात बिंबलेला तो धडा अगदी खोलवर रुजला आहे.

परिस्थितीमुळे खूप नाही शिकता आलं तरी साहित्याच्या मेळाव्यात ते अग्रगण्य आहेत त्यांच्या ओळखी त्यांचा लोकसंग्रह, वाचनाची धडपड आणि प्रतिक्रिया देण्याचा उत्साह अमाप आहे. वेळात वेळ काढून छोटी मोठी कथा वाचली की ते लेखकांचा नंबर अभिप्राय देण्यासाठी तत्परतेने फिरवतात. कधी कधी माझी कथा सामायिक झाल्याचं माझ्या आधी त्यांनाच कळतं. आणि त्यांचा लगेच फोन येतो, “राधिका पंडीत मॅडम आज तुमची कथा आली आहे बरं का! मी वाचलीय आवडली मला. म्हणून तर तुम्हाला लगेच फोन लावलाय”.

बालभारती दिन नुकताच साजरा झाला. आणि मला आठवले ते अशोक भाऊ, आणि त्यांची माऊली. तेव्हां मुखपृष्ठावरचं चित्र बघून ती म्हणाली असेल, “बघ हे चित्र! आणि म्हण मी ह्या मुलांसारखा वाचायला शिकणार आहे. ”.. आणि खरोखरच माऊलीच्या इच्छेप्रमाणे अशोकभाऊनी आपला वाचनाचा व्यासंग वाढवला.

… आता साठीतल्या अशोक भाऊंचा वाचन हा छन्दचं झाला आहे. धुळ्याच्या पेट्रोल पंपावर तुम्ही गेलात ना, की तुम्हाला पुस्तकात डोकं खुपसलेले वाचनात गढलेले अशोकभाऊ नक्कीच भेटतील. त्यांना एखादं छोटसं पुस्तक तुम्ही भेट द्या ते जाम खुश होतील. आयुष्याच्या प्रवासात अशी कितीतरी माणसं येतात आणि एक आपला आगळा वेगळा असा ठसा उमटवतात. त्यापैकीच एक आहेत अशोकभाऊ सोनार..

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “समृद्ध खजिना…” ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “समृद्ध खजिना …” ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

२५ मार्च – वपु काळे यांची जयंती.. त्यानिमित्ताने सहज भूतकाळात गेलो. त्यांच्याशी माझी मैत्री अखेरपर्यंत होती. ९० च्या दशकात पत्रसंवाद हेच साधन होते आणि मी माझ्या आवडत्या लोकांना पत्राद्वारे संपर्क करून स्नेहबंध जुळून येत गेले. नारायण सुर्वे, शिरीष काणेकर, पुल तसेच वपु ही!

मात्र वपुशी असलेली मैत्री हा माझा खऱ्या अर्थाने समृद्ध खजिना!

 

माझ्याकडे नवीन काही घडलं की मी आवर्जून त्यांना कळवायचो. तेही त्या प्रत्येक पत्राला नक्की उत्तर द्यायचे! तसेच त्यांच्याकडे नवीन काही घडलं की ते आवर्जून मला कळवायचे. असा पत्र संवाद सुमारे २५ वर्ष सुरु होता. त्यांची एक एक पत्र म्हणजे जणू साहित्यिक मेजवानीच…

 

नंतर प्रत्यक्ष भेटीचे योग येत गेले. पुण्यात कुठं त्यांचा कार्यक्रम असला की हमखास आधी मला कळवून “भेटूया” असं म्हणायचे. टिळक स्मारकाच्या ग्रीन रुममध्ये अशा कैक गप्पांच्या मैफिली रंगलेल्या!!

त्यांची केवळ पत्रच वाचनीय असायची असं नाही तर त्या पत्राचे एन्व्हलप पण तितकेच प्रत्येकवेळी वाचनीय आणि देखणे असायचे.

वाचकांची आलेली पत्रे आणि त्याला त्यांनी दिलेली उत्तरे याचेच त्यांनी दोन भागात पुस्तक काढले! प्लेजर बॉक्स या नावाने!

आणि दोन्ही भागात माझं एक एक पत्र आणि त्यांनी दिलेलं उत्तर छापलं आहे! हे किती आनंदाचे!

 

त्यांच्या पत्रसंवादाचा एक अफलातून नमुना सोबत पहा.

माझं लग्न झालं त्यावेळी मी त्यांना ते कळवून सोबत आमच्या जोडीचा फोटो पाठवला. मी माझ्या लेटरहेडवर ते पत्र पाठवलेलं. ते पाहून त्यांनी त्यांच्यासाठी पण छान एखाद डिझाईन करून द्याल का मला? असं विचारलं!! हे किती भाग्य. अर्थात नंतर मी त्यांना ते डिझाईन करून दिले जे नंतर शेवट्पर्यंत वापरत होते.

तर माझ्या लग्नाबद्दल त्यांनी पाठवलेलं पत्र आणि त्याचे इन्व्हलप… दोन्ही पहा… यावरून त्यांच्या अफाट सृजनशीलतेचा कल्पना येते!

*

वपुंची अशी पत्र हा माझा समृद्ध खजिना!

वपु ऑल टाइम तुम्ही ग्रेट आहात!

विनम्र अभिवादन!

© डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares