मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘मी मस्त आहे…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆

श्री ब्रह्मानंद पै

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘मी मस्त आहे…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै 

वय झाले अजून मस्ती गेली नाही

विचार धावतात पण शरीर साथ देत नाही

कळते आहे पण वळत नाही

कोणावर विश्वास ठेवायचा तेच समजत नाही

तरी पण मी मस्त आहे….

  

काय होतंय सांगता येत नाही

दुखतात गुढगे सांगायचे नाही

कुणाकडे जाताही येत नाही

सावकाश चालायचे हेच आता उरले

तरी पण मी मस्त आहे….

  

थकले शरीर जरी

नजर अजून शाबूत आहे

थकल्या जीवाला

थोडी उभारी देत आहे

तरी पण मी मस्त आहे….

 

आताशा  मोजकेच दात तासून 

त्यावर टोप्या (cap) घातल्यात

तेव्हा कुठे दुःख थांबले

कुस्करून खाल्ले

तेव्हा पचायला लागले

तरी पण मी मस्त आहे….

 

वाचायला घेतले धुरकट दिसते

चष्मा लावला तर पाणी सुटते

डोळे पुसत वाचण्यापेक्षा

न वाचलेले परवडते

तरी पण मी मस्त आहे….

 

लिहायला घेतले तर हात कापतात

शब्दांवरच्या रेषा सरळ कुठे येतात?

साधी स्वाक्षरी पण धड येत नाही

चेक परत का येतात तेच समजत नाही

तरी पण मी मस्त आहे….

 

उलटा बनियन तर नेहमीच असतो

तरी बरे तो आत झाकला जातो

घरातले हसतातच

तरी पण मी मस्त आहे….

 

कानात हुंकार वाजत असतात

शब्द अस्पष्ट ऐकू येतात

अनुभवाने समजून  घेतो

आणि मगच उत्तर देतो

तरी पण मी मस्त आहे….

 

वाचयला घेतले तरी लक्ष लागत नाही

वाचलेलेसुद्धा काही लक्षात रहात नाही

मित्रांशिवाय कुणाला काही सांगत नाही

समदुःखाची कथा बाकीच्यांना पटणार नाही

तरी पण मी मस्त आहे….

 

बरेच आयुष्य जगून घेतले

अजून थोडे बाकी आहे

उरलेले मात्र सुखात जावे

एवढीच इच्छा बाकी आहे

तरी पण मी मस्त आहे…

 

संसाराचे सारे पाश

आता पूर्ण सोडायचे आहेत

उरलेली पुंजी संपेपर्यंत

आनंदी जगायचे आहे

तरी पण मी मस्त आहे….

 

आपल्याच धुंदीत जगलो आहे

पाहिजे ते मिळवले आहे

उपभोगून आयुष्य सारे

गात्रे शिथिल होत आहेत

तरी पण मी मस्त आहे….

 

आयुष्यात ज्यांनी साथ दिली

काहींनी मध्येच साथ सोडली

कोणाचेच काही अडलं नाही

तरी सर्वांचा मी आभारी आहे

आणि मी मस्त आहे….

 

भार कोणावर टाकायचा नाही

झटपट मात्र बोलावणे यावे

इतरांना हवेहवे वाटताना

आपण निसर्गात विलीन व्हावे

तरी पण मी मस्त आहे….

          आणि  हे देवा  ,

तिथे पण मी मस्त रहावे….

लेखक: अज्ञात 

प्रस्तुती: श्री. ब्रह्मानंद पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३३८ ☆ डेटवर घेऊन चला… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३३८ ?

☆ डेटवर घेऊन चला… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

माझ्यातल्या, दाखवीन एक एक कला

राया मला, डेटवर घेऊन चला

*

भिडवीत असता नुसत्याच नजरा

कधीच नाही तुम्ही, आणलात गजरा

नुसतं म्हणता, मला प्रीतीच्या फुला

राया मला डेटवर घेऊन चला

*

उगा नका घाबरू मी, त्यातली नाही

दरीत डोकावून, सारखाच पाही

मिळताच मोका, करू प्रेमाच्या लिला

राया मला डेटवर घेऊन चला

*

स्टेरिंग गाडीचं, करतंय वळवळ

घाटामुळे मला, होतेय मळमळ

गाडी कशी, नेहमीच लागते मला

राया मला डेटवर घेऊन चला

*

डोहाळे पुरवाल तुम्ही माझे सारे

दिवसाढवळ्याच पाहुयात तारे

असा तुम्ही, सजवून आणाल झुला

राया मला डेटवर घेऊन चला

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दिस झुल्याविना…! ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ दिस झुल्याविना…! ☆ श्रीशैल चौगुले ☆

पंचमीचा झोका बाई

अजुनी मनात झुले

गाणीही विरुन गेली

श्रावण माहेरातले.

*

वारा हृदयी भिडतो

पाखरे सवे बोलती

तरि सरले दिवस

खोल वेदना सलते.

*

काय सांगू नागपुजा

मंदिरी उपवास सुख

भक्ती विसरता ही पिढी

होतसे सृष्टीसही दुःख.

*

लोपली संस्कृती बाई

बंधुप्रेम दुरावले

माय संस्काराचे घर

झुल्याविना पानावले.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ रडू आवरेना ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? रडू आवरेना ? श्री आशिष  बिवलकर ☆

साखर महाग | तोंड झाले कडू |

सामान्यांना रडू | आवरेना ||१||

*

साखर सम्राट | झाले मालामाल |

जनता कंगाल | सद्यस्थिती ||२||

*

कृतिम टंचाई | साठेबाजी धंदा |

महागाई फंदा | गळ्यामध्ये ||३||

*

इथेनॉलसाठी | गाळपला ऊस |

सामान्यांची कूस | मोडूनिया ||४||

*

उसाला लागला | इथेनॉल कोल्हा |

खिशावर डल्ला | सामान्यांच्या ||५||

*

सहकार क्षेत्र | संपूर्ण उध्वस्त |

कारखाने फस्त | स्वार्थासाठी ||६||

*

सामान्यांच्या माथी | रोज नवा धोंडा |

अच्छेदिन गंडा | घालोनिया ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संवाद… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ संवाद… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

खोटा विचार आहे ह्या राजकारण्यांचा

त्यानीच मांडला हो बाजार माणसांचा

मग्रूर आणि लोभी झालेत हे पुढारी

केलाय आज त्यानी कचराच कायद्य्यांचा

का ही निमूट झाली जनता इथे कळेना

डोळे मिटून बघते अन्याय बावळ्यांचा

या आंधळ्या प्रजेला येईल जाग तेंव्हा

उडवील बोजवारा सगळ्याच धोरणांचा

 *

कमजोर लोकशाही होतेय रोज येथे

उरलाच धाक नाही कुठल्याच संस्कृतीचा

पैसा कुठून कोठे पळतोय ते कळेना

देवासही तडाखा बसलाय चोरट्यांचा

 *

अंधार दाटलेले दिसते भविष्य येथे

होईल रोज सौदा आभाळ चांदण्यांचा

शास्त्रौक्त वेद तेव्हा धरतील मौन सारे

होईल काय सांगा‌ उपयोग मांत्रीकांचा

 *

स्वातंत्र्य मिळवलेले जपणे जरूर आहे

ठेवा विचार ध्यानी आता नव्या पिढ्यांचा

सांभाळण्यास त्याना घेऊ जबाबदारी

त्यांच्या सवे करूया संवाद जीवनाचा

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ उमेद… ☆ श्री स्वानंद कुलकर्णी ☆

श्री स्वानंद कुलकर्णी

परिचय

श्री स्वानंद चिंतामणी कुलकर्णी.

शिक्षण – MSc Computer Science

साहित्यिक परिचय – साधारण इयत्ता १० वी पासून कविता लेखनाला सुरुवात झाली. कवितेच्या जगात जास्त रमलो. ललितलेखन, कथालेखन, चिंतनात्मक लेखन याचीही मुशाफिरी केली परंतु आतून ओढा नेहमी कवितेकडे, गीतरचनेकडे राहिला आहे. वृत्तबद्ध, छंदोबद्ध रचनांचा अभ्यास केल्यानंतर त्याची आवड निर्माण झाली. मुक्तछंद लिहिताना पण लयीत लिहिण्याची आवड कायम राहिली. कवितेत यमक अलंकार फार आवडता आहे. कवितेचे विषय निसर्ग, वैचारिक, चिंतनात्मक, प्रसंग चित्रणात्मक अशा प्रांतात वावरणारे जास्त आहेत. ग दि माडगूळकर, बा भ बोरकर, कुसुमाग्रज, गोविंदाग्रज, मंगेश पाडगावकर हे अत्यंत आवडते कवी आहेत. संत वा‌ङमय, अभंग यांची आवड आहे. कवींच्या, संताच्या रचनांचा व्यासंग आणि अभ्यास करणे आवडते. विविध काव्यसंमेलने आणि काव्यस्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे.

? कवितेचा उत्सव ?

☆ उमेद… ☆ श्री स्वानंद कुलकर्णी 

 

उमेद घेउन आकाशातुन सूर्य अंबरी आला

ज्योत त्याची शतवातींची उजळवते जगताला

त्याच्या कोमट स्पर्शाने उब तरुवेलींना मिळते

मुख किरणांचे गिरी तमांचे आत आपल्या गिळते

*

 जाग कळ्यांना आली थोडी रंग वेलीस चढला

काकण भरल्या हातांमधून सडा अंगणी पडला

रांगोळीचे कण विस्कटले सुरेख रेखत नक्षी

आभाळाच्या प्रवासास वर उडले इवले पक्षी

घनमालांच्या घरास तोरण सोनसळीचे शोभे

उमलणाऱ्या फुलाफुलांचे अत्तर हवेस लागे

चराचराला प्राण लाभले भोवताली जग जागे

रंग ऋतूंचा गंध फुलांचा बाग मनाची मागे

 *

प्रसन्न होउन फुले पाहती झाड हासते मौजी

उतरून जाती भिती काळजी खांद्यावरची ओझी

मौना आतुन सुचे प्रार्थना स्मित विसावे ओठी

सुखदुःखाची लाट पाहतो पैल उभारुन काठी

 

© श्री स्वानंद कुलकर्णी

गाव – शिरोळ तालुका – शिरोळ जिल्हा – कोल्हापूर

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ सूर्य स्तोत्र ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

डॉ. निशिकांत श्रोत्री

📚 क्षण सृजनाचा 📚

☆ सूर्य स्तोत्र ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

श्रावण महिन्याचे महत्व लक्षात घेऊन, आज रविवार असल्यामुळे हे सूर्य स्तोत्र सादर करण्यात येत आहे. मूळ संस्कृत व त्याचा भावानुवाद.

☆  सूर्य स्तोत्र – महर्षि मयासूर ☆

प्रात: स्मरामि खलु तत्सवितुर्वरेण्यंरूपं हि मण्डलमृचोऽथ तनुर्यजूंषी।

सामानि यस्य किरणा: प्रभवादिहेतुं ब्रह्माहरात्मकमलक्ष्यचिन्त्यरूपम् ।।१।।

*

प्रातर्नमामि तरणिं तनुवाऽमनोभि ब्रह्मेन्द्रपूर्वकसुरैनतमर्चितं च।

वृष्टि प्रमोचन विनिग्रह हेतुभूतं त्रैलोक्य पालनपरंत्रिगुणात्मकं च।।२।।

*

प्रातर्भजामि सवितारमनन्तशक्तिं पापौघशत्रुभयरोगहरं परं चं।

तं सर्वलोककनाकात्मककालमूर्ति गोकण्ठबंधन विमोचनमादिदेवम् ।।३।।

*

ॐ चित्रं देवानामुदगादनीकं चक्षुर्मित्रस्य वरुणस्याग्ने:।

आप्रा धावाप्रथिवी अन्तरिक्षं सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्र्व ।।४।।

*

सूर्यो देवीमुषसं रोचमानां मत्योन योषामभ्येति पश्र्वात्।

यत्रा नरो देवयन्तो युगानि वितन्वते प्रति भद्राय भद्रम् ।।५।।

☆  सूर्य स्तोत्र ☆ भावानुवाद : डॉ. निशिकान्त श्रोत्री ☆

प्रभाते स्मरितो श्रेष्ठ सविता रूप मी

ब्रह्माण्ड केंद्रवासी यज्ञकर्ता देहस्वामी ।

समप्रकाशी किरणे उत्पत्तीमूल अहंकार विना

ब्रह्मासमान पद्मशुद्ध सदैव चिंतनीय मना ॥१॥

*

सकलांचा तारणहार सुंदरदेही मनप्रसन्न

ब्रह्मेंद्रादी देवता अर्चिती त्या प्रभाते नमन

त्रिगुणीपूर्ण वर्षाकारक संरक्षक नियंत्रक

सकलांचा पालनकर्ता त्रैलोक्याचा पालक ॥२॥

*

प्रभाते भजितो सवितृदेव अनंत शक्तीचा

पापानाशक रोगहारक निवारक शत्रुभयाचा

मूर्तिमान कालस्वरूपी चक्षु समस्त लोकांचा

नमन आदिदेवासी हटवी पाश जसा गोकंठाचा ॥३॥

*

ॐ देवतांस्तव उधळित उदय प्रकाशाचा

मित्राचा नेत्र स्वामी वरुणाचा अग्नीचा

धारयितो पृथ्वी अंतरिक्ष तथा भास्कराला

आत्मा हा विश्वाचा श्रवण करितो विश्वाला ॥४॥

*

उषादेवी संगे प्रकाशमान सूर्य देदिप्यमान

अंत समयी नारीस देउन साथ करी रक्षण

प्रतिक्षा करिती जेथ मनुज पूजिती देवतांसी

शुभ कल्याण तेथ होई शुभ कल्याणासी ॥५॥

॥ इति श्री महर्षि मयासूर रचित निशिकान्त भावानुवादित श्री सूर्यस्तोत्र संपूर्ण ॥

जरी हे स्तोत्र सूर्य स्तोत्र म्हणून प्रसिद्ध असले तरी हे स्तवन सूर्यमालेतील सूर्याचे नसून ते विश्वकेंद्री सवितृ देवाचे म्हणजेच विश्वात्म्याचे आहे. विशेषतः हे पहिला व चौथ्या श्लोकांमधून स्पष्ट होते.

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १०१ आणि १०२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १०१ आणि १०२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

 श्लोक क्र. १०१ – – 

जया नावडे नाम त्या येम जाची ।

विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची ।

म्हणोनी अति आदरे नाम घ्यावे ।

मुखे बोलता दोष जाती स्वभावे ।।१०१।।

अर्थ : ज्या व्यक्तीला भगवंताचे नाम आवडत नाही अशा व्यक्तीला यम त्रास देतो. नामाबद्दल शंका आणि नाना प्रकारचे तर्क कुतर्क ज्याच्या मनात येतात अशा व्यक्तीला तिरस्करणीय नरक प्राप्त होतो. म्हणूनच अत्यंत आदराने भगवंताचे नाम घ्यावे. जो भगवंताचे नाम घेतो त्याच्या स्वभावातील दोष हळूहळू नाहीसे होऊ लागतात.

(येम – यमदूत, जाची – त्रास देतात, विकल्प – शंका/संशय, तर्क – नानाविध कल्पना, स्वभावे – सहजच/नैसर्गिकरित्या)

विवेचन – एखादी गोष्ट कर असे वारंवार सांगूनही जर कोणी ऐकत नसेल, तर त्या व्यक्तीला तसे न करण्याचे काय परिणाम होतील असे आपण समजावून सांगतो. विशेषतः लहान मुलांना एखाद्या गोष्टीतले धोके आपण समजावून सांगतो आणि मग तरी त्यांनी ती करावी अशी अपेक्षा करतो. तसेच समर्थ इथे आपल्याला नामस्मरणाचे महत्व समजावून सांगताना करत आहेत. वारंवार सांगूनही आपण जर नामस्मरण केले नाही तर अंतकाळी आपल्याला यम त्रास देतील, आपल्या मनात नामाबद्दल नको त्या कल्पना आणून जर आपण नाम घेतले नाही, तर लोकांमध्ये आपली छी थू होऊन आपल्या वाट्याला नरक ठरलेलाच आहे. म्हणूनच अत्यंत आदराने भगवंताचे नाम घ्यावे.

आपल्या धर्मशास्त्रात मृत्यूनंतरच्या जीवनासाठी स्वर्ग आणि नरक अशा कल्पना आहेत. पुण्यवान माणसाला स्वर्गप्राप्ती होते आणि पापी मनुष्य नरकात जातो अशी साधारण त्यातील कल्पना आहे. ज्याने पाप केले असेल, भगवंताचे नाम घेतले नसेल अशा व्यक्तीला यमदूत त्रास देतात. नाम न घेणाऱ्याला अशा प्रकारची स्थिती प्राप्त होते असे समर्थ सांगतात. समर्थांच्या काळात अशा कल्पनांवर लोकांचा जास्त विश्वास होता म्हणून समर्थांनी त्या प्रकारे समजावून सांगितले आहे. आज आपण ज्या काळात जगतो आहोत, त्या काळातील लोक स्वर्ग, नरक, यम इ. कल्पनांवर विश्वास ठेवणारे नाहीत. म्हणूनच या गोष्टींचा अर्थ आपण वेगळ्या प्रकाराने घ्यायला हवा.

आज जरी बरेचसे लोक स्वर्ग, नरक, यम इ. गोष्टींवर विश्वास ठेवत नसले तरी बरेचसे लोक हे मानतात की आपल्या बऱ्यावाईट वागण्याची फळं आपल्याला या ठिकाणीच भोगावी लागतात. सर्व संतांनी एकमुखाने भगवंताच्या नामाचा महिमा सांगितला आहे. संतांचे वागणे आणि बोलणे यात एकवाक्यता असते. ते जे बोलतात, त्यामागे स्वानुभवाचे सामर्थ्य असते. गोंदवलेकर महाराज आपल्याला जेव्हा रामनाम घ्यायला सांगतात, तेव्हा त्या नामाची महती त्यांनी स्वतः अनुभवलेली असते. ‘ आधी केले मग सांगितले ‘ असा हा रोकडा व्यवहार असतो. म्हणून निदान संतांच्या सांगण्यावर तरी आपण विश्वास ठेवून नाम घ्यायला हवे.

नाम घेण्याची ही सवय जर लावून घेतली नाही तर अंतकाळी देखील सवयीनुसार नाम न येता दुसऱ्याच गोष्टीत जीव अडकेल. प्राण जाताना त्यामुळे जीवाला वेदना होतील. ऐहिक गोष्टीतच जीव अडकेल. पुन्हा मग जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आपण अडकू. हाच यमदूतांनी दिलेला त्रास आहे असे आपण मानायला हरकत नाही. संतांनी एवढया कळकळीने सांगूनही जर नामाबद्दल विश्वास नसेल आणि त्याच्या खरेपणाबद्दल भलतेच विचार मनात येत असतील, तर मन नामाकडे वळणारच नाही. अशा वेळी माणूस मग दुसऱ्या आकर्षणात अडकतो. कसले नाम, कसला स्वर्ग आणि नरक?  मरणानंतर जे काही होईल ते कोणी पाहिले आहे?  तेव्हा मौजमजा करून या जीवनाचा उपभोग घेऊ असा विचार करून माणूस नको त्या गोष्टीत अडकतो. नको त्या गोष्टी करण्यात वाहवत जातो. मग समाजात अशा व्यक्तीची छी थू होते. त्याची प्रतिष्ठा राहत नाही. लोकांच्या दृष्टीने अशी व्यक्ती तिरस्करणीय बनते. असे जगणे म्हणजे एक प्रकारचा नरकच आहे.

तेव्हा मनात कोणतीही शंका न ठेवता भगवंताचे नाम घ्यावे. अति आदराने ते नाम घेत जावे. भगवंताच्या नामाचे सामर्थ्य असे आहे की जो कोणी ते नाम घेईल त्याचे दोष हळूहळू कमी होत जातात. जे गुण भगवंताला प्रिय आहेत, असे गुण व्यक्तीच्या स्वभावात वास करतात. त्याच्या हातून अनुचित गोष्टी घडत नाहीत. व्यक्ती अंतिमतः सुखी आणि समाधानी असते.

स्वसंवाद 

१. मरणानंतरच्या नरकाची भीती बाळगण्यापेक्षा, मी आजच्या माझ्या चुकीच्या प्रवृत्तींमुळे माझे चालू आयुष्यच ‘नरकप्राय’ करून घेत नाहीये ना?  

२. संतांनी स्वानुभवातून सांगितलेल्या नामस्मरणाच्या ‘रोकड्या व्यवहारावर’ विश्वास ठेवण्याऐवजी, माझे मन अजूनही ‘तर्क-कुतर्कात’ आणि संशयात वेळ वाया घालवत आहे का?  

३. “अंतकाळी सवयीनुसार नाम मुखात यावे” यासाठी मी माझ्या दैनंदिन जीवनात आजपासूनच नामस्मरणाची सवय लावून घेण्यास किती प्राधान्य देतो?  

४. नाम घेतल्याने जर स्वभावातील दोष ‘स्वभावे’ (सहजच) गळून पडणार असतील, तर मी माझ्या अहंकाराचा आणि रागाचा त्याग करून नामस्मरणाचा आश्रय का घेत नाही?  

=====

श्लोक क्र. १०२ – – 

अती लीनता सर्वभावे स्वभावे ।

जना सज्जनालागी संतोषवावे ।

देहे कारणी सर्व लावीत जावे ।

सगूणी अति आदरेंसी भजावे ।।१०२।।

अर्थ : आपल्यामध्ये स्वभावतःच अतिशय नम्रता असावी. अशा सहज नम्रतेने सत्पुरुषांना आनंद द्यावा. आपला देह सर्व चांगल्या कामांसाठी झिजवावा. अतिशय आदरपूर्वक सगुण भक्ती करावी.

(लीनता – नम्रता, सर्वभावे – अगदी मनापासून, कारणी – चांगल्या गोष्टींसाठी)

विवेचन – भक्ताच्या अंगी कोणते गुण असावेत ते या श्लोकात समर्थ आपल्याला सांगत आहेत. भगवंताचा भक्त लीन म्हणजे नम्र असतो. अध्यात्मात लीनता हा अतिशय मोठा गुण मानला गेला आहे. ज्या व्यक्तिजवळ लीनता नसेल, त्याच्या ठायी अहंकार निर्माण होतो. हे मी केले, ते माझ्यामुळे झाले अशा प्रकारचा अहंकार निर्माण होतो. साधकासाठी अहंकार हा प्रगतीतील मोठा अडथळा आहे. त्यामुळे आपल्या स्वभावात नम्रता असणे आवश्यक आहे. ती सुद्धा मनापासून असावी. आतून उमलून आलेली असावी. एखाद्या हसतमुख व्यक्तीच्या चेहऱ्यावर असणारे हास्य आतून उमलून आलेले असते. हास्याचा कृत्रिम मुखवटा त्याला धारण करावा लागत नाही. तशीच नम्रता देखील आतून यावी. ती स्वभावाचाच एक भाग असावी असे समर्थांना सांगायचे आहे. हल्ली कार्पोरेट जगतात आपले काम साधून घेण्यासाठी लोक कृत्रिम नम्रतेचा आश्रय घेतात. निवडणुका जवळ आल्या म्हणजे मते मागण्यासाठी नेते मंडळी अति नम्र होतात. पण ही खरी नम्रता नसून तो काही काळापुरता धारण केलेला एक मुखवटा असतो.

अहंकारी व्यक्ती कोणालाच आवडत नाहीत. नम्रतेने वागणाऱ्या व्यक्ती समोरच्याचे मन सहज जिंकून घेतात. फळांनी लगडलेले झाड वाकलेले असते. ज्याला साधक व्हायचे त्याने तर नम्र असलेच पाहिजे. आपल्या हातून घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचे श्रेय भगवंताला किंवा गुरूंना दिले पाहिजे. दोष असतील तर ते आपले अशी भावना हवी. कर्तेपण भगवंताकडे देतो तो खरा साधक. अशा प्रकारची नम्रता किंवा लीनता अंगी बाणली की सत्पुरुषांना संतोष होतो. गर्विष्ठ किंवा अहंकारी व्यक्ती त्यांना आवडत नाही. ज्ञानेश्वरांसारख्या महान संतांनी आपल्या हातून जे काही कार्य घडले त्याचे श्रेय आपल्या गुरूंना दिले आहे.

आपला हा नरदेह सर्व चांगल्या कारणांसाठी झिजला पाहिजे. केवळ देहाचे भरणपोषण केले तर आपल्यात आणि पशूत फरक काय?  समाजात अनेक चांगली कार्ये होत असतात. अशा कामांना पैशाने नाही तरी शरीराच्या माध्यमातून श्रम करून हातभार लावला पाहिजे. शेगावला गजानन महाराजांच्या मंदिरात, गोंदवल्याला गोंदवलेकर महाराजांच्या मठात अनेक भक्त स्वेच्छेने सेवा देत असतात. अशी उदाहरणे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. यातून भगवंताची सेवा तर घडतेच पण देह भगवंताच्या कारणाने झिजतो. माणसाला जो देहाभिमान असतो, तो नष्ट व्हायला मदत होते. देहबुद्धी कमी होत जाते.

सर्व संतांनी सगुण भक्ती केली आहे. परमेश्वराच्या सेवेत आपला देह झिजवला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यांनी पांडुरंगाची सगुण भक्ती केली. रामकृष्ण परमहंस कालीमातेची सेवा करीत. मीराबाईंनी श्रीकृष्णाची भक्ती केली. परमार्थात प्रगती करायची असेल तर सगुणाकडूनच निर्गुणाकडे जावे लागते. म्हणूनच समर्थ म्हणतात ‘ सगुणी अति आदरेसी भजावे ‘ सगुणात प्रेम निर्माण झाले नाही तर ते निर्गुणात कसे येणार?

स्वसंवाद 

१. माझ्या रोजच्या वागण्या-बोलण्यात असणारी नम्रता ही केवळ माझे ‘काम साधून घेण्यासाठी’ घातलेला मुखवटा आहे, की ती माझ्या अंतःकरणातून आलेली खरी ‘लीनता’ आहे?  

२. ज्ञानेश्वर माऊलींप्रमाणे, माझ्या आयुष्यातील यशाचे श्रेय मी देवाच्या आणि गुरूंच्या चरणी अर्पण करतो, की ‘मी केले’ या अहंकाराचा फुगा फुगवत बसतो?  

३. भगवंताने दिलेला हा सुंदर नरदेह मी केवळ स्वतःच्या उपभोगासाठी आणि देहभरणासाठी वापरतो आहे, की कधी सामाजिक व सत्कार्यात ‘श्रमदान’ करून तो कारणी लावतो?  

४. संतांनी सांगितल्याप्रमाणे, मी माझ्या आराध्य दैवताची भक्ती केवळ ‘वरवरची’ करतो, की मनात अथांग आदर आणि प्रेम बाळगून सगुण स्वरूपात त्या परमेश्वराला शोधतो?  

– क्रमशः श्लोक १०१ आणि १०२

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ किमया निसर्गाची… ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 

☆ किमया निसर्गाची नीलांबरी शिर्के 

पक्षाने बांधले

नाजुक घरटे

झाडावर तया

टांगले उलटे!!  

*

दोघांनी घातल्या

घरट्यात माना

कमतरता काही

राहीली नाही ना!!  

*

अंडी घालुनीया

जन्मतील पिल्ले

तयां सुरक्षित

पाहीजे ठेविले!!  

*

म्हणून दोघेही

काळजी घेती

मनापासुनी ते

पाहणी करती!!  

*

असे वाटले

माझीया मना

फुलाचा वेगळा

प्रकार बघताना!!  

*

निसर्ग निर्मितो

फुल प्रकार

मनात वेगळ्या 

कल्पना साकार!!  

*

म्हणून फुल हे 

घरटे वाटले

दोन्ही फुलांचे

पक्षी जाहले!!  

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस… + संपादकीय निवेदन – सौ. दीप्ती कुलकर्णी – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. दीप्ती कुलकर्णी

💐 अ भि नं द न 💐

गाडगीळ मॅनेजमेंट, सांगली आयोजित मराठी काव्य लेखन स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती दीप्ती कुलकर्णी यांच्या काव्य रचनेस उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला आहे. ई अभिव्यक्ती मराठी तर्फे श्रीमती दीप्ती कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐🖊️

पुरस्कार प्राप्त कविता आज प्रकाशित करत आहोत.

 संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

पुरस्कार प्राप्त कविता

? कवितेचा उत्सव ?

☆ “पाऊस” ☆ दीप्ती कुलकर्णी ☆

 पाऊस आला, पाऊस आला, घेऊन मृदगंधाला

ग्रीष्मातील त्या उष्ण धरेचा, कणकण संतोषला

जलधारांनी बरसत आलाथेंबातुनी प्रगटला

बळीराजाही पेरायालाशिवारात गुंतला ||||

 *

इंद्रधनुचा मोहक पट तोआकाशी उमटला

बालचमुसह सर्वांसाठीआनंददायी बनला

जलाशयांचा, तरुवेलींचाजीवनदाता ठरला

चिंबही भिजल्या सृष्टीचा तो, सखा जणू भासला ||||

 *

धरतीनेही हिरवा शालुअंगभरी ल्यायला

गवतफुलांचा, फळाफुलांचा, सुगंध साकारला

मातीतुनी या नवकोंबांचाहर्ष दिसू लागला

तनामनाने चाहुल घेताआसमंती विहरला ||||

 *

चातकासही थेंबा घेऊनी, जन्म नवा लाभला

रिमझिम येता जलधारांचा, नाद ही झंकारला

पाऊस आला, पाऊस आला, मोद असा जाहला

नव आशांचा, नव स्वप्नांचा, झुला जणू झुलला ||||

© दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

भ्र. ९५५२४४८४६१

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares