मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ११३ आणि ११४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ११३ आणि ११४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ११३ – –

जनीं हीत पंडित सांडीत गेले ।

अहंतागुणे ब्रह्मराक्षेस झाले ।

तयाहूनि वित्पन्न तो कोण आहे ।

मना सर्व जाणीव सांडूनि राहे ।।११३।।

अर्थ : मोठमोठया पंडितांनी आत्महिताचा जो योग्य मार्ग होता, तो सोडून दिला. त्यांच्यामध्ये (आपल्या ज्ञानाचा) अहंकार निर्माण झाल्याने ते मृत्यूनंतर ब्रह्मराक्षस झाले. खरे तर अशा लोकांपेक्षा विद्वान कोण असू शकेल? तेव्हा हे मना, आपल्या ज्ञानाचा अहंकार बाळगू नकोस.

(हीत सांडीत गेले – आत्मकल्याणाचा श्रेयस्कर मार्ग सोडला, अहंता- गर्व/अभिमान, वित्पन्न – विद्वान, जाणीव – अहंकार)

विवेचन : आपल्या ज्ञानाचा व्यर्थ अहंकार बाळगणाऱ्या विद्वान किंवा पंडितांची मरणोत्तर कशी अवस्था होते ते समर्थांनी या श्लोकात सांगितले आहे. समर्थांच्या या सांगण्याला त्यांच्या आणि त्यांच्या काळातील परिस्थिती कारणीभूत होती. १३ व्या शतकापासून ते अगदी समर्थांच्या काळापर्यंत बऱ्याच शास्त्री पंडितांना आपल्या ज्ञानाचा अतिशय अहंकार होता. काही ग्रंथांचे अध्ययन केले म्हणजे ते स्वतःला प्रकांड पंडित समजत. आपल्यापेक्षा अधिक ज्ञानी कोणी नाही असा अहंकार त्यांना होई. असे पंडित मग आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन करण्यासाठी देशोदेशी फिरत. तेथील विद्वानांना चर्चेत हरवून आपण श्रेष्ठ असल्याचे प्रशस्तिपत्रक मिळवीत आणि अभिमानाने ते मिरवीत. अशाच अभिमानी पंडितांनी साधुसंतांना त्रास दिला आहे. आयुष्यभर त्यांचा हाच विद्वत्तेचा अहंकार कायम राहिल्याने अंतकाळी देखील आपण वादात दुसऱ्याला हरवतो आहोत असे दृश्य त्यांना दिसत असे. ‘ अंते मती सा गती ‘ असे म्हटले जाते. असे विद्वान साहजिकच मृत्यूनंतर ब्रह्मराक्षस होत असत. आपल्याकडे अशी समजूत होती की अशा अभिमानी पंडितांना मृत्यूनंतर ब्रह्मराक्षसाची पिशाच्च योनी प्राप्त होते. समर्थ म्हणतात की खरं तर यांच्यापेक्षा विद्वान कोण असू शकत होतं? पण त्यांनी आपल्या ज्ञानाचा सदुपयोग आत्मकल्याणासाठी न करता आपले पांडित्य मिरवण्यासाठी केला.

संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथरचनेचे श्रेय आपले गुरु आणि ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ यांना दिले. स्वामी विवेकानंदांनी आपल्या ज्ञानाचे श्रेय रामकृष्ण परमहंसांना दिले. समर्थ तर स्वतःला रामाचे दास म्हणवून घेत. कोणीही आपल्या ज्ञानाचा अहंकार बाळगला नाही किंवा श्रेय आपल्याकडे घेतले नाही. तुकाराम महाराज तर ‘ फोडिले भांडार, धन्याचा हा माल । मी तंव हमाल भारवाही । असे म्हणतात. एवढी नम्रता संतांकडे असते.

समर्थांच्या चरित्रात एक मजेशीर घटना वाचायला मिळते. समर्थांच्या काळी वामन पंडित म्हणून एक विद्वान होऊन गेले. त्यांचे संस्कृतवर प्रभुत्व होते आणि त्यांनी संस्कृतात ग्रंथरचना केली होती. परंतु सर्वसामान्यांना संस्कृत ग्रंथ वाचणे शक्य नसल्याने त्यांना समर्थांनी मराठीत लिहा म्हणून सांगितले. पण झाले उलटच! हे वामन पंडित समर्थांनाच नावे ठेवू लागले आणि तुम्हीच उलट संस्कृतमध्ये लिहा असे त्यांनी समर्थांना सांगू लागले. एक दिवस प्रवास करीत असताना वामन पंडितांना अंधार झाल्याने एका मोठया झाडाखाली मुक्कामासाठी थांबावे लागले.

त्या झाडाच्या एका फांदीवर एक ब्रह्मराक्षस बसला होता. थोड्याच वेळात तिथे एक दुसरा ब्रह्मराक्षस आला. तो पहिल्या ब्रह्मराक्षसाला म्हणाला, ” मी या शेजारच्या फांदीवर राहू शकतो का? ” तेव्हा तो ब्रह्मराक्षस म्हणाला, ” तू दुसरी जागा शोध. ही जागा मी वामन पंडितांसाठी राखून ठेवली आहे. ” हे ऐकताच वामन पंडितांना दरदरून घाम फुटला. पुढील जन्मी आपण ब्रह्मराक्षस होऊ या भीतीने त्यांची बोबडी वळली. सकाळी धावतच जाऊन त्यांनी समर्थांचे पाय धरले आणि क्षमा मागितली. त्यावेळी समर्थांची प्रशंसा करताना त्यांच्या मुखातून पुढील रचना बाहेर पडली जी आजही समर्थ संप्रदायात म्हटली जाते.

शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे । वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ।

कवी वाल्मिकीसारिखा मान्य ऐसा ।नमस्कार माझा तया रामदासा ।।

– तेव्हा आपल्या ज्ञानाचा अहंकार बाळगून आत्मकल्याणाचा हितकारक मार्ग सोडू नये, आपल्या ज्ञानाचा उपयोग लोककल्याणासाठी व्हावा हेच समर्थांना येथे सांगायचे आहे.

स्वसंवाद

१. माझ्याकडे असलेल्या पदव्या, ज्ञान किंवा माहितीचा मला वामन पंडितांसारखा ‘व्यर्थ अहंकार’ तर झालेला नाही ना?

२. मी माझ्या ज्ञानाचा उपयोग संतांसारखा समाजाच्या ‘आत्मकल्याणासाठी’ आणि हितासाठी करतो, की केवळ चर्चेत दुसऱ्याला हरवून स्वतःचे ‘पांडित्य मिरवण्यासाठी’ करतो?

३. तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे, “मी केवळ एक हमाल असून हे सर्व ज्ञान त्या भगवंताचे आहे” अशी नम्रता माझ्या ठायी आहे का?

४. मृत्यूच्या अंतापर्यंत जर मी माझा ज्ञानाचा किंवा पदाचा अहंकार सोडला नाही, तर माझ्याही वाट्याला वैचारिक किंवा शापयुक्त ‘ब्रह्मराक्षसाचे’ जिणे तर येणार नाही ना?

====

 श्लोक क्र. ११४ – – 

फुकाचे मुखीं बोलता काय वेचे ।

दिसेंदीस अभ्यंतरी गर्व सांचे ।

क्रियेवीण वाचाळता वेर्थ आहे ।

विचारे तुझा तूंचि शोधून पाहें ।।११४।।

अर्थ : उगीचच बडबड करून व्यर्थ ज्ञान पाजळल्याने काहीच साधत नाही. मनातील अहंकार मात्र दिवसेंदिवस वाढतो. आचरण न करता केलेली बडबड व्यर्थ आहे. म्हणून हे मना, ही गोष्ट खरी आहे की नाही हे तू स्वतः शोधून काढ.

(काय वेचे – काही साधत नाही, अभ्यंतरीं – अंतरात, साचे – साठत जातो)

विवेचन : आधीच्या श्लोकात आपल्या ज्ञानाचा अहंकार बाळगणाऱ्या विद्वानांची अंती काय गत होते ते समर्थांनी आपल्याला सांगितले. या श्लोकात ते व्यर्थ पोकळ बडबड करून आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करणाऱ्या दांभिक लोकांवर कोरडे ओढतात. ‘ उथळ पाण्याला खळखळाट फार ‘ अशी आपल्याकडे म्हण आहे. थोडाफार अभ्यास केलेली माणसे आपल्याला फार कळते म्हणून व्यर्थ बडबड करीत असतात. कीर्तन, प्रवचने किंवा सभा संमेलनात अशी अनेक माणसे आपण पाहतो. त्यांच्याजवळ उत्तम वक्तृत्व असते. आपल्या वक्तृत्व कौशल्याच्या जोरावर ते श्रोत्यांवर प्रभाव टाकण्यात यशस्वी होतात. त्यातून त्यांचा अहंकार फुलत जातो. त्यांना कोणी काही सांगितले तरी त्यांची ऐकून घेण्याची तयारी नसते. आपल्या पांडित्याच्या जोरावर आपलेच म्हणणे कसे बरोबर आहे हे ते दुसऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करतात.

आजकाल ज्ञान देणारी खूप साधने उपलब्ध झाली आहेत. दूरदर्शन, वृत्तपत्रे, समाजमाध्यमे यातून दररोज निरनिराळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असते. पण त्यातील खरी किती आहे, त्याला खरोखर अनुभवाची जोड आहे का हे पारखून घेणे महत्त्वाचे असते. जो तो माझेच म्हणणे कसे बरोबर असे सांगून आपले मत लोकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करीत असतो.

व्यवहारात आपण अशी अनेक माणसे पाहतो की जी व्यासपीठावरून बोलतात एक आणि करतात वेगळेच. वैयक्तिक जीवनात त्यांच्या वागण्यात विसंगती आढळते. हा शुद्ध दांभिकपणा आहे. आपण जे काही सांगतो, त्यामागे काही एक तपश्चर्या किंवा साधना असणे आवश्यक असते. जे ज्ञान आपण प्राप्त केलेले असते, ते आचरणात आणणे ही पहिली पायरी आहे. नंतरच ती गोष्ट लोकांना सांगण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. ‘अभ्यासोनि प्रकटावे ‘असे समर्थांचे सांगणे आहे. एखादी गोष्ट केवळ आपल्याला माहीत आहे पण आपण स्वतः ती कधी आचरणात आणली नाही अशी गोष्ट दुसऱ्यांना सांगू नये. आपल्या बोलण्याला तेव्हाच वजन प्राप्त होते, जेव्हा आपण ती गोष्ट आचरणात आणतो. नाहीतर ती केलेली बडबड व्यर्थ आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात, ‘ क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. ‘ 

स्वतःचे मन हा आपले प्रतिबिंब पाहण्याचा एक उत्तम आरसा आहे. आपण बोललो आहे ते कितपत बरोबर आहे, आपण स्वतः ते आचरणात आणतो का हे आपले मन आपल्याला सांगत असते. म्हणून प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून आपल्या वागण्याबोलण्याविषयी विचार करावा. म्हणूनच समर्थ या श्लोकातील शेवटच्या चरणात म्हणतात, ‘ विचारे तुझा तूंचि शोधूनि पाहे. ‘ प्रत्येक श्लोकाच्या शेवटी दिलेले स्वसंवादाचे प्रश्न देखील असेच आत्मपरीक्षण आपल्याकडून व्हावे यासाठी आहेत.

स्वसंवाद : 

१. मी चारचौघांत किंवा समाजमाध्यमांवर जे मोठे विचार मांडतो, ते मी केवळ ‘वक्तृत्वाचा प्रभाव’ पाडण्यासाठी मांडतो की प्रत्यक्षात आचरणातही आणतो?

२. संतांनी सांगितल्याप्रमाणे, माझ्या व्यर्थ बडबडीतून किंवा वाद घालण्यातून माझ्या अंतरात केवळ ‘गर्व’ साठत चालला आहे का?

३. माझ्याकडे येणारी कोणतीही माहिती किंवा ज्ञान पुढे सांगण्याआधी मी ‘अभ्यासोनि प्रकटावे’ या सूत्राचा अवलंब करतो का?

४. ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ हे ओळखून, मी माझ्या स्वतःच्या मनालाच आरसा बनवून माझ्या ‘कथनी आणि करणीतील’ फरकाचे आत्मपरीक्षण करण्यास तयार आहे का?

– क्रमशः श्लोक ११३ आणि ११४

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जगणे आपसुक होई सोने!!… ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 

☆ जगणे आपसुक होई सोने!! ☆ नीलांबरी शिर्के ☆

☆

निर्मळ पाणी

वाहे खळखळ

धुवून टाकी

वस्त्रातील मळ!!

*

तसेच हसऱ्या 

त्यांच्या संवादी

होते आपसुक

मनही निर्मळ!!

*

शुभ्र वसन

अन शुद्ध मनाने

जगणे आपसुक

होई सोने!!

☆

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शारदास्तवन… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? कवितेचा उत्सव ? 

☆ बासरी घुमली… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

☆

प्रभात प्रहरी यमुना तीरी बासरी अचानक घुमली

हलके हलके गोकुळाला जाग गुलाबी आली ||ध्रु||

* 

दावण सुटली गोधन सारे तीरावर पातले

कपिलेसंगे नंदिनी दौडत सुरांप्रत धावले

कान्हा अमुचा मुरली त्याची मनी आंस लागली

प्रभात प्रहरी यमुना तीरी बासरी अचानक घुमली ||१||

 *

गोपींसंगे गोपही सारे हरखुनिया गेले

हात स्तब्धले आसूसुनी कर्णही टवकारले

मोहनच्या वेणूसंगे गोकुळ हरपून गेले

प्रभात प्रहरी यमुना तीरी बासरी अचानक घुमली  ||२||

 *

मुग्ध होऊनी स्तब्ध जाहली रवी गोकुळातली

व्यक्त व्हावया नवनीत रूपे भक्ती साकारली

चराचरांचे भान हरपले दिव्य प्रचीती आली

प्रभात प्रहरी यमुना तीरी बासरी अचानक घुमली ||३||

 *

श्रीहरीच्या बासुरीतुनी निनादून ये ॐकार

फूक घालता ओठातुनिया उमटे विश्वाचा सूर

उर्जा साऱ्या जगताची या एकवटोनी आली

प्रभात प्रहरी यमुना तीरी बासरी अचानक घुमली  ||४||

☆

कवी : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १११ आणि ११२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १११ आणि ११२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. १११ – – 

हिताकारणे बोलणे सत्य आहे ।

हिताकारणे सर्व शोधूनि पाहे ।

हिताकारणे बंड पाषांड वारी ।

तुटे वाद संवाद तो हीतकारी ।।१११।।

अर्थ : समर्थ म्हणतात, ” हितासाठी जे सत्य आहे ते मी तुला सांगतो. आपल्या हितासाठी तू स्वतःच हितकारक गोष्टींचा शोध घे. धर्माच्या विरुद्ध असणारे पाखंडी किंवा नास्तिक विचार बाजूला सार. ज्या चर्चेतून शंकांचे निरसन होते अशी चर्चा किंवा संवाद हितकारक असतो. “

(हिताकारणे – आत्महितासाठी, बंड – विचारातील विरोध, पाषांड – देव व धर्म विरोधी वागणे किंवा नास्तिकता, वारणे – दूर सारणे)

विवेचन : आत्मतत्वाचा शोध घेणे किंवा आत्मसाक्षात्कार करून घेणे हे प्रत्येक मनुष्याचे ध्येय असले पाहिजे असे समर्थांचे सांगणे होते. हेच आपल्या हिताकरिता त्यांनी सांगितलेले सत्य. परंतु काही लोक हे खरोखरच आपल्या हिताचे आहे यावर विश्वास ठेवायला तयार नसतात. म्हणून समर्थ म्हणतात की या गोष्टीचा तू स्वतःच शोध घे. त्यासाठी सर्व मार्गांचा वापर कर. साधू संत काय सांगतात किंवा ग्रंथांमध्ये काय म्हटले आहे हे तपासून पहा. एखादी गोष्ट माणूस जेव्हा स्वतः समजून घेतो, तेव्हा त्यावर त्याचा जास्त विश्वास बसतो. म्हणून समर्थांनी मी सांगतो तेवढेच खरे असे न मानता तुम्ही स्वतःच सत्याचा शोध घ्या असा कळकळीने उपदेश केला आहे.

राम लक्ष्मणादि भावंडांचे गुरु वसिष्ठांच्या आश्रमातील शिक्षण जेव्हा पूर्ण झाले, तेव्हा त्यांना निरोप देताना ते म्हणाले, ” मी माझ्याजवळ असणारे सर्व ज्ञान तुम्हाला दिले आहे. परंतु तरीसुद्धा तुम्ही आपल्या आयुष्यात मी सांगितलेले तेवढेच खरे असे मानून चालू नका. तुमच्या विचारांना आणि विवेकबुद्धीला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे वागा. ” वसिष्ठांसारखी किंवा समर्थांसारखी अधिकारी व्यक्ती जेव्हा असे म्हणते, तेव्हा आपण तर सामान्य माणसे! आपल्या ज्ञानाचा उगीच गर्व करण्यात काय अर्थ आहे? त्यामुळे अशा व्यक्ती जे सांगतात त्यामागे त्यांची साधना असते. सांगण्याचा अधिकार असतो. ‘ आधी केले मग सांगितले ‘ अशा या व्यक्ती असतात.

सत्याची एक वेगळी व्याख्या महाभारतात फार छान आहे. जे हितकारक आहे, ते सत्य असे त्यात म्हटले आहे. एखादी गोष्ट आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी घातक आहे असे जेव्हा आईला वाटते, तेव्हा ती त्याला ते देत नाही. तुझे पोट दुखेल, दात किडतील असे सांगून त्याला ती तो पदार्थ देत नाही. इथे तिचे बोलणे असत्य जरी असले तरी तिच्या मुलासाठी ते हितकारक आहे. काही वेळा कटू बोलणे आपल्या हितासाठी असते. परंतु आजच्या काळात जेव्हा गोड बोलून किंवा वेगळ्या प्रकारे ट्विस्ट करून एखादी गोष्ट सांगितली जाते तेव्हा मात्र ती आपल्या हिताची असेलच असे नाही. टीव्ही वरील मालिकांतून नको त्या गोष्टी नकळत आपल्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणूनच सत्य काय आहे हे आपणच तपासून घ्यायला हवे.

आपण सामान्य माणसे मात्र व्यवहारात बुद्धिभेद करणाऱ्या माणसांच्या वक्तृत्वाला भुलून आपल्या साधुसंतांनी सांगितलेल्या मौल्यवान गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. अशा माणसांच्या नास्तिक, पाखंडी विचारांचा स्वीकार करतो. आपल्याच चांगल्या गोष्टींवर टीका करू लागतो. त्यातून द्वेष तयार होतो. माणूस आपले नीतीधर्माचे आचरण सोडून देतो. क्षुद्र विकार, वासनांना बळी पडतो. काही रूढी, परंपरा कालबाह्य झाल्या असतील, काही गोष्टी चुकीच्याही असतील. पण सगळ्याच गोष्टी कालबाह्य किंवा टाकाऊ झालेल्या नसतात. अर्थात प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचे, लिहिण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु त्यामुळे सामान्य माणसांची मात्र दिशाभूल होते, गोंधळ उडतो. म्हणूनच समर्थांनी आपल्या हितासाठी अशा विचारांना दूर सारून सत्य काय आहे ते जाणून घ्या असे सांगितले आहे.

स्वसंवाद 

१. संतांनी किंवा गुरूंनी सांगितले म्हणून मी आंधळेपणाने विश्वास ठेवतो, की समर्थांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या विवेकबुद्धीने ‘हितकारक गोष्टींचा शोध’ घेण्याचा प्रयत्न करतो?

२. महाभारतातील सूत्राप्रमाणे, माझे बोलणे केवळ वरवरचे ‘गोड’ असते की ते समोरच्या व्यक्तीच्या आणि माझ्या स्वतःच्या ‘परम हिताचे’ (सत्य) असते?

३. टीव्ही, मोबाईल किंवा समाजमाध्यमांवरील आकर्षक वक्तृत्वाला भुलून, मी माझ्या संस्कृतीतील चांगल्या आणि सात्त्विक विचारांकडे दुर्लक्ष तर करत नाहीये ना?

४. मनातल्या शंका दूर करून निःशंक होण्यासाठी मी व्यर्थ वाद घालतो, की एखाद्या अधिकारी व्यक्तीशी माझ्या आत्महितासाठी ‘हितकारक संवाद’ साधतो?

=====

 श्लोक क्र. ११२ – – 

जनीं सांगता ऐकता जन्म गेला ।

परी वाद वेवाद तैसा चि ठेला ।

उठे संशयो वाद हा दंभधारी ।

तुटे वाद संवाद तो हीतकारी ।।११२।।

अर्थ : अनेक वर्षांपासून जगात हिताच्या गोष्टी सांगितल्या आणि ऐकल्या जातात. पण एवढे होऊनही वादविवाद निर्माण करणारे मतभेद कायमच आहेत. संशयापोटी निर्माण होणारा वाद हा अहंकार वाढवणारा असतो. ज्या संवादातून शंका फिटून काही तत्व हाती लागते असा संवाद हितकारक असतो.

(ठेला – तसाच राहिला, दंभ – व्यर्थ अहंकार/अभिमान)

विवेचन : या श्लोकात मानवी स्वभाव आणि प्रवृत्तीवर समर्थांनी अचूक बोट ठेवले आहे. आपण अनेक वर्षांपासून चांगल्या हितकारक गोष्टी ऐकत आलो आणि सांगतही आलो. संतांनी समाजाच्या आणि आपल्या हितासाठी आपले सारे आयुष्य झिजवले. ग्रंथातून, प्रवचनातून आपले विचार आपल्यापर्यंत पोचवले. परंतु दुर्दैव हे आहे की एवढया सगळ्या खटाटोपानंतर देखील आपल्या शंका आणि वादाचे विषय कायम राहिले. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, मनाचे श्लोक, तुकाराम गाथा यासारख्या अनेक ग्रंथांना शेकडो वर्षांची परंपरा आहे. हे अक्षर वाङ्मय आहे. या ग्रंथांमध्ये एवढे ज्ञान आहे की खरे तर कोणत्याही शंकाच शिल्लक राहायला नको.

खरी ज्ञानी माणसे नम्र असतात पण मी विद्वान आहे या जाणिवेतून अहंकार जन्मतो. मला सगळेच माहिती आहे या जाणिवेतून संतांनी जे काही हितकारक सांगितले त्याबद्दल संशय निर्माण होतो. ईश्वर आहे हे कशावरून, पुनर्जन्माचा काही पुरावा आहे का, ईश्वराला कोणी पाहिले आहे का… वगैरे वगैरे अनंत गोष्टींबद्दल मानवी मनात संशय अनंत काळापासून आहे आणि तो तसाच राहणार आहे. शंका असणे रास्त आहे, चांगली गोष्ट आहे. पण एखाद्या अधिकारी माणसाकडून किंवा वर उल्लेख केलेल्या ग्रंथातून जेव्हा आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळते, त्यावेळी निःशंक मनाने ‘ राघवाच्या अनंत पंथावर ‘ चालण्यास सुरुवात करावी.

बऱ्याच माणसांची प्रवृत्ती अशी असते की संतांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा एखादी संशयाची सुई त्यांच्या मनात जास्त घर करून बसते. मग आपल्या हिताचे कळूनही त्यांना त्या मार्गाने जाण्याची बुद्धी होत नाही. अशा लोकांच्या बाबतीत ‘ पालथ्या घड्यावर पाणी ‘ ही म्हण सार्थ ठरते. सगळे समजते आहे पण पोकळ दंभ किंवा अहंकार त्यांना या मार्गावर जाण्यापासून परावृत्त करतो. “मी जप करू? कीर्तनाला जाऊ? छे! छे! मी एवढा विद्वान! मला इतकी माहिती आहे! मग लोक काय म्हणतील? ” यासारख्या खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पना अशा व्यक्तींना परमार्थ मार्गावर चालण्यासाठी प्रतिबंध करतात.

परंतु समाजमान्यता असणाऱ्या काही विद्वानांनी बुद्धिभेद केला की सर्वसामान्य माणसे देखील गोंधळतात. मग अशी माणसे राम आणि कृष्ण यासारख्या वंदनीय महापुरुषांच्या चरित्रात देखील दोष दाखवतात. राम आणि कृष्णासारख्या महापुरुषांनी आपल्या जीवनकार्यातून कोणता महत्वाचा संदेश दिला आहे याकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होते. या सगळ्या गोंधळात आपल्याला आपल्या आत्मतत्वाचा शोध घ्यायचा आहे ही मूळ गोष्ट ते विसरतात. वादविवाद कुठे होत नाहीत असे नाही पण जिथे मूळ तत्वाचा शोध घेण्यापेक्षा आपल्या अहंकाराला जास्त जोपासले जाते असा वाद काय कामाचा? ज्यातून काही जीवनोपयोगी तत्व गवसते आणि मन परमार्थ मार्गाकडे ओढ घेते असा सुखसंवाद महत्वाचा असेच समर्थांना यातून सांगायचे आहे.

स्वसंवाद

१. अनेक वर्षांपासून संतांचे विचार, ग्रंथ आणि निरूपण ‘ऐकून व वाचूनही’ माझे आयुष्य ‘पालथ्या घड्यावर पाणी’ या म्हणीसारखेच कोरडे राहिले आहे का?

२. “मी एवढा शिकलेला, मी नाम कसे घेऊ? ” अशा प्रकारच्या कुठल्यातरी पोकळ दंभामुळे (अहंकारामुळे) किंवा खोट्या प्रतिष्ठेमुळे मी स्वतःला आत्महितापासून दूर ठेवत नाहीये ना?

३. महापुरुषांच्या किंवा संतांच्या चरित्रातील आणि विचारांमधील केवळ ‘दोष’ शोधण्यात मी माझी बौद्धिक ऊर्जा वाया घालवतो, की त्यांच्याकडून ‘जीवनोपयोगी तत्त्व’ शिकण्याचा प्रयत्न करतो?

४. मनात शंका असणे स्वाभाविक आहे, पण ग्रंथांच्या वाचनातून किंवा अधिकारी व्यक्तींच्या ‘सुखसंवादातून’ उत्तर मिळाल्यावर, मी निःशंक मनाने भक्तीच्या मार्गावर चालण्यास सुरुवात करतो का?

– क्रमशः श्लोक १११ आणि ११२

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गरुडझेप… ☆ श्री महेंद्र कोळकर ‘बानासुत’ ☆

श्री महेंद्र कोळकर ‘बानासुत’

अल्प परिचय 

नाव : महेंद्र बानाजी कोळकर (बानासुत)

बानासुत या नावाने मी लेखन करतो.

शिक्षण :एम. ए. अर्थशास्र

? कवितेचा उत्सव ?

☆ गरुडझेप… ☆ श्री महेंद्र कोळकर ‘बानासुत’ ☆

☆

गरुडझेप घे उंच आकाशी

धडकला तळाला जरी

परतू नकोस माघारी

दोन हात कर संकटांशी

*

भविष्याचा एक तरी दिवस

माझाच असेल हक्काचा

विश्वास ठेव स्वतःवर

उत्साहाने झुंज दे प्रतिस्पर्ध्याशी!

☆

© श्री महेंद्र कोळकर ‘बानासुत’ 

संपर्क : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हॉस्टेल.

ईमेल – banasut001@gmail. com मो. ९२८४३४९२३२

 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री गणेश जाताना… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ श्री गणेश जाताना… ☆ श्रीशैल चौगुले ☆

☆

श्रीगणेश जाताना

काळजास दुःख आहे

पुन्हा आगमनाची

भक्ती रुख रुख आहे.

* 

पुजा पाठ नेवैद्य

आरतीत तोच आहे

देवळी मुर्ती विना

अप्रसन्न पेच आहे.

 *

आरास गजबज

सारे कसे शांत होई

मन खाई मनास

क्षण क्षण खंत देई.

 *

देवाधिराज देव

गजानन बुध्दि दाता

विरह जणू युग

आशिर्वाद दुर होता,

☆

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अनंत स्तोत्र ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ अनंत स्तोत्र ☆  डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

☆

मार्ग दावी रे अनंता | आज येथे ऐसे भ्रमिता ||

अंधःकारी बुडून जाता | दिशा काही दिसेना ||१||

*

कोण आम्ही कोठुनि आलो | आज येथे ऐसे अडलो ||

काय फळाची आशा राहो | बूज ती राहीना ||२||

*

धरणीखाली बीज सापडे | जळे वेढुनि त्यास टाकिले ||

जगतासाठी जीवन दिधले | तुझियाचि कृपे ||३||

*

बघता बघता अंकुर आला | डोकावूनिया पाहू लागला ||

मार्ग आपुला शोधु लागला | सूर्यप्रकाशी ||४||

*

दिधले जीवन आदिपासुनी | ठेवुनि त्याची जाण ही मनी ||

घट्ट धरुनिया धरणी ठेवी | मुळीया रूपे ||५||

*

परोपकारी धरणीचा हा | वसा घेतला वृक्षलतांनी ||

फळे अर्पुनी जगतासाठी | कृतार्थही जाहले ||६||

*

दिशा दाविशी रे अनंता | तृणांकुरांना पशुपक्षांना ||

पोरकाच मग मानवचि का | चाचपडे तिमिरी||७||

*

कळत असूनि असा राहिलो | वळता नचही ताठ राहिलो ||

स्वार्था धरुनी अंध जाहलो | असा या जगी ||८||

*

परमार्थाची आस लागली | मोहाची पण भूलचि पडली ||

मजविण दृष्टी आड जाहली | काही कळेना ||९||

*

धाव धाव रे भगवंता | कृपाळू होऊन अनंता |

सोडव यातुनिया निशिकांता | तेजा तव दावून ||१०||

☆

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गुडघ्याला बाशिंग! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक 

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? गुडघ्याला बाशिंग! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

☆

उतावळे बेचाळीस नवरदेव

बसले नटून बाशिंग बांधून 

वाट बघतं भावी भार्यांची 

आर्त डोळ्यात प्राण आणून

*

नाही फिरकल्या नववधू

दिवे लागण झाली तरी 

सुकले हातातले हार तुरे 

शंका दाटून आल्या उरी

*

पंधरा पंचवीस हजाराला 

चुना आयोजकांनी लावला 

खरी गोष्ट सांगता पोलिसांनी

कपाळी हात मारून घेतला

*

लग्न गाठी म्हणे ब्रम्हदेव 

आधीच वर मारून ठेवतो 

पण तुम्हां सारख्या मुर्खांना 

इथलाच कोणी फसवतो

इथलाच कोणी फसवतो

☆

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अभंग… ☆ शुभा रुद्र ☆

शुभा रूद्र 

? कवितेचा उत्सव ?

☆ अभंग… ☆ शुभा रूद्र  ☆

☆

माय माझी गौरी। तूच नारायणी।

दुःख निवारणी। दुर्गा माते।।

 

सौंदर्य मोहिनी। तूच अनुसया।

तूच महामाया। शाकंबरी।।

 

हृदय वासीनी। तूच दुर्गा लक्ष्मी।

प्रार्थीते नेहमी। साधनेत।।

 

देवी सरस्वती। मन ही गुंतले।

भावही दाटले। हृदयात।।

 

ढोलक वाजला। टिपरी वाजली।

प्रेमात भिजली। नवरात्री।।

 ☆

© शुभा रूद्र

मो. 9657189569

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वंदन तुज मोरया! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक 

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? वंदन तुज मोरया! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

☆

होता आपले आगमन

झाला प्रसन्न आसमंत,

दुःख दैन्य पळून गेले

उरली नां कसली भ्रान्त!

*

मखर सजले फुलांनी

केली थोडी रोषणाई,

धूपारतीच्या सुगंधाने 

मन प्रसन्न होऊन जाई!

*

वेळ होता आरतीची

जमती मंडपी मंडळी,

गाऊन अकरा आरत्या 

अंगारा लावती भाळी!

*

ताट नैवेद्याचे गणेशा

तव चरणावर ठेविले,

द्यावी सु्बुद्धी सकला

तुज मनोमनी प्रार्थियले!

तुज मनोमनी प्रार्थियले!

☆

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares