मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # २८७ ☆ प्रेम… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # २८७ ?

☆ प्रेम… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

प्रेम म्हणजे काय?

कुठे कळते, जे तुझ्या माझ्यात,

जाणवलेच नाही कधी,

अगदी उंबरठ्यावरचं माप ओलांडून,

मन हेच गुणगुणले,

“आले तुझिया घरी….

कराया तुझीच रे चाकरी”

किती बाळबोध मन,

लग्न हेच आयुष्याचं

इतिकर्तव्य,

हेच मनावर बिंबलेलं—-

पण कुठं माशी शिंकली,

समजलंच नाही!

आणि सुरू झाला,

समांतर रेषांवरचा प्रवास!

 पण आज “संध्याछाया”

भिववित असताना,

तुझ्या आवाजात,

तिच ‘जरब’ ,

मालकी हक्काची…

आणि आजही माझ्या मनात,

उसळणारी बंडखोरी,

यालाच प्रेम म्हणत असावेत बहुतेक,

कौटुंबिक भाषेत!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मागणे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ मागणे ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

अंतर्यामी सदैव माझ्या

 तुझा मूळचा झरा झुळझुळो

 स्फटिकजळी ह्या तुझी निळाई

 प्रतिबिंबासह नित्य खळखळो

 कधीतरी मी कोणासाठी

 तुझ्या नभासम दाटुन यावे

 सुकू लागल्या तृणपात्यांवर

 दवबिंदूंचे ओघळ व्हावे

 *

 तुझ्या धुक्यातुन दिसत रहावे

 विरुप बोचरे सत्यहि सुंदर

 एक बोडका डोंगरसुद्धा

 पर्वतराणा व्हावा क्षणभर

 *

 तेजतत्त्व ते तुझे शुभंकर

 पणतीमध्ये माझ्या यावे

 कानमंत्र तू दे तिजला रे

 स्वतः जळावे जग उजळावे

 *

 असे झाडपण लाभो जन्मा

 सर्व ऋतू अंगावर घ्यावे

 उंच नभांगणी जाता जाता

 मातीमध्ये खोल रुजावे

 *

 सर्जन सिंचन संहाराचे

 चक्र फिरे तव चराचरातुन

 ठेव अबाधित जीवननिष्ठा

 स्थितीगतीतुन कळिकाळातुन

 *

 तुझी भव्यता तुझी दिव्यता

 नित नेमाने मला पुजू दे

 तुझीच नियती होता वैरी

 हाती मजला वज्र घेउ दे!

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आत्म दिशा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ आत्म दिशा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

कधी तो स्वयं जाणताना

आधार ती प्रतिमा होते

तरी, अपरिचीत स्वतःशी

आत्मऋणी गरिमा होते.

 

रंग-बेरंगी कर्म छाया

सौंदर्य अंतसीमा होते

भव विरक्ती भाव छटा

बंध मनाचे कामा येते.

 

निर्माल्य लोचनी भविष्य

विचार मुद्रा रेषा होते

देह परिचय संपता

केवळ आत्म दिशा होते.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – देखीचा दिमाख… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – देखीचा दिमाख… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

 *

देखीचा दिमाख शिकोनियां दावी /

हि-याऐसी केवीं गारगोटी//१//

 *

मर्यादा ते जाणे अरे अभागिया /

देवाच्या ऐसिया सकळ मूर्ती//२//

काय पडिलासी लटिक्याचे भरी /

वोंवाळुनि थोरी परती सांडी//३//

 *

तुका म्हणे पुढें दिसतसे घात /

करितों फजित म्हणउनि //४//

  – संत तुकाराम.

 *

तुका म्हणे

दुसऱ्याचे अनुकरण करून तसे वागण्याचा प्रयत्न करणाराला तुकाराम महाराज अनुभवाचे खडे बोल सुनावताना म्हणतात.

दुसऱ्याचे काही तरी शिकून आपणही तसे वागण्याचा खोटा खटाटोप करू नये. कारण कितीही मिजास दाखवली तरी गारगोटीला ही-याचे तेज येईल का? गारगोटी कधीच हि-यासारखी दिसणार नाही.

अभागी माणसाला मर्यादा कुठे, किती आणि कशा पद्धतीच्या असतात हेच कळत नाही. त्यांचा अंदाज घेता येत नाही. देवासारख्या दिसणा-या मूर्तीचे आपण दर्शन घेतो. तिच्यात प्रत्यक्ष देहधारी देव कधीच दिसणार नाही. ती फक्त मूर्तीच दिसेल. म्हणून आपण जे खोटे आणि प्रतिकात्मक आहे त्याच्या नादी कधीच लागू नये. त्याची खरी ओळख करून घ्यावी आणि आपल्या मनात त्याची जी भ्रामक ओळख आहे किंवा प्रतिमा तयार झाली आहे ती पुसून टाकावी. आपल्या पासून दूर करावी. आपण जर तसे केले नाही तर आपल्या जिवनात पुढे धोका होण्याचा संभव असतो. आणि मग पुढे जाऊन आपली फजीती देखील होऊ शकते. तसे होऊ नये म्हणून ख-या खोट्याची पूर्ण जाणकारी घेऊन कसे वागायचे ते ठरवायला पाहिजे. म्हणजे काहीच नुकसान होणार नाही.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वंदे वाल्मिकी कोकिलम्… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ वंदे वाल्मिकी कोकिलम्… ☆ श्री दिवाकर बुरसे

अश्विन पौर्णिमा… महर्षी वाल्मिकी जयंती….. त्यानिमित्त महर्षींना वाहिलेली ही आदरांजली…..

श्रीबुधकौशिक ऋषींनी रामरक्षा स्तोत्रात वाल्मिकींचे केलेले वर्णन किती समर्पक आहे!

 कूजंतं रामरामेति मधुरं मधुराक्षरम्।

आरुह्यकविताशाखां वंदे वाल्मीकि कोकिलम्।

भावार्थ:-

राम राम अशा मधुर अक्षरांनी कूजन करणाऱ्या, कवितारूपी शाखेवर बसलेल्या वाल्मिकीरुपी कोकिळास वंदन असो.

वाल्मिकींची स्तुती करणारे हे दुसरे सुभाषित पहा,

सदूषणोsपि निर्दोषः सखराsपि सुकोमलः।

नमःस्तसै कृतायेन रम्या रामायणी कथा।।

भावार्थ:-

 ‘दूषण (दोष, एक राक्षस) असूनही निर्दोष आहे, ‘खर’ (खरखरीत, एक राक्षस) असूनही जी कोमल आहे अशी रम्य रामयण कथा ज्याने रचली, केली त्याला (वाल्मिकींना) नमस्कार असो.

रामायणात ‘खर’ आणि ‘दूषण’ या नावाच्या दोन राक्षसांचा उल्लेख आहे. पंचवटीतील वास्तव्यात रामाने त्यांचा वध केला. वरील श्लोकात सुभाषितकाराने या राक्षसांच्या नावावर ‘श्लेष’ केला आहे. ‘श्लेषालंकार’ हे संस्कृत भाषेचे वैशिष्ट्य आहे. जगातील अन्य कोणत्याही भाषेत इतका विपुल व समृद्ध श्लेष अभावानेच आढळतो. असो.

मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः।

यत्क्रौञ्चमिथुनादेकमवधीः काममोहितम्।।

– – या श्लोकाद्वारे अनुष्टुप् छंदाचा आविष्कार करून ‛रामायण’ या लोकविलक्षण काव्याची रचना करणारे आद्यकवी महर्षी वाल्मीकि यांची आज (अश्विन पौर्णिमा) जयंती. या आद्यकवीला शतशः वंदन!

महर्षि वाल्मिकींच्या काव्यकर्तृत्वाला अभिवादन म्हणून कविवर्य भा. रा. तांबे यांनी रचलेली पुढील सुंदर कविता वाचनात आहे.

जय वाल्मीकी!

*

जय वाल्मीकी! तुज हें तर्पण;

तव चरणीं सर्वस्व समर्पण! ।।ध्रु।।

*

त्रिभुवनपति जो राम रघूत्तम

सुरनरकिन्नरनुत पुरुषोत्तम

हे वाङ्मयतरुकोकिल, निरुपम

त्या रामा तूं देशि रामपण ।।१।।

*

विधिहि शकेना द्याया कवणा

तीं दश वदनें देशि रावणा

राम यमाधिप दे ज्यां मरणा

अमर करिशि तो सुरारि रावण ।।२।।

*

अधनांचें धन, अबलांचें बल

अमंगलांचें श्रेयोमंगल

जन्मांधांचे लोचन निर्मल

दुर्वृत्तांचें दुरितनिवारण ।।३।।

*

हात दिला तूं किती बुडत्यांना!

धीर दिला किती तूं व्यथितांना!

उरीं लाविलें किती पतितांना!

जय भवनाविक पतितोद्धारण! ।।४।।

*

कालाच्या अति कराल दाढा

सकल वस्तुंचा करिति चुराडा

कालशिरिं झडे तुझा चौघडा

जय मृत्युंजय! जय कविभूषण! ।।५।।

*

भा. रा. तांबे

तमसा नदीवर स्नानाला जात असताना एका काममोहित क्रौंच मिथुनातील नराला बाण मारण्याचे क्रौर्य बघून महर्षिंच्या मुखातून बाहेर पडलेली ही शापवाणी……

“मा निषाद प्रतिष्ठां……. ”

शाप दिल्यानंतर महर्षिंना वाईट वाटले. आपली सारी तपश्चर्या वाया गेल्याचे दुःख झाले.

ते तसेच विचारमग्न अवस्थेत आश्रमात परतले. त्यांची विचारमग्न चर्या पाहून एका शिष्याने कारण विचारले, तेव्हा महर्षिंनी सारा वृत्तांत कथन करून आपल्या मुखातून निघालेली शापवाणीही पुन्हा सांगितली.

ते सांगत असताना त्यांच्या लक्षात आले की ह्या शापवाणीत काही छंद दडलेला आहे. महर्षींना त्या ही अवस्थेत आश्चर्य वाटले. हा योगायोग पाहून ते अधिकच विचारमग्न झाले… तेवढ्यात महर्षि नारद तेथे आले. घडलेला वृत्तांत वाल्मिकींनी नारदांना सांगितला. नारदांनाही आश्चर्य वाटले आणि त्यामागचा ईश्वरी संकेतही जाणवला. यावर चिंतन करून नारदांनी वाल्मिकींना रामकथा लिहिण्याचा समादेश दिला.

… त्या रचनेसाठी नव्याने गवसलेल्या या वृत्ताचा उपयोग करण्याचे महर्षिंनी ठरविले. ते वृत्त म्हणजेच ‘अनुष्टुप् छंद’. या वृत्ताचे द्रष्टेपण जाते आद्य कवी महर्षि वाल्मिकींकडे जगातील व रामायणातील पहिला अनुष्टुपातील श्लोक ‘मा निषाद प्रतिष्ठां…’

आद्यकवींनी रामायणासाठी हा सुलभ असा अनुष्टुप् छंद योजला. या नंतर बहुतेक सर्व महाकवींना आपल्या प्रदीर्घ रचनांसाठी हाच छंद सोईस्कर वाटला.

– – एका पंक्तीत आठ अक्षरे, पाचव्या अक्षरावर यति इ. यमक, अनुप्रासादि अलंकाराचा हट्ट नाही. सरळ लिहित रहा, वर्ण्यविषय संपेपर्यंत, असे साधे प्रवाही स्वरूप या वृत्ताचे. म्हणून सर्वांनाच तो सोईचा वाटला.

स्वा. सावरकरांनी अंदमानात जेव्हा महाकाव्य रचायचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनीही हाच छंद निवडला.

पण वृत्तदर्पणातून शिकलेली लक्षणे त्यांना कारावासात काही केल्या नीट आठवेनात. संदर्भग्रंथ उपलब्ध नाहीत. मिळण्याची सुतराम शक्यता नाही. अशा परिस्थितीत काही पाठ असलेल्या श्लोकांवरून त्यांनी अनुष्टुपाची लक्षणे शोधून त्याप्रमाणे आपल्या रचना केल्या. पुढे काही सहस्र रचना झाल्यावर लक्षात आले की आपण केलेल्या रचनांमधे अनुष्टुप् छंदाच्या नियमाचा भंग झालाय. आठ ऐवजी आपण नऊ अक्षरांचे एक वेगळेच, पण अस्तित्वात नसलेले वृत्त नकळत योजले आहे! अपघात असला तरी ही एक वेगळी निर्मिती आहे. अपघाताने ज्या नव्या वृत्ताचा शोध लागला त्याला मग स्वा. सावरकरांनी “वैनायक वृत्त” असे नाव दिले.

– – सात सहस्त्र वर्षापूर्वी आद्य महाकवीने आम्हाला ‘अनुष्टुप्’ दिले तर एका अधुनिक महाकवीने ‘वैनायक’ दिले!

पुरंदर तालुक्यात, पालखी मार्गावर ‘वाल्हे’ नावाचे एक गाव लागते. या गावात वाल्या कोळ्याचा जन्म झाला. वाल्मिकींचे हे जन्मग्राम आहे असा येथील लोकांचा विश्वास आहे. तिथे वाल्मिकींचे मंदिरही आहे.

रामचरित्र सात सहस्त्र वर्षापूर्वीचे आहे. त्यावेळी महाराष्ट्रात दंडकारण्य होते. याच अरण्यात ‘वाल्हे गावचा वाल्या’ वाटमाऱ्या करीत होता.

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सोनं… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सोनं… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

काल जे सोनं होतं

ते आज कचरा झालं

दसरा संपला अन्

महत्त्व त्याचं विरून गेलं||१||

 

अरेच्चा! कालच तर सोनं म्हणून

 देवाचरणी वाहिलं होतं,

सोनं घ्या, सोन्यासारखं रहा

एकमेकांस म्हटलं होतं||२||

 

कळलंच नाही मला,

असं काय झालं,

 हे कालच सोनं

आज कचरा कसं झालं? ||३||

 

आपट्यांच्या पानापानांसारखं

आपणही असतो

कोणाच्या तरी गरजेच्या वेळी

आपण त्याचं सोनं होतो,

त्याची गरज संपली की मात्र

आपणही बाहेर काढले जातो,

दसऱ्याच्या सोन्यासारखं

आपणही कचरा होतो||४||

 

कचरा झालाय आज म्हणून,

आपट्याच्या झाडानं हार मानली नाही,

पुढच्या वर्षी परत दसरा येणार आहे,

म्हणून पठ्ठ्यानं बहरणं सोडलं नाही ||५||

 

मग आपण तर माणसं आहोत,

कोणी कचरा समजलं म्हणून खचून जायचं नसतं,

कोणाची तरी मदत करून

परत सोनं व्हायचं असतं,

आपण बावनकशी सोनंच आहोत,

 हे कदापि विसरायचं नसतं ||६||

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकr

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “आतुर…” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “आतुर…” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

धुंद मंद गंध हा

रातराणी बहरली

प्रीत मन्मनीची गं

अशीच आज मोहरली ।।

*

तव स्मृती या मनी जाग्या

भान माझे हरपते

रोमरोमी फुलवती गं

स्वप्न जणू साकारते ।।

*

माझी कधी होशील राणी

वाट सतत मी पाहतो

रातराणीच्या परी गं

रात्र रात्र मी जागतो …

रात्र रात्र मी जागतो ।।

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – कळेल हे खूण… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – कळेल हे खूण … – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

*

कळेल हे खूण /

तरि दावी नारायण //१//

*

सत्य संतांपाशी राहे /

येरां भय आड आहे//२//

*

अणुचिया ऐसे /

असे भरले प्रकाशें //३//‌

*

इंद्रियांचे धनी /

ते हे जाती समजूनि //४//

*

तर्क कुतर्क वाटा /

नागवे घटापटा //५//

*

तुका म्हणे ल्यावें /

डोळा अंजन बरवे//६//

– संत तुकाराम.

 *

तुका म्हणे

आपणास जे कळत नाही, ज्याची उकल होत नाही, काय करावे ते सुचत नाही अशावेळी ते जाणून घेण्यासाठी शांतचित्ताने आपण परमेश्वर चरणी लीन झाल्यावर, त्याची मनोभावे भक्ती केल्यावर परमेश्वर आपणास योग्य तो मार्ग दाखविल. अशावेळी नेमके काय करावे याच्या स्वानुभवाचे खरे सत्य ख-या संताजवळच आहे. इतरांजवळ त्यांचा स्वानुभव नाही. जो संत नाही त्यांच्याकडे भय भ्रमाचा घोटाळच साठलेला आहे. येवढे मात्र नक्की. इथे आपल्या अवतीभवती असणारा अणू रेणू ही परमेश्वरी परमतेजाने आणि प्रखर प्रकाशाने भारावून ठेवलेला आहे. पण ज्यांनी आपल्या इंद्रियांच्या अधीन न होता इंद्रियानाच आपल्या ताब्यात ठेवले आहे, त्यांच्या वर विजय मिळवला आहे असे जे जाणकार आहेत तेच हे सगळे समजून‌ उमजून घेऊन वागतात. व योग्य ते मार्गदर्शन करतात.

पण जे कोणी ही वाट सोडून तर्क कुतर्कांच्या मागे धावतात तेथे सगळ्याच भल्याभल्यांना ही नागवले जाते. फसवले जाते. हे कळण्यासाठी व जाणून घेण्यासाठी आपण आपल्या डोळ्यात भक्तीचे अंजन घालून त्याच्याकडे पाहिले तरच आपल्याला सारे कळून येईल. अन्यथा आपण ही भ्रमातच गुरफटले जाऊ. या अभंगातून तुकाराम महाराजांनी संतसहवासात राहिल्याने आपल्याला काय मिळेल ते स्पष्ट केले आहे. आणि ख-या भक्तीचा अगदी सरळ सोपा मार्ग ही दाखवून दिला आहे. सर्व सामान्य माणसाने याच मार्गाचा अवलंब करून परमेश्वराची भक्ती करावी असे सांगितले आहे.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आणखी काय हवे जीवाला? ☆ श्री विश्वास दाते ☆

श्री विश्वास दाते

अल्प परिचय 

  • प्लांट हेड किंवा बिझनेस हेड म्हणून बऱ्यापैकी वरिष्ठ पदांवर अनेक वर्षांच्या कारकिर्दीसह भारत आणि परदेशातील उद्योगात पस्तीस वर्षे काम केल्यानंतर, 2005 मध्ये ते फिलिप्समधून चीनमध्ये निवृत्त झाले.
  • सेवानिवृत्तीनंतर, १५ वर्षे, प्रगती लीडरशिप इन्स्टिट्यूट, पुणे, यांच्याशी संलग्न झाले. ४१ विविध व्यवसायांना, व्यवसाय सल्लागार, गुणवत्ता आणि व्यवस्थापन विकासामध्ये प्रशिक्षण आणि समुपदेशन सुविधा देणारा म्हणून मदत केली.
  • त्यांचे इंग्रजीतील पुस्तक ‘Hi There! – माझ्या कॉर्पोरेट प्रवासातील कथा आणि विचार’ आता बाजारात असून कॉर्पोरेट् आणि शैक्षणिक संस्थांद्वारे, एक ‘लर्निंग गिफ्ट आर्टिकल’ म्हणून वापरले  जात आहे.
  • वेगवेगळ्या व्यवस्थापन संकल्पनांवर आधारित त्यांचे दुसरे कथांचे मराठी पुस्तक ‘नमस्कार, ऐकलत का?’ प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक विशेषतः लघु आणि मध्यम (SME) उद्योजक / व्यवस्थापकांसाठी आणि नोकरीच्या बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले आहे.
  • Friendly Stories’ हे काल्पनिक गोष्टींचे आणि ‘काजव्याचे कवित्व’ हे कविता आणि लेख असलेले, अशी दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
  • Learning Management through Q&A’ आणि ‘संकोच’ ही दोन पुस्तके प्रकाशनासाठी तयार आहेत.
  • लेखक अभियांत्रिकीचा पदवीधर असून व्यवसाय व्यवस्थापनात पदविका घेतली आहे.
  • वयाच्या ७९ व्या वर्षी, विश्‍वास, पुणे येथे, त्याच्या पत्नी, दोन विवाहित मुले आणि चार नातवंडांसह समाधानी जीवन जगत आहे.

? कवितेचा उत्सव ?

☆ आणखी काय हवे जीवाला? ☆ श्री विश्वास दाते ☆

झुकू लागले वय ऐंशीला

तरीही वाटे तरुण आजला

आणखी काय हवे जीवाला?

थंड झुळूक देते शिरशीरी

कितीतरी जरी काळ लोटला

आणखी काय हवे जीवाला?

 *

हरदिनी सुचती नव्या कल्पना

मनी सदा आनंदाचा मळा

आणखी काय हवे जीवाला?

 *

स्वप्नामधील सखी लाभली

मनसोक्त सहप्रवास झाला

आणखी काय हवे जीवाला?

 *

चार जिने चढतोय सहजी

भरपूर चालता येतेय मजला

आणखी काय हवे जीवाला?

 *

पाऊस येता सुगंध आला

पटकन जातो त्यात भिजायला

आणखी काय हवे जीवाला?

*

चिक्की दाणे चावू शकतोय

तयार असतो हॉटेलात जायला

आणखी काय हवे जीवाला?

 *

मनासारखे काहीही खातोय

अजुनी आहे चव की भज्याला

आणखी काय हवे जीवाला?

मित्रांसंगे मारतोय गप्पा

मुले नातवे येती भेटायला

आणखी काय हवे जीवाला?

 *

तासंतास वाचन करतोय

सिनेमे पाहायचा आहे लळा

आणखी काय हवे जीवाला?

 *

मनात आले चालवतो स्कूटर

कार चालवायचा नाही कंटाळा

आणखी काय हवे जीवाला?

 *

एक दोन जरी व्याधी असती

चिंता नाही त्यांची मजला

आणखी काय हवे जीवाला?

 *

व्याज पुरेसे येई हाताला

कर भरतांना शांती मनाला

आणखी काय हवे जीवाला?

 *

जुन्या आठवणी येती सारख्या

भविष्याची तरी चिंता न मला

आणखी काय हवे जीवाला?

 *

कुतूहलाला जरी घालतो आवर

जग बघायचय अजुनी मला

आणखी काय हवे जीवाला?

 *

स्वप्नामध्ये फिरून येतोय

पडल्या पडल्या लागतोय डोळा

आणखी काय हवे जीवाला?

 *

झुकू लागले वय ऐंशीला

तरीही वाटे तरुण आजला

आणखी काय हवे जीवाला?

 

© श्री विश्वास दाते 

संपर्क –  चिन्मय अपार्टमेंट, 54, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे 411038 मो +९१ ९८५००३५३६२, vishwasdatye@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ दलदल… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? दलदल… ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

कुणाकुणाच्या पायी मखमल

कुणाकुणाच्या पायी हिरवळ

परि बहुतेकांच्या पायाखाली 

परिस्थितीची असते दलदल – – 

*

दलदल ही अशी भवती बनता

पाय प्रयत्ने एक काढता

दुसरा खोलच रुततो पुरता

चालणे अवघड होऊन जाते – – 

*
हात देणेही अवघड होते

एकमेका सहाय्य दूरच राहते 

दोघेही पडतील भीती छळते

धडपड करीत बसणे उरते – – 

*

खाली बसणे अशक्य असते

उठणेही ते अन् अशक्य असते 

चिखलाची असो वा परिस्थितीची 

दलदल परीक्षाच आपली घेते – – 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares