मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तशीच असते कविता… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ तशीच असते कविता... ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

अस्वस्थ मनाच्या हिंदोळ्यावर झोका घेते कविता

गंधित पहाट वा-यासंगे किलबिल करते कविता

शिशिरामधल्या तृणपात्यांवर दवात भिजते कविता

कडेकपारी निर्झरांतुनी झर झर पळते कविता

*

कविता म्हणजे कृद्ध मनाने कडाडणारी वीज

कविता म्हणजे विखार विरहित संस्कारांचे बीज

कविता म्हणजे बालपरीच्या डोळ्यामधली नीज

कविता म्हणजे सौदामिनीच्या चापल्यातील तेज

*

शिवारातल्या मृद्गंधाच्या लहरी म्हणजे कविता

किना-यातल्या वालुकणांची चमचम म्हणजे कविता

मंदिरातल्या दिपामधली वलये म्हणजे कविता

झोपडीतल्या पणतीमधली करुणा म्हणजे कविता

*

कविता म्हणजे अन्यायाच्या प्रतिकाराचे काज

कविता म्हणजे भाषेमधल्या सौंदर्याचा साज

कविता म्हणजे सात्विकतेच्या समईमधले तेज

कविता म्हणजे वीररसावर अंथरलेली शेज

*

मानवतेच्या व्यंगावरचा आसूड म्हणजे कविता

वर वर सोपे,  जगणे अवघड, तशीच असते कविता

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ६ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ६ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

रविंद्रनाथ टागोरांना कलेचा वारसा त्यांच्या कुटुंबातूनच मिळाला होता. ते स्वत: तसेच त्यांच्या परिवारातील अनेक जण लेखक, नाटककार, कवि, संगीतकार, चित्रकार होते; बॅरिस्टर, वकील, समाजसुधारक, आय सी एस होते. रविंद्रनाथांची पहिली कविता ‘भानुसिंह’ या टोपणनावाने वयाच्या बाराव्या वर्षी प्रसिद्ध झाली तर त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘कबी कहानी’ वयाच्या १७ व्या वर्षी प्रकाशित झाला. त्यांनी पहिली लघुकथा ‘भिखारिनी’ १६ व्या वर्षीच लिहिली. बॅरिस्टर होण्यासाठी ते १८७८ मधे लंडनला गेले पण दोन वर्षांनी परत आले. नंतरच्या २० वर्षात त्यांचे अनेक काव्यसंग्रह, एकांकिका, नाटकं, कथासंग्रह, कादंबऱ्या, निबंधसंग्रह प्रकाशित झाले. त्यांचे वडील बंधू सत्येंद्रनाथ आय सी एस होणारे पहिले भारतीय होते. त्यांची बदली बॉम्बे प्रेसिडेन्सी मधे झाल्यावर ते मुंबई, पुणे, सातारा अशा ठिकाणी राहिले होते. त्यावेळी रविंद्रनाथ त्यांच्याकडे येऊन रहात असत. सत्येंद्रनाथांमुळेच रविंद्रनाथांनी देखील संत तुकारामांची अभंग गाथा वाचली व त्यातील कांही अभंगांचे बंगाली भाषांतर देखील केलं आहे. हे भाषांतरित अभंग ‘रूपांतर’ या त्यांच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत.

—–

गीत : १६

I have had my invitation to this world’s festival, and thus my life has been blessed. My eyes have seen and my ears have heard.

It was my part at this feast to play upon my instrument, and I have done all I could.

Now I ask, has the time come at last when I may go in and see thy face and offer thee my silent salutation?

—–

भावानुवाद : गीत १६

*

आनंदोत्सवाचे आमंत्रण

जीवनोत्सवाचे निमंत्रण 

*

घेऊन आलो, मी आसक्त

तृप्त केली इंद्रिये मनसोक्त

*

तार झंकारुनी रूद्रवीणेची 

गीते मी गाईली आनंदाची

*

कधी उदासी सांडत गेलो

तोडी गात शरणांगत झालो

*

तव आज्ञेची तालीम केली

कर्तव्याची पूर्ती केली

*

आता तरी रे, हे भगवंता

कृपानिधे तू, अरे अनंता

*

तव दरबारी प्रवेश दे मज

रूप मनोहर पाहू दे मज

*

तृषार्त तन, मन, माझे नेत्र

अधीर तसेही गात्र न् गात्र

*

माथा टेकून तव चरणांशी

जाळीन या पापांच्या राशी

*

तुजला करितो मूक नमन

तुझ्या पदांशी देई स्थान

*

चरणांचा तव एक धूलीकण

बनून राहीन, पुरे एक क्षण

*

भावानुवाद: © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

गीत : १७

I am only waiting for love to give myself up at last into his hands. That is why it is so late and why I have been guilty of such omissions.

They come with their laws and their codes to bind me fast; but I evade them ever, for I am only waiting for love to give myself up at last into his hands.

People blame me and call me heedless; I doubt not they are right in their blame.

The market day is over and work is all done for the busy. Those who came to me in vain have gone back in anger. I am only waiting for love to give myself up at last into his hands.

—– 

भावानुवाद : गीत १७

*

तुझ्या कृपेचे द्वार उघडता

स्वाधीन करिन मज तुझिया हाता॥

*

खोळंबुनि मी पाही वाटुली

रीत कळेना बुद्धी सानुली

ओढती मजला ऐहिक धागे

तव भेटीचा क्षण पडतो मागे

नामस्मरणे तुझाच धावा

करण्या होई उशीर देवा

तुझ्या कृपेचे द्वार उघडता

स्वाधीन करिन मज तुझिया हाता॥

*

दिवस, महिने, वर्षे गेली

भक्तीची परि ज्योत न तेवली

नियम येथले आणि कायदे

सरसावुनि मग केले वायदे

त्यांना तोडुनि मुक्त जाहलो

प्रेमा तुझिया मी आसुसलो 

तुझ्या कृपेचे द्वार उघडता

स्वाधीन करिन मज तुझिया हाता॥

*

बुद्धीहीन मज लोक बोलती

आरोप तयांचे खरेच असती

बाजार इथला मला न कळला

समजाविण्यासि जो तो आला

मार्गच असला सोडुनि आलो

मागे नच निर्धारे वळलो

तुझ्या कृपेचे द्वार उघडता

स्वाधीन करिन मज तुझिया हाता॥

*

—–

गीत : १८

Clouds heap upon clouds and it darkens. Ah, love, why dost thou let me wait outside at the door all alone?

In the busy moments of the noontide work I am with the crowd, but on this dark lonely day it is only for thee that I hope.

If thou showest me not thy face, if thou leavest me wholly aside, I know not how I am to pass these long, rainy hours.

I keep gazing on the far away gloom of the sky, and my heart wanders wailing with the restless wind.

—–

भावानुवाद : गीत १८

*

आकाश घनाळत जाई

अंधार दाटुनि येई

*

अशा अवेळी, तुझिया द्वारी

वाट पाहतो, मी बाहेरी

*

तू जर माझा सखा प्रियतम

ऐकू न ये तुज साद का मम?

*

जनलोकी हा दिवस सरे पण

गडद रात्रीचे एकाकीपण

*

कसे साहू मी, हे जगज्जीवन?

तूच एक हो आशाकिरण

*

तव मुखमंडल दावी झणी रे

दूर लोटशी पुरता मज रे

*

जल ओथंबल्या क्षणांतुनि

विरहाग्नी मज जाळित आतुनि

*

अस्वस्थचि हा वात वाहतो

माझ्यासाठी तुला शोधतो

*

माझी ऊरभेदक हाकाटी

ऐकू न ये का तुज जगजेठी?

*

– क्रमशः भाग सहावा

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “खूप छान वाटतंय…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “खूप छान वाटतंय… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

★★★

* खूप छान वाटतंय… *

*आयुष्याच्या संध्याकाळी आपली मुले जेव्हा काळजी घेतात तेव्हा* 

*खूप छान वाटतंय… *

 

बालपणी ज्यांना चिऊ काऊचे घास भरवले,

आज ते मला, आई खाऊन बघ छान आहे, म्हणून 

आपल्या घासातला घास भरवतात..

*खूप छान वाटतय.. *

 

इवल्याशा पाठीवरचं दप्तर मी उचलून घेई,

आज माझ्या हातातले ओझे उचलायला धावत येतात..

*खूप छान वाटतय.. *

 

ज्यांची बोटं धरुन अक्षरांशी ओळख करून दिली,

आज ते माझी नवीन टेक्नॉलॉजीशी ओळख करुन देतात..

*किती मजा वाटते आहे.. *

 

ज्यांना हात धरुन रस्ता ओलंडला,

आज ते माझा हात धरुन रस्ता ओलंडतात,

हातांची अदलाबदल कधी झाली कळलंच नाही..

*पण खूप छान वाटतय.. *

 

चालताना उड्या मारु नकोस रे पडशील, असं म्हणणारी मी..

आणि आज, आई हळू पुढे खड्डा आहे म्हणणारे ते,

एवढा प्रवास कधी झाला कळलंच नाही..

*पण खूप छान वाटतय.. *

 

रिक्षाने जाताना त्यांना आतल्या बाजूला बसवणारी मी..

आज जागा केव्हा बदलल्या समजलंच नाही..

*पण खूप छान वाटतंय.. *

 

प्रयत्न करून बघ, शिकवलंय ना मी तुला, असे म्हणणारी मी आणि आज.. सोपंय ग, एकदा शिकलीस की येईल तुला, असे सांगणारे ते..

*किती गम्मत वाटते आहे.. *

 

ज्यांचा बरोबर बडबड गीते आणि छान छान गोष्टी ऐकल्या, आज ते आई हे गाणं ऐकलंस का, बीट्स आवडतील बघ तुला, असं म्हणतात तेव्हा काय सांगू काय वाटतं…

*लय भारी वाटतंय.. *

 

शाळेच्या पिकनीकला जाताना, बस मध्ये बसवून देणारी मी आणि आज मी प्रवासाला जाताना मला बस मध्ये बसवणारे ते..

शब्द तेच, काळजी तीच, भूमिका बदलल्या

*किती मस्त वाटतय.. *

 

त्यांना काही होत असेल तर, घाबरणारी मी आणि मला जरा बरं नसलं तर, कासावीस होणारे ते..

*किती कृतकृत्य वाटतंय.. *

 

लहानपणी त्यांचा अनाठायी हट्ट कसा चुकीचा आहे, हे सांगणारी मी, आज माझे एखादे मत कसे चुकीचे आहे हे माझे मन न दुखावता मला पटवण्याचा प्रयत्न करतात..

*किती अभिमान वाटतो.. *

 

मुले घरात दिसली नाहीत तर, कासावीस होणारे बाबा आणि आज, हे काय, बाबा अजून आले नाहीत म्हणणारी मुलं..

परत शब्द तेच, काळजी तीच, भूमिका कधी बदलल्या समजलंच नाही..

इवलेसे गळ्यात पडणारे हात, आज आधार द्यायला खंबीर झाले..

*खूप छान वाटतंय.. *

 

नकळत संस्कार घडले,

नकळत भूमिका बदलल्या,

नकळत त्यांच्यात एक संवेदनशील पती आणि हळूवार पिता आकार घेऊ लागला..

*खूप धन्य वाटतंय.. *

★★★

लेखक : अज्ञात 

संकलन व प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चाफ्या रे चाफ्या… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? चाफ्या रे चाफ्या… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

चाफ्या रे चाफ्या 

तुला रंग किती, गंध तरी किती

मन माझे मोहवी तुझ्या संगती…

… १

*

चाफ्याची फुले आली ती फुलुनी

सुगंध दरवळ आसमंतातुनी,

प्रथमदर्शनी तुज अंगणी पाहुनी

बालपण माझे आले फुलारुनी…

… २

चाफ्या रे चाफ्या तुला रंग तरी किती…

*

सोनचाफ्या तुझे सुंदर आयुष्य

बाटलीत बंद तुला ठेवू वर्ष-वर्ष

विठूच्या चरणाशी करता तू स्पर्श

पाहुनी ते रूप गंध दाटे मनी हर्ष…

… ३

चाफ्या रे चाफ्या तुला रंग तरी किती..

*

हिरव्या चाफ्या तुझा सुगंधची फार

पानामध्ये फूल दिसे हिरवेगार,

सुगंध दरवळ परिसर व्यापी

ओंजळीत भरावा हा अत्तर बहार…

… ४

चाफ्या रे चाफ्या तुला रंग तरी किती…

*

पानांमध्ये फुले पहा आली अगणिक

लाल चाफ्या तुझा लाल लाल रंग

हिरव्या कोंदणात भासे जणू माणिक

सुवासाने मन तुझ्या होई माझे दंग

… ५

चाफ्या रे चाफ्या तुला रंग तरी किती…

*

नागचाफ्या तुला नसे की रे गंध

परी फुलारुन दिसे तू देखणा

श्वेतरंग तुझा देतो रे आनंद,

पान तुझे भासे जणू सापाचा रे फणा

… ६

चाफ्या रे चाफ्या तुला रंग तरी किती…

*

कवठी चाफा, देव चाफा, गुलाबी चाफा

सारवल्या अंगणी फुले घेऊ वेचुनी

अनेक रंग रूपे गंधाळी चाफा,

चाफ्याच्या संगती मन गेले गुंतुनी…

… ७

चाफ्या रे चाफ्या तुला रंग तरी किती..

*

चाफा चाफा फुले आला रे फुलून

प्रथम दर्शनी मोहरून गेले मन

ईश्वराची लीला अगाध पाहून

ओंजळीत चाफा गंधाळला क्षण…

… ८

चाफ्या रे चाफ्या तुला रंग तरी किती…

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सीमा… ☆ सुश्री ज्योती कुलकर्णी ☆

सौ. ज्योती कुलकर्णी

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सीमा… ? ☆ सुश्री ज्योती कुलकर्णी ☆

जमीन आणिक पाण्यानेही

हद्द ठरवली अस्तित्वाची

सीमारेषा आखत गेले

म्हणून गोडी बघ जगण्याची 

*

निसर्गातले सगळे सगळे

समजत जगले जबाबदारी

पाळुनी खरे तर मर्यादा

खुशाल जगणे हयात सारी

*
आकाशाला नाही सीमा

पण बरोबरी करू नका हो

शीव सोडुनी गेला सागर

प्रलय केवढा घडेल ना हो

*

भूकंपाने असेच घडते

जीवन सारे भंग पावते

दया सोडुनी क्रूर वागणे

मानवतेला लांछन ठरते

*

दिले आखुनी देवाने जे

नियम अम्हाला सर्वांनाही

हस्तक्षेप जर केला नाही

जीवन अपुले घडेल शाही

कवयित्री : सुश्री ज्योती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३१३ ☆ शेकोटीची लाकडं… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३१३ ?

☆ शेकोटीची लाकडं… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

रात्री थंडीने कहर केला

सूर्य देखील घाबरू गेला

चादर लपेटून धुक्याची

लपत छपत बाहेर आला

थंडी म्हटली माझ्यासमोर

रुबाब नाही करायचा

दवबिंदूही घाबरून

पानावरून पडायचा

गोधड्या नि ब्लॅंकेट

लागले होते घाबरू

त्यांनाही वाटलं आता

जाणार आपली आब्रू

झाडांवरच्या पानांना

लागलं होतं कळू

शेवटचा क्षण आहे

सारेच लागले गळू

बर्फाच्या लादीवर

शिशिर आला बसून

शेकोटीची लाकडं

गेली होती त्रासून

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ असा हेमंत… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ असा हेमंत… ☆ श्रीशैल चौगुले ☆

मोती ढळतात तेंव्हा

माती अश्रुनी भिजते

पान-पान पापण्यांनी

किती धरती सजते.

*

हळूच थंडी हिवाळा

कोट्यात पाखरु शांत

सकाळ कशी हसरी

देहा हुडहुडी प्रांत.

*

चौफेर हरिते चिंब

धुक्यात सूर्य झाकून

अजून पहाट भासे

माथ्यावर तेज बिंब.

*

आकडून पुन्हा ताजे

ओलेती पाकळी फूल

स्वप्नांचे स्वर्ग भुवरी

हेमंत मानवा भुल.

*

क्वचित कोकिळी साद

ओहोळे पैंजणी गाणे

निरभ्र शुभ्र नभात

पंख वा-यास दिवाणे.

*

हटकून आठवणी

पुन्हा बिलगून जीवा

मिठीत घ्यावे तारुण्य

विझण्या आधी सांजवा.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कर्तव्याच्या पदपथावर! ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कर्तव्याच्या पदपथावर !! ? श्री आशिष  बिवलकर ☆

अंधारल्या वाटेवर,

कंदील हाती धरतो |

अनोळखी वाटेवर,

तिमिर सहज सारतो |

*

भय नसतेच मुळी,

अनोळखी वाटांचे |

नौका होऊन झेलतो,

हेलकावे लाटांचे |

*

कंटक आले वाटेत,

घायाळ कसे करतील?

स्पर्श पावलांचा होताच,

टोचणे तेच विसरतील |

*
कर्तव्याच्या पदपथावर,

फुलती मोहाच्या फुलबागा |

रोखून धरतो पावलांना,

हृदयी सत्य-सचोटीचा धागा |

*

कलयुगात ठरे पुण्य दुर्दैवी,

अन् पाप असते भाग्यशाली |

माहित जरी असले सारे,

करतो तत्वांची रखवाली |

*
कोणी कितीही प्रयत्न केले तरी,

जपल्या तत्वांची साथ सुटत नाही | 

यामुळेच आरशात चेहरा पहातांना,

स्वतःची लाज कधीच वाटत नाही |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शेतकरी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ शेतकरी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुमच्या ओठी घास भरवण्या बसला शेतकरी

कर्जापायी मरणादारी गेला शेतकरी

*

सगळ्यांसाठी अविरत झिजला होता नेटाने

उचला त्याच्या देहाला  या मेला शेतकरी

*

नाही केली किंमत त्याची खोट्या नेत्यांनी

दिवसा ढवळ्या सडकेवरती आला शेतकरी

*

मागत होता साधे पाणी रोज पिकासाठी

पण घामाने निथळततेव्हा भिजला शैतकरी

*

कौतुक नाही केले कोणी त्यांच्या कष्टाचे

फुकट्या होता लेखी तुमच्या ठरला शेतकरी

*

नाही जपले केली माती त्याच्या जन्माची

लोभी झाला सत्तेसाठी लुटला शेतकरी

*

सरले आता सगळे गेले केली बरबादी

भुलथापांना भुलला वेडा फसला शेतकरी

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ओल…! ☆ श्री सुजीत कदम  ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ ओल…! ☆ श्री सुजीत कदम  ☆

(छंद : अष्टाक्षरी…)

प्रेम गुलाबाचे फूल

तुझ्या गाली फुललेले

एका  एका पाकळीत

आठवांनी नाहलेले…!

*

प्रेम कवितेचे घर

सुख दुःखाचे माहेर

कधी आसू,  कधी हासू

देई ओठांनी  आहेर…!

*

प्रेम सागराची गाज

त्याला किनारी  आसरा

नको नदी  आसवांची

हवा चेहरा हासरा…!

*

प्रेम गुलाबाचा काटा 

काढी काट्यानेच काटा

तुझ्या डोळ्यात फुलल्या

जीवनाच्या ओल्या वाटा…!

*

दव बिंदू पुरे एक

घेतो टिपूनीया प्रेम

ओल काळजाची माझ्या

माझ्या शब्दात सप्रेम…!

 

© श्री सुजित कदम

पुणे

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares