हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ समय चक्र # २८८ ☆ बाल गीत – सुंदर-सुंदर लिखतीं लेख… ☆ डॉ राकेश ‘चक्र’ ☆

डॉ राकेश ‘चक्र

(हिंदी साहित्य के सशक्त हस्ताक्षर डॉ. राकेश ‘चक्र’ जी  की अब तक लगभग तेरह दर्जन से अधिक मौलिक पुस्तकें ( बाल साहित्य व प्रौढ़ साहित्य ) तथा लगभग चार दर्जन साझा – संग्रह प्रकाशित तथा कई पुस्तकें प्रकाशनाधीन।लगभग चार दर्जन साझा – संग्रह प्रकाशित तथा कई पुस्तकें प्रकाशनाधीन। कई कृतियां पंजाबी, उड़िया, तेलुगु, अंग्रेजी आदि भाषाओँ में अनूदित । कई सम्मान/पुरस्कारों  से  सम्मानित/अलंकृत।  भारत सरकार के संस्कृति मंत्रालय द्वारा बाल साहित्य के लिए दिए जाने वाले सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य श्री सम्मान’ और उत्तर प्रदेश सरकार के हिंदी संस्थान द्वारा बाल साहित्य की दीर्घकालीन सेवाओं के लिए दिए जाने वाले सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य भारती’ सम्मान, अमृत लाल नागर सम्मानबाबू श्याम सुंदर दास सम्मान तथा उत्तर प्रदेश राज्य कर्मचारी संस्थान  के सर्वोच्च सम्मान सुमित्रानंदन पंतउत्तर प्रदेश रत्न सम्मान सहित बारह दर्जन से अधिक राजकीय प्रतिष्ठित साहित्यिक एवं गैर साहित्यिक संस्थाओं से सम्मानित एवं पुरुस्कृत। 

आदरणीय डॉ राकेश चक्र जी के बारे में विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 संक्षिप्त परिचय – डॉ. राकेश ‘चक्र’ जी।

आप  “साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र” के माध्यम से  उनका साहित्य प्रत्येक गुरुवार को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र – # २८८ ☆ 

बाल गीत – सुंदर-सुंदर लिखतीं लेख ☆ डॉ राकेश ‘चक्र’ 

चिड़ियाँ आईं पास अनेक।

सुंदर – सुंदर लिखतीं लेख।।

 *

कोई लिखती नया पहाड़ा।

नहीं सताए उनको जाड़ा।

सुख – दुख में वे रहतीं एक।

सुंदर – सुंदर लिखतीं लेख।।

 *

प्रकृति उनकी जीवन साथी।

भोर जगें वे करें सुप्रभाती।

सादा जीवन करता नेक।

सुंदर – सुंदर लिखतीं लेख।।

 *

पंखों का नित कम्बल ओढ़ें।

नहीं कभी वे रुपया जोड़ें।

करतीं हैं सबका अभिषेक।

सुंदर – सुंदर लिखतीं लेख।।

 *

झूठ न बोलें कभी बिचारी।

सदा रखें अपनी हुशियारी।

कभी न खाएँ , चाउमीन केक।

सुंदर – सुंदर लिखतीं लेख।।

© डॉ राकेश चक्र

(एमडी,एक्यूप्रेशर एवं योग विशेषज्ञ)

90 बी, शिवपुरी, मुरादाबाद 244001 उ.प्र.  मो.  9456201857

Rakeshchakra00@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २८४ – सोबती…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २८४ – विजय साहित्य ?

☆ सोबती…!

वेळ द्यायचा कुणाला

वैयक्तीक गोष्ट ठरे

जिवलग मित्रासाठी

पाझरती स्नेहझरे..! १

*

नसे मैत्रीत हिशोब

असे प्रेम जीवापाड

नाही लपू देत कुणा

संशयाच्या दाराआड…!२

*

मैत्री नाही व्यवहार

नाही‌ स्वार्थी देणे घेणे

निरालस अपेक्षांचे

जाते देऊनीया देणे…!३

*

शब्दाविना जिथे जिथे

काढी आवर्जून वेळ

त्याच नात्यामधे जमे

जीवलग मैत्री मेळ…!४

*

कोणत्याही अटीविना

नाते मैत्रीचे टिकेल

अविश्वास संशयाला

तिथे निरोप मिळेल…!५

*

कुणासाठी द्यावा वेळ

नाही सांगावे लागत

जिथे वाहे स्नेह झरा

तिथे येतसे धावत…!६

*

त्याच त्याच चुका जेव्हा

सवयींचा होती भाग

नाते निखळ मैत्रीचे

जाते लावूनीया आग..!७

*

नको अपेक्षांचे ओझे

करा मित्रांची कदर

वेळ वाईट‌ येताच

धरा मैत्रीचा पदर…! ८

*

समर्थन पडे थिटे

फाटे कारणांची झोळी

दोष स्वभावाचे करी

सुखी जीवनाची होळी…!९

*

आहे ताकद तोवर

पैसा खेळतो हातात

आयुष्याच्या‌ संध्याकाळी

हवा‌ सोबती दारात…!१०

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कीर्तीचा मृदंग… ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ कीर्तीचा मृदंग… ☆ प्रा. भरत खैरकर 

विरुनी जरा उरावे, धरित्रीच्या ठायी

वेडे समर्पण आपले होईल सुगंधी जाई!

इच्छांची टोके आपल्या बांधती रेशीमगाठी

उचलावे आयुष्य सारे श्रमाळल्या हाती!

 *

शीव ओलांडूनी दुराव्याची पंखात घ्यावे आभाळ

आसमंती वास्तव्य जरी कां धरित्रीत असावी नाळ!

 *

आत्म्याची राख होता अश्रूंचे वाढी ओझे

काळाच्या उदरात कीर्तीचा मृदंग वाजे!

 

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ९४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ९४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- सगळं सुरळीत पार पडणार हेच मी गृहीत धरलं होतं आणि ते गृहितच असं चुकीचं ठरू पहात होतं. त्यामुळेच सहजसाध्य वाटणारंच आता अप्राप्य होऊन बसलं. म्हणूनच माझी चलबिचल सुरू झाली आपल्या हक्काचं कांहीतरी नाकारलं जात असल्याची रुखरुख माझं मन पोखरू लागली.

 अखेर काय निष्पन्न होणार हे नेहमीप्रमाणे ‘तो’च तर ठरवणार होता!)

मी स्वतःचीच अशी समजूत घातली खरी पण तरीही त्या रात्री अंथरुणाला पाठ टेकली तेव्हा पुन्हा हेच सगळे विचार मनात गर्दी करू लागले.

“आपण नंतर बोलू यावर, ठरवू काय करायचं ते.. “असं वखरेसाहेब म्हणाले होते. पण ठरवू म्हणजे कधी? अर्ज करायची मुदत तर एक एक दिवस संपत चालली होती. आणि ‘ठरवू काय ते’ म्हणजे काय? त्यांनीच ठरवायचं कां? की मी? मीच जर ठरवायचं असेल तर मी ते ठरवलं होतंच ना? पण हायर मॅनेजमेंटला फक्त

अनप्रॉडक्टिव्ह स्टाफच कमी करायचा होता म्हणे. पण उर्वरित स्टाफपैकी ज्यांचे हितसंबंध अडचणीत येतील ते लिटिगेशन्स सुरू करण्याची शक्यता गृहित धरून सदर योजनेच्या नियमावलीत ही योजना सर्वांसाठीच खुली ठेवली गेली होती. हायर ऑथाॅरिटीज् कडून त्यामुळेच सर्व झोनल व रीजनल हेडस् ना बँकेतील संपूर्ण कारकीर्द चांगली असणाऱ्या स्टाफ मेंबर्सना सदर योजनेचा लाभ घेण्यापासून परावृत्त करण्याच्या तोंडी तरीही स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या होत्या!!

अशा सगळ्या पार्श्वभूमीवर सदर योजनेचा लाभ घेणे कायद्यानुसार मला शक्य असूनही, वखरेसाहेबांना दुखवून कांही करण्याची माझी इच्छा नव्हती. पूर्ण विचारांती मला जाणवले ते हेच की आपल्याला या संधीचा लाभ घेता येणार नाही या विचाराने नव्हे, तर वखरे साहेबांना दुखवून तो लाभ मला घ्यावा लागेल या शक्यतेचा मला त्रास होतोय. हे जाणवलं आणि मन थोडं शांत झालं. आपण फार घाई गडबड न करता एक-दोन दिवस वाट बघून, त्यांचा कल पाहून त्यांच्याशी बोलू. आपली नेमकी बाजू त्यांना पटवून देऊ. पुढं काय करायचं ते ते वेळ येईल तेव्हा ठरवू असा विचार केला आणि मी निश्चिंत झालो.

याबाबतचे विचार आणि चलबिचल वखरेसाहेबांच्या मनातही होतीच हे मला दुसऱ्या दिवशी बँकेत गेल्यानंतर लगेचच जाणवलं. कारण मी कांही कामानिमित्त त्यांच्या केबिनमधे गेलो तेव्हा माझं नेमकं काय काम आहे हे जाणून न घेता त्यांनी मी या विषयाबद्दलच बोलायला आलोय हे गृहितच धरलं असावं तसं मला विचारलं,

” मग काय ठरलं तुमचं? “

प्रश्न अनपेक्षित होता. त्यामुळे पटकन् मला काय बोलावं सुचेना. पण तरीही मला हा निर्णय घेण्यामागची कांहीतरी वेगळीच खोटी कारणं पुढे करणं किंवा अगदी हिशोबीपणाने बोलून माझ्या निर्णयाचं समर्थन करणं नको होतं. मला या निर्णयापर्यंत येण्यामागची माझी खरी भूमिका अतिशय मोकळेपणाने त्यांना सांगायची होती आणि त्यासाठी हीच वेळ योग्य आहे हे लक्षात आलं. तरीही, त्यांनी मला विचारलं म्हणून लगेच उतावीळपणाने कांही बोलण्यापेक्षा मला थोडं थांबावंसं वाटलं म्हणून मी म्हंटलं,…

“आपण नंतर सविस्तर बोलू असं म्हणाला होतात ना तसं आत्ता तुम्ही बिझी असाल तर एक-दोन दिवसांनी हवंतर बोलूया कां? “

” तसं तर कामं कधीच संपणार नाहीयत. केव्हातरी बोलायला हवंच. बसा. आधी तुम्ही कशासाठी आला होतात ते काम आवरू, मग बोलू. ” ते मनापासून म्हणाले.

” ते महत्त्वाचं असलं तरी तसं खूप अर्जंट नाहीय. आॅडिट रिपोर्टवरील क्वेरीजच्या रिप्लायचा ड्राफ्ट मी बनवलाय. तो दाखवायला आलो होतो. तुम्ही एकदा बघून घेतलात तर… “

मी पुढे केलेली फाईल त्यांनी हातात घेतली आणि टेबलवर बाजूला ठेवून दिली.

” ते मी नंतर वाचून बघतो. मग? काय ठरलं तुमचं? ” त्यांनी थेट विषयालाच हात घातला.

“या स्वेच्छानिवृत्ती योजनेकडे मी मला उमेदीच्या वयात मिळणारं १० वर्षांचं ‘बोनस लाईफ’ म्हणून बघतो. ” मी सांगू लागलो. या निर्णय प्रोसेसमधे माझ्या मनात येऊन गेलेले उलटसुलट विचारच निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी स्वत:शीच एकदा तपासून पहावेत तशा प्रामाणिकपणाने मी बोलत राहिलो. माझं आर्थिक नियोजन, इतकी वर्षं मला मनासारखे जोपासता न आलेले माझे आवडते छंद, करायची तीव्र इच्छा असूनही केवळ वेळेअभावी करता न आलेल्या आणि दहा वर्षानंतर कदाचित सगळी उमेद/उत्साह संपून गेल्यानंतर इतक्या असोशीने पुढे कधी करता यायची शक्यताच नसलेल्या अशा कितीतरी गोष्टी, सगळं त्यांना अगदी मोकळेपणानं सांगून टाकलं.

“घरी बोललायत हे सगळं? “

” नाही. कारण बायको आणि मुलगा दोघांनाही हे सगळं माहिती आहे. आर्थिक नियोजनाबद्दल मात्र मी त्यांच्याशी मोकळेपणाने बोललोय. संपूर्ण घरखर्च आणि संसारातल्या माझ्या इतरही सगळ्याच जबाबदाऱ्या या स्वेच्छानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या अतिरिक्त आर्थिक लाभातूनच व्यवस्थित मॅनेज होऊ शकतायत याचीही त्यांना कल्पना दिलीय. माझा मुलगा हुशार आहे. तो सी. ए. ची तयारी करतोय. इंजीनियरिंग किंवा मेडिकलला न गेल्यामुळे त्याच्या शिक्षणाचा खर्च तसा कांहीच नाहीय. उलट त्याने ‘स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यानंतर तुम्ही पैसे कमावण्यासाठी दुसरीकडे कुठेही नोकरी करायची नाही’ अशी अटच घातलीय. या निवृत्तीमुळे मला न मिळू शकणारी एकच गोष्ट म्हणजे एरवी मिळण्याची शक्यता असलेली पुढची प्रमोशन्स! पण त्याचा हव्यास मला यापूर्वीही कधी नव्हताच. आजपर्यंत त्या त्या वेळी मला सगळं मिळत गेलंय आणि जे मिळालं त्यात मला समाधान आहे. एरवीही यापुढच्या उच्चाधिकार पदांपासून मिळणारं समाधान किती फसवं आहे याचा अनुभव आपल्यापैकी सर्वजण घेत आहोतच ना साहेब? त्यापेक्षा स्वेच्छानिवृत्ती नंतर मी आधी सांगितलेल्या सर्व गोष्टींमधून मला मिळणारं समाधान माझ्यासाठी अधिक मोलाचं असेल. “

वखरेसाहेब शांतपणे ऐकत होते.

” हे खरंतर योग्यच आहे, पण एम्. डीं च्या सूचनांचं काय करायचं? ते ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत असणं शक्यच नाही.. ” त्यांच्या बोलण्यातली असहायता मलाही अस्वस्थ करून गेली.

” एक मार्ग आहे सर.. ” मी म्हणालो आणि अगदी ऐनवेळी आपल्याला हे नेमकं सुचलंच कसं याचं मलाच आश्चर्य वाटू लागलं.

“कोणता मार्ग? ” त्यांनी उत्सुकतेने विचारलं.

“मी सर्क्युलरनुसार योग्य मुदतीत माझा अर्ज सबमिट करतो. त्याखेरीज बँकेचं हित लक्षात घेऊन माझा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज

मॅनेजमेंटने नाकारला, तर मी बँकेचा निर्णय विनातक्रार स्वीकारेन आणि त्याविरुद्ध कोणतीही लिटिगेशन्स सुरू करणार नाही असं लेखी आश्वासनही मी तुमच्याकडे देऊन ठेवीन. “

“त्याने काय होईल? “

“मॅनेजमेंटला लिटिगेशन्सचीच भीती आहे ना? माझ्याबाबतीत तरी ती रहाणार नाही. आणि त्याचा मला फायदा एकच. उद्या माझ्यापुढे कशी वेळ येईल आज सांगता येणार नाही. कोणत्याही प्रकारचे मतभेद निर्माण झाले तर तेव्हाचे माझे वरिष्ठ “तुम्हाला बँकेने बाहेर पडायचा मार्ग खुला करून दिला होता ना? जबाबदाऱ्या झेपणार नव्हत्या तर तेव्हाच बाहेर पडायला हवं होतंत” असं मला म्हणाले तर मला मिळालेलं स्वेच्छानिवृत्ती नाकारल्याचं पत्र एखाद्या ‘सन्मानपूर्वक सर्टिफिकेट’ सारखं मी त्यांना दाखवू तरी शकेन. साहेब, इथे काही दिवसांपूर्वीच झालेल्या तुमच्या केबिनमधल्या एम्. डी. मीटिंग मधली, तुमचा कांहीही दोष नसताना तुम्हाला दिली गेलेली अपमानास्पद वागणूक आणि त्यावेळी तुमची झालेली मनोवस्था मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली तेव्हाच आपण जसजसे वर जाऊ तसतशी तिथली हवाही कशी विरळ होत जाणाराय याचं प्रत्यंतर आपल्यापैकी सर्वांना आलेलं आहेच. आणि आज तेच मला योग्य दिशा दाखवून गेलंय. ही स्वेच्छानिवृत्ती त्यामुळेच मला आयुष्यात फक्त एकदाच उपलब्ध होणारी अमूल्य संधी वाटतेय एवढंच. “

वखरेसाहेब मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. माझं बोलणं संपलं तसं ते भानावर आले. समोरच्या ग्लासमधलं घोटभर पाणी पिऊन ते शांतपणे म्हणाले,

” खरं आहे तुमचं. माझ्याकडून तुम्हाला कोणतीच अडचण निर्माण होणार नाही. आणि ते लेखी पत्र वगैरे द्यायचीही कांही गरज नाहीय. वरून कुणी कांही विचारलंच तर त्यांना काय सांगायचं ते मी बघेन. यू गो अहेड.. “

अतिशय अनपेक्षितपणे माझ्या डोक्यावरचं ओझं त्यांनी किती अलगद उतरवून घेतलं होतं! त्यांचे आभार मानून मी जायला वळणार एवढयांत त्यांनी मला थांबवलं.

“लिमये, माझ्या घरच्या जबाबदाऱ्या अजून पूर्ण व्हायच्यात. त्या झाल्या असत्या तर आज मीही हाच निर्णय घेतला असता. सोs… यू आर आॅन राईट ट्रॅक. आॅल द बेस्ट. एंजाॅय अॅण्ड बी हॅप्पी…! “

त्याचं बोलणं हे माझ्यासाठी सदिच्छाच नव्हत्या फक्त तर त्यांच्या तोंडून ‘तो’ च देत असावा असा शभाशीर्वादही होता…!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माघारपण… ☆ अर्चना गादीकर निकारंगे ☆

अर्चना गादीकर निकारंगे

🌸 जीवनरंग 🌸

☆ माघारपण… ☆ अर्चना गादीकर निकारंगे 

आज अस्मी खूप खूश होती. कारण पण काही साधेसुधे नव्हते. आज जवळ जवळ सात ते आठ महिन्यांनी तिचे आई बाबा आपल्या लाडक्या लेकीकडे राहायला येणार होते. हल्ली वयाच्यामुळे तिच्या आई वडीलांच्या दुखण्यांना सुरूवात झाली होती. ते काय कोणाच्या हातात नसते असे अस्मी त्यांची समजूत घालण्यासाठी म्हणत असे. आज खूप दिवसांनी ते लेकीकडे येणार होते. मागील २-३ दिवस अस्मीचे ते दोघे आल्यावर काय काय करायचे, काय काय बनवायचे ह्याचा विचार करण्यातच गेले होते. अस्मी त्यांची वाट पाहत होती. अव्दैत तिचा नवरा थोड्या वेळापूर्वी कामावर गेला होता.

काही वेळातच बंगल्याच्या पोर्चमध्ये गाडी थांबल्याचा आवाज आला. आले वाटत आई बाबा असे म्हणत चार -पाच वर्षांच्या मुलीप्रमाणे धावत ती बाहेर आली. आई वडिलांना पाहून ती आनंदीत झाली. सगळे घरात आले. दोघांना फ्रेश व्हायला सांगून ती किचनमध्ये गेली. बाबांना आवडतात म्हणून तिने सोयाबीनचे कटलेट व गोडाचे आप्पे स्वयंपाक करायला येणार्‍या शालिनीबाईंना हाताशी घेऊन बनविले होते.

उकाड्याचे दिवस असल्याने तिने आवर्जून कैरी साखरेचे केशर घालून पन्हे बनविले होते. सर्व पदार्थ ट्रेमध्ये व्यवस्थित ठेवून ती ट्रे घेऊन हाँलमध्ये आली. आई बाबा फ्रेश होऊन सोफ्यावर येऊन बसले होते. लेकीने आपण येणार म्हणून ठरविलेला बेत पाहून ते खूश झाले. एकेका पदार्थाचा आस्वाद घेताना दोघेही तिच्या पाककलेची स्तुती करत होते. आपली लेक केवढी समजूतदार आहे या विचाराने ते थोडे गहिवरले. त्यांनी केलेल्या कौतुकाने तिला पण जरा भरून आले. मध्येच तिने अव्दैतला कामावर फोन करुन आई बाबांच्या घरी पोहचल्याची बातमी दिली. पलिकडून त्याने पण त्यांच्या येण्याचा झालेला आनंद बोलण्यातून दाखविला होता. तो सी. ए. होता. तिथे जवळच त्याची स्वतःची फर्म होती. मी आज लवकर येतो असे सांगून त्याने फोन ठेवला. सांगितल्याप्रमाणे अव्दैत संध्याकाळी नेहमीपेक्षा खूपच लवकर आला. फ्रेश होऊन तो पप्पांशी गप्पा मारायला तयार झाला. त्यांच्या गप्पा रंगात आल्यावर अस्मीची आई लेकीला मदत करायला किचनमध्ये गेली. बाबा व अव्दैत ह्यांचे विचार एकमेकांशी सुसंगत होते. त्यामुळे ते दोघे तासनतास गप्पांमध्ये रंगून जात असत. लेकीकडे आल्यावर जावयाशी गप्पा मारणे हा त्यांचा आवडीचा कार्यक्रम होता.

दुसर्‍या दिवशी कामावर जाताना संध्याकाळी लवकर येतो असे सांगून अव्दैत कामावर गेला. मी घरी येईपर्यंत संध्याकाळी तुम्ही तिघे निसर्ग तलावाच्या तिथे असलेल्या राधाकृष्णमध्ये जाऊन या, असे त्याने अस्मीला सांगितले. त्याला चांगलेच ठाऊक होते की तिथले दहीवडे हा बाबांचा विक पाॅइंट होता. अव्दैत घरी येईपर्यंत अस्मी व तिचे आई बाबा तिथे जाऊन आले.. अव्दैतने घरी येताना सर्वांसाठी नाटकाची तिकीटे आणली होती. नाटक पाहून झाल्यावर तिथे जवळच जेवण उरकून ते घरी परतले. बाबा व आई थोडे दमले होते तरी खूश दिसत होते. दुसर्‍या दिवशीच्या जेवणात अस्मीने शालिनीबाईंना सांगून चुलीवरच्या मटण व भाकरीचा बेत केला होता. त्यांच्याकडे किचनचा ताबा सोपवून अव्दैत बाहेर पडल्यावर अस्मी त्या दोघांना घेऊन त्यांच्या आवडीच्या ठिकाणी जाण्यासाठी बाहेर पडली. चांगले ३ ते ४ तास खरेदी करून ती दोघे मात्र दमली होती. पण खरेदी करण्याचा उत्साह त्यांना दमून देत नव्हता. घरी आल्यावर लेकीने केलेला जेवणाचा बेत पाहून दोघेही भारावून गेले. मनाची ती अवस्था बाजूला करून बाबांनी विचारले, ” अस्मी राणी! अजून काय काय करून खाऊ घालणार आहेस ह्या आई बाबाला? ” तिला आठवले की बाबा खूश झाले किंवा भावूक झाले की तिला नुसते अस्मी न म्हणता अस्मी राणी म्हणत असत.

लवकरच आई बाबांचा घरी जाण्याचा दिवस उजाडला. अव्दैत व अस्मीने मिळून त्या दोघांना आणखीन काही दिवस राहण्यासाठी खूप आग्रह केला. पण आई बाबांनी त्यांच्या आग्रहाला जास्त उचलून धरले नाही. त्यामुळे अस्मी थोडी नाराज झाली. अव्दैतने तिला समजावले. आपल्या खोलीत आई व बाबा आपल्या सामानाची बांधाबांध करू लागले. अस्मीला न सांगताच अव्दैतने आईसाठी उंची साडी तर बाबांसाठी एक सिल्कचा झब्बा आणला होता. दोघांच्या वयाला अनुरूप असे रंग त्याने त्यांच्यासाठी आणले होते. त्यांच्या खोलीत जाऊन त्याने त्यांच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू त्यांना दिल्या आणि म्हणाला, ” पाहून सांगा जरा तुम्हाला आवडल्या का? “अस्मी आणि अव्दैत त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागले. दोघांनाही खरेदी खूप आवडली. ” ह्याची काय गरज आहे? ” अस म्हणायला मात्र ते विसरले नाहीत.

पुढल्या दिवशी सकाळी लवकर उठून दोघांनी आपले आवरले व अस्मीने बनविलेली इडली सांबार खाऊन दोघांनी आपापल्या बॅगा गाडीत नेऊन ठेवल्या. अव्दैत आज कामावर जरा उशीराच निघणार होता. आई बाबांच्या येण्याने आनंदी झालेली अस्मी आज कावरीबावरी झाली होती. गाडीपाशी थांबून सगळे एकमेकांना निरोप देत होते. झटकन पुढे होऊन अव्दैतने आई बाबांसाठी गाडीचा दरवाजा उघडला. दोघे गाडीत बसल्यावर त्याने तो हळूच बंद केला. बाबांनी त्यांच्या बाजूची काच खाली करून अस्मीला म्हटले, ” चल आता आम्ही निघतो. तुमच्याकडे येऊन खूप छान वाटले. चार दिवस कसे पटकन निघून गेले ते खरच कळलेसुद्धा नाही. पोरी किती केलेस तू आमच्यासाठी या चार दिवसांत. आमच्या दोघांचे तू आईच्या मायेने माघारपणच केलेस. ” त्यांच्या ह्या बोलण्याने अस्मीच्या नकळत तिच्या डोळ्यांतील अश्रू चटकन तिच्या गालावर उतरले. त्यांचे बोलणे तिला नकळत मोठेपणा देऊन गेले होते. बाबांच्या नजरेतून तिचे अश्रू लपले गेले कारण नेमकी त्याचवेळेस त्यांनी गाडीच्या खिडकीची काच वरती केली होती.

अव्दैतचे सहजच बाजूला उभ्या असलेल्या अस्मीकडे लक्ष जाताच तिला विचारले, ” काय ग, रडतेस की काय? ” तेव्हा तिने तेवढ्याच सहजपणे त्याला सांगितले, ” काही नाही रे काहीतरी डोळ्यात गेल्यासारखे झाले त्यामुळे डोळ्यात पाणी आले इतकेच. ” अव्दैत काय समजायचे ते समजला.

© अर्चना गादीकर निकारंगे 

मुंबई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वाळवंटातील हिरवळ… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

??

☆ वाळवंटातील हिरवळ… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

बऱ्याच ठिकाणी लग्नानंतर स्वागत समारंभाचे आयोजन केले जाते. हल्ली त्यासाठी ‘ रिसेप्शन ‘हा इंग्रजी शब्द मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. कधी कोणाचा गौरव सोहळा असतो तर कधी कोणाची एकसष्ठी किंवा एकाहत्तरी किंवा सहस्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम अशा विविध कारणांनी असे कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा कार्यक्रमांना आपण हजेरी लावतो. कार्यक्रम पत्रिकेत उपस्थित राहून आपण कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि स्नेहभोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केलेले असते. हे स्नेहभोजन म्हणजे बऱ्याच वेळा बुफे असते.

‘कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी ‘ असे आवाहन केलेले असल्यामुळे सर्वजण उत्तम प्रकारचा पोशाख घालून अंगावर सुगंधी द्रव्य फवारून अशा कार्यक्रमांना जाऊन खरोखरीच त्यांची शोभा वाढवत असतात. बऱ्याच वेळेला असे कार्यक्रम म्हणजे फॅशन शो सारखे वाटतात. या कार्यक्रमांमध्ये काही ओळखीची बरीच मंडळी भेटते. एखाद्या लांबट टेबलवर पांढरे स्वच्छ आच्छादन घालून निरनिराळे खाद्यपदार्थ आकर्षक पद्धतीने मांडून ठेवलेले असतात. बाजूलाच नव्या कोऱ्या डिश असतात. जणू काही त्या कार्यक्रमासाठी नवीनच आणलेल्या! प्रत्येक डिशवर पेपर नॅपकीन असतो. मंडळी रांगेत उभे राहून आपल्या हाताने आपल्याला हवे ते पदार्थ घेत असतात.

वधू-वरांना किंवा सत्कारमूर्तींना स्टेजवर जाऊन भेटवस्तू द्यायची, शुभेच्छा द्यायच्या आणि यजमानांचा निरोप घेऊन मार्गस्थ व्हायचे असा साधारण हा प्रकार असतो. यजमान बिचारे मनापासून अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. त्यासाठी आपला वेळ, पैसा आणि श्रम खर्च करत असतात. आपण कार्यक्रमासाठी यावे आणि शुभेच्छा किंवा शुभाशीर्वाद द्यावेत असा त्यांचा प्रामाणिक हेतू असतो. आणि तो मोठ्या प्रमाणावर साध्य होतानाही दिसतो. परंतु अलीकडे अशा कार्यक्रमांमध्ये त्यांची सहजता जाऊन आणि मूळ उद्देश बाजूला पडून औपचारिकता आलेली दिसते.

खरंतर असे कार्यक्रम म्हणजे सामाजिक जीवनातील एक सुंदर प्रसंग! यानिमित्ताने समाजाच्या विविध स्तरातील लोक एकत्र येत असतात. प्रत्येक जण नेहमी आपापल्या कामात व्यस्त असल्यामुळे इच्छा असूनही मित्रांच्या, नातेवाईकांच्या किंवा ओळखीच्या लोकांच्या भेटी होत नाहीत किंवा त्यांच्याकडे जाण्यासाठी वेळ मिळत नाही. परंतु अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्याला आपल्या ओळखीच्या व्यक्तींना भेटण्याची संधी उपलब्ध करून देत असतात. त्यामुळे अशा व्यक्तींकडे जाण्यासाठी जो वेळ आपल्याला द्यावा लागला असता तो वेळ वाचतो आणि त्यांच्याशी अनौपचारिक गप्पागोष्टी करण्याची संधी अनायासे उपलब्ध होते. परंतु किती जण या प्रसंगाचा असा लाभ घेतात?

अशा कार्यक्रमात आपल्या ओळखीची व्यक्ती दिसली की आपण आपला हात उंचावून त्यांना अभिवादन करतो किंवा हाय हॅलो म्हणतो. चेहऱ्यावर एखादी स्मितरेषा असते. फार तर ” काय? कसे आहात? खूप दिवसांनी भेटला ” या पलीकडे संभाषणाची गाडी पुढे जात नाही. असा औपचारिक संवाद होऊन जो तो आपापल्या उद्योगात (म्हणजे येथे जेवण्याच्या किंवा शुभेच्छा देण्याच्या कार्यक्रमात) मग्न होऊन जातो.

अशा प्रसंगी समाजाच्या विविध स्तरातील लोक एकत्र आलेले असतात. परंतु आपण सर्वांशी संवाद साधत नाही. आपल्या ओळखीचे, आपल्या बरोबरीचे, आपल्या सामाजिक स्तराला शोभतील अशा प्रकारच्या व्यक्तींशीच आपण फार तर थोडे हितगुज करतो. या कार्यक्रमात असेही काही लोक आलेले असतात की ज्यांचा सामाजिक स्तर किंवा प्रतिष्ठा आपल्यापेक्षा कमी असते. अशा लोकांना आपल्याशी बोलावेसे वाटते परंतु अशावेळी आपली प्रतिष्ठा किंवा अहंकार आडवा येतो आणि आपण त्यांच्याशी बोलणे टाळतो काही लोक तर अशाप्रसंगी ओळखही दाखवत नाहीत. आयोजकांनी आवाहन केल्याप्रमाणे आपण खरोखरच कार्यक्रमाची फक्त शोभा वाढवण्यासाठी येतो आणि एखाद्या शोभेच्या वस्तूसारखेच येतो आणि जातो.

पण खरं तर असे कार्यक्रम म्हणजे लोकांशी संबंध दृढ करण्याची मोठी संधी असते असे मला वाटते. आजच्या काळात जसे आपण अनेक गोष्टींचे रिन्यूअल करतो तसेच संबंधांचे देखील रिन्यूअल करण्याची ही संधी असते. आपल्या मित्रमंडळींची, नातेवाईकांची आस्थेने विचारपूस करावी, त्यांची सुखदुःखे जाणून घ्यावी यासाठी हे कार्यक्रम अनायासे संधी उपलब्ध करून देतात. पण औपचारिकता, कृत्रिमता, अभिमान, अहंकार, खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पना यासारख्या गोष्टींमुळे आपण अशा प्रकारची चांगली संधी अशा कार्यक्रमांमधून दवडतो.

पण अशाही प्रसंगात प्रेमाने विचारपूस करणारे, आस्थेने चौकशी करणारे काही लोक भेटतात. असे लोक मला वाळवंटातील हिरवळी सारखे वाटतात. त्यांच्याजवळ कृत्रिमता नसते. अभिमान किंवा अहंकार नसतो किंवा खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनाही नसतात. अशी माणसे प्रेमाचे किंवा शीतलतेचे गुलाबपाणी प्रत्येकाच्या अंगावर शिंपत असतात. अशी माझ्या ओळखीची काही माणसे आहेत. ती भेटली म्हणजे जवळ येऊन आवर्जून बोलणारच! कधी कधी त्यांच्या पिशवीत गुलाबपुष्पे किंवा चाफ्याची फुले असतात. आपल्या ओळखीच्या व्यक्तींना ही फुले देऊन आपुलकीच्या सुगंधाची देवाण-घेवाण करतात. काहीजण जवळ येऊन अकृत्रिम हस्तांदोलन करतात किंवा गळाभेट घेतात. यातूनही संबंध दृढ होतात अशा व्यक्तींबद्दलची आपुलकी, प्रेम वाढीस लागते. अशी माणसे संकटप्रसंगी धावून येतात, मदतीला नेहमीच तयार असतात. अशी माणसे म्हणजे समाजरूपी उपवनात फुललेली सुंदर फुलेच! वाळवंटात सगळीकडे वाळूच वाळू पसरलेली असते आणि रखरखीत वातावरण असते. अशा वातावरणात कुठे अपवादाने हिरवळ दिसली की मन प्रसन्न होते. अशीच ही माणसे वाळवंटातील हिरवळ!

© विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हे भारतातच घडू शकतं… – लेखिका : मृदुला बेळे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? इंद्रधनुष्य ?

☆ हे भारतातच घडू शकतं… – लेखिका : मृदुला बेळे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे

मी इटलीमधल्या तुरीन इथे बौद्धिक संपदा कायद्यात एलएलएम करत होते, तेंव्हाची गोष्ट आहे, 2013 सालामधली. दिवसवसभराच्या लेक्चर्सने डोकं आंबून गेलं होतं, तेंव्हा एलिझा- आमची प्रोग्राम डिरेक्टर -वर्गात आली. ” माझ्याकडे इथं होणाऱ्या चित्रपट महोत्सवाचे काही फ्री पासेस आहेत, कुणाकुणाला यायचंय बोला पटकन”, ती म्हणाली. मी अज्जिबात वेळ न दवडता हात वर केला, आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एलिझा आणि आम्ही चार पाच जण या चित्रपट महोत्सवाला निघालो. जाऊन पोचलो तर समजलं की तिथं आज जे चित्रपट दाखवले जाणार होते त्यात एक भारतीय चित्रपट होता. डायलन मोहन ग्रे या दिग्दर्शकाचा ‘फायर इन द ब्लड’ या नावाचा.

हा चित्रपट पाहून बाहेर पडले तेंव्हा मी आंतरबाह्य हादरलेले होते. या हादरण्याच्या आड दडलेलं होतं एक कौतुक आणि एक शरम. जगात केवळ औषधं परवडत नसल्याने झालेल्या करोडो गरीब आफ्रिकी लोकांच्या मृत्यूने मी हादरून गेले होते. त्यांच्या मदतीला धावून गेलेल्या सिप्ला या भारतीय कंपनीच्या डोंगराएवढ्या कामाबद्दल एक भारतीय असूनही, आणि औषधनिर्माणशास्त्राची प्राध्यापिका असूनही मला काडीचीही माहिती नव्हती, याची मला प्रचंड लाज वाटली होती. पण त्याचवेळी कौतुक आणि आदराने मन भरून आलं होतं. हा आदर होता गरीब लोकांना स्वस्त दरात औषधं मिळावीत म्हणून सतत धडपडत आलेल्या, त्यासाठी योग्य धोरण, कायदे ठरवत आलेल्या भारत सरकारच्या दूरदर्शी धोरणाबद्दल, त्या दृष्टीने सतत प्रयत्नशील राह्यलेल्या भारतीय जनरिक औषध उद्योगाबद्दल, आणि त्यातल्या सिप्ला, डॉ. रेड्डीज, रॅनबॅक्सी या सारख्या औषध कंपन्यांबाबत.

त्या दिवशी महोत्सवाहून परत आले ती या विषायाचं भूत मानगुटीवर बसवून घेऊन. याबद्दल खोलात जाऊन वाचल्याशिवाय आणि माहिती करून घेतल्याशिवाय माझ्या जीवाला आता चैन पडणार नव्हती. सुदैवाने वाचण्यासारखं भरपूर काही उपलब्ध होतं. मुळात औषधनिर्माण आणि पेटंट हे दोन्ही माझ्या अभ्यासाचे विषय असल्याने वाचलेलं सगळं विनासायास समजत देखिल होतं. एक दिवस अचानक असं वाटायला लागलं की, ” अरे आपल्या देशातल्या वाईट गोष्टींना नावं ठेवण्यात आपण सगळे किती हिरिरीने पुढाकार घेतो. आपल्या देशातला भ्रष्टाचार, इथली रहदारी, अस्वच्छता, गरिबी याबद्दल आपण किती सतत तक्रार करतो, टीका करतो. मग आपल्या देशाने जगासाठी केलेल्या चांगल्या गोष्टीचा धिंडोराही आपण त्याच उत्साहाने पिटायला हवा, नाही का? त्यात आपण मागे का? कुणी तरी करायलाच हवं हे काम”. हा विचार डोक्याच्या एका कप्प्यात सतत सतत फेर धरून नाचत होता.

दरम्यान मी तुरीनहून भारतात परत आले, माझ्या दिनक्रमात अडकले, तरी हा विषय पिच्छा सोडत नव्हता. ” कथा अकलेच्या कायद्याची” या बौद्धीक संपदेवरील माझ्या स्तंभाचं लोकसत्तेत लिखाण सुरू झालं. या स्तंभाला मिळालेला प्रतिसाद अत्यंत सुखावणारा तर होताच. एक दिवस ‘ फायर इन द ब्लड’ पाहून बसलेला धक्का, वाटलेली शरम आणि जाणवलेला अभिमान, सगळे जणू कट करून गोळा झाले, आणि माझ्याभोवती फेर धरून नाचत सांगू लागले, “तूच सांग की ही कहाणी जगाला- तूच लिही” आणि माझ्याही नकळत मी आफ्रिकेत ” औषध औषध” म्हणत प्राण सोडणाऱ्या लाखो करोडो आफ्रिकन माणसांना वचन देऊन बसले – ” हो मी लिहीन”.

आणि मग सुरू झाला एक वेडं करणारा प्रवास. मिळेल तिथून, मिळेल त्या स्वरूपात, मिळेल ते वाचायला सुरुवात झाली. एक दिवस सिप्लाचे सर्वेसर्वा युसुफ हमीद यांचा ईमेल अ‍ॅड्रेस कुठून तरी मिळाला. तो बरोबर आहे की नाही हे सुद्धा मला माहित नव्हतं. आणि ते मुळीच उत्तर देणार नाहीत हे माहित असूनही ” मला तुमच्या कामावर असं असं पुस्तक लिहायचंय” असं कळवणारा ईमेल मी त्यांना धाडून मोकळी झाले. दुसऱ्याच दिवशी त्यांचं उत्तर आलं. पुढच्याच महिन्यात ते लंडनहून भारतात येणार होते आणि तेंव्हा मला भेटायला ये असं त्यांनी मला कळवलं होतं. मी हे वाचून प्रचंड खूश झाले आणि जोमाने कामाला लागले. आणखीन झपाट्याने वाचू लागले.

दरम्यानच्या काळात ते मुंबईत आले. माझं दोन तीनदा त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं. दिलेल्या वेळेला त्याना फोन करूनही ते जर उचलू शकले नाहीत तर ते आठवणीने परत फोन करत आणि ” येस्स माय डिअर गर्ल… टेल मी व्हॉट आय कॅन डू फॉर यू” असं प्रेमाने बोलायला लागून मला आश्चर्यचकीत करत असत.

शेवटी त्यांच्या भेटीचा दिवस ठरला. भेटीच्या वेळेच्या बरीच आधी पोचून मी मुंबई सेंट्रल स्टेशन वरून सिप्लाच्या जुन्या कार्यालयाकडे चालत निघाले तेंव्हा मनात प्रचंड उत्कंठा तर होतीच. पण मी प्रचंड बेचैन होते. डॉ युसुफ हमीद यांच्या सारखा केम्ब्रीज मधे शिकलेला ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध माणूस… अब्जाधीश… सिप्ला या भल्या मोठ्ठ्या औषध कंपनीचा सर्वेसर्वा! तो माझ्यासारख्या एका किरकोळ प्राध्यापिकेला भेटायला तयार झाला होता. आणि मी त्यांच्याशी नीट बोलू शकेन का या विचाराने माझ्या तळहाताला घाम फुटला होता… पाय लटपटत होते… छाती धडधडत होती. एकदाची शेवटच्या मजल्यावरच्या त्यांच्या भव्य कार्यालयात जाऊन पोचले. त्यांच्या कार्यालयात होते ते स्वत: आणि एमके हमीद- त्यांचे बंधू. लालसर गोरापान रंग, पूर्ण चंदेरी झालेले केस, तीक्ष्ण नजर पण बोलण्यात अत्यंत मार्दव असलेले माझ्या आजोबांच्या वयाचे डॉ. युसुफ हमीद. त्यांच्या व्यक्तीमत्वाला एक वलय होतं… आणि त्यांच्यासमोर बसल्या बसल्या ते मला जाणवू लागलं. त्यानी मजेशीर बोलून माझी चिंता एकदम दूर पळवून लावली आणि मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. मला हे का लिहावसं वाटतंय असं त्यानी आधी समजून घेतलं. मग मी किती पाण्यात आहे हे जोखण्यासाठी त्यानी मला माझं या विषयातलं ज्ञान तपासून पाहणारे काही प्रश्न विचारले. आणि मी बरोबर उत्तरं दिल्यावर मग मला म्हणाले, ” हं… आता विचार”. आणि मी त्यांची मुलाखत घेऊ लागले.

उत्तरं देताना प्रत्येक गोष्ट त्यांना अगदी लख्ख आठवत होती. किती तरी औषधांच्या रासायनिक संरचना ते समोरच्या वहीत झरझर काढत होते. मधनंच ” रोझी sssरोझीssss” अश्या मोठमोठ्याने हाका मारत आपल्या सेक्रेटरीला कुठला तरी शोधनिबंध, वृत्तपत्रातला एखादा लेख, एखादं पुस्तक आणायला लावत होते. जेवायची वेळ झाली. त्या दिवशी प्रत्यक्ष डॉ. युसुफ हमीद याच्या पंगतीला बसून जेवण्याचा मान माझ्या नशिबात होता. जेवणं आटपून कॉफी पीत पीत आमची मुलाखत परत सुरू झाली. त्या दिवशी संपली नाही म्हणून दुसऱ्या दिवशीही चालू राह्यली. बोलण्याच्या ओघात मी ज्या लोकांशी बोलायला हवं अश्या किती तरी लोकांची नावं ते मला सांगत होते आणि मी लिहून घेत होते. मुलाखत संपवून मी नाशिकला परत आले तेंव्हा मी खरोखर थक्क झाले होते. डॉ. हमीद यांच्या ज्ञानी, मृदू हुशार व्यक्तीमत्वाने दीपून गेले होते.

दोनच दिवसात त्यांच्याकडून एक खोकं भरून पुस्तकं, सीडीज, वृत्तपत्रीय लेख माझ्या घरी येऊन पोचले. त्यानंतर त्यानी सांगितलेल्या या लढ्यातल्या शिलेदारांना शोधून काढून त्यांच्याशी संपर्क करण्याचा माझा उद्योग सुरू झाला. ही मंडळी जगभर पसरलेली होती.

मी राजहंसच्या दि. ग. माजगावकरांना पुस्तकाची कल्पना कानावर घातली आणि त्यांनीही पुस्तक करायला आनंदाने होकार दिला. देशोदेशी पसरलेल्या माझ्या कहाणीच्या नायकांचा शोध घेण्यात गुंतून गेले.

विशेष उल्लेख करीन तो न्यू यॉर्क टाइम्स वृत्तपत्रात आरोग्य विषयक लिखाण करणारे पत्रकार डोनाल्ड मॅकनील यांचा. डोनाल्डने मला आतोनात मदत केली. डॉ. हमीद यांचं काम सगळ्यात आधी जगाच्या नकाशावर जाहीरपणे आणलं ते डोनाल्डने- न्यू यॉर्क टाईम्समधे याबाबत लेख लिहून. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला डोनाल्डने मला मोठमोठे ईमेल्स लिहिले, दुसऱ्याना फोनवर दिलेल्या मुलाखती मला पाठवल्या, स्वत: लिहिलेलं काही लिखाण पाठवलं… आणि इतर किमान पन्नास लोकांशी माझ्या ओळखी करून दिल्या. या सगळ्यांची मी आजन्म ऋणी राहीन.

तुरीनला असताना जी कहाणी ऐकून मी प्रचंड अस्वस्थ झाले होते, हलले होते, ती कहाणी या सगळ्या मंडळींबरोबर जणू पुन्हा एकदा जगले. त्या कहाणीचा एक भाग झाले. या सगळ्यांशी बोलताना, या बद्दल लिहिताना अनेकदा फार भावनिक व्हायला झालं. ही कहाणी लिहिताना औषधनिर्माणशास्त्राची एक प्राध्यापक आणि आजन्म विद्यार्थिनी म्हणून माझी सामाजिक बांधिलकी काय आहे याची लख्ख जाणीव मला झाली. ती जाणीव माझ्या विद्यार्थ्यांमधे यावी म्हणून मी फार विचारपूर्वक प्रयत्न करू लागले.

या विषयातली सगळी तांत्रिक माहिती लिहायची, पण ती सामान्य माणसाला समजली पाहिजे, त्यासाठी ती कादंबरीसारख्या फॉर्ममधे कशी लिहिता येईल, हे एक मोठंच आव्हान होतं.

सामान्य माणूस महाग औषधं घेत राहतो आणि पिळवटला जातो. हे थांबवण्यासाठी भारतीय पेटंट कायद्यात फार उत्तम सुविधा आहेत. त्यावर जगभरातून, विशेषतः अमेरिका आणि युरोपातून प्रचंड टिका होते, भारतावर प्रचंड दबाव आणला जातो. पण आपलं सरकार बधत नाही. आमच्या जनतेचं आरोग्य तुमच्या पेटंटसपेक्षा जास्त महत्वाचं आहे हे ठणकावून सांगत राहते. रेडक्रॉस, डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स सारख्या सेवाभावी संस्थांना गरीब देशात काम करण्यासाठी morning स्वस्त पण उत्तम दर्जाची औषधं भारत पुरवत राहतो. पण त्याचबरोबर अमेरिका आणि युरोपसारख्या दर्जाबाबत अत्यंत जागरूक असणाऱ्या देशांचाही सगळ्यात मोठा निर्यातदार बनतो. भारत हे कसं करू धजावतो हे जाणून घेण्यात इतर देशातल्या लोकांना प्रचंड रस असतो. आर्जेन्टिना, इंडोनेशियातले लोक जेंव्हा येऊन सांगतात की “सामान्य नागरिकांना औषधं स्वस्तात मिळावी म्हणून काय करायचं हे भारताने आम्हाला शिकवलंय आणि तुम्ही दाखवलेल्या रस्त्यावर आम्ही चालतोय”, तेंव्हा ऊर अभिमानाने भरून येतो.

सगळ्या जगाची फार्मसी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या औषधनिर्माण उद्योगाचा आपण एक लहान बिंदू इतका छोटा भाग आहोत या विचाराने फार कृतार्थ वाटतं! आणि म्हणूनच हे ऋण फेडण्यासाठी माझ्यासारख्या या बिंदूने केलेला एक छोटासा प्रयत्न, उचललेला एक खारीचा वाटा, म्हणजे #अशीही_एक_झुंज हे पुस्तक आहे. भारताबद्दल अभिमान वाटण्याचे आणखी एक कारण हे पुस्तक वाचकांना नक्की देईल याची मला नुसती आशा नव्हे तर खात्री वाटते!

लेखिका : मृदुला बेळे

प्रस्तुती : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अडगळीत गेलेले शब्द — ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ अडगळीत गेलेले शब्द — ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

‘अडगळीत गेलेले शब्द’ हे शीर्षक लिहिताच लक्षात आले की अडगळ हा शब्दच अडगळीत गेला आहे. पूर्वी प्रत्येक घरात एक अडगळीची खोली असायची. सगळ्या नको असलेल्या, परंतु कधीतरी कामास येणार्‍या वस्तू तेथे जाऊन पडायच्या.

.

पण 1 BHK अथवा 2 BHK¨च्या जमान्यात अडगळ सरळ भंगारवाल्याकडे जाते.

.

जुनी घरे आठवताच तसे शब्द खूपच आठवायला लागतात. ओटी, ओसरी, पडवी, परसू, माजघर, बळद, कोठीघर हे शब्द विसरायला झाले आहेत.

.

माळा (आताच्या मराठीत अँटिक, पाण्याची अवैध सिंटेक्स टाकी लपवण्याचं ठिकाण) ही पूर्वी अभ्यासाची जागा पण असायची.

.

तसंच आता व्हेंटिलेटर फक्त हॉस्पिटल किंवा थिएटर मधेच दिसतो. दरवाज्यावर एक झरोकावजा खिडकी असायची हवा खेळती रहाण्यासाठी, तिला व्हेंटिलेटर म्हणायचे हे थोड्यांनाच माहीत असेल.

.

‘वळचण’ हा असाच एक अडगळीत गेलेला शब्द. वळचण म्हणजे छपराचा भिंतीच्याही पुढे आलेला भाग. ऊन-पावसापासून घराचे संरक्षण होण्यासाठी तो तसा ठेवलेला असायचा.

.

घराची वळचण ही गुरा-ढोरापासून आगंतुकापर्यंत सगळ्यांचं विसाव्याचं ठिकाण होतं. कोणीही तेथे विश्रांती घ्यावी असं.

.

पागोळं म्हणजे काय? वळचणीवर पाऊस पडल्यानंतर बहुतेक पाणी ‘पन्हळी’ तून जमिनीत जातं. पण तरीही बरेच चुकार थेंब पन्हळीतून न येता इकडून तिकड़ून खाली येतात – ती पागोळी.

.

‘फडताळ’… फडताळ म्हणजे भिंतीतील कपाट. खुंटी, कोनाडे, देवड्या हे असेच अडगळीत गेलेले शब्द.

.

जुन्या घरातील न्हाणीघर (बाथरूम) असंच. ऐसपैस चुलाण्यावर पंचवीस-तीस लिटरचा हंडा तापत असायचा. दगडी चौरंग, अंग घासायला ‘वज्री’, ‘घंगाळ’ असायचे. तेही असेच कालबाह्य झाले.

.

गृहिणीची कुंकवाची पेटी, त्यातील आरसा, फणी, करंडा, मेणाच्या डाबल्या सहित गडप झाली. सामान्य स्त्रीला शृंगारासाठी एवढं साहित्य पुरेसं व्हायचं. आता व्हॅनिटी बॉक्सेस आल्या. प्रसाधनं त्याच्यात, डोळ्यात व दुकानात मावेनाशी झाली.

.

लहान मुलीच्या वेण्या घट्ट लोकरीच्या धाग्याने बांधल्या जायच्या, त्याला

‘आगवळ’ म्हणायचे. हाही शब्द अडगळीतच गेलेला.

.

स्वयंपाकघरातील चूल गेली त्याचबरोबर चूल, वैल, निखारे हे शब्दही गेले.

.

स्वयंपाकघरातील सतेली, तपेली, कथली, रोवळ्या, गंज हे शब्द आठवेनासे झाले.

.

ओगराळं हा शब्दही असाच अडगळीत गेलेला.

.

पंचपाळे, चौफुले, कावळे हे सगळे हरवले.

.

देवघराबरोबर सहाण, गंधाची थाटी गायब.

.

‘काथवट’ हा शब्द तर इतिहासजमा झालेला. काथवट म्हणजे लाकडी परात, हिंदीतली ‘मन चंगा तो कथोटी में गंगा’ ही म्हण त्यावरूनच आलेली.

.

कपड्यांचा विचार करताना तठव, जाजम, बसकर, सुताडे सगळे हरवून गेलेले. सोवळ्यात नेसण्याचा पितांबर हा शब्द ऐकू येतो,

.

पण उत्तरवस्त्र पाभरी’ हरवून गेली.

.

सोवळ्यात नेसण्याची ‘धाबळी’ सोवळ्याबरोबर कालबाह्य झाली.

.

सोन्याचे भाव गगनाला भिडले आणि जुने सोन्याचे अलंकार विसरले गेले.

.

कोठीघरातील कोठय़ा आहेत; पण कणग्या, ढोल्या – ज्यात भरपूर धान्य भरलेले असायचे – त्या गडप झाल्या.

.

सूप खुंटीवरून बाउल मधे आलं.

.

एखाद्या वर्षी जेव्हा शेतात खूपच भरपूर धान्य येईल तेव्हा अडीअडचणीसाठी अंगणात मोठेमोठे ‘पेव’ खणून त्यात ते धान्य साठविले जाई. एकेका पेवात कमीत कमी दहा-दहा पोते साठविले जाई.

.

जेवण्याची पितळी, वाटकावन, बसकर, माडक्यांची उतरंड, फुंकणी, उखळ, मुसळ, खल आणि बत्ता, जातं, खुंटा, पावशेरा, शेर, मण, गुंज, आतपाव, छटाक वगैरे गायब झाले.

बदलत्या काळाबरोबर पिकदानी सोडून सगळीकडे बिनधास्त आणि बिनदीक्त पान, पणपराग आणि माव्याच्या पिचकाऱ्या टाकणे हा जणू आता हक्क झाला आहे.

‘अ’ अडकित्त्याचा हळूहळू हद्दपार होऊ घातला आहे.

उंचीवर घर असेल तर घरात प्रवेश करण्यासाठी उताराचा रस्ता असायचा त्याला चोप म्हणत असत.. घरात प्रवेश केल्यावर लगेचच दोन्ही बाजूला बैठक असायची, तिला ढाळज किंवा ढेळज म्हणत.. हे पण अडगळीतील नावे आहेत…

.

लाइट आले आणि अनेक तर्‍हेचे दिवे गडप झाले. काळानुसार आणि गरजेनुसार असे अनेक शब्द गडप होत असतात तसेच खूप नवेनवे शब्दही वापरात येत असतात. भाषा ही सतत समृद्धच होत असते. विकास आणि प्रगती ही सतत चालूच राहणार आहे, फक्त गेल्या अर्धशतकात पूर्वी प्रचलित असलेल्या पण विसरल्या गेलेल्या शब्दांची सहज आठवण झाली म्हणून हा सारा शब्दप्रपंच, इतकेच…


संकलक / लेखक : डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘देहावसान’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆

शामला पालेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘देहावसान’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर

प्रा. डॉ. लोपा मेहता, या मुंबईतील जी. एस. मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या. त्यांनी तेथील एनॅटॉमी विभाग प्रमुख म्हणून कार्य केले.

७८ व्या वर्षी त्यांनी ‘लिव्हिंग विल‘ तयार केले. त्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे —

‘जेव्हा शरीर साथ देणे बंद करेल, आणि सुधारण्याची कोणतीही शक्यता उरणार नाही, तेव्हा माझ्यावर उपचार करू नयेत.

ना व्हेंटिलेटर, ना ट्यूब, ना रुग्णालयातील निरर्थक धावपळ.

माझा शेवटचा काळ शांततेत जावा — जिथे उपचारांच्या हट्टापेक्षा समजूतदारपणाला प्राधान्य असेल.’

 

डॉ. लोपा यांनी केवळ हा दस्तऐवजच लिहिला नाही, तर मृत्यूविषयी एक संशोधन-पत्रही प्रकाशित केले. त्यात त्यांनी मृत्यू ही एक नैसर्गिक, निश्चित आणि जैविक प्रक्रिया आहे, असे स्पष्ट केले आहे.

त्यांचा मुद्दा असा की, आधुनिक वैद्यकशास्त्राने मृत्यूला स्वतंत्र संकल्पना म्हणून कधी पाहिलेच नाही. वैद्यकशास्त्राचा आग्रह असा राहिला, की मृत्यू नेहमी एखाद्या आजारामुळेच येतो, आणि जर आजारावर इलाज झाला, तर मृत्यू रोखता येतो.

पण शरीराचे विज्ञान त्याहून खूप खोल आहे.

 

त्यांचा युक्तिवाद असा आहे — शरीर हे अखंड चालणारे यंत्र नाही. ती एक मर्यादित प्रणाली आहे, ज्यात ठराविक जीवनशक्ती असते. ही ऊर्जा कुठल्यातरी टाकीमधून मिळत नाही, तर सूक्ष्म शरीरामार्फत मिळते.

हेच ते सूक्ष्म शरीर, ज्याचा अनुभव प्रत्येकाला येतो, पण जो दिसत नाही. मन, बुद्धी, स्मृती आणि चेतना — या सगळ्यांनी मिळून बनलेली ही प्रणाली आहे.

 

हे सूक्ष्म शरीर म्हणजे जीवनशक्तीचं प्रवेशद्वार आहे. ही ऊर्जा संपूर्ण देहात पसरते, आणि शरीर जिवंत ठेवते. हृदयाची धडधड, पचनक्रिया, विचार करण्याची क्षमता — हे सगळे तिच्या आधारावर चालते.

पण ही शक्ती अमर्याद नाही. प्रत्येक शरीरात तिचे एक ठराविक प्रमाण असते. जसे एखाद्या यंत्रात बसवलेली फिक्स्ड बॅटरी— ना वाढवता येते, ना कमी करता.

“जितकी चावी भरली रामाने, तितके चालेल खेळणे” — असा प्रकार.

 

डॉ. लोपा लिहितात, की जेव्हा शरीरातील ही ऊर्जा संपते, तेव्हा सूक्ष्म शरीर देहापासून वेगळे होते. तोच क्षण म्हणजे देह स्थिर होतो, आणि आपण म्हणतो, “प्राण गेले. ”

ही प्रक्रिया ना आजाराशी संबंधित असते, ना कुठल्या चुकांशी. ही शरीराची अंतर्गत लय आहे — जी गर्भातच सुरू होते, आणि पूर्ण होऊन मृत्यूला पोहोचते.

या ऊर्जेचा खर्च प्रत्येक क्षणी चालतो — प्रत्येक पेशी, प्रत्येक अवयव आपला जीवनावधी संपवतो. आणि जेव्हा संपूर्ण देहाचे “कोटे” पूर्ण होतात, तेव्हा शरीर शांत होते.

 

मृत्यूचा क्षण हा घड्याळाने मोजलेला नसतो. तो एक जीवनशास्त्रीय वेळ असतो — जो प्रत्येकासाठी वेगळा.

कुणाचे जीवन ३५ वर्षांत पूर्ण होते, तर कुणाचे ९० वर्षांत. पण दोघेही आपली पूर्ण वाटचाल करतात.

जर आपण त्याला पराभव किंवा जबरदस्ती मानले नाही, तर कुणीही अपुरे मरत नाही.

 

डॉ. लोपा यांच्या मते आधुनिक वैद्यकशास्त्र जेव्हा मृत्यू टाळण्याचा हट्ट धरते, तेव्हा केवळ रुग्णाचे शरीरच नाही तर संपूर्ण कुटुंब थकते.

ICU मधील महिनाभराची श्वासोच्छ्वासाची किंमत कधी कधी आयुष्यभराच्या बचतीला नेस्तनाबूत करते.

नातेवाईक म्हणत राहतात — “अजून आशा आहे, पण रुग्णाचा देह कधीच सांगून गेलेला असतो — “आता पुरे”.

 

म्हणूनच त्या लिहितात — जेव्हा माझी वेळ येईल, तेव्हा फक्त मला KEM रुग्णालयात घेऊन या. जिथे मला खात्री आहे, की अनावश्यक हस्तक्षेप होणार नाही. उपचारांच्या नावाखाली दूरगामी त्रास दिला जाणार नाही. माझ्या शरीराला रोखले जाणार नाही — त्याला जाऊ द्या”*.

 

पण प्रश्न हा आहे — आपण आपल्यासाठी असे काही ठरवले आहे का?

आपले कुटुंब त्या इच्छेचा मान ठेवेल का? आणि जे मान ठेवतील त्यांना समाजात मान मिळेल का?

आपल्या रुग्णालयांत अशा इच्छेचा सन्मान आहे का, की अजूनही प्रत्येक श्वासावर बिल होणार आणि प्रत्येक मृत्यूवर दोषारोप?

 

हे इतके सोपे नाही. तर्क आणि भावना यांचा समतोल साधणे कदाचित सर्वात कठीण काम आहे.

जर मृत्यूला आपण शांत, नियत आणि शरीराच्या अंतर्गत गतीतून आलेली प्रक्रिया म्हणून पाहायला शिकलो, तर कदाचित मृत्यूची भीती कमी होईल, आणि डॉक्टरांकडून असलेल्या अपेक्षा जास्त वास्तववादी होतील.

 

माझ्या मते, मृत्यूशी लढणे थांबवायला हवे आणि त्याआधी जगण्यासाठी तयारी करायला हवी.

आणि जेव्हा तो क्षण येईल — तेव्हा शांतपणे, सन्मानाने त्याला सामोरे जावे.

 

बुद्धांच्या भाषेत — मृत्यू म्हणजे जीवनाच्या प्रवासातील पुढचा टप्पा आहे.

  

लेखक:अज्ञात

प्रस्तुती : शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हा रक्तपुष्पी फुलोरा… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? हा रक्तपुष्पी फुलोरा… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(वृत्त : उद्धवमात्रा : 2+8+2+2=14)

ते रूप विहंगम दिसते 

उमलून रोज येताना 

जास्वंद देखणा हसतो

पानात फूल होताना 

*

स्वागत अरुणाचे करण्या

अरुणा नामाने येतो

हरिवल्लभ कोणी म्हणती

श्री चरणी सेवा देतो 

*

गजवदनाला प्रिय भारी

ही जवाकुसुमी फुलारी

हा लाल लाल जयपुष्पी

किरिटावर शोभा न्यारी

*

रंगात रंगला सारा 

हा रक्तपुष्पी फुलोरा 

पिवळा, जांभळा, भगवा

अन् शुभ्र दिसे हा गोरा

*

बहुगुणी आणि उपयोगी

कुंतलास जासुम जपतो

झुपक्यात उमलतो गोंडा

झिरमाळी पानी लपतो

*

मी पाहत बसते याला 

वाऱ्यावर झुलतो जेव्हा

कलिकेचे फुलात सजणे 

भ्रमराचे गुंजन तेव्हा

*

पाकळीत झालर फुलते

रंगांच्या मखमालीवर

काव्यात उतरतो माझ्या

गाणे होते मग सुस्वर

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares