आषाढ पौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा. आपल्या गुरुंचे/गुरुतत्वाचे पुण्यस्मरण करण्याचा, गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करून गुरुदक्षिणा अर्पण करण्याचा दिवस.
गुरु कोण?
आपल्याला जो शिकवतो, ज्ञान देतो तो आपला गुरु. गुरु देहधारी असू शकतो किंवा विदेही असू शकतो. येवढेच काय पण गुरु मानवेतर प्राणी, पशु, पक्षी, कीटक, वनस्पती, वस्तू, धातू काहीही असू शकतो. साक्षात श्री गुरुदेव दत्तात्रेयांनी स्वतः चोवीस गुरु केले होते हे सर्वश्रुत आहे. न्यूटनला झाडावरून पडणाऱ्या सफरचंदाने ज्ञान दिले. ते फळ त्याचा गुरु म्हणता येईल. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.
माणूस जन्मापासून मरेपर्यंतच्या आपल्या जीवनयात्रेत पदोपदी, क्षणोक्षणी, कळत नकळत काही तरी शिकत असतो, ज्ञान मिळवत असतो. तो ते ज्ञान कुणाकडूनही घेत असतो. म्हणूनच म्हणावेसे वाटते की जो आपल्याला काही शिकवतो तो गुरुच. गुरु हे एक तत्व आहे असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.
सद्गुरु कोण?
समर्थ म्हणतात, जाणावे आपणासी आपण, या म्हणती ज्ञान (Absolute knowledge) या शुद्ध ज्ञानाव्यतिरिक्त मिळालेली सगळी केवळ माहिती (Information). असे शुद्ध, विमलज्ञान (Absolute knowledge) देणारा तो ‘सद्गुरु’. सद्वस्तु दाखवि तो सद्गुरु अशी सद्गुरु या शब्दाची सोपी व्याख्या समर्थांनीच केली आहे.
अध्यात्मक्षेत्रात सद्गुरुला सर्वोच्च मानले आहे. सद्गुरु म्हणजे ब्रह्मा, सद्गुरु म्हणजे विष्णू, सद्गुरु म्हणजेच महेश्वर. सद्गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म. ज्याने हे चर-अचर, खंडित न होणारे वलयाकार मंडळ व्यापले आहे, असे ब्रह्मपद दाखविणाऱा सद्गुरु. जो चैतन्यस्वरूप, शाश्वत, शांत, आकाशादिपेक्षा सूक्ष्म, निरंजन, नादातीत, बिंदुतीत, कलातीत आहे असा सद्गुरु. सद्गुरु हाच वेदांत, सद्गुरु हाच सिद्धांत आणि सद्गुरु हाच धादांत!
भारतीय अध्यात्म परंपरेत सद्गुरु हाच एकमेव मोक्षदाता आहे असे मानतात. सद्गुरुची महती सांगताना कबीरजी महाराज आपल्या एका दोह्यात म्हणतात,
गुरु गोविंत दोऊ खडे, काके लागू पाय
बलिहारी गुरु आपने, गोविंद दिये बताय।
साक्षात ईश्वर आणि सद्गुरु दोघेही समोर उभे ठाकले तर प्रथम सद्गुरुचे पाय धरावे नंतर गोविंदाचे. कारण सद्गुरुमुळे तर गोविंद लाभले आहेत! येवढे सद्गुरूचे महत्व आहे.
माणसाला सायुज्यमुक्तिदाता सद्गुरु केवळ त्याच्या पूर्वपुण्याईमुळेच मिळू शकतो. पण सध्याच्या काळात अशा योग्यतेचा सद्गुरु लाभणे कठीणच आहे.
परब्रह्म प्राप्ती, आत्मज्ञान प्राप्ती सद्गुरुविनाही होऊ शकते असे मानणारे थोर तत्वचिंतक जे. कृष्णमूर्तींसारखे काही मान्यवर आहेत त्यांचाही इथे उल्लेख करायला हवा.
सद्यस्थिति – गुरुहाट
सध्या अध्यात्म हा व्यवसाय, व्यापार होऊन बसलाय! समाजकारण, राजकारण, नेतेगिरी, भाईगिरी, तशी अध्यात्मगिरी झालीय. देशाविदेशात अनेक गुरु, सद्गुरु, परात्पर गुरु, गुरुमाँ, बुवा, बाबा, बापू, श्री, श्री श्री, श्री श्री श्री आपापले मठ, पीठे, आश्रम, गाद्या, गद्द्या, तख्ते, डेरे, दमदमे, दरबार,आखाडे उघडून बसले आहेत. तिथून जगभर पसरलेल्या भक्तांना सामुदायिक दीक्षा, मंत्रदीक्षा, अनुग्रह, शक्तिपात दीक्षा, आँनलाईन दीक्षा आणि अनुग्रह घाऊक प्रमाणात दिले जातात. काहींना एकांतदीक्षा, अंगसंगदीक्षाही देण्याची व्यवस्था असते. हे मठ, पीठे, आश्रम, गाद्या, गद्द्या, दरबार इ. सर्व सुखसोयींनी युक्त असतात. मठाधिपती गुरु राजाश्वैर्य भोगत असतात. गुरुदेवांना स्वतःची झेड प्लस सुरक्षा असते. गुरुदेवांभोवती भक्त-भक्तिणींचे गराडे पडलेले दिसतात. गुरुदेवांच्या चरणी भक्त आपल्या निष्ठा, श्रद्धा, भक्तीबरोबर धनकोष व खिसेही रिकामे करतात. गुरु शेकडो हजारो कोटींचे स्वामी होतात पण भक्त बिचारे मात्र नंतर काही दिवसात पस्तावतातही! याला अपवाद असू शकतील पण तरीही सामान्यांनी या पासून दूर रहावे हेच हिताचे. असो.
ग्रंथ हेच गुरु.
म्हणून मला वाटते की सध्याच्या विज्ञान युगात या गुरु, बुवा, बापूंच्या नादी न लागता माणसाने ग्रंथ हेच गुरु आणि त्यांचे वाचन हीच उपासना मानावी.
वाचनाला पर्याय नाही. विविध समाजमाध्यमे, आंतरजाल, गुगल, विकिपिडिया हे ही सध्याचे शक्तिशाली गुरुच आहेत. सूज्ञाने त्यांच्या भजनी लागून आपला उद्धार आपणच करावा.
वाचाल तरी वाचाल। नाही तर मराल। न करावा अन्य सवाल। या ऊपरी।।४५।।
(“ग्रंथदास”विरचित “वाचनक्रीया निरूपण प्रकरण”)
समारोप
आम्हाला ज्यांनी जन्मभर शिकवले, समजावले, शहाणे केले त्या सर्वांविषयी आपण कृतज्ञ असायला हवे. ज्या वेळी मातेच्या उदरातून आपण या जगात आलो त्यावेळी होतो केवळ एक जिवंत त्वचा-अस्थि-मांसाचा पिंड! त्यावेळी आपल्याला अस्तित्व प्राप्त झाले होते खरे, पण व्यक्तिमत्व प्राप्त व्हायचे होते. त्या व्यक्तिमत्वहीन अस्थित्वचामांसपिंडावर जन्मल्या क्षणापासून पुढे क्षणोक्षणी कोणी ना कोणी काही ना काही संस्कार केले आणि त्या पिंडाला आकार देत राहिले. आज आपण जे आहोत, आपले जे व्यक्तिमत्व घडले आहे, जे जगाला दिसते आहे त्यामागे अनंत अज्ञात हात आहेत. ते हात या साऱ्या ज्ञात अज्ञात गुरुंचे आहेत.
त्यात सर्वाधिक वाटा आहे असंख्य ग्रंथांचा आणि ग्रंथकर्त्यांचा. तेही सगळेच आपले गुरु आहेत हे नाकारता येत नाही. अशा सर्व ज्ञात अज्ञात गुरुंचे, ग्रंथकर्त्यांचे ऋण मान्य करून त्यांचे आभार मानणे, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिनी त्या सर्व गुरुजनांना आणि त्या मागील महद्गुरुतत्वाला माझा साष्टांग दंडवत! तस्मै श्री गुरवे नमः!!
☆ हे देवा म्हाराजा…- भाग २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर☆
(त्याने मुलाला हाक मारली “झिला, हो धंदो काय चालणा नाय, इतक्या माणसाक दोन वेळा तोंडात घालूक व्हया कायतरी, काय तरी धंदो पाणी करूंक व्हयचं. तू असा कर, मी तुका भाजी घेऊन देताय, तुझ्याकडे होयत्त फुरफ़ुरा आसा, तेच्या पाठी भाजी बांध आणि सगळे बाजार कर. येताना मिरची, कोथिंबीर, टमाटे, आला आणलंस, की हय मी विकीन, तुजा काय मत ‘.
सतीश म्हणाला ” होय बाबानू, मी माज्या गाडयेर भाजी घेऊन जाईन, त्या पैशातून थोडी मिरची, कोथिंबीर आणीन बाकीचे पैसे परत तुमच्यकडे, परत भाजी घेऊक होई मा ‘.)
इथून पुढे – –
प्रभाकरने मनावर घेतलेच. गावात फिरून बाराशे रुपयाची भाजी खरेदी केली, सतीशने भाजी गाडीच्या मागच्या बाजूला बांधली आणि गाडीला किक मारून निघाला.
प्रभाकरला अंदाज होता अंदाजे सतराशे अठराशे रु यायला पाहिजेत. त्यातील दोनशे रु पेट्रोल खर्च वजा केले तरी चारशे रु फायदा. तीन चार बाजार केले तर आठवड्याला पंधराशे रु मिळायला हरकत नाही, म्हणजे माहिन्यला सहा हजार रु कमीतकमी. पुढे अजून भाजी खरेदी करू…
प्रभाकर पानपट्टी स्टॉलवार बसून झिलाची वाट पाहत होता.
चार वाजता मुलगा आला, गाडी घेऊन.
” काय भाजी खपली सगळी, मी म्हंटलाय ना, आमच्या गावच्या भाज्येक खुप मागणी आसा म्हणून, पैसे किती इले?
सतीशने खिशातून सहाशे रु काढून दिले.
“अरे इतकेच, बाकी भाजी रवली की काय ‘.
” नाय हो बाबानू, वासू गावलो, तो म्हणालो बिअर पिऊया, म्हणून चार बाटले बिअर पिलव, तेका आठशे रु सरले, तरी चकण्याचे पैसे वासून दिले ‘. ” म्हणजे भाजीच्या पैशाची दारू पिलात,?
” नाय हो बाबानू, बिअर म्हणजे दारू न्हय, काळ्या बाटलीतून गार पाणी असता, डोक्या हलक्या होता, तुमका एक बाटली हाडलंय, देव..
” अरे… च्या, भाजयचे पैसे सरवलंस तू, आणि वार सांगतंस, बिअर म्हणजे दारू न्हय, आता भाजी घेतलंय, तेंका काय देव मी ‘.
आणि प्रभाकर रडू लागला.
प्रभाकर परत चिंतेत पडला, संसार कसा चालवावा? पैसे कसे मिळवावे? कुठल्याही धंद्यात यश नाही त्यात मुलगा बेजबाबदार. त्याला कशाचे काही पडलेले नाही, व्यसनी झाला आहें, किती शिव्या घातल्या तरी निर्लज्ज. मोहिनी च्या लग्नाचे बघायला हवे म्हणून बायको डोके खाते आहें, भाऊ किरण आपल्यावर विसंबून, त्याची बायको मात्र मेहनती,. एवढ्या माणसांना शिजवायचे काय..
प्रभाकरला रात्र रात्र झोप येत नव्हती, एक दिवस सकाळी पाच वाजता कोणी दार ठोठवले म्हणून प्रभाकरने दार उघडले, तर वाडीतला गणू.
” काय रे, सकाळी सकाळी खय?
“अरे रात्री सादेव गेलो.
“अरे, मग माका कसा कळवलात नाय ‘. “रात झालेली, त्यात तुका हल्ली झोप नसता म्हणून म्हंटला पहाटे कळविया ‘. बरा बरा, मी येतय ‘
प्रभाकरने मुलाला हाक मारली आणि सहदेव गेला असे सांगून तू लाकडे तोडायला जा, असे सांगून तो खान्द्यावर टॉवेल टाकून सहदेवच्या घरी गेला.
सहदेवच्या घरी हळूहळू वाडीतील तसेच नातलगे जमा होऊ लागली होती, प्रभाकर घरात गेला आणि त्याने सहदेवच्या मुलांना जवळ घेतले, त्यांना शांत केले आणि तो सहदेवच्या प्रेतापाशी येऊन बसला.
त्याच्या मनात आले, सहदेवच्या अंगात यायचे, त्याच्यामुळे माणसे यायची, मी गाऱ्हाने घालायचो आणि त्याने अंग सोडल की त्याला त्याला पकडून शांत करायचो, त्यामुळे आपल्याला दोन पैसे मिळायचे आणि लोक येऊन नमस्कार पण करायचे. आता सहदेव पण गेला. वार बंद, म्हणजे वाऱ्याला येणारी माणसे बंद म्हणजे आपली कमाई (तशी ती चार महिने बंदच होती) पण आता कायमची बंद.
म्हणजे ही कमाई यापुढे नाही. काही तरी करायला हवे.
स्मशानात पण वाडीतल्या लोकांची आणि गाववाल्यांची हीच चर्चा आणि काळजी
“सादेव गेलो आता देवा धर्माचा कसा होतला? सगळ्यांच्या अडी अडचणीक सादेव होतो म्हणजे सदेवाच्या अंगातलो देव होतो. सदेवाच्या मुखातून देव अडी अडचणी दूर करी, आता पुढे काय?
सहदेव ला पोचवून प्रभाकर आणि त्याचा मुलगा सतीश घरी आले, प्रभाकरला वाटतं होत, पुढे फक्त अंधार आहें, आता हा अंधारातून वाट कशी मिळणार? सहदेवची जागा मोकळी झाली आहें, देव आणि भक्त या मधील जागा मोकळी आहें, कोण भरून काढणार ही पोकळी?
विचार करता करता प्रभाकरला आयडिया सुचली. ही कल्पना आधी का नाही सुचली, असे त्याला वाटले, तो मनोमन खूष झाला, असे झाले तर सगळ्या विवंचना सुटणार होत्या.
सादेव चें सुतक होते तो पर्यत तो गप्प बसला. सुतक संपल्याबरोबर त्याने मुलाला बोलावले, आजूबाजूला कोणी नाही असे पाहून हळू आवाजात तो बोलू लागला
” झिला, आता सादेव गेलो, आमच्या देवाचा वारा त्याचार येय, आता आमी पोरके झालाव, पण सदेवा नंतर कोणाच्या अंगात देवाचा वारा येऊक व्हया सांग?
“कोणाच्या बाबानू…
“अरे माज्या ‘
तुमच्या?
अरे सदेवाच्या वाऱ्याक गाऱ्हाणं कोण घाली सांग?
तुमी बाबानू..
तेना वारा सोडला काय सदेवक कोण पाठसून धरी?
तुमी बाबानू..
मग सदेवा नंतर कोणाच्या अंगात वारा येतला सांग?
तुमच्या बाबानू… पण देव तुमच्या अंगात येत?
“अरे नाय इलो तर तेका हाडूचो लागतलो?
” खायसून हडतलात?
“ता मी काय ता बघताय, तू एक काम कर, देवाचा गाऱ्हाणं मी घाली ता पाठ कर आणि मी वारा सोडलंय काय मागसून माका घट्ट पकड आणि जमिनीवर झोपऊन शांत कर ‘
मग माज्या मागे म्हण आणि वारा येताना हय गाऱ्हाणं घाल
“हें देवा म्हराजा.. बारा गावच्या, बारा राठीच्या…
प्रभाकरचा मुलगा दोन दिवसात मस्त गाऱ्हाने घालू लागला. मग प्रभाकरने त्याला अंग सोडले की आपल्याला मागून कसे पकडायचे हें शिकवले.
माघी पंचमीला देवाची जत्रा, दरवर्षी लांबून लांबून या जत्रेला माणसे येत, माहेर वशिणी आपल्या मुलांना देवाच्या पाया खाली घालायला येत, चाकरमानी मुद्दाम मुला बाळांना घेऊन येत, यंदा तसे लोक आले, जत्रा भरली
कोकणातील जत्रा, लहान मोठी दुकानें आली, खाजे, बत्तीशी वाले आले, चहा भजी वाले होते. फ़ुगेवले, आईस फ्रूट वाले आले. माणसे येत होती, देवाला नारळ ठेवत होती, राऊळ गाऱ्हाने घालत होता.
पण लोकांमध्ये उत्साह नव्हता कारण सादेव च्या अंगातील वारे या वर्षी नव्हते. लोक लांबून लांबून त्या करिता येत होती.
देवाचे मानकरी गप्प बसून होते, या वर्षी देवाचे वारे नाही, म्हणजे मजा नाही, नुसती जत्रा कसली, असल्या जत्रा गावात अनेक ठिकाणी होतात, पण सदेवाच्या अंगातील वारे…
सगळे मानकरी बसले होते, त्या ठिकाणी प्रभाकर आला आणि ज्येष्ठ मानकऱ्यांना म्हणाला
‘अन्नानू, ढोल वाजूवून बघूया, सादेव नंतर कोणाच्या अंगात देव येता काय?
देव तसो आपणाक निराधार करुचो नाय,खायतरी आपली कुड ठेऊन जातलो ‘
अण्णांनी परवानगी दिली आणि ढोल वाजू लागले.
“ढुंम ढुंम ढुंम, ढुंम ढुंम ढुंम…
त्या बरोबर प्रभाकरचा मुलगा गाऱ्हाने घालू लागला..
देवा म्हराजा… बारा गावाच्या…
त्या क्षणी सू… सू.. करत प्रभाकर मान हलवत देवा समोर येऊन घुमू लागला. त्या बरोबर सगळे मानकरी जागा सोडून सरसवले आणि एकच गल्ला सुरु झाला
,”वारा इला, वारा इला, प्रभ्याच्या अंगात देव इलो ‘
बाहेर जत्रेत ही बातमी पसरली आणि जत्रा सोडून लोक देवळात धावली. मग मानकरी देवाची खात्री करू लागले आणि प्रभाकरच्या वाऱ्याला प्रश्न विचारू लागले.
अर्थात देवाने बरोबर उत्तरे दिली आणि मानकऱ्यांनी मान हालवली त्या बरोबर लोकांनी जल्लोष केला आणि जत्रेला उत्साह आला.
मग दर सोमवारी, गुरुवारी माणसे जमू लागली, प्रभाकरचा मुलगा गाऱ्हाने घालू लागला, मग प्रभाकर घुमू लागला, लोक पाचशे, सातशे रु ठेऊ लागली आणि सतीशला शम्बर दोनशे रु देऊ लागली. त्याची तो बिअर आणून पिऊ लागला.
प्रभाकरची परिस्थिती सुधारली, रंगीत टी व्ही आला, फ्रीझ आला, मुलाकडे मोटर सायकल आली, मुलीचे धडक्यात लग्न झाले, घर बांधण्यासाठी एका भक्ताने चिरे पाठवले, एकाने सळी पाठवली, दुसर्याने लोखंड, कोणी सिमेंट…
आता प्रभाकर मजेत आहें. त्याला पंचक्रोशीत मान आहें, त्याच्याकडे आमदार खासदार सुद्धा अडचणी मिटवायला येतात.
रोज संध्याकाळी प्रभाकर घरी असतो, तेंव्हा त्याचा पोरगा फ्रीझ मधून गार बिअर काढून ग्लासात ओतून त्याच्या हातात देतो आणि त्याला म्हणतो
” बाबानू, बिअर घेवा, बिअर म्हणजे दारू न्हय, दारू वाईट, बिअर घेतला की टेन्शन कमी होता ‘.
आणि प्रभाकर त्याच्या हातातील बिअरचा ग्लास ओठाला लावतो.
☆ “माझी वारी ! माझा अनुभव !” – लेख क्र. ६ ☆ श्री संभाजी बबन गायके☆
☆
मरणाचा सोहळा आणि सोहळ्यातील मरण!
काही परंपरा परिस्थितीनुरूप तयार होतात आणि जोवर परिस्थिती बदलत नाही, तोवर टिकून राहतात. देहू-आळंदी ते पंढरपूर हे अंतर किलोमीटर्सच्या भाषेत सुमारे २५० किलोमीटर्स एवढे आहे. श्री संत गजानन महाराज पालखी शेगाव ते पंढरपूर हे अंतर येताना सुमारे ७५० किलोमीटर्स अंतर कापते… तर येताना मार्ग वेगळा असल्याने ५५० किलोमीटर्स चालावे लागते. कोथळी जिल्हा जळगाव येथून मुक्ताबाई तर थेट जाऊन येऊन थेट सुमारे १५०० किलोमीटर्स अंतर चालतात. पैठण ते पंढरपूर सुमारे ३५० किलोमीटर्स भरते.
देहू-आळंदी, पैठण, मुक्ताईनगर, शेगाव इत्यादी ठिकाणाहून पालखीसोबत पंढरीस येणारे बरेचसे वारकरी आषाढी एकादशीनंतर दुस-या दिवशी वाहनांनी घरी परततात. काही मोजके वारकरी पालखी सोबत चालत माघारी जातात… त्याला परतवारी म्हणतात. आणि परत येतानाचा आव्हानात्मक निम्म्याच दिवसांत प्रवास उरकला जातो!
पूर्वी आजच्या इतके रस्ते विकसित नव्हते. बैलगाडी हे वाहन वारीसोबत नेता यायचे. क्वचित घोडागाडी सुद्धा. पण स्वयंचलित वाहनांची सोय नव्हती. वारी काळात पावसाची सोबत असली तरी हवामानानुसार ऊनही असते कित्येकवेळा. दिवसभराची पायी वाटचाल, त्यामानाने लाभणारी कमी विश्रांती, जेवणाच्या वेळांतील, पदार्थातील बदल, पाणी बदलल्यामुळे, दुषित हवामानामुळे काही वारकरी लोकांची प्रकृती बिघडण्याची शक्यता असतेच. जुन्या काळी तर अनेक आरोग्य समस्यांना वारकरी तोंड देत असत.
लाखो लोक सहभागी असलेल्या वारीदरम्यान वारकरी मृत होण्याचे प्रकार घडणे साहजिकच असे. अशावेळी मृतदेह त्या व्यक्तीच्या मूळगावी घेऊन जाणे अशक्यप्राय होत असे. दळणवळणाची, संपर्क साधने फारशी उपलब्ध नसल्याने मृताच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी बोलावून घेणे वेळेच्या कमतरतेमुळे व्यावहारिक ठरत नसे. मग अशा प्रसंगी ज्या ठिकाणी वारकरी मयत झालेला असेल त्याच ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार केला जाई. तोवर पालखी सोहळा थांबून राही. टाळ-मृदुंगाच्या आणि अभंगांच्या साथीने अंत्यसंस्कार केले जात. आणि मगच सोहळा मार्गस्थ होई!
भक्तिभाव असल्याने वारीच्या मार्गावर एखाद्यास मृत्यू आला तर ती व्यक्ती दैववान होती, त्याला नामस्मरण करता करता देवाने त्याच्याकडे बोलावून घेतले, अशी लोकभावना होती.
हल्ली वारीत वैद्यकीय उपचार, रुग्णवाहिका मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. वाहनांची उत्तम सोय असते. त्यामुळे असा काही प्रसंग उद्भवला तर मृतदेह त्या व्यक्तीच्या गावी पाठवणे शक्य झाले आहे.
एका वारीच्या प्रवासात माझे ज्येष्ठ स्नेही श्री. संभाजी वाघेरे यांना मुतखड्याचा आत्यंतिक त्रास होऊ लागला. आम्ही नेमके वाखरीवरून पुढे निघण्याच्या गडबडीत होतो. त्या प्रचंड गर्दीतही एक डॉक्टर उपलब्ध झाले. त्यांनी प्रथमोपचार केले परंतू रुग्णाला दुखणे असह्य होत असल्याचे पाहून त्याला रुग्णवाहिकेतून पंढरपूरला पाठवण्याचा निर्णय घेतला गेला. आणि रूग्णाला सोबत म्हणून मी ही त्या रुग्णवाहिकेतून निघालो. लाखो लोकांचा समुदाय लगबगीने पुढे निघालेला होता… पण रुग्णवाहिका पाहताच वाट करून दिली जाई… काळजीपोटी वारकरी आत डोकावून पहात… आणि या माणसाला लवकर बरं वाटू दे… अशी विठ्ठलास प्रार्थना करीत… पंढरीस पोहोचल्यावर शासकीय रुग्णालयात योग्य ते उपचार मिळाले. मात्र रात्री पुन्हा त्रास होऊ लागल्याने एका खाजगी डॉक्टरांकडून औषधे घ्यावी लागली.
आम्ही खरं तर औषधोपचार झाल्यानंतर पंढरीत जाऊन आमच्या मुक्कामाच्या जागी पोहोचणार होतो. पण नेमकी त्याचवेळी माझी तब्येत खूप बिघडल्याने मलाही काही सुचत नव्हते. मीही औषधे घेतली. जिथे आम्ही दवाखान्यात गेलो होतो तिथून आमची मुक्कामाची जागा खूपच दूर होती… गर्दीत चालणे अवघड होते. म्हणून आम्ही मंदिराजवळच्या एका धर्मशाळेत रात्रीचा मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. पण इकडे दिंडीत खूपच गोंधळ उडाला होता. दुपारी निघालेलो आम्ही दोघे… आमचा आणि त्यांचा संपर्क होऊच शकला नाही. कारण त्यावेळी मोबाईल नव्हते. आम्ही शासकीय रुग्णालयात गेलो तर होतो पण तिथून आमचे आम्ही दुस-या दवाखान्यात गेलो होतो. शासकीय रुग्णालयात खूप गर्दी असल्याने आम्ही कुणाला काही निरोपही देऊ शकलो नाही. त्यामुळे आमची दिंडी आणि आम्ही एकमेकांपासून दुरावलो होतो. दिंडीतील कारभारी लोकांनी विविध माध्यमातून आमचा शोध घेत होते. वारीसोबत असलेल्या पोलिसांची मदत घेण्यात आली. त्यांनी रुग्णालयात आमचा शोध घेतला खरा… पण आम्ही तिथे नव्हतोच. सर्वजण अत्यंत काळजीत पडले… रात्र झाली होती… लाखो लोक पंढरीत पोहोचत होते. ठिकठीकाणी तंबू पडलेले होतेच.
रात्रीचे दहा-साडेदहा वाजले होते. संभाजीरावांना आता थोडे बरे वाटू लागले… वेदना कमी झाल्या होत्या. मग आम्ही मुक्कामाची जागा शोधण्याचा प्रयत्न केला… पांडुरंगाची प्रार्थना केली… गर्दीतून कशीबशी वाट काढीत, पत्ता विचारीत विचारीत चालू लागलो… आणि काहीच वेळात आमची माणसं दृष्टीस पडली… सर्वांचाच जीव भांड्यात पडला… पण आधी लोक मला खूप रागावले… पण मीही आजारी पडल्याचे समजल्यावर सर्वांनी मग माझीही आपुलकीने चौकशी केली… जेवू घातले… आणि आमची आरामदायक जागेत सोय केली… बारा वाजले होते… एकादशी सुरु झाली होती… तंबूत भजनी जागर सुरु झाला होता… कुणी आजोबा गात होते… जाऊ देवाचिया गावा… देव देईल विसावा! वारीचे दिवस छान होते…! छान असतात! रामकृष्णहरी!
“तु मला ओवाळ अन मी तुला ओवाळते असं म्हणत ग्रुपवर कौतुक सोहळा चालू असतो. ते पाहून बऱ्याचदा हसू येतं आणि असह्य होतं असं वाटतं की.. ”
“ग्रुपमधल्या अनेकांना तसंच वाटतं. फालतूचे वाद आणि बावळटांच्या नादी लागण्या पेक्षा शांत बसणं चांगलं!!” मीना.
“जाऊ दे ना. आपल्याला काय करायचं. आपण गंमत बघायची.”
“ए ग्रुप बघितला का? सुलभाला परत ऍड केलं” मीना.
“विनीतानं केलं असणार”
“दुसरं कोण!!”
“सुलभाचा मेसेज बघितला का?”
“हो,काय तर म्हणे!! आपली मैत्री जुनी आहे. प्रत्येकाचे स्वभाव,विचार करायची पद्धत वेगवेगळी आहे तेव्हा एकमेकांना जज करण्यापेक्षा रिस्पेक्ट करू. कमेंट करण्याआधी विचार करा”
“त्यावर विनीतानं लगेच रिप्लायही दिला ‘खूप छान विचार!! सगळ्यांच्या फायदा होईल. धन्यवाद सुलभा.!”
“सुरवात स्वतःपासून कर,सुलभा” हा कालिंदीचा मेसेज म्हणजे सिक्सर.”
“हो पण या सिक्सरनं ग्रुपवर नवीन वाद सुरु झाला”
“होऊ दे. आपल्याला फुल टाइमपास…” मीना-प्रिया दोघीही मोठमोठ्यांनं हसायला लागल्या..
—–
वरील संभाषण काल्पनिक असलं तरी त्याला वास्तवाचा आधार आहे.
“व्हॉटसप ग्रुप” हे आता जगण्याचा भाग झालेत. ग्रुपवरच्या पोस्ट,चर्चा मेसेजेस,वाद आणि गॉसिप याचसुद्धा रुटीन झालंय मीना-प्रिया यांच्याप्रमाणेच “दुसऱ्यांचं ग्रुपवरचं वागणं” हाच विषय प्रामुख्यानं असतो.
“व्हॉटसप गॉसिप” चा संसर्ग सगळ्यांनाच झालाय. एवढं मात्र नक्की..
गंगा आणि यमुनेच्या पवित्र संगमाजवळील एका शांत, नयनरम्य बेटावर एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. पिता पराशर ऋषींचे अगाध ज्ञान आणि माता सत्यवतीची अलौकिक माया यांच्या छायेत हे बालक लहानाचे मोठे होऊ लागले. बेटावर (द्विपावर) जन्म झाल्यामुळे आणि अंगावर सावळ्या (कृष्ण) रंगाची सुंदर झाक असल्यामुळे माता-पिता त्यांना प्रेमाने ‘कृष्णद्वैपायन’ असे म्हणत. तर पराशर ऋषींचे पुत्र म्हणून त्यांना समाज ‘पाराशर्य’ या नावानेही ओळखू लागला.
बालपणापासूनच कृष्णद्वैपायन यांच्या मनात संसाराच्या ऐहिक सुखांपेक्षा अध्यात्माची, परम सत्याची आणि ज्ञानसाधनेची ओढ तीव्र होती. वयाच्या अगदी छोट्या टप्प्यावर त्यांनी मातेकडे जाऊन वनात तपश्चर्चेसाठी जाण्याची अनुमती मागितली. मातेचा आशीर्वाद घेऊन त्यांनी घोर अरण्यात प्रवेश केला. तेथे त्यांनी अत्यंत कठोर ज्ञानसाधना व तपश्चर्या केली. या तपाच्या तेजाने त्यांना संस्कृत भाषेचे संपूर्ण मर्म, सृष्टीचे गूढ नियम आणि अलौकिक ज्ञानाची प्राप्ती झाली.
२. वेदविभागणीचा महान यज्ञ
त्या काळात मानवी समाजाकडे ज्ञानाचा अथांग साठा होता, पण तो सर्व ‘वेद’ नावाच्या एकाच विशाल राशीमध्ये एकत्र गुंफलेला होता. काळ बदलत होता, मानवी बुद्धी आणि स्मरणशक्ती मर्यादांमध्ये बांधली जात होती. एकच विशाल वेद पाठ करणे किंवा समजून घेणे सामान्य माणसालाच नव्हे, तर विद्वानांनाही कठीण जाऊ लागले होते.
हे पाहून कृष्णद्वैपायनांनी ज्ञानाच्या त्या अथांग सागराचे सुलभ आणि पद्धतशीर वर्गीकरण करायचे ठरवले. त्यांनी एका वर्तुळातील व्यासाप्रमाणे (Diameter) ज्ञानचक्राच्या दोन्ही टोकांना जोडणारे आणि निसर्गाच्या ‘प्रवृत्ती’ व ‘निवृत्ती’ या दोन्ही मार्गांचे सखोल विश्लेषण करणारे महान कार्य हाती घेतले. ज्ञानाचे स्पष्टीकरण (विशद) करून वेदांचे सुटसुटीत भाग पाडले, म्हणूनच जगाने त्यांना आदराने ‘व्यास’ ही पदवी दिली.
व्यासांनी ज्ञानराशीचे चार मुख्य भाग केले:
ऋग्वेद: त्यांनी सर्व ऋचा (छंदोबद्ध मंत) एकत्र करून ज्या स्तवनांचे पठण केले जाऊ शकते, त्यांचा ‘ऋग्वेद’ तयार केला.
सामवेद: ज्या ऋचांचे मधुर गायन करता येते, त्यांना संगीतमय ‘सामवेदात’ ग्रथित केले.
यजुर्वेद: यज्ञ-याग, कर्मकांड आणि विधींचे तपशीलवार वर्णन करणाऱ्या गद्य मंत्रांना ‘यजुर्वेद’ हे नाव दिले.
अथर्ववेद: मानवी जीवनातील लौकिक व्यवहार, औषधी, आणि दैनंदिन रक्षणासाठी लागणाऱ्या मंत्रांचे संकलन करून ‘अथर्ववेद’ रचला.
– – त्या काळातील सर्व श्रेष्ठ आचार्य आणि विद्वानांनी व्यासांच्या या अद्वितीय आणि वैज्ञानिक वर्गीकरणाला नतमस्तक होऊन मान्यता दिली.
३. महाभारत, पुराणे आणि ब्रह्मसूत्रांची निर्मिती
वेदांचे ज्ञान अत्यंत गूढ आणि क्लिष्ट होते. ते अगदी शेवटच्या घटकापर्यंत, सामान्यातील सामान्य माणसापर्यंत कसे पोहोचवायचे? या प्रश्नाचे उत्तर म्हणून व्यासांनी कथा आणि इतिहासाचे माध्यम निवडले.
त्यांनी ‘महाभारत’ या महाकाव्याची रचना केली. पांडव आणि कौरव यांच्या संघर्षाच्या कथेतून त्यांनी मानवी जीवनातील धर्म-अधर्म, सत्य-असत्य आणि चांगले-वाईट यातील सूक्ष्म भेद स्पष्ट केले. महाभारताच्या रूपात त्यांनी मानवी स्वभावाचा आणि जीवनमूल्यांचा एक भव्य आरसाच जगासमोर ठेवला.
त्यानंतरही त्यांचे ज्ञानसत्र थांबले नाही. त्यांनी अठरा महापुराणांची रचना केली, ज्यामध्ये ‘भागवत पुराण’ हे भक्तीचा आणि ज्ञानाचा शिरोमणी ग्रंथ ठरला. या पुराणांमध्ये त्यांनी सृष्टीच्या नियमांचे खालील ५ मुख्य भागांत वर्गीकरण करून रंजक कथांद्वारे ज्ञान दिले:
१. सर्ग: जगाची, निसर्गाची मूळ निर्मिती.
२. प्रतिसर्ग: प्रलयानंतर होणारी पुर्नरचना किंवा प्रलय.
३. मन्वंतर: काळाचे मोठे कालखंड आणि त्यातील जीवनमान.
४. वंश: देव, ऋषी आणि राजांची वंशावळ.
५. वंशानुरचित: त्या महान राजांचे आणि पुरुषांचे चरित्र.
याशिवाय उपनिषदांमधील परम सत्याचा गूढ अर्थ उलगडून दाखवण्यासाठी त्यांनी **’ब्रह्मसूत्रां’**ची रचना केली, ज्याने भारतीय तत्त्वज्ञानाला एक भक्कम वैचारिक पाया दिला.
४. गुरुपौर्णिमा आणि व्यासांचे अमर स्थान
व्यासांनी जगातील अशा कोणत्याही विषयाला सोडले नाही, ज्याचे विवरण त्यांनी आपल्या ग्रंथांमध्ये केले नाही. म्हणूनच “व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्” (म्हणजेच जगतातील सर्व ज्ञान हे व्यासांचे उष्टे आहे/व्यासांनी आधीच स्पर्श केलेले आहे) अशी म्हण रूढ झाली.
ज्या दिवशी महर्षी व्यासांचा जन्म झाला, तो आषाढ पौर्णिमेचा दिवस! आपल्या संस्कृतीने या महान ज्ञानसूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस ‘गुरुपौर्णिमा’ किंवा ‘व्यासपौर्णिमा’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. जगतगुरू म्हणून महर्षी व्यास हे केवळ भूतकाळात होऊन गेलेले ऋषी नाहीत, तर ते आपल्या अवतीभवती विचारांच्या, ज्ञानाच्या आणि संस्कृतीच्या रूपात सदैव जिवंत आहेत.
आपली संपूर्ण भारतीय संस्कृती, आपली विचारसरणी आणि आमचे जीवनमूल्य हे व्यासांच्या महाभारत आणि पुराणांवर आधारित आहे. भारतीय संस्कृतीचे मूळ समजून घ्यायचे असेल, तर व्यासांच्या साहित्याचा अभ्यास करणे अपरिहार्य आहे. अशा या महान, दिव्योदात्त, परम विद्वान आणि सर्वश्रेष्ठ साहित्यकाराचा जन्म आपल्या भारतभूमीत झाला, हा आपल्यासाठी अनंत काळापर्यंत अभिमानाचा विषय आहे.
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर या आद्यगुरु महर्षी वेदव्यास यांच्या चरणी शतशः प्रणाम!
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३४ ☆ मंजिरी येडूरकर ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
टागोर पर्वाचा अंत
वयाच्या ७७ व्या वर्षी रविंद्रनाथांना त्वचेचा जंतुसंसर्ग (Erysipelas) झाला होता. त्याच्याच गुंतागुंतीमुळे १० सप्टेंबर १९३७ रोजी ते चक्कर येऊन पडले व त्यातच ते कोमा मध्ये गेले. जवळजवळ ६० तास ते कोमात होते. त्याकाळी खाजगी टेलीफोन ची सुविधा नसल्यामुळे डॉक्टरांना शांतिनिकेतनात पोहोचायला वेळ लागला. मात्र सुदैवाने रविंद्रनाथांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिला व ते शुद्धीवर आले. त्यानंतर त्यांना खोलीत पडलेला एक प्लायवुडचा तुकडा दिसला व त्यांनी ब्रश व रंग मागितले कारण त्यांना खिडकीतून दिसणारी निसर्गशोभा कुंचल्याने चित्रबद्ध करायची होती. तेंव्हा ते शुद्धीवर येऊन फक्त तीन दिवस झाले होते. त्या चित्राला त्यांनी शीर्षक दिलं, ‘A dark wood with streaks of yellow light breaking through it’s gloom. ‘पुढे आणखी १० च दिवसांनी त्यांनी एक कविता लिहिली व पुढच्या तीन महिन्यात त्याच कवितेला घेऊन १८ कवितांची एक शृंखला (poem cycle) लिहिली. तिला शीर्षक दिलं प्रांतिक. ही poem cycle पुढच्या कांही महिन्यात (१९३८) प्रकाशितही केली. या कवितांच्या केंद्रस्थानी ‘जीवन, मृत्यू, मृत्युपश्चात जीवन’ हाच विषय आहे. या सर्व अठरा कविता त्यांच्या स्वतःच्या मूळ बंगाली कवितांचं इंग्रजी भाषांतर आहे. कोमात असताना, जीवनमृत्यूच्या दरम्यानच्या दोलायमान स्थितीमुळे त्यांच्या नकळत त्यांच्या अंतर्मनात जे तरंग उठले असतील त्यांचं हे प्रकटीकरण असू शकतं.
‘On Deathland dying’ या सुप्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका एलिझाबेथ म्हणतात “रविंद्रनाथ टागोरांइतका मृत्यूविषयी सखोल विचार कुणी केला नसेल. ”
तरुण वयातच जिवलग मैत्रीण व स्फूर्ती स्थान असलेल्या कादंबरी देवींच्या आकस्मिक मृत्यू मुळे त्यांच्या मनाला ज्या असह्य वेदना झाल्या, त्यामुळे कदाचित उर्वरित आयुष्यात मृत्यू हाच त्यांचा जिवलग सखा झाला असावा. वयाच्या ५० व्या वर्षी लिहिलेल्या आपल्या आत्मचरित्रात ते म्हणतात, “सूर्य, चंद्र, तारे, जमीन, आकाश, झाडं झुडपं, नद्या, समुद्र सगळं कांही जिथल्या तिथं असताना माझी जिवलग सखी मात्र एका क्षणात होत्याची नव्हती झाली. हे स्वप्न की सत्य हे कळायच्या आत घडूनही गेलं. एखादा कपडा कशात तरी अडकून कांही कळायच्या आत टर्रकन फाटून जावा व त्या फाटलेल्या भोकातून पलिकडे सर्व अंधारच अंधार दिसावा तसं झालं. “
ह्या मृत्यू नामक अंधारानेच मग त्यांना भुरळ पाडली. जीवन जर क्षर आहे तर अक्षर काय आहे, याचा शोध घेण्याची प्रेरणा त्यांना या प्रसंगाने दिली. सावलीतलं झाड जसं सूर्यप्रकाशाच्या शोधात आपल्या फांद्यांचे हात पाय पसरतं तसाच मृत्यूच्या अंध:कारात अडकलेला त्यांचा आत्मा सकारात्मक विचारांच्या प्रकाशाचा शोध घेत होता.
सन १९३७ मध्ये कोमात जाण्याच्या घटनेनंतर रवींद्रनाथ पूर्ण बरे कधीच झाले नाहीत. त्याची प्रकृती दिवसें दिवस ढासळतच चालली होती. त्यातच त्यांना प्रोस्टेट कॅन्सर झाल्याचं लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांच्या किडनीज् हळूहळू निकामी होऊन युरेमिया व इतर गुंतागुंत निर्माण झाली. हवापालट करण्यासाठी म्हणून १९४० मध्ये टागोरांच्या सून प्रतिमा देवी त्यांना किलामपोंग येथे घेऊन गेल्या पण तिथे त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्यामुळे त्यांना शांतिनिकेतनात परत आणण्यात आलं.
आणि ७ मे १९४१ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी ते अनंतात विलीन झाले.
—–
☆ गीत : १०० ☆
DIVE down into the depth of the ocean of forms, hoping to gain the perfect pearl of the formless.
No more sailing from harbour to harbour with this my weather-beaten boat. The days are long passed when my sport was to be tossed on waves.
And now I am eager to die into the deathless.
Into the audience hall by the fathomless abyss where swells up the music of toneless
strings I shall take this harp of my life.
I shall tune it to the notes of for ever, and, when it has sobbed out its last utterance, lay down my silent harp at the feet of the silent.
EVER in my life have I sought thee with my songs. It was they who led me from door to door, and with them have I felt about me, searching and touching my world.
It was my songs that taught me all the lessons I ever learnt; they showed me secret paths, they brought before my sight many a star on the horizon of my heart.
They guided me all the day long to the mysteries of the country of pleasure and pain, and, at last, to what palace gate have they brought me in the evening at the end of my journey?
बाल्कनीत बसून सकाळचा चहा घेत होतो. बाहेर पाऊस रिमझिम सुरू होता. समोरच्या वायरवर एक कावळा बसला होता. अंगावर पडलेले थेंब झटकत तो इकडे तिकडे पाहत होता. त्याला पाहताच अचानक बालपणात ऐकलेली गोष्ट आठवली.
“एक होती चिऊ, एक होती काऊ… “
मोठा पाऊस आला. चिऊचे घर मेणाचे होते, काऊचे घर शेणाचे. पावसात काऊचे घर वाहून गेले. मग ती चिऊच्या दाराशी आली.
“चिऊताई, चिऊताई, दार उघड… “
आणि मग चिऊचे नेहमीचे उत्तर…
“थांब गं, माझ्या बाळाला अंघोळ घालते. “
थोड्या वेळाने…
“थांब गं, माझ्या बाळाला जेवू घालते. “
पुन्हा थोड्या वेळाने…
“थांब गं, माझ्या बाळाला झोपवते. “
लहानपणी ही गोष्ट गोड वाटायची. चिऊ शहाणी आणि काऊ थोडी भोळी, एवढाच तिचा अर्थ वाटायचा. पण आज त्या गोष्टीकडे वेगळ्या नजरेने पाहावेसे वाटते.
आता मला चिऊचे घर मेणाचे वाटत नाही. ते सिमेंट-काँक्रीटचे, मजबूत घर वाटते. आणि काऊचे घर म्हणजे एखादी मातीची झोपडी वाटते. पाऊस आला की चिऊच्या घरातील माणसे खिडकीतून पाऊस पाहतात. काऊच्या घरातील माणसे मात्र आकाशाकडे पाहत काळजी करतात.
चिऊ म्हणते, “माझ्या बाळाला अंघोळ घालते. “
मला प्रश्न पडतो, काऊला बाळ नसते का?
चिऊ म्हणते, “माझ्या बाळाला जेवू घालते. “
काऊची पिल्ले उपाशी नसतात का?
गोष्ट पुढे जाते आणि एक वाक्य येते, “कोणत्या पोत्यात बसशील? “
लहानपणी हे वाक्य गंमतीशीर वाटायचे. आज त्याचा अर्थ वेगळा जाणवतो. ज्याच्या घरात पोती आहेत, धान्याचा साठा आहे, त्यालाच हा प्रश्न पडू शकतो. ज्याच्याकडे दोन दिवसांपुरतेही धान्य नाही, त्याला पोत्याचा पर्यायच नसतो.
कदाचित ही गोष्ट नकळत समाजाचे चित्र दाखवत असावी.
एकीकडे सुरक्षित घरे, बँकेतली बचत, विमा, साठवणूक आणि उद्याची चिंता कमी असलेले लोक.
दुसरीकडे रोज कमावून रोज खाणारे, पावसाने काम बंद झाले की चूल विझणारे लोक.
पाऊस मात्र दोघांच्या छपरावर सारखाच पडतो.
निसर्ग भेदभाव करत नाही. पण माणसांची परिस्थिती मात्र सारखी नसते.
या गोष्टीतला खरा प्रश्न चिऊ वाईट आहे की काऊ भोळी आहे हा नाही. खरा प्रश्न असा आहे की काऊ दाराशी आली तेव्हा चिऊने तिची भीती, तिचे दु:ख, तिची असुरक्षितता समजून घेतली का?
आज आपल्या सभोवताली अनेक “काऊ” दिसतात. पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त, बेघर, बेरोजगार, संकटात सापडलेले लोक. आणि अनेक “चिऊ” देखील दिसतात. ज्यांच्याकडे साधनसंपत्ती आहे, सुरक्षितता आहे, साठा आहे.
प्रश्न एवढाच आहे की काऊ दाराशी आली तर आपण तिला किती वेळ थांबवणार?
कारण शेवटी माणुसकीचा अर्थ एवढाच असतो की आपल्या घराचे दार बंद करून सुरक्षित बसणे नव्हे, तर संकटात सापडलेल्या दुसऱ्यासाठी ते दार उघडणे.
बालपणीची ती साधी गोष्ट आजही कानात घुमते…
“चिऊताई, चिऊताई, दार उघड… “
आणि वाटते, प्रत्येक पावसाळ्यात हा आवाज पुन्हा एकदा ऐकायला हवा. संपत्तीची खरी परीक्षा साठा किती आहे यावर होत नाही; दार किती उघडे आहे यावर होते.
“लहानपणी आपण चिऊचे कौतुक करतो, मोठे झाल्यावर काऊचे दु:ख समजू लागते, आणि आयुष्याचा खरा धडा तेव्हा मिळतो जेव्हा आपण स्वतः चिऊ असूनही काऊसाठी दार उघडतो. “
लेखक: दत्ता कुकडे
प्रस्तुती:सौ.राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “कर्तव्यपूर्ती” – लेखक / संपादक : कर्नल आनंद बापट (नि.) / प्रा. डॉ. सुभाष भावे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : कर्तव्यपूर्ती
लेखक / संपादक : कर्नल आनंद बापट / प्रा. डॉ. सुभाष भावे
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स
सशस्त्र सेनादलातील शिपाई व अधिकाऱ्यांविषयी सामान्यजनांच्या मनात नेहमीच एक सुप्त आकर्षण असते. सैन्यदलातील कठोर अनुशासन, खडतर प्रशिक्षण, सीमावर्ती व दुर्गम प्रदेशात कुटुंबापासून दूर राहून व्यतीत केलेला सेवाकाळ, शत्रूसोबत झालेल्या चकमकी आणि त्यामधून सैनिकांनी गाजवलेली मर्दुमकी, अशा विषयांवरच्या रम्य कथा ऐकण्यात सर्वांनाच औत्सुक्य वाटते.
परमवीर चक्र किंवा तत्सम शौर्यपदके प्राप्त केलेल्या वीरांच्या अनेक कथा आजवर प्रसिद्ध झालेल्या आहेत. परंतु, प्रत्येक सैनिकाच्या आयुष्यात कधी ना कधी, अत्यंत अवघड असे परीक्षेचे क्षण येऊन गेलेले असतात. भारतीय सैन्यदलांमध्ये असेही असंख्य वीर आहेत ज्यांनी शत्रूसोबत लढताना किंवा इतर काही कठीण प्रसंगांमध्ये असामान्य कामगिरी केलेली आहे, परंतु त्यांना प्रसिद्धीचे वलय लाभलेले नाही.
भारतीय नौदल, हवाई दल आणि भूदलातील अशाच काही शूर सैनिक व अधिकाऱ्यांच्या एकवीस सत्यकथांचा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे. आजवर प्रकाशझोतात न आलेल्या वीरांच्या कथादेखील वाचकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने हे पुस्तक संपादित केलेले आहे. लेखकांचा अल्प परिचयदेखील त्यांच्या कथांसोबत दिलेला आहे.
युद्धाच्या रम्य गोष्टी ऐकता-ऐकता, कधीतरी त्या कथा ऐकणाऱ्यांना स्वतःच अशा एखाद्या युद्धकथेचा भाग होण्याची स्फूर्ती मिळावी हा या पुस्तकाचा खरा हेतू आहे. या पुस्तकातील शौर्यकथा जर अधिकाधिक लोकांनी, आणि विशेषतः किशोरवयीन मुलामुलींनी व तरुण-तरुणींनी वाचल्या आणि त्यातून प्रेरणा घेऊन असेच शूरवीर घराघरातून उदयाला आले, तर या कथांचे मूळ लेखक आणि प्रस्तुत पुस्तकाचे संपादक भरून पावतील.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈