मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३४ ☆ मंजिरी येडूरकर ☆

मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३४ ☆ मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

टागोर पर्वाचा अंत

वयाच्या ७७ व्या वर्षी रविंद्रनाथांना त्वचेचा जंतुसंसर्ग (Erysipelas) झाला होता. त्याच्याच गुंतागुंतीमुळे १० सप्टेंबर १९३७ रोजी ते चक्कर येऊन पडले व त्यातच ते कोमा मध्ये गेले. जवळजवळ ६० तास ते कोमात होते. त्याकाळी खाजगी टेलीफोन ची सुविधा नसल्यामुळे डॉक्टरांना शांतिनिकेतनात पोहोचायला वेळ लागला. मात्र सुदैवाने रविंद्रनाथांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिला व ते शुद्धीवर आले. त्यानंतर त्यांना खोलीत पडलेला एक प्लायवुडचा तुकडा दिसला व त्यांनी ब्रश व रंग मागितले कारण त्यांना खिडकीतून दिसणारी निसर्गशोभा कुंचल्याने चित्रबद्ध करायची होती. तेंव्हा ते शुद्धीवर येऊन फक्त तीन दिवस झाले होते. त्या चित्राला त्यांनी शीर्षक दिलं, ‘A dark wood with streaks of yellow light breaking through it’s gloom. ‘पुढे आणखी १० च दिवसांनी त्यांनी एक कविता लिहिली व पुढच्या तीन महिन्यात त्याच कवितेला घेऊन १८ कवितांची एक शृंखला (poem cycle) लिहिली. तिला शीर्षक दिलं प्रांतिक. ही poem cycle पुढच्या कांही महिन्यात (१९३८) प्रकाशितही केली. या कवितांच्या केंद्रस्थानी ‘जीवन, मृत्यू, मृत्युपश्चात जीवन’ हाच विषय आहे. या सर्व अठरा कविता त्यांच्या स्वतःच्या मूळ बंगाली कवितांचं इंग्रजी भाषांतर आहे. कोमात असताना, जीवनमृत्यूच्या दरम्यानच्या दोलायमान स्थितीमुळे त्यांच्या नकळत त्यांच्या अंतर्मनात जे तरंग उठले असतील त्यांचं हे प्रकटीकरण असू शकतं.

‘On Deathland dying’ या सुप्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका एलिझाबेथ म्हणतात “रविंद्रनाथ टागोरांइतका मृत्यूविषयी सखोल विचार कुणी केला नसेल. ” 

तरुण वयातच जिवलग मैत्रीण व स्फूर्ती स्थान असलेल्या कादंबरी देवींच्या आकस्मिक मृत्यू मुळे त्यांच्या मनाला ज्या असह्य वेदना झाल्या, त्यामुळे कदाचित उर्वरित आयुष्यात मृत्यू हाच त्यांचा जिवलग सखा झाला असावा. वयाच्या ५० व्या वर्षी लिहिलेल्या आपल्या आत्मचरित्रात ते म्हणतात, “सूर्य, चंद्र, तारे, जमीन, आकाश, झाडं झुडपं, नद्या, समुद्र सगळं कांही जिथल्या तिथं असताना माझी जिवलग सखी मात्र एका क्षणात होत्याची नव्हती झाली. हे स्वप्न की सत्य हे कळायच्या आत घडूनही गेलं. एखादा कपडा कशात तरी अडकून कांही कळायच्या आत टर्रकन फाटून जावा व त्या फाटलेल्या भोकातून पलिकडे सर्व अंधारच अंधार दिसावा तसं झालं. “

ह्या मृत्यू नामक अंधारानेच मग त्यांना भुरळ पाडली. जीवन जर क्षर आहे तर अक्षर काय आहे, याचा शोध घेण्याची प्रेरणा त्यांना या प्रसंगाने दिली. सावलीतलं झाड जसं सूर्यप्रकाशाच्या शोधात आपल्या फांद्यांचे हात पाय पसरतं तसाच मृत्यूच्या अंध:कारात अडकलेला त्यांचा आत्मा सकारात्मक विचारांच्या प्रकाशाचा शोध घेत होता.

सन १९३७ मध्ये कोमात जाण्याच्या घटनेनंतर रवींद्रनाथ पूर्ण बरे कधीच झाले नाहीत. त्याची प्रकृती दिवसें दिवस ढासळतच चालली होती. त्यातच त्यांना प्रोस्टेट कॅन्सर झाल्याचं लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांच्या किडनीज् हळूहळू निकामी होऊन युरेमिया व इतर गुंतागुंत निर्माण झाली. हवापालट करण्यासाठी म्हणून १९४० मध्ये टागोरांच्या सून प्रतिमा देवी त्यांना किलामपोंग येथे घेऊन गेल्या पण तिथे त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्यामुळे त्यांना शांतिनिकेतनात परत आणण्यात आलं.

आणि ७ मे १९४१ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी ते अनंतात विलीन झाले.

—–

गीत : १००

DIVE down into the depth of the ocean of forms, hoping to gain the perfect pearl of the formless.

No more sailing from harbour to harbour with this my weather-beaten boat. The days are long passed when my sport was to be tossed on waves.

And now I am eager to die into the deathless.

Into the audience hall by the fathomless abyss where swells up the music of toneless 

strings I shall take this harp of my life.

I shall tune it to the notes of for ever, and, when it has sobbed out its last utterance, lay down my silent harp at the feet of the silent.

—-

मराठी भावानुवाद : गीत : १००

या अथांग, अतल सागरी

शोधिले जन्मजन्मांतरी

*

कुठे मिळेना, असा शिंपला

ज्या मोत्यांत, अनंग लपला

*

शोध शोधुनी दमलो मी पण

शीड फाटले, होडीचे पण

*

पुरे अता मज नाही साहवत

तुझ्याविना प्रभू नाही राहवत

*

अमर्त्य अशा तुझ्या अंतरी

मम मृत्युला स्थान दे परी

*

शेषशायी तू, क्षीरसागरी 

येईन म्हणतो, तुझ्या मंदिरी

*

माझी हृदयस्थ वीणा छेडुनि

मूकपणाने तारा झंकारुनि

*

चिरंतनाचे सूर लावुनि

तुटतील तारा मूक होउनि

*

शांतच वीणा, शांतच तूही

चिरशांती मम उजळील देही

भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—– 

गीत : १०१

EVER in my life have I sought thee with my songs. It was they who led me from door to door, and with them have I felt about me, searching and touching my world.

It was my songs that taught me all the lessons I ever learnt; they showed me secret paths, they brought before my sight many a star on the horizon of my heart.

They guided me all the day long to the mysteries of the country of pleasure and pain, and, at last, to what palace gate have they brought me in the evening at the end of my journey?

—–

मराठी भावानुवाद : गीत : १०१

तुझ्याचसाठी गीते रचितो

तुझ्याचसाठी ती मी गातो

त्या गीतातून तूच स्पर्शितो

मम विश्वाचा एक कोपरा

शोध शोधिले तुला प्रियकरा॥

*

या गीतांनी मला शिकविले

मार्ग मुक्तीचे मज दावियले

मनःचक्षुंनी मग साठविले

तारांगण हृदयात, मधुकरा

शोध शोधिले तुला प्रियकरा॥

 *

ही गीते मज घेऊनि जाती

सुखदुःखाचे देश दाविती

गूढ तयांचे अर्थ सांगती

अंतिम समयी तुझिया द्वारा

मजला नेती हे सर्वेश्वरा॥

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “परशुराम मातृहत्यारा??” ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “परशुराम मातृहत्यारा??” ☆ शोभा जोशी

(डोळे उघडणारा लेख…) 

परशुराम हा महर्षी जमदग्नींचा पुत्र होता.

पित्यासारखाच तो शीघ्रकोपी होता.

लढवय्या होता.

विद्वान होता.

त्याने कोकणभूमीची निर्मिती केली.

परशुराम सप्तचिरंजीवांपैकी एक आहे.

इथपर्यंत परशुरामांबद्दल माहिती मिळाल्यावर आदर निर्माण झाला होता. लहानपणापासून कथाकीर्तनाकडे ओढा असल्याने ही माहिती अनेकदा मिळाली.

पण जेव्हा बुवांनी कीर्तनात, परशुरामाने पिता जमदग्नी यांच्या आदेशानुसार माता रेणुकेचे शीर उडवून तिचा वध केला आणि नंतर पित्याला विनवणी करून मातेला परत जिवंत केले ही कथा सांगितली तेव्हा अंगावर शहारे आले.

परशुरामांबद्द्ल एक अढी बसली. असा कसा पोटचा मुलगा तोही विचारी, विद्वान वगैरे असणारा आईचा जीव घेतो?

कळत नकळत परशुरामांबद्दल दुरावा किंवा एक तुटकपणा निर्माण झाला. त्या विषयात आपलेपणा किंवा जिव्हाळा निर्माण व्हायला काही कारणही नव्हतं. अगदी ज्या कोकणात आपण राहतो त्याची निर्मिती कशी केली असेल याची साधी जिज्ञासा ही कधी जागी झाली नाही.

पण हा दुरावा समूळ नाहीसा व्हावा अशी या चिरंजीवाचीच इच्छा असावी.

 

चिपळूण मधील परशुराम देवस्थानाचे विश्वस्त श्री. प्रशांत पटवर्धन यांना भगवान परशुराम यांच्या जीवनातील प्रसंगांवर कथालेखन करायचे होते. हाती असलेल्या माहितीचं कथेत रुपांतर असं करावं याचं मार्गदर्शन त्यांना हवं होतं. योगायोगाने त्यांच्या जवळच्या मित्राने. जो मलाही लेखिका म्हणून चांगलं ओळखतो,त्याने माझं नाव सुचवलं. आणि आमची फोनवरची कथा कार्यशाळा सुरू झाली.

प्रशांत उत्तम विद्यार्थी आहेत असं माझ्या लक्षात आलं. कथालेखनाचा गृहपाठ ते चोख करत गेले.

ते माझ्याकडून काय शिकले यापेक्षा मला परशुरामांकडे पाहण्याची जी दृष्टी मिळाली ती मला जास्त मौल्यवान वाटते.

 

परशुरामांचं चरित्र अनेक प्रसंगांतून समोर येत गेलं.

सर्वात मला उत्सुकता होती ती त्यांच्या मातृहत्यारा या प्रतिमेबद्दल.

तर त्याबद्दल संशोधकांनी शोधलेली माहिती अशी…

 

कामरूप प्रदेशातील संपूर्ण जमीन मृतप्राय झालेली होती. पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष्य निर्माण झालेलं होतं. वर्षानुवर्ष पाणी नसल्यामुळे सर्वत्र शुष्कता होती. मानवी जीवन,पशुपक्षी कीटक, वनस्पती जीवन यांचा सर्वनाश होत होता.

कसेबसे तग धरून असलेले काही शेतकरी महर्षी ऋचिक यांच्या आश्रमात आले. ऋचिक हे जमदग्नींचे पिता. त्यांनी कामरूप त्या भूमीला सुजला सुफला करून सजीवसृष्टीला संजीवनी देण्याची याचना त्यांनी केली.

जवळच असलेल्या जमदग्नी ऋषींनी भगवान परशुरामाला आदेश दिला.

.. “राम,तुम्ही त्या प्रदेशात जाऊन तिथल्या लोकांत विश्वास निर्माण करा आणि ती मृत झालेली भूमी पुन्हा जिवंत करा. “

आपल्या तीन अनुयायांना घेऊन परशुराम मार्गस्थ झाले.

सांगाडा झालेले वन प्रदेश,डोंगर वाटा,नदीचे कोरडे पात्र पार करत ते कामरूप प्रदेशात पोचले.

कामरूपचं स्वरूप भयावह होतं. भूमीचा कण न् कण पाण्यासाठी तडफडत होता. आक्रोशत होता.

परशुरामांनी जमिनीची पाहणी केली. अभ्यास केला. भू-जलाचा अंदाज घेतला. भूमीचा ध्वनी ऐकण्याचा प्रयत्न केला. मग ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या जिथून प्रवाही होतात तिथून जल वाहत येऊ शकेल का याचा अंदाज घेतला.

कामरूप प्रदेशाच्या बाजुलाच लोहित नावाचा प्रचंड पर्वत होता. रामांनी तिथल्या स्थानिकांना बरोबर घेऊन लोहित पर्वत पार केला. त्या पर्वतापलिकडे एक मोठे सरोवर होते. जवळूनच एक नदीही वाहात होती. रामांनी संपूर्ण जलाशयाला एक प्रदक्षिणा घातली. भोवतालाचे सूक्ष्म निरीक्षण केले.

भार्गवरामांनी या नदीतीरावर आपल्या वास्तव्यासाठी एक आश्रम बांधला. नदीच्या परिसराचा असून अभ्यास केला. त्या परिसरातील बदलांचा मागोवा घेतला. परिसरातील वयोवृध्द शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं. त्यांच्या आठवणीतल्या जल व्यवस्थापनाची माहिती घेतली.

या कार्यात दैवी अधिष्ठान असावे म्हणून शिवाची आराधना,होम,जप सुरू केले.

अखेर शिवशंकरांनी दृष्टांत दिला.

आग्नेयेला जा. तिथे भूमीच्या एका कोपऱ्यात हिमनगांनी अडवलेलं विशाल कुंड आहे. त्या कुंडातील जल शीतल,मधुर असून प्राणवर्धक आहे. हेच जल कामरूप प्रदेशाला संजीवन देईल. यशस्वी भव!

शिवाच्या दृष्टांतानुसार परशुरामांनी जल आणि भूमी विषयातील अनुभवी व्यक्ती, वयोवृध्द शेतकरी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांना साहाय्यासाठी आवाहन केलं. चर्चा केली. आखणी केली. तसंच लोहित पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या लोकांनाही विश्वासात घेतलं. संयमित शब्दात योजना समजावून दिली.

“आपल्याला लोहित पर्वताचा एक भाग फोडावा लागणार आहे. त्यामधून एक मार्ग निर्माण करायचा आहे. जलाशयातून निघणारा एक झरा या मार्गाने तुमच्या प्रांतात आणायचा आहे. एकदा या पाण्याचा ओघ सुरू झाला की ओसाड भूमी हरित होईल. पीक येईल. सजीवसृष्टी पुन्हा बहरेल. “

अर्थातच अनेक शंकाकुशंका निघाल्या, नकारात्मक विचार आले, पण परशुरामांनी कुशलतेने निवारण केलं. त्यांच्या आवाहनातील तळमळ प्रभावी ठरली. मग मात्र जोमाने,जिद्दीने आणि अचल निश्चयाने कामाला सामूहिक रित्या सुरूवात झाली.

लोहित पर्वतातील कठीण खडक फोडले गेले. पर्वताची शकले केली. विशाल पाषाण फोडून त्यामागची माती बाजूला केली. पर्वत कापून पलिकडून अलिकडे प्रवासासाठी मार्ग खोदला गेला. जवळच वाहणारी एक प्राचीन नदी वाळलेली होती. पण तिचा मूळ स्रोत जिवंत होता. तिथून पाट काढण्यात आला. जुना प्रवाह शोधून त्याला नव्याने या मार्गांशी जोडलं गेलं.

आणि…

कामरूप प्रदेशातून विस्तीर्ण नदी खळाळून वाहू लागली. तिच्या प्रवाहाने भूमीला नवा जन्म मिळाला.

लोहित पर्वतांतून ही नदी आली म्हणून या नदीचे नावही ‘लोहित नदी’ ठेवलं गेलं. कामरूपची जनता भगवान परशुरामांना शतशः धन्यवाद देत होती.

आता परतीचे वेध लागले होते.

सारे विश्रांती घेत हसत खिदळत श्रमपरिहार करत होते. पराशर मुनींना परशुरामांची चेष्टा करण्याची लहर आली.

“रामा,एकीकडे तर तुम्ही म्हणता भूमी आपली माता आहे;आणि तुम्ही तर तिचं पर्वतस्वरूप मस्तकच कापलंत. “

भार्गवराम शांत होते. ते म्हणाले…

” हो. पर्वत म्हणजे भू मातेचं मस्तक आहे. पण तेच मस्तक इतकं मोठं झालं की पलीकडची भूमी ओसाड झाली. मी शिरच्छेद नाही केला. फक्त मार्ग मोकळा केला. मृत जमीन पुन्हा जिवंत झाली. म्हणजे आईला पुनः जिवंत केलं पण ही माझ्या पित्याची आज्ञा होती. “

“सत्य, त्रिवार सत्य! म्हणजे परशुरामांनी पित्राज्ञेने आपल्या मातेचा शिरच्छेद केला. आणि तिला संजीवनी केलं. “

या रूपकावर सारेच हसले…

गंमतीत सुरू झालेली चर्चा होती ती. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी सहज म्हणून इतरांना सांगितली. शब्दांनी आकार घेतला आणि हळूहळू ती गोष्ट कर्णोपकर्णी झाली. लोककथांमध्ये मिसळली आणि तिच्यातला लाक्षणिक अर्थ हरवला.

कथेचा गाभा, सूचक तत्वज्ञान बाजूला राहिलं. लोकांनी फक्त शाब्दिक अर्थाने ती स्विकारली. पिढ्यानुपिढ्या ती तशीच सांगितली गेली. भूमीत प्राण फुंकणा-या परशुरामाचे श्रम,अभ्यास,संघटन कौशल्य,भू-जल मन व्यवस्थापनासाठीचे अभियांत्रिकी ज्ञान सगळं सगळं विसरलं गेलं आणि…

मातृहत्यारा हा विपरीत अर्थाचा डाग लागला…

मंडळी,

मी प्रशांत पटवर्धनांची आजन्म ऋणी आहे.

नवनिर्मितीच्या या विद्वान ऋषींची मला ओळख झाली.

मनातला हा आकाशकंदील उजळला आणि माझ्या कोकण भूमीला मी नव्याने मनोमन दंडवत घातला.

 

लेखिका : वैशाली पंडित

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “चिऊताई, दार उघड…” – लेखक : दत्ता कुकडे ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

राधा पै

? वाचताना वेचलेले ?

☆ “चिऊताई, दार उघड…” – लेखक : दत्ता कुकडे ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

बाल्कनीत बसून सकाळचा चहा घेत होतो. बाहेर पाऊस रिमझिम सुरू होता. समोरच्या वायरवर एक कावळा बसला होता. अंगावर पडलेले थेंब झटकत तो इकडे तिकडे पाहत होता. त्याला पाहताच अचानक बालपणात ऐकलेली गोष्ट आठवली.

“एक होती चिऊ, एक होती काऊ… “

मोठा पाऊस आला. चिऊचे घर मेणाचे होते, काऊचे घर शेणाचे. पावसात काऊचे घर वाहून गेले. मग ती चिऊच्या दाराशी आली.

“चिऊताई, चिऊताई, दार उघड… “

आणि मग चिऊचे नेहमीचे उत्तर…

“थांब गं, माझ्या बाळाला अंघोळ घालते. “

थोड्या वेळाने…

“थांब गं, माझ्या बाळाला जेवू घालते. “

पुन्हा थोड्या वेळाने…

“थांब गं, माझ्या बाळाला झोपवते. “

लहानपणी ही गोष्ट गोड वाटायची. चिऊ शहाणी आणि काऊ थोडी भोळी, एवढाच तिचा अर्थ वाटायचा. पण आज त्या गोष्टीकडे वेगळ्या नजरेने पाहावेसे वाटते.

आता मला चिऊचे घर मेणाचे वाटत नाही. ते सिमेंट-काँक्रीटचे, मजबूत घर वाटते. आणि काऊचे घर म्हणजे एखादी मातीची झोपडी वाटते. पाऊस आला की चिऊच्या घरातील माणसे खिडकीतून पाऊस पाहतात. काऊच्या घरातील माणसे मात्र आकाशाकडे पाहत काळजी करतात.

चिऊ म्हणते, “माझ्या बाळाला अंघोळ घालते. “

मला प्रश्न पडतो, काऊला बाळ नसते का?

चिऊ म्हणते, “माझ्या बाळाला जेवू घालते. “

काऊची पिल्ले उपाशी नसतात का?

गोष्ट पुढे जाते आणि एक वाक्य येते, “कोणत्या पोत्यात बसशील? “

लहानपणी हे वाक्य गंमतीशीर वाटायचे. आज त्याचा अर्थ वेगळा जाणवतो. ज्याच्या घरात पोती आहेत, धान्याचा साठा आहे, त्यालाच हा प्रश्न पडू शकतो. ज्याच्याकडे दोन दिवसांपुरतेही धान्य नाही, त्याला पोत्याचा पर्यायच नसतो.

कदाचित ही गोष्ट नकळत समाजाचे चित्र दाखवत असावी.

एकीकडे सुरक्षित घरे, बँकेतली बचत, विमा, साठवणूक आणि उद्याची चिंता कमी असलेले लोक.

दुसरीकडे रोज कमावून रोज खाणारे, पावसाने काम बंद झाले की चूल विझणारे लोक.

पाऊस मात्र दोघांच्या छपरावर सारखाच पडतो.

निसर्ग भेदभाव करत नाही. पण माणसांची परिस्थिती मात्र सारखी नसते.

या गोष्टीतला खरा प्रश्न चिऊ वाईट आहे की काऊ भोळी आहे हा नाही. खरा प्रश्न असा आहे की काऊ दाराशी आली तेव्हा चिऊने तिची भीती, तिचे दु:ख, तिची असुरक्षितता समजून घेतली का?

आज आपल्या सभोवताली अनेक “काऊ” दिसतात. पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त, बेघर, बेरोजगार, संकटात सापडलेले लोक. आणि अनेक “चिऊ” देखील दिसतात. ज्यांच्याकडे साधनसंपत्ती आहे, सुरक्षितता आहे, साठा आहे.

प्रश्न एवढाच आहे की काऊ दाराशी आली तर आपण तिला किती वेळ थांबवणार?

कारण शेवटी माणुसकीचा अर्थ एवढाच असतो की आपल्या घराचे दार बंद करून सुरक्षित बसणे नव्हे, तर संकटात सापडलेल्या दुसऱ्यासाठी ते दार उघडणे.

बालपणीची ती साधी गोष्ट आजही कानात घुमते…

“चिऊताई, चिऊताई, दार उघड… “

आणि वाटते, प्रत्येक पावसाळ्यात हा आवाज पुन्हा एकदा ऐकायला हवा. संपत्तीची खरी परीक्षा साठा किती आहे यावर होत नाही; दार किती उघडे आहे यावर होते.

 “लहानपणी आपण चिऊचे कौतुक करतो, मोठे झाल्यावर काऊचे दु:ख समजू लागते, आणि आयुष्याचा खरा धडा तेव्हा मिळतो जेव्हा आपण स्वतः चिऊ असूनही काऊसाठी दार उघडतो. “

लेखक: दत्ता कुकडे

प्रस्तुती:सौ.राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “डॉक्टर्स डे : आत्मपरीक्षणाचा दिवस…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? विविधा ?

☆ “डॉक्टर्स डे : आत्मपरीक्षणाचा दिवस…☆ श्री जगदीश काबरे ☆

डॉक्टर्स डे : पहिली बाजू

दरवर्षी १ जुलै रोजी साजरा होणारा डॉक्टर दिन हा केवळ डॉक्टरांचा गौरव करण्याचा दिवस नसून, आरोग्य व्यवस्थेच्या एका मूलभूत विरोधाभासाकडे लक्ष वेधणारा दिवसही आहे. समाजाला निरोगी ठेवण्यासाठी आयुष्य वाहून घेणाऱ्या डॉक्टरांच्या स्वतःच्या आरोग्याची अवस्था अनेकदा चिंताजनक असते. इतरांना दीर्घायुष्याचा सल्ला देणारे अनेक डॉक्टर स्वतः मात्र अनियमित जीवनशैली, प्रचंड मानसिक ताण, अपुरी झोप आणि सततच्या कामाच्या ओझ्यामुळे विविध असंसर्गजन्य आजारांना बळी पडत आहेत. त्यामुळे डॉक्टर दिन हा केवळ अभिनंदनाचा नसून आत्मपरीक्षणाचाही दिवस ठरला पाहिजे.

वैद्यकीय व्यवसाय हा इतर अनेक व्यवसायांपेक्षा वेगळा आहे. येथे प्रत्येक निर्णय एखाद्या व्यक्तीच्या जीवन-मरणाशी संबंधित असतो. त्यामुळे डॉक्टरांवर सतत मानसिक दबाव असतो. आपत्कालीन सेवा, रात्रपाळ्या, दीर्घकाळ चालणाऱ्या शस्त्रक्रिया, रुग्णांच्या नातेवाईकांच्या अपेक्षा, न्यायालयीन प्रकरणांची भीती, वाढती स्पर्धा आणि प्रशासनाचा दबाव या सर्वांचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. अशा परिस्थितीत स्वतःसाठी वेळ काढणे अनेक डॉक्टरांना शक्य होत नाही. यातील सर्वात मोठी विसंगती म्हणजे डॉक्टर आपल्या रुग्णांना ज्या आरोग्यदायी सवयींचा आग्रह करतात, त्याच सवयी त्यांना स्वतः पाळता येत नाहीत. वेळेवर जेवण, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, ताणाचे व्यवस्थापन आणि कुटुंबासाठी वेळ या गोष्टी त्यांच्या दैनंदिन जीवनातून अनेकदा हरवून जातात. परिणामी उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, नैराश्य, बर्नआऊट आणि काही वेळा आत्महत्येसारख्या गंभीर समस्या वाढताना दिसतात. आधुनिक वैद्यकीय संशोधनही सातत्याने सांगते की दीर्घकालीन ताण आणि अपुरी विश्रांती यामुळे शरीरातील दाह, हार्मोनल असंतुलन आणि जैविक वृद्धत्व वाढते, ज्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या आरोग्याचा प्रश्न हा केवळ वैयक्तिक नसून सार्वजनिक आरोग्याचा विषय आहे. निरोगी डॉक्टरच अधिक प्रभावीपणे रुग्णसेवा करू शकतो. म्हणूनच डॉक्टरांनी स्वतःच्या आरोग्याला दुय्यम न मानता व्यावसायिक जबाबदारीचा एक भाग मानले पाहिजे. त्याचबरोबर रुग्णालय व्यवस्थापन, शासन आणि समाज यांनीही डॉक्टरांना योग्य कामाचे तास, पुरेशी विश्रांती, मानसिक आरोग्य सहाय्य आणि सुरक्षित कार्यपरिसर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

कोविड-१९ महामारीने या वास्तवाला अधिक ठळक केले. त्या काळात डॉक्टरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा केली. अनेकांनी कुटुंबापासून दूर राहून हजारो जीव वाचवले, तर काहींनी स्वतःचे प्राण गमावले. या अनुभवाने डॉक्टर हा केवळ व्यावसायिक नसून समाजाचा अत्यावश्यक आधारस्तंभ असल्याचे सिद्ध झाले. मात्र अशा समर्पित सेवेनंतरही त्यांच्यावर होणारी हिंसा, अविश्वास आणि अपमान ही आरोग्य व्यवस्थेसाठी अत्यंत घातक बाब आहे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्वास कमी झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण उपचार प्रक्रियेवर होतो.

डॉक्टर दिनाचा खरा संदेश म्हणजे डॉक्टरांचा सन्मान केवळ शब्दांनी किंवा पुष्पगुच्छांनी न करता त्यांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा करून, त्यांच्याविषयी विश्वास आणि संवेदनशीलता निर्माण करून आणि त्यांच्या आरोग्याचीही तितकीच काळजी घेऊन व्यक्त करणे. कारण स्वतः निरोगी असलेला डॉक्टरच समाजाला अधिक सक्षम, सुरक्षित आणि निरोगी भविष्य देऊ शकतो.

डॉक्टर्स डे : दुसरी बाजू

डॉक्टरकी हा व्यवसाय नसून सेवा आहे, असे आपण नेहमी म्हणतो. “वैद्यो नारायणो हरिः” असे म्हणत भारतीय संस्कृतीने डॉक्टरला देवासमान स्थान दिले. परंतु आज वास्तव वेगळे दिसते आहे. रुग्णालये अनेक ठिकाणी सेवेची मंदिरे न राहता उद्योगालये बनू लागली आहेत. काही डॉक्टरांवर व्यापारी वृत्तीचा प्रभाव वाढताना दिसतो. अर्थात अपवाद सगळीकडेच असतात. हजारो डॉक्टर आजही प्रामाणिकपणे आणि सेवाभावाने काम करत आहेत. मात्र डॉक्टरकीच्या व्यवसायात ज्या अनिष्ट प्रवृत्ती वाढत आहेत, त्यांची परखड चिकित्सा करणे आवश्यक आहे. या समस्येची सुरुवात रुग्णालयातून होत नाही; ती घरातून सुरू होते. मुलगा किंवा मुलगी डॉक्टर व्हावी, ही इच्छा अनेक पालकांची असते. ही इच्छा मुलाची आवड, क्षमता किंवा सामाजिक जाणीवेतून निर्माण झालेली नसते; तर ती प्रतिष्ठा, पैसा आणि सामाजिक दर्जा मिळवण्याच्या आकांक्षेतून निर्माण झालेली असते. ‘डॉक्टर झाला म्हणजे आयुष्यभर पैशाची चिंता नाही, तो खोऱ्याने पैसा ओढेल’, ही समजूत अनेक कुटुंबांमध्ये आजही जिवंत आहे. त्यामुळे डॉक्टरकीकडे सेवेची नव्हे तर श्रीमंतीचा शॉर्टकट म्हणून अनेकदा पाहिले जाते.

याच मानसिकतेतून वैद्यकीय प्रवेश परीक्षांमध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण होते. काही विद्यार्थी प्रामाणिक मेहनतीने यश मिळवतात, पण काही पालक पैसा वापरून पेपरफुटी, गैरव्यवहार किंवा कॅपिटेशन फीच्या माध्यमातून प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा शिक्षणाची सुरुवातच पैशाच्या बळावर होते, तेव्हा अशा लोकांकडून नैतिकतेची अपेक्षा करणे कठीण होते. कोट्यवधी रुपये खर्च करून मिळवलेली पदवी अनेकांच्या दृष्टीने सामाजिक जबाबदारी नसून आर्थिक गुंतवणूक बनते. या गुंतवणुकीवर परतावा मिळवण्याची मानसिकता पुढे डॉक्टर झालेल्या विद्यार्थ्याच्या वैद्यकीय व्यवसायातही उतरते. मग काही ठिकाणी कमिशनसाठी रुग्णांना विशिष्ट तपासणी केंद्रात पाठवले जाते, अनावश्यक चाचण्या सुचवल्या जातात, आवश्यकता नसताना रुग्णालयात ऍडमिट व्हायला सांगितले जाते, गरज नसताना शस्त्रक्रिया केल्या जातात, महागडी औषधे लिहून दिली जातात. अशाप्रकारे रुग्णालयातील प्रत्येक उपचाराकडे उत्पन्नाचे साधन म्हणून पाहिले जाते. स्त्रीभ्रूणहत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्येही काही डॉक्टर सहभागी झाल्याच्या घटना समाजाने पाहिल्या आहेत. अशा घटना केवळ कायद्याचा भंग नाहीत; त्या वैद्यकीय नैतिकतेच्याही पराभवाचे प्रतीक ठरतात.

प्रश्न फक्त डॉक्टरांच्या चुकीच्या वागण्याचा नाही तर प्रश्न असा आहे की त्यांना तसे वागण्यास पोषक व्यवस्था कोणी निर्माण केली? महागडे वैद्यकीय शिक्षण, शिक्षणाचे खासगीकरण, अपुरी सरकारी वैद्यकीय महाविद्यालये, कमकुवत नियम, भ्रष्टाचार आणि पैशाच्या बळावर नियम वाकवण्याची संस्कृती यामुळे आरोग्यसेवेच्या क्षेत्रात व्यापारीकरण वाढले. अनेकदा गैरप्रकार उघडकीस येतात, चौकशा होतात, पण प्रभावशाली व्यक्ती, पैसा आणि राजकीय संरक्षण यांच्या आधारे प्रकरणे दडपली जातात. त्यामुळे प्रामाणिक डॉक्टरही संशयाच्या भोवऱ्यात अडकतात. या संपूर्ण प्रक्रियेत समाजाची मानसिकताही तितकीच जबाबदार आहे. आपण मुलाला डॉक्टर झाल्यावर ‘किती लोकांचे प्राण वाचवशील?’ हा प्रश्न विचारत नाही; तर ‘किती कमवशील?’ हा प्रश्न विचारतो. विवाहासाठी डॉक्टर मुलगा किंवा मुलगी म्हणजे मोठे स्थळ मानले जाते. कारण त्यामागे आर्थिक गणिते असतात. म्हणजेच समाज स्वतः डॉक्टरकीला सेवेपेक्षा उत्पन्नाचे साधन मानतो आणि नंतर डॉक्टर व्यापारी झाले म्हणून त्यांच्यावर टीकाही करतो. हा विरोधाभास समाजाचा दुटप्पीपणा उघड करतो.

याचवेळी ग्रामीण भागात, सरकारी रुग्णालयांत, आदिवासी क्षेत्रांत आणि आपत्कालीन सेवांमध्ये शेकडो डॉक्टर अत्यंत कमी साधनसामग्रीत आणि मोठ्या ताणाखाली काम करत आहेत, हे विसरून चालणार नाही. कोविड महामारीत अनेक डॉक्टरांनी स्वतःचे प्राण धोक्यात घालून सेवा दिली. त्यामुळे काहींच्या गैरवर्तनामुळे संपूर्ण वैद्यकीय समुदायाला दोषी ठरवणे अन्यायकारक ठरेल. परंतु गैरप्रकार करणाऱ्यांना अपवाद म्हणून दुर्लक्षित करणेही तितकेच चुकीचे ठरेल. कारण ही प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. म्हणूनच प्रश्न दोषी कोण? असा नसून व्यवस्था अशी का बनली? असा आहे. याचे उत्तर बहुआयामी आहे. पालकांची अवास्तव महत्त्वाकांक्षा, शिक्षणाचे व्यापारीकरण, शासनाचे अपुरे नियंत्रण, वैद्यकीय शिक्षणातील आर्थिक विषमता, नियामक संस्थांची निष्क्रियता आणि समाजाचा पैशाला दिलेला सर्वोच्च मान, या सर्व घटकांनी मिळून ही परिस्थिती निर्माण केली आहे. डॉक्टर हा या व्यवस्थेचा एक भाग आहे; पण व्यवस्था घडवणारा समाजही त्यात तितकाच या परिस्थितीला कारणीभूत आहे.

म्हणून उपायसुद्धा सर्वांनी मिळूनच शोधावा लागेल. त्यासाठी सर्वप्रथम वैद्यकीय शिक्षण परवडणारे आणि गुणवत्ताधारित झाले पाहिजे. कॅपिटेशन फीची संस्कृती संपली पाहिजे. नैतिकतेचे शिक्षण वैद्यकीय अभ्यासक्रमाचा केंद्रबिंदू झाले पाहिजे. अनैतिक डॉक्टरांवर कठोर आणि जलद कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर प्रामाणिक डॉक्टरांना संरक्षण, सन्मान आणि योग्य वातावरण मिळाले पाहिजे. समाजानेही डॉक्टरकीच्या पेशासंबंधीची आपली व्याख्या बदलली पाहिजे. ‘पैसा कमावणारा डॉक्टर नव्हे, तर विश्वास कमावणारा डॉक्टर घडविणे’ हेच खरे डॉक्टरांचे ध्येय असायला हवे. कारण ज्या दिवशी डॉक्टरकीचा व्यवसाय पेशा न राहता पूर्णपणे धंदेवाईक व्यापार बनेल, त्या दिवशी सर्वात मोठे नुकसान डॉक्टरांचे नाही, तर देशातील प्रत्येक सामान्य नागरिकाचे होईल. आरोग्य हा बाजारातील माल नसून मानवी हक्क आहे आणि हा हक्क टिकवायचा असेल, तर डॉक्टरकीच्या पांढऱ्या कोटामागे लपलेल्या व्यापारी मानसिकतेवर समाजाने आणि शासनाने तितक्याच धैर्याने बोट ठेवले पाहिजे… पायबंद घातला पाहिजे आणि समाजाचेही दुटप्पीपणाने वागणे थांबवले पाहिजे.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आषाढीच्या स्वादातली भक्ती…” ☆ तृप्ती देव ☆

तृप्ती देव

? विविधा ?

☆ “आषाढीच्या स्वादातली भक्तीतृप्ती देव

आषाढ मास सुरू झाला, की वातावरणात एक वेगळाच ओलसरपणा आणि आल्हाददायक गारवा पसरायचा. आभाळ भरून यायचं आणि त्या ढगांच्या गडगडाटात पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या माऊलींच्या टाळ-मृदंगाचा नाद ऐकू येतोय असा भास व्हायचा. आमचं कुटुंब मध्यमवर्गीय, त्यामुळे दरवर्षी आषाढीला पंढरपूरला जाणं काही शक्य नसायचं. पण पंढरपूरचं ते अथांग पावित्र्य, तो विठ्ठलमय आनंद दरवर्षी आमच्या घराच्या अगदी लहानशा स्वयंपाकघरात आणि देवघरात अलगद उतरून यायचा.

आमच्यासाठी आषाढी एकादशी म्हणजे केवळ एक उपवास नव्हता, तो तर आनंदाचा एक कौटुंबिक ‘चंगल’ असायचा. त्या एका दिवसात आईच्या हाताची चव, आजीच्या शब्दांतली निस्सीम भक्ती आणि संपूर्ण घरभर पसरलेला विठोबाचा अदृश्य पण जाणवणारा वास… हे सगळं असं काही एकवटायचं, की घरचंच पंढरपूर व्हायचं.

“उद्या कोण कोण उपवास करणार रे? “

एकादशीच्या आदल्या संध्याकाळी स्वयंपाकघरातून आईचा हा नेहमीचा प्रश्न यायचा. आणि आम्ही सर्व भावंडं खेळता खेळता, अभ्यासाच्या वह्या मिटता मिटता एका सुरात ओरडायचो— “मी! “, “मी करणार! “, “मी पण! “

कोणीही नाही म्हणायचा प्रश्नच नसायचा. कारण आमच्या बालमनाला माहीत होतं, उपवास म्हणजे उपाशी राहणं किंवा काहीतरी सोडून देणं नव्हतं; तर उपवास म्हणजे वर्षातून एकदा मिळणारे काहीतरी अत्यंत स्वादिष्ट, खमंग आणि जिभेवर रेंगाळणारे पदार्थ खाण्याची हक्काची पर्वणी!

त्यानंतर स्वयंपाकघरात आई आणि आजीची एक सुरेल, लयबद्ध जुगलबंदी सुरू व्हायची. एकादशीच्या मेजवानीची यादी ठरवली जायची. वरीचे तांदूळ, साबुदाणा, शिंगाड्याचं पीठ, राजगिरा, लाल माती लागलेले रताळे, बटाटे, सैंधव मीठ… आई एकेक नाव घ्यायची आणि आजी तिच्या अनुभवाच्या पोतडीतून त्यात भर घालायची. यादी लांबत जायची, पण दोघींच्याही चेहऱ्यावर थकव्याचा एकही ओरखडा नसायचा. उलट एक वेगळाच उत्साह दिसायचा.

तेव्हा आजच्यासारखे मिक्सर किंवा फूड प्रोसेसर नव्हते. त्यामुळे भाजलेल्या शेंगदाण्यांची टरफलं काढणं आणि ते हाताने फिरवायच्या लोखंडी मशीनमध्ये बारीक करणं हे एक मोठं काम असायचं. आई शेगडीवर शेंगदाणे भाजायला लागली, की संपूर्ण घरात त्याचा खमंग वास सुटायचा. आमचं मुख्य काम काय? तर आईची नजर चुकवून त्या गरम-गरम, खरपूस भाजलेल्या शेंगदाण्यांची मूठभर चोरी करायची आणि तोंडात टाकायची! आईला सगळं समजायचं, ती तिरप्या नजरेने बघून गोड हसायची, पण कधी रागवायची नाही.

कोपऱ्यात ठेवलेल्या पितळेच्या कढईत साजूक तूप वितळत असायचं. आईने तूप कढवून बरणी काठोकाठ भरून ठेवलेली असायची. रात्री झोपण्यापूर्वी आई एका मोठ्या पातेल्यात साबुदाणा भिजत घालायची. कितीही कामं असली, तरी साबुदाणा भिजवायला ती कधीच विसरली नाही. आम्हाला वाटायचं ती आमच्यासाठी हे करतेय, पण खरं तर ती तिच्या त्या सावळ्या “विठोबासाठी” करत असायची.

एकादशीची सकाळ उजाडायची तीच मुळी एका वेगळ्या चैतन्याने. घरात रेडिओवर भीमसेन जोशी किंवा प्रल्हाद शिंदे यांचे अभंग वाजत असायचे. स्वयंपाकघर आणि देवघर यांची विभागणी करणारी एक विटांची भिंत होती, पण मनातील ती सीमारेषा केव्हाच मिटून गेलेली असायची.

एकिकडे देवघरात आजीने अंघोळ करून, सुती साडी नेसून पूजेची तयारी सुरू केलेली असायची. ताजी फुलं, सुवासिक उदबत्ती, कापूर, चंदनाचा गंध आणि बेलपान विठ्ठलाच्या फोटोसमोर वाहिली जायची. आजी डोळे मिटून, अगदी संथ आणि तृप्त स्वरात “पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय… ” अशी साद घालायची.

ठीक त्याच वेळी, भिंतीच्या पलीकडे स्वयंपाकघरात आईच्या हातातून लोखंडी कढईत जिरे आणि हिरव्या मिरचीची तडतडणारी खमंग फोडणी पडायची! तो फोडणीचा पहिला तवंग आणि त्याचा तिखट-गोड सुवास जेव्हा घरभर पसरायचा, तेव्हा वाटायचं की भक्तीचा पहिला नैवेद्य विठ्ठलाला पोहोचला आहे.

सकाळचा बेत ठरलेला असायचा— मऊसुत, मोकळी-सळसळीत झालेली दाण्याचे कूट लावलेली साबुदाणा खिचडी, सोबत यायची आंबट-तिखट हिरवी चटणी, आणि तोंडाची चव वाढवणारा शिंगाड्याचा मऊ शिजलेला शिरा. त्या शिऱ्यामध्ये वाहणारं साजूक तूप आणि आईच्या मायेचा सुवास दोन्ही इतके एकजीव झालेले असायचे, की पहला घास तोंडात टाकताच स्वर्गीय सुखाचा अनुभव यायचा.

सकाळची नहारी झाली की दुपारी पुन्हा स्वयंपाकघराची चाकं फिरू लागायची. दुपारचा बेत म्हणजे साक्षात अन्नपूर्णा अवतरल्यासारखा असायचा. मऊ शिजलेली भगर, त्यावर ओतण्यासाठी चिंच, गूळ आणि शेंगदाण्याचा रस्सा घालून उकळलेली आंबट-गोड आमटी. सोबतीला लालसर रताळ्याच्या साखरेत घोळवलेल्या मऊ फोडी, घरचं उपवासाचे लिंबाचे लोणचं आणि उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले साबुदाणा-बटाट्याचे पापड.

त्या काळात बाजारातून रेडीमेड आणायची पद्धत नव्हती. कोणतीही वस्तू विकतची नसायची; जे काही ताटात यायचं ते आईने स्वतःच्या हाताने, घामाच्या थेंबांनी आणि प्रेमाने तयार केलेलं असायचं. आणि जे घरचं असतं, तेच खऱ्या अर्थाने देवाचं असतं, हा आजीचा नियम होता.

दुपारच्या जेवणाची पंगत बसायची. आम्ही मुलं पोटभर जेवायचो. दिवसभरात घरच्या वातावरणात एक शांत, सात्विक भक्ती न्हाऊन निघालेली दिसायची. जेवणं आटोपल्यावर, सगळी भांडी घासून आई जेव्हा स्वयंपाकघराच्या उंबरठ्यावर थकून बसायची, तेव्हा तिच्या कपाळावर घामाचे थेंब असायचे. ती आजीकडे किंवा आमच्याकडे पाहून हळूच विचारायची— “जेवण कसं झालं? आपला विठोबा खूश झाला असेल ना गं आज? “

तिचा तो निष्पाप, भाविक चेहरा पाहून मला आतून सांगावसं वाटायचं— “आई, विठ्ठलाचं माहित नाही, पण तुझं हे अथांग कष्ट आणि प्रेम पाहून साक्षात विठोबा देवघरातून बाहेर येऊन तुझ्यासमोर हात जोडून उभा राहिला असेल गं! “

संध्याकाल झाली की दिवेलागणीची वेळ व्हायची. तुळशीसमोर आणि देवघरात दिवा लावला जायचा. त्या काळात आमच्याकडे टीव्ही नव्हता, हातात स्क्रीन बिलगलेले मोबाईल नव्हते. पण तरीही घरात अजिबात कंटाळा नसायचा. कारण विठोबा आणि रुक्मिणीचं अस्तित्व घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक नात्यात जाणवत होतं.

आजी संध्याकाळी तिचा उपवास सोडताना किंवा रात्रीच्या वेळी फक्त एकच ठराविक जिन्नस घ्यायची— राजगिऱ्याच्या पांढऱ्याशुभ्र लाह्या, एक केळ किंवा सफरचंद आणि वाटीभर दूध. ती नेहमी एक मोलाची गोष्ट सांगायची, “बाळांनो, आपल्या या धावपळीच्या, चपळ आयुष्यात थोडा संयम, थोडी शांतता हवीच. विठ्ठलाला अवाजवी नैवेद्य नको असतो, त्याला मनाचा साधेपणा हवा असतो. “

पण आई रात्री पुन्हा स्वयंपाकघरात हजर व्हायची. रात्रीच्या वेळी आम्हा मुलांसाठी ती उपवासाची खमंग थालीपीठे भाजायला घ्यायची. शेगडीच्या उष्णतेने तिचा चेहरा लाल बुंद व्हायचा. डाव्या हाताने कपाळावरचा घाम पुसत, उजव्या हाताने थालीपीठावर तूप सोडणं तिचं थांबायचं नाही.

आम्हा सगळ्यांना पाटावर बसवून ते गरमागरम, खरपूस भाजलेलं थालीपीठ, त्यावर घरात साठवलेल्या दुधाच्या सायीचं काढलेलं पांढरंशुभ्र लोणी आणि बाजूला आंबट-तिखट लोणचं… बास! त्या जेवणात जे समाधान असायचं, ते जगातल्या कुठल्याही मोठ्या हॉटेलच्या पक्वान्नात नसेल. ते समाधान फक्त चवीमुळे नव्हतं, तर त्या चवीमागे असलेल्या आईच्या अखंड, निरपेक्ष श्रमांमुळे होतं.

दुसऱ्या दिवशी द्वादशीला आमचा उपवास सुटायचा, आम्ही पुन्हा नेहमीच्या जेवणावर यायचो. आमची एकादशी संपायची, पण मला वाटतं आईची एकादशी कधीच संपायची नाही. तिचा विठोबा फक्त भिंतीवरच्या चौकटीतल्या फोटोत नसायचा; तो तिच्या प्रत्येक हालचालीत, मुलांसाठी केलेल्या प्रत्येक कामात, आणि तिच्या सोशिकतेत असायचा. आई म्हणजे माझ्या घराची साक्षात रुक्माई, तिच्या हातात असतो विठोबाचा पवित्र नैवेद्य, तिच्या काळजात असतो अखंड भक्तीचा गाभा, आणि तिच्याच पायाशी असतो माझा पंढरपूरचा राया!

आता खूप वर्षं उलटून गेली. काळाचं चाक वेगाने फिरलं. घरात आधुनिकता आली. हाताने शेंगदाणे कुटायची गरज उरली नाही, कारण मिक्सर आले. रेशनच्या दुकानाची किंवा साहित्याची चिंता नाही, सुपरमार्केट्स आली. उपवासाचे पदार्थ बनवायचे कष्ट नको म्हणून बाजारात विकतचे पापड, रेडीमेड थालीपीठ भाजणी आणि थेट घरपोच मिळणारे डबे आले. सगळं काही अगदी सोपं, सुटसुटीत आणि वेळेची बचत करणारं झालं.

पण… पण त्या आषाढी एकादशीचा तो जुना, मनाला तृप्त करणारा स्वाद मात्र पुन्हा कधीच नाही आला. त्या पदार्थांमध्ये सगळं काही योग्य प्रमाणात असतं, पण आईच्या हाताची ती जादू आणि आजीच्या प्रार्थनेची ती उब त्यात नसते.

म्हणूनच, आजही जेव्हा आषाढी एकादशी जवळ येते, मी भूतकाळाच्या आठवणींमधून बाहेर पडते आणि मेरे स्वयंपाकघरात आईसारखीच खंबीरपणे उभी राहते. माझ्या मुलांना जवळ बोलावून त्याच मायेने विचारते— “उद्या कोण उपवास करणार रे? ” ते मुलं आपापल्या मोबाईलवरून मान वर करत नाहीत, कदाचित त्यांना त्याचं महत्त्व नसेल, पण तरीही मी न हार मानता आईसारखीच तयारी करायला घेते. मी आज आईची जागा घेतली आहे खरी, संसार सांभाळतेय, पण तिच्यासारखं विशाल, निखळ प्रेम आणि ती भक्ती मी कुठून आणू? हा प्रश्न मला नेहमी सतावतो.

कधी कधी डोळे मिटले की असं वाटतं, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात लाखो वारकऱ्यांची माऊली उभी आहे, विठोबा कटेवर हात ठेवून रांगेत उभ्या असलेल्या भक्तांची वाट पाहतोय… पण मी त्या रांगेत नसून, खूप दूर एका कोपऱ्यात, माझ्या आईच्या आठवणींच्या पंक्तीच्या शेवटी बसलेली आहे, तिच्या आठवणीत पूर्णपणे न्हाऊन निघालेली आहे.

तृप्ती देव

तेव्हा मला मनोमन जाणवतं की, माझा विठोबा फक्त दगडी मंदिरात किंवा गर्दीत नाही; तर तो माझ्या आईच्या कष्ट उपसणाऱ्या हातांमध्ये, तिने दिलेल्या पांढऱ्याशुभ्र लाह्या आणि लोण्यामध्ये, आणि उपवासाच्या दिवशी तिच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या त्या शांत, तृप्त हसण्यामध्येच विसावलेला आहे. “जिथे भाव, तिथे देव. ” आषाढी एकादशी साजरी करणं म्हणजे केवळ उपवास करणं किंवा कष्टाची वारी करून पंढरपूर गाठणं नव्हे— तर आपल्याच घरात वर्षानुवर्षे आपल्यासाठी झटणाऱ्या विठोबाला आणि रुक्मिणीला ओळखणं होय. त्या माऊली म्हणजेच आपली “आई” आणि “आजी”— ज्यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या संस्कृतीचं, प्रेमाचं हे चैतन्य जपलं, आणि आपल्या मनामनात भक्तीची आषाढी कायमची रुजवली.

© तृप्ती देव

भिलाई( छत्तीसगड)

मो ९१६५९८४३२२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”विचारात चिमूटभर बदल झाला तर??..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “विचारात चिमूटभर बदल झाला तर??.. ☆ संध्या बेडेकर ☆

“Sometimes You meet someone in life, Who change your way of thinking. “

काल ताई कडे गेले होते. सहजच. जेंव्हा मनात येईल तेंव्हा जाण्यासाठी हक्काचे ठिकाण म्हणजे माझ्या ताईचे घर.

ताई म्हणजे ‘आभा कुलकर्णी ‘ चा सधन मध्यमवर्गीय परिवार आहे. भाऊजी सरकारी नोकरीत मोठ्या हुद्द्यावर होते. आजही कन्सल्टंट म्हणून काम करतात.

एक मुलगा अजय आणि एक मुलगी अनघा.

अजय भारतातच शिकला आणि भारतातच एका मोठ्या कंपनीत नोकरीला आहे. पण मधून मधून कामानिमित्त परदेशात जाव लागत. कधी कधी तर प्रोजेक्ट च्या कामाने महिनाभर तेथेच रहावं लागतं. तेंव्हा सूनेच्या शोधात असताना हा पोइंट सांगणे खूप महत्वाचे आहे. असं भाऊंजींचे म्हणणे आहे.

‘अनिता देशमुख ‘ बरोबर बरेचदा भेटीगाठी झाल्यानंतर, सर्व सम्मतीने पसंती झाल्यावर,अजय ने हा मुद्दा सर्वांसमोर मांडला.

अजय म्हणाला, 

मला कामानिमित्त कधी कधी महिनाभर बाहेर रहाव लागत. तेंव्हा माझ्या होणाऱ्या बायकोला प्रथम ही गोष्ट माहीत असली पाहिजे,मान्य असली पाहिजे. आणि तीने किंवा आई बाबांनी एकट राहण्यापेक्षा एकत्र रहावं. दोघांनाही एकमेकांची मदत होईल. आधार असेल. मला काळजी राहणार नाही. सर्वांचे सर्व प्रश्न सहज सुटतील. असं माझं मत आहे.

अनिता ने नोकरी चालू ठेवावी किंवा तिला अजून काही आपले छंद जोपासायचे असतील तर ते ही चालेल. माझ्याकडून तिला प्रत्येक कामात माझे व आईबाबांचे सहकार्य नेहमी मिळेल. याची मी खात्री देतो.

अजयने स्पष्ट बोलून सौम्य शब्दात सर्व गोष्टी सांगितल्या. बंगल्यात राहणाऱ्या अनिताला सर्व गोष्टी मान्य होत्या. आणि अजय चे लग्न पार पडले. बंगल्यात तून अनिता फ्लॅट मध्ये रहायला आली.

अनिता मधून मधून माहेरी जात असली,तरी जास्तीत जास्त ती आई बाबांबरोबरच असते. या गोष्टी चे ताईला आणि अनिताच्या आईबाबांना दोघांनाही कौतुकच आहे.

ताई आणि भाऊजीं ना तशी थोडी काळजीच होती. कारण दोन्ही घरच्यांच्या सांपत्तिक स्थिती मध्ये बराच फरक आहे.

प्रत्यक्षात रहायला सुरुवात झाली की कदाचित अनिता ला adjust होण कठीण होईल की काय?? ही भीती ताईला वाटतं होती.

आता लग्नाला महीना झाला. अनिता घरात छान रुळली आहे. आज संध्याकाळी जेवणानंतर सर्वांच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या. सध्या लग्नाच्याच गोष्टी म्हणजे Pre and Post marriage गप्पा होत असतात.

आज ताई अनिताला म्हणाली,

अनिता!! आता जवळजवळ महिना झाला ग तुला या घरात येऊन. अगदी आरामात रहा. मोकळेपणाने काही वाटलं तर सांग. प्रत्येक घरच्या पद्धती वेगळ्या असतात. अग! भाजीत गुळाचे प्रमाण पण प्रत्येक घरचे वेगळे असते, किंवा अजिबात गुळ घालतही नाही. तेंव्हा तुला काही वेगळ खायचं असेल तर तसं सांग,मी करून देईन किंवा तू कर. आम्हाला पण खायला आवडेल.

तुला घरात काम करायची सवय नसेल तर संकोच करू नको. आपण एखाद्या मावशींना कामाला ठेवू शकतो.

अनिता म्हणाली,

आई!! तुम्ही माझा एवढा विचार करता हे बघून मला माझा निर्णय बरोबर आहे. हे लक्षात येतंय.

आई!! मी घरी खूप पैसा बघितालाय. बाबांचा बिझनेस हळूहळू वाढत गेला. पैसा घरात येत गेला. यामागे बाबांचे कष्ट आणि Vision दोन्ही आहे. मला बाबांचा अभिमान आणि कौतुक दोन्ही आहे. आता एवढा बिझनेस सांभाळायला दादा पण भारतात नाही. तो अमेरिकेत स्थायिक झालाय. म्हणजे बाबांनाच सर्व बघावं लागतं. आईने घर,मला आणि दादाला खूप छान सांभाळल. आम्हाला शिस्तीत ठेवल. बाबांनी शुन्यातून हे साम्राज्य उभे केले.

मी बाबांना नेहमी विचारते,

बाबा!! स्वतः साठी वेळ केंव्हा काढणार आहात?? कमविलेल्या पैशाचा आनंद केंव्हा घेणार आहात??

केंव्हा आणि कुठे थांबायचं तेही ठरवता आलं पाहिजे ना.

मी आणि दादा नेहमीच स्वतः चे निर्णय घेत आलो. आई बाबांचा नेहमीच सपोर्ट असतो. मला श्रीमंत परिवारापेक्षा एक छान समजूतदार परिवार मिळावा,ही आमच्या सर्वांचीच इच्छा होती.

“श्रीमंत परिवार, एकुलता एक मुलगा, मुलांची प्रोपर्टी, बंगला ” हे मुद्दे आमच्या घरी नव्हतेच.

आज या गप्पागोष्टींत ‘अनघा ‘ताईची उच्च शिक्षित मुलगीही हजर होतीच. अजय पेक्षा एकच वर्ष लहान,लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पोस्ट ग्रॅज्युएट झालेली, एका नामी कंपनीत लठ्ठ पगाराची नोकरी करणारी अनघा, अनिताचे बोलणं लक्ष देऊन ऐकत होती.

अनघाला लग्न तर करायचे आहे. पण अटी भरपूर आहेत. उच्च शिक्षण,पगार या अटी तर आहेतच. बरोबर एकुलता एक,पॉश लोक्यालिटीत स्वतः चे घर असणारा हवा ही एक अटही आहे.

आता अनघा चे वय तीस वर्ष आहे.

सगळ्यांचे सर्व समजावून झाले. पण पालथ्या घड्यावर पाणी. वय वाढतय पण अटी काही कमी होत नाहीत.

बाकी सर्व अटी तरी ठीक म्हणता येतील. पण पॉश एरियातच घर हवं,

ये बात कुछ हजम नहीं हुई ।

या अटी वर भरपूर चर्चा नेहमीच होत असते.

मध्यंतरी ताईंच्याच कॉलोनीत राहणारे श्री देशपांडे यांनी त्यांच्या उच्च शिक्षित एकुलत्या एक मुलांसाठी विचारलेही होते.

भाऊजींचे म्हणणे,

आपण नेहमीच मिडिल क्लास सोसायटीत राहिलो. आपल काय वाईट झाल.?? खरंतर कोविड पिरियड मध्ये किती लोकांची मदत झाली.

मध्यवर्गीय सामान्य लोकांची सोसायटी चांगली नसते की लोक चांगली नसतात.??

घर / बंगला कुठं आहे यापेक्षा घरातील माणसे महत्वाची नाही का??

आजही अनघाच्या लग्नाचे प्रयत्न सुरूच आहेत पण सर्व अटीत फिट बसणारा मुलगाच मिळत नाहीये.

ताई भाऊजी ना तिची काळजी आहेच.

म्हणतात ना,

वेळ निघून गेल्यावर सुचलेले विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस दोघांची किंमत सारखीच आहे.

आज अनघा बाबांना म्हणाली,

बाबा!! देशपांडे काकांना भेटून पूढच्या गोष्टी केल्या तर माझी काही हरकत नाही.

ताई भाऊंजीं एकमेकांकडे समाधानाने आनंदाने बघतच राहिले.

ताई मनात म्हणाली, हा अनिताच्या विचारांचा प्रभाव आहे का?

भाऊजी पण मनात म्हणाले, 

“Sometimes you meet someone in life who change your way of thinking.”

विचारात चिमूटभर बदल झाला तर आयुष्य बदलत.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ग म भ न… ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

??

☆ ग म भ न… ☆ राधिका भांडारकर ☆

माझी शाळा. हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अत्यंत हळवा कोपरा असतो. आयुष्याच्या भविष्याची, शाळा ही सुरुवात असते. काहीच कळत नसतं, कसलाच अनुभव नसतो. बाल मनातली एक अनोळखी भीती आणि डोळ्यातून नकळत सांडणारे पाणी घेऊन, आईचा हात घट्ट पकडून, शाळेच्या आवारात पाऊल टाकलेलं असतं, आणि त्यानंतर एक एक पायरी चढत, शाळेच्या त्या सुंदर विश्वात आपलं बाल्य, कौमार्य, तारुण्य कसं विकसित होत जातं हे कळतही नाही.

माझी शाळा… गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल ठाणे.

.. एक लांबलचक इमारत, खूप मोठे पटांगण. ,घंटा,पार बांधलेली झाडे,टीचर्स रुम,प्रयोगशाळा,आणि मित्रमैत्रीणींचा घोळका. वर्गात नोटीस घेऊन येणारा शिवा,आणि खूप काही.

पाचवीच्या वर्गात असताना वाटायचं दहावीचा वर्ग किती छान आहे! आपण कधी त्या वर्गात जाऊ? आणि ही दहावी ची मुलं जसा रुबाब करतात, तसा आपल्याला कधी करायला मिळेल?

शाळा म्हणजे बेंचेस, खडू, फळा, गणवेश, प्रार्थना, मधल्या सुट्टीतला सवंगड्यांबरोबर बरोबर खाल्लेला डबा. आणि उरलेल्या वेळात खेळलेले, सोनसाखळी, लंगडी,लगोरी असे मैदानी खेळ. हरलो-जिंकलो,आऊट,टाईम प्लीज, रुसवे भांडणे, कट्टी -बट्टी, कच्चा लिंबू अय्या! ईश्श!

आणि कधीतरी थोडं घाबरत थोडं धिटाईने, नियम मोडत, शाळेच्या आवाराबाहेर जाऊन, एक पैशाचा खाल्लेला गोड पेरू! जांभळं,चिंचा म्हातारीचा कापूस वगैरे. अवीट गोडी! अविस्मरणीय! त्या एका पैशाच्या पेरूची, आजच्या शंभर रुपयाच्या थाई पेरू ला गोडी कशी येणार?

गोखले बाई फार आवडायच्या. विंदांची स्वेदगंगा ही कविता त्यांनी इतक्या तळमळीने शिकवली होती,की आजही त्या ओळी अर्थासकट मनावर स्वार आहेत.

 स्वेद बिंदूंनो विसरा भीती

 खूप बाळगा एकचित्त

 अहित जयातून तीच अनिती

 वेद यात नि यात बायबल 

 पुराण अथवा कुराण यातच 

 मता मतांचा सोडा गोंधळ ।।

गोखलेबाई ही कविता एका चालीत आणि लयीत म्हणायच्या. आणि ती आमच्या उमलत्या मनावर हलकेच पांघरत जायची. शाळेत शिकलेली, म्हटलेली,

” फुलपाखरू छान किती दिसते! ” किंवा “देवा तुझे किती सुंदर आकाश! ” किंवा कुसुमाग्रजांची,

” आवडतो मज अफाट सागर।

निळ्या जांभळ्या जळात केशर ।।.. शाळेच्या अंगणात बहरलेल्या या काव्यानंदाने आजपर्यंत च्या जीवनात कधीही साथ सोडली नाही.

राजेबाईंनी काळ- काम- वेग,नफा-तोटा,सम व्यस्त इतकं घोटून घेतलं की आयुष्यातलं गणितही पक्कं झालं!

नाशिककर बाईंनी प्रेमचंद मुन्शी,मन्नु भंडारी,हरिवंशराय बच्चन यांच्या साहित्याची ओळख करून दिली. फडके बाईंनी माझ्यासारख्या बेसूर गळ्यातू नही, भूप रूप शांतरस असलेले आरोह-अवरोह काढले. चित्रकलेचे तांबे सर मला म्हणायचे,” अगं! तुला नक्की काय काढायचे आहे? चिमणी की बदक? “

विविध कलांचे असे एकेक थेंब शाळेच्या त्या अंगणात मनात साठत गेले. दोन डोंगरातला उगवता सूर्य,निळे आकाश,उडणारे पक्षी,नारळाचे झाड,घर,नदी रस्ता हे एकमेव जागतिक चित्र आजही शालेय जीवनाची साक्ष आहे!

सूर्याभोवती पृथ्वी कशी फिरते, याचं प्रात्यक्षिक चौधरी बाई करून दाखवायच्या. वर्गातलाच कोणीतरी एक सूर्य, कोणीतरी एक पृथ्वी, आणि मग सारी ग्रहमाला बाईंच्या स्टेजवर फिरायला लागायची. या नाटकात मीही एकदा मंगळाची भूमिका केली होती!

पण सारं काही मजेत शिकलो.

पहिल्या नंबर पासून तिसाव्या नंबर पर्यंत प्रवास केला. पण स्पर्धा नव्हती. मित्र-मैत्रिणींच्या यशातही आनंद होता. तसे काही काही चेहरे होते कुसकट! पण वैर, द्वेष असे काही नव्हते. ” यावेळेस माझा नंबर तू पटकावलास.. “इतकाच राग.

शिक्षाही भोगल्या की! बेंचावर उभे राहिलो, वर्गाच्या बाहेर ओणव्याने ऊभं राहून काही मिनिटे सहन केली. शंभर वेळा, शिक्षा म्हणून एखादी ओळ लिहिली. पण पालकांनी कधी शिक्षकांची तक्रार केली नाही.

शाळा म्हणजे एक मंदिर होतं. “हे! जगत्राता विश्वविधाता “या प्रार्थनेने शाळा सुरु व्हायची…

वर्‍हांड्यातल्या फळ्यावर रोज एक सुविचार लिहिलेला असे. आम्ही विद्यार्थीच लिहीत असू.

एकमेका सहाय्य करू। अवघे धरू सुपंथ।।

खरा तो एकची धर्म। जगाला प्रेम अर्पावे।। 

अंथरूण पाहून पाय पसरावेत। 

अलसस्य कुत:विद्या । अविद्यस्य कुत: धनम्।। 

अधनस्य कुत: मित्र ।अमित्रस्य कुत: सुखम।।

Friend in need is a friend indeed  

– – असे कितीतरी सद्विचार…संस्कारांचं गाठोडं बांधून दिलं या शाळेने.

 या शाळेने, जसं मन घडवलं, तसं उमलत्या वयाबरोबर फुलणार्‍या स्पंदनांची ही जाणीव करून दिली. कळीचं फुल होताना घडणारी अंतस्थ वादळं बघायला आणि अनुभवायलाही शिकवलं. त्यासाठी लागणारी संयमाची, प्रशिक्षणाची, स्थैर्याची किल्लीही हाती ठेवली..

अकरावी नंतर शाळा संपली. (आमच्या वेळी दहावी अधिक दोन असे नव्हते. अकरावी होती. आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाची सुरुवात असे.)

 शाळेच्या त्या इमारतीला, त्या पटांगणाला, तिथल्या झाडांना, त्या घंटेला निरोप देताना, खूप खूप काहीतरी वाटून गेले.

 उरले उरात काही 

 आवाज चांदण्याचे 

 आकाश तारकांचे 

 उचलून रात्र गेली ।।

अशी काहीतरी भावना झाली असावी.

माझी शाळा या दोन शब्दांबरोबर, या भावनांचे धबधबे असे कोसळले खरे! पण आज, या शेवटच्या टप्प्यावरून मागे वळून पाहताना, दूर कुठेतरी, अंत: चक्षूने माझी शाळा पाहताना वाटते, या चार भिंतीच्या शाळेने मला संरक्षण दिले. माझ्या जगण्याच्या सीमा निश्चित केल्या ही असतील. पण माझी विद्यार्थीदशा कुठे संपली? या शाळेच्या बाहेर एक मोठी शाळा होती जिथे माझा प्रवेश झाला. आणि त्या शाळेत मी अजूनही आहेच की! आज हीच *माझी शाळा* आहे. फरक इतकाच, या शाळेला भिंती नाहीत, बसायला बाक नाहीत, लिहायला फळा नाही,शिक्षकांचा ठराविक समूह नाही. जिथे जाऊ तिथे शिक्षक आहेत. ते आपल्यालाच शोधायचे आहेत. सारे काही मुक्त आहे. ज्ञानाचा सागर आहे. त्यात एक तर बुडाल नाही तर तराल. इथे तुमचं तुम्हाला शिकायचंय्. तुमचं तुम्हाला टिपायचंय्. अंथरुण पाहून पाय पसरायचे की अंथरुणच वाढवायचे? नेहमी खरं बोलायचं की कधी खोट्याचाही आधार घ्यायचा? जगावर प्रेम करायचे की जगापासून सावध राहायचे? एका गालावर कोणी मारलं तर दुसरा गाल पुढे करायचा की ठोशास प्रतिठोसा द्यायचा, हे तुमचं तुम्हाला ठरवायचे आहे. *ये ग ये ग सरी माझे मडके भरी* हेच का माझं गाणं इथे असायला हवं हेही तुम्हालाच ठरवायचे आहे. आज मात्र *माझी शाळा* म्हणजे हे जग आहे,हे जीवन आहे का?

 मनात येतं..

 ।जग हे बंदी शाळा 

 कुणी न येथे भलाचांगला

 जो तो पथ चुकलेला 

 कुणा न माहीत सजा किती ते 

 कोठून आलो नच स्मरते 

 सुटके लागी मन घाबरते

 जो आला तो रमला।।

 या माझ्या शाळेत मात्र आजही मी विद्यार्थीच आहे. प्रवाहपतित, ज्ञानपिपासू. गुरूच्या शोधात असलेली मी अजूनही गमभन गिरवत आहे…

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ विठूमाऊलीचा प्रसाद… ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

? इंद्रधनुष्य ?

☆ विठूमाऊलीचा प्रसाद लेखक : संदीप चव्हाण ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

आर्मी सर्व्हिसेस कोरचे कॅप्टन प्रकाश कदम पंढरपूरला विठूमाऊलीच्या दर्शनाला आले होते. आज त्यांची सुट्टी संपत होती. दर्शन झालं की इथून मुंबई आणि मग तिथून पोस्टिंगवर – ड्युटीवर रुजू व्हायचं म्हणून कॅप्टनसाहेब लष्करी गणवेषातच दर्शनाला आले होते.

दर्शन झालं, आता बाहेर पडणार एवढ्यात एका छोट्या मुलीनं त्यांना हटकलं – काका, तुम्हीपण सैन्यात आहात ना? इथून आता शत्रूशी ढिशूम ढिशूम करायला तुम्ही काश्मीरला जाणार ना? माझे बाबाही तिथेच आहेत. त्यांच्यासाठी हा विठोबाचा प्रसाद घेऊन जाल? आई म्हणते बाबा आता कधीच परत येणार नाहीत, त्यांना एवढा प्रसाद तर द्या.

… आणि कदमांचा पंढरपूरचा मित्र त्यांच्या कानात कुजबुजत सांगत होता – ही उमंग. शहीद मेजर कुणाल गोसावींची मुलगी. मेजरसाहेब २०१६ साली काश्मीरमध्ये नग्रोटा इथे अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले, तेव्हा ही फक्त ४ वर्षांची होती…

कदमांच्या डोळ्यात पाणी तरारलं आणि त्यांना पुढचं काही ऐकूच आलं नाही.

डॉ. मकरंद पिंपुटकर 

 चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १५ ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १५ ☆ प्रा.भारती जोगी ☆

नेहमीसारखाच शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम सुरू होता. पती-पत्नी… दोघही आपापल्या वाद्यावर सादरीकरण करत होते. पती एक राग वाजवत असे, आणि पत्नी तोच राग त्यांच्या पेक्षा ही तेज गतीने वाजवत असे. असं म्हणतात की, त्यावेळी पतीच्या चेह-यावरचे बदलत जाणारे भाव श्रोत्यांच्या नजरेतून सुटले नाहीत… पत्नीला ही जाणवले… नंतरही जाणवतच राहिले. श्रोत्यांची पसंती आणि वाहवा पत्नीच्या वादनाला अधिक मिळू लागली आणि तिला जाणवू लागली ती पतीची नाराजी, असुरक्षिततेचा भाव, आणि कुठेतरी अहंकाराची छटा!! त्यामुळे वैवाहिक जीवनात वादळं येऊ लागली, नात्यांत हळूहळू दुरावा येऊ लागला…

शेवटी आपला संसार वाचावा म्हणून आणि पतीचा स्वाभिमान दुखावू नये म्हणून तिने सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आणि स्वयंघोषित अज्ञातवास पत्करत स्वतः ला आपल्याच निवासस्थानी चार भिंतीत जगणारे आयुष्य निवडले. कारण तिला आपल्या कलेवर आणि संगीतावर कुठलेही दूषण नको होते.

हे… आपल्या संस्कृतीतल्या पुरुषसत्ताक पद्धतीमुळे… अनाम, अलक्षित राहिलेलं आणखी एक स्त्री रत्न!!

हे झाकोळलं गेलेलं रत्न म्हणजे… भारतरत्न महान सतारवादक आणि संगीतकार पं रविशंकर यांची पहिली पत्नी… महान उस्ताद अल्लाउद्दीन खान यांची कन्या आणि उस्ताद अली अकबर खान यांची भगिनी… *अन्नपूर्णा देवी*!!! उर्फ रोशनआरा खान!

मैहर संस्थानच्या महाराज ब्रिजनाथ सिंह यांनी त्यांच्या वादन कौशल्यावर खुश होऊन त्यांना अन्नपूर्णा देवी हे नाव दिले, असं म्हणतात. १५ मे १९४१ ला हिंदू धर्म स्वीकारला आणि आपल्या पित्याचे शिष्य पं रविशंकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या.

अन्नपूर्णा देवींच्या वडिलांनी सुरुवातीला त्यांना संगीतापासून दूर ठेवले. पण त्यांची अफाट श्रवण शक्ती, आणि संगीतातील समज पाहून त्यांनी देवींना आधी सतारीची दिक्षा दिली.

नंतर… प्रचंड ताकद आणि बोटांची लवचिकता लागणारं, स्त्रियांसाठी वाजवायला सर्वात कठीण असलेलं वाद्य… *सूर बहार* शिकवलं. देवींनी ही आपल्या प्रचंड मेहनतीने त्या वाद्यावर हुकूमत मिळवली. सतारवादनातही कुशलता प्राप्त केली.

सूर बहार… या वाद्याचा आवाज अत्यंत खोल, गंभीर आणि मानवी आवाजाच्या सर्वात जवळ जाणारा असतो. आणि अन्नपूर्णा देवींच्या सूर बहार वादनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या गायकीचे अंग! त्यांच्या वादनात एक प्रकारची शांतता, ध्यान आणि आध्यात्मिक खोली होती. त्यामुळे ऐकणा-याला ध्यानस्थ अवस्था अनुभवायला मिळे हे विशेष!!

आणि म्हणूनच असं म्हणतात की… एकदा पं जीं च्या सतारीच्या

जलद गतीच्या तानांना, जुगलबंदी त उत्तर देतांना देवींनी सूर बहार वर इतकी संथ, गंभीर आणि खोल मींड घेतली की… संपूर्ण सभागृह शांत… आणि… लोकांनी उभं राहून ; फक्त देवींसाठी टाळ्यांचा कडकडाट केला. *त्यांच्या सांगीतिक श्रेष्ठतेचा सर्वोच्च क्षण होता तो!

संगीत जगतातील सरस्वती* च होती ती!! त्यांचं सूर बहार ऐकणं म्हणजे प्रत्यक्ष सरस्वती चे दर्शन!!

पण… या सरस्वतीतल्या पत्नी ने शेवटी आपल्या *आकाशगंगा* या निवासातील एकांत निवडला… एक… सूरांचा बहर आपल्या *सूर बहार* ला उराशी घेऊन अज्ञातवासात गेला. बहर कोमेजतोय असं वाटलं पण… त्यांच्या मोठ्या बंधूंनी… जगप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अली अकबर खान यांनी जाऊन त्यांना समजावले आणि सांगितले की, ” तू मंचावर वाजवणे सोडले आहेस, पण बाबांचे हे अलौकिक संगीत संपू देऊ नकोस. शिष्यांना शिकवून जिवंत ठेव”!!!

अन्नपूर्णा देवींना आपल्या मोठ्या भावाचे म्हणणे पटले, आणि त्यांनी उर्वरित जीवन आपल्या मुंबईतल्या अपार्टमेंटमध्ये चार भिंतीत घालवत संगीत साधना सुरू ठेवली. विना श्रोत्यांच्या संगीतकार बनल्या त्या!

रात्रीच्या गहन शांततेत ; या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील अत्यंत प्रतिभावान, अद्वितीय आणि २० व्या शतकातील एकमेव महिला सूर बहार वादक असलेल्या साधिकेने तिची सूर साधना सुरू ठेवली. रात्रीच्या निरव शांततेत तिच्या साधनेच्या शुचितेने सिक्त सुरांची बहार मात्र आसपासच्या लोकांना संतृप्त करत होती.

संगीत हा प्रसिद्धीचा मार्ग न मानता एक अंतर्गत साधना मानली देवींनी आणि सहा दशके ही तपस्वीनी, अथक, अखंड, अविरतपणे… एखाद्या समई सारखी शांतपणे, मंद-मंद तेवत राहून, समिधे सारखी जळत राहिली,सूर आणि संगीताच्या महा यज्ञात समर्पित होत राहिली!! ,त्या शीतल प्रकाश तेजात देशातील महान संगीतकार घडवत राहिली.

अन्नपूर्णा देवींचे घर जणू गुरूकुल च बनले… साधक शिष्यांसाठी! शिष्यांकडून एकही रूपया मानधन न घेता शिकवत. त्या म्हणायच्या… मी संगीत विकत नाही. ज्याला खरोखर संगीत हवे आहे, त्याला मी मोफत देईन. पण त्यासाठी पूर्ण समर्पण हवे. 

आणि खरंच देवींनी शिष्य घडवितांना त्यांना अग्निपरीक्षा द्यायला लावली. त्यांनी घडविलेल्या शिष्योत्तमांत प्रामुख्याने…

पं. हरिप्रसाद चौरसिया (बासरी) 

पं निखिल बॅनर्जी (सतार) 

दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी

नित्यानंद हळ्दीपूरकर (बासरी) 

यांचा उल्लेख अभिमानास्पद ठरतो. देवींनी या शिष्यांकडून फी कधीही घेतली नाही. त्यांची गुरूदक्षिणा म्हणजे… एकाग्रता, कठोर रियाज, आणि संगीतावर ची अढळ निष्ठा!!

पं हरिप्रसाद चौरसिया यांनी त्यांच्या बद्दल काढलेल्या गौरवोद्गारातून अन्नपूर्णा देवींच्या गुरू रूपेण संस्थिता रुपाचं… सगुण, साकार दर्शन होतं.

पं हरिप्रसाद चौरसिया म्हणतात,…

“मी त्यांच्या दारात कित्येक दिवस उभा राहिलो. मग त्यांनी माझं शिष्यत्व स्विकारले. आणि त्यानंतरच मला समजलं की, संगीत ही केवळ कला नाही, तर ती एक सर्वोच्च साधना आहे. देवी केवळ गुरू नव्हत्या, तर त्या संगीताचे चालते-बोलते मंदीर होत्या.

एक संगीत समीक्षक म्हणतात, 

“पं. रवी शंकर हे जगासाठी चमकणारा सूर्य असतील तर, अन्नपूर्णा देवी रात्री च्या शांततेत प्रकाश देणारा शीतल, दैवी चंद्र होत्या*!!

अन्नपूर्णा देवींचे संगीत अंतर्मुख करणारे होते. त्यांच्या सुरांमध्ये अशी जादू होती जी मानवी बुद्धी च्या पलीकडची होती. त्यांचे सूर बहार वादन ऐकणे म्हणजे प्रत्यक्ष सरस्वतीचे दर्शन घेणे!!

सतारवादनातही वेगवान तानांवर जबरदस्त पकड होती देवींची! पण या तंत्राचा वापर त्यांनी कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी न करता, संगीतातील भाव आणि सौंदर्य वाढवण्यासाठी केला. आणि हेच आपलं वादन वैशिष्ट्य त्यांनी गुरू म्हणून सांगितले आणि शिष्यांना सखोल ज्ञान दिले.

असं म्हणतात की, ऋषिकेश मुखर्जींनी त्यांच्या अभिमान या चित्रपटाची प्रेरणा अन्नपूर्णा देवींच्या वादळी, काहीशा गूढ आणि त्यागमय आयुष्यातून घेतली.

प्रसिद्धी ची यत्किंचितही हाव नसलेल्या, प्रसिद्धीपरान्मुख अशा या तेवत्या समिधेच्या साहित्य साधनेतील समर्पणाची दखल भारत सरकारने मात्र घेतली आणि त्यांच्या प्रतिभेचा योग्य तो सन्मान करून… पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, देशिकोत्तम (मानद डॉक्टरेट) ही पदवी प्रदान केली हे मात्र नोंद घेण्याजोगे!!

अशा या… सहा दशकाहून अधिक काळ प्रसिद्धी च्या झगमगाटापासून दूर राहून संगीत साधना करत… समर्पित होत जाणा-या विदुषीने १३ ऑक्टोबर २०१८ रोजी ९१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. एक समिधा समर्पित झाली…  सूर बहार चे सूर शांत झाले, बहर संपला आणि संगीत जगतात एक निरव, नि:शब्द शांतता पसरली… एक समिधा निमाली!! *

– लेख क्र. १५.

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारताच्या ‘विस्मृत’ वीरांना मान्यता! – लेखिका : मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.) ☆ प्रस्तुती : गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

भारताच्या ‘विस्मृत’ वीरांना मान्यता! – लेखिका : मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.) ☆ प्रस्तुती : गौरी गाडेकर

भारताच्या ‘विस्मृत’ वीरांना मान्यता!  – – पहिले महायुद्ध

मागच्याच आठवड्यात बातमी आली की पहिल्या महायुद्धात लढणाऱ्या ब्रिटिश इंडियन आर्मीमधल्या ९,९०९ सैनिकांच्या बलिदानाला पुराव्यानिशी मान्यता देण्यात आली… भारतीय सैनिकांनी रक्ताने दिलेल्या बलिदानाला एका शतकानंतर शाईच्या काही थेंबांनी दिलेला हा न्याय समजायचा का? इतिहासाच्या पानांमधून या सैनिकांचं अस्तित्त्वच पुसून टाकणाऱ्या एका अन्यायकारक धोरणाबद्दल कबुली देत Commonwealth War Graves Commission(CWGC)ने या भारतीय हुतात्म्यांची नांवं त्यांच्या डेटाबेसमध्ये नुकतीच समाविष्ट केली. अथक संशोधनाच्या अंती घडवून आलेली ऐतिहासिक कागदपत्रांमधली ही सुधारणा दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात मोठी दुरुस्ती मानली जात आहे. नेमकं कोणतं धोरण कारणीभूत होतं या विस्मृतीला?

‘The great War’- भारताचं योगदान – 

‘…the war to end all wars’ असं व्यापक (!) उद्दिष्ट ठेऊन जुलै १९१४ मध्ये सुरू झालेलं महायुद्ध चांगलंच पेटलं. ब्रिटिशांनी भारताचा सहभाग गृहीत धरून इंडियन आर्मी मधलं सैन्य तिथे पाचारण केलं. या महायुद्धात ब्रिटिशांसाठी अखंड भारतातून (आजचा भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश) सुमारे १४ लाख सैनिक लढले होते. यापैकी एकट्या पंजाब प्रांतातून ५ लाख सैनिक भरती झाले होते. घोडदळ, पायदळ, तोफखाना अशा कितीतरी गोष्टींचा यात समावेश होता. या सैन्यात कोवळ्या वयातल्या म्हणजे अगदी १० वर्षे वयाच्या मुलाचाही समावेश असल्याचे पुरावे आहेत!

सुरुवातीला सैन्यभरती आणि प्रशिक्षण यात ब्रिटिश गुंतलेले असतांना, जर्मन सैन्याचं मोठं आक्रमण भारतीयांनी थोपवलं.

फ्रान्स, गॅलीपोली(तुर्कस्थान), बेल्जियम, इजिप्त, पॅलेस्टाईन, पूर्व आफ्रिका… किती ठिकाणी भारतीय सैन्य आत्यंतिक शौर्याने लढलं! युरोपमधल्या जीवघेण्या, भीषण खंदकांनी किती भारतीयांचे जीव घेतले! अपरिचित युद्धभूमी, त्रस्त करणारं थंड हवामान, चालून येणारा क्रूर शत्रू, अपुरी साधनं, प्राण कंठाशी आणणारी लांबच लांब पायपीट, उपासमार, साथीचे रोग… कशाकशाशी लढले भारतीय? आणि कशासाठी? तिथे जिवाची बाजी लावण्यासाठी भाग पाडणारी, स्वतःला ‘सैनिक’ म्हणवून घेत लढण्यासाठी उद्युक्त करणारी कोणती प्रेरणा होती? स्वातंत्र्याची? मुळीच नाही!

ब्रिटिश इंडियन आर्मीमधल्या ७४,१८७ एवढ्या सैनिकांनी युद्धभूमीवर आपला जीव गमावला असा औपचारिक आकडा आहे, तेवढेच गंभीर जखमीही झाले. १. ७ लाख प्राणी (उंट आणि खेचर यांच्यासह मुख्यतः उमदे घोडे), ३. ७ लाख टन एवढा अन्नधान्याचा पुरवठा, १३० करोंड जुट सॅंडबॅग्स (खंदकांमद्धे वापरतात तशा), सुती कपडा, शस्त्रास्त्रं, रणगाडे… आणि मुख्य म्हणजे भारतीय संस्थानांचा तसंच लादलेल्या करांच्या द्वारे लुटलेला प्रचंड पैसा… ही वाढत जाणारी यादी डोळे विस्फरणारी आहे! भारताच्या सहभागाशिवाय स्वतःच्या जिवावर जर्मनीला आव्हान देण्याची, वाढत गेलेलं हे युद्ध लढण्याची ब्रिटनची तयारी होती का? याचं उत्तर मिळतं. त्यामुळे काहीही संबंध नसतांना, स्व-बांधवांवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या ब्रिटिशांसाठी इंडियन आर्मीमधलं हे सैन्य प्राणपणाने लढत होतं.. गुलाम म्हणून!

अन्यायकारक वागणूक

वर्षानुवर्षे ब्रिटिश सैनिक आणि भारतीय सैनिक यांच्यात पगार,रहाण्याच्या सोयी, नोकरीचे नियम,इतर सवलती अशा बहुतांश बाबतीत उघड उघड भेदभाव होताच. मानवतेला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना या युद्धादरम्यान देखील घडल्या. जखमी झालेल्या तसंच winter kit न पोहोचल्यामुळे आजारी पडलेल्या,साथीच्या रोगाने पिडलेल्या भारतीय जवानांना ब्रिटिश परिचरिकांकडे उपचार करवून घेण्यास बंदी होती. उपचारांविना त्यात कित्येकजण गेले. घोंघावणाऱ्या मृत्यूला समोर बघत अनेकांनी घरी (शेवटची) पत्रं लिहिली पण ती तपासली (सेन्सॉर) केली जात असत. कारण युद्धाविषयी कोणतीही माहिती पत्रात लिहिण्याची सक्त मनाई होती. दिशाहीन युद्धनीती आणि अपुऱ्या साधनांमुळेही हजारो सैनिक बळी गेले.

बलिदान नाकारण्यासाठी नवा निकष 

पहिलं महायुद्ध संपल्यानंतर ब्रिटिश सरकारने भारतीय सैनिकांसाठी एक अन्यायकारक निकष लावला: “जे सैनिक थेट युद्धभूमीवर लढतांना मृत्युमुखी न पडता, तिथल्या जखमांमुळे किंवा आजारपणामुळे (operational zones च्या) बाहेर मृत्यू पावले, त्यांना ‘युद्ध शहीद’ (war dead) मानलं जाणार नाही. ” या निकषामुळे हजारो सैनिकांची नांवं हुतात्म्यांच्या यादीत लिहून पुढे मुख्यालयात पाठवण्यात आलीच नाहीत. ब्रिटिश साम्राज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता मानायची सोडा पण दोन ओळींची तार करून त्यांच्या मृत्यूची बातमी घरी कळवण्याची तसदीही ब्रिटिशांनी घेतली नाही ही केवढी टोकाची कृतघ्नता! या एका तांत्रिक नियमामुळे कित्येक वीर सैनिकांचा त्याग इतिहासातून बेदखल झाला. केवळ ‘बेपत्ता’ सैनिक एवढीच त्यांची ओळख मागे राहिली!  

 कुणाचा मुलगा,कुणाचा भाऊ,पती… अनेकजण घरी कधीच परतरले नाहीत! आज काही बातमी कळेल, उद्या कळेल… ते जिवंत आहेत की धारातीर्थी पडले? की शत्रूने डांबून ठेवले? एक पिढी… दुसरी पिढी… वाट बघता बघता कितीतरी डोळे कायमचे मिटले! अनाथ मुलं गरिबीत पिचत राहिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या सैनिकांविषयी काहाही कळलं नाही… गावांगावांमधलं ते औदासिन्य कधीच सरलं नाही आ णि दुर्दैव म्हणजे भारतीय वीरांची हजारो नावं इतिहासाच्या पानातून पुसली गेली!

युद्धानंतर… वचनभंग!

युद्ध संपल्यावर आम्ही ‘अर्ध स्वातंत्र्य’ (dominion status) देऊ असं भारतीय नेत्यांना कबूल करून ते सपशेल नाकारत इंग्रजांनी महायुद्धानंतर भारताला कृतज्ञतेपोटी काय दिलं? तर अत्यंत जाचक असा Rowlatt Act, १९१९ साली पारित करण्यात आला. याअंतर्गत बंडखोरीचं कारण दाखवत कोणालाही वॉरंटशिवाय अटक करता येत होती, नेत्यांना ट्रायल न घेताच तुरुंगात डांबता येत होतं… बरंच काही भयंकर घडत होतं! .. आणि जे सैनिक प्राणपणाने लढले त्याच पंजाबच्या पवित्र भूमीवर अत्यंत निर्घृण पद्धतीने एप्रिल १९१९ मध्ये जनरल डायरने घडवून आणलेलं रक्तरंजित जलियनवाला हत्याकांड! होय.. हेच फलित होतं महायुद्धात ब्रिटिशांच्या बाजूने लढणाऱ्या हजारो जिवांच्या समर्पणाचं…!  

‘पंजाब रजिस्टर्स’ प्रकल्प आणि पुढील संशोधन प्रक्रिया 

Commonwealth War Graves Commission (CWGC), Uk Punjab Heritage Association (UKPHA) आणि ग्रीनविच विद्यापीठ यांच्या संयुक्त प्रयत्नांनी २०२१ साली ‘पंजाब रजिस्टर्स’ हा प्रकल्प आकाराला आला. पुढे पाच वर्षे अथक मेहनत मोठं संशोधन केलं गेलं. लाहोरमधल्या संग्रहालयात जतन केलेल्या युद्धविषयक हस्तलिखितांचा अभ्यास आणि त्याची संगणकात नोंदणी केली गेली. या कागदपत्रांमध्ये पंजाबमधील सुमारे ३,२०,००० सैनिकांची नावं आणि त्यांच्या सेवेचा सविस्तर तपशील नोंदवलेला आहे. तिथे मिळालेली मुख्य यादी पडताळून ९,९०९ सैनिकांची नावं इतर पुराव्यानिशी हुतात्मा यादीत समाविष्ट करण्यात आली. ब्रिटीश साम्राज्यासाठी लढलेल्या हजारो भारतीय सैनिकांच्या बलिदानाची काही थेंबांच्या शाईने का होईना पण अखेरीस नोंद झाली आणि अंशतः त्यांची गौरवगाथा, समर्पण जगासमोर आलं.  

कौटुंबिक वारसा आणि अस्तित्त्वासाठी संघर्ष 

लेस्टरमधील (Uk) दंतवैद्य डॉ. सनी पलाही यांच्यासारख्या हजारो लोकांसाठी त्यांचे पूर्वज शोधण्याचा हा भावनिक प्रवास आहे. त्यांचे पणजोबा केसर सिंग युद्धात शहीद झाले, पण त्यांची कुठेही नोंद नव्हती. केवळ बेपत्ता एवढीच माहिती. आता अधिकृत नोंद झाल्यामुळे, “माझा पूर्वज अत्यंतिक शौर्याने लढला” हा अभिमान पुराव्यासह त्यांच्या पुढच्या पिढीला मिळेल. असे अनेक जण या प्रकल्पाशी भावनिक धाग्याने जोडले गेले आहेत.  

भारतीय शौर्याचा अविभाज्य भाग आणि अखंड भारताचा वारसा

अनेक दशके पहिल्या महायुद्धाचा इतिहास केवळ युरोपीय दृष्टिकोनातून पाहिला गेला. भारतीय सैनिकांना केवळ ‘भाडोत्री’ मानले जात होते. पण हे संशोधन सिद्ध करतं की, हे युद्ध केवळ फ्रान्स किंवा बेल्जियमच्या रणक्षेत्रात नव्हे, तर पंजाबच्या खेड्यापाड्यातही लढलं गेलं. या सैनिकांचा त्याग हा भारतीय शौर्याचा एक अविभाज्य भाग आहे.

लाहोर संग्रहालयात जपून ठेवलेली जुनी कागदपत्रं म्हणजे भारत-पाकिस्तानच्या फाळणीपूर्वीचा, दोन्ही देशांना जोडणाऱ्या एका सामायिक इतिहासाचा पुरावा आहे. याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.

सीडब्ल्यूजीसी (CWGC) च्या महासंचालिका क्लेअर हॉ्र्टन (Claire Horton) यांनी सांगितलं की “पहिले महायुद्ध संपून एक शतकाहून अधिक काळ लोटला असला तरी आमचं शोध अभियान अजून सुरूच आहे. राष्ट्रकुल (Commonwealth) देशांच्या सेवेत बलिदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला योग्य तो सन्मान आणि आदर मिळावा यासाठी हे प्रयत्न आहेत. ‘पंजाब रजिस्टर्स’ प्रकल्प हा या मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या ९,९०९ नावांच्या शोधामुळे जगाच्या इतिहासातील गहाळ झालेली पाने पुन्हा भरून येण्यास मदत होत आहे. हे एक अजरामर स्मरणपत्रं आहे, ही केवळ त्यांना श्रद्धांजली नसून तो एक प्रकारे त्यांचा कौटुंबिक वारसाही आहे. युद्धासाठी दिली गेलेली ही मोठी किंमत आहे. ” 

हा दृष्टिकोन ठेऊन इतिहासातली मोठी त्रुटी भरून काढण्याचा हा प्रयत्न स्वागतार्ह आहे. संशोधनासाठी घेतली गेलेली अथक मेहनत स्तुत्य आहे. मात्र याला न्याय म्हणता येईल का याविषयी शंका आहे. हा रक्तरंजित इतिहास पुसून टाकता येणार नाही.  

स्वातंत्र्यानंतर प्रचंड मोठं अंतर कापत आज विश्वबंधुत्त्वाच्या तत्त्वावर सर्वांशी भारत मैत्रीपूर्ण व्यवहार करत असला तरी हा शोषणाचा इतिहास दोन्ही देशांच्या पुढच्या पिढ्यांना तसंच जगभरात पुढे सांगितला जाणार! ते ऐकून त्यांच्या मनांत काय भावना असतील, माहित नाही. मात्र दुसऱ्यांना गुलाम करून वर्षानुवर्षे त्यांचं शोषण करणाऱ्या देशांच्या यादीत ‘माझ्या राष्ट्राचं – भारताचं’ नांव नाही याचा आपल्याला आणि येणाऱ्या पिढ्यांनाही सदैव अभिमान वाटेल, याची खात्री आहे!

मा. अटलजींच्या ओळी किती समर्पक आहेत – 

“होकर स्वतंत्र मैंने कब चाहा है कर लूं मैं सबको गुलाम

 मैंने तो सदा सिखाया है करना अपने मन को गुलाम |

मैं तेज:पुंज तमलीन जगत में फैलाया मैंने प्रकाश |

जगती का रच कर विनाश, कब चाहा है निज का विकास?

शरणागत की रक्षा की है, मैंने अपना जीवन दे कर|

विश्वास नहीं यदि नहीं आता तो साक्षी है इतिहास अमर |”

जय हिंद!

 –

लेखिका : मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी (नि.)

प्रस्तुती : गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक  संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares