मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५७ आणि ५८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५७ आणि ५८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ५७ – – 

जगीं होइजे धन्य या रामनामे ।

क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमे ॥

उदासीनता तत्त्वता सार आहे ।

सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥ ५७ ॥

अर्थ :  भक्ताने सतत रामनाम घेऊन या जगात धन्य व्हावे. नुसते नामस्मरण करण्यापेक्षा क्रिया म्हणजे कृतीने, भक्तीने सातत्याने उपासना करावी. मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका न येऊ देता, उदासीनपणे (म्हणजे आजूबाजूच्या घटनांचा मनावर परिणाम न होऊ देता) मोकळ्या मनाने रामनामाची उपासना करावी आणि या जगात भक्त म्हणून धन्य व्हावे.

विवेचन : या आधीच्या दहा श्लोकांमध्ये समर्थांनी आदर्श भक्त कसा असावा, त्याची लक्षणे सांगितली आणि त्यावरून साधकांना देखील आपण कसे असावे याचा बोध होतो. पण त्या मार्गाने जायचे कसे किंवा त्यासाठी काय करायचे याचा उपाय ते या श्लोकात आपल्याला सांगत आहेत.

आधीचे श्लोक वाचून जर आपल्याला समर्थ म्हणतात त्याप्रमाणे सर्वोत्तम भक्त व्हावेसे वाटले तर समर्थांचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल. परंतु असे भक्त होण्यासाठी संस्कारांची आणि प्रयत्नांची गरज असते. लहानपणापासूनच संस्काराचे महत्त्व असते. ओल्या मातीला आकार देणे सोपे असते. म्हणून मुलांना चांगल्या गोष्टी सांगणे आणि प्रत्यक्ष आपल्या वागणुकीतून त्यांच्यासमोर चांगल्या वागण्याचा आदर्श ठेवणे या गोष्टी संस्कारात येतात.

त्याचप्रमाणे समर्थांनी सांगितलेला भक्त होण्यासाठी देखील संस्काराची मनाला गरज असते. आपले मन सतत विषयाकडे ओढ घेत असते. त्यामुळे मनाला जाणीवपूर्वक भगवंताचे स्मरण, त्याची उपासना करण्याची सवय लावून घ्यावी लागते. हे एक प्रकारचे संस्कारच असतात. गोंदवलेकर महाराज म्हणतात सामान्य माणसाला देवात सुद्धा विषय दिसतात. परंतु संतांना विषयात सुद्धा देव दिसतो.

संतांजवळ प्रत्येक गोष्टीत देव पाहण्याची जी दृष्टी असते, ती विकसित व्हावी लागते आणि ती संस्कारानेच विकसित होते. म्हणून नामस्मरण, त्यासोबतच कृती आणि उपासना यांच्या माध्यमातून परमेश्वराचे ध्यान करावे. भोवतालच्या परिस्थितीमुळे मनात नाना प्रकारचे विकल्प किंवा शंका येतात. खरा भक्त अशा कोणत्याच गोष्टीकडे लक्ष न देता मनापासून भगवंताची उपासना करतो. म्हणूनच त्याच्यावर उपासनेत मोकळेपणा असतो.

भक्ताने उदासीन असावे असे समर्थ जे म्हणतात त्याचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. उदासीन हा शब्द इंद्रियांच्या बाबतीत वापरला गेला आहे. म्हणजे आपले मन जे सतत विषयांकडे ओढ घेते ती आवरणे, आणि विषयांच्या बाबतीत विरक्त राहणे म्हणजेच उदासीन राहणे होय. थोडक्यात म्हणजे विषयांच्या बाबतीत आपली वृत्ती उदासीन असली पाहिजे. भोवतालच्या परिस्थितीबद्दल नाही. आपण प्रापंचिक माणसे आहोत म्हणून आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटना मग त्या अनुकूल किंवा प्रतिकूल असो, त्या संबंधात आपल्याला त्यांची योग्य ती दखल घेऊन वागावे लागेल. आपले जे कर्तव्य आहे त्याबाबत सजग राहावे लागेल. म्हणजेच त्या बाबतीतली उदासीनता कामाची नाही. आपल्याला प्रपंचात राहून परमार्थ साधायचा आहे. तेव्हा जी उदासीनता आहे ती विकारांबद्दल असावी. अशा प्रकारची सवय एकदा आपल्या मनाला लागली की मग भगवंताची मोकळेपणाने आपण उपासना करू शकू.

आपल्यासारख्या सामान्य माणूस अनेक गोष्टींना आणि विषयांना मनाने बांधला गेलेला असतो आपण जोपर्यंत ही बंधने तोडत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने भगवंताचे होऊ शकत नाही किंवा त्याच्याजवळ जाऊ शकत नाही. मनाने प्रपंचाचा संग टाकावा आणि भगवंताचा संग जोडावा. मग खरोखरच भगवंताचे धन्य भक्त होण्यासाठी आपण पात्र होऊ.

स्वसंवाद :: 

१) माझी उपासना “नित्यनेमाने” होते का? मी सुखात किंवा दुःखात असताना सुद्धा?

२) “सामान्य माणसाला देवात विषय दिसतो” माझ्या उपासनेत माझे खरोखर देवाकडे लक्ष असते का की मनात इतर विचारच जास्त असतात?

३) विकारांबद्दल उदासीन आणि कर्तव्याबद्दल सजग या दोन्ही गोष्टींचा समतोल माझ्या जीवनात आहे का?

– – – – 

श्लोक क्र. ५८ – – – 

नको वासना वीषई वृत्तिरुपें।

पदार्थी जडे कामना पूर्वपापें |

सदा राम निष्काम चिंतीत जावा।

मना कल्पनालेश तोहि नसावा॥५८॥

अर्थ :  हे मना, भौतिक विषयांमध्ये वृत्तीरूपाने वासनांमध्ये अडकू नकोस. पूर्व पापांमुळेच आपले मन विषय वासनांमध्ये अडकते. म्हणून भगवंताचे नेहमी निष्काम भावाने चिंतन कर आणि मनामध्ये कल्पनेचा लवलेशही ठेवू नकोस.

(पदार्थी- दृश्य/बाह्य विषयांमध्ये, निष्काम- कोणतीही इच्छा न ठेवता, कल्पना-सुखाच्या गोष्टींचे मनोरे रचणे, लेश- मागमूस)

विवेचन :  ५७ ते ६० या श्लोकांमध्ये समर्थ आपल्याला विषयवासनेचा त्याग करण्याबद्दल सांगत आहेत. वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागतो हे आपण मागील श्लोकांमध्ये पाहिले आहे. या श्लोकात म्हणूनच समर्थ आपल्याला सांगतात की विषयांमध्ये वृत्ती रूपाने आपली वासना अडकता कामा नये. या दृश्य किंवा भौतिक जगात आपण ज्या ज्या गोष्टी पाहतो, त्यामध्ये आपले मन अडकते. ही सवय पूर्वपापामुळे लागते असे समर्थ सांगतात. हे पूर्वपाप म्हणजे पूर्व संचित संस्कार असे म्हणता येईल. हे संस्कार किंवा वृत्ती केवळ एका जन्माची नसून अनेक जन्मांची असते. त्यातूनच असे वागण्याची बुद्धी होते. यावर उपाय म्हणून निष्कामपणे रामाचे चिंतन करावे आणि विषयवासनांची कल्पना देखील मनामध्ये अजिबात उरू देता कामा नये.

वस् धातूपासून वासना हा शब्द आला आहे. वस् म्हणजे राहणे किंवा स्थिर होणे. आपले मन सतत इंद्रियांमध्ये म्हणजेच विषयांमध्ये राहते आणि सवयीने ते तेथेच स्थिर होते. म्हणून त्याला आपण वासना असे नाव देतो. स्पर्श, शब्द, रूप, रस आणि गंध यांच्या सहाय्याने इंद्रियां मार्फत आपण विषय सेवन करीत असतो. थोडक्यात वासना म्हणजे हवेपण! आपल्याला जोपर्यंत हे हवे, ते हवे असे वाटत असते तोपर्यंत आपली चित्त त्या त्या विषयांमध्ये गुंतलेले असते.

वृत्ती, कामना आणि वासना असा प्रवास आपण बाह्य जगतातील वस्तूंसाठी करीत असतो. आपले मन अतिशय चंचल आहे. या मनावर वारंवार वेगवेगळ्या विषयांचे तरंग उठतात. असे अनेक तरंग जेव्हा तयार होतात, तेव्हा त्यातून त्या विषयाबद्दलची कामना म्हणजेच इच्छा निर्माण होते. ही कामना जेव्हा तीव्र होते तेव्हा तिचे रूपांतर वासनेमध्ये होते. हा वृत्ती, कामना आणि वासनेपर्यंतचा प्रवास माणसाला त्यातून बाहेर पडू देत नाही आणि शेवटी अध:पतनाकडे घेऊन जातो.

माणूस एकदा वासनेच्या अधीन झाला की त्याला दुसरे काही सुचत नाही. तो त्या सवयीचा गुलाम होतो आणि वेगवेगळ्या प्रकारे त्या गोष्टीचे समर्थन करू लागतो. धूम्रपान किंवा मद्यपान करणारे त्या गोष्टींचे समर्थन करीत असतात असे आपण अनेकदा पाहतो. म्हणजे त्यांना त्यात आपण काही वावगे करीत आहोत असे वाटतच नाही. राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’ या नाटकात सुधाकर दारूच्या सवयीचा गुलाम होतो आणि त्यात त्याला काही वाटेनासे होते. परंतु नंतर ही दारू त्याच्या संसाराची धूळधाण करते. प्रख्यात गायक दीनानाथ मंगेशकर यांना देखील मदिरेचे व्यसन लागले होते आणि अति व्यसनामुळे त्यांचे अकाली निधन झाले. मुले लहान असताना संसार उघड्यावर टाकून निघून जावे लागले.

माणूस वृद्ध झाला, इंद्रिये थकली तरी देखील माणूस त्यातून बाहेर पडत नाही. शेवटपर्यंत विषय वासना त्याला त्रास देतच असतात. एखादी गोष्ट प्रत्यक्षात मिळाली नाही की मग तो कल्पनेच्या राज्यात रमतो, कल्पनेचे मनोरथ करू लागतो. आजच्या काळात तर टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया या सगळ्या आभासी गोष्टी कल्पनेच्या राज्यात माणसाला गुंतवून ठेवतात.

मग या सर्व गोष्टीतून सुटका करून घेण्याचा काही उपाय आहे का? निश्चितच आहे! समर्थ म्हणतात, “आपण निष्कामपणे रामाची चिंतन करावे, त्याचे ध्यान, मनन, चिंतन, पूजा करावी. हे सर्व संस्कार आहेत. त्यातून हळूहळू वाईट विषयांची कामना कमी होत जाते, मनामध्ये सद्वासना निर्माण होतात आणि शेवटी निर्वासना अवस्था निर्माण होऊन साधक मोक्षापर्यंत पोहोचतो. असा त्याचा प्रवास वाईटाकडून चांगल्याकडे होऊ शकतो.

पण इथे समर्थ आपल्याला निष्काम भक्ती करायला सांगतात हे लक्षात घ्यायला हवे. आपण सामान्य माणसे परमेश्वराची भक्ती देखील काहीतरी हेतू किंवा इच्छा मनात धरून करीत असतो. त्यामुळे आपली वासना शेवटपर्यंत सुटत नाही. हे ईश्वरा, मला अन्य काही नको. फक्त तू हवा आहेस अशा प्रकारची आर्तता जेव्हा भक्तीत येईल, तेव्हा आपली वाटचाल मोक्षमार्गाकडे व्हायला सुरुवात होईल.

या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचा अरे अरे ज्ञाना झालासी पावन हा अभंग आठवतो. त्यात ते म्हणतात,

वृत्तीची निवृत्ती आपणा सकट |अवघेची वैकुंठ चतुर्भुज ||

जेव्हा साधकाची आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती होऊ लागते, तेव्हा त्याच्या वृत्तीची निवृत्ती होऊ लागते. ती देखील कशी? तर आपणा सकट म्हणजे त्याचा मी पणा, अहंकार सगळे काही नष्ट होते आणि संपूर्ण वैकुंठच त्याला विष्णूरूप दिसू लागते. कामना, वासना सर्वच गोष्टी नाहीशा होतात. कल्पनेचा लवलेश देखील राहत नाही आणि मग आपोआपच जन्ममृत्यूच्या चक्रातून देखील त्याची सुटका होते.

स्वसंवाद ::

१) माझ्या मनात वारंवार येणाऱ्या कोणत्या इच्छा हळूहळू वासनांमध्ये रूपांतरित होत आहेत?

२) “मला हे हवेच आहे” असे वाटते तेव्हा मी त्यामागचा विचार करतो का?

३) मी एखादी गोष्ट मिळाली नाही तर अस्वस्थ होतो का, की शांत राहू शकतो?

४) माझ्या आयुष्यात कल्पनाविलास (दिवास्वप्ने / आभासी जग) किती प्रमाणात आहे?

५) मी दररोज किमान काही वेळ निष्काम भावाने नामस्मरण किंवा चिंतन करतो का?

– क्रमशः श्लोक ५७ आणि ५८.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १० – पेशव्यांच्या इतिहासात हरवलेली स्त्री:— सगुणाबाई ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. १०. – पेशव्यांच्या इतिहासात हरवलेली स्त्री:— सगुणाबाई ☆ प्रा.भारती जोगी ☆

पेशव्यांच्या इतिहासात हरवलेली स्त्री:— सगुणाबाई

“मी सगुणाबाई! नाही ना ओळख लागंत? नाव ही नाही आठवंत ना? बरोबरंच आहे ना… इतिहासाच्या कुठल्या पानात गडप झाले, जमा झाले, हरवले कुणास ठाऊक!

आता मीच देते ओळख करून…

मी… सगुणाबाई! थोरल्या बाजीरावांची धाकटी सून… जनार्दन रावांची पत्नी. सुंदर, गोरीपान आणि विशेष म्हणजे… शिकलेली!

सातारच्या भिडे सावकारांची मी कन्या, वयाच्या ५व्या वर्षी १० वर्षाच्या जनार्दन रावांची पत्नी बनून पेशव्यांच्या घरात आले. आणि जाणवले की बाई गं, मला तर इथे अनेक एकाहून एक अशा मातब्बर सासू आणि जावांमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचयं!

गंमत वाटली ना, अस्तिवाचं टिकवणं तेव्हाही होतं… हे वाचून! पण खरंयं ते!

पण हाय रे दैवा! अस्तित्व टिकवून ठेवीन म्हणंत असतांनाच… अचानक कर्नाटक च्या मोहिमे वरून परततांना जनार्दन रावांना टायफॉइड झाला, आणि मी १०व्या वर्षीच विधवा झाले हो! *बालविधवा* हा शिक्का कपाळावर, आणि लाल आळवण अंगावर! सौभाग्य म्हणजे काय? हे देखील कळले नव्हते, आणि बालविधवा म्हणजे काय? हे तरी कुठे माहिती होतं??

तुम्हाला सांगते… सासर-माहेर दोन्हींची श्रीमंती… पण… सौभाग्याची श्रीमंती हिरावून नेली ना नियतीने! नव-याचा केवळ १४ व्या वर्षी मृत्यू… त्यामुळे एकही पराक्रम नावावर नाही… त्यामुळे मी अभिमानाने मिरवावं असं कुठलंही पद, प्रतिष्ठा किंवा सत्ता ही नाही. जगायला कुठलं कारण ही नाही. मग काय… मरेपर्यंत जगावं लागणार, म्हणून मग विरक्ती ची वाट धरली, बालवयातच! हो! कारण… बालविधवा म्हणजे… *समिधा*!! मूक, मौन, शांत जळंत राहणा-या! त्यांत कुठला आलायं ना ओलावा?

पण एक आधार मिळाला, वेळ घालवायला… *ग्रंथवाचन*! वेगवेगळ्या ठिकाणाहून ग्रंथ मागविले,

दुर्मिळ ग्रंथ संग्रह केला. भरपूर वाचन केले. पोथी-पुराणे ही वाचली. तीर्थक्षेत्री च्या तीर्थ यात्रा ही केल्या.

तुम्हाला एक गंमत सांगते… इतिहासाने माझी नोंद नाही घेतली, पण माझ्या दुर्मिळ ग्रंथ संग्रहाची मात्र नोंद आहे… कदाचित… अ क्षर असा अ क्षय साठा… म्हणून तरला की काय??

असंच वैराग्य युक्त, वैराण आयुष्य आणि वय सरंत होतं… वर्षा-वर्षानी पुढं-पुढं!! कुटुंबातील अनेक मृत्यू या डोळ्यांनी बघितले, पचवले… मायाळू सासू काशीबाई, पित्यासमान नानासाहेब, भावासमान सदाशिव राव, नारायण राव… एक ना अनेक!

पण तुम्हाला सांगते… माधवराव आणि रमाबाईंचं आकस्मिक जाणं… नाही पेलवलं गेलं हो! हा चटका नाही साहता आला. मग खूपच एकटेपण आलं… प्रकृती बिघडली… खालावतच गेली… आणि साता-याजवळ वडूज गावी, वाड्यात… कायमची विसावले मी!

आणि… आणि… पेशवाईतील…

*पहिली बालविधवा*… इतिहास जमा झाली… एक समिधा निमाली!!

– लेख क्र. १० .

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वंगण : मनाचे, स्वभावाचे” – लेखिका : विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर☆

उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “वंगण : मनाचे, स्वभावाचे” – लेखिका : विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर

सकाळच्या गडबडीत नेमकी ट्रॉली बाहेर ओढताना अडकली… धड ना आत, धड ना बाहेर… वैतागच… नेमके चहा साखरेचे डबे आत अडकले…! आतल्याआत चडफड नुसती… आता सुतार बोलवावा लागणार… एवढ्याशा कामाकरता तो आढेवेढे घेणार… नाहीतर बजेट वाढवून या कशा मोडीत काढायला झाल्यात, याची गाथा वाचणार. आजकाल मॉड्यूलर किचन कसं जोरात चाललंय… माझी इकडे कामं आणि तिकडं कामं. सगळं क्षणात मनात आणि डोळ्यांसमोरुन तरळूनच गेलं.

जोर देऊन जरा ओढून बघितलं तर कड्कट् आवाज काढलाच तिने. लादी पुसायला आलेल्या मावशी म्हणाल्या, खोबरेल तेलाचं बोट फिरवा ताई.. कडेच्या पट्टीवर… सरकेल… तात्पुरते तरी निभावेल…! चांगली आयडिया… मी पट्कन तेलाचं बोट फिरवलं… दोन मिनिटांनी ट्रॉली मऊसरपणे आतबाहेर डोकावली… कसलं भारी काम झालं एकदम! मी एकदम आनंदाने तिला धन्यवाद देत म्हणलं, “बरं झालं बाई, वेळेत आलीस… नाहीतर… चहा पावडर विकत आणावी लागली असती. “ती हसली…

“वंगण लागतंय ताई, थेंबभरच पुरतं, पण लागतं कधीमधी आणि वेळेवर! ते मिळालं की सगळं सुरळीत होऊन जातं बघा क्षणात! “

खरंच, वंगण लागतं…!

फक्त मशीन, वस्तूंनाच नाही तर माणसालाही, अगदी त्याच्या देहाइतकंच मनालाही, अगदी नात्यांनाही वंगण अवश्यक आहे.

चार चांगल्या शब्दांचं, आश्वासक स्पर्शाचं, सदिच्छांचं, विचार वाचनाचं, सूरमैफिलींचं, श्रद्धा भक्तीचं, नजरेतल्या भावाचं, योगनिद्रेचं, कलाकल्पनेचं. जे मनाला मोडकळीस येण्यापासून वाचवतं. मरगळ येऊन कोरड्या ठक्क पडलेल्या वृत्तीवर हे वंगण पूर्ववत जगण्याकडे अलगद घेऊन जातं.

लहानपणी आजी सगळ्या नातवंडांना ओळीत बसवून चहाबरोबर एरंडेल पाजायची. प्यायचं म्हणजे प्यायचं… कितीही आदळापट केली तरी ती तिचा हेका सोडायची नाही. पोट आतड्याचं ते वंगणच आहे… महिना- दोन महिन्याने एकदा घेतलं की पोटाचं काम निर्धोक चालू राहतं… आणि तुम्ही मग आबरचबर हादडायला मोकळे… कानात तेल, नाकात दोन थेंब तूप, डोक्यावर बुदलीभर कोमट तेल… शनिवारी रात्रीचा हमखास वंगणाचा कार्यक्रम कित्येक वर्षे आमच्या पिढीने खरं तर अनुभवला. रात्री झोपल्यावर कधीतरी काशाच्या वाटीने तळपाय घासून द्यायची… शरीरातल्या उष्णतेवरचं तिचं ते वंगण होतं.

खरं तर जन्मापासून हे वंगण वेगवेगळ्या रूपात आपली सोबत करत राहतं… आपले शारीरिक, आर्थिक, मानसिक मार्ग निर्धोक करत राहतं, कारण स्निग्धता हा भाव ओतप्रोत या वंगणात भरलेला आहे.

जाईल तेथे मऊपण पेरणं, कोरडेपण- गंज मिटवणं आणि पूर्वस्थितीत आणून सोडणं.. हा (स्व)भावच आहे वंगणाचा!

क्षमा, सोडून देणं, माघार घेणं, प्रसंगानुरूप मदतीला जाणं, हळूवार फुंकर घालणं, स्वच्छ शुद्ध अंतःकरणाने समोरच्याशी शांतपणे बोलणं… हे ही नाती जपण्यासाठी लागणारं एक प्रकारचे वंगणच आहे.

वंगण नसतं तर जगात फक्त खडखडाटच ऐकू आला असता, असं मला नेहमी वाटतं… जीवनातले स्निग्धांश संपले तर फक्त कोरडेपण उरेल… आणि कोरडेपण क्षणात भस्मसात होऊन जातं! त्यामुळे जगण्यात येणारे हर एक प्रकारचे वंगण जपणे, प्रसंगी ते वापरणे फार आवश्यक आहे. निर्जीव मशीन सामुग्रीला जिथं त्याचं महत्त्व समजतं, तिथं तुमच्या आमच्यासारख्या जिवांनी ते जाणलंच पाहिजे.. त्याचं जतन केलंच पाहिजे… तर जगणं लयीत.. सुसह्य… होत राहील!

* * * *

लेखिका : विदुला जोगळेकर

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने…☆ श्री जगदीश काबरे ☆

मृतवत झालेल्या संस्कृत भाषेतील एका वाक्याचाही धड अर्थ न सांगता येणारे म्हणतात की संस्कृत भाषा ही राष्ट्रभाषा व्हावी. त्या दांभिकोत्तमांना पु ल देशपांडे यांनी इचलकरंजी येथील अखिल भारतीय सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलनात केलेल्या भाषणातून जे सणसणीत आणि खणखणीत उत्तर दिले आहे ते असे…

‘भाषेच्या बाबतीतसुद्धा काही संकेत ठरून गेले. तुकोबांची मराठी चेपली गेली आणि पंतकाव्याचा मराठी गद्य आणि पद्य अवतार मान्य झाला. सभ्यतेचं नातं आशयाशी न जुळता संस्कृतप्रचुर भाषेशी जुळलं! आजही आपल्या भारदस्तपणाची सांगड मराठीत आलेल्या संस्कृत शब्दांशीच घातली गेली आहे. खेड्यापाड्यातला नव्याने शिकलेला वर्ग तर उगीचच चांगले चांगले मराठी शब्द टाकून वर्तमानपत्रवाल्यांनी पुरवलेले संस्कृत शब्द वापरतो. आमचे पुढारी चुकलो, नेते सभेला ‘येत’ नाहीत, ‘उपस्थित’ राहतात. एके काळी इंग्रजी भाषेच्या दराऱ्यामुळे बायकोची मिसेस् झाली. तत्कालीन पांढरपेशा समाजात इंग्रजीला जे सामाजिक मोठेपण लाभलं ते आता पुन्हा नवशिक्षित बहुजन समाजातल्या प्रतिष्ठितांत संस्कृतप्रचुर मराठीला लाभायला लागलं आहे. संस्कृतवर माझा राग नाही. रेडिओवरून मी संस्कृतमधल्या बातम्या ऐकतो. इतका विनोदी कार्यक्रम मला लिहिता आला नसता. ‘डॉक्टर किसिंजरेण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्चे अभिभाषणम् कृतम्’ वगैरे ऐकताना इंग्रजी आणि संस्कृतचा हा व्रात्यस्तोम पद्धतीने लागलेला विवाह पाहून मीदेखील ‘अहो ब्यूटिफुलम् एतद्! ‘ असं म्हणतो. पण हे संस्कृतचं प्रकरण इतकं साधं नाही. तिच्यामागे कोठेतरी ही देववाणी आहे या कल्पनेशी जुळलेलं नातं आहे. उर्दूच्या आग्रहात मुसलमानांचा जसा धर्माभिमान दडला आहे, तसाच संस्कृतच्या मागे आमचा संस्कृतिविषयक कल्पनांचा अभिमान दडला आहे. ‘

‘कोठेतरी आपण ह्या भाषेचं अतिमानवी शक्तीशी नातं जुळवलं आहे. त्यातून आमचे राष्ट्रवादी पुढारी संस्कृतचे अभिमानी. आश्चर्य असं की, स्वतः लोकमान्य टिळक हे संस्कृतचे पंडित असून साध्या मराठीचे पुरस्कर्ते होते. मंडालेहून सुटून आल्यावर त्यांच्यावर संपादक मंडळापैकी कोणीतरी अग्रलेख लिहिला, त्याचा मथळा होता ‘लोकमान्यांची बंधमुक्तता’! लोकमान्यांनी त्याच्यावर काट मारली आणि लिहिलं, ‘टिळक सुटले’! पण असा एखादा अपवाद सोडला तर मराठी साहित्यातल्या संस्कृतच्या ह्या जन्मसिद्ध बडेजावामुळे पुन्हा एकदा जनसामान्यांची भाषा निराळी आणि मराठी साहित्याची भाषा निराळी व्हायला लागली. पुढे इंग्लिश हे मोठेपणाचं लक्षण झालं. आजही आमच्या नवसुशिक्षित श्रीमंत मराठी समाजात आपल्या पोराच्या सुंदर मराठीचं कौतुक करण्याऐवजी तो ‘ज्याक् अॅण्ड जिल्’ किती छान म्हणतो याचंच कौतुक अधिक होतं. फुल्यांची मराठी भाषा तथाकथित सुसंस्कृत समाजाच्या मताने वाचण्याच्याही योग्यतेची नव्हती! शेतकऱ्याच्या दारिद्रयाचं फुल्यांनी आपल्या ‘शेतकऱ्याचा असूड’ ह्या पुस्तकात काढलेलं शब्दचित्र केवळ भाषेच्या शैलीच्या दृष्टीनं पाहिलं तरी किती प्रभावी आहे! पण आमच्यापुढे आदर्श शैली होती चिपळूणकरांची. ‘

 

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘श्यामलतेची दिव्यता’ – भारतीय काव्यातील वर्णसौंदर्य ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘श्यामलतेची दिव्यता’ – भारतीय काव्यातील वर्णसौंदर्य ☆ श्री दिवाकर बुरसे

प्रस्तावना

भारतीय काव्यपरंपरेत काही रूपं अशी आहेत, की त्यांचं वर्णन करताना शब्दही शहारतात. कारण तिथे केवळ देह नसतो, तर देहापलीकडची कांती असते; केवळ रंग नसतो, तर अनुभूतींचं अथांग विश्व दडलेलं असतं.

“श्याम”, “श्यामल”, “मेघश्याम”, “नीलमेघवर्ण”, “हिरण्यवर्ण”, “स्वर्णमय”, “कर्पूरगौर” — हे शब्द त्वचेच्या रंगाचं वर्णन करणारे नाहीत; ते करुणा, माधुर्य, गूढता, शांती आणि दिव्य तेजाचे स्वर आहेत. म्हणूनच भारतीय कवींनी श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीलक्ष्मी किंवा श्रीमहादेव यांचं वर्णन करताना रंग नव्हे, तर आपल्या दर्शनानुभूती रंगवल्या.

राम : शांत निळाईचा करुणासागर

“नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गम्” ही ओळ उच्चारताच मनात एक गंभीर, दयार्द्र आणि प्रसन्न निळाई उतरते.

रामांचं श्यामल रूप म्हणजे स्थैर्याची कांती. त्यांच्या वर्णात आकर्षण आहे; पण त्याहून अधिक संयम आहे. मुखावर तेज आहे; पण नेत्रांत त्याहून अधिक करुणा आहे. जणू ऋषींच्या तपश्चर्येतून सांजवेळचं नील आकाश आकार घेत गेलं आणि त्यातून रामांचं रूप प्रकट झालं.

“रामं दूर्वादलश्यामम्… ” — दूर्वेच्या कोवळ्या हिरवट-निळसर छटेसारखी त्यांची कांती : शीतल, सौम्य आणि डोळ्यांना निववणारी.

“नीलमेघश्याम” ही उपमा सहज जन्मलेली नाही. मेघ गडद असतो, पण भयावह नसतो; तो जीवनदाता असतो. त्याच्या कुशीत वीज असते, पण वर्षावात शीतलता असते. रामांची श्यामलता अशीच — सामर्थ्य आणि सौम्यता यांचा अद्वैत संगम.

त्यांच्या वर्णात श्रावणसंध्येची गंभीर प्रसन्नता आहे. जसा दिवस मावळताना आकाश अधिक गहिरं, अधिक शांत आणि अधिक सुंदर होत जातं, तशी रामांची कांती मनात उतरते.

कृष्ण : पावरीत विरघळलेली श्यामलता

“मेघश्यामं पीतकौशेयवासम्… ” ही ओळ ऐकताच श्रीकृष्ण जणू यमुनेच्या तीरावर उभे राहतात.

कृष्णांची श्यामलता ही गूढतेची माधुरी आहे. त्यांच्या वर्णात चपलता आहे, संगीत आहे आणि अंतःकरणाला मोहून टाकणारं आकर्षण आहे. मोरपिसांनी अलंकृत ते सावळं रूप म्हणजे जणू श्रावणमेघांनी बासरीचा स्वर धारण केला आहे.

तो अंधार नाही; तो चंद्रप्रकाशाला अधिक सुंदर करणारा निळसर गहिरा पडदा आहे. त्यांच्या श्यामल कांतीवर मोरपीस अधिक खुलतं, पीतांबर अधिक उजळतो आणि बासरीचा स्वर अधिक विरघळतो.

जशी काळ्या नभामुळं तारकांची शोभा वाढते, तशी कृष्णांच्या श्यामलतेमुळं भक्ती अधिक उजळते. म्हणूनच संत तुकाराम सहज उद्गारतात :

“सावळे सुंदर रूप मनोहर… ”

या एका ओळीत भारतीय सौंदर्यदृष्टीचा आत्माच दडलेला आहे.

श्यामरंग : गूढ प्रकाशाची सावली

राम आणि कृष्ण यांचा श्यामल वर्ण सामान्य अनुवंशिक देहवर्णाच्या चौकटीत मावणारा नव्हता. “श्यामल” म्हणजे केवळ सावळेपणा नव्हे; ती सावळेपणातून झिरपणारी दिव्य कांती आहे.

भारतीय कवींनी रंगांना त्वचेच्या मर्यादेत बंदिस्त केलं नाही. त्यांनी रंगांत स्वभाव पाहिला, करुणा पाहिली, माधुर्य पाहिलं, तेज पाहिलं. म्हणून इथं श्यामवर्णही राजस आहे आणि सावळेपणातही दिव्यता आहे.

श्याम रंग म्हणजे अंधार नव्हे; तो प्रकाशाचा अधिक गूढ झालेला स्वर आहे. जसा रात्रीच्या नभात चंद्र अधिक सुंदर दिसतो, तशीच श्यामलतेच्या पार्श्वभूमीवर करुणा अधिक उजळते.

स्वर्णमयतेचे सूर्यस्पर्शी तेज

भारतीय वाङ्मयानं केवळ श्यामलतेलाच दिव्यता दिली नाही; त्यानं स्वर्णमय तेजालाही तितक्याच आदरानं गौरवलं.

वैदिक श्रीसूक्तात श्रीलक्ष्मीचं वर्णन “हिरण्यवर्णां”, “पद्मवर्णां”, “चन्द्रां प्रभासाम्” असं येतं. महाभारतात कर्णाचं, तर बौद्ध साहित्यात भगवान गौतम बुद्ध यांच्या वर्णाचं वर्णन “स्वर्णमय” असं आढळतं.

हे केवळ गोरेपण नव्हतं; ते वितळलेल्या सुवर्णासारखं तेजस्वी अस्तित्व होतं. त्वचेवर कमलदलासारखी कोमल गुलाबी छटा आणि व्यक्तिमत्त्वात सूर्यकिरणांची प्रभा होती. जणू पहाटेच्या बालरवीकिरणांनी मानवी रूप धारण केलं होतं.

भारतीय कवींनी व्यक्तिमत्त्वातील तेजाला रंगांची उपमा दिली — कुणी मेघश्याम झालं, कुणी हिरण्यवर्ण.

कर्पूरगौर शिव

श्रीराम आणि श्रीकृष्ण दोघेही श्यामवर्णी असले, तरी त्यांच्या वर्णात सूक्ष्म भेद आहे. रामांचा वर्ण निरभ्र आकाशासारखा शांत निळसर आहे; तर कृष्णांचा वर्ण वर्षाऋतूतील सजल मेघासारखा गडद नील.

महादेवांचा वर्ण मात्र याहून भिन्न आहे. कैलासनिवासी शिव “कर्पूरगौर” आहेत — हिमालयाच्या शुभ्रतेसारखे, “रजतगिरीसम” धवल आणि तेजस्वी.

त्यांच्या गौरवर्णात वैराग्याची शांतता आहे; जणू हिमशिखरांनीच मानवी रूप धारण केलं आहे.

काही रंग अनुभवावे लागतात

आज विज्ञान रंग मोजू शकतं, छटा ठरवू शकतं; पण “मेघश्याम” मोजू शकत नाही. कारण तो रंग त्वचेवर नव्हता — तो अनुभूतीत होता.

रामांचा श्याम वर्ण म्हणजे शांत प्रार्थना. कृष्णांची निळाई म्हणजे यमुनेवर तरंगणारी पावरी. श्रीलक्ष्मीची स्वर्णमय प्रभा म्हणजे समृद्धीचं मंगल तेज.

हे रंग चित्रांत रेखाटता येतात, शब्दांत मांडता येतात; पण पूर्णपणे उलगडता येत नाहीत. कारण काही रंग डोळ्यांनी दिसत नाहीत — ते अंतःकरणानं अनुभवावे लागतात.

आकाशाचा रंग हातात पकडता येत नाही; तो फक्त डोळ्यांत उतरतो. तशीच रामांची गंभीर श्यामलता, कृष्णांची मधुर निळाई आणि शिवांची कर्पूरगौर प्रभा भारतीय मनाच्या आकाशात आजही तरंगत आहे — श्रावणातील पहिल्या मेघासारखी… शांत, गूढ आणि चिरंतन.

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”वक्त ने आजमाया.. लेकिन…” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “वक्त ने आजमाया.. लेकिन...” ☆ संध्या बेडेकर ☆

वक्त ने आजमाया.. लेकिन.. हरा नहीं पाया ।” – – – 

काल भारत पाकिस्तानची T 20 World Cup मॅच बघत होते. अनेक चढ उतार मॅच मध्ये घडत होते, आणि त्याबरोबर प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चूकत होते. शेवटचा ओव्हर तर ‘full of activities ‘ होता. बहुतेक क्रिकेट मधील सर्व टर्म्स त्या ओव्हर मध्ये ‘commentators ‘ ना वापराव्या लागल्या.

त्या ओव्हर मध्ये काय नाही झालं.??

एक, दोन, तीन, चार, सिक्स रनस्, नो बॉल, फ्री हिट Wide Ball, stumps उडाले, दोन प्लेअर आउट होतात. कॅप्टन चे एंपायर बरोबर डिस्कशन वगैरे वगैरे. तो एक ओव्हर म्हणजे पूर्ण मॅच होता.

खेळ कसा प्रत्येक बॉलवर बदलू शकतो. ते समजे पर्यंत दुसरी घटना घडते. प्लेअर्स ची कमाल तर होतीच, बरोबर एंपायर्स ची पण परीक्षाच होती. एवढी कठीण परीक्षा त्यांनीही यापूर्वी कधी दिली नसेल बहुतेक. जणू काही सर्वांच्या डोक्यात Super computer fit असतात, तसे ते निर्णय देत होते.

खेळ कसा खेळावा याची अनेक उदाहरण प्रत्यक्षात बघायला मिळत होती.

म्हणजे पूढे एखादा कोच आपल्या शिष्याला कोचिंग देताना हा over नक्की दाखवेल असा हा over होता.

कोणाकोणाचे किती आणि कशा कशाचे कौतुक करावं हेच कळत नाही. हा over म्हणजे तासोंतास चर्चा करण्याचा विषय आहे.

विराटचे तर विराट कौतुक. त्याची बॉडी लॅंगवेज, aggressive approach, presence of mind, stamina, awareness, quick decisios. एवढ्या प्रेशर मध्ये असताना तो घेत होता. कुठेही give up, surrender ची बॉडी लॅंग्वेज नव्हती. ‘मी जिंकणारच ‘हाच भाव चेहऱ्यावर होता.

त्याला साथ देणारा हार्दिक चे योगदान पण तेवढेच. आश्विनचां एवढ्या प्रेशर मध्ये असताना wide ball समजून, सोडणे. खरंच खूप कौतुकास्पद. दोन बॉल खेळायला आलेल्या अश्विन चा वर्ल्ड क्लास दिसला. अनुभव कामी आला.

 

पूर्ण टीम वर्क. positive attitude, Never say die approach.

हारलेला मॅच जिंकला.

 

कुठे, कधी, किती, कसा, केंव्हा, काय?? समतोल साधावा?? हे कोणीही मॅच बघून शिकावं. आयुष्याचे सार सांगणारा असा हा over होता.

मला तर वाटतं मनातील मरगळ काढायला प्रत्येकाने हा मॅच मधून मधून नक्की बघावा.

एक लाखाच्या आसपास उपस्थित दर्शकांसमोर आपले concentration कायम ठेवणे. ध्येयाकडे वाटचाल करत असताना प्रत्येक बॉल वर होणारा प्रेक्षकांचा हल्ला तुम्हाला विचलित करत नाही, म्हणजे किती मानसिक शक्ती, टफनेस, विल पावर, आणि काय म्हणाव?? शब्द/ विशेषण कमी पडतायेत.

त्यानंतर मी कितीदा तरी हा मॅच बघीतला. प्रत्येक वेळी अनेक नवीन विचार मनात येत होते.

हाच का तो कोहली?? मधल्या पिरेडमध्ये अगदी डाऊन होता. प्रत्येक वेळेस खेळायला यायचा आणि लगेच पॅव्हेलियन मध्ये परत जायचा. तेंव्हा अनेकांना बोलायचा चान्स मिळाला होता.

पुन्हा बाऊन्स होऊन पुर्वी पेक्षा जास्त दमदार वापसी. व्वा!! कौतुक च आहे.

तो काळ म्हणजे त्याच्या क्रिकेट जीवनात आलेला ‘Bad Patch ‘ च होता. शिखरावर असताना खाली घसरण. पुन्हा शिखरावर पोहचण. यामधील काळ म्हणजे अनेक मानसिक, शारीरिक उलाढाली चां काळ असणार नाही का?? त्यात पब्लिक फिगर असल्यावर लोकांच्या अपेक्षा असतातच. कौतुक करताना अगदी डोक्यावरच नाही तर, देवघरात बसवतील, तर अपेक्षा भंग झाल्यास काय करतील?? त्यांचाही भरवसा नसतो..

भारतीय तर तसेच क्रिकेट प्रेमी म्हणजे क्रिकेट मागे वेडेच,

 

 क्रिकेट के लिये कुछ भी करेगा वाले

 त्यात पाकिस्तान बरोबर मॅच म्हणजे

 “इज्जत का सवाल असतो.

 

BAD PATCH मध्ये,

खेळताना येणाऱ्या अडचणींवर लक्ष देणे, काही खेळण्याचे टेक्नीक बदलणे. कुठे सतर्क रहायचे?? कुठे समर्पित रहायचे?? हे ठरविणे. योग्य वेळी दोन पावले मागे घेणे.

खेळण्या बरोबर मानसिक अनुशासन असणेही आवश्यक आहे. हे काम खेळाडूंच्या कोचचे जरी असले तरी ते खेळाडू ने ऐकणेही महत्वाचे आहे.

जो काळानुसार स्वतः मध्ये बदल करतो तो प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो. घसरत असताना ताठ उभं राहून चालत नाही. झुकता आलं पाहिजे. शिक्षण घेणे आणि त्याचा उपयोग परीक्षेत करणे, दोन्हीं मध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. खेळाच्या मैदानावर common sense and Presence of mind चे महत्व जास्त असते.

या काळात,

“जब कोई बात बिगड जाए, जब कोई मुश्किल आ जाए, तुम देना साथ मेरा. “

 

असा कोचही पाहिजे. ‘धोनी’ सारखा साथ देणारा मित्रही पाहिजे.

हा विश्वास कोच आणि प्लेअर मध्ये असायला हवा.

“वक्त ने विराट को आजमाया बहुत लेकिन हरा नहीं पाया ।

हेच म्हणावे लागेल.

 

Bad Patch

हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच. त्यांचा सामना करणे म्हणजे, स्वतः चे परिक्षण निरिक्षण करेक्शन करता आले पाहिजे. पुन्हा RESTART चे बटन दाबून पुन्हा जोमाने कष्ट करता आले पाहिजे.

स्वतः लाच Push and run करणे जमले पाहिजे. प्रत्येक area त double XL पेक्षा जास्त मेहनत करणे जमले पाहिजे.

 

म्हणतात ना

” जिंदगी में तोता नहीं बाज बनिए, क्यों कि तोता बोलता बहुत हैं और उड़ता कम हैं । बाज शांत रहता है, लेकिन आसमां छूने की ताकत रखता हैं। “

 

जिंदगी हर कदम एक नयी जंग हैं।

 Don’t be afraid to take risk.

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “राधा कृष्ण…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “राधा कृष्ण…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी

राष्ट्र सेविका समितिची शाखा एक तास असते. त्या एका तासाचे व्यवस्थित नियोजन केलेले आहे. ध्वजवंदन, शारीरिक- सूक्ष्म व्यायाम, खेळ, बौद्धिक, गीत आणि शेवटी प्रार्थना असा सर्वसाधारण क्रम असतो.

इथे घेतले जाणारे खेळ एकदम वैशिष्ट्यपूर्ण आहेत. लंगडी, खोखो, कबड्डी हे खेळ कसे खेळले जातात हे शब्दांवरूनच समजते. तसेच हे खेळ प्रत्येकीने आधी खेळलेले आहेत. इथले खेळ कदाचित तुम्ही खेळले नसणार…

आता” राधा कृष्ण ”

हा खेळ बघा बरं… तुम्ही खेळलात का कधी?

नाही ना… सांगते मजेदार खेळ आहे.

सर्वांनी गोल करून उभ राहायचं. ओळीने एक दोन… एक दोन म्हणायचं. त्या दोघींची जोडी. एक राधा आणि दुसरी कृष्ण..

राधानी डोक्यावर माठ असल्याची ॲक्शन करून ऊभ रहायच. कृष्ण असलेल्यांनी शिट्टी वाजली की गोल पळायला सुरुवात करायची. नियम असा की ऊलटं पळायच नाही.

तेव्हा मोठ्या आवाजात घोषणा द्यायच्या.

” हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल की.. ”

” जय जय गीता भगवत गीता ”

परत शिट्टी वाजली की आपल्या राधे कडे धावत पळत लवकर पोहोचायचं. तिच्यासमोर श्रीकृष्णाच्या मुरलीधर रूपात उभ राहायचं. शंकराचार्यांच्या श्रीकृष्ण अष्टकम् मध्ये त्यांनी म्हटल आहे तसं

” सुनाद वेणू हस्तकं ”

 

किती गोड खेळ आहे ना…

ज्यांची जोडी शेवटी होईल ती आऊट..

परत खेळाची पुढची फेरी सुरू…

सहज घोषणा देता देता श्रीकृष्णाच्या भगवत गीतेची आठवण करून दिली जाते. मला तर हा खेळ फार आवडला. या खेळात दरवेळी निराळी जोडी जमते. परस्पर परिचय.. संवाद होतो. स्नेहबंध वृद्धिंगत होतो.

अशा जोड्या जमवून खेळायचा अजून एक खेळ..

” धबधबा ”

बघा… हा शब्द ऐकून.. अरेच्चा हा कसा खेळायचा? ही उत्सुकता तुमच्या मनात आली ना?

तो खेळ असा आहे..

एक नंबरनी गुढघ्यावर हात ठेवून वाकायचं. दोन नंबरनी शिट्टी वाजली की पळायला सुरुवात करायची. अर्थात त्यावेळेस घोषणा सुरू करायच्या..

” झूल झूल झेंडा झूल

संघटन में शक्ती है

शक्ती को बढाना है

हिंदुस्तान हमारा है “

घोषणा देत पळताना मनात एक ऊर्जा निर्माण होऊन जोश येतो. खेळात उत्साह चैतन्य येते.

शिट्टी वाजली की सखीच्या समोर जाऊन तिच्या पाठीवर पालथे हात वरून खाली जोरजोरात थोपटायचे… की झाला धबधबा.. आहे की नाही मजा… सगळ्याजणी एकाच वेळेस ही क्रिया करतात त्यामुळे बघायला फार गंमत वाटते.

हे खेळ मनाला सुखावून जातात..

असंही समितीत सुरू असतं…

निखळ आनंद देणार…

अवघड व्यायाम करायच्या आधी खेळाडूंकडून थोडा वाॅर्मअप करून घेतात. शाखेत खेळानंतर बौद्धिक असते. इथे मेंदू तरतरीत होऊन बौद्धिक नीटपणे ऐकले जावे म्हणून हे खेळ घेत असावेत.

गंमत म्हणून म्हटलं हं…

इथे सांगितलेले बौद्धिक ऐकण्याची सध्या मात्र फार गरज आहे. आपल्याला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी समितीत जाऊन समजतात. आजूबाजूला काय चाललेले आहे हे माहित होते.

आपण काय करायला हवे याचे भान येते. त्याबरोबरच… ते ऐकून आपल्यात सुधारणा करूया.. इतरांनाही शाखेत येण्यासाठी प्रवृत्त करूया… खेळाचा आनंद घेत घेत राष्ट्रप्रेम जागृत ठेवू या.

त्यासाठी वंदनीय केळकर मावशींना वंदन करून म्हणूया…

मौसीजीने पेड लगाया 

तन-मन धन से सिचेंगे”

©  नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५५ आणि ५६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५५ आणि ५६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ५५ – – – 

नसे मानसीं नष्ट आशा दुराशा।

वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा॥

ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा।

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५५॥

अर्थ: ज्याच्या मनातील दुष्ट वासना आणि वाईट विचार नाहीसे झाले आहेत, भगवंताला आपल्या प्रेमपाशात बांधण्याची उत्कट इच्छा ज्याच्या मनामध्ये तीव्रतेने आहे आणि ज्याच्या प्रेमामुळे आणि शरणागत वृत्तीमुळे स्वतः भगवंत त्याचा ऋणी झाला आहे, असा भक्त भगवंताचा जगातील सर्वात उत्कृष्ट किंवा धन्य भक्त आहे.

(नष्ट -त्याज्य/वाईट, दुराशा – दुष्ट वासना वासना /इच्छा, प्रेमपाश- प्रेमाने बांधून ठेवणे, पिपाशा – तृष्णा /तहान)

विवेचन : भगवद भक्तीत जो रंगून गेला आहे, तो मनाने अंतर्बाह्य निर्मळ असतो. आत एक आणि बाहेर एक असे त्याच्याजवळ असत नाही. वासना, विकार आणि दुष्टभावना यांना त्याच्या मनात थारा नसतो. किंबहुना ह्या गोष्टी त्याला सहनच होत नाहीत. जसे आपल्याला शुभ्र वस्त्रावर एखादाही डाग चालत नाही, त्याप्रमाणे त्याचे मन शुभ्र वस्त्रासारखे आणि पारदर्शक असते. अशा भक्त विषयी बोलताना तुकाराम महाराज म्हणतात, ” जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण त्याचे हृदयी. “

“मना वासना दुष्ट कामा नये रे.. ” असे समर्थ सुरुवातीच्या श्लोकांमध्ये आपल्याला सांगतात. त्याचे तात्पर्य हेच आहे. रावणाच्या मनामध्ये सीतेची कामना होती. धृतराष्ट्राच्या मनात पुत्रमोह होता. दुर्योधनाच्या मनात राज्याची कामना होती. अशा वाईट आणि दुष्ट विचारांमुळे त्यांचा नाश झाला.

आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना ऐहिक सुखाची कामना असते. सत्ता, पैसा, सोनेनाणे कितीही मिळाले तरी हवेच असते. पण भगवंताचा खरा भक्त मात्र या गोष्टींपासून दूर असतो. तो कामना करतो ती भगवंताचीच! त्याच्या मनात तळमळ असते ती भगवंतप्राप्तीचीच! त्याची समर्पण भावना एवढी तीव्र असते की स्वतः भगवंत त्याच्या ऋणात राहतो. त्यांना कोणतेही ऐहिक सुख नको असते. तुकाराम महाराज म्हणतात, ” न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा.. ” त्यांचे भगवंताशी प्रेमाचे नाते जोडलेले असते. “तूंचि बापधनी” अशी भावना परमेश्वराबद्दल भक्ताच्या मनात असते. तोच त्यांचे आई-वडील, गुरु सगळे काही असतो.

भगवंताला देखील अशा भक्तांचा दास व्हावेसे वाटते. आपल्या दासाला कोणताही त्रास झालेला भगवंताला चालत नाही. मग जनाईला तो दळण दळू लागतो, नाथांच्या घरी तो पाणी भरतो, विठू महाराच्या रुपात दामाजींचे कर्ज फेडतो, पुंडलिकासाठी विटेवर उभा राहतो, अर्जुनासाठी त्याच्या रथाचे सारथ्य पत्करतो. यात त्याला कोणताही कमीपणा वाटत नाही.

देव बांधला जात नाही आणि त्याला कोणी बांधू शकत नाही. श्रीकृष्ण लहान असताना यशोदेने त्याला बांधण्याचा प्रयत्न केला. परंतु जो जो त्याला बांधायला जावे तो तो दोरी अपूर्ण पडत होती. मग भगवंताने स्वतःच तिच्याकडून बांधून घेतले. असा भगवंत भक्तांच्या प्रेमाने बांधला जातो. हे अदृश्य बंधन असते. देव भावाचा भुकेला असतो.

सुदामा हा श्रीकृष्णाचा मित्र होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु तो श्रीकृष्णाचा परमभक्त होता. तो जेव्हा श्रीकृष्णाच्या भेटीसाठी द्वारकेला आला तेव्हा श्रीकृष्णाने स्वतः त्याच्या पायात मोडलेले काटे काढले, त्याचे पाय धुतले, सेवासुश्रुषा केली. अशा रीतीने भगवंत हा भक्तांचा ऋणी होतो. परंतु त्यासाठी भक्ताची देखील तेवढी योग्यता असावी लागते.

आपले सगळे संत भगवंताचे असेच प्रेमळ भक्त होते. “संतांचीया गावा प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख लेश ” असे उद्गार संतांच्या बाबतीत तुकाराम महाराज काढतात. म्हणूनच आपण सगळ्या संतांना माउली म्हणून संबोधतो. अशा संतांचा तर भगवंत देखील ऋणी असतो आपण अशा संतांचे दास व्हावे म्हणजे दासानुदास व्हावे. एवढी समर्पण भावना जर आपल्याजवळ असेल तर भगवंत प्राप्ती दूर नाही.

स्वसंवाद :: 

१) माझ्या मनातील दुराशा आणि वाईट विचार मला जाणवतात का? आणि ते नाहीसे करण्याचा मी प्रयत्न करतो का?

२) भगवंताला प्रेमपाशात बांधण्याची तळमळ माझ्या मनात आहे का? की माझी भक्ती केवळ ऐहिक गोष्टींसाठीच आहे?

३) “दासानुदास” होण्याची माझी तयारी आहे का – संतांच्या चरणी नम्रतेने जाण्याइतकी समर्पण भावना माझ्यात आहे का?

== == == 

मनाचे श्लोक क्र. ५६ – – – 

दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू |

स्नेहाळू कृपाळू, जनी दास पाळू |

तया अंतरी क्रोध संताप कैचा |

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा |५६|

अर्थ :  जो अनाथ आणि दुःखितांवर प्रेम करतो, जो मनाने अत्यंत मृदू आहे, प्रेमळ आणि सर्वांवर कृपेचा वर्षाव करणारा आहे, तसेच शरणागताला आश्रय देणारा आहे आणि ज्याच्या अंतरात राग किंवा संताप यांना त्रास नाही, असा परमेश्वराचा भक्त जगामध्ये खरोखरच धन्य होय.

(मवाळ – मृदू, स्नेहाळ – प्रेमळ, दासपाळू – शरणागताला आश्रय देणारा, संताप -त्रास)

विवेचन ::  हा श्लोक “जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा” या पालुपद-मालिकेचा सुंदर समारोप आहे.

हा श्लोक वाचताना एक विशिष्ट लय आपोआपच प्राप्त होते. ‘ ळ ‘ची पुनरावृत्ती याला एक वेगळेच सौंदर्य देते. परंतु हे केवळ भाषिक दृष्टीने जरी असले तरी अर्थाच्या दृष्टीने देखील हा श्लोक तेवढाच सुंदर आहे. जो भक्त भगवंताचा होऊन राहिला आहे, त्याच्यामध्ये काही गुणांचा परिपोष आपोआपच होत असतो. अशा भक्ताच्या अंगी कोणते गुण असतात ते समर्थांनी या श्लोकात सांगितले आहे.

संत हे भगवंताचे श्रेष्ठ भक्त असतात म्हणून संतांमध्ये वरील श्लोकातील गुण आपल्याला प्रकर्षाने दिसतात किंवा जाणवतात. अत्यंत प्रेमळपणा हा संतांचा गुण! ते अनाथांची, दिनांची, दुःखी जनांची माउली होतात. संत एकनाथांनी तप्त वाळवंटात रडत असलेले हरिजनाचे मूल कडेवर उचलून घेतले. पूर्वजांचे श्राद्ध करीत असताना भुकेल्या हरिजनांना जेवू घातले, तृषार्त गाढवाच्या मुखी गंगेचे पाणी घातले. प्रसंगी परमेश्वर तरी कठोर होतो, परंतु संतांना मात्र सर्वसामान्यांचा अपार कळवळा असतो. दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी मी अवतार घेतो असे गीतेमध्ये भगवंत म्हणतात. परंतु ज्ञानेश्वर माउलींसारखे संत दुष्ट नाहीसे होवो असे म्हणत नाहीत तर दुष्टांचा दुष्टपणा नाहीसे होवो असे म्हणतात.

सर्वसामान्यांच्या त्रासाने संत संतापत किंवा दुःखी होत नाहीत. त्यांच्याजवळ अपार करुणा असते. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास.. असे संत तुकाराम महाराज म्हणतात ते याचसाठी. संत कधी कधी कठोरपणे वागले किंवा बोलले तरी देखील त्यात लोककल्याणाची तळमळ आणि प्रेम असते. दासपाळू म्हणजे भगवंताच्या भक्ताला ते आश्रय देणारे असतात.

गीतेत भगवंतांनी स्थितप्रज्ञ पुरुषाची जी लक्षणे वर्णन केली आहेत, असे स्थितप्रज्ञ म्हणजे संत असतात. परंतु अशा व्यक्तींबद्दल बोलताना समर्थ त्यांना संत, महात्मे किंवा साधू असे म्हणत नाहीत तर अशा व्यक्तींसाठी ते ‘दास सर्वोत्तमाचा ‘शब्द वापरतात. हे शब्द अत्यंत अर्थपूर्ण आहेत. दास म्हटले म्हणजे अहंता येत नाही. ज्या व्यक्ती आपल्याला साधू, संत, महात्मे म्हणवून घेतात, अशांच्या ठिकाणी अहंकार येण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे अशी माणसे आपल्याला सिद्धी प्राप्त आहे अशा प्रकारचा दावा करतात. खरे तर सिद्धी या परमार्थापासून दूर नेतात. परंतु सामान्य माणसे सिद्धीला भुलतात. याच गोष्टीचा गैरफायदा अशी मंडळी घेऊन समाजातील लोकांना फसवत असतात. फसवणुकीची अशी खूप उदाहरणे आपल्याला वर्तमानपत्रातून वाचायला मिळतात. सुशिक्षित लोक देखील अशा प्रकारच्या चमत्कारांना बळी पडतात. म्हणून समर्थांच्या उपदेशामध्ये सिद्धींचा उल्लेखही नाही. समर्थांच्या दृष्टीने संत पुरुष तोच की जो परमेश्वराचा दास असतो.

परमेश्वराचा साक्षात्कार झालेले संत निरिच्छ असतात. विपरीत परिस्थितीने ते दुःखी होत नाहीत आणि अनुकूल परिस्थिती आली म्हणून हर्षित होत नाहीत. लोककल्याणाची त्यांना तळमळ असते. त्यासाठीच ते आपले आयुष्य घालवतात आणि म्हणून आता उरलो उपकारापुरता… असेच ते म्हणतात. असेच सर्वोत्तमाचे दास जगामध्ये धन्य भक्त म्हणवले जातात.

स्वसंवाद ::

१) माझ्या मनात दुसऱ्यांबद्दल खरी करुणा आहे का – की ती केवळ दिखाव्यापुरती असते?

२) “दुष्टपणा नाहीसे होवो” असे म्हणण्याइतकी उदारता माझ्या मनात आहे का – की मला माणसेच नको असतात?

३) मी “दास” आहे की “महात्मा” होण्याच्या मागे आहे – नम्रतेने परमेश्वराचा दास राहणे मला खरोखर पसंत आहे का?  

– क्रमशः श्लोक ५५ आणि ५६.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “The Unsung Indian” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “The Unsung Indian” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

डॉ. गणेश राख!

पुण्यातील एका मजुराने पत्नीला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केले. प्रसूती सिझेरियन पद्धतीने झाली. खर्च किती येईल याची त्याला कल्पना नव्हती; घर गहाण ठेवावे लागेल की काय अशी त्याची भीती होती.

डॉक्टर, मूल काय झालं? तो विचारतो.

“तुमच्या घरी परी आली आहे—मुलगी झाली आहे, ” डॉक्टर उत्तर देतात.

“फी किती आहे?”

“परी जन्माला आली की मी फी घेत नाही, ” डॉक्टर शांतपणे म्हणाले.

भावनांनी भरून आलेला तो मजूर डॉक्टरांच्या पायांवर कोसळला—“साहेब, तुम्ही देव आहात. ”

हे पुण्याचे डॉ. गणेश राख! … गेली दहा वर्षे ते असेच करत आहेत—मुलगी झाल्यावर एक पैसाही न घेता प्रसूती. आतापर्यंत १, ००० हून अधिक कन्यांचे जन्म त्यांनी विनामूल्य घडवले आहेत.

“मला लहानपणापासून कुस्तीगीर व्हायचं होतं; पण आई म्हणाली—‘डॉक्टर हो आणि या परींचं रक्षण कर, ’” ते अभिमानाने सांगतात.

लंडनच्या बीबीसीने त्यांच्यावर ‘Unsung Indian’ या शीर्षकाखाली लेख प्रसिद्ध केला आणि त्यांच्या कार्याचं कौतुक केलं.

… त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा—अशा देवदूतांचा जन्म झाला की खरंच समाज धन्य होतो…!

 

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “टॉक्सिक पॉझिटिव्हिटी” – लेखिका: डॉ. स्वाती गानू ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “टॉक्सिक पॉझिटिव्हिटी” – लेखिका: डॉ. स्वाती गानू ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

टॉक्सिक पॉझिटिव्हिटी नेहमी आनंदी राहण्याचा अतिरेक

 

“नेहमी हसत राहा” — पण मन रडत असेल तर?

टॉक्सिक पॉझिटिव्हिटी : भावनांना नाकारणारी खोटी सकारात्मकता.

आजकाल आपण सतत एकच गोष्ट ऐकतो —

“पॉझिटिव्ह राहा…”

“हसत राहा…”

“सगळं ठीक होईल…”

सोशल मीडियावर, नात्यांमध्ये, अगदी घरातही आपल्याला दुःख लपवून आनंदी दिसण्याचा सल्ला दिला जातो.

पण प्रत्येक वेळी हसणं खरंच आवश्यक असतं का?

मन आतून तुटत असताना फक्त “मी ठीक आहे, ” असं दाखवणं योग्य आहे का?

माणूस हा भावना असलेला जीव आहे.

त्याला आनंद होतो, पण दुःखही होतं.

त्याला प्रेम वाटतं, पण कधी भीती आणि एकटेपणाही जाणवतो.

आणि या सगळ्या भावना नैसर्गिक आहेत.

पण जेव्हा समाज आपल्याला “दुःखी होऊ नको”, “रडू नको”, “नेहमी मजबूत राहा” असं शिकवतो, तेव्हा आपण आपल्या खऱ्या भावनांपासून दूर जाऊ लागतो.

यालाच “टॉक्सिक पॉझिटिव्हिटी” म्हणतात.

ही अशी सकारात्मकता आहे जी वरून सुंदर दिसते, पण आतून माणसाच्या भावनांना गप्प बसवते.

ती माणसाला समजून घेत नाही, उलट त्याला स्वतःच्या दुःखाबद्दल अपराधी वाटायला लावते.

 

खरी सकारात्मकता म्हणजे नेहमी हसत राहणं नाही…

तर रडताना स्वतःला स्वीकारणं आहे.

खरी ताकद म्हणजे भावना लपवणं नाही…

तर ‘मला त्रास होतोय’ हे प्रामाणिकपणे मान्य करणं आहे.

कधी कधी माणसाला सल्ल्यांची गरज नसते,

त्याला फक्त कोणीतरी शांतपणे ऐकणारं मन हवं असतं.

“सगळं ठीक होईल” या शब्दांपेक्षा

“मी तुझ्यासोबत आहे” हे शब्द जास्त आधार देतात.

म्हणून आपल्या आसपासच्या लोकांना नेहमी आनंदी राहण्याचा दबाव देऊ नका.

 

कारण भावना दाबल्याने माणूस मजबूत होत नाही…

तो आतून एकटा पडत जातो.

मानसिक आरोग्याची सुरुवात ‘खोटं हसण्यात’ नाही,

तर ‘खऱ्या भावनांना स्वीकारण्यात’ असते.

खरी सकारात्मकता म्हणजे नेहमी हसत राहणं नाही…

 

 आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या भावनांना जागा द्या.

त्यांना रडू द्या, बोलू द्या, व्यक्त होऊ द्या.

 

टॉक्सिक पॉझिटिव्हिटी : नेहमी आनंदी राहण्याचा अतिरेक होत चाललाय का, हा विचार करायची वेळ आली आहे.

 

टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या दुःख, राग, भीती, ताण किंवा नैराश्य यांसारख्या भावना दुर्लक्षित करून तिला जबरदस्तीने सकारात्मक राहण्यास सांगणे. यात व्यक्तीच्या खऱ्या भावनांना महत्त्व दिले जात नाही.

टॉक्सिक पॉझिटिव्हिटी का घातक आहे?

प्रत्येक माणूस आयुष्यात वेगवेगळ्या भावना अनुभवत असतो. आनंद, दुःख, राग, भीती, निराशा या सगळ्या भावना नैसर्गिक आहेत. पण जर एखाद्याला सतत “नकारात्मक विचार करू नकोस” असे सांगितले गेले, तर त्या व्यक्तीला स्वतःच्या भावना चुकीच्या वाटू लागतात.

यामुळे व्यक्ती:

भावना दाबून ठेवते

एकटेपणा अनुभवते

स्वतःला दोष देते

मानसिक तणाव वाढतो

मदत मागण्यास घाबरते

समुपदेशनामध्ये (Counseling) व्यक्तीच्या भावना समजून घेणे आणि स्वीकारणे खूप महत्त्वाचे असते. फक्त सकारात्मक बोलून समस्या दूर होत नाहीत.

दैनंदिन जीवनातील उदाहरणे

१. दुःखी व्यक्तीला जबरदस्ती सकारात्मक राहायला सांगणे

एखाद्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला असेल आणि ती व्यक्ती रडत असेल, तर काही लोक म्हणतात:

“रडू नकोस, मजबूत बन. ”

“देवाची इच्छा असेल. ”

“सगळं चांगल्यासाठीच होतं. ”

ही वाक्ये ऐकायला सकारात्मक वाटतात, पण त्या व्यक्तीच्या दुःखाला जागा देत नाहीत. अशावेळी “तुला खूप वाईट वाटत असेल, मी तुझ्यासोबत आहे” असे म्हणणे अधिक योग्य असते.

२. विद्यार्थ्यांवरील दबाव

एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास झाला तर त्याला लगेच:

“Positive रहा. ”

“तू overthink करतोस. ”

“हे काही मोठं नाही. ”

असे सांगितले जाते. पण त्या विद्यार्थ्याच्या मनातील भीती, अपयशाची भावना आणि ताण समजून घेणे गरजेचे असते.

३. नैराश्य असलेल्या व्यक्तीशी वागणे

नैराश्य (Depression) असलेल्या व्यक्तीला अनेकदा:

“फक्त आनंदी राहा. ”

“इतकं काय विचार करतोस? ”

“इतरांचं बघ, त्यांच्याकडे जास्त समस्या आहेत. ”

असे बोलले जाते. यामुळे त्या व्यक्तीला स्वतःच्या भावना व्यक्त करणे कठीण होते.

सोशल मीडियाचा प्रभाव

आज सोशल मीडियावर “Happy Life”, “Positive Vibes Only”, “Always Smile” अशा गोष्टी खूप दिसतात. लोक स्वतःच्या आयुष्यातील फक्त आनंदाचे क्षण दाखवतात. त्यामुळे इतरांना वाटते की आपणच फक्त दुःखी आहोत.

खरं म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संघर्ष असतात. पण सतत आनंदी दिसण्याचा दबाव मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो.

टॉक्सिक पॉझिटिव्हिटी कशी टाळावी?

जवळच्या व्यक्तींनी:

त्या व्यक्तीचे बोलणे शांतपणे ऐकावे.

तिच्या भावना मान्य कराव्यात

लगेच उपाय देण्याचा प्रयत्न करू नये.

“तुला असे वाटणे स्वाभाविक आहे” असे सांगावे

सह अनुभूती दाखवावी

योग्य प्रतिसाद कसा असावा?

टॉक्सिक पॉझिटिव्हिटी

योग्य आणि समजूतदार प्रतिसाद

“सगळं ठीक होईल. ”

“तू सध्या कठीण काळातून जात आहेस. ”

“रडू नकोस. ”

“रडायला हरकत नाही. ”

“Positive रहा. ”

“तुझ्या भावना महत्त्वाच्या आहेत. ”

“हे काही मोठं नाही. ”

“ही गोष्ट तुला त्रास देत आहे, मी समजू शकतो. ”

भावना स्वीकारणे का महत्त्वाचे आहे?

भावना दडपून टाकल्याने समस्या वाढू शकतात. जेव्हा व्यक्तीला स्वतःच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करता येतात, तेव्हा तिचा मानसिक ताण कमी होतो. दुःख, भीती किंवा राग या भावना चुकीच्या नसतात. त्या मानवी जीवनाचा भाग आहेत.

मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी:

भावना व्यक्त करणे

मदत मागणे

स्वतःला वेळ देणे

स्वतःवर दया ठेवणे हे आवश्यक आहे.

 

सकारात्मक विचार करणे चांगले आहे, पण प्रत्येक वेळी फक्त सकारात्मक राहण्याचा आग्रह धरणे योग्य नाही. टॉक्सिक पॉझिटिव्हिटीमुळे व्यक्तीच्या खऱ्या भावनांकडे दुर्लक्ष होते आणि मानसिक तणाव वाढू शकतो.

समुपदेशनामध्ये व्यक्तीच्या भावनांना स्वीकारणे, तिला समजून घेणे आणि तिच्यासोबत सहअनुभूतीने उभे राहणे केले जाते. प्रत्येक भावना महत्त्वाची आहे आणि त्या व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. म्हणून कोणावरही टॉक्सिक पॉझिटिव्हिटी ठेवण्याचा दबाव आणू नका.

लेखिका: डॉ. स्वाती गानू

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares