मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “भिकारी…???” – भाग २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ भिकारी…???” – भाग २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(आत्ता आत्तापर्यंत आईचा पदर धरून भिकेतले मिळालेले पैसे वाटून घेण्याचा “हट्ट” धरणारा ‘तो” आणि आता टॅलीचे क्लास लावा म्हणून “हट्ट” धरणारा “हा”…! एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत झालेला हा अचंबित करणारा बदल ज्याच्या समोर झाला आहे, त्या कुणाच्याही डोळ्यात, हा बदल पाहून नक्की पाणी येईल… मी तरी काय वेगळा…?) 

इथून पुढे – – – 

मी या अगोदरही सांगितलं आहे, मी बारावीपर्यंत पूर्णतः वाया गेलेलं एक नालायक कार्ट होतो, माझ्या दहावीत मला बीजगणित आणि भूमिती मध्ये 120 पैकी 18 मार्क पडले होते, याच गणितामुळे मला दहावी रिपीट करावी लागली होती, घरच्यांचा मार आणि बाहेरच्यांचे टोमणे खावे लागले होते. गणितावर माझा भयंकर राग आहे…!

आणि म्हणूनच आमच्या दोघांमध्ये “36 चा आकडा” आहे…

आजही गणित माझ्या वाट्याला जात नाही आणि मी त्याच्या…!

आज त्याच गणिताच्या नाकावर बुक्की मारून, मी गणितावर घ्यायचा सूड माझ्या या मुलाने पूर्ण केला 

मला बीजगणित जमलं नाही… पण याचना करणाऱ्या माऊलींच्या मुळाशी जाऊन, आपल्या सर्वांच्या साथीनं, त्यांचं “बीज ” शोधून, तिथे खत पाणी घालून आलो, आयुष्यातील चुकलेल्या गणितातील, वाईट गोष्टी “वजा” करून, “बेरीज” मांडून आलो…!

भूमिती मधली प्रमेयं आणि सूत्र, मला पाठ झाली नाहीत, पण रस्त्यावरच्या लोकांची दुःखं मला पाठ झाली, त्यांना यातून बाहेर काढायचे “सूत्र” समजावून घेण्याचा प्रयत्न केला…!

अल्फा साईन कॉस थिटा मला कधीच समजलं नाही, मात्र या लोकांची दुःख, भाव भावना, मन:स्थिती समजून घेता घेता, नमःस्थिती म्हणजे काय हे मात्र समजले…!

प्रत्येक झाडानं फळ द्यावं असं काहीच नाही… जमेल त्यांनी सावली द्यावी…!

मी झाड झालो… फळ देण्याची माझी पात्रता नव्हतीच, मग मी सावली देण्याचा प्रयत्न केला, अर्थात तुम्हा सर्वांच्याच साथीनं…!

छान छान फुलं सुद्धा माझ्या झाडाला लागली नाहीत, मग बाभूळ होऊन कोणालातरी जपण्याचा प्रयत्न केला…!

आणि…

‘लावाल ना टॅलीचा क्लास…??? ‘ त्याच्या या प्रश्नाने मी तंद्रीतून जागा झालो.

योगायोगाने याच दिवशी फादर्स डे होता, तसा तो रोजच असतो हे वेगळं…!

माझ्यासाठी टॅलीचा क्लास लावा, म्हणून मागे लागणाऱ्या या मुलाच्या हट्टापेक्षा आणखी कोणतंही मोठं गिफ्ट माझ्यासाठी असूच शकत नाही…!

360 अंशाच्या कोनात या मुलाचा झालेला हा बदल असो किंवा दोन वर्षांपूर्वी रस्त्यावर पडलेल्या एका मुलाने स्वतःला बदलून जॉब करायला सुरुवात केली आणि पगारातले पैसे संस्थेला देणगी म्हणून द्यायला आलेला असो. (“देणगी” याच नावाने या मुलाविषयी सविस्तर लिहिले होते)

फुटबॉल च्या खेळात अव्वल असूनही, केवळ फुटबॉलचे स्टड नाहीत म्हणून नाकारला गेलेला, अन्याय झालेला भिक मागणाऱ्या एका आईचा मुलगा.

फोडणे, तोडणे, मारणे, झोडणे हिच भाषा तोंडात…

आज तोच मुलगा तुम्हा सर्वांच्या मदतीमुळे येत्या काही दिवसात फुटबॉल कोच होत आहे. ‘गरीब मुलांना मी फ्री मध्ये शिकवणार सर, मला नोकरी लागली की काही गरीब मुलांना मी सुद्धा शैक्षणिक मदत करणार सर… ‘ 

आज हि भाषा घेऊन तो “माणूस” झाला आहे.

(“घातक” या नावाने याच्यावरही सविस्तर लेख लिहिला होता)

तर… गेल्या अकरा वर्षात खोटे वाटतील, इतके खरे आणि डोळ्यासमोर घडणारे हे बदल पाहायला खरंच खूप भाग्य लागतं, आणि तो भाग्यवान मी आहे…

हे भाग्य आपणा सर्वांमुळे आमच्या पदरी पडलं…!

मी आणि मनीषा आम्ही कृतज्ञ आहोत आपले

उद्या ही मुलं मोठी होतील, स्वतःबरोबर इतरांचंही आयुष्य बदलतील…

जगणं असं या मुलांसारखं असावं… फुलांसारखं… विखुरले तरी सुगंध मागे राहतोच…!

*वैद्यकीय. 

आतापर्यंतच्या कामात मला एक कळलंय, “जिवंत हाय तवंर जगून घ्या… मेल्यावर जाळायची / पुरायची गडबड करून लोकांना घरी लवकर जेवायला जायचं असतं… “

हेच अंतिम आणि अंतिम सत्य आहे… काहीही म्हणा…!!!

इथं सर्व काही महाग आहे परंतु वेदना मोफतच मिळतात आणि या वेदना देणारा आपलाच असतो…

अशा या वेदनायुक्त आयुष्य जगणाऱ्या लोकांच्या आयुष्यात एक हळुवार फुंकर घातली आहे, आपल्या सर्वांच्या मदतीने…!

  1. अंध अपंग आणि वृद्ध असे जे लोक आजारी आहेत, अशांना रस्त्यावरच तपासून वैद्यकीय सेवा दिली आहे, कमरेचे, मानेचे, गुडघ्याचे पट्टे, वॉकर, कुबड्या, काठ्या इत्यादी साधने देऊन शारीरिक दृष्ट्या उभे केले आहे.

 

  1. ज्या गोष्टी रस्त्यावर करणे शक्य नाही उदा. रक्त लघवी तपासणी, सोनोग्राफी एक्स-रे वैगरे वैगरे… या गोष्टी हॉस्पिटलमध्ये करवून घेतल्या आहेत. ज्यांना गरज आहे अशांना मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी एडमिट केलं आहे.

पूर्णपणे बरे झाल्यानंतर, तुमच्या मुळगावी जाऊन किंवा इथं पुण्यात काहीतरी व्यवसाय किंवा नोकरी करा… भीक मागणं सोडा, अशी प्रेमाची गळ, नेहमीप्रमाणे घातली आहे…!

सन्मानाचे स्वावलंबी जीवन… Rehabilitation

वैद्यकीय सेवा रस्त्यावर देत असलो, तरीही हे माझे प्रमुख उद्दिष्ट नाही. त्यांच्यात उठून – बसून, त्यांच्यासोबत जेवण करून, भीक मागण्याचे मूळ कारण त्यांच्या नकळत शोधणे आणि हळूच त्यांच्या हृदयात प्रवेश करून, या लोकांना सन्मानाने जगायला शिकवणे, भीक मागणे सोडायला लावून काहीतरी व्यवसाय करायला तयार करणे, त्यांना तो व्यवसाय टाकून देणे, भीक मागणाऱ्या पालकांशी चांगलं नातं करून, त्यांच्या मुलांनी शिक्षणाच्या प्रवाहात यावे यासाठी त्यांची परवानगी मिळवणं, आणि “भिक्षेकरी” म्हणून नाही तर “गावकरी” म्हणून जगायला लावणं… हे माझे प्रमुख ध्येय आहे…! 

  1. जगायलाच थकलेले एक आजोबा, काही काम करू शकतील अशी शारीरिक कुवत नाही. या आजोबांना एक वजन काटा घेऊन दिला आहे. लोक येतील, या वजन काट्यावर स्वतःचे वजन करतील आणि आजोबांना पैसे देतील.

हे कोणालाही करायला जमेल असं सोपं आणि बैठं काम आहे.

प्रचंड गर्दी असणाऱ्या रस्त्यावर, परंतु यांना काही त्रास होणार नाही, अतिक्रमण होणार नाही, अशा ठिकाणी त्यांना बसवलं आहे.

आयुष्यातून कायमचे “उठण्याआधी” शांतपणे काहीतरी काम करत ते आता “बसले” आहेत…!

लोकांनी वजन काट्यावर केलेल्या “वजनामुळे” यांच्या आयुष्याचा “भार” थोडा हलका होईल, अशी आशा करतो.

या महिन्यात एक जण सुलभ शौचालयात (Public Toilet) व्यवस्थापक म्हणून काम करू लागला आहे. याच्या मुलालाही आपण शैक्षणिक प्रवाहात आणले आहे.

याचं जगणं आणखी “सुलभ” करण्यासाठी प्रयत्नात आहे…!

इतर… 

  1. तीव्र उन्हाळा आणि पुढे येणारा पावसाळा दोन्ही लक्षात घेऊन सर्वांना आपण छत्र्या घेऊन दिल्या आहेत.
  2. जी पुरुष मंडळी काम करू लागली आहेत त्यांना पुढील महिन्यात आपण रेनकोट देणार आहोत.
  3. आंघोळ… किती साधी गोष्ट…! आपण या गोष्टीचा विचार सुद्धा करत नाही.

परंतु रस्त्यावर राहताना आंघोळ करणे हा एक मोठा टास्क असतो, आंघोळीसाठी पैसे लागतात, साबण लागतो, आंघोळ केल्यावर घालायला कपडे नसतात, असलेच तर कपडे धुवायला साबण नसतो, अंगावरचे कपडे धुवून वाळायला टाकले, तर अंगावर घालायचे काय…? अजूनही बरंच काही प्रश्न असतात…

आणि मग आंघोळ टाळण्याकडे कल वाढतो…

आपण म्हणतो हे लोक किती गलिच्छ राहतात…

अनेकांना गलिच्छ राहायची इच्छा नसते, परिस्थिती त्यांना तसे राहायला भाग पाडते…!

आंघोळीसारखी साधी सर्वसामान्य गोष्ट, पण रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी हा एक फार मोठा टास्क आहे, याची कुणालाच जाणीवही होत नाही…

बरोबर आहे, ठेच लागल्यावरच अंगठा असल्याची जाणीव होते, तोपर्यंत नाही, “हि वस्तुस्थिती आहे…! “

असो, आंघोळीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी उदा. टॉवेल, अंगाचे – कपड्याचे साबण आणि इतर कपडे दिले आहेत.

बऱ्याच लोकांचे, आंघोळ करण्यासाठी सुलभ शौचालयामध्ये ऍडव्हान्स पैसे भरले आहेत.

या महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या वरिष्ठ स्तरावरून, भीक मागणाऱ्या लोकांचे पुनर्वसन कसे करता येईल, या चर्चेसाठी बोलावले होते.

मला आलेल्या अनुभवांच्या आधारावर, पुनर्वसनासाठी सहज करता येतील असे 14 मुद्दे मी सादर केले आहेत.

चर्चेत उपस्थित असणाऱ्या इतर मान्यवरांनीही अत्यंत उपयुक्त सूचना दिल्या.

या सर्वांची अंमलबजावणी झाली, तर महाराष्ट्रात खरोखर एकही व्यक्ती भीक मागताना दिसणार नाही.

असो…

माझे आणि मनीषा चे दोन दोन हात आणि तुम्हा सर्वांचे हजारो हात घेऊन, माझ्या सदसद्विवेक बुद्धीला जे पटलं ते या महिन्यात केलं… आपल्यासमोर मांडलं…

खूप लोक म्हणतात, ‘तुम्ही हे काम करता, रात्री किती शांत आणि सुखाने झोप लागत असेल तुम्हाला…? ‘

खरं सांगू…???

स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे लोटली, पण या दुर्लक्षित समाजाचा अजूनही विकास झाला नाही… झोप कशी येणार…?

आपल्या साथीने गेली अकरा वर्षे पूर्ण वेळ मी या लोकांसाठी काम करत आहे… अजूनही म्हणावं तसं यश हाताला लागलं नाही… अजूनही वरच्या पायरीवर सरकलो नाही… झोप कशी येणार…?

अकरा वर्षे काम करून आज सुद्धा, मला असं वाटतं की मी आजही – अजूनही या कामाच्या बालवाडीच्याच इयत्तेत आहे… वरच्या इयत्तेत मी कधी जाणार…? मग झोप कशी येणार…?

अकरा वर्ष एकाच इयत्तेत राहणं, याच्या वेदना काय असतात कशा सांगू…? झोप कशी येणार…??

तुम्ही सर्वांनी मिळून माझ्या हातात पाटी पेन्सिल दिलीत,

पण आज 11 वर्ष, बाराखडी शिकताना अजूनही मी पाटीवर अ.. अ… आंघोळीचा, हेच गिरवत आहे, याची खंत आहे…

झोप कशी येणार…??

प… प… पसायदानाचा मी कधी गिरवणार…?

ज्ञ… ज्ञ… ज्ञानेश्वर माऊलींचा…

हा “ज्ञ” माझ्या पाटीवर उमटून, माझी बाराखडी पूर्ण होऊन वरच्या इयत्तेत माझे लोक कधी जाणार? याच विचारात मी असतो…! मग शांत सुखाने कशी झोप येणार…?

मध्यरात्री एखाद वेळी वाटतं, जाऊ दे थांबवू हे सर्व… बास झालं आता…! या विचाराने शांत सुखाने कशी झोप येणार…?

केव्हातरी पहाटे मग, कुशीवरून वळताना, तुमची आठवण येते…

तुमची प्रत्येक कृती, तुमचे मदतीचे हात आणि कौतुकाचे शब्द… माझ्यासाठी गाणं होऊन कानात रुंजी घालतात…

रुक जाना नहीं तू कहीं हार के 

काँटों पे चल के मिलेंगे साए बहार के… ओ राही, ओ राही…

तू तो चला था सपने ही ले के 

कोई नहीं तो हम तेरे अपने हैं, 

रुक जाना नहीं… रुक जाना नहीं… ओ राही, ओ राही…

तुम्ही गायलेलं हे गीत, माझ्यासाठी जीवन गाणं बनतं…!

हे गाणं ऐकता ऐकता मात्र मी निश्चिंत झोपी जातो, “उद्याची सकाळ” होण्याची वाट पहात…!!!

– समाप्त – 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”फक्त समजून घेता यायला हवं…” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “फक्त समजून घेता यायला हवं… ☆ संध्या बेडेकर ☆

Life is a balance of holding on and letting go

आपण नेहमी ऐकतो वाचतो की वर्तमान काळात जगावं. भूतकाळ म्हणजे जे घडायचे होत ते घडून गेलं. चांगलं वाईट, नमकीन खटठा मीठा सर्व स्वाद चाखायला मिळाले. तरी भूतकाळ अगदी भूतासारखा मागे लागलेलाच असतो. त्याला कितीदा सांगितलं अरे बाबा!!

“Pl do not knock at my door, I do not have anything new to tell you. ”

सर्व माहित असून सुद्धा पुन्हा पुन्हा त्रास द्यायला मागेच असतो.

मी आता तुला (भूतकाळ) मागे सोडलय.

हे नक्की की भूतकाळात घडलेल्या घटना, आपण घेतलेले निर्णय, माणसांचे खरे चेहरे, यावरून मी खूप शिकले आणि आता बऱ्यापैकी हुशार झाले आहे.

Life is a balance of holding on and letting go.

आयुष्यात खूप अनुभव आले. खूपदा हेच कळत नाही की सरळ उभ रहाव की थोडं तिरकच , कारण तिरक ऊभ राहिल्याशिवाय काही लोक सरळ उभे रहात नाही. हे कळलय. कधी कधी आपले मत मांडणे ही गरजेचे असते. नाही तर भोवऱ्यात अडकायला होत.

आयुष्याच्या परीक्षेपेक्षा शाळेची परीक्षा सोपी होती.

तेंव्हा एक सिलेबस तरी असायचा.

आपण कोणत्या वर्गात आहोत. हे माहीत असायचे. परीक्षा झाली की पास की फेल हेही कळायचे.

म्हणजे असं म्हणावस वाटतं

शाळेतला अभ्यासाचा आयुष्यात तसा काही फारसा उपयोग होत नाहीं. तो अभ्यास फक्त डिग्री मिळविण्यापूरताच असतो. मी पदवीधर आहे. हे जगाला सांगायला. बाकी अभ्यासाची हुशारी आयुष्यात उपयोगात येत नाही. कारण येथे कोणताही एक नियम नसतो जो Universal नियम म्हणता येईल. येथे परिस्थीती प्रमाणे नियम बदलतात. येथे चेहरा बघून, गरजेप्रमाणे लोक बदलतात म्हणून नियमही बदलतात..

“एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही, जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते. ”

पायथागोरस चे प्रमेय किंवा न्युटन चे नियम काही आयुष्यात लागू पडत नाहीत.

आता आपण नेहमी चांगल वागावं हा आयुष्यातील एक नियम आहे,

न्युटनच्या नियमाप्रमाणे

Every action has equal and opposite reaction.

पण त्या नुसार तसं काही आयुष्यात घडत नाही. चांगल्या वागण्याचे परिणाम नेहमीच चांगले मिळतात असं नाही. चांगल्या वागण्याने लोक बुद्धू समजतात. They take you for granted. म्हणजे खूप दा तर असं वाटतं

आपल status Fill in the Blank सारखं आहे. म्हणजे,

वेळ आल्यावर/ गरज पडल्यावर लोक जसं कावळ्याला ही मानाने बोलावतात ना तसंच काहीसं वाटतं.

म्हणजे असं म्हणावस वाटतं,

जिंदगी इन लोगों के नखरों से बेहतर तो स्कूल की किताबें थी, जो देर से ही सही लेकिन समझ में तो आ जाती थी।

येथे माणसं समजतच नाहीत.

चांगुलपणा असण चांगलंच आहे. पण त्या बरोबर तितकच सजग सावध डोळसही असायला हवे.

आता वयानुसार, अनुभवावरून बऱ्याच गोष्टी समजायला लागल्या.

कोणी आपल्याला सोडून जातंय तर जाऊ दे. का?? कशाला? काय झालं?? वगैरे विचारायच नाही. त्यात वेळ घालवायचा नाही.

हे असं वागणं म्हणजे माझा घमंड, गुरूर नाही, मी सर्वांना आवडली पाहिजे असा माझा हट्टही नाही. कधी नव्हताच.

People pleasing च्या चक्रात फसायचंच नाही.

What people think about me is not important for me, What I think about myself means a lot for me.

लोक असं का वागतात? याच दुःख आता मला होत नाही. फक्त वाईट याच वाटतं हे सर्व समजेपर्यंत माझं अर्ध्याहून अधिक आयुष्य संपल. याच दुःख जास्त होतंय.

आता वयानुसार विचारांची range वाढली. एकाच ठिकाणी पोहचण्याचे अनेक मार्ग असतात, त्याचप्रमाणे एकाच गोष्टीला बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात. हे कळलय.

सर्वांबरोबर आपले विचार जुळणे शक्यच नाही. बेमेल विचारांना ही समजून घेता आले पाहिजे. हे कळलय.

खरी परिस्थिती ही आहे की

जब तक जिंदगी के रास्ते समझे में आते हैं तब तक लौटने का वक्त हो जाता हैं ।

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७५ आणि ७६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७५ आणि ७६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

 श्लोक क्र. ७५ – – 

समस्तामध्ये सार साचार आहे ।

कळेना तरी सर्व शोधून पाहे ।

जिवा संशयो वाउगा तो तजावा ।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।७५।।

अर्थ : परमेश्वर प्राप्तीच्या सर्व साधनांमध्ये भगवंताचे नाम हेच सार (उत्कृष्ट साधन) आहे. जर हे समजत नसेल तर श्रुती, स्मृती, पुराणे, वेद, उपनिषदे आणि संतांची वचने यांचा अभ्यास करून पहा. भगवंताच्या नामाबद्दल विनाकारण येणाऱ्या संशयाचा त्याग कर. पहाट समयी भगवंताचे चिंतन कर.

(समस्तामध्ये – भगवंत प्राप्तीच्या साधनांमध्ये, सार – महत्वाचे/शाश्वत सत्य, साचार – खरोखरच /आचरणात आणण्याजोगे, वाउगा – व्यर्थ/निरर्थक, तजावा – त्याग करावा)

विवेचन :: समर्थ पुन्हा पुन्हा भगवंताच्या नामाची महती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला पटवून देत आहेत. आधीच्या श्लोकांमध्ये त्यांनी इतर साधनांपेक्षा रामनाम हे घेण्यासाठी किती सोपे आहे हे समजावून सांगितले. या श्लोकात ते म्हणतात की रामनाम हेच सार आहे. बाकी सर्व असार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ” सार सार सार विठोबा, नाम तुझे सार, म्हणोनि शूळपाणी जपताहे वारंवार. ” बा विठ्ठला, तुझे नाम हेच एक सार आहे. म्हणून तर प्रत्यक्ष देवाधिदेव महादेव त्याचा वारंवार जप करीत असतात.

फळे जमिनीतील पाणी, जीवनसत्वे शोषून घेतात. फळातून ते सार आपल्यापर्यंत पोचवतात. नदी पर्वतातील गाळ, कचरा इ. वाहून आणते पण गोड पाणी आपल्यापर्यंत पोचवते. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या खाऱ्या पाण्याची वाफ होते. मेघ आपल्याला जीवनदायी जलधारांचा वर्षाव करतात. आपले शरीर देखील आपण खाल्लेल्या अन्नातील सार शोषून घेते. असार आहे ते बाहेर टाकते. निसर्गातील सर्वच घटक अशा प्रकारे सार ग्रहणाचे कार्य करीत असताना आपल्याला दिसतील. त्याप्रमाणेच ज्याने हे विश्व निर्माण केले, त्याचे नामच सर्व सार आहे. नामातच त्याचा वास आहे. तेच नाम आपणही घ्यावे. पण आपण मात्र असार असलेला हा संसार खरा मानून सारभूत असलेले भगवंताचे नाम घेत नाही.

पण नामाचा महिमा वारंवार सांगूनही काही लोकांना पटत नाही. अशा लोकांना समजावणे अवघड असते. स्वतः शोध घेतल्याशिवाय त्यांची खात्री पटत नाही. त्यांच्या मनात अपार शंका असतात. यांना सांगायला काय जाते? नुसत्या नामामध्ये एवढे सामर्थ्य असणे कसे काय शक्य आहे? नुसते नाम घेऊन काय होणार आहे? कशाला त्यात वेळ घालवायचा? अशा लोकांसाठी समर्थ म्हणतात की माझे बोलणे तुम्हाला खरे वाटत नसेल तर स्वतः खात्री करून घ्या. विविध ग्रंथ, पुराणे, वेद, उपनिषदे अभ्यास. संतांच्या वचनांचे वाचन करा. हे सगळे वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सगळे ग्रंथ, पोथ्या पुराणे एकमुखाने भगवंताच्या नामाचा उद्घोष करीत आहेत. सर्व संतांनी देखील नामाचा महिमा एकमुखाने गायिला आहे. हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल, तेव्हा आपल्या मनातील व्यर्थ शंकांचा त्याग करा. सर्व संशय टाकून द्या. ‘ संशयात्मा विनश्यति ‘ असे म्हणतात. तेव्हा परमेश्वराचे नाम हेच सर्व सार असल्याची जेव्हा खात्री होईल तेव्हा सगळ्या शंका टाकून देऊन निःशंक मनाने भगवंताचे नाम घ्या. कवी अशोक परांजपे आपल्या एका सुंदर गीतात म्हणतात – – 

नाम आहे आदि अंती, नाम सर्व सार ।

आहे बुडत्याला नौका ठेवली जीवनी आधार ।।

या गीताच्या शेवटच्या कडव्यात ते म्हणतात – – 

नाम जपो वाचा नित्य श्वासांतही नाम

नाममय होवो देवा माझे नित्य कर्म

असे आपलेही कर्म नाममय व्हावे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात – – 

नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा ।

वायां आणिका पंथा जासील झणीं ॥

– – म्हणूनच समर्थ आपल्याला सांगतात की प्रभात समयी भगवंताचे चिंतन करावे. म्हणजे दिवसभर त्याचे स्मरण राहते.

स्वसंवाद :: 

१. निसर्गातील प्रत्येक घटक जर केवळ ‘सार’ ग्रहण करत असेल, तर मी मात्र संसारातील ‘असार’ (क्षणभंगुर) गोष्टींनाच आयुष्यभराचे सत्य मानून त्यात गुंतलो आहे का?

२. भगवंताच्या नामाबद्दल किंवा भक्तीबद्दल माझ्या मनात नकळत काही ‘वाउगा’ (व्यर्थ) संशय किंवा तर्क-वितर्क येत राहतात का?

३. सर्व संतांनी आणि श्रेष्ठ ग्रंथांनी ज्या नामाला ‘जीवनाचा आधार’ म्हटले आहे, त्या नामाचा अनुभव मी स्वतः कधी निःशंक मनाने घेऊन पाहिला आहे का?

४. माझे नित्य कर्म ‘नाममय’ व्हावे यासाठी मी रोजच्या धावपळीत किती जागृत राहतो?

– – – – 

श्लोक क्र. ७६ – – 

नव्हे कर्म ना धर्म ना योग काही ।

नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही ।

म्हणे दास विश्वास नामी धरावा ।

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।७६।।

अर्थ : आपल्या हातून कर्म, धर्म किंवा योग यातील एकही गोष्ट व्यवस्थित होत नाही. माणूस पूर्णपणे भोगातही रमत नाही किंवा पूर्णपणे त्यागही त्याच्या हातून घडत नाही. अशा परिस्थितीत समर्थ म्हणतात नामावर विश्वास ठेवा. पहाटेच्या वेळी श्रीरामाचे चिंतन करा.

(त्याग – विरक्ती, सांग – यथासांग/व्यवस्थितपणे)

विवेचन : प्रभाते मनी राम चिंतीत जावा या श्लोकमालिकेतील हा शेवटचा श्लोक. या दहा श्लोकांच्या गटात समर्थांनी भगवंताच्या नामाचा महिमा निरनिराळ्या प्रकारे वर्णन केला आहे. प्रत्येक श्लोकाचा शेवट ‘ प्रभाते मनी राम चिंतीत जावा ‘ या ओळीने झाला आहे. या श्लोकांनी नामस्मरणाचे आणि प्रभात समयी श्रीरामाच्या चिंतनाचे महत्व आपल्या मनावर ठसवले आहे.

आपण प्रापंचिक माणसे. जसे जमेल तसे आपल्या वाट्याला आलेले कर्म करण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु मतमतांच्या गलबल्यात आपण एवढे हरवून किंवा गोंधळून जातो की हाती आलेल्या कर्माला व्यवस्थितपणे न्याय देणे आपल्याला जमत नाही. धर्मपालनाच्या बाबतीतही असेच होते. धर्मपालनासाठीच्या विविध गोष्टी, विविध मार्ग ऐकून सामान्य माणूस गोधळतो. मग हे करू की ते करू अशी त्याची अवस्था होते. योगाचा किंवा ध्यानधारणेचा अभ्यास करणे त्याला शक्य होत नाही. थोडक्यात सांगायचे तर सामान्य माणसाची स्थिती एक ना धड भाराभर चिंध्या या म्हणीप्रमाणे होते. लोकांची ही मानसिकता ओळखून त्यांची दिशाभूल करणारे बुवा बाबा त्यांचे उखळ मात्र पांढरे करून घेतात. समर्थांसारखे सद्गुरू लोकांना अशा प्रकारच्या गोंधळाच्या स्थितीतून बाहेर काढण्याचे अचूक कार्य करतात. लोकांना सन्मार्गाची दिशा दाखवतात.

समर्थांच्या काळात तर सामान्य माणूस अशा गोंधळलेल्या स्थितीतच होता. तो कर्मकांडात अडकला होता. त्यामुळे ईश्वरप्राप्तीच्या खऱ्या मार्गापासून दूरच चालला होता. अशा वेळी समर्थ, संत तुकाराम आदी संतांनी लोकांना खरा धर्म काय आहे हे समजावून सांगितले. लोकांची परंपरा, अंधश्रद्धा आदींवर प्रहार करून त्यांना खरा ईश्वरभक्तीचा मार्ग दाखवला. समर्थांनी नामस्मरण हे सर्वात सोपे साधन आहे. त्यासाठी काही पैसा, वेगळा वेळ, शारीरिक श्रम या गोष्टी लागत नाहीत हे सांगितले.

कालमान बदलले आहे. पूर्वीप्रमाणे लोकांना योग, याग, तप करणे जमणार नाही हे ओळखून त्यांनी परमेश्वर प्राप्तीसाठी लोकांच्या हाती नामस्मरणाची गुरुकिल्ली दिली. आपल्या वाट्याला आलेल्या कर्माचे जेवढया चांगल्या प्रकारे शक्य होईल तसे पालन करा, आपण जे काही धार्मिक विधी करतो, त्यात काही तरी अपूर्णता राहून जाण्याची शक्यता असते. म्हणून आपण शेवटी म्हणतो, ” आवाहनं न जानामी, न जानामी तव अर्चनं… ” असे म्हणून परमेश्वराची क्षमा मागतो आणि काही अपूर्ण राहिले असेल ते पूर्ण करून घे अशी प्रार्थना करतो. म्हणूनच धर्म, योग, याग या गोष्टी पूर्णपणे जशाच्या तशा पालन करणे जमणार नाही हे समर्थ जाणतात. पण या सगळ्यात एकच महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा असे त्यांचे सांगणे आहे. ती गोष्ट कोणती? तर ते म्हणतात, “म्हणे दास विश्वास नामी धरावा. ” इतर गोष्टी जशा जमतील तशा करा. पण नामावर विश्वास ठेवून नामस्मरणाचा सोपा मार्ग अवलंबा असेच त्यांचे सांगणे आहे. संत ज्ञानेश्वर महाराज देखील म्हणतात, ” एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. ” तेव्हा सर्व संतांचे सांगणे एकच आहे. परमेश्वराचे नाम भक्तिभावाने घ्या. जणू तो समोर उभा आहे अशी कल्पना नाम घेताना करा. तुकाराम महाराज म्हणतात, “नाम उच्चारिता कंठी, पुढे उभा जगजेठी । ऐसे धरोनिया ध्यान, मनी करावे चिंतन. ” तेव्हा अशा प्रकारे प्रभात समयी श्रीरामाचे चिंतन करा.

स्वसंवाद :: 

१. विविध ग्रंथांचे मतमतांतर आणि संभ्रम यात अडकून न पडता, मी समर्थांनी सांगितलेल्या ‘नामावरील विश्वासाची’ गुरुकिल्ली स्वीकारायला तयार आहे का?

२. “आवाहनं न जानामी” म्हणताना माझ्या मनात माझ्या अपूर्णतेची जाणीव आणि भगवंताप्रती संपूर्ण शरणागती असते का?

३. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, मुखात नाम घेताना प्रत्यक्ष ‘जगजेठी’ (परमेश्वर) माझ्या समोर उभा आहे, अशी अनुभूती घेण्याचा मी कधी प्रयत्न करतो का?

४. या १० श्लोकांच्या मालिकेतून मी नेमके काय शिकलो? उद्यापासून माझ्या मनात ‘राम चिंतनाची’ नवी पहाट होईल का?

– क्रमशः श्लोक श्लोक ७५ आणि ७६

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मुंबईची तहान भागवणारे ‘७ तलाव’ ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

श्री मंगेश जांबोटकर

? इंद्रधनुष्य ?

☆ मुंबईची तहान भागवणारे ‘७ तलाव’  ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

आपण रोज सकाळी उठल्यावर नळाला पाणी आलं की ते वापरतो, पण हे पाणी मुंबईत नक्की कुठून येतं?

मुंबईला पाणी पुरवणारे तलाव असं म्हटलं की आपल्याला फक्त ‘तानसा-वैतरणा’ एवढीच नावं माहिती असतात. पण या तलावांचं अफाट जाळं, त्यांचा रंजक इतिहास आणि तिथली रंजक माहिती आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नसेल!

आज आपण मुंबईला दररोज जवळपास ३, ८५० दशलक्ष लिटर (MLD) पाणी पुरवणाऱ्या या ७ तलावांची आणि धरणांची संपूर्ण कुंडली अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत.

१. विहार तलाव (Vihar Lake) — मुंबईचा ‘पहिला’ जलस्रोत

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (बोरीवली नॅशनल पार्क) घनदाट जंगलात, तुळशी आणि पवई तलावाच्या अगदी मधोमध हा तलाव आहे.

खरा इतिहास: मुंबईला पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करणारा हा मुंबईचा पहिला मोठा तलाव आहे. ब्रिटिशांच्या काळात १८५६ मध्ये याचं काम सुरू झालं आणि १८६० मध्ये ते पूर्ण झालं.

विशेष माहिती: या तलावाचा एक भाग मिठी नदीच्या उगमाशी जोडलेला आहे. हा परिसर पूर्णपणे संरक्षित (Protected Zone) असल्यामुळे इथे प्रचंड मोठे मासे, स्थलांतरित पक्षी आणि मुख्य म्हणजे मगरींचा मोठा वावर आहे. सुरक्षेच्या कारणास्तव इथे सामान्य नागरिकांना जाण्यास पूर्णपणे बंदी आहे.

२. तुळशी तलाव (Tulsi Lake) — मुंबईतील दुसरा जुना तलाव

विहार तलावा शेजारीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हा तलाव वसलेला आहे.

इतिहास व वैशिष्ट्य: विहार तलाव बांधल्यानंतरही मुंबईची पाण्याची गरज भागली नाही, म्हणून ब्रिटिशांनी १८७९ मध्ये तुळशी तलाव बांधला. हा मुंबईतील दुसरा सर्वात जुना तलाव आहे.

खास गोष्ट: या तलावाचं पाणी अत्यंत शुद्ध मानलं जातं. पावसाळ्यात हा तलाव ओसंडून वाहू लागला की त्याचं अतिरिक्त पाणी विहार तलावात आणि पुढे मिठी नदीला जाऊन मिळतं. हा परिसरही पूर्णपणे प्रतिबंधित क्षेत्र आहे.

३. पवई तलाव (Powai Lake) — निसर्गरम्य पण दुर्लक्षित

मुंबईतील प्रसिद्ध आयआयटी बॉम्बे आणि हिरानंदानी कॉम्प्लेक्सच्या जवळ असलेला हा अतिशय सुंदर तलाव आहे.

खरा इतिहास: ब्रिटिशांनी १८९०-९१ मध्ये मिठी नदीच्या पात्रावर धरण बांधून हा कृत्रिम तलाव तयार केला होता.

महत्त्वाची फॅक्ट: सुरुवातीला हे पाणी पिण्यासाठी वापरण्याचा विचार होता, पण तलावाच्या आजूबाजूला झालेल्या मानवी हस्तक्षेपामुळे आणि प्रदूषणामुळे हे पाणी पिण्यास अयोग्य ठरले. सध्या याचा वापर औद्योगिक कामांसाठी होतो. केंद्र सरकारने १९९५ नंतर याला राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेत स्थान दिले. इथे आजही मगरी आणि विविध पक्षी पाहायला मिळतात. या तलावाच्या बाजूला फिरण्यासाठी सुंदर उद्यान (बागेची जागा) आहे, जिथे लोक निसर्गाचा आनंद घेऊ शकतात.

४. तानसा तलाव (Tansa Lake) — शुद्ध पाण्याचा खजिना

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील माहुली डोंगराच्या कुशीत हा अवाढव्य तलाव वसलेला आहे.

खरा इतिहास: या तलावाचे मुख्य काम ब्रिटिशांनी १८९२ मध्ये पूर्ण केले आणि मुंबईला पाणी सुरू झाले. पुढे १९१५ ते १९२५ दरम्यान मुंबईची लोकसंख्या वाढली, तेव्हा धरणाची उंची वाढवण्यात आली आणि प्रसिद्ध ‘तानसा ट्विन पाईपलाईन्स’ (१८०० मिमी व्यासाच्या दोन मोठ्या वाहिन्या) टाकण्यात आल्या.

तानसा अभयारण्य: या धरणाच्या भोवती ‘तानसा वन्यजीव अभयारण्य’ आहे. या जंगलात बिबट्या, जंगली डुक्कर, भेकर, तरस आणि शेकडो प्रजातींचे पक्षी राहतात. ट्रेकर्ससाठी हा परिसर म्हणजे स्वर्ग आहे.

५. मोडकसागर धरण (Modak Sagar / Lower Vaitarna) — भारतीय अभियंत्याचा चमत्कार

हे धरण स्वातंत्र्यानंतरच्या काळात म्हणजेच १९५४ मध्ये पूर्ण झाले.

इतिहास आणि नाव: हे धरण वैतरणा नदीवर बांधण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेचे (BMC) ख्यातनाम भारतीय मुख्य अभियंता नारायणराव मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अफाट कष्टांतून हे धरण उभे राहिले. म्हणूनच त्यांच्या सन्मानार्थ या धरणाला ‘मोडकसागर’ नाव देण्यात आले.

विशेष माहिती: जेव्हा हे धरण ओव्हरफ्लो होतं, तेव्हा त्याचा विसर्ग एखाद्या मोठ्या धबधब्यासारखा दिसतो. मात्र, सुरक्षेसाठी आणि पाण्यात मगरींचा वावर असल्यामुळे इथे पूर्वपरवानगीशिवाय जाणे निषिद्ध आहे.

६. मध्य व अप्पर वैतरणा (Middle & Upper Vaitarna) — आधुनिक मुंबईची लाईफलाईन

वैतरणा नदी ही मुंबईसाठी वरदान ठरली आहे. या नदीवर वेगवेगळ्या कालखंडात धरणे बांधली गेली.

अप्पर वैतरणा: हे धरण नाशिक जिल्ह्यात आहे, पण त्याचे पाणी पाईपलाईनद्वारे मुंबईला आणले जाते.

मध्य वैतरणा (बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरण): मुंबईची तहान भागवण्यासाठी २०१२ मध्ये हे धरण बांधून पूर्ण झाले. हे धरण अवघ्या २ वर्षांत बांधून रेकॉर्ड तयार करण्यात आले होते. हे पाणी वसई-विरारसाठी नसून पूर्णपणे मुंबई शहरासाठी आरक्षित आहे.

७. भातसा तलाव (Bhatsa Dam) — मुंबईचा ‘सर्वात मोठा’ पाठीराखा

मुंबई-नाशिक हायवेवर (NH-3) शहापूर आणि खर्डीच्या दरम्यान भातसा आणि चोरणा नदीच्या संगमावर हे अवाढव्य धरण आहे.

खरा इतिहास: १९७० आणि १९८० च्या दशकात हे धरण टप्प्याटप्प्याने विकसित करण्यात आले.

सर्वात मोठी फॅक्ट: मुंबईला रोज लागणाऱ्या एकूण पाण्यापैकी जवळपास ५०% पाणी एकट्या भातसा धरणातून पुरवले जाते! म्हणजेच भातसा धरण नसेल तर मुंबईची तहान भागणे अशक्य आहे. हा परिसर अतिशय डोंगराळ, घनदाट जंगलाने वेढलेला आणि प्रचंड प्रसन्न आहे. हायवेवरून जाताना येथील निसर्गाचा गारवा मनाला सुखावून जातो.

थोडक्यात सांगायचं तर…

मुंबईला पाणी पुरवणाऱ्या या ‘सात बहिणींमागे’ (विहार, तुळशी, पवई, तानसा, मोडकसागर, वैतरणा आणि भातसा) अनेक भारतीय आणि ब्रिटिश अभियंत्यांचे अफाट कष्ट आणि दूरदृष्टी आहे. शेकडो किलोमीटर दुरून डोंगरांना पोखरून, बोगदे तयार करून हे पाणी आपल्या घरापर्यंत पोहोचवले जाते.

 … म्हणूनच, पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरा!

  ☆ ☆ ☆ ☆

लेखिका : अबोली पेंडूरकर

प्रस्तुती : श्री. मंगेश जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ दिल ढूँढता है… फिर वही… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “दिल ढूँढता है… फिर वही…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

परी…

होय तिचं नावं परी आहे असचं तर तिने मला एकट्यालाच कानात सांगितलं… त्या लग्न सोहळ्यात…

बाशिंग बळ जड असलेल्या आणि लग्नाला उतावीळ असलेला आमच्या मित्रांच्या कंपूतला  तो ओपनिंग बॅटसमन  शेवट पर्यंत नाॅट आऊट राहिलेला एकमेव गडी…

वयाची बत्तीस गाठली तरी बिचाऱ्याची ब्रह्मचारीपणाची खडी फोडणं चालूच होतं… अगदी मागच्या आठवड्यापर्यंत तरी… आणि आज आता या क्षणाला त्याचं शुभ लग्न सावधान होतयं या गोष्टीवर आमचा निदान माझा तरी विश्वास बसत नव्हता… पाटा विकेटवर बुमराहला झोडपून काढल्यावर विकेट मिळते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे हसू येते ना… अगदी तसंच हसू आम्हा मित्रांच्या चेहऱ्यावर… शेवटी उशीराने का होईना पण विकेट पडली एकदाची…

कुबेराला उणेपणा येईल अशी धन, कनक संपती… उच्च विद्याविभूषित आणि विचारी घराणं… मानमरातबची छत्रचामरं अख्खा कुटूंबावर असलेली… आणि आणि बरेच काही असूनही आमच्या या मित्राचं लग्न मात्र काही जुळतं नव्हतं… बरं अटी चा कोलदांडा त्याच्याकडून काही नव्हता… ओपन माईंडेड नि  मिरर ट्रान्सपरंट  आणि वयात आलेल्या कुठल्याही बालिकेला ह्योच नवरा हवा असा त्यांच्या टिक टिक वाजे डोक्यात… हृदयात नि मनात घंटी वाजवणारा असाच हा होता… बरं काॅलेजात असताना किंवा नोकरी असताना मनाचिये गुंती सारखी परिस्थिती औषधालासुदधा कधी याची केमेस्ट्री जमलीच नाही… सारखं आपलं भ्रमर होऊन या फुलावरून त्या फुलावर त्याचा उडता प्रवास चालूच… कुणी एखादी ने जर त्याला डेरिंग करून तसं विचारलं  माझ्याशी लग्न करशील का? त्यावर हा एक मंद स्मित करून उत्तर द्यायचा… माझा सध्या तरी विचार  नाही… असं उत्तर देऊन उडवून लावत असे… मग स्थळं येणार कशी नि लग्न घटिका समिप तरी कशी येणार… पठ्ठयाच्या मनाचा थांग काही लागत नव्हता… घरच्यांची चिंता वाढत चालली… आम्ही मित्रांनी त्याला सरळ सरळ तर कधी आडून त्याच्या मनात काय आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला… आणि तो शोध अखेर लागला… पाच सहा वर्षा मागे त्याला कुठेतरी परी दृष्टीस पडली होती नि तिने त्याचं मनं नि हृदय काबीज करून टाकले होते… त्यामुळे लग्नाच्या हंगामात त्याच्या डोळ्यासमोर ती परीच दिसायची आणि समोरची दिसणारी मुलगीत परीचा त्याला भास झाला नाही कि  नापसंत असायची… खरं तर इतक्या सुंदर देखण्या मुलीं पाहण्याचा कांदेपोहे खालेल्या डिशेसनां  देखील धुवून धुवून कंटाळा आला होता… नाकारण्यासारखं त्या एकाही मुलीत तसं काहीही नसताना याचा कपाळकरंटेपणा मात्र आम्हा मित्रांना प्रश्नांकीत करायचा… आम्हालाच कधी कधी असं वाटायचं की आमच्या लग्नाच्या वेळी या सुंदर देखणं सौंदर्याने कुठे दडी मारून बसले होते… नि   गळ्यात आमच्या  मात्र बेतासबेत लोढणे अडकवले गेले होते… सिनेमे जलन… दूसरं कायं होणार होतं म्हणा… असो आता काय त्याचं रात गई बात गई… पण आमच्या मित्राचा नकार घंटेने आमची नक्की खात्री झाली कि पाणी मुरतयं कुठेतरी… गडी नक्की कुठंतरी गुंतलाय पण तो अजूनही ओपन का होत नाहीऐ याचचं आश्चर्य वाटलं…

आणि त्या आश्चर्याचा बुरखा असा आज टराटरा फाटला… त्याच्या त्या लग्न समारंभात ती परी म्हणणारी गुलाबी रंगाचा शरारा घालून एक गोड नि सुंदर बालिका त्या हाॅल मध्ये इकडून तिकडून  धावपळ करताना दिसत होती… आपल्या गोरा रंगावर नि हसऱ्या चेहऱ्यावर गालावरच्या खळीने सगळ्यांना घायाळ करून सोडले होते… तिच्या ताईचंच लग्न असल्यामुळे तिचा करवलीचा  मान ती मिरवत होती… आखिर ती होणाऱ्या जीजूची छोटी नटखट जो साली थी… खरं तर मित्राची ती बायको तितकीच सुंदर होती पण ती काही परी नव्हती… तरीही त्याने तिच्याशी लग्न केले… या निमित्ताने कधी कधी त्या परीचा सहवासात राहता येईल… तिच्या त्या सात्विक सौंदर्यात त्याने स्वतःला हरवून बसला… इतके दिवसाची तपश्चर्या फळाला आली होती… विशुद्ध प्रेमाची त्याला प्रचिती आली…

अशा तऱ्हेने आमच्या मित्राचा संसार सुरु झाला आणि त्याला लवकरच त्या परी बद्दल रहस्य कळले… कि परी काही त्याच्या बायोकोची सख्खी बहीण नव्हती  तर  तिच्या आइबाबांनी परीला अनाथालयातून आणलेली… चिखलात फुललेल्या  कमलिनीला  प्रेमाच्या वाटीकेनं संरक्षण नि पालनपोषण करून विकसित केलं होतं… मुग्ध कळीचं आता नाजूक कोमल सुंगधी फुल उमलू लागलं होतं… आणि आमचा मित्र तर त्या कमलदलात कधीचा बंदिस्त झाला होता…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २९ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २९ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

तुकारामांचा युक्तिवाद

दिवस रात्र विठू माऊलीचा ध्यास घेतलेल्या तुकाराम महाराजांची त्यांच्या देवाचे कधी दर्शन घडते आणि माऊलीच्या चरणी त्यांना कधी आसरा मिळतो अशी मनाची अवस्था झाली असताना त्यांनी त्यांच्या काही अभंगांतून खूप छान युक्तिवाद मांडला आहे. आज आपण असे काही अभंग पाहूया.

 नवां नवसांची/ झालो तुम्हासी वाणीची//

 कोण तुझे नाम घेते/ देवा पिंडदान देते//

 कोण होते मागे पुढे/ दुजे बोलाया रोकडे//

 तुका म्हणे पांडुरंगा/ कोणा घेतोसी वोसंगा//

देवाला उद्देशून तुकाराम महाराज म्हणतात,

” अहो देवा, आम्ही तुमची नवसासायासाने झालेली दुर्मिळ मुले आहोत. आमच्या वाचून तुमचे नाव घेणारे दुसरे कुणी आहेत का? आम्ही नसतो तर तुमचे पिंडदान कोण करणार? तुम्हाला परखड शब्दात जाब विचारणारे, रोखठोक बोलणारे आमच्या शिवाय दुसरे कोणीतरी आहे का? पांडुरंगा, आम्ही जर तुमची मुले नसतो तर तुम्ही कोणाला तुमच्या पदरात घेतले असते? “

आहे की नाही महाराजांचा हा मस्त युक्तिवाद? आम्ही तुमचे भक्त नसतो तर देवच जसा एकटा पडला असता, ही पांडुरंगाची मुले आहेत म्हणून त्यांना माय बापाच्या अंगा खांद्यावर खेळण्याचा अधिकार आहे.

 आता हा दुसरा अभंग पहा.

 जेणे तुज जाले रूप आणि नाव/

 पतीत हे दैव तुझे आम्ही//

 नाही तरी तुज कोण हो पुसते/

 निराकारी तेथे एकाएकी//

 अंधारे ते दीपा आणियेली शोभा/

 माणिकाची प्रभा कोंदणाची//

 धन्वंतरी रोगे आणिला उजेडा/

 सुखी काय चाडा जाणावे त्या//

 अमृतासी मोल विषाचिया गुणे /

 पितळ तरी सोने उंच नीच//

 तुका म्हणे आम्ही असोनिया जाण /

 तुज देवपण आणियेले//

 रोजच्या व्यवहारातील उदाहरणे देऊन तुकाराम देवाला सांगतात, ” अरे देवा, आम्ही तुझे दास आहोत, भक्त आहोत म्हणून तुझी ओळख आहे. ” ते काय म्हणतात? आम्ही पतीत आहोत. आणि आमच्यासाठीच देवा तुम्ही हे रूप धारण केले आहे. म्हणून आम्ही पतीतच तुझे दैवत आहोत. आम्ही जर नसतो तर तुझ्या निराकार, निर्गुण स्थितीला कोणी मानले असते? जसे की, अंधार आहे म्हणून दिव्याच्या प्रकाशाची शोभा आहे. वैद्याला रोग्यामुळे प्रसिद्धी मिळते. जर सर्व लोक निरोगी असते तर वैद्याची गरजच काय? विषामुळे अमृताची गोडी आहे, आणि पितळ आहे म्हणून सोन्याला श्रेष्ठता प्राप्त झाली आहे. तसेच आम्ही पतीत आहोत, म्हणून तुझे हे सगुण सुंदर रूप आहे.

या अभंगातून तुकाराम महाराज एक प्रतिभावंत कवी होते असे आपल्याला दिसून येते. परमेश्वराला मनविण्याची ही मोठी चतुर बुद्धी त्यांच्याकडे नक्कीच होती.

माणूस मायेच्या जंजाळात अडकून पडला आहे, जी माया अत्यंत नीच आहे. तुकाराम महाराज म्हणतात की देव खरंतर फार चांगला होता, परंतु या मायेने त्याला सुद्धा बिघडवले आहे. या मायेच्या संगतीत राहून देव लोकांना फसवण्याचे अनेक प्रकारचे खरे खोटे चाळे शिकला आहे. या मायेमुळे याच्यावर जगाचे कर्ज झाले म्हणून लोक याच्या नावाने हाका मारतात. ईश्वरा जवळ कोणी काही मागितले की ही माया ज्याचे त्याला मिळू देत नाही, उलट ती मागणाऱ्याला भ्रम निर्माण करण्याकरता त्याच्या अंगावर धावते.

थोडक्यात काय तर मायेत गुरफटलेल्या माणसाने ईश्वरालाही सोडले नाही, त्यालाच मायेच्या पाशात अडकविले. या कारणाने आम्हा भक्त मंडळींना परमेश्वराची भेट होत नाही.

हा फार मोठा सिद्धांत तुकाराम महाराजांनी सामान्य जनतेला पोट- तिडकीने सांगितला आहे.

 बहु होता भला/ परी या मायेने नासीला//

 बहु शिकला रंग चाळे/ खरे खोटे इचे वेळे //

 नव्हते आळविते कोणी/ तिने केला जग ऋणी//

 ज्याचे त्यासी नेदी देऊ/ तुका म्हणे धावे खाऊ//

विठ्ठलाची भक्ती करीत असताना वेद पठण केलेल्या पंडितांना ते मुळीच मानत नाहीत. ते म्हणतात,

पंडित म्हणता थोर सुख/

परी तो पाहता अवघा मूर्ख//

काय करावे घोकिले/

वेदपाठ वाया गेले//

वेदी सांगितले न करी/

समब्रह्म नेणे दुराचारी//

हा वेदींचा अनुभव/

तुका देखे जीव शिव//

एखाद्याला कोणी पंडित म्हणून संबोधिले तर त्याला त्याच्या विद्वत्तेचा अभिमान वाटतो पण विचारांती तो मूर्खच असतो. कारण नुसत्या वेदांची घोकंपट्टी करून त्याचा अर्थ कळत नसेल तर तो कसला पंडित? मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने त्याचे वेदपठण व्यर्थच आहे. वेदात सांगितले आहे की सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी समत्वाने ब्रह्म विलसत असते, परंतु असा अनुभव येत नाही म्हणून असे पंडित हे खरंतर दुराचारीच. वेदातील मुख्य अनुभव म्हणजे जीव आणि शिव एकच असल्याचा अनुभव. तुकाराम महाराजांना प्रत्यक्ष असा अनुभव आला आहे. त्यांच्या दृष्टीने खरा पंडित असा असतो.

पंडित तोची एक भला/ नित्य भजे जो विठ्ठला//

अवघे समब्रम्ह पाहे/ सर्वांभूती विठ्ठल आहे//

रिता नाही कोणी ठाव/ सर्वांभूती वासुदेव//

तुका म्हणे तोचि दास/ त्या देखिला जाती दोष//

तुकाराम महाराज म्हणतात की जो खऱ्या खुऱ्या भावाने विठ्ठलाची नित्यनेमाने भक्ती करतो, तोच खरा पंडित, कारण तो विठ्ठलाला सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी समत्वाने पाहतो. तो हे जाणतो की वासुदेव सर्वत्र व्यापून आहे. रिकामे असे कोणतेच ठिकाण नाही. असा मनुष्यच खरा विठ्ठलदास आहे, त्याच्या दर्शनाने सर्वदोष नाश पावतात.

संत तुकारामांचे जनतेला हेच आवाहन आहे की, जन हो, हातात टाळ घ्या, वीणा घ्या, त्यांना विठ्ठल स्वरूप माना आणि विठ्ठल नामाचा मुखाने सतत गजर करा.

क्रमशः… २९

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “भिकारी…???” – भाग १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ भिकारी…???” – भाग १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

भिकारी…???

अं… हं……. भिक्षेकरी किंवा याचक म्हणूया हवं तर…..!

समाजात मात्र भिकारी हाच शब्द प्रचलित आहे…….

कोण असतो हा भिकारी…..?

सध्या आंब्याचा सिझन चालू आहे, लोक आंबे आणतात, तो कापून खातात किंवा आमरस करतात…….

परंतु त्याची कोय जी असते तीला मात्र कोणी जपून ठेवत नाही, एका क्षणामध्ये या कोयीला डस्टबिन मध्ये टाकलं जातं…….!

 

– – – काही माणसं अशीच गोड असतात आंब्यासारखी, हा *गोडवा* असतो दरमहा मिळणाऱ्या पगाराचा / पेन्शनचा, प्रॉपर्टीचा किंवा सोन्या नाण्याचा, FD चा किंवा आणखी कशाचाही…….!

मग हा गोडवा त्यांच्याच घरातले लोक चाटून-पुसून खातात किंवा खरवडून खरवडून गर काढून त्यांचा आमरस करतात…….

एकदा का हा *”गोडवा”* संपला की, मग पुन्हा उरते ती कोयच…….!

आता गोडवा नसलेल्या या कोयीचा काय उपयोग…….?

गोडवा संपल्यानंतर या कोयीना सुद्धा डस्टबिन, म्हणजेच उकिरड्यात फेकलं जातं…….!

 

मी लहान असताना खेड्यात “कोयनापानी” नावाचा खेळ खेळायचो…….

यात एका कोयीला दुसऱ्या कोयीने नेम धरून  उडवायचे……. या कोयी जिंकायच्या……. ज्याच्याजवळ जास्त कोयी त्याला सर्वात श्रीमंत समजले जाई…..!

ज्याच्याजवळ जास्त कोयी, तो स्वतःला अलेक्झांडर समजून चालत असे, आणि आम्ही त्याच्याकडे आदर युक्त भीतीने नम्रतेने पाहत असु…….!

 

जे खेड्यातील असतील त्यांना हा खेळ नक्की आठवेल…..!

– – कोयनापानी खेळून, कोयी जमवून श्रीमंत होणे हा खेळ आता कधीच संपला आहे, या गर आणि गोडवा नसलेल्या *कोयी* घरात ठेवणे आता कोणाला परवडणार आहे???

आई बापाला घरात ठेवण्याचा “डाव” सुद्धा आता संपला आहे…..!

 

आज अशा रस गर आणि गोडवा संपलेल्या कोयी घरातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात पडून असतात, थेरडी, म्हातारी, मरायला टेकलेलं म्हातारं, रिटायर्ड झालेला बिनकामाचा बाप किंवा आजारपणात अडकलेली, लवकर मरत पण नसणारी म्हातारी आई……. अशी या कोयीना नावं आहेत…….!

कधीतरी सुंदर आंबा असणाऱ्या, या कोयी आता घरातल्या जागा अडवून ठेवतात, खाटा अडवून ठेवतात, खातात चारच घास परंतु स्वयंपाक करावा तर लागतोच ना…….?

‘यांची फालतूची आजारपणं काढायची का पोरांच्या शाळेचं बघायचं…….? यांच्यामुळे सगळं महिन्याचं गणित बिघडतं…….! ‘ 

“मरत पण नाहीत मेली लवकर”, “खायला कार भुईला भार’

……. हे शब्द ऐकून त्या कोयी आणखी कोमेजून जातात…..!

डोक्यावर घेतलेली फाटकी चादर किंवा पदर भिजून जातो, बघायला कोणाला वेळ असतो…….?

चादर किंवा तो पदर हेच या मूक अश्रूंचे “माफीचे साक्षीदार”…….!

कारण आई बाप कधी कोणाला शिक्षा करतात का?

त्यांनी मुलांना माफ केलेलं असतं…….!

– – किती दिवस सांभाळायचं अशा या कोयीना? म्हणत मुलं, सुना, नातवंडं यांचा बांध फुटतो आणि  वैतागून, घरातले हेच लोक या “कोयी”……. रस्त्यावरच्या उकिरड्यात फेकून देतात.

 

कसं सांगू…..???  

सूर्य मावळल्यावर नाही, “बाप विझला” की आयुष्यात अंधार होतो…..!

 

आई गेली की आईचा नाही, “बाळा” या कानावर येणाऱ्या गोड शब्दाचा, कायमचा  “अंत्यविधी” होतो…..

आई कुठेच कधी जात नाही….. जातो तो “हा शब्द”…!!!

घरातल्या या कोयी फेकणाऱ्या मित्रानो आणि अगं ताई…..

इथून पुढच्या आयुष्यात जखमांनी जेव्हा जीव जाईल थकून……… तेव्हा मायेच्या ओलाव्याने आता कोण सांग, हळद लावेल फुकून…….????

 

आणि हो……. आता पावसाळा सुरू होईल, दारं नीट लागणार नाहीत……. ती फुगून बसतील, तेव्हा मित्रा आणि अगं ताई पावसाला दोष देऊ नकोस…….

कदाचित तुमच्या आई बापाचे, सासू सासऱ्यांचे पाय उंबऱ्यात अजूनही अडकून बसले असतील, तुमच्याच आठवणीत……. म्हणून दारं नीट लागत नाहीत…….!

कसं सांगू तुम्हाला…….????

तरीही या कोयी फेकल्या जातात उकिरड्यावर…….

 

अंगात त्राण नाही, या वयात कुठलंही काम करायचे बळ नाही, हातात डिग्र्या घेऊन कितीतरी तरुण बेरोजगार म्हणून भटकत आहेत, अशावेळी या म्हाताऱ्या माणसांना काम कोण देणार…..?

……. इथून खेळ सुरू होतो जगण्याचा…..

जगण्यासाठी नाईलाजाने भीक मागण्याचा…….!

आता या कोयीना नवीन नाव आपण देतो… भिकारी…!

 

मी आणि मनीषा मग या उकिरड्यात पडलेल्या कोयी उचलतो, त्यांना साफ करतो, आणि मायेचं पाणी घालतो, एक छोटासा खड्डा खणून त्यात यांना पुन्हा रुजवतो, थोडं खत घालतो आणि पुन्हा त्यांच्यापासून एखादं हापूसचं आंब्याचं झाड तयार करण्याचा प्रयत्न करतो….!

– – – आमच्या भाषेत आम्ही याला पुनर्वसन म्हणत होतो…!

 

(आम्ही पुनर्वसन त्यांचेच करतो, ज्यांना भीक मागायची नाही, सन्मानाने जगायचे आहे, जे घरातून बाहेर फेकले गेले आहेत, किंवा ज्यांना कोणाचाही आधार नाही आणि यांना भीक मागण्याशिवाय पर्याय सुद्धा नाही.)

काम नको म्हणून ज्यांनी भिकेचा धंदा केला आहे, असे धंदेवाईक भीक मागणारे, भिकेच्या दलदलीतून बाहेर येण्याची इच्छाच नाही असे, यांनी यातून बाहेर यावे यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत, परंतु जोपर्यंत समाज, पुण्य मिळेल या भावनेने  यांना “दान” समजून “भीक” देत आहे, तोपर्यंत धंदेवाईक लोक यातून बाहेर येणार नाहीत, हे सुद्धा एक कटू सत्य आहे…..! )

 

मी दरवेळी सर्वांना सांगतो, कोणालाही “भीक” देऊ नका, “दा” म्हणून त्याला “मदत” करा…..!

 भीक आणि मदत मध्ये फरक आहे…..

“भीक” म्हणजे आपली कोणतीही कृती, ज्यामुळे समोरची व्यक्ती आपल्यावर किंवा दुसऱ्यावर पुन्हा अवलंबून राहणार आहे, परावलंबी होणार आहे…….

आणि “मदत” म्हणजे आपली कोणतीही कृती, ज्यामुळे समोरची व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल किंवा कोणावरही अवलंबून राहणार नाही, स्वावलंबी होणार आहे…!

एखाद्याला सन्मानाने जगण्यासाठी, खड्ड्यातून बाहेर येण्यास “मदत” करूया…….!

एखाद्याला “भीक” देऊन, त्याला परावलंबी करून पुन्हा खड्ड्यात नको ढकलुया…..!!

 

असो, मला अपेक्षित असलेल्या गोष्टी साध्य करण्यासाठी हरतऱ्हेने आपण “मदत” करत आहात आणि म्हणून हा लेखाजोखा आपणास सविनय सादर…….!

विषय आंब्यापासून सुरू झालाय, तर आंब्यापासूनच सुरुवात करतो.

अन्नदान….. नव्हे क्षुधाशांती आणि तृषाशांती

  1. रस्त्यावरील आमच्या या लोकांना आंबे खायला कधी मिळत नाहीत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वृद्ध आणि बाल बच्चे यांना हापूसचे आंबे खायला दिले आहेत.
  2. रस्त्यावर अन्नावाचून रस्त्याकडेला पडून असणारे वृद्ध आणि आजारी लोक तथा वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणारे अत्यंत गरीब लोक यांना दररोज संपूर्ण जेवण दिले आहे.

अन्नदान म्हणण्यापेक्षा “क्षुधाशांती” हा शब्द जास्त योग्य वाटतो. दान देण्याइतपत मी अजून श्रीमंत झालो नाही, जे काही दिलं, ते आपण… ती आपल्या मनाची श्रीमंती होती…!

  1. तीव्र उन्हाळ्यात एकतर अंगाची लाही लाही होत असताना त्यात पाण्याची कमतरता, अशावेळी रस्त्यावरील वृद्धांना आणि लहान मुलांना पॅक केलेल्या पाण्याच्या बाटल्या दिल्या आहेत.

याच सोबत शरीरातील कमी झालेले पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स (क्षार) भरून काढण्यासाठी “ओरल रिहायड्रेशन सोल्युशन (ORS)” संपूर्ण उन्हाळ्यात आपण दिले आहे.

  1. खराटा पलटण – (Community Cleanliness Team)- 

पूर्वी भीक मागणाऱ्या आज्या आणि मावश्या यांची एक टीम तयार केली आहे, या टीम मार्फत परिसरातील स्वच्छता करून घेत आहोत. स्वच्छता केल्यानंतर ज्यांच्याकडे स्वयंपाक करण्याचे काही साधन आहे अशांना  7 किलो साखर तथा महिनाभर पुरेल इतका कोरडा शिधा / किराणा / राशन दिले आहे.

– – मागितलेली भीक हि लाचारीने मिळते, पण आपण केलेल्या कष्टाचा मोबदला सन्मानाने मिळतोय… तोही भरपूर प्रमाणात, हा विचार त्यांच्यात रुजावा हि यामागे भावना आहे.

हातात नको भिकेची वाटी… चल हातात घेऊ पेन्सिल आणि पाटी”… अर्थात शैक्षणिक मदत…! 

भीक मागणाऱ्या लोकांचे संपूर्ण पुनर्वसन करताना, मुलांची भीक थांबवणे हा एक फार मोठा चॅलेंज आहे.

एक तर भरपूर खायला – प्यायला आणि पैसे मिळत असल्यामुळे मुलांना शाळेत जायची इच्छाच होत नाही आणि मुलांकडून दररोज भिकेतील पैसे पालकांना मिळतात यासाठी  पालकांना मुलांनी शाळेत जावे असे वाटतच नाही.

– – परंतु गेल्या अकरा वर्षाच्या त्यांच्याबरोबर झालेल्या एका चांगल्या रिलेशनशिप मुळे आपण भिक्षेकर्‍यांच्या अनेक मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणले आहे.

यात नर्सरीपासून ते बीबीए / एमबीए पर्यंतची मुले आहेत, हे सांगायला अभिमान वाटतो.

आपण या सर्व मुलांना गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक मदत करत आहोत.

यात शाळा कॉलेजच्या फी, वह्या, पुस्तके, गाईड, युनिफॉर्म शाळेचे दप्तर, बूट सॉक्स, काही वेळा प्रायव्हेट ट्युशन इत्यादीचा अंतर्भाव असतो.

यावर्षी दरवर्षी पेक्षा जास्त मुलं आणि भिक्षेकरी पालक यांच्याकडून आम्हाला सुद्धा शैक्षणिक मदत करा, म्हणून विचारणा झाली.

खरं तर माझ्यासाठी ही अत्यंत आनंदाची, जमेची आणि सकारात्मक बाजू आहे!!!

भीक मागणाऱ्या पालकांची, नवीन पिढी शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली, तर हळूहळू का होईना, परंतु भीक मागणाऱ्या समाजाची संख्या आपोआप कमी होत जाईल.

दरवर्षाचे जून जुलै ऑगस्ट हे तीन महिने आमचे प्रचंड शैक्षणिक खर्चाचे असतात.

यावर्षी जून महिन्यात जे करायचे ठरवले होते, त्याहीपेक्षा जास्त मुलांना आपल्यामुळे मदत करता आली.

ओळख – देख नसणाऱ्या या मुलांच्या भविष्यासाठी आपण आपल्या घासातला घास काढून दिलात, ऋण व्यक्त करायला खरोखर माझ्याकडे शब्द नाहीत.

नुकताच अकरावी कॉमर्स ला गेलेला एक मुलगा, मला आत्तापासूनच टॅलीचे क्लास लावून द्या म्हणून हट्ट धरून बसला.

– – टॅली (Tally) हे एक (गणितातील) अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे. जमा-खर्च, हिशोब, बिले, कर अशा व्यवहारांची नोंद ठेवण्यासाठी याचा प्रामुख्याने वापर केला जातो. या क्षेत्रातील नोकरी मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेले हे सॉफ्टवेअर.

– – आत्ता आत्तापर्यंत आईचा पदर धरून भिकेतले मिळालेले पैसे वाटून घेण्याचा “हट्ट” धरणारा ‘तो” आणि आता टॅलीचे क्लास लावा म्हणून “हट्ट” धरणारा “हा”…!

 एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत झालेला हा अचंबित करणारा बदल ज्याच्या समोर झाला आहे, त्या कुणाच्याही डोळ्यात, हा बदल पाहून नक्की पाणी येईल… मी तरी काय वेगळा…?

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “जुईने करून दाखवले!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

जुईने करून दाखवले! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

३० मे, २०२६ रोजी खडकवासल्यातील एन. डी. ए. National Defence Academy (राष्ट्रीय संरक्षण अकादमी) मध्ये दीक्षांत समारंभ झाला यात खडकवासल्याच्या अगदी भिंतीपलीकडे राहणारी जुई राजेंद्र ढगे ही आपली मराठी कन्याही दमदार पावले टाकीत देशसेवेत दाखल होण्याच्या प्रवासात अग्रेसर झाली… ही अत्यंत अभिमानाची बाब आहे… यातून मुलींनी प्रेरणा घ्यावी यासाठी हा लेखन-प्रपंच!   

२०१७… धनुर्विद्या प्रकारातील मोठी नेमबाजी स्पर्धा कोकणातल्या डेरवण येथे सुरू होती… ती अन्य स्पर्धकांची निशाणेबाजी पहात मैदानाच्या बाहेरून जात होती……. कुणा स्पर्धकाचा भरकटलेला एक टोकदार बाण सणसणत आला आणि तिच्या डाव्या हातामध्ये आरपार घुसला! ती तर धनुर्धारी! प्रत्यंचा ताणायची असेल, तिच्यावर अडकवलेला बाण लक्ष्याच्या दिशेने सोडायचा असेल तर उजवा हात महत्त्वाचा. पण ही प्रत्यंचा ज्या धनुष्यावर बांधलेली असते, ती प्रत्यंचा ताणायला, ते धनुष्य पेलायला डावा हात मजबूत असावा लागतोच. आणि बाण तर हाच डावा हात भेदून गेलाय. झालेल्या जखमेचं आणि तिच्यातून वाहणा-या रक्ताची तमा नव्हती….. पण यापुढे या हातात धनुष्य धरता येईल ना? या एकाच चिंतेचे ढग तिच्या बालमुखकमलावर दिसत होते. सुदैवाने योग्य वैद्यकीय उपचार आणि मनातली प्रखर जिद्द यांमुळे जखम बरी झाली… आणि तिने पुन्हा धनुष्य उचलले! पुढे अनेक पदकं पटकावली.

२०२३… पण यावेळी तिचे लक्ष्य अत्यंत वेगळे होते!

पण भातुकलीच्या खेळामधली भांडीकुंडी किंवा इतर स्त्रीसुलभ नाजूक खेळ खेळण्याच्या पोरवयात तिच्या हाती हे धनुष्यबाण आले कुठून? यासाठी आई थोडी वेगळ्या मातीतली असावी लागते. तिची आई तशीच होती. तिने एक खेळ म्हणून का होईना तिच्या हाती हे काहीसं पुरूषी अस्त्र सोपवलं आणि तिने नेम अचूक धरला! राजपुत्र अर्जुनाच्या हाती धनुष्यबाण हक्क म्हणून मिळालं होतं. तसं ते इतर राजपुत्रांच्या हातीही होतंच, पण अर्जुनाने धनुष्य, बाण, लक्ष्य आणि लक्ष या चारी गोष्टींवर प्रभुत्व मिळवले आणि आज इतिहासात सर्वश्रेष्ठ धनुर्धारी म्हणून अर्जुन हे नाव चिरंजीव झालेलं दिसतं. अर्जुन आणि माशाच्या डोळ्याचा लक्ष्यभेद ही गोष्ट तर लाखो मुलींनी ऐकलेली. पण तिच्या डोळ्यांत ही कथा जणू रुतून बसली होती.

पुराणातील किंवा इतिहासातील ढाल-तलवार, भाले आणि धनुष्यबाणाच्या लढाया आता केवळ गोष्टींत राहिलेल्या आहेत. मात्र आताही लढाई आहेच, मात्र आयुधं आमुलाग्र बदलून गेलीत. ही बदललेली आयुधं सक्षमतेने चालवणारी नवी सैन्यपिढी ही देशाच्या सीमांची सततची मागणी असते, आणि पुढील काळातही राहीलच. याएवढीच महत्त्वाची गरज म्हणजे सैन्याचं नेतृत्व करू शकणारी अतिशय कार्यक्षम, उच्चदर्जा-प्रशिक्षित सैन्य अधिका-यांची फळी.

गरज पडली तेंव्हा स्त्रियांनी हाती शस्त्रास्त्र धरून रणभूमीवर तांडव मांडल्याची उदाहरणं आपल्या हिंदुस्थानात अगदी देवादिकांच्या काळापासूनची. शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात महाराणी ताराराणी आणि इतर रणरागिणींनी हाती खडग घेऊन लढताना जगानं पाहिलं आहेच. स्वातंत्र्यपूर्व काळातील संघर्षात मूळच्या महाराष्ट्रकन्या राणी लक्ष्मीबाईसाहेब तर पाठीस बालक बांधलेलं असताना लढल्या. सुभाषबाबुंच्या आझाद हिंद फौजेत स्त्रियांच्या नाजूक समजल्या जाणा-या हातांमध्ये वजनी बंदुकाही इतिहासाने पाहिल्या आहेत.

इंग्रजांच्या भारतातील सैन्याने १८८८ मध्ये त्यांच्या सोयीसाठी स्त्रियांना फौजेत घेतलं होतं पण ते केवळ परिचारिका म्हणून. पण स्वातंत्र्योत्तर आणि आधुनिक काळातही युद्ध आणि स्त्रिया हा विचार काहीसा मागे पडला होता. वैद्यकीय आणि तत्सम सेवांमध्ये मात्र जगातल्या कुठल्याही सैन्याला स्त्रियांशिवाय सक्षम पर्याय नाही. हिंदुस्थानही याला अपवाद नाही. एका अर्थाने स्त्रियांच्या रक्तातील शौर्याचे निखारे राखेखाली राहून गेले होते. हिंदुस्थानाच्या तिन्ही सैन्यदलांमध्ये स्त्रिया अगदीच कमी आहेत किंवा होत्या असं नव्हतं. Combat services and Supervisory Rols (as officers) अर्थात युद्धसेवा आणि पर्यवेक्षकीय सेवांमध्ये अधिकारी या वर्गात स्त्रिया आहेतच. वायुदलात २०१८ मध्ये १३. ०९%, नौसेनेत ६% तर पायदळात ३. ८०% अशा संख्येने स्त्रिया सेनेला मदत करीत होत्या आणि आता ही संख्या वाढलीही असावी. २०२० पर्यंतच्या माहितीनुसार यातील तीन स्त्रिया वैद्यकीय शाखांतून लेफ्टनंट जनरल किंवा समकक्ष अधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या होत्या. परंतू प्रत्यक्ष हाती शस्त्र धरलेल्या ८३ दुर्गा मे, २०२१ मध्ये भारतीय पायदळात दाखल झाल्या, त्या सैन्य-पोलिस या शाखेत….. जवान म्हणून! स्त्रियाही ‘जवान’ होऊ शकतात, हे आपल्या व्यवस्थेने उशीराने का होईना लक्षात घेतले, हे महत्त्वाचे. देशरक्षणार्थ हौतात्म्य पत्करलेल्या अनेक शूर अधिका-यांच्या पत्नी सैन्यदलात अधिकारी झाल्याच्या बातम्या हल्ली आपण वाचतोच.

स्त्रिया सैन्याचं नेतृत्व करू शकतात हा विचार हिंदुस्थानाने स्विकारला आणि २०२१ मध्ये खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सैन्याधिकारी प्रशिक्षणासाठी स्त्रियांसाठी १९ जागांना अनुमती दिली. यासाठी पुरूष उमेदवारांना असते तशीच कडक सैनिकी परीक्षा निर्धारीत करण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून सुमारे दोन लाखांहून अधिक मुली एन. डी. ए. मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी परीक्षा देतात……. ही संख्या सुखद आहे!

आपल्या या कथेची नायिका २०२१ पासून या दोन लाखांतून एक होण्याच्या स्वप्नांत रममाण होती. प्रखर जिद्द, विविध विषयांचा रोजचा सुमारे दहा-बारा तास अभ्यास, शारीरिक क्षमता कायम ठेवण्यासाठी लहानपणापासून पहाटे लवकर उठून व्यवस्थित व्यायाम करण्याची आई-वडिलांनी रुजवलेली सवय या सर्वांचा गोड परिणाम म्हणून ही महाराष्ट्र कन्या यावर्षी स्टाफ सिलेक्शन बोर्ड (एस. एस. बी.)ची मुलाखत आणि इतर सर्व चाचण्या पहिल्याच प्रयत्नात पार करून सुमारे चार-साडेचार लाख मुला-मुलींमध्ये देशात एकतिसावी आणि मुलींच्यात तिसरी आली!

घरापासून हाकेच्या अंतरावर असलेली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, तिथले रूबाबदार कडेट्स, आकाशात भरा-या मारणारी त्यांची विमाने, पासिंग आऊट परेडच्या सकाळी आकाशातून घोंगावून जाणारी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स आता तिच्या दृष्टीपथात आली आहेत…….

दहावीच्या बोर्ड परीक्षेचं परीक्षा केंद्र म्हणून एन. डी. ए. खडकवासला च्या प्रवेशद्वारावर असलेल्या केंद्रीय विद्यालयात जाण्याचा योग येणं, तिथून आणि त्यानंतर झालेलं एन. डी. ए. चं दर्शन, तेथील कडेट्सचं खडतर प्रशिक्षण व शिक्षा, त्यांची रूबाबदार पण शिस्तबद्ध व्यक्तिमत्वं, तिथंच पदवीनंतर प्रशासकीय सेवांमध्ये जाण्याचा मनाचा आधीचा निर्णय रद्द करून सैन्यदलात झालेला निर्णय… बारावीत शिकत असतानाच प्रवेशपरीक्षेची माहिती मिळताच स्वयंप्रेरणेने अर्ज भरणं….. आई-वडिलांनी तयारीसाठी भोपाळ सारख्या दूरवरच्या प्रशिक्षण वर्गासाठी जाण्याची परवानगी देणं….. हा प्रवास खडतर आहे.

प्रबोधिनीतून उत्तीर्ण होणा-या कडेटसचा पासिंग आऊट परेड सोहळा अत्यंत देखणा आणि स्फुर्तीदायक असतो. आपले भावी सैन्याधिकारी अभिमानाने पावलं टाकीत टाकीत प्रतिकात्मक असलेली अंतिम पग नावाची पायरी ओलांडून देशाच्या संरक्षण सेवेत दाखल होतात.

आणखी तीनेक वर्षांनी आपली ही कथानायिका सुद्धा या पथावरचं आपलं ‘अंतिम पग’ टाकेल आणि मराठी मातीतून हिंदुस्थानाच्या सीमेवर एक संरक्षक उभा ठाकेल…….!

महाराष्ट्रातल्या एन. डी. ए. मध्ये आता महाराष्ट्राने पाऊल ठेवलं आहे! १५०व्या प्रशिक्षण तुकडीच्या यादीत आता एक मराठी नाव, जुई ढगे, हे हि-यासारखे  झळकते आहे!

कुणी लाखात एक आहे, असं म्हणलं जातं तेंव्हा या त्याने किंवा तिने इतर नव्व्याण्णव हजार नऊशे नव्व्याण्णव लोकांना मागे टाकलेलं असतं. शारीरिक सौंदर्याच्या मापदंडाने लाखात एक असणारे तर अनेक असतात, पण आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर असं एकमेव आणि अद्वितीय होणं, ही खूप मोठी बाब ठरते! दोन लाखांतून पहिल्या एकोणीसात येणं म्हणजे एक लाख नव्व्याण्णव हजार नऊशे एक्क्याऐंशी जणींना मागे टाकून पुढे येणे……. आणि ते ही स्वत:च्या हिंमतीवर……. घराण्यात तशी पूर्वपिठिका अजिबात नसताना, आसपासच्या परिसरात तसं वातावरण नावालाही नसताना, या वयातली तरूणाई ‘जवान’ होण्याऐवजी बेगडी दुनियेत ‘बेभान’ धुंदीत, आंतरजालात कीटकांसारखी अडकून पडलेली असताना आणि भक्कम आर्थिक नसताना….. हे किती विशेष!

मध्यमवर्गीय नोकरदार असलेली आई प्रा. डॉ. मनिषा आणि एका प्रसिद्ध कारखान्यात सेवा करणारे  वडील राजेंद्र ढगे व कुटुंबीय, पाठिंबा देणारी शाळा, शिक्षक, पालकांनी तिला खेळांत भवितव्य घडवता यावी यासाठी केलेली पदरमोड, खेळांतून निर्माण होणारी जिद्द, अपयशातून धडे घेत पुन्हा लक्ष्याचा वेध घेण्याची आंतरीक भावना, बारावीची बोर्ड परीक्षा डोक्यावर असतानाही केलेला अभ्यास, सुयोग्य प्रशिक्षण यांमुळे प्रा. डॉ. मनीषा यांची कन्या कुमारी जुई राजेंद्र ढगे ही आपली मुलगी आता सैन्याधिकारी होणार आहे……… महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतो….. Cadet जुई! जयहिंद!

जुई राजेंद्र ढगे आता पुढील प्रशिक्षणासाठी जातील आणि अधिकारी होऊन देशाच्या सेवेत दाखल होतील….. जय महाराष्ट्र!

 

© श्री संभाजी बबन गायके 

न-हे, पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आपल्याला स्वातंत्र्य मिळालं – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ आपल्याला स्वातंत्र्य मिळालं – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ ☆

बरं झालं, आपल्याला  स्वातंत्र्य मिळालं.

ते गोरे, साले रस्त्यामध्ये थूंकू देत नव्हते!

वेड्यासारखे रोज पाण्याने रस्ते धूत होते.

आपण किती भाग्यवान!

गुटका पान तंबाकू खाऊन

रस्त्यात कुठेही थूंकू शकतो!

छान झालं, स्वातंत्र्य मिळालं!

*

ते इंग्रज, साले धान्यामध्ये भेसळ करू देत नव्हते.

मूर्खासारखे रेशनवर सकस धान्य देत होते.

आपण किती पुण्यवान!

दूध अन्न औषधामध्ये

बेमालूम भेसळ करू शकतो.

बेस्ट झालं, स्वातंत्र्य मिळालं!

*

ते ब्रिटीश, साले शिक्षणाचा धंदा करू देत नव्हते!

अडाण्यासारखे दर्जेदार शिक्षण फुकटामध्ये देत होते!

आपण किती विद्वान!

शिक्षणाचा बाजार मांडून

पिढ्या बरबाद करू शकतो!

चांगलं झालं, स्वातंत्र्य मिळालं!

*

ते जुलमी, साले अनाथ मुलांना भीक मागू देत नव्हते!

दळभद्र्यासारखे त्यांच्याकरिता अनाथाश्रम चालवित होते!

आपण किती दयावान!

अनाथ मुलांना पांगळे करून

भीक मागायला लावू शकतो!

झकास झालं, स्वातंत्र्य मिळालं!

*

ते मिशनरी, साले गरीब रूग्णांस हलाखीत मरू देत नव्हते!

ईश्वरसेवा समजून त्यांची सेवाशुश्रुषा करीत होते!

आपण किती करूणावान!

डाॅक्टरांचा संप घडवून रूग्णांचे हाल करू शकतो!

उत्तम झालं, स्वातंत्र्य मिळालं!

*

ते फिरंगी, साले आपणाला लाच खाऊ देत नव्हते!

गाढवासारखे लाचखोरांस बुटांच्या लाथा घालीत होते!

आपण किती सचोटीवान!

लाचखोरांच्या मिळकतीमध्ये आपला वाटा ठेवू शकतो!

*

बरं झाल, ते इंग्रज गेले!

पण जाता जाता, साले आपलं देशप्रेमही घेऊन गेले!

  • एक भारतीय नागरिक

 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महावस्त्राचे पदर – भाग ३ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

महावस्त्राचे पदर – भाग ३ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

उगवतीचे रंग- नात्यांचं महावस्त्र

महावस्त्राचे पदर – भाग तीन : ‘बाबा’ (सह्याद्रीची ढाल)

​आतापर्यंत नात्याच्या महावस्त्राचे दोन भाग आपण पाहिले. त्यातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा पदर होता ‘आई’. तिचा आपण ‘मायेची पैठणी’ म्हणून गौरवपूर्ण उल्लेख केला. आज या महावस्त्राचा दुसरा प्रमुख पदर पाहूया. हा पदर आहेत ‘बाबा’—घरातील आईनंतरचं दुसरं अत्यंत आदराचं दैवत!

​नात्यांचं महावस्त्र विणताना जसा एक धागा मायेच्या मुलायम आणि जरतारी रेशमाचा असतो, तसाच दुसरा अत्यंत महत्त्वाचा धागा हा त्या वस्त्राला बळकटपणा देणाऱ्या टणक सुताचा असतो. हे सुताचं बळकट आणि तितकंच सुरक्षित कोंदण म्हणजेच ‘बाबा’! आई जर या वस्त्राची देखणी सुवर्णमयी पैठणी असेल, तर बाबा या महावस्त्राला कवेत घेणारे आणि उन्हापावसापासून रक्षण करणारे आकाशाएवढे भक्कम छत्र असतात. कुटुंबासाठी ते स्वतः ‘सह्याद्रीची ढाल’ होतात.

​बाबा म्हणजे घराच्या या सुंदर इमारतीचा पायाचा भक्कम दगड असतात. पायाचा दगड जमिनीखाली गाडला गेलेला असतो, तो वरून कोणाला दिसत नाही आणि याची कोणी जाहीर स्तुतीही करत नाही; पण त्यावरच अख्ख्या घराचा डोलारा वर्षानुवर्षे सुरक्षित उभा असतो. कुटुंबाची जबाबदारी, मुलांचे शिक्षण, त्यांचे हट्ट आणि भविष्याची चिंता वाहत बाबा अहोरात्र झिजत असतात. स्वतःचे कपडे जुने झालेले असले, पादत्राणे झिजलेली असली, तरी मुलांच्या आनंदासाठी खिशातला शेवटचा रुपया आनंदाने रिकामा करताना कधीच बाबांच्या कपाळावर आठी उमटत नाही. मुलाला यश मिळालं की आई त्याला उराशी धरून रडते, पण बाबा मात्र घराच्या एखाद्या कोपऱ्यात किंवा गच्चीवर जाऊन शांतपणे आनंदाश्रू पुसतात. जगासमोर ते नेहमी कणखरच राहतात, कारण त्यांना माहिती असतं की घरातील हा मुख्य कणा जर मोडला, तर अख्खं घर कोलमडून पडेल!

​’देणाऱ्याने देत जावे’ या अतिशय प्रसिद्ध कवितेत कविवर्य विंदा करंदीकर म्हणतात:

​हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी,

सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी.

​या ओळींमध्ये थोडासा भावबदल करून मी असं म्हणेन:

​प्रेम देणाऱ्या आईकडून मायेची उबदार शाल घ्यावी,

घराचे आभाळ पेलणाऱ्या बाबांकडून सह्याद्रीची ढाल घ्यावी!

​आपल्याकडे आईची महती सर्वांनीच गायिली आहे, पण त्या मानाने बाबा हे नाते थोडे दुर्लक्षितच राहिले आहे. आजच्या गतिमान युगात कोणी कोणाला क्वचितच पत्र लिहितो. परंतु पूर्वी जेव्हा एकमेकांच्या भावना किंवा सुखदुःखे जाणून घेण्यासाठी पत्राशिवाय दुसरं माध्यम नव्हतं, तेव्हा बाहेरगावी असणारा मुलगा वडिलांना पत्र लिहिताना पत्राची सुरुवात ‘तीर्थरूप’ या शब्दाने करायचा. आपली संस्कृती वडिलांना केवढं सर्वोच्च स्थान देत होती, हेच यातून सिद्ध होतं. वडील हे ‘तीर्थरूप’ म्हणजे तीर्थासारखे पवित्र! त्यांचं छत्र जोपर्यंत शिरावर आहे, तोपर्यंत अन्य कोणत्याही तीर्थक्षेत्री जाण्याची गरजच उरत नाही. ‘आईबाप हे दैवत माझे असता माझ्या घरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी’ या सुंदर भावगीतात नेमका हाच विचार सांगितला आहे. आपल्याकडे केवळ एक दिवस ‘फादर्स डे’ साजरा करण्याची पद्धत नाही; आपली संस्कृती तर रोजच आई-वडिलांना आणि गुरूंना वंदन करायला शिकवते. “मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव” हाच आपल्या जगण्याचा पाया आहे.

​आईची कोमलता, प्रेम, माया आणि हळुवारपणा या गुणांच्या पार्श्वभूमीवर बाबांचे थोडेसे विरोधी वाटणारे व्यक्तिमत्व अधिक उठून दिसते. रामगणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज आपल्या कवितेत महाराष्ट्राचे वर्णन करताना म्हणतात:

 ​राकट देशा, कणखर देशा, दगडांच्याही देशा,

 नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा!

​जसा हा महाराष्ट्र वरून राकट आणि कणखर असला, तरीातून नाजूक, कोमल आणि फुलांचा प्रदेश आहे; मला वाटतं बाबांचे व्यक्तिमत्त्वही हुबेहूब असंच असतं! ते वरून राकट आणि कणखर दिसतात, पण ते केवळ बाह्य रूप असतं. मनाने बाबा सुद्धा तितकेच हळवे असतात. आईचे अश्रू सहज दिसतात, बाबांचे दिसत नाहीत; एवढाच काय तो फरक! बाबा म्हणजे अगदी ‘नारळासारखे’. नारळ वरून पाहायला किती कठिण, खडबडीत आणि टणक असतो; पण त्याच्या आत डोकावून पाहिलं, तर तिथे मायेचं गोड पाणी आणि शुभ्र खोबरे साठलेलं असतं. भगवान शंकरांनी जगाला वाचवण्यासाठी हलाहल विष कंठात धारण केलं, पण बाबांनी प्रपंचात येणाऱ्या समस्यांचं आणि संकटांचं हलाहल चक्क स्वतः पिऊन टाकलं! त्या आगीची झळ त्यांनी कधीच आपल्या लेकरांना लागू दिली नाही. मुलीच्या पाठवणीच्या वेळी जगासमोर खंबीर राहणारा, पण पाठीमागे कोपऱ्यात जाऊन मुसमुसून डोळे पुसणारा पिता मी स्वतः अनुभवला आहे.

​वडिलांच्या स्वभावातील काही वेळा जाणवणारी कठोरता आणि शिस्त ही केवळ आणि केवळ आपल्या मुलांच्या उज्वल हितासाठीच असते. आई जर मुलाचा पहिला गुरू असेल, तर वडील मुलाला मोठे होईपर्यंत आणि जगाच्या बाजारात पाय रोवून उभे राहेपर्यंत मार्ग दाखवणारे खरे मार्गदर्शक असतात. जेव्हा लहान असलेला मुलगा आईचं बोट सोडून चालण्याइतका मोठा होतो, तेव्हा त्याला पुढचा खडतर मार्ग बाबांच्याच मार्गदर्शनाने दिसू लागतो. पावलापावलावर ते त्याची सोबत करतात. “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” अशी त्यांची मूक भूमिका मुलाला आश्वस्त करणारी आणि त्याचा आत्मविश्वास वाढवणारी असते. अपयशाच्या काळात पाठीवर मायेचा हात ठेवून ‘लढ’ म्हणणारे बाबाच असतात.

​’आमचा बाप आणि आम्ही’ या पुस्तकात डॉ. नरेंद्र जाधव यांचे अशिक्षित वडील त्यांना जे मोलाचे मार्गदर्शन करतात, ते प्रत्येकाला अंतर्मुख करणारे आहे. ते म्हणतात, “तू काय बी कर, काय बी शिक; पण जे काय करशील त्याच्यात टॉपला जा! ” गायनाच्या क्षेत्रातील इतिहास ज्यांच्या नावाशिवाय कधीच पुढे जाऊ शकत नाही, अशा मंगेशकर भावंडांना आणि विशेषतः गानकोकिळा लता मंगेशकरांना स्वरांचे बाळकडू देऊन घडवणारे त्यांचे वडील मास्टर दीनानाथच होते!

​साहित्याच्या आणि सिनेमाच्या पडद्यावरही या नात्याची अथांगता नेहमीच अधोरेखित झाली आहे. ‘ शोले ‘ चित्रपटात जेव्हा तरुण मुलगा अकाली मृत्यू पावतो आणि तिथे त्याचे वृद्ध, अंध वडील (अभिनेते ए. के. हंगल) येतात, तेव्हाचा तो प्रसंग आणि त्यांचा संवाद काळीज चिरून टाकणारा आहे. ते अत्यंत कातर स्वरात म्हणतात—”जानते हो दुनिया का सबसे बडा दुःख क्या होता हैं? बाप के कंधे पर बेटे का जनाजा. ” काळीज विदीर्ण करून टाकणारे हे शब्द आहेत!

​’कुंवारा बाप’ चित्रपटात आपल्याला सापडलेल्या एका अनाथ मुलाला जीवापाड जपणारा मेहमूद आठवा….. त्या मुलाला पोलिओच्या आजारातून वाचवण्यासाठी तो जे रक्ताचं पाणी करतो, त्याचं वर्णन कोणत्या शब्दात करावं? तो प्रसंग पाहताना नकळत आपल्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. अगदी त्रेतायुगात डोकावले, तर कैकयीला दिलेल्या वचनामुळे प्रभू रामाला जेव्हा वनवासात जावे लागते, तेव्हा पिता असलेल्या दशरथ राजाचा शोक हृदय पिळवटून टाकणारा आहे. हा कर्तव्यनिष्ठ पिता शेवटी केवळ पुत्रशोकातच आपले प्राण सोडतो.

​गीत रामायणात श्रीराम आणि लव-कुश यांच्या भेटीचा प्रसंग अत्यंत अद्भुत रीतीने वर्णन केला आहे. ‘कुश लव रामायण गाती’ हे गीत ऐकलं की डोळे भरून येतात. प्रभू श्रीरामांसमोर त्याचेच अपत्य त्याचे चरित्र गात असताना, गदिमांनी (ग. दि. माडगूळकर) शब्दांचा केवढा सुंदर चमत्कार साधला आहे:

“पुत्र सांगती चरित पित्याचे, ज्योतीने तेजाची आरती! “

​आणि तेवढ्याच ताकदीने बाबूजींनी (सुधीर फडके) ते आपल्या सुरांनी अजरामर केले आहे. या शब्दांचा प्रत्यक्ष प्रभू रामावर काय परिणाम होतो? तर गदिमा पुढे लिहितात:

​सोडुनि आसन उठले राघव, उठुनि कवळिती अपुले शैशव

पुत्रभेटीचा घडे महोत्सव, परी जो उभया नच माहिती!

​पिता-पुत्रांच्या या भेटीला गदिमांनी ‘पुत्रभेटीचा महोत्सव’ असे अतिशय सुंदर शब्द वापरले आहेत. खरोखरच दिव्य आणि अलौकिक प्रतिभा! ज्या रामाच्या पराक्रमाला पाहून कळिकाळही थरारतो, असे कर्तव्यकठोर श्रीराम आपल्या राजासनावरून उठून चक्क त्या लहान बालकांना प्रेमाने उराशी धरतात; कारण त्यांच्यातही असतं पित्याचं प्रेमळ हृदय!  

​इतिहासाच्या पानापानांत डोकावून पाहिले, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत माता जिजाऊंचे संस्कार जसे अनन्यसाधारण होते, तसेच वडील शहाजीराजांचे शौर्य, युद्धकौशल्य आणि ‘स्वराज्य’ स्थापनेची मूळ प्रेरणा ही वडिलांचीच देणगी होती. शहाजीराजांनी शिवरायांच्या पाठीवर ठेवलेला तो अदृश्य विश्वासाचा हातच होता, ज्याने एका नव्या युगाची पहाट निर्माण केली. कोणीतरी खूप सुंदर म्हटलं आहे:

​”आईकडे बोट धरून जगामध्ये कसं चालायचं हे शिकायचं असतं, पण रस्ता संपल्यावर पुढे स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं, हे फक्त बाबांनीच शिकवलेलं असतं. “

​जीवनात संघर्ष करण्याची ताकद आणि वागताना हवा असणारा विवेक हा मुलाला वडिलांच्या प्रेरणेतूनच मिळत असतो.

​पण आज एकविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, वर्तमान परिस्थितीने बाबा या नात्यासमोरही अनेक नवी आव्हाने उभी केली आहेत. पूर्वीच्या काळी वडिलांचा घरात एक वेगळा ‘दरारा’ असायचा. बाबा घरात आले की मुले शांत व्हायची, एका कोपऱ्यात जाऊन अभ्यासाला बसायची. तो काळ वेगळा होता आणि त्या काळाची शिस्त वेगळी होती. आज मात्र काळ बदलला आहे. आजचे बाबा हे केवळ शिस्त लावणारे ‘वडील’ उरलेले नाहीत, तर ते मुलांचे ‘सखे’ आणि ‘मित्र’ झाले आहेत. आजचा बाबा मुलांशी खेळतो, त्यांच्याशी मैत्री करतो, त्यांच्या मनातले समजून घेतो; बाबांचे हे बदललेले रूप अत्यंत सुखद आणि स्वागतार्ह आहे.

​परंतु, या आधुनिक आणि धावपळीच्या युगात ‘करिअर’ आणि ‘पैशांच्या’ शर्यतीमुळे बाबांना कुटुंबासाठी हवा तेवढा वेळ देणे जिकिरीचे झाले आहे. अहोरात्र काम केल्यामुळे मुलांशी असणारा प्रत्यक्ष संवाद बऱ्याचदा मागे पडतो. आपण मुलांना महागड्या वस्तू, गॅजेट्स किंवा चांगल्या शाळेत प्रवेश घेऊन देतो; पण त्यांना पैशांपेक्षा बाबांच्या ‘वेळेची’ आणि त्यांच्या ‘स्पर्शाची’ जास्त गरज असते, हे आजच्या पित्याला समजून घ्यावे लागेल. केवळ आर्थिक गरजा पूर्ण करणे म्हणजे पितृत्व नव्हे, तर मुलांच्या भावविश्वात प्रत्यक्ष उपस्थित राहणे, त्यांना नैतिक मूल्यांची जोड देणे ही आजची मोठी गरज आहे.

​ज्याप्रमाणे आई सुसंस्कारित असेल तर घर घडतं, तसेच बाबांचे घराकडे असणारे लक्ष, त्यांची संयमी वृत्ती आणि त्यांनी घेतलेले योग्य निर्णय यावर कुटुंबाचे संपूर्ण आरोग्य अवलंबून असते. नात्यांच्या या भरजरी ‘महावस्त्रा’चा हा पितृत्वाचा पदर जर बळकट आणि सुरक्षित राहिला, तरच येणारी पिढी कोणत्याही संकटाचा सामना खंबीरपणे करू शकेल. बाबा नावाच्या या आकाशाएवढ्या छत्राची सावली जपणे आणि त्यांच्या त्यागाची कृतज्ञतेने जाणीव ठेवणे, हीच खऱ्या अर्थाने या महावस्त्राची वीण घट्ट करणे आहे.

​थकलेल्या आणि वयस्कर झालेल्या बाबांसाठी ‘वृद्धाश्रम’ ही जागा म्हणजे शेवटचा पर्याय आहे असं मला वाटतं. घरातच त्यांना सर्वोच्च सन्मानाचे स्थान हवे. ‘नटसम्राट’ नाटक आपण सर्वांनीच पाहिले असेल; त्यातील गणपतराव उर्फ अप्पा बेलवलकर यांना आणि त्यांच्या पत्नीला वृद्धापकाळी मुलं सांभाळायला तयार होत नाहीत, तेव्हा त्यांची होणारी घालमेल काळीज हेलावून टाकते. अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांचा ‘बागबान’ चित्रपटही याच विदारक वास्तवावर भाष्य करतो. अशी नाटकं किंवा चित्रपट पाहताना डोळ्यातून अश्रू ओघळल्याशिवाय राहत नाहीत. कोणीतरी फार सुंदर म्हटले आहे:

​”या वाळलेल्या पानांवर नेहमी जपून पाय ठेवा….. कारण, एकेकाळी याच पानांनी तुम्हाला रखरखत्या उन्हात मायेची सावली दिली होती! “

​आज त्या पानांना आपल्या प्रेमाच्या आणि आदराच्या सावलीची नितांत गरज आहे, हे आपण विसरता कामा नये.

© श्री विश्वास देशपांडे

३/७/२०२६

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी – ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares