मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ फोर बर्नर थिअरी… – लेखिका : शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ फोर बर्नर थिअरी– लेखिका : शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

फोर बर्नर थिअरी बद्दल ऐकलंय का तुम्ही कधी? सुंदर रूपक आहे. तुमचं आयुष्य म्हणजे जणू चार बर्नर असलेला गॅसस्टोव्ह आहे असं समजा. कुटुंब, मैत्री, आरोग्य आणि व्यवसाय ह्या त्या चार चुली. ऍटोमिक हॅबिट्स ह्या पुस्तकाचे लेखक जेम्स क्लिअर यांनी लोकप्रिय केलेली ही कल्पना. कुठल्याही व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक ऊर्जा ही मर्यादित असते. ती ऊर्जा म्हणजे आपापला गॅस सिलिंडर समजा. फोर बर्नर थियरी हे रूपक आपल्याला सांगतं की हे चारही बर्नर एकाच वेळी मोठ्या आचेवर ठेवले तर आपली ऊर्जा लवकर संपून जाईल आणि आपण पूर्णपणे बर्नआऊट होऊ. जे लोक आपापल्या क्षेत्रात अतिशय यशस्वी होतात त्यांना ह्या चार पैकी एक तरी बर्नर कधीतरी बंद करावाच लागतो. बहुतेक लोकांसाठी ‘मैत्री’ हा बंद होणारा पहिला बर्नर असतो, मग कुटुंब, मग आरोग्य आणि सर्वात शेवटी काम!

पण एखादा बर्नर पूर्णपणे बंद न करता, आपण जीवनाच्या कुठल्या टप्प्यावर आहोत, आपलं प्राधान्य कशाला आहे हे समजून ते दोन बर्नर त्या वेळेला मोठ्या आचेवर ठेवून इतर दोन बर्नर सिमवर ठेवता आले तर? आपापल्या स्वयंपाकघरात आपण ते करतोच की, भाताला आधण आलं की उष्णता कमी करून भाजीच्या कढईची उष्णता वाढवतो. तसं केलं नाही तर गॅस पण संपेल आणि जे आपण बनवतोय तेही करपून जाईल हे आपल्याला समजतं. तोच धडा आपण आपल्या जीवनात गिरवायला सुरु केला तर?

फोर बर्नर थियरी हा कुठला मानसशास्त्रीय सिद्धांत नाहीये. ही एक रूपकात्मक मांडणी आहे. पण मला ही संकल्पना खूपच आवडली. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे टप्पे येतात. काही काळ असा असतो जेव्हा आपापल्या कामाला प्राधान्य द्यावंच लागतं. शिक्षणाचा काळ,

स्पर्धा परीक्षा, व्यवसाय उभारणी, एखादा महत्त्वाचा व्यावसायिक प्रकल्प. अश्या वेळी कामाचा बर्नर जोमाने पेटतो. कुटुंब, मैत्री, आरोग्य सर्वांकडे दुर्लक्ष होतं. पण अश्या वेळी इतर बर्नर्स कडे पूर्णपणे दुर्लक्ष न करता ते मंद आचेवर ठेवता आले तर?

पुढे आयुष्यात एक टप्पा असाही येतो जेव्हा कुटुंब केंद्रस्थानी येतं. नवीन संसार उभारताना, मुलं लहान असताना, आई-वडील म्हातारे होत जाताना, घरातलं कुणी आजारी असताना.. अशा वेळी कुटुंबाचा बर्नर मोठ्या आचेवर असावाच लागतो. पण आरोग्य, काम आणि मैत्री असे उरलेले तीन बर्नर पूर्णपणे बंद करून चालत नाही. आरोग्याबाबत बोलायचं तर शरीर हाच फार कठोर गुरु आहे. आपण त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं, तर ते आपल्याला धडा शिकवतंच. म्हणून आरोग्य बिघडतं तेव्हा इतर बर्नर आपोआपच मंदावतात, कधीकधी पूर्णपणे बंदही पडतात, त्यामुळे आरोग्य हा बर्नर सदैव चालू असलाच पाहिजे.

आयुष्याचं संतुलन म्हणजे हे चारही बर्नर सदैव सारख्या आचेवर ठेवणं नव्हे. ते अशक्य आहे. संतुलन म्हणजे एक-दोन बर्नर पूर्णपणे बंद करून उरलेले मोठ्या आचेवर धगधगत ठेवणे हे ही नाही. संतुलन म्हणजे योग्य वेळी योग्य बर्नरची उष्णता वाढवणं, आणि इतर बर्नर्स बंद न करता त्यांना मंद आचेवर जिवंत ठेवणं. कामाचा काळ कठीण असला तरी कुटुंबासोबत संवाद आणि जेवण, दररोज थोडासा तरी व्यायाम, जुन्या मित्र-मैत्रिणींना अधूनमधून तरी भेटत राहणं. हे सगळं म्हणजे मंद आचेवर चालू ठेवलेले इतर बर्नर्स.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपला प्राधान्यक्रम वेगळा असतो, किंबहुना असायला पाहिजे. २५ वर्षांच्या व्यक्तीच्या प्रायॉरिटीज वेगळ्या, ४५ वर्षांच्या व्यक्तीच्या वेगळ्या, ६० वर्षांच्या व्यक्तीच्या वेगळ्या. खरा प्रश्न हा नाहीच आहे की, ‘मी सगळं एकाच वेळी करू शकते का? ’ खरं शहाणपण हे समजण्यात आहे की आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर कुठली चूल धडधडून पेटायला हवी आणि कुठली मंद आचेवर असायला हवी. ज्या व्यक्तीला हे कळलं त्याचं आयुष्य शांत, समतोल आणि सुखी होणारच!

लेखिका : शेफाली वैद्य

प्रस्तुती : गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक  संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आयुष्यातील १९ उंटांची गोष्ट…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “आयुष्यातील १९ उंटांची गोष्ट…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

एका गावात एका व्यक्तीकडे १९ उंट होते.

एके दिवशी ती व्यक्ती मरण पावली.

त्याच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्र वाचण्यात आले.

ज्यामध्ये असे लिहिले होते की..

माझ्या १९ उंटांपैकी अर्धा हिस्सा माझ्या मुलाला, १९ उंटांपैकी एक चतुर्थांश हिस्सा माझ्या मुलीला आणि १९ उंटांपैकी पाचवा हिस्सा माझ्या नोकराला द्यावा.

अर्थात ही वाटणी कशी व्हायची, असा सर्वांचाच गोंधळ उडाला.

 १९ उंटापैकी अर्धा हिस्सा करायचा म्हणजे एक उंट कापावा लागेल.

त्यात एक कट झाला म्हणजे १८ बाकी राहिले.

त्यापैकी त्यात चतुर्थांश हिस्सा करायचा म्हणजे साडेचार होतात मग?

 सगळेच खूप गोंधळले होते.

तेवढ्यात शेजारच्या गावातून एका शहाण्याला बोलावण्यात आले.

तो शहाणा त्याच्या उंटावर बसुन आला.

त्याने समस्या ऐकून घेतली. थोडा विचार केला.

मग म्हणाला,” ठीक  आहे या १९ उंटांमध्ये माझा आणखी हा एक उंट मिसळा आणि वाटून द्या.”

प्रत्येकाला वाटले की एक निघाला मरणासन्न वेडा! जो असे मृत्युपत्र तयार करून निघून गेला आणि आता हा दुसरा वेडा निघाला आहे.तो म्हणतो की, “त्यात अजून एक माझा उंट त्यांच्यामध्ये वाटून द्या.”

तरीही मुद्दा मान्य करण्यात काय हरकत आहे. नुकसान तर नाही.

असा विचार करून सर्वांनी वाटणी करायचा निर्णय घेतला.

आता एकूण उंट १९+१=२० झाले.

२० उंटापैकी अर्धे मुलाला दिले.

उरले १० उंट.

२० उंटापैकी एक चतुर्थांश  हिस्सा मुलीला म्हणजे ५ उंट तिला दिले.

२० उंटापैकी पाचवा हिस्सा म्हणजे ४ उंट नोकराला दिले.

असे एकूण १०+५+४=१९ होतात.

त्यात एक उंट वाचला. वाचलेला उंट जो ज्ञानी माणसाचा होता, तो त्याला परत देऊन टाकला व तो त्याच्या गावी घेऊन निघून गेला.

अशा प्रकारे १ उंट मिसळल्यानंतर काय झाले तर त्यामुळे उरलेल्या १९ उंटाना सुख, शांती, समाधान आणि आनंदाने राहता आले.

त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या आयुष्यातही १९ उंट आहेत.

५ ज्ञानेंद्रिये.

(डोळा, नाक, जीभ, कान, त्वचा)

५ कर्मेद्रिंये.

(हात, पाय, जीभ, मूत्रमार्ग, गुदद्वार)

५ पंचप्राण.

(व्यान, समान, अपान, उदाम व प्राण )

आणि…

४ अंतःकरण चतुष्ट्य.

 (मन, बुद्धी, चित्त, अहंकार)

असे एकूण १९ उंट आहेत.

माणूस आयुष्यभर या १९ उंटांच्या वाटणीत अडकून राहतो.

आता त्यात अडकून न राहाता फक्त त्यात  “मित्र” रूपी उंट त्यात जोडा.! अर्थात आयुष्यात चांगला, इमानदार व सच्चा “मित्र” रूपी उंट सोबत ठेवा.

जोपर्यंत मित्ररूपी उंट आपुल्या आयुष्यात जोडत नाही. तोपर्यंत आपलेच नातेवाईक आपल्याला सुख, शांती, समाधान आणि आनंद हे मिळवून देणारच नाहीत.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “द एस्केप आर्टिस्ट” – लेखक : जोनाथन फ्रीडलँड – मराठी अनुवाद : प्रशांत तळणीकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “द एस्केप आर्टिस्ट” – लेखक : जोनाथन फ्रीडलँड – मराठी अनुवाद : प्रशांत तळणीकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : द एस्केप आर्टिस्ट

लेखक: जोनाथन फ्रीडलँड

अनुवाद : प्रशांत तळणीकर

पृष्ठे: ३८०

मूल्य: ५५०₹ 

‘द एस्केप आर्टिस्ट’ हे दुसऱ्या महायुद्धातील होलोकॉस्टच्या काळातील एका अद्वितीय धैर्यवान व्यक्तीची सत्यकथा सांगणारे हृदयस्पर्शी आणि थरारक पुस्तक आहे. या पुस्तकाचा नायक रुडॉल्फ (रुडी) व्हर्बा हा ऑशवित्झ या कुप्रसिद्ध नाझी छळछावणीत कैद असलेला तरुण ज्यू असतो. एप्रिल १९४४ मध्ये एकोणीस वर्षाचा रुडॉल्फ आपल्या फ्रेड वेत्सलर या सहकाऱ्यासह त्या अभेद्य छळछावणीतून सुटका करण्यात यशस्वी होतो.

विजेच्या तारांच्या कुंपणाखालून सरपटत आणि सशस्त्र वॉचटॉवर ओलांडून, हजारो एसएस (शुट्झस्टाफेल) सैनिक व त्यांची कुत्री यांना चुकवत, पायीपायी दलदलीचे प्रदेश, डोंगर आणि नद्या पार करत त्यांनी स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेण्यात यश मिळवलं.

त्याचे उद्दिष्ट केवळ स्वतःचा जीव वाचवणे नसून, छळछावणीतील अमानुष नरसंहाराचे सत्य संपूर्ण जगासमोर आणणे हे असते.

ज्यू छळछावणीच्या मृत्यूच्या कारखान्यामध्ये, नाझींनी अवलंबलेल्या औद्योगिक सुसूत्रतेनं नरसंहार करण्याच्या प्रक्रियेतील थरकाप उडवणाऱ्या जवळपास प्रत्येक पायरीचा व्हर्बा साक्षीदार ठरला होता. तो जसजसा एक-एक गोष्ट पाहत होता, तसतसा युरोपातील ज्यूंना त्यांच्यासमोर काय वाढून ठेवलं आहे, हे सांगून सावध करण्याचा त्याचा निर्धार अधिकाधिक पक्का होत चालला होता. विज्ञान आणि गणितामध्ये अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी असल्यामुळे, त्यानं प्रत्येक बारीकसारीक तपशील आपल्या स्मरणशक्तीमध्ये पक्के कोरून ठेवले आणि ‘फायनल सोल्यूशन’चा पहिलावहिला डेटा गोळा करण्याकरता आपलं अवघं अस्तित्वच पणाला लावलं

छावणीत असताना व्हर्बाने नाझींच्या सामूहिक हत्येच्या पद्धती, कैद्यांची संख्या आणि मृत्यूचे भयावह वास्तव यांची अचूक माहिती लक्षात ठेवली. सुटकेनंतर त्याने तयार केलेला ‘ऑशवित्झ रिपोर्ट’ हा इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक ठरला. या अहवालामुळे हजारो नव्हे तर लाखो ज्यूंचे प्राण वाचवण्यास मदत झाली.

जोनाथन फ्रिडलँड यांनी ऐतिहासिक पुरावे, संशोधन आणि प्रभावी कथनशैलीच्या साहाय्याने ही कथा अत्यंत जिवंतपणे मांडली आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ युद्धाचा इतिहास सांगत नाही, तर सत्यासाठी झगडण्याची जिद्द, मानवतेचे मूल्य आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा देते.

हे पुस्तक का वाचावे?

– – होलोकॉस्टचा सत्य इतिहास जाणून घेण्यासाठी.

– – अदम्य धैर्य आणि जिद्दीची प्रेरणादायी कथा अनुभवण्यासाठी.

– – दुसऱ्या महायुद्धातील महत्त्वाच्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी.

– – इतिहास, चरित्र आणि सत्यकथांमध्ये रस असणाऱ्या प्रत्येक वाचकासाठी.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “स्वयंप्रामाणिकता : धर्मभयापलीकडील नैतिकता” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “स्वयंप्रामाणिकता : धर्मभयापलीकडील नैतिकता☆ श्री जगदीश काबरे ☆

माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे. त्याला विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि स्वतःच्या कृतींचे परिणाम भोगण्याची क्षमता निसर्गाने दिलेली आहे. तरीही शतकानुशतके माणसाने आपल्या नैतिक आचरणाचा आधार बाहेरच्या कोणत्यातरी शक्तीवर, कोणत्यातरी भीतीवर, कोणत्यातरी परलोकाच्या कल्पनेवर ठेवला आहे. धर्मसंस्काराने माणसाला प्रामाणिक बनवता येते, असा दावा केला जातो. परंतु या दाव्यात एक मूलभूत विसंगती आहे. भीतीतून निर्माण होणारी नैतिकता ही खरी नैतिकता नसते. जो माणूस केवळ देवाची किंवा धर्माची भीती बाळगून सत्शीलपणे वागतो, तो मुळात आतून अनैतिकच असतो. अशा माणसाला इंग्रजीमध्ये otherwise gentleman असे म्हणतात. कारण त्याच्या अनैतिकतेला बाहेरून एक धार्मिक आवरण चढवलेले असते. खऱ्या नैतिकतेचा उगम भीतीत नाही, तर स्वतःच्या मनाशी असलेल्या प्रामाणिकतेत आहे.

धर्म आणि नैतिकता यांचा संबंध माणसाने युगानुयुगे गृहीत धरला आहे. धर्मग्रंथ सांगतात की चांगले वाग, नाहीतर नरक भोगशील. देव पाहतो आहे, म्हणून वाईट करू नकोस. परलोकात जाब द्यावा लागेल, म्हणून इहलोकात सावध राहा. या सगळ्या शिकवणींचा आधार एकच आहे, तो म्हणजे भीती. माणसाला त्याच्या स्वतःच्या विवेकावर विश्वास ठेवण्याऐवजी एका बाहेरच्या अदृश्य शक्तीच्या नजरेची भीती दाखवून नियंत्रित करण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु विचार करा, जेव्हा कोणी पाहत नसेल, जेव्हा देवही गाफील असेल असे वाटेल, तेव्हा या भीतीच्या आधारावर उभी राहिलेली नैतिकता टिकेल का? इतिहास सांगतो की ती टिकत नाही. धर्माच्या नावावर झालेले अत्याचार, धार्मिक माणसांनी केलेल्या अनैतिक गोष्टी, हे सगळे याचेच पुरावे आहेत.

मग स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणे म्हणजे नक्की काय तर आपल्या प्रत्येक कृतीची, प्रत्येक विचाराची, प्रत्येक निर्णयाची जाणीव ठेवणे. स्वतःशीही खोटेपणाने न वागणे. आपली प्रेरणा काय आहे, आपला हेतू काय आहे, हे स्वतःपासून लपवून न ठेवणे. जेव्हा माणूस स्वतःशीच खरा असतो, तेव्हा त्याला इतरांशीही खरे राहणे सहज शक्य होते. कारण खोटेपणा खोट्या गोष्टीची एक साखळी बनवतो. एक खोटे दुसऱ्या खोट्याला जन्म देते. पण जो माणूस स्वतःशीच पारदर्शक आहे, त्याची नैतिकता आतून येते. धर्माच्या भीतीखाली जगणारा माणूस सतत दुभंगलेल्या अवस्थेत असतो. आतून काहीतरी वेगळे वाटते, बाहेरून वेगळे वागावे लागते. मनात एक असते, बोलण्यात दुसरे. कृतीत आणखी वेगळे. या दुभंगलेपणातून माणसाला कधीही आंतरिक शांती मिळत नाही. तो सतत एका अव्यक्त अपराधभावनेच्या सावलीत जगत असतो. धर्माने सांगितलेल्या नियमांची पूर्तता करण्यासाठी तो जे करतो ते मनापासून नसते, ते केवळ दंड टाळण्यासाठी असते. अशा माणसाला नैतिक म्हणता येईल का? खरे पहाता, तो केवळ नैतिकतेचे नाटक करत असतो.

परलोकाची संकल्पना आणि त्यावर आधारित नैतिकता याबद्दलही गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. परलोक खरोखर अस्तित्वात आहे की नाही, याचा कोणताही शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही. तरीही करोडो माणसे परलोकाच्या भीतीने जगतात. स्वर्ग मिळेल म्हणून चांगले वागतात, नरकाची भीती वाटते म्हणून वाईट गोष्टी करणे टाळतात. पण हा व्यवहार आहे, नैतिकता नव्हे. ज्या माणसाला परलोकाचे बक्षीस लुभावत असते तो मुळातच नैतिक नसतोच. नैतिकता ही अटी-शर्तींवर उभारलेली नसते. खरी नैतिकता ही निःस्वार्थ असते, ती स्वतःच्या मनाशी प्रामाणिक असते म्हणून पाळली जाते, कुठल्या बक्षिसाच्या अपेक्षेने नव्हे. देवावर अंधश्रद्धा ठेवणारा माणूस हळूहळू स्वतःच्या विचारशक्तीवरचा विश्वास गमावतो. कारण त्याला सतत सांगितले जाते की, तू काहीच करू शकत नाहीस, देवाच्या इच्छेशिवाय पान हलत नाही. हे सतत कानीकपाळी पडल्यामुळे तो आपल्या स्वतःच्या क्षमतांवर शंका घेऊ लागतो. अपयश आले तर देवाची इच्छा म्हणतो, यश आले तर देवाची कृपा म्हणतो. या दोन्हींमध्ये तो स्वतःला कुठेच ठेवत नाही. मग त्याच्या आयुष्यात प्रगती होणार कशी? प्रगतीसाठी लागते आत्मपरीक्षण, स्वतःच्या चुका स्वीकारण्याची तयारी, आणि त्या बदलण्याची हिम्मत. पण जो माणूस सगळे देवावर ढकलतो, तो ही तिन्ही कारणे टाळतो.

समाजात नियम असतात, कायदे असतात. काही माणसे हे नियम केवळ पोलिसांच्या भीतीने पाळतात. काही माणसे समाजाच्या निंदेच्या भीतीने पाळतात. आणि काही माणसे धर्माच्या भीतीने पाळतात. या तिन्ही प्रकारच्या माणसांमध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे त्यांच्या वर्तनाचे मूळ भीतीत आहे. भीती हे नैतिकतेचे मूळ असू शकत नाही. भीतीतून जन्मलेली नैतिकता ही एखाद्या वाळूच्या घराप्रमाणे असते, जी थोड्याशा वाऱ्याने कोसळते. याउलट, स्वतःच्या विवेकातून, स्वतःच्या जबाबदारीच्या जाणिवेतून आलेली नैतिकता ही दगडाच्या भिंतीप्रमाणे असते. ती कोणत्याही परिस्थितीत टिकते. कारण तिचा आधार बाहेर नाही, माणसाच्या आत आहे. स्वतःची जबाबदारी ओळखणे हे प्रगल्भ माणसाचे लक्षण आहे. जेव्हा माणूस म्हणतो की, माझ्या आयुष्यात जे घडते त्याला मीच जबाबदार आहे, माझ्या चुका माझ्याच आहेत, माझे यश माझेच आहे, तेव्हा तो खऱ्या अर्थाने प्रगतीच्या दिशेने कूच करतो. कारण जेव्हा माणूस आपल्या कृतींचे परिणाम स्वतः भोगायची तयारी ठेवतो, तेव्हा तो अधिक विचारपूर्वक वागतो, तो धर्माच्या भीतीशिवायही नैतिक राहू शकतो. त्याला कोणत्या धार्मिक ग्रंथाची, कोणत्या कर्मकांडाची, कोणत्याही उपासनेची गरज लागत नाही.

विवेकी माणूस म्हणजे केवळ बुद्धिमान माणूस नव्हे. विवेक म्हणजे बुद्धी आणि भावना यांचा समतोल. विवेकी माणूस हा इतरांच्या दुःखाला संवेदनशीलतेने समजतो. तो जाणतो की माझ्या कृतींचा दुसऱ्यावर काय परिणाम होणार आहे. हे जाणणे म्हणजेच सहानुभूती, आणि सहानुभूती हे नैतिक वर्तनाचे मूळ आहे. सहानुभूती ही भीतीतून येत नाही, ती मनाच्या गाभ्यातून येते. असा माणूस धर्मभयाने वागणाऱ्या माणसापेक्षा कितीतरी पटींनी जास्त नैतिक असतो. देवावर विश्वास ठेवणे म्हणजे आपली जबाबदारी एका अदृश्य शक्तीकडे सोपवणे. पण स्वतःच्या कर्तृत्वावर आत्मविश्वास ठेवणे म्हणजे जबाबदारी स्वतः उचलणे. जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो, तो आव्हानांपुढे खचत नाही, तो स्वतःच्या चुका स्वीकारतो आणि पुन्हा त्या चुका होऊ नये म्हणून दक्ष राहतो. असाच माणूस प्रगती करतो, जीवनात अर्थ शोधतो. त्याचे नैतिक आचरण त्याच्या विकसित होत जाणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा एक घटक बनते. त्याउलट जो देवाधर्माच्या भीतीमुळे नैतिकतेने वागतो तो संधी मिळताच अनैतिक कृत्य करायला धजावतो. समाजाची रचना, लोकशाहीचा पाया, मानवी नात्यांची दृढता, हे सगळे स्वयंप्रेरित नैतिकतेवर अवलंबून असते. जर माणसे आतून नैतिक असतील, तर कोणतीही बाह्य शक्ती त्यांना अनैतिक बनवू शकत नाही.

जी मुले केवळ शिक्षेच्या भीतीने चांगली वागतात, ती मोठी झाल्यावर पालकांच्या नियंत्रणातून बाहेर गेल्यावर बिघडण्याची शक्यता जास्त असते. जी मुले नैतिकतेचे मूल्य समजून-उमजून वागतात, ती आयुष्यभर त्या मूल्यांशी बांधील राहतात. म्हणूनच मुलांना धर्माच्या भीतीने नव्हे, तर कारण-परिणामाच्या समजुतीतून नैतिकता शिकवणे हे खऱ्या अर्थाने संस्कार करणे आहे. त्यांना सांगा की, दुसऱ्याला दुखवू नका कारण त्यामुळे त्यांना वेदना होतात, देव रागावेल म्हणून नव्हे, तर त्यांना सांगा की खरे बोला कारण खोट्याने नाती मोडतात. नरकात जाल म्हणून सतशीलतेने वागू नका तर तो तुमचा अंगभूत गुणधर्म झाला पाहिजे. हे शिक्षण मुलाला आयुष्यभर पुरते. थोडक्यात, नीतिमत्तेने जगणे हा माणसाचा अंगभूत गुणधर्म बनणे हेच खऱ्या नैतिकतेचे ध्येय आहे. हे घडण्यासाठी धर्मसंस्काराची नव्हे, तर विवेकी संस्काराची गरज आहे. माणसाला स्वतःशी प्रामाणिक राहण्याची, स्वतःच्या कृतींची जबाबदारी घेण्याची, दुसऱ्याच्या वेदनांना संवेदनशीलतेने समजण्याची सवय लागणे, हेच खरे मानवी उन्नतीचे लक्षण आहे. देवाच्या भीतीखाली वाकणारा माणूस कधीही पूर्णपणे ताठ उभा राहू शकत नाही. स्वतःच्या विवेकावर विसंबणारा माणूस मात्र कोणत्याही परिस्थितीत ताठ उभा राहतो. म्हणून स्वयंप्रामाणिकता ही धार्मिक संस्कारांपेक्षा मानवी प्रगल्भतेचा, माणसाच्या खऱ्या स्वातंत्र्याचा, आणि सच्च्या नैतिकतेचा एकमेव विश्वासार्ह आधार आहे.

 

© श्री जगदीश काबरे

(लेखक समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail.com मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माझी वारी ! माझा अनुभव !”- लेख क्र. ३ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

??

माझी वारी ! माझा अनुभव ! – लेख क्र. ३ ☆ श्री संभाजी बबन गायके 

ज्ञानबा-तुकाराम गजराचे उद्गाते नारायणबाबा!

आषाढ वद्य अष्टमीला जगदगुरू संत श्री तुकोबाराय पंढरीस प्रस्थान ठेवतात आणि दुस-या दिवशी म्हणजे दशमीला कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबाराय पंढरीसाठी निघतात… हा केवळ योगायोग नव्हे!

तुकोबाराय हे ज्ञानोबारायांचे परमभक्त. माऊली ज्ञानोबारायांच्या जन्मानंतर (१२७५) नंतर ३३३ वर्षांनी (१६०८) मध्ये तुकोबाराय देहूत अवतरले. इंद्रायणी देहूतून पुढे अलंकापुरीस जाते!

तुकोबारायांच्या वैकुंठगमनानंतर चार महिन्यांनी मातोश्री जिजाऊ यांच्या पोटी नारायण जन्माला आले… तेच नारायणबाबा अर्थात नारायण महाराज. तुकोबारायांची अध्यात्मिक मिराशी समर्थपणे चालवणारे साधक. घराण्यात पिढ्यान पिढ्या चालत आलेली पंढरीच्या पायी वारीची परंपरा त्यांनीही अंगिकारली. तुकोबाराय देहाने सोबत नसले तरी अभंगरूपाने जग व्यापून उरले आहेत, अशी नारायण महाराजांची खात्री होती. पांडूरंग परमात्म्याच्या या परमभक्तास देहाशिवाय पंढरीची वारी घडवता येईल असा विचार त्यांच्या मनात आला. आणि त्यांनी तुकोबारायांना वारीत सोबत घेण्याचे ठरवले… नव्हे त्यांच्या सोबत वारीला जायचे ठरवले. त्यांनी तुकोबारायांच्या पादुका पालखीत ठेवल्या आणि देहूतून बाहेर पाऊल ठेवले… आणि मग त्यांच्या मनात आले असेल… माऊली सोबत असल्या तर? नारायण महाराज तुकोबारायांना घेऊन थेट अलंकापुरीत दाखल झाले… माउलींना आग्रह केला! आपण दोघेही विठोबाचे लाडके… तुम्ही एकत्रित पंढरीची वाट चालू लागलात तर सबंध मराठी मुलुख तुमच्या आगे-मागे चालत निघेल देवाच्या भेटीला!

पादुकांच्या रुपात आता ज्ञानोबा आणि तुकोबा विराजमान झाले… सोबत चालणा-या भोळ्या भाविकांनी या दोघांच्या नावाचा गजर एकत्रित करायला आरंभ केला आणि महाराष्ट्राला नवा सूर गवसला… ज्ञानबा-तुकाराम… ज्ञानोबा-तुकाराम! ज्यांना ज्ञानोबा हा शब्द उच्चारता येत नव्हता त्यांनी ग्यानबा म्हटलं… तुकाराम सर्वांना म्हणता येत होतंच!

ज्ञानोबा-तुकाराम हा जणू स्वयंभू मंत्र बनला ज्याची जादू आजही कायम आहे.. आणि मराठीचा श्वास असेल तोवर याचे तेज कमी होणार नाही!

काळाच्या ओघात, व्यवहाराच्या प्रवाहात ही परंपरा काही काळ स्थगित झाली… पंढरीनाथाच्या कृपेने ती पुन्हा सुरु झाली. मात्र ही नवी सुरुवात स्वतंत्र मार्गाने सुरु झाली. माऊली ज्ञानोबारायांचे निस्सीम भक्त हैबतबा आरफळकर यांनी आळंदीहून माउलींना स्वतंत्र पालखीत बसवले… राजाश्रय मिळवला… वैभव स्थापित केले… श्रीमंत झाला सोहळा… देहू आणि आळंदी येथून तुकोबा आणि ज्ञानोबा यांच्या दोन स्वतंत्र पालख्या स्वतंत्र मार्गाने एकाच लक्ष्याकडे चालू लागल्या… कालांतराने तुकोबारायांच्या सोहळ्यालाही साजेसे रूप आले… वाटेत काही ठिकाणी या पालख्या एकमेकांना भेटू लागल्या, समांतर चालू लागल्या आणि वाखरी मुक्कामी मोठ्या ओढीने एकमेकांना आलिंगन देत्या झाल्या… भजन मात्र तेच राहिले… ज्ञानोबा-तुकाराम! ज्ञानोबारायांसोबत वाटचाल करणा-या जीवांच्या मुखी एक परवलीचा शब्द रुजला… आणि रुळला… माऊली! तुकोबारायांच्या सोहळ्यातही माऊली-माऊली गजर नित्याचा झाला! गंगा आणि यमुना… विठ्ठल नावाच्या महासिंधुत एकत्रित झाल्या… आणि चंद्रभागेच्या वाळवंटी कैवल्याचं चांदणं कायमचं वस्तीला आलं!

दिंडी म्हणजे केवळ वाटचाल नव्हे. दिंडी म्हणजे ब्रम्हमुहूर्त ते सूर्यास्तापर्यंतचा आखीव-रेखीव, शिस्तबद्ध प्रवास… संतांच्या सहवासात, त्यांच्या साक्षीने आणि मार्गदर्शनाखाली होत असलेला! इथे संत म्हणजे राजे. तेच वैभव, तोच दिमाख आणि तेच राजस उपचार. शाही स्नान, हत्ती, घोडे, सैन्य, अब्दागिरी, पताका आणि नामाचा गजर! वारीत नामस्मरण हे मुख्य कर्म. त्याचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ, अनुभवी साधक म्हणजे विणेकरी! सर्वांच्या पुढे चालणारे, भजनाचे नेतृत्व करणारे आणि स्वर-ताल यांचे सूत्रसंचालन करणारे. त्यांच्या मागे दोनच्या रांगांत पुरुष वारकरी, त्यांच्या मागे महिला, त्यांच्यामध्ये डोईवर तुळशीवृंदावन धारण केलेल्या भगिनी, शिस्त आणि संरक्षणकार्यासाठी दंडधारी चोपदार. माऊली-तुकोबाराय रथात आरूढ होण्याआधी रथांच्या मागे-पुढे शिस्तीत उभे राहते दिंडी. आणि मग नित्योपचार आरंभ होतो. इथं सगळा भार शब्द आणि तालावर. साथीला टाळांचा मधुर गजर. ज्यांच्या हाती टाळ नाहीत त्यांच्या हातात टाळी! आरंभ काकड आरतीच्या अभंगांनी… मग रूपाचे अभंग… मग विषयवार, वारानुसार निवडक अभंगांचे क्रमवार गायन. चाल साधी… चालता चालता सहजी गाता यावी अशी. चरणासाठी अर्थात तुका म्हणे, नामा म्हणे, ज्ञानदेव म्हणे इथपासून स्वतंत्र चाल लावण्याची मुभा… रागदारीचा अविष्कार करण्याची संधी… गायकांना आणि श्रोत्यांना आनंद देणारी! अट एकच शब्द केवळ आणि केवळ संतांचेच असावेत. आयुष्यभर गायले तरी पुरतील अशी अभंगसंपदा आपल्याकडे आहे. तुकोबारायांचे तर हजारो. संतपंचक अर्थात ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, नाथमहाराज, निळोबाराय… यांचे अभंग अगणित. जोडीला मुक्ताई, जनाई, बहिणाई आहेतच… वाट कधी सरते समजतही नाही… उपदेश आणि वाटचाल एकमेकांच्या स्वरांत स्वर मिसळून चालत राहतात. दिंड्यांना स्वतंत्र क्रमांक दिलेले असतात. रथापासून पहिली दिंडी आणि तिच्या पुढे दोन, तीन असे वाढते क्रमांक… आणि रथामागची पहिली दिंडी… आणि त्या मागे दोन, तीन अशा क्रमाने मागे. यात कुणी हस्तक्षेप करायचा नसतो. एकामागून चालायचे. दुपारच्या भोजनाच्या विश्रांतीनंतर माऊली निघायच्या आधी सर्वांनी क्रमांकाने उभे राहायचे म्हणजे रहायचेच. चोपदार सकाळी निघताना शंखनाद करतात तसा प्रत्येक वेळी प्रवास सुरु करण्यापूर्वीही करतात. त्यांच्या हातातील दंड म्हणजे इशारा… त्यानुसार थांबावे किंवा पुढे चालावे.

मुक्कामाचे ठिकाण नजरेच्या टप्प्यात येईतोवर संपूर्ण भजनी मालिकांचे आवर्तन पूर्ण होते. यात आंधळा, पांगुळ, वासुदेव, भारुडे, गौळणी सर्व ओळीने हजेरी लावून जातात. मग अवतरतो हरिपाठ… माऊली ज्ञानोबारायांचे शब्दवैभव, विचारसंगती मिरवणारा… याची चाल ठरलेली. हरिपाठ सुरु करा असा निरोप एकमेकांना दिला जातो आणि संपूर्ण सोहळा या पाठ असलेला हरी उच्चारत वाट चालतात. समाधी संजीवन हरिपाठ… या शब्दांपाशी अवघा सोहळा काहीसा थबकतो… स्वत:भोवती एक प्रदक्षिणा घेतली जाते. एवढ्यात पालखी तळ समीप येतो. मानाचा अश्व ‘समाज आरतीचा’ आदेश घेत दौडत येतो… त्याच्यासाठी दिंड्या मधून मार्ग देत राहतात… आरतीच्या तालावर वारकरी दिवसाच्या चालीचे कष्ट विसरून जातात… माऊली, तुकोबाराय, तसेच इतर सर्व संत… नेमून दिलेल्या मुकाम्माच्या ठिकाणी जातात… वारकरी तंबू-राहुट्या शोधतात… आणि स्थिरावतात. प्रवचन सेवा होते… स्वयंपाक होत आलेला असतो… नैवेद्य जातो… भोजनाच्या पंगती पडतात… अंधार गडद होत असतो… नेमाचे वारकरी एका तंबूत हरीजागरासाठी जमा होतात… आणि पापण्या जडावलेले इतर वारकरी पुन्हा अभंगवाणी अनुभवत निद्रेच्या अधीन होतात! … उद्या नवा गाव… पण शब्द हेच… ज्ञानोबा-तुकाराम!

(नारायणमहाराज आणि हैबतबाबा यांचे उपकार डोंगराएवढे… त्यांनी स्वर्गीही नसलेला हा सुखसोहळा मराठी मातीत रुजवला… दोघेही वंदनीय. माहितीमध्ये काही त्रुटी संभवतात. सांगायचे राहून गेले असेलच… क्रमही चुकलेला असेल… पण वारी अनुभवली असल्याने काही लिहिता येते आहे.)

– लेख क्र. ३ 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “वसुली अशीही” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “वसुली अशीही…” ☆ श्री मंगेश मधुकर

गेले तीन दिवस सतत पडणाऱ्या पावसाचा जोर रात्रीपासूनच वाढलेला. सलग पाऊस असूनही आश्चर्य म्हणजे अजून लाइट गेले नव्हते. सकाळी सातची वेळ, रविवार असल्यानं बाहेर जाण्याची गरज आणि इच्छा दोन्ही नव्हतं. म्हणून निवांत होतो इतक्यात दूध संपलंय, आणावं लागेल अशी शुभवार्ता सौंकडून आली. छत्री घेऊन निघालो. धुवाधार पावसामुळे जो तो आपापल्या घरात असल्यानं सोसायटीत सामसूम मात्र गेटजवळ भर पावसात रेनकोट घालून चक्क एकजण कार धुताना दिसला. ते पाहून हसायला आलं. दिवसेंदिवस लोकांच्या वागण्यातला विचित्रपणा वाढत चाललाय. कुठं, कोण, कसं वागेल याचा नेम राहिला नाही. दूध घेऊन घरी जाताना गाडी धुणं सुरूच होतं. तुफान पावसात इमानेइतबारे गाडी धुणाऱ्याजवळ गेलो. माझ्याकडे पाहत तो हसला.

“काय झालं. असं का पाहताय”

“रागावू नका. एक विचारू” मी.

“माहितीये, काय विचारणार?”

“पावसात गाडी धुणं विचित्र वाटत नाही.”

“गाडी धुण्याचे पैसे घेतो”

“इतरवेळी ठीक आहे पण जोरात पाऊस आहे तरीही?”

“नाईलाज!!”

“म्हणजे”

“पैशेवाल्यांपुढे अक्कल चालवायची नसते”

“कळलं नाही”

“रोज गाडी धुण्याचे साहेब पैसे देतात. पावसामुळे दोन दिवस गाडी धुतली नाही”

“बरोबर केलंत”

“त्यामुळे साहेब संतापले. आता दोन दिवसांचे पैसे कट करणार असं म्हणाले म्हणून भर पावसात गाडी धुतोय.”

“साहेब, फारच हुशार दिसतायेत”

“अति…” म्हणत पावसाच्या पाण्यानं भरलेली बादली भसकन गाडीवर ओतत त्यानं राग व्यक्त केला.

– – पैसे पुरेपूर वसूल करून घेण्याची वृत्ती वाढतीये.

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७७ आणि ७८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७७ आणि ७८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ७७ — – 

करी काम नि:काम या राघवाचे ।

करी रूप स्वरूप सर्वा जिवांचे ।

करी छंद निर्द्वंद्व हे गूण गाता ।

हरिकीर्तनी वृत्तिविश्वास होता ।।७७।।

अर्थ : या राघवाच्या प्राप्तीची मनापासून कामना कर. सकल प्राणिमात्रांच्या ठायी असलेले त्याचे रूप स्वत:मध्येही पहा. त्याचे गुणगान करण्याचा छंद लागला की सारे भेद, द्वंद्व नाहिसे होतील.

(नि:काम – निष्काम होऊन/निरिच्छ वृत्तीने, निर्द्वंद्व – सुखदुःखाच्या पलीकडे जाणे /द्वैतभाव नष्ट होणे, हरिकीर्तन – परमेश्वराचे गुणगान करणे)

विवेचन : परमेश्वर प्राप्तीची इच्छा असणाऱ्या साधकाने कसे वागावे ते समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात. आपण सामान्य प्रापंचिक माणसे आहोत. आपल्या मनात निरनिराळ्या इच्छा, वासना वेळोवेळी उद्भवत असतात. जोपर्यंत वासना आहेत, तोपर्यंत परमेश्वर प्राप्ती होणार नाही. आपण परमेश्वराची प्रार्थना, ध्यान करतो ते सुद्धा मनात काहीतरी इच्छा ठेवूनच. त्यामुळे एक वेळ आपल्या त्या कामना पूर्ण होतील पण ईश्वर मात्र आपल्यापासून दूरच राहील. म्हणून इतर सर्व वासनांचा त्याग करून मला अन्य काही नको. फक्त परमेश्वर हवा आहे अशा अनन्य भावनेतून जर आपण त्याचे गुणगान केले तर त्याचा एक परिणाम असा होईल की हळूहळू आपल्या इतर वासना नाहीशा व्हायला लागतील. देहबुद्धी कमी होईल.

त्या गोष्टीचे मात्र आपल्याला सतत ध्यान लागले पाहिजे. त्याचा छंद किंवा वेड लागले पाहिजे. असे झाले म्हणजे आपल्या अंतर्यामी असणारा ईश्वर हळूहळू या विश्वात सर्वत्र विद्यमान आहे याची जाणीव होईल. तो जसा माझ्यात आहे तसाच सर्व प्राणीमात्रात देखील आहे याची जाणीव दृढ होत जाईल. तो केवळ सजीवात नसून निर्जीवात किंवा सृष्टीच्या कणाकणात त्याचे अस्तित्व आहे हे जाणवेल. भक्त प्रल्हादाचे उदाहरण आपल्याला माहिती आहे. प्रल्हादाचा पिता हिरण्यकश्यपू देवांना आपला शत्रू समजत होता. पण अशा या असुराचा मुलगा प्रल्हाद मात्र विष्णूचा भक्त होता. जेव्हा हिरण्यकश्यपूने त्याला विचारले, ” कुठे आहे तुझा ईश्वर? ” तेव्हा त्याने सांगितले की तो या सर्व चराचरात भरून राहिला आहे. मग हिरण्यकश्यपूने विचारले की या निर्जीव अशा खांबात देखील तो आहे का? तेव्हा प्रल्हादाने होय उत्तर दिले. नंतर त्याच स्तंभातून परमेश्वराने नरसिंह रूप धारण करून दुराचारी अशा हिरण्यकश्यपूचा वध केला.

पैठणच्या ब्रह्मवृंदासमोर ज्ञानदेवांनी सर्वांभूती एकच ईश्वर आहे हे रेड्याच्या मुखातून वेद वदवून सिद्ध केले. संत एकनाथांनी तृषार्त अशा गाढवाला गंगेचे पाणी पाजून त्याचा आत्मा शांत केला आणि सर्वांचा आत्मा एकच आहे याचा प्रत्यय लोकांना आणून दिला. भगवंताच्या भक्तीने या सगळ्या संतांच्या मनातील द्वंद्व नाहीसे झाले होते.

त्याप्रमाणे हरिनामाचे गुणगान केले की आपल्याही जाणिवा हळूहळू सूक्ष्म व्हायला लागतात. मनातील द्वंद्व नाहीसे होते. या जगामध्ये विविध रंग आणि रूपात तोच नटलेला आहे याचा साक्षात्कार होतो. जसे वेगवेगळ्या भांड्यात भरून ठेवलेले पाणी त्या भांड्याच्या आकारात राहते. पण पाणी एकच असते. सोन्याचे दागिने विविध प्रकारचे आणि आकाराचे असतात. पण त्यातील सोने एकच असते. त्याप्रमाणेच या विश्वात परमेश्वरच सगळीकडे भरून राहिला आहे ही जाणीव दृढ होत जाते. संत ज्ञानेश्वर म्हणतात, ” हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणचि जाहला. ” अशी साधकाची अवस्था होते. म्हणून आपण निर्वासन होऊन फक्त एका परमेश्वराचीच वासना धरावी असे समर्थांचे सांगणे आहे.

स्वसंवाद :: 

१. माझी आजची भक्ती किंवा प्रार्थना ही देवाला काहीतरी ‘मागण्यासाठी’ (सकाम) आहे, की मी केवळ त्याच्या ‘स्वरूपासाठी’ (निष्काम) त्याची आराधना करतोय?

२. संतांनी गाढवात किंवा खांबातही देव पाहिला; मी माझ्या दैनंदिन जीवनात माझ्या आजूबाजूच्या माणसांमध्ये, प्राण्यांमध्ये तोच ईश्वरी अंश पाहू शकतो का?

३. माझ्या मनातील ‘आपले-परके’, ‘चांगले-वाईट’ हे द्वंद्व किंवा भेद नष्ट व्हावेत म्हणून माझ्या ठायी रामनामाचा ‘वृत्तीविश्वास’ दृढ झाला आहे का?

४. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे “हे विश्वचि माझे घर” ही भावना माझ्या मनात रुजण्यासाठी मी माझ्या संकुचित विचारांचा ‘छेद’ (त्याग) करायला तयार आहे का?

– – – – 

श्लोक क्र. ७८ – – 

अहो ज्या नरा रामविश्वास नाही ।

तया पामरा बाधिजे सर्व काही ।

महाराज तो स्वामी कैवल्यदाता ।

वृथा वाहने देहेसंसारचिंता ।।७८।।

अर्थ : ज्या मनुष्याचा परमेश्वरावर विश्वास नाही, त्या माणसाला (पामराला) सर्व प्रकारची संकटे त्रास देतात. भगवंत महाराज म्हणजे राजांचा राजा आहे, या विश्वाचा स्वामी म्हणजे मालक आहे, तो कैवल्यदाता म्हणजे मोक्ष देणारा आहे. असा हा सर्वशक्तिमान परमेश्वर आपली काळजी वाहण्यास समर्थ असताना आपण उगाच देहाची आणि संसाराची चिंता करीत बसतो.

(पामर – क्षुद्र /हीन /दीन /दुबळा, बाधणे – त्रास होणे, कैवल्यदाता – मोक्ष देणारा, वृथा – व्यर्थ)

विवेचन : आधीच्या श्लोकात समर्थांनी श्रीरामावर निष्काम श्रद्धा ठेवून त्याचे नामस्मरण केल्यास मनातील द्वंद्व नाहीसे होते. सर्व जीवांच्या मध्ये तो एकच परमात्मा व्यापून राहिला आहे असा साक्षात्कार होतो असे सांगितले आहे. या श्लोकात ज्याचा रामावर विश्वास नाही अशा माणसाचा खरपूस समाचार समर्थ घेतात. अशा माणसाला ते पामर म्हणतात. पामर म्हणजे क्षुद्र, हीन. गरीब आणि पामर यात फरक करता येतो. गरीब माणूस आपल्या कर्तृत्वाने स्वतःची उन्नती करून घेऊ शकतो. पामर हा त्या दृष्टीने महामूर्ख म्हणावा लागेल. कारण आपले हित कशात आहे हे त्याला कळत नाही. ज्यांची परमेश्वरावर श्रद्धा नाही, अशा माणसांना समर्थ पामर म्हणतात. मग तो ऐहिक दृष्ट्या भलेही श्रीमंत असेल, पण पारमार्थिक दृष्ट्या अभागी आणि हीन दीन.

असा माणूस आर्थिक दृष्ट्या भलेही सधन असेल पण प्रपंचात येणाऱ्या संकटांनी तो खचून जातो. प्रपंचातील संकटांचे तडाखे भल्याभल्यांना सोसवत नाहीत. छोट्यामोठ्या गोष्टींनीही अशी माणसे विचलित होतात. समर्थांच्या शब्दात सांगायचे तर अशा माणसांना संसार आणि त्यातील अडचणी बाधक ठरतात. पण ज्यांची रामावर श्रद्धा आहे, अशा माणसांना प्रपंचातील संकटे विचलित करीत नाहीत. त्यांना संकटे येत नाहीत असे नाही. पण भगवंतावर सर्व भार टाकल्यामुळे त्यांना अशा गोष्टींचा त्रास होत नाही.

या श्लोकात भगवंताच्या गुणांचे वर्णन करताना समर्थ तीन विशेषणे वापरतात. तो ‘महा ‘राज आहे, स्वामी आहे आणि कैवल्यदाता आहे. महाराज म्हणजे महान राजा. राजांचा राजा. रामराज्य होऊन आज हजारो वर्षे लोटली तरी रामराज्याची कल्पना आजही लोकांना भावते. रामराज्य म्हणजे आदर्श राज्य होते. राम हा आदर्श राजा. दुसरी गोष्ट म्हणजे तो या चराचराचा स्वामी आहे. इंग्रजी शब्द वापरायचा तर तो ‘ सुप्रीम पॉवर ‘ आहे. या विश्वाचा निर्माता, पालनकर्ता आणि संहारकर्ता तोच आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तो कैवल्यदाता आहे. कैवल्यदाता म्हणजे मुक्ती किंवा मोक्ष देणारा. ज्याने ज्याने रामनाम घेतला, तो तरून गेला. मग तो वाल्या कोळी असेल, भक्त प्रल्हाद असेल, रामनाम घेणारी शबरी असेल किंवा अहिल्या असेल. हनुमंत आणि बिभीषण हे रामाचे भक्त तर चिरंजीव झाले.

थोडक्यात सांगायचे झाले तर श्रीराम म्हणजे कल्पवृक्ष आहेत. कल्पवृक्ष हा इच्छिलेले देणारा असतो. त्याच्या सावलीत बसून आपण काय मागायचे हे आपल्यावर आहे. तो आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती देणारा आहे. कैवल्य प्रदान करणारा आहे. असा हा भगवंत आपल्या पाठीशी असताना आपण देहाची आणि संसाराची व्यर्थ चिंता वाहत असतो. माझे कसे होईल, माझ्या मुलाबाळांचे, नातवंडांचे कसे होईल अशी चिंता आपण करीत बसतो. तर कोणाला या जगाचे कसे होईल अशा प्रकारची चिंता. अशा अनेक प्रकारच्या चिंतांनी सामान्य माणूस गोंधळून जातो.

समर्थ म्हणतात, ‘ मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. ‘ प्रारब्धानुसार जे घडायचे असते, ते घडणारच असते. आपण मात्र व्यर्थ चिंता करीत बसतो. त्यापेक्षा आपण त्याच्यावर विश्वास ठेवून सर्व भार त्याच्यावर सोपवावा. याचा अर्थ मात्र असा नाही की आपल्या वाट्याला आलेले कर्म न करता स्वस्थ बसायचे. अर्जुनाला कर्तव्यप्रवण करण्यासाठीच तर भगवंताने गीता सांगितली ना! तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्या वाट्याला आलेले निहित कर्म उत्तम प्रकारे करावे. तोच पुरुषार्थ आहे. इतर गोष्टी परमेश्वरावर सोपवाव्यात. तुकाराम महाराज म्हणतात, “घालू देवासीच भार, देव सुखाचा सागर. “मग देहाच्या आणि प्रपंच्याच्या चिंता आपल्याला सतावणार नाहीत.

स्वसंवाद :: 

१. “माझे कसे होईल? माझ्या कुटुंबियांचे कसे होईल? ” या विचारसरणीत अडकून मी समर्थांनी म्हटल्याप्रमाणे प्रपंचाची ‘वृथा’ (व्यर्थ) चिंता करत बसलो आहे का?

२. संकटाच्या काळात मी एका ‘पामरा’सारखा विचलित होऊन खचून जातो, की भगवंतावर संपूर्ण भार टाकून खंबीरपणे परिस्थितीचा सामना करतो?

३. कल्पवृक्षाप्रमाणे असणाऱ्या श्रीरामाच्या चरणी आल्यावर मी त्याच्याकडे केवळ तात्पुरती ऐहिक सुखे मागत आहे, की चिरंतन शांती आणि मोक्षाची आस धरतो आहे?

४. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, “देव सुखाचा सागर” आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे का? मी माझे निहित कर्म करून उरलेला भार त्याच्यावर सोपवायला शिकलो आहे का?

– क्रमशः श्लोक श्लोक ७७ आणि ७८

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “अवयवदान…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “अवयवदान…”  ☆ श्री सुनील देशपांडे ☆

जुलै महिना हा अवयवदान प्रबोधन महिना म्हणून नोटो म्हणजेच भारत सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केला आहे. त्यानिमित्ताने एक लेख – – जास्तीत जास्त लोकांमध्ये तो पसरवून लोकांना अवयवदानाबाबत जागृत करण्यासाठी मी सर्वांना आवाहन करीत आहे.

आपलं शरीर हे एक अजब असं स्वयंचलित यंत्र आहे. सदर यंत्रामध्ये दोन केंद्रे आहेत. त्यातलं एक ऊर्जा केंद्र आणि दुसरं आज्ञा केंद्र. या ऊर्जा केंद्राला आपण हृदय असे म्हणतो आणि आज्ञा केंद्राला आपण मेंदू असे म्हणतो. या दोन्ही केंद्राद्वारे आपल्या शरीरातील सर्व व्यवहाराचे नियंत्रण होत असते. आपल्या शरीराचे वेगवेगळे भाग असतात. जसे की हात, पाय, डोकं, नाक, कान, डोळे वगैरे. या सर्व शरीराच्या भागांना अवयव असे म्हणतात. आत्ता मी सांगितले ते सर्व शरीराचे बाह्य अवयव आहेत. त्याचप्रमाणे शरीराच्या आत मध्ये विविध भाग असतात उदा. यकृत, जठर, फुफ्फुस, हृदय, मूत्रपिंड, स्वादुपिंड, वगैरे. या सर्व शरीराच्या आत मध्ये असलेल्या भागांना अंतर्गत अवयव असे म्हणतात. आपलं संपूर्ण शरीर हे बाह्य अवयव आणि अंतर्गत अवयव यांचे द्वारे बनलेले असे अजब यंत्र आहे.

यंत्राचा जेव्हा एखादा भाग बिघडतो तेव्हा यंत्रातला तो भाग काढून दुसरा भाग बसवून ते यंत्र पुन्हा चालू केले जाते. यंत्राचे सुट्टे भाग कंपन्यांकडून विकत मिळतात. त्यामुळे यंत्राचा बिघडलेला भाग दुसऱ्या भागाने बदलून ते यंत्र पुन्हा कार्यरत करता येते. परंतु शरीर हे एक असे अजब यंत्र आहे की त्या यंत्राचा कोणताही भाग कोणत्याही कारखान्यात किंवा शरीराबाहेर कोठेही तयार होत नाही किंवा तयार करून मिळत नाही. शरीराचा भाग हा मानवाच्या शरीरातच तयार होतो आणि तो शरीरातच उपलब्ध असतो.

वर्षानुवर्षे मानवाच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात बऱ्याच वर्षांपूर्वीपर्यंत मानवाच्या शरीरातला एखादा भाग बिघडला की मानवाचे आयुष्य संपून तरी जाते किंवा त्या मानवाला अपंगत्व किंवा काहीतरी शारीरिक कमतरता निर्माण होते.

बिघडलेल्या अवयवामुळे निर्माण होणारी कमतरता अथवा मृत्यू ही गोष्ट असाहाय्यपणे सहन करण्याशिवाय त्या माणसाकडे व त्याच्या कुटुंबीयांकडे पर्याय राहिलेला नसतो.

परंतु आधुनिक वैद्यकशास्त्राने यातील अनेक व्याधींवर संशोधन करून त्यामध्ये नवीन उपचार पद्धती निर्माण केली आहे त्या उपचार पद्धतीला अवयव प्रत्यारोपण असे म्हणतात.

प्रत्यारोपण म्हणजे खराब झालेल्या अवयवाच्या ठिकाणी तो अवयव काढून दुसरा चांगला अवयव बसवणे. परंतु त्यासाठी दुसरा चांगला अवयव उपलब्ध असणे आवश्यक असते आणि आपण पाहिलेच आहे की कोणताही मानवी अवयव कोणत्याही दवाखान्यात किंवा कारखान्यात बनविता येत नाही. तो दुसऱ्या माणसाच्या शरीरातूनच उपलब्ध झाल्यास, तेही चांगल्या गुणवत्तेचा अवयव उपलब्ध झाल्यास खराब झालेल्या अवयवाच्या जागी बदलून बसवता येतो. पण हे कसं घडणार? त्यासाठीच आवश्यक आहे ते म्हणजे ‘अवयवदान’

अवयवदान म्हणजे आपल्या शरीरातील चांगल्या अवयवाचे दुसऱ्याच्या शरीरातील खराब अवयवाच्या ठिकाणी बसवण्यासाठी आपल्या चांगल्या तऱ्हेने कार्यरत असलेल्या अवयवाचे दिलेले दान. हे अवयवदान दोन प्रकाराने करता येते

एक जिवंतपणी आणि दुसरे मृत्यूनंतर.

आता आपण त्याचा उहापोह करूया.

कोणताही अवयव मला माझ्या जगण्यासाठी माझ्या शरीरामध्ये उपलब्ध असावा लागतो. तो नसल्यास माझ्या जीवनाचे काय होईल? आणि त्यामुळे मी एखादा अवयव जिवंतपणे कसा बरे देऊ शकेन? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

जिवंतपणी कोणतीही व्यक्ती आपल्या जवळच्या नातेवाईकांना काही अवयवांचे दान करू शकते ते अवयव म्हणजे

१) दोन पैकी एक किडनी म्हणजेच मूत्रपिंड.

२) लिव्हरचा म्हणजेच यकृताचा काही भाग.

३) फुफ्फुसाचा काही भाग,

४) स्वादुपिंडाचा काही भाग,

५) आतड्याचा काही भाग.

६) गर्भाशय

कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य एका किडनी वर म्हणजेच मूत्रपिंडावर व्यवस्थित व्यतीत होऊ शकते. त्यामुळे एक किडनी दान केल्याने त्याला कोणताही शारीरिक धोका संभवत नाही. त्याच प्रमाणे इतर ज्या अवयवांचे काही भाग आपण दुसऱ्या शरीरात प्रत्यारोपित करतो ते अवयव दोन्ही शरीरात काही कालावधीनंतर पूर्ण आकार धारण करून संपूर्ण पणे कार्यरत होतात. तशी शक्यता असेल तरच डॉक्टर अशा अवयवांचा काही भाग काढून घेण्यास मान्यता देतात. त्यामुळे एखाद्याच्या शरीरातून असे काही भाग काढून घेतल्यास त्याला पुढील आयुष्यात कोणताही शारीरिक धोका संभवत नाही.

एखाद्या स्त्रीचे गर्भाशय चांगल्या रीतीने कार्यरत असून त्या स्त्रीला पुढे मूल नको असल्यास त्या स्त्रीच्या शरीरातून गर्भाशय काढून ज्या स्त्रीच्या शरीरात गर्भाशय नाही किंवा असलेले गर्भाशय नीट कार्यरत होऊ शकत नाही अशा स्त्रीच्या शरीरात ते प्रत्यारोपित करता येते व त्यामुळे त्या स्त्रीला मूल होऊ शकते.

जिवंतपणी वरील प्रमाणे सर्व अवयव दान करून गरजू रुग्णाच्या आयुष्यात आनंद फुलवता येतो आणि दात्याला कोणताही शारीरिक धोका नसतो हे जाणून घेतले पाहिजे.

यातील दुसरा भाग म्हणजे मृत्यूनंतरचे अवयवदान.

अनेक वर्षापासून मृत्यूची व्याख्या ही हृदयक्रिया बंद पडल्यानंतर मृत्यू होतो अशीच आहे. त्यामुळे सहसा हृदयक्रिया बंद पडली की मृत्यू आला अशी व्याख्या केली जायची. सर्व धर्मांनी ही हृदयक्रिया बंद पडल्याने मृत्यू होतो अशीच मृत्यूची व्याख्या केली होती. परंतु आपण या लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे. आपल्या शरीराची दोन नियंत्रण केंद्रे असतात त्यातील पहिले हृदय असते. परंतु दुसरे एक नियंत्रण केंद्र म्हणजे मेंदू. ज्याप्रमाणे हृदय बंद पडल्यानंतर मनुष्याचा मृत्यू होतो त्याचप्रमाणे मेंदू बंद पडल्यानंतरही माणसाचा मृत्यू निश्चित असतो. म्हणूनच मृत्यू दोन प्रकारचे असतात हे आता आधुनिक विज्ञानाने सप्रयोग सिद्ध केलेले आहे. हृदयाचा मृत्यू आणि मेंदूचा मृत्यू – – – 

– – हृदयाचा मृत्यू झाल्यानंतर फक्त तीन मिनिटांमध्ये शरीरातील सर्व अंतर्गत अवयव बंद पडतात आणि पूर्णपणे निरुपयोगी ठरतात. परंतु बाह्य अवयवांपैकी नेत्र आणि त्वचा या दोन अवयवांच्या बाबतीत अपवाद ठरू शकतो. मृत्यूच्या घटकेनंतर साधारणपणे सहा तासापर्यंत हे अवयव खराब होत नाहीत. अर्थात सर्वसामान्यांच्या भाषेत रूढ झाले म्हणून जरी आपण त्यांना अवयव म्हणत असलो तरी तांत्रिक शास्त्रीय भाषेत त्यांना उती म्हणजेच टिशू असे संबोधले जाते. या टिशूंचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा रक्ताशी संबंध नसतो त्यामुळे कोणत्याही माणसाच्या टिशू कोणाही माणसाच्या शरीरास प्रत्यारोपण करता येतात त्यासाठी रक्तगट जुळण्याची आवश्यकता नसते….. त्यामुळे मृत शरीरामधील कॉर्निया व त्वचा म्हणजेच स्किन हे दोन टिशूवर्गीय अवयव मृत्यूनंतर सहा तासाच्या आत काढून घेऊन दुसऱ्याच्या शरीरावर प्रत्यारोपण करण्यासाठी वापरता येतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला अवयवदान करायचे असल्यास त्याच्या मृत्यूनंतर किमान नेत्र व त्वचा दान करता येतेच…… शरीराचे अंतर्गत अवयव मात्र एका विशिष्ट परिस्थितीमध्येच प्रत्यारोपणासाठी उपयोगी ठरू शकतात आणि त्या परिस्थितीतच ते दान करता येतात. त्याबद्दल आपण विस्तृत चर्चा करू.

कल्पना करा की माझा अपघात झालेला आहे आणि त्या अपघातामध्ये माझ्या मानेला जोराचा मार बसलेला आहे आणि मी बेशुद्ध असून मला दवाखान्यात ऍडमिट केलेले आहे. या परिस्थितीत ऍडमिट केल्या केल्या कोणत्याही दवाखान्यामध्ये डॉक्टर प्रथम पेशंटला अति दक्षता विभागात ठेवून त्याला व्हेंटिलेटर लावतात. कारण त्याच्यावर उपचार करत असताना मधूनच त्याचा श्वास बंद पडू नये याची काळजी घेण्यासाठी हा व्हेंटिलेटर लावला जातो. व्हेंटिलेटर हे एक कृत्रिम श्वसन यंत्र असते आणि या यंत्रांमुळे माणूस स्वतः श्वसन करण्यास सक्षम नसेल तर या यंत्राद्वारे कृत्रिमरीत्या त्याचा श्वासोच्छ्वास चालू ठेवता येतो. जर श्वासोच्छ्वास चालू असेल तरच हृदयाचे कार्य चालू ठेवता येते. अशा परिस्थितीत डॉक्टर जेव्हा रुग्णावर उपचार करत असतात त्यावेळी जर पेशंटची मानेच्या मागील बाजूस असलेली ब्रेन स्टेम म्हणजेच मेंदूस्तंभ नावाची ही कांडी तुटलेली असेल तर पेशंटचा मेंदूशी संपर्क पूर्णपणे नष्ट होतो. तसेच जर डोक्याच्या कवटीला मार लागला असेल आणि मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला असेल तरीही मेंदूचे कार्य बंद पडू शकते.

अपघात न झालेल्या रुग्णाला सुद्धा जर ब्रेन हॅमरेज मुळे मेंदूत रक्तस्त्राव झाला असेल तर.

म्हणजेच कोणत्याही कारणामुळे एकूणच शरीराचा मेंदूशी संपर्क तुटणे किंवा मेंदूचे कार्य रक्तस्त्राव होऊन बंद पडणे या दोन्ही स्थितीला ब्रेन डेड म्हणजेच मेंदू मृत्यू किंवा मस्तिष्क स्तंभ मृत्यू असे संबोधले जाते. सर्वसामान्यांच्या भाषेत मेंदू मृत्यू असे आपण म्हणू शकतो.

ही स्थिती अत्यंत महत्त्वाची असते यावेळी मेंदूचे कार्य बंद असले तरीही व्हेंटिलेटर चालू असल्याने रुग्णाचा श्वासोच्छ्वास कृत्रिमपणे का होईना चालू असतो, त्यामुळे हृदयक्रिया चालू असते. त्यामुळे माने खालील सर्व शरीर हे रक्ताभिसरणामुळे जिवंत आहे असे वाटण्याची शक्यता असते. छातीमध्ये हृदयाची धडधड स्पष्टपणे दिसू शकते पण तरीही मेंदू मृत झालेला असेल तर व्हेंटिलेटर काढल्या काढल्या त्या रुग्णाचा मृत्यू 100% निश्चित असतो. म्हणजेच ब्रेन डेड याचा अर्थ जिवंत सदृश्य मृत्यू असेही आपण म्हणू शकतो.

हा खरा मृत्यू आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी अपनी या नावाची एक टेस्ट असते ही टेस्ट चार डॉक्टरांची सरकार नियुक्त समिती सहा तासाच्या अंतराने दोन वेळेला करते. दोन्ही वेळेला ती टेस्ट पॉझिटिव्ह आली तर या समितीतर्फे त्या रुग्णास ब्रेन डेड असे घोषित केले जाते. ब्रेन डेड म्हणजे शंभर टक्के मृत्यूच.

अशा जिवंत सदृश्य मृत्यू परिस्थितीमध्ये माने खालील शरीरामधील सर्व अंतर्गत अवयव कार्यरत असतात. सामान्य यांत्रिक भाषेत म्हणायचे तर ते वर्किंग कंडिशन मध्ये असतात. असे कार्यरत अवयवच फक्त एका शरीरातून काढून दुसऱ्या शरीरात प्रत्यारोपित करता येतात.

याचा अर्थ असा रुग्ण मृत्यूशयेवर हॉस्पिटल मधील आयसीयू मध्ये असल्यास व डॉक्टरांच्या समितीने त्याला ब्रेन डेड घोषित केले असल्यास मगच त्याचे अवयव प्रत्यारोपणासाठी उपलब्ध होऊ शकतात. परंतु त्याही परिस्थितीत ब्रेनडेड रुग्णाच्या वारसांनी अवयव प्रत्यारोपणासाठी मान्यता दिलेली असणे कायद्याने आवश्यक असते.

– – – आता आपण असे समजू की वरील सर्व परिस्थिती सकारात्मक आहे. जेव्हा असे असेल तेव्हा शरीरातील अनेक अवयव प्रत्यारोपणासाठी उपलब्ध असतात. डॉक्टर त्यातील कोणकोणते अवयव योग्य स्थितीत आहेत ते पाहून मगच कोणते अवयव प्रत्यारोपित करावयाचे हे ठरवतात. परंतु सर्वसाधारणपणे जर सर्व अवयव सुस्थितीत असतील तर प्रामुख्याने पुढील अवयव हे मृत्युपंथाला लागलेल्या रुग्णाचे प्राण वाचवू शकतात म्हणून त्यांना लाइफ सेविंग किंवा प्राण रक्षक अवयव असे म्हणतात ते मुख्यतः पुढील प्रमाणे हृदय, फुफ्फुसे, यकृत, स्वादुपिंड, दोन्ही किडनी म्हणजेच मूत्रपिंडे.

परंतू त्याशिवायही आतडी, गर्भाशय, रक्तवाहिन्या, कानाचे ड्रम, हृदयाची झडपे, हाडे, कूर्चा, बोन मॅरो वगैरे तसेच बाह्य अवयवांपैकी दोन्ही डोळे, त्वचा, दोन्ही हात वगैरे असे एकूण 50 पेक्षा जास्त अवयव आणि मुख्यतः उती म्हणजेच टिशू प्रत्यारोपणासाठी उपयोगी पडू शकतात. त्यामुळे प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी विशेषत: वारस नातेवाईकांनी जर अवयवदानास संमती दिली, तर अनेक रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो. आपल्या देशात दरवर्षी पाच लाख रुग्णांचा मृत्यू हा त्यांना प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध न झाल्याने होत असतो. यातले कित्येक मृत्यू आपण फक्त आपल्या संकल्पाने आणि आपल्या वारस नातेवाईक यांनी केलेल्या संकल्पपूर्ती ने आपण वाचवू शकतो.

आज आपण अवयवदान / देहदानाचा संकल्प करूया आणि या संकल्पाची माहिती आपल्या कुटुंबियांना आणि मित्र व नातेवाईक यांना देऊन त्यांनाही या कार्यात सहभागी करून घेऊया. या माणुसकीच्या कार्यासाठी आपल्याला सजग राहता येईल आणि अनेकांचे प्राण वाचवले याचे पुण्य पदरी पाडून घेता येईल.


लेखक : सुनील देशपांडे

उपाध्यक्ष, दि फेडरेशन ऑफ ऑर्गन न्ड बॉडी डोनेशन.

संचालक, मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन.

मो  ९६५७७०९६४०

ईमेल : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पावसाचे थेंब..!  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆

श्री मिलिंद जांबोटकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ पावसाचे थेंब..!  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर 

ते पावसाचे थेंब ना… शेवटी एका ओळीत बसले….

शाळेतल्या बाई वर्गात आल्या की एका क्षणात कसा सगळा कल्ला थांबतो आणि सगळी मुलं एका रांगेत उभी राहतात, अगदी तसं…

 

मी गंमत म्हणून त्यातल्या एका थेंबाला विचारलं,

 “काय रे… सरीबाई ओरडल्या का?”

थेंब हसला. पानाच्या टोकावरून किंचित डोलला. मग म्हणाला,

“नाही हो… सरीबाई ओरडत नाहीत कधीच. त्या फक्त शिकवतात.”

मी चकित झाले…

तो पुढे म्हणाला,

“आम्ही आकाशातून उतरताना प्रत्येकजण आपापल्या मनाचे राजे असतो. कुणाला वाऱ्याबरोबर उधळून जायचं असतं, कुणाला मातीला कवटाळायचं असतं, कुणाला नदी व्हायचं असतं… पण जेव्हा एखाद्या पानावर येऊन विसावतो ना,तेव्हा कळतं— एकट्याने चमकण्यात फारसा अर्थ नसतोच . सोबत बसण्यात वेगळंच सौंदर्य असतं.”

 

त्याच्या त्या वाक्याने माझ्या मनात कितीतरी आठवणी हलक्या सरींसारख्या बरसू लागल्या.

लहानपणी आपणही असेच होतो ना… एकाच बाकावर बसणारे, एकाच डब्यातला घास वाटून खाणारे, शिक्षा झाली तर एकत्र उभे राहणारे. मोठं होत गेलो आणि प्रत्येकाने आपापल्या दिशेने वाहायला सुरुवात केली. कुणी यशाच्या डोंगरावर जाऊन थांबलं, कुणी जबाबदाऱ्यांच्या वाळवंटात हरवलं, कुणी गर्दीत असूनही एकटं पडलं.

 

थेंब पुन्हा म्हणाला,

“रांग म्हणजे शिस्त नाही गं…  रांग म्हणजे दुसऱ्याला जागा देण्याची संस्कृती. स्वतःचं अस्तित्व जपतानाही दुसऱ्याच्या अस्तित्वाला धक्का लागू न देण्याचं नाव रांग.”

मी त्या पानाकडे पाहिलं.

प्रत्येक थेंब स्वतंत्र होता. प्रत्येकाचं प्रतिबिंब वेगळं होतं. तरीही कुणी कुणाला ढकलत नव्हतं. कुणी दुसऱ्यापेक्षा मोठं दिसायचा प्रयत्न करत नव्हतं. सगळे एका अदृश्य मर्यादेचं भान ठेवून शांत बसले होते.

किती विलक्षण आहे निसर्ग!

जिथे माणसाला शिस्त शिकवण्यासाठी नियम लिहावे लागतात, तिथे पाण्याचा प्रत्येक थेंब कोणतंही पुस्तक न वाचता जगण्याचं तत्त्वज्ञान जगत असतो.

थेंब शेवटी अलगद म्हणाला,

“आम्ही पडतो ना म्हणून झाडं हिरवी राहतात. आम्ही थांबतो ना म्हणून पानं सुंदर दिसतात. आणि आम्ही निघून जातो म्हणून पुन्हा नव्या सरींना जागा मिळते. आयुष्याचं रहस्य एवढंच आहे— वेळ आली की बरसायचं, वेळ आली की थांबायचं, आणि वेळ झाली की शांतपणे निघून जायचं.”

एवढं बोलून तो थेंब अलगद पानाच्या टोकावरून निसटला…तेंव्हा

मातीने त्याला मिठीत घेतलं.

आणि मला जाणवलं—

शाळेतल्या बाई खरंच ओरडत नसत. त्या फक्त मुलांना एकत्र उभं राहायला शिकवत असत.

बहुतेक… पावसाच्या सरीबाईही तेच शिकवतात.

एकटं चमकणं म्हणजे मोठेपण नसतं;

एका ओळीत, एका मनाने, एकमेकांना न ढकलता जगणं— हीच खरी जीवनाची शाळा असते.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती: श्री मिलिंद जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “युद्ध, इतिहास, आणि मी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “युद्ध, इतिहास, आणि मी …” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

युध्द म्हंटल कि ते करण्यापूर्वी, आणि झाल्यावर त्याचा अभ्यास होतो, नाहीतर करावा लागतो. अगोदर युध्द करायचं का, कसं, कधी असा विचार करणारे अभ्यास करतात. आणि नंतर झालेलं युध्द का, कसं, किती दिवस झालं आणि त्याचे परिणाम याचा अभ्यास विचारवंत करतात. पण विद्यार्थ्यांच तस नसतं. त्यांना मात्र दोघांनी केलेला अभ्यास अभ्यासावा लागतो. युध्दाचे चांगले वाईट परिणाम नंतर दिसतातच. पण वाईट परिणाम मात्र बर्‍याच काळापर्यंत चांगलेच दिसतात. चांगल दिसणं, आणि वाईट परिणाम चांगलेच दिसणं यातला फरक स्पष्ट होतो.

माझ्या जन्माअगोदर, नंतर, मला समजायला लागेपर्यंत नक्की किती युध्द झाली हे सांगता आलं नाही तरी शाळेत वरच्या वर्गात जात होतो तस छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या युध्दापासून दुसर्‍या महायुद्धाचा अभ्यास होता. जसजसं वरच्या वर्गात जात होतो तसतशी लुटुपूटूची लढाई घनघोर युध्दाच रुप धारण करायची. बर्‍याचदा यांच्या सनावळी, तह, आक्रमण, आपापसात ठरलेल्या काल्पनिक रेषा यांचा वास्तवाशी संबंध वाटलानाही तरीही युध्दपातळीवर अभ्यास केला होता.

निजामशहा, आदिलशहा, शाहिस्तेखान, अफझलखान यांच्या काळात घोडदळ, पायदळ, तलवार, भाला, दाणपट्टा, गनिमीकावा यांच्या सहाय्याने खेळलेलं युध्द, नंंतर विमानाने हिरोशिमा, नागासाकीवर केव्हा बाॅॅम्ब टाकून गेले ते लक्षातच आलं नाही.

पेशव्यांनी अटकेपार झेंडा फडकवला असेल, पण आम्ही इतिहासात पास झालो की आमचा झेंडा डौलायला लागायचा आणि वर्ष पार पडायचं.

या व्यतिरिक्त दोन युध्द, यांचा अभ्यास करावा लागला नाही तरी अभ्यासाइतकेच प्रश्न त्या बाबतीत विचारले जायचे. ही युध्द म्हणजे अर्थातच रामायण आणि महाभारत. रामायणात प्रभु श्रीराम व रावण यांच्यात, म्हणजे दोन वेगवेगळ्या राजांमधे युध्द झाल होतं. पण महाभारतात झालेलं युध्द मात्र नातेवाईकांमधलच होत. आणि इतिहासात कमी मार्क मिळाले की त्या कमी मिळालेल्या मार्कांवरुन घरात वाक् युध्द सुरु व्हायचं. म्हणजे इतिहासावरुनच घरात महाभारत घडायचं. थोडक्यात महाभारतातली आपसात लढाई करायची परंपरा कमी मिळणार्‍या मार्कांमुळे पुढे घरात सुरुच राहिली. युध्दात सामान्य जनता विनाकारण होरपळते तसंच यांच्या युध्दाचा आमचा अभ्यास कमी झाल्याने शाब्दिक चटके बसायचे. यानंतर धर्मयुद्ध, गृहयुध्द, वाक् युध्द, शीतयुद्ध असे युध्दाचे उपप्रकार असतात हे लक्षात आलं.

मावळ्यांंनी लढाईत झालेले वार अंगावर झेलले. आम्ही इतिहासामुळे झालेले वार पाठीवर झेलले. पाठीवर वार करणं भ्याडपणाच लक्षण समजल जात असेल, पण आमच्या बाबतीत सगळेच निधड्या छातीने सहसा पाठीवरच वार करायचे. आणि त्यात कोणालाही म्हणजे वार करणारा आणि झेलणारा यांना भ्याडपणा वाटालाच नाही. आता आपल्या पाठीवर वार होणार हे समजायचं. मावळ्यांकडे वार चुकवायला ढाल असेलही. पण आमची पाठ मात्र ढोल वाजवल्यासारखी बदडली जायची. थोडक्यात इतिहास शिकवला तेव्हा आम्ही कुंभकर्णासारखे झोपलो होतो. आणि जाग आली तेव्हा इतिहास घडून गेला होता, आणि मिळालेले मार्क आमचा अभ्यासाचा इतिहास सांगायला सिध्द होते.

रामायण, महाभारत यात वाली, सुग्रीव, अंगद, जांबुवंत, बिभीषण, द्रोणाचार्य, भिष्म, विदुर, शकुनी, युधिष्ठिर, दुर्योधन, दुश्यासन आणि इतर… यांच्या नावाचा गोंधळ व्हायचा. तर नंतर जर्मन, ईटली, पोलंड, रशिया, अमेरिका, जापान, चिन या देशांपैकी मित्र कोण आणि शत्रु कोण याच्यात गोंधळ व्हायचा. याच गोंधळामुळे आम्ही एक वेगळा इतिहास तयार करायचो आणि त्यावर परत मार मिळायचा.

युध्द म्हंटल की वैर हिच भावना लक्षात येते. पण आमचे सर म्हणायचे तुमच्या अभ्यासासाठी दुसरं महायुद्ध फक्त तोंडओळख आहे. युध्दाची तोंडओळख करायची काय गरज. नंतर काय आपसात चहापाण्याचा कार्यक्रम करायचा होता… पण ही तोंडओळखसुध्दा जुलूमाचा रामराम केल्यासारखी वाटायची. पण यातली दोस्तराष्ट्र ही संकल्पना जवळची वाटली. कारण असेच कमी मार्क मिळालेले आम्ही काहीजण एकत्र आलो, आणि नंतर एकमेकांचे दोस्त बनलो. आणि ही दोस्ती कायम राहिली. आजही गोलमेज परिषदेसारखं चर्चा करायला आम्ही टेबलवर एकत्र येतो. चर्चा वेगळ्या गोष्टींवर असली तरी त्यात शाळेचा इतिहास व सध्या सुरु असलेली युध्द हा विषय डोकावतोच.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares