मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ घटा घन घोर घोर — एक आठवण ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ घटा घन घोर घोर — एक आठवण ☆ श्री दिवाकर बुरसे

 चाळीस – पंचेचाळीस वर्षापूर्वीची गोष्ट. पुण्यात लक्ष्मी क्रीडा मंदिरात, एका पावसाळ्यातल्या शनिवारी रात्री ९ वा. पंडित भीमसेन जोशींचा “पावसाळी राग”हा गायनाचा कार्यक्रम ठरविला होता. प्रवेश मूल्य रु ३/-फक्त!

शुक्रवार सकाळपर्यंत केवळ बावीस तेवीस प्रवेशिका विकल्या गेल्या होत्या. या कार्यक्रमात आपण सपाटून मार खाणार याचा अंदाज ठेकेदाराला आला. त्याने दुपारीच आण्णांचे घर गाठले. मी त्याच्याबरोबर होतो. आण्णांच्या अंगात ताप होता. गाणं होईल की नाही अशी शंकाच होती. ठेकेदाराने त्यांना रडून परिस्थिती सांगितली. “गाऊ शकाल का उद्या? ” विचारले. मानधन कमी करण्याची विनंती केली. त्यावर आण्णा म्हणाले, ” हो रे हो, नक्की गाईन आणि ते मानधनाचे नंतर बघू आपण. आधी गाणे तर ठरल्याप्रमाणे होऊ दे. “

शनिवारी संध्याकाळपर्यंत काही तिकीट विक्री झाली.

कार्यक्रम रात्री ९चा. पंडितजींना घ्यायला मी त्यांच्या घरी रात्री आठ वा. पोहोचलो. ते जेवायला बसतच होते. घरात जाताच ते म्हणाले, “बसा. दोन घास जेवून घेतो. म्हणे रात्री xxxxx मोकळा. “

पावणे नऊ वा. त्यांना घेऊन हॉलवर आलो. तिकीट विक्रीच्या टेबलाभोवती काही रसिक उभे दिसले. आत गेलो. साथिदार आधीच येवून बसलेले. वाद्ये लावायला आरंभ केला. पेटीवाल्याने सूर दिला. पंडितजींनी एकेक तंबोरा लावायला सुरवात केली. बाहेर हॉलमधे रसिक जमायला लागले. पंडितजींच्या अंगात कणकण होतीच. साडेनऊ वाजले.

पंडितजी खांद्यावर शाल पांघरून स्वरमंचावर अवतरले. रसिकांना अभिवादन करून बसले. पुन्हा एकदा वाद्ये लावण्याचे सोपस्कार झाले. श्रोतेही जमायला लागले. चित्र बदलत होते.

आण्णांनी आपला धीर गंभीर आवाज लावला आणि काय, सगळा आसमंत क्षणात त्यांच्या भारदसत, गंभीर षड्जाने भरून गेला! बुवांनी मिया मल्हार गयला आरंभ केला.

इकडे बघता बघता प्रेक्षागार रसिकांनी भरायला लागले, भरू लागले, ओसंडून वहायला लागले!

पंडितजींनी अंगावरची शाल मांडीवर आंथरली. आणि पुढे रात्री अडीच पर्यंत असे काय गायले की बस्. श्रोते ते गाणं अवाक् होऊन ऐकत होते. एक एक रचना रंगत होती.

रामदासी मल्हार नंतर बुवांनी श्रोत्यांना विचारले, ” आता पुरे ना? अडीच वाजले आहेत रात्रीचे” ते पुणेरी रसिक. नाही कशाला म्हणतायत. पुन्हा एक छोटीशी रचना गाऊन पंडितजींनी गाणे थांबविले. ती बैठक भैरवी शिवाय संपली!

फक्त मल्हार आणि मल्हारचे विविध प्रकार संपन्न हाले आणि श्रोते अक्षरशः त्या सुरांच्या वर्षाधारात नखशिकांत नाहून निघाले. पंडितजींचे सर्वांग घामाने डबडबले होते, घामच्या धारा अंगांगातून निथळत होत्या!

श्रोते निघून गेले. स्वरमंच आणि प्रेक्षागार सुने सुने झाले.

आता व्यवहारपूर्तीचा क्षण आला. ठेकेदार द्रव्याचे पाकीट आणि नारळ घेऊन उभा ठाकला. पंडितजींच्या हातात मानधनाचे पाकीट ठेऊन त्याने बुवांना खाली वाकून नमस्कार केला. बुवा त्याला खांद्याला धरून उठवीत म्हणाले, “पाकीट तेवढेच आहे ना रे? जीव ओतून गायलोय आज. ” तू समजत होतास तसे काही झाले नाही. पुणेकरांनी गर्दीच केली होती नेहमीप्रमाणे”.

ठेकेदार काय बोलणार! त्यानेही समजून दोन नोटा अधिकच ठेवल्या होत्या मानधनाच्या पाकिटात.

 चक्क पूर्ण २२००/- रुपये

– – खरं सांगू, केवळ पुण्यात वास्तव्य असल्यामुळे पं. भीमसेन, वसंतराव, छोटा गंधर्व, हिराबाई, पु. ल. राजा परांजपे, अभिनेते विवेक, नृत्यांगना रोहिणी भाटे, चित्रकार रवी परांजपे, शि द फडणीस, मंगेश तेंडुलकर, रोहिणी हट्टंगडी, मोहन आगाशे, मोहन गोखले, ग वा बेहेरे, सी रामचंद्र, आबासाहेब मुजुमदार, बाबासाहेब पुरंदरे, गो नि दा, इ इ. इ…

– – अशा अनेक गुणीजनांचे प्रत्यक्ष सहवास लाभले. रँ परांजपे, महर्षी आण्णा कर्वे, स्वा सावरकर, बालगंधर्व, मा कृष्णराव, मेहेरबाबा, स्वामी माधवनाथ, गुळवणी महाराज, स्वामी विद्यानंद, सूफी संत बियाबानी, मामा दांडेकर, बॅ जयकर, इ. इ. थोरांची प्रत्यक्ष दर्शने घडली. या विषयी मी भाग्यवान तर आहेच!

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “म्हणूनच आहे वर्दीवर ‘विश्वास’!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

म्हणूनच आहे वर्दीवर ‘विश्वास’! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

एस. आर. पी. एफ. जवान राहुल शिंदे

२६, ११, २००८ हे आकडे भारतीयांच्या मनावर जणू तापलेल्या सळईने डागण्या देऊन कोरलेले आहेत. यातील २००८ ही खूण काळाच्या ओघात काहीशी बुजून गेलेली असली तरी २६/११ चा दाह मात्र शमलेला नाही. आणि एका अर्थाने ते चांगलेही आहे. भूतकाळ आणि भूतकाळातील चुकांबद्द्ल जे अनभिज्ञ असतात त्यांच्या हातून त्याच चुका होणे, हे अटळच असते, असे एका तत्ववेत्त्याने म्हटलेले आहे, त्याला काही विशिष्ट असा अर्थ आहे. २६ ते २९ नोव्हेंबर हे चार दिवस तर आपण विसरताच कामा नये. म्हणूनच ह्या चारही दिवशी माझ्या मगदुराप्रमाणे या काळात घडलेल्या काही घटना लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे.

१९७१ च्या भारत-पाक युद्धात राजस्थान सीमेवरील लोंगोवाला चौकी मेजर कुलदीपसिंह चांदपुरी यांनी केवळ १२० सैनिकांच्या जीवावर रात्रभर झुंजवत ठेऊन पाकिस्तानला वाळवंटातील धूळ चारली ही कथाही अनेकांना माहीत असेल. तशीच काहीशी ही घटना.

२६ नोव्हेंबरच्या रात्री ९. ४० वाजता पाकिस्तानी गावठी कुत्री ताजमध्ये घुसली आणि त्यांनी दिसेल त्यांचे लचके तोडले. जास्तीत जास्त माणसांना, त्यातल्या त्यात परदेशी नागरिकांना ओलिस ठेवायचे, भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव आणायचा आणि त्यांच्या सुटकेच्या बदल्यात आपल्या अनेक मागण्या मान्य करायला भारत सरकारला भाग पाडायचे, असा फार मोठा कट शत्रूने आखला होता. प्रत्येक अतिरेक्याकडे एके-47 रायफल्स आणि तिच्या ६०० गोळ्या, २०-२५ हातबॉम्ब्स आणि आर. डी. एक्स. चे एक पुडके एवढी युद्धसामुग्री होती. आणि ताजमधील सर्व नि:शस्त्र माणसांना संपवायला ती पुरेशी होती. बऱ्याच लोकांना ठार मारल्यानंतर (यांनी ताज मधील श्वानांनाही (स्नीफर डॉग्ज) गोळ्या घातल्या! ) त्यांनी मग लोकांना धमकावून, त्यांचे हात बांधून एका जागी गोळा करायला सुरूवात केली.

दक्षिण मुंबई-झोन 1 चे डेप्युटी कमिशनर ऑफ पोलिस या पदावर कार्यरत असलेल्या श्री. विश्वास नांगरेपाटील साहेबांना दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. श्री. के. व्यंकटेश्वरम साहेबांचा संदेश आला.. कॅफे लिओपोल्ड मध्ये गोळीबार झाला आहे.. त्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे.

नांगरेसाहेब तातडीने घटनास्थळाकडे जायला निघाले. मेट्रो चित्रपटगृहाजवळ पोहोचतात न पोहोचतात तोच त्यांचे मोबाईल, रेडिओ, वॉकी-टॉकी खणखणायला सुरूवात झाली. पोलिस कमिशनर हसन गफूर, आणि डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस ए. एन. रॉय यांनी नांगरेपाटलांना त्वरीत हॉटल ताज मध्ये जाण्याचे आदेश दिले.

या प्रवासात असतानाच पाटील साहेबांना विविध स्त्रोतांकडून फोनवर मिळत असलेली माहिती गोंधळात टाकणारी आणि काही बाबतीत तर अफवांवर आधारीत होती. ताजवर सुमारे १०० लोकांनी हल्ला चढवला आहे अशी अफवेवर बेतलेली बातमीही त्यांना दिली गेली.

लिओपोल्डच्या आधी ताजकडे जाणारा मार्ग आहे, बरोबर ११व्या मिनिटाला नांगरेसाहेब ताजमध्ये होते. बहुदा हा टोळीयुद्धाचा प्रकार असावा असे सर्वांनाच वाटत होते. पण ताज मध्ये शिरताच मारल्या गेलेल्या लोकांचे मृतदेह, एके-४७ रायफलच्या गोळ्यांच्या पुंगळ्या, त्यातून बाहेर पडलेले शार्पनेल्स, काचांचे तुकडे इत्यादी पाहून हा नक्कीच अतिरेकी हल्ला आहे, हे त्यांच्या लक्षात आले.

सुमारे १००० खोल्यांचे अवाढव्य ताज हॉटेल, त्यातील अनेक मजले, आणि त्यांच्याकडे जाणाऱ्या शेकडो पायऱ्या.. अतिरेकी नेमके कुठे लपले आहेत, हे समजणे कठीण होते. पण सुदैवाने नांगरे साहेबांनी दीड महिन्यापूर्वीच ताजचे सेफ्टी ऑडीट स्वत: केले होते, त्यामुळे त्यांना ताजची आतली रचना माहित होती.

त्यांच्या कमरेला एक पिस्टल, अंगरक्षक अजित खेतले यांचेकडे एक पिस्टल, ताज चे सिक्युरीटी चीफ सुनील कुडीयादी (नि:शस्त्र), राज्य राखीव पोलिस दलाचा एक हत्यारी जवान, काही पोलिस अधिकारी, रस्ता दाखवण्यासाठी ताज हॉटेलचे दोन कर्मचारी, अशा फक्त बारा जणांची ही तुकडी तयार झाली. बुलेटप्रुफ जॅकेट्स नाहीत, जादाची काडतुसे नाहीत, फक्त सहा गोळ्या झाडू शकणारी तीन-चार पिस्टलस, जुन्या पद्धतीची साधी. ३०३ बंदूक एवढीच शस्त्रे विरूद्ध आधुनिक शस्त्रे, अतिरेकी कारवायांचे दोन वर्षांचे प्रशिक्षण मिळालेले, ब्रेनवॉश करण्यात आलेले, मरण्याच्या तयारीने आलेले, धर्मवेडे मनोरूग्ण तरूण दहशतवादी, त्यात त्यांना पाकिस्तानातून सॅटेलाईट फोनवरून मिळणारी अचूक माहिती, अशी विषम परिस्थिती होती. पण मुंबई पोलिसांच्या वीरांनी पाऊल पुढे टाकले होते… आता माघार नाही!

नांगरे साहेब एस. आर. पी. एफ. जवान राहुल शिंदेला म्हणाले, ”देशाचे रक्षण करण्याची अशी संधी आयुष्यात केंव्हा तरीच आणि नशीबवानालाच प्राप्त होते.. आता माघारी फिरता येणार नाही!

त्यावर २२ वर्षे वयाचं ते कोवळं पोरगं म्हणाले, ”अंगावर ही वर्दी त्यासाठीच तर चढवलीय! ” आणि त्याने पाऊल पुढे टाकले. तेवढ्यात नांगरेसाहेबांचे बॅचमेट आणि नक्षलवाद्यांशी लढण्याचा अनुभव असलेले डी. सी. पी. राजवर्धन सिन्हा हे ताजवर पोहोचले. त्यांनाही ताजवरील हल्ल्याची खबर मिळाली होती. हे सर्व मिळून अतिरेक्यांच्या मागावर निघाले.

अतिरेक्यांना लिफ्टचा उपयोग करता येऊ नये म्हणून सर्व लिफ्ट्स बंद करण्यात आल्या. आपले बहादूर त्यांना शोधत होते. पण अतिरेकी दुसऱ्या विंग मध्ये होते तर नांगरे साहेबांची टीम पहिल्या विंगमध्ये होती. अशा परिस्थितीत प्रसंगावधान राखून नांगरे साहेबांनी चतुराईने सीसीटीव्ही रूममध्ये जाऊन अतिरेक्यांचा ठावठिकाणा शोधण्याचा निर्णय घेतला. आणि ते चौघे त्यांना दिसले.

वरच्या मजल्यावर असलेले अतिरेकी नजरेच्या टप्प्यात येताच त्यांच्यावर पिस्टलमधून गोळ्या झाडण्यात आल्या. अतिरेक्यांना इतक्या लवकर प्रतिहल्ला होईल याची कल्पना नव्हती. त्यांना वाटले की पोलिसांची मोठी तुकडी आपल्यामागे लागली आहे. ते गोळीबार करीत आणखी वरच्या मजल्यावर गेले आणि त्यांनी ग्रेनेड्स फेकले. आपल्या लोकांनी फक्त एक-एक फैर झाडली. कारण गोळ्या पुरवून पुरवून वापरायाच्या होत्या. नांगरेसाहेबांच्या एका गोळीने एका अतिरेक्याच्या पायांचा वेध घेतला पण ते सर्व अतिरेकी इमारतीच्या दुसऱ्या भागात पळून गेले.

तळहातावर शीर घेऊन हे वीर तयार होते. यांच्याकडे खूप कमी संख्या आहे, शस्त्रे नाहीत हे अतिरेक्यांना समजू देणे धोक्याचे होते, जवळ असलेली प्रत्येक गोळी जपून झाडावी लागत होती, बाहेरून जादा पोलिसांची मदत पोहोचण्यास उशीर होता.

अतिरेक्यांना भारतात घुसवणाऱ्या दहशतवादी संघटनांनी दूरवर पाकिस्तानात बसून इथे ताजमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांना सॅटेलाईट फोन वरून सुचना देण्याची चोख व्यवस्था केली होती. त्यांनी या अतिरेक्यांना सीसीटीव्ही कॅमरे फोडा, सीसीटीव्ही रूमवर हल्ला करा असा आदेश दिला.

तोपर्यत सावध झालेल्या भारतीय तपास यंत्रणांनी पाकिस्तानातून होणारे सॅटेलाईट फोन संभाषण अचूक टिपायला सुरूवात केली होती. त्यांनी अतिरेकी सीसीटीव्ही रूमकडे येताहेत असा संदेश डीसीपी राजवर्धन यांच्यापर्यंत अगदी वेळेत पोहोचवला. त्यामुळे पुन्हा सीसीटीव्ही रूमचा आश्रय घेतलेल्या पोलिसांना त्या रूममधून बाहेर निघावेच लागले.

तेवढ्यात अतिरेक्यांनी सीसीटीव्ही रूमवर गोळीबार सुरू करत एक स्फोट घडवला. त्यामुळे त्या रूमचे सिलिंग खाली कोसळले, नांगरेसाहेबांचे अंगरक्षक अजित खेतले गोळ्या लागून जखमी झाले. सर्व टीमला आता जिन्यावरून खाली जाण्याशिवाय पर्याय नव्हता. पण हे सर्व आता अतिरेक्यांच्या गोळीबाराच्या टप्प्यात आलेले होते..

राहूल शिंदे आपल्या रायफलमधून अतिरेक्यांवर गोळ्या झाडत असताना त्यांना अतिरेक्यांच्या एके-४७च्या अनेक गोळ्या लागल्या… वीर खाली कोसळला… तशाही स्थितीत त्यांनी जळत असलेल्या सीसीटीव्ही रूम मध्ये सरपटत जाऊन तेथून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण एके-४७च्या जहाल गोळ्यांनी या वीराचे रक्त जाळून टाकले होते… नंतर जेंव्हा राहुल शिंदे यांचा निष्प्राण देह दृष्टीस पडला तेंव्हा त्यांचे डोळे अतिरेकी ज्या मजल्यावरून गोळीबार करीत होते, त्या दिशेला रोखून पहात होते, संगीन त्या दिशेला रोखलेली होती… ट्रिगरवर बोट होते… रायफलमध्ये गोळी नव्हती तसे कुडीत प्राणही नव्हते!

श्री. विश्वास नांगरे पाटील साहेब, श्री. हर्षवर्धन सिन्हा साहेब आणि त्यांच्या सोबतच्या शूरवीरांनी नौदलाचे कमांडो पोहोचेपर्यंत प्राणपणाने खिंड रोखून धरत शत्रूला थोपवून ठेवले होते, अन्यथा किती भयावह परिस्थिती ओढवली असती, देव जाणे!

ही एक अविश्वसनीय, अलौकीक आणि अगदी विपरीत परिस्थिती असताना केली गेलेली शौर्यपूर्ण कामगिरी होती! … म्हणूनच वर्दीवर ‘विश्वास’ आहे. आणि हा विश्वास बहादूर पोलिस टिकवून ठेवतील अशी खात्री आहे! धन्यवाद मुंबई पोलिस! राहुल शिंदे यांच्या बलिदानाला शतश: वंदन!

माढा तालुक्यातील सुलतानपूर हे राहुल शिंदे यांचे जन्मगाव. या गावाचे नाव आता राहुलनगर असे करण्यात आले आहे.

 

© श्री संभाजी बबन गायके 

न-हे, पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “प्रेमाची ताकद” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆

शामला पालेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “प्रेमाची ताकद” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर

एकदा स्वर्गात कृष्ण आणि राधा समोरासमोर आले..!

गोकुळातून गेल्यापासून राधा आणि कृष्ण कधीच भेटले नव्हते..!

अचानक समोर आल्यावर कृष्ण गडबडला तर राधा शांत-चित्त होती..!

गांगरून कृष्ण काही बोलण्याआधी स्मित वदनाने राधा म्हणाली…

“कसे आहात ‘द्वारकाधीश’..? “

जी राधा त्याला कान्हा-कान्हा म्हणायची तिने ‘द्वारकाधीश’ असे संबोधल्यावर कृष्ण नाराजीने म्हणाला…

“राधे, मी आज देखील तुझा ‘कान्हा’च आहे..! तू तरी मला ‘द्वारकाधीश’ म्हणू नकोस गं ss..!

खूप दिवसांनी भेटतो आहोत.. एकमेकांशी सुख-दुःखाच्या गप्पा मारू… एवढ्या धावपळीत मला जेव्हां जेव्हां तुझी आठवण यायची तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार लागत होती.. * राधा म्हणाली.. “खरं सांगू..? मला असं काहीच होत नव्हतं. मला कधीच तुझी आठवण आली नाही की तुझ्या आठवणीने डोळ्यातून पाणी आले नाही..! कारण, तुझी आठवण यायला मी कधी तुला विसरलेच नाही..! आणि माझ्या नजरेत तूच होतास.. फक्त तू..! त्यामुळे माझ्या अश्रूंबरोबर तू वाहून जावू नयेस म्हणून मी कधी रडलेच नाही..!

प्रेम विसरून तू मात्र काय काय हरवून बसलास ते सांगू..? “

श्रीकृष्ण ऐकतच राहिला..

राधा म्हणाली..

“तुला कदाचित कटू वाटेल पण हे सत्य आहे..! गोकुळातून गेल्यापासून तू आम्हाला कोणालाही कधीच भेटला नाहीस..! तू खूप मोठा झालास.. तुझी कीर्ती तिन्ही लोकांत पसरली..!

पण ह्या प्रगतीमध्ये तुझी अधोगती किती झाली..! यमुनेच्या पवित्र गोड पाण्याने तुझे आयुष्य सुरु झाले.. त्या पाण्यावरच तू वाढलास आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यापाशी थेट द्वारकेस जावून पोहोचलास..!

एका बोटावर फिरणाऱ्या सुदर्शन चक्रावर भरवसा ठेवलास.. पण दहा बोटांनी वाजणाऱ्या बासरीला तू विसरलास..!

कान्हा, जेव्हा तू प्रेमाच्या सान्निध्यात होतास, तेव्हा एका बोटावर गोवर्धन उचलून हजारो जीव वाचवलेस आणि प्रेमापासून दूर गेल्यावर सुदर्शन चक्राने कित्येक जीव घेतलेस..!

‘कान्हा’ आणि ‘द्वारकाधीश’ ह्यांत काय फरक आहे सांगू…?

तू ‘कान्हा’ असतास तर तू सुदामाच्या घरी गेला असतास.. सुदामाला तुझ्या घरी झोळी पसरून यावं लागलं नसतं..!

प्रेम आणि युद्ध ह्यांत हाच मोठा फरक आहे..!

‘युद्धात’ जीव घेतला जातो..!

आणि..

‘प्रेमात’ जीव ओवाळून टाकला जातो..!

कान्हा, प्रेमात माणूस स्वतः दुःखी राहू शकतो पण दुसऱ्याला दुःखी करु शकत नाही..!

तू तर ‘त्रैलोक्याचा स्वामी’ आहेस.. महान अशी ‘भगवद्गीता’ तू जगाला सांगितलीस..! पण तू स्वतः काय निर्णय घेतलास..?

तू राजा होतास.. प्रजेचा पालक होतास आणि तुझेच सैन्य तू कौरवांना देवून टाकलेस..?

तू स्वतः अर्जुनासारख्या ‘महारथी’चा सारथी बनलास, अर्जुनाचा ‘मार्गदर्शक’ झालास.. त्याच अर्जुनाने तुझेच सैन्य तुझ्याच नजरेसमोर मारून टाकले..?

कृष्णा, अरे तुझे सैन्य तुझीच प्रजा होती ना..? आणि प्रजा तर स्वतःच्या मुलांप्रमाणे असते..! तुझ्यातील प्रेम भावना नष्ट झाल्यामुळेच तू असा विनाश बघू शकलास..!

इतका तुला अभिमान होता ना तुझ्या सामर्थ्याचा..? मग जा, पृथ्वीवर जाऊन बघ.. तुझी ‘द्वारकाधीश’ वाली प्रतिमा शोध..!

नाही सापडणार तुला शोधूनही..!

जिथे जाशील तिथे.. घरांत, मंदिरात सर्वत्र तुझ्या बाजूला तुला मीच उभी असलेली दिसेन..!

होय कान्हा, मला गीतेचे महत्त्व माहीत आहे. आज देखील पृथ्वीवर गीता माणसांना ज्ञान देते, मार्ग दाखवते..! समाज गीतेला पूज्य मानतो..! पण भरवसा मात्र युद्ध करणाऱ्या द्वारका-नरेश श्रीकृष्णावर नाही तर प्रेम करणाऱ्या ‘कान्हा’वर ठेवतो..!

गीतेमध्ये राधेचा तर दुरून देखील उल्लेख नाही..! पण आजही लोक गीतेचा – तुझ्या महान भगवद्गीतेचा – समारोप करताना ‘राधे-कृष्ण राधे-कृष्ण’ असाच जप करतात..!

हीच ती खऱ्या प्रेमाची खरी ताकद..!

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : शामला पालेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महावस्त्राचे पदर – भाग २ – ‘आई’ (मायेची पैठणी) ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

महावस्त्राचे पदर – भाग २ – ‘आई’ (मायेची पैठणी) ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

नात्यांचं महावस्त्र – ‘आई’ (मायेची पैठणी)

​ज्याच्याशिवाय नात्यांचं हे महावस्त्र जन्मालाच येऊ शकत नाही, असा या वस्त्रातील एक अनोखा आणि सर्वात मौल्यवान पदर म्हणजे ‘आई’. नात्यांच्या या वस्त्रातील ती खरी सुवर्णमयी ‘पैठणी’ असते. विधात्याने अत्यंत कुशलतेने आणि निगुतीने घडवलेली! ज्यामुळे आपण या जगात येतो आणि आपल्याला आपली ओळख मिळते असे एक नाते म्हणजे आई. प्रत्यक्ष परमेश्वराने सुद्धा जेव्हा पृथ्वीवर अवतार घेतला, तेव्हा त्यालाही आईमुळेच सर्वश्रेष्ठ ओळख मिळाली. राम झाला कौसल्यानंदन, कृष्ण झाला देवकीनंदन. अंजनेय(हनुमंत)आणि राधेय(कर्ण) हे देखील आपल्या आईच्या नावामुळेच ओळखले गेले. ‘ आईची महती ‘ एवढी थोर की जगातल्या अनेक थोर साहित्यिकांनी तिच्यावर भरभरून लिहिले.

​’आई’ हा शब्द जरी उच्चारला, तरी डोळ्यांसमोर प्रेमाची अशी एक मूर्ती उभी राहते जी वैश्विक आहे. माणूस असो वा प्राणी, भारत असो की जगाच्या पाठीवरचा कुठलाही देश; आईचे प्रेम सर्वत्र सारखेच असते. म्हणूनच मी आईला प्रेमाची वैश्विक मूर्ती म्हणतो. इतरांचं प्रेम भलेही ‘माया’ असेल, पण तिचं प्रेम म्हणजे ‘आभाळमाया’! आपल्या मुलांवर असलेली तिच्या प्रेमाची शाल केवळ ऊब देत नाही, तर एक अभेद्य कवच बनून आयुष्यभर त्यांचे रक्षण करते. “घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी… ” तशी आई शरीराने कुठेही असली, तरी तिचे चित्त मात्र सदैव आपल्या लेकरापाशीच असते.

​परमेश्वराने तिला पृथ्वीवर पाठवतानाच तिच्या काळजात ‘अखंड माया’ भरून पाठवली आहे. आई म्हणजे परमेश्वराचे दुसरे रूप. कोणीतरी खूप छान म्हटलं आहे की, परमेश्वराला सगळीकडे उपस्थित राहणे शक्य नाही म्हणून त्याने आईला पाठवले आहे. ती स्वतः उपाशी राहील, पण लेकराचं पोट भरल्याशिवाय तिचं पोट भरत नाही. तिची स्वतःची झोप होवो न होवो, आपल्या तान्हुल्याची झोप नीट व्हावी म्हणून तिची धडपड असते. “निजल्या तान्ह्यावरी माउली दृष्टी सारखी धरी” अशी तिची अवस्था असते. जी स्त्री जन्माला येते, अशी प्रत्येक स्त्री ‘बाई’ होते; पण तिचे बाईपण ‘आई’ झाल्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि त्यासाठी तिने मुलाला जन्म दिलाच पाहिजे अशी काही अट नसते, तिला फक्त ‘आई’ होता आलं पाहिजे, मायेचं पांघरूण घालता आलं पाहिजे. किंबहुना, आई होण्यासाठी स्त्री असण्याचीही अट नाही; ज्याच्या हृदयात सगळ्यांबद्दल प्रेम आणि कळवळा काठोकाठ भरला आहे, अशी कोणतीही व्यक्ती आई होऊ शकते.

​पंढरपूरला विटेवर उभा असलेला पांडुरंग सर्व भाविकांचे, वारकऱ्यांचे दैवत. हा सावळा विठ्ठल काही करत नाही, काही बोलत नाही, काही देत नाही आणि घेतही काही नाही. पण तो ‘विठू माउली’ झाला. का बरं? कारण तो सगळ्यांचं दुःख ऐकून घेतो, सगळ्यांना उराशी धरतो. त्याच्याजवळ कोणताच भेदभाव नाही. तो जरी बोलत नसला, तरी सगळ्यांना खात्री असते की “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” असा आशीर्वाद प्रत्येकाला तो नक्कीच देतो.

​”ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभावीण प्रीती. “

जिच्यामुळे हे विश्व निर्माण झाले अशी माता पार्वती जगज्जननी झाली. आमचे संत देखील ‘माउली’ झाले. समाजाने ज्यांचा अपार छळ केला, तरीही ज्यांच्या मुखातून विश्वाच्या कल्याणासाठी ‘पसायदान’ नावाचे अमृत बाहेर पडले, ते संत ज्ञानेश्वर म्हणूनच ‘ज्ञानेश्वर माउली’ झाले. अहिल्याबाई होळकर लोकांसाठी समाजसेवेची अनेक कामे करून ‘लोकमाता’ झाल्या. अनाथ, निराधार मुलांवर मायेचे छत्र धरणाऱ्या सिंधूताई सपकाळ याच व्यापक मातृत्वाचे रूप झाल्या. ज्या आदीवासी, अशिक्षित स्त्रियांनी वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी प्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन वृक्षांचे संरक्षण केले, त्या वृक्षमाता झाल्या. अशी मातेची अनेक रूपे.

​आपल्या मुलांवर प्रेम करते ती ‘आई’; सर्वांबद्दल प्रेमभाव जिच्या मनात असतो ती ‘माता’; आणि अखिल विश्वाला कवेत घेणारी अपार माया जिच्या काळजात असते, ती ‘माउली’!

​”न मातु: पर दैवतम” असे आपल्याकडे म्हटले जाते; म्हणजेच आईसारखे दुसरे दैवत नाही. इतर देवतांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागते, नवस बोलावे लागतात. पण हे मातृत्व नावाचे दैवत असे आहे की, त्याला प्रसन्न करण्यासाठी कोणतीही उपासना करावी लागत नाही. तिच्या पोटी केवळ जन्म घेतला, की ही देवता प्रसन्न होते आणि आयुष्यभर त्या बाळाची काळजी वाहते. प्रसूती वेदना काय असतात, ते फक्त माताच जाणे! पण जेव्हा ते नवजात अपत्य ती पहिल्यांदा आपल्या जवळ घेते, तेव्हा तिच्या त्या प्रसववेदनांचे शीतल चांदणे होऊन तिच्या मुखावर एक अद्भूत हास्य विलसते. तिच्या उरातील माया अमृत होऊन तिच्या स्तनातून बाळासाठी पाझरू लागते. तिच्या कुशीत जेव्हा तिचं बाळ असतं, तेव्हा ती जगातली सर्वात समृद्ध स्त्री असते. आयुष्याच्या विद्यापीठातली ‘आई’ नावाची सर्वोच्च पदवी निसर्गाने तिला बहाल केलेली असते.

​बाळ अजाणतं असतं, असहाय असतं, त्याला काहीच करता येत नाही तेव्हापासून आई त्याला सावरते. जेव्हा त्याच्या चिमुकल्या ओठांतून ‘आई’ हा पहिला शब्द उमटतो, तेव्हा तिच्या काळजाचा झालेला आनंद गगनात मावत नाही. याच एका शब्दासाठी ती नऊ महिने नऊ दिवस आसुसलेली असते. मग ती हळूहळू त्या सानुल्याला बोलायला शिकवते, पाऊल पाऊल टाकत चालायला शिकवते आणि त्याला स्वतःच्या पायावर उभे करते. तीच त्याची पहिली शाळा आणि पहिला गुरू असते. या शाळेत कुठलीही फी नसते, उलट काळजी आणि प्रेम मात्र अपार असते.

​बाळ जसजसं मोठं होतं, तसतसं तिचं काळीज आनंदाने फुलत जातं. बाळाच्या पंखात ताकद येते आणि ते स्वतःचे आभाळ शोधायला उडू लागतं. पण कधी कधी, आकाशात उंच भरारी घेणाऱ्या या पाखराचे लक्ष जमिनीवर एकटीच बसलेल्या आपल्या वृद्ध आईकडे जात नाही. अशा वेळी ती केवळ दोन शब्दांच्या प्रेमासाठी आसुसलेली असते. आता तिच्या पंखातले बळ कमी झालेले असते. आता वेळ असते त्या मुलाची—परतफेड करण्याची. खरं तर, आईच्या ऋणातून मुक्त होणे किंवा त्याची परतफेड करणे जन्मांतरातही शक्य नाही, पण कृतज्ञतेने त्या ऋणातून उतराई होण्याचा प्रामाणिक प्रयत्न मात्र नक्कीच करता येतो.

​आई नावाच्या नात्याचा परिसस्पर्श ज्यांच्या आयुष्याला झाला, त्या आयुष्याचं सोनं झालं! कौसल्येने रामाला घडवलं, यशोदेने कृष्णाला, जिजाऊ मातेने छत्रपती शिवरायांना, भुवनेश्वरी देवींनी स्वामी विवेकानंदांना, आणि ‘श्यामच्या आई’ने साने गुरुजींना घडवले. असा हा मातृमहिमा अपार आहे.

​सखोल आणि योग्य मार्गदर्शन आणि अचूक निर्णयक्षमता यासारख्या गोष्टी म्हणजे आईच्या सल्ल्याचे वैशिष्ट्य! आईनं ज्यांना मार्गदर्शन केलं आणि आईचा सल्ला ज्यांनी शिरोधार्य मानला, त्यांनी जीवनामध्ये फार मोठे कार्य करून दाखवले आणि ते यशस्वी झाले. पांडवांनी आपल्या माता कुंतीचा सल्ला प्रत्येक वेळी शिरोधार्य मानला; त्याच वेळी त्यांचे बंधू असलेल्या कौरवांनी मात्र आपल्या आईचा (गांधारीचा) सल्ला नेहमीच धुडकावून लावला. या दोन्ही गोष्टींचे परिणाम काय झाले, याची साक्ष महाभारतात आपल्याला मिळते. पांडवांना सर्वत्र विजय मिळाला आणि कौरवांचा मात्र पराभव झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील माता जिजाऊंचा सल्ला प्रत्येक प्रसंगी शिरोधार्य मानला, म्हणूनच ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले.

​आई या नात्याचे अनेक पदर आहेत. गुरूची पत्नी जेव्हा ‘गुरुमाता’ होते, तेव्हा ती आश्रमातील सर्व बटूंना स्वतःच्या मुलासारखे सांभाळते. वशिष्ठांच्या आश्रमात जेव्हा राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचे शिक्षण पूर्ण झाले, तेव्हा निघताना प्रभू रामचंद्रांनी गुरुमातेचे पाय धरून म्हटले, “तुम्ही आईच्या मायेने आम्हाला सांभाळले, कशाचीच उणीव भासू दिली नाही. आमच्या वागण्यात काही चुकले असेल, तर आईच्या मायेने आम्हाला क्षमा करा. ” खरोखरच धन्य ती गुरुमाता आणि धन्य ते संस्कारी भावंडे! रामायणाने अशी नाती कशी जपावीत याचा आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. रामाला वनवासात पाठवले म्हणून जग कैकयीला दोष देत असताना, राम लक्ष्मणाला समजावतो, “आई कोणीही असो, ती सदैव आदरणीयच असते. मला वनात पाठवण्यामागे तिचा नक्कीच काहीतरी चांगला उद्देश असेल. माझ्या शिक्षणात काही उणीव राहिली असेल, ती पूर्ण करण्यासाठीच ही वनाची योजना असावी. ” ही उदात्तता आजच्या पिढीने शिकायला हवी.

​ज्याच्या डोक्यावर मातृछत्र छाया धरून असतं, त्याच्या भाग्याची थोरवी काय वर्णावी? प्रत्यक्ष परमेश्वराला देखील हे भाग्य लाभत नाही म्हणून तो सुद्धा मानवी अवतार धारण करून पृथ्वीवर येतो. ‘दिवार’ या चित्रपटातील एक संवाद मला आजही आठवतो. त्या चित्रपटात इन्स्पेक्टर असलेला शशी कपूर आणि चोराची भूमिका करणारा अमिताभ यांच्यातील संवाद फार लोकप्रिय झाला होता. अमिताभ शशी कपूरला म्हणतो, “मेरे पास गाडी है, बंगला है, नोकर चाकर, पैसा है… तुम्हारे पास क्या है? ” तेव्हा शशी कपूरने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. तो म्हणतो, “मेरे पास माँ है! ” आईची बरोबरी कशानेच होऊ शकणार नाही, कुबेराची संपत्ती देखील तिच्या तुलनेत फिकी आहे.

​पण आज आम्हाला केवळ या महापुरुषांची आणि त्यांच्या मातांची थोरवी सांगून भागणार नाही. असे सुपुत्र आजच्याही काळात घडावेत आणि त्यांना जन्म देणाऱ्या माता धन्य व्हाव्यात, ही भारतभूमी धन्य व्हावी, ही काळाची गरज आहे. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा; जसा आकार द्यावा तशी मूर्ती घडते. ही सुसंस्कारी मूर्ती घडवण्याची पहिली आणि मुख्य जबाबदारी आईची असते. खाण तशी माती असे आपण म्हणतो. आई जर सुसंस्कारित आणि सुशिक्षित असेल तर तिची मुले सुद्धा तशीच होतील. अशा आया घरोघरी असतील तर सुसंस्कारित समाज निर्माण होईल.

​वर्तमानकाळातील मातांपुढे आजच्या युगाने खूप मोठी आव्हाने उभी केली आहेत. पूर्वीची आई मुख्यतः ‘गृहिणी’ होती, त्यामुळे मुलांवर संस्कार करण्यासाठी, त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी तिच्याकडे पुरेसा वेळ असायचा. आजच्या आईला मात्र नोकरी, करिअर आणि घर अशी दोन्ही आघाड्यांवर दुहेरी कसरत करावी लागते. कधी कधी यामुळे तिच्या मनात एक अनामिक ‘अपराधित्व’ (Guilt) डोकावते की, मी माझ्या मुलाला वेळ देऊ शकत नाही. पण अशाही परिस्थितीत ती आपला पदर खोचून खंबीरपणे उभी आहे. ती केवळ मुलांचे संगोपन करत नाही, तर आपल्या कर्तृत्वाने मुलांसमोर स्वावलंबनाचा एक नवा आदर्श ठेवत आहे.

​तथापि, बदलत्या काळाच्या पार्श्वभूमीवर आजच्या आईला काही जाणीवपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आजी-आजोबा, काका-काकू असायचे, मुलांवर सहज संस्कार व्हायचे. आज बहुतेक घरात एकच मूल असते आणि ते एकलकोंडे होते. आजी-आजोबांच्या गोष्टींचे माध्यम आता बऱ्याच घरांतून नाहीसे झाले आहे. मुले पाळणाघर किंवा प्ले-ग्रुपमध्ये वाढतात, पण तिथे आवश्यक कौटुंबिक संस्कार मिळतीलच असे नाही; ही पोकळी आईलाच भरून काढावी लागेल.

​आजची मुले ‘डिजिटल’ युगातली आहेत. ती नुसते सांगून किंवा उपदेश ऐकून शिकत नाहीत; त्यांच्यासमोर स्वतःचा आदर्श ठेवावा लागतो. “सारखा मोबाईल पाहू नकोस, पुस्तक वाच, अभ्यास कर” असे ओरडून मुले ऐकणार नाहीत. आई-बाबांनी कामावरून आल्यावर स्वतः मोबाईल आणि टीव्ही बाजूला ठेवून हातात एखादे चांगले पुस्तक धरले, तर मुलेही त्याचे अनुकरण करतील. आईचा पदर आणि तिची अंगाई यातून जी भावनिक ऊब मुलाला मिळते, ती ‘यूट्यूब’वरील बालगीतांमधून कधीच मिळू शकत नाही, हे आजच्या मातेला समजून घ्यावे लागेल. सुट्टीच्या दिवशी पालकांनी मुलांसाठी वेळ द्यायला हवा, घरातील छोटी-मोठी कामे करताना त्यांना सोबत घेतले, तर श्रमाची आणि जबाबदारीची सवय त्यांना आपोआप लागेल.

​नात्यांच्या या भरजरी ‘महावस्त्रा’चा हा मातृत्वाचा पदर जर संस्कारांनी आणि ओलाव्याने संपन्न राहिला, तरच पुढची पिढी निकोप आणि सुदृढ होईल. आई नावाच्या या पैठणीची जरतारी चमक कधीच फिकी पडू न देणे, ही आजच्या प्रत्येक मुला-मुलीची आणि समाजाची नैतिक जबाबदारी आहे.

(पुढील भाग दर रविवारी)

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पहाट… ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

??

☆ पहाट… ☆ राधिका भांडारकर ☆

रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल

कुसुमाग्रजांच्या या एका ओळीतच पहाट या शब्दाचा खरा अर्थ दडला आहे. रात्रीचा अंधार संपतो आणि हळूहळू सूर्याची किरणे निळ्या आभाळाला रंगवत पसरत जातात. काल संपलाय, कालचा अंधार नाहीसा झालाय आणि आज पुन्हा पहाट झाली आहे. ही पहाट नवी आहे, नव्या स्वप्नांना, नव्या आशा आकांक्षांना घेऊन आली आहे.

पहाट म्हणजे नवा प्रहर, नवी भविष्यं, नवी उर्जा, नवी ध्येयं. पहाट म्हणजे निर्मितीचा काळ आणि “झालं गेलं विसरून जा आता पुन्हा नव्याने करू सुरुवात” असा संदेश घेऊन येणारा दिवसाचा एक महत्त्वाचा प्रहर.

कोंबडं आरवतं, तांबडं फुटतं, पक्षी घरट्यातून किलबिलत बाहेर पडतात, फांदीवर फुलं उमलतात, तळ्यात कमल दले उलगडतात, भ्रमराची मुक्ती होते, अंगणात प्राजक्ताचा सडा पडतो, सुवासिनी सुस्नात होऊन दारची तुळस पूजतात, सडा शिंपतात, रांगोळ्या रेखातात, देवळातली घंटा निनादते, मंत्रोच्चारांचा गजर होतो. सारं वातावरण कसं पवित्र, मंगलमय, प्रसन्न असतं! जणू सारं जळमट झडून जातं आणि पहाटेच्या या प्रहरी एका नव्या उर्जेने, नव्या क्षमतेने जीवन बहरू लागतं. उदया चली नित्य येणारा हा भास्कर जणू पहाटे काना कानात गुणगुणतो,

घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला

उठ आता आणि कामाला लाग.

विश्वाच्या कोपऱ्या कोपऱ्यातील पहाट वेगळी असेल. कुठे धुक्यात लपेटलेली असेल, कुठे दवबिंदूत भिजलेली असेल, बर्फाचे कण पांघरून निवांत कुडकुडत असेल, कुणाच्या मिठीत असेल, शृंगाररंगात थकलेली असेल, कुठे धावत असेल, कुठे चालत असेल पण एक मात्र नक्की की साऱ्या झोपलेल्या चराचराला ती गती देत असते. जाग देते, जाण देते, शक्ती— बळ देते.

पहाट ही नेहमीच सकारात्मक असते, आशावादी असते. मरगळलेल्या मनाला उभारी देते, कर्तव्याची जाणीव करून देते. पहाटेच्या प्रहरात विश्वास असतो जे काल झालं नाही ते आज होईल अशी खात्री देतच पहाट उगवते म्हणूनच म्हटले जाते, ” एक दिवस तुझ्याही आयुष्यात पहाट फुटेल”

किंवा “आज स्वातंत्र्याची पहाट उगवली…”

पहाटेत सौभाग्य दडलेलं असतं. या पहाटेत आश्वासकता असते, आवेश असतो, जोश असतो, प्रचंड ऊर्जा असते. मनावरच्या असंख्य बेड्या झुगारण्याची ताकद पहाटेत असते. पहाट मुक्त असते, स्वतंत्र असते. सत्य शिव सुंदराची ओढ लावणारी असते. पहाटेच्या प्रहरात शांत भक्ती रस असतो मन सहजच आध्यात्मिक बनतं. पहाटेच्या प्रहरी म्हणा हरी हरी अशी परमात्म्याची ओढ लागते. सुंदर विचारांचा झरा शरीर प्रवाहतून नकळत वाहतो.

अशी ही नीरव, निरामय, रस गंध नादयुक्त पहाट!

आयुष्याचे नवे गीत गातच उगवते…

 

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अल्बम… ☆ उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ अल्बम… ☆ उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

4 जुलै माझा वाढदिवस! वाढदिवसाची तारीख आली की मागचे कितीतरी वाढदिवस डोळ्यासमोर येऊन जातात! बालपण डोळ्यासमोर उभे रहातं!

आता सत्तरी ओलांडली तरी जुन्या आठवणी कायमच मनात कोरलेल्या आहेत! 50 /60 वर्षांपूर्वी फोटो काढणे हे तितकेसे कॉमन नव्हते.. त्यावेळी कॅमेराच नवीन होता. साधारणपणे 60/ 65 वर्षांपूर्वी आमच्या घरी कॅमेरा होता. अर्थात ही माझ्यासाठी ऐकीव गोष्ट!

माझ्या वडिलांना फोटोग्राफीची आवड होती. त्यामुळे फोटो काढणे, ते स्वतः डेव्हलप करणे, ह्या गोष्टी ते शिकले होते. स्वातंत्र्यापूर्वी माझ्या वडिलांचे कुटुंब कराचीला होतं, त्यामुळे अजूनही तेथील त्यांच्या घराचे, कराची शहराचे फोटो सुद्धा आमच्या अल्बम मध्ये आहेत.

अगदी पूर्वीच्या कॅमेरात आठ फोटो निघत असत. नंतर छोटे छोटे १६ आणि २४ फोटो निघणारे रोल आले. कॅमेरा मध्ये सुधारणा होऊ लागल्या. तसतसे अधिक चांगले आणि जास्त फोटो मिळू लागले. फोटोंचा अल्बम ही लोकांच्या आवडीची गोष्ट बनू लागली. घरातील लग्न, मुंज, बारसे किंवा कोणताही कार्यक्रम असला की फोटो काढून त्यांचा अल्बम बनवला जाऊ लागला. आमचे दादा मग प्रत्येक अल्बमला नाव देत! ‘गोड स्मृती’

किंवा ‘स्मृती गंध’ यासारखी! आता तर काय मोबाईल मुळे फोटो काढणे खूपच सोपे झाले आहे. पण प्रिंटेड फोटो अल्बम ची शान मला वेगळीच वाटते!

केव्हाही मनात आलं की, एखादा अल्बम काढावा आणि जुने फोटो बघत बसावे यातील आनंद वेगळाच असतो!

स्वतःच्या आयुष्याचा हा अल्बम उघडताना माझ्याही डोळ्यासमोर माझ्या छोट्या छोट्या छबी दिसू लागल्या! आईच्या कडेवर बसलेली मी, कधी रडत असलेली, नुकतीच पावले टाकू लागलेली मी, मला फोटोत दिसली.. नवीनच पंजाबी ड्रेस घालून शाळेला जायच्या तयारीत असलेली चार-पाच वर्षाची ‘ऋजू’ ही एका फोटोत दिसली!

दोन वेण्या वर बांधलेल्या आणि काळ्यावर पांढऱ्या खडीचे परकर-पोलके घालून वडिलांबरोबर रत्नागिरीच्या समुद्रावर फिरायला गेलेली मी मला फोटोत दिसली तर, त्यानंतर स्कर्ट – ब्लाउज घालून शाळेत जाणारी मी मला जाणवून देत होती की, तू आता मोठी झालीस! नकळत 1964 साल उजाडले आणि मी दहा वर्षाची झाले!

माझ्या वाढदिवसाला आई माझ्या मैत्रिणींना घरी फराळाला बोलवत असे. आणि मग छोटासा मनोरंजनाचा कार्यक्रमही होत असे. त्यात चिठ्ठ्या टाकून उचलायला सांगितले जाई आणि चिठ्ठीत असेल त्याप्रमाणे गाणे, नाच किंवा खेळ करून दाखवावा लागत असे. तेव्हा खायच्या पदार्थात पाव-भाजी, केक नसे, पण घरी केलेले पोहे, चिवडा, लाडू यासारखे पदार्थ असत. मग आमची पार्टी मजेत होत असे.. असे वाढदिवस साजरे करता करता अल्बम मध्ये मॅट्रिकच्या वर्षीचा ग्रुप फोटो आला आणि त्यामुळे आपण एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो याची जाणीव झाली.

कॉलेजची वर्षे सुरू झाली आणि घरचा वाढदिवस बंद होऊन बाहेर हॉटेलात वाढदिवस साजरा होऊ लागला.. फोटोसेशन होऊ लागले. मित्र- मैत्रिणींबरोबर वाढदिवस मजेत साजरे होऊ लागले. छान छान गिफ्टची देवाण-घेवाण होऊ लागली आणि हा अल्बम विस्तारत गेला.

अजूनही कधी ते फोटो बघते तेव्हा पुन्हा एकदा मनावर आठवणींचे मोरपीस फिरते! बघता बघता किती वाढदिवस साजरे झाले, परंतु खरी मजा आणि प्रेम मिळाले ते लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला! सरप्राईज म्हणून मिळणारी साडी किंवा दागिना वाढदिवसाला शोभा आणू लागला. मग नवऱ्याबरोबर केक कापतानाचा फोटो अल्बम मध्ये आला. मुलांच्या जन्मानंतर आपल्यापेक्षा मुलांचे वाढदिवस साजरे करत काढलेले फोटो अल्बम मध्ये दिसू लागले. ते चौकोनी कुटुंब असे आमचे फोटो आता अल्बम खुलवू लागले!

मध्यंतरीच्या काळात मुलांनी आमचे वाढदिवस साजरे केले. ‘आई, तुझ्या वाढदिवसाला मी तुला सरप्राईज गिफ्ट देणार आहे, ‘ म्हणून मुले त्यांनी साठवलेल्या पैशातून माझ्यासाठी आठवणीने छोटी- मोठी वस्तू आणू लागली आणि माझा ऊर आनंदाने आणखीनच भरून आला! अरेच्चा, किती मोठे झालो आपण! असे म्हणत अल्बम मधल्या फोटोत भर पडत होती…

आता काय पन्नाशी आली.. मुलांची लग्न कार्ये झाली.. सून, जावई, नातवंडे यांच्या आगमनाने वाढदिवस पुन्हा एकदा जोरात साजरे होऊ लागले. फॅमिली ग्रुप फोटोंची अल्बम मध्ये भर पडली. छोटी नातवंडे अंगा खांद्यावर विसाऊ लागली. काळ्या केसांमध्ये रुपेरी चांदीची भर पडली. वय

जाणवायला लागले. वाढदिवसाला आणलेला गजरा माळण्या इतके केस नाही गं उरले, ‘ असं लेकीला म्हटलं तरी, ‘ आई तुला मोगरीचा गजरा आवडतो ना, म्हणून मी मुद्दाम आणलाय, ‘ असं म्हटलं की छोट्याशा केसांवर तो घालावाच लागे! असे वाढदिवस साजरे करता करता हळूहळू साठी कडे वाटचाल झाली. सांधे कुरकुरायला लागले. आता काही नको तो वाढदिवस असे वाटू लागले! इतकी वर्षे काढलेले फोटो अल्बम मध्ये बघताना आपल्या मधला फरक जाणवू लागला…

पण काळ आपल्यासाठी थांबतो का? ती वाटचाल तर चालूच असते! आत्ता वयाची 72 वर्षे पूर्ण करून 73 व्या वर्षात पदार्पण केले तरी वाढदिवसाचा आनंद सर्वांमध्ये वाटून घेताना दिवस कसा जातो कळत नाही!

कुठे ती लहान ऋजू, नंतर लग्नानंतरची उज्ज्वला आणि आता तर उज्ज्वला आजी! अल्बम मधील सरकती वर्षे बघता बघता मी रंगून गेले! फोटोमुळेच ही किमया झाली आहे. खरंच, मन:चक्षुपुढे येणाऱ्या छोट्या मोठ्या व्यक्ती आपण सांगू शकत नाही वर्णन करून, पण फोटो मुळे मात्र व्यक्ती जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी राहते! ही तर आहे फोटो अल्बमची किमया!

4 जुलै 2026, बहात्तर वर्षे पूर्ण झाल्याचा वाढदिवस साजरा करताना केक कापून झाला! फोटो काढून झाले! आज मोठ्या भावाची माझ्याकडे असलेली उपस्थिती ही माझ्यासाठी आनंददायी होती.. पुन्हा एका नवीन वर्षात पदार्पण केले. आठवणींच्या अल्बम मध्ये आणखी एका फोटोची भर! अशाच आनंदात वाढदिवस साजरा करत रहायचंय, जोपर्यंत भिंतीवरच्या फोटोंमध्ये आपण जाऊन बसत नाही तोपर्यंत! …

© उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतीय ज्ञान प्रणाली (‘भाज्ञाप्र’- Indian Knowledge System – IKS) ☆ डॉ. प्रमोद वि. पाठक ☆

 डॉ. प्रमोद वि. पाठक

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतीय ज्ञान प्रणाली (‘भाज्ञाप्र’- Indian Knowledge System – IKS) ☆ डॉ. प्रमोद वि. पाठक ☆

गेल्या काही वर्षांपासून भारतातील उच्चशिक्षण क्षेत्रातील महाविद्यालयीन अभ्यासक्रमांच्या संदर्भात महत्त्वाच्या विषयांवर विचारमंथन सुरू आहे. तो विषय, भारतीय ज्ञान प्रणालीला (‘भाज्ञाप्र’- Indian Knowledge System – IKS) धरून भारतातील प्राचीन समांतर ज्ञानभंडारशी संलग्न आहे. पदवी परीक्षा करणार्‍या विद्यार्थ्याला त्याच्या अभ्यासाच्या विषयांच्या संदर्भात प्राचीन ज्ञान परंपरेत किती प्रगती झाली होती, प्राचीन चिंतन, संशोधन, तत्त्वज्ञान, आणि अधिक मागे जायचे तर ऋषिमुनींनी केलेले चिंतन माहिती करून देणे, त्यावर अधिक संशोधन करून ते विषय पुढे नेणे हे त्यामागचे उद्देश आहेत.

केंद्र शासनाने ‘भाज्ञाप्र’ला पुढे नेण्याचे धोरण ठेवले असल्याने, त्याला आर्थिक पाठबळ मिळाले आहे. त्याला धरून विषयवार लिखाण, अखिल भारतीय आणि प्रांत स्तरांवरील चर्चासत्रे अनेक विद्यापीठे आणि विद्वत संस्थांकडून आयोजित होत आहेत. ‘भाज्ञाप्र’ अंतर्गत येणार्‍या प्रत्येक विषयाला धरून अभ्यासक्रम कसे असावेत, त्यांचा विस्तार आणि शिकविण्याच्या पद्धतींवर आराखडे केले जात आहेत. सध्या तरी ‘भाज्ञाप्र’चा विस्तार बहुतेक वेळा, लिखित साहित्याला धरून केला जातो.

त्या विषयांची अगदी वेद, पुराणे, प्राचीन गणित, अर्थशास्त्र, भौतिक विज्ञान, रसायनशास्त्र अशी यादी अधिक पुढे नेता येईल. या सर्व विषयांचा थोडक्यात आढावा घेणारी दोन पुस्तके – –

1) Introduction to Indian Knowledge System : Concepts and application, by B. Mahadevan and others, PHI Learning, Delhi -110092,

2) आचार्य श्रेयस चारुदत्त कुर्‍हेकरांचे भारतीय ज्ञान परंपरा, ज्ञानपथ पब्लिकेशन, अमरावती ही नमुन्यादाखल आहेत. कुर्‍हेकरांच्या विषय क्रमवारीवरून लक्षात येईल की सध्याच्या ‘भाज्ञाप्र’ला धरून विषयांत लिखित साहित्यावर भर दिला जातो आहे.

इथे मला अमेरिकेतील प्राध्यापक लिओपोल्ड फिशर आणि नंतर अद्वैैतमत संन्यासी अगेहानंद यांनी भारतीय ज्ञान परंपरेचे दोन भागात केलेले विभाजन आठवते. त्यांनी ज्ञान परंपरेलील दोन प्रवाहांचे थोरली पाती (Greater tradition)आणि धाकली पाती (Little tradition)असे वर्गीकरण केले होते. ’थोरल्या पातीत’ सर्व प्रकारचे लिखित, शिस्तबद्ध रितीने जतन केलेले, पिढ्यानपिढ्यांनी जतन करून ठेवण्याची परंपरा असलेले साहित्य आणि कर्मकांडे होती; तर ’धाकल्या पाती’च्या परंपरेत विशेष करून माजघरात पिढ्यानपिढ्यांनी जतन करून ठेवलेल्या प्रथांचा समावेश होता. त्यात महिलांचे अनेक उत्सव, हळदीकुंकू, सटवाईची पूजा, इ. प्रकार, काही सण आणि अगदी मुलीला न्हाण आल्यानंतर घरातील आणि घनिष्ठ संबंधातील महिला मिळून घरगुती सोहळा करत असत यांचा समावेश होता. कारण माजघरात साजरे होणारे सोहळे लिखित स्वरूपात उपलब्ध नसत. ते कसे साजरे करावे हे घराघरातील गृहलक्ष्मी ठरवत असे. त्यात घरच्या पुरुषांना मज्जाव होता.

शैक्षणिक क्षेत्रातील धाकटी पाती

लिखित साहित्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. तसे पाहिले तर लिप्या प्रचारात येण्यापूर्वी सर्वच साहित्य मौखिक परंपरेने जतन केले जात असे. ते स्मरण करण्यास, सातत्य राखण्यास सोपे जावे यासाठी ते छंदोबद्ध केले जाई. त्याचे सर्वात उत्कृष्ट उदाहरण वेदसंहिता आहेत. एकाही काना, मात्रा आणि विसर्ग उच्चाराचा बदल न होता ते हजारो वर्षे जतन केले जाऊन आज आपल्यापर्यंत पोहोचले आहे. त्याच्या पाठोपाठ व्याकरण ग्रंथ, महाकाव्ये, पुराणे, विज्ञान विषयांवरील ग्रंथ इ. वाङ्मय प्रकार आले. त्यात संस्कृत, प्राकृत, जैन आणि बौद्ध इ. सर्व साहित्य ’थोरल्या पाती’त मोडतात. सध्या ’सा. विवेक’मध्ये राजस वैशंपायन हे अलीकडच्या शतकांतील काही ग्रंथकार आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाची ओळख करून देत आहेत. त्यांचाही समावेश ‘भाज्ञाप्र’त करता येईल.

त्याच हजारो वर्षांच्या काळात दुसराही एक सांस्कृतिक प्रवाह अखंडपणे वाहत होता. तो म्हणजे कौशल्याची कामे करणारे वर्ग आणि शहरी निवास तसेच संपर्कापासून दूरी बाळगून असलेले वनवासी वर्ग होते. त्यांनीही दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक क्षेत्रांत फार प्रगती केली होती. वैदिक काळापासून कौशल्याची कामे करणार्‍या वर्गाचे महत्त्व ’थोरल्या पाती’ने जाणले होते, स्वीकारले होते. त्यांचे उल्लेखसुद्धा वैदिक साहित्यात मोठे महत्त्वाचे आहेत. ’

’ऋग्वेदातत्वष्टा’ हा देवांचा कारागीर असून त्याला देवता समूहात मानाचे स्थान आहे. ’यजुर्वेदा’तील ’रुद्राध्यायात’ समाजातील अनेक कारागीर आणि व्यावसायिक हे ’रूद्रस्वरूप’ आहेत असे मंत्र आहेत. या सर्व कलाकौशल्यांचे काम करणार्‍या समाजघटकांचे संस्कृती संवर्धनात मोठे योगदान होते आणि आहे. त्यांनी प्रगत केलेली कौशल्ये आणि तयार केलेल्या वस्तू अगदी पाच हजार वर्षांपूर्वीपासून-सिंधुसंस्कृती काळापासून निर्यात होत असत. ’रामायणात’ भरत जेव्हा रामाच्या भेटीसाठी वनात निघाला, तेव्हा अयोध्यावासी त्याच्याबरोबर येणार हे लक्षात घेऊन त्याने ’राजमार्ग’ म्हणता यावे असे रस्ते बांधायला घेतले. त्याने अनेक प्रकारच्या तंत्रात निष्णात असलेल्या तुकड्या पुढे पाठविल्या. त्यांची यादी रामायणात दिली आहे. मध्ययुगात आपल्या संस्कृतीला भौतिक पातळीवर उतरवणार्‍या शिल्पींचे, रंगकर्मींचे ‘भाज्ञाप्र’ला केलेले फार मोठे योगदान उपेक्षित आहे.

या मंदिरांचे बांधकाम एका माणसाच्या-मुख्य शिल्पीच्या – हयातीत फार कमी वेळा पूर्ण होत असे. तेव्हा एका पिढीतून दुसर्‍या पिढीत ते देण्याची सुव्यवस्थित प्रणाली त्यांनी प्रगत केली होती. केवळ मंदिर बांधणीतसुद्धा कितीतरी कौशल्यांचा वापर होत असे. शतकानुशतके व्यवस्थित राहणार्‍या मंदिरांसाठी जमिनीची निवड करणे, आसपास उपलब्ध असलेल्या आणि टिकावू पाषाणांची निवड करणे, ते आवश्यकतेनुसार फोडून बांधकामाच्या ठिकाणी पोहोचवणे, ते तासून त्यांपासून मंदिरांच्या विविध भागांचे काम करणे, त्यातून शिल्पे तयार करताना ती शिल्पशास्त्राचे नियम पाळणे आणि कितीतरी व्यवधाने असत. त्यासाठी त्या कामांमध्ये निष्णात असलेले कारागीर पिढ्यानपिढ्या तयार होत राहण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले होते.

दुसरे ठळक उदाहरण दक्षिण भारतात अनेक देवळांमधून उभारलेले संगीत सुरांचे आवाज काढणारे स्तंभ आहेत. ही मंदिरे एकहाती नाहीत. असे स्तंभ उभारण्यासाठी लागणारे साहित्य, ते तासण्याचे तंत्र, इ. साठी निष्णात शिल्पी पिढ्यानपिढ्या तयार होत होते. आज ते तंत्रज्ञान पूर्णपणे लोप पावले आहे.

अशी तंत्रे केवळ वंशपरंपरेने संक्रमित होत असत हे म्हणून चालणार नाही. कारण पिता-पुत्र एकाच क्षमतेचे असतील हे गृहीत योग्य नाही. म्हणून योग्य व्यक्तीच्या निवडीचे निकष (selection criteria) असायलाच पाहिजेत. शिल्पशस्त्राचे ग्रंथ आहेत; पण ते या गोष्टींच्या फार खोलात जात नाहीत. ही माहिती परंपरेने पुढे जात होती. ती लिखित स्वरूपात उपलब्ध नसल्याने आज तशी मंदिरे उभारायची असतील तर ती पुन्हा प्रगत करावी लागतील. ती संशोधनांती प्रगत झाली तर त्यांची उपयुक्तता केवळ मंदिरे बांधण्यापुरती मर्यादित असणार नाही; तर इतर क्षेत्रांत ती वापरली जातील.

समांतर म्हणून उदाहरण द्यायचे झाले तर अवकाश विज्ञान प्रगतीचे देता येईल. मानवाला अवकाश यानाद्वारे पाठविण्याच्या कामी येणारी तंत्रे इतर अनेक क्षेत्रात वापरली जात आहेत. कुठलेही संशोधन वाया जात नाही. पुरातन तंत्रे आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने प्रगत करताना ती अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे. इथे मला एक प्रयोग सुचवायचा आहे. तो म्हणजे, दक्षिण भारतातील मंदिरातील ’सूर’ निर्माण करणार्‍या एखाद्या खांबाची तंतोतंत प्रतिकृती आधुनिक मोजमाप तंत्राने तयार केली आणि सूर निर्मितीसाठी त्याचे परीक्षण केले तर होण्यासारखे आहे. त्यातून जर खरोखरच अपेक्षित सूर निघाले; तर आधुनिक विज्ञानाशी त्याची सांगड सहज घालता येईल, जर नाही निघाले तर आधुनिक तंत्र कुठे कमी पडले ते तपासता येईल.

ढाक्याची मलमल आणि आजचे झिरझिरीत नायलॉनचे कापड यात गुणात्मक काय फरक आहे, यावर बहुधा संशोधन झाले असावे. मला माहिती नाही. पण झाले नसेल तर ते व्हावे. आपण अजिंठा-वेरूळमध्ये चित्रांसाठी वापरलेल्या, शेकडो वर्षे टिकलेल्या रंगांकडे आश्चर्याने पाहतो, त्याची वाखाणणी करतो. ते कसे तयार झाले? त्यावर संशोधन झाले तर भविष्यात अवकाशात वापरण्यासाठी त्या प्रकारच्या रंगांची उपयुक्तता असू शकेल. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा पुन्हा शोध घेतला जावा.

इतिहास आणि समाजशास्त्रांचे नवे दालन

भारतात अस्थायी वनवासी समाज आणि नागरी स्थिर समाज हजारो वर्षे एकमेकांचे शेजारी म्हणून राहत आहेत. त्यांचे आपापसात सामाजिक आणि सांस्कृतिक आदानप्रदान होत राहिले. एक फरक इथे लक्षात घेतला पाहिजे. स्थिर समाजाचा इतिहास अनेक प्रकारच्या लिखीत माध्यमांतून उपलब्ध आहे. तसे वनवासी समाजाच्या बाबतीत नाही. फक्त काही नावारूपाला आलेली वनवासी राज्ये, जसे ठाणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीतील मुकणे राज्य, नागपूर-चंद्रपूर-जबलपूर भागातील गोंड राज्ये, सोडली; तर इतरत्र वनवासी समाजांच्या संस्कृती आणि इतिहासाचा धांडोळा घेण्याची आवश्यकता आहे. त्याच्याशी संबंधित काही प्राथमिक माहितीपर पुस्तकांची माहिती देतो आहे – – –

  1. आदिवासी हलबा/हलबी जमात व भाषा : एक अभ्यास, ले. फरेंद्र कुतिरकर, विजय प्रकाशन, नागपूर, किंमत – 200 रू. , पृष्ठे 134.
  1. भटक्या विमुक्तांच्या इतिहासाची साधने : शोध, अन्वयार्थ आणि मीमांसा, ले. नारायण भोसले, मैत्री पब्लिकेशन्स, पुणे, किंमत 350 रू, पृष्ठे 246. पुस्तकाच्या शेवटी उपयुक्त संदर्भ साधनांची यादी दिली आहे.
  1. युगशिल्पी (मागोवा वडार जमातीचा) : ले. प्राचार्य शिवमूर्ती भांडेकर, लोकवाङ्मय गृह, मुंबई, पृ. – 232. पुस्तकात वडार जमातीचा थेट सिंधू संस्कृतीपर्यंतचा इतिहास, तिचे पूर्ण भारतभर वास्तव्य इ. विषय आहेत.
  1. सातपुड्यातील भिल्ल : ऐतिहासिक आणि सामाजिक मागोवा, ले. डॉ. गोविंद गारे, काँटिनेंटल प्रकाशन, पुणे, किं. 350 रू, पृ. 328. स्वातंत्र्यसैनिक, काही पारंपरिक गीते, शासकीय अहवाल इ. उपयुक्त साहित्य दिले आले आहे.
  1. मणिधर : संस्कारो और कलाओं में नाग की महिमा, नाग देवते संदर्भातील तज्ज्ञांच्या लेखांचे संकलन, मध्यप्रदेश संस्कृती परिषद, भोपाळ. भारताच्या प्रांताप्रांतातील सांस्कृतिक सर्पगाथा असे या पुस्तकाचे सार देता येईल.

– – वरील यादी नमुन्यादाखल दिली आहे. ‘भाज्ञाप्र’ अंतर्गत हे विषय ’धाकटी’ म्हणण्यापेक्षा ’समांतर पाती’ असे येऊ शकतात. त्यांचा अधिक खोलात जाऊन अभ्यास व्हायला पाहिजे. पदवी पातळीसाठी विविध आयामांची ओळख आणि पदव्युत्तर स्तरावर काही आयामांचा सखोल अभ्यास असे संबंधित ‘भाज्ञाप्र’चे स्वरूप असू शकते. त्यातून ‘भाज्ञाप्र’ची परिपूर्णतेकडे वाटचाल होईल.

 

© डॉ. प्रमोद वि. पाठक

नाशिक   भ्र. – ९९७५५५९१५५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक वेगळी बातमी… – लेखक : श्री धनंजय पाटील ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ एक वेगळी बातमीलेखक : श्री धनंजय पाटील ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

काही महिन्यापूर्वी एक मराठी चित्रपट आला होता ” क्रांती ज्योती विद्यालय ” खरं तर चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा आणि समाजाला दिशा देणार माध्यम. ह्याच क्रांतीज्योती विद्यालय चित्रपटपासुन प्रेरणा घेऊन मुंबईतल्या एका बंद पडायला आलेल्या मराठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेला संजीवनी दिली आहे. मुंबईत चुनाभट्टी मध्ये स्वदेशी मिल मराठी शाळा ही 1920 साली मा. जे. आर. डी. टाटा यांनी स्वदेशी कापड गिरणीच्या कामगारांसाठी बांधली. ती वास्तू आजही 106 वर्षानंतर उभी आहे. आपण हिला हेरिटेज दर्जा देऊ शकतो.

तर गोष्ट अशी की, 2001 मध्ये स्वदेशी मिल बंद पडली आणि शिक्षकांचे पगार द्यायला कंपनी कडे पैसे न्हवते. तेव्हा त्या वेळचे शिक्षक श्री. वसंत फालक, श्री. सुभाष भिरूड, सौं. स्नेहलता जाधव, सौं. माया ढोबळे. सौं. शुभांगी उंडाळकर, सौं. गीता पोयरेकर, सौ. प्राची भोसले, सौं. कांचन पाटील आणि सौं. वनिता निर्मल यांनी पगार न घेता 3 वर्षे शाळा सांभाळली आणि शिक्षणाचे पवित्र कार्य निःस्वार्थ पणे सुरु ठेवले. 2003 ला निधी अभावी शाळा बंद पडु नये म्हणुन शिक्षकांनी आणि कंपनीने केदारनाथ विद्या प्रसारणी, कुर्ला यांना शाळा दत्तक दिली. पहिली ते सातवी असलेली शाळा दहावी पर्यंत झाली खरी पण 2026 येता येता शाळेची पटसंख्या जी 200 विद्यार्थी असायची ती 14 वर येऊन थांबली आणि एका हेरिटेज शाळेची कचरा कुंडी पेक्षा वाईट अवस्था झाली. नंतर काही माजी विद्यार्थी 2026 च्या जानेवारी महिन्यात शाळेत स्नेह मेळावा घ्यावाह्या उद्देशाने परवानगी घेण्यासाठी आले. शाळेची दयनीय अवस्था पाहुन त्यांना वाईट वाटले. मग त्यांनी 200 माजी विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बनवला व्हाट्सअप वर. सगळ्यांना स्नेह मेळाव्या निमित्ते शाळेत बोलाविले, प्रत्येकी ₹500 जमा करुन स्नेह मेळावा 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधुन त्यांनी जुन्या शिक्षकांना, विद्यमान शिक्षकांना आणि संस्थेच्या कार्यकारणी ला बोलावले. सोहळा पुर्ण झाला पण एक नवा अध्याय सुरु झाला होता. त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाला भेटुन सेमी इंग्रजी, इंग्रजी माध्यम शाळेत सुरु करायचा प्रस्ताव दिला. स्वतः जबाबदारी उचलून चुनाभट्टी परिसरातील सेवाभावी संस्था, मंडळे, माजी विद्यार्थी, दानशूर व्यक्ती कोणी मंदिरे यांना संपर्क करुन आपल्या कामाची माहिती दिली निधी गोळा करून शाळेची दुरुस्ती, आधुनिकीकरण, आणि सुशोभीकरण केले. रंगकाम आणि टाईल्स ने शाळेच्या भिंती सजल्या. शाळेत भरभरून प्रवेश व्हावे यासाठी जेथे गरीब आणि माध्यमावर्गीय वस्ती आहे तेथे बॅनर लावुन, पॅम्प्लेट वाटून, घरोघरी फिरून प्रचार केला. शाळेच्या प्रचारासाठी एक गाणे AI चा वापर करुन तयार केले आणि रोज स्पीकर वर वाजविले. पालकांच्या खिशाला परवडणारे शिक्षण देणारी शाळा सुरु होतेय फी फक्त 100 रुपये महिना सेमी इंग्रजी साठीआणि फक्त ₹300 महिना इंग्लिश साठी. असा प्रचार करुन एक अभिनवं योजना आणुन त्यांनी 70 नवे ऍडमिशन केले. आणि ह्याच शाळेचे नव्याने उदघाटन येत्या 22 जून रोजी होणार आहे.

वेळ सकाळी 10 वाजता. स्थळ : चुनाभट्टी मुंबई.

आहे ना एक वेगळी बातमी, एक आश्वासक आणि दिशादर्शक घटना जी प्रेरणा देईल मराठी शाळेला.

हे विद्यार्थी म्हणतात की माध्यम जरी बदलले तरी सुचना प्रणाली, संस्कृती, शिक्षण पद्धत्ती मराठी ठेऊन आपल्याला मराठी शाळा वाचवता येतील.

जेथे आज अनेक मराठी शाळा बंद पडत आहेत तेथे सेमी इंग्रजी आणि इंग्रजी ची साथ घेऊन मराठमोळी संस्कृती जपणारी शाळा नवी भरारी घेण्यासाठी सज्ज होतेय. बदलत्या काळाची पावले ओळखून मराठी संस्कृती जपुन इंग्रजी शिक्षणाचा आधार घेऊन परिसरातील गोर-गरीब आणि कामगारांच्या मुलांना हक्काचे शिक्षण देणारी स्वदेशी मराठी शाळा तिच्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा उभी केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्र राज्याने बोध घ्यावा अशी एक घटना महाराष्ट्रात एका मराठी चित्रपटामुळे घडली.

स्वदेशी मराठी शाळा विकास संस्था, चुनाभट्टी, मुंबई 

संपर्क : यतिन पाटील 9867205338

राशी गिरी : +919702734840

निखिल धोत्रे : 8383800880

वरची प्रेस नोट बातमी म्हणुन पाठवत आहे. शक्य झाल्यास जर कुठे प्रसिद्ध झाली तर शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि शाळेला मदत होईल 

 

लेखक : धनंजय पाटील

मो 9969781981

प्रस्तुती : गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक  संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मनाच्या वाड्यात गडबड झाली” – लेखक – अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “मनाच्या वाड्यात गडबड झाली” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

मनाच्या वाड्यात गडबड झाली… जुन्या दुःखांची पंचायत भरली… आली आली ग आठवण बाई… आली ग आठवण बाई…

कोपऱ्यात बसलेले एक जुने दुःख उठले… डोळे चोळीत म्हणाले… अहो, आमचे काय ठरले? आम्ही अजून मनातच राहायचे का?

तेवढ्यात आनंदराव दारातून आत आले… हातात हास्याचे गाठोडे… खांद्यावर समाधानाचे उपरणे…

आनंदराव म्हणाले… काय रे, अजून हीच मंडळी? अजून हीच दुःखे? अजून हाच बाजार? दहा वर्षांपूर्वीचा अपमान… पंधरा वर्षांपूर्वीचा राग… वीस वर्षांपूर्वीचे अपयश… अहो, एवढा जुना माल अजून गोदामात ठेवला आहे?

तेवढ्यात एक दुःख फुगून म्हणाले… आम्ही खास आहोत… आम्ही भावनिक आहोत…

आनंदराव हसले… म्हणाले, भावनिक नाही रे बाबा… तुम्ही आता निर्माल्य झाला आहात… कालची फुले आज निर्माल्य होतात… मग कालची दुःखे आज ताजी कशी?

प्रश्न बरोबर होता… दुःखे गप्प बसली…

एवढ्यात श्रद्धाबाई पुढे आल्या… त्यांनी देवाच्या चरणी फुलांची परडी ठेवली… म्हणाल्या… ही फुले माझी होती… आता त्याची झाली…

मग दुःखांचे काय?

तीही त्याचीच…

देवा… हे राग तुझे… हे अपयश तुझे… ही चिंता तुझी… आता तूच सांभाळ…

हे ऐकताच मनाच्या वाड्यात कुजबुज सुरू झाली… अहो… आपण तर दुःखांना कायमस्वरूपी भाडेकरू ठेवले होते… आता त्यांना नोटीस मिळाली वाटते…

तेवढ्यात भारूड सुरू झाले…

मनाच्या वाड्यात गडबड झाली… जुन्या दुःखांची उचलबांगडी झाली… आली आली ग आनंद बाई… आली ग आनंद बाई…

एक दुःख पुटपुटले… आम्ही जाऊ कुठे?

आनंदराव म्हणाले… गंगार्पण व्हा… निर्माल्य घरात ठेवत नाहीत… मनातही ठेवत नाहीत…

जाता जाता एक जुनी चिंता म्हणाली… माझी आठवण येईल…

मन हसले… म्हणाले… नाही गं… तुझ्या जागी आता आनंदाची पेरणी करायची आहे…

तेवढ्यात शेतकरीबुवा आले… म्हणाले… जमिनीतील तण काढले नाही तर पीक येत नाही… मनातील दुःख काढले नाही तर आनंद उगवत नाही…

वा रे वा… मनाला मुद्दा पटला…

राग बाहेर… मत्सर बाहेर… अहंकार बाहेर… दुःख बाहेर…

आत फक्त प्रेम… आत फक्त विश्वास… आत फक्त आनंद…

तेवढ्यात समाधानराव टाळी वाजवून म्हणाले…

ठरले… ठरले… ठरले…

दुःखांचे निर्माल्य करायचे ठरले… आनंदाची पेरणी करायची ठरली…

मनाच्या वाड्यात पुन्हा उजेड झाला… आनंदाच्या घोषणा सुरू झाल्या…

जय समाधान… जय समाधान…

जय आनंद… जय आनंद…

आणि मनाच्या दारात बसलेला अनुभव नावाचा म्हातारा हसून म्हणाला…

“देवाला वाहिलेली फुले परत मागत नाहीत… मग त्याच्या चरणी ठेवलेली दुःखे पुन्हा उचलून का घ्यायची? “

 – दुःखांचे निर्माल्य करण्याचा सल्ला देणारा एक साधा निरीक्षक..

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निर्णयामागचं गुपीत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्मिता सुहास पंडित ☆

स्मिता सुहास पंडित

? विविधा ?

निर्णयामागचं गुपीत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्मिता सुहास पंडित ☆

साधं, थोडसं गबाळं असणं हेच डी-मार्टचं हे खरं रूप आहे. हाच २. ८ लाख कोटींचा खरा मास्टरस्ट्रोक!

डी-मार्टमध्ये शिरलात की तुम्हाला असं वाटतंच वाटतं की हे दुकान किती ‘विस्कळीत आणि अस्ताव्यस्त’-थोडसं बॉइज होस्टेलच्या रुमसारखं आहे ? जमिनीवर पडलेले खोके, डोळ्यांना त्रास देणारे पांढरे शुभ्र ट्यूबलाईट्स आणि शून्य सजावट. एखाद्या गजबजलेल्या साध्या आठवडी बाजारासारखा भासणारा हा पसारा खरं तर गोंधळ नाही, तर तो एक अत्यंत अचूक असा ‘कॅल्क्युलेशन’चा भाग आहे. डी-मार्टचं हे साधं, किंबहुना थोडं विस्कळीत दिसणं ही त्यांची चूक नाही, तर तो या कंपनीने घेतलेला आजवरचा सर्वात मोठा व्यावसायिक निर्णय आहे.

**

यामागचं गणित समजून घेणं रंजक आहे. भारतात बहुतांश मोठे रिटेलर्स आपल्या कमाईतील १०० रुपयांमागे ३ ते ६ रुपये फक्त जागेच्या भाड्यापोटी जमीनदाराला देतात. डी-मार्टची वस्तुस्थिती अशी आहे की, ते त्यांच्या बहुतांश स्टोअर्सच्या जागा स्वतः विकत घेतात. यामुळे भाड्याचा अवाढव्य खर्च शून्यावर येतो. तिथे ना महागडा इंटिरिअर डिझायनर असतो, ना मूड लायटिंग. फक्त साधे रॅक्स आणि जमिनीवर ठेवलेले कार्टन्स.

**

इंटेरिअरवर खर्च न झालेला प्रत्येक रुपया हा फिरून ग्राहकाच्या खिशातच जातो. हे दुकान जेव्हा तुम्हाला ‘कुरूप’ किंवा ‘साधं’ वाटतं, तेव्हा तुमच्या मेंदूला एक सुप्त सिग्नल मिळतो – “इथे रोषणाईचा खर्च नाही, म्हणजे इथे वस्तू स्वस्तच मिळणार. “यालाच म्हणतात ते ‘लो-कॉस्ट’ ब्रँडिंग, जे महागड्या जाहिरातींपेक्षा जास्त प्रभावी ठरतं.

**

या ब्रँडिंगच्या मुळाशी आहेत डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमाणी. दलाल स्ट्रीटवर त्यांना अनेक दशकांपासून ‘मिस्टर व्हाईट अँड व्हाईट’ या नावाने ओळखलं जातं. एकच पांढरा शर्ट आणि पांढरी पँट, हाच त्यांचा कायमचा पेहराव. कोणताही भपका नाही, कोणताही दिखावा नाही. दमाणी यांनी केवळ दुकान डिझाइन केलं नाही, तर त्यांनी स्वतःच्या साधेपणाचा आरसा तिथे उभा केला आहे.

**

महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय कुटुंबासाठी डी-मार्ट म्हणजे केवळ दुकान नाही, तर ती एक सवय झाली आहे. जाणीवपूर्वक जपलेलं हे साधं रूप म्हणजे ब्रँडिंगचा अभाव नाही, तर तेच या ब्रँडचं सर्वात मोठं शक्तिस्थान आहे. एखादी गोष्ट ‘ब्रँडेड’ दिसण्यासाठी ती चकचकीतच असावी लागते, हा समज डी-मार्टने मोडीत काढला आहे.

**

३१ मार्च २०२६ रोजी डी-मार्टने भारतात ५०० स्टोअर्सचा टप्पा ओलांडला आणि आज या कंपनीचे बाजारमूल्य तब्बल २ लाख ८० हजार कोटी रुपयांच्या वर गेले आहे. कोणत्याही चकचकीत जाहिरातीशिवाय किंवा सेलिब्रिटी ब्रँड अँबेसेडरशिवाय गाठलेला हा आकडा कोणत्याही ब्रँड स्ट्रॅटेजिस्टला घाम फोडण्यासाठी पुरेसा आहे.

**

पुढच्या वेळी जेव्हा एखादं दुकान खूप साधं आणि विश्वासाला पात्र नाही असं वाटेल, तेव्हा पुन्हा एकदा विचार करा. ते खराब डिझाइन नसू शकतं, तर तो त्या ब्रँडने दिलेला सर्वात मोठा संदेश असू शकतो. सौंदर्यापेक्षा बचतीला महत्त्व देणारा असा दुसरा एखादा ब्रँड तुम्हाला आठवतोय का?

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  स्मिता सुहास पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares