मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ७ … ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ७ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

साधकांना उपदेश

संत तुकाराम महाराजांनी सगुण भक्ती करता करता त्यांच्या समवेत असलेल्या साधकांना परमेश्वराच्या भक्तीसंबंधी आपल्या अभंगांतून अमोलिक उपदेश केला आहे.

तुकारामांच्या गाथेचा अभ्यास करताना या अभंगांचा विचार करणे आवश्यक आहे असे मला वाटते.

भक्तीचा सोपा उपाय ते साधकांना सांगतात.

शांती परते नाही सुख/ येर अवघेची दुःख//

म्हणवुनी शांती धरा / उतराल पैलतीरा//

खवळलीया काम क्रोधी/ अंगी भरती आधि व्याधी//

*तुका म्हणे त्रिविधताप/ मग जाती आपोआप//

शांतीचे महत्त्व सांगताना महाराज म्हणतात, “

या जगात चित्ताची शांती ही श्रेष्ठ सिद्धी आहे. सर्व सुख तेथेच आहे, बाकी सर्वत्र दुःख आहे. म्हणून नेहमी मन शांत ठेवावे. त्यामुळे संसार सागरापासून पैलतीरी जाणे सोपे होते. काम, क्रोध खवळले तर अनेक व्याधींचा उगम होतो. एकदा आपल्या देहात, मनात शांती स्थिर झाली की आध्यात्मिक, आधिभौतीक आणि आधि दैविक हे त्रिविध ताप आपोआप निघून जातात. “

भक्तीचा सोपा उपाय तुकाराम महाराज सामान्यांना सांगतात.

सोपे वर्म आम्हा/ सांगितले संती/

टाळ दिंडी हाती/ घेऊनी नाचा//

समाधी सुख सांडा/ ओवाळूनी//

अशा या कीर्तनी ब्रह्म रस/

तुका म्हणे मन पावोनी विश्रांती/

त्रिविध नासती ताप क्षणी//

हातात टाळ घेऊन आणि दिंडीमध्ये विठ्ठल नामाचा गजर करत तल्लीन होऊन नाचल्याने

तुमचे त्रिविध ताप क्षणार्धात नाहीसे होतील आणि समाधी लागल्याचे समाधान मिळेल.

पुढे जाऊन तुकाराम महाराज भक्तांना सांगतात की देखाव्याच्या तीन जाती/(देवाला पाहण्याचे तीन प्रकार आहेत.

जैसा भाव तैसे फळ

स्वाती तोय एक जळ*

तुमचा देवाप्रती जसा भाव असेल त्याप्रमाणे तो तुम्हाला दिसेल.

जसे, स्वाती नक्षत्रात पडणारे पाणी एकच असते, परंतु ते शिंपल्यात पडले तर त्याचा मोती होतो, कपाशीच्या पिकावर पडले, तर पिकाचा नाश होतो आणि जर ते सापाच्या मुखी पडले तर त्याचे विष होते. म्हणून जसा भाव तसेच फळ मिळते.

तुका म्हणे हिरा/ पारखिया मुढा गारा//

जो रत्नपारखी आहे, त्यालाच हिरा कळतो, जो मूर्ख, अज्ञानी आहे त्याच्या नजरेत हिरा आणि गारा सारख्याच असतात.

साधकांना तुकाराम महाराज भक्तीचा सोपा उपाय सांगतात.

सर्वसाधनांचे सार/ भव सिंधू उतरी पार/

योगायोग तपे/ केली तयाने अमूपे/

तुका म्हणे जपा/ मंत्र त्रि अक्षरी सोपा//

या अभंगात विठ्ठल नामाच्या चिंतनाचे महत्त्व तुकाराम महाराज साधकांना सांगत आहेत. चिंतनाने सर्व काही प्राप्त होते. विठ्ठल चिंतन हे सर्व साधनांचे सार आहे. भवसागर तरुन जाण्यास त्याची मदत होते. असंख्य व्रतवैकल्ये, तप, यज्ञ याग केल्याचे पुण्य या एका चिंतनाने मिळते. म्हणून साधकहो, विठ्ठल हा तीन अक्षरी नामजप तुम्ही श्रद्धेने आणि भक्ती भावाने करा. भक्ती मार्ग कसा अत्यंत सोपा आहे हे साधकांना महाराज सांगतात.

न लगे देश काळ/ मंत्र विधान सकळ/

करुनी करुणा भाकावी//

भक्तीतली आर्तता पाहूनच देव स्वतःहून भक्ताजवळ येतो.

*येतो बैसलिया ठाया/ आसने व्यापी देवराया/

निर्मल ते काया / अधिष्ठान तयाचे//

कल्पनेचा साक्षी/ तरी आदरेची लक्षी/

आवडीने भक्षी/ कोरडे धान्य मटामटा//

भक्ताच्या ठिकाणी भगवंताबद्दल जो आदर असतो, तो देवाला कळतो आणि भक्ताने प्रेमाने दिलेले अन्न तो मटामटा खातो.

घेणे तरी भाव/ लक्ष्मी दासाचा उपाव/

तुका म्हणे जीव/ जीवी मेळवील अनंत//

परमेश्वर दासाचा भक्तीभाव जाणून त्याचे रक्षण करतो आणि शेवटी भक्ताला आपल्या स्वरूपाशी मिळवून घेतो.

वाटा घेई लवकरी/ मागे अंतरसी दूरी/

केली भरोवरी/ सार नेती आणिक//

ऐसी भांबावली किती/ काय जाणो नेणो/

किती समय नेणती/ माता भार वाहुनी//

नाही सरले तोवरी/ धाव घेई वेग करी/

घेतले पदरी/ पावले ते आपुले//

फटलंडी म्हणे तुका/ एक सहावे धक्का/

तरीच या सुखा / मग कैसा पावसी//

सामान्य प्रापंचिकाला महाराज या वरील अभंगातून काय सांगतात? ते म्हणतात की अरे परमार्थाचा वाटा लवकर घे, नाहीतर तुला तो मिळणार नाही. नंतर तू कितीही खटाटोप केलास, तरी दुसरेच लोक सार घेऊन जातील. संसाराच्या भ्रमात अडकलेली अशी किती माणसे आहेत, याची गणतीच नाही. निष्कारण प्रपंचाचा भार डोक्यावर घेऊन नरजन्माची सुसंधी वाया घालवतात, म्हणून आयुष्य असेपर्यंत हे साधका, तू संतांकडे धाव घे. संतांकडून मिळणारे ज्ञान साधनेने लवकर आत्मसात कर.

भगवंताला भक्त किती प्रिय आहे हे तुकाराम महाराज साधकांना पुराणातील कथांचा आधार घेऊन सांगतात.

मानी भक्तांचे उपकार/ ऋणिया म्हणवी निरंतर/

केला निर्गुणी आकार/ कीर्ती मुखे वर्णिता//

म्हणोनी जया जे वासना/ ते पुरवितो पंढरी राणा//

अंबऋषी कारणे/ जन्म घेतले नारायणे/

एवढे भक्तीचे लाहाणे/ दास्य करी दासाचे//

भावभक्तीचा अंकित/ नाम साजे दीनानाथ/

म्हणोनी राहिला निवांत/ तुका चरण धरुनी//

भक्तासाठी भगवंत सगुण रूप घेऊन त्याच्या मागे मागे सतत असतो. भक्ताला सर्वकाळ सर्व दिशा शुभच असतात. अखंड हरिनामाने तो शुचिर्भूत झालेला असतो. ज्या ठिकाणी नारायणाचे अखंड चिंतन चालू असते ते स्थळ

उत्तमच असते, मग तो एकांतवास असो, अथवा घर असो. नारायणाची कृपा हे महद्भाग्य आहे.

या ठिकाणी महाराज एक कथा सांगतात.

महाबळ नावाचा एक भट कृष्णाचे पारिपत्य करण्यासाठी गोकुळात आला होता. त्याला कंसाने पाठवले होते. आपण त्रिकालज्ञ ज्योतिषी आहोत असे भासवून त्याने नंद व यशोदेला मोहित केले होते. जेव्हा यशोदा व नंद यांनी त्याला कृष्णाचे भविष्य विचारले, तेव्हा त्याने मुद्दामच विपरीत भविष्य सांगण्यास सुरुवात केली. त्यावेळी कृष्णाच्या मायेने त्या ब्राह्मणाला बसावयास दिलेला पाटच उडला आणि त्या ब्राह्मणाच्या पाठीत बसला. त्याचा खोटेपणा कृष्णाला सहन झाला नाही. असत्याचे, पापाचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही हे भक्तांना सांगण्यासाठी तुकाराम महाराजांनी ही कथा त्यांच्या अभंगात वर्णन केली आहे.

भक्तीचे महात्म्य सांगताना वेळोवेळी त्यांनी अशा प्रकारच्या रूपकात्मक कथांचा उपयोग केला आहे. कधी त्यांची भाषा परखड, तर कधी अति रसाळ आणि मधाळ वाणी त्यांच्या अभंगातून आपल्याला दिसून येते.

वेळोवेळी येणाऱ्या अभंगातून आपण याचा परामर्श घेणारच आहोत.

क्रमशः… ७ 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – भाग – २ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – भाग – २ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

मनाचे श्लोक समर्थ रामदासांनी कसे आणि कोणत्या परिस्थितीत लिहिले त्याची कथा मोठी रंजक आहे. समर्थांनी चाफळला श्रीराम नवमीचा उत्सव सुरू केला होता. या उत्सवा दरम्यान परिसरातील आणि आजूबाजूच्या गावातील शेकडो लोक दर्शनासाठी आणि प्रसादासाठी त्या ठिकाणी एकत्र येत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना या उत्सवाबद्दल जेव्हा कळले तेव्हा त्यांनी दरवर्षी या उत्सवाला मदत देण्याचे ठरवले. दरवर्षी महाराजाकडून या उत्सवासाठी धान्य, शिधा, पैसे इ. स्वरूपात नियमितपणे मदत येत होती. परंतु एकदा मात्र काही कारणाने ही मदत पोहोचू शकली नाही. कदाचित महाराज मोहिमेत गुंतले असल्यामुळे असे झाले असावे. परंतु हा उत्सव कसा पार पडेल याची शिष्यांना मात्र चिंता लागली होती. त्यांनी समर्थांच्या कानावर हा विषय घातला. समर्थ म्हणाले, ” कर्ता करविता राम आहे. हा त्याचाच उत्सव आहे. तोच आपल्याकडून हे कार्य करून घेईल. “

त्याच दिवशी रात्री समर्थांनी रात्री आपला पट्ट शिष्य कल्याणस्वामी यांना बोलावले आणि त्यांना येताना लेखनसामग्री घेऊन येण्यास सांगितले. समर्थांनी कल्याणाला आपल्यासमोर बसवले आणि त्यांच्या मुखातून मनाचे श्लोक बाहेर पडू लागले. ‘ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा ‘ या नमनाच्या श्लोकाने सुरुवात झाली. समर्थ सांगत होते आणि कल्याण लिहून घेत होता. हा घटनाक्रम रात्रभर सुरू होता. ‘ अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी ‘अशातलेच हे होते. लोक कल्याणाच्या तळमळीतून समर्थांच्या चिंतनातूनच उत्स्फूर्ततेने हे श्लोक त्यांच्या मुखातून बाहेर पडले होते.पहाट होईपर्यंत समर्थांनी २०५ श्लोक कल्याणाला सांगितले आणि त्याने ते लिहून घेतले. नंतर समर्थ तपश्चर्येसाठी घळीमध्ये निघून गेले अशी मनाच्या श्लोकांच्या निर्मितीची कथा सांगितली जाते.

सकाळी कल्याण स्वामींनी समर्थांच्या सर्व शिष्यांना एकत्र करून हे मनाचे श्लोक सांगितले आणि त्यांच्याकडून मनाच्या श्लोकाच्या प्रती तयार करून घेतल्या. या प्रती प्रत्येक शिष्याकडे देऊन त्यांना घरोघरी भिक्षा मागण्यासाठी पाठवण्यात आले. प्रत्येकाने त्यातील एक श्लोक खड्या आवाजात म्हणून त्यानंतर जय जय रघुवीर समर्थ असे म्हणायचे असे सांगितले गेले. सर्व शिष्यांनी पंचक्रोशीत जाऊन भिक्षा मागितली आणि काय आश्चर्य ! गाड्या भरभरून धान्य गोळा झाले आणि रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला. समर्थ शिष्यांची भिक्षेची ही परंपरा आजही सुरू आहे.

समर्थांनी केवळ वनात राहून तपश्चर्या केली नाही तर समर्थ जनात आणि वनात अशा दोन्ही ठिकाणी राहिले ते स्वतः घरोघर हिंडून भिक्षा मागत असत. समाजाशी संपर्क यावा समाजाची परिस्थिती कळावी आणि विविध स्तरातील लोकांची संबंध यावा यासाठी ही भिक्षेची पद्धत त्यांच्या कार्यात फार उपयुक्त ठरली. यादृष्टीने समर्थांनी जे मनाचे श्लोक लिहिले ते फार उपयुक्त ठरले. त्यांच्या कार्यकर्त्यांना समाजाशी संपर्क साधणे, समाजाच्या स्थितीची माहिती घेणे हे त्यामुळे सोपे झाले. समर्थांनी अंगीकारलेल्या कार्यात या गोष्टीची मदत झाली. आपल्या कार्यात त्यांनी अशा रीतीने समाजाला जोडून घेतले. तसेच भिक्षेच्या पद्धतीमुळे कोणावर ओझे बनून राहण्याची परिस्थिती आली नाही. कोणावर भिक्षा द्या म्हणून सक्ती नव्हती त्याचप्रमाणे कोणाचीही उपासमार झाली नाही. त्यांच्यापैकी कोणीही या पद्धतीमुळे समाजाशी फटकून वागले नाही आणि समाजाला देखील त्यांच्याबद्दल एक प्रकारची आत्मीयता आणि आदर निर्माण झाला. यासारख्या गोष्टी अगदी सहजतेने घडत होत्या म्हणूनच मनाचे श्लोक फार उपयुक्त ठरले. त्या काळात सर्वत्र मुस्लिम राजवट होती. लोकांच्या मनावर गुलामगिरीचा पगडा होता. स्वधर्माविषयीचा आदर आणि अभिमान नाहीसा होत चालला होता. अशा परिस्थितीत त्यांच्या या श्लोकाने जनसामान्यांना मार्गदर्शन केले आणि एक प्रकारे समाजात जागृती घडवून आणली.

या मनाच्या श्लोकांमध्ये विवेक, वैराग्य आणि भक्ती ही समर्थांनी सांगितलेली त्रिसूत्री मुख्य आधार आहे. विवेक म्हणजे काय स्वीकारावे आणि काय सोडावे याचे भान. वैराग्य याचा अर्थ अनावश्यक इच्छांपासून मनाला मुक्त करणे. आणि भक्ती म्हणजे एका उच्च ध्येयाशी (राघवाशी) मनाला जोडून घेणे. त्या मार्गावर वाटचाल करणे.

” केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ” ही समर्थांची शिकवण आहे. ती त्यांच्या अनुभवातन किंवा प्रचितीतून आलेली आहे. साधारण साडेतीनशे वर्षांपूर्वी लिहिलेले हे श्लोक आजही मनाला मार्गदर्शन करण्यासाठी मोलाचे ठरतात. आजच्या तणावग्रस्त परिस्थितीत गीतेप्रमाणेच आपल्याला ते कसे वागावे आणि बंधापासून तर मुक्तीपर्यंत कशाप्रकारे वाटचाल करावी हे अत्यंत सुलभ पद्धतीने सांगतात.

हे सर्व लिहिण्यामागे एकच शुद्ध हेतू आहे – समर्थांनी दिलेला हा ‘बोध’ केवळ पाठांतरापुरता मर्यादित न राहता तो आपल्या ‘ वर्तनाचा ‘ भाग व्हावा. मनाचे श्लोक हे केवळ ओठांवर न राहता आपल्या अंतर्यामी उतरावे.

मनाचे श्लोक २०५ आहेत. काही ठिकाणी त्यांची संख्या २१० अशीही दिली आहे. परंतु २०५ श्लोक हे सर्वमान्य आहेत. प्रत्येक धार्मिक ग्रंथाच्या शेवटी त्याची फलश्रुती दिलेली असते किंवा तो ग्रंथ का वाचायचा हे सांगितलेले असते. तशाच प्रकारची फलश्रुती समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकांचा समारोप करताना सांगितली आहे. ते म्हणतात

मनाची शते शते ऐकता दोष जाती

मतीमंद ते साधना योग्य होती

चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी

म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी.

ही मनाची शते ( म्हणजे शतक अर्थात द्विशतक आणि येथे २०५ श्लोक असा अर्थ घ्यावा ) ऐकल्यानंतर दोष निघून जातात. मतिमंद लोक देखील साधन करण्यासाठी पात्र होतात, ज्ञानवैराग्य संपन्न होतात आणि मुक्तीच्या सुखाप्रत पोहोचतात. ही मनाच्या श्लोकांची फलश्रुती होती आहे. भगवद्गीता जशी कोणा एका विशिष्ट धर्मासाठी नाही तर ती सर्व मानवजातीसाठी आहे. तसेच मनाचे श्लोक देखील सर्व मानवजातीला मार्गदर्शन करणारे आहेत. गोविंद देव गिरी महाराज म्हणतात,” मनाचे श्लोक वाचल्यानंतर आणि ते जीवनात उतरवल्यानंतर तुम्हाला चार वेद किंवा भगवद्गीता किंवा महाभारत वाचण्याची आवश्यकता नाही यामध्ये त्यातील सर्व सार आले आहे.” मनाचे श्लोक म्हणजे तृषार्ताची तहान भागवणारे मधुर जलाचे सरोवर. आपली जेवढी तहान असेल तेवढे पाणी आपण प्राशन करावे आणि आपली तृषा भागवावी.

मनाच्या श्लोकांचे विश्लेषण करताना आपण केवळ शब्दांचे अर्थ पाहणार नाही, तर त्या श्लोकामागील समर्थांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोन आणि आधुनिक काळातील त्याचे महत्त्व पाहणार आहोत.

समर्थ जेव्हा ‘मना सज्जना’ म्हणतात, तेव्हा ते आपल्याला आपल्यातील सुप्त देवत्वाची जाणीव करून देतात. हा प्रवास आहे – स्वैर मनाकडून स्थिर मनाकडे, आणि स्थिर मनाकडून ईश्वरी साक्षात्काराकडे. या मनोपनिषदाच्या माध्यमातून आपण मनाच्या एका अशा प्रदेशात प्रवेश करणार आहोत, जिथे गोंधळ संपतो आणि स्पष्टता (Clarity) सुरू होते.” या मार्गावर वाटचाल करण्याची शक्ती श्रीराम आम्हाला देवो अशी प्रार्थना करून पुढील भागापासून प्रत्यक्ष श्लोकांचा अर्थ समजावून घेऊया. 

– क्रमशः भाग दुसरा  

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संकल्प… ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

??

☆ संकल्प …  ☆ सौ. उज्ज्वला केळकर

संकल्प – – 

संकल्प करणे, म्हणजे एखादी गोष्ट नियमितपणे, न चुकता, खंड पडू न देता करणे. मला लहानपणापासून संकल्प करण्याचा नाद होता. मी ५वी-६वीत असेन तेव्हा. आम्ही मैत्रिणींनी नवं वर्षाचा संकल्प केला, पहाटे उठायचं. फिरून यायचं. मग तासभर अभ्यास करायचा. मग नेहमीच रूटीन. ३-४ दिवस तसं केलंही. त्यानंतर मात्र आमचा संकल्प आमच्यासारखाच ऊबदार पांघरुणात गुडूप झाला. मैत्रिणींना विचारलं, ‘तुम्ही जाता का रोज फिरायला? ’ त्यांचंही माझ्या सारखंच झालं होतं. ४-५ दिवसात सगळ्यांचाच संकल्प गारठून गेला होता.

शाळेत असताना, मी दरवर्षी जूनमध्ये संकल्प करी, की यंदा गृहपाठ वेळच्या वेळी आणि घरीच करायचा. काही आठवडे, महिने ते सुरळीत चालू राही. पुढे पुढे कधी नवीन छान पुस्तक मिळालं म्हणून, टी. व्ही. ची सिरिअल चांगली आहे म्हणून, बऱ्याचदा झोप आलीय म्हणून, गॅदरिंगच्या वेळी कार्यक्रमाची प्रॅक्टीस म्हणून यात खंड पडत जाई आणि माझा संकल्प गडबडून जाई. मग शाळेत थोडं लवकर येऊन, कुणाचं तरी पाहून गृहपाठ पूर्ण करायची लगबग चालू व्हायची. किंवा गृहपाठ मोठा असेल, तर तो न होण्यामागची खरी-खोटी कारणं शोधायची. पण एवढा मात्र खरं, मी दर वर्षी, जूनमध्ये नव्या उत्साहाने हा संकल्प करायचीच!

शाळेत असताना मी एकदा संकल्प केला होय, ८वीत असेन बहुधा मी तेव्हा, शाळेत कधीही कुणाशीही भांडायचं नाही. सगळ्यांनी ‘मिलनसार’ मुलगी म्हणून माझं कौतुक केलं पाहिजे. बरेच दिवस हा संकल्प निभावला. कारण ठरवलं होतं, भांडणं झाली, तरी आपण नमतं घ्यायचं. आपली चूक नसली तरी… एकदा वार्षिक क्रीडा सामने चालू होते. ८अ विरुद्ध ८ब ‘खो खो’ची मॅच होती. आम्ही दोन्ही वर्गातल्या मुली भवतीनं गोल करून खेळाडूंना प्रोत्साहन देत होतो. आमच्या वर्गाच्या टीमची कॅप्टन मीना. छानच खेळत होती. मी म्हंटलं, ’काय छान खेळतेय मीना! ’ माझ्या शेजारीच ब वर्गातली मधुरा उभी होती. ती म्हणाली, ‘नीता जास्त चांगली खेळतेय! ’ मी म्हंटलं, ‘नाही मीनाच जास्त चांगली खेळतेय. ’ ‘मुळीच नाही नीता… ‘ मीना… नीता… मीना… नीता… ’ आणि जुंपलीच की आमची. मॅच संपली मीना-नीता गळ्यात गळे घाळून खो खोच्या मैदानातून बाहेर आल्या. आमचं आपलं ‘मीना… नीता… ’ चालूच. मग काय माझ्या संकल्पाची झाली ना ऐशी न् तैशी!

पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर संकल्प केला, आता स्टडी रूममध्ये फक्त अभ्यासाची पुस्तके वाचायची किंवा संदर्भ ग्रंथ बघायचे. पण काऊंटरवर एखादा देखणा कविता संग्रह किंवा कथा संग्रह किंवा कादंबरी दिसली की आपोआपच ती पुस्तके चाळली जात. आणि नकळतच त्यातले पुस्तक नोंद करून घेतले जाई आणि मी बैठक जमवून वाचायला सुरुवात करी. पानामागून पाने उलटली जात आणि संकल्प बिचारा बापुडवाणा होऊन मान खाली घालून बसे.

याच वयात काही कविता आवडणार्याी आणि करणार्याासुद्धा काही मैत्रिणी भेटल्या. मग आम्ही सगळ्यांनी संकल्प केला, रोज एक कविता करायची. पहिले दोन –तीन दिवस काही तरी नवे नवे सुचत गेले. नंतर नंतर काही सुचेना. कविता संग्रह चाळून नवीन विषय शोधत राहिलो. ‘र ला र आणि टला ट’ जुळवून कविता करत राहिलो. मग तेवढेही जमेना. भवतीनं अनेक विषय दिसत होते. सुचतही होते, पण ते कवितेत यायला मात्र तयार नव्हते. शेवटी नाईलाजाने रोज एक कविता करायची, निदान चार ओळी तरी लिहायच्याच, या संकल्पाला पूर्णविराम द्यावा लागला. तशी अजूनही मी कविता करते म्हणा, पण रोज एकाचं सृजन व्हावं, अशी प्रतिभा देवाने नाही दिली.

एकदा संकल्प केला रोजनिशी लिहायची. रोज जे घडलं, ते लिहून ठेवायचचं. अनेक थोरा-मोठ्यांनी रोजनिशा लिहीलेल्या आहेत. त्यातल्या काही ना काही, कोणत्या ना कोणत्या स्वरुपात छापूनही आल्या आहेत. मग मी १ जानेवारीपासून मोठ्या उत्साहाने रोजनिशी लिहायला लागले. वाटलं, न जाणो आपल्याही रोजनिशीला हे भाग्य लाभेल. पण ८-१० दिवस रोजनिशी लिहिल्यावर लक्षात आलं, सकाळी उठले. कॉलेजमध्ये गेले. स्टडीत बसून आभ्यास केला. घरी आले. जेवले. टी. व्ही. बघितला. झोपले. रोज तेच ते. तेच ते. कधी बदल म्हणजे तास बुडवून टेबल-टेनीस खेळले. किंवा ‘मॅटिनीला ‘प्यासा‘ बघायला गेले. चित्रपटाने भारून टाकले. गाणी तर… अहाहा… कधी तरी बदल म्हणजे, आज अभ्यास सोडून कथा-कादंबार्याण वाचते, म्हणून बाबा रागावले. नवीन ड्रेस घ्यायला आई नाही म्हणाली, म्हणून मी रूसले. असे सटर फटर बदल. मनन, चिंतन म्हणतात, ते काही घडतच नव्हतं, तर रोजनिशीत कसं उतरणार? शेवटी तेच तेच लिहून मी इतकी कंटाळले, की माझं रोजनिशी लेखन मी थांबवलंच!

लग्नं झालं. नव्या नवलाईचे अद्भूतरम्य, स्वप्नील वगैरे, ‘तू म्हणशील तसं’ म्हणायचे दिवस सरले. वास्तव जीवनात ‘मी म्हणेन तसं’ असं ‘तू.. तू… मैं… मैं’ चालू झालं. ‘नळ का बंद केला नाहीस? दिवा का मालवला नाहीस? ’ अशा साधा साध्या प्रश्नांवरून वाद झडू लागले. त्यातून भांडणे होऊ लागली. या वादा-भांडणाला कंटाळून मी एकदा संकल्प केला, की नवर्या शी अबोला धरायचा. बोललंच नाही, तर वाद- भांडणं होतीलच कशी? टाळी एका हाताने थोडीच वाजते. दोन दिवस अबोल्यात गेले. तिसर्याह दिवशी हे ऑफीसमधून सांगत आले, ‘आज रात्री तुझे आई-बाबा आपल्याकडे येताहेत. आठवडाभर रहाणार आहेत. त्यांचं काही काम आहे. आता त्यांच्यादेखत न बोलता कसं रहाता येईल? विचारल्या प्रश्नांची उत्तरे तरी नकोत का द्यायला? झालं! माझा अबोला बोंबलला.

नेहमीसारखा संसार झाला. उतारालाही लागला. अधून मधून मला नवे नवे संकल्प करण्याची हुक्की येते. मी नव्या उत्साहाने ते करतेही पण… नित्यनेमाने होणार्याा पानगळीप्रमाणे ते गळून पडतात. माझे संकल्प हा घरात आता चेष्टेचा विषय झालाय. मुले दर वर्षी न चुकता १ ज्ंनेवारीला विचारतात, ‘आई, यंदा कोणता संकल्प करणार आहेस तू? ’ मी तितक्याच खेळीमेळीने उत्तरते, ‘बघू या. ठरवलं नाही अजून! ’

असाच एक संकल्प. मुलं आता मोठी झालीत. त्यांना सगळं कळतं. त्यांचे निर्णय ती घेऊ शकतात. त्यांना काही बोलायचं नाही. त्यांना काही विचारायचा नाही. काही सांगायचं नाही. रागावायचं तर नाहीच नाही. पण मुले शिस्तीच्या नावाखाली, त्यांच्या मुलांना बोलली, रागावली, कधी मारलंसुद्धा… नातवंडांचे चेहरे हिरमुसले झाले, की मग पडावं लागतंच ना मधे? अखेर, संकल्प महत्वाचा की नातवंडे महत्वाची? परिणाम काय? संकल्प सिद्धी नाही.

यंदा मात्र नव वर्षाला मी असा संकल्प केला आहे, की सिद्धीला जाईलच जाईल. कोणता संकल्प विचारताय? अहोsss यापुढे कधीही संकल्प न करण्याचा संकल्प केलाय मी यंदा!

© सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… जुनं ते सोनं  भाग – ७७ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… जुनं ते सोनं – भाग – ७७ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

जुनं ते सोनं 

वास्तविक मी, आमच्यावेळी असे काही नव्हते बाई! असे म्हणणार्‍या सदरातील व्यक्ती नाहीच. मला बदल आवडतात. जे जे नवीन ते संपूर्णपणे स्वीकारले नाही तरी त्यांची ओळख असावी असे मला वाटते. तरुण पिढीबरोबर तसे माझे चांगले जमते. त्यांची बदललेली भाषा, बदललेली जीवनपद्धती, त्यांची वस्त्रसंस्कृती, खाद्यसंस्कृती, अत्याधुनिक तांत्रिकतेशी त्यांची असलेली निस्सीम मैत्री, याविषयी मला प्रचंड कुतुहल असते. खरोखरच जग किती बदलले याचे विलक्षण नवल वाटते.

पण तरीही ऐंशीच्या उंबरठ्यावर अनुभवाचा अधिकार गाजवून, सतत त्यांना धोक्याच्या सूचना देण्यात मला काही कर्तव्य बजावल्याचा आनंद होत नसतो. काळाप्रमाणे बदल हे होणारच.

अगदी त्यांच्या हातात हात घालून नाही शकलो तरी त्यांच्या पाठीमागे, कधी सोबतीने, कधी बरोबर जायला हवे असे मला वाटते.

माझ्या आयुष्याचा, मागे वळून जेव्हां मी मागोवा घेते, तेव्हा मला जाणवते की मीही बदललेच आहे की! लहानपणी मी पाटे वरवंटे, उखळ, जाते, चूल, शेगडी,

बंब या वस्तुंसोबत वाढले, ते सारे मला सोडून गेलेच की! का मी त्यांना सोडले? (पण आता ते अँटीक पीसेस म्हणून माझ्या घराचे डेकॉर आहेत.)

आता माझ्या घरात सगळी ईलेक्ट्राॅनीक गॅझेट्स आहेत आणि त्या केवळ चैनीच्या वस्तु नसून माझ्या आयुष्याच्या गरजाच बनल्या आहेत. मग हे नेमकं कधी झालं, कां झालं, या प्रश्नांच्या भानगडीत मी तरी कुठे पडले? ई मेल्स, व्हाॅट्सॲप, फेसबुक या परिवारात मीही पार बुडालेली आहे. किती बदलले मी? मी सुखी आहे का? आनंदी आहे का? निदान मजेत तरी आहे का याचा विचार तरी मी करते कां?

पण त्यादिवशी, एक गंमत झाली.

कुरीअरवाल्याने, एक सफेद रंगाचा, गुळगुळीत लिफाफा माझ्या हातात ठेवला. तो जेव्हां मी उघडला तेव्हां त्यात, रेघा असलेल्या कागदावर सुंदर अक्षरात लिहिलेले, माझ्या बहिणीचे पत्र होते. खरं सांगू! इतक्या वर्षांनी आलेले, धाकट्या बहिणीचे ते स्वअक्षरातले पत्र पाहून एक अनामिक आनंदाची लाट फुटली. वाचण्याआधीच

डोळे पाणावले. कितीतरी वेळ मी तिच्या अक्षरांवर नुसता हात फिरवत राहिले. एक प्रचंड उर्जा होती त्यात. ते निर्जीव नव्हते. उबदार होते. आणि मग जाणवले,

शेवटी, “जुनं तेच सोनं!”

ओहायोला मुलीकडे असताना, जवळच राहणार्‍या तिच्या मैत्रीणीने आम्हाला जेवायला बोलावले होते. अत्याधुनिक

पद्धतीने सजवलेले तिचे घर सुंदरच

होते. मात्र माझ्या लक्षात राहिले ते

तिच्या मुख्य दरवाजाजवळचे तुळशी वृंदावन! घरात शिरतानाच दिसलेली कोनाड्यातली गणपतीची मंगलमूर्ती!

जेवणाचा तर अगदी साग्रसंगीत बेत होता. शिवाय चकचकीत स्टीलची ताटे, वाट्या, चमचे, पेले यांची सुरेख मांडलेली पंगत! टेबलावर का असेना,

त्यात जुन्या आठवणी जपलेल्या होत्या.

श्रीखंडपुरी, बटाट्याची पिवळी भाजी, नारळाची चटणी, मसालेभात असा पक्का महाराष्ट्रीयन बेत. सर्वच तिने खपून केले होते. मला वाटले, माझ्या सारख्या जुन्या पिढीच्या प्रतिनिधीला आमंत्रित केल्यामुळे तिने हे सारे केले असावे. पण जेवताना तीच म्हणाली,

“काकू मला हे फार आवडतं. या परंपरा इथे वाढणार्‍या माझ्या मुलांनाही कळायला हव्यात ना? शेवटी ना काकू ते काय म्हणतात ना, जुनं ते सोनं, तेच खरं! “

बरं वाटलं मला. कुठेतरी धागे अतूट

असल्यासारखे वाटले.

दरवर्षी आम्ही आमच्या गावी जातोच. खानदेशातले एक खेडेवजा शहर. तसा आता जुना वाडा राहिला नाही. तिथे राहणार्‍या भावांनी नव्या पद्धतीचे घर बांधले. अधुनिकीकरण केले. मात्र नवे जुने गळ्यात गळे घालून आहेत.

आम्ही गेलो की माझी जाऊ अंगणात मस्त चूल पेटवते. भांड्याला मातीचं बुड लावून, त्यात एखादा सणसणीत रस्सा बनवते. लोखंडी तव्यावरच्या, चुलीच्या जाळावर शेकलेल्या, खरपूस गरम भाकर्‍या आणि खास लाकडी बडगीत ठेचलेला हिरव्या मिर्चीचा

ठेचा! तोडच नाही त्याला. आणखी एक.

चकचकीत घासलेल्या तांब्याच्या बंबातल्या कडथ पाण्याचे स्नान! सारेच अपूर्व!

गावात फेरफटका मारताना कुणी,

“राम राम पावनं! “म्हणताना ऐकले की,

हाय, हॅलो, व्हाट्सप, चि… ल, हे शब्द किती पोकळ वाटतात! गावरान शब्दातला गोडवाच न्यारा!

कोरोनाच्या काळात, सुरक्षित अंतर ठेवा, या नियमाचे पालन करताना आवर्जून सांगितले गेले, नको शेकहँड, नको मिठ्या, नको मुके. हात जुळवून केलेला नमस्कारच पुरे. मग ही तर भारतीयांची पूर्वापार चालत आलेली संस्कृती.

बाहेरुन आलेल्या माणसाने

घरात येण्यापूर्वी परसातल्या नळाखाली पाय धुवूनच यायचे.. अशा कितीतरी

जुन्या विचारांची दारे पुन्हा उघडली आणि त्यातून सुवर्णमयी वारे वाहू लागले. ”जुने जाऊद्या मरणालागूनी”

असे म्हणायच्या ऐवजी तेच जुने सोन्यासारखे वाटू लागले.

काल लेकीने व्हाॅट्सॲपवर फोटो पाठवले होते.

दोन शुष्क झाडाची खोडे, शंकुच्या आकारात बार्बेक्यु ट्रेवर बाहेरच्या डेकवर ठेवली होती. त्यांना फुलापानांनी सजवले

होते. नारळ बांधला होता. पायाशी रांगोळी रेखाटली होती. होळीपूजनासाठी

तबक सजवले होते. पुरणपोळीचा नेवैद्य दाखवला होता.

त्या पेटत्या नाविन्यपूर्ण होळीची चित्रं पाहताना मला खूप मजा वाटली.

खाली कॅप्शन होती.

“आमची अमेरिकन बार्बेक्यु होळी! “

हे विडंबन नव्हतं. एक गोड आनंदमयी अर्थपूर्ण संकेताचं ते पालन होतं.

अधुनिकतेत जुने सांभाळण्याची धडपड होती. मला खूप छान वाटले.

आयुष्याची, जुन्या नव्याची ही मिसळही मला खमंग रस्सेदार वाटली.

सृष्टीचाच नियम आहे. काहीच नाश

पावत नाही. होते ते फक्त स्थित्यंतर.

जुने—नवे—जुने हे एक चक्र आहे.

जुन्यातून नवे अन् नव्यातून पुन्हा जुनेच.

आणि मग आपण सहज म्हणतो,

“जुनं तेच सोनं! “

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ४३ आणि ४४ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ४३ आणि ४४ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्तिसूत्रे ४३

दुःसंगः सर्वथैव त्याज्यः ॥ ४३ ॥

अर्थ : दुष्ट संग हा सर्व प्रकारे (अंतर्बाह्य) टाकला पाहिजे.

विवेचन:- संतांची संगत करताना काही पथ्ये ही पाळली पाहिजेत. काही गोष्टींचा संग प्रयत्नपूर्वक टाळला पाहिजे. पुढील तीन सूत्रात नारद महाराज आपल्याला कोणत्या गोष्टींचा त्याग करायचा हे सांगत आहेत.

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे हे सर्वमान्य आहे. त्यामुळे तो एकटा राहूच शकत नाही. त्याला सतत कोणीतरी सोबतीला, संगतीला हवे असते. प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमीच चांगली माणसे येतील असे होत नाही. जशी भेटतील ती माणसे स्वीकारून मनुष्याला जीवन जगावे लागते. त्यामुळे रोजच्या जीवनात त्याला बरेवाईट अनुभव येत असतात. साधक पक्का होत नाही तोपर्यंत याचा त्याला कमीअधिक प्रमाणात त्रास होत असतो. संत तुकाराम महाराज एका अभंगात आपल्याला सांगतात,

*”मान अपमान गोवे । अवघे गुंडूनी ठेवावे ॥१॥हेंचि देवाचें दर्शन । सदा राहे समाधान ॥२॥शांतीची वसती । तेथें खुंटे काळगती ॥३॥आली ऊर्मी साहे । तुका म्हणे||४||”*

.. (अभंग क्रमांक ८४, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

संसारातही संग असतोच व परमार्थातही सत्संग आवश्यक आहेच हे मागील सूत्रांतून स्पष्ट झालेच आहे. पण ती सत्संगती प्राप्त होण्याला प्रतिकूल अशी दुःसंगती असते. अनादि संसारात नित्य विषयसेवनाचेच संस्कार साचलेले असतात. इंद्रिय-तादात्म्य, विकार हे त्या दुःसंगाचे प्रेरक असतात. जोपर्यंत त्या दुःसंगात साधक असतो तोपर्यंत त्याची सत्संगाकडे प्रवृत्ती होत नाही. कदाचित झाली तरी तिचा उपयोग होऊ शकत नाही. म्हणून प्रथम त्या दुःसंगाचा त्याग करावयास नारद सांगतात. कित्येक वेळी दुःसंगाचे काही अनिष्ट परिणाम भोगावयास मिळाले असता काही दुःसंग टाकले जातात असे दिसून येते. पण तो खरा त्याग नव्हे. एका प्रकारचा टाकला तर अन्य प्रकारचा राहतोच. कारण दुःसंग एकच प्रकारचा नसतो. म्हणून सूत्रात ‘सर्वथैव’ असे महत्त्वाचे पद घातले आहे. संगाचा चांगलेपणा व वाईटणा त्या संगाच्या विषयावर अवलंबून असतो. दुःसंग हा बाह्य व आंतर असा दोन प्रकारचा आहे. निषिद्ध शब्द स्पर्शादि पंचविषय हे बाह्य असतात, पण ते तमोगुण कार्य म्हणून मोहशक्तीने युक्त असतात. अनादिकालीन विषय इंद्रियतादात्म्यामुळे विषयाचे ठिकाणी अनुकूल बुद्धी निर्माण होते. अंतःकरण राग व द्वेषयुक्त असते, त्यामुळे ते सहज विषयाकडे प्रवृत्त होते. पण ते परिणामी किती बाधक असतात याचे विवेचन मागे सूत्र पस्तीसमध्ये आलेच आहे. सर्व संतांनी पर धन, परस्त्रीचा त्याग करायला सांगितले आहे. परस्त्री माते समान मानावी असे सांगितले आहे.

साधकांस स्त्रीसंगया बाधक होतो याचे अनेक दाखले देता येतील. मोठे तपस्वीही या संगात अडकून पडले असल्याचे आपल्या लक्ष्यात येईल.

दैनंदिन व्यवहार करताना मनुष्य त्याच्या इंद्रिद्वारे करीत असतों. ज्याला भगवतांची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्याने सर्व इंद्रिये, मन, देह निव्वळ शुद्ध करुन चालणार नाही, तर पवित्र करणे तितकेच आवश्यक आहे. संत तुकाराम महाराज प्रापंचिक लोकांसाठी विशेष आदर्शवत असे आहेत. साधनेच्या प्रत्येक टप्प्यातील स्थितीवर त्यांनी मार्मिक अभंग लिहिले आहेत. एका अभंगात ते म्हणतात,

*”पापाची वासना नको दावू डोळा । त्याहुनि अंधळा बराच मी ॥१॥ निंदेचे श्रवण नको माझे कानी । बधिर करोनि ठेवी देवा ॥२॥ अपवित्र वाणी नको माझ्या मुखा ।त्याजहुनि मुका बराच मी ॥३॥ नको मज कधी परस्त्रीसंगति । जनातुन माती उठता भली ॥४॥ तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा । तू एक गोपाळा आवडसी ॥५॥”*

 – संत तुकाराम

‘मनुष्य संतांच्या संगतीत राहील तर तो तसाच बनतो. असंताच्या संगाने असंत, तपस्व्याच्या संगतीत तपस्वी व चोराच्या संगतीत चोर बनतो, वस्त्राला जो रंग द्यावा तो चढतो तसेच माणसाचे आहे. ‘ म्हणून बुद्धिमान पुरुषाने दुष्टांची संगती टाकून देऊन संतांची संगती धरावी. संत हे आपल्या संगतीत असणार्‍याच्या मनातील विषयासक्तीचा आपल्या अमृतमय वाणीने नाश करतात.’

अशा रीतीने दुःसंग सर्वथा त्यागावा हे सांगितले. पण त्याचा त्याग का करावा? तर तो सर्वथा जीवाचा सर्वनाश करणारा आहे. तो कशा कशा प्रकारे मानवाचा सर्वनाश करण्यास कारण होतो हे सांगण्याकरिता पुढील सूत्राची रचना केली आहे.

जय जय रघुवीर समर्थ || 

नारद भक्तिसूत्रे ४४

कामक्रोधमोहस्मृतिभ्रंशबुद्धिनाशसर्वनाशकारणत्वात् ॥४४॥

अर्थ : दु:संग हा भोगवासना, राग आणि मोह निर्माण करून स्मृतिनाश करतो, तसेच विवेक नष्ट करून मनुष्याच्या सर्वनाशास कारणीभूत होतो.

म्हणून साधकाने दु:संग प्रयत्नपूर्वक टाळावा.

विवरण : मागील सूत्रात दुःसंग हा सर्व प्रकारे त्याज्य आहे व तो दुःसंग अंतर व बाह्य असा दोन प्रकारचा आहे असे म्हटले होते. मनुष्याच्या मनात येणारे वाईट विचार आणि त्याच्या हातून घडणारी कृति, या दोन्हीचा परिमाण मनुष्यावर होत असतो.

संग करणे म्हणजे त्या गोष्टीच्या सहवासात रहाणे. कामक्रोधादी सहा विकार मनुष्याला त्याच्या मूळ ध्येयापासून दूर नेत असतात. म्हणून त्यांच्या त्याग करावा असे आपल्याकडे सांगितले जाते. श्री. गोंदवलेकर महाराज इथे व्यावहारिक बाजू लक्षात घेऊन हाच विषय थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडतात. ते म्हणतात, की विकार भगवंताने निर्माण केले आहेत, त्यामुळे त्यांना आपल्या दैनंदिन व्यवहारात निश्चित असे स्थान असले पाहिजे. स्वयंपाक करताना नुसते तिखट वापरले, किंवा नुसती हळद वापरली तर स्वयंपाक स्वादिष्ट होण्याची शक्यता अगदीच कमी. स्वयंपाक स्वादिष्ट होण्यासाठी हळद, तिखट आणि इतर जिन्नस योग्य त्या प्रमाणात त्यात घातले पाहिजेत. हेचं सूत्र आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडते. ह्या सहा विकारांचा विवेकाने विनियोग करता आला तर मनुष्य, साधक त्यांच्या सहाय्याने प्रगती करू शकतो. उदा. आपल्याला राग येतो, याचा मनुष्याला राग आला पाहिजे. साधना करण्याचा कंटाळा न येता, साधना करताना येणाऱ्या कंटाळ्याचा कंटाळा मनुष्याला आला पाहिजे… , पटतंय ना?

अनेक संत स्त्रीसंग करू नये असे म्हणतात. यातील मर्म नीट समजून घेतले गेले नाही तर संभ्रम होऊ शकतो. एकटी स्त्री अथवा स्त्रिया काहीही करू शकत नाहीत. पण स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मातृत्वाचा नसेल तर मात्र गोष्टी बिघडू शकतात, असे सर्व संताना सुचवायचे असावे.

कित्येकाना असे वाटते की, ईश्वरच सर्व कर्माचा प्रेरक असल्याने ईश्वरप्रेरणेनेच पाप होते. कित्येकाची अविवेकमूलक भावना अशी असते की अदृष्टाने पाप होते. ईश्वर जर पापप्रेरक होईल तर त्याचेवर विषमता व क्रूरता हे दोष येतील. ज्या ईश्वराच्या कृपेने जीव उद्धरून जातो तो ईश्वर जीवास पाप करावयास कसे लावील? तसेच अदृष्टही पापास प्रेरक नाही. अदृष्ट हे भोगाला नियामक आहे. सुखदुःखादि भोग अदृष्टजन्य असतात.

कर्म करण्यात जीव स्वतंत्र आहे. ‘स्वतंत्र कर्ता’ असे पाणिनीचे सूत्र आहे. शुभसंस्काराने सद्‌बुद्धीचा जीव अंगीकार करतो तेव्हा त्याच्याकडून पुण्यकर्म होते व अशुभ संस्कार, दुर्बुद्धी व विकाराच्या स्वाधीन झालेला मानव पापकर्मात प्रवृत्त होतो म्हणून श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात,

*”काम हा आणि क्रोध हा घडीला जो रजोगुणे |*

*मोठा खाादाड पापिष्ट तो वैरी जाण तूं इथे ||”*

(गीताई. ३. ३७)

काम-क्रोधाच्या आधीन झालेल्या माणसास जरी काही पूर्वसंस्कार परमार्थाचे असले तरी मोहाने ते झाकले जातात हा मोहाचा प्रभाव आहे. या स्मृतिभ्रंशाच्या पुढची पायरी ‘बुद्धिनाश’ ही आहे. बुद्धिनाश म्हणजे दुसर्‍या अध्यायात गीतेमध्ये जी सद्‌बुद्धी म्हणून सांगितली आहे किंवा गीतेच्या अठराव्या अध्यायात तीन प्रकारची सात्त्विक, राजस, तामस, अशी बुद्धी सांगितली आहे त्यात ‘प्रवृत्ती-निवृत्ती, कार्य-अकार्य, भय-अभय, बंध-मोक्ष यांना यथार्थ रूपाने जी जाणते ती सात्त्विक बुद्धी होय. ‘ असे श्रीकृष्णानी अर्जुनास सांगितले आहे. अशी आपल्या हिताला जी बुद्धी जाणत नाही तोच तिचा नाश होय. कारण वर सांगितलेली बुद्धी हीच मानवाना उद्धारास अनुकूल आहे, हिलाच सद्‍बुद्धी असे म्हणतात. अशा या बुद्धीचा नाश झाला म्हणजे पुढची पायरी सर्वनाशाचीच आहे असे नारद म्हणतात.

‘अंतःकरणात विषयांची नुसती आठवण असेल तरीही संग टाकलेल्यासही पुन्हा विषयासक्ती येऊन चिकटते व त्यामुळे विषयेच्छा प्रगट होते. जेथे काम उत्पन्न होतो तेथे क्रोधाने आपले बिर्‍हाड आधीच ठेवलेले असते, व जेथे क्रोध आला तेथे कार्याकार्याविषयी अविचार ठेवलेला आहेच. ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वार्‍याने दिवा नाहीसा होतो त्याप्रमाणे संमोह प्रगट झाल्यावर स्मृती नाश पावते. किंवा सूर्य मावळायच्या वेळेला रात्र सूर्यतेजाला ज्याप्रमाणे गिळून टाकते त्याप्रमाणे स्मृतिभ्रंश झाला असता प्राण्याची दशा होते. मग सर्वत्र केवळ अज्ञानाचा अंधार होतो व त्याचेच आवरण सर्वांवर पडते, अशा वेळी हृदयात बुद्धी व्याकुळ होते. त्यामुळे जेवढे म्हणून ज्ञान आहे तेवढे समूळ नष्ट होते. प्राण निघून गेले असता शरीराची जशी दशा होते त्याप्रमाणे बुद्धीचा नाश झाला असता पुरुषाची स्थिती होते. ‘ 

श्रीनारद महाराज या दोन सूत्रातून त्याचा त्याग व बाधकता सांगून गेले. पुढील पंचेचाळीसाव्या सूत्रात आणखी एका दृष्टीने या कामक्रोधादिकांची बाधकता दृष्टान्त द्वारा पटवून देतात.

जय जय रघुवीर समर्थ || 

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्र क्र. ४३ आणि ४४.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “असाही एक सिक्युरिटी गार्ड…” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य 

☆ “असाही एक सिक्युरिटी गार्ड…” ☆ श्री संभाजी बबन गायके

हुतात्मा सैनिकांच्या माता-पित्यांच्या पायांखालची माती कपाळाला लावणारा माणूस!

“नमश्कार, साहब… मैं सिक्युरिटी गार्ड जितेंदर सिंग राठौर! ” 

– – एखादे सैनिक, पोलिस अधिकारी, किंवा डॉक्टर्स, प्राध्यापक जशी स्वत:ची ओळख सांगतात तशी ओळख जितेंदर सिंग राठौर सांगतात तेंव्हा या माणसातलं काहीसं वेगळेपण आपल्याला जाणवल्यावाचून रहात नाही. एरव्ही मी सिक्युरीटी गार्ड आहे असं अभिमानानं कोण सांगेल? पण हा माणूसच मनातून सैनिक प्रवृत्तीचा आहे. राजस्थानमध्ये राठौर या लढवय्या घराण्यात जन्माला आलेले जितेंदर सिंग अनेक राजस्थानी तरुणांसारखे सैनिक होण्याचं स्वप्न उराशी बाळगून होते. पण दुर्दैवाने ते वर्दीधारी सैनिक बनू नाही शकले…! पण once a soldier… always a soldier… हे त्यांच्या मनाने अतिशय गांभीर्याने घेतलं. केवळ अंगावर गणवेश मिळतोय म्हणून त्यांनी सुरक्षा रक्षकाची तशी कमी पगाराची आणि कमी सन्मानाची नोकरी स्वीकारली… संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे २४ सुरक्षा रक्षक गणवेश परिधान केलेले आहेत. आणि सध्या ते सरदार वल्लभभाई पटेल संस्थेत कार्यरत आहेत.

१९९९ चे कारगिल युद्ध संपले होते. हुतात्मा सैनिकांचे देह त्यांच्या गावोगावी सन्मानाने पोहोचवले जात होते. अशाच एका हुतात्मा सैनिकाच्या पित्याचे “बेटा गया तो क्या हुआ… वतन तो सुरक्षित है… ” हे वाक्य जितेंदर सिंग यांच्या कानांवर पडले आणि त्यांच्या मनातील सैनिकाने एक मिशन हाती घेतले… सैनिकांच्या स्मृती जतन करून ठेवण्याचे!

– – आणि मग सुरु झाला एक मोठा प्रवास. या प्रवासात लोकांकडून काहीबाही ऐकून घेण्याचाही टप्पा आलाच. लष्कराच्या भाकरी भाजायच्या कशाला? यातून काय मिळणार? असेही प्रश्न ऐकावे लागले असतीलच. कारण यांनी ज्या कार्याला हात घातला होता… त्या कार्यात सातत्य, चिकाटी आणि परिश्रम आवश्यक आहेत. एकतर आपल्या देशात पूर्वी सैनिकांची माहिती एकत्रित ठेवण्याची रीत, सोय नव्हती. विविध बटालियन्स, रेजिमेंटस त्यांच्या त्यांच्या पुरते मर्यादित दस्तऐवज ठेवत असतील. शिवाय पायदळ, वायुदल, नौसेना असे तीन वेगवेगळे विभाग आहेत. त्यात बी. एस. एफ, सी. आर. पी. एफ. इत्यादी अनेक शाखा आहेत. त्यामुळे कुणा एका सैनिकाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असणे दुरापास्तच असेल.

– – पण सुमारे दोन लाख सैनिकांची माहिती, छायाचित्रे जमा करून ठेवण्याची किमया या केवळ दहावी उत्तीर्ण माणसाने करून दाखवली आहे. त्यांच्याकडे सुमारे तीनशे हुतात्मा सैनिकांचे छोटे पुतळेही आहेत, जे त्यांनी स्वखर्चाने तयार करवून घेतले आहेत.

हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांना ते नियमित पत्रे लिहित असतात… आजवर त्यांनी दीड हजार पत्रं लिहून पोहोचवलीही आहेत. डोळ्यांत मोतीबिंदू झाल्यावर दृष्टी कमी झाल्यावर, आणखी दृष्टी कमी होण्यापूर्वीची खबरदारी म्हणून त्यांनी आणखी काही पत्रं लिहून तयार ठेवली आहेत. ज्यांवर फक्त पत्ता घातला की काम झाले!

सर्वांत महत्त्वाची आणि काळजाला हात घालणारी बाब म्हणजे हुतात्मा सैनिकांच्या माता-पित्यांच्या पायांखालची माती त्यांनी जमवून ठेवली आहे…! ही भावना काही साधीसुधी नाही… यासाठी खूप संवेदनशील मन असावे लागते!

पहिले महायुद्ध ते अगदी काल परवा झालेल्या हौतात्म्याची अचूक माहिती त्यांच्याकडे उपलब्ध आहे. आश्चर्य म्हणजे खुद्द काही लष्करी विभागातील लोक त्यांच्याशी विशिष्ट बाबतीत माहिती घेण्यास येत असतात. जे काम खरं तर सरकारचे, सेनेचे आहेत… ते काम एक सामान्य माणूस करतो आहे, हे विचार करण्यासारखे आहे. यातून सरकार आणि सामान्य जनता खूप काही शिकू शकते. माहिती एकत्रित करून ती जतन करून ठेवणे हा विचार केला गेला पाहिजे!

कित्येक किलो वजन भरेल एवढ्या बातम्यांची कात्रणे, छायाचित्रे त्यांच्याकडे आहेत. त्यासाठी त्यांनी स्वत:च्या पगारातून खर्च केला आहे. नातेवाईक, कुटुंबीय, समाजातील इतर लोकांनी या त्यांच्या छंदाबाबत काय काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या असतील, याचा केवळ अंदाजच बांधता येईल!

सध्या गुजरात येथील सूरत शहरात नोकरीत असलेल्या या अवलिया माणसाची माहिती पंतप्रधान कार्यालयापर्यंत आणि तिथून अर्थातच पंतप्रधान महोदयांपर्यंत पोहोचली. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्या मासिक आकाशवाणी संबोधनात, ‘ मन की बात’ या कार्यक्रमात श्री. जितेंदर सिंग यांच्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख केला!

एके दिवशी श्री. जितेंदर सिंग एका लग्न समारंभात सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होते. त्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आला… आपणास सव्वीस जानेवारी, दोन हजार सव्वीस रोजी दिल्लीत प्रजासत्ताक दिन समारंभास निमंत्रित केले गेले आहे! यावर या माणसाने थेट सांगितले… खिशात केवळ एकशे दोन रुपये आहेत. दिल्लीत येण्यासाठी तिकिटाला पैसे नाहीत! त्यावर पंतप्रधान कार्यालयाने श्री. जितेंदर सिंग यांची सूरत-दिल्ली-सूरत विमानाची जाण्या-येण्याची तिकिटे पाठवून दिली, सोबत त्यांच्या पत्नीचीही तिकिटे दिली, दिल्लीत उत्तम निवास, भोजन व्यवस्था करून दिली. आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या सुसज्ज निवासस्थानी राहण्याचा, त्यांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास… ’जिंदगी में पहली बार इतना महंगा खाना’ त्यांनी खाल्ले! आजवर मोठमोठ्या हॉटेल्सचे सुरक्षारक्षक म्हणून काम केले.. पण पहिल्यांदाच तशा हॉटेल्समध्ये राहण्याचा योग आला! एका सामान्य माणसाची एवढी छान बडदास्त ठेवणा-या पंतप्रधान कार्यालयाचे कौतुक करावेच लागेल!

‘तुम्हाला काय पाहिजे? या प्रश्नावर त्यांनी अर्थातच अशी मागणी केली आहे की… त्यांचा हा माहिती, छायाचित्र, पुतळे संग्रह एकाच ठिकाणी सुरक्षित जतन केला जाण्याची व्यवस्था व्हावी!

मी दोन वर्षांपूर्वी कै. रावत साहेबांच्या संदर्भात एक लेख मराठीत लिहिला होता. तो लेख जितेंदर सिंग यांच्यापर्यंत पोहोचला… मराठी विशेष समजत नसतानाही त्यांनी मजकूर समजावून घेतला आणि मला फोन केला… त्यांच्या कार्याची माहिती दिली!

अशा या जन-सैनिकाला आपण अभिवादन करावे, असे वाटल्याशिवाय राहवत नाही. जम्मूचे विकास मन्हास नावाचे एक गृहस्थ देशभरात हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांच्या भेटी घेत असतात, त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधून त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होत असतात. मुंबईच्या उमाताई कुलकर्णी अगदी रोजच्या रोज हुतात्मा सैनिक, त्यांच्या कुटुंबियांविषयी फेसबुकवर माहिती देत असतात. असे अनेक नागरिक देशासाठी लढणा-या सैनिकांविषयी सा-या देशाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करीत असतात. जयहिंद फाउंडेशन सारख्या अनेक संस्था हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना आधार देण्याचे कार्य करीत असतात. लोकवर्गणी मधून सियाचीनमध्ये सैनिकांसाठी प्राणवायू निर्मिती संयंत्र देणा-या कै. योगेश चिथडे व आताही त्यांचे कार्य पुढे नेणा-या सुमेधा ताई चिथडे यांचेही कार्य मोठे आहे. नागरिकांनी अशा प्रकारे सैनिकांच्या मागे ठाम उभे राहिल्यास त्यांनाही लढण्याचे अधिक बळ लाभेल यात शंका नाही.

– – – देशाची ‘सिक्युरिटी’ सांभाळणा-या सैनिकांच्या स्मृतींचा ‘गार्ड’ बनून अहोरात्र उभ्या असलेल्या श्री. जितेंदर सिंग राठौर यांना सल्यूट! त्यांच्या कार्यास जनतेने जरूर हातभार लावावा. जय हिंद!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ९१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ९१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- मी तोवर कधी कल्पनाही न केलेल्या एका अनोख्या अशा घटनेच्या पाऊलखुणांचे धागेदोरे सुद्धा या प्रकाशन समारंभाशीच जोडले जाणार आहेत आणि याचा मुख्य दुवा शांतपणे वाचण्यासाठी ऑफिसमधून घरी येताना सोबत आणलेल्या त्या सर्क्युलर मधेच लपलेला आहे हे त्या क्षणी तरी मला जाणवलेलं नव्हतं एवढं खरं! )

नितिन देशपांडे यांच्याशी फोनवर बोलल्यानंतर पूर्णतः निश्चिंत झालेल्या मनाने मी घरी परत आलो. आईने दार उघडलं तेव्हा समोरचं दृश्य बघून माझ्या आनंदाला पारावरच राहिला नाही. आमचा संपूर्ण हॉल माझ्या ‘आपल्या’ माणसांनी गच्च भरून गेलेला होता! मी फोन करण्यासाठी बाहेर पडल्यापासून परत येईपर्यंतच्या फार फार तर दहा-पंधरा मिनिटात घरातलं चित्र पूर्णतः बदलूनच गेलं होतं! आरती/सलिल तर आले होतेच, तसेच माझे सासूसासरे, बहिण, मेहुणे, हे ही सगळे! सर्वांच्या उपस्थितीनेच एरवी फारसा वावर नसलेलं ते घर आनंद आणि उत्साहाने भरूनच गेलं एकदम!

प्रकाशन समारंभ दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजता होता. अगदी लवकर म्हटलं तरी दुपारी तीन वाजेपर्यंत मी हॉलवर पोचलो तरी पुरेसं होतं. शं. ना. नवरेंना सकाळी स्टेशनवर उतरून घेऊन लॉजवर पोचवणे, त्यांचा चहा, नाष्टा, आणि दुपारचं जेवण होईपर्यंत अधूनमधून इतर बाहेरची कामं आवरण्यापुरतं थोडा वेळ बाहेर जाऊन एरवी नितिन शं. ना. ना पूर्ण वेळ कंपनी देऊन संध्याकाळी बरोबर पावणेचारला त्यांना घेऊन हाॅलवर येणार होता. फोन उपलब्ध नसल्याने या सर्व कामांमधे एखाद्या वेळी कांही अडचण/ अडथळे आलेच तर आमच्यात कम्युनिकेशन गॅप रहाण्याची शक्यता गृहीत धरून नितिनने आधीच ‘कांही अडचण आलीच तर ती मी परस्पर निभावून नेईन’ असं सांगून मला पूर्णतः निश्चिंत केलेलं होतं. त्यामुळे मी अतिशय मोकळेपणाने समोरच्या माझ्या माणसांमधे आनंदाने मिसळून गेलो!

रात्री अंथरुणाला पाठ टेकली आणि मला अचानक ऑफिसमधून घरी आणलेल्या त्या सर्क्युलरची आठवण झाली! तोवर सर्वांची निजानिज झालेली होती. उद्याच्या कार्यक्रमाचंही माझ्या मनावर कसलंच दडपण नव्हतं. त्यामुळे या निश्चिंततेच त्या सर्क्युलरच्या विचाराने हळूच डोकं वर काढत माझ्या मनाचा ताबा घ्यायला सुरूवात केली. सोमवारी ऑफिसला जाण्यापूर्वी हे सर्क्युलर लक्षपूर्वक वाचून त्यातले महत्त्वाचे मुद्दे डायरीत नोंद करून ठेवणं अत्यावश्यक होतं, पण ते करायचं कधी? उद्याचा पूर्ण दिवस घरातली सर्वांची लगबग, माझ्या मनातली प्रकाशन समारंभाची व्यवधानं आणि दिवसभराच्या दमणुकीनंतर कार्यक्रम संपवून मला घरी परत यायला उशीर झाला तर ते सर्क्युलर वाचणं शांतपणे होणार कधी आणि कसं? … या विचाराने तर मला झोपच लागेना. अखेर कंटाळून मी अंथरूण सोडलं. माझी ब्रिफकेस घेऊन किचनमधे गेलो. डायनिंग टेबल जवळचा लाईट आॅन करून ब्रिफकेसमधलं सर्क्युलर बाहेर काढलं. डायरी आणि पेन सोबत घेऊन ते सर्क्युलर वाचायला सुरुवात केली…! ती आठ-दहा पानं म्हणजे सर्व स्तरावरील बॅंक कर्मचाऱ्यांसाठी सुरू झालेली ‘स्वेच्छानिवृत्ती’ साठीची अतिशय आकर्षक अशी नवीन योजना होती! जे या योजनेच्या विविध नियम आणि अटीत बसत असतील ते या योजनेचा लाभ घेऊ शकणार होते! हे सर्क्युलर वाचल्यानंतर त्यातील मुख्य मुद्द्यांची नोंद मी डायरीत करून ठेवली तेव्हा कुठे मी रिलॅक्स झालो. आता काळजी करण्यासारखं काही नव्हतं. या योजनेबाबत विविध शंका विचारणारे असंख्य फोन्स सोमवारी ब्रॅंचेस् आणि रिजनल आॅफिसकडून दिवसभर येत रहाणार होते पण मला आता त्याचं दडपण वाटेना! तरीही यानंतरचा जवळजवळ महिनाभर ही स्टाफ-मॅटर असल्याने माझं अख्खं डिपार्टमेंट यासंबंधीच्या कामातच पूर्णतः व्यस्त रहाणार होतं पण ती नंतरची गोष्ट! या क्षणी तरी आता पूर्णतः माझ्या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभाचा आनंद मला घेता येणार असल्याचं समाधान माझ्यासाठी पुरेसं होतं.

अंथरूणावर पाठ टेकताच हळूहळू झोप येऊ लागली तरी त्या अधांतरी अवस्थेत हे सर्क्युलर, त्यातले विविध मुद्दे, या योजनेव्दारा स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणाऱ्यांसाठी देऊ केलेले अतिरिक्त आर्थिक लाभ, स्वेच्छानिवृत्ती योजना स्वीकारण्यास पात्र असलेल्यांच्या साठी ती स्वीकारणं आणि न स्वीकारणं तो दोन्ही दृष्टीकोनातून आवश्यक असणारा तुलनात्मक अभ्यास अशाच सगळ्या गोष्टींचे

उलटसुलट विचार बॅक आॅफ द माईंड सुरू झाले असल्यासारखं पहाटे पहाटे मला एक स्वप्न पडलं. स्वप्नात मी या योजनांतर्गत स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्विकारल्यानंतर रिलीव्ह होतानाच्या माझ्या सेंडआॅफचं संपूर्ण दृश्य मला दिसलं आणि ते स्वप्न सुरू असतानाच आईनं मला हलवून जागं केलं. माझ्या आधीच सर्वजण उठले होते आणि किचनमधे पहिल्या चहाची गडबड सुरू झालेली होती! ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ म्हणतात, पण माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या अद्याप पूर्ण व्हायच्या असताना मी स्वत:साठी ही योजना स्वीकारण्याचा विचार करणं शक्य तरी होतं कां? माझं मलाच हसू आलं आणि प्रसन्न मनानं मी अंथरूण सोडलं तसा त्या सर्क्युलरचा विचार आपोआपच पुसला गेला. त्या क्षणापासून मात्र मी अगदी मनापासून माझ्या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभाचा विचार करायला मोकळा झालो!

मी, आरती आणि सलिल ठरल्याप्रमाणे दुपारी तीन वाजता हाॅलवर जाऊन पोचलो. घरची बाकी मंडळी त्या सर्वांचं आवरलं कीं पाठोपाठ येणार होतेच. माझ्या आजोळचे अनेक नातेवाईक पुण्यातच होते. माझ्या मावसभावाने त्या सर्वांकडे आमंत्रण पोचवायची जबाबदारी स्वेच्छेने स्वीकारली होती आणि मनापासून पारही पाडली होती. ते सर्वच नातेवाईक अगदी त्यांच्यातले माझा फारसा सहवास नसलेले या पिढीतले ही बरेचजण आवर्जून आले होते. हे सर्वजण बऱ्यापैकी वेळेपूर्वी आल्याने सर्वांशी मला मोकळेपणाने बोलता आल्याचा आनंद कधीच विसरता न येणारं समाधान देणारा होता!

पावणे चारच्या आधीच पाच मिनिटं नितिन शन्नांना घेऊन आला. आत येताच खचाखच भरलेला हाॅल पाहून त्यांना झालेला आनंद त्यांनी त्यांच्या मिष्किल शैलीत व्यक्त करूनच आपल्या भाषणाची सुरूवात केली होती!

अर्थात त्यांच्या आधी प्रकाशक म्हणून राजलक्ष्मी बोलली. तिच्यानंतर मला लेखकाचं मनोगत व्यक्त करायचं होतं. राजलक्ष्मी अतिशय मुद्देसूद आणि समर्पक बोलली. मनोगत व्यक्त करताना आपण काय बोलायचं हे नेमकेपणाने मनाशी ठरवायला मला वेळच मिळाला नव्हता. एरवीही उत्स्फूर्तपणे माझ्या कथालेखन प्रवासा दरम्यान मला आलेल्या अनुभवांबद्दलच मी बोललो असतो, त्याच अनुषंगाने मी माझं मनोगत थोडक्यांत व्यक्त केलं आणि शेवटी माझ्या कथासंग्रहातल्या अर्पणपत्रिकेचा आवर्जून उल्लेख केला.

“माझा ‘जगावेगळी’ हा पहिला कथासंग्रह मी माझ्या बाबांच्या स्मृतींना आणि माझ्या आईला अर्पण केला होता आणि आजचा ‘स्पर्श प्रकाशाचा’ हा कथासंग्रह मी कृतज्ञतापूर्वक अर्पण करीत आहे… ” असं म्हणून मी अर्पणपत्रिका वाचून दाखवली…

‘ पुष्पाताई आणि आनंदास,

तुमच्या कोवळ्या वयापासून या लहान भावासाठी तुम्ही दोघांनी केलेल्या कष्टांना आणि त्यागाला हा ‘स्पर्श प्रकाशाचा’ कृतज्ञतापूर्वक अर्पण… ‘ हे वाचतानाही माझा आवाज भरून आला होता. वाचन संपलं आणि व्यासपीठावरून खाली उतरून पहिल्या रांगेत आईजवळच बसलेल्या माझ्या बहिण आणि भावाला मी कथासंग्रहातील प्रत स्वत: नेऊन दिली तेव्हा आम्हा सर्व कुटुंबियांच्या आजवरच्या प्रवासास साक्षी असलेल्या माझ्या आजोळच्या नातेवाईकांबरोबरच इतरही उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडातांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आईबरोबरच त्या दोघांच्याही डोळ्यांत कृतार्थतेचे अश्रू आणणारा ठरला होता!

शन्नांचं मिष्किल आणि सविस्तर भाषण हे तर त्या संपूर्ण समारंभाचं सर्वात लक्षवेधी वैशिष्ट्य ठरलं होतं!

उपस्थित सर्वांनीच कथासंग्रहाच्या प्रति विकत घेऊन त्यावर माझ्या सहीचा आग्रह धरणं ही त्यांनी मला कौतुकानं दिलेली शाबासकीच होती!!

उपहार आणि चहाकाॅफी सोबत सर्वांशी झालेल्या मनमोकळ्या गप्पांनी त्या समारंभाची सांगता झाली पण त्या आठवणी मात्र इतकी वर्षं उलटून गेल्यानंतर आजही तितक्याच ताज्या आहेत!

याला कारण ठरलंय ते या कार्यक्रमाचं नियोजन जसं तसंच या समारंभाच्या निमित्ताने माझ्या उर्वरीत आयुष्याला मिळालेलं अनोखं वळण सुध्दा! हे वळण म्हणजे त्या दिवशीच्या पहाटे मला पडलेल्या त्या स्वप्नाचं ‘त्या’च्या कृपेने अकल्पितपणे सत्यात परावर्तित होणंच होतं!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ इंद्रायणी काठी… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

??

☆ इंद्रायणी काठी… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

लहानपणी मला एक अभंग फार आवडायचा. त्यावेळी आजच्यासारखी गाणे ऐकण्यासाठी साधने नव्हती. कधी काळी रेडिओवर हा अभंग लागला की मी जीवाचे कान करून ऐकत असे. त्यावेळी त्या अभंगातला अर्थ फारसा कळत नसे. पण अभंगातील गोडवा आणि तळमळ मनाला स्पर्शून जात असे. तो अभंग होता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा-

चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग

दीपालाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगे साकर अवघी गोड.

तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळेचिना.

सुमन कल्याणपूर यांनी आपल्या विलक्षण गोड आवाजात हा अभंग अजरामर केला आहे. आजही हा अभंग लागला की मी त्यात हरवून जातो. मग समोरचा माणूस माझ्याशी कितीही महत्वाचे बोलत असला तरी माझे त्याकडे लक्ष नसते. मग कधी कधी, “ अहो, मी काय म्हणतो? कुठे हरवलात? ” यासारखी वाक्ये ऐकण्याची मी तयारी ठेवतो. असो.

इंद्रायणीचा काठच सुपीक! जिथे तिच्या काठावर शेती, मळे बागबगीचे फुलले; तिथेच, त्याच काठावर विठ्ठल भक्तीचेही मळे फुलले. एक मळा फुलवला ज्ञानोबा माउलींनी आणि दुसरा तुकोबांनी. या मळ्यामध्ये विठ्ठल भक्तीचे अमाप पीक आले. आणि अवघ्या महाराष्ट्रातील जनता येथून विठ्ठल भक्तीचे बीज नेऊ लागली तरी ते कमी न होता उलट वाढतच गेले. इंद्रायणीच्या काठीच भागवत धर्माचा पाया रचला गेला. एकाने पाया रचला आणि दुसऱ्याने कळस.

ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस.

दोघाही संतांच्या शिकवणुकीत विलक्षण साम्य. दोघानाही समाजातील दांभिकतेची चीड. दोघानाही सर्वसामान्यांच्या उद्धाराची तळमळ. भागवत धर्माच्या रत्नजडीत मुकुटात हे दोन अमुल्य हिरे जडवलेले आहेत. समाजातले वाईट, अमंगल नष्ट व्हावे हीच आस या दोघांच्या मनी. असे करताना समाजातील वाईट, दुष्ट व्यक्ती नष्ट होऊ नये तर त्यांची दुष्ट वृत्ती नष्ट व्हावी म्हणून दोघेही प्रयत्नशील. ज्ञानोबा आपल्या पसायदानात म्हणतात-

जे खळांचीची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो

भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे ।।

आणि तुकोबाराय म्हणतात,

.. मेणाहुनी मऊ आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे.

… भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी.

अशा या सर्व संतांच्या शिकवणुकीत साम्य आहे. असे म्हणतात की परमेश्वराला सर्वत्र जाता येत नाही, म्हणून त्याने आई निर्मिली. तसेच मी म्हणेन की परमेश्वराला सर्वाना समजावणे शक्य नव्हते, म्हणून त्याने संतांची निर्मिती केली. सर्व संतांचे हृदय हे आईचेच हृदय. मातेच्या ममतेने संतांनी समाजाचे पालन पोषण केले. माता प्रसंगी बालकाला रागावतेही पण ते त्याच्या हितासाठी. तसे तुकोबा कधी कधी कठोर झाले. पण ते समाजातील अंधश्रद्धा, रूढी, दुष्ट चालीरीती यावर प्रहार करताना. आणि त्या काळात अशा प्रकारे लोकांना समजावून सांगण्याची आवश्यकता होती. लोक आपले कर्तव्य विसरले होते, गुलामगिरीची वृत्ती अंगी भिनली होती, ढोंगीपणा, बुवाबाजी यासारख्या गोष्टीना ऊत आला होता. लोक देवाची खरी भक्ती विसरले होते आणि नवस सायास करू लागले होते. अशा वेळी ‘ नवसे पुत्र होती, तरी का करणे लागे पती ‘ यासारखे परखड बोल तुकोबांनीच समाजाला ऐकवले. दांभिकतेवर प्रहर करताना ते म्हणतात-

… कथा करोनिया दावी प्रेमकळा, अंतरी जिव्हाळा कुकर्माचा

… तुळसी खोवी कानी दर्भ खोवी शेंडी, लतिका धरी बोंडी नासिकाची

… टिळे टोपी माळा देवाचे गबाळे, वागवी ओंगळे पोटासाठी

… गोसाव्याच्या रूपे हेरी परनारी, तयाचे अंतरी कामलोभ

… कीर्तनाचे वेळी रडे, पडे, लोळे, प्रेमेविण डोळे गळताती

… तुका म्हणे ऐसे भाषेचे महंत, त्यापाशी गोविंद नाही नाही.

तुकोबांची दुसरी पत्नी आवली. कजाग आणि कर्कश मावली. आणि तुकोबा विठ्ठल भक्त. एवढेच आम्ही जाणतो फक्त. पण खरे म्हणजे असे नव्हते. आवली असेल कजाग आणि कर्कश पण तुकोबांवर तिचे अतिशय प्रेम. म्हणतात ना ज्या व्यक्तीवर आपले प्रेम असते त्या व्यक्तीवरच आपण रागावतो. ते जेवल्याशिवाय ती तोंडात अन्नाचा कणही घेत नसे. आणि तुकोबांची योग्यता ती जाणून होती.

घरामध्ये खायला काही नसायचे. मुलेबाळे, पत्नी उपाशी. अशा परिस्थितीत एखाद्याला आपल्या संसारासाठी थोडा स्वार्थ सुचला असता तर ते क्षम्यच होते. पण तुकोबांनी त्यांच्याकडे चालून येणारा नजराणा नाकारला. शिवरायांनी त्यांच्याबद्दल अतीव आदराने तो पाठवला होता. पण ‘ काय उणे आम्हां विठोबाचे पायी ‘ या भावनेतून तो नम्रपणे नाकारला. त्यांनी त्या नजराण्यावर तुळशीपत्र ठेवले आणि म्हटले-

सोने आणि माती, आम्हा समान हे चित्ती

तुका म्हणे आले, घरी वैकुंठ सगळे.

आणि त्यांनी त्या नजराणा घेऊन आलेल्या सरदारांबरोबर निरोप पाठवला, ‘ शिवाजीराजांना सांगा! तुम्ही स्वतः आमच्याहून थोर आहात. तुम्ही आहात म्हणून देहू गावावर परचक्र आलेले नाही. हाच नजराणा मोलाचा. आम्हाला द्रव्य काय करायचे? आम्हाला काय उणे आहे?

असे हे निरिच्छ तुकोबाराय. त्यांचे अभंग तरले कारण ते खऱ्या अर्थाने ‘अ-भंग’ होते. काळाच्या कसोटीवरही ते टिकून राहिले. ते अजरामर आहेत आणि राहतील. वर्षानुवर्षे समाजाला मार्गदर्शन करीत राहतील.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – भाग – 1 ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – भाग – १ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

अनेक दिवसांपासून मनाच्या श्लोकांवर काहीतरी लिहावे अशी माझी इच्छा होती. परंतु समर्थांच्या प्रचितीतून आणि अनुभवातून आलेले हे दिव्य श्लोक ! त्यावर खरोखरीच मी काही लिहू शकेन किंवा तसे लिहिण्याची माझी पात्रता आहे का हाही प्रश्न माझ्या मनात होता. तो अजूनही आहे. परंतु तरीसुद्धा मला जसे सुचेल आणि आकलन होईल तसे त्यावर लेखन करावे असा कौल माझ्या मनाने मला दिला. जसे समर्थ म्हणतात ‘ कर्ता करविता राम आहे.’ तसेच मी सुद्धा म्हणतो की हे माझ्याकडून लिहून घेणारे समर्थ आहेत त्यांच्या कृपेनेच मी काही थोडे बहुत लिहिण्याची हिंमत करतो आहे. काही चुकले तर ते मला सांभाळून घेतील आणि आपणही सुज्ञ वाचक मला सांभाळून घ्याल.

समर्थ रामदासांनी विपुल साहित्य रचना केली आहे. त्यामध्ये दासबोध, करुणाष्टके, आत्माराम, मनाचे श्लोक, एकवीस समासी, मानपंचक, मानसपूजा अनेक देवी-देवतांची स्तोत्रे आणि आरत्या असे समृद्ध साहित्य आहे. या त्यांच्या साहित्यामध्ये प्रामुख्याने अध्यात्म विषयाचे प्रतिपादन केलेले असले तरी नानाविध विषय समर्थांनी हाताळले आहेत. त्यात प्रपंच, राजकारण, समाजकारण, व्यवस्थापन, कुटुंब नियोजन, अर्थकारण, निसर्ग आणि वनस्पती विज्ञान, संगीत यासारख्या अनेक विषयांवर साधकांना मार्गदर्शन केले आहे. या सर्व वाङ्मयातून समर्थांचा विविध विषयांचा प्रचंड व्यासंग दिसून येतो.

त्यांच्या या सर्व वाङ्मयात मनाचे श्लोक हा एक अत्यंत लघु परंतु प्रभावी असा ग्रंथ आहे. तो एक अनमोल असा हिरा आहे जो आपल्या विलक्षण तेजाने झळाळून उठतो. साधी सोपी भाषा हे त्याचे वैशिष्ट्य आहे. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तीयोग, सदाचार, सत्संग, सगुण निर्गुण, सुखदुःख, नाम आणि ध्यान यासारख्या अनेक विषयांना समर्थांनी या छोटेखानी ग्रंथात स्पर्श केला आहे. मनाच्या श्लोकांना मनोबोध असेही म्हटले जाते. विनोबा भावेंनी तर त्याला मनोपनिषद असे सार्थ नाव दिले आहे.

मनाचे श्लोकात समर्थांनी प्रत्येक विषयाचे तर्कशुद्ध थोडक्यात विश्लेषण केले आहे. व्याकरणदृष्ट्या सुद्धा हा ग्रंथ परिपूर्ण आहे. यातील श्लोक भुजंगप्रयात या वृत्तात लिहिले गेले असून ते सुरेख असे चालीवर म्हणता येतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. मनाच्या श्लोकांचा अनेक भाषांमध्ये अनुवाद देखील झाला आहे.

समर्थांचे दासबोध हे महाकाव्य तर प्रसिद्धच आहे परंतु सर्वांनीच दासबोध वाचला असेल असे काही सांगता येत नाही. परंतु ज्याला ज्याला मराठी येते त्याला लहानपणापासूनच मनाच्या श्लोकांचा परिचय असतो. कोणत्या ना कोणत्या मार्गाने मनाचे श्लोक लहानपणापासून सतत त्याच्या कानावर पडत असतात. अशाच प्रकारचा मनाच्या श्लोकांचा प्रभाव लहानपणापासून माझ्यावरही आहे. लहानपणी मी ते पाठ केले आणि आजपर्यंत ते वेगवेगळ्या प्रसंगी ऐकत आलो. लहानपणी ते पाठ करायचे म्हणून केले होते परंतु त्यांचा अर्थ फारसा कळत नव्हता. आताही तो फार कळतो आहे अशातला भाग नाही. परंतु जीवन जगण्यासाठी या मनाच्या श्लोकांची फार मोठी मदत आपल्याला होऊ शकते एवढी गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली आणि त्याच उद्देशाने हा मनाच्या श्लोकांवर लिहिण्याच्या लेखमालेचा प्रपंच आरंभला आहे.

मनाचे श्लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे कोणताही उपवास किंवा जपजाप्य यात सांगितले नाही. कोणत्याही कठोर नियमांचे पालन करायचे नाही. हा आपल्या स्वतःच्या मनाला केलेला उपदेश आहे. आपले मनच आपला मित्र किंवा शत्रू असते. प्रपंच असो किंवा परमार्थ तो करण्यासाठी आपले मन आपल्याला अनुकूल असावे लागते. बहिणाबाई म्हणतात,’ मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर.’ मन हे अतिशय चंचल आहे म्हणूनच अशा या मनाला समर्थांनी उपदेश केला आहे. मनाला आजार झाला असेल तर औषध मनालाच द्यावे लागते. म्हणूनच समर्थांनी जनसामान्यांच्या कल्याणासाठी हा मनाच्या श्लोकांचा प्रपंच केला असे म्हणता येईल.

मराठी साहित्यातील आणि संतकाव्यातील ‘मनाचे श्लोक’ हे केवळ आध्यात्मिक काव्य नसून, ते मानवी मनाला उन्नत करणारे एक प्रगत ‘ मानसशास्त्र ‘ आहे. १७ व्या शतकात समर्थ रामदास स्वामींनी रचलेले हे २०५ श्लोक आजही तितकेच प्रस्तुत वाटतात, याचे मुख्य कारण म्हणजे यात केवळ परमार्थाची चर्चा नसून हे ‘ मनावर ‘ विजय मिळवण्याचे प्रयोगात्मक शास्त्र आहे.

मला नेहमी प्रश्न पडतो की, समर्थांनी मनाला उद्देशून बोलताना ‘ मना सज्जना ‘ अशी साद का घातली असावी ? पण आपण मनाचे श्लोक जेव्हा वाचतो किंवा अभ्यासतो तेव्हा लक्षात येते की समर्थ रामदासांचा मानवी मनाचा अभ्यास खूप मोठा आहे. आपले मन हे अत्यंत चंचल आहे. ते जसे अधोगतीला नेऊ शकते, तसेच ते मोक्षाचा मार्गही प्रशस्त करू शकते. म्हणूनच समर्थांनी मनाला ‘ सज्जन ‘ संबोधून प्रथम त्याच्यातील सात्विकतेला जागृत केले आहे. आपल्याकडे घरात आई-वडील जेव्हा मुलांना समजून सांगतात तेव्हा शहाणी मुले असं करत नाहीत असं म्हणतात म्हणजेच ते शहाणा म्हणून आपल्यातील चांगुलपणाला आवाहन करतात. समर्थांनी देखील आपल्या मनाला तशाच प्रकारचे आवाहन केले आहे.

समर्थांच्या या रचनेला मला या ‘ मनोपनिषद ‘ म्हणणे अधिक योग्य वाटते, कारण उपनिषदांचा गाभा असलेल्या ‘ब्रह्मविद्येला’ समर्थांनी अत्यंत सोप्या भाषेत जनसामान्यांच्या उंबरठ्यापर्यंत आणले आहे. जिथे उपनिषदे ‘तत्वमसि’ (ते तूच आहेस) असा गहन संदेश देतात, तिथे समर्थ ‘मना सज्जना राघवी वस्ति कीजे’ असे सांगून त्या तत्त्वाची अनुभूती घेण्याचे साधन आपल्याला देतात. मनाला शिस्त लावणे, षडरिपूंवर विजय मिळवणे आणि विवेकाच्या साह्याने जगणे, ही या मनोपनिषदाची प्रमुख सूत्रे आहेत.

या लेखमालेत आपण समर्थांच्या मनाचे श्लोक – मनोपनिषद या अजरामर कृतीचा धांडोळा घेणार आहोत. त्यातून आपल्या मनाचे नियमन कसे करावे, सात्विकतेचा ध्यास कशा प्रकारे घेता येईल आणि अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग कसा प्रशस्त होईल हे समजण्यासाठी मदत होईल.

यात समर्थांनी केवळ भक्ती नाही, तर ‘विवेक’ (योग्य-अयोग्य निवडण्याची शक्ती) वाढवण्यावर भर दिला आहे. मनात चालणाऱ्या सुख-दुःख, आशा-निराशा यासारख्या द्वंद्वांवर कशी मात करावी हे यातून सांगितले आहे. तसेच परमेश्वर प्राप्तीचा किंवा साधनेचा सोपा मार्ग समर्थ या श्लोकातून आपल्याला सांगतात. कठीण योगाभ्यासापेक्षा ‘नामस्मरण’ आणि ‘सदाचार’ यातून मन शुद्ध होते यावर त्यांचा भर आहे. आजच्या काळात जेव्हा समाज स्वत्व विसरला आहे, नैतिक मूल्यांचा पाया डळमळीत झाला आहे अशा परिस्थितीत समाजाला नैतिक अधिष्ठान प्राप्त करून देण्यासाठी मनाच्या श्लोकांची फार मोठी मदत होऊ शकेल. ज्याप्रमाणे शरीर शुद्धीसाठी व्यायामाची गरज असते, तशी चित्तशुद्धीसाठी या श्लोकांची गरज आहे असे मला वाटते. मनाच्या श्लोकातील प्रत्येक श्लोकाला सुभाषिताचे मोल आहे. आपण ठरवले तर प्रत्येक श्लोक हा एक अमीट मानसिक संस्कार (Psychological Impression) होऊ शकतो. 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘मलेरियाविरोधी औषधांची कूळकथा…’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

 

☆ ‘मलेरियाविरोधी औषधांची कूळकथा…’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

मलेरियाविरोधी औषधांची कूळकथा – – 

औषधांच्या निर्मितीचा इतिहास…

कुठलेही औषध हे मानवी बुद्धीच्या आवाक्याच्या अंतिम टोकापर्यंत जाऊन देखील संपूर्णतः नवीन संरचना घेऊन येत नसते. त्याची सुरुवात ईश्वराद्वारे निर्मित या चल-अचल सृष्टीच्या कुठल्यातरी कोपऱ्यापासून सुरु होते. उदाहरण द्यायचे तर मानवी वंशाची उत्पत्ती! ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्याच्या इच्छेने ध्यान केले. तेव्हा त्यांच्या शरीरातून दोन रूपे प्रकट झाली – एक पुरुष रूप (मनु) आणि दुसरे स्त्री रूप (शतरूपा). स्वयंभुव मनु आणि शतरूपा हे पृथ्वीवरील अनुक्रमे पहिले पुरुष आणि स्त्री मानले जातात. नंतरची वंशवृद्धी होत मानवजातीचा विस्तार झाला.

हे आठवण्याचे कारण मलेरियाशी निगडित आहे. मलेरियाविरोधी औषधांची कुळकथा मला तरी खूपच चित्तवेधक वाटते. दक्षिण अमेरिकेत १६०० साल पासून सिंकोना झाडाची साल ज्वरनाशक, वेदनाशामक आणि टॉनिक म्हणून वापरली जात होती. अंदाजे १६३० मध्ये जेसुइट मिशनऱ्यांनी युरोपियन लोकांमध्ये त्याचा प्रसार केला म्हणून ही साल “जेसुइट्स पावडर” म्हणून प्रचलित झाली. १८२० साली या सालींतील मलेरियाविरोधी औषधी गुणधर्म असलेले मुख्य रसायन कुनैन (क्विनाइन) शोधण्यात आले. मंडळी, हे कुनैन ऐतिहासिक मलेरियाविरोधी औषध आहे, नंतर जवळपास २००० साल पर्यंत याच ऐतिहासिक कुनैन नामक औषधाच्या मूळ रासायनिक रचनेवर आधारित शेकडो मलेरियाविरोधी औषधे प्रयोगशाळेत तयार करण्यात आली. (आजचे अकल्पित स्वस्त कुनैन संपूर्णपणे कृत्रिमरित्या तयार होते.)

घरातील वृद्ध माणूस नकोसे झाले की त्याला अडगळीच्या खोलीत किंवा वृद्धाश्रमात रवाना करतात. कुनैनचे तसेच झाले. त्याचे दुष्परिणाम भरपूर होते. कारण कुनैनपेक्षा सुरक्षित भासणारी नवतीची विविधप्रकारे आकर्षक परिधान धारण करणारी औषधे प्रयोगशाळेतून बाहेर पडत होती. पण ज्याला विषारी औषध म्हणून हद्दपार करण्यात आले होते, तेच जुनेपुराणे जाडेभरडे वस्त्रांकित कुनैन आज नव्या औषधांना दाद न देणाऱ्या मलेरिया परजीवींकरता कर्दनकाळ ठरले आहे. हाताबाहेर गेलेल्या रुग्णांचे जीव याच वृद्ध औषधाने वाचवले आहेत. मैत्रांनो, कित्येक नवथर क्वीन्स आल्या अन गेल्या, मात्र क्विनाईन या ओरिजिनल क्वीनचे राजेशाही महत्व अजूनही शिल्लक आहे. म्हणूनच मंडळी, नम्रपणे विनंती करते की वय झालेल्या माणसाला आणि औषधाला कमी लेखू नका.

‘युध्दस्य कथा रम्या’ असे जो कोणी म्हणत असेल त्याने खालील प्रकरणे अवश्य नजरेखालून घालावीत! दुसरे जागतिक महायुद्ध कित्येक कारणांसाठी ऐतिहासिक ठरले. मात्र औषधशास्त्राच्या दृष्टीने ते खूपच संस्मरणीय ठरले. जर्मनीतील अघोरी कॉन्सन्ट्रेशन कॅंप्समध्ये सरेआम हजारो ज्यूजला यमसदनी धाडणाऱ्या गॅस चेम्बर्समधील अतिविषारी वायू, त्यांची सख्खी, चुलत, आत्ये, मामे आणि मावसभावंडे म्हणजे कीटक नाशके, तसेच एलएसडी आणि तत्सम भ्रमित करणारी व व्यसनाधीनता आणणारी औषधे याच भीषण काळातली! त्यांच्या शोधामागील भयावह उद्देश एकच होता, शत्रूच्या किंवा ज्यूजसारख्या नको असलेल्या जमातींचा ग्रुप मर्डर! या औषधांच्या संशोधनाच्या आणि वापराच्या बाबतीत डॉक्टर्स आणि नर्सेस द्वारा यत्किंचितही विधिनिषेध पाळले गेले नाहीत. या मृत्यूदात्यांचे हे ‘पाशवी’ च्या पलीकडले क्रूर प्रकरण वैद्यकीय शास्त्राला काळिमा फासणारे ठरले.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान जापानी सैन्याने १९४२ साली इंडोनेशियावर आक्रमण केले आणि जावावर नियंत्रण मिळवले. जावा त्यावेळी जवळपास ९५% सिंकोना झाडाच्या घटकांचे उत्पादन करत होता. या जापानी विजयामुळे मित्र राष्ट्रांच्या सैन्याला क्विनाइनचा पुरवठा बंद झाला. पॅसिफिक आणि आफ्रिकन क्षेत्रात हजारो सैनिक मलेरियामुळे मरण पावले. मंडळी, गरज ही शोधाची जननी असते. कुनैनला पर्यायी कृत्रिम औषधनिर्मिती ही काळाची गरज बनली. क्विनाइनपासून प्रेरित पहिले कृत्रिम औषध एटेब्रिन (मेपाक्रिन) याचा ‘एटेब्रिन ग्लो’ (कातडीवर दुष्परिणाम होऊन ती पिवळी पडणे), मानसिक, रक्ताच्या उत्पादनावर तसेच यकृतावरील दुष्परिणाम चिंताजनक होते. गंमत म्हणजे बायर या जर्मन कंपनीने ज्याला १९३४ मध्ये घातकी औषध म्हणून टाकून दिले होते, त्याचेच पुनःपरिक्षण करीत महायुद्धाच्या शेवटी शेवटी अमेरिकेच्या खास मलेरियाविरोधी मोहिमेत क्लोरोक्विन या अत्युत्तम औषधाचा पुनर्जन्म झाला. मैत्रांनो! त्याच्या वैद्यकीय चाचण्या जालीमच होत्या. आफ्रिकेच्या जंगलात युद्धकैद्यांना सोडून देणे, त्यांना मलेरिया झाला की त्यातील निवडक व्यक्तींना हे औषध देणे, आणि इतरांचे रक्षण ईश्वर करो ही घातक भावना जपत हे मलेरियाविरोधी क्रांतीकारक क्लोरोक्विन १९४७ साली एकदाचे बाजारात आले. १९७० ला परजीवींचा प्रतिकार उदयास येईपर्यंत ते मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे औषध बनले. मात्र ‘अती तेथे माती’! प्लाझमोडियम गप्प कसे बसणार? १९७० साल उजाडेपर्यंत क्लोरोक्विन फॅल्सीपॅरम वर निष्प्रभावी ठरले. परिणाम काय तर यत्र तत्र सर्वत्र क्लोरोक्वीनविरुद्ध फॅल्सीपॅरमच्या निकराच्या लढतीत क्लोरोक्वीनने मान टाकली.

यावर उपाय म्हणून विएतनामचे युद्धबंदी, शिवाय देशांतर्गत बंदिगृहातील कैदी या परस्वाधीन मानवसमूहाची तथाकथित संमती (? ) मिळवून त्यांच्यावर प्रयोग करून यूएस आर्मी मेडिकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट कमांडद्वारा मलेरियाविरोधी जहाल प्रकल्प राबवले गेले. मेफ्लोक्विन हे अपत्य (१९७०) त्या दरम्यान विकसित झाले. त्याचा फायदा एकच.. तो म्हणजे ३ किंवा ४ गोळ्यांचा एकल डोज!

.. अशी ही कथा ज्यात भविष्यात आणखी बदल अपेक्षित असतातच.

 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares