नणंद आणि राधाबाई गजग्याचा खेळात रमून गेल्या होत्या. नणंद तर एकदमच खुश झाली होती. घरातून परसदारी आलेल्या सासूबाईकडे राधाबाईंचे लक्षच गेले नाही. सासूबाई दोन क्षण खेळ पहात थांबल्या आणि पुढच्याच क्षणी त्यांनी रागात हाक मारली.
” सुनबाई ss !”
खेळता खेळता सासूबाईंची हाक आल्यावर राधाबाई दचकल्या.. हातात गोळा केलेले गजगे खाली टाकून चटकन उभ्याच राहिल्या.
” घरात पाण्याचा थेंब नाही आणि तू खेळत बसलीयस ? ती एक लहान आहे पण तुला तरी कळायला हवं. तुझी तरी काय चूक म्हणा.. तुझ्या आई-वडिलांनी वळणच लावलं नाही म्हणल्यावर तू तरी काय करणार.. घरात काडीचं म्हणून लक्ष नाही..”
सासूबाई रागात म्हणाल्या आणि तिच्याकडे रागाने पहात वळून तणतणतच घरात निघून गेल्या. सासूबाईंच्या आवाजाने भानावर आलेल्या राधाबाई सासूबाईंच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आश्चर्याने आणि दुःखाने पाहतच राहिल्या. डोळ्यांच्या कडात टचकन पाणी दाटलं. ‘ आजवर सासूबाई असे कधीच लागट, रागाने बोलल्या नव्हत्या … मग आजच कशाकाय बोलल्या?’
नणंदेलाही आईच्या बोलण्याचे आश्चर्य वाटत होते. आई सहसा अशी चिडून बोलत नाही हे तिला ठाऊक होते.. मग आजच ? आपल्यामुळे वहिनीला बोलणे खावे लागले याची अपराधी भावना तिच्या मनात निर्माण झाली होती.
” वहिनी, माझ्यामुळे तुला आईचं बोलणं खावं लागलं. “
इवलंसं तोंड करून नणंद राधाबाईंना म्हणाली. तिच्या डोळ्यांत पाणी तरारलं होतं. तिच्या पाठीवर हात ठेवून हसण्याचा प्रयत्न करीत राधाबाई म्हणाल्या,
” नाही गं, तसं काही नाही. अगं, आज पाणी जास्त खर्च झालंय .. पाणी आणायला हवं हे माझ्याच लक्षात नाही राहिलं. “
” चल, मी पण येते.. दोघी मिळून पटकन पाणी आणूया. “
” नको, तुझा अभ्यास राहिलाय करायचा.. तो कर. मी आणते जाते पाणी. “
” वहिनी असे करूया, पाणी आणू पटकन मग करते ना मी अभ्यास.”
” जा आधी बस अभ्यासाला नाहीतर आई तुला आणि मला दोघींनाही बोलतील…”
हो- नाही करत नणंद गजग्यांची टोपली घेऊन घरात गेली.
नणंद पाठमोरी झाली तसे राधाबाईंच्या डोळ्यांत टचकन् पाणी आले. त्यांनी नणंदेसमोर मनाला घातलेला बांध फुटला होता. काही क्षण त्या तिथंच घराकडे पाठ करून उभ्या राहिल्या. डोळ्यांतून घळाघळा पाणी येत होते.
‘ भरल्या घरात तुला रडायला काय होतं गं ? ‘
लग्नाआधी लहानपणी कधितरी त्या रडत असताना पाठीत धपाटा घालून रागाने आई म्हणाली होती ते त्यांना आठवले. त्यांनी पटकन डोळे पुसले. घरात जाऊन दोन कळशा घेतल्या आणि पाणी आणायला पाणवठ्यावर गेल्या.
पाणवठ्यावर दुसरे कुणीच नाही याचे त्यांना खूपच बरे वाटले. त्या कळशा बाजूला ठेवून तिथल्या दगडावर बसल्या. ‘ कधी नव्हे ते सासूबाई अशा कशा बोलल्या ? आपलं काय चुकले ? ‘ त्यांना सासूबाई आपल्याला बोलल्या यापेक्षा आपल्या आई-वडिलांना त्यांनी दूषणे दिली याचे जास्त दुःख होत होते. मनात परत तो प्रसंग पुन्हा जागा झाला आणि घरातून बाहेर पडताना आवरलेले अश्रू पुन्हा वाहू लागले.
काही वेळ त्या तशाच बसून राहिल्या होत्या. अचानक घरात पाणी नाही याची त्यांना आठवण झाली तशा त्या उठल्या. पाणवल्या डोळ्यांनीच त्यांनी काळशीला दोराचा फास लावला आणि आत सोडली. दुसरी कळशीही पाण्यात सोडून वर काढली. दोन्ही कळशा उचलून घेणार तेव्हा त्यांना जाणवले..कळशा तर अर्ध्यामुर्ध्याच भरल्यात. आपल्याच नादात राहिल्याने कळशा पूर्ण भरायच्याआधीच आपण वर काढल्यात हे ध्यानात येताच एक कळशी दुसऱ्या कळशीत ओतून ती भरून घेतली आणि रिकामी कळशी परत सोडून भरून घेतली. दुःखाचा उमाळा काही वेळाने ओसरला. त्यांनी स्वतःला सावरले तरीही
‘सासूबाई आज अचानक असे कसे बोलल्या ?’ हा प्रश्न काही त्यांच्या मनातून जात नव्हता.
कधीतरी एखादया ओलावल्या क्षणी धाकटी नणंद येऊन टपकायची. त्यांच्या डोळ्यांतील पाणी पाहून जवळ बसत आपला अवखळपणा, खट्याळपणा विसरून जवळ बसत, एखाद्या वडीलधाऱ्यासारखे विचारायची,
” वहिनी, काय झालं गं ? माहेरची, मैत्रिणींची आठवण आली काय गं ?”
त्या खाली मान घालून हळूच डोळे टिपत मानेनेच नकार देत म्हणायच्या,
त्यांच्या या वाक्याने खुश होऊन त्यांच्याजवळ बसत लाडीकपणे नणंद म्हणायची,
” वहिनी, मला सांग ना, तुझ्या माहेरच्या गमती-जमती.. सांग ना गं..! “
मनातील कुपी बंद करत त्या म्हणायच्या,
” आत्ता नाही हं … पुन्हा कधीतरी सांगेन. आत्ता काम आहे गं मला . “
” काम-बीम काही नाही हं..आत्ताच सांग.. हवं तर नंतर आपण दोघी मिळून करू सारी कामं.”
” आणि तुझा अभ्यास ? “
” तो मी करेन ना नंतर.. सांग ना गं ? असं काय करतेस ? “
नणंद रुसायची, फुरंगटून इवलंसं तोंड करून बसायची.. मग मात्र त्यांच्या मनातील कुपी आपोआप उघडायची अन् साऱ्या आठवणी मनभर पसरायच्या..प्राजक्ताची फुलांचा सडा अंगणभर पडावा, पसरावा तशा.
राधाबाई त्या आठवणींच्या फुलांतील एखादे फुल हळूच उचलायच्या आणि नणंदेसमोर ठेवायच्या. फुलाच्या गंधाने त्या गंधभारीत व्हायच्याच पण नणंद तर त्या गंधाने अक्षरशः वेडी होत म्हणायची,
” कित्ती छान आहे ग वहिनी तुझं माहेर ! “
” प्रत्येकीचं माहेर असंच सुंदर असतं गं.. तुझं लग्न होऊन तू सासरी गेलीस की तुलाही तुझं हे माहेर खूपच छान आहे असंच वाटंल.. जाणवंल… प्रत्येक सासुरवाशिणी सारखं.”
” आमी नाय जा.. “
त्यांनी नणंदसमोर लग्नाचा विषय काढल्यामुळे ती लाजून घरात पळून गेली होती..
नणंद लग्न होऊन सासरी गेली आणि राधाबाईंना जास्तच एकटेपणा जाणवू लागला. त्या सासरी आल्यापासून तीन-चार वर्षात त्यांच्यात आणि नणंदेत चांगलेच मैत्रीचे नाते निर्माण झालेले होते.
राधाबाई आणि लेकीच्या विचारात, काळजीत, आठवणीत हरवून गेलेल्या सासूबाई, दिवसभर घरात दोघीच असायच्या. नणंदेच्या सासरी जाण्याने घरातील अवखळपणच, घरातील चैतन्यच हरवून गेले होते.
राधाबाईंच्या मनातील आठवणींच्या कुपीत नणंदेच्या खुपसाऱ्या आठवणी अलगद जाऊन बसलेल्या होत्या. दुपारची सारी कामे झाली की उन्हं चांगली कलती होईपर्यंत विसावाच असायचा. दुपारी सारे आवरून विसवताना मनातली एखादी आठवण कुपीतून सुळक्कन बाहेर यायची, मनात तरंगत रहायची.
एकदा काहीतरी आवराआवर करताना नणंदेच्या हाताला गजग्यांची टोपली लागली. तिला खूप आनंद झाला. ती पळतच राधाबाईंच्याजवळ आली. त्या भाजी निवडत होत्या.. पळत पळत नणंद आली ते पाहून त्यांना नेमकं काय झाले ते समजेना. त्यांनी भाजी बाजूला सारली अन् गडबडीत उभा राहत काळजीने विचारले,
” काय झालं गं ? “
” वहिनी, चल, गजग्यांनी खेळूया ? “
” काsय ? गजग्यांनी ? आणि आत्ता ? “
तिच्या हातात गजगे आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, तिचा उत्साह पाहून त्यांना सानंद आश्चर्य वाटले होते.
” खेळूया ना वहिनी.. कित्ती दिवसात खेळलेलेच नाही मी.. अगं खूप मज्जा येते .. एक्कय..दुक्कय.. तिक्कय खेळताना… चल ना गं. “
खरं तर राधाबाईंच्या मनात माहेरी असताना खेळलेला गजग्यांचा खेळ तरळून गेला. ऐनवेळी गजगे सापडले नाहीत तर बिट्ट्या आणि बिट्ट्या नसतील तर खडे.. दुपारच्या वेळी घराच्या सोप्यात किंवा अंगणात सावलीत जे मिळेल त्याने एक्कय.. दुक्कयचा खेळ रंगायचा. त्यांचे मन त्या आठवणीत रमून गेलं होते.
” खेळूया न वहिनी.. हवं तर फक्त दोनच डाव खेळूया… चल ना गं तिकडे ! “
नणंदेने त्यांचा हात धरून त्यांना परसातल्या आंब्याच्या झाडाकडे ओढतच म्हणले तशा त्या आठवणीतून बाहेर आल्या. त्यांच्या मनाला खेळायची ओढ लागलीच होती त्यात लाडक्या नणंदेचा आग्रह.. त्यांचे ‘ आत्ता नको गं, काम आहे ‘ असा नकार लटका पडला. त्या नणंदेसोबत परसातल्या आंब्याच्या झाडाच्या गार सावलीत गजग्यांचा खेळ मांडून बसल्या.
दोनच डाव खेळायचे असे ठरवून खेळायला बसल्यावर खेळ इतका रंगत गेला की किती डाव झाले आणि किती वेळ झाला याचं भान दोघींनाही उरलं नव्हतं .
‘बाळा, आपलं बायकांचं असंच असतं गं.. रोप एका अंगणात रुजायचं.. वाढायचं.. मोठं व्हायचं.. मग दुसऱ्या कुठल्यातरी अंगणात जाऊन पुन्हा रुजायचं, बहरायचं.. मुळांना नव्या मातीशी, तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणं थोडं कठीण जातं हे खरं… काही क्षण ते रोप कोमेजतं हे ही खरं.. पण तिथल्या मातीशी जुळवून घेता आलं तर मात्र ते चांगलं फोफावतं.. बहरतं.. बहरायचं असलं तर नव्या मातीशी, वातावरणाशी जुळवून घ्यायलाच हवं.. अगं, सुरवातीला थोडं जड गेलं तरी हळू हळू ती माती आपलीच वाटू लागते.. मुळाशी चिकटून आलेल्या जुन्या मातीच्या खुणाही मग वेगळ्या रहात नाहीत, उरत नाहीत.. इथं उगवायचं, वाढायचं आणि तिथं फोफवायचं, बहरायचं..हेच आपणा बायकांचं जीवन असतं हे ध्यानात ठेव पोरी… तिथं गेल्यावर आपणच आपलेंपणा निर्माण करायचा असतो.. हे अंगण चार दिवस पाहुणी म्हणून लाभलेलं.. आपलं खरं अंगण ते तेच असतं..ज्या अंगणात लग्न होऊन जातो तेच अंगण…’
लग्न होईपर्यंत राधाबाईंची आई त्यांना असेच काही-बाही सांगत रहायची. राधाबाई लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आल्या होत्या. सारे बालपण, नव्या नव्हाळीने उमललेले ते अवखळ तारुण्य, ज्या घरात, अंगणात नाचल्या , बागडल्या ते घर, अंगण सारेच वळणाआड गेले.. आणि त्या सासुरवाशीण झाल्या.. पण मनाच्या कुपीत मात्र ते सारे तिकडचे क्षण, भवताल त्यांनी अलगद जपून ठेवलेला होता.
राधाबाई लग्न होऊन या घरात आल्या त्या माहेरच्या आठवणींच्या तळ्यात डुंबतच..घर, माणसे, सारेच परके.. सारंच वेगळं..उपरेपणाची भावना मनाला डाचत होती.. आईचे शब्द मनात रुंजी घालायचे.. आता हेच आपले घर हे त्या मनाला बजावत राहिल्या.. काळ हळुहळु पुढे सरकत राहिला.. तसे सासरचे घर आपले वाटू लागले.. घरातील माणसे आपली वाटू लागली.. मन थोडे थोडे रमू लागले. कामाच्या घबडक्यात माहेरच्या आठवणी नकळत मनातल्या कुपीत कधी गेल्या हे त्यांच्याही लक्षात आले नाही.
घरात तसा जाणा-येणाऱ्यांचा, पाहुण्या-पैंचा रावताच असायचा.. कामाला दिवस अपुराच वाटायचा. त्यांची सासू पण अवतीभवती काहीतरी करत वावरत असायची.. त्यामुळे निवांतपणा , एकटेपणा असा फारसा मिळायचा नाहीच पण कधीतरी एखादया दिवशी दूपारच्या वेळी त्या एकट्याच परसातल्या आंब्याच्या झाडाखाली काहीतरी निवडत बसलेल्या असताना त्यांच्या मनातली आठवणींची कुपी उघडायची.. एखादी माहेरची आठवण हळूच वर यायची..हात ही स्तब्ध व्हायचे.. मन माहेरात पोहोचून त्या आठवणीत रमून जायचे..त्या आठवणीत रमता रमता कुठल्याशा आवाजाने किंवा तसेच मन भानावर यायचे पण भवतालाचे भान हरपून, अवघे माहेर आठवून त्यांच्या डोळ्यांत त्यांच्याही नकळत पाणी दाटलेले असायचे.
“आईची आठवण आली का बाळा ?”
घरातले कुणीतरी वडीलधारे येता येता तिच्या डोळ्यांतील पाणी पाहून आपलेपणाने विचारायचे. कधीतरी सासू तिथे आली तर तिचे मन ओळखून मायेने जवळ घेत विचारायची,
“खूपच आठवण येत असेल तर येतेस का चार दिवस आई-वडिलांना भेटून ?”
कसंनुसं हसत आठवणीतला तो क्षण हळूच मनाच्या कुपीत ठेवून मनाची कुपी त्या बंद करायच्या आणि डोळे पुसत म्हणायच्या,
“नाही, तसे काही नाही. डोळ्यांत काहीतरी गेलं होतं..”
राधाबाईंची सासूही समजूतदार होती. तिलाही असे अचानक डोळ्यांत काहीतरी जाऊन पाणी येण्याचा अनुभव होताच. ती हळुवारपणे राधाबाईंची पाठीवर हात फिरवत म्हणायची,
“तरीही वाटलं कधी माहेरी जावंसं वाटलं चार दिवस तर सांग. सांगीन कुणाला तरी सोडून यायला. याच दिवसात माहेरी जावंसं वाटतं गं…. एकदा का संसाराच्या रामरगाड्यात अडकलं की… आणि अगं आई असते तोवरच माहेर.. नंतर नाही ग उरत काही..”
राधाबाईंना सांगता-समजावताना नकळत सासूबाईंच्या मनातही हरवून गेलेल्या माहेरची आठवण जागी व्हायची मग सुनेला ते जाणवू नये म्हणून त्या झटकन स्वतःचं हळवं झालेलं मन सावरत आत निघून जायच्या.
राधाबाईही डोळ्यांच्या कडा पुन्हा टिपून काम करत राहायच्या.
राधाबाई म्हणाल्या तसे ऋतुजाने चमकून त्यांच्याकडे पाहिले.
आपल्या तोंडून असे वाक्य कसं काय बाहेर पडलं या विचारात असणाऱ्या राधाबाई मनोमन चमकल्या. त्यात सुनेचे म्हणजे ऋतुजाचे असे पाहणे… क्षणभर त्यांच्या मनात भीती तरळून गेली. ऋतुजा पटकन काहीतरी खरमरीतप्रत्युत्तर देऊन आपला अपमान तर करणार नाही ना ? मनात उभा राहिलेल्या या प्रश्नाने त्यांचे अंतर्मन ढवळून निघाले होते.
ऋतुजा काहीच बोलली नाही. क्षणभर ऋतुजाच्या डोळ्यांत त्यांच्याबद्दल, सासूबाईंच्याकडून अनपेक्षित आलेल्या या प्रश्नाबद्दल आश्चर्याचे भाव तरळून गेले होते. त्या असे काही विचारतील, म्हणतील हे ऋतुजाच्या ध्यानी -मनीही नसावे. डोळ्यांतील आश्चर्य क्षणात मावळून त्याची जागा दुःखाने घेतली. तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. काही न बोलताच ती आत निघून गेली.
ऋतुजाने काहीच प्रत्युत्तर केलं नाही हे पाहून राधाबाईंना बरे वाटले. त्यांनी आत जाण्यासाठी वळलेल्या ऋतुजाच्या डोळ्यांतील अश्रू पाहिले आणि त्यांना मनोमन खूप वाईट वाटू लागले.ऋतुजाने अपमान केला नाही यामुळे सुखावलेल्या त्यांना, ‘आपण असे म्हणायला नको होतं .. ‘ असे वाटू लागले. स्वतःच्याच वागण्याबद्दल मनाला चुटपुट लागून राहिली होती. त्यांनी ऋतुजाचा कानोसा घेतला. ती किचनमध्ये जाऊन गॅसजवळ काहीतरी करत होती. आपण तिच्याजवळ जावं.. नकळत आपल्याच बोलण्यामुळे, प्रश्नामुळे निर्माण होऊ घातलेली, झालेली दरी बुजवावी असे त्यांना वाटले .. पण मनाला वाटले तरी त्या उठल्या नाहीत, आत गेल्या नाहीत किंवा तिला हाक मारून बाहेरही बोलावले नाही. तशाच बसून राहिल्या. काही क्षणातच त्या आपल्याच विचारात हरवून गेल्या होत्या.
अवघे अठरावे सरलं आणि त्या त्या कुटुंबात सून म्हणून आल्या होत्या. लग्न ठरायच्या आधीपासूनच त्यांची आई वेळोवेळी त्यांना काहीबाही सांगत होती. कधी काही चुकले , चुकीचे वागले असे आईला वाटले की सूनावत होती. कधी चिडून तर बऱ्याचदा समजुतीच्या स्वरात सुनेने सासरी कसे वागावे, कसे वागू नये हे सांगत होती. तसे त्यांना लहानपणापासूनच ‘ मुलीच्या जातीने असे वागू नये..’ असे त्यांच्या आईने ऐकवलेले होतेच. लहानपणी कधी फटकारलेही होते. अगदी पारंपरिक साच्यात बसवावे तसे त्यांना, त्यांच्या वागण्या-बोलण्या-चालण्याला ‘ मुलीच्या ‘ साच्यात बसवण्याचा प्रयत्न केला होता .. नव्हे प्रयत्नपूर्वक त्यांना त्या साच्यात बसवलेले होते. पिढ्यांनपिढ्यांचा आदर्श , चांगल्या मुलीचा साचा.
लग्न ठरल्या आधीपासूनच आदर्श मुलीच्या साच्यातून त्यांची रवानगी ‘आदर्श सून ‘ या साच्यात झाली होती आणि वेळोवेळी आईचे तेच तेच सांगणे, समजावणे सुरू झाले होते.
‘सासरी जाशील तेंव्हा तिथं इथल्यासारखं वागू नकोस… पटकन कुणाला उलट उत्तर देऊ नकोस, फटकळपणे काही बोलू नकोस.. नाही म्हणजे तुला तशी सवय आहे म्हणून सांगतेय.. कुणी काहीही म्हणालं तरी ऐकून घ्यावं.. उलटून बोलू नये..ते माहेर नाही हे ध्यानात ठेव .. सासूला माझ्याठिकाणी मान.. पण मी काही बोलले की लगेच प्रत्युत्तर देतेस तशी तिथं देऊ नकोस.. मुकाट काही न बोलता ऐकून घ्यायांची सवय हवी गं मुलीच्या जातीला..अगं, कितीही झालं तरी ती आपली सासू असते गं.. समजा काही म्हणाली तरी ऐकून घे.. ऐकून घेतलं की मग भांड्याला भांडं लागत नाही घरात… आणि एक , सर्वांशी मिळून-मिसळून वाग… कुणात दुजाभाव करू नको.. कुणी काही लागट बोललं तर तिथल्या तिथं विसरून जावं.. मनात अढी ठेवू नये..’
कधीतरी त्यांची आई त्यांना सांगायची पण ते स्वतःशीच बोलल्यासारखं असायचे.. काहीसे स्वतःत हरवून गेल्यासारखे.. काहीसे जुन्या आठवणीत गेल्यासारखे.. दुसऱ्याच कुणाचे शब्द आईच्या तोंडून ऐकतेय असे राधाबाईंना वाटायचे. कदाचित आजीने आईला ऐकवलेले.. कदाचित पणजीने आजीला ऐकवलेले..
☆ मनोकामना (भावानुवाद) – श्री भगवन वैद्य ‘प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
या स्टेशनवर गाडी जरा जास्तच थांबत होती. गाडीचे इंजीन इथे बदलले जायचे. `खाली उतरुन काही खायला मिळतं का बघुयात.’
`हो ना! गाडीत आलेल जेवण अगदीच भिकार होतं. पैसे मात्र पुरेपूर वसूल करतात हे लोक!’ डब्यात अशा तर्हेचं बोलणं होत होतं. एवढ्यात दोन मुसंडे बोगीत घुसले.
`मोबाईलवर खाण्याबद्दल तक्रार कुणी केली?’ त्यांच्यापैकी एक जण प्रवाशांकडे गरागरा डोळे फिरवत म्हणाला. `घरात काय फाईव्ह स्टार हॉटेलचं जेवण मागवता काय?’ दुसरा म्हणाला.
`बोला ना! कुणी तक्रार केली? मादर… आमची रोजी-रोटी हिसकवायला बघताय तुम्ही लोक ! टीव्ही नं आमच्यावर इन्क्वायरी लावलीय. बोला, कुणी कंप्लेंट केली?’ पहिला संतापाने किंचाळत म्हणाला.
`मी केली! जेवण अतिशय वाईट होतं. फेकून द्यावं लागलं.’ धोतर, कुडता घातलेला एक वयस्क फौजी म्हणाला. एका मुसंड्याने पुढे येऊन त्याची कॉलर पकडली. दुसर्याने त्याचा हात खेचला आणि त्याला ओढू लागला. `थेरड्या चल खाली! तुला चांगलं जेवण खिलवतो. सगळे जण हबकले. एवढ्यात वरच्या बर्थवर झोपलेले दोन नवयुवक उड्या मारून खाली आले. `त्यांना सोडा. कंप्लेंट आम्ही केलीय.’
`तुम्ही जादा हुशारी दाखवताय काय? तुम्हाला चांगल्या जेवणाची चव चाखवतो.’
`स्साले… त्या टी.टी.ने आम्हाला दंड केला. गाडीत यायचंही बंद केलय. ‘ या दरम्यान आणखी दोन मुसंडे डब्यात शिरले. साईड बर्थवर बसलेले दोन तरुण पुढे येत म्हणाले, `त्यांना सोडा. तक्रार आम्ही केलीय. हवं तर आमचा मोबाईल बघा. ‘
`कंप्लेंट त्यांनी नाही, आम्ही केलीय.’ शेजारच्या बोगीत कॉलेजची हॉकी टीम प्रवास करत होती. `आम्ही वीस प्लेटस मागवल्या होत्या.’ हातात हॉकी स्टीक घेऊन पुढे येत मुले म्हणाली. एकंदर डब्यातलं सगळं वातावरण बघून चारी मुसंडे कुणालाही हात न लावता खाली उतरले.
डब्यातली स्थिती पूर्ववत झाली. केवळ वयस्क फौजी, पाणी भरलेल्या डोळ्यांनी आस-पासच्या युवकांकडे काही काळ बघत राहिले, जशी काही त्यांची मनोकामना पूर्ण झालीय.
मूळ कथा – साध मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ जीवन रंग ☆ विधाता (अनुवादित कथा) ☆ सुश्री सुमती जोशी ☆
वाघांचा फार त्रास होता. लोक अस्वस्थ झाले. गायीगुरं, माणसांपर्यंत सगळी वाघाच्या तावडीत सापडून मारली जाऊ लागली. तेव्हा सगळ्यांनी लाठ्याकाठ्या, बंदुका बाहेर काढून वाघाला यमसदनाला पाठवलं. एक वाघ मेला पण दुसरा आला. शेवटी माणसाने विधात्यापाशी एक निवेदन सादर केलं –
“देवा, वाघांच्या तावडीतून आमचं रक्षण कर.”
विधाता म्हणाला, “ठीक आहे.”
काही दिवसांनी विधात्याच्या दरबारात येऊन वाघांनी तक्रार नोंदवली, “माणसांमुळे आमच्या जीवाला धोका निर्माण झालाय. जीव वाचवण्यासाठी एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जावं लागतं. शिकारी आम्हाला शांतपणे जगू देत नाहीत. याचा काहीतरी बंदोबस्त करा.”
विधाता म्हणाला, “ठीक आहे.”
तेवढयात नेडाच्या आईने विधात्यापाशी मागणं मागितलं, “देवा, माझ्या नेडाला सुंदर बायको मिळवून दे. मी तुला पाच पैशांचे साखरफुटाणे देईन.”
विधाता म्हणाला, “होय.”
हरिहर भट्टाचार्य खटला करायला निघाला होता. विधात्याला उद्देशून तो म्हणाला, “आयुष्यभर तुझी पूजा करत आलोय. उपवास करून देह शिणवलाय. मेहुणा आणि भाच्याला मला धडा शिकवायचा आहे. तुम्ही मला मदत करा.”
विधाता म्हणाला, “अवश्य करीन.”
सुशीलची परीक्षा होती. तो रोज विधात्याला म्हणत असे, “देवा. मला पास कर.” आज तो म्हणाला, “देवा, मला जर स्कॉलरशिप मिळवून दिलीत तर पाच रुपये खर्च करून मी महाप्रसाद करीन.”
विधाता म्हणाला, “चालेल.”
हरेनला कायस्थ डीस्ट्रिक्ट बोर्डाचं चेअरमन व्हायचं होतं. कालीच्या पुजाऱ्यांमार्फत त्यांनी विधात्याची मनधरणी केली, “मला अकरा मतं मिळायला हवीत.” काली पुरोहिताने भरपूर दक्षिणा वसूल करून संस्कृत मंत्र म्हणून विधात्याला भंडावून सोडलं. ‘व्होटम् देही… व्होटम् देही…’
विधाता म्हणाला, “मिळतील, मिळतील.”
शेतकरी हात जोडून म्हणाला, “देवा, पाणी दे.”
विधाता म्हणाला, “देतो.”
आजारी बालकाची माता देवाला म्हणाली, “मला एकुलता एक मुलगा आहे. देवा, त्याला दीर्घायुषी कर.”
विधाता म्हणाला, “ठीक आहे.”
शेजारी राहणारी म्हातारी आत्या वर नमूद केलेल्या मातेच्या संदर्भात म्हणाली, “देवा, मागी फार मिजाशीत असते. रोज नवनवीन दागिने घालून मिरवत असते. हे दयाघना, पोराचा घसा पकडलायत हे फार छान केलंयत. मागीला थोडी शिक्षा होऊ द्या.”
विधाता म्हणाला, “करतो.”
तत्त्वज्ञ म्हणाला, “हे देवा, तू कसा आहेस हे मला समजून घ्यायचंय.”
विधाता म्हणाला, “ठीक आहे.”
चीन देशातून चित्कार ऐकू आला, “देवा, या जपान्यांपासून वाचवा.”
विधाता म्हणाला, “वाचवतो.”
बांगला देशातला एक तरुण धरणं धरून बसला, “कोणताही संपादक माझं लेखन छापत नाही. ‘प्रवासी’ मासिकात माझं लेखन छापून यावं अशी माझी इच्छा आहे. रामानंदबाबूंना कृपा करायला सांगा.”
विधाता म्हणाला, “ठीक आहे.”
जराशी सवड मिळाल्याबरोबर विधाता पाठीमागे उभ्या असलेल्या ब्रह्माला म्हणाला, “आपल्या घरी सरसूचं शुद्ध तेल आहे का?”
ब्रह्मा म्हणाला, “आहे. कशाला हवंय?”
विधाता म्हणाला, “मला हवंय. द्याल का?”
ब्रह्मा म्हणाला, “अवश्य, अवश्य.”
ब्रह्माच्या घरून सरसूचं शुद्ध तेल मिळालं. ताबडतोब त्या तेलाचे दोन थेंब नाकात घालून विधाता निद्राधीन झाला.
त्या गाढ झोपेतून तो अजूनही उठला नाही.
श्री वनफूल यांनी लिहिलेल्या ‘विधाता’ या बंगाली कथेचा भावानुवाद.
प्रिया आणि प्रथमेशचं लग्न झालं. प्रेम विवाह असल्याने जास्तच दणक्यात झालं. नातेवाईक, मित्रपरिवार सगळे जण मिळून 70-75 माणसे प्रकाश व प्रगती जाधवांच्याकडे चार दिवस रहायलाच होती. सासर त्याच गावात असलं तरी ते दोघं IT engineer असल्याने बेंगलोर ला रहाणार होते. त्यांना लगेचच तिकडे जायचे होते.
लग्नाआधी मेंदी, हळद, संगीत वगैरे सर्व हौसेनं आणि मजेत झालं. दुसरे दिवशी प्रियाच्या सासरी सत्यनारायणाची पूजा होती, त्यांनी तिच्या माहेरच्या सर्वांना बोलवलं होतं. पूजेच्या दुस-याच दिवशी प्रिया प्रथमेश तिच्या माहेरी येऊन लगेचच बेंगलोरला जाणार होते.
घरातले सर्व नातलग अजून निघायचेच होते परत. प्रिया लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी येणार म्हणून सगळेजण तयारी करून वाट बघत होते. तितक्यात टीव्हीवर breaking news आली. सर्व देशात लाॅकडाऊन जाहीर केले होते. कोविड 19 महामारीने हळूहळू देशभरात कब्जा केला. सावधगिरी आणि सुरक्षिततेची खबरदारी अत्यावश्यक आहे, हे जाणून पंतप्रधानांनी लगेच काटेकोरपणे आदेश दिले होते. सतत बातम्या येत होत्या. पण चिंताजनक परिस्थिती इतकी वा-यासारखी फैलावेल, अशी कल्पनाही नव्हती.
लाॅकडाऊन झाल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले. वाहतूक बंद केली गेली. सर्व काही जिथल्या तिथे थांबले. सगळा देश गोंधळलेल्या आणि घाबरलेल्या अवस्थेत होता. टीव्ही वरच्या बातम्यांनी भीतीत आणखी भर पडत होती. लाॅकडाऊन मुळे आलेल्या पाहुण्यांना तिथेच रहावे लागले. लग्नघरात जवळ जवळ 50-55 लोक एकाच ठिकाणी अडकून राहिले. त्यात वीस पंचवीस स्त्रिया, आठ-दहा मुले, आणि बाकीचे पुरुष असा गोतावळा होता. त्यात लग्नाच्या चार दिवसासाठी नेमलेला स्वयंपाकी ही होता. त्यालाच पुढे काही दिवस काम चालू ठेवायला सांगितलं. कारण तो शेजारच्या गावचा असल्याने त्याला तिथेच रहावे लागले.
दोन दिवस असेच संभ्रमात गेले. नंतर मात्र परिस्थितीचं गांभीर्य जाणवू लागलं. नातलगांना सुद्धा पाहुण्यांच्या घरात रहाणे अवघड वाटू लागले. पण दुसरा उपायच नव्हता ना!
तेव्हा प्रियाच्या बाबांनी सर्वांना आधार दिला. ” परिस्थितीच अशी निर्माण झाली आहे, त्यामुळे सर्वजण मनात अवघडलेपण न धरता शांतपणे रहा. ही वेळ एकमेकांना आधार देण्याची आणि सावधगिरी बाळगण्याची आहे. आपणही सर्वजण योग्य त्या खबरदारी घेऊन राहू या ” . प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून कामे वाटून घेतली. आर्थिक भारही उचलला. मनात भीती होतीच, एकत्र रहाण्यातही आनंद होता. आठ दिवस, पंधरा दिवस, महिना गेला, पण लाॅकडाऊन उठण्याची काही चिन्हे दिसत नव्हती.
घरातल्या बायका स्वयंपाक घरात मग्न होत्या. पुरूष ही अनेक कामात मदत करत होते. लहान मुलांची मज्जा होती . खाऊ आणि खेळू!
प्रियाची आई स्वयंपाक घरात सर्व देखभाल स्वतः करत होती. तिची भाची, चुलत भावाची मुलगी, (जो भाऊ कोल्हापुरजवळच्या नागर गावात रहात होता, ) मदत करत होती. ती जन्मतः च मुकी होती. तिचं नाव मुग्धा. पन्नाशीला आली होती. कामात हुशार. तब्येत ठणठणीत. नेहमी हसतमुख असे.
प्रियाचे बाबा सगळीकडे लक्ष ठेवून होते. त्यांच्या अनुभवी नजरेनं एक गोष्ट हेरली, प्रियाचा मामेभाऊ अश्विन आणि प्रियाच्या आत्याची नणंद रोमा यांची जास्तच मैत्री झाली आहे. मैत्रीच्या पुढचं पाऊल आहे हे जाणवलं होतं त्यांना..प्रियाच्या मामीलाही शंका आलीच होती. प्रकरण मामा मामी आणि आत्या काका यांच्या चौकटीत प्रविष्ट झालं.
तर दुसरीकडे प्रियाची धाकटी आत्या मीना, जी बॅकेत नोकरी करत होती, तिच्या अति हट्टीपणा आणि अटींमुळे तिचे लग्न लांबले होते. चाळीशी ओलांडली होती. प्रियाचं लग्न झालं , आता तरी आपलेही लग्न व्हावे, ही प्रबळ इच्छा तिच्या मनात निर्माण झाली. आणि काय योगायोग ? तिची ओळख महेश शी झाली. महेश हा प्रकाश जाधवांच्या मित्राचा मुलगा, प्रियाच्या लग्नाला आला होता. काही कारणाने तोही वयाच्या चाळीशी पर्यंत अविवाहित राहिला होता. मीनाच्या आणि त्याच्या ओळखीचं रूपांतर विवाह बंधनाच्या समजूतदारपणात झालं. मीनानं आपल्या वहिनीला, प्रगतीला मनातलं सांगितलं. ते तिच्या भावापर्यंत पोचवायचं काम प्रियाच्या आईनं वेळ बघून केलं. प्रकाश नी महेशच्या वडिलांना फोनवर बोलून कल्पना दिली. लाॅकडाऊन जरासं शिथिल झाल्याबरोबर येतो म्हणाले.
घरात आता लाॅकडाऊन रूटीन पद्धतीने कामे होत होती. दुपारच्या जेवणानंतर पत्ते, कॅरम, बुद्धिबळ यांचे डाव रंगू लागले. दिवसें दिवस कोरोना केसेस वाढत होत्या. पण इथे प्रकाश आणि त्यांचे मोठे काका चिंतन यांनी अतिशय काळजीपूर्वक घराचे व्यवस्थापन सांभाळले. मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करणे, स्वच्छता, सुरक्षित अंतर राखणे या बाबतीत डोळ्यात तेल घालून काळजी घेतली. चिंतनकाका हल्लीच निवृत्त झाले होते. मुंबईत रहात होते. प्रकाशनी खूप आग्रह धरला म्हणून ते प्रियाच्या लग्नाला आले होते. साठाव्या वर्षीही अतिशय स्मार्ट आणि तरतरीत होते.लग्नघरातल्या सर्व ञकार्याची जबाबदारी त्यांनी आपणहून स्वीकारली आणि नियोजनबद्धतेने पार पाडली. प्रियाची आई म्हणाली,
” काका, प्रियाचं लग्न इतकं छान पार पडण्यात तुमचा फार मोलाचा हातभार आहे हं! तुम्ही आलात म्हणून छान वाटले. खूप खूप धन्यवाद. ” सर्वांनी मनापासून त्यांना दुजोरा दिला. तेव्हा काकांच्या डोळ्यातले पाणी प्रियाच्या बाबांच्या आणि आईच्या नजरेतून सुटले नाही. गरीबी मुळे काकांचे लग्न होऊ शकले नाही. इतर जबाबदा-याही होत्या. पण आता आर्थिक परिस्थिती ही छान होती. स्वतःचे घर होते. दुसरेच दिवशी प्रियाच्या आईवडिलांनी आपसात काही वाटाघाटी करून चिंतनकाकांशी विचारविनिमय केला. आई मुग्धाशी बोलली, अचानक समोर आलेल्या प्रस्तावामुळे ती गडबडून गेली. प्रिया च्या आईने मुग्धा च्या वडिलांशी फोनवरुन संपर्क करून ” ही संधी सोडायची नाही ” असा विचार स्पष्ट केला. मुग्धा चे वडील चिंतनला ओळखत होते. त्यामुळे बहिणीवर विश्वास ठेवून मान्य केले.
प्रियाच्या लग्नाचा मांडव अजून तसाच होता. या शुभशकुनी मांडवाने आणखी तीन लग्नघरांच्या दारी तोरण बांधले.
लाॅकडाऊन ने माणसांना स्वतःकडे लक्ष द्यायला शिकवलेच, पण स्वतःला ओळखून गरजेइतकंच आणि उपलब्ध आहे त्यात आनंद मानून सुखी समाधानी होण्याचं तंत्रही शिकवलं. वर्षोनूवर्ष डोक्यात नको ते अहंगंड घेऊन आलेल्या सुखाला डावलणारी मने लाॅकडाऊन च्या परिस्थितीमुळे स्वच्छ झाली.
लाॅकडाऊन उठण्याबरोबर तिन्ही लग्न मर्यादित व-हाडासमवेत पार पडली.
अश्विन आणि रोमा, मीना आणि महेश, चिंतन आणि मुग्धा यांच्या पाठोपाठ लग्नाबरोबरच प्रकाश आणि प्रगती च्या लग्नाचा 25 वा वाढदिवस समारंभ तितक्याच मजेत साजरा झाला.
☆ [1] महात्मा ! [2] बुद्धीबळ – गे म ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक☆
“अलक” या प्रकारात कथा लिहायचा प्रथमच प्रयत्न करतोय !?
अलक – १
[1] महात्मा !
भली मोठी पांढरी शुभ्र मरसिडीज, महाराजांच्या बंड गार्डन रोडवरील राजवाड्या सदृश मठाच्या दारात थांबली. शोफरने धावत येवून दार उघडलं. आतून पांढऱ्या शुभ्र कपड्यातील व्यक्ती श्रीमंतीच्या सगळ्या खुणा दाखवत उतरली. महाराजांचे रोजचे प्रवचन, देशी विदेशी भक्तांच्या भरगच्च दरबारात चालू होते. ती व्यक्ती अदबीनं महाराजांच्या पाया पडली. खिशातून पाचशेच्या नोटांच कोरे बंडल काढले आणि महाराजांच्या पायाशी ठेवले. थोडावेळ खाली बसून प्रवचनाचा लाभ घेऊन परत नमस्कार करून मठाच्या बाहेर पडून गाडीतून निघून गेली. एक महिनाभर हा प्रकार सलग चालल्यावर, एक दिवस ती व्यक्ती बाहेर पडताच, महाराजांनी त्यांच्या सुखदेव नावाच्या खास शिष्याला खूण केली.
“महाराज त्यांचे नांव अनिरुद्ध महात्मे. पुण्यात ‘पुण्यात्मा’ नावाची त्यांची स्वतःची IT फर्म आहे.” “उद्या त्यांची आणि माझी भेट माझ्या खाजगी दालनात अरेंज करा.”
“नमस्कार महाराज, काय सेवा करू?” “नमस्कार महात्मे! आम्ही बघतोय, गेले महिनाभर तुम्ही आमच्या समोर रोज पाचशेच्या नोटांच कोरं बंडल…..” “महाराज, गत आयुष्यात केलेल्या पापांच थोड तरी परिमार्जन व्हावे या एकाच हेतूने हे करतोय!” “नाही पण तुमच्या business मध्ये इतका पैसा ?” “महाराज, आपल्या पासून काय लपवणार! अनेक नेते मंडळी आणि उद्योगपती यांची स्विस बँकेतली खाती पण मेन्टेन करतोय महाराज! तो पण माझा एक business च आहे, पण तो उघडपणे…..” “समजलं महात्मे ! आमच्याकडे सुद्धा अनेक चलनात अगणित रोख रक्कम……” “कळलं महाराज, आपण चिंता करू नका, फक्त आज्ञा द्या !” “महात्मे, उद्या सकाळी मला इथेच भेटा आणि ‘त्या’ सगळ्याची व्यवस्था स्विस बँकेत कशी लावता येईल ते पहा!” “जरूर महाराज ! उद्या सकाळी हा बंदा सेवेला हजर असेल !”
“सुखदेव, गेला आठवडाभर महात्मेची रोजची भेट बंद झाल्ये.” “होय महाराज” “सुखदेव, त्यांचा काही निरोप ?” “काहीच नाही महाराज.” “ठीक आहे. उद्या त्यांच्या IT फर्मला भेट द्या.” “होय महाराज.”
“महाराज त्यांच्या फर्मला टाळं आहे.” “काय ssss ?” “होय महाराज, अनिरुद्ध महात्मेनी फर्मची ती जागा तीन महिन्यासाठी भाड्याने घेतली होती, असं चौकशी करता कळलं.”
प्रमोद वामन वर्तक
३०-०८-२०२१
अलक – २
[2] बुद्धीबळ – गे म !
“हॅल्लो, सुखविंदर, दिल्लीला तुम्ही सगळे कसे आहात?” “हॅल्लो बलबिंदर, आम्ही दिल्लीला मस्त ! आज संध्याकाळी गेम खेळू या का ?” “चालेल”
संध्याकाळी बलबिंदरने मुंबईला आणि सुखविंदरने दिल्लीला आपापले लॅपटॉप उघडले ! त्यात आधीच, “ऑटो मूव्ह” करून “फिड” करून ठेवलेला व त्यांनी अनेक वेळा खेळलेला, एकच “बुद्धिबळाचा” गेम पुन्हा स्क्रीनवर पहायला सुरुवात केली !
प्रमोद वामन वर्तक
०१-०९-२०२१
श्री प्रमोद वामन वर्तक
(सिंगापूर) +6594708959
मो – 9892561086
ई-मेल – pradnyavartak3@gmail.com
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
(पूर्वसूत्र – आदल्या रात्री बटाट्याच्या काचर्या, ब्रेकफास्टला बटाटेवडे आणि आता बटाट्याचा रस्सा. त्याचे सहकारी शांतपणे जेवण वाढण्याची तयारी करत होते. कोणीच काही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. टूरिस्टही सगळा आनंद न् उत्साह हरवून बसले होते. वातावरणात एक विचित्र ताण जाणवत होता. जेवण संपताच एक वयस्कर प्रवासी बोलायला उठून उभे राहिले.)
“मंदार, आम्हा २४ जणांपैकी दहा जण जास्तीचे पैसे द्यायला तयार आहेत. तू हिशोब कर, आम्हाला एक आकडा सांग. पुण्याला परतल्यावर मात्र तू स्वतः दिलेला शब्द पाळ.” त्यांनी सांगितले. मंदारला हे सगळं अनपेक्षित होतं. त्याने दोन्ही हात जोडून त्यांना नम्रपणे नमस्कार केला. मळभ भरुन आलं तसं क्षणार्धात विरुनही गेलं. टूरिस्टसनी दाखवलेल्या समंजसपणामुळे, त्यांच्या सहकार्यामुळे उरलेली टूर छान पार पडली.
पुण्यात रात्री उतरल्यावर त्याने त्या दहा प्रवाशांना दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता आॅफिसमधे यायला सांगितलं.तो स्वत: नऊ वाजताच ऑफीसला पोचला. नानूभाई आजच परत आले होते. तो केबिनमध्ये गेला. तिथे नानूभाईंसमोर त्यांचे चिरंजीवही होते.
“मंदार..?” मंदारला पहाताच नानूभाईंनी सूचकपणे आपल्या चिरंजीवांकडे पाहिले. आधी ठरल्याप्रमाणे पैसे न आल्यामुळे झालेली गैरसोय आणि टूरिस्टना विश्वासात घेऊन आपण अडचणीतून कसा मार्ग काढला हे मंदारने सविस्तर सांगितलं. नानूभाई शांतपणे ऐकून घेत होते.
“ते दहा टूरिस्ट आत्ता दहा वाजता इथे येणार आहेत. तेव्हा त्यांचे पैसे परत द्यावे लागतील ” मंदार म्हणाला. हे ऐकताच चिरंजीव एकदम संतापलेच.
“त्या दहा जणांना आत्ताची वेळ दिलीयस? कुणाला विचारुन? आणि कशासाठी बोलावले आहेस?”
“कशासाठी म्हणजे? त्यांचे पैसे परत करायला नकोत का?”
“हे तुम्ही विचारताय मला? तुम्ही दिलेल्या आश्वासनानुसार चार दिवसांनी तुम्ही पैसे पाठवायला हवे होतेत. पाठवलेत? मी फोन केला तेव्हा बंगल्यावर फोन करुन मॅडमशी बोलायला सांगितलंत. त्यानी मला रात्री उशीरा फोन करायला सांगितलं. मी तसा फोन केला तेव्हा तो त्यांनी उचललाही नव्हता. मी सरांना फोन केला, तो नो रिप्लाय लागला. अशा परिस्थितीत काय करायला हवं होतं मी ? कंपनीचं हित लक्षात घेऊन, कंपनीचं प्रेस्टीज सांभाळणं आणि टूरिस्टना योग्य सर्व्हिस देणं माझं कर्तव्य होतं. मी तेच केलं.”
“व्हाॅट नाॅन्सेस. कंपनीचं हित पहायला आम्ही मालक समर्थ आहोत. दिलेल्या पैशात काटकसर केली असतीस तर सात दिवस सहज निभावले असते.”
“पण का करायची काटकसर ? त्या सर्वांकडून पूर्ण रक्कम आपण आगाऊ वसूल केलीय ना आपण? त्या बदल्यात ज्या ज्या सोयी आणि सेवा आपण प्रॉमिस केल्यात त्या त्यांना द्यायला हव्यातच ना?”
“ते शहाणपण तू मला शिकवू नकोस. त्यांना द्यायच्या सेवेचं निमित्त सांगून त्यांच्याबरोबर तसंच चमचमीत आणि गोडधोड ओरपायला सोकावलायत तुम्ही सगळे. काटकसर कशी न् कुठे करायची शिकवायलाच हवंय तुम्हा सर्वाना..”
त्यांच्या बेजबाबदार शब्दांमधला शेवटचा घाव मात्र मंदारच्या वर्मी लागला.
“मी काय बोलू यावर?” त्याने हतबलपणे नानूभाईंकडे पाहिलं. नानूभाईंनी त्याची नजर चुकवली. चिरंजीव खुर्ची मागे ढकलून तणतणत उठून निघून गेले. आता फक्त नानूभाई काय बोलतात ते ऐकायला मंदारचे कान आतुर झालेले होते.
“ती मंडळी आली की आत पाठव. मी त्यांच्याशी बोलतो.” एवढेच बोलून नानूभाई खाली बघून कांही लिहू लागले.
मंदार घुटमळला. मग न बोलता बाहेर आला. नानूभाई कोणते खरे न् कोणते खोटे त्याला समजेचना. आता क्षणार्धात ते सर्वजण येतील. त्यांना नानूभाईंकडे घेऊन जाऊन त्यांची ओळख करुन देण्यापलिकडे आपल्या हातात कांहीच नाहीय या विचाराने तो हतबल झाला. पण लगेच त्याने स्वतःला सावरलं. कांही झालं तरी त्यांना न्याय मिळायलाच हवा असं त्याला तिव्रतेने वाटलं तेवढ्यात..
“मंदाsर…”
नानूभाईंच्या चिरंजीवांच्या हाकेने तो भानावर आला. त्याला खरंतर आत्ता या क्षणी त्या माणसाचं तोंड बघायचीही इच्छा नव्हती. पण नाईलाजाने तो पुढे झाला.
“हे बघ मंदार,चार दिवसांनी शिमला-कुलू-मनाली टूर आहे. हा त्याचा फायनल प्लॅन. आज रेस्ट घे न् उद्या सकाळी नऊच्या मिटिंगला हजर रहा “
मंदारला आता इथे गुंतून पडावंसं वाटेचना.
“नाही सर, नको. इथे या पद्धतीने काम करण्यात मला आता अजिबात स्वारस्य नाहीय”
“तू हे असं अचानक कसं काय सांगू शकतोस?”
“इथे बऱ्याच गोष्टी अचानकच घडताहेत सर. त्यावरची माझी ही प्रतिक्रिया समजा”
”ठीक आहे. तुझी मर्जी. तू गेलास तर बाहेर शंभरजणं क्यू लावून उभे रहातील हे लक्षात ठेव.”
त्याला झिडकारुन चिरंजीव बाहेर निघून गेले. पण मंदार मात्र शांतपणे तिथंच बसून राहिला. आपण बोललो ते योग्य की अयोग्य या संभ्रमात तो अस्वस्थ असतानाच ते दहा प्रवासी आत आले. मंदारने कांहीच न घडल्यासारखं त्यांचं हसतमुखाने स्वागत केलं. त्यांना घेऊन तो नानूभाईंकडे गेला.
नानूभाईनी प्रथम त्या सर्वांना धन्यवाद देऊन मनापासून दिलगिरी व्यक्त केली. त्यांचे बँक अकाउंट नंबर्स लिहून घेतले. चार दिवसात त्यावर त्यांनी ज्यादा भरलेल्या पैशांचे चेक जमा होतील असे आश्वासन दिले. कंपनीसमोर अकस्मात आलेल्या काही तांत्रिक अडचणी सांगून त्यांचं समाधान करायचा प्रयत्न मंदारला खरंच खूप केविलवाणा वाटत राहिला.
सांगितल्याप्रमाणे रोख पैसे न मिळाल्याने कांहीशा नाराजीने ते दहा जण परत गेले. त्यांना निरोप देताना मंदारला स्वत:लाच अपराधी वाटत राहिलं. तो खूप अस्वस्थ झाला. देवधरांचे फोनवरचे बोल त्याच्या मनात घुमू लागले. नानूभाईंचे चिरंजीव त्याला वाटेल तसं घालून पाडून बोलत असताना नानूभाईंनी दाखवलेली उदासीनता त्याच्या हृदयाला चरे पाडू लागली. अपेक्षाभंगाची ही भळभळती जखम घेऊनच त्याने राजीनामा खरडला. तेवढ्यांत नानूभाई बाहेर आले. त्याला तिथेच थांबलेला पाहून नानूभाईना आश्चर्य वाटलं. मंदारच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता त्यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी त्याला केबीनमधे बोलावलं. समोर बसायला सांगितलं
“मंदार, तू केलंस ते त्या परिस्थितीत योग्यच होतं. पण इथेही काही प्रॉब्लेम्स असतात. त्याचा डोक्याला ताप होतो. तुला त्याने इतकं संतापून बोलायला नको होतं. स्वभावाला औषध नाही हेच खरं. तो संतापाच्या भरात कांही उलटसुलट बोलला तर तू मनावर घेऊ नकोस.”
त्यांचा हतबल स्वर स्पष्ट न बोलताही बरंच कांही सांगू पहात होता असंच मंदारला वाटत राहिलं.
“सर, टूरवरचं आम्हा सर्व स्टाफचं जगणं किती जिकिरीचं असतं हे मी वेगळं सांगायला नकोय. आम्हाला कौतुक, प्रोत्साहन नाही पण उभारी देणारे दोन शब्द तरी हवेतच ना? आपला काहीही दोष नसताना यापुढे हे असं ऐकून घेणं मला फार अवघड वाटतंय. प्लीज मला माफ करा.” असं म्हणून त्याने आपलं राजीनामापत्र त्यांच्यापुढं ठेवलं. नानूभाईनी त्यावरुन नजर फिरवली. त्यांच्या नजरेतली अस्वस्थता मंदारला स्पष्ट जाणवली.
“हा निर्णय घ्यायला तू थोडी घाई करतोय असं नाही वाटत?”
तो काहीच बोलला नाही. गप्प उभा राहिला. नानूभाईनी क्षणभर वाट पाहिली. मग कसनुसं हसले.
“ठिकाय. पण एक कर. बाहेर काळेंकडे जाऊन तुझे राहिलेले सगळे पेमेंट घे आधी. मी त्यांना फोन करुन सांगतो”
तो परत आला तेव्हा नानूभाईनी एक बंद पाकीट त्याच्या हातात दिलं.
” हे काय?”
“जे तुला आत्ताच आणि मीच द्यायला हवं. मी दिलेली सदिच्छा भेट समज.घे.”
त्याने पाकीट घेऊन त्यांना नमस्कार केला.
“अरे, उघडून तरी बघ.” ते म्हणाले. त्याने उघडलं तर आत कंपनीच्या लेटरहेडवर नानूभाईंच्या सही-शिक्क्यासह मंदारचं कौतुक करणारं, त्यांनी दिलेलं ते ‘ एक्सपिरीयन्स- सर्टिफिकेट ‘ होतं..! तो अविश्वासाने त्यांच्याकडे पहातच राहिला. पुन्हा एकदा तो नमस्कारासाठी वाकला तेव्हा त्याच्या डोक्यावर हात ठेवून नानुभाई म्हणाले, ‘शुभास्ते पंथानः संतु’ त्याला गलबलून आलं. त्यांची अवस्थाही फारशी वेगळी नव्हती. निरोपाचा क्षण आला होता पण आता मनात खेद खंत यांना थारा नव्हता. दोघांनीही न बोलता एकमेकांना समजून घेतलं होतं..!
नानूभाईंचं प्रशस्तीपत्र आज या क्षेत्रात लाख-मोलाचं होतं. ही सदिच्छांची शिदोरी घेऊन तो ताठ मानेनं बाहेर पडला. या क्षेत्रातली सोनेरी भविष्याची स्वप्ने मनात तरळत असतानाच पुढील प्रवासास तो सिद्ध झाला .
(पूर्वसूत्र – “रेल्वे, फ्लाईटस्, हॉटेल्स् सगळी बुकिंग आधीच झालीयत. प्रश्न फक्त दैनंदिन खर्चाचा आहे. पूर्ण खर्चाचे सगळे पैसे एकरकमी कशासाठी हवेत? आता एवढीच रक्कम मिळेल. बाकी वेळोवेळी पाठवले जातील. आता यावर वाद नकोय” बूट वाजवीत नानूभाईंचे चिरंजीव निघून गेले. काय करावं त्याला समजेचना. या परिस्थितीत आता नानूभाई हा एकच दिलासा होता. पण…? )
तो पुन्हा नानूभाईंकडे गेला. ते ऑफिसमधे नव्हते. दुसऱ्या दिवशी पहाटेच टूर सुरू होणार होती. टूरमॅनेजर म्हणून हे काळजीचं सावट त्याला अस्वस्थ करीत होतं. मन चिंती ते वैरी न चिंती अशी त्याची अवस्था झाली होती. कदाचित हे सगळे आपल्याच मनाचे खेळ असतील असंही त्याला वाटलं. सगळं सुरळीत होईल. ‘मनमुराद’ ही टुरिझम क्षेत्रातली एवढी नावाजलेली कंपनी. मग काळजी कसली? सगळं सुरळीत होईल. त्याने स्वतःचीच समजूत घातली. मनातली कोळीष्टकं झटकून टाकली. शांतपणे अंथरुणावर पाठ टेकली. पण अर्धवट झोपेत मनात विचार होते ते या अस्वस्थतेचेच…!
फ्लाईटची रिझर्वेशन्स असलेले दहा टुरिस्ट परस्परच येणार होते.उरलेले १४ जण आणि किचन स्टाफ येण्यापूर्वीच मंदार स्टेशनवर पोहोचला. प्रवास विनाविघ्न सुरु झाला.
मुक्कामाच्या पहिल्या रात्री जेवणे आटोपताच परस्परांच्या ओळखींचा कार्यक्रम खेळीमेळीत पार पडला. मंदारने सर्वांचे हसतमुखाने स्वागत केले. दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची रूपरेषा सर्वांना समजावून सांगितली. परस्परांचा निरोप घेऊन सर्वजण आपापल्या रूम्समधे गेले. सर्व स्टाफची जेवणेही आवरली. त्यांची झाकपाक सुरू होताच मंदार स्वतःच्या रुमवर आला आणि काल रात्रीपासून मनात दाबून ठेवलेल्या असंख्य विचारांनी तो थोडा साशंक झाला. त्याला अचानक देवधरांची आठवण झाली. ‘त्यांना फोन लावावा का ? सगळा वृत्तांत सांगून त्यांचा सल्ला घेतला तर?..’ देवधर त्याच्यापेक्षा खूप सिनियर होते. अडचण निर्माण झाल्यानंतर मार्ग शोधण्यापेक्षा आत्ताच त्यांच्याशी बोलणंच योग्य राहिल असा विचार करून त्याने देवधरांना फोन लावला.
सगळं ऐकून देवधर क्षणभर गप्प राहिले.
“तुला एका वाक्यात सांगायचं तर सध्या ‘मनमुराद’ ही बुडती नैय्या आहे मंदार.” हे ऐकून मंदारच्या पायाखालची जमीनच सरकली. “एक लक्षात ठेव. नानूभाईंनी अपार कष्टाने आणि सचोटीने ‘मनमुराद’ उभी केलीय आणि सांभाळलीय. ते सर्वेसर्वा होते तेव्हा कामात समाधान होतं. ‘मनमुराद’ हे तिथं काम करणाऱ्यांसाठी एक आनंदी कुटुंबच होतं. आता नानूभाईही थकलेत.त्यामुळे बरीचशी सूत्रं त्यांच्या चिरंजीवांच्या हाती गेलीयत.तेव्हापासून तिथं सगळं विपरीतच घडत चाललंय.चोर सोडून संन्याशाला फाशी असा सगळा मामला आहे. अरे शेवटच्या दोन-तीन महिन्यात माझा पगारही त्याला डोईजड वाटायला लागला होता.वेळीच सावध होऊन बाहेर पडताना मलाही वाईट वाटत होतं पण व्यवहार आणि भावना यांची सांगड घालणं आवश्यकच होतं.मी तेच केलं. तू एक लक्षात ठेव. टूरिस्टसना या कशाशी कांहीही देणंघेणं नसतं. तू कंपनीचा मालक नाहीयेस तर कंपनी आणि टुरिस्ट यांच्यामधला विश्वासू दुवा आहेस. तो विश्वास जप.टुरिस्ट दुखावणार नाहीत हे बघणं ही तुझी प्राथमिकता असू दे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस. त्यादृष्टीने अतिशय विचारपूर्वक प्रत्येक निर्णय घे.”
मंदारला शुभेच्छा देऊन त्यांनी फोन ठेवला. मंदारच्या मनात कालवाकालव सुरू झाली. नानूभाईंचाही आता त्याला आधार वाटेना. डोळ्यांसमोर तरळत जाणाऱ्या त्यांच्या चिरंजीवांच्या लांबलचक गाड्या, खर्चिक रहाणीमान आज प्रथमच त्याला खटकू लागलं. त्याही परिस्थितीत काहीही विपरीत घडलं तरी परतीची दारं आता आपल्यासाठी बंद झालेली आहेत या जाणिवेने तो चपापला.पण क्षणभरच. अखेर हे त्याने शांतपणे स्वीकारलं. ‘कांही अडचण आलीच तर आपण नानूभाईना फोन करु. ते आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाहीत नक्कीच ‘ त्याने विचार केला आणि तो येईल त्या प्रसंगाला सामोरं जायला सज्ज झाला.
दुसऱ्या दिवशी त्याने रुटीन सुरू केलं ते काहीच घडलं नाही असं दाखवतच.त्यानं ठरवलंच होतं की चौथ्या दिवशी रक्कम येणार हे गृहीत धरूनच आपण नेहमीसारखं सगळं पार पाडायचं. प्रवाशांना कसलीही शंका येता कामा नये याची काळजी घ्यायची.
सुखद हवामान, अप्रतिम निसर्ग-सौंदर्य न् ‘मनमुराद’चं अगत्यशील आदरातिथ्य यामुळे पहिले तीन दिवस तरी छान गेले. चौथ्या दिवशी सकाळपासून मात्र तो अस्वस्थ होता. दहा वाजल्यानंतर तासातासाला तो बँकेत फोन करत राहिला. नकारात्मक उत्तरानं त्याची कासाविशी वाढत चालली.अखेर न रहावून त्याने शेवटी पुणे ऑफिसला फोन लावला. फोन नेमका नानूभाईंच्या चिरंजीवांनी उचलला.
“हे बघ, याबद्दल तू बंगल्यावर फोन करुन ममांशीच बोल.त्या तुला काय ते सांगतील “
नानूभाईंच्या अनुपस्थितीत कधीकधी त्या कामांची जबाबदारी पार पाडत असायच्या पण अशी वेळ क्वचितच येई.मंदारची तर ही अशी पहिलीच वेळ. मंदारने त्यांना घरी फोन लावला.
“हे बघ,आज रात्री उशीरा तू फोन कर.मीन टाईम मी यांच्याशी बोलून कांहीतरी व्यवस्था करीन. रात्री फोन करशील तेव्हाच मी निश्चित निरोप देईन तुला” उद्वेगाने त्याने फोन ठेवला.न रहावून नानूभाईना फोन लावला पण तो नो रिप्लाय आला. मग लक्षात आलं ते एक ग्रूप घेऊन सिंगापूर टूरवर जाणार होते. काय करावं त्याला सुचेचना. डोक्यावर मणामणाचं ओझं लादल्यासारखं त्याला वाटत राहिलं.शेवटी मनाशी कांही एक ठरवून शिल्लक असलेले पैसे घेऊन तो बाजारात गेला.भरपूर कांदे-बटाटे घेऊन आला.रात्रीही तीच भाजी केली. ठरल्याप्रमाणे रात्री उशीरा शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने बंगल्यावर फोन लावला.तो कुणीही उचलला नाही.ही शेवटची आशाही मालवली.
ब्रेकफास्टला बटाटेवडे पाहून एक प्रवासी कुजबुजले,
“कालची बटाट्याची भाजी बरीच उरलेली दिसतेय.”
प्रवाशांच्यासमोर चर्चा नको म्हणून मंदारने तिकडे दुर्लक्ष केलं. म्हणाला,
“सकाळचं साईट सीईंग झालं की एक अर्जंट मीटिंग घेतोय.ती झाल्यावरच आपापल्या रूमवर जावं “
“मिटिंग? कांही सरप्राईज आहे का?” कुणीतरी गंमतीने विचारलं.वेळ मारुन न्यायला तोही गंमतीने हसला.बोलला कांहीच नाही.बोलण्यासारखं काही होतंच कुठं? आता जे कांही बोलायचं ते मिटिंगमधेच हे ठरलेलंच होतं.
साईटसीईंगहून परतताच जेवणाआधी मिटिंगसाठी सर्व प्रवासी रिसेप्शन हॉलमधे एकत्र आले.शांतपणे पण तरीही स्पष्ट बोलायचं हे मंदारने ठरवलं होतं तरीही टूरिस्टसमधल्या अनेकांच्या विविध प्रतिक्रियांचं दडपण होतंच.
“हे पहा, आज आत्ताही जेवणात बटाट्याची भाजी आहे आणि ती मला नाईलाजाने करावी लागणारी एक तडजोड आहे.” क्षणार्धात मिटिंगमधलं वातावरण गंभीर झालं.मग त्याने टूरच्या आदल्या दिवसापासून काल रात्री बंगल्यावर केलेल्या उशीराच्या फोनपर्यंतचा सर्व वृत्तान्त सांगितला.तोवर सर्वांची अस्वस्थता अधिकच वाढली होती.
“पण यात आमची काय चूक ? आम्ही तर सर्व पैसे भरलेले आहेत. विषय संपला.”
प्रवाशांच्या या त्रासिक आवाजातल्या सामुदायिक प्रतिसादानंतरही तो विचलीत झाला नाही.
“चूक तुमचीही नाहीय न् माझीही नाहीय. एक चांगली गोष्ट म्हणजे प्रवासाची आणि सगळीकडची हाॅटेल बुकिंग्ज कन्फर्म आहेत. राहिला प्रश्न चहा,नाश्ता,जेवणाचा. तुम्ही सर्वांनी मिळून जर थोडे थोडे पैसे दिलेत तर कालपर्यंत जशी सेवा दिली तशीच देणं मला शक्य होईल.पुण्याला परत गेल्यावर मी स्वतः तुमच्याबरोबर नानूभाईंकडे येऊन, त्यांच्याकडून तुमचे पैसे परत मिळतील याची जबाबदारी घेतो. पैसे द्यायचे नसले तर शेवटचे तीन दिवस कांदे- बटाट्याचे विविध पदार्थ करण्याशिवाय माझ्याकडे कांहीही पर्याय नसेल.पुण्याहून आणलेला कोरडा शिधा मात्र पुरेसा आहे त्यामुळे बाकी कसलीही गैरसोय होणार नाही हे मी पाहीन.तुम्ही अर्धा तास वेळ घ्या.परस्परांशी चर्चा करा न् मला निर्णय सांगा.”
बोलणं संपताच तिथं क्षणभरही न थांबता मंदार भटारखान्यात आला आणि डोक्याला हात लावून बसून राहिला. आदल्या रात्री बटाट्याच्या काचर्या, ब्रेकफास्टला बटाटेवडे आणि आता बटाट्याचा रस्सा. त्याचे सहकारी शांतपणे जेवण वाढण्याची तयारी करत होते. कोणीच काही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. टूरिस्टही सगळा आनंद न् उत्साह हरवून बसले होते. वातावरणात एक विचित्र ताण जाणवत होता. जेवण संपताच एक वयस्कर प्रवासी बोलायला उठून उभे राहिले.