मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देवळाबाहेरचे देव… — भाग – १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

? जीवनरंग ?

☆ देवळाबाहेरचे देव…  — भाग – १ ☆ श्री प्रदीप केळूसकर

रेवती आंघोळ करून तयार होत होती. तिचा नवरा डॉ. मधुर नाश्ता करत होता, त्याला रेवती म्हणाली..

‘मधुर, माझ्यासाठी आज एक काम कर..

‘काय?

‘बारा वाजता देवीच्या देवळात महाआरती असते, तू आता दवाखान्यात गेलास की साडेअकराला घरी ये आणि मला देवळात सोड..

‘अग पण मला कस जमेल?

‘जमेल.. बाकी पुरुष बघ आपल्या बायकोला घेऊन सायंकाळी फिरायला जातात, हॉटेलात जातात, मॉलमध्ये जातात आणि देवळात पण जातात, तू माझ्याबरोबर कुठे येतोस का?

“अग त्त्यांचे आणि माझे प्रोफेशन वेगळे आहे, मला सायंकाळी दवाखान्यात जायचे असते आणि..

‘आणि नाही बाणी नाही.. पुढचे सर्व मला माहित आहे.. तुला देवळात यायची फारशी इच्छा नसते.. मग आत येऊ नको ना.. मला आरतीला सोड आणि फक्त अर्ध्या तासाने घरी आण. एकदिवस पेशन्ट थोडी वाट बघतील..

‘अग पण.. तुला सोडायला जायला इथून वीस मिनिटे, परत घरी सोडायचे, म्हणजे मला अर्धा तास बाहेर वाट पहात राहायला हवी..

‘मग तू आत का येत नाहीस आरतीला? तेव्हडेच पुण्य…

‘प्रत्येकाची पुण्य मिळविण्याची कल्पना वेगवेगळी असते. तुला देवींची ओटी भरून, आरती करून पुण्य मिळते असे वाटते, मला तसे नाही वाटतं. मला माझ्या पेशन्टना रोगमुक्त करण्याने त्त्यांचे आशीर्वाद महत्वाचे वाटतात..

‘ठीक आहे.. तू येतोस की नाही साडेअकराला ते बोल…

‘मी येईन पण बाहेर बसेन तुझी वाट बघत.. त्या निमित्ताने तो परिसर पहाणे होईल आणि कोणी ओळखीचे भेटले तर..

‘गप्पा? बरोबर..

‘अग गप्पा पण मारायला हव्यात, त्यामुळे समाज कळतो, लोकांना सध्याच्या परिस्थितीबंद्दल काय वाटते हे कळते.. एक भारतीय नागरिक म्हणून लोकांचा आरसा पण पहायला हवा..

‘तू आरसा बघ किंवा आणि काय बघ.. मी साडेअकराला तुझी वाट पहात आहे..

‘ठीक.. मी येतो अकराला..

 डॉ. मधुरने स्कुटर स्टार्ट केली आणि तो दवाखान्यात गेला.

मधुर दवाखान्यात पोचला. आज कोणता तरी सण होता त्यामुळे नेहमीसारखी गर्दी नव्हती. त्याने एप्रन अंगात चढवीला आणि पेशन्ट तपासायला सुरवात केली. अधूनमधून त्याचे लक्ष हातातील घड्याळाकडे जात होते.. साडेअकराला रेवतीला घरी येतो म्हणून सांगितले आहे.. तसे रेवतीला पण फारसे बाहेर जात येत नाही.. एकतर आपले घर शहरापासून लांब आहे आणि दुसरे म्हणजे आपली आई आपल्यासोबत असते.. सध्या ती बहिणीकडे गेली आहे म्हणून नाहीतर तिला एकटीला घरी सोडून रेवती कुठे जात नाही.

सव्वाअकराला डॉ. मधुर बाहेर पडला.. जाताजाता तो मंदाला म्हणाला..

‘मंदा.. मी रेवतीला घेऊन देवीच्या देवळात जातोय.. एक पर्यत येतो.. पेशन्टना सांग डॉक्टर एकनंतर येतील.

आपले साहेब आज बायकोला घेऊन देवळात जात आहेत हे ऐकून मंदाला आश्यर्यच वाटले.

पण काही न बोलता तिने मान हलवली.

मधुर घरी पोचला. त्याने स्कुटर घराबाहेर लावली आणि मोठी चारचाकी बाहेर काढली.. एकतर देवीचे मंदिर सहा किलोमीटरवर होते आणि दुपारचे ऊन होते.. त्याने हॉर्न वाजवताच देवीसाठी ओटी घेऊन रेवती बाहेर पडली, तिने घराला कुलूप केले आणि ती गाडीत बसली.

‘किती दिवसापासून माझ्या मनात होते.. देवींची ओटी भरायची आणि महाआरतीला पण हजर राहायचे.. पण जमतच नव्हते.. माझी आई रोज फोनवर विचारत असते.. देवींची ओटी भरलीस का म्हणून.. पण वेळ यावी लागते म्हणतात ना..

‘आज योग्य वेळ आली काय?

‘अरे, ते बाजूच्या बंगल्यातील नाडकर्णी आहेत ना.. त्या नाडकर्णीना हल्ली बरे नसते.. म्हणून सावित्रीबाई म्हणजे मिसेस नाडकर्णीना देवीला गाऱ्हाणे घालायचे आहे आपल्या नवऱ्याच्या तब्येतीसाठी..

‘बरं मग?

‘आज त्या आपल्या नवऱ्याला घेऊन देवीच्या देवळात जायच्या होत्या.. म्हणजे सकाळीच गेल्या पण त्या.. त्यानी मला विचारले तुम्ही आज देवळात याल का? म्हणजे काय होत.. देवीच्या देवळात जाताना रिक्षा मिळते पण येताना काही वाहन मिळतं नाही, म्हणून त्या म्हणाल्या.. तुम्ही आणि डॉ. मधुर जर आज देवीच्या दर्शनाला आलात तर येताना गाडीची सोय होईल..

डॉ. मधुर हसत म्हणाला. , ‘असं काय? म्हणजे तुम्हाला आज घरचा ड्रायव्हर हवा होता तर..

‘तस नाही रे… मला पण देवीची ओटी भरायचीच होती.. लग्नाला चार वर्षे झाली आणि अजून…

‘त्या करिता डॉ. दीक्षित यांची ट्रीटमेंट सुरु आहे ना.. आणि मध्येच देवी..

‘असुदे.. माझा आहे विश्वास..

मधुरने देवीच्या देवळाजवळ गाडी उभी केली, रेवती त्यातून उतरली आणि देवळाच्या दिशेने चालू लागली, मधुरने गाडी कामत मेडिकलच्या दिशेने वळवली. अशोक कामत त्याचा कॉलेजमधील मित्र, त्याचे या भागात मेडिकल होते.. अशोकने दुकानात येणाऱ्या मधुरकडे पाहिले आणि तो ओरडला..

‘अरे मध्या.. आज दवाखाना बंद ठेवून इकडेकुठे?

‘आली आज मित्राची आठवण.. तुला कुठे येते माझी आठवण?

‘अरे बाबा रोज येते.. तुझे पेशंट या भागात पण आहेत, ते दुकानात येतात तू लिहून दिलेली औषधे घ्यायला.. पण तू या वेळी.. आणि ते पण पेशन्टना सोडून?

‘अरे आज रेवतीला देवीच्या महाआरतीला यायचं होत.. तिला सांगत होतो रिक्षाने जा.. पण तिचे म्हणणे दुपारी या भागात रिक्षा मिळतं नाहीत.. त्यामुळे आज थोडावेळ दवाखान्यातून वेळ काढला आणि तिला इकडे घेऊन आलो..

‘बर.. म्हणजे वहिनी देवळात आणि तू बाहेर..?

‘ज्याला जिथे आवडत तिथे त्याने जावे.. तिला देवळात जायला आवडते मला माणसात मिसळायला आवडते.. तूझ्या दुकानात दहा मिनिटे बसले तर दिल्ली पासून गल्लीपर्यतच्या बातम्या आणि माणसे भेटतात..

‘ये ये.. बर वाटल.. असं म्हणूं कामतने खुर्ची पुढे केली आणि टाळी वाजवून चहाची ऑर्डर दिली

रेवती देवळात गेली.. अजून फार गर्दी नव्हती, तुरळक माणसे होती, आरतीच्या वेळी देऊळ आणि परिसर भरून जायचा. रेवती देवीची ओटी भरायला म्हणून आत आली तेंव्हा तिला नाडकर्णी जोडी दिसली.. दोघे डोळे मिटून देवीचे स्तोत्र म्हणत असावी बहुतेक. रेवतीने देवीची ओटी भरली, पुजाऱ्याने तिला तीर्थ आणि प्रसाद दिला.. तो घेऊन ती मिसेस नाडकर्णीच्या बाजूला बसली.. मिसेस नाडकर्णी तिला बघून हसल्या..

 ‘एकटीच आलीस, डॉक्टर नाही आले काय?

‘आले आहेत, मला दारात सोडल त्यांनी आणि त्त्यांचा मित्र आहे ना कामत केमिस्ट त्याच्यकडे गेलेत..

‘मग आत आले नाहीत ते? ही डॉक्टरमंडळीना बहुदा नास्तिक असतात..

‘मधुरला नास्तिक नाही म्हणता येणार.. तो लहानपणापासून आंघोळ केल्यावर अथर्वशीर्ष म्हणतोच.. सकाळी बाहेर पडताना घरच्या देवांना नमस्कार करतो.. पण मग मात्र कुठल्या देवळात जात नाही की कसला उपास करत नाही. पण त्याचा मला विरोध नसतो. मी उपास करते त्याला तो कधीच काही म्हणत नाही उलट मेडिकल सायन्सच्या दृष्टीने उपास चांगला पण उपासाला साबूतांदूळ किंवा बटाटे खाणे योग्य नसते असे त्याचे म्हणणे.

‘आरती बारा वाजता सुरु होईल.. डॉक्टर बाहेर आहेत ना? इथे रिक्षा मिळतं नाहीत म्हणून विचारले?

‘तो कामतकडे आहे.. आरती झाली की मिसकॉल दे म्हणाला.. मग आपण जाऊ. मिस्टरांची तब्येत कशी आहे?

‘नरमच आहे.. आज देवीचा प्रसाद घेतला की बरे वाटेल..

‘अहो पण ट्रीटमेंट घयायला नको का? अंगावर काढू नका..

‘जाऊ दोन दिवसांनी.. माझा या देवीवर विश्वास आहे. तिचे चमत्कार ऐकलेत मी..

‘ते असुदे.. पण उद्याच त्याना चांगल्या डॉक्टरकडे न्या. मी मधुरला सांगते, तो तुम्हाला चांगला डॉक्टर सुचविल.

एव्हड्यात देवळातील घंटा मोठमोठ्याने वाजायला लागल्या.. मोठी आरती पेटवली गेली आणि झपझप माणसे आरतीसाठी जमा झाली.

आरतीसाठी भक्तमंडळी जमली.. टाळ मृदंग वाजू लागले, लोकांनी टाळ्या वाजून आरती म्हणायला सुरवात केली..

‘दुर्गे दुर्घट भारी.. तुजवीण संसारी…

टाळ, झान्जा जोरात खणखणायला लागल्या. त्याच्यात लोकांनी जोरात टाळ्या वाजवून आरती म्हणायला सुरवात केली.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आत्मनिर्भर — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ मुखवटे — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(ड्रायव्हरने दिलेल्या पत्त्यावर बरोबर कार नेली. एका सोसायटीमध्ये रो हाऊसच्या रांगेत एका बंगल्यासमोर कार उभी राहिली. बाहेरची पाटी मात्र सांगत होती, हे कोणा कर्नल पाटणकर यांचे घर आहे. श्री व सौ पाटणकर.)

इथून पुढे – – 

भार्गवने पुढे होऊन बेल वाजवली. बऱ्याच वेळाने एका मध्यमवयीन बाईनी दार उघडलं. नीटनेटक्या. अंगावर भारी साडी आणि उत्तम रहाणीमान असलेल्या बाईनी दार उघडलं.

“कोण हवंय आपल्याला? मृदु स्वरात त्यांनी विचारलं. भार्गव म्हणाला मकरंद साने इथेच रहातात ना? पत्ता हाच दिलायआम्हाला. ’

हो हो. या ना आत या. ”बाईनी दोघांना घरात घेतलं. हॉलमध्ये बसवलं.

“कोण आलंय ग ममा? ”विचारत आतून पूर्ण दिवस भरत आले असावेत अशी मुलगी बाहेर आली. तिने ढगळ गाऊन घातला होता. साधीसुधी दिसायला अगदीच बेताची पण सरळ वाटणारी मुलगी त्यांना म्हणाली या ना. कोण आपण? ”

भावना चमकलीच तिला बघून”. तुम्ही लीना साने का? मकरंद ची मिसेस? आम्ही त्याच्या पुण्याच्या ऑफिसचे सहकारी. मी भावना वझे आणि हे भार्गव परचुरे”लीनाच्या आईने त्यांना पाणी दिलं.

“ मकरंद जरा बाहेर गेलाय. येईलच इतक्यात. लीनाचे रिपोर्ट्स आणायला गेलाय तो.

फार काळजी घेतो हो तो आमच्या लीनाची. मी आई लीनाची. हा बंगला आमचाच आहे. लीनाचे कर्नल बाबा आता हयात नाहीत. लीना आमची एकुलती एक मुलगी. मकरंदशी लीनाने प्रेमविवाह ठरवला.

मकरंद अनाथ होता गरीबच होता. लीनाच्या वडिलांना हे लग्न मान्य नव्हतं पण लेकीचा हट्ट.!

मग मकरंद घरजावई म्हणून इथे आला. लीना त्याच्या त्या चाळीतल्या एका खोलीत कशी राहू शकली असती? पण मुलगा चांगला आहे हो. ” ममा भडाभडा बोलत सांगत होत्या.

आता लीना म्हणाली, ”कधी बोलला नाही मकरंद मला, की इतकी सुंदर मुलगी त्याची कलिग आहे ते. ”

भावना संकोचून हसली.

लीना म्हणाली “मकरंदचं माझ्यावर जिवापाड प्रेम आहे. मला काही जरी झालं तरी तोच आधी कासावीस होतो. आत्ता सुद्धा स्वतः रिपोर्टस् आणायला गेलाय. म्हणूनच तर रजा घेतलीय त्यानं. फक्त माझ्यासाठी.

“मग लीना, तू कधी नोकरी नाही केलीस का? भावनाने विचारलं.

“ करत होते मी. पण मकरंदला मी नोकरी केलेली आवडत नाही. ‘तू घरी बस. मला बायकांनी बाहेर नोकऱ्या केलेल्या आवडत नाहीत. मी मिळवतोय ना भरपूर? ’ असं म्हणतो तो. ”अभिमानाने लीना म्हणाली.

भार्गव आणि भावनाने नकळत एकमेकांकडे बघितलं.

“ हाच मकरंद ऑफिसमध्ये तावातावाने वाद घालायचा. ‘घरी बायका नुसत्या बसतातच कशा? आपल्या शिक्षणाचा उपयोग नको का करायला? कसल्या या मुली हो. ’.. भावना, मला तुझं फार कौतुक वाटतं हं. आमच्या बरोबरीने पगार मिळवतेस तू. मला नवऱ्याच्या जिवावर आयते बसून खाणाऱ्या बायका अजिबात आवडत नाहीत. ”, मकरंदची सगळी वक्तव्ये आठवली भावनाला.

इथे लीना सांगत होती, मकरंदला तिने नोकरी केलेली आवडत नाही. तेवढ्यात मकरंद आला. त्याला बघूनही आश्चर्य वाटलं भावनाला.

ऑफिसमध्ये टिपटॉप असणारा मकरंद आत्ता गबाळ्या म्हणाव्या अशाच टी शर्ट पँट मध्ये होता.

“ममा, लीनाचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत हो. काळजीचे काहीच कारण नाही. मी डॉक्टरांना भेटून आलो. कारमध्ये पेट्रोल भरलं. आणखी काही आणायचं असलं तर यादी द्या. संध्याकाळी आणतो. ”

“मकरंद उरलेले पैसे ममाकडे दे”. लीना म्हणाली. रिपोर्ट्स आणि पैसे मकरंदने ममांच्या हातात ठेवले.

इतक्यात त्याचं लक्ष समोर सोफ्यावर बसलेल्या भार्गव आणि भावनाकडे गेलं. मकरंद दचकून उभाच राहिला.

… अत्यन्त खऱ्याखुऱ्या आश्चर्याने त्याने विचारलं “तुम्ही इथं कसे? ” त्याला शॉकच बसलेला दिसत होता. आता भार्गव म्हणाला,

“अरे. माझं आपल्या हेड ऑफिस मध्ये काम होतं. तू अशी मधेच अचानक का रजा घेतलीस काहीच समजलं नाही. तर म्हटलं भावनाला, चल भेटून येऊया मकरंदला. ”प्रांजलपणे भार्गव म्हणाला.

ममा म्हणाल्या “अहो. आता मकरंदला कसं जमेल ऑफिसला पुण्याला यायला? लाडक्या बायकोची डिलीव्हरी जवळ आली आता. मी तर म्हणते दे सोडून नोकरी” ममा म्हणाल्या. “काही गरज नाहीये त्याला नोकरीची. माझं ते सगळं लीनाचंच तर आहे. म्हणजे मकरंदचंच. अर्थात माझ्या पश्चात हं.. आत्ता नाही. ”

त्या घरात मकरंदची काय किंमत होती हे दिसलंच की मगाशी. लीनाने उरलेले पैसेही ममाना दे असं फर्मावलं तेव्हाच.

मकरंद घरजावई झाला होता. केवळ याच्या रूपावर भाळून लीनाने याच्याशी लग्न केलेलं दिसलं आणि मग ती म्हणेल, सासू म्हणेल तसं जगणं मकरंदने निमूट स्वीकारलेलं दिसलं भार्गवला आणि भावनाला.

एका नोकराने सगळ्याना चहा आणून दिला. मकरंदची अवस्था अत्यंत अवघड झालेली होती.

भावनाला त्याने सांगितलं होतं, “ माझी बायको दुर्मुखलेली आहे आमचं पटत नाही. मी घटस्फोट घेणार आहे. ”

… आणि आता प्रत्यक्ष चित्र वेगळंच दिसत होतं. चक्क दिवस गेलेले दिसत होते त्याच्या बायकोला.

म्हणे आमचा वर्षानुवर्षे संबंध येत नाही.

माय लेकींनी मकरंदचे अगदी पायपुसणे करून टाकलेले दिसले भावनाला. किती अपराध्यासारखं जिणं जगत होता मकरंद.

चहा संपवून भावना आणि भार्गव जायला निघाले.

“कळव ग लीना बाळ झालं की. ”… मकरंदकडे मुद्दाम बघत भावना खोचून म्हणाली.

“हो तर. येईलच की मकरंद पेढे घेऊन ऑफिसला. ” ममा म्हणाल्या. “ पण मला नाही वाटत तो नोकरी करील. नाही का ग लीना? ”

मकरंद गप्प उभा होता.

“बरंय मकरंद. छान वाटलं तुम्हाला भेटून. ”भार्गव म्हणाला.

त्यांना निरोप द्यायलासुद्धा मकरंद बाहेर आला नाही.

कार मध्ये बसल्यावर भावना आणि भार्गव निःशब्द होते.

भार्गवला मकरंदची दया आली

न राहवून तो भावनाला म्हणाला, ”काय ग हे. इतका चांगला मुलगा पण घरजावई होऊन सगळं गमावून बसलाय. किती सामान्य आहे ग ती लीना. दिसायला याच्या जवळपास तरी आहे का? मूर्ख आहे मकरंद. ”भावना काहीच बोलली नाही. येतानाचा तिचा उत्साह ओहोटीला लागला आता. अचानक भावनाला हसू आलं. ”भार्गव. किती रे गाढव असेन मी. पण मला आता सुटल्या सारखं का वाटतंय? म्हणजे मी खरी गुंतले नव्हतेच रे या मकरंदमध्ये.. ”

भार्गव म्हणाला”भावना, सहाजिकच आहे तुला हा शॉक बसणं. नशीब समज, थोडक्यात बचावलीस तू.

नाहीतर फसलीच असतीस या उनाड माणसाच्या जाळ्यात.

भावना म्हणाली” हो रे भार्गव. किती विश्वास ठेवला मी याच्यावर. काय वाटेल ते सांगत होता आपल्या बायकोबद्दल. प्रत्यक्ष तर ताटाखालचे मांजर आणि गुलाम झालाय त्या चढेल मायलेकींचा. बरं झालं मला तुझ्याबरोबर यायची बुद्धी झाली. म्हणे मी डिव्होर्स घेणार आहे. तोंड बघा. सोकावलाय तिथे रहायला. मग देतोय किंमत त्याची. त्या मायलेकींचा दास होऊन. हा कसला घेतोय डिव्होर्स. ”. भावना म्हणाली.

“भार्गव, मला पश्चाताप होतोय. अशी कशी मी याच्यात अडकले रे? तू परोपरीने सांगूनही माझा तुझ्यावर विश्वास बसला नाही. माझ्यावर विश्वास ठेवशील? मी त्याला मला आजपर्यंत हातसुद्धा लावू दिला नाहीये. बायकांना एक इनर सेन्स असतो, तो सावध करत होता मला, असं म्हण हवं तर. मला माफ कर भार्गव. ”खऱ्या खुऱ्या प्रांजलपणे भावना म्हणाली.

कार फूड मॉलला थांबली. ड्रायव्हर चहा प्यायला उतरला”. भावना चल कॉफी घेऊया मस्त पैकी”. भार्गव म्हणाला. भावना कॉफी टेबल जवळ बसली.

एक मिनिट. आलोच. तू ऑर्डर दे कॉफीची. भावना कॉफीची ऑर्डर देऊन आली.

भार्गव हातात गुलाबाच्या फुलांचा मोठा गुच्छ घेऊन आला. भर मॉल मध्ये गुडघ्यावर बसून तिच्या हातात तो गुच्छ देऊन म्हणाला will you marry me? ”

भावना लाजून लाल झाली. मॉल मध्ये एकच हशा उसळला आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या.

भावना म्हणाली yes dear. i will, i will. ”

भावनाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. एक वृद्ध पारशी बाई म्हणाल्या “डिकरी लकी हायेस बाय. चांगला पोऱ्या आहे हा. बेस्ट लक. हो म्हणून टाक.”

लाजलेली भावना गाडीत जाऊन बसली. हसत हसत भार्गव मागून आला आणि म्हणाला”, माझी ऑफर कायम असणार म्हणालो होतो ना? आपलं पहिल्यापासून प्रेम आहे तुझ्यावर.. ”

त्याला घट्ट मिठी मारून भावना म्हणाली सॉरी. सॉरी माझ्या सगळ्या सगळ्या वेडेपणाबद्दल भार्गव. मला माफ कर मी चुकले. तुला ओळखलंच नाही रे मी. ”भार्गवने तिला जवळ घेऊन तिचे डोळे पुसले. चला आता घरी म्हणाला. कार घराच्या दिशेने धावू लागली.

समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आत्मनिर्भर — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ मुखवटे — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

भावनाला या ऑफिस मध्ये नोकरी मिळाल्यावर तिचा आनंद गगनात मावेना. इतके दिवस तिला एमबीए असूनही मनासारखी नोकरी मिळत नव्हती. या ऑफिसचे जॉइनिंग लेटर आल्यावर भावना मनापासूम खूषच झाली.

पहिल्या दिवशी ऑफिस मध्ये गेल्यावर शेजारच्या क्युबिकल मध्ये बसलेला हसतमुख तरुण हिला बघून बाहेर आला.

हॅलो, मी भार्गव परचुरे. तुमच्या आधी सहा महिने जॉईन झालो. वेलकम टू होरायझन कंपनी.

आपल्याएवढाच असलेला हा हसतमुख तरुण बघून भावनाला हायसं झालं. त्याने सगळ्या स्टाफशी तिची ओळख करून दिली.

हे तुमचं टेबल. त्याने तिला तिचं टेबल दाखवलं आणि तो कामाला निघून गेला.

भावना मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंबातली मुलगी. चार खोल्यांचा साधासुधा फ्लॅट आणि आईवडील भाऊ आणि ही असं कुटुंब.

भावना दिसायला सुरेख स्मार्ट तर होतीच. जरा महत्त्वाकांक्षी आणि उच्च रहाणीची आवड असलेली सुद्धा.

ऑफिसमध्ये भावना चार महिन्यात रुळून गेलीसुद्धा. तिची आणि भार्गवची चांगली मैत्री झाली.

अचानक ऑफिस मध्ये मुंबईहून बदलून एक स्मार्ट तरतरीत तरुण जॉईन झाला. हॅलो मी मकरंद साने.

त्याने सगळ्याना आपली ओळख करून दिली.

किती स्मार्ट होता मकरंद. किती पॉश कपडे होते त्याचे. त्याच्या परफ्यूमने ऑफिसमध्ये सुंदर गंध दरवळला.

मकरंद पण होता एमबीए. भावनाच्या पलीकडेच त्याचे टेबल होते.

आता टिफिन च्या सुट्टीत भार्गव आणि भावनाबरोबर मकरंद पण त्यांना जॉईन झाला. , मकरंदचं घर मुंबईला होतं. इथे मात्र तो एका मित्राबरोबर रूम शेअर करून रहात होता.

“मी पुण्याला कायम नाही रहाणार रे बाबा. लवकर मुंबईला जातो बघ खटपट करून. माझं स्वतःचं सुंदर घर आहे मुंबईला. मकरंद म्हणायचा.

भार्गवपेक्षा भावना पटकन आकर्षित झाली मकरंदकडे. भार्गव ला टाळून बऱ्याच वेळा ती त्याच्या मोटर सायकलच्या मागे बसून लांब लंचला जाई.

भार्गव हे निमूटपणे बघत होता.

भार्गव एकदा म्हणाला”काय भावना,, काय म्हणतोय नवा मित्र?

 बरेच वेळा दिसतेस हल्ली मकरंद बरोबर. लग्न झालंय बरं का त्याचं.

सांगितलं असेलच तुला ना. ”

“भार्गव, बरीच माहिती आहे रे तुला बाकीच्या जगाची. हो, सांगितलं आहे बरं त्याने. ”भावनाला राग आला भार्गवचा.

भार्गव हसला म्हणाला” हे बघ. ते काहीही असो. माझं प्रेम आहे तुझ्यावर. ते काही कमी होणार नाही. करतेस का लग्न माझ्याशी?

आपलं बाबा सगळं सरळसरळ असतं. मी एकुलता एक आहे.. श्रीमंत नाही पण परिस्थिती मस्त आहे आमची. जबाबदारी नाही काही. बघ. विचार कर”.

भावना म्हणाली “, काही नको. मला नाही लग्न करायचं इतक्यात. ”

भार्गव म्हणाला ओके. पण विचार करशील तेव्हा माझं नाव लक्षात असू दे म्हटलं. आपलं प्रेम आहे तुझ्यावर. ”भार्गव हसून तिथून निघून गेला.

भावनाला हसू आलं. तिला भार्गव मनापासून आवडायचा पण आता मकरंदने तिला चांगलीच भूल घातली होती.

त्या दिवशी मकरंद आणि भावना सहज लॉंग ड्राईव्हला गेले.

भावना म्हणाली, काय रे मकरंद, बायको कशी आहे तुझी?

सांगितलं नाहीस मला तिच्याबद्दल काहीही. ”

मकरंदचा चेहरा पडला. ”अग काय सांगायचं, सांगण्या सारखं काहीही नाही ग. अगदी दुर्मुखलेली आणि रडतराव आहे आमची लीना मॅडम. सतत तक्रारी.

मी म्हणून सहन करतोय बरं. पण आमचं अजिबात पटत नाही ग भावना. मला तुझ्यासारखी बायको मिळालीअसती तर किती भाग्यवान ठरलो असतो मी.

मी घटस्फोट घ्यायच्या विचारात आहे. ते सगळं झालं की करशील माझ्याशी लग्न? थांबशील ना माझ्यासाठी? ”मकरंद डोळ्यात पाणी आणून म्हणाला.

भावना म्हणाली, ते बघू नंतर. आधी म्हणतोस तसा नक्की घटस्फोट तर घे”. मकरंद म्हणाला, गेले कित्येक वर्षे माझा तिच्याशी शारीरिक संबंध पण आलेला नाही. त्याही बाबतीत सगळा उजेडच आहे लीनाच्या बाबतीत. ” 

मला तुझ्यासारखी रसिक हुशार आनंदी मुलगी हवी होती ग बायको म्हणून. ”मकरंदने सुस्कारा सोडला. भावनाला त्याच्याबद्दल मनापासून वाईट वाटलं. देव तरी कशा विजोड जोड्या जमवतो ना. तिच्या मनात आलं.

त्या दिवशी ती घरी गेली तर तिला आश्चर्याचा धक्काच बसला.

हॉलमध्ये भार्गव खुशाल तिच्या आईवडिलांशी गप्पा मारत होता.

चहा झालेला दिसत होता.

भावना आल्याबरोबर भार्गव म्हणाला “या या. तुमचीच वाट बघत होतो. आई, चहा द्या ना भावनाला. खूप काम असतं हो हल्ली आम्हाला ऑफिस मध्ये. ’ भावना ओरडून म्हणाली, तू इथं आमच्या घरी काय करतो आहेस भार्गव? ”

भावनाचे वडील म्हणाले, भावना ही काय पद्धत ग तुझी बोलायची?

सॉरी म्हण त्यांना आधी.

समोरच्या गुप्तेकाकांना त्यांचे पार्सल द्यायला आले होते हे. सहज आपलं नाव बघितलं आणि मग तुझं नाव घेऊन म्हणाले, हिच्याच ऑफिस मध्ये मी काम करतो.

आम्हीच बोलावलं त्यांना चहाला. ”

भार्गव हसत होता.

भावना अगदी ओशाळून गेली.

सॉरी हं. मला नव्हतं माहीत. ”ती नरमाईने म्हणाली. होतं असं कधीकधी भावना. भार्गव म्हणाला.

चलो बाय. भेटू पुन्हा म्हणत तो निघून गेला.

आई म्हणाली”, किती चांगला मुलगा आहे ग हा. गुप्ते काका आजारी असतात ना, त्याच्या वडिलांचे मित्र आहेत ते. हा मुलगा त्यांची औषधे न चुकता आणून देतो.

त्याला नव्हतं माहीत ग की हे तुझं घर आहे ते. ”

भावनाला अगदी गिल्टीवाटलं. सॉरी हो बाबा. चुकलंच माझं. ”

उद्या मी सॉरी म्हणेन त्याला पुन्हा. ”

त्या नंतर भावनाचे पंधरा दिवस अगदी गडबडीत गेले. वर्क लोड खूप होतं आणि मकरंद दोन आठवडे रजेवर होता. त्याचेही काम भावनालाच बघायला लागलं. हा मकरंद फोनसुद्धा का उचलत नाहीये म्हणून चिडचिड झालीच होती तिची.

त्या दिवशी लंचब्रेक मध्ये भार्गव म्हणाला, मला ऑफिसच्या कामासाठी पुढच्या आठवड्यात मुंबईला जावं लागणार आहे आपल्या हेड ऑफिसला.

भावना येतेस का तू पण मुंबईला? टाक की एक दिवस रजा.

माझं काम झालं की मस्त हिंडू. आणि आणखी एक तुला आवडेल असं काम.

ऑफिसमधून मकरंदचा पत्ता घेऊ आणि त्याला सरप्राईज म्हणून भेटून पण येऊ. आवडेल तुला? ”भार्गवने तिला आवर्जून विचारलं.

भावनाला त्याचं मनापासून कौतुक वाटलं. किती सरळ आहे हा मुलगा. माझी मकरंदशी वाढत असलेली मैत्री बघूनही हा जेलस नाही होत.

भार्गव तिला आणखीचआवडायला लागला.

“खरंच की रे भार्गव. जाऊया का आपण? येते मी तुझ्याबरोबर. मस्त आऊटिंग होईल मला बघ. आणि खरंच भेटून येऊ मकरंदला. सरप्राईज देऊ त्याला. ”भावना आनंदाने म्हणाली.

भावनाने त्या दिवशी रजा टाकली.

भार्गवला ऑफिस मुंबईला जाण्यासाठी कार देणार होतं.

मग तर काय.

भावनाला न्यायला भार्गव तिच्या घरी गेला.

भावना तयार होऊन खाली आली. “माय माय. कसली ग वंडरफुल दिसते आहेस तू या ब्लॅक टाईट्स आणि मरून टॉप मध्ये. मार्व्हलस”.

भार्गवने दिलखुलास पावती दिली.

कार मुंबईच्या दिशेने धावू लागली.

वाटेत गप्पा मारताना भावनाच्या लक्षात आलं किती हुशार आणि बहुश्रुत आहे भार्गव. इंग्लिश आणि मराठीही तो अफाट वाचतो. त्याचे जनरल नॉलेज फारच छान आहे.

नकळत तिच्या मनात आलं, मकरंद किती कमी आहे याच्यापुढे.

सिनेमाशिवाय आणि त्यांच्या गॉसिपशिवाय त्याला कशातच इंटरेस्ट नसतो. फक्त छान कपडे हॉटेलिंग आणि खरेदी यापलीकडे जग नाही मकरंदचं.

भार्गवचं ऑफीसचं काम झालं.

त्याने भावनाला एका सुंदर हॉटेल मध्ये नेलं. समुद्रकाठी असलेलं ते सुंदर हॉटेल, नारळाच्या झावळ्यानी बनवलेल्या छोट्या हट्स. आणि सुंदर जेवण. बरोबर असलेला हा उमदा हुशार तरुण. इतका आनंद आपल्याला आजपर्यंत मकरंदच्या सहवासात अनेक वेळा राहूनही मिळाला नाही असं भावनाच्या मनात आलंच. पण तरीही मकरंद ची मोहिनी काही उतरत नव्हती भावनाच्या मनावरून.

“चला. आता जायचं ना मकरंदच्या घरी? मी ऍड्रेस घेतलाय त्याचा. ” भार्गव म्हणाला.

“हो जाऊया. किती आनंद आणि आश्चर्य वाटेल ना त्याला. ’ भावना म्हणाली.

भार्गव म्हणाला “, मला बघून नाही पण तुला बघून मात्र नक्की होईल आनंद त्याला. ” भावना हसली आणि म्हणाली, “ शेवटी पुरुष ते पुरुषच. चला आता मकरंदच्या घरी.”

ड्रायव्हरने दिलेल्या पत्त्यावर बरोबर कार नेली. एका सोसायटीमध्ये रो हाऊसच्या रांगेत एका बंगल्यासमोर कार उभी राहिली. बाहेरची पाटी मात्र सांगत होती, हे कोणा कर्नल पाटणकर यांचे घर आहे. श्री व सौ पाटणकर.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुत्तरित प्रश्न… ☆ पुष्पा चिंतामण जोशी ☆

पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ अनुत्तरित प्रश्न… ☆ पुष्पा चिंतामण जोशी ☆

किनाऱ्याकडे झेपावणाऱ्या, फेसाळणाऱ्या लाटा पाहत मृणाल निवांत बसली होती. समोरच्या क्षितिजकडेवर मावळणाऱ्या सूर्यदेवांची लाल सोनेरी आभा तरंगत होती. आज कितीतरी वर्षांनी मृणालला तिच्या माहेरच्या व्याडेश्वर दैवताचं दर्शन घडलं होतं. धूप- उदबत्त्यांच्या सुवासात, समयांच्या शांत, मंद प्रकाशात त्या अनादी- अनंतापुढे नतमस्तक होताना तिचे डोळे आपोआप पाझरू लागले होते.

मृणालच्या थोडा बाजूला बसलेला फिरोज, छोट्या झरीनबरोबर वाळूचा किल्ला करण्यात रमून गेला होता. झरीनसारखाच निरागस, आनंदी दिसत होता तो.

‘बरं असतं बाबा या पारशी लोकांचं! मनमोकळी, साधी, स्वच्छ विचारसरणी आणि आयुष्याचा भरभरून आनंद घेण्याची वृत्ती’. मनातल्या या विचारांनी मृणालच्या ओठांवर हसू उमटलं.

‘ फिरोज पारशी. मग आपण कोण? फिरोजशी लग्न केल्याला आता तीस वर्ष होऊन गेली. ही आपली नात झरीन आता चार वर्षांची होईल. हातातल्या वाळूबरोबर गतकाळातल्या अनेक आठवणी मृणालच्या मुठीतून ओघळू लागल्या.

‘गोऱ्या-घाऱ्या, नाकेल्या, सुशिक्षित कुटुंबात आपला जन्म झाला. नऊवारी साडीतली, कपाळावर चंद्रकोर रेखणारी आई अजूनही त्याच रूपात आठवते. बाकी सारी भावंड आई-वडिलांना शोभेशी. आपल्यावर मात्र निसर्गाने अन्याय केला. कसं कोण जाणे, पण नाकावर म्हशीने पाय द्यावा तसं नकट्यापेक्षाही नकटं नाक जन्मतःच आपल्या वाट्याला आलं. श्वास घेण्याची दोन भोकं तेवढी चेहऱ्यावर दिसायची. लहानपणापासून लोकांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य आणि कीव पाहत आपण मोठे झालो. कित्येकदा आईच्या ओच्या- पदराचा तोंड लपवायला आणि मनसोक्त रडायला उपयोग केला. घरात कुणीच आपल्याला दुखावत नसे पण आरसा म्हणजे वैरी झाला होता.

नशिबाने शाळेत चित्रेबाई भेटल्या. त्यांनी आपल्याला खूप समजावलं. वाचनाची गोडी लावली. स्वतःतल्या चांगल्या गुणांकडे बघायला शिकवलं. हळूहळू मनावर दाटलेलं मळभ नाहीसं झालं. समाजात आत्मविश्वासानं वावरता येऊ लागलं. आजूबाजूला आपल्यापेक्षा अधिक व्यंग असलेली माणसं दिसायला लागली आणि दैवदत्त दान शांतपणे स्वीकारण्याचा शहाणपणा आला. स्वभाव आपोआप सहनशील झाला. बी. कॉम. झाल्यावर चांगल्या बँकेत नोकरी लागली, पण लग्नाच्या बाजारात घोडं अडलेलंंच राहिलं. लहान- मोठ्या सगळ्या भावंडांची लग्न झाली. वयानं तिशी ओलांडली. आई- बाबांची खंत आणि आपल्या लग्नाचे प्रयत्न संपत नव्हते.

एक दिवस आपण नेहमीप्रमाणे फिरोजच्या केबिनमध्ये कामासाठी गेलो होतो. हा अविवाहित, सज्जन, पारशी बॉस त्याच्या हसतखेळत काम करण्याच्या वृत्तीमुळे सगळ्यांचा आवडता होता. ‘टेन्शन नई लेवानू. काम थई जसे. ‘ असा त्याचा सर्वांना आश्वस्त करणारा मंत्र होता. आपल्याला बसायला सांगून फिरोजने आपण पुढे केलेलं रजिस्टर बाजूला सारलं आणि म्हणाला, ‘घणा दिवसथी तने एक वात पुछवी हती, पुछूं के? ‘ प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिल्यावर तो पटकन म्हणाला, ‘मृणाल, विल यू मॅरी मी? ‘

फिरोजच्या या अनपेक्षित प्रश्नाने आपण एकदम दचकलो. फिरोज म्हणाला, ‘ टेक इट इझी. तू विचार कर. मला घाई नाही. तुझा शांत, समंजस स्वभाव, कामातलं कौशल्य कौतुक करण्यासारखं आहे. तू मला मनापासून आवडली आहेस, म्हणून मी तुला प्रपोज केलं आहे. काही कारणाने तू माझं प्रपोजल नाकारलंस, तरी माझी ही ऑफर मी कुणालाही कळू देणार नाही याबद्दल खात्री बाळग. थिंक इट ओव्हर अँड लेट मी नो, आय विल वेट फॉर युवर रिप्लाय. ‘

अंतर्बाह्य थरथरत आपण फिरोजच्या केबिनमधून बाहेर आलो. या दृष्टीने आपण कधी फिरोजचा विचारच केला नव्हता. मनात प्रचंड उलघाल सुरू झाली. फिरोज सर्वार्थाने चांगला होता, पण… पारशी. मनाचा हिय्या करून आपण ही गोष्ट रेखा आणि अनघाच्या- आपल्या खास मैत्रिणींच्या- कानावर घातली.

‘अरे वा! छान! अभिनंदन! चांगला आहे फिरोज. एक लक्षात घे, तुझ्या घरच्यांसाठी आणि बाकीच्यांसाठी ही शॉकिंग न्यूज असेल. तरी पण तू तुझ्या आयुष्याचा विचार करावा. फिरोजची ऑफर म्हणजे तुझ्यासाठी एक चांगली संधी आहे. तुझं आयुष्य मार्गी लागेल. लग्नानंतर माहेरची माणसं तर तुला दुरावतीलंच पण फिरोजच्या घरीही तुझा स्वीकार व्हायला वेळ लागेल. या साऱ्या परिणामांची मानसिक तयारी ठेव. ‘ रेखाने हे अवघड गणित सोडविण्यासाठी आपल्याला मदतीचा हात दिला.

॓आणि हे बघ लोकं काय म्हणतील याचा अजिबात विचार करू नकोस. एक वेगळी घटना म्हणून काही दिवस त्यावर चर्चा होईल मग दुसरी वेगळी बातमी आली की लोक ती बातमी चघळंत बसतील. तुला माहित आहे की मी जॉर्जशी लग्न करायचं ठरवल्यावर सगळ्या नातेवाईकात मित्र मैत्रिणी खळबळ उडाली होती. आमच्या वाडीत राहणारा, लहानपणापासून आमच्याबरोबर खेळणारा जॉर्ज सर्वांना माहीत होता. पण मराठी मुलीचे ख्रिश्चन मुलाशी लग्न ऐकून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. माझ्या घरच्यांच्या मला पूर्ण पाठिंबा होता म्हणून सारं निभावलं. कालांतराने बाकीच्यांचा विरोधी मावळत गेला.

‘फिरोजचं प्रपोजल चांगलं आहे. गो अहेड. फक्त तुला घेतलेल्या निर्णयावर ठाम राहावं लागेल आणि मन घट्ट करावं लागेल. ही पारशी माणसं बाकी उदार, प्रेमळ असली तरी धार्मिक बाबतीत अगदी कर्मठ असतात. त्यांच्या अग्यारीत तुला प्रवेश मिळणार नाही. तसं बघितलं तर आपणही देवळात किती वेळा जातो? आता तुझी तिशी होऊन गेली. एकटीने आयुष्य काढण्यापेक्षा तुलाही तुझं हक्काचं माणूस, घरदार मिळेल. धाकट्या भावाला विश्वासात घे. आम्हाला वाटतं की तू या प्रपोजलचा जरूर विचार करावा. ‘अनघानेही आपल्याला ग्रीन सिग्नल दिला.

मैत्रिणींच्या सल्ल्याने आपल्याला धीर आला. मार्ग सापडला. फिरोजबरोबरच्या रजिस्टर्ड लग्नाला या दोघी मैत्रिणी आणि धाकटा भाऊ हजर होते. आई-बाबांनी नाईलाजाने मूक संमती दिली होती. लग्नानंतर दोन्हीकडचा समाज काही काळ ढवळून निघाला. मग परवेजच्या जन्मानंतर सारं स्थिरस्थावर झालं. परवेजच्या ‘नवजोत’ समारंभाला तर माहेरची खूप माणसं आली होती. सगळ्यांनी त्या समारंभात परवेजच्या टिपिकल पारशी दिसण्याचं आणि आपलं खूप कौतुक केलं. सकाळी अग्यारीत झालेल्या धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी आपण अग्यारीच्या पायऱ्यांवर बसून डोळ्यात दाटलेले ढग अडवून ठेवले होते. संध्याकाळी माहेरच्या प्रेमळ गराड्यात डोळ्यात दाटलेले ढग आनंदाश्रूंमध्ये विरघळून गेले.

झरीनच्या आवाजाने मृणाल तंद्रीतून बाहेर आली. समुद्रावर फिरायला गेलेले परवेज आणि शिरीन परत येताना पाहून झरीन आनंदाने त्यांच्याकडे पळत गेली आणि हात धरून आई-बाबांना किल्ला दाखवायला घेऊन आली. हॉटेल मॅनेजमेंटच्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी परवेज फ्रान्सला गेला होता. तिथे त्याला शिरीन भेटली. लग्न झाल्यावर पाच वर्षांसाठी त्यांनी फ्रान्समध्येच जॉब करायचं ठरवलं आहे. थोडी सुट्टी घेऊन दोघं आली आहेत म्हणून तर हा कोकण ट्रिपचा कार्यक्रम आपण जमवला.

दुसऱ्या दिवशी रत्नागिरीला जाताना, दोन्ही बाजूंच्या मागे पळणाऱ्या झाडांसारखं मृणालचं मन मागे पळालं. परवेजच्या जन्मानंतर आपण नोकरी सोडली तरी अनघा, रेखा आणि आपण महिन्यातून एकदा तरी गप्पांची मैफिल जमवतो. अशाच एका मैफलीत बोलता बोलता अनघा म्हणाली, ‘मृणाल तुझ्या मैत्रीचा खरंच अभिमान वाटतो आम्हाला. किती शांतपणे, सहज निभावतेस तू आयुष्यातले सारे प्रसंग! ‘ 

‘अगदी खरं! तुझ्यामुळे आम्हीही थोडं शांतपणे, संयमाने आयुष्यातल्या प्रश्नांकडे बघायला शिकलो आहोत. ‘ रेखाने अनघाच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

‘आजचं हॉटेलचं बिल मी द्यायचं आहे का? ‘ या आपल्या मिश्किल प्रश्नावर हास्यलहरी उठल्या. रेखा म्हणाली, ‘ एक छोटसं वादळ आलंय आमच्याकडे. त्याला तुझ्या पद्धतीने तोंड द्यायचं ठरवलंय. आमचा संदेश जर्मनीत राहतो हे तुम्हाला माहित आहे. त्याने त्याच्या ऑफिसमधल्या एका मुलीशी लग्न करायचं ठरवलं आहे. ही मुलगी आहे भारतीय, पण एका अनाथाश्रमात वाढलेली आहे. अर्थातच आमच्या साने कुटुंबात हे लग्न कुणालाच पसंत नाही.

‘अगं, काळ कितीही पुढे गेला तरी समाजमन बदलायला खूप वेळ लागतो. आपली तरुण पिढी प्रॉमिसिंग आहे. त्यांचं वागणं आणि विचार अगदी प्रॅक्टिकल असतात. भूतकाळात रेंगाळायला त्यांना आवडत नाही. आपण त्यांच्याशी जुळवून घ्यायला शिकलं पाहिजे. आणि असं वेगळ्या वाटेवरून जाताना त्या मुलांनाही टेन्शन असतं. अशावेळी आई-वडिलांनी मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं की समाजातल्या अर्ध्या लोकांची वायफळ बडबड थांबते आणि मुलांनाही आधार वाटतो. ‘आपण रेखाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

”हो. असाच विचार करून आम्ही दोघांनीही घरच्यांची नाराजी पत्करून संदेशच्या लग्नासाठी जर्मनीला जायचं ठरवलं आहे. ‘

 ॓ ‘॓व्हेरी गुड. अभिनंदन. ‘अनघानेही दुजोरा दिला.॔

॓बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि आज हॉटेलचं बिल मी देणार बरं का! सुनबाईंचे स्वागत म्हणून! रेखा म्हणाली.॔ त्यावर आपण आणि अनघाने हसून दाद दिली.

मुक्कामाचं हॉटेल आलं आणि मृणाल तिच्या आठवणीतून बाहेर आली. हॉटेलमधलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण सर्वांना आवडलं. मनपसंत जेवून गाढ झोपलेल्या मृणालला मोबाईलच्या आवाजाने जाग आली. डोळे उघडून तिनं पाहिलं तर, फिरोज रूमच्या बाल्कनीत असलेल्या छोट्या झोपाळ्यावर बसून ‘टाइम्स’ वाचत होता. फोनवर अनघा होती. अनघाला ॓हॅलो॔ ॔म्हणताना मृणालच्या मनात आलं,  ॓आपल्या कोकण ट्रिपचे फोटो कालच आपण व्हाट्सॲप वर टाकले आहेत.. काय बरं अर्जंट काम असावं अनघाचं?

॓अगं रिटायरमेंटनंतर काहीतरी चांगले कार्यक्रम बघावेत, नवीन ओळखी व्हाव्या म्हणून आत्ता दुपारी मी आमच्या जवळच्या एका नावाजलेल्या महिला मंडळात सभासद होण्यासाठी गेले होते तर त्यांनी माझी मेंबरशिप चक्क नाकारली. कारण माझं आडनाव फर्नांडिस आहे ना, म्हणून! माझ्याबरोबर आलेल्या मैत्रिणीनं त्यांना माझं लव्ह मॅरेज, माझी मराठी कार्यक्रम बघण्याची आवड, मराठी वाचन सारं सांगितलं. त्यांना माझी बाजू पटत होती पण त्यांचे नियम आड येत होते. तू नेहमी म्हणतेस ना की समाजामध्ये आधीच खूप ताणतणाव आहेत. त्यात आपण भर घालू नये. तडजोडीचा मार्ग स्वीकारावा. ते आठवून मी अगदी शांतपणे त्यांच्याशी बोलत होते. नियमाप्रमाणे त्यांचं बरोबर होतं. आणि कालबाह्य नियम बदलायला हवेत हेही त्यांना पटत होतं. मी त्यांना माझ्या माहेरच्या नावानं सभासदत्व दिलं तरी चालेल असे सांगितलं. बघूया त्यांच्या पुढील मीटिंगमध्ये काय ठरते ते. मी एकदम खूप अस्वस्थ झाले म्हणून तुला फोन केला. तू आल्यावर बोलूया परत. एन्जॉय युवर ट्रिप.॔

फोन बंद केल्यावर मृणालच्या मनात उलट सुलट विचारांनी गर्दी केली ज्ञानविज्ञानाने माणसाची भौतिक प्रगती झाली पण माणूस म्हणून त्याची वाटचाल उलट दिशेने होते आहे का? काळ कोणताही असो, स्त्रीपुढचे प्रश्न संपत नाहीत. त्यांचं स्वरूप बदलतं एवढंच. या अफाट विश्वात प्रत्येकाच्या आयुष्याचा मार्ग कोण ठरवत असेल? प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, समस्या वेगळ्या. आपल्या शेजारच्या झोपाळ्यावर जोडीदार म्हणून कोण असेल? की मनासारख्या जोडीदाराची वाट पाहात राहावी लागेल? आपलं फिरोजबरोबरच लग्न ही घटना अतर्क्यच नाही का? सारे देव सारखेच असं आपण म्हटलं तरी आपल्यालाही व्याडेश्वर दर्शनाचीच आस का लागली होती? अनपेक्षित घटना आणि अनुत्तरित प्रश्न यांना गृहीत धरून एकदाच मिळालेल्या या मनुष्यजन्माचा आनंद घेणं श्रेयस्कर नाही का?॔ मृणालच्या मनात विचारांचे आवर्तन उठले होते.

मृणालला उठलेली पाहून फिरोज बाल्कनीतून रूममध्ये आला. गंभीर चेहऱ्याने हातात मोबाईल धरून बसलेल्या मृणालकडे पाहून म्हणाला,

“एनी प्रॉब्लेम? ” 

“नाही रे. नेहमीचंच. चहाच्या पेल्यातलं वादळ. चल,! चहा पिता पिताच सांगते तुला काय झालं ते. ” 

“ओके! नो प्रॉब्लेम….. ” फिरोज हसत हसत म्हणाला. त्याला हसून साथ देत मृणालही उठली.

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लक्ष्मीपूजन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

🌸 जीवनरंग 🌸

☆ लक्ष्मीपूजन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

पावसाळ्याचे दिवस. ६३-६५ चा औंधमधला काळ. त्याकाळी पाऊस पावसाळ्यातच पडे. त्यामुळे बाहेर धुवांधार पाऊस. दरदिवशी न चुकता येणारा रस्ता झाडण्याचा खराट्याचा खर्र-खर्र आवाज त्या मुसळधार पावसातही येतो. मग मात्र माझ्या बाबांचे कुतूहल चाळवते. या गावात येऊन काही काळ उलटून गेलेला असतो. गावाच्या लयीची, गतिची, नादाची हळूहळू सवय होवू लागलेली असते. त्यातलाच हाही एक आवाज. आईबाबांचा सकाळचा दुसरा चहा आणि हा आवाज यांची न चुकता एकत्र येणारी वेळ. एरवी याबद्दल कधीकाही वाटलेले नसते. आज मात्र या पावसात ते गरमागरम चहा पिताहेत आणि बाहेर कोणीतरी रस्ता झाडण्याचे काम इमानेइतबारे करते आहे याने थोडे अपराधी वाटते.

*ते उठतात. दुमजली घराच्या खिडकीतून वाकून खाली पाहातात. ६५-७० ची एक म्हातारी. भिजू नये म्हणून डोक्यावर नावापुरतेच घेतलेले कांबळे. ठिगळं लावून पण नीटनेटकी नेसलेली नऊवारी. हातात लांब दांड्याचा खराटा. पावसाचे वरुन ओतणारे पाणी. रस्त्याच्या कडेला जमलेला ओला पाचोळा. जमेल तसा गोळा करत उचलून पोत्यात गोळा करत पुढे निघालेली असते. *

*बाबांना राहावत नाही. ते वरुनच शुकशुक करून हाक मारतात. कधी कुणी बोलण्याची सवय नसलेली त्या म्हातारीला कुणी आपल्याला बोलावते आहे हेच समजत नाही. बाबा परत एकदा आवाज देतात. आता मात्र चमकून ती आजूबाजूला पाहाते. मग तिचे लक्ष वर जाते. बाबा तिला वर या म्हणून सांगतात. तिच्या चेहर्‍यावर भीती, उत्सुकता याचे मिश्रण पसरते. *

*जिना चढून ती वर येते. बाबा तिला आत बोलावतात. ती अतिशय अवघडून अंग चोरून भिंतीला टेकून उकीडवी बसते. बाबा आईला चहा आण म्हणून सांगतात. आई एक जादाची कपबशी घेऊन तिच्या समोर सारते. ती काहीच बोलत नाही. तिच्या गालावरून येणारे पाणी तिच्या डोळ्यातले की पावसाचे याचा पत्ता न लागू देता ती म्हणते, “ही कपबशी चालत नाय मला. म्हाराची आहे मी मास्तरा. “*

*बाबा हसून म्हणतात, “आम्हाला चालते, घ्या चहा” ती यावेळी मात्र थोडी जिद्दिने म्हणते, “तुमाला चालंल. पण म्यास्नी नाय चालत तुमची. पिचकी, कानतुटकी काडा एकादी. त्यातनंच मी घेतो बगा च्या. तुज्याबद्दल आयकून हाय मी मास्तर गावात. भला मानूस तू. तुला ईटाळ केला मी तर गावात नाव नाय र्‍हायचं बग” आता मात्र आई हसून म्हणते, “बाई, आजपासून ही तुमची कपबशी. आम्ही नाही वापरणार. हवं असेल तर कान मोडून ठेवते उद्याला. पण रोज आमच्या घरापाशी आलात की वर चहा घ्यायला येत जा, आणि मग पुढे जा. “*

*म्हातारीच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर अडकून राहिलेले उरलेले पाणी ओघळते. अंगावरच्या जीर्ण कपड्यासारखंच फिकं हसून ती मान डोलावते. *

*त्यादिवसापासून बायजाबाई आमच्या घरी नवाच्या सुमारास चहा घ्यायला येवू लागते. तिच्या खराट्याचा आवाज लांबरून येवू लागे. तो आला की आई चहाचे आधण टाके. ती घरापर्यंत पोचे तोवर चहा उकळलेला असे आणि ती जिना वर चढून येईपर्यंत तो कपात असे. आई, बाबा आणि बायजाबाई तिघेजण कधी मूकपणे तर कधी काहीबाही गप्पा मारत चहा संपवत. *

*बाबा शाळेला जात, बायजाबाई पुढचा रस्ता झाडायला आणि आई तिच्या पुढच्या घरकामाला. आई कधी तिला चहाबरोबर भाकरी – पोळीचा तुकडा नाहीतर इतर काहीबाही देई. ती तो आनंदाने खात असे. सणासुदीला तिच्यासाठी जेवणही बाजूल काढून ठेवले जावू लागले. या बायजाबाईचं गावाच्या बाहेर एक झोपडं. नावापुरतं रात्रीच्यावेळी झोपायला आसरा देणारं. तिच्या मागच्यापुढच्या कुणाचाच पत्ता तिला माहीत नाही. या जगात दिवसभर गावचे रस्ते झाडायला जन्मल्याप्रमाणे ती सारा दिवस गावात घालवी. कोणी शिळे-पाके कधी आंबलेले खायला देई. बस हेच ते काय आयुष्य बायजाबाईचे. कामाला मात्र चोख. गावातल्या रस्त्यावर कधीच कचरा दिसत नसे आणि त्याचे श्रेय बायजाबाईचेच. *

 

*अशीच ती एकदिवस नेहमीप्रमाणे चहा प्यायला वर आली. आईने चहा केला एकीकडे आणि दुसरीकडे दाण्याचं कूट करायचं म्हणून दाणे भाजायला घेतले. त्याचा खमंग वास घरभर पसरला. चहा पिऊन झाला, बाबा शाळेत गेले. तरी बायजाबाई आज थोडी घुटमळलीच. आईने शेवटी विचारलं, “काय गं बायजा, काही हवंय का? ” ती म्हणाली, “बाये, दाने लय आवडतात बग मला. वासानं जीब चाळवली, देतिस काय वायचं खायाला”. *

 

*आईनं “अगं त्यात काय एवढं” असं म्हणत भाजलेले, अजून गरम असलेले थोडे दाणे तिच्या समोर वाटीत ठेवले. तसं बायजा मान हलवत म्हणाली, “बाये, हे असले नगं. भाजतान काळे पडल्याले दे”. “अगं, असूदे हे चांगले खा की मी देते तर” असं म्हणत आई तिला आग्रह करू लागली. तसं बायजाबाई म्हणाली “अगं माय, तू देशील गं. आनि मंग माजी जिब सरावली ते खायाला की ते काळे जळलेल नाय की गं जानार. बाकीचे सगले ते तस्लेच देतात बग. तूही आपले तेच दे”*

 

*यावर काय उत्तर द्यावं, हे न सुचलेल्या आईनं मग जमतील तेवढे काळे दाणे बाजूला केले आणि तिला दिले. त्यादिवसापासून मग आई थोडे जास्तच दाणे काळे करायला शिकली. जेंव्हा आई दाणे भा़जे त्यावेळी बायजाबाईसाठी काळे दाणे बाजूला काढून ठेवू लागली. *

 

*शेवटी आयुष्याचा आखून दिलेला मार्ग पुढे जात असतो. मी आणि माझी बहीण यांच्या जन्मानंतर, लहान गावात शाळा नसल्याची तीव्र जाणीव बाबांना होवू लागते. आणि शेवटी औंध सोडून सांगलीला त्यांच्या मूळ गावी जायचे ठरवतात. बातमी गावात पसरायल वेळ लागत नाही. एव्हानाच्या ७-८ वर्षांच्या काळात आई-बाबांनी माणुसकीची बरीच पुण्याई गोळा केलेली असते. बातमी पसरल्यापासून गाववाल्यांच्या घरी चकरा सुरू होतात. मास्तरांनी गाव सोडून जाऊ नये म्हणून आर्जवे, नवस, अगदी प्रेमाच्या धमक्याही देऊन होतात. परंतू मास्तर बधत नाही हे पाहून राजासकट गावावर दु:खाचे सावट पसरते. *

 

*जायचा दिवस हळूहळू जवळ येवू लागतो. नेहमीप्रमाणे सकाळच्या चहाला बायजाबाई येतच राहाते. बातमी तिच्यापर्यंतही पोचलेली असते पण ती आईबाबांना “जाऊ नका” असे कधीच म्हणत नाही. “मास्तर, रस्ता जिकडं नेतो तिकडं जायलाच पायजेल की. खुश्शाल जा. सगळं भलंच होईल”, एवढंच म्हणत राहाते. *

 

*आईबाबांचा निघायचा दिवस उजाडतो. सकाळचा शेवटचा चहा प्यायला बायजाबाई नवाला हजर होते. मूकपणे समोर येवून बसते. आईनं चहाचा पुढं केलेला कप घेते, आणि एका चुरगळलेल्या वर्तमानपत्राच्या कागदाची पुडी बाबांसमोर सरकवते. “हे काय गं बायजा”, म्हणत बाबा ती हातात घेऊन उघडतात. आणि त्यांच्या चेहर्‍यावर आश्चर्य मावत नाही. ते न बोलता पुडी आईच्या हातात देतात. आई पाहाते तर चांदीचं उदबत्तीचं घर. *

 

*बाबा कसेबसे शब्द गोळा करत बायजाला विचारतात, “बायजाबाई, हे काय हो? कशासाठी? “*

 

*बायजा उत्तरते, ” माय आणि तू कायम मला देत आले. म्या कदीबी काय नाय दिलं तुमास्नी. म्हून. ते आप्ला राजा येडंच हाय. दिवाळीच्या वक्ताला मला चांदीचं नाणं दिल्तं बग कदी. आता म्या ते काय खाउ? प्वाट भरंल का माजं त्यानं, त्याचं हे करून आणलं गावात जाऊन. तुमि दोगंबी करताय की द्येवाचं मंग मलाबी आसिर्वाद मिळंल न्व्हं”? *

 

*बायजाच्या डोळ्यातला तो पहिल्या दिवशीचा पाऊस आज आईबाबांच्या डोळ्यात उतरतो. हे आम्हाला न देता विकलं तर त्याचे पैसे मिळतील, असे तिला सांगणे म्हणजे तिच्या प्रेमाचा आत्यंतिक अपमान हे बाबांना उमगते. ते न बोलता ती मोलाची भेट स्वीकारतात. बायजाबाई गडबडीनं निघते आणि म्हणते “आज रस्ते लवकर स्व्च करायचं हायती. माझ्या मास्तरचा टरक जानार नव्हं का त्यावरून”. *

 

*शेवटी दुपारचा ट्रक निघतो. बाबा ट्रकवाल्याला हळू चालवायला सांगताता. कारण गावातली शंभर एक माणसं ट्रकमागे चालत वेशीपर्यंत पोचवायल येत असतात. शेवटी ट्रक गती पकडतो, हात उंचावतात. त्यात टरकाला ओवाळून कानशिलावर बोटे मोडणार्‍या बायजाचेही हात असतात. *

 

*सांगलीला आल्यावर कित्येक दिवस आई भाजल्यावर काळे दाणे बाजूला काढत राहाते. त्याने एक बरणी भरून जाते. ते खाणारे मात्र नसते कोणी. शेवटी मात्र तिला लक्षपूर्वक दाणे कमी काळे करण्याची सवय लावून घ्यावी लागते. चांदीचे उदबत्तिचे घर देवघरात विराजमान होते. त्यात लावल्या जाणार्‍या उदबत्तीच्या धुरांच्या वलयाप्रमाणं काळाची वलयं उठत राहातात. त्या अस्पष्ट होत जाणार्‍या धुराप्रमाणं बायजाबाईही विस्मृतीच्या पड्द्याआड अस्पष्ट होत जाते. मधेच कधीतरी तिची गोष्ट बाबा कुणाला तरी सांगत राहातात. त्यावेळी तिच्या आठवणींचा सुवास उदबत्तीसारखाच सारे आसमंत सुगंधीत करत असतो. *

 

*२००८ मधे आईबाब इथे अमेरिकेत येतात. भडंग, भाजणी, गोडामसाला, मेतकूट असे सर्व काढून झाल्यावर बाबा एक मखमली डबी काढतात. म्हणतात काहीतरी आणलंय तुझ्यासाठी. माझ्या बाबांना सोन्या-चांदीच्या वस्तू घडवून घेण्याची दांडगी हौस. तसेच काहीतरी असणार असे मनाशी म्हणत मी ती उघडते तर आत लक्ष्मीची चांदीची देखणी मूर्ति. *

 

*मी बाबांना म्हणते, “बाबा किती सुरेख घडवलेली आहे ही. पण कशासाठी हे इतकं महागाचं. शिवाय तुम्हाला माहीत आहे, मी पूजा वगैरे काय करत नाही”. *

 

*बाबा म्हणतात, “अगं लक्ष्मीची कुठाय ही? ही आहे बायजाबाईची. तिचं उदबत्तीचं घर आणि काही थोडी चांदी माझ्याकडची घालून बनवली मी ही. कष्ट करून मिळवलेले धन सढळपणे दुसर्‍याला देता यायला हवे हे शिकलो त्या लक्ष्मीकडून. म्हणुन तिची मूर्ति करुन घेतली. आता तुझ्याकडे सांभाळ”*

 

*मी निशब्द होते.. मी खरे तर बायजाबाईला कधी पाहिलेले नसते, त्यावेळी माझा जन्मही झालेला नसतो. त्या डबीत कापसात गूंडाळून ठेवलेल्या मूर्तिला मी हलकेच स्पर्श करते. त्या मखमलीत मला तिच्या खरखरीत हातांचा स्पर्श जाणवतो. ती डबी मी ठेवून देते. *

 

*तेंव्हापासुन दिवाळीत लक्ष्मीपू़जनाला आवर्जून पूजा करते ती बायजाबाईची. आणि या लक्ष्मीकडे मागणे मागते की “माये, तुझ्यासारखे नितळ मनाचे धन मलाही लाभू दे”. *

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : शुभदा भा. कुलकर्णी 

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “आनंदी…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? जीवनरंग ?

☆ “आनंदी…” ☆ श्री मंगेश मधुकर

नमस्कार!! “मी आनंदी”

कोणी सेलिब्रिटी नाही.

तुमच्यासारखीच सामान्य माणूस.

आजचा दिवस एकदम खास,

माझा वाढदिवस,

सकाळी छान आवरलं.

रात्री आठवणीनं आणलेला केक स्वतःला भरवताना विचारचक्र सुरु झालं.

“आनंदीबाई, आतापवतो तब्येतीनं छान साथ दिलीय. डायबेटीस, बीपी हे पाहुणे अजून तरी लांबच आहेत. आज त्रेचाळीस पूर्ण, लवकरच पन्नास मग साठ 

बाप रे, इतकं आयुष्य नको.

हातीपायी धड आहे तेव्हाच कारभार उरकलेला बरा. त्यातही झोपेतच झालं तर सोन्याहून पिवळं. आतापर्यंत कोणाला त्रास दिला नाही. पुढेही नको. पुन्हा एकदा हॅपी बड्डे टु मी. ”आरशात पाहत स्वतःला भरभरून शुभेच्छा दिल्या.

खूप वर्षापूर्वी आई-वडील गेले.

तेव्हापासून एकटीच.

भाऊ-बहीण नाही.

जबाबदारी नको म्हणून नातेवाईकांनी अंतर राखलं.

ओळखी खूप आहेत परंतु मित्र-मैत्रिणी नाहीत.

लग्नाचा योग नव्हता.

एकदोन अनुभवानंतर त्या वाटेला परत गेले नाही.

असो.. जाऊ दे.

निदान आजतरी हे रडगाणं नको.

माझं जग फार छोटं.

राहती खोली आणि छोटी टपरी,

दोन्ही आई-वडिलांकडून मिळालेलं.

टपरी म्हणजे माझा जीव की प्राण…

कमाईचे एकमेव साधन.

सकाळी नऊ ते रात्री नऊ तिथचं.

२० वर्षे एकच रुटीन.

एकटेपणाची इतकी सवय झाली की आता सोबतीची भीती वाटते.

तशी मी एककल्ली, फटकळ, तापट स्वभावाची.

कोणाचाही मुलाहिजा न राखता बोलणारी,

खडूस, भांडखोर, फाटक्या तोंडाची म्हणून कुप्रसिद्ध..

म्हणूनच सगळे चार हात अंतर राखून.

खरं सांगायचं तर मी अशी नाहीये पण एकट्या बाईला जगात टिकायचं असेल तर 

काहीतरी मुखवटा घालावाच लागतो.

मी तेच केलं.

रोजच्याप्रमाणे दुकानात बसले होते.

वाढदिवसामुळे मन प्रसन्न अन छान मूड होता.

समोर दहा-बारा वर्षाची मुलं क्रिकेट खेळत होती.

दुकानाजवळच एकजण फिल्डिंग करत होता.

सहज मनात आलं. त्याला बोलावलं अन चॉकलेट दिलं.

अनपेक्षितपणे मिळालेल्या गिफ्टमुळे खुष झालेला पोरगा मनापासून हसला.

त्याचा खुललेला चेहरा पाहून मलाही मस्त वाटलं.

*आपल्यामुळं आनंदी झालेला चेहरा पाहणं यापेक्षा जगात सुंदर काहीही नाही. *

काही वेळानं लक्ष गेलं तेव्हा खेळ थांबलेला अन सगळे दुकानाकडे पाहत होते.

काय झालं असेल याची कल्पना आली.

सर्वांना बोलवून चॉकलेट दिलं. मुलं एकदम खुष.

‘बड्डे!!’एका पिटुकल्यानं विचारलं.

“हो, म्हणूनच चॉकलेट दिलं”

प्रत्येकानं शेकहँड करत ‘हॅप्पी बड्डे’ केलं.

फार फार भारी वाटलं. मुलं खेळायला गेली.

काही वेळानं घोळका परत आला.

“काय झालं. आता काही मिळणार नाही. ”मी विनाकारण डाफरले.

मुलं एकमेकांकडे टकमका बघायला लागली.

एकानं कुठून तरी तोडून आणलेलं पिवळं फुल पुढं केलं.

“माझ्यासाठी!!”मी हरखून विचारलं.

तेव्हा माना डोलावत सगळे म्हणाले “बड्डे गिफ्ट”

त्यावेळेस जे वाटलं ते सांगता येणार नाही.

खूप भरून आलं. मान फिरवून ओढणीनं डोळे पुसले.

प्रत्येकाला बिस्किट पुडा दिला. सगळे डबल खुष.

पुन्हा एकदा शेकहँड करत “हॅपी बड्डे”केलं अन खेळायला गेले.

मी मात्र बराच वेळ त्या फुलाकडे पाहत होते.

वाढदिवसाला मिळालेलं माझं पहिलंवहिलं गिफ्ट.

मुलांचं खूप कौतुक वाटलं. त्यांच्यामुळे माझा वाढदिवस स्पेशल झाला.

खूप सारं समाधान अन आनंद मिळाला.

मी आज फक्त नावापुरती नाही तर खरोखर *“आनंदी”* होते

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ घसरगुंडी… ☆ मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ?

☆ घसरगुंडी… ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

दुपारचा एक वाजून गेला होता. मनोजची मालगाडी लोणावळा ओलांडून कर्जतच्या दिशेने निघाली होती. मनोज गेली पंचवीस वर्षे रेल्वेमध्ये मालगाडीचा गार्ड म्हणून कार्यरत होता. मनोजने आयुष्याचा मोठा भाग घाटातल्या या रूटवर घालवला होता. येथल्या वाऱ्याचा वेग, वळणे, उतारांचे रागरंग —सगळं सगळं त्याला पाठ होतं.

आज सिमेंटच्या गोणींनी भरलेल्या ५८ वाघिणी घेऊन तो मुंबईला निघाला होता. मालगाडीच्या डब्यांना वाघीण नाव कोणी बरं ठेवलं असेल? त्याला नेहमीच गंमत वाटायची.

पळसदरी स्टेशन येत होतं, इथून कर्जत यायला साधारण पाच किलोमीटर, तिथून कल्याणला पोचेपर्यंत आणखी एक तास, मग तासाभराने ठाणे आणि आणखी एखाद्या तासाभरात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गाडीचे शेवटचे स्टेशन. मनोज मनातल्या मनात हिशेब करत होता. थोडेफार सिग्नल आणि सायडिंग जरी धरलं संध्याकाळी सहापर्यंत ड्युटी संपेल असा अंदाज तो बांधत होता.

घाट संपून कर्जत ओलांडले, की मग सोबत आणलेली पोळीभाजी खावी अशी गणितं तो करत असतानाच वॉकीटॉकी खरखरली, विनेशचा – गाडीच्या ड्रायव्हरचा आवाज ऐकू येत होता – “मनोज, वेग वाढतोय गाडीचा … ब्रेक नीट पकडत नाहीयेत बहुतेक. ”

मनोज क्षणभर थिजला.

…. घाट उतरताना ब्रेक नीट लागत नाहीयेत?

मनात थंड शिरशिरी उठली, जीवाची कालवाकालव झाली. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं.

दुनिया जरा जास्तच वेगाने मागे पडत होती. झाडं धावत असल्यासारखी दिसत होती.

वॉकीटॉकीवर काही सेकंदातच पुन्हा विनेशचा आवाज आला – आवाजातला कंप आता स्पष्ट जाणवत होता : “एअर ब्रेक्स प्रतिसाद देत नाहीत… डायनॅमिक ब्रेक लावतोय… पण अजून तो पुरेसा होत नाहीये. ”

मनोजने डोळे मिटले.

पंधरा वर्षांपूर्वी ऐकलेली एक गोष्ट आठवली—

…. “बिघडलेल्या ब्रेकसह घाट उतरणं म्हणजे डोंगराशी झुंज – मृत्यूशी झुंज. ”

आज ती झुंज त्याच्या वाट्याला आली होती.

मनोजने त्याच्या डब्यातील – ब्रेकव्हॅनमधील हँडब्रेकचे चक्र घट्ट पकडलं.

आणि हळूहळू, मोजक्या प्रमाणात त्याने ते चक्र फिरवत ब्रेक लावायला सुरुवात केली—

– – त्याला त्याच्या पहिल्या ट्रेनिंग ऑफिसरने शिकवलं होतं: “ब्रेक झटके देत लावू नकोस, एकदम अचानकही ब्रेक लावू नकोस….. गाडीसोबत बोल. तिच्याशी संवाद साध. ती तुला काय सांगते ते ऐक. त्यानुसार ब्रेक लाव. ”

गाडीची गती जास्त होती, हँडब्रेकचे चक्र फिरवणं कठीण होत चाललं होतं.

जोर लावून ते चक्र फिरवताना घाम फुटत होता, पण त्याने हातांची पकड सैल होऊ दिली नाही.

तिकडे रेल्वे इंजिनमध्ये, समोर, विनेश जिद्दीने लढत होता—एअर ब्रेक, डायनॅमिक ब्रेक वापरत होता, सोबत असलेली रेती ट्रॅकवर फेकत होता (सँडिंग) — मनोज आणि विनेश – दोघेही एकाच शत्रूशी झगडत होते—उतरण आणि त्या उतरणीवर गाडीचा कमी न होणारा वेग.

गाडी आता घाटात जोरात धावत होती. जिथे ताशी ६० किलोमीटरपेक्षा कमी गती असायला हवी तिथे वेग ताशी ७५ किलोमीटरच्या पुढे गेला होता.

– – वारा ब्रेकव्हॅनमध्ये चाबकासारखा घुसत होता.

– – डबे हलत होते, अडखळत होते, थरथरत होते.

मनोजचं हृदय प्रत्येक चाकासोबत धडधडत होतं.

तो हळू आवाजात पुटपुटला— “हळू धाव माझे आई, … शांत हो, … थांब ग…”

…. जणू गाडी त्याचा आवाज ऐकत होती.

विनेशचा आवाज आला – हताश, कमकुवत – “मी नाही थांबवू शकत आहे हिला, नियंत्रण सुटतंय, संपतंय सगळं. ”

मनोजचे श्वास थांबले…..

डोळ्यासमोर जीवाभावाच्या सगळ्यांचे चेहरे तरळून गेले –

सकाळी चहा करत असलेली बायको,

अजून झोपलेली मुलं,

…. आणि विनेशचाही चेहरा – विनेश आणि स्वतःला तो नेहमीच दोन डोळे म्हणायचा, “दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी” म्हणायचा. ५० च्यावर डबे, पाऊण किलोमीटर अंतर असायचं ड्रायव्हर आणि गार्डमध्ये, असायचे एकाच मालगाडीच्या दोन टोकांना, पण क्वचितच भेटायचे एकमेकांना.

मनोजने दीर्घ श्वास घेतला, स्वतःला स्थिर केलं आणि अवसान आणून, शांत स्वरात विनेशला म्हणाला: “हार मानू नकोस. आपण दोघं आहोत. दोघं मिळून थांबवू गाडीला. तू रेल्वे कंट्रोलला सूचना दे. ”

“पळसदरी कर्जत उतारावर मालगाडीचे ब्रेक लागत नाहीयेत” – कंट्रोल रूमवर जणू विजेच्या लोळासारखी बातमी कोसळली. प्रशिक्षण, अनुभव आणि धैर्य पणाला लागलं, सिग्नल adjust केले गेले, मालगाडीच्या मार्गात सुदैवाने अन्य कोणती गाडी नव्हती, कर्जत स्टेशनपुढील गाडीचा मार्ग बदलला गेला, वाहतुकीचा अडथळा नसलेला ग्रीन कॉरिडॉर तयार केला गेला, जास्त रहदारीच्या नेहमीच्या ट्रॅकवरून सायडिंगच्या कमी वापरातल्या ट्रॅकवर गाडी वळवली जाणार होती. दोन किलोमीटर नंतर या ट्रॅकला अशा प्रसंगांसाठीच बांधलेल्या कॅच सायडिंगची तयारी होती—

कर्जत स्टेशन जवळ येत होतं, स्टेशनवर रेल्वे स्टाफ सज्ज होता, सिग्नलमन, पॉईंटमन, स्टेशनमास्तर – सगळे डोळ्यात प्राण आणून धडाडत येणाऱ्या गाडीकडे पाहत होते.

विनेश ओरडला: “वेग अजून जास्त आहे! ”

मनोजने होता नव्हता तो सगळा जोर लावून हँडब्रेक पूर्ण ताकदीने फिरवला.

हात भरून आले होते, हातांना रग लागली होती…

– – – आणि गाडीचा वेग कमी होऊ लागला….

…. खरंच कमी होत होता का भास होऊ लागले होते?

नाही, हा भास नव्हता. वेग नक्की कमी होत होता, खूप नाही, पण पुरेसा.

उतरण जणू थोडी माघार घेत होती.

कर्जत स्टेशन कधीच मागे पडलं होतं, भिवपुरी स्टेशनही मागे गेलं होतं. वेग खूप कमी झाला होता, आणि शेवटी तो क्षण आला—

डायनॅमिक ब्रेक, हँडब्रेक, सँडिंग, आणि माणसांची इच्छाशक्ती — — सगळ्यांनी मिळून त्या ५८ डब्यांच्या राक्षसी गाडीला थांबवलं होतं.

गाडी एक क्षणभर थरथरली…

आणि मग घनघोर शांतता पसरली.

मनोज थकून एका बाकावर कोसळला.

डोळ्यातून घळघळा पाणी आलं. तो वॉकीटॉकीवर कसंबसं बोलला – “वाचलो आपण…”

अधिकारी आले, तपास सुरू झाला.

ड्रायव्हरचे हात अजूनही थरथरत होते.

मनोजच्या तळहातांवर टरटरून फोड आले होते.

ब्रेकच्या घर्षणाने चाकं गरम झाली होती, पण सुरक्षित होती.

लोकांनी विचारलं—

“नेमकं कशाने वाचवलं तुम्हाला? ”

मनोज फक्त एवढंच म्हणाला—

“घाट उतरायला सुरुवात करताना नियमानुसार ब्रेकची चाचणी केली होती, तेव्हा ब्रेक व्यवस्थित होते. नंतर काय बिनसलं, माहित नाही, पण आत्ता गाडी कशी थांबली विचाराल, तर रेल्वेने केलेला ग्रीन कॉरिडॉर, विनेश – मी आणि आमची ही गाडी … आणि मुख्य म्हणजे देवाने – डोंगराने – निसर्गाने आम्हाला दिलेली एक संधी – या सगळ्यांमुळे गाडी थांबली. ”

प्राथमिक तपास पूर्ण झाला, रात्री घरी आल्यावर त्याच्या लहानग्या मुलीने मनोजला विचारलं: “बाबा, आज मी बागेत खेळायला गेले होते. तिथे एक मस्त नवी घसरगुंडी आली आहे. मी तिच्यावर खूप खेळले. झूSSम करून खाली येताना पोटात गोळा येत होता. पण मज्जा आली. तुम्ही आज काय केलंत? आज काही विशेष झालं का? ”

त्याने तिच्याकडे पाहिलं…..

घाटातला गाडीचा वेग, तो सोसाट्याचा वारा, ती भीती, ते धैर्य, आणि सरतेशेवटी थांबलेल्या गाडीचा तो शांत क्षण – आजची त्याच्या गाडीची घसरगुंडी, त्याच्या पोटात आलेला गोळा – हे सगळं सगळं क्षणार्धात त्याच्या नजरेसमोर तरळून गेलं – तो हलकेच हसला…..

“हो, ” तो म्हणाला, “मी सुखरूप घरी आलो… हेच सर्वात विशेष झालंय आज. ”

(२७ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे मुंबई घाट उतरताना, पळसदरी रेल्वे स्टेशननंतर एका मालगाडीचा वेग नियंत्रणात येत नव्हता. या सत्यघटनेवर आधारित हा लेखन प्रपंच. पात्रांची नावे काल्पनिक आहेत.)

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परीक्षा… ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ ‘परीक्षा…’ ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

” दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेत असत..”

अजय अनिता दोघे ही एकाच college मधे शिकत होते.•• दोघे ही हुषार. त्यामुळे लगेचच चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. हेही त्यांच्या लक्षात आले की They are in love. तेंव्हा त्यांनी लग्न करायचे ठरविले. दोघांच्या घरी एकमेकांची माहिती होतीच, त्यामुळे लगेचच दोन्ही घरचे भेटले व लग्न ठरलं.••••

अनिता ने मात्र सर्वांसमोर एक अट ठेवली. ती म्हणाली••• मी एकत्र कुटुंबात राहणार नाही. हे ऐकून अजय व त्यांचे आई-वडील तर चकित झालेच ,बरोबर अनिता चे आई-वडील पण अनिता कडे आश्चर्याने बघू लागले ••

लगेचच अजय चे बाबा म्हणाले, ठीक आहे. मला अनिता चे कौतुक वाटतं की तिने हे लग्नाआधी सर्वांसमोर सांगितले.•••थोडा वेळ द्या आम्हाला .••• आपण उद्या पुन्हा भेटू व पूढचे ठरवू .असं म्हणून बाबांनी परिस्थिती सांभाळुन घेतली.•••

घरी येताना सर्व शांत होते .अजय व आई खूप disturb आहे .हे बाबांच्या लक्षात आले .

घरी आल्यावर बाबा म्हणाले ••••

अरे !! तुम्ही वेगळे राहिला तर आम्हाला काही हरकत नाही .••जवळ राहिलं म्हणजेच प्रेम असत का ? अनिता चांगली मुलगी आहे. तुम्ही दोघे एकमेकांना मागच्या पाच वर्षांपासून ओळखता. चांगली शिकलेली आहे .दिसायला सुंदर आहे. मुख्य म्हणजे तुला आवडते ना •••.मग आम्हाला काही हरकत नाही ••

.आजी मात्र नाखुश होत्या. त्यांनी एकुलत्या एक सुनेबद्दल बघीतलेली सर्व स्वप्न एका क्षणात संपल्यासारखी त्यांना वाटलं. •••.अजय फक्त ऐकत होता .••••

दुसऱ्यां दिवशी अजयने अनिताला समजविण्याचा खूप प्रयत्न केला .पण काही उपयोग झाला नाही .••••

बाबां मात्र आईला समजविण्यात यशस्वी झाले.•• मुलांच्या सुखासाठी व आनंदासाठी आई वडील नेहमीच कोणतेही निर्णय लवकर घेतात.••कोणत्याही प्रकारची तडजोड करायला ते लगेच तयारी दाखवतात .••••

आता अजय अनिता चा संसार सुरू झाला. आई बाबांनी स्वतः लक्ष देऊन त्यांच्या घरातील सर्व सामान अनिता च्या पसंती ने घेतले .••अगदी चमच्या पासून फ्रीज पर्यंत सर्व वस्तू घरात तयार होत्या ••••.

दोघांची नोकरी होती. अजय आठवड्यातून एकदा घरी यायचा ••.येताना फोन करून , विचारून पिशव्या भरभरून तो आई बाबांकरिता त्यांची औषधे ,फळ ,भाज्या आणून देत असे .•••

बाबा म्हणायचे. अरे !!मग मी काय करू??? आम्हाला बाहेर जायचे कारणच मिळत नाही.•• तेंव्हा अजय हसून म्हणत असे ,•••• बाबा !! तुम्ही फक्त आईला घेऊन फिरायला जात जा.•• अनिता मात्र काही खास कारण असेल तरच यायची.•• आईला त्याचे खूप वाईट वाटत असे .बाबांना याची जाणीव होती. ते खंबीर होते .बायकोला सांभाळायची जबाबदारी पण माझीच आहे .हेही बाबांना माहीत होते .••••

बाबा म्हणजे एक प्रसन्न चित्त व्यक्तिमत्त्व .••नेहमीच वेगळ्या आयडिया असतात त्यांच्या जवळ .••• आणि आपली आयडिया कशी छान आहे ,हे त्यांना पटवून पण देता येत .••••

दोघांची गाडी हळूहळू रुळावर येऊ लागली. वरवरून आई खूष आहेत ,असं दाखवत जरी असल्या ,तरी कुठे तरी त्यांचे मन दुखावले होते .••••

अजय आज येणार हे कळलं की आई अगदी तयारीला लागायच्या.••• बाबा लिस्ट घेऊन आईंनी सांगितले ले सर्व साहित्य आणून द्यायचे .•••आई वेगवेगळे पदार्थ तर करायच्याच. बरोबर त्यादिवशी चा डबा म्हणून दोन तीन भाज्या, पोळ्या पण द्यायच्या••. अरे !! तेवढंच अनिताला काम कमी होईल. असं म्हणायच्या.••• नोकरी करुन सर्व करताना ती थकत असेल .••••

अनिता मात्र आपल्या विश्वात अगदी दंग होती . रमलेली होती .••आता तर project leader होती •••.त्यामुळे आनंदात होती••.पण वाढत्या कामाबरोबरच तिचा stress ही वाढत होता.••••

कंपनी मधे employees साठी कधी कधी काही कार्यक्रम आयोजित होत असतात.••• आजचा कार्यक्रम••

‘ Stress management’ वर होता.••••

अनिता ने attend केला ••.वक्ता अर्थातच तयारीने आले होते .••त्यांनी ‘ what is stress?’ त्यांचे शारीरिक व‌ मानसिक कसे परिणाम होतात. stress management करिता काय काय आपण करू शकतो?? त्याबद्दल ते बोलले .योग करणे , regular excercise करणे का गरजेचे आहे हे सांगितले .••••

आपले भाषण संपवताना ते म्हणाले तुम्ही सर्व शिकलेले तरूण अहात. पैसा , post , promotion , फक्त याचाच विचार करू नका . कुठे तरी फुल स्टोप लावायला शिका . कुठे थांबायचे ?? हे ठरवायला शिका .••••

आनंद केंव्हा घेणार आयुष्यात ?? आनंद घेणे ही वर्तमान काळातील गोष्ट असते . भविष्यात घेऊ म्हणून पूढे ढकलायची गोष्ट नव्हे..••••

Life मधे priorities ठरवायाला शिका. पैसा आणि फॅमिली दोन्ही महत्वाचे.••• freedom, privacy. च्या नावाखाली आपल्या माणसांहुन आपण दूर तर होत नाही ना . याचे भान ठेवा .•• एकटेपणा हे सुद्धा स्ट्रेस चे एक मोठे कारण आहे .•• जेंव्हा व्यक्त व्हायला कोणी विश्वासाचे मिळत नाही.तेंव्हा •• स्ट्रेस एकत्र होत जातो ••. तुमच्या या नवीन कल्चर मधे नोकरी सोडणे ,बदलणे, किंवा नोकरी जाणे, या सहज घडणाऱ्या गोष्टी आहेत. •• त्यामुळे अस्थिरता व अनिश्चितता या दोन्ही तलवारी सतत टांगलेल्या असतात तुमच्या आयुष्यात .• निश्चित काही गोष्ट असेल तर ती तुमची फॅमिली आहे .••तो तुमचा आनंद आहे. तेंव्हा विचार करा.••

तुम्ही त्या सर्वांबरोबर जीवापाड तडजोड करता जे निश्चित नाही .•••मग परिवार बरोबर का नाही ??? ती तर जास्त सोपी व सहज गोष्ट आहे .ओझ आणि मन हलकं करायला परिवारासारखी दुसरी सेफ जागा नसते.••• तुमचे कौतुक करायला व तुम्हाला, तुमच्या मुलांना सांभाळायलाही कोणी तरी पाहिजेच ना.••••

माझ्या भाषणात हा उल्लेख मी सर्वात शेवटी जरी केला असला ,तरी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे .•• हे लक्षात ठेवा .••••

अचानक अनिता च्या डोळ्यासमोर अजय च्या आई बाबांचा चेहरा आला .••त्यांनी पाठविलेले डबे ,वेळोवेळी घेतलेली काळजी तिला आठवली .•••

अनिता घरी आली ती वेगळ्याच विचारात.•• येताना तिने बाबांना फोन केला ••.अजय ला पण सुट्टी घ्यायला सांगितले .••••

अनिता अजय उद्या घरी येतायेत . बाबांनी आईंना सांगितले .दोघांच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह??? होते. मिश्रीत भाव होते.•••

बाबा म्हणाले अग !! उद्या अनिता च्या आवडीचा स्वयंपाक कर.••••

दुसऱ्या दिवशी अजय अनिता घरी आले. अनिता ने आई बाबांना सांगितले ,•••

आम्ही येथे तुमच्या बरोबर रहायला येणार आहोत नेहमी करिता .,••

अजय ,आई बाबा पुन्हा एकदा आश्चर्य चकित झाले.•• पण यावेळी मिळणारा धक्का सुखद होता.•••

बाबा म्हणाले •••••

“Yes , you are always welcome .”

फक्त मला पंधरा दिवस द्या. तुमची खोली व्यवस्थित करायला .,••• आई नी बाबांकडे बघीतले , त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व बाबांबद्दलचा अभिमान स्पष्ट दिसत होता.••• .

” दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेत असत. .”

‘संयम ‘आणि ‘माफ करायची ताकद ‘ मनुष्यात असली की सर्व साध्य होते .•••

इतरांकडून कमीत कमी ‘अपेक्षा ‘ व स्वतःकडून जास्तीत जास्त ‘तडजोडी :या दोन गोष्टी प्रत्येकाचे जीवन आनंदी व यशस्वी बनवू शकतात .••••

” चुकीने चूकीच्या मार्गावर गेले तर काही हरकत नाही .पण चूक लक्षात येताच मार्ग बदलायची इच्छा व हिम्मत दाखविणे हे कौतुकास्पद आहे .”••••

म्हणतात ना •••••

“जिंदगी हमें हमेशा एक नया पाठ पढ़ाती है — हमें समझाने के लिए नहीं — हमारी सोच बदलने के लिए. “

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मृत्युला सामोरं जाताना… –  लेखिका : ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ मृत्युला सामोरं जाताना… –  लेखिका : ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर

– एक बोधकथा

आजी तिचं आयुष्य तिनं केलेल्या आयुष्याच्या नियमाप्रमाणे जगली. सत्तरीत फुलांचे हार करून देवाला घालताना ती सुईत दोरा कसा ओवू शकायची हे तिचं तिलाच माहित! पोथी वाचताना डोळ्यातून आसवं का गाळायची हे पण तिचं तिलाच माहित. कामाच्या सरूबाईचा काळा निळा झालेला दंड बघून “सरू, सोड त्याला आता” म्हणून कडाकडा बोलताना ती रागवायची का हळवी व्हायची हे पण तिचं तिलाच माहित!

काही का असेना.. तिच्यातील सच्चेपणा मात्र प्रत्येकाला जाणवत असे. स्वत:ला जे पटतं तेच करण्याची तिची जी धडपड चाले ती बघून घर दार थक्क होत असे. वयाला तिनं कधीच प्राधान्य दिलं नाही. जोवर हात पाय चालत आहेत तोवर आपण कुठलीही गोष्ट करू शकतो हा गाढा विश्वास तिच्याजवळ होता. वर्तमानपत्रात “तुमची आजी” सदर लिहणे काय, पंचाहत्तर वर्षाला स्पॅनिश भाषा शिकणं काय किंवा कराटेचा क्लास लावणं काय.. सारं तिला शोभून दिसायचं.

तिनं स्वत:च्या मृत्युपत्रात लिहून ठेवलं होतं की कुठल्याही परीस्थितीत मला हॅास्पिटलमध्ये नळ्या जोडलेल्या अवस्थेत ठेवू नका. काय वाट्टेल ते झालं तरी. मी माझं आयुष्य माझ्या पध्दतीने जगले आहे आणि माझा मृत्युपण मला हवा तसाच यावा अशी माझी इच्छा आहे! नैसर्गिक पणे येणारा मृत्यु शरीर सुध्दा फार त्रास न होता स्वीकारतं अशी तिची खात्री होती.

आता आजी ऐशीला टेकली होती. पण मनाने वाकली नव्हती. हल्ली शरीर मात्र तिच्या दुर्दम्य इच्छा शक्तीला दाद देत नव्हतं.

एक दिवस सकाळी रोजनिशी लिहित बसलेली असताना ती अचानक जमिनीवर कोसळली…त्या आवाजाने मुलगा व सून धावत आले! त्यांनी क्षणभर विचार केला व तिला ॲंब्युलन्स बोलवून जवळच्या हॅास्पिटलला नेले.

डॉक्टरांनी त्वरीत उपचार करून अर्धांगापासून होणारे नुकसान थांबवण्याचा प्रयत्न केला तरी शरीराची उजवी बाजू पहिल्यासारखी होऊ शकली नाही.. जीव मात्र वाचला होता.

आजी शुद्धीवर आली व स्वत:ला नळ्या जोडलेल्या स्थितीत हॉस्पिटल मधल्या ICU मधे बघताच तिला हे स्वप्न असावं असं वाटलं. तिने स्वत:ला एक चिमटा काढला.. आणि हे स्वप्न नसून सत्य आहे याची तिला जाणीव झाली.

ती भडकली…

मुलगा येताच त्याला म्हणाली, “माझी काय इच्छा होती तुला माहित होतं.. पक्कं माहित होतं. माझ्या व ईश्वराच्या भेटीच्या आड येण्याचा अधिकार तुला कोणी दिला? ”

“अग आई, तू कशामुळे पडलीस हे तरी बघायला नको का? बघ उजवा हात नीट चालत नाही या व्यतिरिक्त तू ठणठणीत आहेस. ” मुलगा काकुळतीला येऊन बोलत होता. “आई, तुला वैद्यकिय उपचार दिले नसते तर तू कदाचित पूर्ण लुळी पांगळी झाली असतीस. त्याचा तुला किती त्रास झाला असता सांग बरं! ” मुलगा समजूत काढत होता.

आजी काही बोलली नाही. ती घरी आली पण घरी आलेली व्यक्ती आजीपेक्षा कुणी वेगळीच होती. रोजनिशी लिहिण्यासाठी हात वळत नव्हता.. प्रसादाचा शिरा अन् खमंग परतलेल्या बेसनाचे लाडू शेजारी पाजारी पाठवता येत नव्हते.. सुईत दोरा ओवता येत नव्हता आणि पोथी वाचण्याआधीच आसवं गळत होती.. तिच्यातलं चैतन्य हरपू लागलं होतं.. ती शुन्यात बघत अंथरुणात पडून रहात होती..

एक दिवस अशीच नैराश्यात पडून असताना तिनं खिडकीतून बाहेर बघितलं.. तीन पायावर चालणारा कुत्रा बघून तिला कौतुक वाटलं… फारसं उडता न येणारा एक पक्षी बागेत थोडं थोडं उडून चारा गोळा करत होता.. नातवानं त्याच्या फोनवर हात नसलेला माणूस पायाने लिहताना दाखवला…

स्वत:चं दु:ख कुरवाळत बसणाऱ्या मनाचा तिला राग आला. आपण कोणी न्यारे नाही! झाडाची फांदी तुटते, पक्षी उडू शकत नाही, कुत्र्याचा पाय तुटतो पण म्हणून ते काही निराश होऊन पडून रहात नाहीत. याच निसर्गाचा आपण एक भाग आहोत. शरीर नाशवंत आहेच! पण मी म्हणजे माझं शरीर नाही!

ती उठली व पूर्वीसारखी तयार झाली.. सुनेनं आश्चर्याने तिच्याकडे बघितलं..

तिनं रोजनिशीची वही घेतली.. डाव्या हातानं रोजनिशी लिहायचा प्रयत्न चालू केला. वेडीवाकडी लहान मुलासारखी लिहिलेली अक्षरे बघून मनापासून हसली.. तिनं ठरवलं की डाव्या हातानेच इतकं सुंदर लिहायचं की सर्वांनी बघत रहावं. एकदा मनाने घेतलं की शरीर पण साथ देऊ लागतं.. डाव्या हाताने परत एकदा श्रीगणेशा सुरू झाला.. जशी अक्षरं सुधारू लागली तशी तिच्या डोळ्यातील चमक वाढू वागली.

तिनं मुलाला जवळ बोलावलं.

“तुझं काही चुकलं नाही रे! माझी आई अशी पडली असती तर मी पण तिला लगेच डॅाक्टर कडेच नेलं असतं.. तू नाही आलास माझ्या व ईश्वराच्या मधे.. अजून ईश्वराला भेटायची वेळ आलेली नाही. रागाच्या भरात बोलले मी.. माफ कर मला! ” मुलाच्या डोळ्यातून येणारं पाणी पुसत ती त्याला म्हणाली, “ज्या वयात उद्याची खात्री नाही त्या वयात सहा महिने मी नैराश्यात वाया घालवले! ”

तिनं वर्तमानपत्रात पाठवण्यासाठी लेख लिहायला घेतला..

मृत्युला सामोरं जाताना..

नुकतीच मी वर जाऊन दार ठोठावून आले आहे. परत आले म्हणून चार गोष्टी सांगते.. अर्धांगाचे निदान झाले आणि माझे मन भरकटले.

कसं मरण हवं असतं माणसाला? शांत, भीतीरहित, झोपेत, नकळत! डॉक्टर नको, हॉस्पिटल नको, नळ्या जोडलेल्या नकोत, व्हेंटिलेटर नको वगैरे लिहणं सोपं असतं.. पण खरी इमर्जन्सी जेव्हा उद्भवते तेव्हा आपण कुठलाच निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नसतो.. अशा परिस्थितीत आपला ज्याच्यावर पूर्ण विश्वास आहे अशा व्यक्तीला पुढचे निर्णय घेण्यासाठी नेमा. तुमचं मन वाचणारी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असावी यासाठी हात पाय धड असताना सतत प्रयत्न करा. मुलगा, सून, नातवंड यांच्याशी अत्यंत विश्वासाचं नात आधीच निर्माण करा.

त्यानंतर मात्र जे घडेल तिच देवाची इच्छा होती हे समजून घ्या.. पण इतरांवर व स्वत:वर रागवण्यात वेळ घालवू नका..

शरीर नश्वर आहे. असेना का! शरीराला झाली इजा, मला नाही हे सतत स्वतःला सांगा.. तुम्ही म्हणजे तुमचे शरीर नाही. तुम्ही म्हणजे तुमची अर्धांगाने लुळी पडलेली बाजू नाही आणि तुम्ही म्हणजे तुमच्या व्याधी नाहीत हे समजून घ्यायचा प्रयत्न करत रहा.

जे त्याने दिले ते घ्यायचे व त्यातील सौंदर्य शोधायचं! मला कधी वाटले नव्हते की डाव्या हाताने मी लिहू शकेन.

आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत जगायचं असतं.. राग, लोभ, हेवे दावे, मान-अपमान यात वाया घालवायचं नसतं!

काल मी तीन पायावर चालणारा कुत्रा बघितला. तो नाही हो रडत बसत. तो उठून अन्नाच्या शोधात हिंडत होता मग आपण आपल्या शरीराकडे बघून का रडत बसायचे?

आलेला दिवस आनंदात घालवा. सांभाळून रहा.

– तुमची आजी

तिनं पेन बंद केलं व सुनबाईला सांगितलं, “आज मी शिरा करते ग.. नैवेद्याला! जमेल मला डाव्या हाताने करायला!

 

लेखिका : ज्योती रानडे

प्रस्तुती :  उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एन्जॉयग्राफी… ☆ नीला महाबळ गोडबोले ☆

नीला महाबळ गोडबोले

??

☆ एन्जॉयग्राफी… ☆ नीला महाबळ गोडबोले

” पोरींनो, सवडीला दीनानाथला ऍडमिट केलय काल दुपारी.. छातीत दुखत होतं म्हणे तिच्या.. ” 

शाळेच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर अप्पीचा मेसेज…

अप्पी सवडीच्या शेजारच्या अपार्टमेंटमधे रहात असल्याने तिला ही बातमी कळलेली..

आम्ही सगळ्या नर्व्हस झालो..

सगळ्याजणींनी पन्नाशी पार केलेली.. साठी दृष्टीपथात आलेली..

कुणाच्या रक्तात साखरेचा शिरकाव झालेला, कुणाचं रक्त विनाकारण उसळू लागलेलं, कुणाच्या डोळ्यांनी मोत्यालंकार धारण केलेले, कुणाच्या वेड्यावाकड्या दंतोजीपंतांच्या जागी आता ” कवळी” नामक कुंदकळ्यांची माळ विराजत असलेली…

कुणी जुन्या गुडघ्याला टाटा बायबाय करून नवीन गुडघोजींची स्थापना केलेली..

पण अजूनपर्यंत सगळ्यांची हृदयं तरूण आहेत, असा गोड गैरसमज होता… त्यामुळे ग्रुपचं नाव ” यंग हार्ट्स ” ठेवलेलं…

अन् म्हणूनच आजच्या या सवडीच्या बातमीनं सगळ्यांची काळीजं धडधडू लागलेली…

” सवडीला हृदयाचा त्रास होऊच कसा शकतो? “… हृदयविकार हा ताणतणावामुळे होतो”.. असा आपला आमचा समज..

आणि सवडीचा ताणतणावातल्या “त” शी दूरान्वयानेही संबंध नसलेला..

सवडी… म्हणजे कु. सविता

आमच्या बरोबरच तिने इयत्ता पाचवीत कन्या शाळेत प्रवेश केलेला..

सावळा रंग, कुरळे केस, जाडसर बांधा, चंद्रासारखा गोल गरगरीत चेहरा, तंद्री लागली की अचानक जोडीदाराशी फारकत घेऊन वेगळ्याच मार्गाने जाणारा उजवा डोळा आणि २४*७ चेह-याला धरून राहणारं दिलखुलास हास्य…

मुद्दामहून तिच्याशी मैत्री करावी असं तिच्यात काहीच नव्हतं… पण ती मात्रं सगळ्यांशी जवळीक करायची..

नाव सविता असलं तरी आम्ही सगळ्या तिला ” सवडी ” च म्हणायचो…

“हसणं” हा तिचा ट्रेडमार्क..

कुणी तिच्याशी भांडलं.. तिचा अपमान केला.. शिक्षक तिला रागावले.. तरी ती हसायचीच…

परीक्षेनंतर पेपर वाटपाच्या वेळी.. “सविता.. शंभरपैकी सात मार्क ” असं म्हणत जोशी सर तिच्या हातात पेपर द्यायचे तेंव्हाही ती तो घेऊन हसत हसत बाकावर जाऊन बसायची.. फक्त यावेळी दातांनी ओठ चावलेला असायचा…

परीक्षेच्या वेळी आम्ही सगळ्या पोरी पोतंभर टेन्शनमध्ये पुस्तकं वाचत असायचो.. ही मात्रं निवांत बसलेली.. मैदानातल्या कबुतरांकडं पहात..

” सवडे, अगं तुला परीक्षेचं टेन्शन येत नाही का गं? ” मी तिला विचारायचे.

” टेन्शन घ्यायचं नाही बघ कशाचच, एन्जॉय करायचं ” ती खळखळून हसायची..

शाळेचा पहिला दिवस. पाचवीचा आमचा वर्ग..

मुख्याध्यापक सर तासावर आलेले. त्यांच्या शिस्तीच्या, कडकपणाच्या कथा थोरल्या बहिणींकडून ऐकलेल्या. आम्ही सगळ्या पोरी टरकलेल्या. ओळखीचा कार्यक्रम सुरू झाला..

वर्षा विष्णु काळे

वैशाली अरूण फाटक

संगीता सखाराम कुलकर्णी

मंजुषा सुरेश महाजन

सुनिता विश्वंभर पाटील..

सुनितानं स्वत:चं नाव सांगितलं.. सरांच्या मनात काय आलं माहीत नाही..

” विश्वंभर हे नाव कुणाचं आहे, कोण सांगेल? “

सगळा वर्ग चिडिचूप..

” सर, मी सांगते.. ” सवडीचा हात वर..

” सांगा ” सरांचा करडा स्वर..

” सर.. विश्वंभर नाव आमच्या मावशीच्या चुलतदिराच्या पोराचं आहे. “

” अहो, कुणाचंं म्हणजे कुठल्या देवाचं? “

विष्णुचं नाव आहे हे.. ” सर डोक्याला हात लावत बोलले… तशी सवडी खदाखदा हसली… नि तिच्या पाठोपाठ सारा वर्ग..

एके दिवशी वर्गात सरस्वतीपूजन करायचं अचानक ठरलं. तयारी काहीच नव्हती.

बाजार शाळेच्याच बाहेर..

” सविता, हे पाच रुपये घे. फुलं आणि नारळ सोलून त्याच्या शेंड्या काढून आण.. ” बाईंनी सांगितलं.

पैसे घेऊन सवडी हसत हसत पळत गेली.

दहा मिनिटात हजर.. हातात पिशवी.

पूजा झाली. फुलं वाहिली..

बाई पिशवीतून नारळ काढू लागल्या.

हातात नारळाच्या फक्त शेंड्याच आल्या.

नारळ नव्हताच.

” सविता, नारळ कुठाय? “

” बाई, तुम्ही नारळ सोलून शेंड्या काढून आण म्हणून सांगितलत, मी शेंड्या काढून आणल्या.. सोललेला नारळ तिथेच ठेवला. ” सवडी तोंडावर हात धरून हसू लागली.

बाईंनी कपाळावर हात मारून घेतला..

सातवीची स्कॉलरशिपची परीक्षा..

सवडी काय म्हणून या परीक्षेला बसली, हे तिला नि देवालाच ठाऊक..

परीक्षा केंद्रात नखशिखांत नटलेली सवडी तासभर आधी हजर होती.

” अगं, एवढी नटून का आलीस परीक्षेला? ” बाईंचा प्रश्न..

 

” काही नाही मज्जा, एन्जॉय करायची परीक्षा पण.. ” सवडीचं तत्त्वज्ञान ऐकून आमचे पालकही अवाक्..

गणिताचा पेपर… सवडी वीस मिनिटांत परीक्षाखोलीबाहेर…

शिक्षक, पालक झाडाखाली बसलेले..

” एवढ्या लवकर आलीस? “

” पेपर एकदम सोप्पा होता. सगळा सोडवून झाला. मग बसून काय करायचं? “

पेपर संपला. आम्ही सगळे रडत बाहेर… पेपर भयंकर अवघड. पाच-सात प्रश्न राहिलेले.

” ए, टेन्शन घ्यायचं नाही. एन्जॉय करायचं ” सवडीचा हसत हसत सल्ला…

दोन महिन्यांची रिझल्ट आला.

सवडीला तिन्ही विषयात प्रत्येकी पाच मार्क. शंभरपैकी.. तरी स्वारी जाम खूश..!!

” मला बघा कसे एकसारखे मार्क मिळाले तिन्ही विषयात.. अवघड असतय असं ” म्हणत सातमजली हास्य..

अन् आम्हाला स्कॉलरशिप मिळूनही नंबर जरा मागे गेला म्हणून आम्ही नाराज… तोंड पाडून…!!

चंद्रावर वातावरण कसं असतं?

 हे नववीच्या भुगोलाच्या परीक्षेतल्या

प्रश्नाचं उत्तर सवडीनं…

 

“चंद्रावर पाणी कमी असल्याने काटेरी झुडपं असतात. ससे मोठ्या संख्येनं असतात. “. वगैरे लिहून…

आणि

स्त्राच्या पेपरात…

“अन्न एनस मधून आत घेऊन इसोफॅगसमधून न पचलेलं अन्न बाहेर टाकलं जातं “… अशी एनस व इसोफॅगसच्या कामांची अदलाबदल केलेली भन्नाट उत्तरं लिहून… सा-या वर्गाला तासभर हसवलं होतं नि बरोबरीनं स्वत: हसली होती..

दहावीची परीक्षा झाली.

सुट्टीतच सवडीचं लग्न झाल्याचं कळलं..

शिक्षण, लग्न, मुलंबाळं, करीअर यात तीस वर्षे कशी गेली ते कळलच नाही..

ना कुणाची भेट ना कुणाची खबरबात…

एके दिवशी व्हॉट्स ऐप नामक जादुगारानं आम्हाला पुन्हा एकत्र आणलं..

त्यात सवडीही होती..

झूमवर एके दिवशी सगळ्या भेटलो..

सवडीचा संसार बराच पुढे गेला होता.

तिचा नवरा मोठा सरकारी अधिकारी होता. खूप पैसा मिळवला होता त्याने. पुण्यात मोठ्ठं नि अलिशान घर होतं. तिनं नव-याचा फोटो दाखवला. स्मार्ट नि हुशार दिसत होता.

” तुझ्यात काय पाहिलं गं त्यानं ” स्पष्टवक्त्या गीतानं विचारलं..

” अगं माझ्या हास्यावर भाळला तो.. ” तिचं हसत हसत उत्तर..

आता विषय मुलांवर आला…

” माझा थोरला मुलगा आय. टी. आय झालाय. अमेरिकेत असतो. नि मुलगी सी. ए. झाली. मुंबईत नोकरी करतेय. वीस लाखाचं पॅकेज आहे. ” इति सवडी…

“आय. टी. आय करून अमेरिकेत? “.. या विचारात असतानाच तिच्या शेजारी राहणारीअप्पी बोलली,

” ए बावळट, तुझ्या तेजसनं आय टी आय नाही, आय आय टी केलय.. पवईहून… “

” अगं आय आय टी काय अन् आय टी आय काय… चांगलं शिकला.. चांगला पगार आहे.. मस्त एन्जॉय करतोय.. झालं तर मग! “… सात मजली हास्य..

” तुझी दोन्ही पोरं एवढी शिकली, एवढी हुशार निघाली.. खूप कष्ट घेतले असशील नं तू त्यांच्यासाठी? काय काय केलंस? “.. आमचा प्रामाणिक प्रश्न..

” मी काही केलं नाही; हेच मोठं काम केलं. कधी त्यांच्या मागं लागले नाही अभ्यासासाठी. त्यांना पाहिजे ते करू दिलं. त्यांना फक्त एकच गोष्ट सांगितली होती..

टेन्शन घ्यायचं नाही.. निवांत रहायचं नि एन्जॉय करायचं.. नव-यावर गेलीत गं पोरं माझी.. हुशार.. अभ्यासू आहेत त्याच्यासारखी..!! “

… दाखवलं नाही तरी आम्हाला तिचा हेवा वाटला… आम्हा साऱ्या तथाकथित हुशार मुलींपेक्षा तिचा संसार जास्त यशस्वी होता…!!

एके दिवशी तिचे यजमान वारल्याची दु:खद बातमी आली… जेमतेम अठ्ठावन्न वय..

” हुशार, कर्तृत्त्ववान माणूस.. पण स्वभाव फार गंभीर… नुसता काम करत राहिला आमच्यासाठी. आयुष्य एन्जॉय केलं नाही आजिबात.. म्हणून इतक्या लवकर गेला.. ” आता मात्रं तिचे डोळे वहायचे थांबता थांबत नव्हते…

सहा महिन्यात बिचारी सावरली..

ट्रिप्सना जायचा सपाटा लावला…

नाटक, सिनेमा, गेट टुगेदर्स.. काही म्हणून सोडेना..

बरोबरच होतं.. एकटी कसे दिवस रेटणार होती?

” आता उरलेलं आयुष्य एकटीनं का होईना पण एन्जॉय करणार… ” तिचं स्पष्टीकरण..

अन् आज ही बातमी आली…

तिला हॉस्पिटलमधे हार्टच्या त्रासासाठी ऐडमिट केलेलं..

वाईट वाटत होतं…

दुसरे दिवशी तिला हॉस्पिटलमधे भेटायला जायचं ठरलं सगळ्यांनी मिळून…

रात्री बाराला व्हॉट्सएप मेसेजच्या नोटिफिकेशनची बेल वाजली..

एवढ्या रात्री ग्रुपवर मेसेज?

घाबरत ग्रुप उघडला…

सवडीचा मेसेज होता…

एन्जॉयग्राफी (enjoygraffy) झाली.

काही निघालं नाही. सगळं नॉर्मल..

उद्या घरी सोडतील..

घरीच या सगळ्याजणी..

मस्त एन्यॉय करू…

 

जिनं सगळं आयुष्य “एन्जॉय” या अजेंड्यावर निभावलं.. तिनं “अॅंजिओग्राफी” चं “एन्जॉयग्राफी” केलं तर काय नवल?

तिच्या त्या “एन्जॉयग्राफी” ला हसत नि एन्जॉय करत केंव्हा झोप लागली ते कळलच नाही…!!

 

©  नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares