प्रेमासारख्या नाजुक विषयाचा बाजार मांडायला ह्या फिरंग्यांना सांगायला नको. ह्यांच्या व्हँलेंटाईन डेवरून मला गझलनवाजांचा एक शेर वजा किस्सा आठवला…
एकदा एक मूर्ख शायर
सूर्यास म्हणतो की….
भास्करा, कीव मजला
येऊ लागते कधी मधी,
रात्र प्रणयाची तू रे
पाहिली आहे कधी ?
तेव्हा सूर्य उत्तर देतो…
आम्हासही या शायराची
कीव येऊ लागते,
याच्या म्हणे प्रणयास
रात्र यावी लागते.
प्रेम हे काय दिवस ठरवून
व्यक्त करायची चीज आहे ?
आपलं मराठी-हिंदी साहित्य एवढं समृद्ध आहे की प्रेम व्यक्त करायच्या किती विविध शैली आपणांस ठाऊक होतात.
प्रेम ही खरं तर नजरा-नजरेची परिणती आहे.
गदिमा म्हणून गेलेयत…
‘प्रथम तुज पाहता, जीव वेडावला…’
यांचं प्रेम सुद्धा एवढं हळुवार की गिरगांव चौपाटीवर भेटूया असे सरळ-सरळ न म्हणता ती खाली मान घालून शालीनतेने पी. सावळारामांच्या काव्यात म्हणते की
‘जिथे सागरा धरणी मिळते
तेथे तुझी मी वाट पहाते’
मग एकदाची परतीच्या भेटीची वेळ ठरते. हा कावरा-बावरा झालाय, ती लाजेनं चूर झालीय. सगळं कसं शांत शांत.
ही कोंडी शेवटी तो फोडतो,
(सोबतीला पाडगांवकर, खळे आणि हृदयनाथ या त्रयीला घेऊन.)
‘लाजून हांसणे अन् हांसून ते पहाणे,
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे’
भेट झाल्यावर मात्र हृदयात
एक अनाहूत हुरहुर सुरू होते.
मग परत गदिमा मदतीला येतात,
‘हृदयी प्रीत जागते, जाणता अजाणता’
तोही आपल्या विश्वात नसतोच.
‘होशवालों को खबर
बेखुदी क्या चीज है,
इश्क किजे, फिर समझिये,
बंदगी क्या चीज है’
प्रेमात ती ठार वेडी झालीय,
म्हणतेय काय….
‘मी मनांत हसता प्रीत हसे,
हे गुपीत कुणाला सांगू कसे ?’
त्याचे बहाणे ती सुद्धा ओळखून आहे.
तिच्या पाठीशी अस्सल कोंकणी सारस्वत (आरती प्रभू ) आहेत,
ती म्हणते,
‘नाही कशी म्हणू तुला विडा मी दुपारी,
परि थोरांच्या समोर घ्यायची सुपारी’
ह्याचे बहाणे थांबायची चिन्हे
नाहीत. मग तीच म्हणते,
‘ये मुलाकात इक बहाना है,
प्यार का सिलसिला पुराना है’
शैलेंद्रच्या काव्यातच सांगायचे तर
‘घडी घडी मेरा दिल धडके,
हाय धडके, क्यू धडके’
ह्याची खात्री पटलीय पण
खुंटी हलवून घट्ट करू पाहतोय.
‘कहना है, कहना है,
आज तुमसे ये पहली बार,
तुम ही तो लायी हो,
जीवन में मेरे
प्यार, प्यार, प्यार..’
ती त्याच्या हरकतीने मोहरून गेलीय.
तृप्त झालीय.
‘धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना,
शब्दरूप आले, मुक्या भावनांना’
आणि मग झाडांची पाने हलतांत. तो खूष.
‘जेव्हां तिची नी माझी, चोरून भेट झाली,
झाली फुले कळ्यांची,
झाडे भरांत आली’
आणि तिनं चक्क होय म्हटलं.
हा गडाबडा लोळायचा बाकी.
‘तुम क्या जानो, मुहब्बत क्या है..:
‘कोकिळ कुहूकुहू बोले,
तू माझा तुझी मी झाले.’
दोघांत एवढं अद्वैत निर्माण झालं की ती म्हणते:
‘तुज्ये पायान् रूपता काटां,
माज्ये काळजान् लागतां घांव’
आपण दोघांचे एक कधी झालो हे त्यांना कळलंच नाही. हृदये जरी दोन असली तरी अंतर्मन मात्र एकच होतं.
दो लब्जों की है बस ये कहानी या हृदयीचे त्या हृदयी कधी झाले, ते ह्या युगुलाला कळलेच नाही.
‘आज तू डोळ्यांत माझ्या,
मिसळूनी डोळे पहा,
तू असा जवळी रहा,
तू अशी जवळी रहा..’
प्रेमाची भावना इतक्या हळुवारपणे व्यक्त करणा-या या कविता ज्या साहित्यात आहेत त्या मराठी भाषेला व्हॅलेन्टाईन डेच्या बाजारू आणि उथळ स्वरूपाकडे बघण्याची गरजच काय?
भारतीय संस्कृती आणि माय मराठी प्रेमी… नक्कीच सहमत असतील.
लेखक:अज्ञात
प्रस्तुती:सौ.राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मराठी भाषा गौरव दिन… ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
महाराष्ट्रात २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कवीवर्य कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांची आज जयंती.
या निमित्ताने आम्ही प्राथमिक शिक्षक शाळेत जे शिकवत असतो ते थोडे आपुलकीच्या माणसांना सांगावे वाटले. लहान मुलांना योग्य उच्चार शिकवले गेले नाहीत तर काय होते ते आपण सगळेच अनुभवत असतो. त्या साठी आम्ही प्राथमिक शिक्षक अगदी लहान वयाचे होऊन त्यांच्या वयाचा विचार करून काही गोष्टी सोप्या करून सांगतो. खूप वेळा त्यांच्यातले होऊन जावे लागते. आणि उच्चार चुकला तर काय गंमत होते आणि अर्थ कसा बदलतो हे दाखवावे लागते.
क, ख, ग, घ, ङ – यांना *कंठव्य* म्हणतात. कारण यांचा उच्चार करताना ध्वनि कंठातून निघतो. एकदा करून बघा.
च, छ, ज, झ, ञ- यांना *तालव्य* म्हणतात. कारण यांचा उच्चार करताना जीभ टाळू ला लागते.
एकदा करून बघा
ट, ठ, ड, ढ, ण- यांना *मूर्धन्य* म्हणतात. कारण यांचा उच्चार जीभ मूर्धा ला लागल्याने होतो. एकदा म्हणून बघा.
त, थ, द, ध, न- यांना *दंतव्य* म्हणतात. यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते.
एकदा म्हणून बघा.
प, फ, ब, भ, म, – यांना *ओष्ठ्य* म्हणतात. कारण यांचा उच्चार ओठ जुळल्याने होतो. एकदा म्हणून बघा.
हे लहान मुलांना सांगून चालत नाही. त्यांच्या कडून म्हणवून घ्यावे लागते. शिक्षकाने उच्चारणे व मुलांनी मागे म्हणणे हा एक आनंद सोहळा असतो. हे सगळे प्रात्यक्षिक करून घ्यावे लागते. तरच त्यांचे उच्चार व लेखन योग्य होण्यासाठी मदत होते.
बरेचदा काही कविता तयार करून त्यातील गंमत दाखवावी लागते.
अशीच एक कविता.
बघा कशी वाटते..
*एक काना वाढला*
*आणि अर्थच बदलला*
मल झाला माल
गल झाली गाल
पल झाला पाल
चल ची बदलली चाल
मत झाले मात
नत झाली नात
पत मधून उगवली पात
रत होताच झाली रात
मन चा वाढला मान
धन चे झाले धान
तन ने घेतली तान
नन झाली नान
तर बनले तार
मर बनले मार
हर झाला हार
गर झाला गार
सर चे झाले सार
पर ने केले पार
धर ची बदलली धार
खर बनली खार
भर चा झाला भार
नर ची झाली नार
सर चे झाले सार
चर चे झाले चार
गड झाले गाड
पड झाले पाड
झड झाली झाड
लड बनली लाड
कडी बनली काडी
गडी बनले गाडी
सड बनली साडी
वड झाले वाडी
गज बदलून झाली गाज
सज वर चढला साज
भज झाले भाज
मज ला चढला भलता माज
रग ला आला राग
मग ने काढला माग
नग बनला नाग
जग ला आली जाग
भंग ने पाडला भांग
रंग ने लावली रांग
संग वदला सांग
ढंग ची झाली ढांग
तप करता आला ताप
जप जपता झाला जाप
कपा ने केले काप
खप बनला खाप
टळ चे झाले टाळ
मळ ची झाली माळ
चळ चे झाले चाळ
गळ ने काढला गाळ
अशी माय मराठीची संपन्नता
उभी रेघ अवतरता
अकार आकार होता
शब्दांच्या अर्थात येते परिवर्तनता.
आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान वाटतो पण तो का? कारण एवढी वैज्ञानिकता इतर कुठल्या ही भाषेत नसेल.
अथर्ववेदात कामदेवाला सर्जनशील शक्तीचा संरक्षक मानले आहे. कामदेव म्हणजे तरुण स्त्री-पुरुषांच्या चित्तातील प्रेमाची अधिष्ठात्री देवता. ज्याचा जन्म ब्रम्हदेवाच्या हृदयापासून झाला.
मन्मथ, मदन, आनंद, कुशमेश्वर, प्रद्युम्न आणि कामदेवाची पत्नी रती म्हणून रतिकांत अशी कामदेवाची विविध नावे आहेत. कामदेव हे पुरुष प्रेमाचं प्रतीक आहे तर रती हे स्त्री प्रेमाचं प्रतीक आहे. कामदेव आणि रती दोन्ही प्रेम देवताच आहेत. आणि पर्यायाने सृजन अथवा उत्पत्ती देवता आहेत. विश्वाची निर्मिती तेव्हाच होईल जेव्हा स्त्री-पुरुषांमध्ये कामवासना प्रज्वलित होतील. या कामवासनेचा संभव रती आणि मदनदेवतेमुळे स्त्री-पुरुषांच्या शरीरात होतो जे अत्यंत नैसर्गिक आहे.
अशा प्रकारच्या कामभावनेने घायाळ झालेल्या एका तरुणीच्या प्रणयार्त मनस्थितीचे दर्शन देणाऱ्या अत्यंत संवेदनशील गीताचा आज आपण रसास्वाद घेऊया. गीतरचना अर्थातच डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांची आहे आणि शीर्षक आहे प्रणयार्त.
☆ प्रणयार्त ☆
मयुरपिसांचा चंदनमंचक प्रणयातुर झाला
साद मन्मथा मदनशरांची येई शमवायला।।ध्रु।।
*
धगधगत्या अंगा न साहवी तलम वस्त्र हलकी
हिरमुसली होऊन बैसली फडताळी कंचुकी
फुलती कलिका आर्त जाहली भृंगा भोगायला
साद मन्मथा मदनशरांची येई शमवायला ।१।
*
ज्योत समयिची निरखुन बघते अनवरत्या देहा
प्रणयदग्धता भाजुन काढी अवघ्या शयनगृहा
दवबिंदूंना आस लागली प्राशुनी घ्यायाला
साद मन्मथा मदनशरांची येई शमवायला ।।२।।
*
गवसणीस सोडून बैसला तानपुरा मोकळा
आहे केवळ ध्यास अंतरी स्पर्शसुखाचा मला
काळ तिष्ठला स्तब्ध होऊनी प्रणयाच्या साक्षिला
साद मन्मथा मदनशरांची येई शमवायला ।।३।।
*
डॉ. निशिकांत श्रोत्री.
या गीतातील धुंद, प्रणयोत्सुक, नशा चढलेली तरुणी जणू काही कामक्रीडेसाठी आवाहनच देत आहे. ती म्हणते,
मयूर पिसांचा चंदन मंचक प्रणयातुर झाला
साद मन्मथा मदनशरांची येई शमवायला ।ध्रु।
मोरपिसांचा मुलायम बिछाना असलेला हा चंदनाचा पलंगही माझ्या इतकाच कामक्रियेसाठी उत्सुक झालेला आहे. माझ्या अंगोपांगी संचारलेला हा कामाग्री शमवायला त्या सुगंधी मदनशरांचा वर्षावच व्हायला हवा.
पुढे ती म्हणते,
धगधगत्या अंगा न साहवी तलम वस्त्र हलकी
हिरामुसली होऊन बैसली फडताळी कंचुकी
फुलती कलिका आर्त जाहली भृंगा भोगायला
साद मन्मथा मदनशरांची येई शमवायला
काम हा विकार असला तरी त्याची उत्पत्ती ही नैसर्गिक आहे. या गीतातील ही तरुणी या भावनावेगाने इतकी व्याकुळ झाली आहे की तिला अंगावरच्या तलम वस्त्रांचंही ओझं वाटतंय. अंगातली चोळी काढून टाकून तिला अनावृत स्थितीतच सौख्य वाटत आहे. उमलणाऱ्या फुलाला जशी गुणगुणणाऱ्या भ्रमराची ओढ असते तद्वत तिला प्रियकराच्या स्पर्शाची आर्त आस जाणवत आहे.
या चार पंक्तीत कवीची शब्दांवरची प्रभावी पकड जाणवते. किती काव्यमय पद्धतीने त्यांनी कामातुर तरुणीचे विवस्त्र पण चितारले आहे! कलिका आणि भुंगा या प्रतीकात्मक रूपकांविषयी आपण जरा नंतर विचार करूया.
ज्योत समयिची निरखुन बघते अनवरत्या देहा
प्रणय दग्धता भाजुन काढी अवघ्या शयनगृहा
दवबिंदूंना आस लागली प्राशुन घ्यायाला
साद मन्मथा मदनशरांची येई शमवायाला
प्रियकराच्या स्पर्शासाठी आसुसलेली ही विरहिणीच आहे. या क्षणी तिच्यासोबत आहे ती समयिची प्रज्वलित ज्योत. जणू काही ती या प्रणयातुर नारीला निरखून पहात आहे. अवघ्या शयनगृहाला जणू काही पेटलेल्या या कामाग्नीची धग जाणवत आहे. तसेच अंतर्देहातून पाझरणार्या दवबिंदूनाही आता निराळ्या स्त्रोतात मिसळून जाण्याची घाई झाली आहे. नदीचं पाणी जसं सागराच्या प्रवाहात मिसळण्यासाठी उत्सुक असतं नेमकी हीच स्थिती इथे जाणवत आहे. आणि या विकारांची तृप्ती, शांती फक्त मदनशरांनीच होऊ शकणार आहे.
गवसणीचा सोडून बैसला तानपुरा मोकळा
आहे केवळ ध्यास अंतरी स्पर्श सुखाचा मला
काळ तिष्ठला स्तब्ध होऊनी प्रणयाच्या साक्षीला
साद मन्मथा मदनशरांची येई शमवायला
प्रणयाच्या या धुंद, गंधित, निशेच्या परमोच्च बिंदूवर असताना देहावरच्या वस्त्रांचे तिला भान नाही. फक्त स्पर्श सुखासाठी तिचे अंतर्मन उत्कट झालं आहे. काळही जणू थांबलाय, स्तब्ध झालाय या निसर्गोत्पन्न प्रणयाचा सोहळा अनुभवण्यासाठी. ही प्रणयाची आर्तता संतोषण्यासाठी या रतीला फक्त मदनाचीच प्रतीक्षा आहे.
उत्तान शृंगार रसातलं हे तीन कडव्यांचं गीत वाचताना डोळ्यासमोरून एक शृंगारिक दृश्यच तरळत जातं.
वाहणाऱ्या हलक्या हवेच्या झुळुकेने शयनगृहाचे पारदर्शक पातळ पडदे डोलत आहेत.. कोपऱ्यातील समईच्या ज्योतीचा प्रकाशही जणू त्या नशेला पूरक ठरत आहे आणि अशा वातावरणात पुरुष स्पर्शासाठी सैरभैर झालेली ती विवस्त्र रमणी प्रियकराची वाट पाहत आहे… असे हे शब्द चित्र डोळ्यासमोरून झरकन जाते.
हे गीत वाचल्यानंतर क्षणभर तरी कुठल्याही नियमशास्त्राच्या आधारे त्याची तोडफोड करावी असं वाटलंच नाही. फक्त डोळे मिटावेत आणि कवीच्या तरल शब्दांची नशा अनुभवावी.
प्रतिभा, व्युत्पत्ती, अलंकार, छंद, वृत्त या काव्य कारणांना काव्य शास्त्रात खूप महत्त्व आहे आणि हे तंत्र प्रणयार्त या गीतात अगदी तंतोतंत साधलेले आहे.
या काव्यपंक्तीत सहज होणारा चेतना गुणक्त्ती या अलंकाराचा अविष्कार केवळ सुंदर!
शिवाय हिरमुसली होऊन बसली फडताळी कंचुकी*या ओळीतील *हिरमुसली कंचुकी ही शब्दरचनाही खूप सूचक आहे. अंगावरची वस्र उतरवताना स्वाभाविक स्त्रीलज्जा किंवा संकोच व्यक्त करण्यासाठी योजिलेला हिरमुसली हा शब्द अतिशय कौशल्याने, काव्याचे सौंदर्य सांभाळून कवीने हलकेच वेचला आहे.
या गीतात कवीने ज्या मदनशरांचा उल्लेख केला आहे त्याबद्दल थोडा विचार करूया.
कामदेवाची अस्त्रे म्हणजे धनुष्य व बाण आहेत. त्याचे धनुष्य इक्षु दंडाचे (उसाचे) अत्यंत लवचिक असे आहे. रक्त कमल, नील कमल, आम्रमंजरी, अशोक पुष्प व मोगरा ही पाच गंधपुष्पे म्हणजे त्याचे पाच बाण आहेत. संमोहन, उन्मादन शोषण, तापन, स्तंभन हे सारे मदनाचे बाण आहेत. आणि कामक्रीडे मध्ये त्या त्यावेळी त्यांच्या अर्थपूर्ण सहाय्यकारी भूमिका आहेत. हे सर्व नीट अभ्यासले असता कवीने या गीतात केलेला मदन शरांचा उल्लेख औचित्यपूर्ण वाटतो.
कलिका आणि भुंगा ही प्रतीकात्मक रूपके आहेत. आणि ती स्त्री-पुरुषांच्या शृंगारिक अवयवांसाठी(कामेंद्रियांसाठी) सूचकतेने वापरलेली आहेत. तसेच कमलदलातला भुंगा हा लाक्षणिक अर्थाने संभोगाची कल्पना मांडतो.
गवसणीस सोडून बैसला तानपुरा मोकळा…. या काव्यपंक्तीत चेतना गुणोक्ती अलंकारासोबत हळुवारपणे विवस्त्रता व्यक्त करणारं रूपकही आहे. तानपुरा या शब्दात “तिच्या कायेची कमनीयता” दडलेली आहे. आणि गवसणी म्हणजे देहावरची वस्त्रे. लाक्षणिक अर्थाने वापरलेले हे शब्द काव्यरचनेला वेगळेच सौंदर्य प्राप्त करुन देतात.
हे संपूर्ण गीत मी जस जसे वाचत गेले आणि एकेका शब्दांची यथामती फोड करत गेले तेव्हा डॉक्टर श्रोत्रींच्या अचाट कल्पना बुद्धीची आणि सौंदर्य दृष्टीची झालेली जाणीव थक्क करणारी वाटली.
वास्तविक काव्यशास्त्रात शृंगार हा अत्यंत महत्त्वाचा रस आहे आणि कवींचाही शृंगार रस हा आवडताच आहे. मूळातच कामविकार हे सर्वसामान्य माणसाच्या दंपती जीवनात उद्भवतातच आणि सामाजिक व कौटुंबिक जीवनात कामशांतीचे महत्त्वही तितकेच आहे.
शृंगार समयी स्री आणि पुरुष यांच्या भावना निराळ्या असतात. शृंगारा अंती पुरुषाला जाणवते ती असीम तृप्ती. मात्र स्रीच्या बाबतीत तसे नसते. ती तृप्त न होता अधिक आर्त होते. आणि या गीतात ही आर्तता अतिशय तरल शब्दात कवीने टिपली आहे. हे विशेष आहे.
श्रृंगार रसाचा साहित्य कृतीमध्ये वापर करणे हे येरा गबाळ्याचे काम नव्हे. शब्दांच्या वापराला इथे खूप महत्त्व आहे. शृंगारमय प्रसंगाचे वर्णन करताना शब्दांची जर घसरण झाली तर सारी कलाकृती सवंग, अश्लील, आघळपघळ, ओंगळवाणी, अवाचनीय होईल. पण डॉक्टर श्रोत्रींचा शब्दप्रवाह हा चांदण्यासारखा शीतल आहे, तरल आहे, सुंदर आहे. सूचक आणि भावदर्शी आहे. मोगर्याची फुलं उधळावीत इतका सुखद आहे. त्यामुळे शृंगारतलं निसर्गतत्व त्यांनी अत्यंत आध्यात्मिक रित्या मांडलय म्हणूनच त्यांचं हे गीत म्हणजे मला शिंपला उघडून मोती उचलावा इतकं सुंदर वाटलं आणि वाचक हो! तुम्हालाही ते तसेच जाणवेल याची मला खात्री आहे.