मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र क्र. ७९, ८०, ८१. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र क्र. ७९, ८०, ८१. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

भक्ति सूत्रे ७९ – – 

सर्वदा सर्वभावेन निश्चिन्तैः भगवानेव भजनीयः ||७९||”

अर्थ : सर्वकाळी सर्व शक्तिनिशी प्रेमभावाने कोणतीही चिंता न करता एक भगवंत भक्ति करण्यास योग्य आहे असे समजून त्याची भक्ती करावी.

विवेचन : एखाद्याने साधकाने साधना करायला सुरवात केली. सकाळी अमुक अमुक वेळ अमुक उपासना आणि संध्याकाळी अमुक वेळ अमुक उपासना. बाकीचा वेळ माझा भगवंताशी संबंध नाही, असे म्हणून किंवा अशी कृती करून चालणार नाही. त्याचे अनुसंधान सतत टिकले पाहिजे, त्यासाठी त्याने सतत विविध मार्ग शोधून भगवतांच्या चिंतनात राहिले पाहिजे. त्यासाठी अनेक मार्ग सर्व संतांनी सांगितले आहेत. त्यातील एक मार्ग आपल्या हातून घडणारी प्रत्येक गोष्ट सद्गुरूंना सांगून करणे.

भक्ती ही केवळ काही वेळापुरती, उत्सवापुरती किंवा गरजेपुरती नसावी. ती सतत असावी. जेव्हा मन, वाणी आणि कृती या तिन्हींतून भगवंताचे स्मरण होते, तेव्हाच खरी भक्ती घडते.

भगवंताची भक्ती ही केवळ आनंद किंवा दुःखाच्या प्रसंगीच न करता, सर्व भावनांनी (जसे की प्रेम, भक्ती, करुणा, नम्रता, लोभ नसलेली तृष्णा, वियोग इ.) करावी. भक्त भगवंताशी प्रत्येक मनोभावाने जोडलेला असतो. समर्थ म्हणतात,

“नित्य नेम प्रातःकाळीं । माध्यानकाळीं सायंकाळीं । नामस्मरण सर्वकाळीं । करीत जावें ॥ ३॥ सुख दुःख उद्वेग चिंता । अथवा आनंदरूप असतां । नामस्मरणेंविण सर्वथा । राहोंच नये ॥ ४॥ हरुषकाळीं विषमकाळीं । पर्वकाळीं प्रस्तावकाळीं । विश्रांतिकाळीं निद्राकाळीं । नामस्मरण करावें ॥ ५॥ कोडें सांकडें संकट । नाना संसारखटपट ।

आवस्ता लागतां चटपट । नामस्मरण करावें ॥ ६॥ चालतां बोलतां धंदा करितां । खातां जेवितां सुखी होतां । नाना उपभोग भोगितां । नाम विसरों नये ॥ ७॥ संपत्ती अथवा विपत्ती । जैसी पडेल काळगती । नामस्मरणाची स्थिती । सांडूंच नये ॥ ८॥ वैभव सामर्थ्य आणी सत्ता । नाना पदार्थ चालतां । उत्कट भाग्यश्री भोगितां । नामस्मरण सांडूं नये ॥ ९॥”

(संदर्भ : दासबोध दशक ४ समास ३)

ज्याप्रमाणात भक्ति वाढत जाते त्याप्रमाणात साधक निश्चिंत होऊ लागतो. कारण त्याच्या पाठीशी उपासनेची शक्ति उभी असते. एकदा देवाला, सद्गुरूंना साधक शरण गेला की त्याची सर्वोतोपरी काळजी सद्गुरू घेत असतात. असा सर्व संतांचा अनुभव आहे.

संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात,

“जेथें जातों तेथें तू माझा सांगाती । चालविसी हातीं धरूनियां ॥१॥ चालों वाटे आह्मी तुझा चि आधार । चालविसी भार सवें माझा ॥ध्रु. ॥ बोलों जातां बरळ करिसी तें नीट । नेली लाज धीट केलों देवा ॥२॥ अवघें जन मज जाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे ॥३॥ तुका म्हणे आतां खेळतों कौतुकें । जालें तुझें सुख अंतर्बाहीं ॥४॥”

सर्व संतांमध्ये एक साम्य नक्की अनुभवायला मिळते, ते म्हणजे त्यांच्या अंतरी असलेले समाधान. त्यासाठी साधकाने आपल्या सद्गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवून, आपली साधना अखंड करावी. सद्गुरू त्याला कायम सांभाळतात.

 – – – – – 

भक्ति सूत्रे ८० – – 

स कीर्त्यमानः शीघ्रमेवाविर्भवत्यनुभावयति भक्तान् ||८०||”

अर्थ : भगवंताचे कीर्तन किंवा नामस्मरण केले जाते, तेव्हा तो भगवंत फार लवकर प्रकट होतो आणि आपल्या भक्तांना आपले अस्तित्व जाणवून देतो.

विवेचन: समारोपाला चाललेल्या या लेखमालेच्या या सूत्रांत आपण भक्तीची फलश्रुती पहात आहोत.

या सूत्रात नारद मुनी आपल्याला भक्तीची एक अमूल्य अनुभूती सांगत आहेत. भक्त जेव्हा भक्तिभावाने भगवंताचे नामस्मरण, कीर्तन करतात, त्याचे नानाविध प्रकारे गुणगान करतात, तेव्हा भगवंत दूर नसतो. तो तत्क्षणी, शीघ्रतेने, त्या भक्तांच्या रक्षणासाठी, त्याला दर्शन देण्यासाठी प्रगट होत असतो.

सर्व संतांची चरित्रे अभ्यासली तर आपल्या ही सहज लक्षात येईल. कोणत्याही भक्ताचे चरित्र अभ्यासा. त्या त्या भक्तासाठी भगवंत धावत आलेले आहेत. मग तो गजेंद्र असो की द्रौपदी असो, भक्त प्रल्हाद असो की ध्रुव बाळ असो. भगवंत भक्ताच्या आवश्यकतेनुसार तो सखुबाईचे दळण दळतो, कबिराचे शेले विणतो, कुंभाराच्या घरी मडकी भाजतो, पाणक्या बनतो… ! किती सांगावे…

माझ्या सारख्या सामान्य मनुष्यानं भगवंताचे यथार्थ वर्णन करणे निव्वळ अशक्य!!

भक्ताने भगवंताला बोलविले की तो येतो. हे सूत्र भगवंताच्या प्रेमळ आणि कृपामय स्वभावाचे वर्णन करते. तो आपल्या भक्तांना दूर ठेवत नाही, तर त्यांच्या प्रेमाच्या हाकेला तत्काळ प्रतिसाद देतो. या सूत्रातून हे शिकायला मिळते की, भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी जटिल साधने आवश्यक नाहीत. प्रेमाने, भक्तिभावाने, नामस्मरणाने त्याचं आवाहन केलं की तो तत्काळ हजेरी लावतो. त्यामुळे भक्ती ही सहज, सुलभ, आणि सर्वोच्च साधना आहे. “कीर्तनातून भगवंताचा अनुभव मिळतो – हा भक्तीचा परमोच्च प्रभाव आहे. “

 – – – – 

भक्ति सूत्रे ८१ – – – 

त्रिसत्यस्य भक्तिरेव गरीयसी भक्तिरेव गरीयसी||८१||”

अर्थ : सत्य वचन, सत्य आचरण आणि सत्य संकल्प ही तीन सत्य वचने आहेत, पण त्यापेक्षा परम सत्याची भक्ति श्रेष्ठ आहे. केवळ भक्ति श्रेष्ठ आहे.

विवेचन :कोणताही काळ ज्याप्रमाणे नीतिमत्ता श्रेष्ठ मानली जाते, त्याप्रमाणे सत्य श्रेष्ठ मानले जाते. प्रामुख्याने सत्याचे तीन प्रकार सांगता येतील.

  1. सत्य वचन (वाणीने सत्य बोलणे)
  2. सत्य आचरण (कर्माने सत्य आचरण करणे)
  3. सत्य संकल्प (मनाने सत्य व संकल्पशुद्ध असणे)

नारदमुनी या सूत्रात स्पष्ट सांगतात की, जरी एखादी व्यक्ती त्रिसत्य अर्थात वाणी, आचरण आणि संकल्प पूर्णपणे सत्यनिष्ठतेनी करणारी असली, तरीसुद्धा भक्तीच त्यापेक्षा श्रेष्ठ आहे.

एखादा मनुष्य खरे बोलणारा आहे पण त्याचे आचरण शुद्ध नाही. एखाद्याचे आचरण अतिशय शुद्ध आहे, पण त्याचा संकल्प शुद्ध नाही असे अनेक दोष मनुष्यामध्ये असू शकतात. काही लोकं प्रकांड पंडित असतात, पण त्यांचा अभिमान पण तितकाच मोठा असतो, अशा लोकांना देवाची भेट दुष्करचं असते, उलट एखादा मनुष्य पंडित नसेल, त्याला लिहिता वाचताही येत नसेल, पण त्याचा भाव शुद्ध असेल, त्याच्या मनात भक्तीचा अंकुर उगवला असेल, तर अशा मनुष्यावर देव प्रसन्न होण्याची शक्यता जास्त असते.

“मनी नाही भाव आणि देवा मला पाव”

अशाने देव पावत नसतो. तर ज्याचा भाव शुद्ध झाला, त्याला देव खात्रीने दर्शन देत असतो, असा अनुभव सर्व संतांनी घेतलेला दिसून येतो. अनेक संत लौकिक अर्थाने निरक्षर होते, पण आज त्यांच्या अभंगावर लोकं विद्या वाचस्पती ची पदवी घेत आहेत, त्यांच्यावर शोध प्रबंध प्रकाशित करीत आहेत, त्यांचे अभंग पाठ्यपुस्तकात समाविष्ट केले जात आहेत.

आपल्याकडे नुसते सत्याचे महत्त्व नाही, तर सत्याचरण करणाऱ्याने त्याला भक्तीची जोड दिली, तीच साधना पूर्ण करणारी ठरते. केवळ नैतिकता, सत्यतेचे पालन हे अध्यात्मासाठी पुरेसे नाही, तर त्याला भावपूर्ण भक्तीची जोड आवश्यक आहे.

मनुष्य भक्ति करू लागला की त्याचे भाडोत्री असलेले अवगुण त्याला सोडून जाऊ लागतात. ही भक्तीची किमया आहे. जिथे भक्ती आहे, तिथे सर्व सद्गुण आपोआप येतात. म्हणूनच नारदांनी दोनदा “भक्तिरेव गरीयसी” असे म्हणत भक्तीच्या श्रेष्ठतेवर जोर दिला आहे.

सत्य, नैतिकता, शुद्ध आचरण हेसुद्धा तेव्हाच सर्वोच्च ठरतात, जेव्हा त्यामध्ये भगवंतावरची भक्ती मिसळलेली असते. म्हणून भक्ती ही साध्यही आहे आणि साधनही. श्रीगोंदवलेकर महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग सांगतो. श्रीमहाराज एकदा नैमिष्यारण्यात जायला निघाले. त्यावेळी थोरल्या रामाच्या मंदिरातील रामाच्या मूर्तीतून अश्रुधारा वाहू लागल्या. श्रीमहाराज स्वतः आले आणि त्यांनी रामाचे डोळे पुसले, तेव्हा अश्रुपात थांबला. ही भक्तीची शक्ति आहे. अशी भक्ति असेल तर भगवंत खांबातूनही प्रगटतो. ही भक्तीच्या महानतेची काही उदाहरणे.

इथे श्रीगोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांमधील एक उतारा देत आहे – – 

– – “खरोखर परमार्थ अत्यंत सोपा आहे, विद्वान् लोक तो उगीचच अवघड करून सांगतात. चांगले काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल. परमार्थ तीनपैकी कोणत्याही एका गोष्टीने साधू शकेल : एक, देहाने साधूची संगत; दुसरी, संतांच्या वाङ्मयाची संगत आणि त्याचप्रमाणे पुढे आचरण; आणि तिसरी, भगवंताचे नामस्मरण. नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल. संतांनी सांगितले ते संशय न घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी, आणि ते पुढे निश्चयाने, श्रद्धेने, आणि प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी. हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे. “

(संदर्भ : श्री गोंदवलेकर महाराज प्रवचने दिनांक २७ जून)

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः भक्तीसूत्रे – ७९, ८०, ८१.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३१३ ☆ आहे तर आहे… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३१३ ?

☆ आहे तर आहे ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

तो नाही माझा तरी पण

आकर्षण… आहे तर आहे

ही प्रीती कसली,

खुळा मोहाचा क्षण …आहे तर आहे

गोपाळा आहेस

 वेणूच्यानादा मध्ये बुडलेला

मातीची नांगरण करण्या

संकर्षण… आहे तर आहे

येथे नाही राहिले–

कोणावाचूनी कोणाचे रे

आयुष्या, नशिबी अटळशी

ही वणवण.. आहे तर आहे

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मुग्ध बालिका… ☆ ज्योती कुळकर्णी ☆

ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ मुग्ध बालिका☆ ज्योती कुळकर्णी ☆  

साठ अन अधिक पाच तरुण का वयमान असे?

वासनांध तू तुझ्यात शिरला हैवान असे

दूध दातही पडले नव्हते अशी बालिका

किती कोडगा! मुग्ध कोवळी खुडली कलिका

 *

तू कोणाचा बाप भाउही नाही का रे!

तिच्यात तुजला नात भासली नाही का रे!

 *

हलकट पाजी नीच शब्दही अपुरे पडती

जंगलातले पशू याहुनी बरे वाटती

 *

फाशीही तुज पडेल शिक्षा कमीच आता

माणुसकीचे श्राद्ध घातले मारत बाता

©  ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भ्रष्टाचाराचे भवितव्य ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

☆ भ्रष्टाचाराचे भवितव्य ☆ श्री सुनील देशपांडे 

आपल्या देशाने लोकशाही व्यवस्थेचा आदर्श म्हणून स्वीकार केला परंतु प्रशासन ही लोकशाहीची शोषण यंत्रणा ठरली हे सुद्धा नाकबूल करून चालणार नाही. एके काळचे स्वतः पंतप्रधान जेव्हा सांगतात की एक रुपयांपैकी ८५ पैसे यंत्रणेमध्ये गायब होतात आणि प्रत्यक्ष लाभार्थीपर्यंत १५ पैसे पोहोचतात. याचा अर्थ प्रशासन यंत्रणा ही ८५% भ्रष्टाचारी आहे आणि शोषक आहे. प्रशासन यंत्रणेवर एवढा मोठा आरोप करून सुद्धा इतकी वर्ष होऊनही त्या आरोपाचे खंडन सुद्धा प्रशासन यंत्रणेतील कोणीही अजून पर्यंत केले नाही. भ्रष्टाचाराची सुरुवात ही प्रशासन यंत्रणेपासून झाली. कारण ब्रिटिशांच्या काळात मूठभर ब्रिटिशांना एवढ्या मोठ्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवून राज्य करण्यासाठी प्रशासन यंत्रणेला भ्रष्टाचाराचे स्वातंत्र्य देणे हे गरजेचे होते. प्रशासन यंत्रणा ही राज्यकर्त्यांची बटीक झाली ही फक्त पगारामुळे नव्हे, तर त्यांना मिळालेल्या भ्रष्टाचाराच्या स्वातंत्र्यामुळे झाली. राज्यकर्त्यांपुढे लाचार होण्याचे भ्रष्टाचार हे सर्वात प्रमुख कारण होते. या प्रशासन यंत्रणेच्या भ्रष्टाचार स्वातंत्र्यामुळेच ब्रिटिशांना एवढ्या मोठ्या लोकसंख्येवर एकतंत्री राज्य करणे शक्य झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही प्रशासन यंत्रणा ब्रिटिश कालीन प्रशासन यंत्रणेप्रमाणे जशीच्या तशी चालू राहिली. त्यावर अंकुश ठेवणे राजकीय सत्ताधाऱ्यांना संपूर्णपणे कधी जमलेच नाही. उलट पक्षी त्या प्रशासन यंत्रणेनेच स्वतःच्या सोयीसाठी हळूहळू राजकीय सत्ताधाऱ्यांनाच भ्रष्टाचारी जगामध्ये ओढून घेतले.

 आता जर राज्यकर्त्यांना खरोखरच काही करायचं असेल तर त्यांना दुसऱ्या एखाद्या अभिनव पद्धतीने प्रयत्न करून बघावे लागतील. त्याचेही भले बुरे परिणाम कालांतराने दिसतीलच. त्यानंतर नवीन काही प्रयोग होतीलच.

नव्हे त्यांना ते तसे करावेच लागतील.

मला अजून आठवते ज्यावेळी मा. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले होते त्यावेळी एक व्यंगचित्र आले होते. एक व्यक्ती त्यांना म्हणते आता तुम्ही पंतप्रधान झाले आहात तर सर्व भ्रष्टाचा-यांना दूर करा.

त्यावर ते असे उत्तर देतात ‘ If I have to remove all corrupt persons, then, one man cannot run the government’

व्यंगचित्रकाराने अगदी वर्मावरच बोट ठेवले होते.

मी जर भ्रष्टाचारा विरोधात कारवाई करायची असेल तर काही दिवस माझ्या कार्यालयात सुद्धा भ्रष्टाचारी असतील तरी त्यांचे बद्दल लगेच कारवाई करता येणार नाही. तशी केली तर माझ्या कार्यालयामध्ये स्टाफच राहणार नाही. जर मी माझ्या पक्षातल्या लोकांवर प्रथम कारवाई करायची ठरवली तर माझे पद व अधिकार सुद्धा राहणार नाही.

शुद्धीकरणाची सुरुवात आता दूर वरून बाहेरून आत मध्ये करण्याची गरज आहे. आपल्याशी संबंध नसलेल्या दूरच्या लोकांच्यावर आणि विरोधी पक्षांवर कारवाई प्रथम सुरू करणे हाच पर्याय शिल्लक उरतो. फक्त एवढेच व्हावे की विनाकारण चांगल्या व्यक्तींना त्रास होऊ नये. जे खरोखर भ्रष्टाचारी आहेत त्यांचे वरच कार्यवाही व्हावी. भ्रष्टाचार विरोधात कार्यवाही धडाक्याने चालू आहे हे पाहिल्यानंतर एखाद्या वेळेस स्व पक्षातले किंवा जवळचे लोक सुद्धा त्या भीतीने भ्रष्टाचारामधून मुक्त झाल्यास उत्तमच. बाहेरची कार्यवाही हळूहळू पूर्ण झाल्यास, सगळ्यात शेवटी स्वतःच्या जवळच्या लोकांच्यावर कार्यवाही सुरू करता येईल.

अशा तऱ्हेचा एक नवीन पॅटर्न जर राबवता आला तर तो यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे. स्वतःच्या पक्षात सामावून घेतलेले भ्रष्टाचारी लोक सुद्धा आत्ताच्या वॉशिंग मशीन मुळे नाही पण नंतरच्या ब्रेन वॉशिंगमुळे भ्रष्टाचारापासून दूर राहतील असा एक प्रयोग जर करत असतील तर काही हरकत नाही.

आत्तापर्यंतच्या परंपरेने जे काही चालले आहे त्याच्या पेक्षा वेगळ्या पद्धतीने पण सकारात्मक परिणाम घडण्याची शक्यता असेल तर एक नवा प्रयोगही करून पाहायला हरकत नाही. फक्त अशा कारवाया करताना विरोधी पक्षाचे असले तरीसुद्धा त्यापैकी खरोखरच भ्रष्ट असतील त्यांच्यावरच कार्यवाही व्हावी. विनाकारण विरोधातले म्हणून बदनामीसाठी त्यांच्यावर कार्यवाही होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसे झाल्यास उत्तमच. परंतु ती कार्यवाही न्याय यंत्रणे मार्फत व कायदेशीर मार्गानेच होणे आवश्यक असल्याने त्याला कालावधी प्रचंड मोठा लागणार आहे. ही त्यातली अडचणीची बाब ठरू शकेल. पण ठीक आहे देर आये दुरुस्त आये. सध्या बहुता तसेच घडते आहे. कारवाईची सुरुवात जोर जोरात गाजावाजा करून होते आहे. एकदा ती न्याय यंत्रणेच्या चक्रामध्ये अडकवून टाकली की मग शांतता कोर्ट चालू आहे! ती केस केव्हा निकाली निघू शकेल हे कोणी सांगू शकेल काय?

सध्या तरी अनेक प्रकाराने यंत्रणेमध्ये बदल करून भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्याचे छोटेखानी प्रयत्न चालू आहेत. लोकांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा करणे. ऑनलाइन पद्धतीने काही गोष्टी केल्याने सरकारी कार्यालयात हेलपाटे घालण्याची गरज भासू नये. जास्तीत जास्त व्यवहार ऑनलाइन पद्धतीने होतील असे पाहणे. यातूनही खूप फरक पडतो आहे, पडला आहे.

काही बाबतीत सरकारी यंत्रणांची काही कामे खाजगी यंत्रणांकडे दिल्यास जो पैसा भ्रष्टाचारामधून काळ्याधना मध्ये जात होता, तो अधिकृतपणे खाजगी यंत्रणांना मिळाल्यास काय हरकत? लोकांचीही सोय आणि ती सोय झाल्यामुळे त्यांची चार पैसे खर्च करण्याची तयारी याचा सुवर्णमध्य निघेल. सध्या अशी यंत्रणा पासपोर्टच्या संबंधात वापरली जात आहे ती यशस्वीही होत आहे असे दिसते.

अशा वेगवेगळ्या मध्यस्थ सेवा निर्माण केल्यास लोकांचीही सोय होईल आणि रोजगाराचीही निर्मिती होईल. अनेक सरकारी यंत्रणांमध्ये आता ऑनलाईन अर्ज विनंती ही पद्धत सुरू झाली आहे. परंतु सर्वसामान्यांच्या अंगवळणी ही ऑनलाईन पद्धती पडत नाही. अशावेळी तरुणांसाठी अशा सेवांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती निर्माण करता येईल. सध्या रेल्वे, विमान इत्यादी आरक्षण सेवा अशा पद्धतीने दिल्या जात आहेत. ही चांगली गोष्ट आहे आणि जनतेच्या उपयोगाची सुद्धा आहे. जुन्या पद्धतीने सरकारी ऑफिसमध्ये खेटे घालून कंटाळून शेवटी नाईलाजाने खुर्चीवरील बाबूला पन्नास शंभर रुपये देऊन काम करून घेत असत. त्याऐवजी आता झालेले ऑनलाईन कामाचे प्रकार याबाबत सेवा देणाऱ्या बेरोजगार तरुणांना पन्नास शंभर रुपये सेवा शुल्क त्यांचे कडून ऑनलाइन सेवा उपलब्ध करून घेणे हे जास्त योग्य होईल. अशाप्रकारे

सामान्य जनतेची क्रयशक्ती जेवढी असेल त्यातून विविध सेवा उद्योगांना जास्त कामाची संधी मिळेल. त्यामुळे सामान्यजनांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणे आणि त्यांची क्रयशक्ती वाढवणे यावर भर दिला जाणे ही गरजेची गोष्ट झाली आहे. त्या दृष्टीने सरकार वेगवेगळ्या योजना राबवून सामान्य माणसाच्या हातात पैसा खेळता ठेवण्याची योजना राबवत आहे का ? पण त्याचवेळी ऐतखाऊ लोकांची संख्या वाढली तर ही गोष्ट सुद्धा राष्ट्राच्या दृष्टीने धोकादायक आणि नुकसानीची ठरेल. त्यामुळे अशा योजना या फक्त मर्यादित कालावधीसाठी किंवा वेगळ्या पद्धतीने परंतु त्यामधील धोके टाळून राबवता येणे शक्य आहे काय याचाही विचार करून अत्यंत कौशल्याने योजनांची निश्चिती करणे आवश्यक ठरेल.

उद्योग व्यवसायामध्ये सरकारी यंत्रणांची लुडबुड कमी करणे. कर प्रणालीचे सुलभीकरण. अनावश्यक गोष्टींना फाटा देऊन सरकारी कामकाजाचे सुलभीकरण. अशा विविध गोष्टी करण्याचा हळूहळू प्रयत्न चालू आहे असे दिसते.

या सर्व प्रयत्नांचे योग्य ते परिणाम कालांतराने दिसतीलच कारण हे परिणाम झपाट्याने होत नसतात, परंतु त्यासाठी एका गोष्टीची मात्र आवश्यकता आहे. सरकार जरी बदलले पक्ष जरी बदलले तरी हे बदल पुन्हा उलट्या दिशेने फिरवण्याचा प्रयत्न झाल्यास पुन्हा परिणाम शून्य.

अर्थात भविष्यावर नजर ठेवून वाट पाहणे, याशिवाय आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या नशिबात दुसरे काय आहे?

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २३ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २३ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

रविंद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांचा जन्मदिवस १५ मे. रविंद्रनाथांच्या जडणघडणीत त्यांच्या वडिलांचा फार मोठा वाटा आहे. म्हणूनच आज आपण त्यांच्याविषयी थोडी माहिती घेऊ या.

महर्षी देवेंद्रनाथ टागोर (ठाकूर) म्हणून प्रख्यात असलेले बंगाली समाजसुधारक, प्रखर राष्ट्रवादी, गद्याकार आणि ब्राम्हो समाजाचे अध्वर्यू देवेंद्रनाथ हे राजा (प्रिन्स) द्वारकानाथ टागोरांचे ज्येष्ठ पुत्र.

देवेंद्रनाथांचा जन्म कलकत्ता येथे त्यांच्या जोड़ासाँको भागातील प्रसिद्ध वडिलोपार्जित वाड्यात १५ मे १८१७ रोजी झाला.

ठाकूर कुटुंबाचे मूळ आडनाव कुशारी. वर्धमान जिल्ह्यातील ‘कुश’ हे त्यांचे मूळ गाव. फार पूर्वी तेथून या कुटुंबाने यशोहर गावी स्थलांतर केले. कालांतराने जातीबहिष्कारामुळे आपले यशोहर (जेसोर) गाव सोडून महेश्वर व शुकदेव हे त्यांचे पूर्वज कलकत्त्याच्या दक्षिणेला गोविंदपूर गावी स्थायिक झाले. पुढे पंचानन कुशारी ह्या पूर्वजाने ईस्ट इंडिया कंपनीच्या कामाचे ठेके घ्यायला सुरुवात केली.

त्या काळी ब्राह्मणेतर लोक ब्राह्मणांना ‘ठाकूर मोशाय’ अशा बहुमानार्थी नावाने संबोधीत. इंग्रज कप्तानांनी ‘ठाकूर’ चा ‘टागोर’ असा उच्चार केला. ईस्ट इंडिया कंपनीच्या बरोबर टागोर कुटुंबाचीही भरभराट झाली. इंग्रज व्यापारी, राज्यकर्ते आणि ज्ञानोपासक ह्यांच्यात वावर असणाऱ्‍या नव्या सरंजामदारांत टागोर घराण्याचाही अंतर्भाव झाला. त्यांपैकीच राजा राममोहन रॉय, यांनी बंगालच्या सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरू केली. त्यांच्या भूमिकेशी रवींद्रनाथांचे आजोबा द्वारकानाथ एकरूप झाले. सार्वजनिक कार्याला त्यांनी केवळ आर्थिकच नव्हे, तर स्वतः उत्तम कायदेपटू आणि व्यासंगी असल्यामुळे वैचारिक परिवर्तनाच्या कार्यातही भाग घेऊन साहाय्य केले.

द्वारकानाथ टागोर हे राजा राममोहन रॉय यांचे सहकारी होते. त्यामुळे देवेंद्रनाथांना लहानपणापासूनच राजा राममोहन रॉय यांचे सान्निध्य लाभले. बालवयात तसेच किशोरवयातही ते राजा राममोहन रॉय यांच्या विद्यालयात शिकले. बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्यांची विद्यालयात ख्याती होती. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा शारदा देवींशी विवाह झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कलकत्याच्या हिंदू महाविद्यालयात झाले. राजा राममोहन रॉय यांचे कनिष्ठ पुत्र, देवेंद्रनाथांचे सहाध्यायी होते. बंगाली ब्राह्मोसमाजाच्या स्थापनेत आणि प्रसारात त्यांचा फार मोठा वाटा आहे.

राजा राममोहन रॉय यांच्या नंतर देवेंद्रनाथ ब्राम्हो समाजाचे अध्वर्यू बनले व त्यांनी समाजाच्या कार्याला उत्कृष्ट वळण दिले. त्यांनी एकेश्वरवादाचा (एकाच ईश्वराची पूजा) प्रसार केला.

(अपूर्ण-उरलेला भाग पुढील भागात)

—–

गीत : ६७

THOU art the sky and thou art the nest as well.

O thou beautiful, there in the nest it is thy love that encloses the soul with colours and sounds and odours.

There comes the morning with the golden basket in her right hand bearing the wreath of beauty, silently to crown the earth.

And there comes the evening over the lonely meadows deserted by herds, through trackless paths, carrying cool draughts of peace in her golden pitcher from the western ocean of rest.

But there, where spreads the infinite sky for the soul to take her flight in, reigns the stainless white radiance. There is no day nor night, nor form nor colour, and never, never a word.

—–

मराठी भावानुवाद : गीत: ६७

*

खोपा तो प्रेमाचा

रंग गंध स्वरांचा

सजविलास साचा

आत्म्यासाठी॥

*

किरणांची झारी

सौंदर्याच्या हारी

प्रभातीची परी

धरणीसाठी॥

*

गर्द अशा वनी

संध्या, गायरानी

संदेशा घेऊनी

शांतीसाठी॥

*

वेळ संपताची

अंतीम मार्गाची

प्रभुच्या प्रेमाची 

वाट मिळे॥

*

रात ना दिवस

रंग नाही वास

चीर विश्रांतीस

स्थानासाठी॥

*

अनंत अंतराळ

तेज मायंदाळ

शब्दहीन पोकळ

आत्म्यासाठी॥

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—–

गीत : ६८

THY sunbeam comes upon this earth of mine with arms outstretched and stands at my door the livelong day to carry back to thy feet clouds made of my tears and sighs and songs.

With fond delight thou wrappest about thy starry breast that mantle of misty cloud, turning it into numberless shapes and folds and colouring it with hues ever changing.

It is so light and so fleeting, tender and tearful and dark, that is why thou lovest it, O thou spotless and serene. And that is why it may cover thy awful white light with its pathetic shadows.

—–

मराठी भावानुवाद : गीत: ६८

सहस्त्र बाहूंनी रश्मी तुझ्या,

मम धरेवर पसरती

सांज होई तो माझ्या दारी,

त्या उभ्या असती

मम अश्रू नि उसासे,

मेघरूपी घेऊन जाती 

त्या मेघांसह मम गीतांना,

तव चरणी अर्पिती 

मेघांची त्या तरल आवरणे,

तुजला आवडती

देशी त्यांना आकार विविध,

रंगछटा किती

तारांकित ती दुलई घेशी,

प्रेमभराने वक्षावरती

तू पावन, प्रसन्न अन् दुलई

 प्रेमळ, अलवार ती

प्रखर तव प्रकाश अन् 

करुण त्या छाया झाकिती

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—–

गीत : ६९

THE same stream of life that runs through my veins night and day runs through the world and dances in rhythmic measures.

It is the same life that shoots in joy through the dust of the earth in numberless blades of grass and breaks into tumultuous waves of leaves and flowers.

It is the same life that is rocked in the ocean-cradle of birth and of death, in ebb and in flow.

I feel my limbs are made glorious by the touch of this world of life. And my pride is from the life-throb of ages dancing in my blood this moment.

—–

मराठी भावानुवाद : गीत: ६९

*

नसानसांतून माझ्या वाहे

अशी अविरत जीवन सरिता

लयबद्ध नृत्य करिते जी 

साऱ्या विश्वातून वाहता

*

तीच उगवते धरतीमधुनि 

अन् सळसळते, पर्णफुलातुनि

जन्ममृत्युच्या चक्रातुन फिरते

भरती ओहोटीस जसे घडते 

*

तेज फाकते मम गात्रातुनि

जीवन स्पर्शाच्या जादूने

अभिमान नाचतो धमनीमधुनि

युगायुगांच्या स्पंदनाने

– क्रमशः भाग २३

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “बाईचा मेंदू…” – कवयित्री : शिल्पा परुळेकर पै ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ “बाईचा मेंदू…” – कवयित्री : शिल्पा परुळेकर पै ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

बाईच्या मेंदूच्या कोपऱ्यात

एक अजब कपाट असतं…

ज्यात अगदी लख्ख साठवलेलं असतं—

कोणाकडे गेलेली वाटी,

कोणाकडे राहिलेला चमचा,

चहाचे कप,

साडी, अगदी एखादी जुनी ताटली

आणि कुणीतरी मागून नेलेली ती चटई…

जिचा फाटलेला कोपरा तिला आजही टोचतो….!

 

हिशोब तर जिभेवरच असतात—

कोणी उसने घेतलेले पैसे,

दुधाचे, वाणसामानाचे बिल,

भाजीवाल्याला द्यायचा राहिलेला तो एक रुपया,

किंवा त्याच्याकडून घ्यायची उरलेली चिल्लर.

 

काळजावरचे ओरखडे ही तितकेच असतात लक्षात—

कुठल्यातरी समारंभात,

कुणीतरी केलेला अपमान,

कुणी मारलेले विषारी टोमणे,

आणि सासू-नणंदांच्या

शब्दांतून पाझरलेला

तो जुना द्वेष…

 

ती कधीच विसरत नाही—

मुलाच्या पहिल्या पावलाचा ठसा,

त्याच्या शाळेच्या डब्यातली रिकामी जागा,

आणि संसाराच्या घाईत मागे राहिलेली तिच्या माहेरच्या

अंगणातली ती चिमूटभर माया.

तिला आठवत असतं—

कपाटात घडी घालून ठेवलेलं तिचं स्वप्न‘,

जे वेळेअभावी तिने कधी उलगडलंच नाही…

तिला सगळं, अगदी सगळं आठवत असतं.

 

पण… तिच्या लक्षात नसते

स्वतःची झीज

कपाळावरच्या केसांत हळूहळू

उमलणारी पांढरी किनार,

धूसर होत जाणारी नजर,

आणि कमरेत साचत गेलेलं

ते जुनाट दुखणं.

ती विसरते वेळेवर घ्यायची

बीपीची गोळी

ती विसरते…भुकेची वेळ, निवांत झोप, आवडीची भाजी..आवडीच गाणं .

तिला आठवतही नाही,

शेवटचं कधी निरखून पाहिलंय स्वत:ला,

ती विसरते…

आरशात पाहताना स्वतःच्या डोळ्यांत डोकावायला,

आणि कोमेजलेल्या चेहऱ्यावर

प्रेमाचा हात फिरवायला.

चुकून कधीतरी आठवलंच सर्व तरीही,

पुन्हा त्यांना विस्मृतीच्या बोचक्यात बांधते आणि

आणि ढकलून देते माळ्यावर…

 

कवयित्री : शिल्पा परुळेकर पै

प्रस्तुती : प्रभा हर्षे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिंदी/मराठी साहित्य – कविता ☆ “बिना शीर्षक के शब्द-पुष्प ” – श्री विजयसिंह चौहान ☆ संकलन एवं मराठी भावानुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ “बिना शीर्षक के शब्द-पुष्प ” – श्री विजयसिंह चौहान ☆ संकलन एवं मराठी भावानुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

अब नहीं लिख पाता हूँ,

न सुन पाता हूँ,

और न बोलना चाहता हूँ

माँ…

 

अरसा हो गया

माँ कहे हुए।

लोग कहते हैं

दुनिया में अमीर बनो,

पर सच तो यह है…

सबसे अमीर वही हैं

जिनके सिर पर

आज भी

माँ का आँचल है।

 

तुम्हारी रिक्तता…

समूचा ब्रह्मांड भी मिलकर

नहीं भर सकता।

वो ममता,

वो आँचल,

जिसमें दुनिया की

हर चिंता हार जाती थी…

जहाँ डाँट में भी

प्यार छुपा होता था।

 

तुम सचमुच

एक स्कैनर थीं,

माँ

चेहरा देखतीं

और दिल पढ़ लेतीं।

मै चुप रहता,

और तुम पूछ ही लेती थीं

क्या हुआ बेटा?”

 

अब…

कोई समझने वाला नहीं,

कोई बिना कहे

जानने वाला नहीं,

कोई पूछने वाला नहीं…

 

अब जीवन तो है,

साँस भी चल रही है,

चलती-फिरती काया भी है

पर तुम्हारे बिना

सब कुछ जैसे

निष्प्राण है।

कवी : श्री विजयसिंह चौहान

संकलनकर्ता  एवं मराठी भावानुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆☆☆☆

ही तर शब्दफुले .. .. या भावनांना ‘ शीर्षक ‘ ??? कशाला ना ?.. .. .. ☆ 

आता काही लिहू नाही शकत .. ना काही ऐकू शकत ..

आणि बोलायची तर इच्छाच नाहीये आई ..

किती काळ लोटला गं .. .. ‘ आई ss ‘ अशी हाक मारून .. .. ..

 

लोक म्हणतात .. ‘ तू श्रीमंत हो ‘ ..

पण सत्य तर हे आहे ना की ..

जगातला सर्वात श्रीमंत माणूस तोच आहे …

ज्याच्या डोक्यावर आजही आईच्या पदराची आश्वासक सावली आहे .. .. ..

 

पूर्ण ब्रह्मांड एकत्र आलं तरी .. तरी तुझी उणीव भरून काढू शकणार नाही गं ..

ते प्रेम .. तो मायेने ओथंबणारा पदर ..

ज्याच्या उबदार छत्रापुढे प्रत्येक चिंता नि दु:ख हरत होतं ..

आणि तुझं रागावणंही .. मनातलं प्रेम कसंतरी दडवणारं होतं .. .. ..

 

तू खरंच एक ‘ स्कॅनर ‘ होतीस आई ..

चेहेरा नुसता बघूनच मन वाचायचीस ..

मी काही न बोलता गप्प बसायचो ..

आणि तू लगेच विचारायचीस .. ‘ काय झालं बाळा ? ‘ .. .. ..

 

पण आता .. ..

आता मात्र समजून घेणारं कुणी नाही ..

न सांगताही समजणारं कुणीही नाही ..

आपणहून जाणून घेणारंही कुणी नाही ..

आणि विचारणारंही कुणी नाही .. .. ..

 

आता आयुष्य तर पुढे सरकतंय ..

श्वासही सुरु आहे अव्याहत ..

हिंडतं फिरतं शरीरही आहेच की .. पण ..

पण तुझ्याशिवाय सगळं .. सगळंच ..

.. कसं गतप्राण झाल्यासारखं वाटतंय .. .. ..

  

मूळ हिंदी कविता :  ‘बिना शीर्षक के शब्द-पुष्प ‘

मूळ कवी : श्री. विजयसिंह चौहान

मराठी भावानुवाद –  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

संपादिका – ई-अभिव्यक्ति (मराठी)

सांगली, महाराष्ट्र

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्द-प्रारब्ध… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ शब्द-प्रारब्ध... ☆ श्रीशैल चौगुले ☆

 

घाव जिव्हारी लागतील तेंव्हा

काळजातले ते फक्त शब्द दे

आसवांची शाई करुन तेंव्हा

कवितेस तुझेच प्रारब्ध दे.

 

मिटतील शंका आयुष्यातील

सौंदर्य भावनांनाही शब्द दे

स्पंदनात उमटतील आठव

थांबणार्या लेखणीस प्रारब्ध दे.

 

दुःख कधी नसतेच ते कसले

अक्षरांना झेलण्या पुन्हा शब्द दे

असावे-नसावे नाते जन्मातले

 गझलेत सामावते प्रारब्ध दे.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विधिनिषेध… ☆ अपर्णा परांजपे ☆

अपर्णा परांजपे

🌳 विविधा 🌳

☆ ✍️ विधिनिषेध… ☆ अपर्णा परांजपे

परमार्थात काय करावे हे तर महत्त्वाचे आहेच पण काय करु नये हे अधिक महत्त्वाचे आहे !!

उदा जप करणे उत्तमच पण एकवेळ जप नाही जमला तर इतकं बिघडणार नाही पण न सांगितलेली गोष्ट केली तर फार नुकसान होतं

परमार्थात ‘विधिनिषेध’ (काय करावे आणि काय करू नये) याला अत्यंत महत्त्व आहे. अनेकदा आपण काय करावे (उदा. जप, तप, पूजा) यात इतके गुंततो की काय टाळावे याकडे दुर्लक्ष होते.

१. ‘न करणे’ हे ‘करण्या’पेक्षा कठीण असते

परमार्थात साधना करणे म्हणजे काहीतरी ‘मिळवणे’ नसून स्वतःमधील दोष ‘कमी करणे’ असते.

उदाहरण: दिवसातून एक तास जप करणे सोपे आहे, पण उरलेले २३ तास कोणाची निंदा न करणे, कोणावर न रागावणे किंवा असत्य न बोलणे हे जास्त कठीण आहे.

जर आपण जपाची बादली भरत असू, पण ‘निंदा’ किंवा ‘अहंकार’ नावाच्या छिद्रातून ती रिकामी होत असेल, तर त्या साधनेचा उपयोग शून्य होतो.

२. आज्ञापालन: हे सर्वात मोठे नुकसान

“न सांगितलेली गोष्ट करणे” हे साधनेत घातक ठरू शकते. याचे मुख्य कारण म्हणजे अहंकार.

जेव्हा साधक स्वतःच्या बुद्धीने “मला हे जास्त चांगलं वाटतं” म्हणून गुरुंनी न सांगितलेली गोष्ट करतो, तेव्हा त्याचा ‘मी’ बळावतो.

परमार्थात साध्या कृतीपेक्षा त्यामागील समर्पण महत्त्वाचे असते. जप चुकला तर तो अनावधानाने झालेला प्रमाद असू शकतो, पण मनाप्रमाणे वागणे हा जाणुनबुजून केलेला स्वैराचार असतो.

३. साधनेतील ‘छिद्रे’ बुजवणे आवश्यक

संत तुकाराम महाराज म्हणतात, “काय थोर झाले तीर्थाचे दर्शन । जरि नाही मन शुद्ध झाले ॥”

जर एखादा माणूस खूप दानधर्म करतोय, पण घरातल्या माणसांना त्रास देतोय, तर त्या दानाला काही अर्थ उरत नाही.

परमार्थात ‘काय करू नये’ याची यादी (जसे की: परनिंदा, मत्सर, क्रोध, दंभ) पाळल्यास अंतःकरण लवकर शुद्ध होते. शुद्ध अंतःकरणात मग थोडा केलेला जपही लवकर फळाला येतो.  

४. पथ्य आणि औषध

परमार्थ हा एखाद्या आजारावरील उपचारासारखा आहे. औषध (जप/साधना) घेणे जितके गरजेचे आहे, त्यापेक्षा जास्त महत्त्व ‘पथ्य’ (काय करू नये) पाळण्याला असते.

जर रुग्ण औषध घेतोय पण पथ्य पाळत नसेल, तर औषध लागू पडत नाही.

त्याचप्रमाणे, साधनेचे औषध तेव्हाच काम करते जेव्हा आपण कुसंगती, विषयांची ओढ आणि नकारात्मक विचारांचे पथ्य पाळतो.  

थोडक्यात सांगायचे तर, ‘साधना’ ही शिडी आहे, तर ‘संयम’ हा तिचा आधार आहे. डबके कितीही मोठे असले तरी त्याला छिद्र असेल तर ते कधीच भरणार नाही. म्हणून दोषांचा त्याग (काय करू नये) हे साधनेचा पाया मजबूत करण्याचे काम करते.

“केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे” या उक्तीसोबतच “काय सोसावे आणि काय टाळावे” याचे भान असणे हाच खरा शहाणपणा आहे.

परमार्थात ‘काय करू नये’ या विषयाला पुष्टी देणारा एक अत्यंत प्रसिद्ध आणि सार्थ संस्कृत श्लोक ‘श्रीमद्भगवद्गीते’ मध्ये येतो. हा श्लोक साधनेतील सर्वात मोठ्या अडथळ्यांना (म्हणजेच काय टाळावे याला) अधोरेखित करतो:

मुख्य श्लोक

त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः ।

कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत ॥

(भगवद्गीता – १६. २१)

या श्लोकाचा शब्दशः अर्थ असा आहे की:

“काम (वासना), क्रोध (राग) आणि लोभ (हाव) हे नरकाचे तीन प्रकारचे दरवाजे आहेत, जे आत्म्याचा नाश करणारे आहेत; म्हणून या तिन्हींचा त्याग करावा (हे करू नये).

या श्लोकाचे तुमच्या विचारांशी असलेले नाते खालील मुद्द्यांवरून स्पष्ट होईल:

आत्म्याचा नाश: येथे ‘नाश’ म्हणजे मृत्यू नव्हे, तर साधकाच्या प्रगतीचा पूर्णतः थांबणे. तुम्ही कितीही जप केला, तरी जर तुम्ही काम-क्रोध-लोभाच्या आहारी जात असाल, तर तुमची सर्व साधना व्यर्थ जाते.

‘हे करू नये’ याचे महत्त्व: भगवंतांनी येथे “हे करा” म्हणण्याऐवजी “हे टाळा” (त्यजेत) यावर जास्त भर दिला आहे. कारण जोपर्यंत या तीन गोष्टी मनात आहेत, तोपर्यंत केलेली कोणतीही साधना फळ देणार नाही.

पायाभूत नियम: परमार्थात जप-तप ही वरची मजली आहे, पण काम-क्रोध-लोभाचा त्याग हा पाया आहे. पायाच नसेल तर मजला कोसळणारच.

आणखी एक पूरक सुभाषित (पथ्याबाबत)

परमार्थात ‘काय करू नये’ हे पथ्यासारखे असते. त्या संदर्भात हे सुभाषित खूप प्रसिद्ध आहे:

विना पथ्यं कदर्यस्य किं पथ्यौषधसेवनैः ।

सपथ्यस्य कदर्यस्य किं पथ्यौषधसेवनैः ॥

अर्थ: जर एखादा रुग्ण ‘पथ्य’ (काय खाऊ नये) पाळत नसेल, तर त्याला औषध देऊन काय उपयोग? (कारण औषध लागू होणार नाही). आणि जर रुग्ण ‘पथ्य’ व्यवस्थित पाळत असेल, तर त्याला औषधाचीही फारशी गरज उरत नाही (कारण तो आपोआपच बरा होईल).

परमार्थात लागू पडताना:

पथ्य = काय करू नये (उदा. निंदा, मत्सर, आज्ञाभंग).

औषध = काय करावे (उदा. जप, पूजा).

जर आपण ‘काय करू नये’ हे पाळले नाही, तर जपाचे औषध लागू होत नाही.

परमार्थातील ‘निषेध’ (काय करू नये) आणि ‘पथ्य’ या विषयावर संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत अतिशय सुंदर भाष्य करतात. विशेषतः सोळाव्या अध्यायात, जिथे दैवी आणि आसुरी संपत्तीचे वर्णन आहे, तिथे ते एका ओवीतून हा विचार मांडतात:

संत ज्ञानेश्वरांची ओवी (अध्याय १६)

विधी निषिद्ध सांडूनि। जे वर्तती स्वेच्छाचारिणी।

ते न पावती गा दोन्ही। इहपर लोक॥

अर्थ: जे लोक शास्त्राने सांगितलेले ‘विधी’ (काय करावे) आणि ‘निषिद्ध’ (काय करू नये) या दोन्ही मर्यादा सोडून केवळ आपल्या मनाप्रमाणे (स्वेच्छेने) वागतात, त्यांना इहलोक (या जगातील सुख) आणि परलोक (परमार्थातील गती) यांपैकी काहीही प्राप्त होत नाही.

विवेचन (ज्ञानेश्वरीच्या प्रकाशात)

ज्ञानेश्वर महाराज येथे ‘मनासारखे वागणे’ (स्वेच्छाचार) हा साधनेतील सर्वात मोठा अडथळा मानतात. तुमच्या मूळ विचाराला पुष्टी देणारे काही महत्त्वाचे मुद्दे:

मर्यादेचे महत्त्व: जसा समुद्र आपली मर्यादा सोडत नाही म्हणून तो टिकून आहे, तसाच साधक जेव्हा ‘काय करू नये’ याची मर्यादा पाळतो, तेव्हाच त्याची साधना सुरक्षित राहते.

आज्ञाभंग हीच मोठी हानी: तुम्ही म्हटल्याप्रमाणे, “न सांगितलेली गोष्ट करणे” म्हणजे गुरूंनी किंवा शास्त्रांनी आखून दिलेली रेषा ओलांडणे होय. माउली म्हणतात की, अशी व्यक्ती कितीही जप करत असली, तरी ती विस्कटलेल्या घरासारखी असते; तिथे लक्ष्मी (दैवी गुण) वास करत नाही.

शुद्ध अंतःकरण: जेव्हा आपण निषिद्ध गोष्टी टाळतो (उदा. निंदा, दंभ, अहंकार), तेव्हाच अंतःकरण आरशासारखे स्वच्छ होते. त्या स्वच्छ आरशात मग ईश्वराचे रूप चटकन दिसते. उलट, आरसाच मळलेला असेल (म्हणजेच आपण चुकीच्या गोष्टी करत असू), तर कितीही प्रकाशाचा (साधनेचा) झोत टाकला तरी प्रतिबिंब दिसणार नाही.

संत तुकाराम महाराजांचा दृष्टिकोन

तुकोबा एका अभंगात म्हणतात:

“भले तरी देऊ कासेची लंगोटी । नाठाळाच्या माथी हाणू काठी ॥”

येथे ‘नाठाळ’ म्हणजे केवळ बाहेरची व्यक्ती नव्हे, तर आपल्या मनातील ‘अयोग्य विचार’ होय. तुकोबा सांगतात की, जो विचारांनी शुद्ध नाही, त्याने कितीही बाह्य उपचार केले तरी ते व्यर्थ आहेत.

सारांश

तुमचा मूळ विचार की “जप नाही जमला तरी चालेल, पण चुकीची गोष्ट करू नये”, हेच संतांनाही अभिप्रेत आहे. कारण ‘साधना’ ही शिडी आहे, पण ‘सदाचार’ ही ती शिडी ज्या भिंतीला लावली आहे, ती भिंत आहे. भिंतच कच्ची असेल, तर शिडी कितीही उंच असली तरी उपयोग काय?

परमार्थात ‘काय करू नये’ हे ‘काय करावे’ पेक्षा का महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट करण्यासाठी एक अत्यंत चपखल आणि जुना ‘दुधाच्या घागरीचा’ दृष्टांत दिला जातो.

दृष्टांत: दुधाची घागर आणि विषाचा थेंब

एका भक्ताने खूप कष्ट करून, पहाटे उठून गाईचे धारोष्ण आणि शुद्ध दूध एका मोठ्या घागरीत जमा केले. ते दूध त्याने अत्यंत श्रद्धेने ईश्वराला अर्पण करण्यासाठी किंवा त्याचे दही-तूप करण्यासाठी स्वच्छ करून ठेवले होते. हे दूध म्हणजे तुमची ‘साधना’ (जप, तप, वाचन) आहे.

पण, त्याच वेळी त्या घागरीत एका विषाच्या सुईचे टोक किंवा सापाच्या विषाचा एक छोटासा थेंब पडला.

आता विचार करा:

१. दूध कितीही शुद्ध असले, तरी ते आता पिण्यायोग्य राहिले का? नाही.

२. त्या दुधाची चव बिघडली नसेल, रंगही बदलला नसेल, पण त्यातील तो एक ‘निषिद्ध’ थेंब (विषाचा अंश) संपूर्ण दुधाला घातक ठरला.

विवेचन:

दूध जमा करणे = विधी (जप, ध्यान, कीर्तन करणे).

विषाचा थेंब = निषिद्ध (अहंकार, परनिंदा, किंवा गुरूंनी ‘नको’ म्हटलेली गोष्ट करणे).

जर आपण दिवसभर जप केला (दूध जमा केले), पण मनात एखाद्याबद्दल मत्सर ठेवला किंवा कोणाचा तरी अपमान केला (विषाचा थेंब), तर आपली सर्व साधना त्या एका कृतीने ‘विषारी’ किंवा निष्फळ होते.

दुसरा छोटा दृष्टांत: ‘छिद्र असलेल्या नावेचा’

समजा तुम्हाला नदी पार करायची आहे. तुमच्याकडे एक सुंदर नाव आहे आणि तुम्ही जोरात वल्हवत आहात. वल्हवणे ही तुमची ‘साधना’ आहे. पण जर त्या नावेला तळाशी एक छोटेसे छिद्र असेल, तर तुम्ही कितीही जोरात वल्हवले तरी ती नाव पैलतीराला पोहोचणार नाही; उलट ती मध्येच बुडेल.

येथे वल्हवणे (काय करावे) महत्त्वाचे आहेच, पण त्यापेक्षा छिद्र बुजवणे (काय करू नये / दोष टाळणे) हे अधिक महत्त्वाचे आहे. छिद्र असेल तर तुमचे सर्व श्रम वाया जातात.

तुमच्या विषयासाठी निष्कर्ष:

न सांगितलेली गोष्ट” करणे म्हणजे त्या नावेला मुद्दाम छिद्र पाडण्यासारखे आहे. जप राहिला तर प्रगती थांबेल, पण चुकीची गोष्ट केली तर अधोगती सुरू होते. म्हणूनच परमार्थात ‘साधनेच्या वेगा’पेक्षा ‘दोषांचा त्याग’ याला संत जास्त महत्त्व देतात.

असा हा अत्यंत महत्त्वाचा विचार करणे त्यावरच चिंतन व कृती करण्याचा निश्चय करणे आपले कर्तव्य आहे जर रामरायाची कृपा हवी असेल तर!

*

 भगवंत हृदयस्थ आहे 🙏

©  अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३७ आणि ३८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३७ आणि ३८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ३७ – – 

सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा |

उडी घालितो संकटी स्वामी तैसा |

हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३७|

अर्थ :  चक्रवाक पक्षांना ज्याप्रमाणे सूर्य अंधारापासून मुक्ती देतो किंवा दिशा दाखवतो त्याचप्रमाणे त्याप्रमाणेच परमेश्वर सुद्धा भक्ताच्या संकटात त्वरित धावून जातो आणि त्याची संकटातून मुक्तता करतो. हरीभक्तीचा महिमा पावलो पावली ऐकू येतो. त्याची निशाणी गर्जते आहे. दासाभिमानी असलेला राम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही.

(मार्तंड – सूर्य, निशाण – एक रणवाद्य/डंका, घाव – त्या वाद्यावरील प्रहार)

विवेचन :  भगवंत आपल्या भक्ताला संकटात सहाय्य करण्यासाठी कशाप्रकारे धावून जातो हे सांगण्यासाठी समर्थ आपल्याला या श्लोकात चक्रवाक पक्षाचे उदाहरण देतात.

चक्रवाक पक्षातील नर आणि मादी एकमेकांवर खूप प्रेम करतात. परंतु अंधारामध्ये या पक्षांची एकमेकांपासून ताटातूट होते. अंधारात त्यांना काहीही दिसत नाही. फक्त ते एकमेकांना साद घालतात. त्यांचा आर्त आवाज फक्त एकमेकांना ऐकू येतो. सूर्योदयाची ते वाट पाहत असतात. एकदा का सूर्योदय झाला की त्यांना दिसू लागते आणि विरहाच्या दुःखातून त्यांची मुक्ती होते. अशा रीतीने चक्रवाक पक्षी आणि सूर्य एकमेकांवर अवलंबून असतात.

या चक्रवाक पक्षांसाठी सूर्य ज्याप्रमाणे विरहातून मुक्तीचे कारण ठरतो, त्याप्रमाणेच भगवंत देखील आपल्या भक्तांसाठी धावून जातो आणि त्यांची संकटातून मुक्तता करतो. आपल्या संकटात जर भगवंत धावून यावा असे आपल्याला वाटत असेल तर आपल्याला त्याच्या भक्तीची ओढ लागली पाहिजे. आधीच्या श्लोकात समर्थांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्याची अनन्यभवाने भक्ती करायला हवी म्हणजे तो संकटप्रसंगी धावून आपली त्यातून सुटका करतो.

श्रीहरी हा भक्तवत्सल आहे. जसे भक्ताला भगवंताशिवाय होत नाही तसेच श्रीहरीला देखील आपल्या भक्ताची काळजी केल्याशिवाय चैन पडत नाही. जेव्हा भक्त एक पाऊल पुढे टाकतो तेव्हा परमेश्वर त्याच्यासाठी स्वतःहून चार पावले पुढे येतो. हरिभक्तीचा महिमा फार मोठा आहे आणि हा महिमा आपल्याला पावलोपावली म्हणजे सर्वत्र ऐकू येतो. त्याची निशाणी म्हणजे त्याचा डंका सर्वत्र वाजतो आहे. वेद, शास्त्र, पुराणे देखील त्याचीच महती गात आहेत.

ज्याप्रमाणे चक्रवाक पक्षातील नर आणि मादी हे दोन जीव एकमेकांसाठी आसुसलेले असतात. त्याचप्रमाणे भक्त आणि भगवंत म्हणजे जीव आणि शिव. जीव शिवापासून म्हणजे आपल्या मूळ रूपापासून दूर गेला आहे. भगवंताची भेट म्हणजे जीवाचे शिवाशी मिलन. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जन्म मरणाच्या फेऱ्यापासून मुक्ती. ईश्वराला मनापासून आवाहन केले तर तो आपल्या हाकेला धावून येतो. ईश्वर म्हणजे या विश्वातील सूक्ष्म आणि सर्वव्यापी अदृश्य शक्ती. ही शक्ती आपल्याला मदत करण्यासाठी तत्पर असते. फक्त आपले आवाहन तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खरी तळमळ हवी. २७ व्या श्लोकापासून तर या ३७ व्या श्लोकापर्यंतच्या एकूण अकरा श्लोकांमध्ये परमेश्वर आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही ही गोष्ट समर्थ आपल्या मनावर ठसवतात.

स्वसंवाद : 

१) चक्रवाक पक्षाला जशी सूर्याची ओढ असते तशी माझ्या मनात परमेश्वराची आर्त ओढ कधी निर्माण झाली आहे का ?

२) “जीवाचे शिवाशी मिलन” हेच जीवनाचे अंतिम ध्येय आहे. माझ्या दैनंदिन जगण्यात हे ध्येय मला दिसते का ?

३) हरिभक्तीचा डंका सर्वत्र वाजतो आहे. मला तो खरंच ऐकू येतो का की सांसारिक गोंगाटात तो माझ्यापर्यंत पोहोचतच नाही ?

– – – – 

श्लोक क्र. ३८ – – 

मना प्रार्थना तुजला एक आहे|

रघुराज थक्कित होऊनि पाहे |

अवज्ञा कदाही येदर्थी न कीजे|

मना सज्जना राघवी वस्ती कीजे|३८|

अर्थ :  या श्लोकात समर्थ मनाला प्रार्थना करतात की राघवाला एकवार तू थक्क होऊन पहा (म्हणजेच त्याला समजून आणि जाणून घे). मनाने तू कायम भगवंताजवळच वस्ती कर. माझ्या या विनंतीचा अवमान म्हणजे अवज्ञा कधीही करू नकोस.

(थक्कित – आश्चर्ययुक्त/अद्भुत, येदर्थी – या बाबतीत)

विवेचन :  आतापर्यंतच्या श्लोकांमध्ये समर्थांनी मनाला उपदेश केला आहे. या श्लोकात मात्र ते मनाला प्रार्थना करतात की हे मना परमेश्वराकडे तू थक्क होऊन पहा. समर्थांचे हे सांगणे सुरुवातीला आपल्याला थोडे विचित्र वाटते. पण त्यात खूप गहन अर्थ भरलेला आहे. एखाद्या गोष्टीकडे आपण थक्क किंवा आश्चर्यचकित होऊन केव्हा पाहतो तर ज्यावेळी त्या गोष्टीचा कार्यकारण भाव आपल्याला समजत नाही. आपल्या समजण्याच्या पलीकडे ती गोष्ट असते तेव्हा आपण त्या गोष्टीकडे एखादी अद्भुत गोष्ट म्हणून पाहतो.

ज्यावेळी पहिल्यांदा वाफेवरचे पहिले रेल्वे इंजिन धावले आणि त्याच्या सहाय्याने रेल्वे धावली, त्यावेळी लोकांनी थक्क होऊन तिच्याकडे पाहिले. ही गोष्ट त्यांच्या दृष्टीने अद्भुत होती. बैल, घोडे किंवा ओढणारे कोणीही नसताना ही गाडी कशी चालते याचे कोडे सर्वसामान्यांना पडले होते. पण जेव्हा ही गोष्ट त्यांना नित्याची झाली आणि त्यामागील कार्यकारण भाव समजला तेव्हा तिचे आश्चर्य त्यांना वाटेनासे झाले. हळूहळू ते तंत्रज्ञान आपण जाणून घेतले, त्याचा अभ्यास केला. त्यात पुढे प्रगती झाली. विजेवर, डिझेलवर धावणाऱ्या रेल्वे इंजिनांची निर्मिती झाली. त्यासाठी त्या तंत्रज्ञानाच्या सानिध्यात आपल्याला जावे लागते.

तशीच ईश्वराने निर्मिलेली ही सृष्टी अद्भुत आहे. चंद्र, सूर्य, तारांगणे, मेघमाला, निरनिराळे प्राणी, पक्षी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव पाहिले की थक्क व्हायला होते. या गोष्टी एकदा काळजीपूर्वक पाहिल्या की त्याच्या मागील कार्यकारण भाव जाणून घेता येईल. एखादे तंत्रज्ञान जाणून घ्यायचे असेल तर ज्याने ते निर्माण केले आहे त्याच्याजवळ जाऊन आपल्याला ते शिकावे लागते. या सृष्टीचा निर्माता ईश्वर आहे. तिचा कार्यकारणभाव जाणून घेण्यासाठी भगवंताला शरण जावे लागेल.

शरण जाणे म्हणजेच भगवंताच्या जवळ जाणे. त्याशिवाय हे शक्य नाही. म्हणून समर्थ म्हणतात मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आपल्याला त्याच्याजवळ वस्ती केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच भगवंताच्या अस्तित्वाचे ज्ञान आपल्याला प्राप्त होईल आणि या चराचरात तो कसा भरून राहिला आहे त्याचेही ज्ञान होईल. आपले कल्याण कशात आहे हे देखील समजेल आणि मग आपोआपच आपली वाटचाल व्यवहारातून अध्यात्माकडे आणि अध्यात्माकडून मोक्षाकड अशी सुरू होईल. समर्थांचे हे सांगणे आपल्या हिताचे आहे. म्हणूनच ते म्हणतात की याची कधीही अवज्ञा करू नकोस.

स्वसंवाद :

१) मी कधी या सृष्टीकडे खऱ्या अर्थाने थक्क होऊन, आश्चर्याने पाहिले आहे का? की सर्व काही गृहीत धरून जगतो आहे?

२) माझे मन खरोखरच “राघवी वस्ती” करते आहे का, की ते अजूनही बाह्य जगातच भटकत आहे?

३) समर्थांची ही विनंती मी मनापासून स्वीकारली आहे का, की अजूनही दुर्लक्षच करत आहे? (क्रमशः

– क्रमशः श्लोक ३७ आणि ३८.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares