२०१० पासून, किशोरवयीन मुलांनी साध्या फोनऐवजी सोशल मीडिया ॲप्सने भरलेल्या स्मार्टफोनकडे वळायला सुरुवात केली. प्रत्यक्षात जगाचं निरीक्षण करण्याऐवजी, अनुभव घेण्याऐवजी ते ऑनलाइन राहून आभासी जगात आपला जास्तीतजास्त वेळ घालवू लागले. त्यामुळे कुटुंब आणि मित्रांसोबतचा प्रत्यक्ष संवाद आणि मानसिक आरोग्य दोन्ही झपाट्याने घसरले..
हे पुस्तक आधुनिक संशोधनाच्या आधारे दाखवून देतं की, मुक्त खेळापासून स्मार्टफोनकडे झालेल्या या संक्रमणामुळे विकास प्रक्रियेत व्यत्यय येतात. अगदी झोपेच्या कमतरतेपासून ते व्यसनाधीनतेपर्यंत अनेक समस्या यामुळे निर्माण झाल्या आहेत. प्राचीन ज्ञानावर आधारित आणि अत्याधुनिक विज्ञान व उपयुक्त सल्ल्यांनी सजलेले हे आश्चर्यचकित करणारे पुस्तक वेगाने घडत असणाऱ्या बदलांना समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
या पुस्तकात –––
== डिजिटल युगात सुदृढ बालपण जपण्यासाठी पायऱ्या
== किशोरवयीन मुलांमध्ये आढळणाऱ्या शारीरिक व मानसिक समस्या व त्यावरील उपाय
== इंटरनेटच्या मायाजालाचा मुलांवर काय परिणाम होतो व मुलींवर काय परिणाम होतो
== चार मूलभूत हानी
== पालक, समाज, शाळा आणि शासन यांनी बजावण्याची भूमिका
मुलांना आभासी जगातून खऱ्या जगात आणण्यासाठी… हे पुस्तक फक्त एक वाचन नाही, तर आजच्या पिढीच्या मानसिक आरोग्याचा आरसा आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या किंवा स्वतःच्या डिजिटल जीवनशैलीचा परिणाम समजून घ्यायचा असेल, तर हे पुस्तक नक्की वाचावे.
इंटरनेटच्या मायाजालात हरवलेली मुलं – आभासी जगातील अस्वस्थ पिढी – समस्या आणि समाधान
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “एक चिरंतन चित्रपट : मुगल -ए -आझम” – लेखिका : डॉ. मीना श्रीवास्तव ☆ परिचय – श्री विश्वास देशपांडे ☆
पुस्तक : एक चिरंतन चित्रपट: मुग़ल-ए-आज़म
लेखिका – डॉ. मीना श्रीवास्तव
प्रकाशक- लोकव्रत प्रकाशन
पाने – १५४
किंमत – ₹ ३००
डॉ. मीना श्रीवास्तव
डॉ. मीना श्रीवास्तव हे नाव माझ्या माहितीनुसार बहुतेक मराठी वाचकांना परिचित आहे. त्यांची लेखनशैली आवडणारे अनेक वाचक आहेत. माझ्या आजपर्यंत प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकांवर त्यांनी अत्यंत ओघवत्या आणि लालित्यपूर्ण भाषेत परीक्षणे लिहिली आहेत. त्याचप्रमाणे माझ्या लेखनावर त्यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रतिक्रिया वाचक वर्गाची दाद घेऊन गेल्या आहेत. माझ्या ‘ रामायण महत्व आणि व्यक्तीविशेष’ आणि ‘महर्षी वाल्मिकी’ या दोन्ही पुस्तकांचे त्यांनी हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये केलेले अनुवाद रसिकांच्या पसंतीस उतरले आहेत. तसेच प्रा. हेमंत सामंत यांच्या अनामिक क्रांतिकारकांच्या आंदोलनाविषयी मराठी लेखांवर आधारित त्यांची दोन हिंदी अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे लेखन वाचताना वैद्यकीय व्यवसायात असलेली ही व्यक्ती इतके सुंदर मराठी लेखन करू शकते याचेही आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
मुगले आजम म्हणजे काळाच्या पडद्यावर अमिट ठसा उमटवून गेलेली अजरामर कलाकृती. हा चित्रपट १९६० मध्ये प्रदर्शित झालेला असला तरी त्यातील कथा आजही ताजी आणि टवटवीत वाटते. ही प्रेम कथा म्हणजे कलेच्या प्रांतातील सगळ्याच कलाकारांनी पाहिलेले एक भव्य दिव्य स्वप्न असे म्हणता येईल. या पुस्तकात डॉ. मीना श्रीवास्तव यांनी या स्वप्नाचा प्रवास, त्यामागील निर्मिती प्रक्रिया आणि तो तयार होत असताना करावा लागणारा संघर्ष अतिशय सुंदर रीतीने उलगडला आहे.
खरे म्हणजे एखाद्या चित्रपटावर एखादे सुंदर पुस्तक लिहिले जाऊ शकते ही कल्पनाच मुळात आपल्याला सुखद धक्का देणारी आहे. तेही १९६० मध्ये निर्माण झालेल्या चित्रपटाबद्दल लिहिणे ही सोपी गोष्ट नाही. त्या काळात जाऊन, त्या सगळ्या गोष्टींचे संदर्भ शोधून त्यांचे हे पुस्तक सिद्ध झाले आहे. त्यांचे हे पुस्तक वाचत असताना आपण थेट त्या काळात जाऊन पोहोचतो. हे भव्यदिव्य स्वप्न साकार करीत असताना निर्माते आणि कलाकार यांच्या मनातील दडलेल्या संवेदना, त्यांनी केलेला त्याग आणि के. आसिफ यांच्यासारखे दूरदृष्टी असलेले दिग्दर्शक यांच्या जिवापाड केलेल्या प्रयत्नांची माहिती त्या या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाल्या आहेत.
हे पुस्तक पाहताक्षणीच आपले मन आकर्षून घेते. मधुबाला म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य! मुखपृष्ठावरील आपल्या हाताने आपल्या चेहऱ्यावरील घुंघट बाजूला करणाऱ्या मधुबालाची आकर्षक छबी आपले मन मोहून घेते. तिचा हसतमुख चेहरा, बोलके डोळे हे चित्र जिवंत करतात. या पुस्तकात या चित्रपटाबद्दल सगळं काही सांगणारी माहितीपूर्ण अशी १५ प्रकरणे आहेत. पुस्तकाच्या शेवटी संदर्भ ग्रंथांची यादी लेखिकेने दिली आहे. त्यातून लेखिकेची पारदर्शकता, प्रामाणिकपणा तर दिसतोच परंतु पुस्तकातील माहितीची अधिकृतता सुद्धा प्रमाणित होते. पुस्तकामध्ये ठिकठिकाणी या चित्रपटाशी संबंधित कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आदींची कृष्णधवल छायाचित्रे दिली आहेत. त्यामुळे पुस्तक अधिक बोलके होते.
या पुस्तकाच्या लेखनासाठी लेखिकेने अपार कष्ट घेतले आहेत. मुगले आजम या चित्रपटाने लेखिकेच्या मनावर आधीपासूनच गारुड केले होते. परंतु हे पुस्तक लिहायचे ठरल्यानंतर संदर्भ ग्रंथ मिळवणे, आंतरजालावरील माहिती मिळवणे या सगळ्या गोष्टीत त्या कमालीच्या गढून गेल्या आणि जवळपास दोन वर्षे त्या मुगले आजमच्या जगातच मनाने वावरत होत्या याची साक्ष त्यांचे मनोगत वाचल्यानंतर मिळते.
शहजादा सलीम आणि दासी अनारकली तरुण वयामध्ये भेटतात. त्यांना एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होते पण हे दोन प्रेमी जीव एकत्र येऊ शकत नाहीत. शहजाद्याचे वडील त्यांच्या प्रेमात भिंत बनून उभे राहतात आणि दोघांचे मार्ग वेगळे होतात. अशी ही खरंतर साधी सोपी कथा. परंतु या कथेमध्ये दिग्दर्शक के. आसिफ यांनी इतके सुंदर रंग भरले की ही कथा पडद्यावर जिवंत झाली आणि युगानुयुगे लोकांना ती आठवत राहील अशा प्रकारे तिचे सादरीकरण त्याने आणि इतर कलाकारांनी केले.
या चित्रपटाचे संगीत आणि गाणी हा सुद्धा एक वेगळ्याच संशोधनाचा आणि लेखनाचा विषय व्हावा इतके ते उच्च दर्जाचे आहे. ती गाणी आजही ताजी टवटवीत वाटतात. या सगळ्या गोष्टींचा मनोरम धांडोळा खास स्वतंत्र प्रकरणातून लेखिकेने घेतला आहे. चित्रपटाचे संगीतकार नौशाद अली यांच्याबद्दलची आणि गीतकार शकील बदायुनी यांच्याबद्दलची अतिशय सुंदर माहिती लेखिकेने दिली आहे. लिहिण्याची शैली तर एवढी ओघवती आहे की वाचक उत्सुकतेने पुढे पुढे वाचत जातो.
आधी श्वेतधवल असलेला हा चित्रपट आधुनिक तंत्रज्ञानाच्या किमयेने नंतर नवरंगात न्हाऊन आला. त्याचप्रमाणे त्याचे रंगमंचीय सादरीकरण देखील झाले. त्या चित्रपटाची ही सगळी रूपे लेखिकेला अपार भावली. या चित्रपटाचे दिग्दर्शक असलेल्या के. आसिफ यांच्या जीवन चरित्रावर लेखिकेने टाकलेला प्रकाशझोत आणि चित्रपटाला आर्थिक सहाय्य करणारे शापूरजी पालोनजी यांच्या बद्दलची माहिती आपल्याला चित्रपट कसा तयार झाला हे समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची मदत करते.
त्याचप्रमाणे या चित्रपटात काम करून आपल्या अभिनयासाठी अमर झालेले पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार, मधुबाला, दुर्गा खोटे, निगार सुलताना, इत्यादी कलाकारांबद्दल आणि त्यांच्या जीवनाबद्दल लेखिकेने फार रोचक शब्दात माहिती दिली आहे. त्यांचे जीवनातील फारसे कोणाला माहीत नसलेले हृद्य प्रसंग सांगितले आहेत.
या चित्रपटातील संवादांचे सौंदर्य लेखिकेने चित्रपटातील प्रत्यक्ष संवाद देऊन वाचकांच्या नजरेस आणले आहे. त्यामुळे चित्रपटातील कथा प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. या चित्रपटाशी संबंधित छोटे-मोठे कलाकार, तंत्रज्ञ, त्यासाठी प्राणपणाने मेहनत करणारी सगळी माणसे या सगळ्यांची माहिती या पुस्तकात आपल्याला मिळते. या चित्रपटाशी संबंधित कुठलीही छोटीशी माहिती देखील दुर्लक्षित होणार नाही याची काळजी हे पुस्तक लिहिताना लेखिकेने घेतलेली दिसते. त्यामुळेच चित्रपट रसिकांसाठी हे पुस्तक म्हणजे मस्ट रीड असे आहे.
एकदा हातात घेतल्यानंतर हे पुस्तक सोडवत नाही. लेखन, भाषाशैली, चित्रे, छपाई या सर्व दृष्टीने पुस्तक अत्यंत देखणे झाले आहे. केवळ चित्रपट रसिकांसाठीच नव्हे तर साहित्य आणि कलेचा अभ्यास करणाऱ्या प्रांतातील सर्वांसाठी हे पुस्तक म्हणजे एक अनमोल ठेवा ठरणार आहे.
अशा या सुंदर पुस्तकासाठी मी लेखिका डॉ. मीना श्रीवास्तव आणि प्रकाशकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि हे पुस्तक वाचकांना नक्कीच एक चांगले पुस्तक वाचल्याची अनुभूती देईल अशा शुभेच्छा व्यक्त करून थांबतो.
परिचय : श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव, मो. ९४०३७४९९३२
– – (पुस्तकाविषयी अधिक माहितीसाठी डॉ. मीना श्रीवास्तव यांच्याशी ९९२०१६७२११ या व्हाट्सऍप नंबर वर संपर्क साधावा.)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “गाथा कोकणच्या सागरदुर्गांची” – लेखक : प्रा. प्र. के. घाणेकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : गाथा कोकणच्या सागरदुर्गांची
लेखक: प्रा. प्र. के. घाणेकर
पृष्ठे: ३८१
मूल्य: ६००₹
कोकणचा भूभाग प्राचीन काळापासून अत्यंत महत्वाचा राहिला आहे. दमण-डहाणूपासून ते गोवा-कारवारपर्यंत हा भूभाग निखळ मराठी भाषिक आहे. कित्येक शतकांपूर्वीपासून या प्रदेशातील बंदरे आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्वाची भूमिका बजावीत आहेत. इथल्या खाड्या एकेकाळी खूप आतवर जहाजांच्या वावरास उपयुक्त ठरल्या होत्या. पण या सगळ्या घडामोडींसाठी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका इथल्या सागरदुर्गांनी बजावलेली दिसते.
कुलाबा, खांदेरी, पद्मदुर्ग, जंजिरा, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, अंजदीव हे सागरबेटांवरील जलदुर्ग किंवा पाणकोट जसे कोकणात आढळतात, तसेच आफ्रिकन सिद्दींनी उभारलेले उंदेरी (जयदुर्ग) आणि जंजिरा (जझीरे मेहरूब) किंवा उत्तर फिरंगाणातील केळवे-माहीमचे किल्ले, तसेच दक्षिणेस गोव्यातील आग्वाद, गास्परदियश, रेईसमागोस, खोलगड उर्फ काब-द-राम असे अनेक किल्ले पोर्तुगीजांनी बांधून घेतले. त्यातही रेवदंडा आणि वसई यांची दुर्गबांधणी खूप वेगळ्या त-हेची आहे.
हे पुस्तक लिहिताना लेखकाने खालील अपेक्षा व्यक्त केली आहे…
कोकणचे किल्ले पाहावयाचे ते ह्यासाठी. आपण का? कसं? कोणासाठी अन् कशासाठी जगायचं? ह्याचा अर्थ या जलदुर्गांच्या सहवासात कळतो. जळणारं मन, उघडे डोळे अन् चालणारे पाय असतील तर हे सारं नीट कळतं आणि मग अशा जागी गेलं की, आपले आपण हरवून जातो. सागराची गाज आपल्याला शिवरायांच्या कल्पनेतील झेप अन् मनसुब्यातील फेक सांगू लागते. इथल्या दुर्गाची ढासळणारी तटबंदी शिवस्पर्शाची कहाणी सांगू लागते. तसं झालं की, अशा किल्ल्यांवर कधीमधी दिसणाऱ्या पुंड तरुणांच्या शहरी टोळक्यांची नाच-गाणी, हावभाव यांची कीव येते. “देवा, त्यांना क्षमा कर… ” असं वाक्य आपल्याही तोंडी येतं.
हे किल्ले पाहताना आपला गौरवशाली इतिहास आपल्याला स्मरणार नसेल, तर हे किल्ले पाहायला जायचंच कशाला? तिथं गेल्याचा ‘पराक्रम’ अजरामर करण्यासाठी खडू, कोळसा, विटकर, चुना आणि तैलरंग अशा गोष्टींचा उपयोग करून घाणेरड्या अक्षरात आपली नावं कोरून ठेवण्याचा उपक्रम करताना आपल्याला स्मरलं पाहिजे की, आपल्या पूर्वजांनी घाम गाळून अन् रक्त सांडून हे दुर्ग उभारले अन् प्राणपणाने जपले, पण त्यांपैकी एकानंही आपलं नाव नाही कुठे कोरून ठेवलं. इथं आल्यावर इथल्या वास्तू, इथली प्रेक्षणीय ठिकाणं, पूजनीय स्थानं, इथली माणसं या सर्वांची जाण आपण राखली पाहिजे. ते आपलं कर्तव्यच आहे. कारण या देशाचा हा वैभवशाली इतिहास आपला आहे.
या किल्ल्यांवर लोकांनी यावं, डोळे भरून ही दुर्गरत्नं पाहावीत. शिवरायांनी ही दुर्गपुष्पे समृद्ध रत्नाकराच्या अन् तात सह्याद्रीच्या माथी वाहून केलेली शौर्यपूजा पाहावी, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. इये मुलखी हिंडणाऱ्यांचे चार गट प्रामुख्याने मला आढळतात. शिवरायांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत श्रद्धेने या गडकोट, किल्ले अन् दुर्गावर मनापासून प्रेम करणारे, हा झाला पहिला वर्ग. पाठपिशवी लटकावून ट्रेकिंग -रॉकक्लाइंबिंग करणारे अन् हिमालयात जाण्यासाठी पूर्वतयारी म्हणून सह्याद्रीत हिंडणारे, हा दुसरा वर्ग. ह्या भागातील पशू -पक्षी -वनस्पती, भूरचना अशा निसर्गविशेषांचा अभ्यास करण्यासाठी हिंडणाऱ्यांचा तिसरा गट, केवळ गंमत म्हणून केव्हातरी-कसंतरी-कारणपरत्वे बाहेर पडणाऱ्यांचा चौथा गट. पण हे किल्ले डोळसपणे पाहावेत, त्यांचं महत्त्व जाणून घ्यावं, तेथे घडलेला इतिहास समजून घ्यावा; तेथील निसर्गविशेषही परिचयाचा असावा, असं सर्वसमावेशक असणं, मला अपेक्षित आहे. पैकी गिर्यारोहण प्रेमींचा कोणत्याही किल्ल्यावर नव्या सुखसोयी, रस्ते, विजेचे दिवे, राहण्याजेवणाची सोय करण्यास सामान्यतः विरोध असतो. या ठिकाणांची दुर्गमता, निर्मनुष्यपणा, अडचणी तशाच राहाव्यात असा यांचा आग्रह असतो. पण आश्चर्य असं की, सर्व सुविधा तिथे उपलब्ध झाल्या, तर त्यांचा लाभही ही मंडळी घेतातच.
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ५-१५ किल्ल्यांवर लोकांनी जावं, तिथला इतिहास स्मरावा; वृद्ध, लहान मुलं, माता, भगिनी, आजारी, अपंग अशा सर्वांना तिथं जाणं सुकर असावं, त्यांना तिथं व्यवस्थित राहता यावं, असं मला नेहमी वाटतं. कारण इथे आपला इतिहास घडला आहे. अवघड वाटा, दुष्कर मार्ग, मानवी संपर्कापासून दूर जावं असं ज्या ट्रेकर्सना वाटतं, त्यांना हिंडायला या दुर्गांच्या देशात अनेक ठिकाणं आहेत. मात्र या साऱ्या सोयींच्या पाठोपाठ येऊ शकणारा बकालपणा टाळणं हे फक्त तिथे जाणाऱ्या आपल्या सर्वांच्याच हाती आहे. तेवढं सांभाळलं जावं असं आवर्जून वाटतं.
– – –
अशा ७८ किल्ल्यांची नकाशांसह माहिती प्रसिद्ध दुर्गअभ्यासक व लेखक प्रा. प्र. के. घाणेकर सरांनी या पुस्तकात दिली आहे. ती सर्वांनाच निश्चितपणे उपयुक्त ठरेल.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
लेखक गण : मिराया पटवर्धन, चित्रा गोडबोले आणि भूषण पटवर्धन
पृष्ठ: १०८ A4 size
मूल्य: ४९९₹
आयुर्वेद फॉर किड्स (मराठी) हे लहान मुलांना आयुर्वेदाची ओळख करून देणारे अत्यंत रंजक आणि माहितीपूर्ण पुस्तक आहे. मिराया पटवर्धन, चित्रा गोडबोले आणि भूषण पटवर्धन यांनी हे पुस्तक मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत आणि आकर्षक चित्रांच्या माध्यमातून तयार केले आहे.
या पुस्तकात आयुर्वेदातील मूलभूत संकल्पना – शरीराची काळजी, आहाराचे महत्त्व, ऋतूनुसार सवयी, आणि नैसर्गिक पद्धतीने आरोग्य टिकवण्याचे मार्ग – गोष्टीसारख्या शैलीत मांडले आहेत. पुस्तकातील पात्रे आणि रंगीत चित्रे मुलांच्या कुतूहलाला चालना देतात आणि त्यांना आरोग्याबद्दल जागरूक बनवतात.
विशेष म्हणजे, मिराया, चित्रा आणि आबा यांच्या संवादातून मुलांना आयुर्वेदाचे तत्त्वज्ञान सहज समजते. त्यामुळे हे पुस्तक केवळ माहिती देणारे नसून मुलांना आरोग्यदायी जीवनशैलीची प्रेरणा देणारे ठरते.
वैशिष्ट्ये :
मुलांसाठी सोपी व मनोरंजक भाषा
आकर्षक आणि रंगीत चित्रे
आयुर्वेदाच्या मूलभूत संकल्पनांची ओळख
आरोग्यदायी सवयींचे मार्गदर्शन
– – एकूणच, आयुर्वेद फॉर किड्स हे पुस्तक मुलांना लहानपणापासूनच आरोग्य, आहार आणि निसर्गाशी जोडणारे ज्ञान देणारे उपयुक्त व प्रेरणादायी वाचनीय पुस्तक आहे. आणि फक्त लहान मुलांनाच नाही, तर मोठ्यांनाही अनेक बाबतीत या पुस्तकातल्या माहितीचा उपयोग करून घेता येऊ शकेल.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “हिंदुत्वाचे विश्वप्रवक्ते — स्वामी विवेकानंद” – लेखिका : अंजली गोखले ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक : हिंदुत्वाचे विश्वप्रवक्ते–स्वामी विवेकानंद
– – संन्यासी योद्ध्याची जीवनगाथा
लेखिका : सौ. अंजली गोखले.
संपर्क: ८४८२९३९०११
प्रकाशक : विवेकानंद केंद्र, मराठी प्रकाशन विभाग पुणे.
संपर्क: ०२०-२४४३२३४२
पृष्ठे. : ३५६
मूल्य. : रु. ४००/-
स्वामी विवेकानंद म्हणजे भगवी वस्त्रे परिधान करुन शिकागो येथील सर्व धर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करणारे, श्री रामकृष्ण परमहंसांचे शिष्य, ज्यांनी हिंदू धर्म व हिंदुस्थानची ध्वजा जगात फडकवली… बस्स ! बहुतांश लोकांना स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल एवढेच माहिती आहे. खरे ना ? पण प्रत्यक्षात स्वामीजींचे व्यक्तीमत्व असे होते की ज्याला अष्टपैलू हा शब्दही तोकडा पडेल. कसे होते स्वामीजी नेमके ? त्यांच्या कार्याचा आवाका केवढा होता ? धर्माविषयी त्यांची मते किती स्पष्ट आणि ठाम होती ? अमेरिकेसह युरोपियन राष्ट्रांना त्यांची भुरळ पडावी असे त्यांच्यात काय होते ? वेद आणि विज्ञान यावरील त्यांचे प्रभुत्व, धर्म आणि देशातील दरिद्रीनारायण यांच्याविषयी त्यांची असलेली मते, विचार आणि प्रत्यक्ष आचार यांचा त्यांनी साधलेला मेळ, युवक आणि शिक्षणपद्धती, उपासना आणि धर्माचरण, आत्मोन्नती आणि समाजोन्नती, त्या काळातील भारतीय महिलांची असलेली अवस्था,… अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर मिरज येथील सौ. अंजली गोखले लिखित..
अंजली गोखले
‘हिंदुत्वाचे विश्वप्रवक्ते… स्वामी विवेकानंद ‘ हे चरित्र एकदा तरी वाचावे.
एका असामान्य व्यक्तीमत्वाचे जीवन आणि कार्य अत्यंत साध्या, सोप्या भाषेत त्यांनी समजावून दिले आहे. स्वामीजींच्या बालपणापासून ते समाधीस्थ होण्याच्या दिवसापर्यंतचा विशाल कालपट त्यांनी अठ्ठावीस प्रकरणांमधून वाचकांसमोर मांडला आहे. स्वामीजींचे बालपण, तारुण्याच्या उंबरठ्यावरील कॉलेज जीवनातील प्रवेश, त्यानंतर श्री रामकृष्ण परमहंस यांची होणारी भेट, या भेटीनंतर पुन्हा पुन्हा भेट घेण्याची लागलेली ओढ लेखिकेने अत्यंत सुलभपणे रंगवून सांगितले आहे. श्री रामकृष्ण परमहंस यांच्या विषयी एक स्वतंत्र प्रकरण लिहिल्यामुळे वाचकाला त्यांच्याविषयी दुर्मिळ अशी माहिती मिळते. पुढील काळात स्वामीजींच्या कुटुंबावर आलेली संकटे, व्यवहारातील चटके आणि त्यातून गुरुकृपेने बाहेर पडण्याचा उपलब्ध झालेला मार्ग याचे वर्णन येते.
आपल्या गुरूंच्या सहवासात स्वामीजींचे व्यक्तिमत्व कसे विकसित होत गेले आणि त्यांच्या आयुष्याची दिशा कशी ठरली हे या सर्व लेखनातून स्पष्ट होते. आपल्या पुढील कार्याचा एक भाग म्हणून स्वामीजींनी केलेली संपूर्ण देशाची पदयात्रा, त्यांचा पहिला परदेश प्रवास, त्यानंतर शिकागो येथील सर्व धर्म परिषदेत त्यांनी केलेले भाषण, या ध्येयापर्यंत पोहचताना आलेल्या अनंत अडचणी, गुरुकृपेने त्यातून बाहेर पडण्याचा मिळालेला मार्ग, त्यांचे अमेरिकेतील कार्य या सर्व घटना लेखिकेने अत्यंत सविस्तरपणे आपल्यासमोर मांडल्या आहेत. स्वामीजींचे पुन्हा एकदा अमेरिकेला जाणे, त्यांचे इंग्लंडमधील दोन दौरे, तसेच अन्य युरोपीय देशांमधील दौरे, त्यांची व्याख्याने, वेदांत प्रसार, वेदांत आणि विज्ञान यांची सांगड घालण्यासाठी चाललेला आटोकाट प्रयत्न, पश्चिमात्य राष्ट्रांची श्रीमंती आणि भारतातील दारिद्र्य पाहून त्यांच्या मनात चाललेला वैचारिक कोलाहल, रामकृष्ण मिशनची स्थापना, मार्गारेट नोबेल म्हणजेच भगिनी निवेदिता यांच्यासारख्या शिष्योत्तमेचा झालेला लाभ, मातृभूमीला परतल्यानंतर झालेले स्वागत, सभा, व्याख्याने, जगभरातील अनेक नामवंत विचारवंत, वैज्ञानिक, तत्त्वज्ञ, धनाढ्य यांच्याशी सर्व विषयावर झालेली चर्चा या सर्व बाबी अत्यंत सूक्ष्मपणे लेखिकेने नमूद केलेल्या आहेत.
समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भारावून टाकणारे स्वामीजींचे व्यक्तिमत्व, त्यांचा मनोनिग्रह, त्यांची ध्येयपूर्तीची आस, या सर्वावर विविध व्याधीमुळे काय परिस्थिती निर्माण झाली होती व त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून स्वामी आपल्या अंतिम ध्येयाकडे कशी वाटचाल करत होते याची कल्पना हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला येते. अनेक प्रकारच्या टीकांना सामोरे जाऊनही, वैयक्तिक बदनामी सहन करूनही, मनाचा तोल न ढळू देता एक संन्यस्त जीवन प्रवासी कशा प्रकारे मार्गक्रमण करत असतो याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे स्वामीजी !
त्यांच्या अलौकिक, असामान्य, अतुलनीय आणि अविश्वसनीय अशा कार्याचा आढावा घेताना लेखिकेने अनेक लहान-मोठे प्रसंग, भावनिक प्रसंग, स्वामीजींना भेटलेली लहान मोठी माणसे, त्यांच्याशी झालेले संवाद, मतभेद या सर्वांचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे स्वामीजींचे कार्य अगदी सहजासहजी पार पडले असे कोणाला वाटत असेल तर ते किती चुकीचे आहे हे समजून येते. स्वामीजींचे विचार समजावून देताना लेखिकेने स्वामीजींच्या तोंडची अनेक वाक्ये उद्धृत केली आहेत. कर्मयोग, भक्तियोग, राजयोग आणि ज्ञानयोगाचे स्वामीजींनी केलेले पृथक्करण अत्यंत सोप्या शब्दांत लेखिकेने सांगितले आहे. त्यामुळे स्वामीजींचे विचार नेमके काय होते हे आपल्याला समजून येते.
शेवटच्या एका प्रकरणात त्यांनी स्वामीजींच्या काही ह्रद्य आठवणी कथन केल्या आहेत. त्यातून विविध लोकांची त्यांच्याविषयी असलेली मते वाचायला मिळतात. स्वामीजी चार वेळेला महाराष्ट्रात येऊन गेले होते. लोकमान्य टिळक, वि. दा. सावरकर, नाटककार भा. वि. उर्फ मामा वरेरकर यांची व स्वामीजींची झालेली भेट, त्यांच्यातील विचारांची देवाणघेवाण, स्वामीजींनी केलेले मार्गदर्शन हे सर्व मराठी मनाला रंजक आणि स्फूर्तीदायक वाटणारे आहे.
परमपूज्य श्री रामकृष्ण परमहंस, माता सारदा देवी, भगिनी निवेदिता आणि श्री. गुडवीन यांचे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात काय स्थान होते हे या पुस्तकाच्या वाचनानंतर लक्षात येते. गुडविन हे नसते तर स्वामींचे विचार आपल्यापर्यंत पोहोचेल असते का ? त्यामुळे ते कोण होते हे जाणून घ्यायलाच हवे. प्रा. रोमा रोलॉनी स्वामीजींचे वर्णन ” विश्वात्म्याच्या वाद्यवृंदाने सादर केलेले उत्कृष्ट संगीत ” या शब्दात का करतात हे समजून घेतले पाहिजे.
स्वामीजींच्या पश्चात कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाबरोबरच विवेकानंद केंद्र या संस्थेचीही निर्मिती करण्यात आली. या विवेकानंद केंद्राचा परिचय व केंद्राचे महाराष्ट्रातील प्रकल्प याविषयी सुद्धा माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जिज्ञासू वाचकांना त्याचा उपयोग होऊ शकेल.
विवेकानंदांचे व्यक्तीमत्व ‘इंद्रधनुष्यी ‘ होते असे लेखिकेने म्हटले आहे. या इंद्रधनुष्याचे सर्व रंग खुलवून दाखवणे हे खूपच अवघड काम आहे. परंतु लेखिकेच्या लेखणीने हे आव्हान पेलले आहे. अवघ्या साडेएकोणचाळीस वर्षांचे आयुष्य लाभलेल्या स्वामीजींच्या आयुष्यातील एक एक दिवस किती मोलाचा होता, आव्हाने आणि प्रतिकुलता यामुळे स्वामीजींना काय काय सहन करावे लागले, परंतु आपले गुरु श्री रामकृष्ण परमहंस व काली माता यांच्यावरील अगाध श्रद्धेमुळे झालेली ध्येयपूर्ती… हे सर्व वाचताना, स्वामीजी म्हणजे एक दैवी चमत्कारच होते याची खात्री पटते. या चमत्काराला शब्दबद्ध करुन वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्वपूर्ण काम सौ. अंजली गोखले यांनी केले आहे. आतापर्यंत त्यांनी विविध प्रकारचे लेखन केले आहे. स्वामीजींचे हे जीवन चरित्र म्हणजे त्यातील मानाचा तुरा आहे. असेच बहुमूल्य लेखन भविष्यातही त्यांच्याकडून व्हावे ही सदिच्छा.!
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मराठी संतसाहित्यातील अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. हा ग्रंथ संतकवी संत ज्ञानेश्वर यांनी भगवद्गीतेवर ओवीबद्ध भाष्य म्हणून लिहिला. परंतु आजच्या वाचकांसाठी मूळ ओवींचा अर्थ समजणे अनेकदा कठीण जाते. हीच अडचण लक्षात घेऊन ज्ञानेश्वरीतील विचार सोप्या, आधुनिक आणि समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न “ज्ञानाई” या पुस्तकातून करण्यात आला आहे.
या पुस्तकात लेखिका मंजुश्री गोखले यांनी ज्ञानेश्वरीतील गूढ तत्त्वज्ञान साध्या आणि प्रवाही भाषेत उलगडले आहे. प्रत्येक अध्यायातील प्रमुख विचार, अध्यात्मिक संदेश आणि जीवनाला दिशा देणारे तत्त्व स्पष्टपणे मांडले आहेत. त्यामुळे वाचकाला मूळ ग्रंथाचा सार सहज समजतो.
पुस्तकाची भाषा अत्यंत सोप्या मराठीत, ओघवती आणि भावपूर्ण आहे. धर्म, अध्यात्म आणि जीवनमूल्ये यांची सांगड घालताना लेखिका वाचकाला विचार करायला प्रवृत्त करतात. विशेष म्हणजे, हा ग्रंथ केवळ धार्मिक न राहता व्यक्तिमत्त्व विकास आणि जीवनदृष्टी घडवणारा ठरतो.
पुस्तकाचीवैशिष्ट्ये :
– – ज्ञानेश्वरीचा सोपा आणि समजण्याजोगा अनुवाद
– – अध्यात्मिक विचारांचे आधुनिक संदर्भात स्पष्टीकरण
— – विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य वाचकांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त
– – मराठी संतसाहित्य समजून घेण्यासाठी उत्तम मार्गदर्शक
संत ज्ञानेश्वर महाराज हे नाव घेतल्यावर मन प्रेमादराने भरून जाते. कोवळ्या वयात समाजाकडून होत असलेले आघात सोसत असतानाही त्याच समाजाच्या उत्थानासाठी झटणारे, आध्यात्मिक क्षेत्रातील आपली असामान्य उंची बाजूला सारत अठरापगड जातीतील संतांना आपलेसे करीत वारकरी संप्रदायाला वेगळे वळण देणारे, आध्यात्मिक क्षेत्रातील समानतेचा पुरस्कार करणारे आणि ज्ञानेश्वरी, अमृतानुभव इत्यादी अक्षर साहित्याची निर्मिती करून मराठी भाषेला आणि भाषकांना उपकृत करणारे संत ज्ञानेश्वर महाराज सर्वांची माउली न होते, तरच नवल! त्यांनी भगवद्गीतेचा प्राकृत मराठी भाषेत केलेला रसाळ अनुवाद म्हणजे भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी! काळाच्या ओघात तत्कालीन मराठी भाषा आजच्या काळात दुर्बोध वाटू लागली आहे. हे जाणवून ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा आजच्या मराठी भाषेत सोप्या पद्धतीने केलेला ओवीबद्ध अनुवाद म्हणजे ‘ज्ञानाई’ हा ग्रंथ!
लेखिका मंजुश्री गोखले यांनी ज्ञानेश्वरीतील गूढ विचार सरळ आणि सुबोध भाषेत उलगडले आहेत.
संत साहित्याची खरी गोडी अनुभवायची असेल तर हे पुस्तक नक्की वाचा.
“ज्ञानाई” हे पुस्तक म्हणजे ज्ञानेश्वरीच्या विशाल तत्त्वज्ञानाचे सोपे, सुगम आणि जीवनस्पर्शी रूप आहे. ज्यांना संत साहित्याची आवड आहे किंवा ज्ञानेश्वरी समजून घ्यायची आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरते.
– – आजच आपल्या संग्रहात जोडा.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “द प्रॅक्टिसिंग माइंड : सरावशील मन” – लेखक : थॉमस एम. स्टर्नर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : द प्रॅक्टिसिंग माइंड : सरावशील मन
लेखक : थॉमस एम. स्टर्नर
मूल्य: २५०₹
मन भटकतंय? लक्ष लागत नाही? काम अर्धवट राहतात?
– – यश मिळत नाही कारण मेहनत कमी आहे… असं नाही!
खरं कारण आहे — सरावाची चुकीची मानसिकता.
द प्रॅक्टिसिंग माइंड हे पुस्तक यश, एकाग्रता आणि कौशल्य विकास यामागील सर्वात महत्त्वाचा घटक — सातत्यपूर्ण सराव (Practice) — यावर आधारित आहे. लेखक सांगतो की आपण बहुतेक वेळा अंतिम परिणामावर लक्ष केंद्रित करतो, त्यामुळे ताण, अधीरता आणि अपयशाची भीती वाढते. पण जर आपण प्रक्रियेवर प्रेम करायला शिकलो, तर यश आपोआप मिळते.
हे पुस्तक “परिणामाऐवजी प्रक्रियेचा आनंद घ्या” हा साधा पण प्रभावी जीवनमंत्र शिकवते.
मुख्य संकल्पना
Present Moment Awareness — वर्तमान क्षणात काम करण्याची सवय.
Process over Result — परिणामापेक्षा सराव महत्त्वाचा.
Patience Development — संयम ही शिकता येणारी कौशल्य आहे.
Mental Discipline — मनाला प्रशिक्षित करता येते.
Small Consistent Steps — छोट्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून मोठं यश.
पुस्तकाची वैशिष्ट्ये ––
– – भाषा अतिशय सोपी व समजण्यासारखी.
– – दैनंदिन जीवनातील उदाहरणांमुळे संकल्पना लगेच समजतात.
– – विद्यार्थ्यांपासून कलाकार, खेळाडू, व्यावसायिक — सर्वांसाठी उपयुक्त.
– – आत्मविकासाकडे शांत आणि व्यावहारिक दृष्टिकोन.
हे पुस्तक “Hard Work” पेक्षा “Right Mindset” कसं महत्त्वाचं आहे हे शिकवतं. यश हे एका मोठ्या उडीने नाही तर दररोजच्या छोट्या सरावातून तयार होतं — ही जाणीव हे पुस्तक प्रभावीपणे करून देते.
– – स्वतःला घडवायचं असेल, तर हे पुस्तक नक्की वाचण्यासारखं आहे.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “आणि राजू झाला बिझिनेसमन” – लेखक : श्री सुरेश हावरे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : आणि राजू झाला बिझिनेसमन
– – नोकरीपेक्षा व्यवसाय करा!
लेखक : सुरेश हावरे
पृष्ठ: १९६
मूल्य: १९९₹
“उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा ” या बेस्टसेलरच्या लेखकाचे नवे पुस्तक!
– – – प्रत्येकाला जीवनात उपयोगी पडतील असे यशस्वी उद्योजकाचे अनुभवाचे बोल
हळूहळू मराठी तरुण उद्योग करायला लागलाय आणि त्याचप्रमाणे अनेक तरुण त्यासाठी उत्सुक असलेले दिसतायेत… अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंन मराठी माणूस उद्योग करण्यापेक्षा जास्त करून नोकरीच्या शोधात असायचा. मात्र आता मानसिकता बदलते आहे. सुप्रसिद्ध उद्योजक डॉ. सुरेश हावरे यांनी यासाठी केलेले प्रयत्न आता फळाला येत असलेले दिसत आहेत… जणू ते आता मराठी तरुणांसाठी मेंटॉरच झाले आहेत.
या पुस्तकात असलेली राजूची गोष्ट त्यांनी मेंटॉरच्या भूमिकेतूनच सांगितल आहे. डॉ. हावरे राजूला मुंबईतील फॅशन स्ट्रीट, झवेरी बाजार, धारावी, खाऊ गल्ली, पुस्तक गल्ली, फुलमार्केट अशा मोठ्या उलाढाली असलेल्या ‘मार्केट्स’ची ओळखअसलेल्या ‘मार्केट्स’ची ओळख करून देतात.
उद्योगाची सुरुवात कशी करावी याचे काही मूलमंत्र देतात…
उद्योग का करावा?
कर्ज घेण्यातील बारकावे
उद्योगाची भाषा
नेटवर्किंग
बदललेल्या विक्री व्यवस्थापनाचे मंत्र
निर्णय प्रक्रिया
व्यवसायातील चढउतार…
आणि उद्योगाच्या अशा विविध पैलूंची माहिती राजूला उपयोगी पडते आणि मग राजू होतो यशस्वी ‘बिझनेसमन’!
उद्योग सुरु करण्यासाठी, तो यशस्वी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी गोष्टीरुप मार्गदर्शन करणारं परिपूर्ण पुस्तक
… आणि राजू झाला बिझनेसमन!
या पुस्तकात
उद्योगच करावा! पण का?
उद्योगच करावा! पण कसा?
उद्योगच करावा! पण कशासाठी?
– – या सर्व प्रश्नाची सविस्तर उत्तरे दिली आहेत.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुरेखाचा सुरेखसा कवितासंग्रह ” अंकुरित आभार “हाती लागला आणि पायाची उणीव असणारी “ति “ची आभाळ भरारी बघून पेन उचलल्याशिवाय राहावलच नाही.
मुखपृष्ठ पाहता क्षणी तिथं बसलेली शुभ्रधवल वस्त्र धारी सुंदरी म्हणजेच शुभ्रधवल मन असणारी सुरेखा असे मला वाटले .तिची नजर आभाळाकडे… त्यातून डोकावणाऱ्या किरणाकडे आहे ..आणि त्या प्रकाश किरणात ती न्हाऊ पाहते.. म्हणजेच साहित्यप्रभेने ती उजळतेय! भक्ती प्रकाशनाने समर्पक चित्र दिले त्याबद्दल कौतुकास पात्र आहेत
सुरेखा चिखलकर
मनीषाची विस्तृत प्रस्तावना कवित्रीचा विशाल पट उलघडणारी आहे. आणि सुरेखाचे मनोगत म्हणजे दोन्ही हातावर सुरू झालेला शंभर टक्के दिव्यांग प्रवासातून शंभर टक्के सबल व्यक्तिमत्त्वाला अधोरेखित करणारे वाटले. दिव्यांग असतानाही शिक्षण, पदव्युत्तर शिक्षण, स्वतःच्या पायावर उभे असलेली(ब्युटी पार्लर) आणि साहित्य व सामाजिक कामातील योगदान ही सोपी गोष्ट नाही .असंख्य वेदनाताई शस्त्रक्रियांना पचवून दिव्यांगावर मात करून ज्या आत्मविश्वासाने ती आज समाजात उभी आहे, जे स्थान तिने निर्माण केले आहे त्यासाठी वज्राराचे मन असावे लागते. ते नक्कीच तिच्याकडे आहे .टाकीचे घाव इतके सोसूनही कवितेतील कोमलता ही तिच्याकडे इतकी विपुल असावी याचं आश्चर्य वाटतं !आणि कविता ही कशा तर निराशेचा सूर नसणाऱ्या! कसे जमते सखे हे तुला इतके पॉझिटिव्ह राहणे? सोनाली नावांगुळ, सचिनदा कर्नाळ यांचे मला कौतुक होते …पण आता त्यामध्ये तू ही सामील आहेस. आणि माझी गावकरी म्हणून तर अधिक उमाळा आणि अभिमान !!
असो तुझा कवितासंग्रह म्हणजे तुझ्या प्रतिमेला फुटलेले अंकुर आहेत ..त्यात असणाऱ्या साठभर कविता म्हणजे तुझ्या प्रतिभेचा, स्त्री जाणिवेचा ,संवेदनशीलतेचा, तुझ्या आतील आवाजाचा, तुझ्या उमेदीचा तुझ्यातील प्रेम भावनेचा, आत्मभानाचा अविष्कार आहेत .
पण याच जमिनीत एक
स्वप्नांचा एक अंकुर रुजला
पंख नसतानाही आभाळाकडे
झेप घेण्याचा ध्यास लागला
दोन्ही होत जमिनीवर
उड्या मारण्याची हौस भारी
पण यात जिद्दीतून फुलली
माझ्या अस्तित्वाची गाथा
या एकाच कवितेवर बोलते .. कारण मला तिने खूप अंतर्मुख केले.पंख नसताना आभाळात उडण्याचे स्वप्न पाहणे म्हणजे
“मंजिल उनको मिलती है जिनके सपनो मे जान होती है| सिर्फ पंखो से कुछ नही, हौसले से उडान होती है|”
– – हे तू अक्षरशः खरे करून दाखवले आहेस .तेही पंख नसताना !यातून तुझे प्रखर आशावादी चित्र तर समोर येते. “उड्या मारण्याची हाऊस भारी” हे म्हटलं तर एखाद्या अल्लड पोरकट मुलीने म्हणण्याचे उदगार! म्हणले तर गमतीने! पण तुझ्या बाबतीत उड्या माराव्या वाटणारे नक्कीच नाही. पण ज्या सहजपणे तू ते रेखाटले आहेस त्यातील कारुण्याला तू जिद्दीची जोड देऊन अस्तित्वाची गाथा लिहिली आहेस हे मात्र खरे!
मी सगळ्या कवितांचा उहापोह नाही करू शकत . वाचकानी स्वतःच त्याचा आस्वाद घ्यावा. या संग्रहामध्ये बायाच्या, निसर्गाच्या, प्रबोधनाच्या ,आयुष्याच्या विविध रंगाच्या, आणि हो.. प्रेमाच्या ही कविता आहेत .विविधरंगी ,विविधढंगी कविता वाचताना सुरेखाचे अंतर्मन उलगडत जाते आणि आपले रिकामे आभाळही अंकुरित , पुलकित झाल्याशिवाय राहत नाही .
आणि आनंद हरी सरांचा ब्लर म्हणजे या संग्रहाला मिळालेली पोचपावती आहे.
तेव्हा सुरेखा तुझ्या जिद्दी सामाजिक व साहित्य प्रवासासाठी अंकुरणाऱ्या आभाळभर शुभेच्छा देऊन इथेच विराम घेते ..तर कधी खरेदी करतात हा कवितासंग्रह साहित्यरसिकानों?
परिचय : डॉ. राजश्री पाटील
प्रस्तुती : डॉ. सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “शिवभूमीची शौर्यकथा” – लेखक : श्री गोविंद अनंत मोडक ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक: शिवभूमीची शौर्यकथा
– – – महाराष्ट्राचा गोष्टीरूप इतिहास
लेखक: श्री गोविंद अनंत मोडक
पृष्ठ: २४१
मूल्य: ३५०₹
श्री. गोविंद अनंत मोडक, यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी संपादित केलेल्या ह्या दुर्मिळ पुस्तकात महाराष्ट्राच्या इतिहासाची माहिती फारच सुंदर लिहिली असून, ती वाचताना कंटाळा येत नाही, सर्व माहिती लिहिताना पाल्हाळ न लावता लिहिली असल्यामुळे तीनवेळा जरी हे पुस्तक कोणत्याही तरुणाने किंवा तरुणीने मन लावून वाचले तरी हा महाराष्ट्राचा संपूर्ण इतिहास त्याच्या मनात पक्का ठसेल.
सदरहू पुस्तकाची अनुक्रमणिका जरी सहज चाळली तरी ‘छत्रपती श्री शिवाजीराजे’ ह्यांच्या जन्मापूर्वीच्याही काळाचा आढावा घेऊन, शिवशाही कशी गाजली, कशी अस्त पावली, पेशवाई कशी सुरु झाली आणि पुढे एकंदरच मराठ्यांचे राज्य ‘कसे बुडाले’ इत्थंभुत माहिती सर्वच तरुण मुलामुलींना आणि प्रौढांनाही वाचायला मिळेल.
ह्या पुस्तकाची प्रस्तावना वाचून असे लक्षात येते की, इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि संशोधक ह्यांना सदरहू पुस्तक कसे समजावून द्यावे ह्याबाबतच्या पाच-सहा विशेष सूचनाही लेखकाने लिहिल्या आहेत.
महाराष्ट्राचा गोष्टीरूप इतिहास” हे पुस्तक मराठी इतिहासाचा थरारक, प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण प्रवास आहे.
शिवरायांच्या तलवारीपासून पानिपतच्या रणांगणापर्यंत असे वीर जे धन दौलतीसाठी नाही लढले, ते स्वतःसाठी नाही लढले, ते राष्ट्रासाठी, आपल्या मातीसाठी, स्वराज्यासाठी, आपल्या शिवरायांसाठी लढले. रक्त, श्रद्धा आणि धगधगत्या ज्योतीने महाराष्ट्र घडवणाऱ्या वीरांचे जगणे तसेच विस्मृतीत गेलेल्या इतिहासाला पुन्हा जिवंत करणाऱ्या ऐतिहासिक गोष्टींचा हा संग्रह आहे. हा संग्रह महाराष्ट्राच्या वैभवशाली भूतकाळाची अनोखी सहल वाचकांना घडवतो.
यात शूर चांदबिबी व हुशार मलिक अंबर, भोसले घराण्याचा उदय, शहाजी राजांची कर्तबगारी शिवबांचे बालपण, स्वराज्य स्थापनेची पूर्वतयारी, स्वराज्य स्थापना, शहाजी राजांची कैद, अफजलखानाचा वध, बाजीप्रभूंचा पराक्रम, शाहिस्तेखानाची स्वारी, बादशहाशी समेट, कपटाने धरले पण युक्तिने सुटले, स्वराज्य व्यवस्था, गड आला पण, सिंह गेला, दोन मोठ्या लढाया, राज्याभिषेक, दक्षिण दिग्विजय, मराठी राज्यावरील आरिष्ट, स्थलांतर, जगण्यासाठी पराकाष्ठा, मराठी राज्यांत दुही, बाळाजी विश्वनाथांस पेशवाई कशी मिळाली, मराठी राज्याच्या वाढीची तयारी, निजामाचा मोड, शिंदे होळकरांचा उदय, गजेंद्रमोक्ष, कोल्हापूरकर संभाजी सभेट, आपसांत लढाई, बाजीरावांची धडाडी, ‘‘माझे मस्तक तरी किल्ल्यात पडू दे! ’’, आता हिंदु- झाले पाहिजे, माळव्याची सनद, आधी एकी मग मुलुखगिरी, शाहूंचा मृत्यु, इत्यादी अश्या एकूण ५९ गोष्टी या संग्रहात समाविष्ट केलेल्या असून सनावली आणि कठिण शब्दांचा कोश हि दिलेला आहे.
इतिहास गोष्टीच्या स्वरूपात – सोपा, रंजक व शैक्षणिक दृष्टिकोनातून मांडलेला विद्यार्थी, शिक्षक, वाचक आणि इतिहासप्रेमींसाठी आदर्श ग्रंथ – –
मराठी साम्राज्याचा अभिमान जागवणारा प्रेरणादायी इतिहास“शिवभूमीची शौर्यकथा”
हे पुस्तक, महाराष्ट्रातल्या तरुण पिढीतल्या सर्वांनीच वाचण्याइतके सोप्या आणि भाषेची लांबण टाळून लिहिलेले आहे. पुस्तकाच्या शेवटी परिशिष्ट असून त्यात सनावली, प्रसिद्ध व्यक्तींचा कार्यकाळ इ. माहिती असून, बऱ्याच ऐतिहासिक शब्दांचे अर्थही त्यात दिलेले आहेत.
गडकोट किल्ल्यांवर भटकंती करणाऱ्या प्रत्येक मराठी व्यक्तीच्या संग्रही असावे, असे हे पुस्तक आहे. सर्वच तरुणांना हे पुस्तक आवडेल अशी आम्ही आशा करतो.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈