मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “सत्य असत्याशी मन केले ग्वाही” –  लेखक : श्री जी. डी. पारेख ☆ परिचय – श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “सत्य असत्याशी मन केले ग्वाही” –  लेखक : श्री जी. डी. पारेख ☆ परिचय – श्री जगदीश काबरे ☆

पुस्तक : सत्य असत्याशी मन केले ग्वाही

लेखक : जी डी पारेख 

प्रकाशक : गोल्डनपेज पब्लिकेशन, पुणे (पुस्तकासाठी संपर्क : ७७२२००५०८१)

एकूण पृष्ठे : १९६

किंमत : ₹ ३५० 

संत तुकाराम महाराजांचे नाव महाराष्ट्रात सर्वांच्या ओठांवर आहे; परंतु त्यांच्या विचारांचे खरे आकलन मात्र दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालले आहे. अभंगांचे पठण, वारीची परंपरा आणि ‘ग्यानबा-तुकाराम’चा जयघोष मोठ्या श्रद्धेने केला जात असला, तरी तुकोबांनी मांडलेली समता, बंधुता, मानवता, विवेक, नीतिमत्ता आणि अन्यायाविरुद्धचा संघर्ष यांचा मूळ आशय अनेकदा झाकोळला जातो. अशा वेळी जी. डी. पारेख लिखित ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ हा ग्रंथ संत तुकारामांचे केवळ भक्तिपर दर्शन घडवत नाही, तर त्यांच्यातील मानवतावादी तत्त्वज्ञ, समाजप्रबोधक आणि नैतिक क्रांतिकारक यांचे प्रभावी दर्शन घडवतो. संत तुकाराम महाराजांना महाराष्ट्राने डोक्यावर घेतले, त्यांच्या अभंगांना कंठस्थ केले, त्यांच्या नावाने लाखोंच्या संख्येने वाऱ्या केल्या; परंतु तुकोबांच्या विचारांचा आत्मा किती जणांनी स्वीकारला? हा प्रश्न आज पूर्वीपेक्षा अधिक तीव्रपणे उभा राहतो. कारण एका बाजूला तुकारामांच्या ‘भेदाभेद अमंगळ’चा जयघोष सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला समाजात द्वेष, जातीय विद्वेष, धार्मिक ध्रुवीकरण, असहिष्णुता आणि अंधश्रद्धांचे पुनरुज्जीवन होताना दिसते. अशा काळात जी. डी. पारेख यांचा ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ हा ग्रंथ केवळ तुकाराम महाराजांवरील आणखी एक पुस्तक म्हणून समोर येत नाही; तो तुकोबांच्या मूळ विचारांचे पुनराविष्कार घडवणारा आणि आपल्या सामाजिक विवेकाला जागवणारा वैचारिक दस्तऐवज म्हणून उभा राहतो.

‘भक्तीला नीतीचे वाहक बनवून मानवतेचा सोपान गाठू पाहणारा वारकरी रूपातील दार्शनिक’ हे या ग्रंथाचे उपशीर्षकच त्याच्या आशयाचे सार सांगून जाते. तुकोबांची भक्ती ही कर्मकांडी नव्हती, ती माणसाला माणसाशी जोडणारी होती. त्यांचा धर्म हा कोणत्याही जातीचा, पंथाचा किंवा सत्तेचा धर्म नव्हता; तो मानवतेचा धर्म होता. त्यांच्या अभंगांतून व्यक्त होणारा ईश्वर हा अन्याय, विषमता आणि दांभिकतेला मान्यता देणारा नसून सत्य, करुणा, समता आणि नीतिमूल्यांचा पुरस्कार करणारा आहे. लेखकाने या सर्व पैलूंचा अत्यंत अभ्यासपूर्ण आणि समकालीन संदर्भात पुनर्विचार केला आहे.

या ग्रंथाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो तुकोबांना वर्तमानाशी जोडतो. आज समाजात संविधानिक मूल्यांबद्दल वाढती उदासीनता वाढत असताना, ‘भेदभेद अमंगळ’ म्हणणाऱ्या तुकोबांच्या विचारांची नव्याने आठवण करून देण्याची गरज लेखक प्रकर्षाने मांडतो. समता, सामाजिक न्याय, बंधुभाव, करुणा आणि मानवतेची ही मूल्ये भारतीय संविधानाचा आत्मा आहेत, तीच मूल्ये संतांनी शतकांपूर्वी आपल्या अभंगांतून लोकांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न केला होता, हे या ग्रंथातून प्रभावीपणे अधोरेखित होते. या ग्रंथाची खरी ताकद त्याच्या वर्तमानाशी असलेल्या संवादात आहे. आज वारीत संविधान, पर्यावरण, समता आणि सामाजिक न्याय यांचे प्रबोधन करणाऱ्यांवर संशय घेतला जातो; काही वेळा त्यांना ‘अर्बन नक्षल’ या अपमानास्पद विशेषणांनीही हिणवले जाते. अशा वातावरणात लेखक अत्यंत नेमकेपणाने दाखवून देतात की, भारतीय संविधानाचा आत्मा आणि संत तुकारामांचा विचार यांच्यात मूलभूत विरोध नाही, तर विलक्षण साम्य आहे. समता, बंधुता, सामाजिक न्याय, मानवी प्रतिष्ठा आणि सर्वसमावेशकता ही मूल्ये संविधानाने स्वीकारण्याच्या कित्येक शतके आधी तुकोबांनी आपल्या अभंगांतून लोकांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न केला होता. म्हणूनच संविधानाची बाजू घेणे म्हणजे संतपरंपरेपासून दूर जाणे नव्हे; उलट तिच्या मूळ आत्म्याशी प्रामाणिक राहणे होय, हा महत्त्वपूर्ण संदेश हा ग्रंथ देतो. अशा पार्श्वभूमीवर ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे’ म्हणणाऱ्या तुकोबांच्या वारीत पर्यावरणसंवर्धनाचा संदेश देणे किंवा समता व संविधानाची आठवण करून देणे हे वारकरी परंपरेशी विसंगत नसून तिच्या मूळ आत्म्याशी सुसंगतच आहे, असा ठाम विचार हा ग्रंथ मांडतो. त्यामुळे वारीचा अर्थ केवळ धार्मिक सोहळा न राहता सामाजिक प्रबोधनाची लोकचळवळ म्हणून पुन्हा समजून घेण्याची प्रेरणा तो देतो. तुकोबांच्या वारीत पर्यावरणाचा संदेश नसेल तर तो कुठे असणार? समाजात समतेचा संदेश नसेल तर भक्तीचा अर्थ तरी काय उरतो? लेखक असे अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थित करतो. त्यामुळे वाचक केवळ पुस्तक वाचत नाही, तर स्वतःच्या श्रद्धा, मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी यांचाही पुनर्विचार करू लागतो.

तुकारामांचे धर्मयुद्ध हे कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नव्हते; ते अज्ञान, दांभिकपणा, बुवाबाजी, अन्याय, जातिभेद आणि धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या शोषणाविरुद्ध होते. भक्तीला विवेकाची आणि नीतिमूल्यांची जोड नसल्यास ती समाजाला मुक्त करण्याऐवजी गुलाम बनवू शकते, हा अत्यंत महत्त्वाचा संदेश लेखक तुकोबांच्या अभंगांच्या आधारे स्पष्ट करतो. त्यामुळे हा ग्रंथ संतसाहित्याचा तसेच आजच्या सामाजिक आणि राजकीय वास्तवाला भिडणारा वैचारिक हस्तक्षेप ठरतो. तुकारामांनी ज्यांच्याविरुद्ध संघर्ष केला, तो ब्राह्मणांच्या विरोधात नव्हता तर त्यांच्या वर्णवर्चस्ववादी प्रवृत्तीच्या विरोधात होता. धर्माच्या नावाखाली चालणारा व्यापार, अंधश्रद्धा, बुवाबाजी, जातिभेद, नैतिक अधःपतन आणि विवेकशून्यता यांच्या विरोधात त्यांनी उभे केलेले धर्मयुद्ध आजही तितकेच सुसंगत आहे. त्यामुळे तुकोबांना केवळ टाळ-मृदंगात किंवा दिंडीत शोधून चालणार नाही; त्यांना समाजाच्या विचारविश्वात पुन्हा प्रतिष्ठित करावे लागेल. जी. डी. पारेख यांचा हा ग्रंथ नेमके तेच कार्य करतो.

आज संतपरंपरेचे नाव घेऊन तिच्यात पुन्हा एकदा ब्राह्मणी विचार मिसळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भक्तीला विवेकापासून, धर्माला नीतिमत्तेपासून आणि वारीला सामाजिक प्रबोधनापासून वेगळे करण्याची धडपड होत आहे. अशा वेळी ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ हा ग्रंथ तुकोबांच्या मूळ मानवतावादी परंपरेची आठवण करून देतो. संतांचा वारसा जपायचा असेल, तर त्यांच्या नावाचा जयघोष करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा स्वीकार अधिक महत्त्वाचा आहे, हे तो ठामपणे सांगतो. संतपरंपरेवर जमा झालेली संकुचित विचारसरणीची धूळ झटकून तिच्यातील सार्वकालिक मानवतावादी तेज पुन्हा अनुभवायचे असेल, तर हा ग्रंथ नक्कीच वाचला पाहिजे. आजच्या महाराष्ट्रात संत तुकारामांचे नाव मोठ्या श्रद्धेने घेतले जाते; आता धार्मिक पुनरुज्जीवनवादाच्या काळात त्यांच्या विचारांनाही तितक्याच प्रामाणिकपणे समजून घेण्याची वेळ आली आहे. त्या दिशेने वाट दाखवणारा हा एक महत्त्वपूर्ण, चिंतनगर्भ आणि काळाची गरज ठरलेला हा ग्रंथ आहे.

हा ग्रंथ वाचून तुकोबांची प्रतिमा अधिक स्पष्ट होते. भक्तीतून नीती, नीतितून समता आणि समतेतून मानवतेचा मार्ग दाखवणारे तुकाराम आजच्या महाराष्ट्राला पुन्हा या ग्रंथातून भेटतात. म्हणूनच हा ग्रंथ केवळ संतसाहित्याचा अभ्यास नसून, वर्तमानाला प्रश्न विचारणारा, समाजाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारा आणि मानवतावादी महाराष्ट्राची दिशा दाखवणारा एक महत्त्वपूर्ण वैचारिक ग्रंथ आहे. हा ग्रंथ लिहून जी डी पारेख यांनी प्रबोधनाला आणखी सशक्त केले आहे. जी डी पारेख यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम……

☆

परिचय : श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “नॉट विदाऊट माय डॉटर” – इंग्रजी लेखिका : बेट्टी मेहमुदी – मराठी अनुवाद : लीना सोहोनी ☆ परिचय – अलका ओमप्रकाश माळी ☆

अलका ओमप्रकाश माळी

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “नॉट विदाऊट माय डॉटर” – इंग्रजी लेखिका : बेट्टी मेहमुदी – मराठी अनुवाद : लीना सोहोनी ☆ परिचय – सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆ 

पुस्तक : नॉट विदाऊट माय डॉटर

मूळ लेखिका… बेट्टी मेहमुदी

अनुवाद.. लीना सोहोनी..

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे 

काही पुस्तकं इतकं वेड लावतात की ती कितीही वेळा वाचली तरी समाधान च होत नाही.. ती पुन्हा पुन्हा वाचावीत असच वाटतं राहतं.. त्यातलच एक पुस्तक म्हणजे नॉट विदाउट माय डॉटर हे पुस्तक… मूळ अमेरिकन लेखिका बेट्टी मेहमुदी ह्यांनी लिहलेले आणि लीना सोहनी ह्यांनी अनुवादित केलेले हे पुस्तक म्हणजे संकट काय असतात आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी किती पराकोटीची जिद्द असावी लागते याचं उत्तम उदाहरण आहे.. इच्छा असेल तर मार्ग नक्की मिळतो ह्या वाक्याची प्रचिती जागोजागी ह्या पुस्तकात येते… एक पुरोगामी विचारांची आधुनिक अमेरिकन स्त्री आणि तिने तिच्या चार वर्षाच्या मुलीसाठी केलेला संघर्ष ह्याची ही कहाणी… अमेरिकेत नोकरी निमित्त आलेला एक इराणी माणूस “मूडी” आणि एका सुशिक्षित घटोस्फोटित दोन मुलांची आई असणाऱ्या अमेरिकन महिलेची “बेट्टी” ची संघर्षमय प्रेम कहाणी म्हणजे हे पुस्तक..

अमेरिकेसारख्या आधुनिक जगात वावरणारा एक इराणी माणूस मूडी.. पेशाने डॉक्टर असणारा बेट्टी ला भेटतो.. तो तिचा डॉक्टर म्हणून.. पुढे भेटीगाठी वाढतात.. गोष्टी वेल्हाळ स्वभावामुळे मूडी लवकरच बेट्टी ला ही आवडू लागतो.. बेट्टी च्या दोन्ही मुलांना ही हा नवीन बाबा आवडू लागतो… कालांतराने बेट्टी आणि मूडी लग्न करतात.. चौघांचा सुखाचा संसार सुरू होतो.. बेट्टी स्वतःच्या नोकरी मध्ये उच्च पदावर पोहचते.. मूडी ही आपल्या क्षेत्रात नाव कमवत असतो.. पार्टी, पिकनिक, सगळं अगदी छान सुरळीत सुरू असत..

… अशीच काही वर्ष जातात आणि माहतोब चा जन्म होतो.. सोनेरी केसांची, निळ्या डोळ्यांची माहतोब सगळ्या घरात आनंद घेऊन येते.. वरून दिसायला तर आनंदी कुटुंब असत.. पण.. मूडी चा भाचा इराण वरून येतो आणि ह्या कुटुंबाला नजर लागते.. हळूहळू मूडी मधला कट्टर इराणी बेट्टी ला दिसू लागतो.. छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांना खटकू लागतात.. मूडी चा भाचा आणि तो फारसी भाषेत तासनतास गप्पा मारत असतात..

आणि एक दिवस मूडी जाहीर करतो की आपण इराण ला जाऊन माझ्या कुटुंबीयांना भेटून येऊ.. ते वाट बघतायत.. भावनिक होऊन तो बेट्टी ला समजावतो तरीही बेट्टी च्या मनात पाल चुकचुकत असतेच.. पण त्याचा प्रेमापोटी 15 दिवस त्याच्या सोबत जाण्यास ती तयार होते…

….. इथे कथानक एका वेगळ्या वळणावर येऊन पोहचत.. बेट्टी, माहतोब आणि मूडी इराणला जायला निघतात.. तिथल्या परंपरे प्रमाणे बेट्टी ने पूर्ण कपडे घालावेत अस फर्मान निघत पण ते ही ती करते.. चादोर (एक इराणी पेहराव) जो की जाड्या भरड्या कपड्यांचा अगदीच विटकरी रंगांचा असतो.. एक केस ही दिसू नये असा पोषाख.. त्या ड्रेस मध्ये बेट्टी ची होणारी घालमेल.. त्या चार वर्षाच्या माहतोब साठी ही हाच नियम.. ती ही एक स्त्रीच ना म्हणून.. इथून सुरू होते एका कट्टर इराणी मुस्लिम छळवादी, स्त्रियांना गुलाम समजणाऱ्या एका नवऱ्याच्या सो कॉल्ड पुरुषी मनोवृत्तीची कहाणी…

इराण ची त्या काळातील ती परिस्थिती.. ते गलिच्छ राहणीमान.. वर्षानुवर्षांपासून अंघोळ न करता राहणाऱ्या स्त्रिया.. अंघोळी मुळे आजार होतात हा समज बाळगणाऱ्या स्त्रिया.. टॉयलेट ची ही सोय नसलेली घर.. अन्नाच्या नावाखाली वाट्टेल ते खाणारी कुटुंब.. स्वागताच्या विचित्र विचित्र पद्धती.. आणि हे सगळं जेंव्हा बेट्टी सारखी अमेरिकेतून आलेली स्त्री पाहते तेंव्हा पुढच्या दिव्याची कल्पना येते आणि ती शहारून जाते.. चार वर्षाची माहतोब केविलवाणी होऊन जाते… आपल्या समोर काय वाढून ठेवलंय ह्याची दोघी माय लेकीना कल्पना येते.. लवकरच मूडी आपले रंग दाखवायला सुरुवात करतो आणि एक दिवस अमेरिकेत कधीही न परतण्याचा विचार जाहीर करून टाकतो.. पायाखालची जमीन सरकते म्हणजे काय ते बेट्टी ला कळून चुकत… तो पर्यंत दोघींचे ही पासपोर्ट मूडी ने ताब्यात घेतलेले असतात… अमेरिके विषयी चा प्रचंड द्वेष, राग.. त्यात बेट्टी अमेरिकन म्हणून तिला घरच्या स्त्रियांकडून मिळणारी वागणूक हे सगळं सहन करण्यासाठी एक परमेश्वर च आपली मदत करू शकतो ह्याची जाणीव माय लेकिना होते आणि सुरू होतो एक जीवघेणा अनुभव.. बेट्टी ला तिच्या घरच्याशी फोनवर ही बोललं दिलं जात नाही.. तिचे परतीचे सगळे दोर कापले जातात.. अशा परिस्थितीत ही ती आपण आपल्या मुलीसह ह्या कैदेतून सुटायच हा निश्चय करते.. त्यासाठी केलेले तिचे प्रयत्न तिची जिद्द.. चिकाटी म्हणजे हे पुस्तकं… नवऱ्याची क्रूर मारहाण… मुलीवरचा राग.. प्रचंड मानसिक दडपण.. माहातोब आणि बेट्टी चा विरह… हे सगळं वाचताना रडू नाही आलं तरच नवल… त्या नंतर आहे ही परिस्तिथी स्वीकारली आहे हे मूडी ला दाखवण्यासाठी केलेली धडपड, आणि एका बाजूला सुटकेसाठी चे प्रयत्न ह्याची उत्कंठा वर्धक कहाणी म्हणजे हे पुस्तक.. आपल्या मुलीसाठी तिच्या भवितव्यासाठी.. केलेल्या एका आईच्या संघर्षाची ही कथा… आणि जवळजवळ दिड ते दोन वर्ष ह्या यातनादायी, स्त्रियांना कसपटा समान समजणाऱ्या, अगणित बंधनं असणाऱ्या समाजामध्ये काढणे म्हणजे नरकयातनाच.. तरी ही इच्छा तिथे मार्ग हे आपल्या वडिलांचं वाक्य आठवून आठवून जगणाऱ्या एका जिद्दी आईची ही कहाणी… तिची सुटका ती कशी करून घेते, आपल्या मुलीसोबत मायदेशी जाऊ शकते की नाही हे सगळं एकदा तरी वाचलच पाहिजे…

हे पुस्तक मी आज पर्यंत चार पाच वेळा तरी वाचलं असेन पण प्रत्येक वेळी बेट्टी वेगळीच वाटते.. नवीन काहीतरी वाचतो आहोत असा फिल येतो.. आणि आपल्या समोर असणाऱ्या अडचणी, संकट किती क्षुल्लक आहेत हे कळून चुकत.. आणि जगण्याची एक नवी प्रेरणा मिळते.. जेव्हा जेंव्हा अडचणीत आहोत आणि आता काय करू अस वाटतं तेंव्हा मी बेट्टी चा संघर्ष वाचते आणि मग कळत अरे आपल्याकडे तर खूप काही आहे.. स्वातंत्र्य, उत्तम कुटुंब, आपले विचार मांडण्याची संधी आणि मुख्य म्हणजे प्रत्येक व्यक्ती.. तिचं व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे हे मानणारा समाज.. हे इतकं असूनही जेंव्हा आपण कुरकुर करतो तेंव्हा हे पुस्तक एकदा वाचलं की खाडकन डोळे उघडतात..

© अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘निळी सावळी नभाळी (काव्यसंग्रह)’ – कवयित्री : डॉ. स्वाती पाटील ☆ प्रस्तुती – सुरेखा चिखलकर ☆

सुरेखा चिखलकर

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘निळी सावळी नभाळी (काव्यसंग्रह)’ – कवयित्री : डॉ. स्वाती पाटील ☆ प्रस्तुती – सुरेखा चिखलकर ☆ 

पुस्तक : निळी सावळी नव्हाळी (कविता संग्रह) 

कवयित्री – डॉ.स्वाती पाटील

प्रकाशन – प्रतिभा पब्लिकेशन बुक 

मूल्य – 200 /-

“निळी सावळी नव्हाळी’—हे शीर्षकच मनाला एका अनामिक प्रसन्नतेचा अनुभव देते. डॉ. स्वाती पाटील यांच्या या काव्यसंग्रहात निसर्गातील निळाई आणि मानवी मनातील सावळ्या छटांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. श्रीकृष्णाच्या छटांमधून उमटलेली ‘सावळी’ भावना आणि आकाश-पाण्यातील ‘निळाई’ यांच्या माध्यमातून कवयित्रीने मानवी नात्यांमधील ‘नव्हाळी’ म्हणजेच नवेपण शोधण्याचा प्रयत्न केला आहे. या संग्रहातील प्रत्येक कविता वाचकाला अंतर्मुख करणारी आणि निसर्गाच्या अधिक जवळ नेणारी आहे.कवितेशिवाय जगणं अवघड झालं असतं आणि सावित्रीमाय नसती तर लेकींना शहाणपणाचा प्रदेश सापडला नसता, अशा शब्दांत डॉ. स्वाती पाटील यांच्या काव्यप्रतिभेचे कौतुक केले जाते. ‘निळी सावळी नव्हाळी’ हा केवळ एक कवितासंग्रह नसून तो स्त्रीच्या अंतर्मनातील तरल भावभावनांचा, निसर्गाशी असलेल्या अतूट नात्याचा आणि जगण्याच्या तत्त्वज्ञानाचा एक अनोखा आविष्कार आहे. या संग्रहातील कवितांमधून लेखिकेने दुःखाला हसतमुखाने सामोरे जाण्याची आणि वेदनेला कलेची किनार लावण्याची किमया साधली आहे.”

मराठी साहित्यातील प्रगल्भ काव्यपरंपरेत डॉ. स्वाती पाटील यांचा ‘निळी सावळी नव्हाळी’ हा कवितासंग्रह आपले स्वतंत्र स्थान निर्माण करतो. या संग्रहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कवयित्रीची शब्दकळा आणि त्यातील लयात्मकता. केवळ शब्द मांडणे म्हणजे कविता नव्हे, तर त्या शब्दांतून एक जीवंत अनुभव उभा करणे, हे कौशल्य डॉ. स्वाती पाटील यांना अवगत आहे. घर, पाऊस, निसर्ग ,ती वाहत राहते ,प्रीत नव्हाळी, उसवले श्वास ,भूक ,लेक माझी आणि स्त्री-अस्तित्व अशा विविध कविता विषयांना स्पर्श करताना त्यांची लेखणी कुठेही अडखळत नाही, उलट ती अधिक समृद्ध होत जाते.”

डॉ. स्वाती पाटील यांच्या कवितेचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे त्या निसर्गाशी साधत असलेला संवाद. ‘निळी सावळी नव्हाळी’ या संग्रहात निसर्ग केवळ पार्श्वभूमी म्हणून येत नाही, तर तो एका जिवंत पात्रासारखा वावरतो. विशेषतः ‘पाऊस’ आणि ‘श्रावण’ या ऋतूंच्या छटा कवयित्रीने अत्यंत हळुवारपणे टिपल्या आहेत. त्यांच्या मते, पाऊस हा केवळ आकाशातून पडणारा जलधारांचा समूह नसून तो मनाच्या गाभाऱ्यात रुजणारा एक भाव आहे.”तुझ्या-माझ्यातला पाऊस देहातीत व्हावा…” अशी साद घालताना कवयित्री पावसाला आध्यात्मिक आणि भावनिक उंचीवर नेऊन ठेवते. श्रावणातील ऊन-पावसाचा खेळ असो किंवा पावसाच्या सरींनी चिंब भिजलेली सृष्टी असो, त्यांच्या शब्दांतून निसर्गाचा हा उत्सव वाचकासमोर जिवंत होतो. हिरव्यागार माळरानावरील ‘हिरवी दुलई’ पांघरण्याची भाषा करणारी ही कविता निसर्गाच्या सानिध्यात मानवी दुःखाला विसरायला लावते. पावसाच्या थेंबांना आणि निसर्गाच्या रंगांना कवयित्रीने ज्या प्रकारे मानवी भावनांशी जोडले आहे, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. हा निसर्ग अनुभवताना वाचकही त्या ‘निळ्या सावळ्या’ वातावरणात हरवून जातो.

– – त्यांच्या निळी सावळी नव्हाळी या काव्यसंग्रहास आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !! 

परिचय : सुरेखा महिपती चिखलकर

गोटखिंडी, तालुका वाळवा

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “हाऊ टू कंट्रोल द अनकंट्रोलेबल” – इंग्रजी लेखिका : बेन ऑल्डरिज – मराठी अनुवाद : संध्या रानडे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “हाऊ टू कंट्रोल द अनकंट्रोलेबल” – इंग्रजी लेखिका : बेन ऑल्डरिज – मराठी अनुवाद : संध्या रानडे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : हाऊ टू कंट्रोल द अनकंट्रोलेबल 

लेखक : बेन ऑल्ड्रिज

अनुवाद : संध्या रानडे

प्रकाशक : माय मिरर पब्लिशिंग हाऊस, पुणे 

पृष्ठ: ३०४

मूल्य: २९९₹ 

“ आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींना आपण जितकं जास्त महत्त्व देतो, तितकं आपलं नियंत्रण कमी होतं. ” – एपिक्टेटस

आयुष्यात कठीण प्रसंग येणार, हेच माणूस असण्याचं वास्तव आहे. पण त्यांना अधिक मजबूतपणे सामोरं जाण्याचा काही मार्ग असेल तर?  तो मार्ग आहे, स्टोईक तत्त्वज्ञान

ही प्राचीन ग्रीक विचारसरणी आजही तितकीच उपयुक्त आहे, जितकी ती दोन हजार वर्षांपूर्वी होती. याचा मूलभूत उद्देश एकच आहे तो म्हणजे, आपल्याला अधिक चांगलं आयुष्य जगायला मदत करणं. स्टोईक तत्त्वज्ञानाचं सूत्रमंत्र सांगतो: “आपण बाह्य घटनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण त्यांना कसा प्रतिसाद द्यायचा हे मात्र आपण ठरवू शकतो. ”

व्यावहारिक तत्त्वज्ञ आणि सल्लागार व्यक्तिमत्त्व बेन ऑल्ड्रिज स्टोईक विचारांतील १० महत्त्वाच्या तत्त्वांद्वारे तुम्हाला अधिक लवचिक, संतुलित आणि समृद्ध जीवन कसं घडवायचं हे शिकवतील.

हे पुस्तक केवळ विचार करण्यासाठी नाही, तर कृती करण्यासाठी आहे.

बेन तुम्हाला काही आव्हानात्मक पण उपयुक्त सरावही सुचवतात, ज्यामुळे तुम्ही स्टोईक तत्त्वज्ञान प्रत्यक्षात उतरवू शकता. जसे की,

* स्वतःची अँटी-बकेट लिस्ट तयार करणं

* जाणूनबुजून थोडंसं अस्वस्थ अनुभव घेणं

* निःस्वार्थी दृष्टीकोन विकसित करणं

* स्वतःच्या मृत्यूचा विचार करणं (मेमेंटो मोरी)

– – – – – – 

” तुमचं नियंत्रण तुमच्या मनावर आहे-बाह्य घटनांवर नाही. हे ओळखा, आणि तुम्हाला तुमच्यातील खरी ताकद सापडेल. –

– – मार्कस ऑरेलियस”

– – – – – 

लेखक बेन ऑल्ड्रिज यांच्याबद्दल – –

बेन ऑल्ड्रिज हे व्यावहारिक तत्त्वज्ञान, कम्फर्ट झोन, मानसिक आरोग्य आणि साहस यांवर लेखन करतात. त्यांच्या आव्हानात्मक आणि वेगळ्या प्रयोगांमुळे ते ओळखले जातात.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘रामायण! महत्व आणि व्यक्तिविशेष’ – लेखक : श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – विभावरी कुलकर्णी ☆

 विभावरी कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘रामायण! महत्व आणि व्यक्तिविशेष’ – लेखक : श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

पुस्तक : रामायण! महत्व आणि व्यक्तिविशेष – एका डोळस रामभक्तीचा रसाळ प्रवास

लेखक – श्री.  विश्वास देशपांडे, ९४०३७४९९३२

प्रकाशक – सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन 

रामायणाच्या आजवर हजारो आवृत्त्या आणि शेकडो भाष्ये उपलब्ध असताना, “यात आणखी नवीन काय असणार? ” या शंकेला पूर्णविराम देणारे हे एक अत्यंत आगळेवेगळे आणि समकालीन काळाला दिशा देणारे पुस्तक आहे.  लेखक श्री.  विश्वास देशपांडे सरांनी कोणत्याही पारंपरिक पठडीत न अडकता, आधुनिक पिढीच्या मानसिकतेचा विचार करून या ग्रंथाची केलेली मांडणी खरोखरच कौतुकास्पद आहे.

आजच्या ‘रील्स’ आणि वरवरच्या वाचनाच्या युगात, मूळ संहिता न वाचता खलनायकांचे होणारे उदात्तीकरण (उदा.  रावणाचे उद्दात्तीकरण) आणि त्यातून निर्माण होणारे गैरसमज दूर करण्यासाठी हे पुस्तक एका दीपस्तंभासारखे काम करते.

१.  मानवी मूल्यांचा मेरुमणी : पुरुषोत्तम राम

लेखकाने रामाचे चित्रण करताना त्याला देव्हाऱ्यात कोंडून न ठेवता, एक ‘सर्वगुणसंपन्न माणूस’ म्हणून आपल्यासमोर उभे केले आहे.  एक सामान्य माणूस आपल्या आचरणाने, कर्तव्याने आणि नैतिकतेने कशा प्रकारे देवत्वाच्या उंचीवर पोहोचू शकतो, याचे सुरेख विश्लेषण पुस्तकातील तीन भागांमध्ये आले आहे.  पुत्र, पती, बंधू, राजा, योद्धा आणि अगदी शत्रू म्हणूनही रामाचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व वाचकाला अंतर्मुख करते.  राम आणि रावण यांच्यातील संघर्ष हा केवळ दोन व्यक्तींमधील नसून, तो “विश्वात्मक विचार विरुद्ध टोकाचा व्यक्तिवाद” आणि “संस्कारित रामवृत्ती विरुद्ध नैसर्गिक रावणवृत्ती” यांमधील फरक स्पष्ट करणारा आहे.

२.  स्त्रीत्वाचा स्वाभिमान आणि इतर व्यक्तिरेखा

“जेथे राघव तेथे सीता” या उक्तीप्रमाणे सीतेच्या अलौकिक आणि स्वतंत्र अस्तित्वाचे दर्शन यात घडते.  सीतेवरील कथित अन्यायाचा आणि तिच्या अग्निपरीक्षेचा संवेदनशील प्रसंग लेखकाने अत्यंत निष्पक्ष आणि संयतपणे हाताळला आहे.  आजच्या ‘झटपट लग्न आणि झटपट काडीमोड’ या अस्थिर काळात राम-सीतेचे नाते एक आदर्श वस्तुपाठ ठरते.

याशिवाय लक्ष्मण, भरत, उर्मिला, मंदोदरी आणि बिभीषण यांच्या स्वभाववैशिष्ट्यांचे अचूक आकलन लेखकाने मांडले आहे.  त्यातही संकटमोचक आणि परमभक्त हनुमंतावरील दोन प्रकरणे लेखकाच्या आत्मीयतेमुळे प्रचंड वाचनीय झाली आहेत.  अगदी नकारात्मक मानल्या गेलेल्या कैकयीच्या मनाचे विश्लेषणात्मक चित्रण करून तिच्याविषयीचे गैरसमज दूर करण्याचा स्तुत्य प्रयत्न यात दिसतो.

३.  प्राचीन व्यवस्था आणि आजची परिस्थिती

एक शिक्षक म्हणून देशपांडे सरांनी रामायणकालीन राजसत्ता आणि गुरुसत्ता (शिक्षण पद्धती) यांच्यातील सुवर्णसमन्वयावर अचूक बोट ठेवले आहे.  आजच्या व्यावसायिक आणि भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी ती जीवनपद्धती किती श्रेष्ठ होती, हे प्रकर्षाने जाणवते.  अष्टप्रधान मंडळ, ऋषिमंडळ आणि राजा यांच्या त्रिसूत्रीवर चालणारी रामराज्याची न्यायप्रिय शासन व्यवस्था आणि आदर्श कुटुंबसंस्था आजच्या विस्कळीत समाजाला आरसा दाखवणारी आहे.  लक्ष्मणरेषेचे सामाजिक महत्त्व, वालीवध यांसारख्या वादग्रस्त मुद्द्यांवर लेखकाने अत्यंत परिपक्वतेने भाष्य केले आहे.

४.  सांगीतिक गोडवा आणि रसाळ भाषा

पुस्तकाचा शेवट म्हणजे सुग्रास जेवणानंतरचा ‘गोडाचा घास’ आहे! ‘गीतरामायणा’व्यतिरिक्त असणारी, रामाच्या बालपणापासून राज्याभिषेकापर्यंतची वेगळी ‘रामगाणी’ समाविष्ट करून लेखकाने आपल्यातील गहिऱ्या संगीततज्ज्ञाची ओळख करून दिली आहे.  पुस्तकाची भाषा अत्यंत साधी, सरळ आणि प्रवाही असल्याने ते कुठेही क्लिष्ट वाटत नाही.

हे पुस्तक केवळ एका विशिष्ट धर्मापुरते मर्यादित नसून मानवी मूल्यांचा आदर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ‘संग्रहणीय’ आहे.  लेखकाची रामावरील प्रगाढ आणि डोळस श्रद्धा या पुस्तकाच्या पानापानातून पाझरते.  आजच्या तरुण पिढीने आणि पालकांनी हे पुस्तक केवळ वाचावे असे नाही, तर त्यावर मनन करून ते आचरणात आणण्याची गरज आहे.  अक्षरांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण केलेली ही एक नितांत सुंदर आणि चैतन्यमय ‘भावांजली’ आहे.  प्रत्येकाने आवर्जून अनुभवावा असा हा एक “नवनवोन्मेषशालिनी वाङ्मयीन उत्सव” आहे!

पुस्तक परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “घे गगन भरारी” – लेखक : प्रा. वसंत गिरी ☆ परिचय –  श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “घे गगन भरारी” – लेखक : प्रा. वसंत गिरी ☆ परिचय –  श्री विश्वास देशपांडे ☆

पुस्तका : घे गगन भरारी

लेखक : प्रा. वसंत गिरी 

प्रकाशक : यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे 

यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे यांच्या वतीने प्रकाशित झालेले घे गगन भरारी हे पुस्तक नुकतेच हातात पडले. नावाला साजेशा मुखपृष्ठामुळे हे पुस्तक आकर्षक झाले आहे.

गिरी सर हे प्राध्यापक म्हणून तर विख्यात आहेतच. परंतु त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ते एक उत्तम विचारवंत आणि संवेदनशील मार्गदर्शक आहेत. अध्यापनाच्या व्यासपीठावरून, वर्तमानपत्रातील लेखांमधून, तसेच त्यांच्या असंख्य व्याख्यानांतून त्यांनी जे विचारमंथन समाजापर्यंत पोहोचवले, त्याचा गहिरा ठसा या पुस्तकात उमटलाआहे. त्यांच्या लेखनात केवळ अनुभवाचा गाभा नाही, तर आजच्या समाजस्थितीचे अचूक भान आणि भविष्यातील मार्गदर्शनही आहे. हाती आलेले हे पुस्तक म्हणजे त्या ज्ञानदीपाची नवी ज्योत आहे. या पुस्तकात सरांच्या विचारांचा झरा वाहतो आहे – कधी चिंतनशील, कधी भावस्पर्शी तर कधी वाचकाला जागं करणारा. प्रत्येक लेखात विचारांची ठिणगी आहे जी वाचकाच्या मनाला उजळून टाकते, आत्मपरीक्षणाची ज्योत प्रज्वलित करते.

सरांचे हे सातवे पुस्तक आहे. या आधी त्यांची सहा पुस्तके आतापर्यंत प्रकाशित झाली आहेत. उगवतीचे उन्मेष, तरुणाचे आयडॉल सुभाषचंद्र बोस, क्रांतिउद्यानाचे तपस्वी, गोस्वामी शौर्यगाथा ही त्यांची पुस्तके म्हणजे तरुणाईसाठी इतिहासाचा प्रेरणादायी असा महान ठेवा आहे. तर हास्यगिरी भाग एक व दोन मधून विनोदी आणि उपरोधिक पद्धतीने आजच्या समाजव्यवस्थतील दोषांवर त्यांनी कोरडे ओढले आहेत.

शब्द हे फक्त ध्वनी नसतात; ते विचारांचे दीप असतात. एखादा शब्द अंतःकरणात शिरला, तर तो मनाच्या अंधाऱ्या काना-कोपऱ्याला उजळून टाकतो. प्रा वसंत गिरी सरांचे ‘ घे भरारी ‘ हे पुस्तक हाती घेतल्यावर असाच अनुभव येतो. हे लेखन म्हणजे विचारांचा आणि चिंतनाचा वसंत फुलवणारे एक उत्तुंग पर्वत शिखर. या पर्वत शिखरापर्यंत भरारी घेऊन तेथून दिसणार्‍या दृश्याचे निरीक्षण मात्र बारकाईने करायला हवे.

या पुस्तकातील प्रत्येक लेख म्हणजे वाचकाला विचारांची नवी वाट दाखवणारा दिवा. त्यांची भाषा ओघवती आहे, पण क्लिष्ट नाही किंवा डोळे दिपवणारी नाही. ती साधेपणाच्या कळसावर उभी आहे. वाचकासमोर ते सहजपणे मुद्दे ठेवतात तसेच प्रश्नही ठेवतात. प्रश्नचिन्हांचे हे बीज इतके टवटवीत आहे की वाचकाच्या मनात आत्मपरीक्षणाची पालवी फुटल्याशिवाय राहात नाही.

‘हे बुद्धिनाथा, आम्हाला विवेक दे’ या लेखात गणरायाची स्थापना होत असताना मूर्ती आपण का स्थापन करतो, मूर्तिपूजा का करतो, प्रार्थना का करतो हे सांगताना ते म्हणतात, ” मूर्ती हे देवाचे सूक्ष्म रूप. आपले मन एकाग्र करण्यासाठी मनःशांती, संयम, विचारक्षमता, कार्यक्षमता आणि क्षमाशील वृत्ती वाढावी यासाठी मूर्तीची स्थापना आणि प्रार्थना आपण करतो. मानवी मनाची वाटचाल प्रगल्भतेच्या दिशेने व्हावी हाच त्यामागचा हेतू असावा. मानवी मन उच्चतम मानवतेच्या दिशेने चालावे यासारखी विचारप्रवण करणारी सुंदर वाक्ये लेखात आपल्याला आढळतात. ते उत्सवाच्या गलबल्याला आरसा दाखवतात. मिरवणुकीतील गैरप्रकार उन्माद, दिखाव्याची स्पर्धा, भपकेबाज पूजा याबाबत कठोर शब्दात नाराजी व्यक्त करतात. खरी भक्ती ही साधेपणात आहे, ही जाणीव त्यांनी वाचकासमोर अत्यंत सोप्या पण प्रभावी भाषेत मांडली आहे.

‘आजच्या अर्जुनाचा अभ्यासयोग कोणता?’ या लेखात गीतेतील अर्जुन आजच्या विद्यार्थ्याच्या मनात उभा राहतो. “ मन अत्यंत चंचल आहे. त्याला नियंत्रणात ठेवणे महाकठीण बाब आहे. ” हे वाक्य वाचताना आपल्यालाही आपल्या धडपडीचे आणि चंचलतेचे भान येते. लेखक सांगतात—“अभ्यास आणि वैराग्यात मनोग्रहाचे रहस्य आहे. यालाच अभ्यासयोग म्हणतात. ” हा विचार म्हणजे दिशाहीन तरुणाईसाठी दीपस्तंभच आहे. गिरी सरांमधला चिंतनशील माणूस या ठिकाणी दिसतो. ते म्हणतात, ” वर्तमान स्थितीत अभ्यासयोग विद्यार्थ्याला उमजला नाही; कारण तो गुरुलाही उमजला नाही. त्यासाठी आपल्यातील दोष, उणीवा यांची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. या ठिकाणी एका वक्त्याच्या भाषणातील एक सुंदर उदाहरण लेखकाने दिले आहे. वेरूळ अजिंठ्याच्या पाषाणात जे शिल्प तत्कालीन कारागिरांनी निर्माण केले, त्यात त्या पाषाणमूर्तींच्या चेहेऱ्यावर हास्य, आनंद, दुःख, क्रोध, असूया, प्रेम इ. भावभावना दाखवण्यात ते कलाकार यशस्वी झाले आहेत. जर पाषाणात या भावभावना ओतता येतात, तर सजीव अशा विद्यार्थ्यांच्या मनात आवश्यक असे विचार शिक्षकाला का रुजवता येणार नाहीत ? आजी आम्ही भौतिक सुखसुविधात अडकलो आहोत. आध्यात्मिक पातळीवर जाऊन समाधानाचा मार्ग आम्ही शोधतो का ? जगा आणि जगू द्या यासारखी तत्वे आम्ही आचरणात आणतो का ? यासारख्या मूलभूत तत्वांचा विचार या लेखात आपल्यापुढे सर मांडतात. आजच्या अर्जुनाला यशस्वी होण्यासाठी या तत्वांचा विचार करणे गरजेचे आहे.

‘क्रोधावर नियंत्रण’ या लेखात ते म्हणतात, ” क्रोध हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा उपयोग कसा करायचा हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते. नकारात्मक वृत्तीच्या लोकाांना क्रोध विनाशाकडे नेतो. सकारात्मकवृत्तीचे लोक आपला क्रोध संयमाने व्यक्त करतात. तर दुसऱ्या प्रकारचा क्रोध देशाभिमान रुजवतो, सत्कार्य करायला शिकवतो. आपली वृत्ती शांत, संयमी, समाधानी आणि आनंदी ठेवल्यास आपण तणावमुक्त जगू शकतो.

‘सद्गुणाने होते जीवन सुंदर’ हा लेख म्हणजे अंतःकरणातील आरसा. “आपले प्रत्येक कर्म आपल्या व्यक्तिमत्वाची उंची वाढविते आणि घटविते सुद्धा. ” या एका वाक्यात जीवनाचे सार सामावले आहे. सद्गुण म्हणजे बाहेरून लावलेला रंग नाही; तो व्यक्तिमत्त्वाच्या गाभ्यातून उमलणारा सुगंध आहे, हे लेखक जाणवून देतात. या लेखात ते म्हणतात, “सत्कार्यातील आनंदामागे अपार मेहनत आणि अविरत कष्ट असतात. ही माणसे त्यांच्या दैनंदिन जीवनात कमालीची प्रसन्न असतात. शुभ्र, स्वच्छ झऱ्यासारखे वाहत असतात. ही अवस्था ज्याला प्राप्त झाली त्याच्या अंतरंगात सत्याचा दीप तेवत असतो. तो आपली तो आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून सत्याचा शोध घेत राहतो. त्याचे जीवन म्हणजे निखळ वास्तवतेची प्रयोगशाळा.

तर ‘युवाशक्तीच्या उत्साहाला दिशा हवी’ या लेखात लेखकाने तरुणाईला थेट प्रश्न केला आहे—“उत्साहाला विवेकाची दिशा मिळाली, तरच समाज परिवर्तन घडते. ” ही ओळ तरुणांच्या हृदयात नवी उमेद, नवा संकल्प जागवणारी आहे.

‘जीवनात संयम का हवा?’ या लेखातील ते म्हणतात, ” युवावस्थेत विचारांची दिशा हवी, म्हणजे जीवनाची दशा होणार नाही. ” या लेखातील वाक्य ” भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या संपत्तीला कष्टाचा सुगंध येत नाही ” आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे.

तर प्रगल्भ विचारांची मानवी संपत्ती या आपल्या लेखात गिरी सर म्हणतात, ” युवाशक्ती ही देशाची मानवी संपत्ती आहे. हे आपल्या देशातील केंद्र व राज्य शासनालाही कळले पाहिजे. शिक्षणाकडे अनुत्पादक क्षेत्र म्हणून पाहण्याचा शासनाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. शिक्षण क्षेत्र खाजगी क्षेत्राकडे सोपवून त्याचे बाजारीकरण करणे योग्य नाही. अशा परिस्थितीत भावी पिढीकडून भरीव कार्याची अपेक्षा कशी करणार ? या लेखातून लेखकाची तळमळ आणि शासनव्यवस्थेतील नाकर्तेपणाविषयीचा संताप तीव्र शब्दात व्यक्त झाला आहे.

आपल्या ‘ घे भरारी ‘ या लेखात ते म्हणतात, ” मनुष्यदेह हे एक साधन आहे, त्याद्वारे आपण व्यापक व चिरंतन ठरणारी कार्यपूर्ती करणार आहोत. हे आपल्या स्मरणात राहील तर आपणास देहासक्ती (शरीराचे आकर्षण) राहणार नाही. आणि आपली अपेक्षित कार्यपूर्ती झाल्यावर देहाची किंमत काहीच नाही. ” या लेखात युवकांसाठी मोलाचा संदेश लेखक देतात.

असे या पुस्तकातील एकूण ३१ लेख वाचकाला विचारप्रवण करतात. या पुस्तकाची एक मोठी ताकद म्हणजे त्याची शैली. लेखक वाचकाला प्रवचन देत नाहीत; ते त्याच्याशी संवाद साधतात. त्यांचे लिखाण म्हणजे एखाद्या हृदय संवादासारखे आहे. या संवादात कधी व्यंगाची धार आहे, कधी आत्मीयतेची ऊब आहे, तर कधी अनुभवाच्या गाभ्याला भिडणारी गंभीरता आहे. लेख वाचताना लेखकावर असणारा स्वामी विवेकानंद तसेच देशभक्तांच्या विचारांचा प्रभाव जाणवतो. आपले म्हणणे ते विविध उदाहरणे देऊन पटवून देतात.

“ज्ञानाचा दीप जिथे लागतो तिथे अंधार नाहीसा होतो;

आणि जे शिक्षक हा दीप लावतात ते स्वतःच प्रकाशरूप होतात. ”

मला वाटते हे पुस्तक सर्वांसाठी आणि विशेषतः आजच्या तरुणाईने वाचणे आवश्यक ठरते. आजच्या काळात जेव्हा आपण वेग, स्पर्धा, उपभोगवाद यांच्या भोवऱ्यात अडकलो आहोत, तेव्हा ‘ घे भरारी ’ हे पुस्तक आपल्याला शांत पण ठाम आवाजात सांगते, “थांब जरा… स्वतःकडे बघ… विचार कर…आणि जीवनाचे खरे ध्येय शोध. ” त्यांच्या इतर पुस्तकांप्रमाणेच वाचक या पुस्तकाचेही मनापासून स्वागत करतील अशी खात्री आहे.

परिचय : श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव,  मो. ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “ताठ कणा” – लेखिका : श्री अभिनव भुते, अजय कोठारी ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “ताठ कणा” – लेखिका : श्री अभिनव भुते, अजय कोठारी ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : ताठ कणा 

लेखक : अभिनव भुते, अजय कोठारी

पृष्ठ: २४०

मूल्य: ३५०₹ 

हे पुस्तक म्हणजे पाठदुखी समजून घेण्याचा, भीतीवर मात करण्याचा आणि कण्याला नव्याने ओळखण्याचा प्रवास…

“डॉक्टर, माझी पाठ का दुखते?”

हा प्रश्न आज लाखो लोकांच्या आयुष्याचा भाग बनला आहे. ऑफिसमध्ये तासन्तास बसून काम करणारा कर्मचारी असो, दिवसभर कष्ट करणारा शेतकरी असो किंवा घराची जबाबदारी सांभाळणारी गृहिणी — पाठदुखी आता प्रत्येक घरात पोहोचली आहे. पण या वेदनेपेक्षा जास्त त्रास देतात ते गैरसमज, भीती आणि अपुरी माहिती.

‘ताठ कणा’ हे केवळ पाठदुखीवरचं वैद्यकीय पुस्तक नाही; तर रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातला विश्वासाचा संवाद आहे. सोप्या भाषेत आणि रोजच्या उदाहरणांतून हे पुस्तक कण्याची रचना, पाठदुखीची कारणं, योग्य व्यायाम, चुकीच्या सवयी, MRI आणि रिपोर्ट्समागचं वास्तव, तसेच ऑपरेशन खरंच कधी आवश्यक असतं हे समजावून सांगतं. प्रत्येक घरात असायला हवं असं हे पुस्तक.. जरूर वाचा.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘माझी माय आक्का’ – लेखक : आत्माराम जाधव ☆ परिचय – विभावरी कुलकर्णी ☆

 विभावरी कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘माझी माय आक्का’ – लेखक : श्री आत्माराम जाधव ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

पुस्तक : माझी माय आक्का 

 – – एका कृतज्ञ आत्म्याचा भावस्पर्शी प्रवास

लेखक: आत्माराम जाधव

प्रकार: आत्मकथन 

पार्श्वभूमी: सुपने, पाटीलवाडी (जि. सातारा) आणि पुणे

प्रकाशन – संवेदना प्रकाशन, चिंचवड.

‘माझी माय आक्का’ हे केवळ एका शिक्षकाचे आत्मवृत्त नाही, तर प्रतिकूलतेवर मात करुन यशाचे शिखर सर करणाऱ्या एका संपूर्ण पिढीचा प्रातिनिधिक दस्तऐवज आहे. निसर्गाचा लहरीपणा, गरिबी, कौटुंबिक आपत्ती आणि भूकंपासारखी नैसर्गिक संकटे या सगळ्यांमधून तावूनसुलाखून निघालेल्या एका संवेदनशील ‘आत्म्याचा’ (आत्माराम) हा विलोभनीय प्रवास आहे. या लेखनाला ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल वाघ यांची लाभलेली प्रस्तावना या पुस्तकाचे वाङ्मयीन वजन अधिक वाढवते.

मुख्य कथानक आणि विषयसूत्र 

कथानकाची सुरुवात सातारा जिल्ह्यातील कोयना नदीच्या काठावर वसलेल्या ‘सुपने’ या निसर्गरम्य आणि पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या गावापासून होते. अवघ्या सहा महिन्यांचे असताना आईचे छत्र हरवलेल्या ‘आत्मा’ नावाच्या बालकाला त्याची मावशी ‘रकू आक्का’ पोटच्या गोळ्यासारखं सांभाळते. पुढे तीच त्याची सावत्र आई होते.

लेखकाचे बालपण, उजव्या हातावरून बैलगाडीचे चाक गेल्याचा अपघात, शिक्षणासाठी केलेला संघर्ष, मुंबईतील माथाडी कामगारांचे अनुभवलेले कष्टप्रद जीवन, आणि अखेर डी. एड. , बी. ए. , एम. ए. करत पुणे महानगरपालिकेत आदर्श शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून मिळवलेली प्रतिष्ठा… असा हा थक्क करणारा प्रवास या आत्मकथनातून उलगडत जातो.

पुस्तकाची बलस्थाने व वैशिष्ट्ये 

वात्सल्याची त्रिमूर्ती: ‘माय आक्का’ आणि ‘आबा’ पुस्तकाचा केंद्रबिंदू ‘आक्का’ (रुक्मिणी) आहे. “माय मरो मावशी उरो” या म्हणीला आक्काने आपल्या अपार मायेने खरे करून दाखवले. स्वतः अशिक्षित असूनही “मी मास्तर, इंजिनिअर, डॉक्टराची आई आहे” हा तिचा स्वाभिमान आणि तिची जिद्द वाचकाला हेलावून टाकते. आबांचे शांत, प्राणिमात्र प्रिय व्यक्तिमत्त्व आणि त्यांनी विमानाचे स्वप्न पाहण्याऐवजी “विमानात बसण्याचे स्वप्न बघ” असा दिलेला जीवनाचा कानमंत्र पुस्तकाला वेगळी उंची देतो.

ग्रामीण संस्कृतीचे हुबेहूब चित्रण

लेखकाने ७०-८० च्या दशकातील ग्रामीण संस्कृती जिवंत केली आहे. जात्यावरच्या ओव्या, गुऱ्हाळातील उकळणारा रस, विहिरीवर पोहण्याच्या गमती, सुगीचे दिवस, बैल ‘गणप्या’ आणि कुत्रा ‘नगऱ्या’ यांच्याशी असलेले माणसासारखे नाते, तसेच गावातील जत्रा, तमाशा, आणि भूकंपानंतरचे पुनर्वसन यांचे अत्यंत प्रामाणिक चित्र डोळ्यांसमोर उभे राहते.

‘श्यामची आई’ या संस्काराची सावली

लेखकाच्या जीवनावर साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाचा असलेला प्रभाव संपूर्ण लेखनात जाणवतो. पहिल्या पगारातून पुस्तक विकत घेणे आणि आपल्या आक्कात ‘श्यामची आई’ पाहणे, हा प्रसंग वाचकाच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही.

गुरुवर्यांप्रती कृतज्ञता

डी. आर. पवार गुरुजी, संदे गुरुजी, डांगेसर (ज्यांनी इंग्रजीची गोडी लावली), प्राचार्य नानासाहेब माने या सर्व शिक्षकांबद्दल लेखकाने व्यक्त केलेली कृतज्ञता आजच्या काळात दुर्मिळ आणि मार्गदर्शक आहे.

भाषाशैली आणि सादरीकरण

लेखकाची भाषा अत्यंत साधी, सरळ, प्रवाही आणि प्रामाणिक आहे. कुठेही भाषेचा बडेजाव नाही की कृत्रिमता नाही. सातारी/ग्रामीण बोलीतील संवादांमुळे (उदा. “माझ्या आत्माला चांगलं शिकवा, त्याला आय नायं…”) कथनाला मातीचा सुवास येतो. पुस्तक वाचकाची उत्सुकता शेवट पर्यंत टिकवून ठेवते. शेवटी आक्काच्या निधनानंतर झालेला पसायदानाचा आणि हरिपाठाचा ‘दृष्टांत’ मनाला चटका लावून जातो.

‘माझी माय आक्का’ हे केवळ एका व्यक्तीचे चरित्र नसून तो कृतज्ञतेचा महामंत्र आहे. आई-वडिलांचे अपार कष्ट आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे एक सामान्य ग्रामीण मुलगा कसा घडतो, याचे हे जिवंत उदाहरण आहे. आजच्या भौतिकवादी आणि विभक्त कुटुंबपद्धतीच्या काळात, एकत्र कुटुंबपद्धतीचे महत्त्व आणि आई-वडिलांचे ऋण काय असतात, हे सांगणारे हे पुस्तक प्रत्येक कुटुंबाने आणि विशेषतः नवीन पिढीने वाचलेच पाहिजे.

थोडक्यात सांगायचे तर… हे आत्मकथन वाचताना मन भूतकाळात रमते, डोळे पाणावतात आणि शेवटी एका आदर्शाची शिदोरी हाती लागते! एक उत्कृष्ट, हृदयस्पर्शी आणि संग्राह्य साहित्यकृती.

पुस्तक परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “संतांची चरित्रे” – पुस्तकांचा संच लेखक : माधवराव आप्पाजी मुळे / ल. रा. पांगारकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “संतांची चरित्रे” – पुस्तकांचा संच लेखक : माधवराव आप्पाजी मुळे / ल. रा. पांगारकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : संतांची चरित्रे – ४ पुस्तकांचा संच.

१. श्री नामदेव चरित्र : रू. २५०/-

२. श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र आणि ग्रंथ विवेचन : रू. २००/-

३. संत तुकाराम चरित्र : रू २५०/-

४. एकनाथ चरित्र : रू २००/-

सव्वाशे वर्षे झाली या संतांच्या चरित्रांना प्रकाशित होऊन! माधवराव आप्पाजी मुळे आणि ल. रा. पांगारकर यांनी १२५ वर्षांपूर्वी लिहिलेले चार संतांचे चरित्र:

पुस्तक पहिले 

संत नामदेव महाराज चरित्र !

लेखक: माधवराव आप्पाजी मुळे

पृष्ठ:२५६ 

औंढा नागनाथ मंदिर ज्यांच्यासाठी स्वतःची दिशा बदलून घेते, ज्यांच्या रचना गुरू ग्रंथ साहेब मध्ये समाविष्ट आहेत, ज्यांच्या दर्शनासाठी जगभरातून शीख बांधव नरसी येथे येतात, अशा संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचे हे चरित्र!

ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया ।।

नामा तयाचा कंकर । तेणे केला हा विस्तार ।।

जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।

तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।

बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।।

संत बहिणाबाई यांनी लिहिलेला अभंग महाराष्ट्रीय संताचे कार्याचे यथार्थ वर्णन करणारे आहे. संत ज्ञानेश्वर यांनी वारकरी पंथाला सुसंघटित केलं. त्याचा पाया घातला…. पण त्याला विस्तृत करण्याचे कार्य मात्र संत नामदेवांनी केलं. हे तत्वज्ञान भारतभर जावे म्हणून देशाटन केलं. संत बहिणाबाई नामदेव महाराज यांना बांधकाम पूर्ण करणारा, त्याला आकार देणारा किंकर म्हणून त्यांचा उल्लेख करतात. संत ज्ञानदेव आणि संत नामदेव यांच्या मध्ये जो स्नेहभाव होता तो वाचताना आपल्याला कळवळून आले नाही तर नवल! अकृत्रिम प्रेम काय असते? संत संगत काय असते?

संत परंपरेतील सर्वात वडीलधारे संत नामदेव !दीर्घायुषी ! वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन देशभर प्रवास करणारे संत नामदेव पंजाबमध्ये ही गेले. त्यांच्या रचना “गुरूग्रंथ साहेब” आहेत. अशा संतांचे हे चरित्र!गुरू नानक, संत कबीर अशा श्रेष्ठ संताशी त्यांच्या भेटी आणि झालेला संवाद या चरित्रात आहे. हा फार महत्वाचा भाग आहे.

हे चरित्र वाचताना अनेक अभंग यात आलेले आहेत. ते अभंग स्वतः च त्या त्या घटना सांगणाऱ्या आहेत. त्यामुळे चरित्र आणि अभंग असा सुंदर ग्रंथ वाचकाला मिळतो.

शतकोटी कवने केली असे त्यांच्या बाबत म्हटले जाते. त्यांच्या अभंगांत समकालीन चरित्र आहेत. इतर संतांची माहिती आहे. त्या सगळ्या अभंगाचा अभ्यास करून लेखकाने नामदेव महाराज यांचे अतिशय रसाळ आणि सुरेख पण वास्तवदर्शी चरित्र तयार केलं आहे.

*****

संतचरित्रे लिहिण्यासाठी आवश्यक असलेली मनोभूमिका पांगारकरांच्या ठायी होती. उत्कट भक्तिभावामुळे ते संतांच्या जीवनाचे व कार्याचे मर्म सहृदयपणे समजून घेऊ शकले. चरित्राची साधने ते परिश्रमपूर्वक जमवत. संतांच्या जीवनातील आणि काव्यातील दोष दाखविणे त्यांना मान्य नव्हते. संतांनी केलेल्या चमत्काराच्या पारंपरिक कथांवर अविश्वास दाखविणे त्यांना योग्य वाटत नसे. श्री ज्ञानेश्वर, तुकाराम व एकनाथ महाराज या संतांची चरित्रे त्यांनी लिहिली. कोणाही सत्पुरुषाचे वर्णन ते नम्रभावाने करीत.

ल. रा. पांगारकर यांनी १२५ वर्षांपूर्वी लिहिलेले संत चरित्र ल. रा. पांगारकर उर्फ लक्ष्मण रामचंद्र पांगारकर हे संतचरित्रे लिहिण्यासाठीच जन्माला आले होते असे म्हणतात. हे विधान अतिशयोक्तीचे नाही याची प्रचीती त्यांनी लिहिलेले संत तुकारामांचे चरित्र वाचताना येते. तुकाराम महाराजांचे चरित्र लिहिताना त्यांनी अगदी रामेश्वर भटासदेखील झुकते माप दिले आहे. ल. रा. पांगारकर यांनी त्यांचा गौरव केलेला आहे. ‘आतां प्राकृत भाषेंत अधिकारसंपन्न शूद्रालाही धर्मरहस्य सांगायला हरकत नाहीं. कारण धर्मरहस्य भगवत्कृपेनें कोणत्याही जातीच्या शुद्धचित्त मनुष्यांत प्रगट होतें. ही गोष्ट सिद्ध करून देण्याला तुकोबाचा छळ होऊन ते त्यांत यशस्वी व्हावयास पाहिजे होते व या छळाचा कस होण्याचा मान रामेश्वरभटास मिळाला!’ अशा शब्दांत रामेश्वरभट्टांची भलामण केली आहे.

पांगारकरांच्या चिकित्सक वृत्तीचा परिचय करून घ्यायचा असेल तर त्यांचे मोरापंत चरित्र पाहावे, तुकाराम चरित्र पाहावे. प्राचीन वाङमयाचा विचार करताना पांगारकरांची दखल घेतल्याशिवाय पुढे जाता येण्यासारखे नाही. त्यांनी प्राचीन मराठी वाङमयाचे अत्यंत आवडीने आणि समरसतेने अध्ययन केले. मराठी भाषा आणि इतिहास यांचा व्यासंग करून, आपल्या लेखणीचा आणि वाणीचा प्रभावी वापर करून, जनमानसात या विषयांची गोडी निर्माण करण्याचे महान कार्य त्यांनी आमरण केले. त्यांना अनेक चाहते, मित्र लाभले. भगवंतांच्या स्मरणात त्यांनी नेहमीच गोडी मानली. आयुष्यभर ग्रंथरचनेचा हव्यास अडचणी सोसून रसिकतेने केला.

पुस्तक दुसरे 

संत तुकाराम चरित्र

पृष्ठ : ३४६ 

ह्या ग्रंथाची इमारत कोणत्या आधारांवर उभारली आहे याचा उलगडा करणे अवश्य आहे. पहिला आणि मुख्य आधार म्हणजे तुकोबांचे अभंग हा होय. तुकोबांचे चरित्र त्यांच्या अभंगातच उत्कृष्ट लिहिले गेले आहे. त्यांचे अंतरंग, त्यांचा अभ्यास, त्यांचे अनुभव, त्यांचे उपदेश त्यांच्या अभंगात इतक्या स्पष्ट रीतीने प्रकट झाले आहेत की दुसऱ्या कोणालाही ते तसे वर्णन करून सांगता येणार नाहीत. अभंगंचे परिशीलन आणि मनन जितक्या आस्थेने, आवडीने व आदराने करावे तितके महाराज आपले हृदय उघडे करून दाखविण्यास तयार आहेत. परंपरेचे साह्य मात्र अवश्य धेतले पाहिजे.

ह. भ. प. पांगारकरांनी ‘आठ वर्ष’ मेहनत घेऊन लिहिलेले हे तुकारामचरित्र प्रथम 1920 साली तत्कालीन इंदूर संस्थानचे अधिपती सवाई तुकोजीराव होळकर यांनी दिलेल्या देणगीतूनच छापले होते. त्या काळी, संस्थानिकांच्या मदतीशिवाय अशी कामे होणे अशक्यच होते व आजही असे काम कठीणच आहे म्हणून गेल्या १०० वर्षात कोणत्याच प्रकाशकाने हे चरित्र छापण्याचे धाडस केले नाही यात नवल नाही. पण, वारकरी मंडळींच्या वाढत्या प्रतिसादामुळे दुसऱ्याच आवृत्तीपासून हे चरित्र कायमच उपलब्ध ठेवण्याचे ठरविले आहे आणि याप्रमाण आणखीही संतचरित्रे छापण्याचा वरदा प्रकाशन चा मनोदय आहे.

पुस्तक तिसरे – 

श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र आणि ग्रंथ विवेचन – 

पृष्ठ:२०४ 

ज्ञानेश्वर माऊलीचे हे रसाळ चरित्र वाचून मराठी माणसाचे हृदय हेलावून येईल. जाने ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला आहे, त्याला तर या चरित्रातील अक्षरे अमृतालाही सजनी जिंकत आहेत असे वाटेल. सर्वसामान्य व्यक्तीला हे चरित्र पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटेल. ज्ञानेश्वर हे मराठी संतांचे शिरोमणी! त्यांच्याविषयी अनेक संतांनी आपल्या अभंग त्यांची स्तुती केलेली आहे. हे अभंग ही लेखकाने ग्रंथाच्या शेवटी एकत्रित दिलेले आहेत.

पहिल्या प्रकरणांमध्ये आपल्याला संत ज्ञानेश्वर जन्मापूर्वीचा काळ म्हणजेच महाराष्ट्रातील पार्श्वभूमी समजते. यात महाराष्ट्राचा राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिक इतिहास समजतो. मराठी माणसाला, राजा रामदेवराय यादव हे परिचित आहेत. पण यात यादव कुळाचा तपशील मिळतो. अनेक ग्रंथ रचनाकरांचा तपशील मिळतो. उदा भास्कराचार्य.

दुसरे प्रकरण कुलवृत्तान्त आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे पूर्वज, यांचे माता पिता रुक्मिणी व विठ्ठलपंत यांचा विवाह, त्यांचा संन्यास रामानंदस्वामींचा अनुग्रह इत्यादीची माहिती मिळेल. याच प्रकरणांमध्ये संन्याशाच्या पोटची मुलं आणि त्यांचा छळ आलेला आहे.

असे एकेक प्रकरण सविस्तर आणि व्यापकपणे दिलेले आहे. प्रत्येक प्रकरणात गरजेनुसार अनेक अभंग रचना आहेत. त्या संदर्भ किंवा प्रमाण म्हणून वापरल्या आहेत.

पुस्तक : चौथे 

संत एकनाथ चरित्र

पृष्ठ:२२२ 

गृहस्थाश्रमात राहून नाथांनी ब्रह्म स्थिती अभंग ठेवली! गृहस्थी जीवन अर्थात प्रपंच आणि अध्यात्मिक जीवन अर्थात परमार्थ या दोन्हीचा सुरेख मेळ घालण्याचे अत्यंत कठीण कार्य नाथांनी आपल्या जीवनात केलेले आहे.

शांतीब्रह्म या नावाने ओळखले जाणारे संत एकनाथ गृहस्थ जीवनातील आदर्श! शालीवाहन राजाची राजधानी पैठण नाथांमुळे आज महाराष्ट्राला माहिती आहे.

संस्कृत इतकीच प्राकृत ही महत्त्वाची आहे, असे सांगणारे संत एकनाथ माणसामाणसातील भेद मानत नसत. देश भ्रमण करताना काशी येथील ब्राह्मणांनी नाथांचा अतोनात छळ केला. पण नाथांच्या सद्वर्तन आला भुलून पुढे त्यांचा जय जयकार केला.

भागवत धर्माचा प्रसार नाथांनी केला. अभंग गवळणी भारुड यामाध्यमातून नाथांनी समाजामध्ये जागृती निर्माण केली. नाथांनी रचलेल्या आजही जगभर मागणी असते.

दासोपंत आणि नाथांचे भेट त्याच प्रमाणे नाथांनी ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन कसे घेतले याचेही या चरित्रामध्ये वर्णन वाचायला मिळते.

 – – – – 

ही माहिती आणि पुस्तकेही आपल्या परिचित वाचकांना, कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, मराठी विषयाचे विद्यार्थी यांना आवर्जून पाठवू! 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆“निरोगी रहा ” – लेखक / लेखिका : वैद्य परीक्षित शेवडे / वैद्य स्वराली शेंड्ये ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “निरोगी रहा ” – लेखक / लेखिका : वैद्य परीक्षित शेवडे / वैद्य स्वराली शेंड्ये ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : निरोगी रहा

लेखक: वैद्य परीक्षित शेवडे

 वैद्य स्वराली शेंडये

पृष्ठ: १२८

मूल्य: २२०₹ 

Prevention is better than cure म्हणजेच “आपण रोगाच्या प्रतिबंधाबाबत उपचारांपेक्षा अधिक सजग असायला हवं” हे आजच्या घडीला जगन्मान्य तत्त्व आहे. हा प्रतिबंध करण्याचा मार्ग म्हणजेच आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्या आणि ऋतुचर्या. या दोन्हींचं पालन आजच्या काळात कसं शक्य आहे, त्यातील तपशील, खाचखळगे यांसहच काही सोप्या पथ्याच्या रेसिपी, मानसिक आरोग्याची काळजी अशी पुरेपूर उपयुक्त माहिती असलेलं पुस्तक म्हणजे “निरोगी रहा” 

दैनंदिन जीवनात निरोगी आणि संतुलित राहण्यासाठी आयुर्वेदाच्या तत्त्वांवर आधारित मार्गदर्शन करणारे उपयुक्त पुस्तक. आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या विविध आरोग्य समस्यांवर सोप्या आणि व्यावहारिक पद्धतीने उपाय सांगण्यात आले आहेत.

या पुस्तकात आहार, दिनचर्या, मानसिक स्वास्थ्य, रोगप्रतिबंधक सवयी आणि नैसर्गिक आरोग्य व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. आयुर्वेदातील पारंपरिक ज्ञान आणि आजच्या जीवनशैलीचा समतोल साधणारे हे पुस्तक प्रत्येक कुटुंबासाठी उपयुक्त ठरेल.

पुस्तकातील वैशिष्ट्ये

— निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदिक मार्गदर्शन

— दैनंदिन आरोग्य टिप्स आणि सवयी

— मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याविषयी माहिती सोपे, व्यावहारिक आणि प्रभावी उपाय

 

.. सर्व वयोगटांसाठी उपयुक्त मार्गदर्शक.

 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares