☆ दोन लघुकथा – ‘सैनिकाची आई‘ / ‘मातीतच संपतो‘ ☆ श्री मयुरेश देशपांडे ☆
१) सैनिकाची आई…
मी मागे वळून पाहिलं आणि हातातली सतार अलगद खाली ठेवली. शारदा ताईंना झोप लागली होती. मी हळूच खोली बाहेर आले. ओसरीच्या पायऱ्यांवर खांबाला टेकून निवांत बसले. हि रात्र माझ्या आयुष्यात दरवर्षी येते. सकाळपासूनच शारदा ताई अस्वस्थ होतात. मनोसोक्त रडतात. जुन्या आठवणी सांगतात. अगदी रात्री उशिरा पर्यंत त्यांना झोप येत नाही. मग मी देवघरातल्या समईची वात सारखी करते. हातात सतार घेऊन देवापुढे बसते व एकेक अभंग गायला सुरवात करते. शारदा ताईच काय सारा आश्रम तल्लीन होऊन ऐकत असतो. कोणी साथ देतो, कोणी तान देतो तर कोणी नुसतच गुणगुणतो.
पाहता पाहता सारा आश्रम शांत झोपी जातो. चार पाच अभंगांनंतर तर शारदा ताईंनाही झोप लागते. आणि मग मी अशीच बाहेर येऊन खांबाला टेकून ओसरीच्या पायऱ्यांवर बसते. साऱ्या आश्रमाला धीर देणाऱ्या शारदाताई स्वतःला मात्र कधीच धीर देऊ शकल्या नाहीत. सगळ्यांना दुःख विसरायला शिकविणाऱ्या शारदाताई स्वतःचे दुःख कधीच विसरु शकल्या नाहीत.
हेमंतराव शहिद झाले तेव्हा अगदीच सुरवातीचे काही दिवस वगळता, त्या धैर्याने उभ्या राहिल्या. आदित्यला सैनिकी शाळेमध्ये आधीच घातले होते. तिथून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि मग लष्करातला बडा अधिकारी असा आदित्यचा प्रवास झपाट्याने झाला. तो वडिलांची जागा घेईल असे म्हणता म्हणता त्याने ती जागा घेतली सुद्धा. शारदा ताईंनी त्याला फोटोंमध्येच मोठा होताना पाहिले. आपले सर्व शिक्षण व लष्करातले पहिले पोस्टिंग संपवून पहिल्यावहिल्या अधिकृत सुट्टीवर तो घरी आला.
सुरुवातीला दार उघडले तेव्हा शारदाताईंना समोर हेमंतराव असल्याचाच भास झाला. तोच उंचधिप्पाड देह, तीच अधिकाऱ्याची टोपी, तोच कडक इस्त्री केलेला गणवेश, उजव्या खिश्याच्या वरती विविध पदकांची दाटी, पण मान मात्र विनम्रतेने खाली झुकलेली. आई आत घेणार नाहीयेस का? त्याच्या प्रश्नाने शारदाताई भानावर आल्या व समोर हेमंतराव नाही तर जणू त्यांचेच प्रतिरुप असलेला आपला मुलगा आदित्य आहे याची त्यांना जाणीव झाली.
आदित्य घरी आला आणि घराचे पुन्हा गोकूळ झाले. त्याच्या मित्रांचे येणे जाणे, त्यांचा गोंधळ, सारे काही त्या कानांत आणि डोळ्यांत साठवून घेत होत्या. त्याचे लाड पुरवता पुरवता त्याची सुट्टी कधी संपत आली हे कळलेच नाही. एके दिवशी भिंतीवरच्या कालनिर्णयावर फुली मारणाऱ्या आईला पाहून, आई मी सुट्टी वाढवून घेऊ का? तश्या बऱ्याच रजा आहेत बाकी, आदित्यने विचारले. इतर कोणाची आई असते ना, तर पटकन हो म्हणाले असते. पण मी एका सैनिकाची आई आहे, शारदाताईंनी आदित्यला आपले उत्तर सांगितले.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आदित्यला लवकर उठविले. आई झोपु दे ना, परत अशी झोप नाही मिळणार, आदित्य डोक्यावर गोधडी घेत म्हणाला. चल उठ लवकर, आज आपल्याला एका महत्वाच्या ठिकाणी जायचे आहे, शारदा ताईंनी एवढेच सांगितले. समोरच्या कमानीवर मोठ्या अक्षरांत मातोश्री वृद्धाश्रम असे लिहिले होते. त्याला काहीच कळत नव्हते. ते दोघे कार्यालयात गेले. या शारदा ताई, तुमचा फॉर्म भरुन तयार आहे, निर्मला ताईंनी दोघांचे हसून स्वागत केले.
आई हे काय चालले आहे? आदित्य जवळ जवळ ओरडलाच. शांत हो बाळा. आपण बाहेर पडल्यावर बोलू. हे बघ तुझे बाबा गेले तेव्हाच खरे तर मी एकटी पडले होते पण तुझी जबाबदारी होती म्हणून दिवस कसे गेले कळलेच नाही. आता तुझी जबाबदारी संपली आहे. तु कामावर चालला आहेस. कमीतकमी अकरा महिने तरी घरी परत येणार नाहीस. मग एवढे दिवस घर मला खायला उठेल. इथे माझ्या वयाच्या बायका आहेत, त्यांच्यात मी सहज मिसळून जाईन.
आदित्यला खरे तर आईचा निर्णय पटला नव्हता पण त्याचवेळी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याला निश्चिंत करत होता. आठवड्याभरात तो सैन्यात आणि शारदाताई आश्रमात परतल्या. इथे सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहता राहता इथल्या कधी झाल्या हेच कळाले नाही. मला तर त्यांनी आपली मुलगीच मानले होते. किंबहुना आश्रमातले सगळेच तसे म्हणतही होते. आम्ही दोघी एकमेकींवर जीवापाड प्रेम करत होतो. माझे संगीत माझे गाणे त्यांना प्रचंड आवडत होते.
तो दिवस आलाच, जो कुठल्याच सैनिकी कुटुंबाच्या जीवनात येऊ नये असे त्या कुटुंबाला कायम वाट असते. दारावरची तार आणि टिव्हीवरची बातमी एकाच वेळी आले. आदित्य नक्षलवाद्यांशी लढता लढता शहीद झाला होता. शारदा बाई कोसळल्याच. आणि यावेळी मात्र उभ्याच नाही राहिल्या. ज्यांनी आयुष्यात अनेकांना उभं केलं त्यांना कोणीच उभं करु शकले नाही. एरवी वर्षभर त्या नॉर्मल असतात. पण हा दिवस आला की कपाटात लपवलेला आदित्यचा फोटो बाहेर काढतात आणि दिवसभर रडत बसतात. अगदी रात्री उशिरा पर्यंत.
काही तरी वाजले आणि माझी तंद्री तुटली. मांजरच असावे बहुतेक. मी पुन्हा आत आले. शारदाताईंना शांत झोप लागली होती. त्यांच्या मानेखालची उशी नीट केली. अंगावर पांघरुण घातले आणि मीही आता बाजूच्याच पलंगावर झोपी गेले.
– लेखक म. ना. दे. (होरापंडीत मयुरेश देशपांडे)
+९१ ८९७५३ १२०५९
* * * *
(२) मातीतच संपतो…
“ये अंबूजा सिमेंट से बनी दिवार है, तुटेंगी नहीं|”, भिंतीवरती पिवळ्या रंगावर निळ्या रंगाने लिहिलेली अंबूजा सिमेंटची जाहिरात तीने पाहिली आणि इथच घर बांधू असे ती पटकन म्हणाली. माझ्यासाठी ती एक साधी झोपडी असली तरी तिच्यासाठी तीच घर होत. तीच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह बघून मी हि तीथेच झोपडी उभारायचे ठरविले. त्याच सोसायटीमध्ये मी सुरक्षारक्षक म्हणून कामाला असल्याने कोणी विरोध करायचाही प्रश्न नव्हता.
तिने हातातली वळकटी खाली ठेवली. मी हि डोक्यावरचे ओझे उतरवले. तीला सामानापाशीच हुशारीने थांबायला सांगून झोपडी उभारण्यासाठीचे सामान शोधायला निघालो. जवळच हे मंडपवाला होता. खूप विनवणी केली तेव्हा त्याने त्याच्याकडचे त्याच्यासाठी टाकाऊ पण माझ्यासाठी उपयुक्त असे काही बांबू दिले. पुढे थोड्याच अंतरावर एका राजकीय पक्षाचे कार्यालय होते. कार्यालयाच्या मागच्या अडगळीत काही जूने फ्लेक्स पडलेले होते. विनंती करुन ते फ्लेक्स उचलून आणले.
सामान ठेवले होते तिथे आलो. वाट पाहून बायकोने रस्त्यावरच अंग टाकले होते. नुकताच डोळा लागला असावा. उठवावे वाटत होते पण नाही उठवले. मी एकट्यानेच झोपडी बांधायला घेतली. एकाला एक बांबू जोडले. बाजूने व वरून फ्लेक्स बांधले. आतली जमीन थोडी सारखी केली. किमान आडोसा होईल असे बांबूचेच एक दार बनविले. मग एकेक करुन सामान आत ठेवले. जेव्हा तिच्या डोक्या खालची वळकटी फक्त आत ठेवायची बाकी राहिली, तेव्हा तिला उठवले.
आपल्याला झोप लागली हे लक्षात आल्यावर तीची तीलाच लाज वाटली. पण मग जेव्हा समोर उभारलेला रंगीबेरंगी महाल बघितला तेव्हा तिच्या आनंदाला सीमा उरली नाही. क्षणाचीही उसंत न घेता तिने आजूबाजूचे आंगण झाडून काढले. दारासमोरल्या मातीवर रेघोट्या ओढत नक्षीदार रांगोळी काढली. मग यलम्मा देवीचे नाव घेत रीतसर उजव्या पायाने तिने झोपडीत प्रवेश केला. माझ्या झोपडीमध्ये आज खऱ्या अर्थाने लक्ष्मी आली.
जुजबी लिहिता वाचता येणाऱ्या तिने झोपडीत प्रवेश करताच ती ओळ पुन्हा वाचली.. ” ये अंबूजा सिमेंट से बनी दिवार है, तुटेंगी नहीं |” आणि स्वतःशीच हसली. तिला चुलीसाठी विटा व लाकडं आणून दिली. पण बनवायच काय? मस्तपैकी काळ्या कोंबड्याचं वशाट आणा. फक्कड तांबडा रस्सा बनविती तुमच्यासाठी. आज आपला पहिला दिवस हाय ना व्ह. यलम्मा देवीला छानपैकी नैवेद दाखवू आणि सुरवात करु. ” तिची भोळी बाबडी श्रद्धा बोलली.
नविनच सोसायटी होती. अजून बांधकाम शंभर टक्के पूर्णभी झाल नव्हतं. काही बिर्हाड राहिला आली होती, काही यायची होती. मला बिल्डरनेच सुरक्षारक्षक म्हणून कामाला लावले. सहा महिने झालं असतील. माझं नवीनच लग्न झालेलं. किती दिस बाहेरच खाणार आणि किती दिसं बायकोपासून लांब राहणार म्हणून या वक्ताला तीलाबी सोबत घेऊन आलो. गाठीशी थोडी दमडी जमली होती त्यातुनच वशाट आणलं आणि थोडी मीठ मिरची. खोटं कशाला सांगा, वाटेत मापट भर लावून आलो होतो. तीला सांगणार नव्हतोच पण चेहऱ्यावरची तरतरी बघून तीला समजलेच. पहिलाच दिवस म्हणून तीहि काय बोलली नाय.
किती दिसांनी जवळ झोपत होतो. रात्रभर दोघांच्या डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळी उठायला उशीर झाला. मालक आले तेव्हा गेट उघडायला कोणीच नाही बघून चिडले पण पहिला दिवस म्हणून माफ केले. एकेक दिवस जाऊ लागले. आमचं बस्तान बसलं होतं. मी सुरक्षारक्षकाचं काम करत होतो. तीने पण सोसायटीत दोन कामे मिळवली होती. सगळे कसे छान चालले होते. आमचा संसार फुलला होता, त्याला दोन फळेबी आली होती.
एक दिवस ती काळरात्र आली. खरे तर गेली चार दिवस तुफान पाऊस पडत होता. पण आज जरा पावसाने रौद्ररुप धारण केले होते. कडाडणाऱ्या वीजा काळजात धडकी भरत होत्या. संध्याकाळी मालक गेला तसे मी गेट बंद करुन झोपडीकडे धाव घेतली. घराबाहेर पडता येत नाही म्हणून पोर कंटाळून गेली होती. त्यांच्याशी गप्पागोष्टी करता करता रात्र झाली. पावसाच्या आवाजाने झोप लागणे अशक्य होते, तरी दिवसभराच्या थकव्याने कशीबशी झोप लागली.
मध्यरात्री धडाम् करुन मोठा आवाज झाला. बायकोला पोरांपाशीच ठेवून मी बाहेर धावलो. सोसायटीच्या भिंतीला लागून असलेले मोठे झाड जमिन खचल्याने सोसायटीच्या कंपाउंड वॉलवर कोसळले होते. त्या कंपाउंड वॉलवर जीला लागून माझी झोपडी होती. मी मदतीसाठी धावणार तेवढयात दुसऱ्यांदा मोठा धडाम् आवाज झाला आणि त्या आवाजाबरोबर माझी दातखीळ बसली. कारण तो आवाज कंपाउंड वॉलची भिंत कोसळल्याचा होता. आणि त्या भिंतीखाली माझी संसार वेल तीला आलेली फळे सारे काही दबले गेले होते. त्यांचा आक्रोश त्या मातीखाली दाबला गेला होता कायमचाच.
माणूस मातीतून जन्म घेतो आणि मातीतच संपतो असे म्हणतात. मी आज ते अनुभवत होतो. मला राहून राहून माझ्या भोळ्याभाबड्या बायकोने जे वाक्य वाचले होते ते आठवत होते, ” ये अंबूजा सिमेंट से बनी दिवार है, तुटेंगी नहीं |”.
लेखक : म. ना. दे. (होरापंडीत मयुरेश देशपांडे)